संत निळोबाराय (संतकृपेनें प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधानें जनांपाशीं व संतांपाशीं उद्गार)
१४५१
अवघ्याचि संपत्ती आलीया घरा । तुमचिया दातारा आगमनें ॥१॥
शीतळ झालों पावन झालों । तुमचिया लागलों चरणांसी ॥२॥
धरिलीया जन्माचें सार्थक झालें । तुम्हीं अवलोकिलें म्हणोनियां ॥३॥
निळा म्हणे धरिलें हातीं । जेव्हांचि संतीं तुम्हीं मज ॥४॥
१४५२
आईका हो संत तुम्ही मुनेश्वर । माझिये निर्धार अंतारींचा ॥१॥
विठोबावांचूनि न मनींचि दैवत । न धरी माझें चित्त भाव कोठें ॥२॥
काय मतांतरें करुं ते साधनें । हरीनामकीर्तनें वांचूनियां ॥३॥
निळा म्हणे न लगे वायूची धारण । तत्वसंख्या कोण कामा आली ॥४॥
१४५३
उपायाच्या करितां श्रेणी । परि जेथ कोणी न पवेचि ॥१॥
तया पावविलों ठायां । संतीं करुनियां निज कृपा ॥२॥
ज्याचे प्राप्ती लागीं योगी । धांवती मागीं सुषुम्नेच्या ॥३॥
निळा म्हणे सिध्द मुनीं । ज्यांतें अनुदिनीं चिंतिती ॥४॥
१४५४
उत्तीर्ण त्यांचे काय व्हावें । न कळे भावें वंदितों ॥१॥
जीव पायीं ठेवूं म्हणे । लटिकेपणें तो मिथ्या ॥२॥
देह मांस चर्म हाडें । अर्पिता अपाडें नैश्वर तीं ॥३॥
निळा म्हणे चरणीं माथा । ठेवूं आतां संतांचिये ॥४॥
१४५५
उत्तीर्ण त्याचें नव्हिजे आतां । जिवही अर्पितां थोडाची ॥१॥
ओंवाळूनि सांडूं काया । वरुनी पायां संतांच्या ॥२॥
मायबापा काय दयावें । कैसें व्हावें उताराई ॥३॥
निळा म्हणे ज्यांची कृपा । जन्म खेपा निवारी ॥४॥
१४५६
उत्तम संचित होतें गांठीं । तेणेंचि या भेटी संतांसवें ॥१॥
सुकृतासी आलीं फळें । भावबळें लगटोनी ॥२॥
त्याच्या भाग्या आले भाग्य । लाधले संग संतांचा ॥३॥
निळा म्हणे पूर्णते आले । जिहीं या सेविलें संतचरणा ॥४॥
१४५७
ऐसा संतांच उपकार । काय मी पमार आठवूं ॥१॥
करुनियां अनुमोदन । दिधलें वचन अभयाचें ॥२॥
म्हणती करीं नामपाठ ॥ न करीं खटपट यावीण ॥३॥
निळा म्हणे कृपावंत । करिल सनाथ श्रीहरी ॥४॥
१४५८
कोठें फावो येतां मग । निश्चळ ऐसा हा प्रसंग ॥१॥
आजि संतसंगगुणें । हरिचीं नामें उच्चारणें ॥२॥
अनायासेंचि कथा कीर्ति । जोडली याचि संगती ॥३॥
निळा म्हणे फळोन्मुख । झालें परमार्थिक सुख ॥४॥
१४५९
कृपा केली संतजनीं । लाविलों भजनीं श्रीहरीच्या ॥१॥
नाहीं तरी जातों वायां । लक्ष भोगावया चौर्यांयशीं ॥२॥
आणिकां साधनीं गुंताचि पडतां । अभिमान वाढतां नित्य नवा ॥३॥
निळा म्हणे धांवणें केलें । सुपंथें लादिलें नीट वाटें ॥४॥
१४६०
खाती आपण जें जेविती । तेंचि आणिकांही वाढिती ॥१॥
आजि बहुता भाग्यें भेटी । झाली चरणीं पडली मिठी ॥२॥
नाहींचि आम्हांसी वंचिलें । निज गुज अवघेंचि आपुलें ॥३॥
निळा म्हणे कृपावंत । केलें अनाथा सनाथ ॥४॥
१४६१
जिकडे जिकडे भासे रवी । प्रभा नीच नवी सांगातें ॥१॥
तैसें केलें माझें वाचें । तुम्हीं सामार्थ्याचें बोलणें ॥२॥
उजळिल्या दाहीं दिशा । करुनी प्रकाशा निजबोधें ॥३॥
