संत निळोबाराय (देवाची स्तुति)
५२५
अगा ये नरकासुरमर्दना । कुशदैत्यनिकंदना । अगा कंसमधुकैटभसूदना । अगा मर्दना हिरण्याक्षा ॥१॥
अगा वृत्रासुरनिहंत्या । हिरण्यकश्यपा विदारित्या । अगा रावण संहारित्या । कुंभकरणादीराक्षसां ॥२॥
अगा रिठासुराच्या वैया । सहस्त्रभुजांच्या वधणारा । अगा निवटीत्या भोमासुरा । सत्यभामावरा गोविंदा ॥३॥
अगा ये काळियादमना । शकटासुर विध्वंसना । अगा शिशुपाळवक्रदंतहनना । जरासंधभंजना कागबगा ॥४॥
अगा बळी बंधनाअसुरारी । अगाअरिमन्मथ तमारी । अगा ताटिकापूतनारी । गोवर्धनधारी बळिवंता ॥५॥
अगा ये केशियादमना । तृणासुरधेनुकहनना । अगा मरिचा सुबाहुउध्दरणा । त्रिशिराखरदूषणप्राणहर्त्या ॥६॥
अगा ये विरोचनजाळंधरअंतका । अहिरावणमहिरावणघातका । कबंधवाळीच्या हंतका । रघुकुलटिळका सांबहरणा ॥७॥
अगा ये शंखासुराचिरणारा । मच्छरुपिया पोहणारा । शुंभनिशुंभाचिया घातणारा । मोहनीरुप धरा दैत्यांतका ॥८॥
अगा ये अपारभक्तपाळका । पंढरीभुवैकुंठनायका । विश्व चराचरव्यापका । अभय वरदायका निळयाच्या ॥९॥
५२६
वस्तुचा जो स्वाभावगुण । वोसंडूं नेणे तो आपणा ॥१॥
तेविं हा परमात्मा श्रीहरी । सांडूं नेणें आपुली थोरी ॥२॥
जेवीं कस्तुरी परिमळ । शीतळपणा मलयानिळ ॥३॥
निळा म्हणे परिसपणा । नेणे सांडूं आपुल्या गुणा ॥४॥
५२७
मच्छ कच्छ वराह झाला । खुजाहि शोभला विक्राळ ॥१॥
भक्तप्रिय प्रियोत्तम । सदा अविश्राम दासाविशीं ॥२॥
फरशधारी धनुर्धर । स्वरुप सुदंर गोपवेषीं ॥३॥
निळा म्हणे बौध्य कलंकी । धरी नेटकीं रुपें ऐसीं ॥४॥
५२८
महिमा अदभूतची पाहतां । चरणीं उध्दार झाला पतिता ॥१॥
आहिल्या शिळा झाली शापें । चरणस्पशें ते निष्पाप ॥२॥
उध्दरिले विमळार्जून । अगाध चरणाचें महिमान ॥३॥
निळा म्हणे तारिल्या शिळा । हाही प्रताप आगळा ॥४॥
५२९
रसना एकी रस तों नाना । कैसी विवंचना रचिली हे ॥१॥
नकळे लाघव तुमचें हरी । करितां भरोवरी जाणिवेच्या ॥२॥
काय पिंजूनी मेघपडळ । घडिलें ज्वाळ विजुवाचें ॥३॥
निळा म्हणे तडक भारी । फुटें अंबरीं कासियाचा ॥४॥
५३०
वीज पडे गनन गडाडी । रचिली परवडी कशाची ॥१॥
अदभुत प्रकाशाचा लोळ । पडतां अंतराळ दणाणीत ॥२॥
काय हे तुमची कैशा लीला । नेणवे सकळां चोजवितां ॥३॥
निळा म्हणे गर्भी बाळा । वाढवा गोपाळा कैशा परी ॥४॥
५३१
शकटासुर काळयासी । प्रताप ठाउका हा तयासी ॥१॥
बळिसी झाला विदयमान । देतां तीन पांड दान ॥२॥
लवणासुरा अनुभव । कुशा गोमताचळा सर्व ॥३॥
निळा म्हणे चतुरानना । नित्य करितां पुजा ध्याना ॥४॥
५३२
सकळांचिया नेत्रें तुम्हां सर्वही देखणें । सकळांचिया श्रोत्रें तुम्हां सर्वही ऐकणें ॥१॥
ऐसे सर्वज्ञची तुम्हीं सर्वदा देवा । जेथिल तेथें ज्याच्या तैशा जाण तसा भावा ॥२॥
सकळांच्याही रसना सर्वही रस सेवितां । सकळांच्याही चरणें लंघुनी जातां दिगंता ॥३॥
निळा म्हणे सकळांच्याही जीवाचें जीव । होऊनियां अलिप्त शेखी रुप ना नांव ॥४॥
५३३
सर्वांतरीं वास याचा । महदादी अणूचा हदयस्थ ॥१॥
नाहीं दुरी जवळी ऐसा । कोंडोनी दिशा भरलासे ॥२॥
एकवीसही ही स्वर्गांपरीं । पाताळाभीतरी भूमंडळा ॥३॥
निळा म्हणे सर्वातरीं । वसोनी विटेवरी ठाकला ॥४॥
५३४
सूर्य प्रकाशाचा नेणेचि महिमा । रात्रीचिया तमा न देखोनि ॥१॥
क्षीरसिंधु नेणे तृप्ती कैसी असे । क्षुधेचे वळसे इतरांसी ॥२॥
कल्पतरु नेणें औदार्य आपुलें । दैन्यचि देखिलें नाहीं तेणें ॥३॥
अमृता नाठवे अमत्व कैसेंही । मृत्यूचि त्या नाहीं म्हणोनियां ॥४॥
कामधेनु नेणें कामनेचा भोस । अपूर्णता तीस नातळतां ॥५॥
निळा म्हणे तैसा तुम्ही पांडुरंगा । नेणांचि वियोगा व्यापकपणें ॥६॥
५३५
संत गाती सनकादिक । तुमचिये कौतुक कीर्तिचें ॥१॥
तारिल्या शिळा गिळीला वन्ही । पर्वत उचलूनि धरिला वरी ॥२॥
सागर सारुनी व्दारकापुरीं । वसविली नगरी उदकांत ॥३॥
निळा म्हणे गोवळवत्सें । झाला निज इच्छें क्षणमात्रें ॥४॥
५३६
श्रीकृष्ण विचरे कुंजवनीं । तैसाचि दंडकरण्यीं श्रीराम ॥१॥
एकें वधिले खरदूषण । एकें मर्दन कागबगा ॥२॥
नासिक छेदनें शूर्पणखा । येणें पूतना देखा शोषियेली ॥३॥
निळा म्हणे चरित्रमाला । रचिली स्वलीला रामकृष्णें ॥४॥
५३७
श्रुतीदेवाच्या कणिया खाणें । श्रलाध्य अन्नें विदुराच्या ॥१॥
द्रौपदीहातींचे भाजीपान । मानी समान पंचामृता ॥२॥
मुद्रला घरींचा वेचक पाक । मानी अधिक् क्षीराब्धीहुनी ॥३॥
निळा म्हणे नामयासवें । बैसोनि जेवावें परम प्रीति ॥४॥
तुमच्या शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांतीला भेट द्या .