संत निळोबाराय (खेळ)
२२६
अंतरंग माझे गडी । न गमे तुम्हांवांचूनि घडी ॥१॥
या रे जवळीं फांकों नको । झकवल्यावसें कोणा लोकां ॥२॥
तुमचा गोड वाटे संग । शहाणे उबग मज त्यांचा ॥३॥
निळा म्हणे भाविकांप्रती । येऊनि काकुळती बोलतु ॥४॥
२२७
आतां माझ्या सहवासें रहा । होईल पहा कौतुक तें ॥१॥
चला जाऊं मांडू खेळ । म्हणती गोपाळ बहुत बरें ॥२॥
खेळों हुतुतु वांटुनि गडी । पुढेंहि परवडि विटिदांडू ॥३॥
निळा म्हणे श्रीहरि शहाणा । नागवेचि कोण डाया तळीं ॥४॥
२२८
आहाडे पाहाडे गे वावुगेचि झगडे । नको करुं बाई आतां पाहे मागें पुढें ॥१॥
सावळा श्रीरंग गे व्यापूनि असे जग । त्यासि नव्हे क्षत ऐसे बोल बोले चांग ॥२॥
वेडया वाकुडया गोठी गे नको काढूं वोठी । ध्यानीं मनीं गीतीं गाई कान्हो जगजेठी ॥३॥
निळा म्हणे निंदास्तुति जयासि समान । त्याचि सवें बोल उणे करिल बहुमान ॥४॥
२२९
खेळवी चालवी । हातीं धरुनियां नाचवी ॥१॥
ऐसी कृपेची ओतली । माझी विठाई माउली ॥२॥
जाणे भुक तहान । वारा लागों नेदी ऊन ॥३॥
निळा म्हणे लाड । पुरवी करुनियां कोड ॥४॥
२३०
चुचकारुनि गोधनें बैसविलीं आखरीं । म्हणती याहो श्रीहरी खेळों आतां ॥१॥
धावतीं वोढाळें आवरिलीं सकळें । झालों तुझिया बळें बळीवंत ॥२॥
नाचवीसी तैसे नाचों सुखें आतां । काळाचिया माथां ठेवूनि पाय ॥३॥
निळा म्हणे केलों सांगाती दैवाचे । देऊनि सुखाचें भोजन आजी ॥४॥
२३१
पुन्हां पेहरंब्याच्या सुखें गे गाई हरिमुखें । वाजवुनी टाळी रंगीनाचोनी हरिखें ॥१॥
देईल तोचि पानें गे गौरवुनी मानें । खोबरियाच्या वाटया माळा गळांचीं सुमनें ॥२॥
उदार हा दानीं गे लोकीं त्रिभुवनीं । तोचि ध्याई चित्तीं आतां करिल सुखा धणी ॥३॥
निळा म्हणे सर्व खेळीं खेळा साक्षभूत । तोचि जंनी वनीं सये नांदे हदयांत ॥४॥
२३२
बैसवूनि आले गोधनें आखरीं खेळ नानापरी मांडियेला ॥१॥
वाजविती पावे मोह्या घमुती । छंदें त्या नाचती गाती ब्रीदें ॥२॥
आलके सेलके हमामा हुंबरी । झोंब्या घेती कुसरी निवडुनी गडी ॥३॥
लगोरियाचे चेंडु सुरकाडी मुरदांग । नानापरि आंग मोडुनियां ॥४॥
निळा म्हणे हरी पाहोनी निराळा । अवघियांच्या खेळा साक्षपणें ॥५॥
२३३
मिळालें गोपाळ बैसलें पाळीं । मध्यें वनमाळी विराजला ॥१॥
या रे म्हणती खेळ मांडू । विटीदांडू लगोरीचा ॥२॥
हुंबरी बा रे नाचों फेरे । टिपरी अखरे भोंवताली ॥३॥
निळा म्हणे गाऊनि वाचें । कान्होबाचे पवाडे ॥४॥
२३४
करितां उसी हातां नये चेंडु गमाविला । धरुनि कानिं पाठिवरी बैसविती मुला ॥१॥
म्हणती म्हणे कीर । नाहींतरी घेंई फेर ॥२॥
अधिके अधिक्वरि साया घेऊं येती । गमावितां चेंडु हाल अवघेचि पहाती ॥३॥
निळा म्हणोनियां लावि लक्षडोळां । देईल हातीं चेंडु हरि कृपेचा कोवळा ॥४॥
