संत निळोबा महाराज

संत निळोबाराय (आरती)

संत निळोबाराय (आरत्या)

१५७१

भानुदासाच्या कुळीं महाविष्णूचा अवतार । आदि क्षेत्रीं स्थान वस्ती गोदातीर ॥१॥

ओवाळूं आरती स्वामी एकनाथा । तुमचे नाम घेतां हरे भवभयचिंता ॥२॥

जनार्दनाची कृपा दत्तात्रयाचा प्रसाद । भागवती टीका नारायण्‍ आत्मबोध ॥३॥

ब्रहमा विष्णु महेश ज्यासी छळवया येती । न ढळे ज्याची निष्ठा होशीं एकात्मता भक्ति ॥४॥

कावडीनें पाणी ज्या घरीं चक्रपाणी वाहे । अनन्यभक्तिभावें निळा बंदी त्याचे पाय ॥५॥

१५७२

प्रपंचरचना सर्वहि भोगुनि त्यागीली । अनुतापाचे ज्वाळीं देहबुध्दी हविली । वैराग्याची निष्ठा प्रगटूनि दाखविली । अहंता ममता दवडुनि निजशांति वरिली ॥१॥

जयजयाजी सदगुरुतुकया दातारा । तारक तूं सकळांचा जिवलग सोयरा ॥ध्रु॥ हरिभक्तिचा महिमा विशेष वाढविला । विरक्तिज्ञानाचा ठेवा उघडुनि दाखविला । जगदोध्दारालागीं उपाय सुचविला । निंदक दुर्जनांचा संदेह निरसिला ॥जय ॥२॥

तेरा दिवस बह्या रक्षूनियां उदकीं । कोरडयाची काढूनी दाखविल्या शेखीं । अपार कविताशक्ति मिरवुनि इहलोकीं । कीर्तनश्रवणें तुमच्या उध्दरती जन लोकीं । जय ॥३॥

बाळवेष घेऊनि श्रीहरी भेटला । विधिचा जनिता तोचि आठवा हा दिधला । तेणें ब्रहमानंदें प्रेमा डोलविला । न तुके म्हणुनी तुका नामहं गौरविला ॥ जय ॥ ॥४॥

प्रयाणकाळीं देवें विमान पाठविलें । कलिच्या काळामाजीं अदभुत वर्तविले । मानवदेह घेऊनि निजधामा गेले । निळा म्हणे सकळ संत तोषविले ॥ जय ॥  ॥५॥

१५७३

अवघे वर्ण बावन्न परी । शब्दीं शब्दांच्या कुसरी ॥१॥

आयते दिल जोडूनियां । स्वामी सद्गुरु तुकया ॥२॥

न लगे करणेंचि घडामोडी । अर्थी अक्षरें उघडीं ॥३॥

निळा म्हणे कृपावंत । कैसेनि उत्तीर्ण होऊं आतां ॥४॥

१५७४

एकाक्षरीं विस्तार करा । कर्थांतरा मेळवुनी ॥१॥

हे तों माझी नव्हे युक्ति । चेतवणें स्फूर्ति तुमची हे ॥२॥

वसंताच्या ईक्षण मात्रें । पल्लव पत्रें फळें वृक्षा ॥३॥

निळा म्हणे रविकीणें । विकाशवणें कमळासी ॥४॥

१५७५

कृपावंत सद्गुरुराया । केला जो माझीया मना बोध ॥१॥

तो काय बोलोनि दाखवूं आतां । बोलणें बोलतां आरौतें पडे ॥२॥

शब्दांतील पराप्तर । ध्वनि १कार न पवेचि ॥३॥

निळा म्हणे आनंद कोटी । उथळोनी सृष्टी गगनीं भरे ॥४॥


संत निळोबाराय गाथा । संत निळोबाराय अभंग । निळोबा अभंग । निळोबा गाथा । सर्व गाथा । निळोबाराय माहिती । पिंपळगाव मंदिर निळोबाराय । sant nilobaray gatha | sant nilobaray abhang | niloba abhang | niloba gatha | sarv gatha | nilobaray mahiti | nilobaray mandir pimpalgav |

तुमच्या शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांतीला भेट द्या .