नेत्र झांकविले ते – संत निळोबाराय अभंग – ११६

नेत्र झांकविले ते – संत निळोबाराय अभंग – ११६


नेत्र झांकविले ते हरी
कारण इतुलेंचि अभ्यंतरी
मज विराट झालियावरी
छळतील हे देखतां ॥१॥
तंव तें भावार्थी चोखडे
त्याणीं देखिलें तें निवाडें
मग नाचती कृष्णापुढें
कीर्ति त्याची वर्णित ॥२॥
म्हणति मागेंही याचिपरी
केलीं चरित्रें तुवां हरी
शेषिली पूतना निशाचरी
अघाबकांतें चिरिलें तें ॥३॥
तुझिये अंगीं सर्व कळा
नेतां ब्रम्हायानें आम्हां सकळां
तैसेंचि होऊनियां गोपाळा
दोहीं ठाई रक्षिलें ॥४॥
आजीं कळला तुझा महिमा
नेणतिया गोवळां जी आम्हां
करीं अपराध आमुचें क्षमा
तुज उच्छिष्टें चारिलीं तें ॥५॥
बेटया म्हणोन बोभाइलें
शिव्या देउनी आळविलें
खेळतां डावहि मागितले
भांडण केलें नेणतां तुज ॥६॥
निळा म्हणे सहस्त्रवरी
नमस्कार केले ऐसे हरी
तेणेंचि तोषोनियां उत्तरीं
बोले तुम्ही सखे माझे ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नेत्र झांकविले ते – संत निळोबाराय अभंग – ११६