ऐसें एकोनियां यशोदा
म्हणे तरी मी न सोडी तूंते कदा
अंतरलें काम माझा धंदा
राहें गोविंदा ऐसाचि ॥१॥
बोलोनियां तें ऐसें गेली
आपुल्या कामा वरीपडि झाली
पुढें कृष्णे युक्ति केली
अति विचित्र ते ऐका ॥२॥
मग त्या उपडुनियां उखळा
आला बाहेरीं तया वेळा
दावें तैसेंचि असतां गळा
उखळ आडकवी वृक्षेसी ॥३॥
विमलारर्जुन कुबेरनंदन
नारदवचनें शाप पावेन
होते राहिले वृक्ष होऊन
कृष्णचरणस्पशें उध्दरावया ॥४॥
त्याचें उदित झालें भाग्य
यालागीं येऊनियां श्रीरंग
करिते झाले तो प्रयोग
सावध मनें परियेसा ॥५॥
ते उभयतांहि शेजारीं
वाढले होते दिव्य सहस्त्रवर्षेंवरी
उंची पाहातां गगनोदरीं
शाखपल्लव डोलती ॥६॥
त्या उभयतां माजी उखळ
आडकवुनी कृष्ण् गोपाळ
तया नेटी देउनी चरणतळ
हेलावा देऊनि उपटिलें ॥७॥
तिहीं गर्जना केली कैसी
प्रळयकाळींची विदयुल्लता जैसी
उध्दार पावेनियां हरिचरणासी
वंदूनियां ते गेले ॥८॥
ऐकोनियां तो घोषगजर
यशोदा धंवली अति सत्वर
पाहे तंव तो सारंगधर
माजि वृक्षा पडियला ॥९॥
मग उचलूनियां करतळीं
आलंगिला हदयमेळीं
निढळ मेळउनी निढळीं
अवलोकीं वदन क्षणक्षणा ॥१०॥
म्हणे भ्यालिसी गे माझी माय
थोर केला म्यां अन्याय
उखळीं बांधलीसी हा अपाय
थोर वरुनि चूकला ॥११॥
मग सोडूनियां कंठीचें दावें
मुख पुसी निजपल्लवें
निळा म्हणे याचीं लाघवें
नेणवतीचि ब्रम्हादिकां ॥१२॥