निळोबाकृत चांगदेव चरित्र (प्रकरण ३ ते ५)
१५६७
(प्र.३)
बरवीं हीं गुंतली आपुल्या वचनें । निमित्तावरुन भोवंडावी ॥१॥
विचारुनी ऐसें बोलिेलें सकळ । वदवीं अविकळ पशुमुखें ॥२॥
तुझा याचा आत्मा आहे एक जरी । वदवी ग्यान्या तरी येचि क्षणीं ॥३॥
नाहीं तरी वृथा न करावी वल्गना । घेऊनियां पतना जावें स्थळा ॥४॥
हमणती ज्ञानदेव तुमच्याचि प्रसादें । करील घोष वेद म्हैसी पुत्र ॥५॥
कराल तें काय नव्हे धरामर । पाषाणीं ईश्वचर प्रतिमे स्थापा ॥६॥
ग्रथत्रयामाजी सांगा जी निरुता । पढावा कोणता वेद येणें ॥७॥
ऐकोनि सकळ विस्मयें बोलती । ऋग्वेदचि म्हणती पढवा यासी ॥८॥
देऊपि वरदान केली आज्ञा त्यासी । पशू प्रारंभासी करिता झाला ॥९॥
मुख्य प्रणवाच्चार काढियेला स्वर । देखोनि व्दिवर ठकावले ॥१०॥
लागली टकमक सांडलें निज धैर्या । म्हणती गेलों वांयां दुराभिमानें ॥११॥
संहिता पद क्रम उपन्यासें त्वरित । सूत्रादिनिरुक्त शिक्षा छंद ॥१२॥
अष्टाध्यायी मीमांसा अरण ब्राम्हण । मांडिलें अध्ययन जुगादीचें ॥१३॥
बोलियेला म्हैसा वेदाच्या सुस्वारी । हें सकळ व्दिजवरीं देखियेलें ॥१४॥
गळाले अभिमानें जाहले बिगलीतं । चरणीं लोळत दीनपणें ॥१५॥
म्हणती हेचि देव तिन्ही मूर्तिमंत । मुक्ताई सादयंत परामाया ॥१६॥
नेणोनियां महिमा चावळनसें जी देवा । तो परिहार आतां दयावा काय किती ॥१७॥
घडले जे अपराध ते ते करा क्षमा । अहो सिध्दोत्तमा विश्वसंदया ॥१८॥
अज्ञान गर्वित गेलों जी अभिमानें । बोलियेलों वचनें अमर्यादे ॥१९॥
सर्वी सर्व तुम्हीं सदा सर्वगत । कैंचें प्रायश्चित नित्यमुक्ता ॥२०॥
निमित्तें करुनि करितां उध्दार । जडजीवां आधार चरण तुमचे ॥२१॥
विश्वाच्या उध्दारा तुमचें अवतरण । कराया स्थापन स्वधर्माचें ॥२२॥
कळलेती यावरी विधीचे जनिते । व्यापुनी सकळांतें सगुणरुपीं ॥२३॥
ऐशीं करुनि स्तवनें करिती दंडवत । आणि मागती आज्ञेतें विनीतता ॥२४॥
घेऊनि निरोप जाती मंदिरासी । हमैसा देऊनि त्यासी पढीण म्हणू ॥२५॥
ऐकोनि अदभूत ऐसा चमत्कार । येती नारीनर नमस्कारा ॥२६॥
घरोघरीं चर्चा स्त्रियाबाळें करिती । प्राणीमात्र वर्णितीत कीर्ति त्यांची ॥२७॥
मिळोनि परस्परें विप्र अनुवादती । योग्यता हे म्हणती नकळे त्यांची ॥२८॥
आणीकही एक नवल वितलें । क्षेत्रींच्या देखिलें सर्व जनीं ॥२९॥
करिती विस्मयचर्चा तंव येरें दिवसी । श्राध्द गृहस्थासी होतें घरीं ॥३०॥
तेणें त्या चौघांसी दिधलें निमंत्रण । त्याचे पितृगण आणियेले ॥३१॥
देऊन भोजन केले स्वर्गवासी । सांगितली ऐशी मात तेणें ॥३२॥
तें सादर चांगदेवें ऐकीयेलें श्रवणी । आणखीही ब्राम्हणीं संनिधींच्या ॥३३॥
श्रवणेंचि सिध्दासी ताटस्थ्ा लागलें । प्रश्नी वियारिलें ज्योतिषमतें ॥३४॥
तंव तें सत्य ऐसें आलें अनुमाना । विस्मयें त्या नयनां अश्रु आले ॥३५॥
म्हणे हें तों नव्हे तपाचें सामर्थ्य । होती मूर्तिमंत देवची ते ॥३६॥
अपूर्व हे वार्ता नवलचि ऐकिली । पूर्वी नाहीं झाली नव्हे पुढें ॥३७॥
अनुतापें झाला उव्दिग्न मानसीं । पुसे ब्राम्हणासी पुढतोपुढती ॥३८॥
कोण त्यांचा ग्राम झाले किती दिवस । व्दिज म्हणे मास एक झाला ॥३९॥
इंद्रायणी तीरीं आहे अलंकापूर । तेथे निरंतर वास्तव्य त्यां ॥४०॥
पुसोनि ब्राम्हणा गेले निवासिया । म्हैसा घेऊनियां समागमें ॥४१॥
ऐकोनि चांग देवें शिष्य पाचारिलें । आणि एकांतासी गेले सांगती त्यां ॥४२॥
यावरी पूजन न करावें आमचें । सांगतो हें साचें धरा चित्तीं ॥४३॥
तंव ते विनविती होऊनि भयभीत । आज्ञा किंनिमित केली ऐसी ॥४४॥
आम्ही तों अज्ञान नेणों स्वामी सेवा । अपराध तो देवा कीजे क्षमा ॥४५॥
त्या म्हणती चांगदेव पूजेचे अधिकारी । आले महीवरी तेचि पूज्य ॥४६॥
जेवीं सूर्यवंशी अवतरतां राघव । राहिला भार्गव मागील मागें ॥४७॥
शिष्ट असतां पूज्य न दयावी आपण । आहें प्रमाण वेदशास्त्रीं ॥४८॥
घडतां अमर्यादा जावें पतनासी । भय हें मानसीं बहुत वाटे ॥४९॥
शतमख करुनियां नहूष् स्वर्गा गेला परी अमर्यादें पावला सर्वत्व तो ॥५०॥
त्रिशंकू सगर ऐस सांगों किती । अमार्यादें येती पतनव्दारा ॥५१॥
तरी ते जूज्य प्रकट झाले मूर्तिमत । ऐकिलें तें सांप्रत याचि काळे ॥५२॥
नव्हती ते मानवी देवाचे अवतार । निवृत्ती ज्ञानेश्वर सोपानदेवो ॥५३॥
मुक्ताबाई आदिमाया हे जननी । केला प्रतिष्टानीं कीर्तिघोष ॥५४॥
म्हैसीपुत्रामुखे बोलविल्या श्रुती । आश्चर्य हें चित्तीं बहूत वाटे ॥५५॥
जावें भेटीलागी विचारलें मनीं । हे सिध्दी माधनीं नव्हें कोणा ॥५६॥
अनुतापें झाला संतप्त मानसीं । म्हणे सिध्दाईसी खेव आला ॥५७॥
तंव बोलती प्रबुध्द त्यासीचि आणावें । अहो मूळ पाठवावें सिध्दराया ॥५८॥
सर्व सत्ता तुम्हां आहे जी स्वाधीन । राजे प्रजाजन आज्ञेमाजी ॥५९॥
तंव म्हणती चांगदेव नव्हे हा विचार । आज्ञेचा बडिवार कोणा अंगीं ॥६०॥
वंचूनियां काळा रक्षिलें शरीर । बहुत दिस भार वाढविला ॥६१॥
परी हें सामर्थ्य नाहीं आम्हां अंगी । जावें भेटीलागीं हेंचि सत्य ॥६२॥
जन्माचें सार्थक सिध्दाचीये भेटी । होईल या तुटी संसारेसीं ॥६३॥
परी सिध्दपणा येईल उणीव । काय कीजे जीव तळमळी ॥६४॥
ते म्हण्ती देवा हे नव्हे सत्य वार्ता । म्हैसी केवीं वदता होईल वेदा ॥६५॥
आणि मृत स्वर्गवासी पितर कैसे येती । ते भोजने करुनि जाती हेंही मिथ्या ॥६६॥
स्वामीसी विश्वास वाटे भलतीयाचा । परी हा नव्हे साचा वर्तमान ॥६७॥
नाहीं ये वार्तेसी साक्ष पडताळा । बोलियेला वाचाळ मिथ्या व्दिजा ॥६८॥
तया म्हणती चांगदेव प्रश्न म्यां पाहिला । तोही उतरिला यथार्थ्पणें ॥६९॥
तों शिश्य म्हणती देवा प्रश्नही चुकतो । न सांपडता जातो वेळ काळ ॥७०॥
हें ऐकोनी तयांसी सिध्दद म्हणती तुम्ह मुर्ख । अरे विदया आहे चोख पढित माझाी ॥७१॥
तरि ते म्हणती जहारे प्रतिष्ठाना । आणि हें वर्तमान आणा यथातथ्य ॥७३॥
चिरंजीव सकळ क्षेत्रवासी व्दिजां । आशीवाद माझा लिहा पत्रीं ॥७४॥
नवल हें ऐकिलें रेडा बोलविला । निगमाक्षरीं केला घोष तेणें ॥७५॥
स्वर्गस्थ्ा पितर आणूनि जेवविले । पुनरपि बोळविले स्वर्गाप्रती ॥७६॥
साच कीं मिथ्या धाडावे लिहुनी । तें ऐकावया मनी उत्कंठीत ॥७७॥
सांगती शिष्यासी जाऊनी त्वरीत । यावे शिघ्रवत वरावरी ॥७८॥
चालिले तेथूनी सत्वचर ब्राम्हण । ते पावले पैठण गंगातीरा ॥७९॥
तीहीं ऐकोनी चांगदेवें पाठविलें पत्र । मिळाले सर्वत्र क्षेत्रावासी ॥८०॥
धूतवस्त्रावरी गाधुमाचां राशी । मांडिलें पत्रासी पूजा केली ॥८१॥
आलिंगिले पत्र कंठी दरीं शिरीं । वाचिलें समग्रीं श्रवण केलें ॥८२॥
कळला अभिप्रावो विस्मयें दाटलें । ते सिध्द आठवले बाळवेशी ॥८३॥
फुंदती गाळिती उभय नेत्रीं जीवन । म्हणती धन्य ईश तिन्ही ॥८४॥
पूर्वार्जितें होती उत्तम गोमटीं । म्हणोनि ते दृष्टीं देखियेले ॥८५॥
मग म्हणती सिध्दासी झालें हे उपश्रुत । नवल जें अदभुत वितलें येथें ॥८६॥
दिव्यक्रीडा ऐसे संत आचरीत । दिगंता धांवत वायावरी ॥८७॥
कैसी विस्तारिली आख्या दूरदेशीं । आश्चर्य हेंचि मानसीं बहुत वाटे ॥८८॥
सन्मानुनी ब्राम्हणां दीधलें भोजन । वस्त्रें पांघरवून गौरविलें ॥८९॥
दिधली दक्षिणा मार्गी खर्चावया । पत्र लिहूनियां दिलें हातीं ॥९०॥
परात्परा सिध्दा गुरुसी नमन । पत्र अवलंबन केलें स्वामी ॥९१॥
विदयार्थी ये आम्ही सर्वही ब्राम्हण । झालो सुखसंपन्न आशीर्वादें ॥९२॥
ऐकिले जे वार्ता सत्य विपली येथें । पढविलें पशूनें वेदघोषें ॥९३॥
गृहस्थाचे पितर आणुनी जेवविले । प्रत्यक्ष पाहिलें आपण नेत्री ॥९४॥
निवृत्ति ज्ञानेश्वर मुक्ताई सोपान । वय तों लहान बाळवेषी ॥९५॥
करुनि ऐसी क्रीडा येथुनी स्वार झाले । नेवासिया गेले महासिध्द ॥९६॥
तया स्थळी केला भगवदीता अर्थ । दहा सहस्त्र ग्रंथ सिध्द झाला ॥९७॥
बाबाजीपंतांनीं स्वहस्तें लिहिला । परी ओंवीबध्द केला ज्ञानेश्वरीं ॥९८॥
सच्चिदानंदबाबा ठेवियेलें नांव । शिक्षापिला भाव देखोनियां ॥९९॥
एक पशु दुजा सच्चिदानंदबाबा । शिष्य केले नभा नकळती ॥१००॥
येथूनियां जातां अळंकापुरीसी । पशू आळियापाशीं स्थापियेला ॥१॥
अजान वृक्ष तेथें ठेवियेली खूण । झालें निरुपण निवेदिलें ॥२॥
घेऊनियां पत्र व्दिज आले तप्तीतीरा । नमिलें वटेश्वरा चांगयासी ॥३॥
करुनि नमस्कार पत्र दिलें हातीं । नवलावो सांगती देखिले तो ॥४॥
म्हणती सत्य देवा अदभुत चरित्र । वर्णिती सर्वत्र तेथिंचे जन ॥५॥
वाचिलीया पत्र म्हणती चांगदेव । वार्ता अभिनव नित्य नवी ॥६॥
विचारितां दिसे नव्हें सामान्य । गेला अभिमान गळोनियां ॥७॥
कायरे अतिक्रम करविला मज हातीं । फिटली असती भ्रांती पाहोनि त्यांते ॥८॥
आतां तरी जावें म्हणती अलंकापुरा । सामग्रीया करा सिध्द वेगीं ॥९॥
तंव शिष्यजन सर्व गृहस्थ मिळाले । सकळीं प्रार्थिले म्हणती देवा ॥१०॥
सिध्दाई कोणाची नाहीं स्थिरावत । तपाचें सामर्थ्य वेंचलीया ॥११॥
आहे नाहीं आतां त्याचें सिध्दपण । धाडा विचक्षण पाहोनि येती ॥१२॥
मग तैशासारिखा करावा विचार । येणे येरझार चुके देवा ॥१३॥
मग पाचारिले प्रौढ वृध्द तपोराशी । जा म्हणती तयांसी अलंकापुरा ॥१४॥
वसती सिध्द तेथें निवृत्ति ज्ञानेश्वर । सोपान मुनेश्वर मुक्ताबाई ॥१५॥
सिध्दपण त्यांचे आहे कीं वेंचलें । तें पाहोनि यावें वहिलें वेगावत ॥१६॥
ते म्हणती स्वामीया संताचें लक्षण । काय कैसी खूण सांगा आम्हां ॥१७॥
वर वेषा आम्हीं पाहावें तें काय । अंतरीचें नव्हे विदयमान ॥१८॥
गृहस्थाश्रमीं एक उदास दिसती । एक ते भासती व्यवसायीसे ॥१९॥
एक वेडे मुके पंगु मुद्राहीन । चतुर व्युत्पन्न दिसती एक ॥२०॥
देहाच्या संबंधें दिसे देहाकृती । अवस्थाही भोगिती यथाकाळें ॥२१॥
निद्रित निजेमाजी जागोचि जागृतीं । स्वप्न्रींहि देखती नानाविध ॥२२॥
इंद्रियां वर्तविती स्वभावव्यापारीं । दिसती संसारी अतिदक्ष ॥२३॥
बाळक कौमार वृध्दाप्य तारुण्य । दिसती लौकिकासारखेची ॥२७॥
न चोजवे आम्हां संतांचीं निज खूण । सांगावें लक्षण तेंचि पहों ॥२८॥
आंगे संत तोचि ओळखे संतासी । काय आणिकासी वर्म कळे ॥२९॥
म्हणती चांगदेव साच हे बोलिले । विचार न चले युक्ती तेथें ॥३०॥
कायरे करावें पूसती शिष्यांसी । ते म्हणती सिध्दासी दयावें पत्र ॥३१॥
लिहोनि पत्रिका दयावी यांचे हातीं । देऊनि हे पाहती स्थित्यंतर ॥३२॥
पत्राचं उत्तर काय देती कैसें । अर्थी अनायासें येईल कळों ॥३३॥
मग पत्र लिहावया बैसले एकांती । न चालेची युक्ति थोटावली ॥३४॥
अनामासी नाम अरुपाशीं रुप । कैसें लावूं पाप कल्पनेचें ॥३५॥
चिरंजीव म्हणों तरी विश्वात्मक । तीर्थरुप तरी बाळकदशा आंगी ॥३६॥
न दिसे पूर्वी न लभेचि अक्षर । पडियेला विचार न चले हात ॥३७॥
मग दिधली टाकुनी पत्रिका लेखणी । चित्तीं चिंतवणी पैठी झाली ॥३८॥
देखोनि सकळ प्रार्थिती सिध्दासी । कां हे दशा ऐसी विपरीत ॥३९॥
म्हणेती चांगदेवकाय रे लिहावें । मूळ न संभवे पत्रिकेचें ॥४०॥
तरी ते म्हणती देवा कोरें पत्र पुरे । दयावें अत्यादरें पाठवुनी ॥४१॥
युक्तीमाजी दिसे बरवा हा सिध्दांत । सिध्दाईचा अर्थ गूढ गुह्य ॥४२॥
घालुनियां घडी कोरें पत्र देती । आणि उत्तर म्हणती मागा त्यांसी ॥४३॥
जाऊनियां तुम्हीं यावें शीघ्रवत । करा दंडवत क्षेम सांगा ॥४४॥
चालिले तेथुनी आले शिवपीठा । वास्तव्य वरिष्ठा सिध्दा जेथें ॥४५॥
यावरि म्हणे निळा पत्राचें उत्तर । देती ज्ञानेश्वर परिसावें तें ॥४६॥
अत्यंत रसाळ आहे निरुपण । पुढील प्रकरण कसोटीचें ॥४७॥
॥ इति चांगदेव चरित्रे पत्र प्रेषणंनाम तृतिय प्रकरणं ॥
१५६८
(प्र.४)
पावले ब्राम्हण अलंकापुरासी । आनंदमानसीं न समाये तो ॥१॥
देखिला दंडक्षेत्रवासी जन । प्रात:काळीं प्रश्न करिती तीर्थी ॥२॥
पूजूनि सिध्दासी नरनारी बाळें । जाताती राउळा आपुलाल्या ॥३॥
बाळलीळा वेषें आनंदें खेळती । नर नारी देखती येतां जातां ॥४॥
खालावुनी माथा श्रीमुख पाहती । आपुलाल्या जाती कामा लोक ॥५॥
देखोनियां ब्राम्हण मनीं विवारिती । येथें नमस्कारिती मार्गी कोणा ॥६॥
पुढें देखियेल्या खेळतां कुमारी । पुसती उच्चस्वरीं तयांप्रती । ॥७॥
निवृत्ति ज्ञानदेव वसताती कोठें । कोणीकडे मठ आहे त्यांचा ॥८॥
ऐकोनि कुमारी हिडसुनी धिक्कारी । बोट कानावरी ठेवूनियां ॥९॥
कोठील रे तुम्ही नेणां विनीतता । उध्दट बोलतां महामूर्ख ॥१०॥
अर्भकाच्या परी नामें उच्चारुनी । पुसतां महामुनी सिध्दराया ॥११॥
दीर्घस्वरें करिती नामाचा उच्चार । नेणोनियां पार महिमा त्यांचा ॥१२॥
गव्हाराच्या परी बोला सैरा शब्द । मूर्ख तुम्ही मुग्ध हीनबुध्दी ॥१३॥
व्यापकासी स्थान अपारासी मान । मानितां अज्ञान मूढमती ॥१४॥
ऐकावें स्वर्गीचे श्रीमंत गोसावी । नाटक लाघवी ब्रम्हांडाचे ॥१५॥
तया एकदेशी कल्पूनियां स्थान । पुसतां अज्ञान मठ त्यांचा ॥१६॥
तिहींलोकांवरी मिरवे ध्वज ज्यांचा । नेणां महिमा त्यांचा मतिमन ॥१७॥
अरे ब्रम्हादिकां पूज्य ईश्वर अवतार । बोलतां उत्तर अमर्यादें ॥१८॥
संज्ञामात्रें नेत्र खुणेनें दाविती । पहा ते खेळती नित्यमुक्त ॥१९॥
ज्ञानप्रभा दिनमणी ते उगवले । ते प्रत्यक्ष देखिले देव तिन्ही ॥२०॥
सहजाचें आसन आंगी योगकळा । देखियेली लीळा आत्मनिष्ठ ॥२१॥
देखतां लोटिले देह लोटांगणीं । लागले चरणीं अति नम्र ॥२२॥
म्हणती ज्ञानदेव चांगयापासून । आले हे ब्राम्हण समाचारा ॥२३॥
तें ऐकोनियां व्दिज म्हणती अंतर्निष्ठ । जाणीतलें स्पष्ट अंतरींचे ॥२४॥
यावरी सिध्दाइ्र असावी ते कैसी । सर्वांतरवासी देवचि हे ॥२५॥
लागोनियां चरणीं दिधली पत्रिका । सांगितलें निकें वर्तमान ॥२६॥
म्हणती चांगदेवें प्रणिपात केला । मस्तक ठेविला चरणांवरी ॥२७॥
पत्राचें उत्तर मागितलें स्वामी । भेटी अंतर्यामीं इच्छिताती ॥२८॥
म्हणती निवृत्तिनाथ वाचा ज्ञानेश्वरा । तंव ते म्हणती कोरा अर्थ आहे ॥२९॥
कोरें पत्र बरें निवृत्ति बोलती । पाकाची निष्पत्ती होय तेथें ॥३०॥
कोरें ते सोंवळें खरकटें ओंवळें । धुतल्याही जळें शुध्द नोहे ॥३१॥
कोरें तें निर्मळ स्वीकारिलें जाय । अमंगळ राहे खरकटें तें ॥३२॥
कोरीया अक्षर उमटे कसोटी । रददी जाय हाटी विकावया ॥३३॥
एकाक्षर ब्रम्ह प्रणवाचे कुशीं । नुच्चारे पुरेशी उच्चारिता ॥३४॥
पाविजे अक्षर गुरुकृपा खुणे येराशी उमाणे नुकलवे ॥३५॥
शिणती बहुतें करितां खटपट । अर्थ उफराटा पडे तयां ॥३६॥
अक्षर परब्रम्ह वेदा अगोचर । कैंचा अनुस्वार उमटला ॥३७॥
न चले जाणीव न चले शाहाणीव । तुर्का नुरे ठाव अक्षर तें ॥३८॥
पत्र लिहा तुम्हीं कृपेचा प्रसंग सोरसें । अज्ञापिलें ऐसे निवृत्तिनाथें ॥३९॥
रेखियेली पत्रीं लिखिती पासष्टी । पाहतां अर्थ दृष्टीं तत्वी पडे ॥४०॥
परम गुह्या गुह्य उपनिषदीभाग । कृपेचा प्रसंग संपादिला ॥४१॥
वाचिलीया अर्थ अणितां मानसीं । पाकजे अनायसी परमतत्वा ॥४२॥
न करितां यजन अध्ययन अध्ययन । न करिता साधन आत्मप्राप्ती ॥४३॥
देऊनियां पत्र म्हणती चांगदेवा । निरोरपर सांगावा विवराहे ॥४४॥
घेऊनियां पत्र निघाले ब्राम्हण । वंदिले चरण पुढतोपुढतीं ॥४५॥
आले तप्तीतीरा नमिलें सिध्दासी । वर्तमान त्यासी निरोपिलें ॥४६॥
म्हणती सिध्दराया पाहिला जी महिमा । आंगी निरुपमा सामर्थ्याचा ॥४७॥
अदभुत ऐश्वर्य देखिलें लोचनी । दिधलें लिहोनी पत्र तुम्हां ॥४८॥
देऊनियां पत्र म्हणती व्दिजवरा । देवाचे अवतार नि:संदेहें ॥४९॥
मग करुनियां पूजा पत्र वाचियेलें । तंव गुह्य देखिलें न चले युक्ती ॥५०॥
मग म्हणे अभिमान अदयापि न जाळे । तिमिरें गेले डोळे न दिसे हित ॥५१॥
कृत्रिम आचरणें दशा झाली ऐशी । विश्वास मानसीं थार नेदी ॥५२॥
ऐकतों श्रवणीं पहावें लोंचणी । निश्चय तो मनी दृढ केला ॥५३॥
अनुतापें उददेश धरिला चांगदेवें । अळंकापुरा जावें सिध्दा भेटी ॥५४॥
तरी सार्थक धरिलिया जन्माचें । नाहीं तरी काळाचें भातुकलें ॥५५॥
न चुकती जन्म चौर्यांयशी यातना । काळासी वंचना कोठवरी ॥५६॥
पाचारिले वर्स परिपत्य अधिकारी । सांगती तयारी करावी त्यां ॥५७॥
वहनें सामग्रीया सिध्द करा वेगीं । जाणे भेटीलागीं सिध्दाचिये ॥५८॥
कोठवळे जमादार आले पोतनीस । सरंजाम त्यांस आज्ञापिला ॥५९॥
ऐकोनियां सर्व गृहस्थ शिष्यवर्ग । धांविले सवेग आले जवळी ॥६०॥
म्हणती सिध्दराया परिसावी विनंती । जाणें तरी युक्ति ऐसें जावें ॥६१॥
प्रतापें महत्वें आपुल्या महिम्यानें । ऐश्वर्य भूषणें सिध्दाईच्या ॥६२॥
विदयेच्या सामथ्यें आपुलीया वैभवें । जाऊनि भेटावें बडिवारे ॥६३॥
आपणा देखोनि झांकेल त्यांचे तेज । येतील तेहि सहज शरण पायां ॥६४॥
तैसाचि योजिला युक्तीचा प्रसंग । विस्तारिलें सोंग बहुविध ॥६५॥
व्याघ्रावरी स्तंभनें सर्पासी मोहनें । सिध्द केलीं वहनें रथ वारु ॥६६॥
हाकारिला सर्व शिष्यसमुदाय । सांगितलें काय तयांप्रती ॥६७॥
बैसा व्याघ्रावरी सर्प धरा करीं । नाना अळंकारी जाऊ चला ॥६८॥
जाती चांगदेव भेटी समुदायें । महा महोत्साहें अलंकापुरा ॥६९॥
तप्तीतीराहूनि गृहस्थ अपार । सवें दळभार गजवारु ॥७०॥
कश्यप स्वामीचा फळला आशिर्वाद । राजश्रिया पद भोगप्राप्ती ॥७१॥
चालियेला राजे गृहस्थ मंडळी । केलीं विप्रकुळीं परस्थानें ॥७२॥
म्हणती सिध्दा भेटी होईल परस्परें । पाहों अत्यादरें उत्साह तो ॥७३॥
परिवारें सांगतीं घेतलीं स्त्रियाबाळें । व्यवसायीं पाठयाळ थोपटिली ॥७४॥
निघाला उदमि म्हणती सौदागर । भरियेले संभार गोणीयांचे ॥७५॥
हांशील जकाती न लगे चौकी देणें । लाभा नाहीं उणें पिकला कौल ॥७६॥
नटवे नृत्यांगना गुणिजनांचे भार । चालिले अपार समागमें ॥७७॥
ठाकूर नगारी गर्जती पवाडे । सवें चालती देव्हडे सिध्दापुढें ॥७८॥
गजावरी वादयें निशाणें कुसरी । द्रव्यें भरिल्या हारी गाडीयांच्या ॥७९॥
नरंमिन्याचीं दिंडें सवें शिकारखाना । राज्यभार सेना तैसा चालें ॥८०॥
डेरे कनातांचे लादियेले उंट । चालती संघाट काटीयांचे ॥८१॥
नौबनी नगारे वादयजात सकळ । घाषें तया भूगोल दुमदुमिला ॥८२॥
लक्षावत यात्रा तप्तीतीराहुनी । चालतां अवनी न पुरे मार्ग ॥८३॥
छबिने पताका मोरपिसा कुंचे । टाळ मृदंगांचे समारंभें ॥८४॥
शृंगारिला भेख विदयेच्या कुसरी । सोंगें नानापरी दर्शनाचीं ॥८५॥
सवारले शिष्य गुरु आज्ञेवरी । नाना वेषधारी बाह्यरंग ॥८६॥
चर्चियेलीं भस्में काशांबरवासी । मृग व्याघ्र चर्मासी संख्या नाहीं ॥८७॥
कडुक कुंडले शिरीं जटाभार । मुक्तकेशी दिगंबर नागवेचि ॥८८॥
जागवटे सैल्या फुलमाळा शोभती । कथा विराजती नानावर्ण ॥८९॥
झोळया बटवे कक्षेमाजी जडया बुटया । आडबंद लंगोटया बटूवस्त्रें ॥९०॥
कुबडया काठया छडया वेणूदंड हातीं । टोप विराजती कफणीया ॥९१॥
कुंडले सांगातें भांग घोटावया । चिलमी ओढाया गुडगुडया ॥९२॥
पक्ष्यांचे पिंजरे सांगाते कुतरे । चितळें सामरें सोकविलीं ॥९३॥
पांवे मोह्या चंग किन्नरी झल्लरी । डफ हुडुक करीं नागसरे ॥९५॥
गोरख छंदे हाती गोलाणें धनुष्यें । धांवति आवेशें विदयोचिया ॥९५॥
कुशळ कवि ते वाचाळ बोलते । बहुमतें झाकविते तर्कवादी ॥९६॥
फळें जळाहारी एक दुग्ध पिती । मौन्याचे व्रतस्थी पवनाभ्यासी ॥९७॥
व्याघ्रा आरोहणें रथाचीं वहनें । सर्पाचीं वेष्टणे नानाविध ॥९८॥
योगमुद्रा अंगी दाविती कसोटी । नाना लक्ष दृष्टी उफराटिया ॥९९॥
कलरवापरी अंजनें घालूनि नयनीं । दाविती लोचनीं तिमिर तेज ॥१००॥
भाविका नरनारी बाळा झकविती । हेंचि ब्रम्हा म्हणती तेजाकार ॥१॥
सत्याचा दुष्काळ असत्याची रुढी । दाविताती प्रौढी थोरपणा ॥२॥
मार्गीचे जन लोक सामोरे धांवती । लोटांगणी येती चांगदेवा ॥३॥
नानावस्त्रें भेटी सिध्द सामग्रिया । समर्पोनी पायां नमस्कारिती ॥४॥
याचेनि दर्शनें जडजीवां उध्दार । करिती जयजयकार नामघोषें ॥५॥
आले पुण्यस्तंभा श्रीगोंदें सन्निध । केला तीर्थविधी स्नान संध्या ॥६॥
व्दिज संतर्पणें वांटियेलीं दाने । पुढारी गमनें आरंभिलीं ॥७॥
आळेखिंडीवरुनि चालियेले भार । केले नमस्कार म्हैसीपुत्रा ॥८॥
केंदुरावरुनि उतरले घाट । गर्जती उध्दट सिध्दनामें ॥९॥
कान्होपाठक प्रीतीं चालविले सवें । प्रार्थुनी चांगदेवें अत्यादरें ॥१०॥
आले भीमातीरीं स्नानीं स्थिरावले । पुढें पाठविलें सांगोनियां ॥११॥
यावरी म्हणे निळा होईल सिध्दभेटी । परस्परें ते गोमटी आहे कथा ॥१२॥
बहुत अपूर्व असमाई चरित्र । परिसोत सर्वत्र श्रोतेजन ॥१३॥
॥ इति श्रीचांगदेवचरित्रे सिध्ददर्शनंनाम चतुर्थ प्रकरणं समाप्तम् ॥
१५६९
(प्र.५)
चालिले ब्राम्हण वार्ता सांगावया । शीघ बैसोनियां ॥१॥
तंव ते तिन्ही देव बाळमूर्ती धारी । मुक्ताई खेचरी आदिमाया ॥२॥
बाळक्रीडालीळें होतीं भिंतीवरी । बैसलीं सूर्यकरीं उष्ण घेत ॥३॥
तंव ते पातले वार्तिक व्दिजवर । करिती नमस्कार विनीतता ॥४॥
सिध्द आले भेटी चांगदेव समर्थ । सांगती वृतांत साष्टांगेसी ॥५॥
ऐकोनि चांगदेव आले भेटावया । उल्हासल्या बाह्या आलिंगना ॥६॥
जावें सामोरें निवृत्तिनाथ बोलती । तंव ज्ञानदेवा चित्तीं विस्मय वाटे ॥७॥
सर्वांतरवासी स्वामी सर्वगत । नभीं नभ सतत जयापरी ॥८॥
सन्मुख विन्मुख सूर्य कोणाकडे । आज्ञेचे बागडे नाचवीत ॥९॥
जेथें जावें तेथें भरुनि उरलेती । सर्वांतरी वस्ती तुमची स्वामी ॥१०॥
मग हंसूनि तयासी म्हणती निवृत्तीनाथ । वदलासी यथार्थ सिध्दांत तूं ॥११॥
परी येथें सगुणें भेटावें । निर्गणीं तो अवघें शुन्याकार ॥१२॥
व्दैतयोग घडे निजसुखाची वृध्दी । अभेदी तो सिध्दी आपेंआप ॥१३॥
आणखी एक गुज ऐकें ज्ञानसिंधू । इंद्राचा हा बंधु मरुदगण ॥१४॥
पुत्र कश्यपाचा उदरीं दितीचा । जन्म झाला याचा पूर्वजन्मीं ॥१५॥
मातेनें याचिये मागीतला वर । व्हाव राज्यधर पुत्र माझा ॥१६॥
तोचि भोगावया आला हा वैभव । पारमार्थिक सर्व लेउनी लेणीं ॥१७॥
इंद्रादिकां पूज्य व्हावी ऐसी बुध्दि । विदयायोग रिध्दी वरेंदु हा ॥१८॥
स्वर्गवासी आला वरदें मृत्युलोका । विदयांचा आवांका सर्व अंगी ॥१९॥
चतुर्वेद वक्ता षडषास्त्रीं संपन्न । अष्टादश पुराणें मुखोदगत ॥२०॥
चतुर्वेद विदया कळा ही चौसष्टि । मंत्र सप्तकोटी विधी ज्याचे ॥२१॥
स्थान मान कळा जाणे योगसिध्दी । अष्टादषौषधी रसायनें ॥२२॥
जडया बुडवा जाणे रोगाच्या परीक्षा । पंचाक्षरी शिक्षा करीत भूतां ॥२३॥
मणी मंत्र सिध्दी तोटके वेधका । साधका बाधका विदया जाणे ॥२४॥
चतुर हरिभक्त चौदाशे वर्षांच । बहुविदया सिध्दाच्या सिध्दजनीं ॥२५॥
आर्तभूत आले भेटी लवलाहो । उचित हें आहे सामोर या ॥२६॥
णती ज्ञानदेव चलावेंजि प्राज्ञा । भिंतीशी केल आज्ञा चला म्हणे ॥२७॥
निर्जिव चाले भिंती देखे विश्वजन । धांवती ब्रम्हण पुढें सांगों ॥२८॥
तों येती चांगदेव वादयांच्या गजरीं । आरुढोनि गजावरी चवरडोली ॥२९॥
तंव सांगती वार्तिक महासिध्द आले । भिंती आळंघले चालविती ॥३०॥
ऐकूनि चांगया गलितपत्र झाला । लोटांगणी आला गडबडां ॥३१॥
घाली दंडवत उभा ठाके पाहे । भिंती चालताहे गजगती ॥३२॥
तेज सूर्यापरी चौघे भिंतीवरी । देखोनियां करी नमस्कार ॥३३॥
ऐसे शतवरी संख्या नमस्कार जाले । तंव ते पातले जवळीके ॥३४॥
विनीत चांगया देखियेली स्थिती । उतरले क्षितीं भेटावया ॥३५॥
जाली भेटी तोचि विश्रांतीचा वट । छाया घनदाट बैसावया ॥३६॥
प्रीतीच्या पडिभरें पडिलें आलिंगन । परम समाधान उभयतां ॥३७॥
आलिंगनिमिसें हदगत आपुलें । सुख निक्षेपिलें ह्रदयीं त्याच्या ॥३८॥
चांगदेवा कृपादृकष्टी अवलोकीलें । अमृताचें झालें मार्जन त्या ॥३९॥
नेणों काय केलें ह्रदयीं क्षेम देतां । विश्रवीं एकात्मता ठसावली ॥४०॥
तुटलें बिरडें पुढें जन्मावळी । मागें झाली होळी संचिताची ॥४१॥
सकळ जनयात्रा दंडाचिये परी । जैसी महीवरी पडली वस्त्रे ॥४२॥
देखोनियां भाव देव कृपामूर्ती । आलिंगन देती लहान थोरां ॥४३॥
देवासी सारिखी आले शरणागतें । दुबळी समथें उंचनिचें ॥४४॥
अनन्याचा भाव जाणती हदगत । करिती त्या सनाथ दर्शनमात्रें ॥४५॥
सकळ विश्व जन यात्रा समुदाय । आलिंगिले बाह्या पसरुनियां ॥४६॥
आनंद पिकला सिध्दाचिये भेटी अमृताचि वृष्टि अनिवार ॥४७॥
विश्रांतीसी सुख आलें जया ठाया । रुळवि त्या पायावी निढळें ॥४८॥
गर्जती आनंदे नामाच्या गजरीं । घोष तो अंबरीं न समाये ॥४९॥
नाचती नाचणी संगीत कूसरी । राग सप्तस्वरीं आळविती ॥५०॥
वाजविती वादयें करिती सोहळा । समर्पिती कळा अभ्यासिल्या ॥५१॥
सिध्दाच्या चरित्रें गर्जती पवाडे । नाचती सुरवाडे आनंदाच्या ॥५२॥
ऐसे आले अळंकापुरी इंद्रायणीतीरा । ब्रम्हानंद नरनारी लोकां ॥५३॥
म्हणती चांगदेव महा लाभ झाला । हा सद्गुरु भेटला कृपामूर्ती ॥५४॥
विधियुक्त पूजा षोडशोपचारीं । समर्पिली शिरीं पुष्पांजुळी ॥५५॥
पतित पतित तारावें पतीता । चांगा विनितता शरण आला ॥५६॥
वरदहस्त आतां मस्तकीं ठेवावा । चांगा म्हणवावा शिष्यवर्ग ॥५७॥
मग श्रीनिवृत्तीनाथें कृपेच्या सागरें । आणि ज्ञानेश्वरें सोपानदेवें ॥५८॥
निरविला चांगा मुक्ताबाईप्रती । यासी करा प्रतीत आत्मज्ञानी ॥५९॥
चांगदेवें चरणी न्यासिला मस्तक । मुक्ताबाई हस्त ठेवी माथा ॥६०॥
न कळे ब्रम्हादिकां सद्गुरुची हतवटी । कला उठाउठी निजबोध ॥६१॥
स्वरुपीं अढळ ठेली चित्तवृत्ती । इंद्रियां विश्रांति तेणें सुखें ॥६२॥
न लाविची मुद्रा कष्ट नाहीं अंगी । केला राजयोगी जिवन्मुक्त ॥६३॥
लेवविला सर्वांगी पासष्टीचा अर्थ । होऊनि कृतार्थ ठेला पायीं ॥६४॥
चांगदेव म्हणे आजिची जन्मलों । गुरुपुत्र झालों मुक्ताईचा ॥६५॥
मागील चौदाशे झाली जन्मांतरे । आजी जन्म खरें सार्थकाचें ॥६६॥
मीचि मज भासे विश्वातें वसविता । हें सद्गुरु वचनें आतां प्रतीती आलें ॥६७॥
धन्य हा सद्गुरु निवृत्ति ज्ञानेश्वरु । सोपान मुनेश्वरु मुक्ताबाई ॥६८॥
दर्शनेंचि यांच्या सवरुप साक्षात्कारु । चांगा वटेश्वरु सुखी केला ॥६९॥
मग केशवदास चांगा म्हणती ज्ञानेश्वर । तुज असो बडिवार नामाचा या ॥७०॥
हा एकोनि उत्साह सकळ प्रांतवासी । आले दर्शनासी परिवारे ॥७१॥
म्हणती सिध्द भेटी आले चांगदेव । अगणित वैभव घेऊनियां ॥७२॥
सकळ वर्ण आले पहावया चरित्र । पंचक्रोशी क्षेत्र न पुरे ठावो ॥७३॥
व्यवसायी जन आले घेऊनि सौदे माल । होईल उकल म्हणती येथें ॥७४॥
साधिले बाजार मांडिलें दुकान । पहिले तो वाण सिध्द आहे ॥७५॥
म्हणती चांगदेव करावें पूजन । दयावें निमंत्रण सर्व यात्रे ॥७६॥
त्रिलक्ष भोजनाची अइत सारिली । पूजा आरंभिली सद्गुरुची ॥७७॥
उभय तीरी दिले मंडप अपार । शोभे गंगातीर इंद्रायणी ॥७८॥
सकळ यात्रा आणि ज क्षेत्रवासी । यावें भोजनासी प्रार्थियेले ॥७९॥
नरनारीं बाळें अवघीं लहानथोरें । प्रार्थिलीं आदरें प्रसादासी ॥८०॥
भगवदभुती दयावें सर्व भुतीं अन्न । हेंचि मुख्य पूजन सद्गुरुचें ॥८१॥
आरभिले पाक अन्नें नानापरी । शाखा कोशिंबिरी चिरयेल्या ॥८२॥
शर्करा मिश्रीत सघृत पक्कानें । षडस दिव्यान्नें सिध्द केलीं ॥८३॥
मग षोडशोपचारें पूजेस आरंभ । वेदघोषें नभ गर्जिन्नलें ॥८४॥
सिदोपंत गिरिजाबाईचें पूजन । करुनि स्तवन बहुत केलं ॥८५॥
तुमचिये कुळीं हे विश्वाचे तारक । उपजलें बाळक महासिध्द ॥८६॥
समर्पिली पूजा वस्त्रें अळंकार । संपदा अपार वोपियेली ॥८७॥
सिध्दाचें पूजन आरंभिले वोजा । मेळवूनियां व्दिजां व्युत्पन्नांसी ॥८८॥
निवृत्ति ज्ञानेश्वर सोपान मुक्ताई । पूजेची नवाई विश्व देखे ॥८९॥
रत्नजडित चौक्या बैसविले वरी । अर्घ्यपादयादि उपचारी पंचामृतें ॥९०॥
शतसहस्त्र विप्र भोंवताले फेरी । अभिषेक पात्रें करीं धरिलीं व्दिजीं ॥९१॥
महारुद्र आरंभ उपन्यास । अंबर मंत्रघोषं दुमदुमीत ॥९२॥
मंगळ उतुरे नाना वादयांचा गजर । घोषें अवलोकिती चरण दृष्टी ॥९५॥
नानापरिमळ द्रव्यें गंधाक्षता माळा । जडित पदकें गळां समर्पिली ॥९५॥
सुवर्ण तंतु वस्त्रें मुकुटादि अलंकार । लेववीले परीकर चांगदेवें ॥९६॥
मुद्रिका भूषणें जडितांचि कुंडलें कटी सूत्र सुदले वाळे वाकीं ॥९७॥
नाना सुमन हार घालूनियां कंठी । अवलोकुनी दृष्टी भरुनियां ॥९८॥
विसन्न चांगया जाणे विधी मार्ग । पूजा केली सांग उपचारेशीं ॥९९॥
पूजेचे आसनीं विराजल्या मूर्ती । झाली धुपारती आरतीया ॥१००॥
सुवर्ण दक्षिणा गौदाना दिधली । पूजा सांग केली सद्गुरुची ॥१॥
पहाती लोचनी नरनारी बाळें । आणि नाचती कल्लोळें प्रेमाचिया ॥२॥
जवादी कस्तुरी बुक्याचे धुसर । उघळती अपार देवावरी ॥३॥
नैवेदय पुष्पांजली केल्या प्रदक्षिणा । सकळां ब्राम्हणां पूजीयेले ॥४॥
हरिभक्त वैष्णव पूजिले आदरें । वादयें मंगळतुरे घोष ध्वनि ॥५॥
व्यवसायी जन यात्रा पूजीयेले क्षेत्रवासी । दिधलीं सवसिणीसीं हळदी कुंके ॥६॥
चांगदेवें मग पोटया सुंदर जानु जंघा ॥८॥
उदर त्रिवळी प्रशस्त वक्षस्थळा । शोभली निर्मळ उटी अंगी ॥९॥
सरळ भुजादंड तुळशीपत्रें माळा । नानापुष्पें गळां डोल देती ॥१०॥
हनुवटी चुबुका दंत हिरीया जाती । दुबाही पंगति विराजली ॥११॥
नासिक सरळ उन्मलीत नेत्रकमळ । शोभल्या कळाळीं गंधाक्षता ॥१२॥
जावळ कुरळमंडीत मस्तक । पूजा ब्रम्हादिक समर्पिती ॥१३॥
मुक्ताई मुक्तरुप मुक्तीची चित्कळा । नित्य मुक्तलीळा दावी अंगी ॥१४॥
अर्ध्यापादयादिक वेदाच्या सुस्वरी चांगदेव करी ध्यान पूजा ॥१५॥
धन्य तो दिवस नैवेदय अर्पिला पुष्पांजुली केला प्रणीपाता ॥१६॥
पूजिले ब्राम्हण विधी अपचारें । हरिभक्त आदरें यथोचित्ता ॥१७॥
बैसविल्या पंगती इंद्रायणी तीरीं । पात्री नानापरी विस्तारिल्या ॥१८॥
दिव्यान्नें परवडी अन्नशुध्दी वाढिली । मंत्रे प्रोक्षीयेलीं त्रिपदेच्या ॥१९॥
सोडिला संकल्प झालों निर्विकल्प । निराशिलें पाप संदेहाचें ॥२०॥
तदर्पण केलें ज्ञानेश्वर नामें । भोजनें संभ्रमें सारियेलीं ॥२१॥
एक एक शीत व्दिजमुखीं अर्पिता । शतक्रतू भोक्ता नारायण ॥२२॥
ऐसा ये क्षेत्रींचा अदभुत महिमा । वर्णी निरुपमा चांगदेव ॥२३॥
मग समर्पिले विडे दक्षिणा उपचारीं । चांगदेव करी नमस्कार ॥२४॥
मंत्राक्षता व्दिजीं अर्पियेल्या शिरीं । राहो कल्पवरी क्षेत्र महिमा ॥२५॥
मग बैसवोनि पंगती परिवार आपुला । शेष प्रसाद घेतला चांगदेवें ॥२६॥
अदभुत सोहळा हरीचीं कीर्तनें । वांटियेलीं धनें याचकांसी ॥२७॥
सकळांसी तृप्ती याचेनि दर्शनें । करीती स्तवनें नारीनर ॥२८॥
प्रत्यक्ष पंढरी ते हे अळंकापूर । मुक्तीचें माहेर उपासका ॥२९॥
निर्विकार जन सकळ क्षेत्रवासी । पूजिती सिध्दांसि नित्यकाळ ॥३०॥
धन्य पंचक्रोशी धन्य क्षेत्रवासी । धन्य जे यात्रेसी येती लोक ॥३१॥
ऐसा चांगदेवें स्तुतीवाद केला । आणि मस्तक ठेविला चरणांवरी ॥३२॥
याचि जन्में बहुत जन्मा निवारीलें । वंदितां पाउलें सद्गुरुचीं ॥३३॥
बहुतेक विदयांचे बहु गुरु आहेती । परी ते तुळणे येती सद्गुरुचे ॥३४॥
ज्याचिया प्रसादें पावलो हा बोधू । समूळ मायाकंदू तोडियेला ॥३५॥
निजानंद पदीं स्थापिलों सतत । केला जीवन्मुक्त क्षणामाजी ॥३६॥
काय उताराई होंऊं कवण्या अर्थे । अर्पितां नाशिवंतें जीवादिकें ॥३७॥
कायावाचामनें करुनि कुरवंडी । धरी तें न सोडीं चरण याचे ॥३८॥
येणें काळें सर्व लाभाचिया कोटी । लाधलों या भेटी सिध्दाचिया ॥३९॥
सकळ विदया सहित करुनि वोवाळणी । सांडीन वरुनी जीवप्राण ॥४०॥
म्हणती चांगदेव कृतकृत्य झालों । चरणीं राहिलों मुक्ताईचे ॥४१॥
या संतचरित्र ओव्या मुक्ताफळें माळा । मिरवी जो गळां आवडीनें ॥४२॥
पुढें वाचे गाये आणीका परिसवी । लाभे तो पदवी हरिभक्तीची ॥४३॥
संतांचे चरित्र आवडी जो गाये । पढीयंता तो होये विठोबांसी ॥४४॥
आवडे श्रीहरी संत आचारित । म्हणउनी तिष्ठत हरीकथे ॥४५॥
नारद प्रल्हाद पुंडलीक नामा । प्रिय पुरुषोत्तमस जीवाहुनी ॥४६॥
गोरा परसा आतां नरहरी सावता । कूर्मा आवडता पांडुरंगा ॥४७॥
निवृत्ति ज्ञानेश्वर सोपान मुक्ताइ्र । चांगा मिराबाई भानुदास ॥४८॥
विसोबा खेचर जाल्हान कबीर । रोहिदास वच्छरा चोखामेळा ॥४९॥
जनार्दन एका विष्णुदास तुका । वैकुंठनायका आवडते ॥५०॥
संतोबा पवार हरीभक्त अपार । हे परम प्रीतीकर विठोबाचे ॥५१॥
या सकळांची चरित्रें श्रवणें पठणें । मुक्त वाचाऋणें झाला निळा ॥५२॥
नव्हे वाचस्पती मूढ वाचक मी । परि उदयोकर्ता स्फूर्ति ज्ञानेश्वर ॥५३॥
तिहींच हा ग्रथ पावविला सिध्दी । प्रवर्तूनि बुध्दी स्फूर्ती दिली ॥५४॥
श्रोता वक्ता तूंचि आवडीच्या भोरें । ग्रंथ अत्यादरें लिहविला ॥५५॥
नेणता प्रमेय कथेच्या अन्वया । नेणों केलें काय सामर्थ्यगुणे ॥५६॥
सत्य सत्य सत्य त्रिवाचा हें सत्य । वदविता यथार्थ तुकया सिध्द ॥५८॥
उदंड राहिलें कथीं कथिता कथनीं । वाढेल म्हणउनी ग्रंथ थोर ॥५९॥
देवाचिया चित्ता आलें तोंचि पुरे । राहिल्या विस्तारें काय काज ॥६०॥
पुढातो पुढती संतां हेचि विनवणी । बैसावें श्रवणीं करुनी कृपा ॥६१॥
ऐकूनि हें संत तोषले सकळ । म्हणती तूं प्रेमळ कळों आलें ॥६२॥
हरिप्रियाची कथा सप्रेमें वदलासी । झाला हा आम्हांसी पाहुणेरु ॥६३॥
प्रासादिक वाणी आम्हांरे रुचली । अष्टांगें निवालीं श्रवणमात्रें ॥६४॥
निळा म्हणे सुखें आनंदे निवाला । चरणासि लागला धांवोनियां ॥६५॥
॥ इति श्रीचांगदेवचरित्रे सिध्ददर्शनअनुग्रहपूजादिउपचारकथनं नाम पंचमप्रकरणं समाप्तम् ॥
संत निळोबाराय गाथा । संत निळोबाराय अभंग । निळोबा अभंग । निळोबा गाथा । सर्व गाथा । निळोबाराय माहिती । पिंपळगाव मंदिर निळोबाराय । sant nilobaray gatha | sant nilobaray abhang | niloba abhang | niloba gatha | sarv gatha | nilobaray mahiti | nilobaray mandir pimpalgav |देवभक्त यांची एकरुपता संत निळोबाराय (संतांपाशीं करुणा भाकणें)निळोबाकृत चांगदेव चरित्र (प्रकरण ३ ते ५)निळोबाकृत चांगदेव चरित्र (प्रकरण ३ ते ५)निळोबाकृत चांगदेव चरित्र (प्रकरण ३ ते ५)निळोबाकृत चांगदेव चरित्र (प्रकरण ३ ते ५)निळोबाकृत चांगदेव चरित्र (प्रकरण ३ ते ५)निळोबाकृत चांगदेव चरित्र (प्रकरण ३ ते ५)निळोबाकृत चांगदेव चरित्र (प्रकरण ३ ते ५)निळोबाकृत चांगदेव चरित्र (प्रकरण ३ ते ५)
तुमच्या शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांतीला भेट द्या .