संत निळोबाराय गाथा (मंगलाचरण)

संत निळोबाराय (लळित)

संत निळोबाराय (लळित)

२७४

असों चरणावरी तुमच्या ठेऊनियां मन । करुनियां कीर्तन रुपीं तुमचियां दृष्टी ॥१॥

होईल ते हो कैसी आमुची गती । नणों योगयुक्ति तप साधन दुसरें ॥२॥

सांगितलें संती करा नामाचा घोक । नलगे मग आणिक कृपा करील श्रीहरी ॥३॥

निळा म्हणे विश्वासें त्या राहिलों ठायी । ठेऊनियां पायीं जीवभाव सकळ ॥४॥

२७५

उचित अनुचित आम्ही नेणों नेणतीं । सर्वोविशीं मूढचि मती विदीत असावें ॥१॥

म्हणोनियां आतां कृपादृष्टी अवलोका । वैकुंठनायका नका उपेक्षा करुं ॥२॥

हीन दीन मूर्ख परि शरण तुम्हासी । आलो हषिकेशी अंगिकारावा ॥३॥

निळा म्हणे तुम्ही देवा कृपा सागर । मी  तंव किंकर लवण रेणू सानसा ॥४॥

२७६

गोड माझी वाणी तुम्हीं करुनि श्रीहरी । लावावी वैखरी कीर्तनस्तवनीं आपुलिये ॥१॥

इतुलेंनिचि सार्थक माझया होईल जन्माचें । अभयदान तुमचें ऐसें झालियावरी ॥२॥

बहुत दिवस आस्था मनीं वाहिली हेचि । करावी तुमची सेवा-स्तुति निजभावें ॥३॥

निळा म्हणे चरणावरीं ठेविली डोई । अपराध ते माझे कांहीं मना नाणावें ॥४॥

२७७

ठेऊनियां भाव तुमचिये चरणीं । बैसेन श्रवणीं वैष्णव करितां कीर्तन ॥१॥

याचिपरी सार्थक हा करीन काळ । जाऊं नेदी निर्फळ ऐसें आयुष्य नरदेह ॥२॥

यथामती वर्णीन तुमचे कीर्तिपवाडे । नाचोनी बागडे नाचोनी बागडे निर्लज्ज होउनी मानसीं ॥३॥