निळा म्हणे सत्या चाली । वाट दाविली तुम्हीं ते ॥४॥
१४६२
धन्य काळ आजिचा दिवस । हरिचे दास भेटले ॥१॥
दंडवत घालीन पायां । करीन काया कुरवंडी ॥२॥
पाप ताप दैन्य गेलें । येथुनी पाउलें देखतां ॥३॥
निळा म्हणे पावलों फळ । केलिया निर्मळ सुकृतातें ॥४॥
१४६३
धन्य झालों कृपा केली । भेटी दिधलीं अवचिती ॥१॥
सांभाळिलें तुम्ही संती । केल्या आर्ती परिपूर्ण ॥२॥
मी तो दीन तुमचा रंक । घातली भीक अभयाचि ॥३॥
निळा म्हणे न भेणें आतां । सन्मुख येतां किळिकाळ ॥४॥
१४६४
नव्हती माझे फुकट बोल । जाणे विठ्ठल सत्य मिथ्या ॥१॥
संतकृपेची हे जाती । ओघेंचि चालती अक्षरें ॥२॥
कैंची मती बोलावया । ठायींचि पायां विदित तें ॥३॥
निळा म्हणे बाहेरी आलें । होतें सांठविलें ह्रदयीं जें ॥४॥
१४६५
न वजों यावरी आतां कोठें । सांडुनि चरण हे गोमटे ॥१॥
जोडलें ते भाग्ययोगें । येणे काळें संतसंगें ॥२॥
दुभिन्नले वरुषोनी वरी । प्रेमअमृताच्या धारीं ॥३॥
निळा म्हणोनी सांठी । केली जिवें देउनी मिठी ॥४॥
१४६६
निज सायासें जोडुनी । होतें निक्षेपुनी ठेविलें ॥१॥
तेंचि दिधलें माझया हातीं । आजीं संतीं कृपादान ॥२॥
कल्पादीचें पुरातन । जें महा धन परमार्थिक ॥३॥
निळा म्हणे पोटा आलों । म्हणोनि झालों अधिकारी ॥४॥
१४६७
नेणोनिया आपपर । होतें सुकर निक्षेपींचें ॥१॥
तेणें हातीं धरोनिया । संतीं ठाया पावविलों ॥२॥
विटेवरी दाविलें धन । होतें पोटाळून महर्षी ज्या ॥३॥
निळा म्हणे बैसला ध्यानीं । ज्याचिये चिंतनीं सदाशिव ॥४॥
१४६८
परम सुखाचा सुकाळ । चित्तीं वसे सर्वही काळ ॥१॥
ऐसें केले कृपादान । तुम्हीं मनातें मोहुन ॥२॥
जिवा पैलाडिये खुणे । पावविलें सामथ्यें गुणें ॥३॥
निळा म्हणे ऐसे किती । उपकार वानूं पुढतोपुढतीं ॥४॥
१४६९
पूर्ण केला पूर्ण केला । पूर्ण केला मनोरथ ॥१॥
घरा आले घरा आले । घरा आले कृपाळू ॥२॥
सांभाळिलें सांभाळिलें । सांभाळिलें अनाथा ॥३॥
केला निळा केला निळा । केला निळा पावन ॥४॥
१४७०
पूर्वार्जित होतें पुण्य । तेणें हे चरण आतुडलों ॥१॥
आतां सुखा नाहीं उणें । इहलोकीं भोगणें परत्रींचें ॥२॥
ऐशिया सुखा पात्र केलें । तुम्हीं अवलोकिलें कृपादृष्टीं ॥३॥
निळा म्हणे पूर्ण काम । पावलों संभ्रम सुखाचा ॥४॥
१४७१
ब्रम्हानंद मुसावला । अंगी बाणला आविर्भावो ॥१॥
संतवचनामृतें तृप्ति । झाली विश्रांति इंद्रियां ॥२॥
मन बैसलें ऐक्यासनीं । निश्चळ आसनीं सुखाचिये ॥३॥
निळा म्हणे लाभ ऐसा । जोडे सरिसा संतसंगे ॥४॥
१४७२
बोलिले शब्द निश्चयाचें । प्रतीति साचे आले ते ॥१॥
माझा मजचि परिचय झाला । संती दाविला हितार्थ ॥२॥
निमिषमात्रें सावध केलें । आपुलिये लाविलें निजसेवें ॥३॥
निळा म्हणे उपकार त्यांचा । सहस्त्र वाचा न वर्णवे ॥४॥
१४७३
भाग्याची उजरी । दिसे यावरी वोडवली ॥१॥
म्हणोनियां कृपावंत । झाले संत मायबाप ॥२॥
पाचारुनी देत मोहें । प्रेमपेहे पाजिती ॥३॥
