म्हणती आजि वांचिलों जीवें
जवळी श्रीहरी होतां सवें
तंव ते गांईचे मेळावें
वाडियाकडें मोहरले ॥१॥
मग ते चालिले गोवर
वाजवीत वादयें खेळत खेळ
शिंगें कहाळा घागरघोळ
चांदिवे ध्वज उभारुनी ॥२॥
ऐशिया परमानंदकल्लोळीं
गाई आलिया वाडिया जवळी
तंव त्या गौळणी सकळी
आलिया दुडिया घेउनी ॥३॥
गौळी वत्सां पाचारिती
गोधना दुहावे ते करिती
गाई सुरवाडें दुभती
वत्सांही पाजिती तृप्तीवरी ॥४॥
संवगडे म्हणती चला घरां
जाऊं आतां शारंगधरा
मग मोहच्छायें मंदिरा
चालले गजरें मिरवत ॥५॥
तंव त्या तलगा गौळणी नारी
नानापरीच्या आरत्या करीं
घेऊनियां आत्मया श्रीहरी
ओवाळिती निजभावें ॥६॥
विचित्र पुष्पांचियां माळा
आवडी घालिती हरीच्या गळां
ऐसे मिरवित आले राउळा
येतां यशोदा देखिलें ॥७॥
तिणें करुनियां अंक्षवाणें
ओवाळिले जिवें मनें
तंव गोवळ बोलति बोलणें
जालें अपूर्व वनीं तें ॥८॥
निळा म्हणे तें ऐकवया
निवाडें बैसली यशोदा माया
गोवळ सांगती लगोनि पाया
थोर कौतुक देखिलें ॥९॥