संत निळोबा महाराज

संत निळोबाराय (निळोबास्वामीकृत सदगुरू तुकाराम महाराजांची स्तुति)

संत निळोबाराय (निळोबास्वामीकृत सदगुरू तुकाराम महाराजांची स्तुति)

नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा । नमो सद्गुरु सच्चिदानंदरुपा । नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती । नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती ॥१॥

तुझया आठवीं वीसरे आपणातें । तरंगा जळीं घालितां जेवि होते ॥ अळंकार सोनेंचि होऊनि ठेला । निळा यापरी आठवी सद्गुरुला ॥२॥

तुका सद्गुरु हा तुका सद्गुरु हा । तुका नातुडे सच्चिदानंद तो हा ॥ जया मोहरा सर्व सिध्दांत जाले । न तूके महामौन्य घेऊनि ठेले ॥३॥

जनीं वीजनीं वोळती हा तुकावा । करीतां पुजा आणिती नित्य भावा । स्फुरद्रूप तो सर्व जाणोनि नेणें । पहा सांडिलें सर्वसाक्षित्व जेणें ॥४॥

असदाग होणेंचि नाहीं जयातें । सदत्वासि कैंसेनि येणें तयातें ॥ जडत्वासि जो नातळे चित्प्रकाशें । चिदाभास तो बोलिजे त्यासि कैंसें ॥५॥

नव्हे दु:ख आनंद त्यातें म्हणावें । आनंदासि आनंदता केंवि पावे ॥ नये देखतां बूबळें आपणासी । निळा यापरी आठवी सद्गुरुसी ॥६॥

मनुष्याकृती राघवें ख्याति केली । शिळाशीखरें सागरीं तारियेलीं ॥ तुकास्वामी हा पूर्णब्रम्ह प्रकाशी । जळीं रक्षिलें निर्जिवा कागदासी ॥७॥

महाराज हा जन्मला मृत्युलोकीं । दुजीं ऊपमा नाढळे ईहलोकीं ॥ भवसिंधुसी बांधिला सेतु जेणें । अनाथा दिनाकारणें तूकयानें ॥८॥

तुका हा तुका हा परब्रम्हरुपीं । तुकीतां तुका हा परब्रम्हरुपीं । तुकीतां तुका हा तूकला सत्स्वरुपीं ॥ तुकास्वामीतें नाम वाचेसि गातां । बहूसा निळा हा पावला वर्म हाता ॥९॥

असे जो सदा नित्य एकांतवासी । असे जो सदा सर्वदाही उदासी । असे जो सदा भोगत्यागें विरागी । असे जो सदा रंगला अंतरंगीं ॥१०॥

तयाचे पदीं रंगलें चित्त माझें । सुखा पावलें सच्चिदानंद भोजें । म्हणोनि निळा चिंतनीं तोचि चिंती । सखा सोयरा सद्गुरु तोचि अंतीं ॥११॥

असे जो सदा देखण्याही निराळा । न लक्षेचि लक्षा जिवाचा जिव्हाळा ॥ नये जो कदां देखतां ऐकतांही । असे जो सदा दिव्य देही विदेही ॥१२॥

नये जो कदां स्पर्शतां कवळितांही । नये जो कदां देखतां ऐकतांही ॥ नव्हे जो कदां एकदेशी विदेशी । अलक्षी निळा लक्षितो नित्य त्याशीं ॥१३॥

अशिर्वांद देतां कदाही न भागे । करी सत्य वाक्या न चूके प्रसंगें । अशा अर्चितां सद्गुरु तूक्याला । निळा चिंतिलें तेंचि पावोनि ठेला ॥१४॥

असे सर्वव्यापी सदा सर्वदांही । नसे नाम ना रुपही ज्यासि कांहीं । असे जो सदा व्याप्यव्याप्या निराळा । तयाचे पदीं रुळतो नित्य नीळा ॥१५॥

न देखें रवी अंधकारासि जैसा । कदा बंधना न देखे मुक्त तैसा ॥१६॥

तुका भासला मानवी वेषधारी । परी हा लिलाविग्रही निर्विकारी ॥ स्वयें श्रीहरी व्यापकू सर्व जीवा । तुका तेचि तो हा परब्रम्ह ठेवा ॥१७॥

असोति नसे सर्वदा देहमेही । नसोनि असे सतूस्वरुपींच पाही । न लक्षेचि कोणा लिलाविग्रहीसा । दिसोनि जळीं वेगळा भानु जैसा ॥१८॥

निळा पावला थोर पुण्यें तयासी । मनीं चिंतितां सद्गुरु तूक्यासी । महालाभ आलभ्य तो प्राप्त जाला । पदीं लागतां तोचि होऊनि ठेला ॥१९॥

नमो सद्गुरु स्वामीया तूक्यासी । असें बोलतां बोलण्यासीच ग्रासीव असे शब्दव्यापी तोचि त्या शब्दाव्यापी तोचि त्या शब्दवीता । परी नाकळे शब्द त्याही अतौता ॥२०॥

असे व्यापुनि सर्वदा व्योम सर्वां । परी नाढळे स्पर्शनीं स्पर्शभावा । तसा हा तुका तूकितां तूकवेना । लिलाग्रिही तो कदा ही कळेना ॥२१॥

असोनी जिवीं जीवमात्रा निराळा । घटीं ब्रिबला जेविं जो अंतराळा । असे व्यापुनी वेगळें व्योम जैसे । असे सद्गुरु स्वामीचें रुप तैसें ॥२२॥

दिसे दर्पर्णी दर्पणातें न शीवे । असे वेगळेंचि अलिप्त स्वभावें । जैसें स्वप्नही भासुनी सत्य नोहे । तसें दृश्य मिथ्याच तो सत्य आहे ॥२३॥

निजानंद आनंदवीतो मनाला । मनीं तोचि तो भासतो लोचनाला ॥ तयावीण हें रिक्त नाहींच कोठें । दिसे सर्व जें त्यांतरीं तोचि भेटे ॥२४॥

असे दृश्य अदृश्य त्याही परौता । जिवीं जीवनाहूनी या जीववीता ॥ नव्हे त्याविणं सर्व कांहींच ऐसा । मृगांबु रवी भासवी मिथ्य जैसा ॥२५॥

लिलाकौतुकी सर्व होऊनि ठेला । नसे वेंचला ना गुणत्वासि आला ॥ जयालागिं होणें न होणें असेना । जरी दावितो आपणलागि नाना ॥२६॥

असे देखतां दीसतो तोचि अंगें । लिलानाटकी सर्व घेवोनि सोंगें ॥ नेहोनी कदा सर्वही तोचि जाला । परी आपआपीं सवरुपींच ठेला ॥२७॥

दिसे दृश्यअदृश्य त्याही निराळस । क्षराअक्षरातीत जो का स्वलीळा । असंभाव्य होऊनि कांहींच नोहें । नहोनी सदा सर्वदां तोचि आहे ॥२८॥

अनेका घटीं दाउनी आत्मबिंबा । परी जेथिंचा तेथ भानु स्वयंभा ॥ नसे स्पर्शला फांकला तो कदांही । तसा सद्गुरु भासला सर्व देहीं ॥२९॥

घटा भंगल्या भंगलें बिंब नाहीं । असे जेथिचें तेथ् निश्चींत पाही ॥ तसा सद्गुरु सर्व व्यापूनि ठेला ॥ परी नातळे व्यापिले तया निराळा ॥३०॥

असे भानु व्योमीं प्रभा फांकलीसे । परी भिन्न नोहूनि बिंबीं विलासे ॥ तसा सद्गुरु जात ना येत नाहीं । असे जेथिचा तेथ सर्वत्र पाही ॥३१॥

नये ना कदा जाइना दूर कोठें । नसे ना असे आपआपींच दाटे ॥ अशा सद्गुरु नमो आत्मयाला । निळा वंदितां वंदनीं तोचि जाला ॥३२॥

अरुपची हा सर्व व्यापला सर्व देहीं । परी देह वीदेहता सि नाहीं ॥ जगव्दंय हा वंदनाहीं निराळा । नसोनि असे सर्व दाऊनि लीला ॥३३॥

नसे नेणतां नेणिवेमाजि कोठें । बहू जाणतां जाणिवाहि न भेटे ॥ अशा सद्गुरुच्या पदा लागतां हो । पदा देखोनी तोचि होऊनि राहो ॥३४॥

नसे रुप ज्या सर्वही तोचि जाला । नयोनि रुपा आपआपींच ठेला ।॥ नसे ना असे व्याप्य ना एकदेशी । तया वंदिलें सद्गुरु तूक्यासी ॥३५॥

अकस्मात येऊनि भेटि दीली । परी भेटण्यामाजि जाणीव नेली ॥ अशा जाणण्‍यानेण्याही निराळा । करुनि पदीं स्थापिला नित्य नीळा ॥३६॥

कशी हे कृपा सद्गुरु तूकयाची । नुठेची कदा देहऊर्मी देहाची । मनीं मन ही हारपोनीच गेलें । पदां चिंतितां चित्त हीरोनि गेले ॥३७॥

नुठी बुध्दिचा अल्प उल्लेख तोही । अंत:कारणिचा शून्य संकल्प पाही ॥ निळा यापरी मुगध होऊनि ठेला । नेणो तूकया काय बोधूनि ठेला ॥३८॥

स्वयें सत्य असत्य तें काय जाणे । जसा सूर्य अंधारलेशा न जाणें । तसा सद्गुरु न देखे दृश्यजातां निजानंदरुपीं वसे तो सतंता ॥३९॥

न तूकेची जो तो म्हणे हा तुकावा । तुका नातुडे तो नये रुपनांवा ॥ कसें तूक घालुं अरुपासि आतां । नये लक्षितां बुध्दिजातां समस्तां ॥४०॥

