संत निळोबाराय गाथा (मंगलाचरण)

संत निळोबाराय (संतांचें वर्णन)

संत निळोबाराय (संतांचें वर्णन)

१२५७

अगाध कीर्ति वाढले संत । केली विख्यात चरित्रें हीं ॥१॥

अग्नींत उभे विषचि प्याले । नाहीं ते भ्याले महा शस्त्रा ॥२॥

वंदूनि आज्ञा बोले पशु । करी श्रुतिघोषु दीर्घ स्वरें ॥३॥

निळा म्हणे ठेऊनि उदकीं । कागदहि सेखीं कोरडया वह्या ॥४॥

१२५८

अढळ वैराग्य प्रगटे अंगीं । बसतां संगीं संतांचिया ॥१॥

दिव्य भोगीं विटे मन । मृतिकेसमान सोनें रुपें ॥२॥

परमामृर्ती नाहीं चाड । अप्सरा दुवाड वाटती त्या ॥३॥

निळा म्हणे इहलोकींचे । भोग ते साचे वामनापरि ॥४॥

१२५९

अर्थ जाणती अनुभवी । खूण ठावीं जयां ते ॥१॥

संतकृपेचि ते जाति । कवणे रिती ते कैसी ॥२॥

कळे त्या खरें खोटें । धीट पाटे प्रासादिक ॥३॥

निळा म्हणे अंतरींचें । प्रेम साचें कीं लटिकें ॥४॥

१२६०

अर्थ अवघेचि याचे हातीं । जया देऊं जे बोलती ॥१॥

तों ते तात्काळचि पावले । जगामाजी धन्य झाले ॥२॥

नाहींचि वेळ काळ गुंती । देतां रंक थोर नेणती ॥३॥

निळा म्हणे अवलोकनें । तोडिती भवांचीं बंधनें ॥४॥

१२६१

अपार संत झाले क्षितीं । ऐकिलें ऐकाल पुढेंही होती ॥१॥

जे जे झाले हरिचे दास । करितां कीर्तनें सांडुनी आस ॥२॥

र्शनें मुक्ति आणिकां देती । उदंड पावन केल्या याती ॥३॥

निळा म्हणे सनकादिक । आदि करुनि अनामिक ॥४॥

१२६२

अलभ्य लाभ ते सत्संगती । घरासीचि येति चोजवितां ॥१॥

ज्याचे ध्यानीं मनीं देव । राहिला राव पंढरीचा ॥२॥

त्याहूनि अधिक् आहे कोण । काळहि आपण सेवा करी ॥३॥

निळा म्हणे तिष्ठती व्दारीं । होउनी कामारी रिध्दीसिध्दी॥४॥

१२६३

अवलोकिलें कृपादृष्टीं । केली वृष्टी वचनामृतें ॥१॥

अंकुरले भावबीज । कारण निज अंतरीचें ॥२॥

संतांचि हे सहज स्थिती । आठव देती स्मरणाचा ॥३॥

निळा म्हणे धांवोनि येती । आणि उपदेशिती निज गुहा ॥४॥

१२६४

अहो ऐका भाविक । संत आर्तक मुमुक्षु ते ॥१॥

शुध्दचर्या आचरण । हेंचि पूजन संताचें ॥२॥

नंलगे सांगावें मागावें । जाणती स्वभावें हदत ते ॥३॥

निळा म्हणे अकस्मात । भेटती संत भावशुध्दी ॥४॥

१२६

आणिकातेंही विठ्ठल  करिती । लागले संगती भाविक त्या ॥१॥

यांचा वारा लागेल ज्यासी । येती त्यासी मुक्तीही वरुं ॥२॥

घडतां त्यांचें अवलोकन । होती पावन महा पापी ॥३॥

निळा म्हणे त्यांची भेटी । तेचि गांठी विठठलेचि ॥४॥

१२६६

आणिकही उदंड संतजन । राहिले व्यापून महीतळीं ॥१॥

नामेंचि पावन केलें दोषी । उध्दार आणिकांशीं करुनियां ॥२॥

गर्जती तेणें ब्रम्हानंदे । हरिनाम पदें आळविती ॥३॥

निळा म्हणे निमग्न झालें । हरिपदा पावलें हरिनामें ॥४॥

१२६७

आदि मग हे अनादि बोली । निशीनें प्रगटलीं सूर्यमहिमा ॥१॥

अर्थ याचा आणा चिता । मग विचारितां कळेल ॥२॥

कडूचि नसतां कैंचें गोड । उष्मेविण सुरवाड छायेचा ॥३॥

निळा म्हणे पुत्रेंविण । न शोभे बापण वायाणें ॥४॥

१२६८

आधीं भक्त पाठी देव । प्रगटे भाव देखोनी ॥१॥

काचोळी पाठी कण । भूस निकण मग दाणा ॥२॥

आधीं तंतु पाठी वस्त्र । कनका अलंकार रुप करी ॥३॥

निळा म्हणे भक्ताविण । कैंचे देवपण देवासी ॥४॥

१२६९

आपपर ते नोळखती । अवघाचि देखती विठ्ठल  ॥१॥

पूर्ण होऊनि ठेलें काम । आत्माराम देह त्यांचा ॥२॥

विठ्ठल  कानीं विठ्ठल  घ्राणीं । विठ्ठल  नयनीं मनामाजी ॥३॥

निळा म्हणे विठ्ठल  अंगे । रंगले रंगे विठठलाच्या ॥४॥

१२७०

आपणचि ते येती घरा । देखोनि बरा निजभाव ॥१॥

आप्तपणें आलिंगिती । मनींचा पुरविती हेत सकळ ॥२॥

अनाथ अनन्य देखोनी रंक । करिती कौतुक खेळविती ॥३॥

निळा म्हणे लाविती सेवे । आपुलिया वैभवें गौरविती ॥४॥

१२७१

आपणा सारिखें । देखे नाढळे पारिखे ॥१॥

गुरुकृपा तो लाधला । व्यापुनी चराचर एकला ॥२॥

निंदा स्पर्धा व्देषाव्देष । तुटले कामक्रोध पाश ॥३॥

निळा म्हणे पात्र सुखा । झाला एकाएकीं देखा ॥४॥

१२७२

आवरुनियां ज्यांनीं चित्त । ठेविलें सतत हरीचरणीं ॥१॥

झाली त्याची कार्यसिध्दी । तुटल्या व्याधि जन्म जरा ॥२॥

एकविध भजले देवा । उतरले भव समुद्रातें ॥३॥

निळा म्हणे निश्चय पदा । पावले गोविंदा आठवितां ॥४॥

१२७३

आले भेटी संत जन । गर्जे गगन हरिनामें ॥१॥

टाळ विणे मृदंग भेरी । छविने अंबरीं झळकती ॥२॥

विठ्ठल  देव धांवती पुढें । भेटती कोडें जिवलगा ॥३॥

निळा म्हणे आलिंगनें । नव्हती भिन्न वेगळे ॥४॥

१२७४

इंद्र चंद्र महेंद्र सर्व । मानवती देव हरिभक्तां ॥१॥

म्हणती इहींचि केला ऋणी । चक्रपाणी कीर्तनें ॥२॥

नेदि तिये वैकुंठवासी । आपणचि पाशीं गोंवियेला ॥३॥

निळा म्हणे हे सदैव सदा । कीर्तनें गोविंदा रंजविती ॥४॥

१२७५

उगाचि राहेन संतापासीं । सेवुनी चरणांसी निरंतर ॥१॥

पुसेन तया सांडूनी लाज । आपुलीये गुज अंतरींचें ॥२॥

फेडितील ते मनींची शंका । वचनेंचि एका क्षण्मात्रें ॥३॥

निळा म्हणे उणेंचि नाहीं । त्याचिये पायीं निजानंदा ॥४॥

१२७६

उत्तीर्ण नव्हीजेची वेचतां जीवें । ऐसे बरवे उपकार याचे ॥१॥

सांगावें तें कोठवरी । जे जे अवसरीं जें केलें ॥२॥

वाटे तिटे घरीं दारीं । आपुल्यापरी सांभाळी ॥३॥

निळा म्हणे आपुल्या नेमा । न टळे महिमा हाचि याचा ॥४॥

१२७७

उदार ऐसा न दिसेचि दृष्टि । पाहतांहि सृष्टी मज आतां ॥१॥

जयाचीया वचनें जीवा जीवपण । नुमसेचि शीवपण शिवा अंगीं ॥२॥

अविदयेसी अर्हता मावळे । बोध भानुउजळे प्रकाशीतु ॥३॥

निळा म्हणे दावी आनंदा आनंदु । भोगवी निजानंदु निजानंदा ॥४॥

१२७८

उदार संत उदार संत । जया तैसा हेत पुरविती ॥१॥

अपार देणें अपार देणें । पावती पेणें वैकुंठीचें ॥२॥

न सरे ऐसें न सरे ऐसें । देती सहवासे निजात्मसुख ॥३॥

निळा म्हणे यांचिये पायीं । निज वस्ती देंई देवा मज ॥४॥

१२७९

उभारुनी बाहो ध्वज । सांगती पैज घेउनी ॥१॥

विठ्ठल  म्हणा विठ्ठल  म्हणा । कळिकाळ आंकण मग तुम्हां ॥२॥

लहानां थोरां नारीनरां  करिती हांकारा विश्वाचिया ॥३॥

निळा म्हणे तत्वता बीज । देताती सहज निवडूनी ॥४॥

१२८०

एक एका अवलोकिती । एक मिसळती एकांत ॥१॥

संत तेचि झाले देव । संती देव विराजे ॥२॥

येरयेरां मिठी पडे । आतां निवडे तें कैसें ॥३॥

निळा म्हणे भक्ति सुखें । झाले सारखे उभयतां ॥४॥

१२८१

एकचि आशिर्वाद देती । जरी अवलोकिती कृपेनें ॥१॥

तरी त्या पावविती पदा । जेथें सर्वदा रमती मुनी ॥२॥

निश्चयाचें देणें त्याचें । हरिती जीवाचें जीवपण ॥३॥

निळा म्हणे अगाध वाचा । संत वरदाचा महिमा हा ॥४॥

१२८२

एकचि वचन मानस पायीं । ठेविले नवाई काय सांगों ॥१॥

धन्य ते संत धन्य ते संत । जाणती हद्रत सकळांचे ॥२॥

दवडुनी अभिमान देवाचि देती । आणिकांही करिती आपणासें ॥३॥

निळा म्हणे अघटित चर्या । लागतांचि पायां पालटती ॥४॥

१२८३

एकनिष्ठ झाला भाव । आतां देवा तेचि अंगे ॥१॥

व्दंव्दे त्याचीं करिती काई । सर्वांठायीं देव तयां ॥२॥

ध्यानीं मनीं जनीं वनीं । प्रगटे लोचनीं अहोरात्र ॥३॥

निळा म्हणे वियोगवार्ता । नेणती सर्वथा हरिभक्त ॥४॥

१२८४

एकाहुनी आगळे एक । झाले हरिभक्त अनेक ॥१॥

भक्ती निजज्ञानें वैराग्यें । देवचि होऊनी ठेले अंगे ॥२॥

प्रेमभक्ति अनुसरले । विठ्ठल  देवें ते पूजिले ॥३॥

निळा म्हणे सांगों किती । न पुरे अल्प माझी मती ॥४॥

१२८५

एका नामें बहुत तरले । एका भावें जे अनुसरले । एका तुमतेचि ते पावले । एकाएकीं गोविंदा ॥१॥

एका जाणोनियां तुमतें । एका रुसले अहंकारातें । एका विसरोनियां संसारातें । एका सुखातें पावले ॥२॥

एका तुमच्या निजध्यासें । एकाचि तुमच्या नामघोषें । एका तुमच्या कृपालेशें । आपणा ऐसे तुम्ही केलें ॥३॥

एका तुमच्या कीर्तनमेळें । एका तुमच्या भावबळें । एकाएकींचि उठोनि पळे  पाप सगळें गोविंदा ॥४॥

निळा म्हणे एकाएकीं । स्मरणमात्रेंचि झाले सुखी । एका नामोच्चारें मुखीं । वैकुंठलोकीं बैसविलें ॥५॥

