सहजचि तुमचीं वंदिली – संत निळोबाराय अभंग – ११५०
सहजचि तुमचीं वंदिली पाऊलें ।
तवं मी माझें हें हिरोनि घेतलें ॥१॥
आतां कोण दर्शना येईल सांगा ।
स्वभाव कळल्यावरी तुमचा पांडुरंगा ॥२॥
हें काय तुम्हांसी बोलिलें विहीत ।
चोरोनियां घ्यावें आमुचें संचित ॥३॥
प्रारब्धें भोग जे दयावयासी येती ।
अभिलाषूनि तेहि भोगितां श्रीपती ॥४॥
आतां क्रियमाण संग्रह जो करावा ।
तोही वरिच्यावरी तुम्हांचि हरावा ॥५॥
अवघेंचि आमुचें घेऊनियां अंतीं ।
जीवभाव तेहि बुडवावें पुढती ॥६॥
निळा म्हणे सर्वस्वें उघडाच केला ।
तुमचिये संगतीं दैव हा लाधला ॥७॥