संत निळोबाराय गाथा (मंगलाचरण)

संत निळोबारायांच्या गौळणी

संत निळोबारायांच्या गौळणी

१६८

एकीं येकटेंचि असोनि एकला । विश्वीं विश्वाकार होऊनियां ठेला । जया परीवो तैसाचि गमला । नंदनंदन हा आचोल अंबुला वो ॥१॥

ऐशा गौळणी त्या बोलति परस्परीं । करुनि विस्मय आपुलाल्या अंतरीं । विश्वलाघवीया हाचि चराचरीं । नेणों महिमा यांसी म्हणों व्यभिचारी वो ॥२॥

गिरी गोवर्धन येणें उचलिला । काळिया महासर्प नाथुनि आणिला । जळत वणवा वो मुखेंचि प्राशीला । गिळितां आघासुर चिरुनी सांडिला वो ॥३॥

कपटया माभळभटा दिल्हें पिडेदान । शोषिली पूतना विषें पिाजितांचि स्तन । उखळीं बांधता उपटिले विमळार्जून । भक्षूनि मृतिका वदनीं दाविलीं भुवनें वो ॥४॥

आणिखीं एक येणें नवलावो केला । काला वांटितां वो विधाता ठकिला ॥ भाग नेदितां तो वत्सें गोवळ घेऊनि गेला । तैसिच आपण येथें होऊनियां ठेला वो ॥५॥

इंद्र चंद्र महेंद्र यातेचि पूजीती । श्रुति शास्त्रें तेही यातेंचि स्तविती । महासिध्द मुनि ध्यानीं आराधीती । निळा म्हणे तो हा जोडला सांगाती वो॥६॥

१६९

ऐकीं एकपणाचा घेउनियां त्रास । जाला नानाकार स्वरुपें बहुवस । म्हणोनि दुसरेंचि नाढळे वोयास । जयाततयामाजीं याचाचि रहिवास वो ॥१॥

ऐसे निजात्मया जाणोनि गोविंदा । जीवे भावें अनुसरल्या प्रमदा । करिती सेवावृत्ति निशिदिनी सदा । हसती रुसती करिती विनोदा वो ॥२॥

सर्वसाक्षी सर्वही जाणता । सर्व करुनियां म्हणावे अकर्ता । जीवीं जिवाचा हा आप्तचि सर्वथा । जेथें तेथें याची नित्य एकात्मता वो ॥३॥

नित्य अंगसंगें भोग त्यासि देति । दृष्टी अवलोकूनि गुण त्याचे गाती । नेऊनि एकांति वो निजगुज बोलती । करिती कामधाम परी त्याचिपासीं वृत्ति वो ॥४॥

सासु सासुरिया भ्रतारासी चोरी । नणंदा जावा त्याही त्यजूनियां घरीं । देती आलिंगन निजात्मया हरी । येथुनि म्हणती संसारा बोहरी वो ॥५॥

ऐशा निळा म्हणे झाल्या हरिरता । त्या त्या विराजती मुक्तिचिया माथा । नानासाधनांच्या लाजउनि चळथा । जाल्या असोनि संसारि नित्यमुक्ता वो ॥६॥

१७०

कांहींच नहोनियां कांहीं एक होता । नामारुपातीत आपण नेणता । होण्यानहोण्याच्या नेणोनियां वार्ता । त्याचा संकल्पचि झाला त्या प्रसवता वो ॥१॥

ऐशा परि हा मूर्तिमंत झाला । विश्वीं विश्वकार होऊनियां ठेला । भाग्यें आमुचिया मूर्ती मुसावला । गाऊ वानूं ऐसा आम्हांसी फावला वो ॥२॥

नव्हे ते पुरुष ना नारीपण जेथें । शुन्या निरशून्याहि पैलाडी परते । नाकळे नाद बिंदू कळा ना ज्योतितें । परा पश्यंतीचा प्रवेश नाहीं जेथें वो ॥३॥

गुणलावण्याची उघडली खाणी । मंडित चतुर्भुज मुगुट माळा मणी । मुख मनोहर कुंडलें श्रवणीं । श्रीवत्सलांछन ह्रदयीं साजणी वो ॥४॥

घ्या गे उचलूनि जाऊं निजघरा । आजि फावला तो पाहों यदुवीरा । खेळों आदरें या खेळवूं सुंदरा । याच्यासंगे नाहीं सुखा पारावरा वो ॥५॥

निळा म्हणे ऐशा संवादे सुंदरी । करिती क्रिडा सवें घेऊनि मुरारी । सुखी सुखरुप झाल्या कल्पवरी । पुन्हा न येती त्या फिरोनि संसारीं वो ॥६॥

१७१

दिसे सगुण हा स्वरुपसुंदर । परि व्यापूनियां ठेला चराचर । देवादानचादि मानव असुर । याविण उरला ऐसा नाहीं तृणांकुर वो ॥१॥

ऐशा गौळणी त्या अनुवाद करिती ज्या ज्या रंगलिया याच्या अनुवृत्ती । रजनीं दिवो जयां याचीचि संगती । त्या त्या स्वानुभवें आपुल्या बोलती वो ॥२॥

महि अंबु तेज मारुत गगन । जगा बीजरुप हाचि वो लपोन महदमायेचें हा अनादि कारण । देवत्रयासी हा मूळ अधिष्ठान हो ॥३॥

आपुल्याचि गुणी । उरला भरोनियां चाही वाणी खाणी । ज्या परि हा तैसाचि साजणी । रुपें गुणे क्रिया मंडित भूषणीं वो ॥४॥

भुवनें चतुर्दश तींहि याच्या पोटीं । स्वर्गी एकविसाहि आदि हा शेवटीं । होण्या न होण्याच्या नेणोनियां गोठी । आपीं आपणचि एकट एकटी ॥५॥

निळा म्हणे आम्हीं नेणोनियां अबळा । हासों रुसों यासी करुं गदारोळा । खेळतां खेळ यासी भांडों वेळोवेळां । केले अपराध ते मागों या गोपाळा वो ॥६॥

१७२

नव्हते एक ना दुसरें कांहीं यासी । होता लपोनिया आपुलीये कुसीं । कांहिंचि नाळखुनि आपआपणासि । तोचि येउनि येथें जाला अविनशी वो ॥१॥

रुप धरिलें सगुण चांगलें । ठाणमाण माण जेथील तेथेंचि रेखीलें । चतुर्भुज शंखचक्रातें मिरवलें । मुगुट माळा श्रवणीं सुतेज कुंडले वो ॥२॥

नव्हता गांवसीव पहिला यासि कांही । नामरुपासि तो आधीची ठाव नाहीं । म्हणती वैकुंठ तें कालिची जालें बाई । क्षीरसागर ना कैंचि शेषशाई वो ॥३॥

नव्हता काळागोरा खुजा ना ठेंगणा । स्‍वरुपसुंदर ना आंधळा देखणा । कैंचि जीवशिव तयासी भावना । पंचभौतिक ना नेणें पंचप्राणा वो ॥४॥

नव्हता मन बुध्दि इंद्रियांचा मेळा । कार्यकर्तृत्व हा कारण वेगळा । येणें जाणें यासी नव्हतें कवण्या काळा । तोचि आला या नंदाच्या राउळा वो ॥५॥

यासी जीवेंभावें धरा घाला मिठया । ऐशा बोलती गौळणी गोरटया । निळा म्हणे अवघ्या मिळोनि लहानामोठया । यासि चुकती त्या अभाग्या करंटया वो ॥६॥

१७३

नित्यानंदा पुढे आनंद तो कोण । विषयसुख बाई बापुडें तें क्षीण । जेथें न सरेची वैकुंठसदन । शेषशयी वो त्रिकुटभुवन वो ॥१॥

नेघों म्हणोनियां त्यागिती परौतें । घेऊं संगसुख हरीच्या सांगातें । गाऊं वानूं रुप पाहोनि निरुतें । हांसो खेळों ठायीं जेववूं सांगातें वों ॥२॥

नेघों समाधीचें सुख तुच्छ वाटे । नित्यनित्याचिये न पडों खटपटे । काय करुं ते तपाचे बोभाटे । एका हरिविण अवघी ते फलकटे वो ॥३॥

काय जाऊनियां करुं निजधामा । तेथें मी नातुडें नाडळें विश्रामा । येथें सांडूनियां तमालमेघ:शामा । नेघों नाईका आणिका दुर्गमा वो ॥४॥

स्वर्गभोग तेही न लागती असार । क्षणें होती जाती क्षणेंचि नैश्वर । येथें हरिसंगे क्रीडों निरंतर । सर्वही सुखांचे हा जोडला आगर वो ॥५॥

निळा म्हणे नित्य नि:सीम स्वानुभवें । ऐशा गोपिका त्या रंगल्या हरिसवें । अधिकाधिक् हें प्रेम त्यांचे नवें । जाणोनि आवडी ते पुरविली देवें वो ॥६॥

१७४

मी मज माझें याची केली वो निरास । वीण आपणा येणें आणियेला त्रास । नेदी आड येऊं दुजियाचा आभास । कैसें काय करुं सांगा मज यास वो ॥१॥

ऐसें जाजावोनी बोले एक नारी । हरीचा सुखानंद भरुनी अंतरी । लटिकाची वालभाचा भाव लोकाचारीं । दाऊनि एकांतीं हरिसी काम सारी वो ॥२॥

म्हणे वृत्ति माझी नुरे देहावरीं । क्षणही न कंठे वो सासुरामाहेरीं । काय करुं मी वो न गमे घरदारीं । नेऊनी घाला जेथें अनंग मुरारी वो ॥३॥

यावरी गेलें आतां माझें माणुसपण । करितां उपचार ते हरिती माझे प्राण । गेलें होऊनियां होतें तें निर्माण । सोडा आस माझी दया वो मोकलून वो ॥४॥

ऐशीं देहगेहीं होऊनि उदास । गेले तुटोनियां अवघे आशापाश । निद्रा जागृती ना स्वप्नाचा आभास । एक लागला त्या हरीचा निजध्यास वो ॥५॥

निळा म्हणे नेणे आपपर दुसरें । भरली निजानंदी न पाहे माघारें । कैंचे येईल तेथें अविदयेचें वारें । झालें ह्रदयीं स्वानुभवचेईरें वो ॥६॥

१७५

याच्या संगसुखें गर्भवास घेतां । येत जात गे कल्पाच्या चळथा । नेघो भुक्ति मुक्ति देतां सायुज्यता । ऐशा गौळणी त्या सुखानंदभरिता वो ॥१॥

धन्य प्रेमळा त्या रंगल्या श्रीरंगी । नेणती दुसरें वों संसारी विरागी । हरिचीं भूषणें त्या लेऊनि निजांगी । सुखी सुखरुप भोगी नित्य त्यागी वो ॥२॥

याच्या सहवासें वो भोगिता निजभोग । भोगीं भोगातीता सर्वदा नि:संग । नथेचि दृष्यावरी देखतीहि जग । ऐशा विचरती होऊनि अनंग वो ॥३॥

नित्य जनीं वनीं हरीतें देखती । हरीचि होऊनियां हरीतें भजती । हरिरुप झाली त्यांची अंगकांति । हरिचि मुसावला ध्यानीं मनीं चित्तीं वो ॥४॥

येती जाती त्या हरिच्या सांगा तें । वसती नित्यकाळ हरि वसे जेथें । करिती भोजने त्यां जेववितां हरीतें । हरीविण त्या न घेती जीवनातें वो ॥५॥

निळा म्हणे तया हरीच सांगाती । त्याहि वर्तताती हरीच्या अनुवृत्ती । नाहीं उरविली दोनीपणें खंती । वसती एकएकीं निजात्मता युक्ती वो ॥६॥

१७६

यासी पाहतां वो हदयस्थ पाहीला । यासि बोलतां वो वेदुचि घोकिला । यासि खेळतां कुसंगदोष गेला । यासि भोगितां हा प्रत्यवायी गळाला वो ॥१॥

ऐसा निजानंद परमात्मा श्रीहरी । आम्हीं लाधलों वो भाग्याच्या संसारी । नित्य आलिंगूं या हदयाच्या अंतरीं । ऐशा निजबोधें निवाल्या सुंदरी वो ॥२॥

यासी विचारतां परमार्थ हातिं लागे । यासि विवरितां ये सिध्दांत वोळंगे । यासि विनटतां समाधि पायां लागे । यासी विनवितां हाचि वरिआं गे वो ॥३॥

यासि करुं जातां सहजचि गोठी । स्वार्थ परमार्थ पुरुषार्थ लागे पाठीं । यासी जिवीं ध्यातां यासिचि पडे मिठी । या गीतीं गातां बहमांड पडे पोटीं वो ॥४॥

यासीं करोनि पुढें विचरों जनीं वनीं । यासी घेऊनि संगे बैसों वो भोजनीं । यासि निजवूनि निजो निजशयनीं । याचें संग सुख घेऊं अनुदिनीं वो ॥५॥

निळा म्हणे निजाश्रमीची सकळा । ऐशा आरजा गौळणी त्या बाळा । ध्यानीं मनीं जिवीं ध्यातां या गोपाळा । गेल्या विसरोनियां संसार सोहळा वो ॥६॥

१७७

येकलें न कंठेचि म्हणोनियां येणें । केलीं निर्माणें वो चौदाही भुवनें । गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणें । पांचही महाभूतें भौतिकें भिन्नें भिन्नें वों ॥१॥

ऐसा लाघविया मायासूत्रधारी । येकला येकटाचि झाला नानाकरी । स्थूळ सूक्ष्म जीव जीवाचे अंतरीं । तो हा नंदनंदन सये बाळब्रम्हचारी वो ॥२॥

याचिये नाभिकमळीं जन्म चतुरानाना । याचिया निजप्रभा प्रकाश रविकिरणा । याचिया महातेज हुताशना । येणेंचि पढवून वेद केला शहाणा वो ॥३॥

याचिया द्रावपणें समुद्रासी जळ । याचियां चपळपणें पवन हा चंचळ । याचिया अवकाशें आकाश पघळ । याचिया घृतिवळे अवनी हि अढळ वो ॥४॥

येणोंचि मेरुस्तंभ अचळ धरियेला । दिशादिग्पाळांसी येणेंचि ठाव दिधला । विधिविधानाचा शास्त्रा बोध केला । येणेंचि सुरपति स्वर्गी बैसविला वो ॥५॥

भोगूनि अंगना हा बाळब्रम्हचारी । येकला जेथें तेथें सोळा सहस्त्रा घरीं । आम्हां तुम्हां भोगूनि अलिप्त मुरारी । निळा म्हणे ऐसा विवादति नारी वो ॥६॥

१७८

वेणु वाजवीत यमुनेच्या तटीं । उभा कान्हया सांवळा जगजेठी । भोंवती गोधनें वो थाटीं । एकोनि गवळणी धांवती उठाउठीं वो ॥१॥

ऐसा जनमन मोहनरंजवणा । गुणीं गुणातीत नंदाचा पोसणा । करुनि अकर्ता हा सृष्टयादिरचना । विश्वीं विश्वातीत अलक्ष देखणा वो ॥२॥

बैसोनि विमानीं याच्या पाहो येति खेळा । देव सकळही मिळोनियां पाळा । वोघ कुंठित या यमुनाच्या जळा । वरुषे ब्रम्हानंद नरनारी बाळावों ॥३॥

जलचर भूचर खेचर वनचरें । लुब्ध होऊनियां वेणेचिया स्वरें । राहिलीं तटस्थचि मानसें शरीरें । नेणती वैरभाव एकत्र परस्परें वो ॥४॥

पवन निश्चलचि होऊनियां ठेला । सूर्य अस्तमाना जाऊं विसरला । वत्सें न पिती देहभाव गेला । मुखींचा कवळ गाईमुखींचि राहिला वो ॥५॥

ऐसा स्वानंदाचा आला महापुर । कृष्णवेणुध्वनी लोधले अंतर । नेत्रीं गळताती प्रेमाचे पाझार । निळा म्हणे देहीं देहा अनाचार वो ॥६॥

१७९

शुकादिकाचिये ह्रदयीं ध्यान । आम्हां जोडलें वो न करितां साधन । सहजचि पाचारितां येतसे धांवोन । प्रेमें आलिंगितां निवें तनु मन वो ॥१॥

ऐशा गौळणी आनंद भरितां । दृष्टीं अवलोकूनि मदनचिया ताता । म्हणती धन्या भाग्य आमुचें वो आतां । लाधलों जन्म झाली कृताचि कृत्यता वो ॥२॥

नित्य हरीचिया समागमें बाई । नाहीं देखिलें तें सुख भोगूं देहीं । प्रारब्ध संचित क्रियमाण तेंही । गेलें हारपोनिया ॥ ठांईचें ठांई वो ॥३॥

येतां जातां नेणों काळाचा आडदरा । देखतां सन्मुख तो पळतुसे माघारा । रंग श्रीरंगाचा उमटला शरीरा । तेणें वाहातात जन्मदु:ख जीर वो ॥४॥

हरीचे सन्निधीं वो सहवासें वर्ततां । यासि बोलतां चालतां कृष्ण खेळतां ।  आंगी ऐश्वर्याचा दृढावली सत्ता । तेणें अजरामर झालों असों निभ्रांता वों ॥५॥

ऐशा कृष्णरुपीं रुपसा बाळा । होऊनि स्तविती पूजिती वेळोवेळां । कडिये खांदिये घेऊनि घननीळा । निळया स्वामीतें अवलोकिती डोळां वो ॥६॥

१८०

एकी म्हणे हरि आमुचा शेजारीं । दुजी म्हणे मित्र माझा ॥१॥

तिजी म्हणे सखा आमुचा जिवलग । चौथी म्हणे नि:संग सदांचा हा ॥२॥

एकी म्हणे कुमारि देऊनि आणिला । एकी म्हणे जन्मला यशोदे पोटीं ॥३॥

निळा म्हणे एकमेकां न मिळती । पुराणे भांडती तैशापरी ॥४॥

१८१

एकी म्हणती हरि आमुचा सोयरा । दुजी म्हणे घरा पुसों जांई ॥१॥

तिजी म्हणे काली आणिला पोसणा । चौथी म्हणे कान्हा यशोदेचा कीं ॥२॥

एकी म्हणे माझा नोवरा साजणी । एकी म्हणे बहिणी पाठीची मी ॥३॥

निळा म्हणे म्हणती आमुचा पिता । एकी म्हणे चुलता सखा माझा ॥४॥

१८२

एकी म्हणती हा आमुचा सांगाती । दुजी म्हणे परती भाऊ माझा ॥१॥

तीजी म्हणे हरि आमुचा मेहुणा । चौथी म्हणे पैसुन्या देखणी झणें ॥२॥

एकी म्हणती हा आमुचा गोवळ । सहावी म्हणे बाळ नंदाचा कीं ॥३॥

निळा म्हणे जैशा श्रुती विवादती । तैशा या भांडती परस्परें ॥४॥

१८३

करितां तयां काम धाम । तमाळश्याम ध्यानीं मनीं ॥१॥

तेणें पावल्या आनंदा । वेधीं गोविंदा वेधलिया ॥२॥

जागृति स्वप्न सुषुप्ती आंत । नेणेति माता आणिकांची ॥३॥

निळा म्हणे अहोरात्रीं । देखती नेत्रीं तेंचि रुप ॥४॥

१८४

कृष्णरुपा वेधिल्या नारी । देखती अंतरी तेंचि रुप ॥१॥

गमनीं शयनीं आसनी भोजनीं । देखती जनीं वनीं दृष्टीपुढें ॥२॥

एकांती लोकांती घरीं दारीं बाहेरी । त्याविण निजाचारीं नेणती दुजें ॥३॥

निळा म्हणे सर्वहि त्याचा परिवार । होवोनी सारंगधर ठेला घरीं ॥४॥

१८५

बोलती चालती देखती ऐकति । सर्वत्री श्रीपती त्यांचे दृष्टी ॥१॥

सासुरे माहेर सासु सासरा दीर । देखती त्या भ्रतार हरीच्या रुपें ॥२॥

सोयरेसज्जनइष्टमित्रजन । कन्याकुमरेधन कृष्णचि गोत ॥३॥

निळा म्हणे त्यांचे संपत्ति वैभव । पशुवादिक सर्व झाला कृष्ण ॥४॥

१८६

बोलती बोलणें चालती चालणें । करिती देणें घेणें परि तो ध्यानीं ॥१॥

जेविती जेवणीं खेळत खेळणीं । मिरविती भूषणें परि चित्त तेथें ॥२॥

गीतीं गाती गीत विनोदीं हांसती । रुदनीं रुदत परि त्या कृष्णीं ॥३॥

निळा म्हणे सुखें भोगिती नानाभोग । परि त्यांचे श्रीरंग ध्यानी मनीं ॥४॥

१८७

येतां देखोनियां भार । गाई मनोहर गोवळांचे ॥१॥

धांवचि घेऊनि गौळणी येती । पाहावया श्रीपती मदनमूर्ती ॥२॥

एकीस न पुसतां एकी । माय लेकी सास्वा सुना ॥३॥

निळा म्हणे पाहोनि मुख । भोगताती सुख कैवल्यापर ॥४॥

१८८

पशु पक्षी जीव श्वापदें वनचरें । अवघीं कृष्णाकारें झालीं तयां ॥१॥

माडया उपरमाडया बैसती बैसणीं । नाना अलंकार लेणीं झाला कृष्ण ॥२॥

मनीं त्यांचे कृष्ण ध्यानी त्यांचे कृष्ण । श्रवणीं त्यांचे कृष्ण वदनीं वाचे ॥३॥

निळा म्हणे कृष्णीं झाल्या कृष्णरुप । अवघ्या नामरुप क्रियासहित ॥४॥


संत निळोबाराय गाथा । संत निळोबाराय अभंग । निळोबा अभंग । निळोबा गाथा । सर्व गाथा । निळोबाराय माहिती । पिंपळगाव मंदिर निळोबाराय । sant nilobaray gatha | sant nilobaray abhang | niloba abhang | niloba gatha | sarv gatha | nilobaray mahiti | nilobaray mandir pimpalgav |

 

कृषी क्रांती 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *