मग लाउनी शिंकियाच्या हारी
बैसल्या जागत आपुल्या घरीं
कवडाआड आणि माजघरीं
शिंकिया जवळी भोंवताल्या ॥१॥
पाटीये तळीं झांकोनी दीप
बैसल्या दवडोनियां झोंप
तंव हा सच्चिदानंदस्वरुप
आला चोरिये त्याचि घरां ॥२॥
गडी ठेवूनियां बाहेरी
चाहुली मारुनियां संचार करी
तंव या शिंकियाचिया हारी
चाचपडतां सांपडल्या॥३॥
तेणें हरिखेला अंतरीं
म्हणे आतां साधली चोरी
बरा निवाड फावला वरी
निजल्या नारी नेणती ॥४॥
गोड चाखोनियां तें पाहे
हातोहातीं लांबवीत जाय
दूध लोणी वरील साय
दहीं साजुक विरजलें ॥५॥
आपण खाये गडियां चारी
गोड आहे म्हणे हरी कुचकुचिती हळूचि करीं
म्हणतीं बाहेरी निघावें ॥६॥
तंव सांचल ऐकोनियां गौळणी
आवेशें धांविल्या अवघ्याजणी
दीप उघडिला तंव हा नयनीं
देखियला चोरिये भक्षितां ॥७॥
झडा घालुनियां वरी ॥ कवळिल्या अवघ्या नारीं
म्हणती कैसी करुनी चोरी
घरे आमुची बुडविली ॥८॥
निळा म्हणे बोलोनि ऐसें
चरणी बांधति आवेशे
तया किंव दावितसे
म्हणे मी आलों भुलोनिया ॥९॥