१२८६

एका विठठलींचि ठेविला । जिहीं निश्चय आपुला ॥१॥

तेचि विठ्ठल  झाले आता । मोह सांडूनियां ममता ॥२॥

देवावीण सहसा कांहीं । दुजें तयां उरलेंचि नाहीं ॥३॥

निळा म्हणे स्वानुभव ल्याले । विठ्ठल चि अंगे होऊनि ठेले ॥४॥

१२८७

एकीं देव अनेकीं देव । नेणेचि भाव पालटों ॥१॥

देवचि भासे धरा मंडळ सूक्ष्म स्थूळ महदादी ॥२॥

अन्न जीवन भूक तहान । देवचि भोजन तृप्तीचें ॥३॥

निळा म्हणे अंगें मनें । जीवे प्राणें देवचि ते ॥४॥

१२८८

ऐश्वर्याचीं वचनाक्षरें । वदती मधुरें तत्वदातीं ॥१॥

श्रवण करिती सात्विक लोक । पावती सुख कैवल्य ॥२॥

भोगूनियां नित्यानंदा । सुखें निजपदा लिगटती ॥३॥

निळा म्हणे हे संत साधु । आर्तबंधु दीनांचे ॥४॥

१२८९

ऐसी जोडलिया सत्संगती । परम विश्रांती भाविका ॥१॥

बहमानंदाचे पारणें । नित्य स्मरणें श्रीहरिच्या ॥२॥

सकळीर लाभाच्या संपत्ती । सामोया धांवती पारमार्थिक ॥३॥

निळा म्हणे कृत्य झालें । ज्यालागीं आलें नरदेहा ॥४॥

१२९०

ऐसे हरिचे दास हरिनामीं रंगले । हरीचि होउनी ठेले एकाएकीं ॥१॥

आप पर तया न दिसेचि पाहतां । विश्वीं एकात्मता अवलोकीती ॥२॥

काम क्रोध लोभ मोह ममता माया । पळताती देखोनियां आशा तृष्णा ॥३॥

निळा म्हणे त्यांच्या दर्शनेंचि मुक्त । होताती पतीत महापापी ॥४॥

१२९१

अंगी ऐश्वर्य येऊनि बाणें । तुमचे भक्तींचीं लक्षणें ॥१॥

तैं तो मान्य होय जगीं । विश्व वंदी तयालागीं ॥२॥

शांती क्षमा आलिया वस्ती । संतलक्षणाची प्रशस्ती ॥३॥

कामक्रोधामोडली चाली । सर्व भूतीं साम्यता झाली ॥४॥

तुटोन गेले आशापाश । नुरोनि कल्पना नि:शेष ॥५॥

निळा म्हणे नाहीं ममता । कृपा तुमची ते अनंता ॥६॥

१२९२

अंतरींचा जाणती हेत । कृपावंत मग होती ॥१॥

सर्वजाण सर्वजाण । संत निपुण ये अर्थी ॥२॥

देखोनियां आर्तिकांसी । करिती त्यांसी निजबोध ॥३॥

निळा म्हणे विठ्ठल  मंत्रीं । देती श्रोती उपदेश ॥४॥

१२९३

कळिच्या काळा नागवती । जिहीं विठ्ठल  धरिली चित्तीं ॥१॥

तेचि देव झाले अंगे । अहंमोह ममतात्यागें ॥२॥

देहचि असोनि देहातीत । भोगीं अभोक्ते सतत ॥३॥

निळा म्हणे नामासाठीं । विठ्ठल  सांठविला पोटीं ॥४॥

१२९४

काय त्यांचा महिमा वाणूं वारंवार । हरिभक्त थोर भूमंडळीं ॥१॥

ज्याचिये भेटीचें आर्त ब्रम्हांदिकां । पूज्य सकळ लोकां विश्वा झालें ॥२॥

यमधर्म वास पाहे नित्य काळ । म्हणे धन्य वेळ भेटती ते ॥३॥

निळा म्हणे सर्व भाग्यें चोजविती । रिध्दिसिध्दि येती वोळंगणे ॥४॥

१२९५

कांहीं करी ना हा करवी । असोनि जीवीं जीवविहीन ॥१॥

संतचि ओळखती यासी । जाणतां आणिकांसी दुर्लभ ॥२॥

बुध्दीचिये पाठीं पोटी । न देखे शेवटीं बुध्दी तया ॥३॥

निळा म्हणे सत्ता याचि । न देखे विरंची आणी रुद्र ॥४॥

१२९६

केली पायवाट । उल्लंघिला मायाघांट ॥१॥

जिहीं हरी आठविला जिवें ह्रदयीं धरिला ॥२॥

जिंकोनियां काळा । वरि गेले भूमंडळा ॥३॥

निळा म्हणे ब्रहमैशान । पावोनी लाविलें निशाण ॥४॥

१२९७

कैसी सांपडली वेळ । तया केवळ लाभाची ॥१॥

देवचि झाले चिंत्ते वित्तें । गणगोतेंसहति ॥२॥

नयेचि विकल्पाचा वारा । त्यांचिया शरिरा आतळों ॥३॥

निळा म्हणे पहाती तेथें । देवापरतें न देखती ॥४॥

१२९८

गर्जता जाती ब्रम्हानंदें । हरिची पदें हरिभक्त ॥१॥

धाक त्यांचा कळिच्या काळा । कांपे चळचळां देखोनि ॥२॥

विबुध अवघे करिती मान । तीर्थें वंदन चरणाचें ॥३॥

निळा म्हणे धन्य ते जगी । झाले श्रीरंगी रंगतां ॥४॥

१२९९

गर्जत नामाच्या कल्लोळीं । आले महीतळीं उध्दरित ॥१॥

ते हे वीर वैष्णव गाढे । कळिकाळ त्यांपुढें तृणप्राय ॥२॥

वचनमात्रेंचि देती बोध । करिती अगाध सच्छिष्या ॥३॥

निळा म्हणे त्यांचिये वाणी । अमृत वोळुनी वृष्टि करी ॥४॥

१३००

गर्जतां विठोबाच्या नामें । जाळिलीं कर्मे शुभाशुभें ॥१॥

रिघाले अवघियां बाहेरी । विठ्ठल  अंतरीं धरुनियां ॥२॥

कैंचें तयां मायाजाळ । विराली तळमळ कल्पनेची ॥३॥

निळा म्हणे भोग त्याग । त्यांचें पांडुरंग हो सरला ॥४॥

१३०१

गर्जविती भ्रगवदुणीं । सर्वदा वाणी नीतीघोषें ॥१॥

तेणेंचि पावन करिती जगा । भवभय भंगा पावउनी ॥२॥

भाग्याचे ते पावती तेथें । वसती जेथें हरिभक्त ॥३॥

निळा म्हणे त्यांच्या गोठी । ऐकतां कोटी सुखाच्या ॥४॥

१३०२

गजेंद्रच्या संगे नाडीया उध्दार । प्रल्हादें असुर उध्दरीलें ॥१॥

हनुमंते जुत्पत्ती रिस आणि वानर । पावविले पार भवसिंधु ॥२॥

विभिषणें राक्षस लावियले भक्ती । केली पावन क्षिती धर्मराजें ॥३॥

निळा म्हणे तैसें संतीं उध्दरिलें । नवजाती बोलिले संख्यारहित ॥४॥

१३०३

गोड तुझी ब्रीदावळी । गोड गातां नित्यकाळीं । गोड भक्त भावें बळी । तूं वनमाळी त्यापाशीं ॥१॥

गोड तुमचीं नामें गाती । गोड कीर्तनीं उभे ठाकती । गोडा गोड तूं श्रीपती । त्याची भुक्ति मुक्ति तूंचि तूं ॥२॥

गोड त्याचे स्वानुभव । तुमच्या पायी ठेविला जीव । गोड भक्ति दृढभाव । तुमच्या चरणीं लिगटले ॥३॥

गोड त्याचें याती कुळ । गोड सत्कर्म तें सोज्वळ । गोड त्याचें बुध्दीबळ । तुज धरिलें निश्चयें ॥४॥

निळा म्हणे त्यांची मती । गोड कीर्तनीं नवी स्फूर्ती । गोड तुमची सगुण मूर्ती । ह्रदयीं त्याचे स्थिरावली ॥५॥

