संत निळोबाराय गाथा (मंगलाचरण)

संत निळोबाराय (नामपर)

संत निळोबाराय (नामपर)

१०००

अखंड भूतदया मानसीं । वाचे नाम अहर्निशी । तया न बिसबे हषिकेशी । मागें मागें हिंडतसे ॥१॥

जिहीं परकारणीं वेंचिलें । शरीर आयुष्य आपुलें । धन वित्तही वंचिले । तयां विठठलें सन्मानिजे ॥२॥

जिहीं गाईलें नित्य नाम । अंतरीं धरुनियां प्रेम । तया वस्तिसी निजधाम । निर्मूनियां ठेविलें ॥३॥

जिहीं धरिला संतसंग । दुराविलें त्रिविध जग । तया सखा पांडुरंग । निजानुभवें जोडला ॥४॥

निळा म्हणे सद्गुरु भक्ति । दास्य ब्राम्हणांचे अनुरक्ती । तयालागीं हा श्रीपती । करी सांगाती आपुला ॥५॥

१००१

अवघियांचे असोनि देहीं । अतर्बाही न दिसचि ॥१॥

जेवीं साखरेमाजी गोडी । न दिसे उघडी असतांही ॥२॥

वादय दिसती न दिसे नाद । जेविं कां स्वाद भोजनीं ॥३॥

निळा म्हणे जाणों जातां । जाणोनि नेणता वेद जेथें ॥४॥

१००२

आतांहि जे गाती नामें । ते पावती निजात्मधामें ॥१॥

ऐसी नामा अंगी शक्ती । आहे ठेविली श्रीपति ॥२॥

मुख्य पाहिजे विश्वास । निद्रा सांडूनियां आळस ॥३॥

निळा म्हणे जे जे गाती । ते ते परमपदा जाती ॥४॥

१००३

आला स्वानुभवा । बहुतांसी हा आहे ठावा ॥१॥

उच्चार या हरिनामाचा । तरणेपावचि भवसिंधूचा ॥२॥

सांगितला संती । प्रतीती पाहोनियां अंती ॥३॥

निळा म्हणे निश्चयाचा । सुमगोपाव हा मोक्षाचा ॥४॥

१००४

उच्चारितां नाम वाचे । झालें त्याचें स्वरुपचि ॥१॥

नाहीं तया उरले दुजें । आत्मतेजें जग भासे ॥२॥

ब्रम्हानंदी निमग्न वृत्ति । विराजती स्वानंदे ॥३॥

निळा म्हणे गुणातीत । अखंडित निजबोधें ॥४॥

१००५

उपदेशिला एकचि सार । मजही उच्चार नामाचा ॥१॥

म्हणती न पडे साधन फंदीं । होशिल दोंदी काळाचा ॥२॥

करीं संत समागम । गाईं हरिनाम कीर्तनीं ॥३॥

निळा म्हणे ऐसा संतीं । केला निज प्रीति उपदेश ॥४॥

१००६

एक गांऊ आम्ही विठोबाचें नाम । सकळहि धाम मंगळाचें ॥१॥

इतर साधनें फळ काम देती । पुनरपी आणिती गर्भवसा ॥२॥

योग याग स्वर्ग काम फळदाते । म्हणोनियां त्यातें दूषिती संत ॥३॥

निळा म्हणे नाहीं विकार हरिनामा । पाववी निजधामा स्वस्ति क्षेम ॥४॥

१००७

एकचि नाम विठोबाचें । उच्चारितां वाचे उणें काय ॥१॥

रिध्दी सिध्दी लोटांगणीं । येती धांवोनि चोजवीत ॥२॥

भुक्ति मुक्ति जवळूनियां । नवजाती ठाया आन कोठें ॥३॥

निळा म्हणे सर्वही सुखें । वसती हरिखें जवळी त्या ॥४॥

१००८

एका हरिच्या नामेंविण । कली दुर्गम साधन ॥१॥

म्हणोनियां न येती मना । करोत जैसी ज्या भावना ॥२॥

आम्हां हरिभक्तां दुषण । छंदे बंद अवलक्षण ॥३॥

निळा नाणूं दृष्टी । ऐसी अभगी करंटी ॥४॥

१००९

एका हरिच्या नामाचिसाठीं । चढला वैकुंठीं गजेद्र पशु ॥१॥

व्दंव्दाचिया महामारी । ओढितां जळचरीं जळा आंत ॥२॥

तैसाचि प्रल्हाद नामचि गातां । शस्त्र अग्नी घाता विष न करी ॥३॥

निळा म्हणे हरिचे भक्त । हरिनामें मुक्त बहुत झाले ॥४॥

१०१०

एकोनियां हरिनाम घोष । पळती दोष दिगंता ॥१॥

जेंचि हनुमंताचिये हांके । कांपती धाकें निशाचरें ॥२॥

अथवा पडतांचि रविकिरण । जाय हरपोन अंधकार ॥३॥

निळा म्हणे घोकिलें जिहीं । घेतला तिहीं अनुभव हा ॥४॥

१०११

कळासलें मनीं । तेंचि उपदेशा तोंची कानीं ॥१॥

भवाब्धी हा तारावया । नाम तुमचें पंढरिराया ॥२॥

आपणा आणि आणिकां । आड येऊं नेदूं शंका ॥३॥

निळा म्हणे जीवेंसाठीं । करितो करुनियां आटी ॥४॥

१०१२

काम क्रोध पळती दुरी । माया तृष्णा आपापरी ॥१॥

विठ्ठल  नामाचिया गजरें । दोष गेले दिगांतरें ॥२॥

अहं ममता देशघडी । आशा चिंता झाली वेडी ॥३॥

निळा म्हणे ऐसें झालें । हरिच्या नामे हरिचि केलें ॥४॥

१०१३

काय करावी तपसाधनें । हरिनाम चिंतनें सर्व सिध्दी ॥१॥

हा गे वाल्‍मीक रामचि झाला । प्रल्हादें जिंकीला व्दंव्दसमूह ॥२॥

गजेंद्र पशू नामचि जपतां । मुक्ति सायुज्यता भोग भोगी ॥३॥

निळा म्हणे हरिनाम वाड । मुक्तिचें सांकड नाहीं आम्हां ॥४॥

१०१४

केला प्रतिपक्ष आपुल्या अभिमानें । तोडिली बंधनें बहुतांची ॥१॥

जिही उच्चारिलें अनुतापें नाम । त्यांचे जन्ममरण निवारिलें ॥२॥

कोणीये यातीचा हो कां कोणी । एका केलें कवतुक त्याचें तुम्ही ॥३॥

निळा म्हणे सजना जातीचा कसाई । रंका बंका तोहीं उध्दरिला ॥४॥

१०१५

केले सुखी फार  । कांही न करिता विचार ॥१॥

कोण याती कैसें कुळ । नामें आळवितां कृपाळ ॥२॥

केले वरिष्ठ सकळा । प्रेमे देऊनियां गळां ॥३॥

निळा म्हणे वाढविले । वैकुंठीं ते सरते केले ॥४॥

१०१६

जन्म जरा तुटती रोग । धरितां अनुराग हरिनामींची ॥१॥

ऐसा अनुभव सांगती संत । पावले प्रतीत आंगेंचि ते ॥२॥

तरोनि आपण आणिकां तारिती । जड जीवा दाविती मार्ग सोपा ॥३॥

निळा म्हणे नाम वरिष्ठ साधना । माजीं त्रिभुवना आख्या याची ॥४॥

१०१७

जिव्हाग्रीं ठेवितांचि गोड । पुरे कोड सकळही ॥१॥

तें या विठोबाचे नाम । सर्वदा निष्काम फळदाते ॥२॥

उच्चारचि करितां ओठीं । जाळित कोटी पापांच्या ॥३॥

निळा म्हणे साधन ऐसें । सुलभचि नसे दुजें आन ॥४॥

१०१८

जिहीं गाईलें हरिचे नाम । आतळों कर्म नेदी त्यां ॥१॥

जन्म जरा हरुनी व्याधी । बैसवी पदीं अपुलीया ॥२॥

ऐसा अगाध मिहिमा याचा । वर्णितां वाचा न पुरती ॥३॥

निळा म्हणे स्तवितां संतीं । अपार मती वेदांचिये ॥४॥

१०१९

जेथूनियां येणेंचि नाहीं । फिरोनियां कांही संसारा ॥१॥

तया नांव परमपद । लाभती मृग्ध हरिनामें ॥२॥

