सकळ मंत्रांमाजी मंत्र उत्तम ।
दोंनीं अक्षरें जगतां राम ।
निरसोनियां मायादि भ्रम ।
पाविजे निजधाम अनायसें ॥१॥
तैसाचि मंत्राराज प्रसिध्द ।
त्रि अक्षरीं जपतां गोविंद ।
नरनारी बाळकें शुध्द ।
पावती अच्युतपदातें ॥२॥
चतुराक्षरीं मंत्र सरळ ।
जपतां नारायण श्रीगोपाळ ।
चतुर्भज होती सकळ ।
स्वरुपता पावतीं ॥३॥
त्रि अक्षरीं मंत्रसार ।
विठ्ठल नामाचा उच्चार ।
निळा म्हणे करितां नर ।
न ये समोर कळीकाळ त्या ॥४॥