संत निळोबाराय (ढोंगी संत)
१४२५
अंधकारीं प्रकाश दावी । दिप रवीपुढें मिथ्या ॥१॥
तैशीं प्राप्तापुढें ज्ञानें । युक्तिचीं दिनें लेवासे ॥२॥
जिवे मेवे गोडिये निके । परि ते फिके परमामृतीं ॥३॥
निळा म्हणे दाविती भाव । परि ते स्वमेव संत भिन्न ॥४॥
१४२६
आणिकांते उपदेशी । आपण मळिन मानसीं ॥१॥
बोले ते ते धूर्त वादें द लटिक्याचि प्रेमें रडे स्फुंदे ॥२॥
सोंग परमार्थ हा सार । आशा अंतरी विखार ॥३॥
निळा म्हणे देहाभिमानें । गेलीं भोगिती ते पतनें ॥४॥
१४२७
आतां अभक्त कातर । मळिन जयाचें अंतर ॥१॥
दाऊनियां वरदळ वेष । मना अंगी आशापाश ॥२॥
वाचे सात्विक बोलणें । विषयीं वासनेचें ठाणें ॥३॥
निळा म्हणे घेउनी सोंगें । निरवे चार करीत उगे ॥४॥
१४२८
ऐसींचि देखिलीं उंदडें । जळो त्यांची काळीं तोंडें ॥१॥
मुखें सांगती परमार्थ । स्वार्थ अंतरी अनर्थ ॥२॥
अनुताप दाविती वैराग्य । वरी आंतर्बाह्य रंगे ॥३॥
निळा म्हणे उगीचि रीति । पडलीं संसारीं कुंथितां ॥४॥
१४२९
कोण तया लेखी । नाहीं विठठलीं ओळखी ॥१॥
करिती तितकें पोटासाठीं । गाणें नाचणें आटाआटी ॥२॥
कळा दाविती व्युत्पत्ति । चातुर्य जाणिवेची संपत्ती ॥३॥
निळा म्हणे संतापुढें । येतां लाजती ती माकडें ॥४॥
१४३०
बोलणें परमार्थ आशा अतरीं अनर्य ॥१॥
काय करुं ते व्युत्पत्ति । बहुरुप्याची संपत्ती ॥२॥
रसाळ वाचेसी बोलणें । माळा मुद्रांची भूशणें ॥३॥
निळा म्हणे गेलीं द वांयां न भजतां विठठलीं ॥४॥
१४३१
प्रत्यक्ष जनीं जनार्दन । नूणोनियां कथी ज्ञान ॥१॥
काय तैसी ते वाचाळें । करिती चावटी तोंडबळें ॥२॥
नाहीं अंगी हरिची भक्ति । दाविती कोरडीच विरक्ति ॥३॥
निळा म्हणे नेणतां वर्म केलें पाठी लागे कर्म ॥४॥
१४३२
सोंवळया नांव क्षीरसागर । वृथाचि मांजर गाजरीं ॥१॥
काय तैसी तें वायाणें । लटिकीं भूषणें मिरविती ॥२॥
शुभा नांवे विकती शेणी । मृगजळ पाणी काय खरें ॥३॥
निळा म्हणे पाखांड करिती । जगीं म्हणविती गोसावी ॥४॥
१४३३
त्रास उपजे माझिया मना । अवलोकितां त्यांच्या वदना ॥१॥
जे या दुषिती नामासी । कृत्रिम करिती उपदेशासी ॥२॥
सांगती पाखंड । बोल बोलोनियां वितंड ॥३॥
निळा म्हणे जाती । घेउनी नरका शिष्यांप्रती ॥४॥
१४३४
जाणीवेचा झाला फुंद । भाग्य मंद नेणे तो ॥१॥
सांगतांहि न मानी हीत । करी आघात आपुल ॥२॥
मना आला अर्थ काढी । ओढे ओढे अहंतेचे ॥३॥
निळा म्हणे व्दैतबुध्दि । नये तो कधीं परिपाका ॥४॥
१४३५
तत्वतां न कळे । आलें मना तें चावळे ॥१॥
खरियासी मानी खोटें । खोटें खया ऐसें वाटे ॥२॥
अंध न देखे निवाडू । तम तैसा हाचि उजिवडू ॥३॥
निळा म्हणे बुध्दिमळीन । नेणें पाप कीं हें पुण्य ॥४॥
१४३६
निर्भीड बोलणें । ज्याचें अपस्वार्थी जिणें ॥१॥
त्याचिये संगतीचे फळ । होय चित्तसी खळबळ ॥२॥
परदु:ख नेणतां । कर परान्नें पुष्टता ॥३॥
निळा म्हणे दावी सोंग । ऐसा त्यजावा मातंग ॥४॥
१४३७
नेणे आपुल्या हितावरी । बोले त्यांसीचि विरुध्द करी ॥१॥
जाणावा तो जन्मांतर । पूर्व दोषाचा विकार ॥२॥
सर्व काळ अल्प बुध्दी । नेणे बोलों सभासंधी ॥३॥
निळा म्हणे तया दिसे । अवघें जगचि वेडें ऐसें ॥४॥
१४३८
नेणोनियां आत्महित । करिती घात अभिमानी ॥१॥
नसतीच वाढवूनियां उपाधी । पडती मधीं संदेहा ॥२॥
नाठवूनियां विठ्ठल देवा । करिती सेवा भूतांची ॥३॥
निळा म्हणे जन्मोनि गेला । वृथाचि पडिला निरयांत ॥४॥
१४३९
न राहेचि क्षणहि भरी । कदा निश्चळ अंतरी ॥१॥
वाचाळ धोवे तैसें । कार्येविण निरुददेशें ॥२॥
करी बोलतां प्रमाद । वाढवुनि वादावाद ॥३॥
निळा म्हणे महा मूर्ख । करी सकळां सर्वे दु:ख ॥४॥
१४४०
घेऊनियां कृत्रिम सोंगे । नानापरींच्या नटती रंगें ॥१॥
आपण बुडवीती । लाउनि आणिकांही संगती ॥२॥
जाउनि एकांतीं बैसणें । करुनी चावटी बोलणें ॥३॥
निळा म्हणे उपदेशिती । विषय आत्मरुप शिष्याप्रती ॥४॥
१४४१
चातुर्य मिरवी । कळा व्युत्पत्ति दाखवी ॥१॥
परी तें अवघें वांयां गेलें । एका न भजतां विठठलें ॥२॥
गायनाची कळा । आसनें मुद्रेचा सोहळा ॥३॥
निळा म्हणे जें जें करी । सोंगींचि तें तें अवघें वरी ॥४॥
संत निळोबाराय गाथा । संत निळोबाराय अभंग । निळोबा अभंग । निळोबा गाथा । सर्व गाथा । निळोबाराय माहिती । पिंपळगाव मंदिर निळोबाराय । sant nilobaray gatha | sant nilobaray abhang | niloba abhang | niloba gatha | sarv gatha | nilobaray mahiti | nilobaray mandir pimpalgav |देवभक्त यांची एकरुपता |
तुमच्या शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांतीला भेट द्या .
संत निळोबाराय (ढोंगी संत)