संत निळोबाराय गाथा (मंगलाचरण)

संत निळोबाराय (ज्ञानपर)

संत निळोबाराय (ज्ञानपर)

१४८३

एकापासूनी झालें विश्व । विश्वामाजीं एकचि अंश ॥१॥

जैसे शून्यापासुनी अंक । झाले भांदितां नुरेचि लेख ॥२॥

शून्या नुठितां शून्यपणें । कैंचें एका एक होणें ॥३॥

निळा म्हणे भक्तचि नाहीं । कैचा देवहि तये ठायीं ॥४॥

१४८४

एक बैसे सिंहासनीं । कर जोडोनी एक उभा ॥१॥

एक पूजा स्वीकारित । एक करित निजांगे ॥२॥

मुळीं पाहतां दोघे एक । परि कौतुक दाखविलें ॥३॥

निळा म्हणे सेवक स्वामी । पुरुषोत्तमीं हे मिथ्या ॥४॥

१४८५

एकीं एकपणा ठाव । नसोनि झाला सर्वा सर्व ॥१॥

जैसें गगन घटीं मठीं । दिसोन आपण आपल्या पोटीं ॥२॥

येणें होणें नाणीं मनें । आपींआप संचलेपणें ॥३॥

निळा म्हणे याची कळा । नेणे हाहि न देखे डोळां ॥४॥

१४८६

अंगकांति प्रकाशली । सूर्या दिधली किंचितसी ॥१॥

तेणेंचि प्रकाशला भानु । झाला तो नयनु त्रैलोक्या ॥२॥

तैसेंची चंद्रा जीवनमृत । दिधलें किंचित श्रीहरी ॥३॥

निळा म्हणे तेणेंचि जगें । निववित अंगें मयंकु ॥४॥

१४८७

कल्पनातीत झालें मन । जैसें गगन निरभ्र ॥१॥

म्हणोनिां ऐक्य आलें । स्वरुपीं ठेलें निश्चळ ॥२॥

नित्यानंदे झाली तृप्ती । देखतां भूती भगवंत ॥३॥

निळा म्हणे जडलें पदीं । निरावधी विठठलीं ॥४॥

१४८८

काय वर्णूं याचे गुण । ज्याचें त्रिभुवन रुपस ॥१॥

चंद्र सूर्य तारांगणा । दीप्ति हुताशना ज्याचेनी ॥२॥

जेणें वाड केलें गगन । दिधलें आसन वसुंधरे ॥३॥

निळा म्हणे धरिला मेरु । भरिला सागरु दिव्य क्षीरें ॥४॥

१४८९

कांहींच न होऊनि विस्तारला । बहुरुपी हा एकला ॥१॥

नवल विचित्र हेंचि वाटे । कैसा नेटोनि ठेला नटें ॥२॥

एका ऐसा न होऊनि एक । नानाकोंरे हा अनेक ॥३॥

निळा म्हणे नट लाघवी । शेखीं वेगळा गोसावी ॥४॥

१४९०

कैसा याचा वेध जाणती अनुभवी । जयां आहे ठावी कृपा याची ॥१॥

न ये तें दावितां सांगतांहि परी । वर्ते जें माझारीं भुलवूनियां ॥२॥

नेदीचि बाहेरीं उमसों बुध्दि मना । भरुनियां भावना झांकोळिली ॥३॥

निळा म्हणे तोचि साक्ष माझया जिवीं । चाळक गोसावी ब्रम्हांडाचा ॥४॥

१४९१

कैंचि याला बाईल आई । नामरुपें तेंही लटिकेंचि ॥१॥

मूळचि नाहीं डाळ तें कैंचे । लटिकें साचें काय म्हणों ॥२॥

हात पाय नाक ना डोळे । देखणें आंधळें नातळेचि निळा म्हणे कांहींचि नव्हे । तोचि हा अवघे श्रुति बोले ॥३॥