पहा नवलाव हा कैसा । वानरां रिसां पदप्राप्ति ॥३॥

निळा म्हणे श्रीराम सेवे । नामानुभावें मर्कटे ते ॥४॥

१०२०

तरलें तों असंख्यात । सांगो जातां न लागे अंत ॥१॥

एका हरीच्या नामासाठीं । भरल्या विमानांच्या कोटी ॥२॥

नाना याति स्त्रिया पुरुष । वनचर श्वापदादी राक्षस ॥३॥

निळा म्हणे कीटक पंतग । पावले नामें पद अभंग ॥४॥

१०२१

तरले नामें अनेक तरती । वैकुंठा जाती घोषगजरें ॥१॥

ऐसा याचा कीर्तिमहिमा । उत्तमा अधमा सारिखाचि ॥२॥

कलियुगीं तो सुगम सार । नामोच्चार हरीचा ॥३॥

निळा म्हणे अनुतापेंसी । गाती वैंकुठासी ते जाती ॥४॥

१०२२

तेचि धन्य तेचि धन्य द सुकृती जन नरदेही ॥१॥

जिहीं करुनि नामपाठ । भरला घोट व्दैताचा ॥२॥

निरसूनियां ममता माया । कीर्तनें काया प्रक्षळिली ॥३॥

निळा म्हणे अंतर्साक्षी । केला कैं पक्षीं जगाचा ॥४॥

१०२३

धराल तरी धराल चित्तीं । संशय निवुत्ती करुनियां ॥१॥

या हो विठोबाच्या नामें । साधनें दुर्गमें लाजविलीं ॥२॥

सहजचि उच्चार करितां वाचे । सायुज्याचे अधिकारी ॥३॥

अनन्यभावें शरणागत । होतां पतित उध्दरिले ॥४॥

न मागोनियां धन संपत्ती । भाव भक्तिी भुकेला ॥५॥

निळा म्हणे अंतर जाणे । अधम न म्हणे उत्त्म हा ॥६॥

१०२४

न कळेचि प्रेम याची गोडी । धांवे तांतडी नाम घेतां ॥१॥

भरोनियां मन अंतरी राहे परताचि नोहे जवळुनी ॥२॥

न बिसंबे त्या रानीं वनीं । साउली धरुनी चाले सवें ॥३॥

निळा म्हणे पुरवी भुके । वागवी भातुकें खांदयावरी ॥४॥

१०२५

नका बोलों शब्द वावगे विवाद । आठवा गोविंद ध्यानीं मनीं ॥१॥

सकळही तुमचें होईल कल्याण जरी गाल गाणें विठोबाचें ॥२॥

लटिकाचि बडिवार बोलों जाल वाचा । तरि होईल काळाचा अति क्रोध ॥३॥

निळा म्हणे पहा विचारुनी दृष्टी । धरा पोटीं होईल तें ॥४॥

१०२६

न लगे जागें वनाप्रती । अथवा एकांती बैसणें ॥१॥

विठ्ठल  विठ्ठल  म्हणा कां वाचे । सकळार्थाचें कारण हें ॥२॥

न लगे आसन मुद्रा । सांडणें कळा योगस्थिति ॥३॥

निळा म्हणे उधळण सार । न लगे निराहार व्रतचर्चा ॥४॥

१०२७

नाना साधनें मंत्र तंत्र । उपासना यंत्र अवघड तें ॥१॥

म्हणोनियां हरिचें । भाविकां सुगम हरिभक्तां ॥२॥

नाहीं आघात प्रायश्चित । वाचा शुचिर्भूत सर्वदा ॥३॥

निळा म्हणे ज्ञान व्युत्पत्ति । कळती निगुती योगाचिया ॥४॥

१०२८

नाम तारक हें श्रीहरी । गर्जतां तुमचे भव सागरी ॥१॥

ऐसें जाणोन वैष्णवजन । करिती नित्यनित्य कीर्तन ॥२॥

न लगे तया खटाटोप । नामस्मरणें निरसे पाप ॥३॥

निळा म्हणे बरवी युक्तिी । झाली भाग्यें भविका प्राप्ति ॥४॥

१०२९

नामचि एक विठोबाचें । अवघ्या साधनाचें शिरोरत्न ॥१॥

उच्चार मात्र करितां ओठी । प्रगटे पोटीं हरिरुप ॥२॥

विश्वासचि पाहिजे आधीं । अतंरशुध्दी कारण हें ॥३॥

निळा म्हणे नरवी दोष । हरी नि:शेष जन्ममृत्यु ॥४॥

१०३०

नामचि एक उच्चारिले । तेही नेले निजधामा ॥१॥

ऐसा याचा कीर्तीघोष । वर्णिती शेष निगमादिक ॥२॥

जिहीं अवलोकिला दिठीं । धन्य सृष्टीमाजीं ते ॥३॥

निळा म्हणे यात्रे येती । ते ते पावती इच्छिलें ॥४॥

१०३१

नामासाठीं वोपी शांति । बैसवी पंगती संताचिये ॥१॥

ऐसा उदार त्रिभुवनीं । नाहीं वांचूनि एका हरी ॥२॥

भुक्ति मुक्ति ज्याचे हातीं । दिव्य संतति भोग सकल ॥३॥

निळा म्हणे देतां न म्हणे । थोर लहानें भाविकें ॥४॥

१०३२

नामाचेची घोष । करुनि निर्दाळिले दोष ॥१॥

वाट घेण वाल्हा कोळी । अजामेळा पडतां जळी ॥२॥

गणिका आणि पशु गज । प्रल्हाद दैत्याचा आत्मज ॥३॥

निळा म्हणे प्रसिध्द ख्याती । नामापाशी भुक्ति मुक्ति ॥४॥

१०३३

नामापाशीं भुक्ति मुक्ति । ज्ञान विरक्ति हरिनामीं ॥१॥

नामापाशर दयाशांति । साधना समाप्ति हरिनामीं ॥२॥

नामें प्राप्त नित्यानंद । स्वरुपावबोध हरिनामें ॥३॥

नामीं तिष्ठती रिध्दि सिध्दी । तुटती उपाधि हरिनामें ॥४॥

निळा म्हणे हरिनाम सार । उतरि भववपार हरिनाम ॥५॥

१०३४

नामेंचि तुमचीं आळवितां । न पुरे धणी पंढरीनाथा ॥१॥

याचि सुखें कल्पकोडी । जातां वेळ वाटे घडी ॥२॥

जडता नामीं निजध्यास । नाहीं काळ गणना त्यास ॥३॥

निळा म्हणे निश्चय माझा । जाणतां तुम्ही पंढरीराजा ॥४॥

१०३५

नामें तारिले पातकी । मुक्त झाले मृत्युलोकीं ॥१॥

ऐसें बोलियेले वाल्मीक । महाभारतीं व्यासादिक ॥२॥

कलियुगीं हरिकीर्तन । करितां तरले अधम जन ॥३॥

निळा म्हणे अंसंख्यात । हिरच्या नामें झाले संत ॥४॥

१०३६

नामे दोषी अजामेळ । परम चांडाळ तारियेला ॥१॥

पुराणी हा महिमा व्यासें । वर्णिला उददेशें वाल्मीकेंही ॥२॥

जे जे नामीं रतले प्राणी । वहिले विमानीं श्रीहरीनें ॥३॥

निळा म्हणे पावले पार नामेंचि अपार भवसिंधूच्या ॥४॥

१०३७

नामेंचि पावन केली क्षिती । घोषें निजशांति पातका ॥१॥

जये गांवी जये देशी । वसती त्यांसी सुखलाभ  ॥२॥

सुदर्शन फिरे वरी । विघ्ना बोहरी करावया ॥३॥

निळा म्हणे कळिकाळ कांपे । नांदती प्रतापें हरिजन ॥४॥

१०३८

नाहीं संदेह करी हा पाठ । पावसी वैकुंठ हरि म्हणतां ॥१॥

जैसे प्रल्हाद उपमन्यु धुरु । करितां नामोच्चारु वरिष्ठ पदीं ॥२॥

नेदी हा आघात लागों वारा । धांवेल सामोरा स्वामी माझा ॥३॥

निळा म्हणे घेईल वोसंगा । नेईल जेथें जगा गम्य नाहीं ॥४॥

१०३९

निजात्मप्राप्तीलागीं सार । हरीचिया उच्चार नामाचा ॥१॥

हेंचि बीज हेंचि गुज । हेंचि निज निजाचें ॥२॥

ऐसें संती पुरस्कारुनी । सांगितलें कानीं येऊनियां ॥३॥

निळा म्हणे परम प्राप्ती । नामींचि विश्रांति हरीचिया ॥४॥

१०४०

निवैंतरता सर्वांभूतीं । दया शांति आणि करुणा ॥१॥

केली कृपा नारायणें । ऐशीं चिन्हें उमटतां ॥२॥

क्षमा अंगी निर्मत्सर । वाणी उच्चार नामाचा ॥३॥

निळा म्हणे नम्रता अंगी । मोहत्यागी ममतेच्या ॥४॥

१०४१

पशु पक्षी श्वापद याती । भृंग पतंग कीटक जाती ॥१॥

हरीतें भजतां हरिरुप झालीं । निजानंदी निमग्न ठेलीं ॥२॥

दैत्य दानव निशाचर । मानव याती नारी नर ॥३॥

निळा म्हणे भजतां हरी । अगाधपणें पावले थोरी ॥४॥

१०४२

भावें पाचारितां । विठ्ठल  नामं आळवितां ॥१॥

येसी धांवत धांवत । माउली तूं कृपावत ॥२॥

देसी प्रेम पान्हा  । मुखी घालूनियां स्तना ॥३॥

निळा म्हणे घेसी । तया अंकीं खेळविसी ॥४॥

१०४३

यम नियम प्राणायाम । साधे जपतां रामनाम ॥१॥

रामनाम जपतां आधीं । नाशताती आधिव्याधी ॥२॥

रामनामी जडली वाचा । हरिरुप होय साचा ॥३॥

निळा म्हणे रामनाम । पावलासे मोक्षधाम ॥४॥

१०४४

यमा हातींचा सुदशी । रामनाम उच्चारिशी ॥१॥

मुखी नाम उच्चारितां । नुरे भवरोगाची व्यथा ॥२॥

नित्य वदे राम राम । तो प्रत्यक्ष आत्माराम ॥३॥

निळा म्हणे कृतकृत्य । रामनामें होय अमर्त्य ॥४॥

१०४५

याचि अनुष्ठानें ध्रुव आणि प्रल्हाद । भोगिताती पद वरिष्ठ तें ॥१॥

जेथें नाहीं होणें निमणें संसारा । काळाचा आडदरा अनोळख ॥२॥

शुका नारदासी हाचि नित्य जप । जिव्हेसी अलाप हरिनामाचे ॥३॥

निळा म्हणे तेहि झाले हरिच्या ऐसें । नाम निजध्यासें महिमा ऐसा ॥४॥

१०४६

येणेंचि साधनें । तुटती संसारबंधनें ॥१॥

म्हणोनियां करा लाहों । स्मरा रुक्मादेवी नाहो ॥२॥

येईल धांवतां । धावोनियां पाचारितां ॥३॥

निळा म्हणे हरी । कृपावंत दीनावरी ॥४॥

१०४७

रानीं वनीं घरीं दारीं । वसतां उच्चारीं हरिनाम ॥१॥

तेणेंचि माया उत्तरोनि घांट । पावसी वैकुंठ सहजवृत्ती ॥२॥

नलगे करणें खटाटोप । करीं हाचि जप नामाचा ॥३॥

निळा म्हणे होईल ऋणी । हा चक्रपाणी तुझा मग ॥४॥

१०४८

रामराम उच्चारितां । नुरे संसाराची चिंता ॥१॥

राम हाचि दीनबंधु । तोचि तारी भवसिंधु ॥२॥

दृष्टी रामरुपीं रंगली । आत्माराम होऊनि ठेली ॥३॥

निळा म्हणे राम हरी । हेचि भवसागर तारी ॥४॥

१०४९

वाचे उच्चारिलें नाम । ह्रदयीं धरुनियां प्रेम ॥१॥

तेंचि बीज फळा आलें । रुप दृष्टीगोचर झालें ॥२॥

कळासलें ध्यानीं मनीं । दिसे तेंचि जनीं वनीं ॥३॥

निळा म्हणे पंढरीनाथ । अंतरबाह्य जेथें तेथें ॥४॥

१०५०

विठोबा विठोबा नामोच्चार गोड । सरे येथें चाड सकळिकांची ॥१॥

गात्य आईकत्या एकचि नव्हाभ्र । वैकुंठ राउळीं वसावया ॥२॥

न लगती सायास करणें योगाभ्यास । नाचतां उदास कीर्तनमेळीं ॥३॥

निळा म्हणे जन्म चुके थोडयासाठीं । अच्चारितां ओंठी ऐशी नामें ॥४॥

१०५१

विठ्ठल नामाचा प्रताप । लेश उरों नेदी पाप ॥१॥

त्रिविधतापांची बोहरी । विठ्ठल नामाच्या उच्चारीं ॥२॥

दैन्य दु:ख निर्दाळिलें । विठ्ठल  नामें ऐसें केलें ॥३॥

निळा म्हणे शांतिसुखें । विठ्ठल  विठ्ठल  म्हणतां मुखें ॥४॥

१०५२

विठ्ठल  विठ्ठल  वदतां वाणी । चक्रपाणी संतोषे ॥१॥

म्हणोनियां लाहो करा । अहो अवधारा अवघेहि ॥२॥

येणेंचि नामें वैकुंठासी । गेले पापरासी बहु मार्गे ॥३॥

निळा म्हणे सांगती संत । उभवुनी आत पुराणांतरी ॥४॥

१०५३

विठ्ठल  विठ्ठल  म्हणतां वाचे । स्वरुप त्याचें आठवे ॥१॥

शामसुंदर कटीं कर । रुप मनोहर तेजस्वी ॥२॥

दिव्य सुमनें तुळसीमाळा । मळवट पिंवळा रेखियेला ॥३॥

निळा म्हणे मुगुटावरी । खोंविल्या मंजरी कोंवळियां ॥४॥

१०५४

विठ्ठल  नामें वाहे टाळी । बहमानंदाच्या कल्लोळीं ॥१॥

निजात्मसुखाचा सोहभ । विठ्ठल  अवलोकिती डोळां ॥२॥

सकळही सुकृतें ओळलीं । विठ्ठल रुपें उभीं ठेली ॥३॥

निळा म्हणे जडली बुध्दी । नित्य हरिनामें समाधि ॥४॥

१०५५

व्युत्पत्तींचे ज्ञान । सांचवणी तें जीवन ॥१॥

नव्हे पांडुरंगकृपा । नाना मंत्रे करितां जपा ॥२॥

उपवसा पारणीं नाम उच्चारितां वाणी ॥

निळा म्हणे न पवे सेवा । ऐशी सर्वात्मक देवा ॥४॥

१०५६

सकळ मंत्रांमाजी मंत्र उत्तम । दोंनीं अक्षरें जगतां राम । निरसोनियां मायादि भ्रम । पाविजे निजधाम अनायसें ॥१॥

तैसाचि मंत्राराज प्रसिध्द । त्रि अक्षरीं जपतां गोविंद । नरनारी बाळकें शुध्द । पावती अच्युतपदातें ॥२॥

चतुराक्षरीं मंत्र सरळ । जपतां नारायण श्रीगोपाळ । चतुर्भज होती सकळ । स्वरुपता पावतीं ॥३॥

त्रि अक्षरीं मंत्रसार । विठ्ठल  नामाचा उच्चार । निळा म्हणे करितां नर । न ये समोर कळीकाळ त्या ॥४॥

१०५७

सकळ मंत्रां वरिष्ठ सार । विठ्ठल  नाम त्रि अक्षर ॥१॥

वाचे उच्चार करितां जप । प्रगटे देहीं विठ्ठल रुप ॥२॥

त्रिविध तापांचेंचि हरण । विंठठल नाम उच्चारण ॥३॥

निळा म्हणे सुगम सिध्दि । विठ्ठल  नामाची समाधी ॥४॥

१०५८

सकळ साधनां वरिष्ठ सार । विठ्ठल  नामाचा उच्चार । आणखी नका वोरबार । शीणचि उरेल पुढती ॥१॥

धांवा म्हणोनि अवघे वेगीं । चितचि ठेवा पांडुरंगी । संसारचि तुटेल मागी । फिटेल धगी त्रिविध तापा ॥२॥

आवडी नाचतां पैं गातां । पांडुरंग प्रेमदाता । अवघी तोडूनियां चिंता । करील माथा बैसणें ॥३॥

ऐसें जाणोनियं निरुती । करा हरिनामें आवृत्ति । मग हा कळिकाळाचें हातीं । नेदील तुम्हां सर्वथा ॥४॥

निळा म्हणे सुगम ऐसें । संतीं दाविलें सौरसें । जतन करिती जे मानसें । ते तो पावती सर्वथा ॥५॥

