देखोनि तें यशोदा – संत निळोबाराय अभंग – १०७
देखोनि तें यशोदा ऐकोनि गोठी
क्रोधें संतप्त झाली पोटीं
म्हणे हा चोरिया करितां महा हाटीं
न राहेचि मी काय करुं ॥१॥
किती तरी हे अपवाद
सोसूं जनाचे वेवाद
उदंड सांगताहि हा गोविंद
न सांडीचि खोडी आपुली ॥२॥
मग म्हणे तूं गोपाळा
न संडिशीचि आपुला चाळा
शिक्षा लावीन याचि वेळां
मग तूं शहाणा होशील ॥३॥
यावरी नेदीं घरात येऊं
तुजला न घाली खाऊं जेऊं
तुझिया खोडी माझा जिऊ
बहुत तपिंनला या काळें ॥४॥
मग लाऊनियां दावें गळां
नेऊनि बांधला त्या उखळा ॥ म्हणे सांडिता ऐसा चाळा
तुज सर्वथा न सोडीं ॥५॥
हांसती भोवत्या अवघ्या नारी
म्हणती करिशील आतां चोरी
नासिंले खादलें तें आजिवरी
फावलें ऐसें म्हणों नकों ॥६॥
यावरी येशी आमुचा घरां
चोरीये जरी दधीक्षीरा
तरी नेऊनियां कौसासुरा
हातीं देऊं तुजलागीं ॥७॥
ऐसें बोलोनियां सुंदरा
गेल्या आपुलिया मंदिरा
यशोदा म्हणे रे चक्रधरा
घरीं काय उणें तुज ॥८॥
निळा म्हणे बोले हरी
गोड न लागेचि तें निर्धारीं
चोरियेचेंचि आवडे भारी
करील याहिवरी चोरीया ॥९॥