१४९२

कैंचि आतां जीवा उरी । आंत बाहेरी कोंदला ॥१॥

नेदी पडों कोठें उणें । वाचा करणें चाळितु ॥२॥

भोग भोक्ता आपण झाला । वांटुनी प्याला अभिमाना ॥३॥

निळा नामें रुपें नाहीं । भसे देहीं विठ्ठल  ॥४॥

१४९३

कोठें वसे झाडाचिवरी । कोठें पोखरीं विवरांत ॥१॥

कोठें जळीं वसे स्थळीं । कोठे अंतराळी अंतरिक्ष ॥२॥

कोठें पर्वतीं दरकुटीआंत । कोठें वनांत झाडखंडीं ॥३॥

निळा म्हणे चिखलीं शेणीं । वसे पाषाणीं काष्ठांत ॥४॥

१४९४

कोठें ग्रामीं कोठें पुरीं । कोठें सागरीं तरियांत ॥१॥

कोठें सांदी कोंदी बिळीं । कोठें वारुळीं धुळीमाजी ॥२॥

कोठें वोले वोलवंटी । वसे तळवटीं शिखरांवरीं ॥३॥

निळा म्हणे वसे शिरीं । केशाभीतरीं कोठे वस्त्रीं ॥४॥

१४९५

कोठेंचि हा नसे कोठेंही न दिसे । कोठेंचि अमुकासे न म्हणे कोणी ॥१॥

कोठें याचें होणें कोठें याचें निमणें । कोठूनि येणें जाणें न तर्केचि ॥२॥

कोठें याची स्थिति कोठें याची प्रीति । कोठें याची वसती न कळे कोणा ॥३॥

कोठूनि याचें कूळ । वर्णावयास आढळ न कळे गोत्र ॥४॥

निळा म्हणे याती न दिसे रुपाकृती । नयेचि कोणे व्यक्ती विचार करितां ॥५॥

१४९६

खांबसूत्रीं खेळवीं दोरी । नाचती पुतळया दिसती वरी ॥१॥

तैसा बोलवी बोलतां । न दिसे परि तो मज आतौता ॥२॥

किनरी वाजे नानापरी । वाजवी त्याची ते कुसरी ॥३॥

निळा म्हणे तैसा माझा । वाच्यवाचकु सद्गुरुराजा ॥४॥

१४९७

गगनीं वसोनियां रवी । प्रकाश भूमंडला पुरवी ॥१॥

तैसे तुम्ही जेथिल तेथें । असोनियां चाळा भूतें ॥२॥

नभ न सांडुनी आपुला ठावो । पुरवी वावो जगातें ॥३॥

निळा म्हणे सन्निधानें । चुंबक चालवी अचेतनें ॥४॥

१४९८

गंगा पवित्र सर्वागुणी । स्पर्शे विटाळे रांजणीं ॥१॥

तेविं चैतन्य अवघें एक । भूतभेदें त्या कळंक ॥२॥

भूमिका नाहीं खंडण केली । उत्तम अधम संगें झाली ॥३॥

निळा म्हणे धर्माधर्म । वर्णानुरुप क्रियाकर्म ॥४॥

१४९९

घंडु जातां अळकांर । होती अवघेचि श्रुंगार ॥१॥

नलगे उजळाही देणें । शोभती अंगीच्या बरवेंपणें ॥२॥

आंतु बाहेरी सारिखें । न ये हीनपणा बीकें ॥३॥

निळा म्हणे सुधा माल । हातीं लागला सुढाळ ॥४॥

१५००

छायामंडपींचीं चित्रें दिसती । तैसी सृष्टी भासतसे ॥१॥

परि त्या आधार दीपज्योति । कातडी नुसती येहवीं ते ॥२॥

तेविं आत्मप्रभा भासे । जग हें विलसे नानाकृती ॥३॥

निळा म्हणे गगनीं रवि । दावूनि जेविं अलिप्त ॥४॥

१५०१

जाणे सकळां अंतरींचा । भाव साचा मिथ्या तो ॥१॥

तया करी तैसाचि मान । जैसें भजन ज्यापाशीं ॥२॥

जेविं एकचि स्वातीजळ । सर्पी गरळ हिरा भूमीं ॥३॥

निळा म्हणे एकचि हरी । जैशापरी तैसाचि ॥४॥

१५०२

नवल हा प्रकाशवेगळा । झांकिलियाही डोळा पुढें दिसे ॥१॥

नव्हे हा उजळिला सवेंचि मावळला । आत्मतेजें केला उदो नित्य ॥२॥

ढवळा ना काळा पिंवळा ना जांभळा । जीवींच्या जीवनकळा प्रकाशितु ॥३॥

निळा म्हणे आजि आरतीचेनि व्याजें । कृपें पंढरीराजें कळलें मज ॥४॥

१५०३

नाहींचि या डाळ मूळ । पाहातां यासी जाती कुळ ॥१॥

रुप नाम न दिसे वर्ण । पाय डोळे हात कान ॥२॥