न घालितां व्योम हे तागडीं ही । जया तूकितां तूक दूजेंचि नाहीं ॥ नये भास्करा तूक कांटाळ कोठें । तसा हा तुका साम्य दूजें न भेटे ॥४१॥

तुळे घालितां पृथ्वीये तूका साम्य दूजें न भेटे तुळे घालितां पृथ्विये तूक नाहीं । दुजे मेरु मांदार सिंधूसि तेही ॥ तसा हा तुका तूकितां तूकवेना । नयेची साम्य दूजें दिसेना ॥४२॥

असा सद्गुरु भेटतां लाभ कोटी । तया भेटल्यास स्वरुपींच गांठीं ॥ कदा सद्गुरु व्दैतभावो दिसेना । असे अंतरीं बाहेरी तो कळेना ॥४३॥

जेणें अचिलें सद्गुरुच्या पदासी । वरी सौख्यसाम्राज्य येऊनि त्यासी । निळा अर्चुनी सद्गुरु तूकयाला । निजानंदबोधीं स्वयें तो विराला ॥४४॥

जया पूजिलें आदरें पांडुरंगें । विमानस्थ केलें प्रयाणप्रसंगें ॥ तनू मानवी दिव्यरुपीच केली । न त्यागी तिये दिव्यलोकासि नेली ॥४५॥

मनोभाव माझा तया पादपदमीं । परी गूजसा राहिला तोयपमीं ॥ निळा त्यापरी लीन तेथेंचि झाला । पदीं तूक्‍याच्या विरोनीच गेला ॥४६॥

स्वयें दृश्यद्रष्टा निजांगेंचि जाला । हरीभक्त हा भेद गीळोनी ठेला ॥ नसे दीसतें देखणें सत्य जेव्हां । निजानंदरुपींच वास्तव्य तेव्हां ॥४७॥

नसे एक ना दूसरें ज्यासी कांहीं । निजानुभवी भेदु हा सत्य नाहीं ॥ स्वयेंचि स्वयें न देखे आपणासी । तया दूसरें तें न भासेंचि शेषीं ॥४८॥

हरी सद्गुरुसी कदां भेद नाहीं । कवी बोलिले व्यासवाल्मीक तेही ॥ असा नित्य बोधू शुका नारदाला । विदेहीनृप येचि बोधीं निवाला ॥४९॥

हरी सद्गुरु संतही ऐक्यभावें । जेणें लक्षिलें आथिला तोचि दैवें ॥ आलें स्वानूभवा तेंहि तैसेंचि जालें । निजानंदरुपीं हरीसी मिळालें ॥५०॥

जगद्रूप हा सद्गुरु चित्प्रकाशे । दुजे नातळोनी अभासे निजांशें ॥ महद्-ब्रम्ह व्योमादिकें तोचि जाला । अणूरेणुही मस्तकीं तोचि ठेला ॥५१॥

जया रोमरंध्री बहु ब्रम्हगोळ । अणूमाजिं तो सांगरुपी कृपाळ ॥ समस्तांसि व्यापूनियां व्याप्य जाला । परी तो असे आपरुपीं लपाला ॥५२॥

नसे एक ना दूसरें ज्यासि कांहीं । नहोनी असे सर्वही सर्वदा ही ॥ जया रुप ना नामही सोसवेना । तया नाटकें दाविले लोक नाना ॥५३॥

असा हा तुका कौतुकी आपरुपी । नसेना असे नातुडे वागजल्पी ॥ जया लक्षितां लक्ष मध्येंचि वीरे । बहु तर्क सिध्दांत होती फरारे ॥५४॥

प्रकाशें जयाच्या दिसे सर्व कांहीं । दिसे देखतां तोचि होऊनि नाहीं ॥ असा नाटकी लाघवी सूत्रधारी । लिलाविग्रही पूर्णकामावतारी ॥५५॥

जेणें निर्मिलें त्रिदशां ब्रम्हयासी । पदीं स्थापिलें कार्य सांगोनि त्यासी ॥ महर्षी ऋषी ज्याचिया नीजमत्ता । करीती सदा यज्ञयागादि संस्था ॥५६॥

जेणें निर्मिलें सर्व संकल्पमात्रें । विकल्पेंचि नेदी उरों त्या स्वतंत्रें ॥ जयाची मती नेणती देव तीन्ही । न लक्षे कदा त्यांतरींही वसोनी ॥५७॥

दिसे दर्पणीं ते असे वेगळेची । दिसे देखतें होऊनि त्यासि तेंची ॥ तसा हा तुका सर्व लक्षानिराळा । असे दाउनी देखतां तोचि लीळा ॥५८॥

नव्हेची कदा वेगळा आपरुपा । रुपातीत हा न देखे आपआपा ॥ तयासी कसें नामरुपासि आणूं । गुणातीत त्याचे कसे गुण वाणूं ॥५९॥

अनूलक्षितां लक्ष जेथें पुरेना । नये जाणिवा जाणतां जाणवेना ॥ अनुमानदृष्टांत नाहीं जयासी । प्रमाणासि कैसेनि आणूं तयासी ॥६०॥

येथें सर्वदा मौन्य परादिकांचें । कळे रुप तकांतरां केंवि त्याचें ॥ नये जाणिवा बुध्दिच्या जाणण्यासी । जया चिंतिता चित्त नूरेचि शेषों ॥६१॥

स्वलीळाचि हा रुपआरुपधारी । करी कौतुकें नित्य जो निर्विकारी ॥ धरी वेष तोहीच नानापरींचे । परी वेगळा नातळे रुप त्याचें ॥६२॥

भवरोगिया नित्य आरोग्यकर्ता । असा हा प्रभू सर्व सामर्थ्यधर्ता ॥ जया ज्ञानवैराग्य सेवूनि राहे । महायश औदार्य ऐश्वर्य पाहे ॥६३॥

क्षमा लक्षुमी नित्य अंकीत ज्याची । पदा सेवुनी अर्चनीं नित्य अर्ची ॥ जयाच्या रुपा देखतांचीं अनंगें । तनू जाळुनी पुत्र जाला निजांगें ॥६४॥

जेणें निर्मुनी कोटिब्रम्हांडमाळा । अलिप्तचि राहोनियां त्या निराळा ॥ कशी रोमरंध्रींच पाळी ढिसाळें । नव्हे पार ऐसीं विशाळें भुगोळें ॥६५॥

असे रुपमंडीत पूर्णांश जैसा । चतुर्भज हा पाहिजे त्यासि तैसा ॥ करीं वागवीं मोहरी श्रृंग पावा । घन:श्याम हा लक्षि तूं भक्तिभावा ॥६६॥

धरीं मस्तकीं मुकुटीं मोरपीसा । असे कस्तुरी रेखिला भाळ तैसा ॥ वरी कुंडलें शोभलीं दिव्य कर्णी । विराजे गळां कौस्तुभू सर्व लेणीं ॥६७॥

असोनि असा दिव्यरुपी सदा हा । अरुपी लपेना ढळे भास तेव्हां ॥ असे भाविका सर्वदां सर्व देशी । नसे नास्तिका नास्तिवादेंचि त्यासी ॥६८॥

असे मच्छ हा कच्छ वराहरुपी । सिंह खुजा फर्शधारी प्रतापी ॥ धरी वीजयी चापपाणी विराजे । अनूजोपवेष्टीत वायोतनूजे ॥६९॥

जेणें सांडुनी भद्र सिंहासनासी । वनीं शोधिलें राक्षसांच्या मुळासी ॥ जेणें देवही बंदिचे मुक्त केले । महापातकी मुक्तिस्थानासि नेले ॥७०॥

तसाची व्रजीं गोपवत्सांसि पाळी । करी गोपिका मेळवूनी धुमाळी ॥ स्वभक्तांसि पालूनि दृष्टी निपाती । असे बौध्यरुपी न बोलोनि अंतीं ॥७१॥

पुढे वंतू । कृतायुग धर्म प्रकाशील जेव्हां । कलीदोष वरुनियां सत्य तेव्हां ॥७२॥

जया चिंतितां चित्त चैतन्य होतें । जया अर्चिता सर्व सामर्थ्य येतें ॥ जयां पाहरा पाहणें तोचि होये । जया ध्यासितां ध्येय ध्यातां राहे ॥७३॥

तमूचि जसा दीपका सन्निधानें । प्रकाशेचि होऊनि राहे समाने ॥ नसे फेडणें नेसणें त्यासी कांहीं स्वत:सिध्द नेणें उपाधीस तेही ॥७४॥

स्वदेहींच ऊर्णी जसा तंतु काढी । तयासीच खेळोनियां शीघ्र मोडी । तसा स्वामी हा विश्वविस्तार होतो । पुन्हां आपणामाजि त्या सांठवितो ॥७५॥

जसा सूर्यहा व्योमिंचा व्योमिं राहो प्रकाशे परी विश्व तो दाविताहे ॥ नियंता तसा सर्वदा आपरुपी । न भासोनी भासे तोचि तो सर्वव्यापी ॥७६॥

सुवर्णीच जाले अलंकार पाहे । परी आंतु बाहेरि सोनेंचि राहें ॥ जसा पट तंतूचि होऊनि ठेला । तसा श्रीहरी विश्व न होनि ठेला ॥७७॥

जयालागिं दूजेपणाचा अभावो । कदापि नसे नामरुपासि ठावो ॥ तेणें आपणांमाजिं हें दाखवीलें । बहू होउनी आपण रंजवीलें ॥७८॥

नव्हे एक अनेक कांहींच ऐसा । माये उपाधीक दावी तमाशा ॥ स्वयें देखुनी देखतां त्यासि रीझे । निजानंदरुपीच ऐसा विराजे ॥७९॥

विचित्राकृती मंडपीमाजिं चित्रें । बहू भासती दीपज्योति विचित्रें । परी ते दिसे दीपज्योतीच पाही । तसा एक आत्माचि हें विश्व नाहीं ॥८०॥

स्वत:सिध्दुची स्वामी माझा तुकावा । तुकातीत हा नातुळे रुपनावां । निळा नित्य सर्वातरीं त्यासि पाहे । तया चिंतनीं तोचि होऊनि राहे ॥८१॥

तमारी कधीं अंधकारासी नेणें । स्वयें स्वप्रकाशासि कैसेनि जाणें । तसा सद्गुरु देखे ना बंधनासि । स्वयें मुक्त हें केंवि मानेल त्यासी ॥८२॥

असे मुक्त तो सर्वासि देखे । जसें अमृतें नेणिजे मृत्युदु:खें ॥ तसा ज्ञानिया दृश्य जें त्यासि नेणें । स्वयें ज्ञानि मी हेंहि कैसेनि जाणे ॥८३॥

दिसे भास आधींच तो सत्य नाहीं । तया होत जातें न भासे कदाही । असा हा तुका नित्य आनंदरुपी । असे नित्य तो नित्य आपस्वरुपीं ॥८४॥

जया भेद हा नाढळे चित्प्रकाशें । अभेदीं तया कोण आस्था विशेषें । नये एक आनेक देही मनासी । निजात्माचि मी हें नुरे भान त्यासी ॥८५॥

असे सर्वदा नित्य आनंदवासी । तया विषयीं कोण गोडी विशेषीं । चकोरें जसा चंद्र अमृत चाखे । तसा तो कदा पंकतोया न तोखे ॥८६॥

जेणें भोगिलें सर्व ऐश्वर्य अंगें । तया दुर्भरत्वीं कसें चित्त रंगें । जेणें संपत्ती त्यागिली निश्चयाची । तया कोण गोडी भिके जावयाची ॥८७॥

जयाचे घरीं लक्षभांडार कोटी । करावी मजूरी केंवि हें त्यासि ऊठी । तसा रातला जो निजात्मसुखासि । कसा तो रिझे क्षुल्लका भोगण्यासि ॥८८॥

जयाचे घरीं नित्य कैवल्य नांदे । तया दु:खद्रारिदय कैचीं प्रमादें । जया जोडली संगती भास्कराची । तया घालणी केंवि घाली तमाची ॥८९॥

जेणें सर्वसंगासि सोडोनि दीलें । असंगासि चित्तासी बैसवीलें ॥ तया भेदभ्रांतीस ठावोचि नाहीं । जनी वीजनीं वर्ततां सर्वदाही ॥९०॥

जणें सद्गुरु अर्चिला ज्ञानदाता । तया भ्रांतिचा नाढळे लेश आतां ॥ जेणे अक्षयीं भक्षिले अमृतासी । कदा मृत्युवार्ता न बाधी तयासी ॥९१॥

जया वैदयराजासी देखोनि जाती । महारोग ते औषधें केंवि राहती ॥ जसा मारुती देखतांची पिशाच्या । घडे भंगणीं अंतरीं धाक त्याचा ॥९२॥

नव्हे सद्गुरु सन्मुख भेदु तैसा । तमारीपुढें लेश अंधारु जैसा । जनीं वीजनीं एक आत्माचि होयें । तरंगा जसें व्यापुनी सिंधुतोय ॥९३॥

जशा सारुपा दिसती तोयगारा । परी त्या कदा होतिना भिन्न नीरा ॥ तसें सद्गुरुस्वामी हे संतमूर्ती । अनूकार ते सस्वरुपापुवृत्ती ॥९४॥

जसा कर्पुरु कर्दळीगर्भ होये । परी व्योमिचा व्योम होऊनि ठाये ॥ तसे हे जनीं भासती जीवभेद । परी ते सदा सस्वरुपीं अभेद ॥९५॥

पर्जन्यीं असंख्यात वर्षती बिंदुधारा । परी एक वांचूनि कैंचा पसारा ॥ जसें तोय तें तोयची आदि अंतीं । तसें चित्स्वरुपीं जीव हे होती जाती ॥९६॥

जयालागिं तूं धुडिसी जीव येथें । तरी धुंडिसी कासयालागिं तीथें ॥ घरीं चुकले ठेवणें त्यां विदेशीं । कसे लाभसी चाळितां भूमिकेसी ॥९७॥

म्हणे दीपज्योती प्रकाशासि दावा । पुसे गूळ गोडी न जाणे स्वभावा ॥ जसें चोजवी व्योम स्थान रहाव्या । तसा लक्षिसी दूरी आत्मा पहाव्या ॥९८॥

 

अणूमात्र बीजीं समग्रचि जैसा । लपाला वदूं कांहीं नाहींच ऐसा ॥ जयीं अंकुरेसी निघे बाहेरी तो । तयीं नाकळे गगनचुंबीत जातो ॥११०॥

पुन्हा मोडिता बीजमात्रींच राहे । अव्यक्तीं तसें विश्व नाहींचि होये ॥ तरी व्यक्त अव्यक्त हा चेतवीता । गुरुस्वामी हा सर्व सर्वा नियंता ॥११॥

जसा अग्न काष्ठीं काष्ठ नेणेचि त्यासीं । धरी उन्नती तोचि जाळीं तयासीं ॥ मग अग्नी ना काष्ठ होऊनि राहे । तसा सद्गुरु स्वामी हा वर्तताहे ॥१२॥

तयाचे पदीं चित्त हे लीन जालें । नव्हे भिन्न त्या समरसी मिळाळें ॥ अकस्मात हा लाभ योजूनि आला । गुरु नीळयासी तुकोस्वामी जाला ॥१३॥

अनुष्ठान तें तें अहंतेसि मूळ । होऊनी पुढें मोह घालील जाळ ॥ बहुश्रूतता देउनी जाणिवेसी । नेदि आतळो सस्वरुपासुखसी ॥१४॥

बहूसाल ज्ञानें बहू जाणिवेचा । बहू स्फुंद होतो बहू मान्यतेचा ॥ कधीं पावसी शांतिसूखासी आतां । न देखोनि विश्वीं त्रिदशांचा नियंता ॥१५॥

जयाचेनिया सर्व दिसे असे ही । जयाचेनि चळे ढळे सर्व कांहीं ॥ असा अंतरींचा सखा नेणसी कां । जयाचेनिया तूंचि तूं माजि नीका ॥१६॥

जेणें वीणस्तंभा धरीलें नभासी । जळामस्तकीं थावरीलें महीसी ॥ जेणें चंद्रसूर्यादि नक्षत्रमाळा । नभीं चालवील्या असंभाव्य लीळा ॥१७॥

जयाचेनि हे प्राणअपान देहीं । सदा वर्तती चाळिती इंद्रियांही ॥ जेणें न मिळे सोडिती त्याचि वेळा । नुलंघूनि आज्ञा गती त्याचि काळा ॥१८॥

असा सर्व सत्ताधिप त्रीजगाचा । त्रिदशाजना मानवा राक्षसाचा ॥ जयावीण हें न चळे आणूरेणू । निमिष्योनिमिष्या जयाचें प्रमाणू ॥१९॥

सदा सर्वरुपी सदा सर्वव्यापी । न शीवोन सर्वांतरी पुण्यपापी ॥ जयामाजि तैसाचि होऊनि ठाके । अलिप्तपणें आपरुपींच थोके ॥ ॥२०॥

समग्रचि हा जेथिचा तेथ राहे । परी एक अंश जगा स्पर्शताहे ॥ जसा भानु हा व्योमिंचा व्योमस्थानीं । वसोनी जगा स्पर्शतो रश्मिकीर्णी ॥२१॥

जळीं हा स्थळीं काष्टिं पाषाणि आहे । सदासर्वदा जेथिचा तेथ राहे ॥ कसा लाघवी हा कळासूत्रधारी । करी नाटकें चाळि प्राचीनदोरी ॥२२॥

असे स्थावरी जंगमीं सूक्ष्मदेहीं । असे पोकळीमाजि नमीं मही ही ॥ जयावीण हे रिक्त कोठें असेना । तया नेणती भाविती लोक नाना ॥२३॥

विहारशययासनीं भोजनीं ही । वसे सवप्नतुर्यादिकाअंतरीं ही ॥ अणूरेणुव्यापी नव्हे त्या परौता । असे सर्वदा सर्वही हा निरुता ॥२४॥

अविदयांतरीं हा सुविदयांतरीं ही । महदब्रम्ह व्यापूनि हा सस्यकींही ॥ वसे उत्तमादीक अंत्येज जातीं । अनस्यूत हा जन्म जराक्षयांती ॥२५॥

बहु दाऊनी स्वर्गसंमारमाळा । जिवा भोग भोगवी प्राचीन वेळा ॥ जिहीं अर्चिलें कर्म ज्या ज्या विलासें । तया नेमिलें सुखदु:खासि तैसें ॥२६॥

असा हा जनीं वीजनीं सर्व दाता । तयासी भजे रे करी हेंचि आतां ॥ नको वीसरुं सर्वथाही तयासी । धरी अंतरीं सद्गुरु तूकयासी ॥२७॥

बरा लाभ हातासि हा आजि आला । मनीं सद्गुरु तूकया साठवीला । तयाचेनी भोजें निळा नाचताहे । तयाजनीं भोजें निळा नाचताहे । जनीं वीजनीं तोचि सर्वत्र पाहे ॥२८॥

तया वेगळें आन कांहीं दिसेला । जडोनि तया राहिला तो ढळेना । निळा स्वर्गसूखासि ही पात्र जाला । पदीं तूकयानें तया ठाव दीला ॥२९॥

मनी चिंतिलें आजि तें तें प्राप्त जालें । जुनें ठेवणें हस्तकीं सर्व दीलें । असा हा तुका सर्वदानीं उदारु । नुपेक्षी जयाचा करी अंगिकारु ॥३०॥

तया पाहिजे एक विश्वास गांठीं । अनन्यासी तो सर्वथाही न लोटी । जया बोधिलें त्या नुरे भ्रांतिलेशु । जनीं वीजनीं भेटवी त्या परेशु ॥३१॥

करी आपणासारिखें ज्यासि पाहे । चिदानंद बोधींच ठेऊनि राहे । म्हणोनि तुका हा करा साह्य आतां । निळा निश्चयो सांगताहे समस्तां ॥३२॥

नर्का तूकयासी कदा भेद मानूं । असे जीव जीवीं सदा तो समानू । नभा व्यापुनी आणुरेणु प्रकाशें । असे व्यापुनी सर्वही तो निजांशे ॥३३॥

जया अर्चिती देव तेतीस कोटी । महर्षी ऋषी तापसी मेरुपाडी । महा साधनी योग जो का दुवाडे । तोहि साधिती योगि याचेचि चाडे ॥३४॥

नका साधनें ही तुम्ही आड आणूं । पहा सर्वसाक्षी निजात्मा सुजाणू । तया पाहतां पाहणें तेचि होती । तया तोचि भासे नुरे देहस्फूर्ती ॥३५॥

न दीसेचि तो देहबुध्दी पहातां । अभेदीं दिसे तोचि तुम्हा अतौता । नसे ना दिसे देखणें त्यासि दोन्ही । तरी तो पहा तोचि त्यातें मिळोनी ॥३६॥

नुरे देखतां दीसणें ज्यासि बाप्पा । तया सद्गुरु वोळला पूर्ण कृपा । जया सर्वथा जाणिवेचा विटाळू । तया भेटला सद्गुरु हा कृपाळू ॥३७॥

नुरे भेद अभेद ऐसाचि जाला । निजानंदरुपीं सदा तो मुराला ॥ स्फुरद्रूप मी हेही नूठीच उर्मी । नव्हे सर्वसाक्षी निजात्मा निजात्मीं ॥३८॥

तयाचे पदीं नित्य कैवल्यरासी । पुढें तिष्ठती आणिमादीक दासी ॥ तेथें मुक्तिमोक्षासही कोण पूसे । जया सद्गुरु वोळला चित्प्रकाशें ॥३९॥

गुरु माऊली साउली हे अनाथा । स्नेहाळूपणें पूरवी सर्व आस्था ॥ आपत्या दिना पाजुनि प्रेमपान्हा । कशी रक्षिते अंगसंगी अभिन्ना ॥४०॥

जयाची क्रिया नित्य आनंदकारी । जयाची क्रिया सर्वदा निर्विकारी ॥ जयाची क्रिया आवडे पांडुरंगा । जयाची क्रिया भोगवी सौख्यभोगा ॥४१॥

जयाची क्रिया सत्यसंकल्प पाळी । जयाची क्रिया नित्य पर्वा दिवाळी ॥ जयाची क्रिया भाविकां सौख्यदाती । जयाची क्रिया मान्य संनीं महंतीं ॥४२॥

जयाची क्रिया अमृता जीववीती । जयाची क्रिया भास्करा भातिदाती ॥ जयाची क्रिया नीववीते मयंका । जयाची क्रिया सत्य बोधीत लोका ॥४३॥

जेणे भक्तिवीरक्तिज्ञानासि ठावों । करुनी बरा दाविला हा उपावो ॥ जेणें सत्यसनातनी वस्तु केली । अणूनि जना प्रत्यया दाखवीली ॥४४॥

असा हा तुका नित्य कैवल्यदानी । असें दावितो तत्ववाक्यें वदोनी ॥ जनीं फेडिला देह संदेह माझा । नमो ऐसीया सद्गुरु स्वामीराजा ॥४५॥

जेणें रासक्रीडामिसें गोपिकांसी । दिल सौख्य आलभ्य जें कां महर्षी ॥ जयाचा नये लेश ब्रम्हादिकांतें । तपीं साधितां नातुडे शंकरातें ॥४६॥

नव्हे काम तो भाग रतीसुखाचा । निजानंद तो वोपिला अंतरींचा । जयालागिं शूकादिकें धुंडिताती । सदा संतही अंतरीं इच्छिताती ॥४७॥

तुका सद्गुरु सर्व भोगीं विरागी । असे तेंचि होउनी त्यातेंचि भोगी । तया अर्चिती त्यासिही लाभ होतो । निळा सद्गुरु तूक्यासीच ध्यातो ॥४८॥

जयाचे मनीं तोचि अध्यास लागे । स्वयें होतस तोचि तैसा निजांगें । जसें कींटकी भुंगुटीलागिं जालें । तसें नीळया तूक्यानेंचि केलें ॥४९॥

जया पूर्ण आस्था निजात्मा पहावा । तिहीं लक्षणीं हातुका ओळखावा । जेणें पाहिलें सद्गुरु तूकयासी । तेणें पाहिलें सत्य नीजात्मयासी ॥५०॥

असे देहचतुष्टयाही निराळा । मना बुध्दिते नातळोनि स्वलीलीळा । तया पाहवें हेंचि वाटे जयासी । तेणें पहावें सद्गुरु तूक्यासी ॥५१॥

जेणें देवव्दिजांसि संतुष्‍ट केलें । जेणें यज्ञयागादिकां तोषवीलें । विबूधादिकां नित्य आनंद केला । नमो सद्गुरुच्या अशा त्या पदाला ॥५२॥

आशिर्वाद ज्याचा महालाभ देतो । निजात्मरुपा तत्क्षणीं मेळवीतो । जेणें ठेविला मस्तकीं हात पूरे । पळे मोह अंधार तो पैल मेर ॥५३॥

जेणें दीधले सौख्य तें नित्य वाढें । त्वरें तत्पदा भेटवी त्यासि कोडें । महानंद आनंद तो भोगवी त्या । जयाची कृपा पाववी सत्यसत्या ॥५४॥

जेणें पाहिलें ज्यासि कारुण्यदृष्टी । तया दाविली आत्मरुपेंचि सृष्टि । पुन्हा त्या नुरे देहसंदेह कांहीं । केलें आपणासारिखें त्यासि पाहीं ॥५५॥

हदयावकाशें परेहूनि परते । असे व्योम जें शून्य त्याही अरौतें । महाशून्य चिदांबरींचा आदित्यू । तयां भेटवीताचि आत्मा सतंतु जयाच्या प्रकाशा नसे पार लेखा । उदो अस्तु ना ग्रहणही सांज ऊखा ॥५६॥

तयाच्या प्रकाशा नसे पार लेखा । अदो अस्तु ना ग्रहणही सांज ऊखा । तया आत्मया सद्गुरु स्वामीयासी । नमस्कार माझा सदा तूकयासी ॥५७॥

जेणें बोधिला बोध मैळो शकेना । जेणें दीधला स्वानुभव तो टळेना । जेणें दीधला तोचि दृष्टीस राहे । निजात्माप्रकाशूचि सर्वत्र पाहे ॥५८॥

तया सद्गुरु स्वामीसी काय देऊं । उत्तीर्णासी काहिं न दीसे उपाऊ । मुळीं पाहतां मीहि माझें दिसेना । तया तोंचि आतां पदीं मी अभिन्ना ॥५९॥

बरी स्नान संध्या करुं देवपूजा । नसे यज्ञयागादिकीं भाव दूजा । बरा सद्गुरु सर्वरुपीं विलासे । जयामाजिं तैसाचि भासीं अभासे ॥६०॥

जया आदि ना अंत कोठचि नाहीं । नसोनी असे सर्वदा सर्व देहीं । जया पाहतां दृष्टि पूरा शकेना । अणूमाजिही लोक व्यापूनि नाना ॥६१॥

जेणे ऊटिला भानु मैळाचि नेणें । प्रकाशी जगातें स्वतजें स्वकीर्णे । जेणें ताविला अग्न हो तो निवेना । कदा उष्णता त्यागुनी तो वसेना ॥६२॥

जेणें जीवनें भरिल्या तोयराशी । पुरोनी जगा ऊरला तो विशेषीं । जेणें वोटिला मंडपू या नभाचा । नसे स्तंब ना जोर कांहींच साचा ॥६३॥

जेणें अंतरिक्षाचि नक्षत्रमाळा । कशा लोंबवील्या करीती झळाळा । जेणें सोम हा अमृताचाचि अंशी । भरिल्या कळा नीववीतो जगासी ॥६४॥

जेणें  हीमवंतु हिवाचाची केला । न तापेचि तो सीत होऊनि ठेला । जेणें पृथ्वियेसी क्षमत्वासी दिल्हे । जळामस्तकीं आचळू स्थावरीलें ॥६५॥

जेणें नीर हें काय पीळोनी केलें । नसांडी उष्ण त्या अग्निसी काय दीले ॥ जेणें सूर्य प्रकाशिला कासयानें । न लक्षेची देवामहर्षीसि ध्यानें ॥६६॥

असा स्वामी हा सर्वचातुर्यसिंधु । तया नेणती हे बुध्दिमंदु ॥ तया सद्गुरुच्या न लागोनी पाया । धाडिला जन्म केला अपाया ॥६७॥

पुढें जन्म असंख्यात व्याधी । असे मृत्यु हा नेणती पापबुध्दि । स्वयें जन्मे घेवोनि यावें । पुढें यातनेलागिं सिध्दचि ॥६८॥

महा दु:ख ते मातरोदरपंकी । वसोनी नवमास नकीं ॥ महादु:ख्‍ ते मातरोदरपंकी । वसोनी असावे नवमास नकीं ॥ महादु:ख ते जन्मकाळीं जिवाते । निर्गती नाचले युक्ति तेथें ॥६९॥

असे लक्षचौया शिचा होत फेरा । तरी नेणवे भाग्यमंदा गव्हा । तुका सद्गुरु सिध्द सांडोनि एैसे । भवे भोगिती निळा नवेचि कैंसे ॥७०॥

जया सद्गुरु नीज वाक्याचिं सवें स्वयें तत्पदा जाऊनिया मिळावे । असा तो सखा दूरि नाहींच कोठें । जया पाहसि त्यांतरीं तोचि भेटो ॥७१॥

जया एक ना दूसरें स्थान नाहीं । सदा सर्वदा सर्व अंतर्वबाहीं ॥ अशा सद्गुरु तुकया शरण जा रे । होसि तूंचि तूं सर्वव्यापी तसारे ॥७२॥

न लागें तुतें योगयाग वासवें । आहेसि जसा असोनि तेंचि व्हावे । न लागें तुते भोगणें त्यागणेंहि । न लागे दुरी गम्य देशांतराही ॥७३॥

असा सूगमु पंथ या तूकयाचा । नव्हेची कदा आदरु साधनाचा ॥ जयामाजि तैसेचि होऊनि जावें । तया बोधितां सर्व होईल ठावे ॥७४॥

नसे दक्षणा पूजनाचि अपेक्षा । जया सर्व पदार्थ जाति उपेक्षा ॥ न घेऊनि कांहींच ऐश्वर्य देतो । स्वयें आपणासारिखे त्यां करीतो ॥७५॥

जयाच्या आनंदासि नाहीं समाप्ती । सदा सर्वदा डुल्लत जो अनार्ती ॥ जया एक मी दूसरें हें उरेना । जयामाजि तैसाच होऊनि नाना ॥७६॥

असे बैसला तेथुनी सर्व देशा । असे पूरला वायु सर्वत्र तैसा ॥ जया दूसरे भोग्य कांहीं दिसेना । स्वयें भोग्यभोक्ता ही देहीं असेला ॥७७॥

जया सद्रुरु पूर्ण कारुण्यदृष्टि । असे वोळला तोचि सभाग्य सृष्टी ॥ तयां जन्मजन्मांतरां येत जातां । अशंकाचि नाहीं जसी स्वप्नवस्था ॥७८॥

तया होऊनि जन्म ठावाचि नाहीं । असे कीं नसे नाठवे हेंहि कांहीं ॥ जया येतजातां नसे जन्मखंती । असे तूंचि आसे स्वरुनानुवृत्ती ॥७९॥

अशा सद्गुरुच्या कृपावैभवानें । वरीला जसा सूर्य प्रकाशकीर्णे । समाधान चित्ता सदासर्वदाही । तया काय व्हावें कदा भान नाहि ॥८०॥

स्वसुखासुखासीं लिगटोनि ठेला । सदा अंतरीं बाहेरीं तो निवाला ॥ नेणें मस्यका आदि ब्रम्हदिकांसी । समत्वचि पाहे न मानी विशेषीं ॥८१॥

नव्हे इंद्रच्रद्रादिकां लाग जेथें । तया पावला तत्पदालागिं तेथें ॥ जेथें जाणणें नेणणें हें असेना । तयामाजि तेंचि दुजें ऊससेना ॥८२॥

नसे मीच येथें सर्व मिथ्यैव पाहीं । असे मीचि हें सर्व जाणोनि पाही ॥ असे निश्चयें सद्गुरुचेनि मूखें । घरी एक पक्षास राही सवसूखें ॥८३॥

जरी सर्वही तूंचि जालासि बापा । तरी भूतभेदा नयेची विकल्पा ॥ जरी नोहुनी कांहीचि हेंचि ठासी । तरी तूं तया पावसी सत्सुखासी ॥८४॥

असें बोलिलों सद्गुरुच्या  निरोपें । नसे चावळलों कदा वागजल्पें ॥ बरें अंतरीं हें विचारुनि पाहे । असत्यासि रीझों नको सांग ते स्वर्गिचे नावडती । गुरुसेवनीं त्या अनूराग चित्तीं ॥९५॥

जिहीं मर्दिले कामक्रोधादिकांसी । अहंभाव निर्दाळिला निश्चयेसी ॥ जिहीं व्देष्निंदेसिही नीवटीलें । प्रतिष्टादि दंभादिकां बोळवीलें ॥९६॥

मनी एक तो ठेविला नित्य बोधु । जिहीं तोडिला सर्व आशासमंधु ॥ सदा दास्य या आर्चिले सद्गुरुचें । जिवीं ध्याउनी सर्वदा रुप त्याचें ॥९७॥

गुरुचे पदीं निश्चयो नित्या ज्याचा । तयाचे घरीं दास मी सत्य साचा ॥ असें श्रीहरी गूज सांगे रमेसी । म्हणे मी वसे सर्वदा त्याचिपासीं ॥९८॥

म्हणोनि निळा सद्गुरुच्या पदासीं । जडोनीच ठेला नव्हे भिन्न त्यासीं ॥ सदासर्वदा तूकयाचेंचि ध्यान । नव्हे विसरु नाठवे देहभान ॥९९॥

असे दुरि जें कां दिगंता परौतें । तया चिंतितां तेंचि हें चित्त होतें ॥ म्हणोनि तुका सद्गुरु हाचि ध्यायीं । तया पावसी सत्य याची उपायीं ॥२००॥

जसा रावणें व्देषिला राम चित्तीं । समरीं स्वयें राम झाला देहांतीं ॥ तसाचि स्वयें कंसही कृष्ण जाला । मनीं ध्यासितां तोचि होवोनि ठेला ॥१॥

जसी कीटकी भुंगृटीलागि पाही । भयें चिंतिता तेचि जाली स्वदेहीं ॥ म्हणोनि भला हाचि अभ्यासयोगू । नसे घातु येथें करी लाभ चांगू ॥२॥

निळा पावला सद्गुरुतूकयासी । मनीं निश्चये आठवीतां तयासी ॥ वसे लोचनीं मानसीं तोचि आतां । जिवीं जाला नहोनी परौता ॥३॥

धरीतां मनीं वाक्य या सद्गुरुचे । निळा लाधला सौख्य त्याचे कृपेचें ॥ जनीं वीजनीं एक आत्माचि देखे । न मानी दुजे खंडज्ञानें न तोखें ॥४॥

बहू मतमतांतरें काय होये । थिता भाव तोही दुहावोनि जाये । तसे तर्कसिध्दांतही त्याचिपरी । जयें साधनें वाहवीताति दूरी ॥५॥

नव्हे अक्षरं घोकितां सौख्यलेशू । करी दंभ माना प्रतिष्ठे प्रवेशू । तपें मंत्रयत्रादि ऊपासनाही । बहु देखणी लोटिती ते प्रवाहीं ॥६॥

जरी आसनें नित्य एकांतवासी । करी प्राण अपान नीरोधनासी । त्याजूनी रसा सेविती कंदमूळें द तरी आत्मप्राप्तीसी ते ते निराळे ॥७॥

तयालागिं त्यांचा नको वीट आला । मनीं आठवूं सद्गुरु तूकयाला । जयाचेनि वाक्यें तत्पदेसींच भेटी । न लागें कदा सांडिमांडी अटाटी ॥८॥

निळा जाणोनी एक त्यांतें न मानी । धरिलें जिवीं ऐकिलें तेंची कानीं । जसें बोधिले सद्गुरु तूक्यानें । असें सर्व मीचि त्यजी खंडज्ञानें ॥९॥

बरे तर्कवीतर्क ते दूर केले । कृपासागरें भेदभ्रांतीस नेलें । निजात्मपदीं स्थापिले नीळयासी । तुका सद्गुरु वोळलाही तयासी ॥१०॥

होतें गौप्य तें गुह्य भांडार दीलें । पदीं बैसवूनि पदायोग्य केले । नव्हें वीसरु आठवू सत्य त्याचा । असा बोधिला बोध त्यासी सुखाचा ॥११॥

जया भोगितां तृप्तिसी भूक लागे । पहावेची वाटें पहाणें न भागे । असे सर्वदा तेंचि कोंदोनि ठेलें । असे अंतरी बाहेरी तेंचि जालें ॥१२॥

नये सांगतां रुप त्याचें कदाहि । कशासारिखें त्यांसि दृष्टांत नाहीं । तया देखतां तोचि व्हावे निजांगे । जसे रश्मिकीर्णचि ते सूर्य अंगे ॥१३॥

नसे भेद अभेद ते केवि दावूं । जयालागिं दूजेपणाचा अभावू । नव्हें जाण्‍ जें कां स्वयें आपणासी । तया दूसरें कोण जाणेल त्यासी ॥१४॥

असें आंत बाहेरी त्यांते न देखे । जशी शर्करा गोडियेते न चाखे ॥ तसें तोचि तें जाण ना नेण ऐसें । नसोनी असे तेंचि होऊनि तैसे ॥१५॥

धरी नाम आनाम त्याची मिरासी । धरी रुप आरुप जो चिव्दिलासी ॥ धरी सर्व सामर्थ्य कांहीं नहोनि । धरी लोक आनेक त्या नातळोनि ॥१६॥

दिस दाखवी जो निजांगें अकती । भरी कीर्तीचे पुंज सर्वा विवर्ता ॥ जेणें निर्मुनी लोकलोकांतरासी । असोनी स्वयें नित्य तोही उदासी ॥१७॥

जया पाहतां नातळे लोचनातें । जया धुंडिता नाकळें जो मनांतें ॥ नव्हे जो कदा दृश्य द्रष्टा निजांगें । जया नेणिेजे जाणिवेच्या प्रसंगे ॥१८॥

जया आवडे भक्ति ते भाविकांची । जया नावडे भक्ति ते भाविकांची । जया नावडे जाणिवा जाणिवेची ॥ नव्हे जो कदा साधनाही अपैता ॥१९॥

असा हा तुका सद्गुरुस्वामी माझा । जेणें कीर्तिच्या ऊमिल्या दिव्य भूजा ॥ जया लक्षितां दृष्टी ही त्या पुरेना । तरी पाहतां तृप्तिही वोसरेना ॥२०॥

घन:श्याम हा नूतनू नित्य भासे । असे जो जिवीं तोचि बाहेरि दीसे ॥ असे सर्वदा सर्वव्यापी अरुपी । स्वयें स्फूर्तितें स्फूर्ति तोचि आरोपी ॥२१॥

असे दूरी ना अंतरीं जोचि ऐसा । निळा चिंतोनी योजिला तोहि तैसा । तया सद्गुरुच्या नमो पादना । जसा भास्करीं उत्सवु तोपधनया ॥२२॥

नमीतां तया ठाव नूरेचि रीता । वसे अंतरीं मीही तया अतौता ॥ निजांगें निळा तोचि होऊनि ठेला । तया आठवी तोचि होउुनि गेला ॥२३॥

नमीतां नमण्यासि कोंठेंचि नाहीं । तया तोचि नहोनिया भिन्न कांही । निळा कीं तुका भेद ऊरेल कैंचा । तुका ना निळा आदि ना अंत याचा ॥२४॥

जया चिंतितां चित्त चैतन्य जाले । जयां लक्षितां लक्ष लागोनि गेले ॥ जया ध्यासितां ध्यान ही मिचि जालों । पदा लागतां पादपन्धीं विराला ॥२५॥

नये सांगतां दावितां रुप त्याचें । नये ऊपमे तूकया तूक कैंचे ॥ निघे शब्द तो शब्द त्याही अरौता । दिसे दृश्य अदृश्य त्याही परौता ॥२६॥

असा सद्गुरु हा तुकोस्वामी माझा । नसे साम्य तें पाहतां त्यासि दूजा ॥ तयाचे पदीं रंगला नित्य नीळा । तदाकारता पावला तो स्वलीळा ॥२७॥

असे शक्ति चक्राहुनी या परौता । स्वलीळाचि वर्ते करुनी अकर्ती ॥ जया नूमसें मीं हें माझें कदाही । अरुपी रुपातीत तो सर्वदा ही ॥२८॥

निळा रक्षिला नित्य सेवानुवृत्ती । अशिर्वाद देऊनियां दिव्य स्फूर्ती ॥ हरीनाम गाऊनीया गूण वाचे । असे चिंतनीं सदगरु तूकयाचे ॥२९॥

नये जाणतां जाणण्याही निराळा । न दीसे कदा लक्षितां चर्मडोळा ॥ नये ऐकतां देखतां स्पश्रतांही । नसोनि असे सर्व अतर्यबाहयीं ॥३०॥

असे व्यापुनी सर्व आकाश जैसें । परी नातळे स्पर्शले त्यासि तैसें ॥ असे नाहिंसा सर्व अंतर्यबाहयीं तसा सद्गुरु व्यापकू सवे कांहीं ॥३१॥

नसे वणे व्यक्ती परी सुंदरु तो । बहू दाउनी रंजवी जीववी तो ॥ परी आपरुपा समानूचि राहे । अनूमान दृष्टांत तोही न साहे ॥३२॥

नव्हे रक्त ना श्वेत ही पीतवर्ण । हरी ततुं नव्हे जांबळा नीळ कृष्ण ॥ तया कासियसारिखें हो म्हणावें । अरुप रुपातित जो कां स्वभावें ॥३३॥

नयेना कदा जाइना दूरी कोठें । जयामाजिं तैसाचि भासोनि भेटे ॥ असा सन्निधीं ना दिगंतीं दिसेना । असोनि नसे लोक व्यापूनि नाना ॥३४॥

नसे दर्पणीं मूख दीसे खरेंसे । खरें देखेना आपणालागिं जैसें ॥ तसें दृश्य दाऊनियां वेगळेची । न दीसे स्वयें तेंचि तें आपणासी ॥३५॥

स्वसंवेदय हेंही असे बध्दगांठी । असे अमृतू अमृतातें न घोटी ॥ स्वयें अग्न तो जाळिना आपणातें । रवीतें रवी न देखोनीच वर्ते ॥३६॥

खरें तें खरें नेणिजे ते अविदया । रिझेना असत्या ते जाणा सुविदया ॥ जसा नूगवे भानु त्या नांव राती । उदेला घडे दीवसूची गभस्ति ॥३७॥

नसें वंदिलें सद्गुरुच्या पदासी । उणें काय अज्ञान अज्ञा नराशी ॥ असें जाणुनी आठवी नित्य त्याला । निळा चिंतनीं चिंतितु तूकयाला ॥३८॥

गुरु बोलिजें ते गिरी पर्वतासी । लघू ते हळू भार नाहीं जयासी ॥  तसा हा नव्हे सद्गुरु स्वामी माझा । हळू जाडय नाहीं समाजीं समाजा ॥३९॥

तयाचेनी बोधें निळा मग्न राहे । तयामाजिं तैसाची होऊनि पाहे ॥ जनीं वीजनीं तोचि देखे तयासी । निळाही तसा त्याचिया सामरसीं ॥४०॥

नसे मी येथें सर्वही तोचि जाला । जयामाजिं तैसाचि होऊनि ठेला ॥ दिसे देखतां तोचि त्यांते निजागें । तयामाजि मी तोचि तेणें प्रसंगें ॥४१॥

न भावीतही जाणिवे तोचि येतो ।न चिंती तरी चिंतनीं तोचि राहतो ॥ असे मानसीं चित्त चैतन्य प्राणीं । रसस्वादनीं लोचनीं तोचि घ्राणीं ॥४२॥

त्वचाश्रोत्रही तोचि होऊनि ठेला । जिवीं जीव व्यापूनिही इंद्रियांला ॥ जसी क्षारता सिंधुतोयींच राहे । परी मेघमूखेंचि तें गोड होये ॥४३॥

प्रपंतू तसा सद्गुरुचेनि मूखें । परब्रहम बोधेचि होऊनि ठाके ॥ नसे मी असे तोची तो सर्व कांहीं । घटत्व जसें मृत्तिकेमाजि नाहीं ॥४४॥

दिसे दृश्य तें दृश्य माझया विकल्पें । स्वयें सत्य मी मिथ्य माया आरोपे ॥ माया उपाधीक शीवतव शीवा । अविदया उपाधीक जीवत्व जीवा ॥४५॥

मायाअविदयाउपाधिनिरासी । स्वत: सिध्द आत्माचि तो चिव्दिलासी ॥ जरी सर्व आत्माचि बोधसि आला । प्रपंचु तरी ऐक्यभावें निमाला ॥४६॥

म्हणें दृश्य द्रष्टा नव्हे मी निजांगें । असें मूळिंचा मूळ निर्मीत सोंगें ॥ घटाकाश जैसे मठाकाश भासे । उपाधी निमित्तचि तें भिन्न दीमे ॥४७॥

परी मुख्य आकाश तें तेंचि पाहीं । उपाधिविनाशें न भंगेंची कांहि ॥ अंळकार होऊनिया मुख्य सोनें । नव्हे भिन्न त्या वीकतां मोलमाने ॥४८॥

तसें विश्व हें एक आत्माचि जाला । तयामाजिं मी तोचि होऊनि ठेला ॥ हमणोनि धरा पाय त्या सद्गुरुचें । मनीं ध्याउनी स्वामीया तूकयाचें ॥४९॥

नव्हे आजिचा कालचा नूतनु मी । नसे रुप आरुप नामीं अनामीं ॥ असे तें नये दावितांही दिसेना । नये सांगतां शब्द पूरों शकेना ॥५०॥

असे बोधिले सद्गुरुतुकयानें । निजानंद देऊनिया थोर मानें ॥ निळा त्या सुखें तोचि होऊनी ठेला । पदीं सद्गुरुचे विरोनीच गेला ॥५१॥

पुढारोनियां भक्त कारुण्यसिंधु । करें स्पर्शलें मस्तका दीनबंधु ॥ तयाचाचि नेणों फळोददेश जाला । सबाह्यांतरीं तोचि कोंदोनि ठेला ॥५२॥

दिसे अंतरी बाहेरी सर्व तोचि । जनीं वीजनीं ठाव रीता नुरेची ॥ जिवीं जीव जाला शिवीं शीव जाला । देहीं देह होवोनियां तोचि ठेला ॥५३॥

अळंकार जैसें सुवर्णचि जाले । परी सांडुनी त्यासि नाहींच गेले ॥ तसा तोचि तो सर्व अतर्यबाहयीं । निळा नामरुपासि ठावचि नाहीं ॥५४॥

उठी सागरीं लाअ आनंत कोटी । परी जीवनूची तया पाठिपोटीं ॥ तसा तोचि तो व्यापितां व्याप्य जाला । निळा आपणा भिन्न नाहींच केला ॥५५॥

मुळीं तंतु एकचि आनंत पव्द । जरी भासलें त्यांतरी तोचि स्पटु ॥ जसी मृत्तिका तेचि पात्रें  अमूपें । तसा तोचि तो मी वृथा आपरुपें ॥५६॥

असा नाटकी तोचि विस्तारलासे । जनीं वीजनीं तोचि होऊनि भासे ॥ बहु लोक आनंत ब्रहमांडमाळा । निजांश दाऊनियां तयानिराळा ॥५७॥

असा सर्वव्यापी परी त्या अनन्या । प्रत्यक्षचि फेडोनियां भ्रांतिदैन्या ॥ जसा चातकाकलागिं आकाशबिंदू । मुखी वर्षोनि फेडि =तृरूाासमंधू ॥५८॥

जया देखतां अंतरीं आर्त जैसें । तयालागिं तैसेचि होणें निजांशे ॥ जसी व्याघ्रिणी स्नेहें वत्सासी पाळी । दुजें देखता भक्षूं धावें कराळी ॥५९॥

तया तो नसे आपुलें कीं परावें । परी पावती लोक संकल्पभावें ॥ वरी प्रेमळा भेटि येऊनि देणें । तसें नास्तिका नाहीं ऐसेंचि होणें ॥६०॥

दिसे दर्पणीं मूख ज्याचें जसें त्यासि तैसेंचि दावी । बरें वोखटें त्यासि तैसेंचि भावी ॥६१॥

तसा जो जनीं वीजनींही पहातां । जयालागिं तैसाचि ती विश्वभती ॥ तया देखिेलें सत्य जें मानिताती । तिही देखिली दृश्यमायीक भ्रांती ॥६२॥

जसा भक्त प्रल्हाद अंकीं धरावा । तेणेंचि रुपें दैत्य चीरोनि घ्यावा ॥ असे भावना ज्यांतरीं त्यासि तैसा । उपाधीवरी स्फटिकभास जैसा ॥६३॥

महदब्रहम कोटी रोमरंध्रींच थारा । असा तो प्रभू आणुमाजीं पसारा ॥ नये लक्षितां रुप कोणासी कैसें । विबुध्दादिकां ब्रहमयाही न भासे ॥६४॥

न दिसे कदा तोचि सर्वत्र देखे । न ऐके तरी सर्वही तोचि ऐके ॥ नव्हे दृश्य अदृश्य तोचि सर्वासि भेटे । नये चाखतां जेवितां तोचि घोटे ॥६५॥

असे अंतरी काय त्यासी आणावें । न दीसेचि त्यातें कसें जी पहावें ॥ नसे स्थान त्या भेटिसी कोठें जाऊं । न ये जाइना त्या भवंडूं केवि ठेवूं ॥६६॥

न बोलेचि त्यातें कसें जी पहावें ॥ नसे स्थान त्या भेटिसी कोठें जाऊं । न ये जाइना त्या भवंडूं केवि ठेवूं ॥६६॥

न बोलेचि त्यातें कसें बोलवावें । न लक्षेचि त्यातें कसें ऐकवावें ॥ न पाहेचि त्यातें कसें काय दावूं । न घेची तया काय कैसेंनि देऊं ॥६७॥

न जायेची त्यातें कसें बोळवीजे । न खायेची त्यातें कसें जेववीजे ॥ नसेना असे केवि त्यातें पहावे । नसे अंग त्या काय म्यां लेववावें ॥६८॥

न लक्षेचि घाला भुकेला कदाही । असे जागतू कीं निजेला स्वदेहीं ॥ घरीं कीं दुरी कोण जाणेल कैसा । जुना कीं नवा नित्य अनित्य ऐसा ॥६९॥

असे निर्जिवू सजिवू हें कळेना । असे कीं नसे पाहतांही दिसेना ॥ उभा बैसला कीं निजेला न लक्षे । तया काय कीजेचि पक्षे अपेक्षे ॥७०॥

नये सागरा कोठेंही सांठवीतां । नये व्योम हें न्यावया ठाव रीता ॥ नये थांवरीतां मही आन ठायीं । तसा आत्म राजूचि सर्वत्र पाही ॥७१॥

नलक्ष जया पाहतां लोचनातें । नये ऐकतां केवि ऐको तयातें ॥ नये स्पर्शतां काय स्पर्शोनि घेऊं । नव्हे भिन्न त्या भेटिसी केवि जाऊं ॥७२॥

नव्हे जो कदा आपुला ना परावा । नसेना असे व्याप्य अव्याप्य जीवा ॥ जया भेद अभेद लागो शकेना । तया केंवि घेऊं त्यागितां त्यागवेना ॥७३॥

नये त्यागितां ना धरीतां कदाही । वसे सर्व व्यापूनियां सर्व ठायीं ॥ असा हा तुका काय तूकूं तयासी । तुकातीत तो तोचि तूके तयासी ॥७४॥

निळा राहिला नित्य चिंतूनि त्यातें । नसे विसरु तो निजांगचि वर्ते ॥ असे जो सदा दूसरें ग्रासुनियां । स्वयें ग्रासुनी जो असे आपणींया ॥७५॥

नसे अंत ना पार ज्याच्या रुपातें । असे कीं नसे नाठवे हेंही जयाते ॥ घरीं कीं दुरी मी स्वदेशीं विदेशीं । कदा देखेना जन्ममृत्यूजरेसी ॥७६॥

असें वेचलों कीं नसे संचलों मी । न जाणें कदा कोठील कोण तो मी ॥ आलों मी पुढें जाइन हेंहि नेणे । तया जाणती त्यासि तैसची होणें ॥७७॥

नुठी वृत्ति मी जाणतां हेंही ज्यासी । स्वयें नेणतां हेंही नूरेची शेषीं ॥ तोहि सद्गुरु तुक्यासी मिळाला । रवी कीर्ण तैसाचि होवोनी ठेला ॥७८॥

स्वयें जाणण्यानेणण्यातील जाला । अकस्मात तैसाचि होऊनि ठेला ॥ जसा शर्करें गोडीयेसी समंधू । तरंगाजळा भिन्न नोव्हेचि सिंधू ॥७९॥

नव्हे भिन्न मी काय चिंतू तयासी । न्याहाळी कसा दर्पणु दर्पणासी ॥ जसा देखेना भास्करु भास्करातें । निळा तुकया चिंतितां तेविं होतें ॥८०॥

तरी तोचि मी मीही तोचि स्वभावें । तरी वेगळें नूरिजे रुप नांदें । प्रभा भातु हे नांवेंचि भिन्न जाली । परी ते सदा एक एकींच ठेली ॥८१॥

स्वयें दृश्य द्रष्टाचि तो एक आंगें । जसी वामसव्यें निजांगीं निजांगें । नव्हे नरनारायणा भेद कांहीं । स्वयें एकुची भिन्न दावूनी देही ॥८२॥

प्रभा भास्करु जेविं दोनी नहोनी । तसे सद्गुरु शिष्य ऐक्या मिळोनी । जगद्रूप जनार्दनू हा स्वभावें । स्वयें तोचि तो दाउनी दोनीं स्वरुपें । अळंकार भासे परी तें सुवर्ण । नये भिन्न दोनीं स्वरुपें । अळंकार भासे परी तें सुवर्ण । नये भिन्न भेदातित एकवर्ण ॥८४॥

स्वयें भास्करु जेवि नेणें तमातें । तमूही तसा देखेना भास्करातें । तसे संतही सद्रुपीं ते अभिन्न । असत नोहती त्यांतरी ही मिळोन ॥८५॥

जसी ते निशी भेटता भास्कराशीं । तमा वीसरोनी मिळे त्या प्रकाशी । नुरे काळिमा लेश अंधार कोठें । स्वयें होउनी तोचि त्यासीच भेटे ॥८६॥

कटुत्वासी सांडूनीया सेंद जैसी । परीपक्क ते पावली गोडियासी । जसा शर्करा इक्षूदंडूची जाला । स्वयें नामरुपासी त्यागूनी ठेला ॥८७॥

निळाही तसा चिंतिता तूकयासी । स्वयें तोचि जाला मिळोनी तयासी । जसें सिंधु तोयेची तें मीठ जालें । पुन्हा मीळतां तोय होऊनी ठेले  ॥८८॥

बहु चित्र दाऊनीया एकि भिंति ही मृत्तिकेचीच जाली । पुन्हा मृत्तिका भिंतिलोपें मिळाली ॥८९॥

तसा हा तुका दाउनी नामरुपें । स्वयें आपणामाजिं आपस्वरुपें । निळा ही तुका व्दैकतभावा निरासी । स्वयें मीळणी मीळती सामरसीं ॥९०॥

जसा वन्हि मीळोनिया कर्पुरातें । स्वयें नूरवी आपणां ना तयातें ॥ तसें मीळतां सद्गुरु तुकयासी । दुजे हारवूनी निजात्मेसि ग्रासी ॥९१॥

नव्हे कांहिंच त्यासि कैसें पहावें । उपाधीनिमित्तची त्या ओळखावें ॥ उपाधीनिरासीं तेहि नाहींच होये । नये जाणतां जाणिवेच्या उपाये ॥९२॥

म्हणोनी बरे ओळखा तूकयासी । असें अंतरीं बाहेरी तो तुम्हासी ॥ न दीसे तरी तोचि तो सर्व आहे । तया लक्षूनी तोचि होऊनी राहे ॥९३॥

महा पंचभूतां भौतिकांहि निराहा । असे चेष्टऊनी सर्व विचित्र लीला ॥ करी दाखवीहि परी तो अकर्ता । असे शाक्तत्रयां निर्मुनी ही नियंता ॥९४॥

तया नेणतां भोगिजे मूढ योनी । असंख्यात त्या दु:ख शोकाभिदानी ॥ तरी लागवेगे धरा पाय त्याचे । मनीं चिंतुनी सद्गुरुतूकयाचें ॥९५॥

निळा सांगतो सर्वदा हेंचि सर्वा । नका अंतरु या सुखानंददैवा ॥ जये वेंचला तो क्षणू पूढती हा । हरुनी अयुष्या विटंबील देहा ॥९६॥

न मानी तयां भोगणें तें न चूके । पुढें यातना योनिव्दारें अनेके ॥ न दीसे उपाव अशा दु:खजाती । हाति प्राप्त तेव्हां यातनाची अवर्ती ॥९७॥

निर्षिध्दचि त्या शुध्द कोणा म्हणावें । कसें विष्‍ तें अमृतासी तुकावें ॥ अधमींच तो केवि मीळे स्वधर्मी । महामूढ तो केवि पावेल आत्मा ॥९८॥

म्हणोनी असें निंदय तें तें त्यजावें । तया संगती संगदोषें लिपावे ॥ जरी जोडली संगती सज्जनाची । तरी पाविजे संपदा सत्सुखाची ॥९९॥

तरी आठवू पाय त्या सद्गुरुचे । जयाच्या कृपें पाविजे सौख्य साचें ॥ जेणें तोडिला मोहसंदेह फांसा । दिला बोध चित्ता न मिळेचि ऐसा ॥३00॥

तया चिंतीतां चित्त नाहींच होतें । उरी ही पुढें ठेविना आठवातें असा सर्व होऊनियां तोचि ठाके । नुरे आपणू नूरऊनी अनेके ॥१॥

असें आठवी नाठवी जो समानू । स्वयें नूरऊनीं ज्ञानअज्ञानभानू ॥ तयाच्या पदा वंदिताची स्वलीळा तदाकारता पावला नित्य नीळा ॥२॥

प्रतीबिंब बिबांहुनी दूरिकैंचें । अभासें परी तेंचि स्वरुप त्याचें ॥ उपाधीच ते भास आभास दावी । सहस्त्रांघटीं नातळोनी स्वभावीं ॥३॥

जिये वस्तुचा गुणस्वभाव जैसा । अनादी असे तोचि आलोडु तैसा ॥ असे अंगिची साउली मिळा जैसी । नव्हे सारितां दूरि ज्याची तयासी ॥४॥

स्वभावें जयाचा तेंचि अध्यात्म त्याचें । न सूटे जसे साकरे येचे ॥ सुगंधु जसा कस्तुरीतें न सोडी । तसा हा तुका भ्रातिदैन्यासि फेडी ॥५॥

तसा इश्वरु नामरुपासि नेणे । प्रकाशी परी विश्वआभासि कीणें ॥ दिसावे जगें हा स्वभावोचि त्याचा । जसा दाहकू गुण हूताशनाचा ॥६॥

उदेला तसा होय मार्तंड तूका । जयाच्या प्रकाशें नुरेची अशंका ॥ करी आपणसारिखेची अनन्य । महाराज हा सद्गुरु धन्य धन्य ॥७॥

तयाचे पदीं सर्व विश्रांत जोडो मनीं आठवीतां महासौख्य वाढे ॥ ककसा पावला आतवीतां त्वरेसी । विसावोनि ठेला हदयावकाशीं ॥८॥

असो जाणता हा सखा अंतरींचा । कळें अंतर्गुह्यार्थ जैसा जयाचा ॥ करी पूर्ण राहोचि नेदी अशंका द न पूसे तरि देखतां भाव नीका ॥९॥

मनीं चिंतता मूर्ति या सदागुरुची । करी भाविका आपणांसारिखेची ॥ तया भिन्न ते सर्वथा ऊरवीना । निजानंद भोगूनि राखे अभिन्ना ॥१०॥

दयाशांतिचा पूर्णसिंधूचि जैसा । भरोनी असे आर्तिकालागिं तैसा ॥ बरा देउनी बोध त्या अंतरींचा । निजानंदरुपींच रक्षीत साचा ॥११॥

पहा नीळयालागिं प्रसन्न जाला । अकस्मात येऊनियां बोध केला ॥ जसें सिध्द दत्तात्रयें येउनीयां । दिलें तत्व जनार्दना बोधुनियां ॥१२॥

बअरा साधला सर्व हीतार्थ आतां । तुकोस्वामीचा हा आशीर्वाद होता ॥ निजानंदसुखसिची पात्र केला । निहा सद्गुरुस्वामीनीं गौरविला ॥१३॥

नेणो काय सुकृत होतें निजाचें । होतें जोडिलें जन्मजन्मांतरींचें ॥ फळोदेश हे दयावया तेचि आले । तुकोस्वामीच्या दर्शना योग्य केलें ॥१४॥

मी तो नेणतें नेणतां हीत कांहीं । होतों वाहवीलों दु:ख चिंताप्रवाहीं ॥ उदासील होवोनियां जीव देतां । अकसमात हा पातला प्राणदाता ॥१५॥

त्वरें येऊनीयां समाधान केलें । धरुनी करीं हदया मेळवीलें ॥ निज मसतकीं हात ठेऊनि तेव्हां । कला तत्वबोधीं क्षणेंचि रिघावा ॥१६॥

निजांकीं निळा बैसवोनि कृपेनें । नि:संदेह केला बहुता रितीनें ॥ आशिर्वाद देवोनियां स्थापियेला । जनीं वीजनीं ऐक्यते पाववीला ॥१७॥

महासौख्य तें अंतरीं गौप्य होतें । प्रकाशून तें प्राप्त केलें दिनातें ॥ निळा तेंचि पावोनियां तृप्त जाला । गुरुस्वांमिनी तो पदीं स्थापियेला ॥१८॥

स्तवीतां तया न चले वैखरीचें । जया रुप ना नामही सत्य साचें ॥ अरुनचि हा प्रगटूनी स्वरुपा । निळा बोलिला पूर्ण प्रतापकृपा ॥१९॥

जयाची मती नेणती वेद चारी । बहु शास्त्र सिध्दांतही ऐल मेरीं ॥ ऋषीही बहुमतमतांतरेंसी । पहाती परी नेणवें हा तयांसी ॥२०॥

महदभाग्य हें आजि ऊदीत जालें । गुरुस्वामीनीं सत्कृपें क्षेम दीलें ॥ बरा बोधुनी वोध चित्तासि केला । निळा संतजनाप्रति नीरवीला ॥२१॥

कृपाळूपणें सत्य कारुण्यसिंधु । निळा स्थापिला देउनी नित्य बोधु ॥ हदयस्थ त्या काय म्यां वीनवावें । पदीं स्थपिलें काय उत्तीर्ण व्हावें ॥२२॥

पदीं रंगलों सर्वदा सदगरुचें । महाराज या स्वामीया तूक्याचे ॥ जेणें नेत्र दिव्यांजनें सोज्वळीलें । रुपा आपुल्या देखण्या योग्य केलें ॥२३॥

नये जो कदा दृश्यभावास्वरुपा । तेणें दाविलें आपणालागि कृपा ॥ निळा भेटूनी तत्वसिध्दांत दीला । पदीं सथापुनियां पदा योग्य केला ॥२४॥

भवसागराचा सदा हा उतारु । करी पार ज्याचा करी अंगिकारु ॥ नेदी अंगअंगुष्ठ भीजोचि कोठें । महाकूशलू हा करी पार नेटें ॥२५॥

जयाचेनियां आत्मतत्वींच भेटी । जयाचेनियां ससवरुपेंचि पुष्टी ॥ जयाचेनियां मोहअंधार फीट । जयाचेनि हा कामसंकल्प तूटे ॥२६॥

मनीं चिंतनीं ध्याउनी तूकयासी । निळा नित्य नीमग्न जाला तयासि ॥ असा त्याचिये आठवींची विराला । अकसमात त्यातेंचि पावोनि ठेला ॥२७॥

बहुनीजनिष्ठे अर्चुनी सद्गुरुसी । निळा हेंचि प्रार्थूनि मागे तयासी ॥ म्हणे हदयीं माझिये त्वां बसावें । सदा नामसंकीर्तनीं प्रेम दयावें ॥२८॥

करुनी कृपा बोधुनी हेंचि दिलें । होतें अंतरीं आर्त प्रविष्ठ जालें ॥ निळा ऐकतां नीज वाक्या निवाला । पदां वंदुनीयां सुखाचाचि जाला ॥२९॥

म्हणे धन्य हो धन्य स्वामी कृपाळा । नमो सद्गुरु दीनबंधू दयाळा ॥ करीतील जे नित्य अभ्यास त्याचा । मनोभाव सिध्दीसि न्यावा तयाचा ॥३०॥

दिलें वाक्य तें सत्य सिध्दीस न्यावें । अनाथादिनालागि हें बोधवावें ॥ निळा नित्य प्रार्थूनियां हेंचि मागें । किजे दान हेंची कीं येणें प्रसंगें ॥३१॥

असे श्लोकसंख्या त्रिशतबत्तिसांची । निजस्तूति हे सद्गुरुस्वामीयाची ॥ घडें नित्य आवर्तनु एक ज्यासी । करीती गुरु येउनी बोध त्यासी ॥३२॥

 

॥ श्रीसद्गुरुतुकारामार्पणमस्तु ॥


संत निळोबाराय गाथा । संत निळोबाराय अभंग । निळोबा अभंग । निळोबा गाथा । सर्व गाथा । निळोबाराय माहिती । पिंपळगाव मंदिर निळोबाराय । sant nilobaray gatha | sant nilobaray abhang | niloba abhang | niloba gatha | sarv gatha | nilobaray mahiti | nilobaray mandir pimpalgav |

तुमच्या शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांतीला भेट द्या .

संत निळोबाराय (निळोबास्वामीकृत सदगुरू तुकाराम महाराजांची स्तुति) संत निळोबाराय (निळोबास्वामीकृत सदगुरू तुकाराम महाराजांची स्तुति) संत निळोबाराय (निळोबास्वामीकृत सदगुरू तुकाराम महाराजांची स्तुति) संत निळोबाराय (निळोबास्वामीकृत सदगुरू तुकाराम महाराजांची स्तुति) संत निळोबाराय (निळोबास्वामीकृत सदगुरू तुकाराम महाराजांची स्तुति) संत निळोबाराय (निळोबास्वामीकृत सदगुरू तुकाराम महाराजांची स्तुति) संत निळोबाराय (निळोबास्वामीकृत सदगुरू तुकाराम महाराजांची स्तुति) संत निळोबाराय (निळोबास्वामीकृत सदगुरू तुकाराम महाराजांची स्तुति) संत निळोबाराय (निळोबास्वामीकृत सदगुरू तुकाराम महाराजांची स्तुति) संत निळोबाराय (निळोबास्वामीकृत सदगुरू तुकाराम महाराजांची स्तुति) संत निळोबाराय (निळोबास्वामीकृत सदगुरू तुकाराम महाराजांची स्तुति) संत निळोबाराय (निळोबास्वामीकृत सदगुरू तुकाराम महाराजांची स्तुति) संत निळोबाराय (निळोबास्वामीकृत सदगुरू तुकाराम महाराजांची स्तुति)