पुढें गांईची खिल्लारें – संत निळोबाराय अभंग – ११२
पुढें गांईची खिल्लारें
मागें गोवळ आपण भारें
मुरलीवादन सप्तस्वरें
करीत चालत आनंदे ॥१॥
पांवयाच्या तलालोरी
डफहुडूक त्या भीतरीं
शंख कहाळा वाजवित कुसरीं
गोवळ नाचती भोंवतें ॥२॥
गाइ| चरती पांगोनी वनीं
मुख संतोष चारा वदनीं
कृष्णा दृष्टीं अवलोकुनी
तृप्त जीवनीं यथाकाळें ॥३॥
शीतळ छाया देखती जेथें
विलासे नाचत ठाकती तेथें
टिपरी रुमाल घेउनी हातें
मोडिती अंगे नानापरी ॥४॥
हुतुतु हमामा विटी दांडू
सुरकठया लगोरिया घेउनी चेंडू
झोंबिया घेऊनि दावती वाडू
आपुलिया निजशक्ति ॥५॥
नाना उमाणीं उगवितीं कोडीं
सांगती काहाण्हीया कडोविकडीं
गाणी गाती अति आवडी
करिती उध्दार रागांचे ॥६॥
निळा म्हणे माध्यान्हकाळीं बैसोनी कळंबावे तळीं
काढिल्या शिदोया माजीं वनमाळी
करिती आरोहणा स्वानंदें ॥७॥