बाळ तरुण वयसा वृध्द । जिण्यामरणापरता शुध्द ॥३॥

निळा म्हणे धरिला चित्तीं । कैंसा नेणों पूर्वी संतीं ॥४॥

१५०४

नाहींचि उरला रिता । ठावो याविण तत्वतां ॥१॥

अणु रेणु महदाकाश । त्याहीमाजीं याचा वास ॥२॥

होतां जातां सहस्त्रवरी । ब्रम्हांडाच्या भरोवरी ॥३॥

निळा अखंडता । नव्या जुन्याही हा परता ॥४॥

१५०५

नाहीं म्हणतां अवघें तेंचि । आहे म्हणतांचि दावितां नये ॥१॥

म्हणोनियां न चले शब्द । राहे विवाद ऐलाडी तो ॥२॥

डोळा देखणा देखे सर्व । न देखे बरव आपुली तो ॥३॥

निळा म्हणे तेवीं जाणों जातां । जाणणेंचि तत्त्वतां वस्तु होये ॥४॥

१५०६

निर्माणचि नाहीं त्याचें काय वर्णावें । जाणीवचि न रिघे तेथें काय जाणावें ॥१॥

म्हणऊनियां येथें अवघा खुंटला वाद । विरोनियां गेला अवघा अभेदीं भेद ॥२॥

जागृति ना निद्रा जेथें नाहीं सुषुप्ती । तुर्या ना उन्मनी कैंची स्वप्नाची भ्रांती ॥३॥

निळा म्हणे अनुभव तेथें अनुभवितें कैंचे । निमोनियां गेलें ऐक्य उरलें मुळींचे ॥४॥

१५०७

निर्विकार असोनि आत्मा । अवघ्या भूतग्रामा प्रकाशी ॥१॥

एरवीं करी ना करवी । जेवीं रवि निज व्योमीं ॥२॥

लोह चळे चुंबकयोगें । परि तो अंगे न शिवे त्या ॥३॥

निळा म्हणे आत्मसत्ता । वर्तणें भूतां कर्मतंत्रीं ॥४॥

१५०८

नेणें मी परिहार । देऊं कोणासीं उत्तर ॥१॥

म्हणोनियां हें खरें खोटें । ठेवा बांधोनियां मोटे ॥२॥

नेणोनियां तुमची गती । तंटा माझयाचि नांवे करिती ॥३॥

निळा म्हणे प्रत्युत्तर । मज तों न सुचे उत्तर ॥४॥

१५०९

पदार्थमात्रीं आठवे जरी । नलगेचि तरी साधन ॥१॥

एरवीं दिसे देखणा तोचि । पाहिजे त्याची परि कृपा ॥२॥

अवघाचि वसोनि अवघे ठायीं । दिसे दाखवीही अवघ्यांतें ॥३॥

निळा म्हणे भोगी त्यागी । तोचि जगीं जगदात्मा ॥४॥

१५१०

पहा ज्याचें तयाची परी । जीवनभातें याच्या करीं ॥१॥

देऊं जाणे यथाविधी । जैसा भाव तैशी सिध्दी ॥२॥

उंच नीच अधिकारें पावती आपुलाल्या व्यापारें ॥३॥

निळा म्हणे ज्यापरी रवी । ज्याचे वेवसाय तया दावी ॥४॥

१५११

दोष वसे पात्रांतरीं । आत्मा निर्मल चराचरीं ॥१॥

सर्पामुखीं वसे विष । मधुमक्षिके सारांश रस ॥२॥

स्वातिजळें मुक्ताफळ । शुक्तीं सपीं हाळाहळ ॥३॥

निळा म्हणे उपाधिभेदें । दावित निवाड शुध्दाशुध्दें ॥४॥

१५१२

सर्वी असतां सर्वपणें । मी हें म्हणे अविदया गुणें ॥१॥

पाहातां आधीं अविदया‍चि वावो । तेथें मीपणाचा कैंचा ठावो ॥२॥

मीहि नाहीं तूंहि नाहीं । येकीं येकत्व नुपसें पाही ॥३॥

निळा म्हणे नहोनी कांहीं । नसोन असे आपुला ठांई ॥४॥

१५१३

नवल हे कृपा घनवट । उडवूनी मायेचें फळकट । आप आपणां केलें प्रगट । मोडिली वाट दुसयाची ॥१॥

आपणांसवें आपण खेळे । आपआपणासी चावळे । शेखीं आपण आपणा मिेळे । खेळतां वेगळें दाउनि ॥२॥

ऐसा आपुलिया संतोषा । एकी भिन्नत्वाची आशा । अनेकत्वाचा मिरउनी ठसा । एकी येकला शेवटीं ॥३॥

दाऊनियां नानाकार । नानाकृति नारीनर । तेचि करुनियां निराकार । आपणाअंगी आपण ॥४॥

निळा म्हणे कृपातरणी । प्रगटोनियां माझिये वाणी । प्रकाशी आपुला किणीं । लाविली गुणीं वर्णावया ॥५॥

