संचित प्रारब्ध क्रियमाण
न सुटे प्रणियां भोगिल्याविण
यालागीं करावें हरीचें स्मरण
तुटेल बंधन मग त्यांचे ॥१॥
सतकर्म करितां विधियुक्त
माजी निषेधाचा पडे आघात
सांग अथवा व्यंग होत
होय तें संचित निश्चयेंसी ॥२॥
उत्तम अधम कर्मे घडती
जाणतां नेणतां पदरीं पडती
तींचि संचिते होऊनि ठाती
पुढें भोग दयावया ॥३॥
पापपुण्यात्मक कर्मे घडलीं
भोगितां उर्वरीत जीं राहिलीं
फळ दयावया उभीं ठाकलीं
प्रारब्धें लाभालाभदायके ॥४॥
क्रियमाणें जें आतां आचरे
सत्कमें अथवा अकर्माकारें
जें जें निपजे नित्य व्यवहारें
क्रियमाण ऐसें बोलिजे तें ॥५॥
आतां तिहींचेही निस्तरण
घडे जेणें ते ऐक खूण
संचितें घडे जन्ममरण
उत्तम अधम योनिव्दारें ॥६॥
जे जे योनी धरी जो जन्म
तेथींचे विहित त्याचि त्या स्वधर्म
सांग नव्हतां भोगणें कर्म
नव्हेचि सुटिका कल्पांतीं ॥७॥
आतां भलतेही योनीं जन्म होतां
अनुतापें भजे जो भगवंता
नामें त्याचीं गातां वानितां
दहन संचिता भक्तियोगें ॥८॥
यावरी प्रारब्धें भोग येती अंगा
भोगितां स्मरे जो पांडुरंगा
निस्तरे प्रालब्धां तो वेगा
पावे अंतरंगा श्रीहरीतें ॥९॥
जें जें नित्यांनी आचरत
तें ब्रम्हार्पण जो करित
अहंकृति न धरी फळ कामरहित
क्रियमाण जाळीत निष्कामता ॥१०॥
याचिलागीं निळा म्हणे
कर्मपाश तुटती येणें
विठोबाचिया नामस्मरणें
यातायाती चुकती ॥११॥