१०५९

सहजचि नाम आलें वाचे । करीत दोशांचे निर्मूळ ॥१॥

ऐशी व्यास गर्जे वाणी । महिमा पुराणीं विख्यात ॥२॥

पापी चांडाळ दुरात्मे ते । नामेंचि सरते वैकुंठीं ॥३॥

निळा म्हणे गणिका वाल्हा । अजामेळ उध्दारिला गजेंद्र ॥४॥

१०६०

सांगितलें वर्म एवढेंचि करीं । नित्यता उच्चारीं हरिचें नाम ॥१॥

न लगे कोटें जाणें येणें । कर्मबंधनें तुटतील ॥२॥

योगसाधन पवनाभ्यास । न करी सायास अडचणी ॥३॥

निळा म्हणे हरीच्या नामें । चुकती जन्में या प्रहरा ॥४॥

१०६१

सांगितलें संतजनी । उगवुनी कानीं बिजाक्षरें ॥१॥

विठ्ठल  जपतां विठ्ठल  होसी । न धरीं मानसीं संशय ॥२॥

करीं कीर्तन वाजवी टाळी । राहेल वनमाळी हदयांत ॥३॥

निळा म्हणे पडे आटीं । साधन संकष्टी आणिकां ॥४॥

१०६२

नामचिंतनें जडली प्रीती । भगवदभावना सर्वभूतीं ॥१॥

हेचि परमार्थ साधन । मुखीं नाम ह्रदयीं ध्यान ॥२॥

विषय भोगीं विलोभता । मोह न बाधी त्या ममता ॥३॥

निळा म्हणे निजध्यासें । झाले मुक्त शुकाऐसे ॥४॥

१०६३

सांगेल खूण परि हें न कळे । नुघडतां डोळे बुध्दीचे ॥१॥

याचिलागीं चित्तशुध्दी । करा हो उपाधी निरसुनी ॥२॥

दावितांही न दिसे वर्म । ठाके त्या कर्म आड उभें ॥३॥

निळा म्हणे दोषा धुणी । गर्जवा वाणी हरिनामें ॥४॥

१०६४

सुखें करावें भोजन । गर्जावे गुण श्रीहरिचे ॥१॥

ल्यावें लेणें अळंकार । असावें सादर हरिकथे ॥२॥

यथाविधी भोगितां भोग । ह्रदयीं पांडुरंग आठवावा ॥३॥

निळा म्हणे न लिंपे कर्मा । हरिनाम धर्मा अवलंबितां ॥४॥

१०६५

सोडविलीं ऐसी बहुतें आयकें । भूतळीं पातकें तरलीं नामें ॥१॥

बोलियेले संत पुराणीं व्याख्यानें । तारिले चिंतनें महापापी ॥२॥

अजामेळ गणिका पौंडिक जरव्याध । नाहीं अपराध विचारिले ॥३॥

निळा म्हणे तोचि धरिला विश्वास । घालुनियां कास नाम गातों ॥४॥

१०६६

संचित प्रारब्ध क्रियमाण । न सुटे प्रणियां भोगिल्याविण । यालागीं करावें हरीचें स्मरण । तुटेल बंधन मग त्यांचे ॥१॥

सतकर्म करितां विधियुक्त । माजी निषेधाचा पडे आघात । सांग अथवा व्यंग होत । होय तें संचित निश्चयेंसी ॥२॥

उत्तम अधम कर्मे घडती । जाणतां नेणतां पदरीं पडती । तीं‍चि संचिते होऊनि ठाती । पुढें भोग दयावया ॥३॥

पापपुण्यात्मक कर्मे घडलीं । भोगितां उर्वरीत जीं राहिलीं । फळ दयावया उभीं ठाकलीं । प्रारब्धें लाभालाभदायके ॥४॥

क्रियमाणें जें आतां आचरे । सत्कमें अथवा अकर्माकारें । जें जें निपजे नित्य व्यवहारें । क्रियमाण ऐसें बोलिजे तें ॥५॥

आतां तिहींचेही निस्तरण । घडे जेणें ते ऐक खूण । संचितें घडे जन्ममरण । उत्तम अधम योनिव्दारें ॥६॥

जे जे योनी धरी जो जन्म । तेथींचे विहित त्याचि त्या स्वधर्म । सांग नव्हतां भोगणें कर्म । नव्हेचि सुटिका कल्पांतीं ॥७॥

आतां भलतेही योनीं जन्म होतां । अनुतापें भजे जो भगवंता । नामें त्याचीं गातां वानितां । दहन संचिता भक्तियोगें ॥८॥

यावरी प्रारब्धें भोग येती अंगा । भोगितां स्मरे जो पांडुरंगा । निस्तरे प्रालब्धां तो वेगा । पावे अंतरंगा श्रीहरीतें ॥९॥

जें जें नित्यांनी आचरत । तें ब्रम्हार्पण जो करित । अहंकृति न धरी फळ कामरहित । क्रियमाण जाळीत निष्कामता ॥१०॥

याचिलागीं निळा म्हणे । कर्मपाश तुटती येणें । विठोबाचिया नामस्मरणें । यातायाती चुकती ॥११॥

१०६७

स्वप्नीं देखिलें तें जागृतीये नाहीं । हारपोनियां ठायी ठावोचि नुरे ॥१॥

तेचि परी झाली माझिया मानसा । संसारात माशा क्षंणेचि विरे ॥२॥

कैंची हे संपत्ति धन वित्त पशु । लटिकाचि आभासु मायीक तो ॥३॥

निळा म्हणे एक सत्य हरीचें नाम । येर अवघाचि श्रम मिथ्याभूत ॥४॥

१०६८

हरीचें नामचि एक पुरे । सकळ साधनाचिये धुरें ॥१॥

पावावया वैकुंठासी । लहानथोरां विश्वासीयांसी ॥२॥

न लगे जाणें वनांतरा । सोडोनियां घरदारा ॥३॥

निळा म्हणे वैकुंठीपद । जावया हे संपदा ॥४॥

१०६९

हरिरुप ध्यानीं हरिनाम वदनीं । हरीच्या चिंतनीं तद्रूपता ॥१॥

हरि तयां अंतरी हरि तयां बाहेरी । रक्षी निरंतर श्रीहरी त्यां ॥२॥

हरि तयां आसनीं । हरि तयां भोजनीं । हरि तयां शयनी निद्रा करी ॥३॥

निळा म्हणे हरि देह गेह दारा । हरी दुजा वारा लागों नेदी ॥४॥

१०७०

हाचि उपाव सुगम सार । तरणें संसार जया नरा ॥१॥

नाम गातां गोविंदाचे । फिटे जीवाचें जीवपण ॥२॥

भुक्ति मुक्ति वोळंगे येती । अंगींचि ठाकती दया क्षमा ॥३॥

निळा म्हणे अवघीच सुखें । येती हिरखें चोजवित ॥४॥

१०७१

हेंचि आम्हांसी गुरुगम्य । हरीचें नाम उपदेशिलें ॥१॥

आणिकां साधनीं चाड नाहीं । घालिती अपायीं म्हणोनियां ॥२॥

योगाभ्यास मंत्रजप । पुरश्चरण तप हरिनाम ॥३॥

निळा म्हणे दाविला मार्ग । हाचि हा चांग गुरुनाथें ॥४॥

१०७२

हेंचि परमार्थाचे सार । हरीचिया उच्चार नामाचा ॥१॥

जिहीं केला पावले ते । वैकुंठी सरते सुखी झाले ॥२॥

गातां वानितां हरि गुणरासी । झाले त्रैलोक्यासी पूज्य ते ॥३॥

निळा म्हणे निका उपावो । सांपडला ठावो वैष्णवां ॥४॥

१०७३

होय अंतरी पालट । करितां पाठ हरिनामें ॥१॥

देवा ऐसे देवचि होती । जे या भजती विठठला ॥२॥

ऐसा याचा प्रताप ठसा । प्रगटे सरिसा नामजपें ॥३॥

निळा म्हणे लटिकें नव्हे । पहा स्वानुभवें आपुलिया ॥४॥

१०७४

नाम वाचे श्रवण कीर्ति । पाउलें चित्तीं समान ॥१॥

काळ सार्थक केला त्यांनी । धरिला मनीं विठ्ठल  ॥२॥

कीर्तनाचा समारंभ । निर्दभ सर्वदा ॥३॥

निळा म्हणे स्वरुपसिध्दि । नित्य समाधि हरिनामीं ॥४॥

१०७५

हाकेसवें उडी । घालूनियां स्तंभ फोडी ॥१॥

ऐसी कृपावंत कोण । माझे विठाईवांचून ॥२॥

करितां आठव । धावोनियां घालि कव ॥३॥

निळा म्हणे गातां । नामें दयावी सायुज्यता ॥४॥

१०७६

संत एकांतीं बैसजे । सर्वही सिध्दांत शोधिले । ज्ञानदृष्टी अवलोकिलें । सारांश काढिलें निवडुनी ॥१॥

तें एक श्रीहरींचे नाम । सकळ पातकां करी भस्म । अधिकारी उत्तम आणि अधम । चारी वर्ण नरनारी ॥२॥

विठ्ठल  नामें उच्चार ओंठी । विठ्ठल मूर्ती पाहतां दृष्टी । लाभे ब्रम्हतेची पुष्टी । वाढे पोटीं निज शांती ॥३॥

देखतां कापती त्या काळ । हरिच्या ऐसे अंगी बळ । प्रगटे वैराग्य अढळ । तुटती मळ ममतेचे ॥४॥

महा दोषांची झाडणी । अहंभावादिकांची गाळणी । उभय कुळें बैसवोनि । जाती विमानीं वैकुंठा ॥५॥

ऐसा नामाचा प्रताप । उरों नेदीं पुण्य पाप । भंगूनियां त्रिविधताप । ठाकती सद्रूप होऊनि ॥६॥

दृष्य नुरें त्यांचिये दृष्टी । ब्रम्हानंदें कोंदे । निळा म्हणे धरितां कंठीं । बीजमात्र हरिनाम ॥७॥


संत निळोबाराय गाथा । संत निळोबाराय अभंग । निळोबा अभंग । निळोबा गाथा । सर्व गाथा । निळोबाराय माहिती । पिंपळगाव मंदिर निळोबाराय । sant nilobaray gatha | sant nilobaray abhang | niloba abhang | niloba gatha | sarv gatha | nilobaray mahiti | nilobaray mandir pimpalgav | नामपर |

तुमच्या शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांतीला भेट द्या .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *