संत निळोबाराय (श्री एकनाथ महाराजांचे निर्याणाचे अभंग)
१
प्रत्यक्ष् भानुदासाचें कुळीं । स्वयें वनमाळी अवतरले ॥१॥
भक्तीमार्ग लोपे अधर्म संचला । कली उदय झाला प्रथम चरण ॥२॥
नानापरी जन वर्ततसे सैरा । न भें व्यभिचारा नारी नर ॥३॥
निळा म्हणे इहीं अवतार केले । जग उध्दरिलें महादोषी ॥४॥
२
धन्य प्रतिष्ठान क्षेत्र महिवरी । गोदेचियें तिरीं पुण्यभूमि ॥१॥
धन्य तो श्रीगुरु जनार्दन सखा । त्रैलोक्य देखा पावन केलें ॥२॥
धन्य तो अवधूत प्रसादें तारीलें । कृतकृत्य केले सुफळ जन्म ॥३॥
निळा म्हणे त्याचा न कळेचि पार । कोण बडीवार माझा तेथें ॥४॥
३
तयाचें चरित्र तोचि वदवीत । वैकुंठ समर्थ नांदे घरीं ॥१॥
प्रतिष्ठानालागी स्वयें जनार्दन । राहिले कारण दोन मास ॥२॥
नित्यनेम ज्याचा करी प्रात:स्नान । विधियुक्त जाण् वेदमार्गे ॥३॥
निळा म्हणे जातां गोदेचिया स्नाना । नवल विंदाना देखियेलें ॥४॥
४
बांधोनियां शिखा हिशोबाचे मिसें । एकनाथ बैसे महाव्दारीं ॥१॥
जातां मार्गावरोनि पाहे निजदृष्टी । होतसे कष्टी रुक्यालागी ॥२॥
स्वभावें बोलिलें हास्यमुख वचन । प्रपंच्या कारण महादु:ख ॥३॥
निळा म्हणे ऐसा उपदेश शब्द । ऐकतांचि बोध मना झाला ॥४॥
५
अंतरीं नमप एकनाथ करी । धन्य धन्य वैखरी वदलिसे ॥१॥
लटिका व्यवहार सव्र हा संसार । मायेचा प्रसर मृगजळ ॥२॥
हिशोब मिळतां न बैसे क्षणभरी । आठवीं श्रीगुरु ॥३॥
निळा म्हणे तेव्हां सांपडला रुका । श्रीहरि सखा संतोषला ॥४॥
६
हिशोबी हिशोब अवघाचि मिळाला । सूर्य उदय झाला अंतरदृष्टी ॥१॥
देऊनियां गांठ लाविलें कपाट । साधिलें अचाट गुरुसेवा ॥२॥
ठेऊनियां हात स्वयें ब्रम्ह केले । नाहीं तें उरलें मी तूं पण ॥३॥
निळा म्हणे ऐसा गुरुकृपेचा कोंवळा । डोळियांचा डोळा दाखविला ॥४॥
७
उदयीं उदय होतां कृपादृष्टी । स्वयें जगजेठी सेवा करी ॥१॥
सडा समार्जन स्वयें करी हरि । उदक तें भरी गंध घासी ॥२॥
स्वार्थ परमार्थ दोन्ही ही साधन । साधियेलें जाण क्षणमात्रें ॥३॥
करोनि कवित्व एकादशी टीका । भागवत देखा हरिलीला ॥४॥
निळा म्हणे अपार करोनि अभंग । तोडीला उव्देग संसाराचा ॥५॥
८
धन्य धन्य एकनाथा । तुमचें पायीं माझा माथा ॥१॥
दासोपंताचा अभिमान । गेला होताचि दरुशन ॥२॥
दत्तात्रय चोपदार । पुढें उभे कांठीकर ॥३॥
यवन अंगावरीं थुंकला । प्रसाद देऊनि मुक्त केला ॥४॥
निळा शरण तुमच्या पायां । अनन्य भावें नाथराया ॥५॥
९
आणिक हे ग्रंथ प्रमाण अष्टोतरशें । वदिलें स्वरसें गुरुकृपें ॥१॥
रामायण अदभुत सप्तकांड साचार । तंव प्रयाण विचार आरंभिला ॥२॥
समाधि सुखाचा सोहळा अपार । होता जयजयकार प्रतिष्ठानीं ॥३॥
निळा म्हणे ऐसा ब्रम्हानंद झाला । आंनदी लोटला आनंदचि ॥४॥
१०
पताकांचे भार वैष्णव नाचती । रामकृष्ण गाती नामावळी ॥१॥
शालीवाहन शके पंधराशे अकरा । विजय संवत्सरा फाल्गुन मास ॥२॥
उत्तम हे तिथी षष्टी रविवार । प्रयाण् साचार दोन प्रहरीं ॥३॥
निळा म्हणे ऐशा नामाच्या गजरीं । समाधि गोजिरी प्रतिष्ठानी ॥४॥
११
आनंदे वैष्णव गाती पै नाचती । जयजयकार करिती ऋषीमुनी ॥१॥
विमानांची दाटी पुष्पांचा वरुषाव । स्वर्गीहूनि देव करिताती ॥२॥
स्वयें परब्रम्ह करीत सोहळा । सकळ भक्तमेळा प्रतिष्ठान ॥३॥
निळा म्हणे हरि निघाले पंढरी । आनंद भीतरीं ब्रम्हादिकां ॥४॥
तुमच्या शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांतीला भेट द्या .