१३०४

घडो त्याचा समागम । ज्याचें प्रेम विठठलीं ॥१॥

सहज त्याच्या ऐकतां गोठी । परमार्थ पोटीं दृढावे ॥२॥

अनुतसपासी दुणीव चढे । वैराग्य वाढे चढोवढी ॥३॥

निळा म्हणे वाढे भाव । संचरे स्वानुभव निजांगीं ॥४॥

१३०५

चोजवीत घरां येती । ज्यांचा देखती शुध्द भाव ॥१॥

ऐसे करुणाघन हे संत । करिती हेत परिपूर्ण ॥२॥

पाचारुनियां ह्रदयीं धरिती । निकट बैसविती जवळी त्या ॥३॥

निळा म्हणे अनुभव झाला । तोचि दाविला बोलोनि ॥४॥

१३०६

जडोनियां ठेली । वृति पायीं लिगटली ॥१॥

मुखीं नामाचि गर्जना । हरिचा आठव क्षणक्षणा ॥२॥

रुपाचें चिंतन । तेथेंचि गुंतलें मन ॥३॥

निळा म्हणे दिलें । देह पायीं समर्पिले ॥४॥

१३०७

जन्ममरणा निवारिती । जे दाविती सुपंथ ॥१॥

बैसविती अक्षयपदीं । ब्रम्हानंदी कृपाळू ॥२॥

काचि वचनें सिध्दासनीं । करिती बैसउनी अगाध ॥३॥

निळा म्हणे उत्तीर्णत्वासी । दुर्लभ पाशीं कवण वस्तु ॥४॥

१३०८

जया नाहीं आपपर । सांगतां विचार सवहिताचा ॥१॥

जेणें देव जोडे जोडी । दाविती परवडी त्या साचा ॥२॥

संदेहाचे तोडिती पाश । सहज उपदेश बोलणें ॥३॥

निळा म्हणे अनुताप उठी । ऐकतां गोठी भाविका ॥४॥

१३०९

जिणे मरणें नाहीं आतां । हरीच्या भक्तां कल्पांती ॥१॥

त्याच्या ध्यानें तैसेंचि आलें । आपुला विसरले देहभाव ॥२॥

जडोनि ठेली अखंडता । एकात्मता हरिरुपीं ॥३॥

निळा म्हणे झाले संत । गुणातीत निजबोधें ॥४॥

१३१०

जिहीं जोडिला विश्वासें । निज निष्ठेच्या मानसें ॥१॥

मुखें आळविले नाम । याचें धरुनियां प्रेम ॥२॥

बैसली आवडी । याच्या पापीं दिली बुडी ॥३॥

निळा म्हणे याच्या घरा । धांव करी येरझारा ॥४॥

१३११

जिहीं निमिषमात्रें देह पालटिला । स्त्रियेचाचि केला पुरुष उभा ॥१॥

त्यांचे नवल कोण तारिती जड जीवा । यालागीं घडावा संतसंग ॥२॥

जिहीं फिरविलें औंढयाचें देऊळ । बोलविले बोल मूर्तिकरवीं ॥३॥

निळा म्हणे जिहीं प्रेतें जिवविलीं । वरदें उपजविलीं बाळें स्त्रिया ॥४॥

१३१२

जे जे होऊनियां अनुरक्त । झाले विरक्त हरिनामें ॥१॥

त्यांचे अंगी विसांवला । ह्रदयींचि राहिला प्रगटोनी ॥२॥

नेदी उरों दुसरेपणें । त्यांचेनि प्राणें जीवें जितु ॥३॥

निळा म्हणे घालुनि मिठी । त्यांते कल्पकोटी न विसंबे ॥४॥

१३१३

ज्यांची वचनें ऐके देव । पंढरिराव प्रीतीनें ॥१॥

भेटविती भेटे तया । पसरुनियां निज कर ॥२॥

जें जें तया वाटे गोड । तें तें कोड पुरउनी ॥३॥

निळा म्हणे जवळी राहे । त्यांची पाहे निज वास ॥४॥

१३१४

तेचि भक्त भागवत । संतसेवे जे निरत ॥१॥

शुध्द त्यांचा भक्तिभावो । संत वरदें लाभे देवो ॥२॥

संतवचनी विश्वासती । सत्य परमार्थ त्यांचे हातीं ॥३॥

निळा म्हणे संतसेवा । घडे त्या उदयो झाला दैवा ॥४॥

१३१५

तोचि वणिती आनंद । परमानंद अंतरींचा ॥१॥

जनीं लावावया गोडी । कीर्ति परवडी पोकरिती ॥२॥

आपण पावोनियां सुखा । आणिकां हरिखा मेळविती ॥३॥

लिध्हा म्हणे निगमादिक । ज्याचें कौतुक वानिती ॥४॥

१३१६

तेचि संत तेचि संत । ज्यांचा हेत विठठलीं ॥१॥

नेणती कांही टाणेटोणे । नामस्मरणें वांचुनी ॥२॥

काया वाचा आणि मनें । धाले चिंतने डुल्लती ॥३॥

निळा म्हणे विरक्त देहीं । आठवचि नाहीं विषयांचा ॥४॥

१३१७

तेथें माझे कायसे बोल । संत सखोल संवाद ॥१॥

आइकतांचि समाधान । होतेसें उन्मत मनाचें ॥२॥

सिध्द प्रदासाची वाणी । जे तुमच्या गुणीं मिरवली ॥३॥

निळा म्हणे ती तों रंक । जाणती लोक सकळीही ॥४॥

१३१८

देखती तें विठ्ठल रुप । वाचें विठ्ठल नामजप ॥१॥

तेहि विठ्ठल  झाले अंगें । मोहममताविषयत्यागें ॥२॥

विठ्ठल  कीर्ति लेइले अंगीं । विठ्ठल  झाले भोगीं त्यागीं ॥३॥

निळा म्हणे विठ्ठल  झाले । व्दैतभावातें मुकले ॥४॥

१३१९

देखती लोचनीं । निजात्मया अनुदिनीं ॥१॥

त्यांच्‍या भाग्याचा तो महिमा । नेणे चतुर्मुख ब्रम्हा ॥२॥

हरीसंगें हरिचेंचि रुप । झाली भावना तद्रुप ॥३॥

निळा म्हणे अवलोकनें । तैसेचि झालें अंगे मनें ॥४॥

१३२०

देखोनियां त्याचा अंतर्भाव । वोळला देव कृपासिंधु ॥१॥

येऊनि जवळी ह्रदयीं धरी । आणि मुखीं भरी ब्रम्हारस ॥२॥

देऊनी विभाग आपला मान । करी वाढवून मान्य जगीं ॥३॥

निळा म्हणे ठाकूनि आलेला वेळ । आवडी गोपाळ आलिंगी त्या ॥४॥

१३२१

देतां कांहींचि न घेती । भुक्ति मुक्ति रिध्दीसिध्दी ॥१॥

म्हणोनियां संकट थोर । वाटे दुस्तर मज यांचें ॥२॥

वैकुंठासी नेऊं म्हणतां । विटती तत्वतां ऐकोनि ॥३॥

निळा म्हणे रंगले रंगी । माझिया निजांगी लिगटले ॥४॥

१३२२

देतां काहींचि न घेती । संत उदासीन चित्तीं ॥१॥

त्रैलोक्यींचा मानधन । नावडे तयां देवाविण ॥२॥

नाहीं आस्था देहावरी । आशा तृष्णा कैंची उरी ॥३॥

निळा म्हणे ते देवचि झाले । कल्पकल्पांतीं संचले ॥४॥

१३२३

देश काळ वर्तमान । तया नाढळेचि भिन्न ॥१॥

जया कृपावंत माय । विठाई कवळुनी राहे ॥२॥

आपुलें पारिखें  । नेणती ते इच्छा सुखें ॥३॥

निळा म्हणे केली । ओळखी ठायींची ते भली ॥४॥

१३२४

देव अंगें निराभास । भक्त रुपस चांगला ॥१॥

म्हणोनियां तें आणिती रुपा । दर्पणीं पहा पां जेवीं नभ ॥२॥

नामें रुपें मंडित केला । शृंगारिला अळंकारें ॥३॥

निळा म्हणे भक्त जनक । देव बाळक या हेतु ॥४॥

१३२५

देवाचें वर्म सांपडला भाव । नवजाये जवळुनी आडकला देव ॥१॥

देव म्हणे माझी नव्हेचि सुटका । भावेंविण म्हणती देवोचि लाटिका ॥२॥

वर्म हें यासीं दाविलें कोणें । संतांसी ठाउकें येर कोणीही नेणे ॥३॥