२३५
खेळों कोलकाठी पुढें धांवसील वेगें । वारुनि वरिच्या वरि राखो नेणसी तूं आंगे ॥१॥
आतां खेळ कोलकाठी । रे गोपाळ धरुनि दृष्टी ॥२॥
राखों जातां दांडे सिवताती आग । नावरती तुज तरी वाउगेचि सोंग ॥३॥
निळा म्हणे वस्तादा करि नंदाचा नंदन । तोचि देईल विदया तुज करील प्रवीण ॥४॥
२३६
धरुनि हातीं हात पोरा धरिसी चिकाटी । न सुटेसि मग बाळिया सांपडता मुष्टी ॥१॥
धरिसी तरी धरि एक हरी चित्तीं मनीं । नाहीं तरी अहंकार गोविल वेसनिं ॥२॥
सोडवितां न सुटे त्या न सिवे आभिमाना । वांयां व्यर्थ कुंथोनियां पडसिल पतना ॥३॥
निळा म्हणे अंतरीचें जाणे हरि सर्व । तया हातिं हात देतां देईल तो वैभव ॥४॥
२३७
कपाळ झेटि मिसे बोट लावितेसी लल्लाटीं । तेंचि नमन अर्पी बाई कान्हो जगजेठी ॥१॥
सहलाचिया खेळा गे जोडि घननीळा । नलगे कांही घेणें देणें परि हा तो जवळा ॥२॥
नमन हेंचि निज गे परमार्थाचें बिज । सहज भावें नमुं जातां जोडे अघोक्षज ॥३॥
निळा महणे आतां गे वर्म आले आतां । श्रीहरीच्या संगसुखें गाऊं गुणकथा ॥४॥
२३८
झेटिमेटी बाईगे लवे हरिच्या पायीं । नमन नम्रतां हेचि परमार्थाचा सोई ॥१॥
निढळासी बोट लावितेसी वेळोवेळां । नमनाचि होतें सहज खेळतां या खेळा ॥२॥
उत्तम हा खेळ गे खेळतां निर्मळ । नमनीं नमितां हातां येतो हा गोपाळ ॥३॥
निळा म्हणे जग तुज करिल कृपा मग । येऊनियां वास करितां ह्रदयीं श्रीरंग ॥४॥
२३९
तारुण्याच्या बळें घेऊं धांवाशिल झोंबी । पडलिया तळीं हांसो लागतील उभी ॥१॥
घेसी तरी घेई हरीसवें घाली मिठी । नेदी पडो तोचि वंदय करील ये सुष्टी ॥२॥
एकाहूनि एक बळी नये तुझया ध्याना । कुंथोनियां येसी तळा होईल तनाना ॥३॥
निळा म्हणे झोंबीलोंबी घेंई काळासवें । श्रीहरीच्या बळें मग वांटसील नांवे ॥४॥
२४०
टिपरियाचे घाई गे नाच सुखें बाई । गितीं गाऊनियां हरिचें संगमसुख घई ॥१॥
नाचोनियां फेरि गे गुण त्याचे उच्चारी । जेणें काग बग रिठा मर्दियले वैरी ॥२॥
ऐसें गाई गाणें गे हरि जोडे जेणें । येर येऊं नेदी वाचे लटकी ते वांयाणे ॥३॥
निळा म्हणे नामें गे तोडी मरणजन्में । ऐसा हरि गीतीं गातां हरतील कर्मे ॥४॥
२४१
खेळों पंडखडे गे बैसोनि निवाडे । आधीं उचली एक मग दोनि घेंई पुढें ॥१॥
सावधान चालि गे नेमाचेचि झेलि । दोन तीन पांच सात सांडी येक उचली ॥२॥
नेदी लागो ढका दुसरियासि झोका । हळूचि घेंई उचलूनियां तरिच खेळ निका ॥३॥
निळा म्हणे हरि गे साक्ष निरंतरी । तोचि जाणे सर्व आहे तुज मजही माझारी ॥४॥
२४२
तरिच पिंग्या गोडि गे लावोनि आंग मोडी । नाहीं तरी परती सर म्हणती जा घांगडी ॥१॥
फिरविसी मान जरी हरीतें लक्षून । तरीच खेळ रुचेल तुझा मानवती जन ॥२॥
राये उभी नीट गे होउनियां धीट । नाहींतरी झोंके खातां म्हणती फटफट ॥३॥
निळा म्हणे श्रीहरि गे आठवी अंतरीं । तरीच पिंगा मानेल जगा धन्य म्हणती नारी ॥४॥
२४३
पिंगा म्हणिजे पिलंगोनि भिरभिरियाचे परी । फिराविसी माज मान तरि तुझी थोरी ॥१॥
चित्त हरिवरी गे ठेवूनि दे भोंवरी । नाहींतरी सर परती येथूनि जाय दुरी ॥२॥
वाउगाचि ताठा गे नाहीं वळवटा । येथें नाहिं काम तुझें जाई आल्या वाटा ॥३॥
निळा म्हणे निजानंदे कांपवी शरीर । धरुनियां निज मनीं रुक्मिणीचा वर ॥४॥
२४४
फिरविसी मान तरी पिंग्याच्या महिमान । नाहींतरी सरे परती जाई वो येथून ॥१॥
धरी हरि चित्तीं गे पिंगयाच्या निगुती । नाहींतरी वायां जासी भोवंडीचे भ्रांती ॥२॥
मोडशील माजगे तरीच पिंगा साजे । लाटण्याऐसी न लवतां फजितीचें भोज ॥३॥
निळा म्हणे सांगितले धरी हित कानीं । तरीच पिंगा मोड तुझा श्रीहरिचिंतनीं ॥४॥
२४५
फुंकिसी जगा गडी गे तरि घालीं फुगडी । नाहीं तरी नको करुं फजिती रोकडी ॥१॥
मोडीं आंग बाई गे नाचण्याचे सोयी । आठवूनि श्रीहरिचा निजानंद देहीं ॥२॥
त्या नांव फुगडी गे बंधनातें तोडी । नाहीं तरि कांपवूनि काय टिया मांडी ॥३॥
निळा म्हणे जोडी गे देवासवें गडी । आठवूनि ध्यानीं मनीं रुप घडी घडी ॥४॥
२४६
पेहरंब्याचे सोई गे सारविसी भुई । परि येथें तेथें असे अवघाचि हरि पाही ॥१॥
कापवितां हात जरी सावधान चित्त । तरीच होईल मान न पवतां घातपात ॥२॥
नाचविसी पाय गे घोळसूनि भोय । परि नग्न दाखवितां जगीं हासे होय ॥३॥
निळा म्हणे बरा गे विचार करी धीरा । आठवूनि हदयांत राहे शारंगधरा ॥४॥
२४७
समान नीट दोही आंगे पोरा खेळे मुरदांगे । नाहीं तरी जासि वायां चुकवितां आंगें ॥१॥
खेळ सख्या खेळा । लक्षूनि हरी डोळा ॥२॥
सांडूनि मर्यादा जरि घालिसी पाउलें । तरी होसि फजित पोरा मारितील मुलें ॥३॥
निळा म्हणे चिप चरणे धरुनियां निघ । न पडसी कोडियांत ध्यातां हा श्रीरंग ॥४॥
२४८
तरिच बरवंटा गे लई लई लखोटा । फिरोनियां नवजसी यमपंथें वाटा ॥१॥
लखोटयाच्या भारें गे नवजाये चाचरी । धरुनियां तारा निजवृत्ति हे सावरी ॥२॥
हरीचिया छंदे गे डोल ब्रम्हानंदे । घालूनियां पायातळीं इंद्रचंद्रपदें ॥३॥
निळा म्हणे खेळीं गे जोडी वनमाळी । नाहिं तरि मायामोहें पडशील जाळीं ॥४॥
२४९
पाडूनि लगोया चेंडुवाच्या एका घायें । सुखी खेळे खेळ साह्य करुनि हरीचे पाय ॥१॥
खेळे ऐसा खेळ । मनीं धरुनि घननीळ ॥२॥
उडोनिया जातां चेंडु न सांभाळे उसी । धांवतांचि मरती पोरें होतीं कासाविसी ॥३॥
निळा म्हणे झेलूनियां घेंई वरिच्यावरी । एकविध भावें शरण जाऊनियां हरी ॥४॥
२५०
लगोरिया मांडूनि पोरा वांटशील गडी । निर्बळाच्या संगे डाव देतां येसी रडी ॥१॥
न करीं ऐसें आतां । करीं गडी श्रीअनंता ॥२॥
मारितांचि लगोया आधीं येतो हाता डाव । चुकलिया व्याहाण वाटी हांसतात सर्व ॥३॥
निळा म्हणे वांयांविण नको पावों खेदा । याचिलागीं न विसंगे श्रीहरि गोविंदा ॥४॥
२५१
वांटुनियां गडी चेंडु मांडियेली फळी । मेलासी धांवतां कान्हो नाटोपेचि बळी ॥१॥
येईल चेंडू हातारे । हरिसी शरण जातां ॥२॥
पाडिल्या लगोया जेणें तेणेंचि नेला डावो । वाउगीची शीणती येरें धांवतां गेले पावो ॥३॥
निळा म्हणे शरण गोपाळा जांई करीं तातडी । तरीच चेंडु येईल हातां पांगविसी गडी ॥४॥
२५२
खेळ मांडी गडियांसवें । आपण लपावें लपवी त्यां ॥१॥
म्हणे अवघे झांका डोळे । आपण पळे पळवी त्यां ॥२॥
आला डाव दयावी पाळी । मागे जवळी गडियांही ॥३॥ निळा म्हणे पाठिवरी । बैसे हरी बैसे हरी बैसवी त्यां ॥४॥
२५३
चाल म्हणसी बाईगे खेळों लपंडाई । जेथें तेथें साक्ष कान्हा लपो कोणें ठाई ॥१॥
झाकुनियां डोळा गे लपविली चपळा । लेपों जाति जेथें तेथें कलकलिती बाळा ॥२॥
पडसाई नसे गे अवघाचि प्रकाशे । सर्वठाई व्यापूनि आत्म वनमाळि वसे ॥३॥
निळा म्हणे खेळगे अवघाचि हो पळ । जेथें तेथें साक्षपणें वतें हा गोपाळ ॥४॥
२५४
म्हणसी कडवसां गे मायेचिया बैसा । मायाचि नाहीं मिथ्यापणें निजबोधप्रकाशा ॥१॥
लपों कोणीकडे गे सांग बाई निवाडें । अविदयाही म्हणसी तरी ते न दिसे निवाडे ॥२॥
कैंचें मी माझें हें गे झांकोळिलें तेजें । अवघी आत्मराजें माझया उजळीं निजें ॥३॥
निळा म्हणे नुरे गे लपणेंचि वोंसरे । याचिया प्रकाशें उजळले दरे खोरें ॥४॥
२५५
विटि दांडू भला रे तरीच मारीं टोला । नाहीं तरि डाव घेतां धांवडिती मुला ॥१॥
सावधान पाहे रे हरीचि चित्तीं ध्याये । न राहोनि निदसुरा खेळाच्या प्रवाहें ॥२॥
हाणें नीट दांडू रे नाहीं तरी नाडू । वाउगाचि टोला होतां पावसील दंडू ॥३॥
निळा म्हणे हरिमुखें म्हणतांचि सुनेति । न चुके जो त्वरा करी तोचि पावे कीर्ति ॥४॥
२५६
विटिया दांडू मांडिती खेळा । मेळवूनि मेळा संवगडियांचा ॥१॥
सुं म्हणोनियां मारिती टोला । हांसती त्याला डाव घेतां ॥२॥
धांवती एक ते उभेचि ठाकती । जिंकोनियां मानिती आपण धन्य ॥३॥
निळा म्हणे खेळ मोडा रे गडि हो । कान्होबाचे पाहों पाय आतां ॥४॥
२५७
खेळ खेळ झेंपा गे आठवि चिद्रुपा । नाहिंतरि पुन:पुन्हां न चुकति खेपा ॥१॥
घेंई बारवोटीं गे काढी सागरगोटी । जेणें अर्थ स्वार्थ परमार्थ पडे पोटीं ॥२॥
बरवि घालि झेंप गे लांबउनि हात । नाहिं तरी लाजोनियां आयुष्या करिसि घात ॥३॥
निळा म्हणे डोले गे हरीचिया तोलें । जेणें इहपरलोकीं विकसिल मोलें ॥४॥
२५८
चढोनियां झाडा पोरा खेळसी सुरकांडी । निसरतां हात पाय माझा होईल मोडी ॥१॥
धरुनी हरि चित्तिसी खेळे वरिझाडा । अभिमानें जासी तरी होईल चुरा हाडा ॥२॥
दिसती त्या खाधा पोरा मोठयापरी ठीसरी । मोडती आंगभारें याचा विश्वास न धरीं ॥३॥
निळा म्हणे सांगितलें धरि चित्तें मनें । मग तूं चढेवरी सुखें हिंडे खादयापानें ॥४॥
२५९
सूरकांडी बैसोनि खोडीं चढसी झाडावरी । मोडलिया डाहाळी खांदी पडशील अघोरीं ॥१॥
वेंघ ऐशावरी घेऊनि सवें हरि ॥२॥
जगडवाळ झाड वरी खांदयाहि वांकुडया । उलंडल्या वरुनि हात मोडतील मांडया ॥३॥
निळा म्हणे श्रीहरी ते दृष्टी धरुनियां । वेंघे वरी जाई दुरी न पवसी अपाया ॥४॥
२६०
आंगा आणुनि वारें पोरा घालिसि हमामा । निघोनियां जाईल पुढें पडासे येऊनि दमा ॥१॥
घुमे एक्याभावें । हा गोपाळ घेउनि सवें ॥२॥
तोंडा येतो फेंस पुटिला नाचसिल बा रे । पडतां निसतोश मग हांसतिल पोरें ॥३॥
निळा म्हणे सकळही सोडुनियां तमा । एका हरिविण तया नांव हमामा ॥४॥
२६१
धरुनियां श्वास पोटीं सेवो पहासी हाल । न पवसी स्थळ भोंवतां गडियांचा मेळ ॥१॥
हुतुतु हुतुतु किती करिसी वेळोवेळां । होऊनियां नम्र भजे घननीळ सांवळा ॥२॥
धांवतां अविचारें पोरें धरिती टांगे । चलतां वळ मागें पडशील उगे ॥३॥
निळा म्हणे सांडूनियां हुतूतूचा बार । आठवी हा ध्यानीं मनीं नंदाचा कुमर ॥४॥
२६२
जाईजण्या बळें पोरा घालिसी हुंबरी । विचकिसी दांत पुढें पडसिल फेरी ॥१॥
पाहे हरिकडे । मग हुंबरी घाली कोडें ॥२॥
उडसील बळें ज्याच्या वोळखे तो आधीं । नाहीं तरि वायां जासी न पडे उपाधी ॥३॥
निळा म्हणे सांगितलें हीत धरी पोटीं । निजभावें शरण रिघे कान्हो जगजेठी ॥४॥
२६३
मी तों नेणें याची लीळा । अकळकळा खेळ खेळे ॥१॥
पुढील सूचना जाणोनियां । आधींच उपाया करुनी ठेवी ॥२॥
निमित्य दावूनियां आणिकाचें । आपणचिं त्याचें रुप धरी ॥३॥
निळा म्हणे नवल पोटीं । वाटे शेवटीं मग कळे ॥४॥
२६४
सरलियां खेळा गे म्हणती अवघ्या बाळा । आरते आरती करुं नंदाच्या गोवळा ॥१॥
हाचि जीव प्राण सोयरा सज्जन । ओवाळितां यासि बाई निवे तनुमन ॥२॥
करुनियां आरतीं पंचप्राण ज्योती । मिळोनियां सकळां बाळा श्रीमुख पाहाती ॥३॥
निळा म्हणे वेगळे धन्य पर्वकाळ । साधला हा आजि येथें आळवूं गोपाळ ॥४॥
२६५
हरीच्या पायीं विश्वासलें । सवंगडे झाले म्हणउनी ॥१॥
दिवस रातीं नव्हतां तुटी । सांगती गोठी आलोकिका ॥२॥
ब्रम्हांनदें खेळती खेळ । करिती कल्लोळ गीतवादयें ॥३॥
निळा म्हणे निर्भय चित्तें । नाणती काळातें निजदृष्टी ॥४॥
२६६
आतां मी पुसेन तें सांगा रे उमाणें । तुम्ही आलेती कोठुनी जाणें कोठें ॥१॥
मग विचारती गोवळ म्हणती नेणों मूळ । ऐसेचि आम्ही आढळ दास तुझे ॥२॥
म्हणतो नंदाच्या पोसण्या । दारसुण्या दासाच्या ॥३॥
जेथूनि तुझें येणें तेथुनि आमुचें जीणें । जाशील तेव्हां जाणें तुजचि संगे ॥४॥
निळा म्हणे ऐकोनियां संतोषले हरी । म्हणती यारे यावरी खेळ खेळों ॥५॥
२६७
गोपाळ म्हणती कान्हया आमुचीं उमाणीं । सांगसी तरि चरणीं ठेंवूं माथा ॥१॥
यावरीं श्रीहरि बोले मधुराक्षरीं । पुसा रे झडकरी विलंब नका ॥२॥
मीचि मज न देखें मी माझें नोळखें । कान्हो कोण्या मुखें सांगे आतां ॥३॥
तंव बोले गोविंदु ऐका रे सावधु बोधीं विराला बोधु म्हणोनियां ॥४॥
एक म्हणती गोपाळा । देखणा माझा डोळा । तरी न देखो मातें आंधळा कैसेनि झाला ॥५॥
तंव कृष्ण म्हणे दयोतक तूंची प्रकाशक । मृगजळ केंवीं अर्क देखेल सांगे ॥६॥
एक म्हणती गडी रसना रस निवडी । तरि कां ने घे गोडी आपुली आपण ॥७॥
निळा म्हणे कान्हया बोलें आमुच्या काजा । सिध्दी गेलें गुज पावलेती ॥८॥
२६८
घालितां उमाणीं पोरा नुमजति तुज । उकलूनियां हरि घेई हदईचें निज ॥१॥
असोनियां चराचरीं न दिसे तें काय । नाहीं जया कान डोळे मुख हात पाय ॥२॥
एक ना दिसें तें काय । नाहीं जया कान डोळे मुख हात पाय ॥३॥
एक ना अनेक नव्हे नव्हेचि कांहिबाहीं । नसोनियां तेंचि वसे अखंड देहादेहीं ॥४॥
निळा म्हणे सांग माझें ऐकें हें उमाणें । नेणवेत रिपुस सुखे हरिचीं हीं लक्षणें ॥५॥
२६९
म्हैस वेलि देतां सेलि होंसि कासाविस । येईल पुढें थेटे पडसें आयुष्याचा नाश ॥१॥
बुड हरि सवें । देहभाव उरनिभावें ॥२॥
दरडिवरी राहोनि उभा मारिसी किराणें । तळींचा धोंडा नेणोनि पोरा जाशील जिवें प्राणें ॥३॥
म्हणे निळा सांडूनि खेळा श्रीहरीतें भज । आक्षोम जळ न चले बळ होशील निर्बुज ॥४॥
२७०
गोपाळ विनोदें बोलती । तिरस्कारिती गोविंदा ॥१॥
लाज ना भये नाहीं काम यासी । मोकळा सकळांसी ठाउका असें ॥२॥
उगाचि बैसे पाहे खेळ । भोवंडा सकळ आपणांतूनि ॥३॥
निळा म्हणे भोगुनी सोळा सहस्त्र नारी । कैसा ब्रम्हचारी म्हणवितसे ॥४॥
२७१
देउनी भातुकें । पुढें नाचवी कौतुकें ॥१॥
हांसोनियां नवल करी । कृपादृष्टी तयावरी ॥२॥
बोबडें बोलणें । त्याचें म्हणे कोडिसवाणें ॥३॥
निळा म्हणे प्रीति करी । खेळविला उरावरी ॥४॥
२७२
देतां शिव्या हांसो लागे । निंदा श्लाघ्ये ऐकोनी ॥१॥
करिती त्यांचे असघेंचि गोड । करुनि कोड स्वीकारी ॥२॥
जेवितां देती उष्टावळी । घाली कवळी मुखींचि त्या ॥३॥
निळा म्हणे धणीवरि धाले । म्हणे मी पावलों पाहुणेर ॥४॥
२७३
खेळे हेटि मेटी नाचे एकाचि पायावरी । धांवोनियां सिव आतां आत्मया श्रीहरि ॥१॥
तरिच खेळ बरा रे । नाहिंतरी चेरा ॥२॥
धांवति तो पोरें पळतां धरि वेगावत । सारुनिया मागें गिती गाई भगवंत ॥३॥
निळा म्हणे चपळपणें करि कार्यसिध्दी । नाहीं तरी पोधा होता न पवसी कधीं ॥४॥
तुमच्या शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांतीला भेट द्या .