संत निळोबाराय (हरीचे वर्णन)
४७३
अहो कृपेच्या सागरा । अहो भक्तकरुणाकरा । भक्तमुक्तीच्या दातारा । जगदोध्दारा विठोजी ॥१॥
अहो त्रिविक्रमा वामना । रामा कृष्णा मधुसुदना । दशरथत्मजा रघुनंदना । दानवदमना मुरारि ॥२॥
अहो चतुरामाजी सुजाणा । अहो अच्युता नारायणा । अहो राधारुक्मिणिरमणा । दिनोध्दारणा गोविंदा ॥३॥
अहोजी वैकुंठनायका । विश्वचराचरपालका । अनंतब्रम्हांडव्यापका । यदुकुळटिळका श्रीहरी ॥४॥
अहो केशवा माधवा । जनार्दना श्रीवासुदेवा । मुकुंदा दामोदरा यादव । भक्तजनभावा लक्षीत्या ॥५॥
अहो नृसिंहा श्रीधरा । मच्छ कूर्म वराह ऋषीकुमरा । अहो परात्परा अति सुंदरा । श्रीरमावरा गुणनिधी ॥६॥
अहो पदयनाभा शेषशयना । राजसा राजीवलोचना । निळा म्हणे सुखसंपन्ना । अहो निजनिधाना परामात्मया ॥७॥
४७४
अहो देवा तिमिरनाशा । बुध्दीप्रकाशा विठठला ॥१॥
अनुग्रह तुमचा झाला जया । निरसरला माया तम त्याचा ॥२॥
असोनियां ते घरींदारीं । मुक्तचि संसारीं संगातीत ॥३॥
निळा म्हणे नित्यनंदे । भोगिती ते पदें वैकुंठींची ॥४॥
४७५
अवघें टाळूनि निमित । वरुनी बोलत आपणा ॥१॥
ऐसीं करितो हरि लाघवें । सर्वहि ठावें सर्वज्ञा ॥२॥
बुध्दि बुध्दिचा हा जनिता । स्फुर्ति प्रसविता स्फूतींचा ॥३॥
निळा म्हणे आपल्या गोडी । तया आवडी स्तवनाची ॥४॥
४७६
अयोध्येसी जन्मले राम । पुरुषोत्तम मथुरेसी ॥१॥
आनंद झाला दशरथाघरीं । गोकुळामाझारी तैसाचि ॥२॥
ऋषीयज्ञ सिध्दी नेला । कृष्णें आणिेला गुरुपुत्र ॥३॥
निळा म्हणे वरिली सीता । येणें दुहिता भीमकाची ॥४॥
४७७
आणिखिही याचीं उदंड वर्मे । बोलतांचि ते नाशी आमुचीं कर्मे ॥१॥
म्हणोनियां याचें भयचि वाटे । बोलों जाय तंव बोलणेंचि कुंठे ॥२॥
वेदहि ना बोलेचि भेउनी याला । देखोनि यातें मग मौन्येचि ठेला ॥३॥
काळहि कांपे याचिया धाकें । त्यासिहि गिळूनि आपणचि ठाके ॥४॥
ना बोलती योगी याचिया भेणें । ध्यानीचि बैसले वसवूनि रानें ॥५॥
संतहि याची न करित गोठी । धरुनि राहिले उगलेचि पोटीं ॥६॥
अणुमात्र याची बोलतांचि कर्मे । मरणासीचि मारुनी हरितो जन्में ॥७॥
धीटपणें निळा बोलिला कांहीं । बोलतांचि लाविला आपुला वाही ॥८॥
४७८
आप आपणा नेणता । निर्मी बहमांडाच्या चळथा ॥१॥
काय सांगो नवल परी । ऐसी याची आकळ चोरी ॥२॥
अंगें आपण निराकार । प्रकटोनि दावी जगदाकार ॥३॥
निळा म्हणे महर्षि देवा । न कळती ऐशा याच्या मावा ॥४॥
४७९
उणें पुरें बोलिलों आधीं । तें आपुलिये बुध्दि सारिखें ॥१॥
तुम्ही तो देवा कृपामूर्ती । सकळां आर्ती पुरवितां ॥२॥
पशुपक्षी सांभाळिले । स्मरतां नेले निजधामां ॥३॥
निळा म्हणे तुमच्या घरीं । वाढे थोरी दासांची ॥४॥
४८०
उगाचि नसे क्षणही भरी । व्यभिचारी हरि चित्ताचा ॥१॥
मनचि गोंवी चरणापाशीं । अवघेचि यासी मग मुक्त ॥२॥
घरींचे घरीं जीवीचें जीवीं । उघडि हा ठेवी जुगादीच्या ॥३॥
निळा म्हणे धरिली खोडी । मुळींची न सोडी कल्पवरि ॥४॥
४८१
एकपणाचा घेऊनि त्रास । नेदींच दुसयास आड येऊं ॥१॥
ऐसा मुळींचाचि चोरटा हरि । चोरिचिवरीं मन याचें ॥२॥
पंचामृतें पांचहि पांचहि विषयें । चाटूनियां जाय वरावरीं ॥३॥
निळा म्हणे याचे शोधितांहि मार्ग । न लगेचि अनंग हातींचि हा ॥४॥
४८२
एक एकाहुनी आगळे । ओंविले संत कंठमाळे ॥१॥
तेणें विराजलेती हरि । प्रभा फांकली दिगांतवरी ॥२॥
संत चरित्रें सुंदरे । परिधान केलीं दिव्यांबरें ॥३॥
संतनामें निळा म्हणे । मुगुट कुंडलें करकंकणें ॥४॥
४८३
एका पासूनियां हरी । घाली आणिका पदरीं ॥१॥
ऐसे खेळ याचे निके । खेळे आलके सेलकें ॥२॥
रडवी हांसवी एका । दाऊनि लपवी पाडी चुका ॥३॥
निळा म्हणे खेळा । नाहीं रुप याच्या ताळा ॥४॥
४८४
ऐसा आपीं आपरुप । करुनि त्रैलोक्या साटोप ॥१॥
नाहीं वेंचला उणा झाला । जैसा तैसाचि संचला ॥२॥
दाऊनियां चराचर । लपवी अंगी न मानी भार ॥३॥
निळा म्हणे नट लाघवी । नेदी कळों ठेवाठेवी ॥४॥
४८५
ऐसे याचे अकळ खेळ । जाणतां पांगुळ वेदश्रुती ॥१॥
काय फोडुनि चांदिण्या केल्या । गगनीं बांधल्या कीं मुक्त ॥२॥
कासयाचे पर्वत धोंडे । घडिले अपाडे अमर्याद ॥३॥
निळा म्हणे पर्जन्यधारा । केल्या अपारा त्या कैशा ॥४॥
४८६
अंतरींचा जाणें भेद । प्रगटीं आनंद त्या तैसा ॥१॥
देव माझा चतुर एैसा । जैशा तैसा क्षणमात्रें ॥२॥
भाविकांचे आंगींचि लाळे । शहाण्या नावडे अभाविका ॥३॥
निळा म्हणे जाणे परी । सर्वांतरीं साक्षी हा ॥४॥
४८७
कांहीचि सदैव दुबळे । न म्हणे हा बाळें नारीनर ॥१॥
जया परी तैसा होय । बापमाय सकळांचा ॥२॥
शरणागताचिया नांवे । पशुहि उध्दरावे पक्षिया ॥३॥
निळा म्हणे जीव जीवा । वंदय हा देवा मानवांसी ॥४॥
४८८
काळयासर्प गजेंद्रनाग । जटायु पतंग उध्दरिला ॥१॥
कुब्जादासी गणिका वेश्या । व्याधहि मांसाहारि तो ॥२॥
भिल्ल पापी अजामेळ दोषी । पूतना राक्षसी उध्दरिली ॥३॥
निळा म्हणे तुमचा ऐसा । कीर्तिचा ठसा तिहीं लोकीं ॥४॥
४८९
कासियाचीं बिजें घडलीं । लावणी केली वृक्ष तृणा ॥१॥
नेणवें महिमा तुमचा देवा । देवा मानवा दानवासी ॥२॥
काय मर्दुनी घातले बहळ । नाना परिमळ पुष्पयाति ॥३॥
निळा म्हणे नानापरींचे । घोस तरुंचे फळें पर्णे ॥४॥
४९०
कैसेनि आकळतें मन । देवावीण भक्तांचें ॥१॥
कामक्रोधलोभा शांती । कैसेनि होती मग त्याची ॥२॥
काळदंड चुकविता । कोण होता देवावीण ॥३॥
निळा म्हणे मोकळा भक्ता । करुनि ठेविती कोण पदीं ॥४॥
४९१
कैसी वानूं त्याची थोरी । ज्याची चराचरीं जीवनकळा ॥१॥
अदिकरुनि ब्रम्हादिक । शेवटील कीटक धरुनियां ॥२॥
चंद्र सूर्य तारांगणा । दीप्ति हुताशना ज्याचेनी ॥३॥
निळा म्हणे महिमा ज्याचा । वर्णितां वाचा वेद मुके ॥४॥
४९२
कोण करितें समाधान । देवावीण भक्तांचे ॥१॥
ब्रम्हसनातन पावविता । कोण या होता भक्तांसी ॥२॥
नाना कल्पनेचीं व्यसनें । तोडितें बंधनें कोण सांगा ॥३॥
निळा म्हणे जन्मजरा । यातना अघोरा न चुकत्या ॥४॥
४९३
कृपाळु भक्तांचा कैवारी । क्रोध दैत्यांदानवांवरी । एका तारी एका मारी । एका उध्दरी नाममात्रें ॥१॥
एका घरीं एका दारीं । एका ह्रदयीं एका परिवरी । एका धुंडितां अष्टही प्रहरीं । न सांपडे माझारी त्रैलोक्या ॥२॥
एकपत्नीव्रत दशरथा घरीं । रेणुकानंदन हा ब्रम्हचारी । मुंजिया बटु बळिच्या व्दारीं । महा व्यभिचारी नंदाचा ॥३॥
मोहनी रुपें सुंदोपसुंद । मोहुनी परस्परें करविला वध । वृंदेसी करुनियां शकट भेद । वधिला जालंदर रणरंगी ॥४॥
मत्स्यें केला शंखोव्दार । कुमें घेतला धराभार । वराहें हिराण्यक्ष असुर । मर्दुनी धरा धरिली निजदंती ॥५॥
नृसिंह हिरण्यकश्प विदारिला । वामनें बळी पाताळीं घातला । परशुरामानें सहस्त्रार्जुन वधिला । पृथ्वीचा केला दान धर्म ॥६॥
रामें रावणाचें मर्दन । केलें देवांचे बंदी मोचन । कृष्णें काळयवना जाळून । कंस चाणूर निवटिले ॥७॥
बौध्यें मोडविला दैत्ययज्ञ । वेदनिंदा निजमुखें करुन । कलंकिया म्लेंछचेनि निकंदन । पुढील कार्यार्थ हा असो ॥८॥
ऐसे अवतार घेउनी हरि । भूभार हरिले नानापरी । आपुलिया दासाचें रक्षण करी । संत चराचरीं गर्जती ॥९॥
चतुराननरुपें सृष्टीचें सृजन । विष्णुरुपें प्रतिपाळण । रुद्ररुपें परम क्षोभोन । करील संहार सकळांचा ॥१०॥
शंभु त्रिपुरातें संहारी । गजासुराचा मस्तक उतरी । गणेशरुपें नृत्यांच्या गजरीं । एका दैत्या चुरी पदघातें ॥११॥
ऐसीं हे चरित्रें श्रवण करितां । ठावो नुरेचि दोषा दुरिता । ब्रम्हानंदें श्रोता वक्ता । मुक्ति सायोज्यता पावती ॥१२॥
नानारुपें नाना नामें । नाना अवतार नाना कर्मे । धर्म रक्षिले ते सुखसंभ्रमें । निळा म्हणे सप्रेमें गर्जत ॥१३॥
४९४
खग मृग राक्षस वानर । दैत्य दानव निशाचर । सिध्दचारण विदयाधर । नागविखार कीटकादि ॥१॥
चतुष्पदें जळचरें मनुष्ययाति । दासी वेश्या भिल्ल्णिी किती । कोळी अंत्यज अधम जाती । उध्दरिले श्रीपति सत्संगें ॥२॥
न विचारितां कुळयाति । धर्माधर्म त्यांची रीति । शरण येतांचि ते निश्चिति । निजधामाप्रति पाठविलीं ॥३॥
न म्हणोनि नरनारी बाळकें । उत्तम अधम कनिष्ठ लोकें । नामेचि पाचारितां मुखें । नेलें ते निजसुखें वैकुंठा ॥४॥
निळा म्हणे ब्रीदें चरणीं । वागवी म्हणवी भक्तांचा ऋणी । ऐसी आख्या जे वेदीं पुराणीं । तेचि रहाटी चालवी ॥५॥
४९५
गोड नाम तुमचें देवा । गोड सेवा तुमची ते ॥१॥
गोड तुमची कीर्ति वाणी । गोड श्रवणीं ऐकतां ॥२॥
गोड तुमचे रुप दृष्टी । गोड पोटीं प्रेम तें ॥३॥
गोड निळा तुमचें पायीं । गोड डोयी ठेवितां ॥४॥
४९६
गोडा गोड तुमचें नाम । गोड जन्म स्मरणें त्या ॥१॥
गोड वाचा पढतां गीत । गोड चित्त चिंतवें गोड ध्यानें तुमच्या मन । गोड स्तवने गुण वाणी ॥२॥
गोड निळा कीर्तन संगी । गोड रंगी नाचतां ॥३॥
४९७
गाइलेचि गातां गीतीं । पवाडे तुमचेंचि श्रीपती । सहसा धणी न पुरे चित्तीं । सरितां रातिदिवस युगें ॥१॥
अनंता युगी अनंत खेळ । अनंता नामा रुपांचे मेळ । अनंत संपादिलें जे निर्मळ । पढतां वाचे उल्हासु ॥२॥
क्षीराब्धिशयन वैकुंठवास । अमरावती सत्यलोक कैलास । अष्टहि दिक्पाळाचे वेष । भरले सावकाश निजात्मरुपें ॥३॥
मच्छ कच्छ वराह रुपें । नृसिंह वामन परशुराम प्रतापें । राम कृष्ण बौध्यादि अमूपें । मिरविली स्वरुपें क्षुल्लकादि ॥४॥
नाना स्वर्गं सृष्टीरचना । नाना ऋषीरुपें वसवूनि स्थना । नाना संतरुपा नारायणा । निळा विज्ञापना करी तुमची ॥५॥
४९८
घन:श्याम मूर्ति राजीवलोचन । सांठवलें त्रिभुवन उदरामाजी ॥१॥
कौस्तुभ पदकें तुळसीमाळा कंठी । कास हे गोमटी पीतांबरें ॥२॥
लेईला अलंकार भूषणें परवडी । दिव्य रत्नें चोखडी । खवणें तयां ॥३॥
निळा म्हणे माझें निवालें तनुमन । देखतांचि सुप्रसन्न वदन याचें ॥४॥
४९९
जिहीं अवलोकिला डोळां । हरील्या त्यांच्या जीवनकळा ॥१॥
ऐसा अनादि हा बुडवणा । आहे ठावा विचक्षणा ॥२॥
चित्तें वित्तें आपणा एैसे । करुनि ठेवी निजध्यासें ॥३॥
निळा म्हणे पडिल्या गांठीं । न सोडी नष्ट हा शेवटीं ॥४॥
५००
ज्याचे जैसे भाव तैशा त्या दाविती । स्वानुभव बोलती आपुलाल्या ॥१॥
परी तो एकला सकलांसीही पुरला । ज्याच्या परी झाला तैसा तेथें ॥२॥
एकचि स्वातीजळ विषे मुक्ताफळ । पालटें स्थळास्थळ होय तैसें ॥३॥
निळा म्हणे गंध उपाधी निराळा । दावीं पुष्पीं कळा उमलता ॥४॥
५०१
जेणें मंथुनि क्षीरार्णव । काढिलीं अपूर्व दिव्य रत्नें ॥१॥
त्याचा महिमा वर्णूं कैसा । भरोनी आकाशा कोंदला तो ॥२॥
जेणें धरुनियां दांतीं । आणिली वसुमती समुद्रांतूनि ॥३॥
निळा म्हणे जेणें भानु । ठेविला उटुनु न मेळेसा ॥४॥
५०२
तारुनियां प्रचंड शिळा । उतरला पाळा मर्कटांचा ॥१॥
करुनि सिंधु पायवाट वधिले थाट राक्षसांचे ॥२॥
गोवळवेषें कौंसादिकां । लाविल्या शिका मर्दियेले ॥३॥
निळा म्हणे ब्रम्हचारी । भोगोनियां नारी सोळा सहस्त्र ॥४॥
५०३
तुमच्या कृपामृतजळीं । माझी वचनवल्ली अंकुरली । मती विस्तारें फांकली । फळ संभारीं हरिनामें ॥१॥
नवल कृपामृतधन । वरुषला तुमचें हें वरदान । माझी वाचा आणि मन । केलीं पावन कीर्तनें ॥२॥
एकट एकलोचि श्रीपती । पुरोनि उरलेति त्रिजगतीं । अपूर्व चरित्रें अपूर्व ख्याती । संत गर्जती स्वानंदें ॥३॥
शुक सनकादिक नारद । व्यास वाल्मीक आणि प्रल्हाद । साही शास्त्रें चारी वेद । पुराणें पवाडे वर्णिती ॥४॥
परि तुम्ही नकळा त्यांचिये मती । अपार म्हणोनियां गुणसंपत्ती । जेथिंचे तेथेंचि भक्त स्तविती । अपार म्हणती विस्तारला ॥५॥
सगुण गोकुळीं गौळियां घरीं । निर्गुण योगियां हदयमंदिरीं । ढिसाळ ब्रम्हांडाबाहेरी । महर्षी देव स्तविताती ॥६॥
शिव आपुलिये हदयभुवनीं । नित्य निमग्न तुमचे ध्यानी । भोळया भाविकां लागुनी । आवडी ऐसें रुप धरी ॥७॥
कामिनीभावें कांतातुर । मदनमूर्ति मनोहर । वैरसंबंधी कंसचाणेर । तयां तैसाचि ते ठायीं ॥८॥
गोवळांमाजी गाईपाठीं । वानरांमाजीं मेळवुनी थाटी । रावणनि:पातनीं परम हटीं । आतुबर्ळी कळिकाळा ॥९॥
नित्य नूतन तुमचे गुण । चरित्रें गाती वैष्णव जन । निळा झाला सुखसंपन्न । चरणीं मन ठेवितां ॥१०॥
५०४
दिनबंधू आत्मयारामा । सुखविश्रामा विश्वजनका ॥१॥
परात्परा पुरुषोत्त्मा । आगमानिगमा जगवंदया ॥२॥
निर्विकल्पा निरंजना । सुखनिधाना गुणमूर्ती ॥३॥
अगा ये निळयाच्या दातार । रुक्मिणीवरा श्रीविठठला ॥४॥
५०५
देवावीण भक्तांचें संकट । कोणतें अरिष्ट निवारित ॥१॥
कोणासी शरण जातें तेव्हां । कळिकाळ जेव्हां आकळूं येतां ॥२॥
संसार जेव्हां करितां ओढी । तडातोडी भंवतालीं ॥३॥
निळा म्हणे तें चुकविलें । अनर्थ वारिले कृपावंतें ॥४॥
५०६
देव नसतां भक्तांचीं विघ्नें । कोण जन्ममरणें निवारितें ॥१॥
कोणासी म्हणते धांवा धांवा । करितां कुडावा कोण दुजा ॥२॥
कोण नेता वैकुंठासी । आपुले विश्रांतीसी निज घरा ॥३॥
निळा म्हणे देवावीण । संसारबंधन न तुटतें ॥४॥
५०७
धराल जरी चित्तीं न लगेचि तरी वेळ । आहेती सकळ कळा हातीं ॥१॥
क्षणेचि सगुण क्षणेंचि निर्गुण । क्षणेंचि प्रसन्न होतां दासा ॥२॥
क्षणेंचि निर्मिले चतुर्दशलोक । देव ब्रम्हादिक चौदा मनु ॥३॥
झकवाल तरी ठकडे देवा ब्रम्हांदिकां । भेटाल तरि भाविकां नलगे वेळ ॥४॥
ऐसे संत मुनी जाणती सकळ । क्रीडा तुमचा खेळ ठावा तयां ॥५॥
निळा म्हणे माझें अतरींचे आर्त । जाणतां सतत साक्ष तुम्ही ॥६॥
५०८
न कळती तुझिया मावा । दैत्यां देवां आणि मानवां ॥१॥
कैसें तुझे रुप नाम । कोण कूळयाति धर्म ॥२॥
जागृत आहेसीं कीं निजलेला । उपवासीची कीं धाला ॥३॥
निळा म्हणे जित कीं मेला । न वजसी कोणी देखिला ॥४॥
५०९
नगरी नेली वैकुंठासी । कीर्ति हे ऐसे अदभुतचि ॥१॥
कंस वधिला भौमासुर । महिमा अपार हा घोष ॥२॥
तारुनी शिळा उध्दारि कटका हाही नेटका पुरुषार्थ ॥३॥
निळा म्हणे नाथिला सर्प । भंगिला दर्प रावणाचा ॥४॥
५१०
नारायणा तुमच्या चरणीं । भक्ति मुक्तिचिया खाणी ॥१॥
मोक्ष सर्वदा तिष्ठत । चरणीं जोडोनियां हस्तक ॥२॥
ऋध्दि सिध्दि वोळंगती । चरणीं तुमच्या श्रीपति ॥३॥
निळा म्हणे अवलोकितां । पाउलें सुकुमार सायुज्यता ॥४॥
५११
नरकासुरा वधिलें जेणें । मुरुसी मर्दुनी घेतलें ठाणें । वृत्रासुराचें हरिलें जिणें । तारकासुरा प्राणहानी केली ॥१॥
मधु दैत्याचें सूदन । हिरण्याक्षाचे घेतले प्राण । हिरण्यकश्यपा विदारुन । काळयवन दग्ध केला ॥२॥
रिठासुर दाढें चाचिला । अघा बगासुर तो चीरिला । तृणासुर सहजेंचि मर्दिला । शकट मोडिला पादघातें ॥३॥
उपटिलीं धेनकासुराचीं शिंगें । कंस चाणून ते वधिले रागें । केशियाचीं मोडिली टांगे । गोंकुळीं श्रीरंगें बाळपणीं ॥४॥
परशुरामें वधिला सहस्त्रार्जुन । एकवीस वेळां क्षत्रियांचें कंदन । रामें ताटिका खरदूषण । नासिकछेदन शूर्पनखे ॥५॥
रावण कुंभकर्ण रामें मर्दिले । कित्येक निशाचरातें आटिलें । ऐसे पवाडे संपादिले । बहु वेळां उतरिले धराभार ॥६॥
निळा म्हणे जे ते अवतारीं । भक्त रक्षूनी दैत्यां मारी । ऐसिया चरित्राची हारी माळा लाविल्य कल्पादी ॥७॥
५१२
पाचारितां यावें बोळविता जावें । हें तों न संभवे तुम्हांपाशीं ॥१॥
जेथिल तेथेंचि प्रगटाल रुपडें । आपुल्या सुरवाडें भक्तांचिया ॥२॥
जाणें येणें नाहीं तुम्हां कदाकाळीं । असा भूमंडळीं व्यापूनियां ॥३॥
निळा म्हणे ऐसें जाणोनियां मनीं । करितों अनुदिनीं स्तवन तुमचें ॥४॥
५१३
बहुतां येणें नागविलें । हरुनी सर्वस्वही नेलें ॥१॥
करुं जातां याची गाठी । जिवीं जिवा घाली मिंठी ॥२॥
पाहिलाचि पुरे । उरों नेदी त्या दुसरें ॥३॥
निळा म्हणे चेटकी ऐसा । स्वाभाव त्याचा सांडिल कैसा ॥४॥
५१४
भक्तआवडीऐसें रुप । धरीं हा बाप मदनाचा ॥१॥
नेदी पडों अंतर कोठें । पाहिजे नेटें त्याचि ऐसा ॥२॥
एकापुढें कटीकर । श्यामसुंदर विटेवरी ॥३॥
निळा म्हणे नरसिंहरुपें । प्रगटे प्रतापें शुष्ककाष्ठीं ॥४॥
५१५
मागें तुम्हीं वांटिलें लोकां । सनकादिकां पर्यंत ॥१॥
अधम तेहि थोराविले । आपणा केले सारिखें ॥२॥
नाहीं विचारिली याती । धरिलें हातीं प्रीतीनें ॥३॥
काय त्यांचें क्रियाकर्में । कांही धर्म न विचारा ॥४॥
उदारपणा नाहीं सीमा । पुरषोत्तमा तुमचिया ॥५॥
निळा म्हणे सरतें पुरतें । केलें किती वर्णावें ॥६॥
५१६
म्हणविते शरणांगत । कोणाचे भक्त देवावीण ॥१॥
कोणापाशीं हा परिहार । देते संसार यातनेचा ॥२॥
कोण देवाविण येते । भक्तांसी सोडविते भयांतुनी ॥३॥
निळा म्हणे देव आणि भक्त । येरेयेरा होत साह्य सदा ॥४॥
५१७
येतो जातो ना दिसेपरी । नित्य व्यभिचारी चित्ताचा ॥१॥
ऐसाचि याचा चोरटा खेळ । आहे चक्रचाळ मुळींचाची ॥२॥
नेदी कळों न दावीच अंग । उमटोचि माग कैसा तो ॥३॥
निळा म्हणे सायास करितां । होतात वृथा आमुचे ते ॥४॥
५१८
सर्वज्ञ सर्वदा तुम्ही सर्वसाक्षी । म्हणऊनि कैपक्षी हरिभक्तांचे ॥१॥
खरें खोटें कळे तुम्हां वरीवरीं । संकल्प अंतरीं उठितांचि ॥२॥
जया तैसें फळ नेमुनी ठेवितां । जोडूनियां देतां काळा हातीं ॥३॥
कर्मा ऐसें फळ भोगवितां सकळ । करुनियां काळ पुढें सत्ता ॥४॥
निळा म्हणे माझें जैसें आचरण । तैसें करा दान कृपानिधी ॥५॥
५१९
हरीविण आहे कोण । सान मोठें वेगळें ॥१॥
सर्वांचाही सर्व साक्षी । अध्यक्षी हें नाम त्या ॥२॥
कर्मा ऐसें देतां फळ । सत्ता केवळ हे ज्याची ॥३॥
निळा म्हणे वीटे उभा । परि हा नभा व्यापक ॥४॥
५२०
लखलखिलें सुतेज माझिया नयनापुढें । चतुर्भुज रुपडें मेघश्याम ॥१॥
तेणेंचि वेधिलें हदईचि राहिलें । मागें पुढें ठेले वेष्ठुनियां ॥२॥
हदयाची भीतरीं पाहतां बाहेरी । तेंचि चराचरीं दिसे माये ॥३॥
निळा म्हणे तेणें हरिला देहभाव । सांगता हा नवलाव वाटे येरा ॥४॥
५२१
बहूत याचक सांभाळिले । जे जे झाले शरणांगत ॥१॥
नाना वर्ण नाना याति । धरिले हातीं नुपक्षूनी ॥२॥
केलें वरिष्ठ सकळालागीं । मिरविले निजांगी आपुलिये ॥३॥
निळा म्हणे उबग नेणें । करिता देणे कृपेचें ॥४॥
५२२
दुभिन्नले जया पाय । तया सुखा उणें काय ॥१॥
महिमा जाणें पृथुराजा । किंवा गौतमाची भाजा ॥२॥
ध्यानीं ध्यातां चंद्रमौळी । समाधिस्थ नित्य काळीं ॥३॥
निळा म्हणे सनकादिक । संतहि जाणती सकळिक ॥४॥
५२३
श्रवणीं कुंडलें ढाळ देती । हीरयापगंति दंत तैसे ॥१॥
तुळसि वैजयंती माळा । पदकि कीळा रत्न ज्योति ॥२॥
नेत्र जैसे रातोत्पलें । दिव्य कमळें विकासलीं ॥३॥
निळा म्हणे तत्पदवासी । भक्तरासी भोंवताले ॥४॥
५२४
येति जाति होति मरती । नानाकार भूतव्यक्ती ॥१॥
हा तो आहे जैसा तैसा । अनादि रुपें आपणाचि ऐसा ॥२॥
नहोनिया सूक्ष्मस्थूळ । वृध्द तरुणा अथवा बाळ ॥३॥
निळा म्हणे एकला येक । न होउनि एक ना अनेक ॥४॥
तुमच्या शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांतीला भेट द्या .