अग्नीची व्हावया शांती – संत निळोबाराय अभंग – ११५

अग्नीची व्हावया शांती – संत निळोबाराय अभंग – ११५


अग्नीची व्हावया शांती
उपाय आहे तुमच्याचि हातीं
लावोनियां बैसा पातीं
डोळेचि झांकुनी बळकट ॥१॥
उघडे ठेवितां चेतले वन्हीं
मग तो नाटोपे आम्हां लागुनी
सांडील अवघीयांसीच जाळुनी
झांका म्हणउनी निज नेत्र ॥२॥
गोवळ म्हणती कैसे डोळे
झांकउनी मारवितोसी रे सकळे
येरु म्हणे तुम्हां हें नकळे
तोटका या काळें ऐसाची ॥३॥
येथें न धरितांचि विश्वास
जळाल अवघेही नि:षेश
ऐसें सांगोनिया त्यांस
डोळे निज करें धरविले ॥४॥
मग आपण वाढोनियां श्रीहरी
जाहला विराटरुपिया गगनावरीं
मुख पसरोनियां श्वासेंची करी
वोढिल्या अग्निज्वाळा ॥५॥
पोटीं घालूनियां दावानळ
जाहला पहिल्याचि ऐसा गोपाळ
हें देखोनी अवघेची गोंवळ
बोटांसंघीं लक्षितां ॥६॥
तयां म्हणे उघडा नेत्र
ऐकोनी बोलती ते सर्वत्र
म्हणती देखिलें हें चरित्र
तूंचि गगनवरी वाढलासी ॥७॥
निजमुखें गिळिलें ज्वाळ
तूंचि तूं काळाचाहि काळ ॥ आजी देखिला तुझा खेळ
आम्हीं आपुल्या निजदृष्टीं ॥८॥
निळा म्हणे बोलोनी ऐसें
लोळतीं पायावरी उल्हासें
मनीं जाणोनियां विश्रवासें
हाचि परमात्मा ईश्वर ॥९॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अग्नीची व्हावया शांती – संत निळोबाराय अभंग – ११५