दाटलिया धुई आच्छादी – संत निळोबाराय अभंग – ११२९
दाटलिया धुई आच्छादी रवितेजा ।
त्याचिपरी माझा दोष बळी ॥१॥
न चलेचि पुढें तुमची ही युक्ति ।
सुदर्शन हातीं असोनियां ॥२॥
काय चाले बळ सागराचें वडवानळीं ।
करित उठी होळी जीवनाची ॥३॥
निळा म्हणे तैशापरी जी अनंता ।
माझिया संचिता न जिंकावें ॥४॥