श्री नवनाथ भक्तिसार १ ते ४०

श्री नवनाथ भक्तिसार १ ते ४०


श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय १

श्रीगणेशाय नमः

श्रीगुरुभ्यो नमः ॥

श्रीपांडुरंगाय नमः ॥ श्रीकुलदेवतायै नमः ॥ श्रीमातापितृभ्यां नमः ॥

ॐ नमो जी हेरंवमूर्ती ॥ वक्रतुंडा गणाधिपती ॥ विद्यार्णवा कळासंपत्ती ॥ भक्तसंकट वारीं गजानन ॥१॥

सदैव धवला श्वेतपद्मा ॥ विद्याभूषित कलासंपन्नधामा ॥ तुझ्या वंदितों पादपद्मा ॥ ग्रंथाक्षरां बोलवीं ॥२॥

तूं निश्वळ निरंजन निर्विकार ॥ परी भक्तरज्जुबंधनाधार ॥ प्रेमें संभवोनि मूर्ति साकार ॥ आम्हां दासां मिरविसी ॥३॥

तरी वक्रतुंडा पाशांकुशधरा ॥ किंकिणीमंडिता ग्रंथादरा ॥ येऊनि स्वामी वदनसुंदरा ॥ मम रसनारस सेवीं कां ॥४॥

अगा अर्थ – लिंग – प्रकरण – र्‍हस्व – ॥ दीर्घ शृंगार धारणा सुरस ॥ छंद ताल नवरसरस ॥ ग्रंथामाजी आदरीं कां ॥५॥

हे गणाधिपते गणराज ॥ मी अबुध वर्णना आहे सहज ॥ परी कृपा करोनि सकळां भोज ॥ विकळ आपदा हरी आतां ॥६॥

हे मोरेश्वरा गणाधिपति ॥ सर्वविषयाधीशमूर्ती ॥ मंगळारंभी मंगळाकृती ॥ आरंभीं स्तुती पार्थितो ॥७॥

तरी सरस्वती कळामांदुस ॥ सवे घेऊनि वहनहंस ॥ या संतांगणीं येऊनि सभेस ॥ विराजावें महाराजा ॥८॥

जी मंगलदायक वाग्भवानी ॥ चातुर्थसरिता ब्रह्मनंदिनी ॥ ती महाशक्ती हंसवाहिनी ॥ येऊनि घेई महाराजा ॥९॥

जीचेनि कृपें वांकुडें दृष्टी ॥ वाचस्पतीच्या मिरवती कोटी ॥ ती माय तूं सवें गोरटी ॥ घेऊनि येई महाराजा ॥१०॥

असो ऐसें पाचारणवचन ॥ ग्लानित भावना सम्यक् पाहून ॥ ग्रंथासनीं मूर्तिमंत येऊन ॥ वरालागीं ओपिजे ॥११॥

सकळसिद्धी पूर्णपणा ॥ पावोत ऐशा विनीतवचना ॥ वरद मौळी हस्तकंजना ॥ स्पर्शोनि ज्ञान मिरविलें ॥१२॥

म्हणे महाराजा कलोत्तमा ॥ सिद्धी पावेल काव्यमहिमा ॥ ऐसे बोलोनि सुशीलधामा ॥ रसने स्थापिली सरस्वती ॥१३॥

यापरी नमितों श्रीगुरुराज ॥ जो अज्ञानतमी सविता विराजे ॥ जो मोक्षपदातें वरवूनि काज ॥ साधकातें विराजवी ॥१४॥

तो ज्ञानेश गुरु ज्ञानदिवटी ॥ संजोगोनि बैसला मम पृष्ठीं ॥ लेखणी कवळोनि करसंपुटीं ॥ ग्रंथालागीं आदरीतसे ॥१५॥

वरदहस्तें स्पर्शोने मौळी ॥ फेडिली सकळ अज्ञानकाजळी ॥ यापरी तया बद्धांजुळी ॥ अनन्यभावें नमितों मी ॥१६॥

जो नरहरिवंशीं विजयध्वज ॥ धुंडिराज नाम तयाचें साजे ॥ तोही पृष्ठीं बैसोनि सहज ॥ ग्रंथालागीं आदरीतसे ॥१७॥

आतां नभूं ज्ञानशक्ती ॥ जी सत्तामयी चिदभगवती ॥ अनन्यभावें चरणांवरती ॥ भाळ तिचिये अर्पोनियां ॥१८॥

यापरी नमितो श्रोते संत ॥ कीं तुमच्या गृहींचा मी अतीत ॥ तरी ग्रंथांतरीं सुरस नितांत ॥ प्रेमभरित दाटवा ॥१९॥

अहो प्राज्ञिक संत श्रोतीं ॥ प्रत्यक्ष तुम्ही महेशमूर्ती ॥ तुम्हां वर्णावया अबुध शक्ती ॥ मजमाजी केवीं मिरवेल ॥२०॥

परी धन्य तुम्ही भक्तिंवाडें ॥ स्वीकारितां बोल बोबडे ॥ जड बाळा उभवोनि कोडें ॥ जगामाजी मिरवितां ॥२१॥

कीं पहा जैसें कांचमण्यास ॥ सोमकांत नांव ठेविलें त्यास ॥ तेणोंचे शब्दें लाज सोमास ॥ वरवूनि बुंदां ढाळीतसे ॥२२॥

तेवीं तुमचा शरणागत ॥ नरहरि मालू धुंडीसुत ॥ तस्मात महंत श्रोते संत ॥ करा सरतें आपणांतरीं ९ ॥२३॥

यापरी पूर्वी कथासारामृत ग्रंथ ॥ वदविला तुम्हीं श्रद्धायुक्त ॥ आतांही ओपूनि वरद हस्त ॥ भक्तिसार वदवा हा ॥२४॥

जे संत झाले जगद्विख्यात ॥ तयांचें माहात्म्य वदविलें समस्त ॥ परी सारसार कथा ज्यांनी सांप्रदाय जगद्विख्यात ॥ जगामाजी स्थापिले ॥२६॥

तरी त्यांची सर्व कथा ग्रंथीं ॥ स्वीकारावया अवधान द्यावें श्रोतीं ॥ असो कलिप्रारंभीं रमापती ॥ नवनारायणां पाचारी ॥२७॥

उद्भवासी बैसवोनि सन्निध ॥ कनकासनीं यादववृंद ॥ तंव ते नवनारायण प्रसिद्ध ॥ प्रविष्ट झाले द्वारके ॥२८॥

कवि प्रथम हरि दुसरा ॥ अंतरिक्ष तृतीय होय चतुर ॥ महाप्राज्ञिक प्रबुद्ध नर ॥ नारायण चतुर्थ तो ॥२९॥

पंचम महाराज पिप्पलायन ॥ सहावा आविर्होत्र नारायण ॥ सातवा द्रुमिल आठवा चमस जाण ॥ करभाजन नववा तो ॥३०॥

ऐसे नवनारायण महाराज ॥ द्वारकेंत पातले सहजासहज ॥ रमापतीचें पाचारणचोज ॥ दृश्य झाले धवळारी ॥३१॥

हरीनें पाहतांचि नारायण ॥ सोडिता जाहला सिंहासन ॥ परम गौरविले आलिंगून ॥ कनकासनीं बैसविले ॥३२॥

सकलवैभवभूषणाकार ॥ मेळवोनि सकळ अर्चासंभार ॥ सारिता झाला सपरिकर ॥ षोडशोपचारें पूजेसी ॥३३॥

हरिचा गौरव पाहोन ॥ बोलते झाले नारायण ॥ कवण अर्थी पाचारण ॥ आम्हांसी केलें श्रीरंगा ॥३४॥

हरि म्हणे जो महाराजा ॥ कीं मनीं काम वेधला माझ्या ॥ कलींत अवतार घेणें ओजा ॥ तुम्हीं आम्हीं चलावें ॥३५॥

जैसे सम्रुच्चयें एकमेळीं ॥ राजहंस जाती उदधिजळी ॥ तेवीं तुम्हीं कृपाकल्लोळीं ॥ अवतारदीक्षा मिरवावी ॥३६॥

येरु म्हणती जनार्दना ॥ अवतार घ्यावा कवणे स्थाना ॥ कवण नामीं कवण लक्षणां ॥ जगामाजी मिरवावें ॥३७॥

यावरी बोले द्वारकाधीश ॥ कवि नारायण जो कां प्रत्यक्ष ॥ तेणें मच्छिंद्र होऊनि दक्ष ॥ जगामाजी मिरवावें ॥३८॥

यावरी हरी जो महादक्ष ॥ तो तंव शिष्य होऊनी प्रत्यक्ष ॥ महाराज नामें तो गोरक्ष ॥ जगामाजी मिरविजे ॥३९॥

यापरी अंतरिक्ष नारायण नाम ॥ तो जालिंदर मिरविजे प्रकाम ॥ तयाचा शिष्य भक्तिद्रुम ॥ प्रबुद्ध नामें कानिफा ॥४०॥

यापरी पंचम पिप्पलायन प्रकाम ॥ मिरविजे जगीं चरपट नाम ॥ आविर्होंत्र जो योगद्रुम ॥ मिरविजे जगीं नामें नागेश ॥४१॥

यापरी द्रुमिल अतिसमर्थ ॥ जगीं मिरविजे भरतनाथ ॥ आणि चमस नारायण जगीं विख्यात ॥ रेवणनामें मिरविजे ॥४२॥

नववा जो करभाजन ॥ तो गहिनी ऐसें मिरविजे नाम ॥ ऐसे अवतार महीकारण ॥ दीक्षेप्रति मिरवावे ॥४३॥

म्हणाल एकटपणीं वास ॥ करणें सांगतां आह्मी कलीस ॥ तरी तुम्हांसवें अवतारास ॥ बहुत येतील महाराजा ॥४४॥

प्रत्यक्ष कवि वाल्मीक सुरस ॥ तो पुढें होईल तुलसीदास ॥ आणि शुक महाराज जो ब्रह्ममास ॥ कबीर भक्त होईल तो ॥४५॥

यापरी जो व्यास मुनी ॥ तो जयदेव होईल महाप्राज्ञी ॥ आणि उद्धव माझा प्राणाहुनी ॥ आवडता होईल नामा तो ॥४६॥

आणि भक्तिप्रौढी जांबुवंत ॥ तो नरहरि होईल नितांत ॥ प्रत्यक्ष जो बलराम भ्रात ॥ पुंडलीक होईल तो ॥४७॥

मीही प्रत्यक्ष जन्मोन ॥ ज्ञानदेव नामें मिरवीन ॥ आणि धवलारी जो पंचानन ॥ निवृत्तिनाथ होईल कीं ॥४८॥

आणि सत्यनाथ चतुरानन ॥ तो स्वनामीं मिरवील सोपान ॥ जी योगमाया मानसमोहन ॥ मुक्ताबाई विराजेल ॥४९॥

यापरी प्राज्ञक हनुमंत ॥ तो रामदास होईल महाभक्त ॥ आणि कुब्जा दासी मातें रमत ॥ जनी जनांत होईल कीं ॥५०॥

असो ऐसें समुच्चयेंकरोन ॥ कलींत वाढवावें भक्तिमाहात्म्य जाण ॥ मग अवश्य म्हणोनि नारायण ॥ पुढें बोलत प्रश्नातें ॥५१॥

म्हणती महाराजा सर्वज्ञमूर्ती ॥ आम्हां सांगतां जन्मस्थिती ॥ परी कवण स्थानीं केउते युक्तीं ॥ व्यक्त होणें तें सांगा ॥५२॥

यावरी बोले प्रत्यक्ष नारायण ॥ कीं दीक्षेचें भविष्यपुराण ॥ पूर्वीच कथिलें पराशरनंदनें ॥ महामुनि व्यास तो ॥५३॥

अगा पूर्वी अठ्ठ्यांयशीं सहस्त्र ऋषी ॥ निर्माण झाले विधिवीर्यासीं ॥ तें वीर्य चुकोनि ठायाठायासी ॥ अपाप कांहीं उरलें असे ॥५४॥

तें जीवदशेवांचोनि सत्य ॥ महाराजा न पावे उदय ॥ तरी ते ठायीं ठायीं केउतें वीर्य ॥ त्याचें ठाय ऐकावें ॥५५॥

उपरिचर वसु यानी असतां ॥ वीर्य गळलें उर्वशी पाहतां ॥ तें शरस्तंबीं दुरोनि द्रवतां ॥ आदळतां झालें त्रिभाग ॥५६॥

यमुनेंत वीर्यबिंदु द्रोणाकांठीं ॥ पडतांचि झाले विभाग शेवटीं ॥ दोन भाग द्रौणापोटीं ॥ एक जळीं पडियेला ॥५७॥

असो पर्णद्रोणांत जो भाग पडिला ॥ तो तत्काळ द्रोणकूपीं जन्मला ॥ परी जळांत जो भाग पडिला ॥ तो ग्रासिला मत्स्यानें ॥५८॥

तरी तें मत्स्युदरीं वीर्य ॥ नारायण प्रत्यक्ष आहे ॥ परी जीवदशेविण गर्भवंशोदय ॥ होत नाहीं महाराजा ॥५९॥

तरी प्राज्ञिक कवि नारायण ॥ तेणें मत्स्युदरी जन्म घेणें ॥ मच्छिंद्र ऐसें जगांत नामाने ॥ मिरवावें महाराजा ॥६०॥

यापरी शिव कामावरी कोपोन ॥ तृतीयनेत्रींचा काढोनि अग्न ॥ महास्मर केला भस्म तेणें ॥ ऐसें ग्रंथ बोलती ॥६१॥

परी तो काम द्विमूर्धनी ॥ बैसला आही वीर्य प्राशन करोनी ॥ तरी तयाचे जठरीं अंतरिक्ष जाऊनी ॥ जालिंदर नामें मिरवेल ॥६२॥

यापरी कुरुवंशीं जनमेजयें ॥ नागसत्री आवाहन केलें आहे ॥ तया वंशीं महान पाहें ॥ बृहद्रथ राणा मिरवेल ॥६३॥

तो महीलागीं करील हवन ॥ तेव्हां गर्भ सांडील द्विमूर्धन ॥ यज्ञकुंडीं देदीप्यमान ॥ जालिंदरें जन्मावें ॥६४॥

यापरी ब्रह्मवीर्य सहस्त्रेंशीं ॥ ऋषि निर्मिले सहस्त्र अठ्ठ्यायशीं ॥ तेव्हां वीर्य रेवातीरासी ॥ रेवेमाजी पडियेलें ॥६५॥

तें महीचे परम कुशीं ॥ वीर्य आहे रेवातीरासी ॥ तेथें व्यापोनि जीवदशेसी ॥ देहालागीं मिरवावें ॥६६॥

तो महाराजा चमस नारायण ॥ रेवणसिद्ध मिरविजे नामानें ॥ रेवारेवेंत झाला जन्म ॥ म्हणोनि नाम हें त्याचें ॥६७॥

तेचि वेळीं आणिक रेत ॥ सर्पिणीमौळीं अकस्मात ॥ पडतां प्राशिलें तिनें नेमस्त ॥ भक्ष्य म्हणोनि जाण पां ॥६८॥

ते जनमेजयाचे नागसत्रांत ॥ नाग आहुति विप्र देत ॥ तये वेळीं आस्तिकें निश्वित ॥ सर्पिणीतें लपविलें ॥६९॥

ब्रह्मवीर्य उदरांत ॥ अंडजाशुक्तिरत्नयुक्त ॥ पुढें होईल महानाथ ॥ भविष्य जाणोनि आच्छादी ॥७०॥

महातरुच्या पोखरी ॥ तक्षकात्मजा पद्मिनी नारी ॥ ठेवितां प्राज्ञिक ऋषीश्वरी ॥ नवमास लोटले ॥७१॥

असो त्या अंडजाशुक्तिकायुक्त ॥ जीवदशा सकळ होऊनि मुक्त ॥ तरी आविर्होंत्र नारायण तेथ ॥ संचरिजे महाराजा ॥७२॥

वीर्य अंडजपात्र सांडोनी ॥ गेली आहे तक्षकनंदिनी २ ॥ तो वडाच्या पोखरस्थानीं ॥ अद्यापि आहे महाराजा ॥७३॥

तरी तेथें आविर्होत्र ॥ प्रवेश करितां सत्पात्र ॥ वटसिद्धनाथ स्वतंत्र ॥ तया देहीं मिरवावे ॥७४॥

यापरी मित्ररेत मंत्रसंपत्तीं ॥ कृपें कुरवाळील मच्छिंद्रजती ॥ ती वरदहस्ताची उकरडा विभूती ॥ साचोकार मिरवेल ॥७५॥

तें मंत्रप्रतायें सूर्यवीर्य ॥ सविताराज सांडिता होय ॥ परी तें भविष्यकारणीं उकरडामय ॥ वरदभस्म मिरवेल ॥७६॥

तेथें हरी जो नारायण ॥ शीघ्र संचरोनि दीक्षाकारण ॥ गौरक्ष ऐसें प्रतिष्ठानामानें ॥ जगामाजी मिरवावें ॥७७॥

यापरी मृडानीकारणीं ॥ सुरवर आलिया दक्षसदनीं ॥ ते कमलोद्भव पाकशासनी ॥ समारंभें पातले ॥७८॥

परी दक्षात्मजेची रुपरहाटी ॥ नेत्रकटाक्ष पाहतां परमेष्ठी ॥ तेणें धडाडोनि कामपाठीं ॥ इंद्रियद्वारा द्रवला तो ॥७९॥

परी तो चतुराननी ॥ बैसला होता समास्थानीं ॥ काम द्रवतां इंद्रियवदनीं ॥ परम चित्तीं लाजला तो ॥८०॥

मग रगडोनि चरणटांचे ॥ छिन्नन्व केलें रेताचें ॥ तें एक आगळें साठ सहस्त्रांचें ॥ रेतभाग वहियेलें ॥८१॥

तें साठ सहस्त्र रेतप्रभाणासी ॥ जीवदशा अपत्य वालखिल्यऋषींसी ॥ झाले परी एक भागासी ॥ वीर्य आहे तैसेंच ॥८२॥

तें लज्जायुक्त होऊनी ॥ केरासह सांडिले भागीरथीजीवनीं ॥ तयांतूनि एक भाग जाऊनी ॥ कुशवंटीं ॥ स्थिरावला ॥८३॥

तरी ते कुशदरीचे निखळीं ॥ रेतभागाची आहे वेली ॥ ती पिप्पलायन माउली ॥ संचारावें तेणें तेथें ॥८४॥

टांचे चरपटलें आहे रेत ॥ म्हणोनि नाम चरपटनाथ ॥ जगांत मिरवोनि जगविख्यात ॥ दीक्षेलागी विराजावा ॥८५॥

यापरी कुंभोदभवाचा उदय झाला ॥ तो मित्रकामशराचा लोट लोटला ॥ तो गगनपंथें विमुक्त झाला अतिबळें करोनियां ॥८६॥

एक भाग घटीं पडतां ॥ अगस्तिउदय झाला तत्त्वतां ॥ एक भाग महीवरता ॥ कैलिकसदनीं पातला ॥८७॥

तो महाराज कैलिकऋषी ॥ भिक्षाभरतरी ऊर्ध्वशी ॥ भरतरी म्हणती भिक्षापात्रासी ॥ आंगणीं तें ठेविलें ॥८८॥

तों मित्ररेत अकस्मात ॥ येऊनि पडिलें भरतरीआंत ॥ तें कौलिकें पाहोनि भविष्यातें ॥ भरतरीं तैसें रक्षितसे ॥८९॥

तरी ते भरतरीरेतसंगीं ॥ द्रुमिल नारायण प्रसंगीं ॥ संचारोनि रेत अंगीं ॥ भरतरी नामें मिरविजे ॥९०॥

यापरी हिमाद्रीच्या विपिनस्थानी ॥ दिग्गज ठेला महीते शयनीं ॥ तैं सरस्वतीचे उद्देशेंकरोनी ॥ विधि वीर्यासी ढांसळला ॥९१॥

तें वीर्य गजकर्णात ॥ पडतांचि झाले चाली ॥ चालता मेदलें पाउलीं ॥ तया पादसंधींत तनु ओतिली ॥ जीवदशा अत्रीची ॥९३॥

तैसा गजकर्णसूतिकारण ॥ प्रबुद्ध मिरविजे रेतरत्न ॥ तया नामाभिधानी प्रयत्न ॥ कर्णकानिफा मिरविजे ॥९४॥

यापरी गोरक्षाची हतवटी ॥ पडतां वाळवंटाचे पोटीं ॥ कर्दमओपुतळा करितां जेठी ॥ अभिमंत्रोनि भविष्यांत्तर ॥९५॥

मंत्रशक्ती विष्णुवीर्य ॥ आव्हानिलिया पुतळामय ॥ तैं करभाजनें संचराया ॥ जीवदशा मिरवावी ॥९६॥

ऐसें सांगोनि रमारमणें ॥ संतुष्ट केले नवनारायण ॥ मग परस्परें नमनानमन ॥ करोनियां उठले ते ॥९७॥

असो भगवंतेंशीं नवनारायण ॥ पाहती मंदराचळमौळीस्थान ॥ श्रीशुकाचार्य समर्धपासीं जाऊन ॥ समाधीं वरियेलें ॥९८॥

नव समाधी मेरुपाठारीं ॥ दहावी समाधी शुकऋषीश्वरीं ॥ असो ते दाही स्थूळशरीरीं ॥ पुढें तेथोनियां निघाले ॥९९॥

यापरी शुकवीर्याचें कथन ॥ वद्रिकाश्रमीं सोमब्राह्मण ॥ रंभाउद्देशें झालें पतन ॥ कबीर तेथें जन्मला ॥१००॥

ही कथा भक्तिकथामृतांत ॥ वदविली आहे जगन्नाथें ॥ आतां नवनारायण झालें व्यक्त ॥ त्यांची कथा ऐक वी ॥१॥

असो वसुवीर्य दोन्ही भाग झाला ॥ एक मच्छीनें प्राशिला ॥ तंव कवि नारायण संचरोनि वहिला ॥ गर्भ लागला वाढीसी ॥२॥

दिवसानुदिवस नवमास ॥ मच्छीने लोटिले जलोदरास ॥ पुढें प्रसूत अंडज सुरस ॥ यमुनाजळीं व्हावें जों ॥३॥

तों तेथें एक कथा वर्तली ॥ श्रीकैलासीं अपर्णा माउली ॥ शिवासी म्हणे कृपासाउली ॥ अनुग्रह मज द्यावा जी ॥४॥

तुम्ही जपता जो मंत्र ॥ तो मज द्यावा जी पवित्र ॥ तेणेंकरोनि मी चिर ॥ सनाथपणें मिरवेन जी ॥५॥

शिव म्हणे उमे ऐक ॥ मी मंत्र उपदेशीन सकळिक ॥ परी एकांत ठाव अलोकिक ॥ ऐसा जाण पाहिजे गे ॥६॥

अपर्णा म्हणे एकांतस्थान ॥ तरी महीवरी शोधूं आपण ॥ ऐसें ऐकतां दयाघन ॥ अवश्य तीतें म्हणतसे ॥७॥

मग सिद्ध करोनि नंदिकेश्वर ॥ हिंडतां स्थाने महीवर ॥ श्रमोनि वर्ततां उमाईश्वर ॥ यमुनेतटीं येऊनि पोंचले ॥८॥

मग उतरोनि नंदिकेश्वरावरुनि तीं ॥ नंदी ठेवोनि तटावरती ॥ उभयतां उतरोनि यमुनेसरितीं ॥ जवळ कांठीं बैसलीं ॥९॥

तंव तो यमुनातटएकांत ॥ तेथें मनुष्यांची न मिळे जात ॥ ऐसें पाहोनि शुद्ध एकांत ॥ तें स्थान ईश्वरासी मानलें ॥११०॥

परी तो मच्छोदरांत ॥ कवि नारायण नेणोनि त्यांत ॥ पार्वतीतें उपदेशित ॥ मंत्रसंजीवनीसी नाथ ॥११॥

तीतें तो मंत्र उपदेशितां ॥ मच्छी तेथें होती सत्यता ॥ तो उपदेशशब्द गर्भी तत्त्वतां ॥ मच्छिंद्रानें ऐकला ॥१२॥

ऐकलेपरी ग्रहणचि झालें ॥ तेणेंकरुनि ज्ञान प्रगटलें ॥ मीतूंपण सर्व सरलें ॥ सर्वचि ब्रह्म सनातन ६ ॥१३॥

असो शिव पार्वतीतें पुसत ॥ कीं कैसें चोज उपदेशांत ॥ तूतें सांपडेल खूण ते मातें ॥ बोलानि दावीं अपर्णे तूं ॥१४॥

ऐसें शिव तीस पुसतां ॥ तों आधींच मच्छेंच्र झाला बोलता ॥ म्हणे महाराजा आदिनाथा ॥ ब्रह्मवोज मिरवेल ॥१५॥

आतां किंबहुना चराचरा ॥ असे स्वरुपीं वृत्ति साकार ॥ नग नोहे हेमचि सार ॥ आब्रह्मभुवनापासोनी ॥१६॥

ऐसें शिव ऐकतां वचना ॥ जळीं पाहे चाकाटोन ॥ तों मच्छोदरीं नारायण ॥ कवि महाराज समजला ॥१७॥

मग शंकर बोलते झाले त्यातें ॥ म्हणती महाराज तूं आहेस येथें ॥ तरी मम उपदेशाचा तूतें ॥ लाभ झाला कविराया ॥१८॥

परी हें फारचि झालें अपूर्व ॥ पुढें ऐक आनंदपर्व ॥ मंत्रउपदेशगौरव ॥ दत्तमुखीं करवीन मी ॥१९॥

तरी तुज जन्म झालियापाठीं ॥ बद्रिकाश्रमी यावें शेवटीं ॥ तेथें तूतें देईन भेटी ॥ सर्व सामग्री सचिन्ह ॥१२०॥

ऐसें बोलोनि आदिनाथ ॥ स्वस्थाना गेला अपर्णेसहित ॥ येरीकडे गर्भ मच्छोदरांत ॥ तोचि मंत्र घोकीतसे ॥२१॥

यापरी भरतां पूर्ण दिवस ॥ मच्छीनें प्रसूतकळा समयास ॥ अंड सांडोनि जळतटास ॥ मच्छी गेली जळोदरीं ॥२२॥

असो अंड सांडोनि तीरास ॥ मच्छी गेली जळोदरास ॥ त्यास कांहीं लोटल्या दिवस ॥ यमुनातीजळी ॥ निजगणासहित संचरले ॥२४॥

तो अकस्मात मित्रात्मजातटी ॥ अंडजशुक्तिका पाहिली दृष्टीं ॥ मग सर्व मिळोनि चंचुपुटीं ॥ खाद्य म्हणोनि भेदिती ते ॥२५॥

चंचुपुटांचा भेदवज्र ॥ तेणें अंड झालें जर्जर ॥ द्विशकल होऊनि सत्वर ॥ महीवरे आदळले ॥२६॥

परी वरील शकल पडिलें महीं ॥ खालील शकलांत बाळ विदेही ॥ जैसा अर्क उदकप्रवाहीं ॥ एकाएकीं उतरला ॥२७॥

रुदनशब्द कडकडाट ॥ बाळतेजाचा बोभाट ॥ तें न्याहाळितां चकचकाट ॥ पाहोनियां पळाले ते ॥२८॥

असो सकळशुक्तिका रत्नाकर ॥ आंत मुक्तमुक्तिकेचा भद्र मच्छेंद्र ॥ असतां तमारिकन्यातीर ॥ पावला धीवर त्या काळीं ॥२९॥

तो धीवर कामिकनाम सुभट ॥ पाहतां अंडजशुक्तिका प्रकट ॥ तों आंत रत्नतेज स्फुट ॥ बाळ रम्य देखिला ॥१३०॥

देखिला परी जो सविता ॥ मग चित्तीं द्रवली मोहममता ॥ म्हणे बाळ हें कोमळ तत्त्वतां ॥ यातें भक्षील कोणी सावज ॥३१॥

ऐसा उदय होतां चित्तीं ॥ देव शब्दकुसुमां सांडिती ॥ कीं हे महाराजा कामिकमूर्ती ॥ बाळ नेई वो सदनातें ॥३२॥

अरे हा दक्ष योगींद्रजेठी ॥ तारक नौका महीपाठीं ॥ तरी तूं संशय सोडोनि पोटीं ॥ सदना नेई महाराजा ॥३४॥

ऐसें देववागुत्तररत्न ॥ कर्णपुटिकं होतां भूषण ॥ मग तें दृढ करोनि जतन ॥ हदयसंपुटीं पाळीतसे ॥३५॥

महाविश्वासाचे पाठीं ॥ आधींच मोह नांदेल पोटीं ॥ आनंदाची अपार दाटी ॥ आनंदपात्रीं हेलावे ॥३६॥

जैसें पयाचेनि पात्रीं ॥ घृतशर्करा होय मिश्रिती ॥ तो गोडपणाचा भाग अमृतीं ॥ वाढला कां जाईना ॥३७॥

कीं दरिद्राचे सुरवाडास ॥ मनीं पेटली राजहौस ॥ ते गजशुंडींची माळा ग्रीवेस ॥ सुख कां वाटलें जाईना ॥३८॥

कीं वंशवृद्धि ते शून्यमय ॥ चिंताकाळिमा निशा आहे ॥ तैसा सुतमित्राचा होतां उदय ॥ मग तेथ चिंता कासया ॥३९॥

कीं कवडीसाठीं वोंचितां प्राण ॥ ते मांदूसचि लाधली सुखधन ॥ कीं मृत्युभयातें असुख मानून ॥ चित्त जडे चिंतासाकडीं ॥१४०॥

तों पीयूषाची अनुकूलता ॥ गोडी सुखाचा उदय होतां ॥ मग चिंतानिशीचा आनंदसविता ॥ प्रभेलागीं हेलावे ॥४१॥

मग स्नेहकवचें करसंपुटीं ॥ तोयें न्हाणिला बाळजेठी ॥ हदयीं वाहूनि कामिक पोटीं ॥ सदनीं आणिले तयातें ॥४२॥

शारद्वता नामें सुंदरा नारी ॥ ओपिता झाला तिचे करीं ॥ म्हणे साजणी वंशाधारी ॥ सुत मिरवीं लोकांत ॥४३॥

कीं पाहें पां पूर्ण भरंवसा ॥ कीं राधातनय कर्ण जैसा ॥ तरी तो पुढें राजमांदुसा ॥ जगामाजी आव्हानी ॥४४॥

तन्न्यायें भाग्योदयें ॥ सर्व सुखशयनीं पहुडावे ॥ अहाहा बाळ अवतार होय ॥ कवि नारायण मच्छेंद्र ॥४५॥

मग कामिकहाती सुढाळ सुता ॥ नवरत्नांच्या सम पाहतां ॥ परम आनंदली शारद्वता ॥ बाळ कवळिला स्नेहमेळीं ॥४६॥

स्नेहें धरितांचि पयोघरी ॥ पय दाटलें अतिपाझरीं ॥ जैसें सोमतेजकरी ॥ सोमकांत द्रवतसें ॥४७॥

असो कुशांचें मंडन ॥ स्नेहभावें होतां संगोपन ॥ मग बाळजठरापिंडींचा अग्न ॥ पय पाहोनि स्वीकारी ।४८॥

तैं स्नेहाचा ओघ बाणे ॥ बाळ अंगिकारोनि मार्जनें ॥ तप्तोदकीं घालोनि स्नानें ॥ पालखातें हालवितसे ॥४९॥

आधींच नामें शारद्वता ॥ त्यावरी अपत्यकामी कांता ॥ तेथें बाळमोहकाम द्रवतां ॥ कवण रीतीं वर्णावें ॥१५०॥

आधींच असतां अमरवेलीं ॥ त्यावरी पजन्यर्वृष्टी झाली ॥ मग तो हेलावा लवलव पाउलीं ॥ कवणासी वर्णवे ॥५१॥

ऐसेपरी आनंदस्थितीं ॥ दिवस लोटले कांहींसे मिती ॥ पांच वरुषें वयावरुती ॥ मच्छिंद्रनाथ मिरवला ॥५२॥

तंव कोणे एके दिवसी ॥ सुदिनीं उदईक भूमीसी ॥ पिता म्हणे तमारिकन्येई ॥ चला जाऊं ये मच्छिंद्रा ॥५३॥

अवश्य म्हणे मच्छिंद्रनाथ ॥ कृतांतभगिनीतीरा येत ॥ मग जळोदरीं संचरोनि तात ॥ मच्छबाळां आव्हानीतसे ॥५४॥

तंव जाळ्यासवें मीनधाडी ॥ आंतुल्या ओढी करसंपुती ॥ बाहेर काढितां कामिक जेठी ॥ महीं मीनांतें सोडीतसे ॥५५॥

मच्छिंद्रासी म्हणे सुतोत्तमा ॥ वेंचोनि सांठवी या मीनां ॥ ऐसे वदोनि कामिक पुन्हां ॥ जळामाजी संचरे ॥५६॥

येरीकडे मच्छिंद्रनाथ ॥ मीन देखतां म्हणे हो तात ॥ अहा मातुळकुळा घात ॥ कामिका ताता मांडिला ॥५७॥

तरी आपण असतां ऐसी रहाटी ॥ बरवेपणें पाहतां दृष्टीं ॥ हें योग्य नव्हे कर्म पाठीं ॥ उपकारा मिरवावें ॥५८॥

पूर्वीं आस्तिकें मातुळकुळा रक्षिलें ॥ आपुले तपाचेनि बळें ॥ राव बोधोनि सत्रपाळ ॥ नागकुळा वाचविलें ॥५९॥

मग एक एक मत्स्य वेचोनी ॥ प्रवाहा मेळवी जीवनालागोनी ॥ तें कामिकतातें दृष्टीनें पाहोनी ॥ परम चित्तीं क्षोभला ॥१६०॥

जैसा परम सबळ ॥ पेटला मिरवी वडवानळ ॥ तेवीं कामिकक्रोधाग्नि प्रबळ ॥ हदयानाजी धडाडी ।६१॥

कीं मेघमंडळाचे दाटीं ॥ चपळा पळती तेजावाटी ॥ तैसा धडाडोनि क्रोध पोटीं ॥ बाहेर आला तत्क्षणीं ॥६२॥

लक्षोनि मच्छिंद्राचें मुखमंडन ॥ स्वकरपुटी केले ताडन ॥ म्हणे जळोदरीचे काढितां मीन ॥ बहु श्रम जाणसी ॥६३॥

तरी पुन्हां जळोदरी ॥ मच्छ सोडितोसी कैसा भिकारी ॥ खासील काय उदरांतरीं ॥ भीक मागों जाशील ॥६४॥

ऐसे ऐकोनि कामिकवचन ॥ मनांत मच्छिंन्द्र करी बोलणें ॥ सर्वांत पवित्र भिक्षान्न ॥ दोष त्यासी कांहीं नसे ॥६५॥

तरी हाचि आतां उपदेश ॥ आरंभावे भिक्षान्नास ॥ येरीकडे जळोदरास ॥ कामिक तेव्हां संचरला ॥६६॥

येरीकडे मच्छिंद्रनाथ ॥ दृष्टी चुकवोनि गमन करीत ॥ भ्रमण करितां अद्वैतवनांत ॥ सुढाळ जागा दिसेना ॥६७॥

मग उत्तरदिशा बद्रिकाश्रम ॥ पाहतां झाला योगद्रुम ॥ तेथें द्वादश वर्षे उत्तमोत्तम ॥ योगालागी आचरला ॥६८॥

तें तीव्र तप गा शुचिस्मंत ॥ मंत्रदृष्टी अद्वैतवनांत ॥ लोहकंटक पादांगुष्ठांत ॥ देऊनि तप करीतसे ॥६९॥

ऊर्ध्व वायूचे करुनि भक्षण ॥ दृष्टी अर्का देऊनि दान ॥ वाचा करोनि कृष्णार्पण ॥ हरीभजनीं मिरविल ॥१७०॥

शरीर क्लेशा देऊनि दान ॥ ईश्वरी वेध तनुमनप्रमाणें ॥ तेणें अस्थिपंजरावरोन ॥ त्वचा तितुकी मिरवीतसे ॥७१॥

तपें भक्षिलें सकळ मांस ॥ परी लाग न लागे अस्थित्वचेस ॥ मांस भक्षोनि सकळ भागास ॥ वृद्धिरस सकळ आटिलें ॥७२॥

नेत्र फिरोनि झाल्या वाती ॥ दिसों लागली कार्पासरीती ॥ सकळ तेजाची आटली ज्योति ॥ महाघोर तपानें ॥७३॥

अस्थि त्वचा व्यक्त होऊनी ॥ शिरा दिसती चांगुलपर्णी ॥ सर्व अंग गेले वाळोनि ॥ काष्ठापरी मिरवितसे ॥७४॥

ऐसे क्लेश असंभवित ॥ मच्छिंद्रअंगीं जाणवत ॥ तों तेथें अकस्मात ॥ अत्रिनंदन पातला ॥७५॥

संचरोनि देवालया ॥ स्तविता झाला उमाराया ॥ हे दक्षजामाता करुणालया ॥ दिगंबरा आदिपुरुषा ॥७६॥

कामांतका फणिवेष्टका ॥ रुंडभूषणा कैलासनायका ॥ अपर्णानिधाना कामांतका ॥ वृषभारोहणा महाराजा ॥७७॥

हे सकळ दानवांतका ॥ देवाधीशा उमाकांता ॥ प्रळयरुद्रा त्रिपुरांतका ॥ शूळपाणी महाराजा ॥७८॥

हे शंकरनामाभिधानी ॥ पंचवक्त्रा त्रिनयनी ॥ भस्मधारणा उमारमणी ॥ नरकपाळा विराजसी ॥७९॥

ऐसें स्तुतीचें वाग्रत्न ॥ दत्त अर्पितां माळा करोन ॥ तेणें तोपोनि कामदहन ॥ प्रत्यक्षपणे मिरवला ॥१८०॥

प्रत्यक्ष होतां उमाकांत ॥ नयनीं यजिता झाला दत्त ॥ मग आलिंगोनि प्रेममरित ॥ निकट आपण बैसला ॥८१॥

योगक्षेमाची सकळ वार्ता ॥ शिव पुसतां झाला दत्ता ॥ तेणेंही सांगोनि क्षेमवार्ता ॥ शिवसुखा पुसिलें ॥८२॥

यापरी बोलता झाला दत्त ॥ कीं बद्रिकाश्रमीं कानन बहुत ॥ तरी महाराजा दृष्टी व्यक्त ॥ माजी करा कृपाळुवा ॥८३॥

मग अवश्य म्हणोनि उमारमण ॥ उभयतां पाहूं चालले कानन ॥ परी ही वासना दत्ताकारणें ॥ मच्छिंद्रदैवें उदभवली ॥८४॥

जैसा लाभ असतो पदरीं ॥ तो सहज वळूनि येत घरीं ॥ लघुशंके मूत्रधारीं ॥ मांदुसघट लागतसे ॥८५॥

कीं उष्णत्रासें मही चाली ॥ आतुडे कल्पतरुची साउली ॥ तेवीं दत्तवासना उदभवली ॥ मच्छिंद्रदैवप्रकरणीं ॥८६॥

कीं याजव्रता टाकिल्या बाहेरी ॥ हिरा ठेवोनि नेत गारी ॥ तेवीं दत्तात्रेयवासनालहरीं ॥ उदेली मच्छिंद्रदैवानें ॥८७॥

असो ऐशा लाभभावना ॥ उभयतां रमती बद्रिकाश्रमा ॥ नाना तरुप्लवंगमां ॥ अपार चिन्हें पाहती ॥८८॥

सुरतरु पोफळी ॥ बकुळ चंपक कर्दळी ॥ गुलछबु गुलाब केळी ॥ नारळी सोनकेळी शोभल्या ॥८९॥

की सहज पाषाण ढाळितां महीसी ॥ दैवें आतुडे हस्तपादांसी ॥ तेवीं मच्छिंद्रदैवउद्देशी ॥ दत्तवासना उदभवली ॥१९०॥

ऐसे वर्णितां अपारतरु ॥ तरी बद्रिकेचा फार शेजारु ॥ कानना महा निकट मंदारु ॥ मंदराचळ शोभला ॥९१॥

