नाहींचि तुम्हां भीडचाड – संत निळोबाराय अभंग – १०३
नाहींचि तुम्हां भीडचाड
येथें करुं अल्याति बडबड
कृष्ण माझा अवघ्यांसीं गोड
तुम्हांसी कां गे वीट याचा ॥१॥
जाऊं नेणेचि बाहेरी
तयावरी घालितां गे तुम्ही चोरी
आलगटा अवघ्याचि नारी
नसतींच गाहाणीं आणित्या ॥२॥
घरीं काय त्या उणें झालें
जे तुम्हां घरी दूध दहीं चारिलें
नेऊनियां कोठें सांठविलें
कृष्ण खणार तें किती ॥३॥
लेंकरुं माझें कोडिसवाणें
विकारमात्र कांहींची नेणे
तयासी शिनळ चोर हें म्हणणें
फजीत पावणें आहे तुम्हां ॥४॥
जा गे आतां धरुनि आणा
खोटें शिनळिय येरी श्रीकृष्णा
नाहीं तरी फजीतपणा
व्यर्थचि पावाल या बोलीं ॥५॥
कृष्ण तो अंतर्बाह्य निर्मळ
जैसी कां शुध्द स्फटिक शीळ
तया चोरियेचा लावितां मळ
जिव्हा कांटतील तुमचिया ॥६॥
निळा म्हणे परिसोनी येरा
क्रोधेंचि चालिल्या आपुल्या घरा
म्हणती धरुनियां श्रीवरा
आणूं तैसाचि इयेपाशीं ॥७॥