१५१४

स्थिरावल्या वृत्ती पांगुळला प्राण । अंतरिची खूण पावोनियां ॥१॥

पुंजाळले नेत्र जाले अर्धोन्मिलित । कंठ सद्रदित रोमांच आले ॥२॥

चित्त चाकाटलें स्वरुपामाझारीं । न निघे बाहेरि सुखावलें ॥३॥

सुनीळ प्रकाशें उदेजला दिन । अमृताचें पान जीवनकळा ॥४॥

शशीसूर्या जाली जीवें ओंवाळणी । आनंदा दाटणी आनंदाची ॥५॥

निळा सुखासनीं प्रेमेसी डुल्लत । विराजला निश्चित निश्चिंतीनें ॥६॥

१५१५

प्रवृत्तिनिवृत्तीचे आटुनिया भाग । उतरिलें चांग रसायण ॥१॥

ज्ञानाग्रीहुतासी कडशिलें वोजा । आत्मसिध्दीकाजा लागोनियां ॥२॥

ब्रम्हरस ब्रहमीं सिध्द झाला पाक । घेतला रुचक प्रतितीमुखीं ॥३॥

स्वानुभवें अंगीं झाला समरस । साधननिजध्यास ग्रासोग्रासीं ॥४॥

आरोगयता निळा पावला आष्टांगीं । मिरवला रंगीं निजात्मरंगें ॥५॥

१५१६

नवलचि एक वाटे मज । कैसें गुज अनुवादों ॥१॥

आपुली आपण बाईल जाला । आपणाचि व्याला आपणाशीं ॥२॥

मागें पुढें एकला एक । दाविले अनेक परी मिथ्या ॥३॥

निळा म्हणे हा चराचरा । वसउ आंतरा बाहेरी ॥४॥

१५१७

पाहों जातां हा न दिसे । झांकोळिला विश्वाभासें ॥१॥

आतां पाहों कोणीकडे । आड आपणा हा दडे ॥२॥

डाहाळी आड आंबा । असोनि न दिसेचि उभा ॥३॥

साखर दिसे खडा । गोडी पाहों काणीकडा ॥४॥

निळा म्हणे सोनें । न दिसे झांकिलें भूषणें ॥५॥

१५१८

देव प्रगटचि लपला । आड आपण बैसला ॥१॥

काय नवल सांगो कैसें । सूर्य झांकिला प्रकाशें ॥२॥

निज ज्वाळें वैश्वानर । लह्या लोपिला सागर ॥३॥

निळा म्हणे धुळी । आड ठेली महीतळीं ॥३॥

१५१९

विश्व अवघें मायाभास । माया ब्रहमीं नाहींची मोस ॥१॥

जेविं वन्हि सूर्यकांतीं । प्रगटतां कीर्ण त्या नेणति ॥२॥

शुक्तिका प्रसवें मुक्ताफळ । जळींचें परि त्या नेणेचि जळ ॥३॥

निळा म्हणे धूम्री वन्हीं । नाहींचि तयातें प्रसवोनी ॥४॥

१५२०

हातीं घेतला चितांक । दिठी न दिेसेंची कनक ॥१॥

तैसा देव पाहों जातां । विश्वाभासुचि भोंवतां ॥२॥

न दिसेचि दोरा । माजी लपांला अंबरा ॥३॥

निळा म्हणे मारा । ठेल्या लपवूनियां नीरा ॥४॥

१५२१

इंद्रियांची पुरली धांव । मनासी ठाव विश्रांति ॥१॥

तया नांव ब्रम्हप्राप्ती । जेथे उपरति चित्ताचीं ॥२॥

बुध्दीचीहि जाणीव विरे । तर्क मतांतरें मुरडलीं ॥३॥

निळा म्हणे कुंठित गती । पांगुळले ठाती पंचप्राण ॥४॥

१५२२

उपरम झाला सर्वकाळ इंद्रियां । स्वरुपीं विलया मन गेलें ॥१॥

ऐशिया स्वानंदे बुझाविलें चित्त । राहिली अचिंत वदनीं वाचा ॥२॥

अष्ट अविर्भाव डवरले अंगीं । प्राणी प्राणरंगीं निजवासें ॥३॥

त्रयबंध ठसा पडिला शरीरा । वृत्ति गेली घरा निजाचिया ॥४॥

निमोनियां गेलें शब्दाचें बोलणें । पवनचि प्राणें शोषियेला ॥५॥

निळा सुखासुखीं पावला विश्रांती । पद पिंडा समाप्ति करुनियां ॥६॥

१५२३

एक्या जिवें एक्या भावें । एकचि एकलें एक्या देवें ॥१॥

एकाएकीं एकचि झालें । एका अंगी विरोनी गेलें ॥२॥

एकचि केलें निजानुभवें । एकाचि झालें एक्या नांवें ॥३॥

निळा म्हणे एकाएकीं । एकचि झालें तिहीं लोकीं ॥४॥

१५२४

एकींच नसतां एकपण दुजेपण कैचें । म्हणउनियां न चले कांही तेथें शब्दाचें ॥१॥

पहातें पहाणें जेथें विरमोनि जाय । घेणें देणें कैंचें तेथें सांगावे काय ॥२॥

दृश्याचि नाहीं द्रष्टत्वाचा फिटला पांग । काया वाचा मनचि नाहीं धारणा योग ॥३॥

निळा म्हणे जेथें सुख सुखपणा नये । निजानंदी निजानंद हारपले ठाय ॥४॥

१५२५

अवघें होऊनि कांहींचि नव्हे । आपुल्या स्वाभावें आपण ॥१॥

तया नांव आत्मतत्व । शुध्द सत्व मायादी ॥२॥

ध्वनि बीज ओंकार रुप । तेंही स्वरुप ऐलाडी ॥३॥

निळा म्हणे जाणों जातां । जाणोनि नेणता वेद जेथें ॥४॥

१५२६

असोनि अलिप्त सर्वसंगी । आत्मा भोगी ना विरागी ॥१॥

ऐसें जाणती ते ज्ञानी । नित्यमुक्त त्रिभुवनीं ॥२॥

मी हें स्फुरे जेथूनियां । आत्मा परचि त्याहूनियां ॥३॥

निळा म्हणे मी हे वदती । मूर्ख देहातेंचि कल्पिती ॥४॥

१५२७

आत्मा नाहींचि देखिजे ऐसा । उजळितां प्रकाशा रविकीर्णा ॥१॥

असोनियां पाठीं पोटीं । न देखेचि दृष्‍टी देखण्या ॥२॥

लेऊनियां सर्वांभरी । असोनि बाहेरी नाढळे ॥३॥

निळा म्हणे उगम जैसा । न देखेचि सहसा सागर ॥४॥

१५२८

आत्मा करी ना करवी । अलिप्तपणें वर्ते जीविं ॥१॥

साक्ष नव्हे ना असाक्ष । उपेक्षा करीना कैंपक्ष ॥२॥

जैसें गगनीं अभ्र गळें । गगन अलिप्त त्यावेगळें ॥३॥

निळा म्हणे सन्निधानें । लोह चाले चुंबक नेणें ॥४॥

१५२९

आपणा दाउनी भुरळे केले । ठकुनि माझें मीपण नेलें ॥१॥

आतां जाऊं कोणीकडे । पळों तरी तो मागें पुढें ॥२॥

धांवा म्हणोनि बोलो जाय । तंव बोलातें गिळूनी आपणाचि ठाये ॥३॥

ऐकों जाय याच्या गोठी । तंव तो शब्दा पाठीं पोटीं ॥४॥

देखों जातां देखणेंचि होय । दृश्यादृश्‍य हा नुरवीचि माये ॥५॥

सुगंध घेतां आपणचि नाक । गंधाचा गंध हाचि हा एक ॥६॥

मी माझें मज न दिसेची कोठें । बहुता जुगांचे हरिले सांठे ॥७॥

ठकूनियां निळा अवघाचि नेला । सकळही त्याचें आपणचि झाला ॥८॥

१५३०

आत्मा निघोट निर्मळ । नातळे तो मायामळ ॥१॥

जेवीं मृगजळातें भानु । प्रगटूनियां वेगळा भिन्नु ॥२॥

आत्मबिंब नव्हे छाया । तैसीं स्वरुपीं मिथ्या माया ॥३॥

निळा म्हणे हें स्वानुभवें । विचारितां होईल ठावें ॥४॥

१५३१

आंतु बाहेरी देखणाचि दिसे । परि तो आभासे दृश्य ऐसा ॥१॥

ज्ञानेंचिविण वांयां गेला । बोध मावळला सत्याचा ॥२॥

त्याविण दिसतें देखतें देखतें कोण । परि ये नागवण भ्रांतीची ॥३॥

निळा म्हणे आठव न धरे । तेणोंचि अंतरे हातोहातीं ॥४॥

१५३२

जेविं देखोनि सकळां । आपणा न देखे हा डोळा ॥१॥

परि तो न म्हणावा कीं अंध । देखणाचि तो शुध्दबुध्द ॥२॥

अवधियांतें जाणे । जाणीव जेवी आपणा नेणे ॥३॥

निळा म्हणे आहे तैसा । आत्मा आपआपणा ऐसा ॥४॥

१५३३

जें जें कांहीं होय जाय । त्या त्या लय अव्दैतीं ॥१॥

तें अव्दैतही लोपल्या पाठीं । आपणाचि पोटीं आपण ॥२॥

तया नांव स्वरुप म्हणती । जें निज एकांतीं एकलें ॥३॥