निळा म्हणे भक्तासी तिहींचि दाविलें । न सोडिती आतां जिवेंसी बांधलें ॥४॥

१३२६

देवासाठीं घेउनी जोग । अवघचि भोग त्यजियला ॥१॥

तेचि एक बळिये गाढे । कांपे त्यापुढें कळिकाळ ॥२॥

आशा मात्र नाहीं ज्यांसी । शांतिसुखासी लिगटले ॥३॥

निळा म्हणे हरीच्या ध्यानें । गेले विसरोन देहभाव ॥४॥

१३२७

दृढ विश्वासें हरिसी भजतां सायुज्यता पावले ॥१॥

ऐसे भक्त नेणों किती । झाले वानिती पुराणें ॥२॥

जिहीं केलें पिंडदान । पदीं मन प्राणेंसी ॥३॥

निळा म्हणे त्यांची कीर्ति । संतहि गाती कीर्तनीं ॥४॥

१३२८

दृश्य नेणती आभास । अवघा बहमींचा प्रकाश ॥१॥

तया नाहीं दुजी परी । एकावीण उरली हरी ॥२॥

अवघेंचि नेणोनि जाणते । अवघ्या राहिले आंतौते ॥३॥

निळा म्हणे जनीं वनीं । अवघ्या अंगें जनार्दनीं ॥४॥

१३२९

धन्य त्याचा शुध्‍द भावो । आरधिला देवो पंढरीचा ॥१॥

धन्य त्यांचें जन्मकर्म । गाईलें नाम विठोबाचें ॥२॥

धन्य त्यांची देहक्रिया । आन उपाया नातळती ॥३॥

निळा म्हणे धन्य झाले । जे या गेले शरण हरी ॥४॥

१३३०

धरिती ज्या हातीं संत कृपावंत । पाळी पंढरीनाथ लळा त्याचा ॥१॥

न विसंबे त्या घडी पळ युग मानी । दिसों नेदी जनीं किविलवाणें ॥२॥

पाजी प्रेमपेहे वाह तया अंकी । म्हणे हे लाडकीं तान्हीं माझीं ॥३॥

निळा म्हणे दावी स्वहिताचा पंथ । नेदी त्यां आघात येऊं आड ॥४॥

१३३१

न करितीचि कांही वाणी । देतां पुरविती आयणी ॥१॥

म्हणती घ्या रे घ्या निज मुखें । अवघ्यां एकचि धन सारिखें ॥२॥

नाहीं वांटितां भागले । सदा सर्वदा हरिखेले ॥३॥

निळा म्हणे पूर्णपणें । नेदिती पडों कोठें उणें ॥४॥

१३३२

नव्हे हे सांगितली मात । महिमाचि अदभुत सद्गुरुचा ॥१॥

जीवा जीवपणा वंग । तोडूनि अभंगु ब्रम्ह करी ॥२॥

आपुलीये मूळ निरासी । नांदवी ज्यासी हातीं धरी ॥३॥

निळा म्हणे करितां सेवा । ऐसिया दैवा पात्र करी ॥४॥

१३३३

नव्हो अविश्वासी तैसे । आधम जैसे कृतघ्न ॥१॥

केले उपकार ते संती । आठवूं चित्तीं प्रीतीनें ॥२॥

तेचि करिती साभिमानें । सत्य वचनें आपुलीं ॥३॥

निळा म्हणे न सांडू वाट । दाविली नीट संती ते ॥४॥

१३३४

नाठवीता स्वयें दयावी आठवण । ते तों आहे खूण सद्गुरुची ॥१॥

ऐशिया प्रकारें बोधवितां शिष्या । अंतरीं प्रकाशा काय उणें ॥२॥

आपुलें स्वराज्य फावें आपणांसीं । नित्य सदभ्यासीं तद्रूपता ॥३॥

निळा म्हणे ऐशी सद्गुरुपें कळा । परी आहे विरळा बोधक तो ॥४॥

१३३५

नामधारक हरीचे दास । करिती नाश पापांचा ॥१॥

वसती त्यांच्या सहवासें ते । होताती सरते वैकुंठीं ॥२॥

यमधर्म लागती पायां । लोकत्रयामाजीं धन्य ॥३॥

निळा म्हणे हरिहर देव । करिती राणीव त्यांच्या घरीं ॥४॥

१३३६

नाहीं तरि संत झकवित कोणा । थोर लहाना सारखेचि ॥१॥

नाहीं तेथें कानें कोचें । उघडया वाचें उच्चार ॥२॥

न लागे पूजनासी धन वित्त । एकचि चित्त भाव पुरे ॥३॥

निळा उपदेश देती । कानीं सांगती विठ्ठल  म्हणा ॥४॥

१३३७

नाहीं भिन्नत्व उरलें । अवघ्या अंगें अवघें झालें ॥१॥

नेणती ते मानामान । जन तैसें तयां वन ॥२॥

न लगे साधन त्या संपत्ती  । देवचि झाले सर्वा भूतीं ॥३॥

निळा म्हणे एकाएकीं । एकचि होऊनि ठेले लोकीं ॥४॥

१३३८

नित्य कथाश्रवणीं प्रीती । चित्तवृत्ति अर्थातरीं ॥१॥

तेचि आधिकारीं या सुखा । स्वानुभव निका पावती ॥२॥

जयां बोलतां चालतां । एकात्मता न खंडे । ॥३॥

निळा म्हणे आले घरां । सुख माहेरा विश्रांती ॥४॥

१३३९

नित्य वदनीं हरीचें नाम । अंतरीं प्रेम विसावलें ॥१॥

त्याच्या भाग्या नाहीं सीमा । पुरुषोत्तमा प्रिय झाले ॥२॥

आवडती ते सर्वदा हरी । न वचे दुरी पासुनी त्यां ॥३॥

निळा म्हणे मेघ:श्याम । पुरवीं काम सर्व त्यांचें ॥४॥

१३४०

नित्यानंदाचिया घरा । विवेक पैलतीरा पावविती ॥१॥

तेचि सद्गुरु संतजन । निजात्मज्ञान फळदाते ॥२॥

वदनीं वसविली वेदोनीती । स्वधर्म स्थापिती सकळांचे ॥३॥

निळा म्हणे नेती धामा । वैकुंठग्रामा विश्रांती ॥४॥

१३४१

निजानंद भुसावला । विठ्ठल  झाला रुपाकृती ॥१॥

तेणें लाचविलीं मानसें । लाविलें पिसें संतजनां ॥२॥

नित्य त्यातेंचि अवलोकिती । आणि वानिती गुण वाचें ॥३॥

निळा म्हणे नाचती रंगीं । करिती जगीं उत्साह ॥४॥

१३४

नेणती ते आपपर । विश्वीं झाले विश्वंभर ॥१॥

नाहीं देहाची भावना । करितां नामसंकीर्तना ॥२॥

हरीच्या नामामृतें धाले । गिळुनी ब्रम्हांडा राहिले ॥३॥

निळा म्हणे अवघ्याचि परी । झाले व्यापक चराचरीं ॥४॥

१३४३

पुशुमुखें वेदाच्या श्रुती । पढवा कीर्ती तुमचिये ॥१॥

अचेतन भिंती चालवणें । हेंही कारणें विचित्र ॥२॥

तेरा दिवस उदकीं ठेवा । कागद देवा कोरडे ॥३॥

निळा म्हणे नारायण । ब्रम्हणजन तुम्हां घरीं ॥४॥

१३४४

पापी आणि दुराचारी । सहपरीवारीं संतांच्या ॥१॥

तरले आणिक तरती पुढें दिधलें येवढें सामर्थ्य त्यां ॥२॥

तुम्हीं देवा कृपावंत । केले निजभक्त आपणसे ॥३॥

निळा म्हणे जगदोध्दारा । केला हा बरा उपाय ॥४॥

१३४५

पावले ते झाले सुखी । ज्यांची बोळखी संतचरणीं ॥१॥

कीटक पतंग पशु याती । मानव सत्संगतीं उध्दरले ॥२॥

जिहीं विश्वास धरिला पायीं । तरले ते डोहीं भवाब्धीच्या ॥३॥

निळा म्हणे निर्वाणरुप । पावले स्वरुप श्रीहरीचें ॥४॥

१३४६

पाहोनियां आले ठाव । संत गांव सुखाचा ॥१॥

त्याचि दाविताती वाटा । सुगमा वैकुंठा जावया ॥२॥

बाळया भोळया सात्विक लोकां । करुनी नेटका उपदेश ॥३॥

निळा म्हणे परोपकारा । लागीं वसुंधरा विचरती ॥४॥

१३४७

पाहोनियां सकळ मतांतरें । बैसला धुरें जाणतीयां ॥१॥

परि ते दुर्लभ निपुण ज्ञानी । जे कां जाणोनि नेणते ॥२॥

बोलती उदंड सारांश गोष्टी । परत्वीं भेटी विरळे ते ॥३॥

निळा म्हणे वरदळवेषीं । नुतरती कसीं तयांपुढें ॥४॥

१३४८

पूर्ण कृपा झाली तया । गेलों लगटोनियां निज चरणीं ॥१॥

न देखती ते हरिविण । जनीं जनार्दन कोंदला ॥२॥

आनंदे त्या अळविती । वोसणती हरिनामें ॥३॥

निळा म्हणे देवचि झाले । भावा आले तयाचिया ॥४॥

१३४९

प्रताप तुमचा आहेचि जैसा । करितां जी तैसा बडिवारही ॥१॥

नव्हे जें कोणा तें करुनी दावितां । अघटित घडवितां निमिष्यमात्रे ॥२॥

स्त्रियांचे पुरुष पशुमुखें श्रुती । चालविल्या भिंती उदकीं वह्या ॥३॥

निळा म्हणे माझा करा अंगिकार । तरी महिमा थोर वाढेल तुमचा ॥४॥

१३५०

फळलें तया जन्मांतर । न पडे विसर नामाचा ॥१॥

अत्यादरें हरीची भक्ति । झाली विरक्ति विषयाची ॥२॥

कामक्रोधां गिळिलें शांति । अहंकार समाप्ति मदमत्सरा ॥३॥

निळा म्हणे अचिंतन । लागलें अनुसंधान हरिरुपीं ॥४॥

१३५१

बहुत भाग्यें भूमंडळा । आले सकळां उध्दराया ॥१॥

वर्तोनियां दाविती लोकां । पाविती परिपाका आणिकांही ॥२॥

सहज त्यांचा क्रीडा खेळ । हाचि मंगळ सुखकर्ता ॥३॥

निळा म्हणे हें महीतळ । ज्याचिया अढळ धर्मक्रिया ॥४॥

१३५२

बोलणें त्याचें तें नि:शब्द । देखणें देखती सच्चिदानंद । करणें चाळितां आत्मबोध । विषयीं विषय बहमरुप ॥१॥

जाणें येणें आणिकां दिसें । अचळपणें तें जैसें तैसें । कल्लोळ सागरीं उससे । रश्मि जैसे निजबिंबीं ॥२॥

न मोडे त्या अखंडता । घेतां देतां सर्वही करितां । हांसतां खेळतां बोलतां । निजीं निजतां यथासुखें ॥३॥

लेणीं अळंकारहि मिरविती । जयापरि तैसेचि दिसती । न मोडतां स्‍वरुपस्थिति । चित्तीं चितंन सर्वदा ॥४॥

निळा म्हणे गुणातीत । देहीं देहातें नातळत । होऊनियां ठेले संत । अंखटित अखंडीं ॥५॥

१३५३

बोलविला बोले वेद । म्हैसा सुबुध्द स्वरान्वयें ॥१॥

काय एक न करा देवा । भिंती चालवा निचेष्टिता ॥२॥

शिष्यालागीं देतां बोध । नलगे पलाघे निमिष्यहि ॥३॥

निळा म्हणे ज्ञानेश्वरा । मजहि अंगिकारा रंका दीना ॥४॥

१३५४

ब्रम्हसंपत्ती वरी तया । आवडे जया संतसंग ॥१॥

त्रिकाळज्ञानी होय तो नर । आत्मसाक्षात्कार भोगप्राप्ती ॥२॥

शांति दया क्षमा सिध्दी । बोलतां समाधी चालतां त्या ॥३॥

निळा म्हणे एवढा लाभ । जोडे त्या स्वयंभ भागयवंता ॥४॥

१३५५

भक्तसेवेच्या उपकारें । बहुत आभारें दाटलों ॥१॥

काय उत्तीर्ण व्हावें यासी । रुकमाईसी विचारी ॥२॥

देतां कांहीच न घेती । उदासवृत्ती सर्वदा ॥३॥

निळा म्हणे जिवींचि जडले । तिहीं मज केलें अंकित ॥४॥

१३५६

भक्त भावाच्या संपत्ती । भोगा ऐश्वयें श्रीपती ॥१॥

करा त्यांचे समाधान । न सांडितां सिंहासन ॥२॥

केली नामाची घोकणी । जिहीं तुमच्या चक्रपाणी ॥३॥

निळा म्हणे ठेविली जिहीं । निष्ठा अखंड तुमचे पायीं ॥४॥

१३५७

भक्त म्हणावें तयासी । न गुंते जो आशापाशीं ॥१॥

अहंकार निरसिला । देहभाव पालटला ॥२॥

निंदा स्तुति हे नावडे । पाहतां परब्रम्ह आवडे ॥३॥

निळा म्हणे तया ध्यातां । स्वानंद तो येत हातां ॥४॥

१३५८

भक्तांचिया गांवा आला । देव परमानंदे धाला ॥१॥

म्हणे नवजायें येथुनी । आतां भक्तांसी टाकुनी ॥२॥

शीण माझा हरला भाग । गोड वाटे याचा संग ॥३॥

निळा म्हणे विजयी झालें । देवा भक्त घेउनी आले ॥४॥

१३५९

भक्तांवीण देवा कोण । सोयरा सज्जन तिहीं लोकीं ॥१॥

यालागीं त्यांचीच वास पाहे । आज्ञेंत राहे भक्तांचिया ॥२॥

आवडी ऐसी रुपें धरी । भक्तांचे करी सांगितले ॥३॥

निळा म्हणे लोकीं तिहीं । भक्तांविण आप्त नाहीं देवा ॥४॥

१३६०

भक्तांवीण देवालागीं । पुसतें जगीं कोण दुजें ॥१॥

नामहि नव्हतें रुपहि नव्हतें । कैसेंनि जाणतें कोण तया ॥२॥

परेहि परता परदेशीं होता । केला भक्तीं सरता आपुल्या बळें ॥३॥ निळा म्हणे तो देवसा केला । भक्तीं आणिला नामा रुपां ॥४॥

१३६१

भवसिंधु त्यां पायवाट । मायाघाट उतरले ॥१॥

गर्जत विठोबाच्या नामें । गेले व्योमें निजपंथें ॥२॥

परब्रम्हा वरावरी । भेटले हरि विश्वात्मया ॥३॥

निळा म्हणे जोडलीं पदें । ब्रम्हानंदें डुल्लती ॥४॥

१३६२

भाग्यें जोडे सत्संगती । जरि होय हातीं सुकृती ॥१॥

भाव शूध्द संचित गांठीं । तरीच भेटी तयांसवें ॥२॥

शुध्दचर्या आचरण । लाभती चरण तरि हातीं ॥३॥

निळा म्हणे सज्जनसंग । देवा भाग दुर्लभ तो ॥४॥

१३६३

भाव भक्ती भाग्यवंत । तयां संत भेटती ॥१॥

येर ते भाग्यें जाती वायां न भजतां पायां संतांच्या वचनीं यांचे विश्वास धरिती । धन्य ते होती उभय लोकीं ॥२॥

निळा म्हणे या सज्जनापायीं । जीवभाव जिहीं समर्पिला ॥३॥

१३६४

भाविकांची उत्तम जाती । विश्वास धरिती संतवचनीं ॥१॥

तयां फळे त्यांचा भाव । प्रगटे देव हदयात ॥२॥

जाणीवेचा नाहीं फुंद । शुध्दबुध्द होती ते ॥३॥

निळा म्हणे त्यांची स्थिती । नये ते गती जाणतिया ॥४॥

१३६५

भूतीं भगवंत देखिला । मानामान सहजचि गेला ॥१॥

तुमचे कृपेचि हे जाती । स्वरुपीं वेध झाला वृत्ती ॥२॥

व्देषाव्देष निंदा नेणे । चिंता असूया पळती भेणें ॥३॥

निळा म्हणे भूतमांत्रीं । झाला कृपेसी तो धात्री ॥४॥

१३६६

भूतीं भूतात्मा देखतां । ठेली जडोनि एकात्मता । नाढळे गुणदोष वार्ता । नमन नम्रता त्यां अंगी ॥१॥

धन्य त्यांचे जन्मकर्म । सम नाढळे ज्या विषम । गळोनियां क्रोध काम । झाले निष्काम निर्लोभ ॥२॥

संकल्प नासले विकल्प । पुण्य कैंचें तया पाप । ठेलें सवरुपीं स्वरुप । विठ्ठल रुप विठठलीं ॥३॥

अहंकार नुरे उरीं । झाले व्यापक चराचरीं । निजानंदाची उजरी । सन्मुख तयां सर्वदा ॥४॥

निळा म्हणे स्थैर्यबुध्दी । निंर्दंव्द झाले निजात्मबुध्दी । सच्चिदानंद पदोपदीं । कैवल्यसुखें डुल्लती ॥५॥

१३६७

मस्तक माझा पायांवरी । राहो निरंतरी संतांच्या ॥१॥

इतुलेन मी कृतकृत्य । होईन निश्चित संसारीं ॥२॥

धरिल्या जन्माचें सार्थक । भवभयमोचक साधन हें ॥३॥

निळा म्हणे नलगे फार । करणें विचार यावरी ॥४॥

१३६८

म्हणोनियां शब्द न पवेचि तत्वतां । बुध्दीचिया माथां वळघे कोण ॥१॥

मना पवना केंवि घडेल संचार । श्रुती परात्पर म्हणती ज्यातें ॥२॥

नाद बिंदु कळा ज्योती हीं बोलणीं । आरौतीं निर्वाणीं विरती तेथें ॥३॥

निळा म्हणे वर्म नेणती ते सकळें । वाचकें वाचाळे संतावीण ॥४॥

१३६९

म्हणोनियां संतजनां । देती आलिंगना पूजिती ॥१॥

त्यांचियां मुखें ऐकती कथा । मानिती परमार्था फळ आलें ॥२॥

म्हणती आजी धन्य झालों । प्रसाद पावलों संतांचा ॥३॥

निळा म्हणे उत्साह देवा । मानला वैभवा देखोनियां ॥४॥

१३७०

मानामान संकल्प आशा । तुटला मोहजाळ फांसा ॥१॥

तया गुरुचियां भक्तां । नुरेचि कोठें गोंवा गुतां ॥२॥

संर्वातरीं आपुलें रुप । देखती नेणतां विकल्प ॥३॥

निळा म्हणे कर्मातीत । झाले होऊनि कर्मी रत ॥४॥

१३७१

मार्ग दाउनी गेले आधीं । दयानिधी संत पुढें ॥१॥

तेणेंचि पंथें चालोंजातां । न पडे गुंता कोठें कांहीं ॥२॥

मोडूनियां नाना मतें । देती सिध्दांते सौरसु ॥३॥

निळा म्हणे ऐसे संत । कृपावंत सुखसिंधु ॥४॥

१३७२

मुक्ति येती धांवोनियां । प्रीती वरावया हरिभक्तां ॥१॥

रिध्दी सिध्दी वोळगे येती । समागम इच्छिती पुरुषार्थ ॥२॥

शांति क्षमा दया सिध्दी । सारिती उपाधी येऊनियां ॥३॥

निळा म्हणे निरहंकृती न ढळे परती नैराशा ॥४॥

१३७३

मृत प्राणी ते जीवविले । पुरुषहीं केले स्त्रियांचे ॥१॥

हे तों तुमची सहजस्थिती । लोकांसी भक्ति प्रगटावया ॥२॥

प्रसादेंचि विधवेसी बाळ । जन्मविला केवळ भातलवंडा ॥३॥

निळा म्हणे तुमची करणी । देवाहुनी अधिक् ॥४॥

१३७४

याचिलागीं परांगना । मानिती हुताशनापरी ज्ञाते ॥१॥

जवळी गेल्या जाळूं शके । म्हणोनि धाकें पळती त्या ॥२॥

आधीं तों न करिती संभाषण । मी एकांतदर्शन कैचें त्यां ॥३॥

निळा म्हणे शुचिर्भूत । वसती निर्धूत जनीं वनीं ॥४॥

१३७५

यात्रेहूनि आले गांवा । घेऊनियां विठ्ठल देवा ॥१॥

भक्त पूजिती आदरें । टाळ विणे मृदंगस्वरें ॥२॥

दिंडया पताका छबिने । नृत्य हरिकथा गायनें ॥३॥

निळा म्हणे निज भुवनीं । पूजिती स्तविती अनुदिनीं ॥४॥

१३७६

रात्री पळे येतांचि सविता । सिंहगर्जनें कुंजर चळता ॥१॥

तैसें हरिभक्तां सांकडें । येताचि पळे दृष्टीपुढें ॥२॥

महालक्ष्मीचें वारें । येतांचि दरिद्र घे माघारें ॥३॥

निळा म्हणे हरीच्या स्मरणें । हारपोनि ठाती जन्ममरणें ॥४॥

१३७७

रंगले ते संतसंगें । झाले अंगे शुध्द बुध्द ॥१॥

देवचि संत देवचि संत । आणिकांही करीत देवचि ते ॥२॥

कैंचें तेथें व्यवधान । ब्रम्ह सनातन पाववितां ॥३॥

निळा म्हणे न लभे देवा । आणिती भावा त्या संत ॥४॥

१३७८

लाजोनियां समाधीसुख । ठाके अधोमुख हरिभेटी ॥१॥

म्हणोनियां रतले दास । करिती उल्हास नित्य नवा ॥२॥

ऐकोनियां नामावळी । धांवोनी कवळी ह्रदयीं त्या ॥३॥

निळा म्हणे जवळी ठाके । नेदी पारिखे दिसोंचि ॥४॥

१३७९

वाचेतें वदवी रसनेतें चाखती । नेत्रातें दाखवी परि त्या दुरी ॥१॥

बुध्दी बोधविता चित्ता चेतविता । देहीं देहातीता कैसेनि दावूं ॥२॥

भावाभावातीत अव्दैता अव्दैत । ज्यातें म्हणत नेति नेति ॥३॥

निळा म्हणे कांही न होऊनियां जें आहे । दाविती त्याचि सोय सद्गुरु संत ॥४॥

१३८०

विठ्ठल नामें विठ्ठल  झाले । देहभावा विसरुनि गेले ॥१॥

सर्व काळ विठ्ठल  चित्तीं । बहमानंदें ते डुल्लती ॥२॥

विठ्ठल  ध्यानीं मनीं जनीं । विठ्ठल  लोचनीं चिंतनीं ॥३॥

निळा म्हणे भोगी त्यागीं । विठ्ठल  तया जडला आंगीं ॥४॥

१३८१

वैष्णव वसती जये स्थाळीं । तेथें धुमाकुळ कथेची ॥१॥

विठठल देव नाचे उभा । दाटे सभा संतांची ॥२॥

सुखी होती महानुभाव । पावती ठाव तत्पदीं ॥३॥

निळा म्हणे नारी नर । होती तत्पर परमार्थी ॥४॥

१३८२

शुक प्रल्हाद हरिच्या नामें । गातां सुखसंभ्रमें निवाले ॥१॥

त्यांनी उघडूनियां हे मागी । दाविली जगीं हरिभक्ती ॥२॥

तैसाचि नामा विष्णूदास । पावला सौरस परब्रहमीं ॥३॥

निळा म्हणे दाउनी तुका । गेला एका जनार्दन ॥४॥

१३८३

शोधुनियां आले संत । हिताहत जगाचें ॥१॥

तेचि वचनें अनुवादती । सकळां नीतिप्रमाणें ॥२॥

सत्यासत्य ठावें तया । पाहोनियां ठेविलें ॥३॥

निळा म्हणे गुंता गोवा । कांहिंचि जिवा न करिती ॥४॥

१३८४

सकळाहि संत आराधिती । हदयकमळीं ते पूजिती ॥१॥

चरण गोमटे म्हणवूनि । पापा तापा करिती धुणी ॥२॥

नित्यानित्यें आठविती । निळा म्हणे तृप्त झाले । चरणामृतेंचि ते धाले ॥३॥

१३८५

सकळाठायीं भगवदाव । हाचि अनुभव जयाचा ॥१॥

त्याच्या चरणीं लीन व्हावें । उध्दरावें कृपेनें ॥२॥

मावळले कामक्रोध । वृत्ति सन्निध हरीच्या ॥३॥

निळा म्हणे त्याच्या नामें । पापें अधर्म नासती ॥४॥

१३८६

सद्गुरुकृपा वोळली तयां । जे पंढरीराया अनुसरले ॥१॥

भक्ति ज्ञान वैराग्यशीळ । शांति अढळ निवैंरता ॥२॥

भूतदया मानसीं वसे । मातले प्रेमरसे गर्जती ॥३॥

निळा म्हणे ह्रदयीं ध्यान । मुखीं चितंन अहर्निशी ॥४॥

१३८७

सारुनी अवघींच मतांतरें । जे लटिक्यासी खरें मानिती ॥१॥

एकचि दृढाविती भावो । जेणें देवो जोडे तो ॥२॥

सत्य भजन सय भक्ति । सत्यचि बोधिती परमार्थ ॥३॥

निळा म्हणे एकाचि वचनीं । ब्रम्हसनातनीं मेळविती ॥४॥

१३८८

सांगो जातां शब्दचि विरे । जेंवि अंधारें रविभेटीं ॥१॥

सागरीं ठाव बुडीही देतां । न लभेची सर्वथा निर्बुजला ॥२॥

यापरि शब्द न पवेचि तेथें । कैसेनि सुखातें अनुवादें ॥३॥

निळा म्हणे जाणती संत । आहे सिध्दांत तेथींचा तो ॥४॥

१३८९

सांपडली हे सुगम वाट । हरीचिया पाठ नामाचा ॥१॥

ब्रम्हानंदे करिती घोष । कीर्तनीं उल्हास नित्यानीं ॥२॥

हरीचिया प्रेमें रंगोनियां गेले । देहींचे विसरले देहभाव ॥३॥

निळा म्हणे जिंकोनि काळा । भोगिती सोहळा वैकुंठींचा ॥४॥

१३९०

सीत बुंद प्राप्त ज्यासी । निजात्मसुखासी तो पावे ॥१॥

जेथें उभे संतजन । नारायण समावेत ॥२॥

तया सुखा उणें नाहीं । लोकीं तिहीं पूज्य तो ॥३॥

निळा म्हणे हरीचे शेष । करीत नाश कल्मषा ॥४॥

१३९१

सुखाचीच ओतली । मूर्ति याची ठसावली ॥१॥

अविच्छिन्न भगवतबुध्दी । सर्वभूतीं निरवधी ॥२॥

मोह ममता कैंची आतां । आशा कल्पना हरिच्या भक्तां ॥३॥

निळा म्हणे सनकादिकां । अनुभव तैसा त्याचा निका ॥४॥

१३९२

सुरवर इच्छा करिती त्यांची । नित्य हरिभक्तांची भेटावया ॥१॥

म्हणती धन्य हरीचे दास । सर्वदा उदास देहभावीं ॥२॥

दर्शनें यांच्या सर्वही सिध्दी । तुटती उपाधी जन्ममरणें ॥३॥

निळा म्हणे वैकुंठवासी । रंगला प्रेमासी यांचिया ॥४॥

१३९३

सुरदास आंधळा पंजाबी ब्राम्हण । गातां तुमचे गुण धन्य झाला ॥१॥

विसोबा खेचर चांगा वटेश्वर । नरहारी सोनार पाठक नामा ॥२॥

जिवलग तुम्हां सांगाती जीवाचे । विभागी भाग्याचे केले तुम्हीं ॥३॥

निळा म्हणे भेद नाहीं तुम्हां संतां । दाविली भिन्नता प्रीतीसाठीं ॥४॥

१३९४

सूर्य न देखे अंधकारा । अग्नि जेवीं शीतज्वरा ॥१॥

तेंचि हरिभक्तां सांकडे । येऊंचि न शके तयापुढें ॥२॥

हनुमंतासी भूतबाधा । नव्हे कल्पांतीही कदा ॥३॥

निळा म्हणे दत्तात्रया । न बाधी मोह ममता माया ॥४॥

१३९५

सोडोनियां जाती पोतीं । कृपा करुनी दिधलीं हातीं ॥१॥

संत उदार उदार । लुटविलें निज भांडार ॥२॥

होतें सायासें जोडिलें । निक्षेपीचें तें दाविलें ॥३॥

निळा महणे उदारपणा । मेरु संतांच्या ठेंगणा ॥४॥

१३९६

संतकृपा  त्यांसीचि फळे । ज्यांचें चित्त वोळे परमार्थी ॥१॥

काय उणें सुखा मग । संतसंग जोडता ॥२॥

देवचि हातीं लागे तयां । संत जयां प्रसन्न ॥३॥

निळा म्हणे संतांपाशीं । आहे अनायासीं सर्व सिध्दी ॥४॥

१३९७

संतरुपे तुम्हीच धरा । विश्वंभरा अवतार ॥१॥

म्हणोनि महिमा कीर्ति जगीं । वागविती अंगी सामर्थ्य ॥२॥

बोलवउनि रेडा चालविता भिंती । विमानीं होती उपविष्ट ॥३॥

निळा म्हणे मानवी तनु । जाती घेऊनी वैकुंठा ॥४॥

१३९८

संतप्रसाद लाधले । तेचि धाले ब्रम्हारसे ॥१॥

सदा नामीं जडली प्रीति । तेचि करिता उच्चार ॥२॥

भक्ति भाग्य वोसंडलें । वैराग्य आलें मोडोनी ॥३॥

निळा म्हणे अंगी शांति । क्षमा विश्रांति ज्ञानाची ॥४॥

१३९९

संतां ऐसा उदार एक । त्रैलोक्यनायक श्रीविठ्ठल  ॥१॥

आणखी नये तुळणें दुजा । धुंडितां समाजा त्रिभुवनीं ॥२॥

ज्याचिया वचनें भवसिंधु नुरे । मायाभुररें दूरी पळे ॥३॥

निळा म्हणे सगुणवतार । तेंचि परात्पर श्रीहरीचें ॥४॥

१४००

संतांचा वास जये स्थळीं । तेथें रवंदळी पापाची ॥१॥

काम क्रोध जाती विलया । ममता माया देशधडी ॥२॥

तृष्णे कल्पनेचा गांव । वोस ठाव संदेहा ॥३॥

निळा म्हणे अहंकारा । मद मत्सरां उरी नुरे ॥४॥

१४०१

संतांपाशी अपार सुख । हरिखा हरिख वोसंडे ॥१॥

बोलती वचनें तेचि वेद । शास्त्रानुवाद विहिताचे ॥२॥

पुरातन ज्या ज्या उत्तम वाटा । दाविती चोखटां भाविकां ॥३॥

निळा म्हणे यांचा धंदा । हाचि सर्वदा गुण वाणी ॥४॥

१४०२

संतीं जया हातीं धरिलें । ब्रम्हसनातन ते पावले ॥१॥

आणिकां दुर्लभ जें साधनें । यांच्या प्राप्‍त अवलोकनें ॥२॥

फळ अनापेक्ष पावती । प्राणी यांचिये संगतीं ॥३॥

निळा म्हणे कल्पतरु । सामान्य दाते हे ईश्वरु ॥४॥

१४०३

हरावया कलीचे दोष । साच हे अंश श्रीहरीचे ॥१॥

म्हणोनियां सामर्थ्य अंगीं । वागविती जगीं निभ्रांत ॥२॥

भक्तिलेणें लेऊनियां । विचरती मायालाघवी ॥३॥

निळा म्हणे संदेह नाहीं । यदाथीं कांहीं त्रिसत्य ॥४॥

१४०४

हरीचिया भजनें हरिचे जन । करिती पावन पतितांसी ॥१॥

ऐसा त्यांचा अगाध महिमा । निरुपमा तो न वर्णवे ॥२॥

देऊनियां परमार्थसिध्दी । पावविती पदीं श्रीहरीच्या ॥३॥

निळा म्हणे सत्संगसुख । गणितां अधिक् परमामृता ॥४॥

१४०५

हरीच्या पढोनियां नामावळी । करिती होळी महादोषा ॥१॥

तेचि धन्य देहधारी । या माझारीं कलियुगा ॥२॥

सत्य वाणी सत्याचि क्रिया । जे आचरोनियां वर्तती ॥३॥

निळा म्हणे त्यांचिया संगें । उध्दरिजे जगें अनायासें ॥४॥

१४०६

हरिभक्त माझे जिवलग सांगाती । सांभाळूनी नेती परलोका ॥१॥

वचनेंचि त्यांच्या होय महा लाभ । करी पदमनाभ कृपादृष्टी ॥२॥

मोहादिबंधनें जाती तुटोनियां । कळिकाळहि पायांतळीं दडे ॥३॥

निळा म्हणे मुक्त मोकळिया वाटा । जावया वैकुंठा त्यांच्या संगें ॥४॥

१४०७

हरिभक्तीच्या जाणोनी नीति । त्याचि उपदेशिती भाविकां ॥१॥

पडो नेदिती अडचणी गोवा । जातां देवा भेटिसी ॥२॥

बैसवूनियां सुखासनीं । पावविती धमीं वैकुंठा ॥३॥

निळा म्हणे देऊनी संग । ठेविता अभंग हरिपदीं ॥४॥

१४०८

हेंचि त्यांचे नित्य काम । दावणें धर्म विहिताचे ॥१॥

ज्याचें तया स्वहित जोडें । ऐसें उघडें बोलती ॥२॥

नि:सीम पांडुरंगी भक्ति । उपजे विरक्ति भाविकां ॥३॥

निळा म्हणे ऐसी वाणी । वदती पुराणीं प्रतिपादय ॥४॥

१४०९

संतभेटीचें आरत । उभाचि राहिला तिष्ठत ॥१॥

बापकृपाळु श्रीहरी । वाट पाहे निरंतरीं ॥२॥

धांव घालूनियां पुढें । आलिंगी त्या वाडेंकोडें ॥३॥

निळा म्हणे नवाची नित्य । सोहळा भक्तांचा करित ॥४॥

१४१०

दळणीं दळीतां आठवे मानसीं । अलंकापुरवासी ज्ञानराज ॥१॥

वोविया मंगळी गाईन तयासी । स्वामी तुकयासी निजानंदे ॥२॥

एकाजनार्दन आणि नामदेव । देति स्वानुभव आठवितां ॥३॥

परलोकसोईरे जिवलग हे माझो । जें का पंढरिराजे अनुग्रहीले ॥४॥

निळा म्हणे संत जे जे भूमंडळीं । त्यांची पायधुळी वंदीन मी ॥५॥

१४११

धन्य त्यांची तयां माय प्रसवली । ज्यांची निष्ठा जडली विठ्ठल रुपीं ॥१॥

विठ्ठल  आसनीं विठ्ठल  भोजनीं । विठ्ठल  शयनीं न विसंबती ॥२॥

त्यांचे सर्व काम पूर्ण मनोरथ । करिल हा नाथ पंढरिचा ॥३॥

निळा म्हणे ज्यांचा हेत पांडुरंगीं । रंगले ते जगीं धन्य जाले ॥४॥

१४१२

दैव आलिया त्याचिया दैवा । करिता सेवा आवडी ॥१॥

तेही झाले संतचि अंगे । करिती संगे आणिकां ॥२॥

सहज त्यांची वर्तणुक । अवघ्या अधिक् साधनां ॥३॥

निळा म्हणे बोलती गोठी । त्याची रहाटी वेदाच्या ॥४॥

१४१३

यमधर्मही इच्छी भेटी । हरिभक्तां दृष्टीं पहावया ॥१॥

म्हणे त्यांच्या मुखें कथा । होईन ऐकतां पावन मी ॥२॥

जीहीं भुलविला हरी । कीर्तनगजरीं करुनियां ॥३॥

निळा म्हणे धन्य ते वाणी । गर्जत गुणीं सर्वदां ॥४॥

१४१४

येकायेक पण । नसंपडे दुजेंनविण ॥१॥

म्हणोनियां भक्त केला । आधीं मग देव जाहला ॥२॥

फुला आधीं फळ । नव्हेचि मुळेंविण डाळ ॥३॥

निळा म्हणे लेंक । होतां बापपणा बिक ॥४॥

१४१५

माझें माझे हातीं हीत । दिधलें संतमुनिश्वरीं ॥१॥

काय उत्तीर्ण होऊं कैसा । उपकारें आकाशा झांकोळिलें ॥२॥

जिहीं पाजीलें अमृत धणीं । तयां कांजवणी काय देऊं ॥३॥

निळा म्हणे रत्पपालटा । सागरगोटा काय तुके ॥४॥

१४१६

संतसंगें हरे पाप । संतसंगे निरसे ताप । संतसंगे निर्विकल्प । होय मानस निश्चळ ॥१॥

संतसंगे वैराग्य घडे । संतंसगे विरक्ती जोडे । संतसंगे निजशांति वाढे । साधन ह्रदयीं अखंडित ॥२॥

संतसंगे हरिची भक्ति । संतसंगें ज्ञानविरक्ति । संतसंगें भुक्तिमुक्ती । साधकां वरिती अनायासें ॥३॥

निळा म्हणे साधुसंगे । महाभाग्याचें हें भाग्य । सेविती ते स्वरुप चांग । पावती आत्मया श्रीहरीचें ॥४॥

१४१७

संतवारें आलें वरी । चराचरीं धन्य तो ॥१॥

संत सेवा घडली ज्यासी । प्रसन्न त्यासी देव सकळ ॥२॥

संत वचनीं विश्वासला । पूज्य तो झाला त्रिभुवनीं ॥३॥

निळा म्हणे संतभेटी । निरसन कोटी संदेहा ॥४॥

१४१८

होऊनियां तेचि राहिले निवांत । रुपीं अखंडित होउनी संत ॥१॥

नित्य निरामय अखंड अव्दय । ध्याती देवत्रय ज्यातें सदा ॥२॥

येकविसा स्वार्गातें कवळुनी राहिलें । सूर्या प्रकाशिेलें जेणें तेजें ॥३॥

निळा म्हणे कृपा करुनिया सद्गुरु । देती अभयकरु त्यासी फावे ॥४॥

१४१९

सर्वकाळीं एकात्मता । जोडली त्या भाग्यवंता ॥१॥

ज्याचा गेला अहंकार । गळोनीया मद मत्सर ॥२॥

जें जें दृष्टीपुढें देखें । तें तें हरीरुपें वोळखे ॥३॥

निळा म्हणे नित्य केला । पूर्णबोधें उदो त्याला ॥४॥

१४२०

हरीच्या नामें हरीचे दास जाले सकळिकांस वंदय जगीं ॥१॥

समोर त्याच्या नये काळ । कळिचा अमंगल म्हणउनी ॥२॥

वदनीं त्यांच्या निघता घोष । पळती दोष इतरांचे ॥३॥

निळा म्हणे केली वाट । सोपी वैकुंठप्राप्तीची ॥४॥

१४२२

म्हैसीपुत्रामुखें बोलवणें श्रुती । चालवणें भिंती बैसोनियां ॥१॥

नव्हे हा सामान्य महिमा संतांचा । नैवेदय हातींचा मूर्ती जेवी ॥२॥

उदकामाजी वह्या ॥ ठेऊनी कोरडया । दाखवणें रोकडया विश्वजनां ॥३॥

निळा म्हणे तिहीं संगेंचीं तारणें । दीने उध्दरणें नवल कोण ॥४॥

१४२१

हरीच्या भजनें हरीचे भक्त हरीचे भक्त । झाले विख्यात भूमंडळीं ॥१॥

तरोनि आपण तारिले आणिका । वैकुंठनायका प्रिय झाले ॥२॥

ज्यांचे ध्यानी मनीं हरी । राहिला निरंतरीं दृष्टीपुढें ॥३॥

निळा म्हणे अवघेचि सांग । केले उभय भोग भोगुनियां ॥४॥

१४२३

सुदिन होय साधकांसी । जरी ते अनायासी भेटती ॥१॥

बोध प्रतापाची वाणी । गर्जविती गुणीं श्रीहरीच्या ॥२॥

ऐकती त्यांचे हरे पाप । निरसे ताप त्रिविध ॥३॥

निळा म्हणे भूतळीचे । देवचि साचे बोलते ते ॥४॥

१४२४

ईश्वरा नियंता निगुण । नाम रुप जया नाहीं वर्ण । विदया अविदयातीत चिदधन । आपणा जो आपण्‍ गुरुशिष्य ॥१॥

नातळोनि महदहंकार मायेसी । सहजचि गुणतीत तो अनायासीं । होणें निमणें नाहीं ज्यासी । आपण आपणासी कदा न देखे ॥२॥

नुरवुनी एक एकपण । दुजेपणा घालीत शून्य । पूर्णपणें नुरवीच पूर्ण । तत्साक्षी आपण सर्वद्रष्टा ॥३॥

ऐसिया आदि गुरुमूर्ति । आपणचि पुरुष आपण शक्ति । उमामहेश ऐशिया ख्याति । वाढउनी त्रिजगती विस्तारिली ॥४॥

मग आपण गुरु आपण शिष्य । आपण दीक्षा आपण उपदेश । दाउनी परंपरेचा मोस । अभेदज्ञानास प्रगटीतु ॥५॥

म्हणोनियां जी आदिनाथा । प्रकृति पुरुष तूंचि तें आतां । सकळ विश्वी विश्वजनिता । करिसी तत्वता निजबोध ॥६॥

शिव शक्ति निमित्य दावून । उपदेशिलें निजगुह्यज्ञान । तेणें देवोदेवि सुखसंपन्न । पावला मीन तो लाभ ॥७॥

तेणें गोरक्षीं उपदेशिला । निजात्मज्ञानीं प्रबोधिला । त्रैलोक्यमाजी गौरविला । योग दाविला विषदार्थ ॥८॥

गुह्यात़गुह्यज्ञानकथन । तेणें गहिनीतें उपदेशून । उध्दरावया दीन जन । तेणें निवृति शिक्षापिला ॥९॥

तेचि हातवटी ज्ञानेश्वरा । दिधली आदिपरंपरा । सोपान मुक्ताई वटेश्वरा । चांगया प्रसाद दिधला ॥१०॥

निळा म्हणे ऐसियापरी । नाथसांप्रदायाची थोरी । प्रगट केली ज्ञानेश्वरी । भगवदगीता उकलुनी ॥११॥


संत निळोबाराय गाथा । संत निळोबाराय अभंग । निळोबा अभंग । निळोबा गाथा । सर्व गाथा । निळोबाराय माहिती । पिंपळगाव मंदिर निळोबाराय । sant nilobaray gatha | sant nilobaray abhang | niloba abhang | niloba gatha | sarv gatha | nilobaray mahiti | nilobaray mandir pimpalgav |देवभक्त यांची एकरुपता | संतांचें वर्णन।                

तुमच्या शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांतीला भेट द्या .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *