गोवळसंगे चोरिया करी
शिंकी उतरुनियां बाहेरी
आणि फोडी गोवळकरीं
कवळ देत लोणियाचे ॥१॥
दूध तूप साय लोणी
दहीं हुडकूनियां आणी
खाय लवंडी आणि पोरा लागुनी
देऊनियां धणी सुखी करी ॥२॥
देउनी समर्थ हा घेणार
सर्वी सर्वात्मा ईश्वर
म्हणोनियां हा हुडकूनियां घर आणी बाहेरी लपविले ॥३॥
कोठेंहि उरों नेदिचि संचित आणी बाहेरीं ते अकस्मात
वाढूनि सौगडिया देत
आपणहि स्वीकारित त्यांच्यासंगे ॥४॥
देखोनियां तें वृध्द नारी
बोभाट करिती यशोदे व्दारी
म्हणती गे कुमारा आवरीं
नव्हाडी केली गोरसाची ॥५॥
नित्य संवकलासे आमुचे घरीं
धांवोनि तो निशीच्या भरीं
निद्रिस्त असतां शिकींचि उतरी
आणि गोवळां चारी गोरस ॥६॥
निळा म्हणे न सोसवे आतां
नित्य उपद्रव याचा होतां
आणखीही गुह्य गोष्टी सांगतां
होईल लौकिक आमुचाचि ॥७॥