निळा म्हणे दावूनियां नामरुपा । नयेचि पडपा विश्वाकृती ॥४॥

१५३४

जैशिया तैसा मिळोनियां । नेणवे म्हणोनियां कोणसी ॥१॥

गोडी साखर करितां भिन्न । वेगळी कैसेनि रुप धरी ॥२॥

डोळा देखतां एकचि दिसे । करितां जैसे भिन्न नये ॥३॥

निळा म्हणे वाचा वदतां । दिसती ऐक्यता परि भिन्न ॥४॥

१५३५

तोचि ब्रम्हविद जाण । परब्रहमीं वृत्ति लीन ॥१॥

व्दैताव्दैत मावळलें । पूर्णब्रम्ह अनुभविलें ॥२॥

जन वन तें समान । मन झालें पैं उन्मन ॥३॥

निळा म्हणे त्यांच्या नांवे । दोष नाशती स्वभावें ॥४॥

१५३६

याचिया ध्यानें हें चराचर । अवघें तदाकार मज भासे ॥१॥

मही अंबु मारुत गगन । भासे हुताशन हाचि झाला ॥२॥

चंद्रसूर्य तारांगणे । सुरासुरागण मनुष्यादी ॥३॥

निळा म्हणे जनीं वनीं । हाचि भरोनि राहिला ॥४॥

१५३७

येती जाती  वर्षती मेघ । गगन तें अभंग जैसें तैसें ॥१॥

तैसींच ब्रम्हांडे अनेक होती जाती । स्वरुप तें अव्दैतीं अव्दैत ॥२॥

नाना नटिया नटवेष । परि तो आपणास भिन्न नव्हे ॥३॥

निळा म्हणे नानावस्त्राकार तंतु । दाउनी आपणांतु आपण ॥४॥

१५३८

समोर सदा संर्वाकडे । मागें पुढें वेष्टीत ॥१॥

कां हो नेणों हरी ऐसा । जैसा तैसा परिपूर्ण ॥२॥

उदका अंगी जैसा रसु । गगनीं अवकाशु घनदाट ॥३॥

निळा म्हणे अंतर्बाह्य । त्याविण आहे कोण दुजें ॥४॥

१५३९

सगुण निर्गुण कल्पनेचा भास । वस्तु अविनाश व्यापकत्वें ॥१॥

स्वानुभवें पाहीं लटिकें साच नाहीं । परिपूर्ण अवघाही आत्माराम ॥२॥

आपलाचि सादु अंतराळीं जेवीं । दुजेंवीण दावी दुजेंपण ॥३॥

लटिकें म्हणों जातां साच तया पोटीं । दर्पणींची भेटी आपणासवें ॥४॥

स्वप्नमाजी जेवीं नाना परिवार । प्रबोधीं साचार एकलाचि ॥५॥

निळा म्हणे रज्जू भासे सर्पपणें । झकविलें तेणें नेणतीया ॥६॥

१५४०

सर्वांमाजी गगन आहे । परि धरितांचि नये काय करुं ॥१॥

तैसें नाकळेचि तें शंब्दातें । जेविं खदयोतें रवीभेटी ॥२॥

सागरीं पडतांचि लवणकण । निवडितां भिन्न न निवडे ॥३॥

निळा म्हणे तैशा परी । बोलतांचि वैखरी लीन तेथें ॥४॥

१५४१

सोनें असे सोनेपणें । अलंकार लेणें होय जाय ॥१॥

तैसें चराचर होतां जातां । वस्तु अखंडता अखंड ॥२॥

नाना मृगजळ दिसे भासे । भूमिका ते असे कोरडीच ॥३॥

निळा म्हणे घटमठ मोडी । अवकाश परवडी नाहीं तया ॥४॥

१५४२

सोयरा श्रीहरी । आत्मा एक चराचरीं ॥१॥

नाहीं तया आपपर । वसवी सकळांचे अंतर ॥२॥

देवां दानवां मानवां । स्थूळ सूक्ष्मादिकां सर्वां ॥३॥

निळा म्हणे जीवमात्रीं । व्यापकपणें तोचि धात्री ॥४॥

१५४३

पायीं चित्त हें राहिलें । ब्रम्हरुप पैं जाहलें ॥१॥

मन झालें हें उन्मन । स्वरुपीं झालें तें लीन ॥२॥

बुध्दि बोध्दव्या मुकली । एकाकारता पावली ॥३॥

निळा म्हणे नाहीं देह । तेथें कैंचा तो संदेह ॥४॥

१५४४

पूर्णापासुनी आले आंख । शेखी पूर्णचि नुरे लेख ॥१॥

पूर्णी असतां पूर्णपण । नेणें आपणा आपण ॥२॥

दशक वाढवूनी शेवटीं । पूर्णपणें घाली पोटीं ॥३॥

निळा म्हणे कांहीचि नाहीं । तेंचि या बीज विश्वा पाहीं ॥४॥

१५४५

प्रसाद तुमचा लाधलों आतां । झालों कृतकृत्यता सनाथ ॥१॥

पुरविला जीवींचा हेत । होतो चिंतीत मानसीं तो ॥२॥

कृपा करुनियां दाविला देवा । आपुला ठेवा उघडुनी ॥३॥

निळा म्हणे सद्गुरुनाथा । गाऊं आतां ओंविया गीतीं ॥४॥

१५४६

प्राणी प्राण अर्पे । तेणें अपीं तें समपें ॥१॥

ऐशा आहे प्रेमाकळा । परी तो बोधक विरळा ॥२॥

दृश्याचिया पाठीं । दृश्य लोपे द्रष्टाचि उठी ॥३॥

निळा म्हणे ज्ञानें । ज्ञेय राहिले होऊन ॥४॥

१५४७

बहुरुपी हा एकला । नानाकारें नटें नटला ॥१॥

पुरुषाकृति स्त्रिया बाळें । होउनी कोणाही नातळे ॥२॥

नामें रुपें वस्त्राभरणें । रसस्वाद नाना खाणें ॥३॥

निळा म्हणे फळें पुष्पें । पर्णे मूळें भिन्नचि रुपें ॥४॥

१५४८

मन विश्रांति पावलें । गुरुचरणीं स्थिरावलें ॥१॥

ज्ञानयुक्त होतां मन । ब्रम्हभूत झालें जाण ॥२॥

जिकडे जिकडे जाय मन । तिकडे तिकडे अधिष्ठान ॥३॥

निळा म्हणे मन । होऊनि ठेलें तें उन्मन ॥४॥

१५४९

माझेंचि मज नवल वाटे । मीचि भेटें मजलागीं ॥१॥

निजात्मबोधें उदो केला । प्रकाश दाटला कोंदोनी ॥२॥

कोठें कांहिंचि न दिसे दुजें । निजात्मतेजें जग भासे ॥३॥

निळा म्हणे अवघे ठायीं । मीचि नाहीं दुजी परी ॥४॥

१५५०

माया ब्रहमींचा आभास । नाहीं ते ब्रम्ही नि:शेष ॥१॥

यालागीं दिसे ते टवाळ । रत्नचि ते रत्नकीळ ॥२॥

सूर्यचि सूर्यातें प्रकाशी । न देखोनियां तम तेजासी ॥३॥

निळा म्हणे स्वसंवेदया । नातळे विदया ना अविदया ॥४॥

१५५१

माझिये मनीं बैसला हरी । नयनामाझारीं कोंदला ॥१॥

भरोनियां मना बुध्दी । राहिला संधीं इंद्रियांच्या ॥२॥

पाहे तेथें आपणचि दिसे । स्वरुप विलसे पदार्थी ॥३॥

निळा म्हणे जें जें कांहीं । भासे तेंही त्याचीं रुपें ॥४॥

१५५२

मी माझें पाहतां न देखेचि दिठी । आदि मध्य शेवटीं विचारितां ॥१॥

टवाळ हें मिथ्या अविदयेचें भान । चेईलिया स्वप्न जैसें होय ॥२॥

मृगजळनदी आभासला पूर । न भिजे उखर कोरडेंचि ॥३॥

निळा म्हणे कांति दिसे ते वाउगी । वेगळा उरगीं पासुनी त्या ॥४॥

१५५३

अमृत गोडिये नाहीं भिन्नपण । प्रभा रविकीर्ण जयापरी ॥१॥

अळंकार सोनें काय तें वेगळें । डोळियां बुबळें वेगळिक ॥२॥

नभा अवकाशा कोण भिन्न करी । वस्त्रतंतुपरी देव भक्त ॥३॥

निळा म्हणे प्राण तोचि प्रभंजन । नव्हती ते भिन्न एकएका ॥४॥

१५५४

अवघियांचे असोनि देहीं । अंतर्बाहीं न दिसेचि ॥१॥

जेवीं साखरमाजीं गोडी । न दिसे उघडी असतांही ॥२॥

वादय दिसती न दिसे नाद । जेविं कां स्वाद भोजनीं ॥३॥

निळा म्हणे तैसा आत्मा । न दिसेचि भूतग्रामा कवळुनी ॥४॥

ज्ञानें अवघेंचि जाणें । परि एक नेणे आत्मज्ञाल ॥१॥

बोल तितुके बोलचि वरी । परि न चढे पायरी प्राप्तीची ॥२॥

आपुलेंचि हित आपण नेणे । वरी आणिकां शाहाणें करुं धांवे ॥३॥

निळा म्हणे ठाकुनी लोकां । आपणहि नर्का जात सवें ॥४॥

१५५५

अवघें देखे ब्रम्हरुप । गुण दोष पाप नातळे ॥१॥

त्याची झाली चित्तशुध्दी । कृपानिधी तोषला ॥२॥

हरीच्या भजनीं अत्यादर । पडेल विसर संसारें ॥३॥

निळा म्हणे विठ्ठल  ध्यानीं । चित्तीं मनीं बैसला ॥४॥

१५५६

स्वामी एक म्हणवी दास । आवडीस रुप केलें ॥१॥

मुळींचे दोघां एकपण । परीं हें भिन्न्‍ दाखविलें ॥२॥

एक म्हणे धांवा धांवा । एक कुडावा करी त्याचा ॥३॥

निळा म्हणे नवल वाटे । साने मोठे नव्हती हे ॥४॥

१५५७

भेदचि याचा नये हातां । जाणिवा जाणतां नानापरी ॥१॥

मतमतांतरें वृथाचि होती । याच्या न पवती दारवंटा ॥२॥

पाहों जातां बुध्दीचे डोळे । होताती आंधळे समोर या ॥३॥

निळा म्हणे नेदीचि कोणा । देखों आपणा लपवितसे ॥४॥

१५५८

पाहणें पाहातें । गेलें हारपोनियां निरुतें ॥१॥

मीहि नाहीं तूंही नाहीं । आपींआप अंतरबाहीं ॥२॥

उदो अस्तु सविता नेणें । जेथें तेथें आपुलेपणें ॥३॥

निळा म्हणे नर्भी नभ । जेवीं दावूनियां प्रतिबिंब ॥४॥

१५५९

पाहों जातां देखणे तेंचि । जाणता जाणणेंचि होईजे अंगें ॥१॥

आतां कैसें सांगावें यावरी । बोलतांचि वैखरी गिळूनि जाये ॥२॥

बुध्दीच्या प्रवेशें हरपे । मन जेथें संकल्पेंसहित विरे ॥३॥

निळा म्हणे चित्ता नुरे चित्तपण । आनंदा मुरवण आनंदें त्या ॥४॥

१५६०

नातळोनियां नामरुपा । येवढया वाढविलें संकल्पा ॥१॥

न कळे याची माव कोण । देवां दैव्यां विचक्षणा ॥२॥

वेदश्रुति धांडोळितां । कार्यकारणही हा परता ॥३॥

निळा हा अनुमाना । न ये योगिया मुनिजनां ॥४॥

१५६१

दृष्टीविण देखणें रसनेविण चाखणें । शब्देंविण बोलणें ऐसें आहे ॥१॥

चरणेंविण चालणें निजकरोंविण घेणें । श्रवणेंविण ऐकणें तेथींचें चालणें निजकरोंविण घेणें । श्रवणेंविण ऐकणें तेथींचें गुज ॥२॥

चित्तेंविण चिंतणें बुध्दीविण जाणणें । मनेंविण अनुभवणें अनुभव्यातें ॥३॥

निळा म्हणे गगनें गगना आलिंगन । पवनासवें गमन पवना जेवीं ॥४॥

१५६२

धन वित्त दारा सुत । गणगोत मृगांबु हें ॥१॥

आणणचि स्वयें दृश्यत्वा येतां । भासवी तत्वतां दृश्यजाता ॥२॥

निजांगे जेवीं विलसे छाया । तेवीं हे माया मिथ्यत्वें ॥३॥

निळा म्हणे मुख्य बिबेंवीण । भासविती कोण प्रतिबिंबा ॥४॥

१५६३

नमियेलीं घरांत घरें । शिवशक्ति वधुवरें ॥१॥

आदिगुरु चराचरा । पासुनी ज्या परंपरा ॥२॥

प्रसवोनियां दृश्यजाता । सुरासुरा मातापिता ॥३॥

निळा म्हणे वरद हस्तें । पावविती जे परमार्थातें ॥४॥


संत निळोबाराय गाथा । संत निळोबाराय अभंग । निळोबा अभंग । निळोबा गाथा । सर्व गाथा । निळोबाराय माहिती । पिंपळगाव मंदिर निळोबाराय । sant nilobaray gatha | sant nilobaray abhang | niloba abhang | niloba gatha | sarv gatha | nilobaray mahiti | nilobaray mandir pimpalgav |संत निळोबाराय (ज्ञानपर)संत निळोबाराय (ज्ञानपर)

तुमच्या शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांतीला भेट द्या .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *