संत निळोबाराय गाथा (बालक्रीडा)
८
गडियां म्हणे पळतां घरें ।
नवनितें क्षीरें असती ते ॥१॥
म्हणती गोवळ ऐके कान्हा ।
आहेसि तूं देखणा पुढें होई ॥२॥
आम्ही नेणो थारेमारे ।
अवघीं घरें तुज ठावीं ॥३॥
निळा म्हणे काढीं माग ।
आम्ही सवेग येऊं मागें ॥४॥
९
ऐकोनि बोल हांसे त्यांचे ।
म्हणे हे बेटयाचे पोट पोसे ॥१॥
आयतें आणूनि द्यावें हातीं ।
मग हे सेविती स्वानंदें ॥२॥
तयां म्हणे यारे लागे ।
माझिया मागें चोजवित ॥३॥
निळा म्हणे पाळतिही करी ।
आपणचि चोरी वाटी त्या ॥४॥
१०
चित्ताचे चिंतनी मनाचें मननी ।
जीवाचे जीवनीं कृष्ण त्यांचे ॥१॥
बुध्दीचे बोधनीं श्रोत्राचे श्रवणीं ।
आमोद घेतां घ्राणी कृष्णीं मन ॥२॥
देहीं देहभावा नेणती स्वभावा ।
इंद्रियांचीया धांवा कृष्णरुपीं ॥३॥
निळा म्हणे त्यांचा वर्तता व्यापार ।
अवघा शार्ङगधर होऊनि ठेला ॥४॥
११
पांवा वाजवी मोहरी ।
बार हमामा हुंबरी ॥१॥
नाचे गोपाळांच्या छंदें ।
क्रीडा करी ब्रम्हानंदें ॥२॥
सांगोनी येरयेरां काहाणी ।
कोडीं उगविती उमाणीं ॥३॥
निळा म्हणे नाना सोंगें ।
संपादिलीं पांडुरंगें ॥४॥
१२
नाहीं त्या उरलें दुजें कृष्णविण ।
ब्राह्य अंत:करण कृष्ण झाला ॥१॥
जीवाचाही जिव शिवाचाही शिव ।
देहीं देहभाव कृष्ण झाला ॥२॥
शब्दा शब्दविता बोधा बोधविता ।
चित्ता चेतविता झाला कृष्ण ॥३॥
निळा म्हणे कृष्णें केलें कृष्णाकार ।
सबाह्य अंतर रंगविलें ॥४॥
१३
दहीं दूध तूप लोणी ।
आणि दुधाणी चोरुनी ॥१॥
म्हणे घ्यारे पोटभरी ।
आपणहि स्वीकारी त्यांसवे ॥२॥
नाचे हातीं लोणीया गोळे ।
नाचवी गोवळें भोंवताली ॥३॥
निळा म्हणे चाहाळी करी ।
रिचवी वरी आणि हांसे ॥४॥
१४
घुमघुमिती मोहर्या नादें ।
पांवे छंदें वाजविती ॥१॥
शिंगें काहाळा गजर झाला ।
श्रीहरि शोभला समुदायें ॥२॥
अंगी चंदन बाणली उटी ।
कास ते गोमटी पितांबरें ॥३॥
निळा म्हणे केशर भाळीं ।
तेज बंबाळी मुगुटाचें ॥४॥
१५
नाचती विनोंदें ।
क्रीडा करी त्यांच्या छंदें ॥१॥
गोवळ वांकुल्या दाविती ।
आलें वाचे ते बोलती ॥२॥
म्हणती चोरटया शिनळा ।
दोघां बापांचिया बाळा ॥३॥
लटिकीया कपटिया कुचरा ।
निर्बल नपूंसका निष्ठूरा ॥४॥
तोंडें वांकुडी पिचके डोळे ।
तयां माजीं आवडी खेळे ॥५॥
निळा म्हणे विश्वासिया ।
न वजे दुरि पासूनियां ॥६॥
१६
बहुत अवतार घेतलीं सोंगें ।
बहुतां भक्तांसी तारिलें मागें ।
बहुताचि शोभला बहुतां अंगे ।
बहुतां संगे क्रीडा केली ॥१॥
मासा कांसव डुक्कर झाला ।
नृसिंह वामन होउनी ठेला ।
भक्ताचें काजीं संकटे याला ।
बहुत अवगला अवगणिया ॥२॥
एके दिवशी गोधनामागें ।
अवघाचि गिळियला होता नागें ।
त्यातें चिरुनियां निघाला वेगें ।
वांचला भाग्यें गौळियांच्या ॥३॥
एकदां वोणवा गिळितुचि आला ।
गोवळे देखोनि धाकिती त्याला ।
पसरुनी मुख तो अवघाचि प्याला ।
विराट झाला स्वरुपी हा ॥४॥
वनामाजी ब्रम्हा चोरुनी आला ।
वत्सें गोवळे घेऊनी गेला ।
अंगे आपण तैसाचि झाला ।
मिरवत आला गोकुळांत ॥५॥
इंद्राचि पांजी आपनचि खाय ।
त्याचिया क्रोधें पाउसाचे भय ।
मग उचलूनी डोंगर तळीं त्या राहे ।
गोकुळासगट नाहीं भ्याला ॥६॥
चेंडुवाच्या मिसें बुडाला डोहीं ।
काळियाचि नाथुनी आणिला पाही ।
नाचती गोवळे वोसरल्या गाई ।
आनंदासी काई उणे तेथें ॥७॥
व्देषिया म्हणोनि मामा तेचि मारी ।
विश्वासी म्हणोनी पांडवा घरीं ।
आवडत्या म्हणोनी भोगिल्या नारी ।
लाघवी मुरारी खेळ खेळे ॥८॥
निळा म्हणे हा भक्तांसाठीं ।
नाना कचाटें सोसितो आटी ।
धरुनियां भावे बैसतां पोटीं ।
सोडवी संकटी स्वामी माझा ॥९॥
१७
ब्रम्ह आणि गोवळपणें ।
यज्ञ भोक्ता आणि उच्छिष्ट खाणें ।
महर्षिस्तव आणि हुंबरी घेणें ।
नाटकी विंदानें अघटित ॥१॥
नित्यमुक्त आणि बांधला गळा ।
परात्पर आणि कोंडिती बाळा ।
ब्रम्हचर्य आणि सहस्त्र सोळा ।
भोगिल्या अबळा आणिखीही ॥२॥
असुरमर्दन आणि मारिती गौळणी ।
लक्ष्मीकांत आणि चोरितो लोणी ।
ईशाचा ईश आणि फोडितो दुधाणीं ।
गुणातीत अगुणी भरलासे ३॥
विश्वव्यापक आणि यशोदे कडिये ।
शुकाचें ध्यान आणि दासी पिढिये ।
कृपावंत आणि मारिली माये ।
रडे ये माये ये माये लटिकाचि ॥४॥
रोमीं ब्रम्हांडे आणि बाळक झाला ।
आतुर्बळी आणि उखळी बांधिला ।
बळीचा व्दारपाळ आणि पंढरियें आला ।
पुसतांचि याला नाहीं कोणी॥५॥
सखा भावाचा आणि मामासीचि मारी ।
धर्मस्थापक आणि अकर्मे करी ।
देहातीत आणि आयुधें धरी ।
अकर्ता करी मना आलें ॥६॥
सर्वज्ञचि आणि नेणता झाला ।
काळाचाहि काळ आणि बाऊसि भ्याला ।
माउशीचे स्तनीं विषचि प्याला ।
उत्तीर्ण तिये झाला जीवघातें ॥७॥
अरुप आणि घेतलीं सोंगें ।
निष्काम आणि गौळणी मागें ।
नित्य तृप्त आणि गोवळसंगे ।
नित्य उच्छिष्टें खाय त्यांची ॥८॥
भूपति आणि मंत्री माकडें ।
अर्धांगी नोवरी आणि नेली म्हणून रडे ।
नावा सांडुनी तारितो दगडें ।
वनवासी उघडें फळें भक्षी ॥९॥
अमरां पूज्य आणि राखितो गाई ।
क्षिराब्धीचा जामात आणि घोंगडें डोई ।
ईशाचा ईश आणि लोळतो भुई ।
नंदाचे गोठणीं गाईवाडा ॥१०॥
सनकादिक देव स्तविती भावें ।
तो हा लंपट गौळणीसवें ।
न मागती त्यांसी देऊचि धांवे ।
आणि मागत्यासी व्हावें अतिकृपण ॥११॥
जगदानी आणि भिकारी झाला ।
विराटरुपी आणि खुजट ठेला ।
त्रिपाद देतां त्रैलोक्य नेला ।
शेखीं बळीनें बांधला व्दारदेशीं ॥१२॥
नित्य पूर्ण आणि भोजन मागे ।
बाळकाचि दात्याचें कांपवी अंगे ।
न जेवितां सवें पळोचि लागे ।
मग धांवे त्यामागें विमानीं घालीं ॥१३॥
दयावंत आणि अंगींच चिरलें ।
मयोरध्वजाचीं केलीं शकलें ।
उदार कर्णाचे दांतचि पाडिले ।
शिबीतें सोलिले कपोतासाठीं ॥१४॥
ब्राम्हणभक्त आपणा म्हणवी भला ।
आणि नारदाची नारदी करुनी ठेला ।
सख्ये बहिणीची भीड नाहीं याला ।
जांबळाच्या निमित्यें केला उपहास ॥१५॥
वेदांसी स्तवितां उगाचि बैसे ।
आणि गौळणीच्या शिव्या ऐकोनि हांसे ।
नित्यानंद आणि रडतचि बैसे ।
आळी घेउनी मिसे जेवणाच्या १६॥
निळा म्हणे हा लाघवी हरी ।
कांहींही न करुनी अवघेंचि करीं ।
भक्तां व्देषियां एकेचि परी ।
निंदा स्तुतीवरी सम देणें ॥१७॥
१८
भाविक गोवळ ।
अंगी विश्वासाचें बळ ॥१॥
तेणें स्थिरावली बुध्दी ।
निश्चळ झाली हरीच्या पदीं ॥२॥
नाही ओढा वारा ।
चित्तीं चैतन्याचा थारा ॥३॥
निळा म्हणे हरीच्यासंगें ।
करिती क्रीडा नानारंगें ॥४॥\
१९
तुमच्या कीर्तनें पावलों पार ।
भवसिंधूचा लहान थोर ।
पशुपक्षी दैत्य निशाचर ।
नारीनर बाळकें ॥१॥
पुण्यपावन तुमची कथा ।
एकाक्षर श्रवणीं पडतां ।
झाडा करुनियां दोषां दुरितां ।
कलिमल तत्वता विध्वंसती ॥२॥
हरिनामाच्या घोष गजरी ।
ध्वनि रिघतांचि कर्णविवरी ।
भितरील पातकांचिया हारी ।
दिशा लंघोनि पळताती ॥३॥
आनंदासि उणेंचि नाहीं ।
कोंदोनि ठाके अंतर्बाही ।
नाना चरित्रांची नवाई ।
श्रोते ऐकोनि संतोषती ॥४॥
गिरी उचलिला गोवर्धन ।
निजमुखें प्रासिला हुताशन ।
काळिया आणिला नाथून ।
मिसें जाऊन चेंडूवाच्या ॥५॥
वत्सें गोवळे चतुराननें ।
नेतां अवघीं आपणचि होणें ।
स्तनीं लावितां पूतनाशोषणें ।
केलीं विंदानें अघटित ॥६॥
परता सारुनियां सागर ।
माजी रचिलें व्दारकापूर ।
निद्रा न मोडितां नारीनर ।
मथुरा नेऊन सांठविली ॥७॥
काळयवनासि ठकिलें कैसें ।
मुचकुंदावरी नेला पळत्या मिसें ।
जाळूनि त्याचे केलें कोळसें ।
आपण निराळा साक्षपणें ॥८॥
भाजीदेठें तृप्त होणें ।
पांडवा नेणतां ऋषिभोजनें ।
परीक्षितीसी गर्भीचि रक्षणें ।
अपूर्व विंदाने श्रीहरीचीं ॥९॥
यशोदेचें स्तनपान करीत ।
नंदा कडिये विराज तेथ ।
गोपिकांचे मनोरथ ।
पूर्ण करित रासक्रीडे ॥१०॥
गौळणी रंजवी नानापरी ।
दही दूध लोणी त्यांचे चोरी ।
उणें पडतां त्यांचिये घरीं ।
अधिकचि करीं वाढूनियां ॥११॥
गायींमागें धांवे रानीं ।
घोंगडें काठी पावा घेउनी ।
नानापरीचीं खेळे खेळणीं ।
लीलाविग्रही अवतारी ॥१२॥
ऐशीं अगाध दिव्य चरित्रें ।
गाती ऐकती त्यांची गात्रे ।
अवघीं होऊनियां पवित्रें ।
जाती वैकुंठा निळा म्हणे ॥१३॥
२०
वळत्या आम्हांसी पाठवी ।
त्याचा नाठवी उपकारही ॥१॥
नका येऊं देऊं संगें ।
लावा मागें भोवंडुनी ॥२॥
याची वोढाळें धांवती ।
सैरा नाटोपती तें आम्हां ॥३॥
निळा म्हणे ऐकोनी हरी
त्यांचे करी समाधान ॥४॥
२१
जिवलग माझे गडी ।
न गमे घडी तुम्हांविण ॥१॥
सांगा जे जे मनोरथ ।
पुरवीन आर्त तुमचें तें ॥२॥
नका आतां उदासीन ।
करुं मन मजवरी ॥३॥
निळा म्हणे हरि ऐसा ।
करी लालसा दासांची ॥४॥
२२
शिंगे काहाळा मोहरीं पावे ।
नादें हेलावे अंबर ॥१॥
वाकी घागर्या तोडर पायीं ।
धावती गाई थाट पुढें ॥२॥
मोर कुंचे चांदिवे वरि ।
नाचती गजरीं हरिनामें ॥३॥
पढती ब्रीद्रें सवें निळा ।
बहुत गोपाळा आवडे ॥४॥
२३
सुंदर उटी मलयागरे ।
वेढिलीं चिरें पापेंचि ॥१॥
मोरपिसें मुगुटावरी ।
मुरली अधरी वाजवितु ॥२॥
घनश्याम हा मदनमूर्ती ।
झळके दीप्ती पदकाची ॥३॥
निळा म्हणे पांडूरंग ।
संतसंग भोंवताला ॥४॥
२४
मोहर्या पांवे तलालोरी ।
नाचती गजरीं गीत गाती ॥१॥
शिंगें काहाळा मृदंग विणे ।
गाणें नाचणें निज छंदें ॥२॥
टिपरी घागर्या एकची घाई ।
उठिताती पायीं झणत्कार ॥३॥
निळा म्हणे रंगले रंगें ।
केलें श्रीरंगें आपणासें ॥४॥
२५
मृदु मधुर वाजवीत वेणु ।
सावळा नंदनु नंदाचा ॥१॥
तेणें गोपिका वेधल्या ।
पात्र झाल्या ब्रम्हसुखा ॥२॥
रंजवित्या विनोदवचनीं ।
हास्य करुनि हासवीतु ॥३॥
निळा म्हणे त्यांचिया गळां
घाली वेळोवेळां करपल्लव ॥४॥
२६
सुकुमार सुंदर ।
अंगकांति मनोहर ॥१॥
विठो घननीळ सांवळा ।
लावण्यें मदनाचा पुतळा ॥२॥
कसीयेला पीतांबर ।
चरणीं ब्रीदाचा तोडर ॥३॥
निळा म्हणे माळा कंठी ।
मुगुटीं मोरविसावेटी ॥४॥
२७
पोसणाचि परी आवडला ।
मानु दिधला पुत्रपणा ॥१॥
मागें पुढें सांभाळिती ।
त्याचेंचि करिती कोड सदां ॥२॥
खांदी कडिये घेउनी सुखें ।
बोलों हरिखें शिकविती ॥३॥
निळा म्हणे ऐसे लोक ।
वानिती कौतुक परस्परें ॥४॥
२८
धीट अधिकार कापिले ।
बधिर बोलिके तोतिरे ॥१॥
भाविकांचा गोडा भावो ।
देखोनि सर्वे नाचे देवो ॥२॥
म्हणे धन्य तुमचें कर्म ।
अवघें माझेचि ठाईं प्रेम ॥३॥
निळा म्हणे तुम्हांविण ।
दुजें आप्त मज तें कोण ॥४॥
२९
याज्ञिक मंत्रे अवदान देती ।
त्याहुनी अधिक या उच्छिष्टा बोराची प्रीती ॥१॥
हे काय अवगुण नव्हती सांगा ।
प्रत्यक्ष ठाऊकेचि आहेती जगा ॥२॥
सांडूनियां सेजे लक्ष्मी ऐसी ।
भोगितो विद्रूप कौंसाची दासी ॥३॥
घरींची दही दुधें या न लगती गोडें ।
चोरटा लोकांची मोडितो कवाडें ॥४॥
श्रुतिस्मृतीची ही वचनें नेघोनियां कानीं ।
हांसे श्रलाघे शिव्या देतां गवळणी ॥५॥
निळा म्हणे याची खोडीचि हे ऐशीं ।
ते बोलोनि काय मानली यासी ॥६॥
शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या