तयावरोनि वर्षत तोयधर ॥ मणिकर्णिके अपार नीर ॥ ती भागीरथी उत्तमतीर ॥ निजदृष्टीनें पाहिली ॥९२॥

मग तेथ ओघ धरोन ॥ उभयतां करिते झाले गमन ॥ असो मच्छिंद्राकारणें ॥ निजदृष्टीं पाहातील ॥९३॥

तेथें जी जी होईल वार्ता ॥ श्रीगुरु ज्ञानें होय सांगता ॥ निमित्तमात्र धुंडीसुता ॥ ग्रंथामाजी मिरविलें ॥९४॥

धुंडीसुत नरहरिवंशीं ॥ मालू वदे कवित्वासी ॥ निमित्तमात्र नरहरिकृपेसी ॥ तोचि बोलवी ज्ञानेश ॥९५॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्यकिमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥

प्रथमोऽध्याय गोड हा ॥१९६॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

॥ नवनाथभक्तिसार प्रथमोऽध्याय समाप्त ॥


श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय २

श्रीगणेशाय नमः

जयजयाजी मूळपीठवासिनी ॥ पुंडलीकाच्या गोंधळालागोनी ॥ भक्तवरदे भवानी ॥ उभी अससी माये तूं ॥१॥

संत गोंधळी विचक्षण ॥ कंठीं मिरवितां तुळसीभूषण ॥ तेचि माळा सुलक्षण ॥ जगामाजी मिरविसी ॥२॥

घालिती तुझा प्रेमगोंधळ ॥ कामक्रोधांचे देती बळ ॥ गीतसंगीत सबळ ॥ गुण गाती माये तुझे ॥३॥

असो ऐशा गोंधळप्रकरणीं ॥ संतुष्ट होसी माय भवानी ॥ तरी या ग्रंथगोंधळी येऊनी ॥ साह्य करी जननीये ॥४॥

मागिल्या अध्यांयी रसाळ कथन ॥ गणादि सकळांचे केले नमन ॥ उपरी मच्छिंद्राचें जनन ॥ यथाविधी कथियेलें ॥५॥

आतां पुढें श्रवणार्थी ॥ बैसले आहेत महाश्रोती ॥ तयांची कामना भगवती ॥ पूर्ण करावया येई कां ॥६॥

तरी श्रोतीं सिंहावलोकनीं कथन ॥ श्रीदत्तदेव आणि उमारमण ॥ भागीरथीविपिनाकारण ॥ पहात पहात चालिले ॥७॥

जैसे फलानिमित्त पक्षी ॥ फिरत राहती वृक्षोवृक्षीं ॥ त्याचि न्यायें उभयपक्षी ॥ गमन करिती तीरातें ॥८॥

सहज चालती विपिनवाटी ॥ तों मच्छिंद्र देखिला त्यांनीं दृष्टीं ॥ बाळतनू पाठपोटीं ॥ अस्थि त्वचा उरल्या पैं ॥९॥

जटा पिंगट नखें जळमट ॥ फंटकारी पादांगुष्ठ ॥ कार्पासमय झाली दृष्ट ॥ त्वचा लिपटली अस्थींसी ॥१०॥

सर्वांगे शिरा टळटळाट ॥ दिसती अवनी नामपाठ ॥ ध्वनिमात्र शब्द उठे ॥ चलनवलन नयनांचें ॥११॥

ऐसा पाहूनि तपोजेठी ॥ विस्मयो करिती आपुले पोटीं ॥ म्हणती ऐसा कलीपाठीं ॥ तपी नेणों कोणीच ॥१२॥

अहो विश्वामित्रप्रकरणी ॥ दिसतो तपी हा मुगुटमणी ॥ तपार्थ कामना अंतःकरणीं ॥ करणी कोण यातें उदेली ॥१३॥

मग दत्तासि म्हणे आदिनाथ ॥ मी स्थिरता राहतों महीं येथ ॥ तुम्हीं जाऊनि कामनेतें ॥ विचारावें तयातें ॥१४॥

कवणा अर्थी कैसा भाव ॥ उचंबळला कामार्णव ॥ तरी लिप्सेचा समूळ ठाव ॥ काय तोही पहावा ॥१५॥

येऊनि त्यापरी अत्रिनंदन ॥ शिवानंदसूक्तिक सुढाळ रत्न । श्रवणपुटीं स्वीकारुन ॥ तयापासीं पातला ॥१६॥

उभा राहोनि समोर दृष्टी ॥ म्हणे महाराजा तपोजेठी ॥ कवण कामना उदेली पोटीं ॥ तें वरदवरातें मिरवावें ॥१७॥

ऐसे वरदाचे वागवट ॥ मच्छिंद्र श्रवण करितां झगट ॥ नम्रभाव धरुनि प्रकट ॥ तयालागीं बोलत ॥१८॥

कर्णी शब्द पडतां सुखस्थिती ॥ दृष्टी काढोनियां वरती ॥ पाहता झाला दत्ताप्रती ॥ महाराज योगी तो ॥१९॥

भ्रूसंकेतें करोनि नमन ॥ दाविता झाला निजनभ्रपण ॥ जो कीम ईश्वरी आराधन – ॥ प्राप्तीलागी उदेला ॥२०॥

बोले महाराजा कृपासरिता ॥ तुम्ही कोण तें सांगावें आतां ॥ द्वादश वर्षे काननीं लोटतां ॥ मानव नातळे दृष्टीसी ॥२१॥

तरी त्वच्चित्त सदैव भवानी ॥ प्रत्यक्ष झाली मम प्रारब्धें धरणीं ॥ तरी प्रसादनग अभ्युत्थानीं ॥ स्थापूनि जाई महाराजा ॥२२॥

ऐसें तयाचें वागुत्तर ॥ ऐकोनि तोषला अनसूयाकुमर ॥ म्हणे वा रे नामोच्चार ॥ दत्त ऐसें मज म्हणती ॥२३॥

जो व्याघ्रपदीं ऋषिजन्म ॥ अत्रि ऐसें तया नाम ॥ तयाचा सुत मी दासोत्तम ॥ महीलागीं आधारलों ॥२४॥

तरी असो ऐसी गोष्टी ॥ कवण कामना तुझ्या पोटीं ॥ उदेली जे तपोजेठी ॥ शब्दसंपुटीं मिरवीं कां ॥२५॥

येरु म्हणे वरदोस्तु ॥ कामना वरी एक भगवंतु ॥ ऐसें वदता झाला अतीतु ॥ पदावरी लोटला ॥२६॥

जैसी सासुर्‍या बाळा असतां ॥ अवचट दृष्टी पडे माता ॥ हंबरडोनि धांवोनि येतां ॥ ग्रीवे मिठी घालीतसे ॥२७॥

किंवा अवचट वत्सा भेटतां गाय ॥ मग प्रेम लोटी चित्त सदैव ॥ तेणेंपरी मच्छिद्र मोहें ॥ पदावरी लोटला तो ॥२८॥

द्वादश वर्षे तपाचे श्रम ॥ ते आजि फळले मानूनि उत्तम ॥ सांडोनि सकळ आपुला नेम ॥ पदावरी लोटला तो ॥२९॥

परी तपश्रमाचे बहुत क्लेश ॥ हदयीं गहिंवरले दुःखलेश ॥ नेत्रींचे झरे विशेष ॥ पदावरी लोटले तैं ॥३०॥

तेणें झालें पादक्षालन ॥ पुढती बोले करी रुदन ॥ हे महाराजा तूं भगवान ॥ महीमाजी मिरविशी ॥३१॥

रुद्र विष्णु विरिंची सदय ॥ त्रिवर्गरुपी देह ऐक्यमय ॥ ऐसें असोनि सर्वमय ॥ साक्षी महीं अससी तूं ॥३२॥

तरी येऊनि सर्वज्ञमूर्ती ॥ असोनि माझा विसर चित्तीं ॥ पडलासे किमर्थ अर्थी ॥ अपराध गळीं सेवोनियां ॥३३॥

ऐसें म्हणोनि वारंवार ॥ ग्लानींत करी नमस्कार ॥ क्लेशनगीचें चक्षुद्वार ॥ सरितालोट लोटवी ॥३४॥

तरी तो अत्यंत शांत दाता ॥ म्हणे बा हे न करी चिंता ॥ प्रारब्धर्मदराचळाची सरिता ॥ ओघ ओघील आतांचि ॥३५॥

मग वरदहस्ते स्पर्शोनि मौळी ॥ कर्णी ओपीत मंत्रावळी ॥ तेणें अज्ञानदशाकाजळी ॥ फिटोनि गेली तत्काळ ॥३६॥

जैसें माहात्म्य भारती ॥ उदयदृष्टी करितां गभस्ती ॥ मग अंधकाराची व्याप्ती ॥ फिटोनि जाय तत्काळ ॥३७॥

तेवी दत्त वरदघन ॥ वोळतां गेलें सकळ अज्ञान ॥ मग चराचर सकळ जीवन ॥ जैसें हेलावलें दृष्टीसी ॥३८॥

नाठवे कांहीं दुजेपण ॥ झालें ऐक्य ब्रह्मसनातन ॥ जैसें उदधी सरिताजीवन ॥ जीवना जीवनसम दिसे ॥३९॥

ऐसी झालिया जीवनसम दृष्टी ॥ आत्रेय धरिता झाला पोटीं ॥ म्हणे बा रे योगी धूर्जटी ॥ इंदिरावर कोठें तो सांग ॥४०॥

येरु म्हणे जी ताता ॥ ईश्वरावांचोनि नसे वार्ता ॥ जळीं स्थळीं काष्ठीं महीं पर्वता ॥ ईश्वर नांदे सर्वस्वीं ॥४१॥

ऐसें ऐकोनि वागुत्तर ॥ ग्रीवा तुकवी अत्रिकुमर ॥ मग सच्छिष्याचा धरोनि कर ॥ चालता झाला महाराज तो ॥४२॥

सहज चालतां चाले नेटीं ॥ आले आदिनाथ प्रेमदृष्टी ॥ मच्छिंद्र मूर्धकमळधाटी ॥ पदावरी वाहातसे ॥४३॥

शिवें पाहूनि मंददेहीं ॥ म्हणे हा पूर्वी नारायण कवी ॥ मग प्रेमसरितेच्या लोटप्रवाहीं ॥ धरिला हदयीं तत्काळ ॥४४॥

मग त्रिवर्ग येऊनि त्या स्थानीं ॥ दत्तासी म्हणे पंचमूर्धनी ॥ या शिष्यातें अभ्यासोनी ॥ सकळ सिद्धी मिरवीं कां ॥४५॥

जें वेदकारणाचें निजसार ॥ जें सर्वोपकाराचें गुहागर ॥ सकळ सिद्धींचें अर्थमाहेर ॥ निवेदी तूं महाराजा ॥४६॥

जारणमारण उच्चाटण ॥ शापादपि निवारण ॥ शरादपि अस्त्रादिनिबर्हण मंत्रशक्ती त्या वरत्या ॥४७॥

जो जैसा कर्मविजे पाठ ॥ होती दैवतें वरती भेट ॥ वंशवरद वाक्पट ॥ मस्तकीं स्थापोनि जाताती ॥४८॥

वरुण आदित्य सोमस्वामी ॥ भौमशक्रादि यमद्रमी ॥ शिवशक्ति कामतरणी ॥ वर देऊनि उठविले ॥४९॥

विष्णू विरिंची कृपाकृती ॥ वरदबीजे देऊनि शक्ति ॥ ते मंत्र अंखें अपारगती ॥ हदयामाजी हेलावला ॥५०॥

असो सद्विद्येचा मंदराचळ ॥ उभवोनियां अत्रिबाळ ॥ क्षणमात्र वेंचूनि केला सबळ ॥ सिद्धतरणी जेउता ॥५१॥

नागबकादि वातास्त्र ॥ नगनागादि महावज्र ॥ पावक जलधी अस्त्र पवित्र ॥ सांगोपांग तो झाला ॥५२॥

ऐसें सांगोनि सांगोपांग ॥ जाता झाला योगमार्ग ॥ परी सांप्रदाय योजूनि योग ॥ कानफाडी मिरवला ॥५३॥

पुढील भविष्य जाणोन ॥ सांप्रदाय केला निर्माण ॥ षडरुप जोगीदर्शन ॥ कानफाडी मिरवले ॥५४॥

नाथ ऐसें देऊनि नाम ॥ शिंगी शैली देऊनि भूषण ॥ ऐसें परिकरोनि प्रमाण ॥ अत्रिनंदन पैं गेला ॥५५॥

यापरी तो मच्छिंद्रनाथ ॥ नमोनि निघाला आदिनाथ ॥ महीवरी नाना तीर्थे ॥ शोध करीत चालिला ॥५६॥

तो भ्रमण करितां सप्तश्रृंगीं ॥ येता झाला महायोगी ॥ अंबिका वंदोनि मनोमार्गी ॥ सप्रेम स्थितीं गौरविली ॥५७॥

करीत वैखरीं अंबास्तवन ॥ तों आलें कल्पने मन ॥ कीं कांहीं तरी कवित्वसाधन ॥ लोकांमाजी मिरवावें ॥५८॥

कवित्व तरी करावें ऐसें ॥ कीं उपयोगी पडे सर्व जगास ॥ मग योजोनियां शाबरीविद्येस ॥ मनामाजी ठसविली ॥५९॥

यापरी अनेक कल्पना करीत ॥ कीं शाबरीविद्येंचे करावें कवित ॥ परी वरदगुंतीं वश्य दैवत ॥ केउते रीतीं होतील ॥६०॥

मग अंबेपासी अनुष्ठान ॥ करिता झाला सप्तादिन ॥ वेदबीजाचें अभिषिंचन ॥ अंबेलागी करीतसे ॥६१॥

तेणें जागृत महिषमर्दिनी ॥ होऊनि बोले तयालागोनी ॥ बा रे कवण कामना मनीं ॥ वेधली तें मज सांग ॥६२॥

येरु ह्नणे वो जगज्जननी ॥ शाबरी विद्येचें कवित्व कामनीं ॥ वेधक परी वरालागोनी ॥ उपाय कांहीं मज सांग ॥६३॥

उपरी बोले चंडिका भवानी ॥ पूर्णता पावशी सकळ कामनीं ॥ मग त्या सिद्धाचा हात धरोनी ॥ मार्तंडपर्वतीं पैं नेला ॥६४॥

तेथें नागवृक्ष अचिंत्य थोर ॥ तरु नोहे तो सिद्धीचें माहेर ॥ दृश्यादृश्य केलें पर ॥ महातरु नांदतसे ॥६५॥

तेथें करोनि बीजी हवन ॥ तरु केला दृश्यमान ॥ तो कनकवर्ण देदीप्यमान ॥ निजदृष्टीं देखिला ॥६६॥

त्या तरुच्या शाखोपांतीं ॥ नाना दैवतें विराजती ॥ मग नामाभिधानें सकळ भगवती ॥ देवतांची सांगे त्या ॥६७॥

तीं दैवतें धुरंधर बावन्न वीर ॥ मूर्तिमंत असती तरुवर ॥ नरसी काळिका महिषासुर ॥ म्हंमदा झोटिंग वीरभद्र ॥६८॥

वेताळ मारुती अयोध्याधीश ॥ श्रीकोदंडपाणी रामेश ॥ सूर्य नामीं तेथ द्वादश ॥ मूर्तिमंत नांदतसे ॥६९॥

पायरी जलदेवता असती नव ॥ कुमारी धनदा नंदा नांव ॥ विमळा मंगळा ज्ञानप्राप्तिव ॥ लक्ष्मी आणि विख्याता ॥७०॥

यापरी चंडा मामुंडा ॥ रंडा कुंडा महालंडा ॥ अप्सरा जोगिनी शंडवितंडा ॥ तरुभागी विराजल्या ॥७१॥

काळव्याळ वीरभैरव ॥ भस्मकेत सिद्धभैरव ॥ रुद्र ईश्वरी गण भैरव ॥ अष्टभैरव हे असती ॥७२॥

यापरी शस्त्रअस्त्रयामिना ॥ दमि धूमि कुचित भामिना ॥ सातवी ज्वाळा शुभानना ॥ वृक्षावरी त्या असती ॥७३॥

यापरी शंखिनी डंखिणी यक्षिणी ॥ त्या समुच्चयें असती बारा जणी ॥ अष्टसिद्धी महाप्रकरणी ॥ वृक्षावरी विराजल्या ॥७४॥

प्राप्ति प्राकाभ्या अणिमा गरिमा ॥ ईशित्व वशित्व प्रथिमा महिमा ॥ एवंच अष्टसिद्धी नामा ॥ तरुवरी विराजल्या ॥७५॥

अष्टसिद्धींसमवेत ॥ बावन्न वीर सकळ दैवत ॥ तया तरुच्या शाखा व्यक्त ॥ करोनियां बैसले ॥७६॥

ऐसे दृष्टी पाहिले सर्वही ॥ तीं पहाती न बोलती कांहीं ॥ यावरी अंबिका करी काई ॥ निवे दोनी नाथातें ॥७७॥

बा रे ऋष्यमूकपर्वतस्थानी ॥ ब्रह्मगिरीच्या निकटवासनीं ॥ अंजनपर्वत तयासी म्हणी ॥ नदी काचित आहे बा ॥७८॥

दक्षिणओघीं सरिता जात ॥ ते कांठीं महाकाळी दैवत ॥ स्थानें असती जाण तेथ ॥ भगवतीतें नमावें ॥७९॥

तेथोनि पुढें दक्षिणपंथीं ॥ सरितापात्रें जावें निगुती ॥ परी बा तेथें श्वेतकुंडें असती ॥ तोयमरित महाराजा ॥८०॥

तरी शुक्लांवेल कवळूनि हातीं ॥ एक एक सोडावी कुंडाप्रती ॥ ऐशीं कुंडें एकाशतीं ॥ हस्तिपदसमान आहेत ॥८१॥

परी तितुकें पूजन कोरडे वेलीं ॥ सकल सरल्या परत पाउलीं ॥ पाहात यावें ती वल्ली ॥ सकळ कुंडांमाझारी ॥८२॥

जया कुंडांत सजीव वेल ॥ दृष्टिगोचर बा होईल ॥ तया कुंडीं स्नान वहिले ॥ करोनि जीवन प्राशिजे ॥८३॥

तें जीवन प्राशितां निश्वित ॥ मूर्च्छा येईल एक मुहूर्त ॥ तै बारा नाभीं जपावे आदित्य ॥ मूच्छेंमाजी असतां पैं ॥८४॥

मग प्रत्यक्ष होईल तमांतक ॥ मौळी घ्यावा तो हस्तक ॥ पुढें काचकूपिका भरोनि उदक ॥ येथें यावें महाराजा ॥८५॥

मग बारा नामीं करोनि सिंचनीं ॥ तरु न्हाणावा तया जीवनीं ॥ तेव्हां दैवतें प्रसन्न होऊनी ॥ वरदान तूंतें देतील बा ॥८६॥

परी एक वेळां न घडे ऐसें ॥ खेपा घालाव्या षण्मास ॥ एक एक दैवत एक खेपेस ॥ प्रसन्न होईल महाराजा ॥८७॥

ऐसें सांगोनि माय भगवती ॥ गेली आपुले स्थानाप्रती ॥ येरु पावला अंजनपर्वतीं ॥ सरितापात्री ओघातें ॥८८॥

काळी महाकाळी देवतांस ॥ नमोनि निघाला काननास ॥ करीं कवळोनि शुक्लवेलास ॥ कुंडांलागी शोधीतसे ॥८९॥

असो एकशतं कुंडें पाहोन ॥ तितुक्यांत शुक्लवेल स्थापोन ॥ पुन्हां पाहे परतोन ॥ सकळ कुंडांमाझारी ॥९०॥

तों आदित्यनामें कुंडीं तीव्र ॥ ते वेल पाहे साचोकार ॥ तों दृष्टीं पडले पल्लवाकार ॥ स्नान तेथें सारिलें ॥९१॥

स्नान झालिया उदकपान ॥ होतांचि व्यापिलें अतिमूर्च्छेन ॥ परी द्वादश नामीं मंत्रसाधन ॥ सोडिलें नाहीं तयानें ॥९२॥

परी मूर्च्छा ओढवली अतितुंबळ ॥ शरीर झालें अतिविकळ ॥ स्वेद नेत्रें गेला अनिळ ॥ देह सांडोनि तयाचा ॥९३॥

ब्रह्मांडांतोनि अंतर्ज्योती ॥ तीही वेंधों पाहे अंतीं ॥ तरी आदित्यनांवें जाण होतीं ॥ जपालागीं नित्य करीत ॥९४॥

जसें जागृती घडोनि येत ॥ तोंचि स्वप्नीं जीव घोकीत ॥ त्याचि न्यायें उरला हेत ॥ जीव जपी अर्का तो ॥९५॥

ऐसे संकट घटतां थोर ॥ खालीं उतरला प्रभाकर ॥ कृपें स्पर्शोनि नयनीं कर ॥ सावध केला महाराज ॥९६॥

मग कामनेचा पुरवोनि हेत ॥ मस्तकीं ठेविला वरदहस्त ॥ म्हणे बा रे योजिला अर्थ ॥ सिद्धी पावसी येणें तूं ॥९७॥

ऐसें बोलोनि आदित्य गेला ॥ तेणें काचकुपिका भरोनि वहिला ॥ पुन्हा मार्तडपर्वतीं आला ॥ येऊनि नमी अश्वत्थ ॥९८॥

आदित्यनामें करोनि चिंतन ॥ आदित्य तेथें झाला प्रसन्न ॥ म्हणे महाराजा काय कामना ॥ निवेदावी मज आतां ॥९९॥

येरु म्हणे कवित्व करीन ॥ तया साह्य तुवां होऊन ॥ मंत्रविद्या तव नामानें ॥ फळास येवो महाराजा ॥१००॥

अवश्य म्हणूनि तमभंजन ॥ मंत्रविद्या साध्य करुन ॥ बांधला गेला जलजलोचन ॥ मंत्रशक्तिकार्यार्थ ॥१॥

ऐसा सप्त मास येरझारा करुन ॥ दैवतांसी करोनि घेतलें प्रसन्न ॥ मग शाबरीविद्येचा ग्रंथ निर्मून ॥ बंगाल देशीं चालता झाला ॥२॥

असो ऐसी गौरक्षकथा ॥ वदला आहे किमयागारग्रंथा ॥ तेथें किमयांची स्थानें सर्वथा ॥ सांगतलीं आहेत जीं ॥३॥

परी प्रथम अवघड करणें ॥ तें मानवातें न ये घडोन ॥ ते अवतारी असती परिपूर्ण ॥ म्हणोनी घडलें तयांसी ॥४॥

परी सांगावया कारण ॥ स्वमुखें गौरक्ष वदला आहे कथन ॥ त्या ग्रंथाचा आश्रय पाहून ॥ नवही योगी वर्णिले ग्रंथीं ॥५॥

तरी श्रोतीं तया ग्रंथा ॥ दोष न ठेवावा सर्वथा ॥ संशय आलिया किमयागारग्रंथा ॥ विलोकावें विचक्षणीं ॥६॥

मुळावेगळें कांहीं कथन ॥ येत नाहीं जी घडोन ॥ म्हणोनि सकळ संशय सांडोन ॥ ग्रंथ श्रवणीं स्वीकारा ॥७॥

यापरी बळेचि चाळवोनि दोष ॥ निंदोनि जो कां मोडील हरुप ॥ बिकल्पपंथी मिरवितां जगास ॥ पावेल वंशबुडी तो ॥८॥

आणिक वाणी जाईल झडोन ॥ नरकीं पडेल सप्त जन्म ॥ आणि जन्मोजन्मीं शरीरेंकरोन ॥ क्षयरोग भोगील तो ॥९॥

असो आतां तीर्थउद्देशीं ॥ मच्छिंद्र गेला बंगालदेशीं ॥ तेथे फिरत तीर्थवासीं ॥ हेळा १ समुद्रीं पातला ॥११०॥

तये देशीं चंद्रगिरि ग्राम ॥ तेथे नरसिंहाचा झाला जन्म ॥ सुराज पिता विप्रोत्तम ॥ कृतिदेवीकृशीं आचारनेम ॥ सकळ धर्म पाळी तो ॥१३॥

आधीं तपन यजन २ याजन ॥ स्नानसंध्यामाजी निपुण ॥ तयाची कांता गुणोत्तम ॥ सरस्वती नामें मिरवतसे ॥१४॥

सदा सुशील लावण्यखाणी ॥ कीं नक्षत्रपातीं विराजे मांडणीं ॥ वाटे काम इच्छा धरुनि मनीं ॥ तेथें येऊनि बैसला ॥१५॥

कीं स्वर्गी मेघांचे मंडळ पाहीं ॥ तेथोनि चपळा उदया ये ही ॥ कीं अर्क होऊनि गृहीं गोसावी ॥ तेजभिक्षा मागतसे ॥१६॥

जियेचे अधरपंबळदेठीं ॥ द्विज विराजती वरती थाटीं ॥ जैसे रत्न हेमी शेवटीं ॥ स्वतेजें तगटीं ॥ मिरवितसे ॥१७॥

भाळ विशाळ सोगयांजन ॥ कुंकुमरसें शोभलें गहन ॥ मुक्तानक्षत्रकबरीं संगीन ॥ चंद्राबिजोरा विराजवी ॥१८॥

नासिक सरळाकृती ॥ ते शुक्तिकारत्नहेमगुप्ती ॥ मुक्तनळे जैसे गभस्ती ॥ नासिकपात्रीं विराजले ॥१९॥

कर्णबिंदी वलयाकृती ॥ हेममुगुटीं ढाळ देती ॥ रत्नताटंके ॥ नक्षत्रपातीं ॥ करुं वश्य ती पातले ॥१२०॥

असो ऐसी श्रृंगारखाणी ॥ सकळ संपत्ति नटली कामिनी ॥ रुपंवती सकळ गुणीं ॥ जगामाजीं मिरवतसे ॥२१॥

परी उदरीं नाहीं संतान परम ॥ तेणें उचंबळोनी योगकाम ॥ न आवडे धंदा धामाश्रम ॥ सदा वियोग बाळाचा ॥२२॥

देवदेव्हारे उपाय अनेक ॥ करिती झाली कामनादिक ॥ परी अर्थ कोठें उदयदायक ॥ स्वप्नामाजीं आतळेना ॥२३॥

नावडे आसन वसन गात्र ॥ विकळ मिरविती निराशगात्र ॥ शून्यधामीं चित्त ॥ पवित्र नांदणुकी नांदतसे ॥२४॥

प्रपंच मानिती अतिहीन ॥ जैसें दीपाविण शून्य सदन ॥ कीं सकळस्वरुपीं दाराहरण ॥ परी नासिकहीन मिरवतसे ॥२५॥

कीं वज्राउपरी गिरे गोमट ॥ परी वसतीस दिसे तळपट ॥ तेथें पाहतां दानवी पिष्ट ॥ कांडिती ऐसें वाटे कीं ॥२६॥

कीं तरुविण अरण्य कर्कश ॥ कीं सरितांविन जैसे विरस ॥ मग तें क्षणैक पशुमात्रास ॥ भयंकर दरी वाटतसे ॥२७॥

कीं शरीरीं चांगुलपण ॥ परिधानिलें वस्त्रानें भूषण ॥ परि चतुःस्कंधीं शवदर्शन ॥ सुगम कांहीं वाटेना ॥२८॥

तें शरीर घ्राणाविण ॥ आप्तवर्गातें वाटे हीन ॥ तेवीं सर्व उपचार कांतेलागोन ॥ संसार हीन वाटतसे ॥२९॥

ऐसें असतां भावस्थिती ॥ गृही दर्शिली योगमूर्ती ॥ नाथ मच्छिंद्र अंगणाप्रती ॥ अलक्ष सवाल वदतसे ॥१३०॥

तंव ते कांतेनें पाहूनि त्यातें ॥ चरणीं लोटली शोकभरितें ॥ आणोनि शीघ्र वस्त्र आसनातें ॥ विराजविला महाराज ॥३१॥

बैसोनि नाथानिकत ॥ सांगती वियोग शोक उल्हाट ॥ हदयीं भरोनि नेत्रपाट ॥ क्लेशांबु मिरविले ॥३२॥

म्हणे महाराजा अनाथनाथा ॥ तुम्ही सर्वगुणी विद्येसी जाणतां ॥ तरी मम हदयीं शोकसरिता ॥ नाशजळा वाटतसे ॥३३॥

म्हणे तरी यातें उपाव कांहीं ॥ सांगा म्हणोनि लागतें पायीं ॥ पुन्हां स्पर्शोनि मौळी प्रवाहीं ॥ कवण शब्दा वाढवीतसे ॥३४॥

पुढें ठेवोनि भिक्षान्न ॥ पुन्हां कवळी मोहें चरण ॥ आणि नेत्रां घनाची वृष्टि जीवन ॥ पदमहीतें सिंचीतसे ॥३५॥

तेणें मच्छिंद्रचित्तसरिते ॥ मोहसराटे अपार भरुते ॥ शब्दें तोयओघ मिरवत ॥ होतें सुखसरितेसी ॥३६॥

म्हणे वो साध्वी क्लेशवंत ॥ किमर्थ कामनीं चित्त ॥ तें मज वद कीं चित्तार्थ ॥ सकळां मुक्ती लाहील कीं ॥३७॥

ऐसे शब्देवर्गउगमा ॥ ऐकोनि बोले द्विजराम ॥ म्हणे महाराज योगद्रुमा ॥ संतती नाही वंशातें ॥३८॥

तेणें वियोगें खदिरांगार ॥ झगट करितो अतितीव ॥ तेणेंकरोनि चित्त शरीर ॥ दाह पावे महाराजा ॥३९॥

ऐसे क्लेश चित्तशक्ती ॥ कदा न वसे धैर्यपाठी ॥ दुःख गोंधळी शोकपातीं ॥ नृत्य करी कवळूनी ॥१४०॥

तरी हा शोकवडवानळ ॥ जाळूं पाहे धैर्यजळ ॥ त्यांत स्वामींनीं होऊनि दयाळ ॥ शोकग्नीतें विझवावें ॥४१॥

ऐसी वदतां वागभगवती ॥ प्रेमा उदेला नाथचित्तीं ॥ मग आदित्यनामें मंत्रविभूनी ॥ महाशक्ती निर्मीतमे ॥४२॥

नाथाकरी भस्माचिमुटी ॥ तेथें वीर्य करी राहाटी ॥ मग तें भस्म तपोजठी ॥ तिये हातीं वोपीतसे ॥४३॥

म्हणे माय वो शुभाननी ॥ हे भस्मचिमुटी करीं कवळूनी ॥ घेई सेवीं आपुले शयनीं ॥ निशीमाजी जननीये ॥४४॥

म्हणतील भस्म नोहे पूर्ण गभस्ती ॥ जो हरिनारायणउदयो कीर्ति ॥ प्रभा मिरवोनि त्रिजगतीं ॥ मोक्षमांदुसा मिरवेल ॥४५॥

तरी तूं सहसा हळवटपणी ॥ कामना नवरीं भस्मासनीं ॥ म्यांही पुढील भविष्य जाणोनी ॥ चिद्भवानी वदविली ॥४६॥

या भस्माची प्रतापस्थित ॥ तव उदरीं होईल जो सुत ॥ तयातें अनुग्रह देऊनिया स्वतः ॥ करीन सरस ब्रह्मांडीं ॥४७॥

मग तो सुत न म्हणे माय ॥ सकळ सिद्धींचा होईल राय ॥ जैसा खगी नक्षत्रमय ॥ शशिनाथ मिरवेल ॥४८॥

मग तो न माय ब्रह्मांडभरी ॥ कीर्तिरश्मीचे तेजविवरीं ॥ आणि वंद्य होईल चराचरीं ॥ मानवदानवदेवादिकां ॥४९॥

तरी माये संशयो न धरितां ॥ भक्षीं भस्म सांडोनि चिंता ॥ ऐसी सांगोनि सकळ वार्ता ॥ नाथ उठे तेथूनि ॥१५०॥

यावरी बोले शुभाननी ॥ कीं महाराजा योगधामीं ॥ तुम्ही केव्हां याल परतोनी ॥ सुता अनुग्रह वोपावया ॥५१॥

नाथ ऐकोन बोले तीतें ॥ म्हणे ऐक वो सदगुणसरिते ॥ पुन्हां येऊनि देई उपदेशातें ॥ द्वादशवर्पाउपगंतीं ॥५२॥

ऐसे वदोनि शब्द सुढाळ ॥ निघता झाला सिद्धपाळ ॥ तीर्थउद्देशीं नानास्थळ ॥ महीलागीं लंघीतसे ॥५३॥

येरीकडे भस्मचिमुटी ॥ सदृढ बांधोनि ठेविली गांठीं ॥ हरुष न राहे पोटीं ॥ उचंबळोनि दाटलासे ॥५४॥

मग ती सर्वेचि नितंबिनी ॥ जाऊनि बैसे शेजारसदनीं ॥ तेथें सात पांच व्रजवासिनी ॥ येऊनि त्या स्थानीं बैसल्या ॥५५॥

ते त्या जाया शब्दरहाटीं ॥ सहज बोलती प्रपंचगोष्टी ॥ त्यांत ही जाया हर्ष पोटीं ॥ कथा सांगे ती आपुली ॥५६॥

म्हणे माय वो ऐका वचन ॥ चित्त क्षीण झालें संततीविण ॥ परी आज आला सर्वार्थ घडोन ॥ तो श्रवणपुटें स्वीकारा ॥५७॥

एक अकस्मात माझ्या सदनीं ॥ बोवा आला कान फाडोनी ॥ कानफाडी केवळ तरणी ॥ मातें दिसूनि आला तो ॥५८॥

मग म्यां त्यासी स्तवोनी भक्तीं ॥ प्रसन्न केली चित्तभगवती ॥ मग प्रसाद वोपूनि माझे हातीं ॥ गमन करिता झाला तो ॥५९॥

तरी तो प्रसाद भस्मचिमुटी ॥ मातें दिधली पुत्रवृष्टी ॥ परी सांगोनि गेला स्वयें होटीं ॥ भक्षण करीं शयनांत ॥१६०॥

तरी माय वो सांगा नीती ॥ तेणें वाढेल काय संतती ॥ येरी ऐकोनि न मानिती ॥ तेणें काय होईल गे ॥६१॥

अगे ऐसीं सोंगें महीवरती ॥ कितीएक ठक बहु असती ॥ नाना कवटाळें करुनि दाविती ॥ जग भोंदिती जननीये ॥६२॥

आणि दुसरा त्यांत आहे अर्थ ॥ कानफाडे कवटाळे व्यक्त ॥ नानापरींच्या विद्या बहुत ॥ तयांपासी असती वो ॥६३॥

काय वो सांगूं शुभगात्री ॥ कानफाडे कृत्रिममंत्री ॥ जाया पाहोनि शुभगात्री ॥ करिती कुत्री मंत्रानें ॥६४॥

मग ते तयांते सवें घेऊनी ॥ हिंडती वस्ती क्षेत्रमेदिनी ॥ रात्रीमाजी कांता करोनी ॥ सुखशयनीं भोगिती ते ॥६५॥

तरी दिवसां कुत्री रात्रीं जाया ॥ करिती त्यांसी जाण माया ॥ तूं कोणीकडूनि भ्रमांत या ॥ पडली आहेस जननीये ॥६६॥

परी हें आम्हांसी दिसतें वोखट ॥ तूं शुभानन जाया अतिबरवंट ॥ पदरीं बांधोनि घेतलें कपट ॥ यांत बरवें दिसेना ॥६७॥

ऐसे बोल बोलतां युवती ॥ भवव्याघ्राची झाली वस्ती ॥ मग ती परम विटूनी चित्तीं ॥ सदनाप्रती आलीसे ॥६८॥

मग ती कवळोनि भस्मचिमुटीसी ॥ येती झाली गोठ्यापासीं ॥ तेथें गोरजकेरांसीं ॥ मिरवलीसे उकरडां ॥६९॥

तयामाजी भस्मचिमुटी ॥ सांडिती झाली ते गोरटी ॥ तयामाजी हरिजेठी ॥ संचार करी महाराज ॥१७०॥

जो नवनारायण कीर्तिध्वज ॥ प्रत्यक्ष विष्णु तेजःपुंज ॥ हरि ऐसे नाम साजे ॥ कीर्ति रत्नामाझारीं ॥७१॥

असो ऐसी अदैवराहटी ॥ करोनि जाती झाली गोरटी ॥ सदनीं येऊनि प्रपंचदिठीं ॥ सदा सर्वदा मिरवतसे ॥७२॥

असो ऐशी कथाअवसर ॥ पुढें निवेदूं ग्रंथ सादर ॥ तरी श्रोतीं क्षीरोदकसार ॥ पुढिले अध्यायीं स्वीकारणें ॥७३॥

भक्तिसार हा कथार्थ ग्रंथ ॥ शुक्तिकानवरत्नमुक्त ॥ तुम्हां श्रोत्यांचे कर्णग्रीवेंत ॥ भूषणातें शृंगारुं हो ॥७४॥

यापरी निंदक खळ दुर्जन ॥ असो त्यांचें कांजीपान ॥ तयांचे निंद्य वचन ऐकोन ॥ सोडों नका क्षीरोदका ॥७५॥

धुंडीसुत मालूचें वचन ॥ नरहरि वदे जग सुगम ॥ भावार्थगुणीं गुंफोन ॥ माळ स्वीकारी श्रोत्यांसी ॥७६॥

स्वस्तिश्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ द्वितीयोध्याय गोडा हा ॥१७७॥

अध्याय ॥२॥ ओंव्या ॥१७७॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ शुभं भवतु ॥

॥ नवनाथभक्तिसार द्वितीयोध्याय समाप्त ॥


श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय ३

श्रीगणेशाय नमः

जयजयाजी पंढरीशा ॥ रुक्मिणीवरा आदिपुरुषा ॥ पुंडलीकवरदा पुंडरीकाक्षा ॥ सर्वसाक्षी जाणता तूं ॥१॥

हे जगत्पालका जगन्नायका ॥ ब्रह्मांडावरी यादवकुळाटिळका ॥ आतां भक्तिसारीं दीपिका ॥ ग्रंथार्थदृष्टी मिरवावी ॥२॥

मागिले अध्यायीं सिद्धसाधन ॥ श्रीमच्छिंद्रनाथा आलें घडोन ॥ उपरांतिक भस्मदान ॥ सरस्वतीतें तेणें केलें ॥३॥

केले परी दैवहत ॥ तिनें टाकिलें गोमहींत ॥ परी फार ठकली अदैववंत ॥ अतिहीन प्रारब्धीं ॥४॥

घर पुसत लाभ आला ॥ तो निर्दैवपणें पदीं लोटिला ॥ कीं पुढें मांदुस येतां वहिल ॥ अंध होय आवडीनें ॥५॥

कीं अवचट लाधला चिंतामणी ॥ तो आवडी गोवी गोफणी ॥ कीं खडा म्हणोनि देतो झोंकोनी ॥ कृषिशेतीं टाकीतसे ॥६॥

कीं अवचट लाधतां पीयूषघट ॥ विष म्हणोनि करी वीट ॥ तेवीं विप्रजाया अदैवें पाठ ॥ नाडलीसे सर्वस्वीं ॥७॥

सहज काननीं फिरतां फिरतां ॥ जाऊनि बैसे कल्पतरुखालता ॥ परी दैवइच्छे भूत खाईल आतां ॥ तन्न्यायें नाडली ॥८॥

कीं कामधेनु गृहीं आली ॥ ती बाहेर बळेंचि दवडिली ॥ तन्न्यायें परी झाली ॥ नाडलीसे सर्वस्वें ॥९॥

किंवा बाण ढाळितां खेळींमेळीं ॥ निधान लाधला हस्तकमळीं ॥ तो गार म्हणोनि सांडिला जळीं ॥ महाडोहीं निर्दैवें ॥१०॥

कीं सहज आतुडे हातीं परीस ॥ खापर म्हणोनि टाकितसे त्यास ॥ कीं घरा आला राजहंस ॥ वायस म्हणोनि दवडिला ॥११॥

कीं हार देऊं देव उदित ॥ परी त्यासी भासलें परम भूत ॥ तन्न्यायें विप्रकांतेस ॥ घडोनि आलें महाराजा ॥१२॥

