संत निळोबाराय (कीर्तनपर)
१०७७
आतां अवघे हरिचे जन । करा हो चिंतन नामाचें ॥१॥
देव नुपेक्षील सर्वथा । करा कथा कीर्तनें ॥२॥
टाळ मृदंग लावा भेरी । नाचा गजरी हरिनामें ॥३॥
निळा म्हणे वैकुंठवासी । येती भेटीसी तुमचीये ॥४॥
१०७८
आवडोनी रुप मनीं ॥३॥ धरिले वदनीं हरिनाम ॥१॥
त्याचें सांग झाले सफळ । आलियाचें फळ नरदेहा ॥२॥
रुचला संतसमागम । आपुलिया धर्म कुळाचा ॥३॥
निळा म्हणे भगवत्कथा । गातां ऐकतां निज मोक्ष ॥४॥
१०७९
ऐकतां श्रवणीं परमानंद । उपमर्दे कंद मायेचा ॥१॥
घोशगजरें गजें वाचा । जो श्रुतिशास्त्राचा गुह्यार्थ ॥२॥
परम रसाळ मधुराक्षरें । चालती सुस्वरें हरिभजनें ॥३॥
निळा म्हणे सुमंगळ। ऐश्वर्य कल्लोळ प्रेमाचे ॥४॥
१०८०
कथाश्रवणें उपजे विरक्ति । कथाश्रवणें वाढे शांति । कथाश्रवणें परमानंद प्रप्ति । कथा श्रवणें ॥१॥
पापी उध्दरती । कथा श्रवणें उपाधी तुटे । कथाश्रवणें भवाब्धि आटे । कथाश्रवणें सच्चिदानंद भेटे । समुळ तुटे मायाजाळ ॥२॥
कथाश्रवणें स्वरुप स्थिति । कथाश्रवणें विषय समाप्ती ॥३॥
कथाश्रवणें मीपण नुरे । कथाश्रवणें अभिमान विरे । कथाश्रवणें कल्पनाहि चुरे । ब्रम्ह साक्षात्कारें भेटिसी ये ॥४॥
निळा म्हणे प्रथम पायरी । हरिकथा श्रवण मनन वरी । निजघ्यासें आत्मया हरी । भेटीजे निर्धारी साक्षात्कारें ॥५॥
१०८१
कथा श्रवणें स्वरुप सिध्दी । लागे समाधि सात्विका ॥१॥
ऐसा लाभ जोडे जोडी । बैसतां आवडे हरिकथे ॥२॥
कथा श्रवणें परिहार दोषां । होताति पाशमुक्त पापी ॥३॥
निळा म्हणे हरिकथा श्रवण । करी बोळवण जन्ममृत्या ॥४॥
१०८२
कथाश्रवणें विरक्ति जोडे । निजशांती वाढे उल्हासें ॥१॥
कथाश्रवणें परमानंद । प्रगटे स्वानंद निज ह्रदयीं ॥२॥
कथाश्रवणें उपाधी तुटे । भवाब्धी आटे नि:शेष ॥३॥
निळा म्हणे कथाश्रवणें । हरती मरणें जन्म जरा ॥४॥
१०८३
कर्मे वांटिलीं चहूं वर्णा । क्षत्रिय वैष्य आदि ब्राम्हणा । वेदपुरुषा नारायणा । गुणविवंचना तुज हातीं ॥१॥
यज्ञ षटकर्मे ब्राहमाणांसी । क्षात्रदान क्षत्रियांसी । कृषीगोरक्षवाणिज्य वैश्यासी । सेवा शूद्रासि याचिते ॥२॥
नामें स्तोत्रें स्त्रियांदिकांसी । सेवा वांटिली अधिकारेंसी । संतसनकादिक योगियांसी । स्वानुभव सिध्दांत दिधले ॥३॥
कथा कीर्तन सकळ लोकां । आधिलांपासुनि अनामिकां । तरणोपाय विश्वव्यापका । केला नेटका विधिमागें ॥४॥
निळा म्हणे ऐसियापरी । कृपा करुनियां श्रीहरी । जीव तारिले भवसागरीं । भक्तकैवारी म्हणोनियां ॥५॥
१०८४
कीर्तन केलें ब्रम्हानंदे । ध्रुव प्रल्हादें एकनिष्ठ ॥१॥
तयां केलें सुखसंपन्न । त्रैलाक्यीं मान वाढवुनी ॥२॥
तैसेचि शुक नारदमुनी । पावले कीर्तनीं समाधिसुख ॥३॥
निळा म्हणे बहुतां संतां । कीर्तन अव्दैता मेळविलें ॥४॥
