काली माजुम घेतला होता
गडियांसवें म्यां नेणतां
तेणेंचि आजि माझिया चित्ता
झाला विभ्रम ऐशापरी ॥१॥
न यें सोडाल आजि तरी
तुमचे घरीं न करीं चोरी
मस्तक ठेवितों पायांवरी
करा उपकार आजि मज ॥२॥
एकी म्हणती विश्वास नाहीं
याचिया शब्दाचा वो कांही
आजि सोडितां हा उदयांही
ऐसेंचि करील येउनी ॥३॥
अवघाचि चोरुनीया गोरस
नित्य खातो सावकाश
आमुचें घरीं नुरवी लेश
पहा माणसें रोडेलीं ॥४॥
आपुलिये हा सुटिकेसाठीं
उदंड सांगेल ऐशिया गोष्टी
परि निष्ठूर आणि कपटी
या ऐसा नाही भूमंडळीं ॥५॥
आतां यासि न्यावें तेथें
यशोदे दावावे निरुतें
तियेसि सत्य वाटत नव्हतं
फेडावा संदेह तियेचा ॥६॥
निळा म्हणे मग बांधोनी गळा
धुलकाविती अवघ्या बाळा ॥ गाळी वोपुनियां सकळां
आणिला धरुनी यशोदेपें ॥७॥