अभंग गाथा

संत निळोबाराय (श्री संत निळोबारायाकृत अभंग)

संत निळोबाराय (श्री संत निळोबारायाकृत अभंग)

व्दारकेचि मूर्ती एकनाथा घरी । पाणी वाहे हरि कावडीने ॥१॥

श्रीखंडया चंदन उगाळूनि करी । वस्त्र गंगातीरी धूत असे ॥२॥

सेवेसी तत्पर उभा ठायी ठायी । देवपूजेसमयी तिष्ठतसे ॥३॥

निळा म्हणे देव रावे ज्याचे घरी । दत्तचोपदारी करितसे ॥४॥

एकोबाची सेवा करी । वाहे घरी जीवन ॥१॥

गंधाक्षता तुळसीमाळा । पुरवी सोहळा करी ऐसा ॥२॥

करुनि सडासंमार्जन । पाळित वचन आज्ञेचे ॥३॥

निळा म्हणे यापरिहरि । विराजे घरी दासांचे ॥४॥

दासोपंतांचा अभिमान । गेला घेताचि दर्शन ॥१॥

धन्य धन्य एकनाथा । तुमचे चरणी माझा माथा ॥२॥

दत्तात्रय चोपदार । येथे उभे काठीकर ॥३॥

यवन अंगावरी थुंकला । प्रसाद देवुनी मुक्त केला ॥४॥

निळा शरण तुमच्या पायां । अनन्यभावे नाथराया ॥५॥

सकल संतांचा हा राजा । स्वामी एकनाथ माझा ॥१॥

ज्यांचे घेताचि दरुषण । पुन्हा नाही जन्म मरण ॥२॥

ज्यांचे वचिता भागवत । प्राणी होय जीवनमुक्त ॥३॥

निळा म्हणे लीन व्हावे । शरण एकनाथा जावे ॥४॥

मातापिता समर्थ । स्वामी माझा एकनाथ ॥१॥

काळ रुळतो चरणी । देवघरी वाहे पाणी ॥२॥

ज्यांचे अनुग्रहे करुन । झालो पतित पावन ॥३॥

जो वसे प्रतिष्ठानी । निळा त्यासी लोटांगणी ॥४॥

धन्य गोदातीर धन्य प्रतिष्ठान । धन्य तेथील जन रहिवासी ॥१॥

कृष्णकमलातीर्थी चरण नाथांचे । उध्दरी जगाचे कलिदोष ॥२॥

जयातीर्थी स्नान तत्पदी दर्शन । पूर्वज उध्दरण कुळासहित ॥३॥

निळा म्हणे जया धडो तेथील वारी । तया पुण्यासही न वर्णवे  ॥४॥

प्रत्यक्ष परब्रहम भानुदासाचे कुळी । स्वये वनमाळी अवतरले ॥१॥

भक्तिमार्ग लोपे अधर्म संचला । कलि उदय झाला प्रथमचरण ॥२॥

नानापरि जन वर्ततसे सैरा । नभें व्याभिचारा नारीनर ॥३॥

निळा म्हणे इही अवतार केले । जग उध्दारिले महादेवी ॥४॥

उदयी उदयी होता कृपा दृष्टी । स्वये जगजेठी सेवा करी ॥१॥

सडासंमार्जन स्वये करी हरि । उदकते भरी गंध घासी ॥२॥

स्वार्थ परमार्थ दोन्ही ही साधन । साधियेले जाण क्षणमात्रे ॥३॥

करोनि कवित्व एकादशी टीका । भागवत देखा हरिलीला ॥४॥

निळा म्हणे अपार करोनि अभंग । तोडिता उव्देग संसाराचा ॥५॥

आणिक हे ग्रंथ प्रमाण अष्टोतरशे । वदले स्वरसे गुरुकृपे ॥१॥

रामायण अदभूत सप्तकांड साचार । तंव प्रयाण विचार आरंभिला ॥२॥

समाधी सुखाचा सोहळा अपार । होतो जयजयकार प्रतिष्ठानी ॥३॥

निळा म्हणे एैसा ब्रहमानंद झाला । आनंदी लोटला आनंदचि ॥४॥

१०

आनंदे वैष्णव गाती पै नाचती । जयजयकार करिती ऋषीमुनी ॥१॥

विमानांची दाटी पुष्पांचा वरुषाव । स्वर्गीहूनि देव करिताती ॥२॥

स्वये परब्रहम करीत सोहळा । सकळ भक्तमेळा प्रतिष्ठान ॥३॥

निळा म्हणे हरि निघाले पंढरी । आनंदे भीतरी ब्रहमादिकां ॥४॥

११

भानुदासाचे कुळी महाविष्णुचा अवतार । आदी क्षेत्री स्थान वस्ती गोदातीर ॥१॥

ओवाळु आरती स्वामी एकनाथा । तुमचे नाम घेता हरे भवभ्य चिंता ॥२॥

जनार्दनाची कृपा दत्तात्रयाचा प्रसाद । भागवती टीका नारायण आत्मबोध ॥३॥

ब्रहमाविष्णु महेश ज्यासी छळावया येती । न ढळे ज्याची निष्ठा होसी एकात्मता भक्ति ॥४॥

कावडीने पाणी ज्याघरी चक्रपाणि वाहे । अनन्य भक्तिभावे निळा वंदी त्याचे पाय ॥५॥

१४२१

हरीच्या भजनें हरीचे भक्त हरीचे भक्त । झाले विख्यात भूमंडळीं ॥१॥

तरोनि आपण तारिले आणिका । वैकुंठनायका प्रिय झाले ॥२॥

ज्यांचे ध्यानी मनीं हरी । राहिला निरंतरीं दृष्टीपुढें ॥३॥

निळा म्हणे अवघेचि सांग । केले उभय भोग भोगुनियां ॥४॥

१४४०

घेऊनियां कृत्रिम सोंगे । नानापरींच्या नटती रंगें ॥१॥

आपण बुडवीती । लाउनि आणिकांही संगती ॥२॥

जाउनि एकांतीं बैसणें । करुनी चावटी बोलणें ॥३॥

निळा म्हणे उपदेशिती । विषय आत्मरुप शिष्याप्रती ॥४॥

१५७१

भानुदासाच्या कुळीं महाविष्णूचा अवतार । आदि क्षेत्रीं स्थान वस्ती गोदातीर ॥१॥

ओवाळूं आरती स्वामी एकनाथा । तुमचे नाम घेतां हरे भवभयचिंता ॥२॥

जनार्दनाची कृपा दत्तात्रयाचा प्रसाद । भागवती टीका नारायण्‍ आत्मबोध ॥३॥

ब्रहमा विष्णु महेश ज्यासी छळवया येती । न ढळे ज्याची निष्ठा होशीं एकात्मता भक्ति ॥४॥

कावडीनें पाणी ज्या घरीं चक्रपाणी वाहे । अनन्यभक्तिभावें निळा बंदी त्याचे पाय ॥५॥

१५७२

प्रपंचरचना सर्वहि भोगुनि त्यागीली । अनुतापाचे ज्वाळीं देहबुध्दी हविली । वैराग्याची निष्ठा प्रगटूनि दाखविली । अहंता ममता दवडुनि निजशांति वरिली ॥१॥

जयजयाजी सदगुरुतुकया दातारा । तारक तूं सकळांचा जिवलग सोयरा ॥ध्रु॥ हरिभक्तिचा महिमा विशेष वाढविला । विरक्तिज्ञानाचा ठेवा उघडुनि दाखविला । जगदोध्दारालागीं उपाय सुचविला । निंदक दुर्जनांचा संदेह निरसिला ॥जय ॥२॥

तेरा दिवस बह्या रक्षूनियां उदकीं । कोरडयाची काढूनी दाखविल्या शेखीं । अपार कविताशक्ति मिरवुनि इहलोकीं । कीर्तनश्रवणें तुमच्या उध्दरती जन लोकीं । जय ॥३॥

बाळवेष घेऊनि श्रीहरी भेटला । विधिचा जनिता तोचि आठवा हा दिधला । तेणें ब्रहमानंदें प्रेमा डोलविला । न तुके म्हणुनी तुका नामहं गौरविला ॥ जय ॥ ॥४॥

प्रयाणकाळीं देवें विमान पाठविलें । कलिच्या काळामाजीं अदभुत वर्तविले । मानवदेह घेऊनि निजधामा गेले । निळा म्हणे सकळ संत तोषविले ॥ जय ॥  ॥५॥


संत निळोबाराय गाथा । संत निळोबाराय अभंग । निळोबा अभंग । निळोबा गाथा । सर्व गाथा । निळोबाराय माहिती । पिंपळगाव मंदिर निळोबाराय । sant nilobaray gatha | sant nilobaray abhang | niloba abhang | niloba gatha | sarv gatha | nilobaray mahiti | nilobaray mandir pimpalgav |

तुमच्या शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांतीला भेट द्या .