१०८५
कीर्तनरगें जे जे । ते ते सहजें हरिप्रीय ॥१॥
येर मुमुक्ष्रू जे जे होती । कीर्तनें पावती ते लाभा ॥२॥
महा अनुष्ठान हरिची कथा । नित्य जोडतां सुखप्राप्ती ॥३॥
निळा म्हणे कैवल्यपद । पावती अभेद हरिकीर्ति ॥४॥
१०८६
कीर्तनाची आवडी मोठा । धांवे पाठीं वेष्णवा ॥१॥
जेथें होती नामघोष । नाचें उदास ते ठायां ॥२॥
ऐकोनियां आपुली कीर्ति । सुखें जगपती सुखावें ॥३॥
निळा म्हणे टाळिया छंदे । डुले आनंदे सुप्रेमें ॥४॥
१०८७
किर्तनाचा घोष गजर । ऐकतां अपार उध्दरले ॥१॥
ऐसे किती सांगावे ते । कीतनें सरते वैकुंठी ॥२॥
आदिकरुनी स्त्रिया बाळें । कीर्तनकल्लोळें हरिपदीं ॥३॥
निळा म्हणे श्रोते वक्ते । एकात्मतेतें पावले ॥४॥
१०८८
कीर्तनें धुवट केलें लोकां । दोष कळंकापासुनी ॥१॥
टाळिया हरिनामाच्या घोषें । पळती त्रासे कलिमल ॥२॥
स्वानुभवें वेधल्या वृत्ती । श्रोतेहि होती चतुभुर्ज ॥३॥
निळा म्हणे श्रोते वक्ते । एकात्मतेतें पावले ॥४॥
१०८९
केला जिहीं नामपाठ । तयां वैकुंठ मोकळें ॥१॥
न साधे जें योगयागें । कथाप्रसंगे सुलभ तें ॥२॥
कीर्तनाचे घोष जेथें । होती तेथें हरि उभा ॥३॥
निळा म्हणे सुलभ ऐसें । आन साधनचि नसे कलियुगीं ॥४॥
१०९०
कोणाचीहि न धरुनी आशा । भजावें जगदीशा कीर्तनें ॥१॥
मग तो कृपेचा सागर । उतरील पार भवसिंधू ॥२॥
तोडूनियां ममता जाळ । करील कृपाळ वरी कृपा ॥३॥
निळा म्हणे आवडी त्यासी । कीर्तनापाशी तिष्ठतु ॥४॥
१०९१
चर्हाटिया दंतकथा । माजी अनर्था कारण ते ॥१॥
शुध्द भावें हरि कीर्तन । करितां जनार्दन संतोषे ॥२॥
चातुर्यवाणी रंजवण । थित्या खंडण प्रेमाचें ॥३॥
निळा म्हणे घडती दोष । निंदा उपहास इतरांचे ॥४॥
१०९२
जेणें कीर्तनीं धरिली निष्ठा । झाला वरिष्ठा तो ॥१॥
पहा प्रल्हाद दैत्यवंशी । झाला देवासी परम पूज्य ॥२॥
नामा शिंपी विष्णुदास । यवन कबिरास बहुमान ॥३॥
निळा म्हणे कीर्तनरंगी । रंगले जगीं धन्य झाले ॥४॥
१०९३
जो जो काळ कीर्तनीं जाय । तो तो हाय सार्थक ॥१॥
घटिका पळही न वचे वांयां । चुकवी आपायापासुनी ॥२॥
न लगे जन्मांतरा येणें । पुढती मरणें मागुती ॥३॥
निळा म्हणे ऐसा निका । उपाय नेटका सकळांसी ॥४॥
१०९४
देखोनियां संतमेळा । कीर्तन सोहळा धांव घाली ॥१॥
ऐकावया आपुलीं नामें । गुणसंभ्रमें नित्य नवे ॥२॥
बैसोनियां प्रेम वांटी । नाचे परवडी मग सवें ॥३॥
निळा म्हणे आपुल्या सुखें । वांटी हारिखें भुक्ति मुक्ति ॥४॥
१०९५
धन्यरुप झाला काळ । करितां कथा गदारोळ ॥१॥
आजि पोखल्या आयणी । प्रेमसुखाचिया जेवणीं ॥२॥
होउनी ठेला दिव्यरुप । पुण्य निरासेनियां पाप ॥३॥
निळा म्हणे निमग्नता । झाली मन बुध्दि चित्ता ॥४॥
१०९६
नारद वैष्णवांचा शिरोमणी । नाचे कीर्तनीं सर्वदा ॥१॥
देवोचि त्याची पूजा करी । आणि नमस्कारी भेटतां ॥२॥
दैत्यां घरीं बहुमान त्याचा । ऐसा कीर्तनाचा बडिवार ॥३॥
निळा म्हणे तिहीं लोकांत । कीर्तनें विख्यात हरिभक्त ॥४॥
१०९७
नित्यानंदे घोषें करितां हरीचें कीर्तन । श्रोते आणि वक्ते होती परम पावन ॥१॥
आणिकहि लोक तरती त्यांच्या सहवासें । भाळया भोळया भाविकांसी लाभ अनायासें ॥२॥
जेथें नित्य नामघोष टाळिया गजर । तेथें रंगी नृत्य करी रुक्मिणीवर ॥३॥
निळा म्हणे तोचि प्रसन्न होउनी दासासी । भुक्ति आणि मुक्ति ठेवी त्यांच्या सहवासीं ॥४॥
१०९८
पाहोनियां हरिकीर्तन । होती प्रसन्न देव तुम्हा ॥१॥
संनकादिक येती भेटी । कथा गोमटी ऐकावया ॥२॥
संत महंत येउनी पुढें । बैसती गाढे कीर्तनीं ॥३॥
निळा म्हणे पांडुरंग । रंगी रंग मेळचीन ॥४॥
१०९९
भवरोगें जे पिडले लोक । तिहीं आवश्यक सेवावें ॥१॥
महा मात्रा हरिकीर्तन । उरलें रसायन निज निगुतीं ॥२॥
मागें बहुतां गुणसी आलें । आरोग्यचि ठेविलें करुनियां ॥३॥
निळा म्हणे सांगता फार । होईल विस्तार नामें त्यांची ॥४॥
११००
लोंढा आला सात्विकचा । पूर अदभूत या प्रेमाचा ॥१॥
तेणें लागती वोसाणें । स्वानंदचि नामस्मरणें ॥२॥
मनोमीन तळपताती । गोड अर्थातें कवळिती ॥३॥
निळा म्हणे उभय तीरें । श्रोते वक्ते निर्मळ नीरें ॥४॥
११०१
वैराग्याचा मेरु तो गोरा कुंभार । तोडियले कर आणेसाठीं ॥१॥
महाव्दारीं कथा श्रवण करितां । टाळी वाजवितां निघती नवे ॥२॥
तुम्ही देवा कृपादृष्टी अवलोकिला । ह्रदयीं तो धरिला प्रीतिकरीं ॥३॥
निळा म्हणे तुम्हां दासाचा अभिमान । अवतार म्हणूवन धरणें लागे ॥४॥
११०२
शिंपी सोनार चांभार । ब्रम्हणादि नारी नर ॥१॥
हरीच्या कीर्तनें हरीचे भक्त । होऊनि ठेले जीवन्मुक्त ॥२॥
सुतार कुंभार यवन । अंत्यजादी हीन जन ॥३॥
निळा म्हणे क्षेत्री शूद्र । वैश्यहि पावले मुक्तिपद ॥४॥
११०३
श्रवण कथेचें सादर । करिती नर सभाग्य ते ॥१॥
सुख पावोनियां विश्रांती । मोक्षपदां जाती सुखरुप ॥२॥
अगाध महिमा भगवदगुणीं । संत पुराणीं गर्जती ॥३॥
निळा म्हणे हरिचें नाम । सकळां भस्म करी पापा ॥४॥
११०४
श्रीहरिच्या संकीर्तनें । तुटलीं बंधनें बहुतांची ॥१॥
होऊनियां उपरती । राजा परीक्षिती उध्दरला ॥२॥
कीर्तनें नारद मुक्त शुक । आणि सनकादिक प्रल्हाद ॥३॥
निळा म्हणे हरीची कथा । एकात्मता देवाभक्तां ॥४॥
११०५
सांगो जातां न कळे वाचा । महिमा कथेचा अपार ॥१॥
श्रवणें पठणें हरिची कीर्ती । नाना याति उध्दारल्या ॥२॥
चतुष्पदें श्वानसूकरें । श्रवणवदारें मुक्ति त्यां ॥३॥
निळा म्हणे कीटक पक्षां । कीर्तनें वृक्षा हरिप्राप्ती ॥४॥
११०६
सांडूनि गुणदोषांची मात । करावा संघात संतांचा ॥१॥
साधकां हे सुगम वाट । वस्ती वैकुंठ पावावया ॥२॥
नित्य करितां हरीचीं कथा । दोषा दुरिता संहार ॥३॥
निळा म्हणे धरिल्या चित्तीं । भाविकां लाभती स्वानुभाव ॥४॥
११०७
सुखें भिक्षा मागोन खावें । हरीचें करावें कीर्तन ॥१॥
कलियुगीं हें साधन सार । भवसिंधू पार पाववितं ॥२॥
नेघोनियां गुणदोष । करावें घोष हरिनामें ॥३॥
निळा म्हणे सुगम सिध्दी । तुटती उपाधी सकळही ॥४॥
११०८
सोहळा तो देखोनियां । लागती पाया मोक्ष मुक्ति ॥१॥
जये रंगीं नाचे हरी । कीर्तनगजरीं सत्संगें ॥२॥
तेथें कोण पाड येरा । साधनसंभारा तर्कवादा ॥३॥
निळा म्हणे योगायाग । ठाकती मृग आरोगुनी ॥४॥
११०९
हरीची कथा अमृतरस । गोड ग्रास नामावळी ॥१॥
तेणें करुं सर्वदा तृप्ती । क्षुघे निवृत्ती तृषेची ॥२॥
अजर अमर होते काया । अविदया माया निरसोनी ॥३॥
निळा म्हणे कीर्तनीं सिध्दी । लाभे समाधी हरिभक्तां ॥४॥
१११०
हरीचें मनोहर कीर्तन । हेंचि साधन कलियुगीं ॥१॥
नको आणिकां मतांतरी । पडो भवसागरीं वहावसी ॥२॥
निश्चयाचें उत्तर हेंचि । करावी हरीची हरीभक्ती ॥३॥
निळा म्हणे ऐसें कानीं । सांगितले येऊनि गुरुदेवें ॥४॥
११११
संतोषतरुचें हें फळ । आलें रसाळ पक्कदशे ॥१॥
सेविती ते तृप्त होती । ब्रम्हता पावती सनातन ॥२॥
रुची ऐसें आवडे तया । विरक्ता संसारिया सुखदाते ॥३॥
निळा म्हणे श्रवणपुटीं । लावितांचि पुष्टीकारक ॥४॥
१११२
पतना न्यावें जिहीं दोषीं । कीर्तनीं तयांसी हा रस ॥१॥
जैसें बीज भाजल्याअंतीं । नुगवेचि शेतीं पेरिल्य ॥२॥
तैशीं जळती कर्माकर्मे । एका हरिनामें गर्जतां ॥३॥
निळा म्हणे श्रोता वक्ता । होती उभयतां शुचिर्भूत ॥४॥
१११३
भूतीं उपद्रव दिधला । ताडिला अथवा निस्तेजिला । तेणें चित्ती दाहो जाला । अधिभौतिक बोलिला तो ताप ॥१॥
देहीं प्रगटे रोगव्याधी । तेणें आहाळली तापे बुध्दी । लोळे न पुरे दु:खावधी । आध्यात्मिक त्रिशुध्दि तो ताप ॥२॥
दैवें अतिवृष्टि का अनावृष्टि । रजीकें लुटिलें जाला कष्टी । आगीनें जळतां नावरें संकटीं । तो अधिदैव ताप बोलिजे ॥३॥
ऐसे त्रिविधताप सत्संगती । विवकेश्रवणें विलया जाती । म्हणोनि कीर्तनी बुध्दिमंतीं । आवश्य श्रवणार्थी बैसावें ॥४॥
निळा म्हणे होईल लाभ । ब्रम्हानंदा निघती कोंभ । प्रसन्न होउनी पद्मनाभ । शीतळ करील सर्वार्थीं ॥५॥
संत निळोबाराय गाथा । संत निळोबाराय अभंग । निळोबा अभंग । निळोबा गाथा । सर्व गाथा । निळोबाराय माहिती । पिंपळगाव मंदिर निळोबाराय । sant nilobaray gatha | sant nilobaray abhang | niloba abhang | niloba gatha | sarv gatha | nilobaray mahiti | nilobaray mandir pimpalgav | कीर्तनपर |
तुमच्या शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांतीला भेट द्या .