म्हणती दसवंतीये देख – संत निळोबाराय अभंग – १०६
म्हणती दसवंतीये देख देख
वोजे पाहे याचें मुख
लोणीं माखलें साजूक
आणि दहींही गिरबडलें ते वरी ॥१॥
पाहे यशोदा जंव निर्धारी
तंव माग देखे मुखावरी
मग झडपिती अवघ्या नारी
कैसें बोलत होतीसी ॥२॥
याचिपरी आमुच्या सुना
कुमारीही लाविल्या ध्याना
सांगता हें तुमच्या मना
सत्य नव्हतें वाटत ॥३॥
आतां शासन करिशील तरी
खोंडी सांडील हा वो निर्धारीं
नाहीं तरी नाकळे हरी
नित्य कलह तुम्हां आम्हां ॥४॥
लाडिका तरी बांध गळां
परी नको सोडूं हा मोकळा
आम्ही उत्तीर्ण आपुल्या बोला
सांगोनियां या काळें ॥५॥
यावरी चोरिये देखतां
न सोडें जिवें या तत्त्वतां
नेऊंनियां निज एकांता
बांधू गांठी जिवाचिये ॥६॥
येणें गोरसाची धुणी
करुनि फोडियेली दुधाणीं
त्याचाहि हिशेब तुज लागुनी
न देववे यशोदे सर्वथा ॥७॥
ऐशिया निकुरेंसी या नारी
शिव्याहि देती तोंडचिवरी
म्हणती यशोदे तुझी ही थोरी
नुरेल यावरी जाण गे ॥८॥
निळा म्हणे खादलें वित्त
देणें लागेल तुज तें सत्य
ऐसेही दावूनियां संकेत
ताडिती कृष्णा निज करें ॥९॥