निळा म्हणे सांगती कानीं । माझें मजलागुनी स्वहित ॥४॥
१४७४
भाग्य माझें उभें ठेलें । संती दाविलें निधान ॥१॥
आतां उणें कोठें कांही । न पडे ठायीं भरलेंसें ॥२॥
जेथें पाहे तेथें आहे । न पाहतांही राहे कवळुनी ॥३॥
निळा म्हणे व्यापुनी अंतरी । गगनाही बाहेरीं तेंचि दिसे ॥४॥
१४७५
भोळा देव । दाखविला आम्हां केला सन्मुख ॥१॥
पंढरियें विटेवरीं । उभा व्दारीं पुंडलिका ॥२॥
संती केला परोपकार । आम्हां उध्दार दीनांचा ॥३॥
निळा म्हणे जवळी नेलें । हातीं दिलें निरवुनी ॥४॥
१४७६
मज तों सांभाळिलें संती । धरिलें हातीं दीन म्हणुनी ॥१॥
सांगतां नये विश्वास लोकां । बाधी अशंका ज्याची त्या ॥२॥
मी तों बोलें त्याचिया सत्ता । पुढें विचारितां कळेल ॥३॥
निळा म्हणे जुनाट नाणें । नव्हे हें उणें पारखितां ॥४॥
१४७७
मायबाप उत्तीर्ण होणें । न घडे देणें अपत्या ॥१॥
जरी लक्ष जोडी दिली । ॥२॥
जैसा आत्मा विश्व प्रसवे । तेणें त्या व्हावें उत्तीर्ण के ॥३॥
निळा म्हणे शुध्द भावे । चरणा जावें लिगटोनी ॥४॥
१४७८
मी तों संतांचें पोसणें । देती समयीं तेंचि खाणें ॥१॥
अवघी चुकली जाचणी । उण्यापुयाची सोसणी ॥२॥
करुं सांगितलें काज । चिंता दवडूनियां लाज ॥३॥
निळा म्हणे फिटली खंती । जिणें मरणें त्यांचे हातीं ॥४॥
१४७९
मी ज्या बोलिलों निगुती । संतकृपेच्या त्या युक्ती ॥१॥
येरवीं हें काय जाणें । प्रसादाचें करणें त्यांचिया ॥२॥
छायाचित्र नाचवितां । प्रकाशितां दिप त्यासी ॥३॥
निळा म्हणें माझे कर्म । जाणती वर्म ते संत ॥४॥
१४८०
लेवविले अळंकार केलें थोर वाढवुनी ॥१॥
आपुली दृष्टी निववितां । मी तो नेणतां लळेवाड ॥२॥
गोड घांस मुखीं भरा। जेविता पाचारा आवडी ॥३॥
निळा म्हणे शिकवा बोलों । पुढें चालों आपणा ॥४॥
१४८१
होतें तैसें पांई केलें निवेदन । अंतरलों दीन बहुत होतों ॥१॥
संबोखून केले समाधान चित्ता । वोगरुनि भाता प्रेमरस ॥२॥
नामरत्नमणी करुनि भूषण । अळंकारीं मंडण माळा दिली ॥३॥
निळा तेणें सुखें झाला निरामय । नामीं नाम सोये निमग्नता ॥४॥
१४८२
कृपा केली संतजनीं । अर्थ दाविले उघडुनि ॥१॥
तेचि प्रगट केलें आतां । नाहीं बोलिलों मी स्वतां ॥२॥
नेणों काय केलें संतीं । माझी चेतवुनियां मती ॥३॥
निळा म्हणे वोढावारा । नाहीं तोंडा ना अक्षरा ॥४॥
संत निळोबाराय गाथा । संत निळोबाराय अभंग । निळोबा अभंग । निळोबा गाथा । सर्व गाथा । निळोबाराय माहिती । पिंपळगाव मंदिर निळोबाराय । sant nilobaray gatha | sant nilobaray abhang | niloba abhang | niloba gatha | sarv gatha | nilobaray mahiti | nilobaray mandir pimpalgav |संत निळोबाराय (संतकृपेनें प्राप्त झालेल्या स्थितीसंत निळोबाराय (संतकृपेनें प्राप्त झालेल्या स्थितीसंत निळोबाराय (संतकृपेनें प्राप्त झालेल्या स्थिती
तुमच्या शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांतीला भेट द्या .