निळा म्हणे हेंचि आर्त निरंतर माझें । चरण यासी साक्ष तुझे पंढरीनाथा ॥४॥

२७८

तुमचीया बळें तुम्हांसवें खेळावें । आपल्या नाडावें मतिवादें धांवता ॥१॥

याचिसाठीं क्षणक्षणां विनंति करीं । ठेवावें मजवरी अवलोकन कृपेचें ॥२॥

तुम्हांसी न भजतां योगयाग सायास । तैंचि भवपाश होती फळें देऊनी ॥३॥

निळा म्हणे जप तप ध्यान संपत्ति । कृपेंविण तुमचे होती बंधना मूळ ॥४॥

२७९

दुजे नेणोनियां कांही । आठवितों तूतें देहीं ॥१॥

यासी साक्षी तूंचि कीं गा । अंतरींच्या पांडुरंगा ॥२॥

जे जे उठती संकल्प । मनी तें तें तुमचे रुप ॥३॥

निळा म्हणे चित्तें वित्तें । होतें जें जें कांहीं जातें ॥४॥

२८०

देतां घेतां येतां जातां । सदा तुझी संनिधता ॥१॥

नाहीचि कल्पांतीं वियोग । ऐसे व्यापियेले अंग ॥२॥

नाहींचि कल्पांतीं वियोग । ऐसें व्यापियेले अंग ॥३॥

सवप्न निद्रे आणि जागृती । अवघे ठायीं तुझीचि स्तुती ॥४॥

निळा म्हणे देखे ऐके संगें तुझया जें जें चोखे ॥५॥

२८१

त्रिवेणीसंगमी बुडती बहुत । नेघे प्रायश्चित त्यांचे गंगा ॥१॥

ज्यांचे कर्म जैसें भोगिती ते फळ । गंगा ती निर्मळ जैसी तैसी ॥२॥

बुडती जहाजें वायूचिया संगे । परि दोष नलगे वायूसी तो ॥३॥

निळा म्हणे तैसा परमात्मा श्रीहरी । वर्ते सर्वांतरी अलिप्तपणें ॥४॥

२८२

न मागों कांही तुम्हां धन वित्त संपत्ती । सोसुनी विपत्ती नाम गाऊं आवडी ॥१॥

न घेऊनियां भार जाणीव शहाणीव माथां । करुं तुमची कथा नित्यकाळ आवडी ॥२॥

वसउनि संतसमुदाय भोंवते । गाऊं नाचूं प्रेमें आठवुनि तुम्हातें ॥३॥

निळा म्हणे ऐशापरी सारुं आयुष्य । करुनियां दास्य राहों तुमचे चिंतनी ॥४॥

२८३

नामीं गोंवियली वाचा । मनीं संकल्प हा तुमचा ॥१॥

ऐसा वेष्टलों जी हरी । हातें पायें अवघ्यापरी ॥२॥

देखों जाय रुप तें दिठी । श्रवणीं त्याही तुमच्या गोष्टी ॥३॥

निळा म्हणे घरीं दारीं । देशी तूंचि देशांतरीं ॥४॥

२८४

नि:सीम भाव देखोनियां हरि । केली स्वीकारी पूजा त्याची ॥१॥

पत्र पुष्प तोय फल । घाली सकळ मुखींचि तें ॥२॥

कांहींची नेदी जाऊं वांया । पाहे भक्तांचिया हाताकडे ॥३॥

निळा म्हणे संतोष मानी । क्षीराब्धीहुनी परमामृता ॥४॥

२८५

परात्पररुपी ज्ञानाज्ञान आटे । परि हा लावी वाटे श्रुतीचिये ॥१॥

वेदविहितासी न पाडी अंतर । लाघविया थोर सूत्रधारी ॥२॥

भोगुनी गौळणी होय ब्रम्हचारी । अलिप्तपणें चोरी दहीं दूध ॥३॥

निळा म्हणे सर्व अग्निसंगे जळे । परि दोशा नातळे अग्नी जेवीं ॥४॥

२८६

पावो माझीं हेचि सेवा । करितों नित्यानित्य देवा ॥१॥

तुजचि आवडीच्या सुखें । गातों वार्णितों ते मुखें ॥२॥

पढतों ज्या ज्या नामावळीं । वाजवूंनियां हातें टाळीं ॥३॥

निळा म्हणे ध्यानीं मनीं । जें कां चिंतितों चिंतनीं ॥४॥

२८७

भाविकाचें अवघेंचि गोड । करुनि कोड स्वीकारी ॥१॥

भोळा नाथ पंढरीचा । न करी दासाचा अतिक्रम ॥२॥

न म्हणे रुक्ष थोडें कांही । घाली अवघेंही मुखींचि तें ॥३॥

निळा म्हणे कृपावंत । उभा तिष्ठत विटेवरीं ॥४॥

२८८

मागें पुढें अवघा हरी । घरीं दारीं हदयांत ॥१॥

याविण रितें न दिसे कोठें । सानें मोठें अणु रेणु ॥२॥

गगन दिशा महितळी । माजि पोकळीं तोचि तों ॥३॥

निळा म्हणे मनाबुध्दी । माजी संधी इंद्रियांच्या ॥४॥

२८९

राजा जाय तिकडे ऐश्वर्य संपत्ती । वैभवें चालती समागमें ॥१॥

वसे वनामाजी तेथें सर्व सिध्दी । घेऊनि समृध्दी वसतीपाशीं ॥२॥

नाहीं उणें धनावस्त्रा आणि भूषणा । अन्ना काष्ठा जीवना तृणा सैन्या ॥३॥

निळा म्हणे देवा तुम्ही लक्ष्मीवर । उभे कटीं कर जयापाशीं ॥४॥

२९०

राहो ध्यानीं मनीं हेंचि नित्य रुपडें । जे कां वाडेंकोडे आलें पुंडलिका भेटी ॥१॥

ठेवूनियां विटे दोन्ही चरण सुकुमार । विराजले कर सुंदर कटिप्रदेशीं ॥२॥

ज्यातें चिंतिताती योगी मुनिजन मानसीं । संत ज्यातें भजती नित्य कीर्तनआवेशीं ॥३॥

निळा म्हणे त्याविण दुजें नलगे मज कांहीं । जाणे अंतरीचें पांडुरंग सकळही ॥४॥


संत निळोबाराय गाथा । संत निळोबाराय अभंग । निळोबा अभंग । निळोबा गाथा । सर्व गाथा । निळोबाराय माहिती । पिंपळगाव मंदिर निळोबाराय । sant nilobaray gatha | sant nilobaray abhang | niloba abhang | niloba gatha | sarv gatha | nilobaray mahiti | nilobaray mandir pimpalgav | निळोबाराय लळीत   । nilobaray lalit ।

तुमच्या शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांतीला भेट द्या .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *