संत निळोबा महाराज

संत निळोबाराय (आपल्या स्थितीसंबंधानें जनाशीं उद्गार)

संत निळोबाराय (आपल्या स्थितीसंबंधानें जनाशीं उद्गार)

७४८

अखंडता ते झाली ऐसी । विठ्ठल  राहिला मानसीं । ध्यानीं मनीं लोचनासीं । अहर्निशीं निजबोध ॥१॥

जनीं वनीं जनार्दन । नाढळें त्या भिन्नाभिन्न । एकात्मता अनुसंधान । नित्य दर्शन विठठलीं ॥२॥

देहीं असोनी देहातीत । गुणीं गुणातें नातळत । विषयीं विषयापासुनी मुक्त । भोगीं भोगासक्त नव्हती ते ॥३॥

नित्य निरामय निर्गुण । जगादात्मा जो आनंदघन । विटेवर पाउलें समान । लोधलें मन चरणीं त्या ॥४॥

निळा म्हणे विठ्ठल  जपें । सांडिले ते पुण्यपापें । संकल्प सोडिले विकल्पें । त्रिविधतापें स्वानुभवी ॥५॥

७४९

अवघाची गुणीं आहे हा भला । परि हा याला लोभ कां ॥१॥

कांहींच उरों नेदी माझें । संचिंतपुजें भरियेलें ॥२॥

बरें वाईट हा न म्हणेचि कांहीं । पाप पुण्य तेंहि लुंचियेलें ॥३॥

निळा म्हणे जें जें देखें । तें तें हा सुखें भरितुची ॥४॥

७५०

अवघींच अंगे वेष्टोनि ठेलीं । हरीचिये रंगली निज सेवें ॥१॥

तेणेंचि वाटे कृतकुत्यार्थ । चुकले अनर्थ जन्मजरा ॥२॥

सर्व काळ सुखीं सुख । हरिखीं हरिख कोंदला ॥३॥

निळा म्हणे पुरले नवस । आलिया नरदेहास सफळ झालें ॥४॥

७५१

अवघ्या अंगें अवघें झालों । अवघेचि ल्यालों आळंकार ॥१॥

अवघ्या ठायीं अवघ्या देहीं । अवघ्या नाहीं वेगळां ॥२॥

अवघ्यां जवळी अवघ्यां दुरी । अवघ्यां परी सारखा ॥३॥

अवघा निळा अवघ्यां संगें । अवघ्या रंगे रंगला ॥४॥

७५२

असो आतां हें बोलणें । आम्ही निर्भय एक्या गुणें ॥१॥

सांगितलें करुं काम । हातें टाळी मुखें नाम ॥२॥

गुण वानूं नानापरी । आज्ञा त्याची वंदुनी शिरीं ॥३॥

निळा म्हणे राजा धरी । हातीं तया सभाग्य करीं ॥४॥

७५३

असोतु ऐसियाच्या गोठीं । काय करुनि लाभ तुटी ॥१॥

गाऊं विठठलु सांवळा । आठवूं तो वेळोवेळां ॥२॥

जया चरणीं ब्रीद भार । वांकि किंकणी झणत्कार ॥३॥

निळा म्हणे तुळसीमाळा । पदक एकावळी गळां ॥४॥

७५४

असो त्याची मात । गाऊं गीतीं पंढरीनाथ ॥१॥

जेणें मनासीं विश्रांती । फावे इंद्रियां सुखशांती ॥२॥

आळवितां नामें । भुवनें चौदाहिं संगमें ॥३॥

निळा म्हणे वैकुंठवासी । करी कृपा राहे पासीं ॥४॥

७५५

आम्हां सापडलें वर्म । हरिभक्तिचें सुगम ॥१॥

त्यांचे आळवावें नाम । ह्रदयीं धरुनियां प्रेम ॥२॥

वाजउनी टाळी । सुखें नाचावें राउळीं ॥३॥

निळा म्हणे संतीं । दाविलें हें कृपावंतीं ॥४॥

७५६

आम्हां सुखा नाहींचि उणें । सेवागुणें स्वामीचियां ॥१॥

अवघ्या ब्रम्हांडाच्या सूत्रीं । गाऊं वक्‍त्रीं गुण त्याचे ॥२॥

जेणें उदंड सभाग्य केलें । निजदास आपुले भूमंडळी ॥३॥

निळा म्हणे उपेक्षूं नेणें । आपुलिया स्मरणें नामाच्या ॥४॥

७५७

आळवीण क्षणक्षणां । नारायणा या नामें ॥१॥

या हो या हो पंढरीनाथा । कृपावंता सामोरे ॥२॥

आलियाचा हरा शीण । दया हो आलिंगन धांवोनी ॥३॥

निळा म्हणे परस्परें । अत्यादरें आदर ॥४॥

७५८

आळवूं आम्ही विठोबासी । नेणों आण्किासी रंजवूं ॥१॥

राग कळा घात मात । स्वर संगीत मूर्छना ॥२॥

ताल ग्राम छंद बंद । गीत प्रबंध कंपित ॥३॥

निळा म्हणे प्रेमें वाणी । गर्जवूं गुणीं श्रीहरिच्या ॥४॥

७५९

आज्ञापिलें जें श्रीहरी । तेचि वदली हें वैखरी ॥१॥

नाहीं माझें येथ वीर्य । जाणे ज्याचें तोचि कार्य ॥२॥

येईल जरी हे प्रतिती । धरा तरी हें हितचि चित्तीं ॥३॥

निळा म्हणे सांडिजे येरी । नास्तिक वादी परते दुरी ॥४॥

७६०

विसारे गोंविला । अवघा आंखुनी ठेविला ॥१॥

देउनिया अहंभावो । भक्तीं सांठविला देवो ॥२॥

नामाचिंतन । करुनि केला हा स्वाधीन ॥३॥

निळा म्हणे जिवेंसाठीं । करुनि सामाविला पोटीं ॥४॥

७६१

उगेचि आतां बैसेन मी म्हणे । तंव हा करणें चेष्टवितों ॥१॥

दृष्टीपुढें हा उभाचि ठाये ऐकणें होउनी राहे श्रोत्रबिळीं ॥२॥

मनही नेउनी लेपउनी ठेवी । चित्तासी हा गांवी आपणासीं ॥३॥

निळा म्हणे बाई हदयीच राहिला । अवघाचि रोधिला जागा येणें ॥४॥

७६२

उतरिला माझा भार । येणें कैवार धरुनियां ॥१॥

आपुला आपण सोहळा करी । पाहिजे संसारीं पुरवी तें ॥२॥

नेदि पडों उणें कोठें । आलीं संकटें निवारी ॥३॥

निळा म्हणे झाला ऋणी । चक्रपाणी आम्हां घरीं ॥४॥

७६३

उमटलें वरी । होतें तैसें तें अंतरीं ॥१॥

आतां नवजाय झांकिलें । बुध्दि वाचे वोसंडले ॥२॥

दीप अंधारीं ठेविला । प्रकाश न झांके फाकला ॥३॥

निळा म्हणे पांडुरंगें । चूतविलीं माझीं अंगें ॥४॥

७६४

ऐसा जोडियला दातार । करुनी नामाचा उच्चार ॥१॥

आम्हीं भाग्यवंतीं जनीं । पायीं याचे विश्वासोनी ॥२॥

नेदी जाऊं कोठें दुरी । पुरवी अवघेंचि हा घरीं ॥३॥

निळा म्हणे त्वरित आला । फळा अर्थ तो चिंतिला ॥४॥

७६५

काय करुं तैसे ज्ञान । जेणें अभिमान खवळे तें ॥१॥

राहो भाव तुझया चरणीं । गर्जो वाणी गुण कीर्ति ॥२॥

काय करुं व्यत्पत्ती तैसी । जेणें वादासी मूळ होय ॥३॥

निळा म्हणे अहंकार वाढे । नलगे वेडें वैराग्य तें ॥४॥

७६६

काय काज कोणासवें । विठ्ठल देवें वांचूनी ॥१॥

काय नाहीं चरणापासीं । पाहिजे ज्याशी तें तेथें ॥२॥

म्हणोनियां जीवें साठी । करुनि नेहटी बैसलों ॥३॥

निळा म्हणे सभाग्य धणी । पुरवील आयणी सकळ ही ॥४॥

७६७

काय विघरुनी केलें पाणी । घडिली अवनी कासयाची ॥१॥

महिमा जाणें त्याचा तोचि । नेणें विरंची जरी ज्ञाता ॥२॥

काय पिंजुनी केलें गगन । निर्मिला हुताशन कासयाचा ॥३॥

निळा म्हणे भरोनि अंबरा । निर्मिला वारा कासयाचा ॥४॥

७६८

कांहीच जाणीव न करावी । आहे जिवीं हें ठावें ॥१॥

परि मज बोलवी देवो । तेथें उपावो कोणाचा ॥२॥

नव्हे कांही बहुश्रुत । वक्ता पंडित वाचाळ ॥३॥

निळा म्हणे श्रीविठ्ठल  । बोलवी बोल ते बोलें ॥४॥

७६९

कृपाघनें वृष्टी केली । माझीं निवविलीं निजांगें ॥१॥

म्हणोनियां वारंवार । त्याचे उपकार आठवितों ॥२॥

न घेउनी कांही सेवा । धांविले कुणवा आपुलिया ॥३॥

निळा म्हणे सुखी केलें । हातीं धरिलें वरदानें ॥४॥

७७०

कृपादीन प्रकाशिला । विलया नेला अंध:कार ॥१॥

आतां दृष्टीपुढें दिसे । जेथें असें तें तैसें ॥२॥

सत्यासत्यमिळणी झाली । अवघी फावलीं निवडितां ॥३॥

निळा म्हणे उदयो केला । रवीचि उगवला नयनांत ॥४॥

७७१

कृपा तुमची फळा आली । बुध्दी झाली निश्चळ ॥१॥

नामचि एक उच्चारिलें । तेथेंचि बैसलें मन माझें ॥२॥

इंद्रियांची पुरली धांव । बुध्दिभाव ठसावला ॥३॥

निळा म्हणे निरंतर । न पडे विसर चित्तासी ॥४॥

७७२

केला माझा अंगिकार । ठेविले कर जेणें कटीं ॥१॥

आतां सुखा नाहीं उणें । नामस्मरणें याचिया ॥२॥

तीर्थे व्रतें तपोवनें । वसती स्थानें भासती ॥३॥

निळा म्हणे साधनसिध्दि । दर्शनें उपाधी निरसिल्या ॥४॥

७७३

केलें तैसें वदलों देवें । अनुभवें उद्गार ॥१॥

नाहीं येथें चालों येत । तर्क मत पायांपें ॥२॥

स्वामीसवें निकटवासें । जैसें तैसें केंवि सरें ॥३॥

खोटी याची नव्हे चाली । निवडिली पारखितां ॥४॥

निळा म्हणे केला धंदा । परमानंदा आज्ञेचा ॥४॥

७७४

कोटी दिवाळया दसरे सण । घडलें श्रीचरण देखिलें ॥१॥

सकळही पर्वेव्रतें जोडलीं । तुमचीं वंदिलीं पदांबुजें ॥२॥

आलिंगनें शीतळ काया । निवाल्या बाह्या जीव प्राण ॥३॥

निळा म्हणे अवघींच अंगें । तुमच्या संगे सुस्नात ॥४॥

७७५

खेळविलें अंगावरी । अळंकारी शोभविलें ॥१॥

मी तों नेणें नेणपणें । होती शहाणे विस्मित ॥२॥

परस्परें अनुवादती । एक सांगती एकापें ॥३॥

कैसा निळा भाग्यवंत । मायबाप संत जवळी त्या ॥४॥

७७६

गणगोत अवघें धन । आम्हां चरण विठोबाचें ॥१॥

आणखी दुजें नेणों कांहीं । चाडचि नाहीं धनमानें ॥२॥

देवाविण वाटती ओस । वैकुंठ कैलास नावडती ॥३॥

निळा म्हणे आवडी जाणें । पुरवी खुणें जिवींचे तो ॥४॥

७७७

गोमटे पाय देखिले दिठीं । समान नेहटी वीटेचिये ॥१॥

तैंचिपासुनी लागला छंद । याचिया वेध स्वरुपाचा ॥२॥

कटांवरी कर तुळसीमाळा । चंदनाचा टिळा मुगुट माथा ॥३॥

निळा म्हणे वेढिलें वसन । विदयुल्लतें समान तेज त्याचें ॥४॥

७७८

घांट गर्जे महाव्दारीं । विठ्ठल नामें वागेश्वरीं ॥१॥

निळा उभा तो देखिला । भाव भक्ति आलिंगिला ॥२॥

इटे उभा तो देखिला । भाव भक्ति आलिंगिला ॥३॥

निळा म्हणे आवडी पोटीं । हदय सांठविला संपुष्टीं ॥४॥

७७९

चित्तीं माझें पांडुरंग । बैसला अभंग न ढळेसा ॥१॥

जातां दिवस जातां राती । स्वप्नीं जागृतीं सुषुप्तीं तो ॥२॥

देखतां डोळा ऐकतां कानीं । बोलतां वदनीं तोचि पुढें ॥३॥

निळा म्हणे बुध्दीमन । गेलीं विरोन त्यामाजीं ॥४॥

७८०

जडला जीवीं तो नव्हेचि परतां । चित्तीं चिंता व्यापूनियां ॥१॥

बुध्दीमाजीं याचेंचि ठाणें । राहटें करणें अहोरात्रीं ॥२॥

अंत:करणीं धरिला थारा । आंतु शरीरा बाहेरी हा ॥३॥

निळा म्हणे अवघाचि हरि । आम्हां घरीं दारीं दाटला ॥४॥

७८१

जयाचेनि कृपामृतें । पोखें माझें जीवन भातें ॥१॥

कैसा विसरों मी यासी । एकानेक नाहीं ज्यासी ॥२॥

नेणोनियां आपपर । केला माझा अंगिकार ॥३॥

निळा म्हणे शिकवा बोल । बोली बोलणें सुढाळ ॥४॥

७८२

जाणीवचि माझी गिळूनि ठेला । नेणीवेतें प्याला निपटूनियां ॥१॥

निढळवाणें मज करुनि ठेविलें । जीवाचेंही हरिलें जीवपण ॥२॥

ज्ञानासी तो हा वाढोचि नेदी । ग्रासिल्या उपाधी परमार्थिका ॥३॥

निळा म्हणे येणें नेलें आपपर । मोडियेली थार दोहिंकडे ॥४॥

७८३

जाणोनियां मनींचा हेत । केलें सनाथ मजलागीं ॥१॥

कृपावंत संत सद्गुरु । भवार्णव तारुं मजलागी ॥२॥

बोलविली आरुषवाणी । श्रीहरिच्या गुणीं आपुलिये ॥३॥

निळा म्हणे नवलचि केलें । अंकिता गौरविलें निज अंकीं ॥४॥

७८४

जिवाचाही जीव माझया शिवाचा शिव । पंढरीचा देव मन बुध्दी इंद्रियें ॥१॥

आईका हो श्रोते तुम्ही संत सज्जन । मी माझें हें जतन कोण करी यावरी ॥२॥

नयनाचेंही नयन माझया घ्राण । श्रवणाचेंहि श्रवण तोचि रसनेची रसना ॥३॥

त्वचेचीही त्वचा माझे वाचेची वाचा । बोलविसी बोलचा तोची अर्थ तात्पर्य ॥४॥

कराचेहि कर माझा चरणचे चरण । चैतन्याचें चैतन तोचि रसनेची रसना ॥५॥

त्वचेचीही त्वचा माझे वाचेची वाचा । बाकलविसी बोलचा तोची अर्थ तात्पर्य ॥६॥

कराचेहि कर माझया चरणाचे चरण्‍ । चैतन्याचें चैतन्य तोचि मनांचे मन ॥७॥

निळा म्हणे भुक्ति मुक्ति विरक्ति ज्ञान । शांति क्षमा दया तोचि सिध्दी साधन ॥८॥

७८५

जीवभाव ठेवूं पायीं । तरी तो काय लटिकाचि ॥१॥

याचिलागीं लिगटलों । पायीं जडलों न ढळेसा ॥२॥

जेथें संतचरणरज । पडती सहज मी तेथें ॥३॥

निळा म्हणे याविण आतां । न दिसे अर्पितां उत्तीर्णपणा ॥४॥

७८६

जेणें माझी वाचस्पती । आपुल्या कृपें केली सरती ॥१॥

त्याचें उत्तीर्ण होउं म्हणतां । जीवा जीवपण नुमसे आतां ॥२॥

अवघेंचि त्यांचे घेणें देणें । मी हें माझें कांहीचि नेणें ॥३॥

निळा म्हणे ठेविलों ऐसा । जाळींचा बुदबुद जळींचि जैसा ॥४॥

७८७

जेणें छत्र सिंव्हासन । दिधलें आसन त्रिणाचें त्या ॥१॥

काय उर्त्तीण होईजे रंकें । तेंचि म्यां मशकें संतचरणा ॥२॥

ज्याचिया कृपें ब्रम्हानंद । पावलों अगाध अक्षयी तो ॥३॥

निळा म्हणे साम्राज्यें लेणें । लेवविलें ईक्षणें कृपेचिया ॥४॥

७८८

ज्याचा आहे त्या अभिमान । मी तों रंक अनाथ दीन ॥१॥

नजगे देणें हा परिहार । होईल सत्याचा आदर ॥२॥

जेणें केलेसेल पुढारें । त्याचे तया उणें पुरें ॥३॥

निळा म्हणे मी मापारी । उभा धणी शिरावरीं ॥४॥

७८९

झालें डोळियां पारणें । इंद्रियांही पुरलेपणें ॥१॥

विठो देखतांचि दिठीं । जिवीं जिवा पडली मिठी ॥२॥

बुध्दिनिश्चयाचें घर । तेहि झाली तदाकार ॥३॥

निळा म्हणे काया वाचा । मना संकल्प हा तयाचा ॥४॥

७९०

डोळियाचाही डोळा बुध्दी । माझी उघडूनियां कृपानिधी । देखणी करुनियां त्रिशुध्द । निजात्मपदीं स्थापिली ॥१॥

तेणें दिसती ठायां ठावो । हदय सकळांचेही भाव । संत दावी जे अनुभव । आणखीही सर्व मायाकृत ॥२॥

नवल कृपेची हें जाती । फिटली मोह ममता भ्रांती । उत्पत्ति स्थिती प्रळय होती । तें तें निगुती आटलें ॥३॥

देखणें झालें नयनानयन । देखती आपुलेंही वर्तन । राहिलें ठायींच ते जडोन । अभेद होऊन देखती ॥४॥

निळा स्वामी सद्गुरुनाथा । देखणा तूंचि मी नाहीं आतां । तोडूनी मी हे माझी ममता । आपण आतौता मेळविलों ॥५॥

७९१

त्याचे पायीं माझी बुध्दी । जडली कधीं न ढळेची ॥१॥

ज्याचे ध्यानीं मनीं हरी । नामें वैखरी उच्चार ॥२॥

नित्य कीर्तनांचें घोष । करिती उल्हास आवडीं ॥३॥

निळा म्हणे त्यांची गोठी । ऐकतां पोटीं सुख वाटे ॥४॥

७९२

दिवसरात्रीं हाचि धंदा । वर्णितों गोविंदा गुणकीर्ति ॥१॥

स्वप्नामाजी सुषुप्ती आंत । जागृतीये मात याचाचि ॥२॥

खातां जेवितां बोलतां । आठवे कथा नित्य याची ॥३॥

निळा म्हणे लगटोनि आलें । पीक चांगले असंभाव्य ॥४॥

७९३

दिसे तोचि जनीं वनीं । विठ्ठल  ह्रदयीं त्रिभुवनीं ॥१॥

लेणें नेसणें भूषणें । विठ्ठल  वस्त्रें परिधानें ॥२॥

अन्न भोजन उदक पान । विठ्ठल  सुषुप्ती शयन ॥३॥

निळा म्हणे वाचा बोली । विठ्ठल  होऊनियां ठेली ॥४॥

७९४

न कळे केव्हां दिवस गेला । रात्रीं झाला तमनाश ॥१॥

निद्राचि नाहीं स्वप्न तें कैंचें । नि:शेष जागृतीचें विस्मरण ॥२॥

भोक्ताचि नाहीं कैचा भोग । अनंगीं अभंग हारविलें ॥३॥

निळा म्हणे ठांई ठावो । देवीं देवो मावळला ॥४॥

७९५

न पडे विसर याचा मना । झाली तद्रुप वासना । मही व्यापूनियां गगना । दिसे नयना रुप पुढें ॥१॥

जें जें आढळें दृष्टीपुढें । तें तें याच्या स्वरुपें मांडें । व्यापुनी सकळांमाजिवडें । वसें अंतरीं सकळांचे ॥२॥

स्वरुप सांवळें सगुण । अंगकांति मेघवर्ण । करीं धरुनियां जघन । दृष्टी अवलोकीं पुंडलिका ॥३॥

कर्णी कुंडलें विशाळ डोळें । जैसीं विकासलीं दिव्य कमळें । हदयावरीं कंठमाळे । पदकीं रत्नें झळकती ॥४॥

कास पितांबरें घातलीं । मेखळा कटीं सूत्रें रेखिलीं । पाउलें विटेवरीं शोभलीं । निळयां झालीं प्रसन्न तीं ॥५॥

७९६

न धरी आतां शंका । कशासाठी भिऊं लोकां ॥१॥

ज्याचें ओझें तयावरी । मज हे ऐशी काय थोरी ॥२॥

सांगितलें करुं काज । ज्याची तया चिंता लाज ॥३॥

निळा म्हणे गेलो भेवो । जाणोनि साह्य पंढरिरावो ॥४॥

७९७

नाहीं उपेक्षिलें कोणा । थोरा लहाना निवडुनी ॥१॥

ऐसी संत देती ग्वाही । पुराणेंही गर्जती ॥२॥

आम्ही आतां न फिरों मागें । करुं वेगें वेगुचि ॥३॥

निळा म्हणे पळें पळ । साधु काळ भेटीचा ॥४॥

७९८

नाहीं ऐसें उणेंचि कोठें । भरतो पोट तोंडवरी ॥१॥

बाहेर येती वोसंडोन । चाही कोन उथळोनी ॥२॥

झाली आनंदा दाटणी । गर्जे वाणी त्या सुखें ॥३॥

निळा म्हणे माझी सत्ता । नाहीं वदता विठ्ठल  ॥४॥

७९९

नाहीं कोठें गोंविला हेत । ठेविलें चित्त याचिवरी ॥१॥

सगुण सुंदर देखिलें दिठीं । विटे नेहटी तेंचि पुरे ॥२॥

वामभागीं विराजमान । स्वरुपीं समान रुक्मिणी ॥३॥

निळा म्हणे लाभला छंद । याचाचि वेध मनासीं ॥४॥

८००

नाहीं माझा उरविला । संदेह अवघाचि फेडिला ॥१॥

म्हणोनियां त्याच्या सुखें । नाचें कीर्तनीं मी हरिखें ॥२॥

बोलविती जें जें वाचें । तें तें अक्षर निश्चयाचें ॥३॥

निळा म्हणे मी नेणें गति । अर्थ त्याचा ते जाणती ॥४॥

८०१

नाहीं लौकिकाशीं काज । माझें गुज तो जाणें ॥१॥

अंतर्बाह्य ठावें तयां । येईल बाह्य पसरुनी ॥२॥

हाचि निश्चय माझा मनीं । विश्वास वचनीं संतांच्या ॥३॥

निळा म्हणे निर्भय चित्तें । भेटी त्यातें पाचारी ॥४॥

८०२

निजध्यास लागला मनीं । हाचि चिंतनीं दिवसरात्रीं ॥१॥

न सुटेचि करुं कैसें । लाविलें पिसें गोवळें ॥२॥

येऊनि जाऊनि पुढेंचि उभा । लाविलें भांवा मन माझें ॥३॥

निळा म्हणे नवचें दुरि । भरला शरीरीं न सुटेचि ॥४॥

८०३

नीत नवा प्रेमा कृपेचिया बळें । अंतरीं हा वोळे आनंदघन ॥१॥

नाचतीं मयूरें रोमांचीत दाटी । अमृताची वृष्टी जीवनकळा ॥२॥

आकाशें दुमदुमी गर्जे अनुहत । सुनीळ तळपत विदयुल्लता ॥३॥

पिकली भूमिका बीज आलें फळा । अव्दय निजकळा सवंगिलें ॥४॥

भाग्यवंत निळा सांठवी निराळीं । आत्मया जवळी निकटवासें ॥५॥

८०४

नुठेचि मन वरुनियां । जडोनी ठेलें हरीच्या पायां ॥१॥

बुध्दि निश्येंसी राहिली । परम विश्रांति पावली ॥२॥

डोळे न धाती पाहतां । चरणीं विगुंतले तत्वतां ॥३॥

निळा म्हणे न पुरे धणी । करीन जीवें बोवाळणी ॥४॥

८०५

नुरवूनि दुसरें आतां ठेलों चरणीं । नित्यानंद भोगीतुंचि दिनरजनीं ॥१॥

आळवूनि वाचें याचीं उत्तम नामें । सारिन काळ याचिपरि सुखसंभ्रमें ॥२॥

धरुनियां रुप दृष्टीं हदयभुवनीं । सांठवीन आपुलिया मनाचे मननीं ॥३॥

निळा म्हणे जन्मोनियां केली हे जोडी । विठोबाचि सेवा नित्य नविये आवडी ॥४॥

८०६

नेघों आम्ही कदा भुक्ति आणि मुक्ति । हरिनामीं विश्रांति सर्व जोडे ॥१॥

काय कराव्या त्या रिध्दी आणि सिध्दी । वाउग्या उपाधी भजना गोंवा ॥२॥

नलभे आम्हां कांही मान्यता बहुमान । जेणें अभिमान खवळे अंगीं ॥३॥

निळा म्हणे दुरी दुरावूं जाणीव । नलगे शहाणीव नाडील ते ॥४॥

८०७

नेटकेंचि दैव उघडलें आजीं । तो हा मजमाजीं संचरला ॥१॥

आतां कैसें करुं मी यासी । नावरेंचि मनासी आवरितां ॥२॥

सुदिन घटका सांपडली होती । ते पडिली अवचितीं हातीं याचे ॥३॥

निळा म्हणे मी मज माझें । हिरोनियां वोझें नेलें सकळ ॥४॥

८०८

पडतांचि तें वचन कानीं । धरिती मनीं अत्यादरें ॥१॥

सुकृताचीं उत्तम फळें । आलीं एक वेळे ओढवोनि ॥२॥

सुखीं सांठवलें सुख । हरिखा हरिख भेटला ॥३॥

निळा म्हणे कल्प कोटी । पडली गांठीं हरीसवें ॥४॥

८०९

पायीं लीन होता निळा । दिधला कळा प्रेमाची ॥१॥

निववूनियां केला सुखी । ठेउनी मुखीं निज नाम ॥२॥

माउलीची ऐशी जाती । बालकां प्रीति समजावी ॥३॥

निळा म्हणे कृपावंत । साक्षभूत अंतरींची ॥४॥

८१०

पुरातन मी शरणांगत । आहे स्थापित सद्गुरुचा ॥१॥

म्हणोनि संत पाळिती मातें । देउनी भातें प्रेमरस ॥२॥

जेउनी उरला प्रसाद देती । निकट बैसविती जवळिकें ॥३॥

निळा म्हणे क्षणक्षणां । देती स्मरणा श्रीहरिच्या ॥४॥

८११

पांडुरंगें सत्य केला अनुग्रह । निरसूनियां देह बुध्दि भेद ॥१॥

येऊनी एकांतीं उपदेशिलीं कानीं । बीजमंत्रें दोन्हीं निजाक्षरें ॥२॥

जीवा शिवा शेज रचिली आनंदीं । आउटावें पदीं आरोहण ॥३॥

निजीं निजरुपीं निजविला निळा । अनुहातें बाळा हल्लरु गाती ॥४॥

८१२

फुटलें धरण आला लोंढा । नावरे तोंडा माझिया तो ॥१॥

कृपाघनें वृष्टी केली । वाचा गर्जिन्नली बोधवरें ॥२॥

प्रतीति विदयुल्लता झळकती । थेंबुटे पडती ब्रम्हरसें ॥३॥

निळा म्हणे पिकलें पीक । आलें सकळीक भागासी तें ॥४॥

८१३

बरवें झालें बरवें झालें । आत्मराम ह्रदयीं आले ॥१॥

सद्गुरुनीं कृपा केली । वस्तु डोळां पैं दाविली ॥२॥

आनंदीं आनंद । पाहे तिकडे हा गोविंद ॥३॥

निळा म्हणे मी निष्काम । परिपूर्ण आत्माराम ॥४॥

८१४

बरवा झाला वेवसाय । चित्तीं आठवितां पाय ॥१॥

राम ह्रदयीं राहिला । परमानंद प्राप्त झाला ॥२॥

व्दैत तेंहि मावळलें । परब्रम्ह प्रकाशलें ॥३॥

निळा म्हणे धन्य झालों । गुरुकृपें स्थिरावलों ॥४॥

८१५

बैसला तो ध्यानीं मनीं । पाहतां लोचनीं विठ्ठल  ॥१॥

रुप गोजिरें सुंदर । वेधिलें अंतर मन बुध्दी ॥२॥

नाठवेंचि कांहीं आतां । त्याविण चित्ता दुसरें ॥३॥

निळा म्हणे लाविलें पिसें । मी मज नुमसे आठवितां ॥४॥

८१६

बैसला तोचि माझिये ध्यानीं । कटीं कर दोन्ही वसवितां ॥१॥

नयनाचि माजीं नवचे दुरीं । आंतु बाहेरीं कोंदला ॥२॥

याविण नाठवे आणिक कांहीं । देहादेहीं तोचि तो ॥३॥

निळा म्हणे दिवसरातीं । स्वप्नीं सुषुप्तीं जागृतींत ॥४॥

८१७

बोलों जातां वचनाक्षरें । माजी संचरे निरोपण ॥१॥

ऐशी दाटली दाटणी । वाचा गुणी गुंडाळिली ॥२॥

नाना संकल्प ते मुराले । स्तवनींचि झाले सादर ॥३॥

निळा म्हणे निमिषोनिमिष । झाले श्वासोश्वास अक्षरें ॥४॥

८१८

ब्रम्हानंदा भरणी आली । तेचि केली सामोरी ॥१॥

वंचिलें नाहीं कोणापाशीं । होतें मानसीं धरिलें तें ॥२॥

अवघे नाम विठोबाचें । स्वरुप त्याचें ध्यानीं मनीं ॥३॥

निळा म्हणे देतां हांके । उभाचि ठाकें सन्मुख ॥४॥

८१९

वणिंतां चरित्रे न पुरे धणी । वाचा लांचावली हरीच्या गुणीं । स्वानंदाची उघडली खाणी । नामस्मरणीं मातली ॥१॥

अधिक् अधिक् स्फूर्तीचा प्रसर । आगळीं अक्षरें चालती फार । नेणों फुटलें हें चिदांबर । मेघवृष्टिन्यायें होतसें ॥२॥

आवरताही नावरे मती । लिहितां न पुरे हे दिवसरातीं । न कळें काय केलें संतीं । देउनी प्रसाद आपुला ॥३॥

अवघेंचि उघडूनियां भांडार । दृष्टी दाविलें सारासार । लेववूनियां ते अलंकार । केलें समोर बोलावया ॥४॥

अक्षरें वाचे येती । ते ते  प्रमेयेसीचि उठती । नेणों गुंफोनी ठेविलीं होतीं । तेचि प्रसादीं वोपिलीं ॥५॥

नाहीं वाचेसी गुंतागोवा । तात्पर्यार्थाचि हा अघवा । ऐसा योजूनियां बरवा । मुहूर्त दिधला समर्थी ॥६॥

निळा आईत्या पिठावरी । रेघा आढीत बैसला घरीं । दैव मोडोनी आलें वरी । होतें संचितीं म्हणउनी ॥७॥

८२०

वाम चरणीं वाहे नीर । गंगा अमृताचे पाझर ॥१॥

आवडे तें माझया मना । धणी न पुरेचि लोचना ॥२॥

महिमा जोडला मुद्रिका । ध्वज वज्र अंकुश उर्ध्वरेखा ॥३॥

निळा म्हणे मुंजुळ गाती । वाळे वांकी रुणझुणिती ॥४॥

८२१

वाउग्या खटपटा । नावडती तैशा चेष्टा ॥१॥

जेणें पांवे भ्रंश बुध्दी । न पावती स्वरुपसिध्दि ॥२॥

घालिती घालणी । काय करुं ते बोलणीं ॥३॥

निळा म्हणे मिथ्यावाद । काय करावे ते छंद ॥४॥

८२२

वाचे बोलविलें देवें । मज हें काय होतें ठावें ॥१॥

सहज नामें आळवितां । ओघ आला हा अवचिता ॥२॥

संत जाणती अंतर । कीं हा रखुमाईचा वर ॥३॥

निळा म्हणे पुसिलि गोठी । नये सांगतां तें गोमटी ॥४॥

८२३

वाचा वेधलां हरिकीर्तनीं । श्रवण श्रवणीं गोडावले ॥१॥

नेत्रीं बैसलें हरीचें रुप । पूजनीं पडप उभय करां ॥२॥

प्रदक्षणें सोकलें चरण । आष्टांग आलिगंन नमस्कारा ॥३॥

निळा म्हणे हेंचि कोड । अवघिया चाड विठठलीं ॥४॥

८२४

वेडा नव्हे मुका चतुर शहाणा । बोले अबोलणा मौनावस्था ॥१॥

विष्णुदासा निळा वाचा विदेहता । अंगी सप्रेमता आवडीची ॥२॥

ह्रदयीं चतुर्भुज मेघशाम मूर्ती । मुखीं नामकीर्ति ब्रीदावळी ॥३॥

नेणता म्हणोनि संत आपंगिला । निळा निरविला पांडुरंगा ॥४॥

८२५

व्यापूनियां ठायां ठावो । अवघाचि देवो प्रगटला ॥१॥

संतकृपा फळा आली । ते वरुषली स्वानंदें ॥२॥

अंकुरली भावबीजें । विस्तारलीं सहजें गुणचर्या ॥३॥

निळा म्हणे कणिसें दाटे । नाहीं फलकट कणभारें ॥४॥

८२६

सत्यासाठीं माझी चाली । संती केली आज्ञा ते ॥१॥

विठ्ठल  विठ्ठल  म्हणों मुखें । वाणूं सुखें गुण त्याचे ॥२॥

काय आम्हां दासा चिंता । धणी पुरवितां शिरावरीं ॥३॥

निळा म्हणे निश्चतीनें । असों वचनें एकाचिया ॥४॥

८२७

सर्वकाळ तेंचि वाटे । रुप पहावें गोमटें ॥१॥

जें कां पुंडलिकाचे व्दारी । उभें ठेलें विटेवरी ॥२॥

पितांबराचें परीधान । मुगुट कुंडले विराजमान ॥३॥

निळा म्हणे कौस्तुभ गळां । नाना पुष्पें तुळसीमाळा ॥४॥

८२८

सदाचा हा धाला सदाचा भुकेला । सदाचा निजेला जागा सदा ॥१॥

ऐसिये परिचा अंबुला साजणी । वरिला सुवासिणी सदाचि मी ॥२॥

सदाचा बोलिका सदाचा हा मुका । सदाचा हा लटिका खरा सदां ॥३॥

सदाचा हा वेडा सदाचा हा कुडा । सदाचा हा निर्भिडा भीड सदा ॥४॥

सदाचा हा दाता सदाचा मागता । सदाचा हा रिता भरला सदा ॥५॥

निळा म्हणे सदा जवळी ना हा दुरी । सदा सर्वांतरीं नसोनि वसे ॥६॥

८२९

सहजचि होतों उभा । संत सेवेचिया लोभा ॥१॥

तंव काढिला निक्षेप । हातीं दिला तो अमूप ॥२॥

नाहीचिं अंत जया । किती माप लाऊं तया ॥३॥

निळा म्हणे दिवसरातीं । न पुरे करितां गणती ॥४॥

८३०

सांपडली वाट । आम्हां वैकुंठाची नीट ॥१॥

सहज वचनीं विश्वसतां । संतसंगती लांगता ॥२॥

वारलें दुर्घट । होतें भ्रांतीचें कचाट ॥३॥

निळा म्हणे सुखी । झालों पूर्विली ओळखी ॥४॥

८३१

सिंधुतनया सेवितां पाय । तुमचे तल्लीन होउनी ठाय ॥१॥

ब्रम्हानंदाची राणीव । चरणरेणु माजी सर्व ॥२॥

म्हणे हे न विसंबें मी आतां । युगें कल्नकोटी जातां ॥३॥

निळा म्हणे सुकुमार ते । विटे सांपडलें आमुतें ॥४॥

८३२

सुखी केलें सुखी केलें । संती दाविलें निज हित ॥१॥

जन्मोजन्मीं दास त्यांचा । पोसणा ठायींचा पुरातन ॥२॥

नित्य आपुला आठव देती । आणि पुरस्कारिती निज सेवें ॥३॥

निळा म्हणे हेंचि त्यांचें । वर्तन ठायीचें पूर्वापार ॥४॥

८३३

सुखीं सांठविलें सुख । हरिखा हरिख भेटविला ॥१॥

आनंदासी आनंद झाला । सद्गुरु भेटला तेचि क्षणीं ॥२॥

प्रतीतीसही प्रतीत झाली । शांति मेळवविली निजशांती ॥३॥

निळा म्हणे सुकाळ ऐसा । केला दशदिशा कोंदलीया ॥४॥

८३४

सेवकाचि परि स्थापिला पदीं । मग त्याचिये बुध्दी कोण तुके ॥१॥

तैसेंचि केलें मजही देवा । निपेक्ष अवघा दावूनियां ॥२॥

आईता वांटा दिधली जोडी । कवडीनें कवडी सांचिली ते ॥३॥

निळा म्हणे देवा आभारचि केले । मल सेवका गौरविलें आपुलिया ॥४॥

८३५

सैंध दाटली अक्षरें । माप नव्हें पुरें । केली माझीया दातारें । अतिवृष्टी कृपेची ॥१॥

लिहितां न पुरे दिवसराती  । वाढविला विस्तार तो मती । जैसे क्षीराब्धीवरीं येती । तरंग मिरविती असंख्य ॥२॥

नाना प्रमेय नाना कथा । नाना पदांचिया चळथा । निघती त्या पंढरीनाथा । आवडती प्रियवादें ॥३॥

संतचरित्रें हरिचें गुण । केलें पवाडें ते विंदान । नाना पतितांचे उध्दरण । केलें संरक्षण दासांचें ॥४॥

ऐशिया स्तवनीं लाविली वाचा । बडीवार हरीचिया नामाचा । केला प्रतिपाळ तो दासाचा । वारंवार आठवितों ॥५॥

नाना नामें नाना चरित्रें । कल्याणरुपें अती पवित्रें । श्रवणें पठणें गातां वक्त्रें । हरिच्या पदातें पावविती ॥६॥

आइती जोडूनियां ठेविलीं । होतीं ठायींचि गुंफिलीं । निळा म्हणे तेचि वोपिलीं । माझिये वदनीं वरदानें ॥७॥

८३६

माझी बुध्दि झाली वेडी । दिधली बुडी हरिनामीं ॥१॥

नुमजे येथें विगुंतली । न करी बोली आणिक ॥२॥

सांडियले वादावाद । छंद बंद आणिक ॥३॥

निळा म्हणे तुमच्या पायीं । जडली ठायीं न ढळेसी ॥४॥

८३७

मीचि माझा विस्मय करी । नवल परी देखोनी ॥१॥

कैशी येणें पांडुरंगें । अंगीं अंगें लपविलीं ॥२॥

पळही मात्र विसर देहीं । न पडेचि ठायीं व्यापियलें ॥३॥

निळा म्हणे नाम वाचे । गुण त्याचें आठवती ॥४॥

८३८

याचा आश्रय झाला आम्हां । या पुरुषोत्तमा विठठलाचा ॥१॥

गातां वाचितां चरित्रें याची । न करी दासांची उपेक्षा हा ॥२॥

आपुला संकेत सिध्दी न्यावा । करणें देवा हेंचि सत्य ॥३॥

निळा म्हणे निष्ठा जाणें । तैसाचि करणें आदर त्या ॥४॥

८३९

याचिया रुपाचें चिंतन । करितां तनु मन वेधलें ॥१॥

देहीं नुरता  देहभाव । झालों स्वयमेव तेंचि रुप ॥२॥

नाईकती शब्दा श्रवण । दुजिया नयन न देखति ॥३॥

निळा म्हणे बावरी ऐसी । दिसें लोकांसी प्रीति वरी ॥४॥

८४०

याचिलागीं तुमचा करितसें धांवा । रात्रंदिवस देवा आळवूनि ॥१॥

नेणें जप तप स्नान संध्या विधी । जड माझी बुध्दि प्रज्ञाहीन ॥२॥

नाहीं आश्रमाचें घडलें विहित । न कळे उचित नित्यादिक ॥३॥

निळा म्हणे माझा कैसा परिपाक । वैकुंठनायक तुम्ही जाणा ॥४॥

८४१

भावें आळवितां देवा । लागला हातीं जुनाट ठेवा । दैव मोडीनी आले दैवा । सुख विश्रांती पावलों ॥१॥

आतां वेचूं खाऊं जेऊं । शोभती अळंकार ते लेऊं । आपुलें सुहद गौरवूं । हरिभक्त वैष्णव साबडे ॥२॥

अपार संपत्ती आली घरां । नाहीं आतां वोढावारा । नलगे जाणें आणिकांच्या घरां । कांहीं मागावें यासाठीं ॥३॥

खरें नाणें खरें केणें । खरिया मोलें घेणें देणें । खरें विकें खरेपणें । न पडे उणें भरलेंसे ॥४॥

निळा म्हणे माझिया दैवें । जोडिलें होतें पडिलें ठावें । कृपा केली विठ्ठल देवें । दिधलें भांडार ॥५॥

८४२

मजही भीड नुलंघवे । जें त्या पुसावें मनोगत ॥१॥

सर्वही भावें सेवाऋणी । मजचि करुनी सोडियलें ॥२॥

आशा मात्र नाहीं याशीं । जे कां देहासी नाठविती ॥३॥

निळा म्हणे घातली मिठी । कल्प कोटी न सुटेशी ॥४॥

८४३

मस्तक माझा पायावरी । या वारकरी संतांच्या ॥१॥

प्रतिवर्षी पंढरपुरा । जाती महावव्दरा हरि भेटी ॥२॥

भेटी त्याची इच्छी मन । करिती कीर्तन अनुदिनीं ॥३॥

निळा म्हणे लोटांगण । घालित जाईन सामोरा ॥४॥

८४४

महासुखा पारणें होये । आनंद राहें लिगटोनी त्या ॥१॥

ऐशिया पावविलों विश्रांती । निमग्न वृत्ती इंद्रियांच्या ॥२॥

मनही तेथुनी वेगळेंचि नोहें । पांगुळले पाय प्राणाचे ॥३॥

निळा म्हणे रवि शशी । हारपले निशी दिवस दोन्ही ॥४॥

८४५

मावळली खंती । देहीं देहाची विस्मृती ॥१॥

पांडुरंग ध्यानीं मनीं । रुप बैसलें लोचनीं ॥२॥

पांडुरंग ध्यानीं मनीं । रुप बैसलें लोचनीं ॥३॥

नये कळों दिवस रातीं । स्वप्न निद्रा ना जागृती ॥४॥

निळा म्हणे अखंडता । विठ्ठल रुपीं तादात्म्यता ॥५॥

८४६

भावें वोजावली भूमिका । वरी कृपाघन वोळला निका । संतीं बीज दीधला फुका । तेचि पेरिलें तोचि क्षणीं ॥१॥

वाफलें तें वरावरी । कणिसें दाट आल्या घुमरी । पिकलें न समाये अंबरीं । चहुकोनि सारिखेचि ॥२॥

निळा केला भाग्यवंत । सवंगीता नावरे पीक अदभुत । रसीवा केला नलगे अंत । माप करितां नावरेसा ॥३॥

उमाणु जातां अधीकची वाढे । दिसोंचि लागे पुढें पुढें । सांजे भरले सीग नमोडे । मोडति गोड ओढितां ॥४॥

नवल पिकाची हे धणी । होती संतकृपेची पेरणी । पुरे पुरे नव्हेचि उणी । पदरीं भरुनि बैसलों ॥५॥

निळा झाला सदैव आतां । अपार लेखाचि नव्हे चित्ता । साठऊं जाणतां नेणता । राहो भरिता उरलें तें ॥६॥

८४७

शोधूनी अन्वये वंशवंशावळी । परंपरा कुळीं उच्चारण ॥१॥

म्हणविले पूर्वी जैसे होते तैसे । केले सामरस्यें समाधान ॥२॥

येक छत्र झळके उन्मनि निशाणी । अनुहाताचा ध्वनि गगन गर्जें ॥३॥

निळयास्वामी स्थापी निजपदीं दासा । करुनि उल्हास आवडिचा ॥४॥

८४८

पावलो प्रसाद इच्छा केली तैसी । झाले या चित्तासी समाधान ॥१॥

मायबाप माझा उभा कृपादानीं । विटे सम जोडुनि पदांबुजें ॥२॥

सांभाळीसी येउ नेदिची उणीव । अधिकार गौरव राखे तैसे ॥३॥

निळा म्हणे सर्व जाणें अंतर्बाहे । जया तैसा राहे कवळुनिया ॥४॥

८४९

सुखें जन्मातरें घेऊं । नामें आळवूं श्रीहरीचीं ॥१॥

नाहीं आम्हा त्याचें कोडें । संसार बापुडें तें काये ॥२॥

कळिकाळाचें भय तें किती । पाया पडति यमधर्म ॥३॥

निळा म्हणे सर्वहि सिध्दी । रुळती पदीं हरिनामें ॥४॥

८५०

आटीतो आटणी । करुनि इंद्रियां दाटणी ॥१॥

कवळूनियां नामापाशीं । तुमच्या ठेवितों सायासी ॥२॥

नेदी घेऊं वावो । दुजा न देऊनियां ठावो ॥३॥

निळा म्हणे ज्योती । जागवितो दिवसराती ॥४॥

८५१

आठवला तो माझिये मनीं । कटीं कर दोन्ही वसविता ॥१॥

न गमे दिवस न गमे राती । लागते खंती फुटे ॥२॥

जीवही होतो कासावीस । कैं तें रुप देखेन ॥३॥

निळा म्हणे भेटवा आतां । ठेवितों माथ चरणवरीं ॥४॥

८५२

आठवितां याचे पाय । गेलें निरसोनि संसारभय ॥१॥

अवघा काळ अवघी वेळ । स्मरणें याचिया सुमंगळ ॥२॥

सदैव आम्हीं भूमंडळीं । पढो हरिच्या नामावळी ॥३॥

निळा म्हणे यावरी आतां । नेणों जन्ममरणचिंता ॥४॥

८५३

आठवितां नामें सुखची संतुष्टी । लाभें लाभ कोटी सुकृताचा ॥१॥

म्हणऊनि हाचि घेऊनियां छंद । गातुसे गोविंद विठ्ठल  हरी ॥२॥

ज्याचिया व्दैतबाध । अवघाचि उपाध माया भ्रांती ॥३॥

निळा म्हणे नित्य वैष्णवां साधन । हेंचि अनुसभान दिवसराती ॥४॥

८५४

आम्ही स्वामीचिया बळें । येथें असों खेळेमेळें ॥१॥

नामें गाऊनी आवडी । करुं पदांच्या घडामोडी ॥२॥

करुन कीर्तन सोहळा । रंजवूं नारीनरबाळां ॥३॥

निळा म्हणे दिवसराती । केव्हां नेणों येती जाती ॥४॥

८५५

आतींचें आर्त होतें माझया मनीं । बहुत दिवस नयनीं प्रकाशलें तें ॥१॥

भरोनियां कोदंली चौदाहि भुवनें । सुतेज केलीं गगनें याचेनि तेजें ॥२॥

आवडीचें निज प्रकाशलें गुज । आतां नाचेन भोज येणें छंदें ॥३॥

निळा म्हणे दिशा व्यापूनियां मही । प्रकाश माझया देहीं संचरला तो ॥४॥

८५६

आर्त माझें पूर्ण झालें । यांची पाउलें देखतां  ॥१॥

आतां कोठें न धांवे मन । राहिलें होऊन अचंचळ ॥२॥

याविण कांहीं नलगे जोडी । पुरली आवडी विषयाची ॥३॥

निळा म्हणे ध्यानीं मनीं । राहो चिंतनी हेंचि रुप ॥४॥

८५७

वदविली आरुषवाणी । वैदिक पुराणीं मिश्रित ॥१॥

म्हणोनियां संतसज्जन । करिती श्रवण बैसोनी ॥२॥

अर्थ तात्पर्याचे घेती । आणि डोलविती मस्तक ॥३॥

निळा म्हणे ऐसें केलें । मज या विठठलें दयाघनें ॥४॥

८५८

होतें पूर्वार्जित । उत्तम संग्रहीं संचित ॥१॥

तेंचि उत्तीर्णत्वालागीं । झालें सन्मुख ये प्रसंगीं ॥२॥

भोग मोक्ष फळें । निवारलीं शांतिबळें ॥३॥

निळा म्हणे सहजचि आला । ओघ अमृताचा हा जिव्हाळा ॥४॥

८५९

होवोनियां निश्चळ । स्थिर राहिलों अढळ ॥१॥

नाहीं भय शंका मनीं । विश्वास मानियला वचनीं ॥२॥

ज्याचें तया पुढें । बोलेन वेडेही वांकडें ॥३॥

निळा म्हणे देवें । वदविलें तें वदेन भावें ॥४॥

८६०

उपाधीचा उबग आला । मनिं आवडला सत्संग ॥१॥

तयासी देवेंचि कृपा केली । भ्रांति निरसली बुध्दीची ॥२॥

कल्पनेचा पुसला ठाव । देहभाव हारपला ॥३॥

निळा म्हणे निरभिमान । झालें उन्मन मनाचें ॥४॥

८६१

नेदी करुं काज काम । स्मरवि नाम आपुलें ॥१॥

मागें पुढें उभाचि असे । लाविलें पिसें श्रीरगें ॥२॥

खातां जेवितां जवळिच रोहे । परताचि नोहे काय करुं ॥३॥

निळा म्हणे घातलि मिठी । आपणासाठीं मज केलीं ॥४॥

८६२

रुप देखतांचि लोचनीं । राहिलें तें ध्यानीं मनीं ॥१॥

माझिया जिवाचें जीवन । विठ्ठल  नामाचें मोहन ॥२॥

चित्त विगुंतलें पायीं । देहभावहि नुरोचि देहीं ॥३॥

निळा म्हणे जीवप्राण्‍ । तेथेंचि राहिला इ  जडोन ॥४॥

८६३

माझिये मनीचा फिटला बेहो । देखताचि नाहो रुक्मीणीचा ॥१॥

कळिकाळ ते काय बापुडें रंक । होऊनि मशक ठेलें पुढें ॥२॥

कामक्रोधां कैंची उरी । दोषां महामारी हो सरली ॥३॥

निळा म्हणे नि:संदेहो । देहीं देंहो हारपला ॥४॥

८६४

नेणों काय पुर्वार्जित । होतें सुकृत निक्षेपिचें ॥१॥

तेंणें हातीं धरोनियां । संती ठाया पावविलों ॥२॥

विटेवरी दाविलें धन । होते पोटाळुन महर्षी ज्या ॥३॥

निळा म्हणे बैसला ध्यानीं । ज्याचिये चिंतनी सदाशिव ॥४॥

८६५

अवगुणीं देखिलें । म्हणोनियां उपेक्षिलें ॥१॥

माझें वोढवलें कर्म । करी आळी नेणें धर्म ॥२॥

तेणेंचि नेणों संतापली । क्षोमें करुणा हारविली ॥३॥

निळा म्हणे नये । मोहें पाळावया माय ॥४॥

८६६

सुफळ जिणें हरिच्या भजनें । चुकलीं पतनें यमजाच ॥१॥

नित्य करितां हरिकीर्तन । गातां गुण निजआवडी ॥२॥

घडतां संतसमागम । हरीचें प्रेम दुणावलें ॥३॥

निळा म्हणे साधिली वेळ । सकळाही मंगळ मंगळाची ॥४॥

८६७

ब्रम्हानंदे गर्जे वाणी । हरिच्या गुणीं मातली ॥१॥

आंवरिताही नावरती । पूरचि लोटति अक्षरांचे ॥२॥

अवतारचरित्रें जन्मकर्मे । क्रीडा संभ्रमें केलीं ते ॥३॥

निळा म्हणे घडघडाट । चालती लोट नावरती ॥४॥

८६८

माझा बोल खरा चाल खरा । मती विस्तारा फांकविली ॥१॥

विठ्ठल देवें केली कृपा । दाविला सोपा निज पंथ ॥२॥

यावें जावें पंढरपुरा । आपुल्या माहेरा वस्तिसी ॥३॥

निळा म्हणे घातली सुती । माझिये हातीं कृपाघनें ॥४॥

८६९

संती केला अंगिकार । मज हा निर्धार बाणला ॥१॥

त्यांचिया बोलें अभयदानें । नि:शंक वचनें हीं ऐशीं ॥२॥

नाहीं कोठें गोंवागुंती । अक्षरें चालती गुंफिलीं ॥३॥

निळा म्हणे सत्यासाठी । जाणती चावटी माझी ते ॥४॥

८७०

संतकृपावरदबळें । माझीं वचनामृतफळें ॥१॥

स्वीकारिजे पंढरीनाथें । बैसोनियां सादर चितें ॥२॥

म्हणती गोड हे तुझी वाणी । सद्गुरुकृपेचीं बोलणीं ॥३॥

निळा म्हणे श्रोते संत । प्रसन्नपणें दत्तचित्त ॥४॥

८७१

संतीं सांगितलें मज । आपुलिये गुज अंतरींचे ॥१॥

म्हणती आठवीं पंढरीनाथा । सांडीं वार्ता इतरांची ॥२॥

नको विसबों तूं यासी । अगाध सुखासि पावशील ॥३॥

निळा म्हणे सेवा आतां । हेचि प्रसन्नता आमुची ॥४॥

८७२

संती ठेविलें निश्चळ ठायीं । चित्त हें पायीं आपुलीये ॥१॥

तेणें समाधन वृत्ती । नव्हेचि स्थिति पालट ॥२॥

अखंडिता राहिले ध्यान । होउनी उन्मन मनाचें ॥३॥

निळा म्हणे कृपा केली । जाणों आली या अर्थ ॥४॥

८७३

संतांचिया समागमें । गाऊं नामें आवडी ॥१॥

काय आमचें करील काळ । कळीचे मळ नातळतां ॥२॥

हरीच्या नामें शुचिर्भूत । वाचा पुनीत करचरण ॥३॥

निळा म्हणे घडीं घडीं । करुं हे जोडी नीच नवी ॥४॥

८७४

श्रोते वक्ते होती सुखी । अध्यात्मविखीं भाविक ॥१॥

ऐसा केला प्रसंग हरी । आरुष वैखरी वदवूनी ॥२॥

साबडेंचि परी रुचे ऐसें । केलें सौरसें आपुलिया ॥३॥

निळा म्हणे आपुला भक्त गुणीं । केली वोवणी अक्षरां ॥४॥


संत निळोबाराय गाथा । संत निळोबाराय अभंग । निळोबा अभंग । निळोबा गाथा । सर्व गाथा । निळोबाराय माहिती । पिंपळगाव मंदिर निळोबाराय । sant nilobaray gatha | sant nilobaray abhang | niloba abhang | niloba gatha | sarv gatha | nilobaray mahiti | nilobaray mandir pimpalgav | आपल्या स्थितीसंबंधानें जनाशीं उद्गार |

तुमच्या शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांतीला भेट द्या .