येरीकडे मच्छिंद्रनाथ ॥ पूर्वसमुद्रीं जगस्त्राथ ॥ करोनि सेतुबंधा येत ॥ रामेश्वरदर्शनीं ॥१३॥

तो श्वेती येऊनि करी स्नान ॥ अवचट देखिला वायुनंदन ॥ क्लेशशरीरा जरा व्यापून ॥ सान शरीरी बैसला ॥१४॥

तया संधींत मेघ वर्षाव ॥ करिता झाला सहजस्वभाव ॥ दरडी उरकोनि गुहा यास्तव ॥ करिता झाला मारुती ॥१५॥

वरुनि वर्षाव पर्जन्य करीत ॥ येरु इकडे दरडी उकरीत ॥ तें पाहोनि मच्छिंद्रनाथ ॥ विस्मयातें पावले ॥१६॥

पावला परी हटकोनि बोलत ॥ म्हणे मकंटा तूं मूर्ख बहुत ॥ आतां करिसी सदन निश्वित ॥ स्वशरीर रक्षावया ॥१७॥

पर्जन्य वर्षे विशाळधार ॥ यांत कधीं करसील घर ॥ जैंसे तस्करीं लुटलियावर ॥ दीपा तेल भरीतसे ॥१८॥

कीं बाईल गेलिया झोंपा केला ॥ तैसा न्याय घडोनि आला ॥ कीं स्वसदनातें पावक लागला ॥ कूप खणी विझवावया ॥१९॥

कीं ग्रीवे पडतां काळफांस ॥ मग वाचिता होय अमरस्तोत्रास ॥ कीं परम पीडितां तृषार्तास ॥ कूप खणूं म्हणतसे ॥२०॥

कीं हदयीं पेटला जठरानळ ॥ कामधेनूचें इच्छिती फळ ॥ किंवा मेघ ओसरल्या बीजें रसाळ ॥ महीलागीं पेरीतसे ॥२१॥

तन्न्यायें पर्जन्यकाळ ॥ सदन करिसी उतावीळ ॥ तस्मात् मूर्ख मर्कट वाचाळ ॥ मिरवूं आलासी पुढागं ॥२२॥

ऐसें ऐकोनि वायुनंदन ॥ म्हणे चतुर आहेस कोण ॥ येरु म्हणे जती पूर्ण ॥ मच्छिंद्र ऐसें मज म्हणती ॥२३॥

येरु ह्नणे तूतें जती ॥ कोणे अर्थी लोक म्हणती ॥ नाथ म्हणे प्रतापशक्ती ॥ आहे म्हणोनि वदतात ॥२४॥

यावरी बोले वायुसुत ॥ आम्ही आयिकतों जती हनुमंत ॥ तुम्ही नूतन जती महींत ॥ एकाएकीं उदेलां ॥२५॥

तरीं आतां असो कैसें ॥ मी मारुतीच्या शेजारास ॥ भावें राहोनि एक वेळेस ॥ वरिलें आहे महाराजा ॥२६॥

तेही कला सहस्त्रांशीं ॥ मातें लाधली महापरेशी ॥ ते तुज दावितों या समयासी ॥ तयापासाव जे प्राप्त झाली ॥२७॥

तरी त्या कळेचें निवारण ॥ करोनि दावीं मजकारण ॥ नातरी जती ऐसें नाम ॥ सोडोनियां जाई बां ॥२८॥

यावरी बोले मच्छिंद्रनाथ ॥ कोणती कळा ती दावीं मातें ॥ तिचें निवारण श्रीगुरुनाथ ॥ करी जाण निश्वयें ॥२९॥

जैसा श्रीराम असतां शयनीं ॥ पाहे मारुती वृक्षावरोनी ॥ नाना पर्वत टाकी उचलोनी ॥ रामशरीरा योजोनियां ॥३०॥

परी रामें न सोडितां शयन ॥ सज्ज करुनि चापबाण ॥ सकळ पर्वतांकारण ॥ निवारण करी तो ॥३१॥

तन्न्यायें श्रीगुरुराज ॥ सकळ अर्थी पुरवील चोज ॥ सकळ ब्रम्हांडाचें ओझें ॥ नखाग्रीं धरील तो ॥३२॥

तेथें तुझी मर्कटा कथा ॥ किती असे दावी आतां ॥ फार करिसील पाषंडता झोकसील कवळीनें ॥३३॥

तरी आतां कां करिसी उशींर ॥ मर्कटा दावीं चमत्कार ॥ ऐसें ऐकतां वायुकुमर ॥ पूर्ण चित्तीं क्षोभला ॥३४॥

उड्डाण करोनि जाय एकांता ॥ तेथें धरी भीमरुपता ॥ न कळतां त्यातें सात पर्वतां ॥ उचलोनिया फेकिले ॥३५॥

नभमंडपीं ढगासमान ॥ पर्वत येतसे पंथीं गगन ॥ तें मच्छिंद्रनाथें दृष्टी पाहोन ॥ स्थिर स्थिर म्हणतसे ॥३६॥

वातप्रेरक मंत्रशक्ति ॥ वाटेंत कोंदली पर्वतीं ॥ तो येरीकडे आणिक मारुती ॥ दुसरा पर्वत फेकितसे ॥३७॥

तो दुसरा म्हणतां तिसरा येत ॥ चवथा पांचवा शतानुशत ॥ मग एकचि मंत्रे करोनि वात ॥ ठायींचे ठायीं रोधिला ॥३८॥

जैसे कंदुक बाळ खेळती ॥ मध्ये अटकतां परते पंथी ॥ तन्न्याय झाला पर्वती ॥ ठायींच्या ठायीं जाती ते ॥३९॥

येरीकडे वायुनंदन ॥ पर्वत परतता दृष्टी पाहोन ॥ पूर्ण क्षोभला जेवीं कृशान ॥ महाप्रळयकाळींचा ॥४०॥

मग महापर्वत एक विस्तीर्ण ॥ उचलोनि बाहुमस्तकीं अर्पून ॥ फेंकावा तो मच्छिंद्रनाथानें ॥ निजदृष्टीने देखिला ॥४१॥

मग अब्धिउदक घेऊनी ॥ वायुआकर्षणमंत्र म्हणोनि ॥ सबळ झुगारोनि पाणी ॥ वायुनंदन सिंचिला ॥४२॥

तेणें भरोनि शरीरीं वात ॥ चलनवलन सर्व सांडीत ॥ ऊर्ध्व झाले दोन्ही हात ॥ मौळीं पर्वत राहिला ॥४३॥

मग ते जैसी स्तंभावरी ॥ रचिली म्हणती द्वारकापुरी ॥ तेवी मारुती शिरावरी ॥ पर्वतातें मिरवीतसे ॥४४॥

खाली टाकावया न चले बळ ॥ जेवीं विरला हस्त विकळ ॥ पदीं चालावयाही बळ ॥ कांही एक न चाले ॥४५॥

तें पाहोनियां दीन बाळ ॥ हदयीं कवळी तात अनिळ ॥ मग प्रत्यक्ष होऊनि रसाळ ॥ सोडीं सोडीं बाळातें ॥४६॥

तैं अवश्य म्हणोनि मच्छिंद्रनाथ वातशक्ती ॥ संगीत झाली देइस्थिती ॥ मग समीप येऊनि नाथाप्रती ॥ धन्य धन्य म्हणतसे ॥४८॥

यावरी बोलता झाला अनिळ ॥ बा मारुती तुझे न चले बळ ॥ तुज मज आतीनिर्बळ ॥ बांधोनि केलें सिद्धानें ॥४९॥

जेणें तुझियां बापा बांधिलें ॥ त्यासी तुझें भय काय आले ॥ त्याचें आचरण तैसें झालें ॥ भक्तिशक्ति अघटित ॥५०॥

म्हणसी सिद्धाची मंत्रस्थिती ॥ अघटित असे बदतां उक्ती ॥ तरी माझी भक्ति गुरुची शक्ती ॥ ईश्वरी वाचा म्हणतात ॥५१॥

येतुल्या पांच शक्ती क्रियावंतासि ॥ सकळ देवता होती दासी ॥ ऐसें ऐकोनि अंजनीसुतासी ॥ परम आनंद मिरवला ॥५२॥

यउपरांतिक मच्छिंद्रनाथ ॥ मारुत मारुती यांच्या चरणीं लागत ॥ म्हणे येथोनि तुमचें सख्य उचित ॥ मजवरती असो कां ॥५३॥

मग प्रसन्न चित्तीं समीर मारुती ॥ म्हणती बारे त्वत्कार्यार्थी ॥ आम्ही वेंचोनि आपुली शक्ती ॥ सुखसंपत्ती तुज देऊं ॥५४॥

जैसे दानवांच्या काजा ॥ कविमहाराज उशना वर्ते वोजा ॥ तेवीं त्वत्कार्यार्थ मोजा ॥ शक्ती आपुली वेचूं आम्ही ॥५५॥

कीं सागरीं टिटवी अंड्यांकरिता ॥ आपुल्या शक्ती झाला वेंचिता ॥ तेवीं महाराजा त्वतकार्यार्था ॥ शक्ती आपुली वेचूं कीं ॥५६॥

कीं विधीच्या संकटांत ॥ विष्णु मत्स्यावतार घेत ॥ तन्न्याये त्वत्कायार्थ ॥ शक्ती आपुली वेचूं की ॥५७॥

की अवश्य ऋषींचे शापपृष्ठीं ॥ स्वयें विष्णु झाला कष्टी ॥ तन्न्यायें तुजसाठी ॥ शक्ती आपुली वेचूं कीं ॥५८॥

कीं रामाच्या उपयोगासी ॥ कपि गेले सीताशुद्धीसी ॥ तन्न्यायें तुजसी ॥ शक्ती आपुली वेंचूं कीं ॥५९॥

ऐसें वरदवाग्रत्न ॥ ओपूनि प्रीतीं वायुनंदन ॥ म्हणती बा रे तीर्थागमन ॥ जती नाम मिरवी कां ॥६०॥

यावरी बोले मच्छिंद्रनाथ ॥ जती नामें होईन विख्यात ॥ परी एक कल्पना तुझे चित्तीं ॥ नाथ म्हणे तूं सर्वज्ञमूर्ती ॥ आयुष्यभविष्य जाणसी ॥६२॥

ऐसी सर्वज्ञा असोनि नीती ॥ विवाद केला कां मजप्रती ॥ आणि भेटी झाली नागाश्वत्थीं ॥ तुझी माझी पूर्वीच ॥६३॥

तें शाबरी विद्येचें कवित्य ॥ करवोनि वर दीधला त्यांत ॥ ऐसें असोनि सखया माहीत ॥ रळी व्यर्थ कां केली ॥६४॥

यावरी बोले वायुनंदन ॥ बा तूं करितां श्वेतीं स्नान ॥ तेव्हां तूतें ओळखोन ॥ तुजपासीं मी आलों ॥६५॥

तूं कविनारायणाचा अवतार ॥ जननीं भेदिलें मच्छोदर ॥ हे माहीत परी त्या त्या कल्पनेवर ॥ चित्त कांहीं उदेलें ॥६६॥

कीं नागपत्रीं अश्वत्थासीं ॥ वर ओपिला देवें तुजपासीं ॥ परी त्या सद्विद्येचे सामर्थ्यासी ॥ पाहूं ऐसें वाटलें ॥६७॥

यावरी पुढें कार्य ॥ आणिक ॥ पडलें तूतें अलोलिक ॥ तेथें टिकाव धरणें कौतुक ॥ म्हणोनि शोध शोधिला ॥६८॥

तरी बा आतां येथोनि गमन ॥ स्त्रीराज्यासी करावें मज लक्षोन ॥ तेथें नातळे पुरुषप्रवेश पूर्ण ॥ परत्रभुवनीं तो पावे ॥६९॥

बा रे झालें तुझें दर्शन ॥ तुजसीं आहे माझें कारण ॥ मज मस्तकीचें ओझें उतरणें ॥ तुझे हातें होईल ॥७०॥

यावरी बोले मच्छिंद्रनाथ ॥ कैसा झालासी ऋणी व्यक्त ॥ सर्व कामातें वायुसुत ॥ सांगोपांग निरोपी ॥७१॥

येरु म्हणे योगद्रुमा ॥ रामाचें घडलें दास्य आम्हां ॥ सिताशुद्धि पाहोनि उगमा ॥ लंकापति मारविला ॥७२॥

तैं सीता घेऊनि अयोध्यें जातां ॥ परी सीतेच्या कामना वेधली चित्ता ॥ आहे दासत्व मारुती करिता ॥ महीलागी हा एक ॥७३॥

तरी हा असो बा संपूर्ण संपन्न ॥ कांता धन सुत एक सदन ॥ जरी वितुळे सुख संसारीं साधन ॥ कांतेमागें होतसे ॥७४॥

तरी या मारुतीसी कांता करोन ॥ भोगवूं सर्वसुखसंपन्न ॥ परी ब्रह्मचारी मम भाषण ॥ मान्य करील कीं नाहीं ॥७५॥

तरी यातें वचनीं गोंवून ॥ गृहस्थाश्रमीं करावा वायुनंदन ॥ ऐसें सीतेनें कल्पोन ॥ पाचारिलें आम्हांतें ॥७६॥

जवळीं बैसवोनि स्नेहानें ॥ स्वकरें मग मुख कुर्वाळोन ॥ म्हणे बा मारुति तूं धन्य ॥ तिहीं लोकीं अससी पै ॥७७॥

तरी बा माझें एक मागणें ॥ देसील तरी उत्तम मानीन ॥ यावरी तूंही नकार मजलागोन ॥ देणार नाहीं सहसाही ॥७८॥

उदार वेंचिती आपुला प्राण ॥ परी नकार न देती वाचेकरोन ॥ शिबीरायानें कपोताकारणें ॥ मांस दिधलें रती रती ॥७९॥

पाहें श्रियाळ उदारकीर्ती ॥ बाळ दिधलें याचकाहातीं ॥ तन्न्यायें त्याच पंक्तीं ॥ तूंही अससी कपींद्रा ॥८०॥

ऐसें ऐकतां जननीवचन ॥ परम तोषला वायुनंदन ॥ म्हणे माय वो कामना कोण ॥ उदित करीं देईन मी ॥८१॥

येरी म्हणे करतलभाप ॥ देसी आपुल्या सदभावास ॥ तरी मम कामनेची हौस ॥ दृश्य करीन तुज बा रे ॥८२॥

मग करीं कर वोपोनि शेवटीं ॥ म्हणे मागाल ते कामना होटीं ॥ ते मी देऊनि चित्तसंतुष्टीं ॥ मिरवीन जननीये ॥८३॥

येरी म्हणे मम कामना ॥ तुवां आचरावें गृहस्थाश्रमा ॥ कांता करोनि संसारउगमा ॥ सर्व सुख भोगावें ॥८४॥

ऐसी ऐकतां वागवटी ॥ सप्रेम खोंचला आपुल्या पोटीं ॥ म्लानवदन चित्त हिंपुटी ॥ परम संकटीं पडियेला ॥८५॥

मग न देतां मातेसी कांहीं उत्तर ॥ येऊनि बैसला रामासमोर ॥ परी चित्तवृत्ति कोमीत मुखचंद्र ॥ श्रीरघूत्तमें पाहिला ॥८६॥

मग जवळी पाचारोनि हदयीं ॥ धरीत आली दयाळ आई ॥ म्हणे बा रे तुझा व्यर्थ केवीं ॥ मुखचंद्र वाळला ॥८७॥

मग प्रांजळीं सर्व कथन ॥ श्रीरामातें निवेदन ॥ नेत्रीं अश्रू म्लान वदन ॥ मी करोनियां बसलों ॥८८॥

परी अंतःसाक्ष रघुकुळटिळक ॥ म्हणे वायां न मानीं दुःख ॥ स्त्रीराज्याच्या स्त्रिया सकळिक ॥ कांता असती तुझ्याचि ॥८९॥

तरी बा याचें ऐक कथन ॥ कृत त्रेत द्वापार कलि पूर्ण ॥ या चोहों युगातें म्हणती निपुण ॥ चौकडी एक ही असे ॥९०॥

तरी बा ऐशा चौकड्या किती ॥ तीनशें शहाण्णव बोलती मिती ॥ तूतें मातें चोहों चौकड्यांप्रती ॥ जन्मा येणें आहेचि ॥९१॥

मी नव्याण्णवावा राम क्षितीं ॥ तूंही नव्याण्णवावा मारुती ॥ आणि लंकाधीश याच नीतीं ॥ नव्याण्णवावा असे ती ॥९२॥

यावरी चौदा चौकड्यांचें राज्य रावण ॥ करील ऐसें बोलती वचन ॥ परी चौदा अंकींचा आकडा मागोन ॥ आंख नेला विधीनें तो ॥९३॥

मग उरला वरील एक चतुर्थ ॥ तितुक्या चौकड्या राज्य करीत ॥ परी सांगावया कारण त्यांत ॥ आपण मारोनि येतसे ॥९४॥

मग आल्यावरी स्त्रीराज्यांत ॥ जाणें लागे मारुती तूतें ॥ तरी बा पाळी तुझी निश्वित ॥ आली आहे ती भोगीं कां ॥९५॥

ऐसें म्हणतां श्रीराम वहिला ॥ मग म्यां त्यातें प्रश्न केला ॥ कीं दृढ कासोटी आहे मजला ॥ भेटी केवीं कामरती ॥९६॥

मग राम म्हणे बा ऊर्ध्वरेती ॥ आजपासोनि असे मारुती ॥ तयाच्या भुभुःकारें श्वाससंगतीं ॥ गरोदर होती त्या स्त्रिया ॥९७॥

तरि तूं सकळ संशय सांडोन ॥ शैल्यदेशीं करी गमन ॥ तुझें ब्रह्मचारीपण ॥ ढळत नाहीं महाराजा ॥९८॥

ऐशी वार्ता होता निश्वितीं ॥ मग म्यां स्वीकारिलें शैल्यदेशाप्रति ॥ यावरी तेथेंही स्त्रिया नृपती ॥ मेनका नामें विराजली ॥९९॥

तीतें पृथ्वीची देशवार्ता ॥ ऐकीव झाली कीं पुरुषकांता ॥ देशोदेशीं उभयतां ॥ रमत आले स्वइच्छें ॥१००॥

देवदानवमानवांसहित ॥ पशुपक्षीनागजात ॥ सकळ स्त्रीपुरुष उभयतां ॥ इंद्रियसुखें सुखावती ॥१॥

कामरती मंथनाकार ॥ रतीसी अर्पिती कामिक नर ॥ ऐसा जाणोनि मनीं विचार ॥ परम चित्तीं क्षोभली ॥२॥

मग तिनें मांडिलें अनुष्ठान ॥ मनामाजी काम वरोन ॥ कीं प्रत्यक्ष होऊनि वायुनंदन ॥ रतिरत्न अर्पू त्या ॥३॥

ऐसा काम वरोनि चित्तीं ॥ बैसलीसे दृढ तपापरती ॥ मांसा तोडोनि यज्ञकुंडी आहुती ॥ मम नामीं अर्पीतसे ॥४॥

ऐसे लोटले द्वादशवर्ष ॥ सकळ आटिलें शरीरमांस ॥ मग ती पाहोनि अति कृश ॥ प्रसन्न झालों मी तीतें ॥५॥

परि तीतें होतां माझी भेटी ॥ पदी मौळी घालोनि मिठी ॥ म्हणे अर्थ जो उदभवला पोटीं ॥ तो सिद्ध करीं महाराजा ॥६॥

मग मी विचारिता झालों तीतें ॥ कीं कवण कामनासरिता भरिते ॥ मज सांगोनि अर्थरसातें ॥ सुखसमुद्रा मेळवीं ॥७॥

ऐसें ऐकतां वचनोत्तर ॥ म्हणे महाराजा वायुकुमर ॥ तुझेनि स्त्रिया गर्भिणी समग्र ॥ होऊनि मिरवती महाराजा ॥८॥

तरी तूं सकळांचा प्राणेश्वर ॥ स्मरा ओपी भुभुःकार ॥ तरी ते नादें रतिनार ॥ सुख पावे सकळांसी ॥९॥

तरी नादबुंदा सुखासना ॥ मैथुनरती घरीं कामना ॥ हे मार्ग सकळ देशकारणा ॥ स्वर्गमृत्युपाताळीं ॥११०॥

तरी कां कर्म आमुचेचि ओखट ॥ स्वप्नीं दिसेना ऐसा पाठ ॥ तरी तूं स्वामी आमुचा अलोट ॥ तें सुख आम्हां मिरवी कां ॥११॥

ऐसें वदतां स्त्रिया भूषणीं ॥ मग मी बोलिलों तिये लागोनी ॥ कीं ऊर्ध्वरेता जन्माहूनी ॥ दृढकासोटी विराजिलों ॥१२॥

जेथें उदय झालों जठरीं अंजनी ॥ ते उदरां दृढकौपिनी ॥ मातें प्राप्त शुभाननी ॥ कनककासोटी ती असे ॥१३॥

तस्मात् दृढ इंद्रियसंपत्ती ॥ ढाळे लागले भांडारग्रंथीं ॥ तेणें इंद्रियव्यवहारशक्ती ॥ जगामाजी मिरवेना ॥१४॥

म्हणूनि कामा ऊर्ध्वगमन ॥ श्वासोक्त रतिकामद्रुम ॥ तुम्हां स्त्रियांचा रतिआश्रम ॥ शांत तेणें पावतसे ॥१५॥

तरी त्वत्तपाच्या श्रमध्वजा ॥ मच्छिंद्र नगरीं विराजवूं ओजा ॥ तें चित्तदैव रतिराजा ॥ कामभक्ती तुष्टेल ॥१६॥

म्हणोनि मच्छिंद्र आहे कोण ॥ तरी तो प्रत्यक्ष कविनारायण ॥ त्वत्तपाच्या कामीं बैसोन ॥ फलद्रुम होईल कीं ॥१७॥

ऐसें बोलोनि तीर्थावतीं ॥ तुष्ट केली सकाम अर्थी ॥ तरी तूं जाऊनि मनोरथीं ॥ तुष्ट करीं महाराज ॥१८॥

येरु म्हणे ऊर्ध्वरेता ॥ मातें कार्य हें निरोपितां ॥ तरी ब्रह्मचर्यत्व समूळ वृथा ॥ आंचबळें जाईल ॥१९॥

मी तों उदास कामशक्ती ॥ नोहे म्हणतील नाथपंथी ॥ जती नामीं जगविख्याती ॥ जगामाजी मिरवलों ॥१२०॥

तरी ऐसी कुकर्मराहटी ॥ मातें घडोनि येतां जेठी ॥ मग वाभ्देवतानिंदादिवटी ॥ येऊनि जगीं मिरवेल ॥२१॥

यावरी आणिक सिद्ध जगीं ॥ नाथपंथी आहेत योगी ॥ तेही योगपंथ ते प्रसंगीं ॥ विटाळ माझा करतील ॥२२॥

एवं स्त्रीसंग अश्लाघ्य फार ॥ अपकीर्तीचें दृढ भांडार ॥ सर्वविनाशी मोहनास्त्र ॥ स्वीकारावें हें वाटेना ॥२३॥

स्त्रियांसगें बहु नाडले ॥ अपकीर्ती जगी मिरवले ॥ आणि सर्व सुकृता आंचवले ॥ रितें पोतें तें वाताचें ॥२४॥

पाहें अमरेंद्र झाला भग्न ॥ चंद्र मिरवला कलंकेंकरुन ॥ समूळ राज्यविनाश रावण ॥ स्त्रीलोभें नाडला तो ॥२५॥

विधिसुताची ब्रह्मकासोटी ॥ तीही क्षणमात्रें झाली सुटी ॥ साठ पोरें निर्मूनि पोटीं ॥ दैन्यभाजा वरियेली ॥२६॥

याचि नीतीं तदा तात ॥ अकर्मप्रवाही कन्ये रत ॥ विधि ऐसें नाम उचित ॥ अविधिपणें बुडविलें ॥२७॥

पहा तपी तो त्र्यंबक ॥ तपियांमाजी असे अर्क ॥ परी कामदरीं अस्तोदक ॥ भिल्लिणीउदथीं लुब्धला ॥२८॥

तन्न्याय तपोजेठी ॥ काम रंभेच्या करोनि पोटीं ॥ आंचवोनि तप घे नरोटी ॥ तन्न्यायचि मिरवतसे ॥२९॥

ऐसा विश्वामित्र तो अमित्र झाला ॥ याची नीतीं वदसी मला ॥ तरी वन्ही कामदरीला ॥ व्याघ्रमया नांदविसी ॥१३०॥

ऐसें ऐकोनि मच्छिंद्रवचन ॥ म्हणे बा रे योगद्रुमण ॥ ही अनादि राहटी पूर्ण ॥ भोग भोगितां निर्दोष ॥३१॥

जैसें रामें मजला कथिलें ॥ नव्याण्णव मारुती असे वदले ॥ तन्न्यायें तुम्ही भले ॥ नव्याण्णवावा अससी तूं ॥३२॥

तरी अनादि राहटी ॥ भोगिता झाला भामिनी वीस कोटी ॥ मौनिनाथ येऊनि पोटीं ॥ कीर्तिअर्क मिरवेल ॥३३॥

तव तात जो उपरिचर वसु ॥ तो तव उदरीं येईल वसु ॥ कीर्ति ते महीप्रकाशु ॥ महाप्रचंड मिरवेल ॥३४॥

ऐसें सांगोनि वायुसुत ॥ प्रसन्न केलें चित्त दैवत ॥ मग वरप्रदानवाणीं रुकारवंत ॥ मच्छिंद्रनाथा देतसे ॥३५॥

जैसें शुक्रें अमित्रसुता ॥ प्रसन्न होऊनि चित्तसविता ॥ देऊनि मंत्रसंजीवनी अर्था ॥ प्रभूलागीं मिरवल ॥३६॥

तेवीं अमित्रकुळजा ॥ राज्य स्थापिलें भक्तिकाजा ॥ नेणूं विभीषण शत्रु अनुजा ॥ केला सरता चिरंजीव ॥३७॥

तन्न्यायें घातक वसु ॥ नेणोनि कामशरा पासु ॥ रुकार तैं समयासु ॥ अंजनीसुत पैं केला ॥३८॥

मग करोनि नमनानमन ॥ अवश्यपणें करितां गमन ॥ अदृश्य पाहोनि वायुनंदन ॥ मच्छिंद्रनाथ चालिला ॥३९॥

सहज चालिला महीपाठीं ॥ अर्थी हिंगळा द्यावी भेटी ॥ ऐसें गमोनि तया वाटीं ॥ येऊनियां पोचला ॥१४०॥

तवं ते शक्तिद्वारीं ॥ रक्षक असती दक्षाचारी ॥ अष्टभैरव कृतांत संगरीं ॥ जिंकूं पाहती कृतांता ॥४१॥

आणि शतकोटी चामुंडा ॥ शंखिनी डंखिनी प्रचंडा ॥ त्याही तीव्र ब्रह्मांडा ॥ ग्रासूं पाहती कृतांतपणीं ॥४२॥

यावरी अर्णव बहु कर्कश ॥ नाना पर्वत विशेष ॥ त्यांत व्याघ्रादि साबजें रीस ॥ येऊं येऊं म्हणताती ॥४३॥

म्हणे ते अर्णव सहज बोली ॥ परी नोहे कृतांताची बैसे पाली ॥ कीं पूर्वी दानवांनीं आणोनि ठेविली ॥ भयें माय त्या ठायीं ॥४४॥

कीं तें अर्णव पाहतां सहज ॥ तैंचि देवतांचे तेज ॥ विरुनि जाय मोडे माज ॥ नको नको म्हणवूनी ॥४५॥

कंटकवन जाळिया संधी ॥ भयानक सावजें अपार मांदी ॥ पाहतांक्षणीं कामनाबुद्धी ॥ विरोनी जाय तत्काळ ॥४६॥

तेथें न पावे वायुनंदन ॥ परम भयभीत मन ॥ कृतांतपत्नीचें कानन ॥ भक्षील म्हणोन पळतसे ॥४७॥

असो ऐशी वातगोष्टी ॥ मित्र उदेल परम पाठीं ॥ कीं येथें संचरतां रश्मिदाटी ॥ ग्रासील मग काय करुं ॥४८॥

येऊनि ते परी कानन पाहतां ॥ रश्मी संचारुं न देई सवित ॥ असो ऐशी काननवार्ता ॥ संकट भयाचे स्थान चित्तातें ॥४९॥

तेथें सिद्धमुनी राव ॥ संचरेल आपुल्या प्रतापें गौरव ॥ ती कथा रसज्ञ ज्ञानदेव ॥ श्रीगुरु माझा वदेल कीं ॥१५०॥

तरी स्मृतीं ठेवोनि हेत ॥ प्राशन करा कथामृत ॥ मग भवरोगाचे अपार भरितें ॥ दुःखक्लेश नांदेना ॥५१॥

हा ग्रंथ केवळ चिंतामणी ॥ हरेल चित्ताची काळजी मुळींहुनी ॥ जैसें वृश्श्र्विकदंशालागोनी ॥ विष शोषी महाराजा ॥५२॥

तरी होऊनि सद्विवेक ॥ सांडा कुटिलपणी तर्क ॥ निंदा दोष विघ्न भातुक ॥ सेवूं नका सहसाही ॥५३॥

निंदाशक्ती परम पापिणी ॥ अतिरंजक नीचवदनी ॥ परी आमुची मायबहिणी ॥ पवित्र करील आमुतें ॥५४॥

जो या निंदेसी प्रतिपाळील ॥ तो सखा अदभुत आमचा स्नेही विपुळ ॥ पातकमळाचें क्षालन करील ॥ वारंवार इच्छीतसे ॥५५॥

धुंडीसुत नरहरिवंशीं ॥ मालू स्नेह करी निंदकासी ॥ बहुत आयुष्य इच्छी त्या मानवासी ॥ उपकारी म्हणोनी ॥५६॥

तरी असो आदर श्रोतीं ॥ तुम्हीं न बैसावें तया पंगतीं ॥ मालू तुम्हातें हीच विनंती ॥ वारंवार करीतसे ॥५७॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ तृतीयोध्याय गोड हा ॥१५८॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ नवनाथभक्तिसार तृतीयोध्याय समाप्त ॥


श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय ४

श्रीगणेशाय नमः

जयजयाजी करुणानिधे ॥ आगमअगोचर विशाळबुद्धे ॥ सकळमुनिमानसहदयवृंदे ॥ उद्यान वाटे आनंदाचें ॥१॥

हे योगिमानसरजनी ॥ पंढरीशा मूळपीठणी ॥ पुंडलिकाचे आराध्य स्वामिणी ॥ उभी अससी विटेवरी ॥२॥

सौम्य दिससी परी नीटक ॥ बहुत ठक चित्तचालक ॥ भक्तमानसभात्रहारक ॥ छिनाल सुकृत उरों नेदीं ॥३॥

पहा कैसी बकासमान ॥ नासाग्रभागीं दृष्टी देऊन ॥ कोणी म्हणेल गरीबावाण ॥ चांगुलपण मिरवीतसे ॥४॥

परी ही अंतरीची खुण ॥ न रहरि मालू एकचि जाणे ॥ भक्तीविषयीं लंपट वासना ॥ मनामाजी हुटहुटी ॥५॥

सुकर्म हदया घालूनि हात ॥ युक्तिप्रयुक्ती काढूनि घेत ॥ पुढें पुढें होऊनि कार्यार्थ ॥ आपुले त्या संपादी ॥६॥

पहा दामाजीचें दायधन ॥ गटकन गिळिलें अभिलाषून ॥ कंगालवृत्ती सोंग धरुन ॥ देव महार झाला असे ॥७॥

नरहरि सबळ सुवर्णकर्म ॥ तयाच्या विषयीं वरिला काम ॥ भांडावें तों जन्मोजन्म ॥ शिवमौळी राहातसे ॥८॥

कुब्जादादुला वांकुडातिकुडा ॥ नाहीं म्हणे तिला झाला पुंडा ॥ वृंदा पुरुषही जाडा ॥ स्मशानवस्ती केलीसे ॥९॥

ठकवोनि मारिला काळयवन ॥ सोळा सहस्त्र दादुला होऊन ॥ शेवटीं न पावे समाधान ॥ ब्रह्मास्थिती वरिलीसे ॥१०॥

चक्षुगोचर होत जें जें ॥ तें मागूं शके अति निर्लज्जें ॥ सुदामाचें पृथुक खाजे ॥ कोरडें न म्हणे सहसाही ॥११॥

काय वरिला मृत्यु दुकाळानें ॥ द्रौपदीची खाय भाजीपानें ॥ हात वोडवूनि लाजिरवाणें ॥ मिटक्या मारुनि भक्षीतसे ॥१२॥

शबरीचीं बोरें उच्छिष्ट पाहून ॥ न म्हणे भक्षी मन लावून ॥ चोखियाचा पदार्थ गोड पाहून ॥ र्‍हदासहित सारीतसे ॥१३॥

नामा बाळ ठकवूनि त्वरित ॥ नैवेद्य भक्षित हातोहात ॥ तस्मात् किती दुर्गुणांत ॥ सदगुणातें आणावे ॥१४॥

असो ऐसे परम ठकणी ॥ येऊनि बैसली ग्रंथश्रेणी ॥ मम चित्तातें समूळ घेऊनी ॥ पायांपासीं ठेवीतसे ॥१५॥

असो तिचे वरदेंकरुन ॥ श्रोते ऐका आतां कथन ॥ श्रीमच्छिंद्र योगीं पूर्ण ॥ हिंगळाकारणीं संचरला ॥१६॥

मागिल अध्यायीं कथन ॥ मच्छिंद्र मारुतीचें युद्ध होऊन ॥ शेवटीं प्रीति विनटून ॥ हिंगळाख्यस्थाना पावले ॥१७॥

ती ज्वाळामुखी भगवती ॥ महाप्रदीप्त आदिशक्ति ॥ तेथें जाऊनि द्वाराप्रती ॥ मच्छिंद्रनाथ पोचले ॥१८॥

तंव तें द्वार पाहतां क्षितीं ॥ उंच बाहु सार्धशत ॥ औरस चौरस षडशत ॥ विराजलेसें द्वार तें ॥१९॥

तें द्वारीं प्रचंड ॥ अष्टभैरव महाधेंड ॥ त्यांनीं नाथपंथ पाहुनि वितंड ॥ चित्तांत कामना उदेली ॥२०॥

नागपत्रअश्वत्थठायीं ॥ मच्छिंद्रनाथ हा गोसावी ॥ नेमाचरणीं विद्याप्रवाहीं ॥ प्रसन्न केलें देवातें ॥२१॥

तरी शाबरीविद्याकवित ॥ येणें केलें वरदस्थित ॥ तपीं तें प्रांजळ कायस्थ ॥ केवीं झाले तें पाहूं ॥२२॥

ऐसा काम धरुनि पोटीं ॥ युद्धरीतांच्या सुखालोटों ॥ अष्टही भैरव एकथाटीं ॥ प्रत्यक्ष झालें द्वारातें ॥२३॥

अंगें नेमूनि संन्यासरुपा ॥ देहपंकजा दावूनि तदूपा ॥ म्हणती महाराजा योगदीपा ॥ कोठें जासी तें सांग ॥२४॥

येरु म्हणे शक्तिदर्शन ॥ घेणें उदेलें अंतःकरण ॥ तरी तुम्ही आहांत संन्यासधाम ॥ तुम्हां जाणें आहे कां ॥२५॥

तंव ते म्हणती जोगिया ऐक ॥ आम्ही येथेंचि स्थायिक ॥ भगवतीकाजा वरदायक ॥ द्वारपाळ म्हणवितों ॥२६॥

तरी येथें कामनास्थित ॥ दर्शनार्थ कोणी येत ॥ तरी पापपुण्य पुसोनि त्याप्रत ॥ मार्गापरी योजितसों ॥२७॥

अगा पुमांसा प्राणी शब्दरचनें ॥ दिसूनि येतां चित्तकामनें ॥ त्या प्रसादूनि अंबादर्शनें ॥ सिद्ध करितो महाराजा ॥२८॥

आणि पापकलह अर्थ धूर्जटी ॥ आमुतें दिसूनी येता दृष्टी ॥ त्यासी मागे परतवूनि राहटी ॥ तो पुरुष दर्शनासी मिरवेना ॥२९॥

तस्मात् वागोत्तराचे देठी ॥ प्रसाद मिरवला हो शेवटीं ॥ तरी त्वत्कामना उदेली पोटीं ॥ अंबादर्शनीं मिरवावें ॥३०॥

तरी महाराजा योगद्रुमा ॥ पापपुण्यांचा झाडा आम्हां ॥ दर्शवोनि दर्शन कामा ॥ स्वस्थ करीं रतिसुखा ॥३१॥

अंतरीं आला अर्थकंदर्प ॥ येथें करितां कांही लोप ॥ तरी संचार करितां द्वारमाप ॥ मध्ये अटक महाराजा ॥३२॥

द्वार सांकडें होतें अतिसान ॥ गुंते करितां अनृत भाषण ॥ मग त्यातें मागें ओढून ॥ पूर्ण शिक्षा दावितों ॥३३॥

तस्मात् तुमची कर्मराहटी ॥ झाली जैसी महीपाठीं ॥ तीतें दर्शवूनि वागदिवटी ॥ दर्शनातें दर्शिजे ॥३४॥

येरु म्हणे द्वारस्थ बापा ॥ आम्ही नेणों पुण्यपापा ॥ कर्मसुकर्म अर्थकंदर्पा ॥ ईश्वरी अर्थी केलें असे ॥३५॥

जैसेया लहराभास ॥ उभय नातळे त्या सुखास ॥ हर्षदरारा सावधपणास ॥ ठायीं ठायीं मुरतसे ॥३६॥

तो नौका सरितातोयी जात ॥ दों थडीं रुख दिसती पळत ॥ दों थडींचा बा एक साक्षिवंत ॥ रुखा पळ नेणेचि ॥३७॥

कीं तो व्यक्त बहू घटक्षितीं ॥ अंतरदिवटा बहु गभस्ती ॥ परी त्याची सदा दीप्ती ॥ नयनीं मिरवे महाराजा ॥३८॥

तुटूनि नीतिपुण्यद्रुमा ॥ आम्ही नेणों पाउली उगमा ॥ तंव ते म्हणती नरेंद्रोत्तमा ॥ बोल बोलसी हे काय ॥३९॥

जगीं जन्मोदय देह धरिल्या पोटीं ॥ कर्माकर्म उभे राहटी ॥ मिरवले हे प्रपंचहाटीं ॥ पदार्थसवें हे दोन्ही ॥४०॥

तरी बा तयाच्या गृहकपाटीं ॥ ना तळपे ना मिरवे शक्ती ॥ तरी आतां लोपूनि कर्माप्रती ॥ अर्थ तुझा सरेना ॥४१॥

जैसें वेचिल्यावांचूनि धन ॥ नातळे कदा हाटींचे कण ॥ तरी कर्माकर्म जल्पल्याविण ॥ अर्थ तुझा सरेना ॥४२॥

तरी प्रांजळवचनप्रवाही ॥ कामसरिता मिरविल्याही ॥ तेणें दर्शनें अंबापायीं ॥ संगमातें मिरवेल ॥४३॥

नातरी गौन धरुनि पोटीं ॥ वदतां अर्थ न लाघे जेठी ॥ प्रांजळ वद कीं शेवटी ॥ फिरुनि जाशील माघारा ॥४४॥

तुवां प्रांजळ वदल्याविण ॥ करुं न देऊं तुझें गमन ॥ बहुचावटी जल्पल्यान ॥ शिक्षा पावसी येथें तूं ॥४५॥

ऐसें ऐकतां मच्छिंद्रनाथ ॥ म्हणे शासनी उदेला आदित्यसुत ॥ तेथें तुमची शक्ति अदभुत ॥ केवीं वर्णूं मशक हो ॥४६॥

जो महाप्रळय भद्ररुद्र ॥ तो ग्रासूनि बैसला मुखचंद्र ॥ तेथें तुमची कथा महींद्र ॥ काय असे मशक हो ॥४७॥

ऐसी ऐकतां मच्छिंद्रगोष्टी ॥ परम क्रोधाची झाली दाटी ॥ मग ते अष्टभैरव थाटी ॥ एकदांचि उठावले ॥४८॥

जैसें अपार विधानथाटी ॥ अबळां सांडूनि उबलाकोटी ॥ प्रदीप्त होऊनि सांगे गोष्टी ॥ महाखगीं जाऊनियां ॥४९॥

तन्न्यायें अष्टभैरव ॥ मांडिते झाले युद्धपर्व ॥ कोणी त्रिशूळ परशु गांडीव ॥ टणत्कारिले ते समयीं ॥५०॥

तो परजोनि असिलता ॥ मुदगलगुरु ज्या परमकठिणता ॥ अंकुश बरची मांडू अस्ता ॥ चक्रें चालती उद्देशें ॥५१॥

गदा दारुकायंत्र अचाट ॥ भाले गुप्ती कुठार बोथट ॥ ऐशीं शस्त्रें तीव्र अचाट ॥ करीं कवळूनि उठावले ॥५२॥

तें पाहूनि मच्छिंद्रनाथ ॥ भस्मझोळीं वोपिला हस्त ॥ जय जय श्रीगुरुराजदत्त ॥ म्हणूनि भस्म करीं कवळूनि ॥५३॥

दाही दिशा मंत्रगौरव ॥ विभूती चर्चूनि आपुला भाव ॥ म्हणे मित्रावरुणदेव ॥ सिद्ध असोत मम काजा ॥५४॥

अश्विनी वरुण आंग्न वात ॥ धरामरादि वज्रनाथ ॥ गण गंधर्व तरंगिणीवत ॥ सिद्ध असोत आम्हांतें ॥५५॥

बुद्धिसिद्धि योगी अपार ॥ ब्रह्मांडात नांदणार ॥ त्या सर्वातें नमस्कार ॥ साह्य असोत आमुतें ॥५६॥

ऐसी जल्पूनि मंत्रशक्ती ॥ प्रेरिता दृढ झाली विभूती ॥ युद्धसमारंभ क्षिती ॥ आमंत्रिलें सर्वासी ॥५७॥

मग वज्रपंजर प्रयोगभूती ॥ धरास्त्रें नेमूनि शक्रदैवतीं ॥ मंत्रप्रयोग सबळशक्ती ॥ भाळीं विभूती चर्चीतसे ॥५८॥

तेणें शरीर वज्राहून ॥ ते समयीं झालें अतिकठिण ॥ मग म्हणे मच्छिंद्रनाथ पूर्ण ॥ कार्य साधा आपुलें ॥५९॥

यावयातें कराल आळस ॥ तरी मातृपितृशपथेस ॥ गुरु धिक्कारुनि निर्बळ यश ॥ मुखा काळें कराल कीं ॥६०॥

मग जिणें संदेहरुपी ॥ मिरवणें येथें मम कंदर्पी ॥ उडी सांडूनि कोरडे कूपीं ॥ प्राण त्यजावा हें बरेंच ॥६१॥

ऐसी ऐकतां वज्रपाणी ॥ पेटला सबळ जेवीं अग्नी ॥ मग शस्त्रें शिखा नाथविधानीं ॥ कवळूं पाहती ग्रासावया ॥६२॥

जे अष्टभैरव भद्रकाळ ॥ शस्त्रें सोडिती उतावेळ ॥ म्हणे येथें यांचा काळ ॥ चिताभस्मीं मेळवा ॥६३॥

मग नाथशरीरा लक्षूनि अष्ट ॥ शस्त्रें प्रेरिती प्रहार अनिष्ट ॥ त्रिशूळ फरश ते नीट ॥ दणादणीत अंगातें ॥६४॥

अंकुश परज गूर्ज मुदगर ॥ मांडू गदा भालचक्र ॥ गुंफी खंजीर बरची असिल ॥ सबळ प्रहारें भेदिती ॥६५॥

परी तो शस्त्रें मच्छिंद्रनाथ ॥ तृणप्राय सकळ मानीत ॥ शखवृष्टी घन वर्षत ॥ मच्छिंद्र पर्वत झालासे ॥६६॥

ऐसें होतां ते अवसरी ॥ निर्विघ्न दिसती ते शस्त्र ॥ मग परम कोपें गांडीवास्त्र ॥ सज्ज करिते पैं झाले ॥६७॥

एकी निर्मिला वातशर ॥ दुजीं निर्मिला कामास्त्र तीव्र ॥ तिजे निर्मिले वासव अस्त्र ॥ महाशक्ती आगळी ते ॥६८॥

चौथीं योजिलें नागास्त्रबंधन ॥ जें महातक्षकाहूनि दारुण ॥ पांचवें ब्रह्मास्त्र प्रवीण ॥ शापादपि विराजे ॥६९॥

सहावें रुदाख प्रळयकाळ ॥ कीं भक्षूं पाहे ब्रह्मांड सकळ ॥ सातवें दानवास्त्र सबळ ॥ असंख्य राक्षस मिरवती ॥७०॥

आठवें कृतांतास्त्र कठिण ॥ प्रेरितां पावती मृत्यु काळ नाम ॥ प्रचंड हस्तपाश कवळून ॥ असंख्य स्थिती मिरविती ॥७१॥

ऐसे योजूनि गांडीवा गुणी ॥ प्रेरिते झाले अष्टही क्षणीं ॥ मग ते अस्त्र भ्रमतां गगनीं ॥ प्रळयकाळ वोढवला ॥७३॥

वातास्त्राची प्रळयगती ॥ महापर्वत स्वर्गपंथी ॥ वायुचक्रीं भ्रमण करिती ॥ अकीं कार्पास जेउता ॥७४॥

कामास्त्र परम कठिण ॥ उर्वशीचें चांगुलपण ॥ अन्य दारा करवीत गमन ॥ मच्छिंद्रजती ये कृती ॥७५॥

त्याही परम सुंदर खाणी ॥ पाहतां काममूर्च्छनीं ॥ देव दानव मानव ध्यानीं ॥ जपी तपी लागती ॥७६॥

वासवशक्ती अतिप्रौढी ॥ तेज प्रवेशतां पडे ब्रह्मांडीं ॥ मित्रता पाहूनि घालणें उडी ॥ उरली नाहीं मागुतीं ॥७७॥

ती शक्ती होतां प्रगट ॥ शब्द करी कडकडाट ॥ तेणें उचलूं पाहे ब्रह्मांडपीठ ॥ धराकंप दाटला ॥७८॥

शेष दचकला आपुले मनीं ॥ उंचावीतसे ग्रीवा मूर्धनी ॥ कूम पृष्टा सरसावूनी ॥ भयें कांपे चळचळां ॥७९॥

वराह उंचावोनि दंत ॥ म्हणे धरा होती रसा व्यक्त ॥ दिग्गज भयभीतचित्त ॥ सैरा धांवती दशदिशां ॥८०॥

अस्त्रें नोहे प्रळय अचाट ॥ कीं प्रळयरुद्राचा हळहळाट ॥ विमानयानीं पाहे सुभट ॥ त्या पळतां समजेना ॥८१॥

तेज पाहतां सत्य अदभुत ॥ गंधर्व झाले मूर्च्छागत ॥ तार तारांगण होत ॥ चंद्र लपवी मुखाते ॥८२॥

सूर्य वरुणा करी दाटी ॥ म्हणे राहें खगापोटीं ॥ वगीं प्रळय जेठी ॥ जगामाजी मिरवला ॥८३॥

शिव झाला भयातुर ॥ रक्षा कपाटें गिरिकंदर ॥ ऐसा प्रळय होतां अपार ॥ ठायीं ठायीं पडताती ॥८४॥

त्यांत नानास्त्र विषवल्लीसरणी ॥ प्रगटतां विषाची प्रेरणी ॥ अघटित तेथें जाहली करणी ॥ आली विपाची मूर्च्छना ॥८५॥

होतां ब्रह्मास्त्र शापादिक ॥ त्यांत प्रवेशला रुद्रास्त्र पावक ॥ तो क्षणें जाळूं पाहें सकळिक ॥ ग्रासीन म्हणे ब्रह्मांड ॥८६॥

त्यातें साह्यार्थ दानवास्त्र झालें ॥ भयानक बहुधा रक्षक धांवले ॥ तैशांत काळास्त्र परम शिरलें ॥ प्राण हरुं लोकांचा ॥८७॥

ऐसी प्रळयाची होतां मांडणी ॥ मच्छिंद्र देखतां नयनीं ॥ मग नव अस्त्रशक्तिमंत्र जपूनी ॥ विभूतीतें सोडीतसे ॥८८॥

तेणें अस्त्रविचक्षणीं ॥ कैसे ऐका प्रतापखाणी ॥ वातअस्त्राचे पुढे जाऊनी ॥ पर्वता्स्त्र विराजलें ॥८९॥

यावरी कामास्त्रापुढें जाऊनी ॥ संचरलें अस्त्र विरक्त धडपडूनी ॥ तेणें कामास्त्र बापुडें होऊनी ॥ पाठी देऊनि पळतसे ॥९०॥

वासवशक्ति अतिदारुण ॥ तियेचे पुढें झालें मोहन ॥ तेणें महंता गेली पळून ॥ वासवशक्तीची सर्वस्वें ॥९१॥

नागास्त्राचे पडिपाडीं ॥ खगेंदास्त्र घाली उडी ॥ सकळ नागाची जुपडी ॥ दाढेखाली रगडी तें ॥९२॥

यावरी ब्रह्मास्त्र प्रळयानळ ॥ यास्तव अस्त्र उरों नेदी केवळ ॥ शांति वरुण वाचे सफळ ॥ आशीर्वचन नाथातें ॥९३॥

यावरी रुद्रास्त्र उरों नेदी केवळ ॥ तयापुढें धाडिलें कार्तिकेयास्त्र बाळ ॥ येतांचि सर्व अंग झालें शीतळ ॥ कोप शांताब्धींत बुडाला ॥९४॥

दानवास्त्रा नाहीं मिती ॥ त्याची मच्छिंद्राचें देवास्त्र करी शांती ॥ सकळ त्यातें पाहूनि जाती ॥ अंतरिक्षस्त्रानीं आपल्या ॥९५॥

यावरी काळास्त्र गहन ॥ तेणें संजीवनी अस्त्र पुढें पाहून ॥ मागोमागें पाश घेऊन ॥ निर्लज्जपणें पळताती ॥९६॥

ऐशी अष्टांची अष्टनिवृत्ती ॥ करुनि पावली सकळ शांति ॥ यावरी जें अस्त्र उरलें नववे मिती ॥ तयाची ख्याती परिसावी ॥९७॥

तें वातास्त्र अर्कप्रचंड ॥ प्रवेश करितां भैरवपिंड ॥ तेणें विकळ झाले अष्टधेंड ॥ चलनवलन विसरले ॥९८॥

प्रथम वासव शक्ति प्रगट होतां ॥ दणाणा उठला ब्रह्मांडी समस्तां ॥ तो प्रळयनाद अंबा ऐकतां ॥ परिचारिका धाडीतसे ॥९९॥

त्या परिचारिका एकएकाकिनी ॥ कोटी चामुंडा लावण्यखाणी ॥ शंखिनी डंखिनी योगिनी ॥ जळदेवता पातल्या ॥१००॥

चंडा रंडा मुंडा कुंडा ॥ मंडा वंडा आणि वितंडा ॥ ऐशा वर्णिल्या किती तोंडा ॥ अष्टराष्ट्री धांविन्नला ॥१॥

परी पूर्वी पांचसती ॥ समाचारा आल्या असती ॥ त्यानी पाहुनि प्रळयगती ॥ सकळ समुदाय तो आणिला ॥२॥

त्याही चमुंडा तीव्र थोर ॥ शस्त्रास्त्रीं करिती मार ॥ परी तो सुभट मच्छिंद्र ॥ निवारीत अस्त्रानें ॥३॥

असो वातास्त्रआकर्षणी ॥ अष्टभैरव गेले क्षीण होऊनी ॥ प्राण विकळ देह धरणीं ॥ निचेष्टित पडियेले ॥४॥

यारीव एक क्षणीं चामुंडाभार ॥ तयांचा कैसा झाला विचार ॥ भुलीक मोहनास्त्र ॥ कामशरीं योजिलें ॥५॥

तंव तें अस्त्र प्राबल्यवंत ॥ सर्वाच्या संचरलें देहीं गुप्त ॥ तेणें क्षणैक होऊन मूर्च्छित ॥ पिशाचासमान भ्रमताती ॥६॥

कोणी वाद्यें घेऊन नाचती ॥ कोणी उगीच टाळ्या पिटिती ॥ कोणी खगीं तंद्री लाविती ॥ कोणी हंसती गदगदां ॥७॥

कोणी म्हणती विमान आलें ॥ कोणी उग्याच डोलती डोले ॥ कोणी धांवती महीं पाउलें ॥ पळतां उलथोनि पडताती ॥८॥

कोणी उगेचि स्फुंदोनि रडती ॥ कोणी गोंधळी गायन करिती ॥ कोणी रानोरान भ्रपती ॥ आई बया म्हणोनि ॥९॥

कोणी लोळती धुळींत ॥ कोणी मृत्तिका उधळीत ॥ कोणी उदो उदो म्हणत ॥ कोणी रडतां पडताती ॥११०॥

कोणी निचेष्टित पडतां धरणीं ॥ मक्षिका गोंगाट करिती वदनीं ॥ कोणी उग्याच शिव्या देऊनी ॥ विवाद करिताती नेपुरें ॥११॥

कोणी भेटती दाटती प्रेमें ॥ कोणी काष्ठाचि उभवूनी सप्रेमें ॥ नाना खेळ स्त्रिया उगमें ॥ पुरुषनांवीं होताती ॥१२॥

कोणी फेडूनि नेसतें वसन ॥ वृक्षा नेसविती गुंडाळून ॥ कोणी कवळूनि करीं पाषाण ॥ स्तनपान करिती त्या ॥१३॥

कोणी काढूनि चोळी चिंधोटी ॥ त्याची नेसती लंगोटी ॥ अंगा चर्चूनि भस्मचिमुटी ॥ भोपळा नरोटी कवळूनियां ॥१४॥

कोणी ऊर्ध्व करोनि हस्त ॥ अलख म्हणोनि भिक्षा मागत ॥ कोणी शृंगार काढूनि निश्वित ॥ पाषाणांते लेवविलें ॥१५॥

ऐसा होता चमत्कार ॥ त्यांत काय करी नाथ मच्छिंद्र ॥ विद्यागौरवी प्रहर ॥ तयामाजी संचरवीं ॥१६॥

तें अस्त्र चपळ सबळवंत ॥ वसनें आसडूनि त्वरित ॥ नेऊनियां गगपंथें ॥ अंबरातें मिरविलीं ॥१७॥

मग त्या सकळ नग्न होऊनी ॥ नृत्य करिती सकळ अवनीं ॥ त्याही सकळ आणि मच्छिंद्रमुनी ॥ मायास्त्रातें जल्पतसे ॥१८॥

तेणेंकरुनि अपार पुरुष ॥ सर्वभूषणीं महादक्ष ॥ निर्मूनियां नाथ प्रत्यक्ष ॥ समोर संचार करवीतसे ॥१९॥

ऐसी करुनि दृढ राहटी ॥ स्मरणास्त्र जल्पलें होटीं ॥ तेणेंकरुनि सर्व गोरटी ॥ देहाप्रती पातल्या ॥१२०॥

देहस्मरणीं होता स्थित ॥ आपण आपणाकडे पहात ॥ तो नग्नशरीरी केश मुक्त ॥ परम लज्जित मग त्या झाल्या ॥२१॥

भोंवतें पाहती दृष्टी करुनी ॥ तों अपार पुरुष देखिलें नयनीं ॥ तेणें फारच लज्जित होऊनी ॥ पळती सैराट नग्नचि ॥२२॥

तों पळतपळत सहज नयनीं ॥ भैरव पाहिले अनवस्थान ॥ कंठीं उरलासे प्राण ॥ रुधिर अवनीं सांडतसें ॥२३॥

आणिक पाहिलें नेत्रश्वेतीं ॥ मग पळूनि गेल्या जेथें भगवती ॥ अंबिका पाहूनि नग्न समस्ती ॥ आश्चर्य चित्तीं करीतसे ॥२४॥

म्हणे कां वो ऐसें केलें ॥ कोणी तुम्हांतें नागाविलें ॥ येरी म्हणती सुकृत संपलें ॥ म्हणूनि अवस्था हे झाली ॥२५॥

माय वो माय जोगी आला ॥ कोणीकडोनि जाणों आम्ही त्याला ॥ तेणें करुनि अवस्था आम्हांला ॥ प्राण घेतला भैरवांच ॥२६॥

आतां जननी काय उरलें ॥ तुम्ही स्वस्थान सोडा वहिले ॥ नातरी दशा पूर्ण पावाल ॥ आम्हां दिसतें जननीये ॥२७॥

भैरवांसारिखे वार धुरंधर ॥ तयांचा प्राण कंठावर ॥ उरला असे बरावा विचार ॥ आम्हांलागीं दिसेना ॥२८॥

तो जोगी नव्हे मायाजननी ॥ सुत प्रसवला दुसरा तरणी ॥ पूर्वभयाची आतां मांडणी ॥ जगामाजी मिरवेना ॥२९॥

की एकादश प्रळयरुद्र ॥ एकच शरीरीं मिरवले भद्र ॥ देवदानव नक्षत्र चंद्र ॥ आम्हां वाटलें ग्रासितो ॥१३०॥

कीं माये प्रळयविजेच्या स्थानास ॥ आजीच आली धरुनि यास ॥ आप तेज मही वायु आकाश ॥ ग्रासील ऐसें वाटतसे ॥३१॥

तरी आतां वेगीं माये ॥ या स्थानातें आंचवावे ॥ कोणे प्रकारें वांचवावें ॥ जीवित्व आपुलें जननीये ॥३२॥

ऐसें बोलूनी भयभीत ॥ कंपायमान बावर्‍या होत ॥ कोणी बोलतां चांचरा घेत ॥ आला आला म्हणोनि ॥३३॥

ऐसी दीक्षामाय भवानी ॥ पाहूनि आश्वर्य करी मनीं ॥ मग स्वचित्तांत पाहे शोधूनी ॥ कोण कोणाचा कोणता ॥३४॥

तंव तो महाराज कविनारायण ॥ उपरिचर वसूच प्रियनंदन ॥ मच्छिंद्रनामें अवतार धरुन ॥ जगामाजीं मिरवला ॥३५॥

ऐसें आणूनी स्वचित्तांत ॥ मग सकळांलागीं वसनें देत ॥ पुढें घालूनि अबला समस्त ॥ बाहेर आली जगतत्रयजननी ॥३६॥

मग मच्छिंद्रापाशीं येऊनि त्वरित ॥ बहु प्रेमानें हदयीं धरीत ॥ तेणें पाहूनि जगन्मातेतें ॥ चरणावरी लोटला ॥३७॥

मग घेऊनि अंकीं मच्छिंद्रनाथ ॥ म्हणे बा प्रताप केला बहुत ॥ तरी भैरव प्राणरहित ॥ झाले सावध करीं त्यांसी ॥३८॥

ऐसें ऐकूनि अंबिका वाणी ॥ प्रसन्न झाली चित्तभवानी ॥ मग अस्त्रविद्या वाताकर्षणीं ॥ काढूनि घेतली ते समयीं ॥३९॥

जैसें दुग्धामाजी तोय ॥ काढुनि घेत हंस समयीं ॥ तेवीं वाताकर्षण अस्त्र सदयी ॥ काढूनि घेत ते क्षणीं ॥१४०॥

कीं पंचाक्षरी कौशलेप्रती ॥ मही मांदुसे काढूनि घेती ॥ तन्न्यायें विद्याशक्ती ॥ काढूनि घेत तो नाथ ॥४१॥

किंवा स्वबुद्धिविचक्षण ॥ कार्यं असतां परस्वाधीन ॥ तें युक्तिप्रयुक्तीं घेती करुन ॥ प्राज्ञ बळें आपुलालें ॥४२॥

असो ऐसे दृष्टांत बोलें ॥ येरीकडे भैरव सावध झाले ॥ चलनवलन सर्व संचरलें ॥ जैसे तैसें शरीर ॥४३॥

मग झाल्या विचक्षणीं ॥ दिशा पाहती दृष्टीकरुनी ॥ तों जगन्माता अंकीं घेऊनी ॥ मच्छिंद्रातें बैसली ॥४४॥

मग ते अष्ट भैरववीर ॥ येते झाले अंबिकेसमोर ॥ म्हणती अंबे प्रताप थोर ॥ मच्छिंद्रानें पै केला ॥४५॥

आम्ही याची युद्धमांडणी ॥ घेऊं सकळ परीक्षाकडसणी ॥ मग नागपत्रअश्वत्थाहुनी ॥ कथा बदले अंबेतें ॥४६॥

नागअश्वत्थाहूनि ऐकतां गोष्टी ॥ माता म्हणे हा धन्य धूर्जटी ॥ मग मच्छिंद्रास म्हणे माझे दृष्टीं ॥ प्रताप कांहीं दावी कां ॥४७॥

जैसें पयामाजी तोय ॥ शोषूनि घेत हंस पय ॥ तेवीं आतां युद्धसंदेह ॥ काढूनि दावीं चक्षूतें ॥४८॥

यावरी बोले मच्छिंद्रनाथ ॥ कैसी दावूं कोणत्या अर्थ ॥ माता म्हणे हा पर्वत ॥ आकाशातें मिरवी कीं ॥४९॥

मिरवेल परी जेथील तेथ ॥ पुन्हां ठेवीं मूर्तिमंत ॥ ऐसें ऐकतां मच्छिंद्रनाथ ॥ करीं कवळी भस्मातें ॥१५०॥

मग वायुअस्त्र फणिदैवत ॥ मंत्रजल्पें केलें युक्त ॥ पर्वतीं फेकितां भस्म होत ॥ उदयवातचि जो झाला ॥५१॥

वात मौळी कद्रुनंदन ॥ पर्वत मौळी शीघ्र वाहून ॥ वातचक्रीं करी भ्रमण ॥ चंडरथासमान कीं ॥५२॥

त्यांतें उलथावया शक्ती ॥ अंबा पाहे आपुल्या चित्तीं ॥ परी शेषमौळींची पर्वतमाती ॥ दृढ असे ढळेना ॥५३॥

मग मनीं म्हणे हा धन्य नाथ ॥ जेणें ऐक्य केला पर्वत वात ॥ शत्रु समरीं ऐक्य चित्त ॥ मिरविलाही हें धन्य ॥५४॥

पर्वत पूर्ण वातावरी ॥ तो वात मिरवी घेऊनि शिरीं ॥ जैसा मत्स्यकोदरीं ॥ येवोनिया दडाला ॥५५॥

कीं व्याघ्रअजानांदवटी ॥ नांदविले एका पेटीं ॥ कीं उरग उरगारी सांगती गोष्टी ॥ प्रेमभावें मिरवूनियां ॥५६॥

तन्न्यायें मच्छिंद्रें केलें ॥ धन्य सद्विद्येचें धाम रचिलें ॥ मग कुरवाळूनि म्हणे वहिलें ॥ पर्वतातें उतरीं कां ॥५७॥

मग मच्छिंद्रें वात आकर्षून ॥ ठायींच्या ठायीं नग उतरुन ॥ ठेवूनी अंबेचे समाधान ॥ सद्विद्येनें पैं केलें ॥५८॥

यावरी नाथ आणि भगवती ॥ गेले अंबिकास्थानाप्रती ॥ तेथें राहूनि तीन रात्री ॥ पुसूनियां चालिले ॥५९॥

मग अंबा प्रसन्न होऊन ॥ अस्त्रें दिधलीं त्यातें दोन ॥ स्पर्शास्त्र अस्त्र भिन्न ॥ प्रसादातें निवेदिलेम ॥१६०॥

असो ऐसा प्रसाद घेऊन ॥ निघता झाला मातेसी नसून ॥ बारामल्हारांचा मार्ग धरुन ॥ जाता झाला तो नाथ ॥६१॥

पुढें बारामल्हारांचें कथन ॥ श्रोतियां सांगे धुंडीनंदन ॥ नरहरि मालू नामाभिधान ॥ जगामाजी मिरवे तो ॥६२॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ चतुर्थोध्याय गोड हा ॥१६३॥

श्रीकृष्णार्पमस्तु ॥ ॥ नवनाथभक्तिसार चतुर्थोध्याय समाप्त ॥


श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय ५
श्रीगणेशाय नमः
जयजयाजी यदुकुळटिळका ॥ भक्तिपंकजाच्या सदैव अकी ॥ मुनिमानसचकोरपाळका ॥ ॥ कृपापीयूषा चंडा तूं ॥१॥
भाविक प्रेमळ भक्त परी ॥ तयामचा अससी पूर्ण कैवारी ॥ बाळप्रल्हादसंकटावरी ॥ कोरडे काष्ठीं प्रगटलासी ॥२॥
करविंशतिप्रताप सघन ॥ संकटीं घातले देव तेणें ॥ तदर्थ सकळ रविकुळपाळण ॥ अवतारदीक्षा मिरविसी ॥३॥
देवविप्रांचें संकट पाहून ॥ मत्स्यकुळातें करी धारण ॥ मग उदधीतें गगन दावून ॥ शंखासुर धरियेला ॥४॥
तेवींच दैत्य दुमदुमा करीत ॥ अवतार कच्छ झाला मिरवीत ॥ उदधी मंथूनि शंखा ॥ तोषवीत ॥ महाराज कृपार्णव ॥५॥
राया बळीची उद्दाम करणी ॥ स्वरुप मिरवी खुजटपणी ॥ संकट पडतां सुरगणी ॥ फरशधर झालासे ॥६॥
अपार भक्तप्रेमा सघन ॥ त्यांत स्थिरावले पंडुनंदन ॥ शिशुपाळ – वक्रदंतकंदन ॥ वसुदेवकुशीं मिरवला ॥७॥
असो ऐसा भक्तिप्रेमा ॥ तूतें आवडे मेघश्यामा ॥ तरी भावभक्तिच्या उगमा ॥ पुढें ग्रंथ बोलवीं ॥८॥
मागिलें अध्यायीं केलें कथन ॥ हिंगळाज क्षेत्रीं मच्छिंद्रनंदन ॥ अष्टभैरव चामुंडा जिंकून ॥ दर्शन केलें अंबेचें ॥९॥
तरी श्रोते सिंहावलोकनीं ॥ कथा पहा आपुले मनीं ॥ बारामल्हारमार्ग धरुनी ॥ जाता झाला मच्छिंद्र ॥१०॥
तो बारामल्हारकाननांत ॥ मुक्कामा उतरला एका गांवांत ॥ देवालयीं मच्छिंद्रनाथ ॥ सुखशयनीं पहुडला ॥११॥
तों रात्र झाली दोन प्रहर ॥ जागृत आहे नाथ मच्छिंद्र ॥ तंव काननी दिवट्या अपार ॥ मच्छिंद्रनाथें देखिल्या ॥१२॥
इकडूनि जाती तिकडूनि येती ॥ ऐशा येरझारा करिती ॥ तें पाहूनि नाथ जती ॥ म्हणे भुतावळें उदेलें ॥१३॥
तरी यातें करावें प्रसन्न ॥ समय येत हाचि दिसून ॥ कोण्या तरी कार्यालागून ॥ उपयोगीं श्रम पडतील ॥१४॥
तरी त्यातें आतां शरणागत ॥ प्रसन्न करुनि घ्यावें भूत ॥ श्रोते म्हणती कार्य कोणतें ॥ भूतास्वाधीन असेल कीं ॥१५॥
तरी ऐसें न बोलावें या वेळे ॥ भूत श्रीराम उपयोगी आलें ॥ राक्षसाचें प्रेत नेलें ॥ समरंगणीं सुवेळे ॥१६॥
तेव्हां अमृतदृष्टीकरुन ॥ उठवी श्येन कपिरत्न ॥ तेवीं तुळसीसी प्रसन्न ॥ भूत झालें कलींत ॥१७॥
तरी लहानापासूनि थोरापर्यंत ॥ समयीं कार्य घडूनि येत ॥ पहा अर्णवा झुरळें निश्वित ॥ वांचविलें म्हणताती ॥१८॥
तन्न्यायें कल्पूनि चित्तीं ॥ नाथ भूतांच्या बैसल्या अर्थी ॥ मग अंबिकाअस्त्र स्पर्शशक्ती ॥ प्रेरिता झाला तेचि क्षणी ॥१९॥
तें अस्त्र प्रेरितां भूतगणीं ॥ होतां स्पर्श कुरुमेदिनीं ॥ मग पद घरी आंवळूनी ॥ सुटका नाहीं पदातें ॥२०॥
जेवीं युद्ध कुरुक्षेत्रांत ॥ मही धरीतसे कर्णरथ ॥ चक्रें गिळूनि करी कुंठित ॥ गमनसंधान करुं नेदी ॥२१॥
तन्न्यायें स्पर्शशक्ती ॥ करी भूतपदा धरा व्यक्ती ॥ चलनवलन मग त्या क्षितीं ॥ कांहीएक चालेना ॥२२॥
जैसे तरु एकाचि ठायीं ॥ वसती अचळप्रवाहीं ॥ तन्न्यायें भूतें सर्वही ॥ खुंटोनियां टाकिली ॥२३॥
तयां भूतांचें वियोगानिमित्ते ॥ कीं वेताळा भेटी जाणें होतें ॥ सर्व मिळोनि येतां क्षितींत ॥ जमोनियां येताती ॥२४॥
तंव ते दिवशीं झाले कुंठित ॥ वेताळभेटीच राहिली अप्राप्त ॥ येरीकडे वेताळ क्षितींत ॥ अनंत भूतें पातलीं ॥२५॥
तो दक्षभूतांचा बळी वेताळ ॥ पाहे अष्टकोटी भूतावळ ॥ तों न्यूनपणीं सर्व मंडळ ॥ दिसून आलें तयातें ॥२६॥
मग अन्य भूतातें विचारीत ॥ शरभतीरींची भूतजमात ॥ आली नाहीं किमर्थ ॥ शोध त्यांचा करावा ॥२७॥
अवश्य म्हणोनि पांच सात ॥ गमन करिते झाले भूत ॥ शरभतीरीं येऊनि त्वरित ॥ निजदृष्टीं पहाती ॥२८॥
तंव ते मंडळी महीं व्यक्त ॥ उभी असे बळरहित ॥ जैसा एका ठायींचा पर्वत ॥ दुसर्‍या ठायीं आतळेना ॥२९॥
मग त्या मंडळानिकट येऊन ॥ पुसते झाले वर्तमान ॥ तुम्ही व्यक्त महीलागून ॥ काय म्हणोनि तिष्ठलां ॥३०॥
येरी म्हणती अनेक जे भेद ॥ महीं उचलोनि देतां पद ॥ कोण आला आहे सिद्ध ॥ तेणें कळा रचियेली ॥३१॥
मग ते पाहे कळा ऐकून ॥ पर्वता चालिले शोधालागून ॥ गुप्तरुपें वस्तींत येऊन ॥ मच्छिंद्रनाथ पाहिला ॥३२॥
बालार्ककिरणीं तेजागळा ॥ शेंदूर चर्चिलासे भाळा ॥ तयामाजी विभूती सकळा ॥ मुखचंद्रें चर्चिली ॥३३॥
कर्णी मुद्रिका रत्नपाती ॥ कीं वस्तीत पातल्या रत्नज्योती ॥ हेमगुणी गुंफोनि निगुती ॥ कवरींभारीं वेष्टिला ॥३४॥
ललाट अफाट मिशा पिंगटा ॥ वटदुग्धानें भरल्या जटा ॥ सरळ नासिका नेत्रवाटा ॥ अग्रीं समदृष्टी पहातसे ॥३५॥
अर्कनयनीं विशाळ बहुत ॥ उग्रपणीं उदय दावीत ॥ पाहतां वाटे कृतांत ॥ नेत्रतेजें विराजला ॥३६॥
स्थूळवट बाहुदंड सरळ ॥ आजानुबाहू तेजाळ ॥ कीं मलविमल करुनि स्थळ ॥ बहुवटीं विराजले ॥३७॥
मस्तकीं शोभली दिव्य वीरगुंठी ॥ कंथा विराजे पाठपोटीं ॥ त्यावरी ग्रांवेसी नेसल्या दाटी ॥ ज्ञानशिंगी मिरवीतसे ॥३८॥
बाहुवटें हनुमंत ॥ वीरकंकण करीं शोभत ॥ कुबडी फावडी घेऊनि हातांत ॥ बोधशौलिका विराजे ॥३९॥
जैसा तीव्र बारावा रुद्र ॥ कीं सरळ योगियांचा भद्र ॥ जैसा नक्षत्रगणीं चंद्र ॥ तेजामाजी डवरतसे ॥४०॥
ऐसें पाहूनि एक भूतीं ॥ मनामाजी करितां ख्याती ॥ येणेंचि व्यक्त केलें क्षितीं ॥ भूतगणा वाटतसे ॥४१॥
मग ते होऊनि संदेहस्थ ॥ नाथासी म्हणती भूतें पतित ॥ जाऊं द्या स्वामी करा मुक्त ॥ आपुलाल्या कार्यासी ॥४२॥
नाथ म्हणे सर्व गुंतले ॥ तुम्ही मुक्त केवीं राहिले ॥ येरु म्हणे पाठविलें ॥ समाचारा वेताळे ॥४३॥
तरी महाराजा करीं मुक्त ॥ जाऊं द्या वेताळनमनार्थ ॥ यावरी त्यांसी म्हणे नाथ ॥ सोडणार नाहीं सहसाही ॥४४॥
तुमचा वेताळ आदिराणीव ॥ जाऊनि त्यातें त्वरें सांगावें ॥ येरु म्हणती मग अपूर्व ॥ भलें नोह महाराजा ॥४५॥
वेताळ खवळता बाबरदेव ॥ हे महाबळाचे असती अष्टार्णव ॥ ब्रह्मांड जिंकूनि कंदुकभाव ॥ महीं खेळती महाराजा ॥४६॥
नवनाग जैसे सबळी ॥ तयां माजी फोडितां कळीं ॥ तयांसवें कोणी रळी ॥ केली नाहीं आजन्म ॥४७॥
देव दानव गंधर्व असती ॥ तेही वेताळ बलाढ्य म्हणती ॥ तस्मात् स्वामी तयांप्रती ॥ श्रुत करुं नोहे जी ॥४८॥
येरु म्हणे संपादणी ॥ येथें काय करितां दाऊनी ॥ तुमचा वेताळ पाहीन नयनीं ॥ बळजेठी कैसा तो ॥४९॥
ऐसी ऐकूनी भूतें मात ॥ म्हणती अवश्य करुं श्रुत ॥ मग जाती जेथ तो वेताळ भूत ॥ तयापाशीं पातले ॥५०॥
राया वेताळासी करुनि नमन ॥ सांगते झाले वर्तमान ॥ म्हणती महाराजा भूतांसी विघ्न ॥ जोगी एक आहे कीं ॥५१॥
तेणें खेळूनि मंत्रशक्ती ॥ महीं व्यक्त केली जमाती ॥ शेवटीं म्हणतो हेचि गती ॥ तुम्हां करीन महाराजा ॥५२॥
ऐसें ऐकूनि पिशाचराव ॥ परम क्षोभला विकृतिभाव ॥ म्हणे आतां अष्टका सर्व ॥ भूतावळ मेळवा ॥५३॥
मग भूतभृत्य जासूद हलकारे ॥ जाते झाले देशांतरा ॥ अर्बस्थान पंजाब गुर्जरा ॥ बंगालादि पातले ॥५४॥
माळवी मेवाड तेलंगण ॥ कर्नाटकी देश दक्षिण ॥ कुंडाळ कैकाड विलंबवचन ॥ सप्तद्वीपींचे पातले ॥५५॥
सकळां श्रुत करुनि गोष्टी ॥ पाठविती सकळ भूतथाटी ॥ अष्टराणीव एक एक कोटी ॥ समारंभा पातले ॥५६॥
अष्टराणीव तयांचें नांव ॥ महावीर विद्याकारणीं सर्व ॥ म्हंमद म्हैषासुर धुळोवान गर्वे ॥ बाबर झोटिंग पातले ॥५७॥
मुंजा नरसिंहाचा अवतार म्हणोनि वीरांत त्याचा संचार ॥ तोही एक कोटी भार ॥ घेऊनियां मिळाला ॥५८॥
असो ऐसे कोटीभार ॥ उतरले जैसे गिरिवर ॥ महाभद्र तो आग्या वेताळवीर ॥ येऊनियां पोहोंचला ॥५९॥
सकळ वेताळापाशीं येऊन ॥ कथिते झाले सिद्धगमन ॥ मग सकळ सांगूनि वर्तमान ॥ समारंभीं चालिले ॥६०॥
येऊनि शरभतीराप्रती ॥ अष्टही कोटी कोल्हाळ करिती ॥ तेणें दणाणी अमराक्षती ॥ आणि पाताळी आदळतसे ॥६१॥
तें पाहूनि मच्छिंद्रनाथ ॥ करीं कवळी विभूतिपात ॥ आराधूनि मंत्रशक्तीतें ॥ लखलखीत पैं केलें ॥६२॥
स्मरणगांडीव विभूती शर ॥ सज्ज करिती अति तत्पर ॥ परी सर्वाचा प्रताप पहावया स्थिर ॥ महीं विराजे उगलाचि ॥६३॥
परी वज्रास्त्रमंत्र जपून ॥ भोवतें वेष्टिलें रेषारंगण ॥ आणि मस्तकीं वज्रासन ॥ वज्रशक्ती मिरवीतसे ॥६४॥
तेणेंकरुनि भूतांचा प्रवेश ॥ लिप्त नोहे आसपास ॥ परी भूतावळ्या स्मशानास ॥ वर्षाव करिती आगळा ॥६५॥
जैशा पर्जन्याच्या धारा ॥ वर्षाव करिती अपार अंबरा ॥ परी वज्रास्त्र सबळ मौळिभारा ॥ कदाकाळीं मानीना ॥६६॥
त्यांत अष्ट पिशाचनृपाळ ॥ स्वरुपेंकरुनि अति विशाळे ॥ तरु टाकिती उपटूनि बळें ॥ पर्जन्यधारांसारिखे ॥६७॥
परा तें वज्रास्त्र मौळी ॥ तया न गणिती तये काळीं ॥ तरु संचवूनि पर्वतमौळी ॥ पर्णकुटी ती जाहली ॥६८॥
ऐसा संचरतां तरुभार ॥ काय करिते झाले समग्र ॥ कोरडे काष्ठादि तृण अपार ॥ तयावरी सांडिती ॥६९॥
सकळ करुनि महाकहर ॥ सांडिते झाले वैश्वानर ॥ तें पाहूनि नाथ मच्छिंद्र ॥ जलदास्त्र प्रेरीतसे ॥७०॥
भूतें सांडिती वैश्वानर ॥ तरु कडकडती ज्वाळपर ॥ ब्रह्मांडी उमाळा व्यापे थोर ॥ पक्षिकुळ जीवजंतु ॥७१॥
ऐसी पाहतां पावकथाटी ॥ परी जलदास्त्रें केली दाटी ॥ उदधी मिरवूनि आकाशापाठी ॥ शांत केला पावक तो ॥७२॥
यापरी मच्छिंद्रनाथ ॥ पावकास्त्र प्रेरिता झाला विभूतिमंत्र ॥ तेणें अग्नि प्रदीप्त करीत ॥ भूतगणीं मिरवीतसें ॥७३॥
परी तो दृश्य अदृश्य जाणोनी ॥ प्रळयाग्नि पाहती गुप्त होऊनी ॥ मग पहा उदधितोया सांडोनी ॥ आकाशांत मिरवूं त्या ॥७४॥
परी तो विझेना मंत्राग्न ॥ मग मच्छिंद्रें जलदास्त्र प्रेरुन ॥ शांत केला द्विमूर्धन ॥ अस्त्रमंत्रें करुनियां ॥७५॥
शांत होताचि मंत्राग्नी ॥ महीं उतरली भूतगणीं ॥ मग स्पर्शास्त्र जल्पोनी ॥ भूतांगणीं कल्पीतसे ॥७६॥
तेणेंकरुनि अष्टकोटी ॥ मही व्यक्त झाली एकथाटी ॥ जैसी पूर्वी भूतांते राहटी ॥ तेंचि झालें सर्वांस ॥७७॥
परी अष्टजन जे तयांचे नृप ॥ महाबळी प्रतापदर्प ॥ ते स्पर्शास्त्र न गणती माप ॥ स्वबळें मिरविती ॥७८॥
परी स्पर्शास्त्रें एकचि केलें ॥ अदृश्य सकळ तेज खंडूनि धरिलें ॥ हें तों नेणोनि निकट आले ॥ मच्छिंद्रातें आकळावया ॥७९॥
परी भोवतें आहे वज्र संपन्न ॥ लाग न चाले कांहीं तेणें ॥ परी परम बलाढ्य वेताळसंधान ॥ निकट अंगें पातले ॥८०॥
परी भोंवते आहे वज्रास्त्र ॥ तेंचि गिळूनि गेला मुखपात्र ॥ हें मच्छिंद्र पाहतां अति विचित्र ॥ वासवास्त्र सोडीतसे ॥८१॥
वासवास्त्र होता प्रगट ॥ उभयतांची झाली झगट ॥ जैसे जेठी लागूनि येत पाठ ॥ लोंबी झोंबी खवळले ॥८२॥
एकमेकां महीं पाडिती ॥ तेणें दणाणा उठे क्षिती ॥ अष्टसमुद्र हेलावती ॥ खळबळती नक्षत्रें पैं ॥८३॥
शेषमस्तकें हेलावती ॥ कूर्म म्हणे त्या अति अदभुती ॥ वराह सांवरुनि नेटे दंती ॥ महीलागी उचलीतसे ॥८४॥
येरीकडे सप्तजन ॥ कवळूं पाहती मच्छिंद्राचे चरणीं ॥ कीं चरणीं धरुनि महीकारण ॥ मच्छिंद्रनाथ आकळावा ॥८५॥
परी तो नाथ अति चपळ ॥ पुनः वज्रास्त्र सिद्ध केले सबळ ॥ दाही दिक्षा रक्षपाळ ॥ ऐसें वज्रास्त्र मिरविलें ॥८६॥
यावरी तो दानवास्त्र जल्पून ॥ दानव केले सप्त निर्माण ॥ मधु तिल कुंभकर्ण ॥ मरु आणि मालीमल ॥८७॥
मुचकुंद त्रिपुर बळजेठी ॥ ऐसी सप्त दानवहाटी ॥ साती देवतें बळजेठीं ॥ लोंवी झोंबी पातले ॥८८॥
झोटिंगातें मधु झगटे ॥ खेळताती कुंभक नेटें ॥ बाबरातें कुंभकर्ण लोटे ॥ झोटधरणी झगडती ॥८९॥
म्हंमदालागीं मरु भिडत ॥ मालीमल मुंज्यातें आल्हाटीत ॥ म्हैसासुर अति मुचकुंद उन्मत्त ॥ त्यातें भिडतसे ॥९०॥
धुळोवान वीर समर्थ ॥ त्रिपुर झगटे तया निरत ॥ ऐसे एका मंत्री अस्त्र दैत्य ॥ सप्तजन आल्हाटिले ॥९१॥
ऐसे भिडतां अष्टजन ॥ महीं उठला अति दणाण ॥ एकमेकां महीकारण ॥ आकळावया ते जल्पीती ॥९२॥
एक दिन एक रात्री ॥ साती जणां न विश्रांती ॥ लाथा केवड हुमण्या देती ॥ वर्मावर्मी जाणूनियां ॥९३॥
तेणेंकरुनि प्रहार भेदीत ॥ भेदितां देह विकळ होत ॥ मुष्टिप्रहारें मूर्च्छित होत ॥ महीं तडती आदळोनि ॥९४॥
मग साती जणें दानवास्त्र ॥ भिडतां केलें त्या जर्जर ॥ मग सप्त दानव अदृश्यवर ॥ होते झाले एकसरें ॥९५॥
येरीकडे वासवशक्ती ॥ भिडतां प्रेमें वेताळाप्रती ॥ तों संधान पाहूनि हदयस्थिती ॥ वासवशक्ती भेदीतसे ॥९६॥
तेणें घायें अति सबळ ॥ मूर्च्छित पडला वेताळ ॥ महीं पडतां उतावेळ ॥ अदृश्य झाली शक्ती ते ॥९७॥
येरीकडे मच्छिंद्रनाथ ॥ वाताकर्पणविद्या जल्पत ॥ तों सांवरोनि वेताळ मूर्च्छित ॥ पुनरपि आला त्वरेनें ॥९८॥
येतां येतां सातीजणीं ॥ लगट करिती निकट येऊनि ॥ तों सिद्धप्रयोग वाताकर्पणी ॥ मच्छिंद्राचा झालासे ॥९९॥
सिद्धप्रयोग होतां नीती ॥ संचारतो अष्टदेहांप्रती ॥ तेणेंकरुनि वातगती ॥ आकर्षण होतसे ॥१००॥
जंव जंव आकर्षणवात होत ॥ तंव हस्तपादांचें वलन राहात ॥ परम क्लेश उचंबळत ॥ मूर्च्छाशक्ती मिरवावया ॥१॥
ऐसी होतांचि अष्टमावृत्ति ॥ मग एकमेकांप्रती बोलतीं ॥ आतां आसडूनि अहवृत्ति ॥ शरण वेगीं रिघावें ॥२॥
नातरी जोगी आहे कठिण ॥ भूतांसह आपुला घेईल प्राण ॥ तरी यातें प्रसन्न करुन ॥ जगामाजी नांदावें ॥३॥
जैसें रामप्रसादेंकरुन ॥ लंकाराणीव विभीपण ॥ की वालीचे कृतीनें ॥ राज्यीं मिरवला सुग्रीव ॥४॥
तन्न्यायें येथें करुन ॥ वांचवावा आपुला प्राण ॥ उपरी जीवलिया संगोपन ॥ आश्रय होईल हा एक ॥५॥
जैसा दरिद्रियाला परिस ॥ कीं चिंतामणी चिंतित्यास ॥ कीं पीयूष लाभे रोगियास ॥ तैसें होईल आपणासी ॥६॥
कीं प्रल्हादाचें नरसिंख दैवत ॥ संकटीं झालें साह्यवेंत ॥ तन्न्यायें आजही प्रीत ॥ वाढवावी महाराजा ॥७॥
ऐसें बोलूनि एकमेकां ॥ निश्वय करुनि नेटका ॥ म्हणती महाराजा तपोनायका ॥ सीमा झाली प्रतापा ॥८॥
तन्न्यायें सर्वज्ञमूर्ती ॥ सोडवीं आम्हां क्लेशपद्धती ॥ क्रोधानळें प्राणआहुती ॥ योजू नको महाराजा ॥९॥
तरी आतां अनन्य शरण ॥ आहोंत आमुचा वांचवा प्राण ॥ जैसें कचा शुक्रें दान ॥ संजीवनीचें पैं केलें ॥११०॥
तूं प्रत्यक्ष अससी नारायण ॥ हें नेणोनि रळी तुजकारण ॥ केली परी उचित घन ॥ प्राप्त झालें सध्यांचि ॥११॥
जैसा जटायु आणि संपाती ॥ प्रताप दावू गेले गभस्ती ॥ परी भोगदशाप्राप्ती ॥ सध्यांचि झाली लाभावरी ॥१२॥
तन्न्यायें येथें झालें ॥ तरी कृपेचीं बसवीं पाउलें ॥ चलनवलन अवघोचि राहिलें ॥ बोलणें उरलें सांगावया ॥१३॥
आतां क्षणैक करिसी आळस ॥ आम्ही जाऊं परठायास ॥ तेणें लाभ तव हस्तास ॥ काय मिरवेल तुजलागीं ॥१४॥
तरी आमुचा वांचवावा प्राण ॥ मग नाम तुझें मिरवू जगाकारण ॥ सांगशील तें कार्य करुन ॥ भूतांसहित येऊं कीं ॥१५॥
कीं यमें पाळिले यमदूत ॥ किंवा विष्णू पुढें विष्णुगण धांवत ॥ तन्न्यायें आम्ही भूतांसहित ॥ तुजपुढें मिरवूं कीं ॥१६॥
हें जरी म्हणशील खोटें ॥ तरी पूर्वजां बुडवू नरककपाटें ॥ आणि पंचपातकें महानेटें ॥ निजमस्तकी मिरवू कीं ॥१७॥
गोहत्यारी ब्रह्महत्यारी ॥ स्त्रीहत्यारी बाळहत्यारी ॥ मातृपितृगुरुहत्यारी ॥ पंचपातकें मस्तकीं मिरवू कीं ॥१८॥
ऐशी पातकें रौरव क्षितीं ॥ भोग मिरवू संवत्सरअयूती ॥ यातें साक्ष चित्रगुप्ती ॥ लीनमुखपदा मिरवू कां ॥१९॥
ऐसे आमुचे बोल निश्वित ॥ काया वाचा धरुनि निश्वित ॥ तरी आतां होई कृपावंत ॥ दयालहरी मिरवावी ॥१२०॥
यावरी बोले मच्छिंद्रनाथ ॥ साबरीविद्या मम कवित्व ॥ त्यातें साह्य भूतांसहित ॥ कार्याथीं तुम्हीं असावे ॥२१॥
जो जो मंत्र जया प्रकरणीं ॥ तरी त्या अर्थी तुम्ही वर्तोनी ॥ साह्य करावें मंत्रालागुनी ॥ कोणीतरी घोकिलिया ॥२२॥
मग अष्टही म्हणती अवश्य ॥ कार्य करुं निःसंशयास ॥ मग साधनप्रयोग आपुला भक्ष ॥ पृथक् पृथक् सांगितला ॥२३॥
अष्टकोटी भूतावळीसहित ॥ भक्षसाधन सांगितलें समस्त ॥ येणें पथें कार्य जगांत ॥ निश्वयें आम्ही मिरवू कीं ॥२४॥
पूजा पुरस्कर अभ्युत्थान ॥ मंत्रासहित निर्वाण ॥ मंत्र उजळला स्थापूनि ग्रहण ॥ पर्वणीतें नेमिलें ॥२५॥
ऐसा निश्वय सांग होतां ॥ मग बळें प्रेरकास्त्र प्रेरितां ॥ समूळ नासूनि गेली वार्ता ॥ आकर्षण अस्त्राची ॥२६॥
येरीकडें अष्टकोटी भूतावळ ॥ जोगिणी इत्यादि सकळ ॥ स्पर्शू पाहती चरणकमळ ॥ महीं व्यक्त होऊनिया ॥२७॥
तेव्हां जल्पूनि विमुक्तास्त्र ॥ मुक्त केले पिशाच सर्वत्र ॥ मग मच्छिंद्रपद नमूनि पवित्र ॥ सन्मुख उभे राहती ॥२८॥
बद्धांजुळी उभय कर ॥ उभे असती ते समोर ॥ वाणी वदले जयजयकार ॥ धन्य मच्छिंद्र म्हणोनी ॥२९॥
मग त्या मंडळींत मच्छिंद्र ॥ कैसा शोभला मूर्तिमंत ॥ जेवीं नक्षत्रांमाजी तेजोमंत ॥ शशिनाथ मिरवला ॥१३०॥
कीं रश्मिपालमंडळांत ॥ तेजें गहिंवरला प्रभे आदित्य ॥ कीं सुरवरगणी शचीनाथ ॥ स्वर्गांमध्यें मिरवला ॥३१॥
कीं शिवगण समुदायीं ॥ परम शोभत नगजावई ॥ कीं विष्णुगुणांत शेषशायी ॥ प्रभुत्वपणीं मिरवला ॥३२॥
कीं दानवांमाजी उशगनामूर्ती ॥ कीं देवामाजी बृहस्पती ॥ कीं पृतनेमाजी ऐरावती ॥ देवांगणीं मिरवितसे ॥३३॥
तेवीं पिशाचमंडळांत ॥ परम शोभला मच्छिंद्रनाथ ॥ मग सकळांच्या मस्तकीं ठेवूनि हात ॥ म्हणे क्षेमवंत असावे ॥३४॥
अष्टजण मुख्य नायक ॥ ते बोलति बोलावून सकळिक ॥ कीं मच्छिंद्र कार्य श्लोक ॥ जगउपकारा वदला असे ॥३५॥
तरी त्याचा धाक कोणीं ॥ तया साह्य पिशाच असावें येऊनीं ॥ सांगितलें याचें कार्य द्या करुनि ॥ मंत्रोच्चार होतांचि ॥३६॥
ऐसें ऐकोनियां भूतें ॥ अवश्य म्हणती जोडोनि हात ॥ यावरी बोलें मच्छिंद्रनाथ ॥ आणिक वर मज द्यावा ॥३७॥
तुमचें आमुचें समरांगण ॥ झालें सबळ बळेंकरुन ॥ त्या समरांगणाचें कथन ॥ लोकीं ऐसें मिरविलें ॥३८॥
तरी तें आख्यान वाचितां ॥ तया न करावी बाधा सर्वथा ॥ आणि हें आख्यान संग्रहीं पाळितां ॥ प्रिय मानावा तो पुरुष ॥३९॥
त्यासी जरी संकट येतां ॥ निवारण करावें तुम्हीं सर्वथा । आणि आपुलेकडूनि सहसा व्यथा ॥ जाणूनि त्या पुरुषा करुं नये ॥१४०॥
हें आख्यान राहे जया सदनीं ॥ तेथें बसूं नयें सहसा भूतांनी ॥ जैसें भाद्रपदशुद्ध चतुर्थीदिनीं ॥ चंद्रालागीं न देखती ॥४१॥
कीं अविंघ जेवीं का सूकर ॥ की श्वान मानिती अशुद्ध विप्र ॥ अस्पर्श होतां व्यथा किंचित ॥ होणार नाहीं भूतांची ॥४३॥
यावरी प्रशस्तपणें राहन ॥ जरी त्या सदना आलें विघ्न ॥ तयाचें करावें निवारण ॥ सकळ भूतें मिळोनियां ॥४४॥
आणि तया घरचें मनुष्य व्यर्थ ॥ जरी भेटलें जातां मार्गात ॥ तरी मार्ग सोडूनी निश्चित ॥ दूर मार्ग बैसावें ॥४५॥
हें आख्यान जो पाळिता ॥ त्यासी कदाकाळी न करावी व्यथा ॥ हेंचि द्यावें मज सर्वथा ॥ कृपा धरुनि सर्वांनीं ॥४६॥
ऐसी ऐकूनि मच्छिंद्रउक्ती ॥ आवश्य करुं सकळ म्हणती ॥ त्या सदनातें व्यथा निश्चितीं ॥ आम्ही न करुं महमाही ॥४७॥
ऐसें वदूनि वरदभूत ॥ नमिता झाला मच्छिंद्रनाथ ॥ सर्व नमूनि पुसून त्यातें ॥ स्वस्थानातें चालिलें ॥४८॥
अष्टकोटी पिशाचांसहित ॥ अष्ट विराजे मुख्य दैवत ॥ तेंही नमूनि मच्छिंद्राप्रत ॥ स्वस्थानासी पै गेले ॥४९॥
येरीकडे मच्छिंद्रनाथ सत्वर ॥ पाहता झाला बारामल्हार ॥ तेथीचा विधी करुनि सर्व ॥ कुमारी दैवतां चालिला ॥५०॥
तैसीच पावे कालिका भवानी ॥ ते कथा पावेल मच्छिंद्रालागुनी ॥ ते पुढिले अध्यायीं अवधान देऊनी ॥ कथा श्रोते स्वीकारा ॥५१॥
अहो ह्या कथासारग्रंथास ॥ परिकर पंचम अध्याय घोकिल्यास ॥ पिशाचबाधा तयासी खास ॥ होणार नाही सहसाही ॥५२॥
जरी पहिलां बाधा असेल ॥ तरी तो पठण करितां जाईल ॥ प्रथम अध्याय जो घोकील ॥ त्याचा अंगारोग जाईल कीं ॥५३॥
दुसरा अध्याय घोकिल्यापासून ॥ विद्याभ्यास होईल पूर्ण ॥ तिसरा अध्याय घोकितां प्रसन्न ॥ होईल अंजनीसुत तयांतें ॥५४॥
चवथा अध्याय घोकिता फळ ॥ कार्यं निवटील परम सकळ ॥ मान्याता देईल महापाळ ॥ मौन पडेल सर्वातें ॥५५॥
असो ऐसे पंचम प्रसंग ॥ मंत्रसंजीवनी अनुराग ॥ धुंडीसुत मालूजी सांग ॥ वदे नरहरीकृपेकरुनियां ॥५६॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ पंचमाध्याय गोड हा ॥५७॥
अध्याय ॥५॥ ॥ ओंव्या ॥१५७॥ ॥ श्रीकृष्णार्पंमस्तु ॥ श्रीदत्तात्रेयर्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
॥ नवनाथभक्तिसार पंचमोध्याय समाप्त ॥

श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय ६

श्रीगणेशाय नमः

जयजयाजी क्षीराब्धिवासा ॥ शेषशायी कमळहंसा ॥ नभोदभवशोभा कमळाभासा ॥ सुखविलासा रमेशा ॥१॥

हे करुणानिधे दयावंता ॥ दीनबंधो दीनानाथा ॥ पुढें रसाळ कवित्वकथा ॥ बोलवीं की रसनेसी ॥२॥

मागील अध्यायीं रसाळ कथन ॥ कीं बारामल्हार पवित्र स्थान ॥ तेथें अष्टदैवत पिशाच मिळोन ॥ युद्ध केलें नाथासी ॥३॥

यापरी बारामल्हार करुनि तीर्थ ॥ कुमार दैवत करुनि कोकणस्थानांत ॥ कुडाळ प्रांत आडूळ गांवांत ॥ येऊनियां राहिला ॥४॥

तों ग्रामाबाहेर दुर्गालयीं ॥ महाकाळिका दैवत आहे ॥ तयाचे दर्शना लवलाहें ॥ मच्छिंद्रनाथ पैं गेला ॥५॥

तें काळिकादैवत अति खडतर ॥ मूर्तिमंत नांदे पृथ्वीवर ॥ तें शिवहस्ताचें काळिकाअस्त्र ॥ स्थापन केलें महीसी ॥६॥

त्या अस्त्रेंकरुनि दैत्य वधिले ॥ म्हणोनि शिवचित्त प्रसन्न झाले ॥ म्हणूनि काळिकादेवी वहिलें ॥ वरदान घेई कां ॥७॥

वेधक कामना असेल चित्तीं ॥ तें वरप्रदान मागें भगवती ॥ येरी म्हणे अपर्णापती ॥ मम कामना ऐकिजे ॥८॥

तव हस्तीं मी बहुत दिवस ॥ बैसलें अस्त्रसंभारास ॥ आणि जेथें धाडिलें त्या कार्यास ॥ सिद्ध करुनि आलें मी ॥९॥

बहुत वृक्षांतें भंगितां क्षितीं ॥ मी श्रम पावलें अंबिकाहस्ती ॥ परी मातें विश्रांती ॥ सुखवासा भोगू दे ॥१०॥

मग अवश्य म्हणूनि उमारमण ॥ तेथें केलें तियेचें स्थापन ॥ तें उग्र दैवत अति म्हणोन ॥ अद्यापि आहे कलीमाजीं ॥११॥

त्या काळिकादर्शनासाठीं ॥ चित्त व्यग्र होवोनि पोटीं ॥ मार्ग लक्षूनि तयासाठीं ॥ संचार करिता जाहला ॥१२॥

देवीप्रती करुनि नमन ॥ म्हणे माय वो आश्वर्यपण ॥ म्यां मंत्रकाव्य केलें निपुण ॥ त्याजला साह्य होई तूं ॥१३॥

तरी माझें हस्तें विराजून ॥ मम कवित्वविद्या गौरवून ॥ तया ओपूनि वरदान ॥ कार्या उदित होई कां ॥१४॥

ऐसें मच्छिंद्र बोलतां वाणी ॥ क्षोभ चढला अंतःकरणीं ॥ शिवहस्तें अस्त्रालागोनि ॥ पूर्णाश्रम झालासे ॥१५॥

त्यात मच्छिंद्राचें बोलणें ॥ त्या काळिकादेवीनें ऐकून ॥ तेणें क्षोभलें अंतःकरण ॥ प्रळयासमान जेवीं ॥१६॥

जैसा मुचकंद श्रमोनि निद्रिस्त ॥ तैं काळयवन गेला तेथ ॥ निद्रा बिघडतां क्रोधानळांत ॥ प्रसर झाला त्या समयीं ॥१७॥

कीं प्रल्हाद पडतां परम संकटीं ॥ विष्णुहदयीं क्रोध दाटी ॥ प्रगट झाला कोरडे काष्ठी ॥ राक्षसालागीं निवटावया ॥१८॥

तैसी काळिकाहदयसरिता ॥ उचंबळली क्रोधभरिता ॥ मच्छिंद्रालागीं महीसिंधुअर्था ॥ मेळवूं पाहे लगबगें ॥१९॥

कीं क्रोध नोहे वडवानळ ॥ मच्छिंद्र अब्धी अपारजळ ॥ प्राशूं पाहे उतावळ ॥ अर्थसमय जाणूनियां ॥२०॥

म्हणे नष्टा अनिष्टा पतिता ॥ मी भवपाणी श्रमलें असतां ॥ त्यांतचि मातें दुःखवार्ता ॥ शिणवूं पाहसी पुढारा ॥२१॥

तुवां कवित्वविद्या निर्मून ॥ मातें मागसी वरप्रदान ॥ परी वर नोहे मजला विघ्न ॥ करुं आलासी दुर्बुद्धे ॥२२॥

अरे मी आपला भोग सारुन ॥ निवांत बैसलें सेवीत स्थान ॥ तैं तूं मातें वरा गोंवून ॥ शिणवूं पाहसी दुगत्मया ॥२३॥

तरी आतां मम लोचनीं ॥ उभा न राहें जाय फिरोनि ॥ नातरी आगळीक होतां करणी ॥ शासनकाळ लाभसील ॥२४॥

मी शिवकरीचे अस्त्र ॥ तव करीं राहीन काय विचित्र ॥ कीं करीं कवळूनि नरोटीपात्र ॥ भिक्षा मागे श्रीमंत ॥२५॥

किंवा पितळधातूची मुद्रिका रचिली ॥ ते हिराहिरकणी वेढका घडली ॥ तेवी तूतें कामना स्फुरली ॥ सर सर माघारा ॥२६॥

कीं वायसाचे धवळारी ॥ हंसबाळ करी चाकरी ॥ तन्न्यायें दुराचारी ॥ इच्छूं पाहे मम काष्ठा ॥२७॥

राव रंकाचे पंक्ती आला ॥ आला परी श्रेष्ठता त्याला ॥ कीं सिंधूचि कूपस्थानीं ठेला ॥ नांदत कीं आवडीनें ॥२८॥

की दीपतेजाते पाहूनि वास ॥ दीपतेजातें करी आस ॥ तन्न्यायें शक्तिअस्त्रास ॥ तंव करीं वसती प्रारब्धें ॥२९॥

आला विचारिता पांडित्यपण ॥ तो अजारक्षका पुसेल कोठून ॥ तन्न्यायें मूर्खा जाण ॥ आलासी येथें दुरात्मया ॥३०॥

अहा प्रतापी विनतासुत ॥ क्षीणचिलीट होऊनि मस्त ॥ तयासीं समता करुं पाहत ॥ तेवीं येथें आलासी ॥३१॥

अरे मी देव रुद्रकरी असतां ॥ तंव करीं वसूं हें काय भूता ॥ तूतें कांही शंका बोलतां ॥ वाटली नाहीं दुरात्मया ॥३२॥

तरी असो आतां कैसें ॥ येथोनि जाई लपवी मुखास ॥ नातरी जीवित्वा पावसी नाश ॥ पतंग दीपासम जेवीं ॥३३॥

याउपरी मच्छिंद्र म्हणे देवी ॥ पतंग जळे दीपासवीं ॥ परी तैसें नोहे माझे ठायीं ॥ प्रताप पाहीं तरी आतां ॥३४॥

अगे मित्राबिंब तें असे लहान ॥ परी प्रतापतेजें भरे त्रिभुवन ॥ तेवीं तूतें दाखवून ॥ वश्य करीन ये समयीं ॥३५॥

अगे प्रताप जेवीं पंडुसुतांनी ॥ वायुसुतातें श्वेती दावुनी ॥ अक्षयी ध्वजीं बैसवोनी ॥ किर्ति केली महीवरी ॥३६॥

की अरुण मित्रापुढी जोड ॥ तेवीं तूतें दावीन चाड ॥ तरी दत्तपुत्र मी कोड ॥ जगीं मिरवीन ये वेळे ॥३७॥

देवी म्हणे भ्रष्टा परियेसी ॥ कान फाडुनि तूं आलासी ॥ इतुक्यानें भयातें मज दाविसी ॥ परी मी न भीं सर्वथा ॥३८॥

हातीं घेऊनि करकंकण ॥ शेंदूर आलासी भाळीं चर्चुन ॥ परी मी न भिईं इतुक्यानें ॥ सर सर परता हे भ्रष्टा ॥३९॥

अरे तुझी उत्पत्ती मज ठाऊक ॥ कीं धीवर जाण तुझा जनक ॥ तरी तूं मत्स्य मीन धरुनि कौतुकें ॥ निर्वाह करी बा उदराचा ॥४०॥

तरी तुज अस्त्रविद्या निपुण ॥ कायसा व्हावी दारिद्रयाकारण ॥ कीं अंधाचें जन्मचक्षुलावण्य ॥ सर्वथा उपयोगी दिसेना ॥४१॥

कीं बहुरुपी मिरवी शूरपण ॥ तरी तें खेळापुरतें निपुण ॥ तें द्वंद्वजाळ सांभाळ सांभाळून ॥ वेव्हार आव्हानी आपुला ॥४२॥

अरे मातें दाविसी उग्र रुप ॥ दांभिका ठका महाप्रताप ॥ अहंकृती मनाचें पाप ॥ मनामाजी मिरवी कां ॥४३॥

तूतें वाटेल मी महाथोर ॥ कीं वश्य केलीं भूतें समग्र ॥ तैसा नोहे हा व्यवहार ॥ शिवास्त्र मी असें ॥४४॥

उगवली दृष्टी करीन वांकुडी ॥ पाडीन ब्रह्मांडांच्या उतरंडी ॥ तेथें मशका तव प्रौढी ॥ किमर्थ व्यर्थ मिरवावी ॥४५॥

अगा मशक धडका हाणी बळें ॥ तरी कां पडेल मंदराचळ ॥ तेवीं तूं मातें घुंगरडें केवळ ॥ निजदृष्टीं आव्हानिसी ॥४६॥

मच्छिंद्र म्हणे देवी ऐक ॥ बळीनें वामन मानिला मशक ॥ परी परिणामीं पाताळलोक ॥ निजदृष्टीं दाविला ॥४७॥

ऐसें ऐकतां भद्रकाळी ॥ चित्तव्यवधान पडिलें क्रोधानळीं ॥ मग प्रतापशिखाज्वाळामाळी ॥ कवळूं पाहे मच्छिंद्रा ॥४८॥

मग परम क्रोधें त्यासी बोलत ॥ म्हणे कवण प्रताप आहे तूतें ॥ तो मज दावीं मशाक येथें ॥ वामनकृत्यें बळी जेवीं ॥४९॥

मच्छिंद्र म्हणे बहु युद्धासी ॥ मिरवलीस शिवकार्यासी ॥ तें मज दावीं अहर्निशीं ॥ परीक्षा घेईन मी तुझी ॥५०॥

अगा तरु वाढला गगनचुंबित ॥ परी वातशस्त्रें उचंबळत ॥ तेवीं तूतें तोचि पंथ ॥ आज दृष्टी पडेल कीं ॥५१॥

अगे बहु जिंकिलें समरंगणीं ॥ अभिमाननग वाढविला त्यांनी ॥ परी प्रारब्धयोगेंकरुनी ॥ छिन्नभिन्न होईल तो ॥५२॥

ऐसें ऐकतां भद्रकाळी ॥ देती झाली सिंहा आरोळी ॥ प्रगट होतां अंतराळी ॥ ब्रह्मांड तेथें उजळले ॥५३॥

शब्द करी अति अचाट ॥ कीं सहस्त्र विजूंचा कडकडाट ॥ कीं अनंत अर्कउदयांत ॥ महीलागीं मिरवला ॥५४॥

तें भद्रकाळी अस्त्र पूर्ण ॥ येरी अस्त्र नोहे तें समयप्रदान ॥ कीं देवदानवांचें मरण ॥ महीलागीं मिरवतसे ॥५५॥

तें अस्त्र नोहे बोलतां वाणी ॥ कीं मायाप्रळयींचा उदित अग्नि ॥ सकळां शांतवूनि शून्यवदनीं ॥ भक्षूनि राहे पंचभूतां ॥५६॥

ऐसी ते सकळ पूर्ण ॥ कीं वासवशक्तीची भगिनी दारुण ॥ पाहती झाली उर्ध्वगमन ॥ तेजःपूज मिरवूनी ॥५७॥

जंव शब्द करितां अति अचाट ॥ खचूनि पडती गिरिकपाट ॥ वनचर पळतां न मिळे वाट ॥ ठायीं ठायां दडताती ॥५८॥

अष्ट दिग्गज अष्ट दिक्पाळ ॥ परम हडबडले शब्द तुंबळ ॥ अति थडथडाट कांपे केवळ ॥ महीलागीं मिरवतसे ॥५९॥

हेलावलें समुद्रजळ ॥ हालावले सप्तपाताळ ॥ मही म्हणे मी रसातळ ॥ पाहीनसे वाटतें ॥६०॥

उरगनाथ सहस्त्रफणी ॥ तोही उचली स्वमूर्धनी ॥ वाहूं पाहे सकळा अवनी ॥ रसातळ भोगातें ॥६१॥

ऐकूनि सबळ गडगडाट ॥ वराह दत सांबरी नेटें ॥ कूर्म पृष्ठी आपुली हाटे ॥ महीलागीं देतसे ॥६२॥

ऐसें दाही दिशा झालें ॥ मानव दानव सर्व गळाले ॥ विकारा करुनि प्रगट वहिले ॥ महीलागीं मिरवतसे ॥६३॥

सकळ झालिया हडबडाट ॥ देव दचकले स्वर्गपीठ ॥ सोडोनि राहोनि विमाना पेठ ॥ अंतराळीं मिरवती ॥६४॥

अंतराळीं कडकडाट ॥ करितां बोले मच्छिंद्रा नेट ॥ म्हणे घाला येतसे अचाट ॥ जीवित्व रक्षी जोगड्या ॥६५॥

तुवां व्यर्थ केली रळी ॥ आतां महीची होईल रांगोळी ॥ तरी तूं स्वगुरु येणें काळीं ॥ स्मरणातें मिरवीं कां ॥६६॥

अगा जैसें वज्राखें करुन ॥ बा नगाचे होत चूर्ण ॥ तन्न्यायें तूं महीकारण ॥ क्षीण करिसी जोगड्या ॥६७॥

अरे हा सकळ महीपाट ॥ तो आज कालिका करी सपाट ॥ तरी आतां काय पाहसी वाट ॥ मिरविसी कैसा जोगड्या ॥६८॥

कीं धरा सबळ ती आंदोळली ॥ यावरी तळीं भद्रकाळी ॥ तरी मच्छिंद्रधान्याची पिष्टबळी ॥ आतां मिरवीन जोगड्या ॥६९॥

मच्छिंद्र म्हणे बोलसी वाणी ॥ परी ते वृश्विककंटकाची खाणी ॥ दंश करितां मजलागोनि ॥ त्याला मारीन निश्चयें ॥७०॥

मग भस्मझोळी कुक्षीपुटी ॥ करीं कवळूनि भस्मचिमुटी ॥ मंत्रअस्त्रातें आणोनि पोटीं ॥ वासवशक्ती जपतसे ॥७१॥

मंत्रीं पाठ होतां भस्मचिमुटी ॥ फेकिली तेव्हां गगनपंथीं ॥ तंव ती तत्काळ वासवशक्ती ॥ प्रगट झाली तेजस्वी ॥७२॥

जैसे सहस्त्र अर्क तेजाळ ॥ कीं उदय पावला भडाग्निगोळ ॥ काळिकाविधान तममंडळ ॥ निरसावया जातसे ॥७३॥

काळिका कनककश्यपूजागीं ॥ मानूनि प्रल्हाद मच्छिंद्र जोगी ॥ स्तंभापरी भस्मचिमुटींत वेगीं ॥ नरहरिरुपें प्रगटली ॥७४॥

कीं परम क्रोधी वडवानळ ॥ भद्रकाळी ते समुद्रजळ ॥ प्राशावया उतावेळ ॥ गगनपंथें जातसे ॥७५॥

तें वासवास्त्र अर्क करीचें ॥ भद्रकाळी अस्त्र शिवकरीचें ॥ उमय ते सवार प्रतपनगरीचे ॥ युद्धालागीं मिरवले ॥७६॥

कीं पाहणी पाहतां हरिहर ॥ कीं एक मित्र एक चंद्र ॥ वाचस्पतींचें माहात्म्य अपार ॥ उशना कवि मिरवीतसे ॥७७॥

कीं एक मेरु एक मांदार ॥ कीं वायु आणि वायुकुमार ॥ तेवीं भद्रकाळी वासवास्त्र ॥ गगनामाजी मिरवती ॥७८॥

कीं जेठियांमाजी जरासंघ ॥ तया भिडला भीम प्रसिद्ध ॥ कीं कपीमाजी सुग्रीव द्वंद्व ॥ वालीलागी भिडतसे ॥७९॥

तन्न्यायें उभय शक्ती ॥ युद्धा मिसळल्या गगनपंथीं ॥ लोंबी झोंबी प्राणरहिती ॥ करुं पाहती एकमेकां ॥८०॥

मग तो एकचि दणदणाट ॥ झाला सबळ ब्रह्मांडस्फोट ॥ विमानीं पळविती देवता वाट ॥ चुकारपणीं मिरवतसे ॥८१॥

दोन्ही अस्त्रें बळवंत ॥ एकमेकांतें प्रहार करीत ॥ जेणें प्रहारें भयाभीत ॥ दाही दिशा तैं होती ॥८२॥

परी ती काळी अस्त्रदैवत ॥ तिणें ग्रासिलें वासवशक्तीतें ॥ मग अति क्रूर होऊनि उन्मत्त ॥ मच्छिंद्रावरी चालिली ॥८३॥

तें पाहूनि मच्छिंद्रनाथ ॥ करीं कवळी भस्म चिमुटांत ॥ मग एकादश शस्त्रातें ॥ रुद्रमंत्र प्रयोगीं स्मरतसे ॥८४॥

जेणेंकरुनि एकादश रुद्र ॥ प्रगट झाले महाभद्र ॥ तेजःपुंज नक्षत्रचंद्र ॥ काळिकास्त्र मिरवले ॥८५॥

तें महाप्रळयाकार ॥ भयंकररुपी अनिवार ॥ तें पाहतांचि काळिकास्त्र ॥ मूक्तीलागी प्रवर्तली ॥८६॥

सकळां करुनि नमनानमन ॥ स्तुतीस वाडोनि खणूनि रत्न ॥ परम भक्ती सूक्तीचें कारण ॥ श्रृंगारिलें रुद्रातें ॥८७॥

तें नवरत्नांचा सुगम श्रृंगार ॥ भूषणीं मिरवितां एकादश रुद्र ॥ शांत होऊनि महाभद्र ॥ ऐलरुपी पावले ॥८८॥

तें पाहूनि मच्छिंद्रनाथ ॥ वज्रास्त्र त्वरें प्रेरित ॥ तया साह्य धृमास्त्र ॥ महान्त तेवी मिरवतसे ॥८९॥

तेणेंकरुनि धुमधुमाकार ॥ मावळला मित्र तारा चंद्र ॥ तया संधतिं वज्रास्त्र ॥ निजमस्तकीं भेदीतसे ॥९०॥

परी ती चपळ काळिका देवी ॥ वज्रास्त्र धरिलें तिनें पायीं ॥ आपटिती झाली शैलाद्रिमहीं ॥ उत्तगदिशे कारणें ॥९१॥

तेणें घायें शैलाद्रि पर्वत ॥ निमा चूर झाला नेमस्त ॥ ती साक्ष अद्यापि हिंदुस्थानांत ॥ सह्याद्रि पर्वत नसेचि ॥९२॥

रामेश्वरापासूनि नेमस्त ॥ आणि गुर्जरदेशपर्यंत ॥ महाद्री आहे नांदत ॥ पैल नसे महाराजा ॥९३॥

असो ऐसें वज्रास्त्र सरलें ॥ आणि धूम्रास्त्र तें गिळिलें ॥ तें पाहूनि मच्छिंद्र वहिलें ॥ वाताकर्षण जपतसे ॥९४॥

तें सबळ वाताकर्षण ॥ लाभले होतें मच्छिंद्राकारणें ॥ जें शुक्रमंत्रपदान ॥ संजीवनी लाधली ॥९५॥

कीं वसिष्ठा धेनु झाला लाभ ॥ कीं तें विष्णूचें सुदर्शन मिळालें स्वयंभ ॥ तेवीं देत सूक्तिकागर्भ सूक्तास्त्र मिळालें ॥९६॥

कीं यमालागीं यमन साधलें ॥ कीं दमालागीं दमन लाधलें ॥ तेवीं युक्ती मच्छिंद्र शोभले ॥ देत सूक्तिकारत्न मिरविलें ॥९७॥

कीं वज्रास्त्रें शक्र विराजमान ॥ कीं देवतां लाधलें अमृतपान ॥ तेवीं दत्तानें सूतिकारत्न ॥ मच्छिंद्रातें मिरविलें ॥९८॥

रत्नांत मंत्रावळी ॥ देत कृपेची वरदवाळी ॥ भस्मचिमुटी योजूनि ते काळीं ॥ प्रोक्षितां झाला मच्छिंद्र ॥९९॥

तंव तें मंत्रास्त्र गुप्त काळिका देवीवर वाहात ॥ प्रवेश होताचि वात कुंठित ॥ सकळ देहाचा पै झाला ॥१००॥

तेणें देवी विकळ झाली ॥ पूर्ण ॥ कांहीं पळतां रानोरान ॥ दचका पावती समुच्चयें जन ॥ देव दानव विस्मित ॥३॥

असो ती आवरण अवस्था ॥ महीं निचेष्टीत झाली माता ॥ श्वेत नयनीं विकळ देहस्था ॥ अवस्थेत मिरवली ॥४॥

प्राणरहित होऊं पाहे ॥ मग वेगीं स्मरला उमाराय ॥ ते वाग्भाट धावोनी तरुणोपाय ॥ जाऊनि पोंचले कैलासा ॥५॥

जातांचि श्रवणद्वारीं बोभाट ॥ सावध होय कैलासनाथ ॥ की शिवकरींचें काळिकास्त्र अचाट ॥ संकटातें पडियेलें ॥६॥

तो हदयीं पाहे विचारुन ॥ मच्छिंद्रनाथाचे झाले आगमन ॥ मग नंदिकेश्वरीं सिद्ध होऊन ॥ तया ठायीं पातला ॥७॥

येताचि देखे मच्छिंद्रनाथ ॥ धावूनि लगबगीं अति त्वरित ॥ चरणकमळीं कामनातीत ॥ मूर्धकमळ अर्पीतसे ॥८॥

शिव उतरुनि नंदिकेश्वरीं ॥ भाउकें कवळिला दशमकरी ॥ भेटूनि हदय प्रेमलहरीं ॥ आवळूनि धरितसे ॥९॥

म्हणे तान्हुल्या अति थोर ॥ करुनि दाविला चमत्कार ॥ मजकरींचे काळिकास्त्र ॥ आजि जिंकिलें पराक्रमें ॥११०॥

नाथ म्हणे आदिनाथ ॥ ही त्वत्कृपेची बोधसरिता ॥ बद्रिकाश्रमीं राहूनि दत्ता ॥ श्रुत केलें तुम्ही माते ॥११॥

षण्मास महारजा रक्षूनि मातें ॥ प्रसन्न रवि केला तुम्हीं दत्त ॥ त्या प्रसन्न कुळाचें उदित ॥ मातें ओपिलें कृपेनें ॥१२॥

शिव म्हणे वा अस्तु आतां ॥ सावध करीं काळिकादैवता ॥ नाथ म्हणे वरदहस्ता ॥ मम मौळी स्पर्शावा ॥१३॥

माझें मागणें आहि किंचित ॥ देऊनि स्वामीनीं करावें श्रुत ॥ जैसा संजीवनीचे अर्थ ॥ शुक्र कचा फळला असे ॥१४॥

मग सिद्ध सर्वेश वरदमौळी ॥ म्हणे कोण कामना उचित झाली ॥ तदनुअर्थ ये काळीं ॥ लाभसी तूं वद वत्सा ॥१५॥

नाथ म्हणे पंचावन्ना ॥ कवित्व करविलें सावरी सावरी पवित्रा ॥ त्यातें वर देऊनि वरदपात्रा ॥ काळीकास्त्र मिरवावें ॥१६॥

जैसें तव करीं बहुदिवस ॥ वसूनि अमित केलें कार्यास ॥ तेवीं माझे वक्त्रास ॥ काळिकेनें वसावें ॥१७॥

जें जें कार्य लागे मातें ॥ तदनुकार्य वाहावें सरतें ॥ आणि पुढेंही मंत्रकार्यातें ॥ उपयोग व्हावें जयासी ॥१८॥

ऐसें ये रीतीं वरदान्द ॥ द्याल जरी प्रसन्न होऊन ॥ तरी कामनासमाधान ॥ निजदेही नांदेल ॥१९॥

अवश्य म्हणूनि उमारमण ॥ काळिका त्वत्करीं ओपिन ॥ परी या समयीं जीवित्वदान ॥ काळिकेतें स्वीकारीं ॥१२०॥

यापरी मीही उमानाथ ॥ त्वत्कार्यासी आहें उदित ॥ ऐसें म्हणोनी करतळीं त्वरित ॥ भाष घेतली मच्छिंद्रें ॥२१॥

मग चरणी माथा ठेवूनी ॥ भस्माचिमुटां घेऊनी ॥ वातास्त्रमंत्रआकर्षण जपोनी ॥ बोलतसे वैखरीं ॥२२॥

पूर्णपाठ वैखरीसी होता ॥ भस्मुचिमुटी फेंकी तत्त्वतां ॥ तेणें हदगत होऊनि सर्वथा ॥ काळिकादेवी उठली ॥२३॥

उठूनि बैसली सावध होऊनी ॥ दाही दिशा पाहे न्याहाळूनी ॥ तो अकस्मात शूळपाणी ॥ आपुले दृष्टीं देखिला ॥२४॥

मग लगबगें येऊनी त्वरित ॥ शिवपदीं मौळी सज्ज करीत ॥ म्हणे महाराजा आदिनाथ ॥ आजि जीवित्व त्वां दिधलें ॥२५॥

जैसे होय सर्पसत्रास ॥ तोही मिरविला आस्तिक त्यास ॥ तेवी आज मम प्राणांस ॥ रक्षिता झालासी आदिनाथा ॥२६॥

कीं भस्मासुराच्या पवनवातीं ॥ आपण पडिलां होतां व्यावृत्ती ॥ तेथें रक्षणें विष्णुमूर्ती ॥ कृपापात्रीं मिरविली ॥२७॥

कीं शक्तिधातें सुमित्रासुत ॥ पुढें होतां रघुनाथ ॥ विकट होता हनुमंत ॥ प्रसन्न त्यातें झालासे ॥२८॥

कीं प्रल्हादाच्या कैवारासी ॥ नरहरी धांवला अति उद्देशीं ॥ तन्न्यायें आज तूं मजपाशीं ॥ मिरवलासी कीं कृपेनें ॥२९॥

ऐसें म्हणोनि काळिकादेवी ॥ वारंवार लागे पायी ॥ याउपरी म्हणे दक्षजांवई ॥ मम मागणें आहे एक ॥१३०॥

देशील जरी कृपा करुन ॥ तरी तुज देईन नागरत्न ॥ देवी म्हणें उमारमण ॥ अर्थ कोणता बोलवा ॥३१॥

शिव म्हणे बहु दिवस ॥ मम करीं विराजलीस ॥ आतां येऊनि मच्छिंद्रदास ॥ जगउपकारीं बसावें ॥३२॥

हेंचि मागणें माझें आहे ॥ तुवां कृपा करुनि मज द्यावें ॥ हें वचन ऐकूनि महामाय ॥ गदगदां हांसिन्नलीं ॥३३॥

म्हणे महाराजा पायांपाशीं ॥ मी म्हणवितें तुमची दासी ॥ इतुकें गुह्य धरोनी मानसीं ॥ दान मागतां हें काय ॥३४॥

जिकडे धाडाल तिकडे जाईन ॥ तुमची आज्ञा मज प्रमाण ॥ इतुकें गुह्य धरोन ॥ दान म्हणणें अनुचित हैं ॥३५॥

जैसा वाचस्पती ज्ञानचाड ॥ अजारक्षका पुसे कोड ॥ तन्न्यायें मम प्रयुक्तीं ॥ जल्पतां कीं महाराजा ॥३७॥

कीं पीयूष मृत्युनिवारणास ॥ स्तविता झाला बळीरस ॥ कीं टक्याकरितां महापरिस ॥ विनवीतसे धनाढ्याला ॥३८॥

तन्न्याय अपर्णापती ॥ गौप्य धरुनि करितां विनंती ॥ परी हें श्लाघ्य सेवकाप्रती ॥ कदाकाळीं साजेना ॥३९॥

तरी आतां असो ऐसें ॥ मान्य करीन स्वामिशब्दास ॥ मग बोलावूनि मच्छिंद्रास ॥ जननीं हदयीं कवळिला ॥१४०॥

म्हणे बा रे ऐक वचन ॥ साबरीविद्या कविरत्न ॥ जेथें येईल माझें नाम ॥ तेथें साह्य मी असें ॥४१॥

कवण अर्थी असो कैसें ॥ मी प्रवर्तवूनि उच्चाराम ॥ ऐसें करतल देऊनि भाष्य ॥ समाधानीं मिरवलें ॥४२॥

मच्छिंद्र आणि उमानाथ ॥ देवीनें ठेवूनि तीन रात्र ॥ मग स्नेहसंपन्न बोल बोलत ॥ मच्छिंद्रनाथा ओडविलें ॥४३॥

याउपरी शिवें देदीचा पाणी ॥ मच्छिंद्रनाथाच्या कृपें ओपूनी ॥ अति गौरवें शूलपाणी ॥ स्वस्थानासी जातसे ॥४४॥

मग मच्छिंद्र आणि उमानाथ ॥ देवी बोळवूनि स्वस्थाना येत ॥ शिव पावले कैलासांत ॥ मच्छिंद्रनाथा भेटूनी ॥४५॥

यापरी तेथूनि मच्छिंद्रनाथ ॥ उत्तरपंथें गमन करीत ॥ तो समुद्रतीरीं हरेश्वर दैवत ॥ गदातीर्थी पातला ॥४६॥

गदातीर्थी करुनि स्नान ॥ येत हरेश्वरा दर्शनाकारणें ॥ ते कथा वर्तेले रसाळ पूर्ण ॥ पुढिले अध्यायीं वदूं आतां ॥४७॥

शिवसुत वीरभद्र ॥ महाजेठी प्रतापरुद्र ॥ तयातें भेटतां नाथ मच्छिंद्र ॥ समरंगणीं मिरवती ॥४८॥

असो येऊनि त्या प्रसंगीं आतां ॥ भावें पूजिली काळिका देवता ॥ तरी पठणीं प्रसंग उपयोग बहुतां ॥ मुष्टिनिवारणी पडेल ॥४९॥

पुढें मंत्रपुष्टी दृष्टी ॥ बाधा न करी तीर्थाचिया पाठीं ॥ कुडेचेडजारणा लोटीं ॥ मरणभीती बाधेना ॥१५०॥

हा अध्याय नित्य पठण करील ॥ तो इतुक्या भयापासूनि सुटेल ॥ आणि हा अध्याय गृहीं पाळींल ॥ कधीही पीडा त्यासी न होय ॥५१॥

आणि कोणासही जगा आंताता ॥ काळीमुष्टीची बाधा होतां ॥ त्यांतें प्रसंग श्रवणी पडतां ॥ शम होईल ती मुष्टी ॥५२॥

ऐसें गोरक्षाचें कथन ॥ वदला आहे किमयागिरी ग्रंथाकारण ॥ तरी जन हो विश्वास धरुन ॥ ग्रंथ संग्रही पाळावा ॥५३॥

हा ग्रंथ म्हणाल उगलीच वाणी ॥ तरी नोहे आहें अमृतसंजीवनी ॥ पहा सिद्धाची वाग्वाणी ॥ श्रीगोरक्षें कथियेली ॥५४॥

तरी विश्वास धरुनि चित्ता ॥ प्रचीत घ्यावी पठण करितां ॥ नाहींतरी ग्रंथ उगाचि निंदितां ॥ दोषामाजी पडाल कीं ॥५५॥

याउपरी अर्थाअर्थी ॥ उगेंचि निंदाल ग्रंथाप्रती ॥ तयाचा निर्वश पावूनि क्षितीं ॥ यमपुरीं वसे तो ॥५६॥

तरी श्रोते भाविक जन ॥ तुम्हां सांगतों एकचि वचन ॥ भावविश्वासा करा रोहण ॥ सकळ स्वार्थ पुरेल कीं ॥५७॥

जे विश्वासावर स्वार झाले ॥ ते सर्वस्वी तरुनि गेले ॥ सत्यवचनीं जगीं मिरवले ॥ संतवदनीं विश्वासुक ॥५८॥

तरी जगामाजी धुंडीसुत ॥ मालू नरहरीच्या वंशांत ॥ विश्वासें झाला ब्रह्मीं व्यक्त ॥ संतपदीं भावार्थ ॥५९॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ षष्ठाध्याय गोड हा ॥१६०॥

शुभं भवतु श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

॥ नवनाथभक्तिसार षष्ठाध्याय समाप्त ॥


श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय ७

श्रीगणेशाय नमः

जयजयाजी पंकजाक्षा ॥ कमलापते कमलपत्राक्षा ॥ अवगुणरुपा गुणसर्वेशा ॥ महादक्षा रघुत्तमा ॥१॥

हे कमळमित्रकुळभूषणा ॥ रावणांतका रघुनंदना ॥ पुढें बोलवीं ग्रंथरचना ॥ जेणें श्रोतयां सुख वाटे ॥२॥

मागिले अध्यायीं कथा सुरस ॥ काळिका देवी मच्छिंद्रास ॥ प्रसन्न होऊनि वरदानास ॥ साबरीविद्या आतुली ॥३॥

तेथूनि आला हरेश्वरासी ॥ गदातीर्थस्नानउद्देशीं ॥ स्नान करुनि पर्वतासी ॥ प्रदक्षिणा आरंभिली ॥४॥

सर्वेचि येतां मच्छिंद्रनाथ ॥ तों वीरभद्र पातला स्नाना तेथ ॥ मानववेषी जोगी कृत्य ॥ त्रिशूळ डमरु धनुष्यादि ॥५॥

शैली शिंगी नाद अदभुत ॥ नाद नोहे तो आंगम व्यक्त ॥ साधकहिताचा स्वार्थअर्थ ॥ परिणाम सूचवी ॥६॥

अहो ती शिंगी नोहे देवता ॥ साधकजनांची कामदुहिता ॥ पूर्ण करावया परिणाम अर्था ॥ बोधरवि प्रवेशती ॥७॥

रज तम सत्त्व तृतीय गुण ॥ महामारक अति कठिण ॥ ते त्रिवर्ग करिती खडतरपण ॥ ऐक्य केला त्रिशूळ तो ॥८॥

यापरी आगमनिगमबीजें ॥ सारव्यक्त तेजापुंजें ॥ तयाची पंथिका दावी करांबुजे ॥ विशाळ डमरु विराजला ॥९॥

सगुणकथा सप्तधातु ॥ गुणीं भरला गुणातीतु ॥ नवरंगरसांत झाला व्यक्तु ॥ हरिगुणींचि भक्तु होईना कां ॥१०॥

कामक्रोधषडगुणविकार ॥ सत्त्वस्थाचे शत्र अनिवार ॥ तयां जिंकितां विवेक फार ॥ शरगांडीव विराजलें ॥११॥

अहो शर नोहे ते जाण युक्ती ॥ कामक्रोधांतें देत मुक्ती ॥ गांडीव नोहे तें विषयभक्ती ॥ ज्ञानशरीं विराजलें ॥१२॥

अगा शर न म्हणूं ते ज्ञानदिवटी ॥ अज्ञानतमींचें मनीं वीरभद्र येतसे स्नानालागून ॥ तों मार्गी मच्छिंद्रातें पाहून ॥ उभा केला हटकोनी ॥१५॥

करुनि उभे नमनानमन ॥ म्हणे स्वामी तुम्ही कोण ॥ येरु म्हणे मच्छिंद्र अभिघान ॥ निजदेहा मिरवीतसे ॥१६॥

येरु म्हणे कवण पंथीं ॥ अभ्यास मिरवितसां जगाप्रती ॥ मच्छिंद्र म्हणे जोगीये नीती ॥ नाथपंथीं मिरवीतों ॥१७॥

येरु म्हणे कोण दर्शन ॥ मच्छिंद्र म्हणे जोगीमहिमान ॥ शैली कंथा मुद्रा भूषण ॥ निजाअंगीं मिरवीतसें ॥१८॥

वीरभद्र म्हणे मुद्रा सान ॥ न घालितां फाडिले कान ॥ येरु म्हणे गुरुप्रसादें करुन ॥ मंथनीं निर्मिला हा एक ॥१९॥

वीरभद्र म्हणे काय पाखंड ॥ व्यर्थचि उगलें वाढवूनि बंड ॥ जगामाजी मिरवितां काळें तोड ॥ योग्यायोग्य दिसेना ॥२०॥

तरी आंता योगद्रुमा ॥ मुद्रा सोडीं ह्या नसती उत्तमा ॥ नाहीं तरी शिक्षा पावसी नेमा ॥ ठाई ठाई महाराजा ॥२१॥

अगा तव गुरु ऐसा कोण ॥ वेदविधिच्या प्राज्ञेंकरुन ॥ पूर्ण आगळीक पंथ निर्मून ॥ जगामाजी मिरवितो ॥२२॥

अगा स्वबुद्धी तर्क करुन ॥ भलतेंचि मत करी स्थापन ॥ तो प्राज्ञिक नव्हे मुर्खाहून ॥ शतमूर्ख म्हणावा ॥२३॥

ऐसी ऐकतां भद्रगोष्टी ॥ मच्छिंद्र संतप्त झाला पोटीं ॥ म्हणे मशका खाटी ॥ वल्गना करिसी अपार ॥२४॥

अरे शतमुर्खाहूनि मूर्ख ॥ म्हणूनि बोलसी दुःखदायक ॥ परमात्मा क्षोमवूनि पातक ॥ भार वाहिला निजमौळी ॥२५॥

अरे आत्मा क्षोभतां पराचा ॥ पापभार होत ब्रह्मांडींचा ॥ तस्मात् तव गुरु कैंचा ॥ दुजा गुरु विलोकीं ॥२६॥

अरे नष्टा दुर्जन अधमा ॥ तव दर्शने स्नान करणें आम्हां ॥ आतां उगाचि जाय आपुल्या कामा ॥ शिक्षा पावसील मम हस्ते ॥२७॥

ऐशापरी मच्छिंद्रनाथाचें भाषण ॥ ऐकतां वीरभद्राचें क्षोभलें मन ॥ म्हणे भ्रष्टा तुझा प्राण ॥ आतांचि घेईन ये काळीं ॥२८॥

मग करीं कवळूनि सायकासन ॥ सत्वर रगडूनि लाविला गुण ॥ निर्वाण अर्धचंद्र बाण ॥ तूणीरांतूनि काढिला ॥२९॥

तें पाहूनिं मच्छिंद्रनाथ ॥ म्हणे पतित झालासी उन्मत्त ॥ अरे उद्धटा आपुलें अहित ॥ जनांमाजी मिरविसी ॥३०॥

अरे सायकासन सिद्ध करुन ॥ सोंग दाविसी मजलागून ॥ परी हें बरवें नोहे मरण ॥ ये काळीं पावसी ॥३१॥

अरे ऐसें सोंग मजकारण ॥ कित्येक झाल अवलोकून ॥ बहुरुप्याचें खडतरपण ॥ शूरत्व रणीं मिरवेना ॥३२॥

कीं अजाकंठींचे लंबस्तन ॥ परी नातुडे त्यांत दुग्धपान ॥ तेवीं तूं दाखविसी हावभाव करुन ॥ परी क्षणैक क्षीण होसील कीं ॥३३॥

वीरभद्र म्हणे मूर्खा एक ॥ तूतें दावीन यमलोक ॥ तव आयुष्य सरलें सकळिक ॥ म्हणूनि येथें आलासी ॥३४॥

तरी मी तूतें काळक्षय ॥ प्रगट झालों आहें प्रत्यक्ष ॥ तरी तव गुरु प्रतापदक्ष ॥ कैसा आहे पाहूं दे ॥३५॥

मच्छिंद्र म्हणे मशकासाठी ॥ मेरु मिळवील काय नगांची कोटी ॥ कीं महाक्षीराब्धी घेऊनि नरोटीं ॥ भीक मागेल पोटातें ॥३६॥

मूर्खा ऐक वचनार्थ ॥ मम गुरुचा मौळीं वरद हस्त ॥ तेणें होतसे शरणागत ॥ मानव दानव देवादि ॥३७॥

तेथें अर्मका तुझा पाड ॥ किमर्थ आधीं मिरविसी कोड ॥ महासविता तप्त उजेड ॥ खद्योतातें मिरवेना ॥३८॥

वीरभद्र म्हणे तूं काय करिशी मरणकाळीं फांटा फुटला तुजसा ॥ आतां क्षणोंचि भूमीपाशीं ॥ करीन नव्हतासि ऐसें ॥३९॥

अरे तव ग्रीवेतें काळपाश ॥ आधींच पावलें आयुष्य नाश ॥ म्हणूनि मूर्खा तूतें हौस ॥ ये वादा स्फुरलासी ॥४०॥

ऐसें म्हणूनि वीरभद्रानें ॥ गुणीं सज्जिलें अस्त्रविंदान ॥ म्हणे भ्रष्टा सावधान ॥ राममंत्र जल्पीं कां ॥४१॥

मच्छिंद्र म्हणे राममंत्र ॥ तूतें वाटला अपवित्र ॥ परी तेणोंचि सुखी पंचवक्र ॥ दुःखलेशी मुकलासे ॥४२॥

अरे राममंत्रें वाल्या तरला ॥ तें नाम तारील आतांचि मजला ॥ परी सावध तूं होई कां वहिला ॥ राममंत्रावेगळा ॥४३॥

ऐसें म्हणूनि कक्षे झोळी ॥ विलोकूनि भस्म करीं कवळी ॥ मग शस्त्रास्त्रीं तेणें काळीं ॥ वज्रस्थापना जल्पतसे ॥४४॥

पूर्ण प्रयोग घालूनि धाटीं ॥ भोंवती फिरवी भस्मचिमुटी ॥ तेणें करुनि वज्रदाटी ॥ दाही दिशा मिरवीतसे ॥४५॥

आणीक करीं कवळूनि भस्म ॥ यासी विलोकी योगद्रुम ॥ तों वीरभद्रें सायकें परम ॥ निर्वाण बाण सोडिला ॥४६॥

तो बाण येतां किंकाटत ॥ दृष्टीं पाहे मच्छिंद्रनाथ ॥ मग आपुले मानी मनांत ॥ बाण आहे तृणासम ॥४७॥

ऐसें म्हणूनि स्तब्धदृष्टी ॥ उभा करीं कवळूनि भस्मचिमुटी ॥ तवं तो बाण नभापोटीं ॥ संचरुनि उतरतसे ॥४८॥

मच्छिंद्रनाथातें लक्षून ॥ खालीं उतरतसे घ्यावया प्राण ॥ तों सबळ बळें वज्र येऊन ॥ प्रहार करितें पैं झाले ॥४९॥

तरी तें वज्र वरिष्ठ ॥ आदळतांचि बाण झाला पिष्ट ॥ तें पाहूनि वीरभद्र वरिष्ठ ॥ परम चित्तीं क्षोभला ॥५०॥

मग शक्तिअस्त्र देदीप्यमान ॥ योजिता झाला रुद्रनंदन ॥ सज्ज करुनि सायकसंधान ॥ साधूनियां प्रेरिलें ॥५१॥

सर्वेचि काढूनि दुसरा बाण ॥ नागास्त्र तयावरी स्थापून ॥ तोही चुंबीत पावला गगन ॥ पाठोपाठ शक्तींच्या ॥५२॥

परी ती शक्ती बलाढ्य बहुत ॥ स्वर्गी मिरवे शब्द करीत ॥ ऐकतां शब्द भयभीत ॥ सकळ मही झाली असे ॥५३॥

दिग्गज पळती रानोरान ॥ शेष न ठेवी आपुली मान ॥ वराह पाहूनि अति निर्वाण ॥ दंतानें मही सरसावी ॥५४॥

कूर्म करीतसे सबळ पृष्ठी ॥ पाहूं पातले देव विमानदाटीं ॥ तेही पाहूनि कपाटपोटीं ॥ संचरुनि पळताता ॥५५॥

देवविमानीं हडबड ॥ पाहूनि उडुगण पळती पाड ॥ सोडूनि आपुले कार्य उघड ॥ नभामाजी सरळले ॥५६॥

देव मानव यक्ष दैत्य ॥ म्हणती पावला प्रळयमृत्यु ॥ ही शक्ति नोहे प्रळय समस्त ॥ मही बुडवील वाटतसे ॥५७॥

सबळ बळिष्ठ ती मही कांपत ॥ तेणें नगकडयांची खांचणी होत ॥ मायलेक चुकुनि निश्वित ॥ रुदन करिती हंबरडे ॥५८॥

सहस्त्र विजूंचा कडकडाट ॥ दावूनि शब्द अनिवारलोट ॥ नभमंडळ पाहूनि नीट ॥ शक्ती भेदिली वज्रातें ॥५९॥

तेणें वज्र अति क्षीण ॥ होऊनि पडलें गगनाहून ॥ पुढें मच्छिंद्राचा लक्षूनि प्राण ॥ हरावया येतसे ॥६०॥

यावरी नागास्त्र निःशक्त ॥ तें पाहूनि मच्छिंद्रनाथ ॥ त्वरें कवळूनि भस्म चिमुटींत ॥ रुद्रास्त्र प्रेरीतसे ॥६१॥

त्यासवोंचि योजूनि खगेद्र अस्त्रांत ॥ पाठोपाठीं प्रेरीत ॥ परी रुद्रास्त्र झालें व्यक्त ॥ रुद्र एकादश प्रतापी ॥६२॥

एकादशरुद्रचूडामणी ॥ शक्तीतें तल्लीन करी कवळूनी ॥ तेणें हस्त पाद मूर्धनी ॥ क्षीण हाऊनि पडियेली ॥६३॥

शक्ती पडतां खचूनि महीं ॥ रुद्र मिरवले अदृश्य देहीं ॥ येरीकडे खगेंद्र अही ॥ अस्त्रा अस्त्र भक्षीतसे ॥६४॥

तेणें नागास्त्र त्वरित ॥ अदृश्य झालें युद्धरहित ॥ यावरी अस्त्र विनतासुत ॥ तेंही झालें अदृश्य ॥६५॥

यावरी वीरभद्र प्रतापतरणी ॥ वातास्त्र प्रेरिता झाला गगनीं ॥ तें मच्छिंद्रनाथ विलोकुनी ॥ पर्वतास्त्र सोडितसे ॥६६॥

तेणें कोंडिला अवघा वात ॥ मग वज्रास्त्र प्रेरी महारुद्रसुत ॥ तेणेंकरुनि चूर्ण पर्वत ॥ अदृश्यपणीं मिरवला ॥६७॥

यापरी प्रतापी वीरभद्र त्वरित ॥ प्रेरिता झाला अग्न्यस्त्र ॥ ते पाहूनि मच्छिंद्रनाथ ॥ जलदास्त्र प्रेरीतसे ॥६८॥

त्यानें सकळ अग्नि विझवून ॥ करितें झालें अदृश्य गमन ॥ यावरी वीरभद्रें कामास्त्र सोडून ॥ कामव्यथा योजीतसे ॥६९॥

त्यावरी विरक्तनाथ मच्छिंद्र ॥ प्रेरिता झाला रत्यस्त्र ॥ तेणेंकरुनि काम पळत ॥ सुख पावला रतिसंगें ॥७०॥

यावरी वीरभद्र दक्ष ॥ प्रेरिता झाला महोरगास्त्र ॥ तें पाहूनि मच्छिंद्रनाथ ॥ संजिवनी प्रेरितसे ॥७१॥

वीरभद्र तो वैश्वानर ॥ प्रेरिता झाला दानवास्त्र ॥ मच्छिंद्रनाथ अति तत्पर ॥ देवास्त्र प्रेरितसे ॥७२॥

मग अस्त्र तें बळवंत ॥ देव दानव प्रगटले अमित ॥ ते पाहूनियां उभयतांतें ॥ स्वग्रीवा तुकविती ॥७३॥

परस्परें धन्य धन्य ॥ वदोनि हदयीं करिती मान ॥ गदगदोनि हास्यवचन ॥ एकमेका बोलती ॥७४॥

वीरभद्र म्हणे सकळे महीं ॥ वीर जिंकिले भद्रयुद्धें प्रवाही ॥ परी सच्छिंद्रा तुजसमान ये देहीं ॥ देखिला नाहीं कोणीच ॥७५॥

मच्छिंद्र म्हणे वरदहस्त ॥ पुढें पहा भद्रजात ॥ येरी म्हणे अविनाशवंत ॥ गुरु आहे माझा कीं ॥७६॥

वीरभद्र तुकावूनि मान ॥ म्हणे गुरु तुझा आहे प्राज्ञ ॥ आणि तूंहि त्यांत अससी धन्य ॥ प्राज्ञीकवंत सद्यशा ॥७७॥

ऐसें देवास्त्र युक्तप्रयुक्त ॥ दानव वरुनि सकळ शांत ॥ अदृश्यपणीं स्वस्थानांत जाऊनियां पोचलें ॥७८॥

यावरी वीरभद्र ब्रह्मास्त्र ॥ प्रेंरिता झाला अति पवित्र ॥ तें पाहूनियां वरदपात्र ॥ विध्यस्त्र प्रेरितसे ॥७९॥

तें प्रगटतां चतुभुंजमूर्ती ॥ विधी लागे चरणाप्रती ॥ यावरी कार्तिकास्त्र भद्रजातीं ॥ सोडिता झाला तत्क्षणीं ॥८०॥

तें पाहूनियां दत्तवरदपाणी ॥ स्त्रीअस्त्र सोडित गगनीं ॥ तें बोलतां लावण्यखाणीं ॥ स्वामीलागी विहिताती ॥८१॥

तणेंकरुनि कार्तिकास्त्र ॥ तत्क्षणीं पावलें शांत ॥ यावरी भद्र तो काळास्त्र ॥ प्रेरिता झाला तत्क्षणीं ॥८२॥

तें पाहुनि मच्छिंद्रनाथ ॥ मायाप्रळयी प्रेरिलें अस्त्र ॥ तेणें काळ भक्षूनि पवित्र ॥ पंचतवकवळीतसे ॥८३॥

तें पाहूनि सकळ देव ॥ करितें झालें मच्छिंद्रस्तव ॥ म्हणती महाराजा युगभाव ॥ सकळ नाश पावेल कीं ॥८४॥

म्हणती महाराजा कलिभाग ॥ पुढे आहे अनंतयुग ॥ तों आजि तुम्ही सकळ याग ॥ विनाशरुपी पाहतां कीं ॥८५॥

तरी आतां कृपा करुन ॥ मायाप्रळय घ्या आवरुन ॥ मग देववाणी श्रवणीं ऐकून ॥ वासनीक अस्त्र प्रेरितसे ॥८६॥

तेणें मायाप्रळय हरला ॥ मायाउत्पत्तिप्रयोग राहिला ॥ मग सकळ विमानें उतरुनि महीला ॥ देव नमिति मच्छिंद्रा ॥८७॥

ब्रह्मा विष्णु आणि रुद्र ॥ स्तवनें केला शांत मच्छिंद्र ॥ मग संनिध बोलावूनि वीरभद्र ॥ करीं कर ओपिती ॥८८॥

म्हणती कविनारायण मच्छिंद्राथ ॥ तरी आपण होऊन ॥ कीं मच्छिंद्राची कामना कोण ॥ ती मीच पूर्ण करीन ॥ वरदचित्तेंकरुनिया ॥९०॥

धन्य आहे मच्छिंद्रनाथ ॥ युद्धीं कुशल प्रतापवंत ॥ धन्य श्रीगुरु मिळाला त्यातें ॥ प्रतापवंत आगळा तो ॥९१॥

मजसमान युद्धनेमीं ॥ पातलों यासी युद्धभूमीं ॥ परी न देखों युद्धसंगमीं ॥ मच्छिंद्रासमान पुरुषार्थ ॥९२॥

म्यां पूर्वी रावण बळी भांडोन ॥ सुखें देवीवर रणीं आणूनि ॥ किन्नर गंधर्व थकित जाण ॥ नाहीं पुढें ठेले मम युद्धीं ॥९३॥

कल्पांतभैरव मातें नाम ॥ देते झालें सुरासुर उत्तम ॥ माझें जिंकावया युद्धकर्म ॥ मिळाला नाहीं कोणीच ॥९४॥

परी आजी खातरी कृत्याकृत्य ॥ केली असे मच्छिंद्रनाथें ॥ मग करी कवळूनि हदयाते ॥ धरिता झाला सप्रेम ॥९५॥

म्हणे महाराजा योगद्रुमा ॥ वेधक कामना असेल तुम्ही ॥ तरी ती सांगूनि रुदीत्तमा ॥ वरदसुखा पहुडवीं ॥९६॥

येरु म्हणे बा महाराजा ॥ एक अर्थ तूं करुनि माझा ॥ परी त्यातें फळ देऊनिया जा ॥ लोकोपकारीं मिरवावें ॥९७॥

जैसे एक वायूचे आधीन यथार्थ ॥ वर्षाकाळीं मेघ वर्षे जलातें ॥ तेणें तुष्ट होय क्षितींत ॥ चराचर अवघेंही ॥९८॥

तन्न्यायें कामना चित्तीं ॥ विकार सांडी वरली मती ॥ तरी कार्यगंधाच्या बैसोनि अर्थी ॥ लोकोपकारीं मिरवावें ॥९९॥

तरी तो अर्थ म्हणाल कोण ॥ महाराजा करा श्रवण ॥ म्यां कामनी वरिला विद्याकाम ॥ साबरीविद्या महाराजा ॥१००॥

तरी त्या मंत्रबोलासमान ॥ आपण वहिवाटा ये देहीं धर्म ॥ त्वरें जाऊनि जगाचा काम ॥ मंत्रापाठीं पुरवावा ॥१॥

एवं वर ओपूनि मातें ॥ लोट लोटवा कृपासरिते ॥ मग अवश्य म्हणे मच्छिंद्रातें ॥ कार्य सहसा करीन मी ॥२॥

ऐसें बोलूनि वरदयुक्ती ॥ करतळा देत प्रसन्नचित्तीं ॥ यापरी सकळ देव बोलती ॥ प्रसन्न होऊनि तयातें ॥३॥

म्हणती वीरभद्रें दिधला वर ॥ तया साह्य असों आम्ही समग्र ॥ मंत्रपोटीं कार्य थोर ॥ आम्ही करुं सहसाही ॥४॥

ऐसें बोलूनि वरदयुक्ती ॥ मग मच्छिंद्र म्हणे नमस्कार सर्वाप्रती ॥ रुद्र ब्रह्मा चक्रवर्ती ॥ भावेकरुनि नमियेला ॥५॥

विष्णुपदीं ओपितां मौळी ॥ तोही त्याते कृपें न्याहाळी ॥ परम प्रेमें हदयकमळीं ॥ धरिता झाला स्नेहाळ तो ॥६॥

म्हणे वत्सा पूर्णकोटी ॥ जेथें पडतां जीव संकटीं ॥ माझें स्मरण करितां ओंठीं ॥ दृश्य होईना त्या ठाया ॥७॥

दृश्य होतां संकटराशी ॥ निवारीन मी निश्वयेंसी ॥ मग चक्रअस्त्र देऊनि त्यासी ॥ तुष्ट मानसीं केला तो ॥८॥

यापरी नंदीश उमानाथ ॥ तोही प्रसन्न होऊनि त्यातें ॥ प्रेमें कवळूनि हदयातें ॥ त्रिशूळास्त्र ओपितसे ॥९॥

यापरी नाभितनया नमितां ॥ तोही वदे प्रसन्नचित्ता ॥ शापादपि सविता ॥ संजोगिलें तयासी ॥११०॥

जें वाणीनें निघे अक्षर ॥ तें होय साचोकार ॥ शुभाशुभ कर्मावर ॥ फळें पावती गोमटीं ॥११॥

ऐसें वदूनि विधिराज ॥ तुष्ट केला तपोभुज ॥ यापरी शक्र नमी ओज ॥ तोही वर आपीतसे ॥१२॥

मग वज्रास्त्र कां पूर्ण ॥ त्यातें दिधलें कृपा करुन ॥ मग अस्त्रमंत्र सांगून ॥ वज्रहस्त ओपिला ॥१३॥

यावरी नमितां देव कुबेर ॥ तोही होऊनियां उदार ॥ सिद्धि देऊनि समग्र ॥ दासी केल्या तयाच्या ॥१४॥

यावरी वरुण भावें नमितां ॥ तोंही प्रसन्न होऊनि चित्ता ॥ आपास्त्रमंत्रभोक्ता ॥ केला असे त्वरेनें ॥१५॥

त्या मंत्राचा होतां पाठ ॥ आपोआप धरेत नीर उठे ॥ सकळ सारितां लोटूनि लोट ॥ दिशें दिशे मिरविती ॥१६॥

यापरी नमितां द्विमूर्धनी ॥ तोही आल्हादे चित्तकामनीं ॥ वर दिधला मंत्रअग्नी ॥ स्मरण होतां प्रगटावें ॥१७॥

यापरी नमितां देव अश्विनी ॥ तोही देत मंत्रमोहनी ॥ असो सर्व देवीं वरदपाणी ॥ एकएकांनीं ओपिला ॥१८॥

मग आपुलालें आसन योजून ॥ सिद्ध करिते झाले गमन ॥ यावरी मच्छिंद्र कर जोडून ॥ विनवीतसे सकळिकां ॥१९॥

म्हणे महाराजा स्वर्गवासी ॥ मातें कामना वेधली कीं जीवासी ॥ मणकर्णिकास्नान मानवांसी ॥ आदर चित्तीं वाटतसे ॥१२०॥

तरी मातें करावया स्नान ॥ न्याल जरी कृपेंकरुन ॥ तरी येऊनियां कामना पूर्ण ॥ करीन आपुली महाराजा ॥२१॥

ऐसी ऐकूनि वचनयुक्ती ॥ सकळ प्रसन्न झाले चित्तीं ॥ मग स्वयें विमानीं वाहूनि श्रीपती ॥ घेऊनियां चालिला ॥२२॥

विमानयानें आपुले बहुत ॥ त्वरें पातलें वैकुंठनाथ ॥ मग आपुले आसनीं मच्छिंद्रनाथ ॥ नेऊनियां बसविला ॥२३॥

आसनीं शयनी भोजनीं ॥ एकत्रपणीं वर्ते चक्रपाणी ॥ सकळ देव पातले स्वस्थानी ॥ मच्छिंद्र वैकुंठीं राहिला ॥२४॥

मग नित्य मनकर्णिकेचें स्नान ॥ मच्छिंद्रनाथ येत करुन ॥ यावरी पूर्ण समाधिकारण ॥ पाहूं ऐसें वाटतसे ॥२५।

मग विष्णूसी म्हणे मच्छिंद्रनाथ येत करुन ॥ यावरी पूर्णजन्मांत ॥ तयां गोचर करावें ॥२६॥

अवश्य म्हणूनी नारायण ॥ मेरुपाठारीं केलें गमन ॥ मग दाही समाधी दृष्टी पाहून ॥ संतुष्ट झाला मानसीं ॥२७॥

नवनारायणांच्या समाधी नव ॥ दहावी समाधी वासुदेव ॥ ऐसा पाहूनि मनोभाव ॥ पुनः येत वैकुंठी ॥२८॥

असो एक संवत्सर वैकुंठनाथ ॥ ठेविता झाला प्रीतिवंत ॥ मग पाचारुनि उमाकांत ॥ नेता झाला कैलासीं ॥२९॥

येथेंही एक संवत्सरपर्यत ॥ राहता झाला मच्छिंद्रनाथ ॥ स्थितिवृत्तीं स्नेह बहुत ॥ वाढविले शिवाचे ॥१३०॥

यावरी कोण एके दिवशी ॥ इंद्र येऊनि कैलासासीं ॥ भावें नसूनि महादेवासी ॥ मच्छिंद्रनाथा नेतसे ॥३१॥

यावरी तीन मास अमरावतीं ॥ राहता झाला योगपती ॥ तेथेंही अत्यंत वाढवूनि प्रीती ॥ निरोपातें मागतसे ॥३२॥

तों विधीनें नारद पाठवून ॥ नेलें सत्यलोकाकारण ॥ तेथेंही षण्मास राहून ॥ विधिराज तोषविला ॥३३॥

यापरी सकळ देव येऊनि तेथ ॥ घेऊनि जाती मच्छिंद्रनाथ ॥ एक एक दिन करुनि तीर्थ ॥ सकळ देवांसी तोषविलें ॥३४॥

सुरगण गंधर्व किन्नर यक्ष ॥ पितृगणादि अर्यमा दक्ष ॥ सकळ करुनि प्रीतीनें प्रत्यक्ष ॥ तोचि एक मिरवला ॥३५॥

असो सप्तवर्षेपर्यत ॥ स्वर्गी राहिला मच्छिंद्रनाथ ॥ सकळांचा गौरव घेऊनि अतिथ ॥ पुसुनिया निघतसे ॥३६॥

मग सकळ निघूनि स्वर्गवासी ॥ बोळविती मच्छिंद्रासी ॥ विमानीं वाहूनि मृत्युलोकासी ॥ आणूनियां घातलें ॥३७॥

असो देव गेले स्वस्थानासी ॥ येरीकडे मच्छिंद्र पृथ्वीसी ॥ पुनः चालिला तीर्थाटणासी ॥ करावया अत्यादरें ॥३८॥

भ्रमण करितां शुद्धमहीसी ॥ जाता झाला केकाडदेशीं ॥ तें परम स्थान पश्विमदेशीं ॥ वज्रवन पाहिलें ॥३९॥

तंव त्या ठायीं वज्रभगवती ॥ महादैवत प्रतापशक्ती ॥ भावें नमूनि अंबिकामूर्ति ॥ तीर्थस्नान करीतसे ॥१४०॥

तेथें तीनशें साठ कुंडें असती ॥ परी उष्णोदकें भरलीं असती ॥ तें पाहूनि परम चित्तीं ॥ आश्वर्यातें मानीतसे ॥४१॥

आश्वर्य मनांत योजूनि करीत ॥ कीं उष्णोदकें कुंडें भरित ॥ तरी तयांची राहणी पुसुनि कोणास ॥ आपण कुंडें निर्मावीं ॥४२॥

निर्मूनि ये परी सर्वाहून ॥ परमागळें उष्णोदक जीवन ॥ मग सकळ तीर्थात करुनि स्नान ॥ भगवतीठाया पातला ॥४३॥

पाचारुनि तीर्थाच्या पुजार्‍यासी ॥ वृत्तांत पुसीला उष्णोदकासी ॥ विचारितां सांगे त्यासी ॥ उष्णोदककारण तें ॥४४॥

म्हणे पूर्वी वसिष्ठें यज्ञ केला ॥ तेव्हां सकळ देव पातले स्नानाला ॥ त्यांनीं निर्मूनि उष्णोदकाला ॥ कुंडें केली आपुलालीं ॥४५॥

उष्णोदकीं स्नानाकरितां तात्कालिक ॥ निर्मिते झाले सकळिक ॥ आपुली नामें अलोलिक ॥ कुंडांलागीं ठेविलीं ॥४६॥

द्वादश वरुषें द्वादश दिवस ॥ समस्त राहिले त्या ठायास ॥ यज्ञ पावलिया पूर्णतेस ॥ सकळ गेले स्वस्थाना ॥४७॥

तीं कुंडें अद्यापपर्यंत ॥ स्थानोस्थानीं आहेत ॥ ऐसें ऐकूनि मच्छिंद्रनाथ ॥ म्हणे योजिलें करावें ॥४८॥

मग सरस्वतीसरितापात्रीं ॥ जी उंचवट जागा तया क्षेत्रीं ॥ पाहुनि वाटिका पवित्र नेत्रीं ॥ वरुणमंत्र जल्पतसे ॥४९॥

आपास्त्रमंत्र उच्चार पूर्ण ॥ होतांचि प्रविष्ट झालें जीवन ॥ भोगावतीचें उदक काढून ॥ अग्निमंत्र जल्पतसे ॥१५०॥

अग्निमंत्र उच्चार होतां ॥ प्रवाहीं लागला हुताशन तत्त्वतां ॥ तेणेंकरुनि हुताशनतप्तता ॥ पावती झाली ते समयीं ॥५१॥

शिववरदकरीं त्रिशूळ हातीं ॥ तो बुडाकडोनि टाकिला महामाथीं ॥ तेणेंकरुनि जीवन तप्त कुंडाप्रती ॥ महीलागीं विराजलें ॥५२॥

भोगावतीचें उत्तम उदक ॥ प्रगट होतां अलोलिक ॥ आपण स्नान करोनि शुचिक ॥ करी भगवती मातेतें ॥५३॥

भोगावतीचें उत्तम जीवन ॥ अंबिकेप्रति होतां स्नान ॥ मग ती मच्छिंद्रा प्रत्यक्ष होऊन ॥ बोलती झाली सम्यक ॥५४॥

म्हणे जिवलगा मच्छिंद्रनाथा ॥ धन्य तूं प्रतापवंता ॥ भोगावतीजीवनातें मातें ॥ स्नान घातलें योगींद्रा ॥५५॥

तरी येथें एक मास ॥ वस्तीस वसावें सावकाश ॥ मग बोळवीन स्वस्थचित्तास ॥ तुजलागीं पुढारां ॥५६॥

अवश्य म्हणोनि मच्छिंद्रनाथ ॥ राहता झाला मास तेथ ॥ मग रुचल्या अर्थी बोले देवीतें ॥ बोलूनि काळ क्रमीतसे ॥५७॥

यावरी कोणे एके दिवशीं ॥ मच्छिंद्र म्हणे अंबिकेसी ॥ वज्रबाई नाम तुजसी ॥ काय म्हणूनि सांगा हें ॥५८॥

माता म्हणे तपोधना ॥ वसिष्ठ करिता जाहला हवना ॥ तैं शक्र पातला स्थाना ॥ यालागीं महाराजा ॥५९॥

तंव समास्थानीं सकळ ऋषी ॥ बैसले होते महातापसी ॥ तों इंद्र पातला देवकटकेंसीं ॥ समास्थानीं बैसावया ॥१६०॥

सभेंत येतां शचीनाथें ॥ उत्थापन दिधलें नाहीं त्यातें ॥ म्हणूनि क्षोभें अमरनाथ ॥ वज्र लागीं प्रेरितसे ॥६१॥

तें पाहूनियां दाशरथी राम ॥ शक्तिमंत्रें दर्भ मंत्रून ॥ सोडिता झाला वज्राकारण ॥ बहु तांतडी लगबगें ॥६२॥

मग त्या दर्भी मंत्रप्रयुक्ती ॥ मी प्रगट झालें महाभगवती ॥ वज्र गिळूनि उदरआहुती ॥ करीती झालें ते समयीं ॥६३॥

यावरी शक्रें राम तो बोलून ॥ पूर्ण केला समाधान ॥ मग श्रीरामाचें स्तबन करुन ॥ वज्र पुन्हां मागितलें ॥६४॥

मग तो प्रसन्न होऊनि चित्तीं ॥ वज्र दीधलें मागुती ॥ मग सकळ ऋषिदेवी मजप्रती ॥ नांव ऐसें स्थापिलें ॥६५॥

यज्ञ जाहला समाप्ती ॥ सकळ गेले स्नानाप्रती ॥ परी श्रीरामें येऊनि ते क्षितीं ॥ मातें स्थापिलें अद्यापि ॥६६॥

ती भोगवती येथें श्रेष्ठा ॥ माझी केली प्राणप्रतिष्ठा ॥ तें भोगावतीचें उदक श्रेष्ठा ॥ मिळालें होते मजलागीं ॥६७॥

किंवा आतां तुझें हातीं ॥ स्नाना पावली भोगावती ॥ परी रामाहूनि कृपामूर्ती ॥ तुवां अधिक केले बा ॥६८॥

रामें न्हाणिलें शीतोदकें ॥ तुवां न्हाणिलें उष्णोदकें ॥ आणि अखंडित पुण्यश्लोकें ॥ भोगावती दिधली त्वां ॥६९॥

असो ऐशी संवादयुक्ती ॥ झाल्याअंती त्या उभयतीं ॥ उपरी मासाची झाली भरती ॥ नाथ पुसूनी निघाला ॥१७०॥

उत्तरदेशीं करितां गमन ॥ अयोध्यें जातां तपोधन ॥ द्वारावती तीर्थ करुन ॥ अयोध्येसी पातला ॥७१॥

ती कथा बहु सुरस ॥ होईल ती स्वीकारा पुढिलें अध्यायास ॥ धुंडीसुत नरहरिवंश ॥ मालू सांगे गुरुकृपें ॥७२॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ सप्तमाध्याय गोड हा ॥१७३॥

अध्याय ॥७॥ ओव्या ॥१७३॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीदत्तात्रेयार्पपणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

॥ नवनाथभक्तिसार सप्तमाध्याय समाप्त ॥


श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय ८

श्रीगणेशाय नमः

ॐ नमोजी गुरुराया ॥ भवच्छेदका पळवीं माया ॥ श्रीज्ञानेश्वरा सदयहदया ॥ मम किंचित नाम मिरविशी ॥१॥

अघा हे ज्ञानदिवटी ॥ आम्हा साधकां जे दिठी ॥ मिरवला आहेसी पूर्णकोटी ॥ हिनकारक महाराजा ॥२॥

तरी मागिले अध्यायीं कथन ॥ विधियुक्त वीरभद्र केला प्रसन्न ॥ आणि स्वर्गवासातें भोगून ॥ महीलागीं मच्छिंद्र उतरला ॥३॥

आणि वज्रावटिके वज्रभगवती ॥ तोपविलें स्नानाप्रती ॥ उष्णोदकीं भोगावती ॥ जगामाजी मिरविली ॥४॥

यापरी द्वारका करुनि तीर्थ ॥ गोमतीं स्नानविधी यथार्थ ॥ करुनियां द्वारकानाथ ॥ प्रसन्न चित्तीं आगळा ॥५॥

त्यावरी आला आयोध्येसी ॥ तरी श्रोतिया कथा परियेसीं ॥ स्नान करुनि शरयूतीरासी ॥ रामदर्शना जातसे ॥६॥

तों पशुपतराव तया ग्रामीं ॥ रामवंशांत पराक्रमी ॥ तो देवालयीं पूजेलागुनी ॥ आला होता संभारें ॥७॥

अपार सैन्य जें भोंवती ॥ सदनीं तुरंगमें रावती ॥ छत्रचामरें कळसदीप्ती ॥ लाजविती मानूतें ॥८॥

वाजी गज यांचे रंग आणिक ॥ तेहीं चपळ अलोलिक ॥ वाताकृती लक्ष एक तयाभोंवते फिरताती ॥९॥

सकळ वाजी श्रृंगारयुक्त ॥ जडित पाखरा हाटकवत ॥ रत्नकोंदणीं हार लखलखीत ॥ कीं नक्षत्रमणी मिरविले ॥१०॥

त्यांतही झळकत झालरीयुक्त ॥ गुणीं ओविले अपार मुक्त ॥ कोणी विराजत गंगावत ॥ शुभ्रतेजीं मिरवले ॥११॥

ग्रीवे माळा रत्नवती ॥ हाटकासी जे ढाळ देती ॥ रत्न नोहे तेजगभस्ती ॥ चमूलागी मिरवला ॥१२॥

पदीं पैंजण रुणझुणती ॥ कीं वीरांची वीरश्री वाचे वदती ॥ कीं शत्रुगणींच्या अपार पंक्ती ॥ ब्रीद म्हणती विभांडूं ॥१३॥

ऐशियापरी वाजी ते हौसे ॥ कीं चिंतल्या ठायीं दाविती वास ॥ अतिवातचपळगतीस ॥ सर सर म्हणती माघारा ॥१४॥

अगा ते वाजी न म्हणूं महीचे ॥ कीं इंदुबंधुरत्न उदधीचे ॥ विशाळ शुक्तीकापात्र अब्धीचें ॥ मुक्त करुनि आणिले ते ॥१५॥

याचकनीती विकासूनि अवनीं ॥ हत्ती मिरवती पृतनेलागुनी ॥ विशाळ गंडस्थळ दंतकदनी ॥ चूडे सुवर्ण मिरवलें ॥१६॥

हाटक व्यक्त त्यां भूषण ॥ हौदे अंबारिया देदीप्यमान ॥ कीं पृतनामहीचे नग ते पूर्ण ॥ भावनीं ऐसें पाहे कां ॥१७॥

अपार सैन्य बहु संभार ॥ पाहतां उचलिले जे गिरिवार ॥ कीं पर्वत माथां तरुशृंगार ॥ तैशा पताका गजपृष्ठीं ॥१८॥

एकाहूनि एक अधिक ॥ महारथी ते युद्धकामुक ॥ दहा सहस्त्र रायासवें लोक ॥ युद्धकामुक असती ॥१९॥

परी युद्धशास्त्री चतुर सुगम ॥ कीं परशक्तीस देती दम ॥ ऐसे प्रतापीक स्तोम ॥ इंद्रसुखा आगळे कीं ॥२०॥

पायीचें पायदळ अपार ॥ वस्त्राभरणीं मंडिताकार ॥ छडीदार आणि चोपदार ॥ जासूद हलकारे मिरवती ॥२१॥

हेमभूषणीं मुक्तमाळा ॥ सकळ पाइकां झळकती गळां ॥ जडितरत्नीं अति तेजाळा ॥ हेमालंकार करकमळीं ॥२२॥

दाहीं अंगुळीं मुद्रिका गहन ॥ हेममुक्तें ते मिरवती श्रवण ॥ पहातेपणीं राणीवपण ॥ भार पडेल लोकातें ॥२३॥

असो ऐशी अपार संपत्ती ॥ मिरवला पाशुपत अयोध्यापती ॥ ते सकळ दाटी देवळाभोंवतीं ॥ राजीराजीने मिरवली ॥२४॥

त्यांत श्रीरामदर्शनाकारण ॥ जाता झाला योगद्रुम ॥ परी ते द्वारपाळ परम ॥ नाथालागीं बोलत ॥२५॥

परम पाप संचल्या तुंबळ ॥ तेव्हां मिरवे द्वारपाळ ॥ प्रथम धर्मालागी काळ ॥ अधर्मपरी मिरवतसे ॥२६॥

त्या धर्मद्वारींचे म्हणती श्वान ॥ ते द्वारपाळ द्वाररक्षण ॥ आपण बुडुनि यजमाना ॥ बुडवूं पाहती निश्वयें ॥२७॥

महानष्ट जातां समोर ॥ कदा न म्हणती लहानथोर ॥ न भांड चित्तीं परम निष्ठुर ॥ वाचे कठोर बोलती ॥२८॥

सप्तजन्म तस्करनीती ॥ शत ब्रह्महत्या जया घडती ॥ तेव्हां तो पावे द्वारपाळ क्षितीं ॥ धर्मविनाश रायाचा ॥२९॥

ऐसियेपरी द्वारपाळ ॥ राजद्वारीं असती सकळ ॥ मच्छिंद्र जातां उतावेळ ॥ हटकूनि डंभ केली असे ॥३०॥

तीव्र वाचे बोलती वचन ॥ म्हणती कान फाडूनि बुद्धिहीन ॥ कोठें जासी तांतडीनें ॥ मतिमंदा हे मूर्खा ॥३१॥

हे भ्रष्टा तूतें कैसें कळेना ॥ कीं राव आला आहे दर्शना ॥ त्यात तूं जासी बुद्धिहीना ॥ सर परता माघारा ॥३२॥

ऐसें म्हणूनि निष्ठुर वचन हातीं ॥ लोटिलें मच्छिंद्रनाथाप्रती ॥ येणेंकरुनि परम चित्तीं ॥ विक्षेपातें पावला ॥३३॥

परी तो सर्वज्ञ संतापासी ॥ विवेक अर्गळा घाली त्यासी ॥ तो म्हणे सेवकांसीं ॥ संवाद करणें विहित नव्हे ॥३४॥

पतिस्वाधीन पतिव्रता ॥ कीं पात्रसोई वाहे सरिता ॥ तेवीं बुद्धि करुनि पाशुपता ॥ सेवक सेवा आव्हानिती ॥३५॥

कीं सुईमागें गुंतो जातां ॥ कीं मित्रामागें रश्मी येतां ॥ तदनुबुद्धि पाशुपता ॥ सेवक सेवा आव्हानिती ॥३६॥

कीं रत्नामागे सकळकळा ॥ माउलीसवें आव्हानूं बाळा ॥ तदनुबुद्धि अयोध्यानृपाळा ॥ सेवक सेवा आव्हानिती ॥३७॥

कीं माळी मळ्याचा योजूनि पंथ ॥ सयुक्त सोडी उदक आंत ॥ तदनुबुद्धि पाशुपत ॥ सेवक सेवा आव्हानिती ॥३८॥

ऐसिये शब्दां सदगुणवाणी ॥ बोधी सकळां विवेकखाणी ॥ बंधनीं निर्मूनि विक्षेप मनाचे चरणीं ॥ घालितां झाला महाराज ॥३९॥

परी बुद्धिप्रकरण ॥ अणिक सुचले तयाकारण ॥ कीं सेवकांतें काय बोलून ॥ शिक्षा देऊं राजातें ॥४०॥

एक राव आर्‍हाटितां ॥ संपूर्ण सेवकां दाटे व्यथा ॥ जेवीं गवसनी मित्रा घालितां ॥ रश्मी आतुडती सहजचि ॥४१॥

शरीरीं कोठें घालितां घाय ॥ परी सर्वोपरी दुःख होय ॥ तदनुशिक्षा योजितां राया ॥ दुःख मिरवी घृतनेते ॥४२॥

ऐसें योजूनि मच्छिंद्रनाथ ॥ भस्मचिमुटी कवळी हाता ॥ स्पर्शास्त्रमंत्रप्रयुक्ता ॥ रामनामीं जल्पला ॥४३॥

येरीकडे पाशुपत ॥ देवा बद्धांजुळी होऊनि प्रणत ॥ रामासन्मुख दंडवत ॥ महीं मस्तक ठेवीतसे ॥४४॥

तों स्पर्श मग येऊनि निकट ॥ करिता झाला अंगीं झगट ॥ झगट होतां महीपाठ ॥ भाळा सहज झालीसे ॥४५॥

राव उठूं पाहे क्षणीं ॥ परी सुदृढ युक्त न सोडी मेदिनी ॥ भाळपदादी उभयपणीं ॥ महीयुक्त झालीं तीं ॥४६॥

करितां यत्न बहुतांपरी ॥ परी विभक्त नोहे कदा धरित्री ॥ बहु श्रमला नानापरी ॥ उपाय कांहीं चालेना ॥४७॥

मग बोलावूनि सेवकमंत्री ॥ वृत्तांत सांगे झाल्यापरी ॥ म्हणे कदा न सोडी धरित्री ॥ व्यक्त झाली सर्वस्वें ॥४८॥

परी मंत्री बुद्धिमंत ॥ एकटाचि तेव्हां बाहेर येत ॥ सेवकां पुसे रळी मात ॥ कोणी कोणातें झाली कां ॥४९॥

मनांत म्हणे कोणी जाती ॥ आला असेल नगराप्रती ॥ गांजिल असेल राजदूतीं ॥ म्हणून क्षोभला असेल तो ॥५०॥

मग त्यातें क्षोभ न येतां ॥ क्षोभ वरिला श्रीभगवंता ॥ तयाचे साधू जगीं छळितां ॥ क्रोध नावरे देवासी ॥५१॥

महीं श्रेष्ठ तो अत्रिनंदन ॥ परी उगेंचि क्षोभवूनि आपुलें मन ॥ श्रीअंबऋषीचे केलें छळण ॥ तरी न साहे दैवतें ॥५२॥

तेणें सुदर्शन लावूनि पाठीं ॥ गर्भ सोसी आपण जगजेठीं ॥ तस्मात् भक्त गांजिल्यापाठीं ॥ कदा न राहवे देवातें ॥५३॥

भजनीं प्रेमा प्रल्हादबाळा ॥ परम आवडे तमाळनीळा ॥ दानवीं गांजितां उतावळा ॥ कोरडे काष्ठी प्रगटला ॥५४॥

धर्महवनीं मंडूकबाळ ॥ तप्तोदकीं केलें शीतळ ॥ तस्मात् संकटीं भक्त प्रेमळ ॥ कदा न राहवे देवातें ॥५५॥

रणीं होतां कडकडाट बहुत ॥ पक्षिजोडा बाळें टाकूनि जात ॥ बाळकांनीं स्मरतां रमानाथ ॥ करिघंटा टाकी तयांवरी ॥५६॥

पारधी पक्षिप्राणहरणीं ॥ व्याळरुप झाले चक्रपाणी ॥ तस्मात् दासाचा छळ कोणी ॥ कदाकाळीं करुं नये ॥५७॥

जळीं पदातें नक्र ओढी ॥ कोणें दूतीं ॥ गांजिली असेल हरिभक्ती ॥ म्हणूनि लोभे सायक हातीं ॥ हरीनें वरिला असेल कीं वृत्तांत तो प्रविष्ट झाला ॥६०॥

मंत्री वृत्तांत ऐकूनि कानीं ॥ शोधूनि काढी मच्छिंद्रमुनी ॥ धन्य मंत्री तो शोधप्रकरणी ॥ अर्थपैशुन्य निवडिता ॥६१॥

अहो तो मंत्री नोहे मोहरा ॥ अमृत घेऊनि सांडी मदिरा ॥ कीं चिंत मणिराज अधीरा ॥ राजचिंताहरणार्थ ॥६२॥

तन्न्यायें तो सुघडकरणी ॥ त्वरें लागला मच्छिंद्रचरणी ॥ मग म्हणे महाराजा औदार्यपणीं ॥ कृपादान ओपावें ॥६३॥

तुम्ही संत ते स्नेहभरित ॥ पूर्णशांतीचे भांडारयुक्त ॥ औदार्य सांगतां नाहीं मित्र ॥ अपराध क्षमा करावा ॥६४॥

मेघ जरी उदार म्हणावा ॥ तोही समता न करी संतमाथा ॥ मेव विसरे दातृत्वभावा ॥ तेवी संत नोहे तो ॥६५॥

जरी परिसाची उपमा देऊं ॥ तो लोहातेचि देत हाटकभाऊ ॥ इतर धातूसी होत परिभवू ॥ न चले शक्ती तयाची ॥६६॥

कल्पतरु जरी करावा समान ॥ शुभासुभ दावी रत्न ॥ तेवीं नोहे संतजन ॥ शुभचिन्हेंचि वाछिती ॥६७॥

ऐसें बोलतां मच्छिंद्रनाथ ॥ प्रसन्न झाले स्वचित्तांत ॥ क्रोध आवरुनि होतां शांत ॥ प्रसाद देऊं म्हणतसे ॥६८॥

मग करीं कवळूनि भस्म चिमुटी ॥ विभक्त अस्त्र मंत्रपोटीं ॥ कविराज जल्पतां होटीं ॥ धरा चिमुटी सोडीतसे ॥६९॥

राव उठूनि बैसे धरित्री ॥ वेगीं पाचारीतसे सुहितमंत्री ॥ सर्वेचि येऊनि झडकरी ॥ दूती राजाज्ञा निवेदिली ॥७०॥

पत्रिके बोलावूनि निकट दूत ॥ विचारुनि घेतो राजक्षेमांत ॥ तंव ते शुभवार्ता सांगत ॥ कल्याणें राजा विराजला ॥७१॥

मग मच्छिंद्राचा धरुनि पाणी ॥ मंत्री नेत तयालागुनी ॥ प्रवेश होता तये क्षणीं ॥ वृत्तांत रायातें निवेदला ॥७२॥

रायें ऐकूनि सकळ वृत्तांत ॥ मच्छिंद्रचरणीं भाळ अर्पीत ॥ अति गौरवें स्नेहभारीत ॥ नाम पुसे तयाप्रती ॥७३॥

येरी म्हणे नरेंद्रपाळा ॥ मज मच्छिंद्र म्हणती तान्हुल्या बाळा ॥ रायें ऐकूनि वृत्तांत सकळा ॥ मच्छिंद्रचरणीं प्रेरीतसे ॥७४॥

पूर्वी मच्छिंद्रकृतिरत्न ॥ सांठवले श्रवणाकारणें ॥ तेणेंकरुनि दर्शनभूषण ॥ स्वीकारावयासी पहातसे ॥७५॥

ऐसी इच्छा अब्धांपाठीं ॥ तो मच्छिंद्रचंद्र देखीला दृष्टी ॥ मग परम मनीं आनंददाटी ॥ चित्रपात्रीं हेलावली ॥७६॥

मग सुखासनें सिद्ध करुन ॥ राजानें मच्छिंद्राचा हात धरुन ॥ आपुले समास्थानीं नेऊन ॥ कनकासनी बैसविला ॥७७॥

षोडशोपचारें पूजन ॥ अर्पिता झाला तन मन धन ॥ वरी परम आदरें भक्तिरत्न ॥ मच्छिंद्रनाथ ओपीतसे ॥७८॥

सदा सर्वदा आसनीं शयनीं ॥ गमनीं भोजनीं जोडूनि पाणी ॥ निरंतर उभा सेवेलागुनी ॥ अन्य कांहीं सुचेना ॥७९॥

ऐसिया भक्तीचा पाहतां पाठ ॥ मच्छिंद्रकृपेचा लोटला लोट ॥ म्हणे कोण नरेंद्र कामनालोट ॥ कवण चित्तीं दाटतसे ॥८०॥

येरु म्हणे जी योगद्रुमा ॥ मी सूर्यवंशीं पाशुपतनामा ॥ रामअवलाद, कृशपत्नीधामा ॥ अवलाद देह असे हा ॥८१॥

तरी वडील माझा विजयी ध्वज ॥ श्रीराम अवतरे तेजःपुंज ॥ मातें भेटवीं महाराजा ॥ मित्रकुळाचा टिळक जो ॥८२॥

येरी म्हणे रे भाऊका दिठीं ॥ आतां करितों तयाची भेटी ॥ मग सभेबाहेरी तपोजेठी ॥ राया घेऊनि येतसे ॥८३॥

उभा राहूनि राजांगणीं ॥ धूमास्त्र मंत्र जल्पे वाणी ॥ भस्मचिमुटी संजीवनी ॥ अर्कावरी प्रेरितसे ॥८४॥

तेणें ध्रुव खगमंडळ संपूर्ण ॥ धूम्रें भरुनि गेलें गगन ॥ दिशांसह अर्क संपूर्न ॥ झांकाळूनि पैं गेला ॥८५॥

धूम्रास्त्रानें भरले नयन ॥ नेत्र पुसीतसे सारथी अरुण ॥ धूम्र संचारोनि मुखाकारण ॥ कासावीस होतसे ॥८६॥

तें पाहुनि सविताराज ॥ म्हणे अस्त्रविद्ये धूम्र विराजे ॥ क्षत्रिय कुळांतील नरेंद्र ओजें ॥ तेणें प्रेरली ही विद्या ॥८७॥

मग तो महाराज जगलोचन ॥ कवळूनि सायका चढवूनि गुण ॥ वायुअस्त्र शर निर्मून ॥ सोडिता झाला महाराजा ॥८८॥

तंव तो शर प्रतापवंत ॥ लवकरी प्रगटवी स्थावर मारुत ॥ तेणें मंदराचळ पर्वत ॥ हालूं पाहती डगडगां ॥८९॥

गगनापासूनि महीपर्यंत ॥ प्रगट झाला प्रळयवात ॥ तरु उचंबळूनि नभीं भ्रमत ॥ पक्षी जेवीं भूगोलातें ॥९०॥

ऐसा वात होतां प्रगट ॥ धूम्रें फुटला दिशापाट ॥ सदनालागीं निर्मळ वाटे ॥ गमन करितां येईंना ॥९१॥

तें पाहूनियां योगद्रुम ॥ जल्पता कितुलें ॥ कीं मंदराचळचि दुजे उगवले ॥ तेणें मार्ग कुंठित जाहले ॥ वातचक्राचे महाराज ॥९३॥

मग ते अस्त्रीं नारायण ॥ पर्वत पाहतां विशाळपणें ॥ मग वज्रास्त्रसंधान ॥ करिता झाला अर्क तो ॥९४॥

तंव वज्रास्त्र अतिकठिण ॥ पर्वतमाथे गेले भेदून ॥ तेणें घायें शतचूर्ण ॥ त्वरें झाले नगराज ॥९५॥

पर्वत चूर्ण होतां निगुती ॥ तें पाहूनि मच्छिंद्रजती ॥ भ्रमीं अस्त्र योजूनि उपरती ॥ मित्र भागीं सांडीतसे ॥९६॥

तें अस्त्र होतां स्पंदनी प्रविष्ट ॥ वाजींसह अरुण झाला भ्रमिष्ट ॥ सांडूनि रहाणीची नित्य वाट ॥ स्यंदन नेती भलतीकडे ॥९७॥

तें पाहूनियां द्वादशनामी ॥ ज्ञानशराच्या न उरल्या गुणऊर्मी ॥ तेणें करुनि भ्रमें प्रकामी ॥ नाशाप्रती पावतसे ॥९८॥

जैसा पेटला पावक ॥ त्यावरी सोंपविलें सकळ उदक ॥ मग तो उरे केवीं दाहक ॥ तेवीं अर्का झालें असे ॥९९॥

कीं अज्ञानपण साधकाचें ॥ श्रीसदगुरु निवारीत वाचें ॥ अंगीं भूषण ज्ञानपणाचें ॥ बोधगुनी गोवीतसे ॥१००॥

कीं सदनांत दाटला अंधार अपार ॥ तो दीप उजळितां होतो दूर ॥ तन्न्यायें श्रीभास्कर ॥ ज्ञानेश्वरा प्रेरितसे ॥१॥

तेणें उडवूनि भ्रमिष्टपण ॥ सुपंथसुपंथा करी गमन ॥ तें मच्छिंद्रनाथें दृष्टी पाहोन ॥ वाताकर्षण जल्पत ॥२॥

वातास्त्र आकर्षण सबळ ॥ वायुचक्रीं भेदिलें तुंबळ ॥ मग वाजींचे आणि सारथ्याचे तये वेळ ॥ श्वासोच्छवास राहिले ॥३॥

आणि जो प्रत्यक्ष चंडीकरण ॥ तोही दाटला श्वासेंकरुन ॥ वायुचक्री गेले आटून ॥ रथ उलथोनि पडियेला ॥४॥

वायुचक्राचा ज्यासी आधार ॥ तो आधार तुटतांचि सत्वर ॥ स्वर्गाहूनि उर्वीवर ॥ आंदळला स्यंदन तो ॥५॥

महीं आदळतां दिव्य रथ ॥ खालीं पडला श्रीआदित्य ॥ स्यंदनीं वाजी अति होत ॥ कासाविस श्वासानें ॥६॥

परी महीं पडतां तेजोराशिपाळ ॥ महीं मातला अति अनळ ॥ तेणें दाहूं पाहे सकळ ॥ महीवरले उदभिज्ज ॥७॥

तें पाहूनि मच्छिंद्रनाथ ॥ जलदास्त्र स्मरे त्वरित ॥ तेणेंकरुनि अपरमित ॥ जलवृष्टी होतसे ॥८॥

परी आदित्य पडतां निचेष्टित ॥ परम घाबरले स्वर्गदैवत ॥ मग विमानयानीं होऊनि त्वरित ॥ मच्छिंद्रापाशीं पातले ॥९॥

ब्रह्मा विष्णु आणि शिव ॥ वरुण अश्विनी कुबेर देव ॥ सुरवर अनादि सकळ गंधर्व ॥ महीलागीं पातले ॥११०॥

सत्यलोक तपोलोक ॥ अतळ वितळ सुतळादिक ॥ संकटीं पडला एक अर्क ॥ लागवेगीं धांविन्नले ॥११॥

जैसे सकळ तरुवरतीं ॥ चहूंकडूनि पक्षी येती ॥ तन्न्यायें महीवरती ॥ सकळ देव उतरले ॥१२॥

मग महाराजा क्षीराब्धिजांवई ॥ धांवूनि मच्छिंद्र धरिला हदयीं ॥ म्हणे हा आदित्य कोण न्यायी ॥ संकटी तुवां योजिल ॥१३॥

याउपरी करुनि नमस्कार ॥ विष्णूतें देत उत्तर ॥ म्हणे महाराजा पाशुपतवीर ॥ आदित्यकुळीं असे हा ॥१४॥

ऐसें असतां यथार्थ ॥ वंशजासी न पाहे हा आदित्य ॥ तस्मात् वडिलांची धर्मनीत ॥ ऐसेपरी असावी कां ॥१५॥

जिया मातेने बालकांचे संगोपन ॥ तिया रोषाची केली पखरण ॥ मग ती माता काय म्हणून ॥ लावेपरी मिरवावी ॥१६॥

स्वामी सेवकां अमित्र मानी ॥ मग कार्य कैचे येत घडोनी ॥ सदा संशयाची गवसणी ॥ उभयचित्तीं मिरवतसे ॥१७॥

तस्मात् राय पाशुपती ॥ नावडे या आदित्याप्रती ॥ म्हणूनि ऐसा वैकुंष्ठपती ॥ चर्याभाग रचियेला ॥१८॥

आणिक एक मम वागुत्तरासी ॥ साबरीविद्या कवित्वराशी ॥ सूर्यनामें मंत्र उपदेशी ॥ प्रसन्न असावें अर्काने ॥१९॥

याउपरी आणिक आहे चोज ॥ सूर्यवंशीं विजयध्वज ॥ तो पाशुपतातें श्रीराम आज ॥ भेटवावा महाराजा ॥१२०॥

ऐसेपरी कामना मनीं ॥ वेधली आहे चक्रपाणी ॥ पाशुपतरायाचे प्रेमवदनीं ॥ गुंती पावलों भक्तीनें ॥२१॥

नवराणिवासह माझा काम ॥ पूर्णते आणा मेघश्याम ॥ ऐसें बोलतां योगद्रुम ॥ हरी उत्तरा स्वीकारी ॥२२॥

म्हणे बा रे योगद्रुमा ॥ सूर्यनामीं मंत्र ॥ जगीं होतील प्रविष्ट पवित्र ॥ तैं रवकष्टानें येऊनि मित्र ॥ कार्य करील लोकांचें ॥२४॥

ऐसें बोलूनि चक्रपाणी ॥ करतळा कर देत वचनीं ॥ म्हणे बा रे भास्कर मंत्रालागुनी ॥ वरदाता झालासे ॥२५॥

बा रे तव मंत्र लोकोपकार ॥ नामस्मरणीं होतां नर ॥ तेणेंचि पातक योग भद्र ॥ सकळ जनांचे मिटतील ॥२६॥

सहज सूर्यांचे वदतां नाम ॥ सकळ पातकें होतील भस्म ॥ तैंशांत मंत्रप्रयोग उत्तम ॥ कार्यालागीं दुणावेल ॥२७॥

नाममंत्रयुक्त प्रयोग ॥ त्यावरी तव वाणी पवित्र अभंग ॥ त्याहीवरती वरद चांग ॥ प्रत्यक्ष दैवतें मिरवतील ॥२८॥

तरी बा सोळा राशी पावलें ॥ सुवर्ण जडावासी गमले ॥ तें भूषण मोला चढलें ॥ मान्य केवीं होईना ॥२९॥

तरी या कामा कदा आळस ॥ होणार नाहीं महापुरुष ॥ आम्ही सर्व देत तव वचनास ॥ उतरलों आहों महाराजा ॥१३०॥

वीरभद्राचे समरंगणी ॥ आणि नागपत्रअश्वत्थस्थानीं ॥ तूतें ओपूनि वरदवाणी ॥ तुष्ट केलें आधींच ॥३१॥

तरी आतां संशय ॥ सांडूनि अर्का जीववावें ॥ याचि रीतीं देव अवघे ॥ गौरविती मच्छिंद्रा ॥३२॥

जैसे एका चंद्रांबुसाठी ॥ न्याहाळिती चकोर पाठी ॥ तेवीं जगलोचना दिठीं ॥ सकळ देव गौरविती ॥३३॥

मच्छिंद्र म्हणे पाशुपतराया ॥ आधीं दावीन राम काया ॥ तेव्हांचि समाधान तरी राया ॥ मम चित्तांत ओसंगी ॥३४॥

ऐसी ऐकतां मच्छिंद्रवाणी ॥ सौमित्रासह सगुणी ॥ प्रगट झाला कोदंडपाणी ॥ दशरथतनय महाराज ॥३५॥

मग राममूर्ती प्रगट होतां ॥ शिवासी आनंद वाटला चित्ता ॥ जयानें राया पशुपता ॥ आनंदसरिता उचंबळली ॥३६॥

मच्छिंद्रें देखतां कोदंडपाणी ॥ भावे मस्तक ओपिलें चरणीं ॥ रामें प्रेमें धरुनि वक्षःस्थानीं ॥ मच्छिंद्रनाथ कवळिला ॥३७॥

पाशुपतराव भाविक पूर्ण ॥ तोही वंदी श्रीरामचरण ॥ राम त्यातें हदयीं धरुन ॥ धन्य वंश म्हणतसें ॥३८॥

यावरी मच्छिंद्र जोडोन दोन्ही हस्त ॥ नम्रोत्तरीं स्तवूनी रघुनाथ ॥ गौरवोनि रामा बोधत ॥ हे रघूत्तमा महाराजा ॥३९॥

तव नामें अनंत असती ॥ तेवी त्यांत रामनाम गंगा वसती ॥ सर्वात श्रेष्ठ सीतापती ॥ ग्रंथामाजी निवेदिलें ॥१४०॥

त्याही ग्रंथां नाहीं भिती ॥ परी तव नामें शुभ ते असती ॥ तेवी माझ्या कवित्वाप्रती ॥ वदनपात्रीं विराजिजे ॥४१॥

साबरीविद्येचें अपार वचन ॥ मंत्रप्रयोगीं कवित्व पूर्ण ॥ जेथें येईल तुझें नाम ॥ तेथे कार्य करावें समग्र त्वां ॥४२॥

तव नामीं होतां मंत्रोच्चार ॥ तें त्वां कार्य करावें समग्र लवकर ॥ तरी प्रांजळ चित्तीं देवीं कर ॥ मम करी ओपावा ॥४३॥

चित्ती असेल जरी अवमान ॥ तरी सज्ज करीं कां कोदंडबाण ॥ माजवोनि आतां समरंगण ॥ नृत्य करु रणांगणीं ॥४४॥

श्रीराम म्हणे मच्छिंद्रा ऐक ॥ तूं तिहीं देवांचा वरदायक ॥ श्रीदत्तात्रय प्रतापार्कं ॥ अवतार तिघा देवांचा ॥४५॥

आणि नरसिंह अवतार पूर्णब्रह्म ॥ ते तुज वश्य आहेत योगद्रुमा ॥ तेथें मी कां नसावें साह्यार्थकामा ॥ साह्य असों तुज आतां ॥४६॥

तुझ्या मंत्री माझें स्मरण ॥ होतांचि कार्य करीन ॥ बावनवीरांत सबळ आचरण ॥ मंत्रप्रयोगीं दावीन मी ॥४७॥

ऐसी वदूनि वरदवाणी ॥ भाष देत मच्छिंद्रपाणी ॥ मग म्हणे हे योगधामी ॥ मज तुज ऐक्य असे की ॥४८॥

तूं विष्णूचा अवतार ॥ जो कविनारायण महाथोर तस्मात् तुझें शरीर ॥ ऐक्यत्व असें या लोकीं ॥४९॥

ऐसें बोलोनि कौसल्यासुत ॥ धन्य म्हणवूनि ग्रीवा तुकावीत ॥ यावरी बोले सावध आदित्य ॥ वेगें करीं तपोराया ॥१५०॥

एक मित्रावांचूनि धरणी ॥ झाली असे दीनवाणी ॥ तरी योगींद्रा सुखधामीं ॥ मम पूर्वजां मिरवीं कां ॥५१॥

महीं पडला अंधकार ॥ देव त्रास पावले समग्र ॥ सकळ जगाचा व्यवहार ॥ खोळंबला तपोराया ॥५२॥

ऐसे ग्लानी सुढाळ वचन ॥ श्रीराममुखीं ऐकोन ॥ तें मच्छिंद्रहदयीं अपार ॥ भूषण ॥ चित्तशक्तीतें मिरविले ॥५३॥

तेणें परम आनंदघृत्ती ॥ प्रसन्न झाली चित्तभगवती ॥ मग वातास्त्रमंत्र देहस्थव्यक्ती ॥ प्रसादातें ओपीतसे ॥५४॥

वातयुक्त अस्त्र पूर्ण ॥ मुखीं जल्पतां मच्छिंद्रयोगिजन ॥ मग सुटी पावोनि वाताकर्षण ॥ सुखी केला आदित्य तो ॥५५॥

मग सावध होऊनि महीं बैसत ॥ दाही दिशा न्याहाळीत ॥ तों अपार दृष्टी देखूनि दैवतें ॥ सकळांलागीं पाचारी ॥५६॥

सकळ दैवतें जाऊनि तेथ ॥ नमिला महाराज प्रताप आदित्य ॥ यावरी विष्णूलागीं पुसत ॥ क्षत्रिय कोण ऐसा आहे ॥५७॥

कीं वासना पुन्हा परतून ॥ हरुं पाहत श्यामकर्ण ॥ धन्य प्रतापी प्रतापगहन ॥ आजि दावीं कां मजकारणें ॥५८॥

तरी ऐसे प्रतिज्ञें लागून ॥ कीं युगानुयुगीं असें प्रसन्न ॥ तरी तयाचें मुखमंडन ॥ मज भेटीतें आणावें ॥५९॥

मग मच्छिंद्रातें देव पाचारिती ॥ कीं तुज बोलावीतसे गभस्ती ॥ मग चंद्राख जल्पूनि उक्ती ॥ दर्शना जात मच्छिंद्र ॥१६०॥

मित्र दाहक तो अति सबळ ॥ म्हणूनि चंद्रास्त्र जपला मच्छिंद्रबाळ ॥ तें मागें पुढें परम शीतळ ॥ चंद्रास्त्रीं मिरवीतसे ॥६१॥

त्यांत जलदास्त्राचा वर्षाव ॥ होवानि होत शीतल ठाव ॥ ऐसें योजूनि सविताराव ॥ जाऊनिया नभियेला ॥६२॥

सर्वातें देखूनि मच्छिंद्रनाथ ॥ धन्य धन्य ऐसें म्हणत ॥ कवण नामीं असे पुसत ॥ ग्राम धाम जन्मादि ॥६३॥

मग विष्णूनें मुळापासूनि कथा ॥ नामधामादि सांगितली वार्ता ॥ कविनारायण महीवरता ॥ मच्छिंद्रनाथ मिरवतसे ॥६४॥

येरी म्हणे माझा अंश ॥ नवनारायण असती महीस ॥ तयांचा अवतार शुभ आम्हांस ॥ चांगुलपर्णी वाटला हा ॥६५॥

तरी बा रे मच्छिंद्रनाथा ॥ कवण कामनीं वेधली व्यथा ॥ तें मज वदूनि वरदामृता ॥ प्राशन करीं महाराजा ॥६६॥

कृत त्रेता द्वापारयुग गेलें ॥ परी ऐसें नाहीं केलें ॥ धन्य तुझा प्रताप असे विपूल ॥ धन्य गुरु तुझा तो ॥६७॥

येरु म्हणे कर जोडोनी ॥ मम वेधली कामना मनीं ॥ साबरीविद्या कवित्वकरणी ॥ कृपा करुनि दाविली ॥६८॥

परी त्यातें वरद आपुला ॥ असावा ऐसें वाटतें मनाला ॥ तरी कृपा करुनि वर त्याला ॥ दिधला पाहिजे महाराजा ॥६९॥

मंत्रप्रयोगी तुझें स्मरण ॥ होता व्हावें दृश्यमान ॥ जगाचें कार्य मंत्रसाधन ॥ स्वकष्टानें मिरवावें ॥१७०॥

ऐसी ऐकतां मच्छिंद्रवाणी ॥ अवश्य म्हणे वासरमणी ॥ मंत्रप्रयोग स्वयें घेऊनी ॥ कार्य करीन जगाचें ॥७१॥

ऐसें वदोनि जगलोचनी ॥ भाष देत करतळींवचनीं ॥ यावरी पाशुपतराया बोलावुनी ॥ चरणावरी घातला ॥७२॥

सूर्यवंशीं वीर्यप्रवाह ॥ वंशमालिका सगुण सर्व ॥ तुष्ट केला सविताराव ॥ मच्छिंद्रानें ते समयीं ॥७३॥

वंशमालिका ऐसी ऐकून ॥ संतुष्ट झाला सवितानारायण ॥ मग आपुला सिद्ध वरुनि स्पंदन ॥ वातचक्रा आव्हानी ॥७४॥

येरीकडे सकळ देव ॥ विमानयानीं गेले सर्व ॥ आपुलालें स्थान अपूर्व ॥ पाहते झाले ते वेळां ॥७५॥

येरीकडे मच्छिंद्रनाथ ॥ कृपें आव्हानूनि पाशुपत ॥ निघता झाला करुनि तीर्थ ॥ राममूर्ती वंदूनिया ॥७६॥

आतां पुढील अध्यायीं कथन ॥ चंद्रागिरि पाहिला ग्राम ॥ तेथें गवरांतूनि गोरक्ष काढून ॥ पुन्हा तीर्थे करील कीं ॥७७॥

नरहरिवंशीं घुंडीसुत ॥ मालू हरीचा शरणागत ॥ पुढिले अध्यायीं उत्तम कर्थेत ॥ निवेदील श्रोतियांसी ॥७८॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥

अष्टमाध्याय गोड हा ॥१७९॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥


श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय ९

श्रीगणेशाय नमः

श्रीगुरुभ्यो नमः ॥ जयजयाजी जगदुद्वारा ॥ अवतारदीक्षाज्ञानेश्वरा ॥ अघटितमायावतारधरा ॥ भिंतीवाहना गुरुराया ॥१॥

रेड्यामुखीं वेदोच्चार ॥ करुनि तोषविले सकळ विप्र ॥ फोडोनि भगवदगीताभांडार ॥ सकळ जनां वाढिलें ॥२॥

ऐसा तूं कविमहाराज ॥ तरी मम कामनेचें धरुनि चोज ॥ ग्रंथार्थी विपुल सुरस ॥ वैखरीतें वदवीं कां ॥३॥

मागिले अध्यायीं कथा सुरस ॥ दिधली भाक मच्छिंद्रास ॥ वर देऊनि वातचक्रास ॥ गमन करिता पैं झाला ॥४॥

आणि श्रीरामाची झाली भेटी ॥ तेणेंही वर ओपूनि शेवटीं ॥ पाशुपतरायाची रामाचे पोटीं ॥ कामना संतुष्ट केली मच्छिंद्र ॥५॥

असो आतां येथूनि मच्छिंद्रनाथ ॥ सप्त मोक्षपुर्‍य पाहूनि त्वरित ॥ अयोघ्या मथुरा अवंतिका यथार्थ ॥ काशी काश्मिरी पाहिलीं ॥६॥

मिथिला प्रयाग गया सुग्ग ॥ तेथें नमूनि विष्णुपदास ॥ अन्य तीर्थे करुनि बंगालदेश ॥ चंद्रागिरीस तो पातला ॥७॥

गांवांत करितां भिक्षाटन ॥ तों सर्वोपकारी दयाळू ब्राह्मण ॥ तयाचे दृष्टी पडतां सदन ॥ झालें स्मरण भस्माचें ॥८॥

मनांत म्हणे याच सदनीं ॥ पुत्रमंत्रसंजीवनी ॥ वरदभस्मी सिद्ध करुनी ॥ दिधली होती निश्वयें ॥९॥

तरी ती साध्वी विप्रजाया ॥ सरस्वती नामें होती जया ॥ सर्वोपकारी दयाळ द्विजभार्या ॥ सुकृत होतें तियेचें ॥१०॥

तरी द्वादश वर्षे लोटल्यापाठीं ॥ पुन्हां मी येईन शेवटीं ॥ ऐसें वदोनि भस्मचिमुटी ॥ सरस्वतीतें दीधली असे ॥११॥

तरी त्या मायेचा शोध करुन ॥ पाहूं तियेचा वरदनंदन ॥ ऐसें हदयीं मच्छिंद्र आणून ॥ सदनामाजी प्रवेशला ॥१२॥

उभा राहूनि विप्रांगणीं । हे सरस्वति ऐसी पुकारी वाणी ॥ तंव ती ऐकूनि शुभाननी ॥ बाहेर आली अति त्वरें ॥१३॥

येतां देखिला योगद्रुम ॥ मग भिक्षा घेऊनी उत्तमोत्तम ॥ म्हणे महाराजा भिक्षान्न ॥ झोळीमाजी स्वीकारीं ॥१४॥

मच्छिंद्र म्हणे वो शोभननी ॥ तव नाम काय तें ऐकूं दे कानीं ॥ येरी म्हणे सरस्वती अभिधानी ॥ लोकोपचारें मज असे ॥१५॥

उपरी मच्छिंद्र बोले तीतें ॥ नाम काय तव भ्रतागतें ॥ येरी म्हणे सर्व त्यातें ॥ दयाळपती म्हणताती ॥१६॥

नाथ म्हणे तुम्ही कवण जाती ॥ गौड विप्र म्हणे ती तैं सरस्वती ॥ ऐसें ऐकूनि खूण चित्तीं ॥ मिळाली तेव्हां नाथाच्या ॥१७॥

मच्छिंद्र म्हणे माये ऐक ॥ दावीं कोठे तव बाळक ॥ येरी म्हणे जी पुत्रमुख ॥ पाहिले नाहीं अद्यापि ॥१८॥

मच्छिंद्र म्हणे बोलसी कां खोटें ॥ म्यां वरदभस्माचीं दिधली चिमुट ॥ भस्म नोहे तें संजीवनीपीठ ॥ पुत्ररुपींचें दर्शवी ॥१९॥

दाखवी परी तो पुत्र कैसा ॥ अजरामर मागें सोडिला कैसा ॥ तेजःपुंज अन्यून अनिळ महेशा ॥ ऐसा पुत्र असेल कीं ॥२०॥

असो भस्मचिमुटी ऐकतां वाणी ॥ खूणयुक्त झाली नितंबिनी ॥ परी भस्मचिमुटीतें उकिरडाभुवनीं ॥ सांडिले अन्याय वाढला ॥२१॥

तेणेंकरुनि जाहली भयग्रस्त ॥ हदयीं संचरला कंपवात ॥ चित्तीं म्हणे आतां हा नाथ ॥ शिक्षा करील मजलागीं ॥२२॥

नेणों शापें करील भस्म ॥ कीं तोडील स्वशक्तीनें माझा काम ॥ कीं तरुरुप हो ऐसा शाप देऊन ॥ सांडूनि जाईल अवनीतें ॥२३॥

आधी मी अल्पबुद्धीपासुनी ॥ घेतल्या आहेत नितंबिनीवाणी ॥ कीं कानफाट्याची विपरीत करणी ॥ अविद्यार्णवी असती ते ॥२४॥

नाटक चेटक कुडे अपार कपट ॥ जाणती दुर्गुण परम पापिष्ट ॥ जाया पाहूनि उत्तम बरवट ॥ स्तुती करिती तियेची ॥२५॥

दिनमानपर्यत कुत्री ॥ उत्तम जया करिती रात्रीं ॥ मग शयनीं घेऊनि शेजपात्रीं ॥ भोग भोगिती दुरात्मे ॥२६॥

ऐसें पूर्वी मज श्रुत ॥ सखियामुखीं श्रवण केलें होतें ॥ परी तोचि बोल समस्त ॥ सत्य होऊं पाहतसे ॥२७॥

तरी आतां कपाळ फुटकें ॥ होणार ते होऊ शके ॥ कानफाट्या करुनि चेटकें ॥ दशा करील कीं माझी ॥२८॥

तरी यातें कवण उपाय ॥ कांहीं सुचेना करुं काय ॥ हा ओळख धरुनि समय ॥ साधूनि आला परतोनि ॥२९॥

ऐसे रीतीं मनीं जल्पत ॥ तरी गात्रें थरथरा कापत ॥ अत्यंत भयाचें भरुनि भरतें ॥ शुद्धि पात्रा सोडिलें तिनें ॥३०॥

यावरी नाथ म्हणे वो जननी ॥ पाहसी काय तूं पिशाचपणीं ॥ पुत्र कोठें तो दावी नयनी ॥ उशीर न लावीं वो माते ॥३१॥

ऐसिया बोलाची होतां दाटी ॥ मग विचारी हदयी गोरटी ॥ कीं यासी वदावी खरी गोष्टी ॥ वृत्तांत जितुका झाला तो ॥३२॥

खरेपणीं आहे वर्म ॥ मिथ्यावादी होय न शर्म ॥ दैवें अन्यायसाफी होऊन ॥ मुक्त होतसे तो प्राणी ॥३३॥

तस्मात् जी खरी सत्यनीती ॥ त्यांत साहते बहु असती ॥ पांचांमुखीं बदूनि श्रीपती ॥ मुक्त करी अन्यायीं ॥३४॥

तस्मात् राहो अथवा जावो प्राण ॥ पुढें येवो कैसें घडून ॥ परी सत्य वाचे खरें भाषण ॥ वृत्तांत झाला तैसा वदूं ॥३५॥

मग चरणीं ठेवूनि भाळ ॥ उभय जोडूनि करकमळ ॥ म्लानमुख दीन विकळ ॥ वृत्तांत सकळ निरोपी ॥३६॥

म्हणे महाराजा क्षमाशीळा ॥ आपण जो कां प्रसाद दिधला ॥ परी अन्याय मजपासूनि झला ॥ भस्म गारी सांडिलें ॥३७॥

सांडिलें म्हणाल काय म्हणून ॥ तरी विश्वासें व्यापिलें नव्हतें मन ॥ भस्मानें पुत्र होईल कोठून ॥ ऐसे म्हणून सांडिले ॥३८॥

शेजारी असती बोलती जन ॥ दारा म्हणती प्रज्ञावान ॥ खरें नाहे निरुपण ॥ केले विचित्र तुजलागी ॥३९॥

तेणें संशय आणूनि मनीं ॥ नेणों कैसी घडेल करणी ॥ जठरीं पेटला कोपवन्ही ॥ तरी आपणचि भोगावा ॥४०॥

अपत्याकरितां परम अहित ॥ परगृहीं मिरवावें कां यथार्थ ॥ म्हणोनि गौप्य धरिलें चित्तांत ॥ समस्ती बदलीसे ॥४१॥

जन्मांत आल्या परोपकार ॥ करावा हें शास्त्रनिर्धारं ॥ न घडेल तरी उपकार ॥ अनुपकार करुं नये ॥४२॥

उत्तम वृक्षाची करावी लावणी ॥ न धडे तरी न टाकावा खंडुनी ॥ धर्म करावा न मेदिनीं ॥ वारुं नये कवणातें ॥४३॥

आपण स्वतां तीर्थासी जावें ॥ न घडे तरी परा न वारावें ॥ विवाहकार्य कदा न मोडावें ॥ आपुली बुद्धी वेंचुनियां ॥४४॥

गौतमीं करुं जातां चोरी ॥ तेथें वेचूं नये वैखरी ॥ तस्करातें मारितां अधिकारी ॥ आड त्यातें होऊं नये ॥४५॥

सुतापाशी पित्याचे अवगुण ॥ सांगूनि न करावें मन क्षीण ॥ सुनेपाशीं सासू हीन ॥ म्हणूं नये कदाचि ॥४६॥

कूप तडाग मळे बागाईत ॥ करतां वारुं नये कवणातें ॥ कोणी कीर्तनासी असतील जात ॥ आड येऊं नयें त्यासी ॥४७॥

आपुली वैखरी वेचल्यांत ॥ होऊं पाहे पराचे अनहित ॥ तरी ते विचारुनि स्वचित्तांत ॥ मौनें कांहीं न बोलावें ॥४८॥

ऐसें जाणोनि सरस्वती ॥ सत्य बोलली ती युवती ॥ कीं महाराजा विश्वास चित्तीं ॥ ठसला नव्हता त्या वेळे ॥४९॥

ऐसिया युक्तीप्रयुक्तीकरुन ॥ भावाभावी दृष्टी वेंचून ॥ जेणें जनाचें होय कल्याण ॥ तोचि अर्थ करावा ॥५०॥

म्हणूनि भस्माचे सांडवण ॥ मज दयाळा घडलें पूर्ण ॥ काय करुं दैवहीन ॥ उपाय तो अपाय झालासे ॥५१॥

कीं वाटे चालतां चाली ॥ धनाची ग्रंथिका पुढें आली ॥ परी दैवहीना बुद्धी संचरली ॥ अंध व्हावें तें समयीं ॥५२॥

कीं कल्पतरुच्या वृक्षाखाली ॥ कल्पिली कल्पना फळा आली ॥ कीं पिशाचवत बुद्धी संचरली ॥ दैवहीना शेवटीं ॥५३॥

तन्न्यायें मातें झालें ॥ आतां क्षमा करावी माउले ॥ अज्ञानापणें उडविलें ॥ हित माझें महाराजा ॥५४॥

परी ही ऐकतां वाणी ॥ मच्छिंद्र खिन्न झाला मनीं ॥ म्हणे स्त्रिया जाती पापरुपिणी ॥ अविश्वासाचें भांडार हें ॥५५॥

हिताहित कदा न जाणती ॥ भलतेसें पद ठेविती ॥ आपण बुडूनि दुसर्‍यास बुडविती ॥ बेचाळीस पूर्वजांसी ॥५६॥

स्त्रियांसंगें लाभ किंचित ॥ कांही दिसेना सकळ अनहित ॥ उगाचि रावे भडाइत ॥ वृषभ जेवीं वनीचा ॥५७॥

उदयापासूनि सायंकाळ ॥ कष्ट अमित होती तुंबळ ॥ एक क्षणही चित्त शीतळ ॥ विश्रांतीतें मिळेना ॥५८॥

या विषयसुखाची परी ॥ मानावी जरी हदयांतरी ॥ तेथें होय स्वशक्तिबोहरी ॥ निर्बळपणी मिरवावें ॥५९॥

ऐसी जीवासी अवस्था होय ॥ मेलिया नरकामाजी जाय ॥ केल्या कर्माचे रुप फेडाया ॥ आचरण कांहीं नसेचि ॥६०॥

शिष्यपाप गुरुनाथा ॥ स्त्रीपाप भोगणें भर्ता ॥ तस्मात् जिकडे तिकडे पाहतां ॥ अनर्थाचें मूळ ती ॥६१॥

तस्मात् स्त्रियांचे बुद्धी लागे जन ॥ तो प्राणी गा प्रज्ञाहीन ॥ महामूर्ख अति मलीण ॥ दुष्कर्माचा भांडारी ॥६२॥

तन्न्यायें मी मूर्ख झालों ॥ या बाईच्या बोलीं लागलों ॥ वरदमंत्रभस्य ओपिलों ॥ सूर्यवीर्या आणोनी ॥६३॥

याउपरी आणीक वर ॥ मंत्रसंजीवनी आहे अमर ॥ सूर्यवीर्ये देहवर ॥ रचिला असेल कोठेंही ॥६४॥

तरी आतां ठाव सांडिला ॥ शोध करुनि पाहूं वहिला ॥ ऐसा मनीं विचार केला ॥ सरस्वतीतें बोलतसे ॥६५॥

म्हणे माय वो ऐक वचन ॥ घडलें घडो दैवयोगानें ॥ तरी सांडिलें भस्म तें ठिकाण ॥ मम दृष्टीसी दावीं कां ॥६६॥

तुजवरी क्षोभ करावा कांहीं ॥ तरी पदरीं कांही पडत नाहीं ॥ तरी सांडिला ठाव माझे आई ॥ निजदृष्टीं दावी कां ॥६७॥

ऐसे बोलतां नाथ वाणी ॥ भय फिटलें मुळींहूनी ॥ प्रांजळ चित्तें शुभाननी ॥ मुखचंद्रा उचंबळी ॥६८॥

म्हणे महाराजा योगद्रुमा ॥ सांडिला ठाव दावित्यें तुम्हां ॥ पुढें चाले उगमा ॥ नाथ जातसे सवें सवें ॥६९॥

तंव तो उकिरडा केर उद्दाम ॥ गोवर पडिला पर्वतासमान ॥ तेथें जाऊनि सुमधुम ॥ नाथाप्रती सांगतसे ॥७०॥

हे महाराजा तपाजेठी ॥ येथें सांडिली भस्मचिमुटी ॥ ऐसें ऐकोनि नाथ होटीं ॥ हांक मारी बालकातें ॥७१॥

हे हरीनारायण प्रतापवंता ॥ मित्रवर्या सूर्यसुता ॥ जरी असशील या गोवरांत ॥ नीघ त्वरित या समयीं ॥७२॥

या गोवरगिरींत नरदेहजन्म ॥ मिरवला असें तूतें उत्तम ॥ तरी गोरक्ष ऐसें तूतें नाम ॥ सुढाळपणीं मज वाटे ॥७३॥

द्वादश वर्षेपर्यंत ॥ बैसलासी गोवरक्षणार्थ ॥ म्हणूनि गोवररक्षक नाम तूतें ॥ पाचारितों स्वच्छंद्रें ॥७४॥

तरी आतां न लावी उशीर ॥ हे गोरक्षनाथा निघे बाहेर ॥ ऐसे वदतां नाथ मच्छिंद्र ॥ बाळशब्द उद्देला ॥७५॥

म्हणे महाराजा गुरुवर्या ॥ गोरक्ष असें मी या ठाया ॥ परी गोवरनगानें गुंफित काया ॥ भार मौळी विराजला ॥७६॥

तेणेंकरुनि शरीरवेष्टण ॥ झालें आहे दडपण ॥ तरी गौरीयातें विचारुन ॥ बाहेर काढीं महाराजा ॥७७॥

ऐसें ऐकूनि बोले उत्तर ॥ लौकरी आणून लोहपत्र ॥ मही विदारुनि नगगौर ॥ बाळतनू काढिली ॥७८॥

काढिली परी ती तनुलता ॥ बालार्ककिरणीं दिसे समता ॥ कीं घनमांदुसी विद्युल्लता ॥ चमक दावी आगळी ॥७९॥

कीं पूर्ण चंद्र प्रकाश पौर्णिमेचा ॥ दिशा उजळे समयीं निशीच्या ॥ तेवी तनुगर्म मदनाचा ॥ जगामाजी मिरवला ॥८०॥

कीं दुसरा ईश तो चक्रधर ॥ त्यजोनि आतां मूर्तिसार ॥ वीट मानूनी क्षीरसागर ॥ म्हणूनि येथें आला असे ॥८१॥

कुंकुमाकार पदपंकज ॥ सकळ आंगोळ्या तेजःपुंज ॥ चंद्राकारसम विराजे ॥ नखें अग्न आंगोळी ॥८२॥

घोटींव सुनीळ अपूर्व देखा ॥ कीं इंद्रनिळाची झळके बिका ॥ मनगटावरी अलौलिका ॥ सकळ पोटरी विराजे ॥८३॥

गुडघ्यावरी जानुस्थळ ॥ जैसे स्तंभ कर्दळीचे उभय सरळ ॥ त्यावरी कटितटा अति निर्मळ ॥ हरिमाजासम जाणावी ॥८४॥

कटीवरती नाभिघाम् ॥ त्यावरतें हदय अति सुगम ॥ सुगम परी विद्याधाम ॥ ऐसेपरी वाटतसे ॥८५॥

सरळ बाहु स्कंधीं शोभत ॥ परी आजानबाहु दिसों येत ॥ तयामाजी जग समस्त ॥ उभ्या कर्दळी मिरवती ॥८६॥

त्यातेंही अंगुळ्या सरळ प्रकाम ॥ तयांअग्रीं नख उग्रतम ॥ चंद्राकृती तेज उत्तम ॥ कोर जैसी द्वितीयेची ॥८७॥

असो स्कंधामाजी ग्रीवा सकळ ॥ घोटितां बीक दावी सकळ ॥ तयावरी हनुवटी निर्मळ ॥ अधरोपरी शोभतसे ॥८८॥

अधर दंत जिव्हेसहित ॥ आनन केवळ चंद्र मूर्तिमंत ॥ परी आनन नोहे धाम निश्वित ॥ वेदधनाचें विराजे ॥८९॥

सरळ नासिका शुकाग्रवत ॥ उभय चक्षु विशाळवंत ॥ चक्षु नव्हेत ते शशिआदित्य ॥ नांदावया पातले ॥९०॥

भाळ विशाळ कबरी भार ॥ कुरळ वरती पिंगटाकार ॥ ऐसा महाराज सर्वेश्वर ॥ उदया आला वाटतें ॥९१॥

द्वादश वर्षे अलोलिक ॥ सर्वगुणी पाहतां बालक ॥ सरस्वतीनें भाळी देख ॥ तर्जनीतें लाविलें ॥९२॥

मनांत म्हणे ती गोरटी ॥ आहा जनीं मीच करंटी ॥ ऐसा पुत्र माझिये पोटीं ॥ येतां दैवें उच्छेदिला ॥९३॥

चित्तीं उठोनि परम तळमळ ॥ नेत्रीं दाटलें अपार जळ ॥ मोहें करपें हदयकमळ ॥ रुदनसंवादा अनुवादी ॥९४॥

तें पाहूनि मच्छिंद्रनाथ ॥ म्हणे खेद कां वो करिसी व्यर्थ ॥ तुझा नव्हता तो सुत ॥ प्राप्त कैसा होईल ॥९५॥

पहा पहा अन्नयोग ॥ श्वान पराचा भक्षितो भाग ॥ परी उलटोनि रसनामार्ग ॥ श्वान दैवें विराजे ॥९६॥

तन्न्यायें मूर्तिमंत ॥ विभाग नसे हा ऐसा सुत ॥ आता शोक करिसी कां व्यर्थ ॥ नवशापविभाग मिरविसी ॥९७॥

तरी जा तूं येथूनी ॥ नाहक घेसील शापवाणी ॥ माझा कोप प्रत्यक्ष अग्नी ॥ ब्रह्मादिकां साहेना ॥९८॥

ऐसी बोलिला क्रूर वार्ता ॥ सरस्वती पावली भय चित्ता ॥ मागें पाऊल ठेवूनि तत्त्वतां ॥ निजसदना पातली ॥९९॥

येरीकडे गोरक्षनाथें ॥ येऊनि वंदिलें गुरुपदातें ॥ मच्छिंद्रनाथ तो प्रसन्नचित्तें ॥ अनुग्रह ओपितसे ॥१००॥

ॐ इति एकाक्षर अक्षर ॥ संबोधीत समग्र ॥ नारायणीं नामोच्चार ॥ मंत्रविधीनें निरोपिला ॥१॥

वरदहस्त ठेवूनि मौळीं ॥ सकळ निवटिली अज्ञानकाजळी ॥ वरदविभूती चर्चूनि भाळीं ॥ मुख कुरवाळी प्रेमानें ॥२॥

मग हस्त धरोनि तत्त्वतां ॥ म्हणे तान्हुल्या ऊठ आतां ॥ महीचे गोचर करुनि तीर्था ॥ हरिपरायणा सकामातें ॥३॥

अवश्य म्हणूनि गोरक्षनाथ ॥ सलीन चरणीं माथा ठेवित ॥ श्रीमच्छिंद्राचा धरुनि हस्त ॥ गमन करिता पैं झाला ॥४॥

चंद्रागिरींस्थान सोडूनि ॥ करिती जगन्नाथीं गमन ॥ तों मार्गी जातां एक ग्राम ॥ कनकगिरि लागला ॥५॥

मच्छिंद्र पाहता ग्राम सुरस ॥ बोलतां झाला गोरक्षास ॥ बा रे प्रारंभ क्षुधेस ॥ जठरामाजी दाटला ॥६॥

कक्षेमाजी घालूनि झोळी ॥ बा रे संचरोनी वस्तिमेळीं ॥ भिक्षा मागूनि ये वेळीं ॥ क्षुधा माझी हरी कीं ॥७॥

अवश्य म्हणूनि गोरक्षनाथ ॥ सत्वर झोळी कक्षे घेत ॥ संचरोनि कनकग्रामांत ॥ भिक्षा मागे घरोघरीं ॥८॥

भिक्षा मागतां अति उद्देशीं ॥ तंव तो गेला एका विप्रगृहासी ॥ तेथें पाहतां ते दिवशीं ॥ पितृश्राद्ध मिरवलें ॥९॥

विप्र करुनियां भोजन ॥ उपरी मागत्यासी देतसे अन्न ॥ ते संधीसी गोरक्ष जाऊन ॥ ‘ अलक्ष ‘ जल्पतसे ॥११०॥

तंव त्या घरची नितंबिनी ॥ महाप्राज्ञिक सुस्वरुपिणी ॥ क्षमाशांतीची लावण्यखाणी ॥ सर्वगुणीं संपन्न ॥११॥

तिनें पाहतां गोरक्षनाथ ॥ भाविती झाली चित्तांत ॥ म्हणे धन्य हें बाळ अतित ॥ चांगुलपर्णी मिरवतसे ॥१२॥

प्रत्यक्ष मातें भासे कैसा ॥ कीं बालर्कतनूचा ओतिला ठसा ॥ कीं हरुनि चपळेचें मांदुसा ॥ महीलागीं उतरला ॥१३॥

परी हा तापसी योगी वरिष्ठ ॥ मातें भासतो योग हा श्रेष्ठ ॥ पूर्वीचा कोणी योगभ्रष्ट ॥ जगामाजी मिरवतसे ॥१४॥

ऐसें जाणूनि लवडसवडी ॥ पात्रीं पदार्थ स्वकरें वाढी ॥ अन्नसामग्री अति तांतडी ॥ घेऊनि आली भिक्षेसी ॥१५॥

खाज्या करंज्या पदार्थ धिवर ॥ पोळी भात शिरा कचोर ॥ मालुपुव्यादि सुकुमार ॥ परम मृदू भक्ष्य तो ॥१६॥

चोटी मुगदळ बुंदी विशेष ॥ पूर्ण पोळिया विस्तीर्ण पात्रास ॥ धान्या पुर्‍या पंच मधुरस ॥ श्रद्धापूर्ण ठेविल्या ॥१७॥

वड्या पातवड्या शाखा बहुत ॥ सौभ्यमठ्ठकाचे द्रोण थरित ॥ कोशिंबिरी आंबेरायतें ॥ बहु भात चटणिया ॥१८॥

कढी सांबारें वडी त्यांत ॥ सार आमटी चणचणीत ॥ नाना द्रोण भरुनि घृत ॥ मेतकुटादि वाढिलें ॥१९॥

मध्यभागीं ठेवूनि भात ॥ त्यावरी वरण कनकवर्णात ॥ तळीं वडे पोखरे दह्यांत ॥ घालोनियां वाढिलें ॥१२०॥

ऐसियापरी षड्रसान्न ॥ घवघवीत पात्र वाढून ॥ श्रीगोरक्षापुढें ठेवून ॥ नमस्कारी प्रीतीनें ॥२१॥

गोरक्ष पाहतां पात्र सुरस ॥ मनीं वाटला परम हर्ष ॥ चित्तीं म्हणे त्या नितंबिनीस ॥ धन्य धन्य माउले ॥२२॥

अहा आम्ही कोठील कोण ॥ नोहे इष्ट सोयरे जन ॥ आम्हासाठीं सिद्ध करुन ॥ पात्र वाढून आणिलें ॥२३॥

पात्र पहा घवघवीत ॥ हें पात्र नोहें यथार्थ ॥ शिवलिंगी शोभला भात ॥ पात्र शाळुंका मिरवली ॥२४॥

नाना पदार्थ अर्थप्रकरण ॥ तें शिवासी अपार सुगम ॥ कीं शिवलाखोली ढांसळून ॥ शाळुंकाते मिरविली ॥२५॥

कीं प्रीतीं पाहतां तो भात ॥ सकळ अन्नाचा प्रभु शोभत ॥ पात्रमहीतें प्रीतीनें बहुत ॥ नाना पदार्थ मिरवलें ॥२६॥

तरी शाक नोहे पुतनावेळ ॥ खाजें मंत्री दिसे सकळ ॥ मौळीं छत्र तेजाळ ॥ वरान्न हें मिरविले ॥२७॥

ऐसा भास भासूनि हदयीं ॥ पात्र कक्षझोळीन ठेवी ॥ आशीर्वचने तोषवूनि बाई ॥ जाता झाला महाराज ॥२८॥

चित्तीं म्हणे उदरापुरतें ॥ प्राप्त अन्न झालें मातें ॥ आतां वेंचूनि स्वकष्टातें ॥ केवीं हिंडावें घरोघरीं ॥२९॥

ऐसा विचार करुनि चित्तीं ॥ येऊनि वंदिलें श्रीगुरुमूर्ती ॥ भिक्षाझोळी ॥ कक्षेंतूनि निगुते ॥ काढूनि ठेवी पुढारां ॥१३०॥

तंव ती प्रत्यक्ष तपोमौळी ॥ विकासूनि पाहे झोळी ॥ तंव तें अन्न सुंदर परिमळीं ॥ निजदृष्टीं देखिलें ॥३१॥

मग तें घेऊनि आपुलेपासीं ॥ भोजन करी योगींद्र तापसी ॥ अन्न स्वादिष्ट रसनेसी ॥ लागतां भक्षी आवडीनें ॥३२॥

मुखामाजी कवळ करितां ॥ रसना न लावी दंतां ॥ म्हणे दे तरकी होतील आतां ॥ लवडसवडी लोटीतसे ॥३३॥

जठरभांडारीं भरुनि भरतें ॥ आणीक इच्छे नाहीं पुरतें ॥ परी सर्व पदार्थ कामनायुक्त ॥ वंडा प्रिय मिरवला ॥३४॥

परी पदार्थ अपूर्वपणीं ॥ कामना येथें राहिली मनीं ॥ कीं वडा आणीक असतां भोजनीं ॥ चांगुलपणा मिरवितो ॥३५॥

ऐसी चित्तीं कल्पना आणून ॥ पाहता झाला गोरक्षवदन ॥ तों सच्छिष्य ओळखून ॥ बोलता झाला गुरुसी ॥३६॥

म्हणे महाराजा तपोधना ॥ कवण कामना आली मना ॥ तो अर्थ उघड दावूनि वचना ॥ आम्हां कार्या निरोपावें ॥३७॥

येरु म्हणे गोरक्षनंदना ॥ कामना वेधली माझिया मना ॥ आणिक वडा असता भोजना ॥ तृप्त चित्तीं मिरवतों ॥३८॥

ऐसें ऐकोनि गुरुचें चोज ॥ म्हणे गुरुराजा महाराज ॥ आतांचि वडा आणूनि सहज ॥ तुम्हांप्रती देईन मी ॥३९॥

ऐसें म्हणूनि तात्काळिक ॥ उठता झाला तपोनायक ॥ विप्रगृहीं येऊनि देख ॥ मारी हांक गोरक्ष तो ॥१४०॥

म्हणे माय वो माय आतां ॥ आणिक वडा दे तत्त्वतां ॥ मम गुरुची कामना असे चित्ता ॥ तृप्ती अस्तातें पावेना ॥४१॥

तंव ते बोले नितंबिनी ॥ आलासी गुरुचें निमित्त करोनी ॥ परी सकामसविता स्वेच्छापणीं ॥ हदयापात्रीं हेलावे ॥४२॥

मातें दावूनि गुरुभक्ती ॥ कामने करुं पाहसी तृ[ती ॥ तस्मात् सकळ अर्थ कळूं आला चित्तीं ॥ मजलागीं जाण पां ॥४३॥

येरु म्हणे जननी ऐसें ॥ कामनीं वेधलें नाहीं मानस ॥ गुरुइच्छा कामउद्देश ॥ पाहूं आलों त व ठाया ॥४४॥

तंव ती बोले विप्रनंदिनी ॥ गुरुअर्थ काम मी ॥ वेधली म्हणतोसी तरी प्राज्ञी ॥ वन माजें ऐकावें ॥४५॥

अगा मम भक्तीचे प्रसंगेंकरुन ॥ तूतें दिधलें पहा वाढून ॥ पुन्हां आलासी मागून ॥ तरी तें नाहीं फुकाचें ॥४६॥

येरु म्हणे तरी त्यास ॥ काय लागतें सांग आम्हांस ॥ तेंचि देऊनि तूतें खास ॥ वडे जाण इच्छितों ॥४७॥

येरी म्हणे गुरुभक्ती ॥ मातें दावूं पावलासी शक्ती ॥ परी वडे अन्नावरते पाहिजेत ॥ डोळा काढूनि देई कां ॥४८॥

येरु म्हणे काय कठिण ॥ चक्षुकामनीं वेधलें मन ॥ तरी चक्षु आतां देईन जाण ॥ उशीर नसे या कार्या ॥ ॥४९॥

ऐसें बोलुनि केलें कौतुका ॥ तत्काळ अंगुळी अनामिका ॥ चक्षुद्वारी घालोनि देखा ॥ बाहेर काढिलें बुबुळातें ॥१५०॥

बुबुळगोळ वामकरतटी ॥ ठेवितां लोटला रुधिर पाटी ॥ जैसा नगीं झरा लोटीं ॥ अकस्माद उदभवलासे ॥५१॥

कीं मांदारनदी स्वर्गीहुनी ॥ उत्तरे मनकर्णिकेचे जीवनीं ॥ तन्न्यायें चक्षुद्वाराहूनी ॥ लोटे लोटला रुधिराचा ॥५२॥

म्हणावी ती रुधिर नोहे शक्ती ॥ दाखवूं पातली गुरुभक्ती ॥ विप्रकामना पात्र भरुनि ॥ जीवनभागीरथी दाविली ॥५३॥

कां ते जाया हेलनभाव ॥ ती सागराची मिरवली ठेव ॥ तदर्थ जीवनभागिरथीराव ॥ गोरक्षनगीची आणिली असे ॥५४॥

असों ऐसें तेणें रुधिरा ॥ लोट लोटला महीवरा ॥ तें पाहूनि चिंतातुरा ॥ प्रेमें जाया मिरवली ॥५५॥

रुधिर वाहतां भडभडाट ॥ महीं लोटला रक्तपाट ॥ खंडणा नोहे परम अचाट ॥ भूषण मिरवी लोकातें ॥५६॥

तरी तो पाहतां रुधिरपाट ॥ नोहे धरादेवीचा शुद्ध मळवट ॥ भाळीं चर्चूनि कुंकुमपाट ॥ भूषण मिरवी लोकांतें माजी परतली ॥५८॥

चित्तीं म्हणे हा अहाहा कैसें ॥ बोलतां झालें विपर्यासें ॥ धन्य हा एक शिष्य असे ॥ जगामाजी मिरवला ॥५९॥

अहा कैसें केलें धैर्यपण ॥ बोलतांचि काढिला जेणें नयन ॥ परी ती व्यापूनि भयसंपन्न ॥ म्लानवदन मिरवली ॥१६०॥

मग वडे घेऊनि सातपांच ॥ देऊं पातली लगबगें साच ॥ पुढें ठेवूनि वदे वाचे ॥ ऐक्याथें करी भावार्थ ॥६१॥

उपरी जोडूनि उभय पाणी ॥ विनंती करी म्लानवदनीं ॥ म्हणे महाराजा सहजबाणी ॥ शब्द माझा उदेला ॥६२॥

परी उदय होतां न लावितां वेळ ॥ तुम्ही बाहेर काढिलें बुबुळ ॥ परी मम अन्यायी शब्द केवळ ॥ क्षमापात्रीं मिरवणें ॥६३॥

तुम्ही कृपाळू संपूर्ण ॥ बैमतां अंगीं क्लेश धरुन ॥ परी तितुकें दुःख पराकारण ॥ देऊं ऐसें वाटेना ॥६४॥

कीं कमळ करी अस्तसमयीं ॥ घ्यावया विद्रा इच्छा घेत हदयी ॥ परी तें दुःखप्रवाही ॥ कदाकाळी मिरवेना ॥६५॥

शेवटीं आपण पावोनि मरण ॥ परातें कळिके सुख ओपून ॥ राहे तन्न्यायें करुन ॥ तुम्ही संत आहाती ॥६६॥

उपरी बोले गोरक्षनाथ ॥ तूं किमर्थ झालीस भयभीत ॥ वडे अन्न तत्प्राप्त्यर्थ ॥ चक्षु दिधला म्यां आपुला ॥६७॥

तरी तूं भयभीत न होई सकळ ॥ स्वकरीं माझें विराजे बुबुळ ॥ येरी म्हणे तपस्वी स्नेहाळ ॥ कृपा करीं मजवरी ॥६८॥

इतुकें देऊनि मातें दान ॥ बुबुळासहित नेईजे अन्न ॥ आपुलें कार्य संपादून ॥ क्षमा वाढवीं आमुतें ॥६९॥

ऐसें ऐकूनि गोरक्षनाथ ॥ म्हणे तूं न होई भयभीत ॥ बुबुळासह वडे अन्नातें ॥ घेऊनियां चालिलो ॥१७०॥

चक्षूसी आडवोनि पदर ॥ जावोनि उभा राहिला गुरुसमोर ॥ वाचे बोले नम्रोत्तर ॥ इच्छा पूर्ण करा जी ॥७१॥

परी तो कनवाळु मच्छिंद्रनाथ ॥ सच्छिष्याचें मुख पाहत ॥ तंव वसनपदर चक्षूवरतें ॥ घेऊनियां मिरवला ॥७२॥

तें पाहूनि चक्षुवसन ॥ म्हणे चक्षू झांकिला केवीं वसनें ॥ येरु म्हणे उगेच करुन ॥ चक्षु वसनें धरियेला ॥७३॥

मनांत कल्पी गोरक्षनाथ ॥ जरी मी यातें करीं श्रुत ॥ तरीं धिक्करुनि वडे अन्नासहित ॥ दुःखप्रवाहीं मिरवेल ॥७४॥

जेसा श्रावणाचा अंतकाळ ॥ ऐकतां न सेविती वृद्ध तेथें केवळ ॥ तन्न्यायें येथें केवळ ॥ दुःखसरिता लोटेल ॥७५॥

म्हणूनि पुसतां गुरुंनीं वचन ॥ बोले श्रीगुरुतें गौप्य धरुन ॥ सहजस्थिती चक्षुवसन ॥ धरिलें असें महाराजा ॥७६॥

येरु म्हणे बा मुखकमळा ॥ प्रत्यक्ष पाहूं दे माझिया डोळां ॥ येरु म्हणे गुरुस्नेहाळा ॥ भोजन झालिया दाखवीन ॥७७॥

मी तों असतां सहजस्थिती ॥ कीं परी उगलाच नयन केउतगती ॥ ठणका उठला चक्षुप्रती ॥ आला की काय कळेना ॥७८॥

तरी तें दावूनि चक्षुद्वार ॥ परम दिसेल अपवित्र ॥ किळस बाधील भोजनोत्तर ॥ चक्षु पहावा महाराजा ॥७९॥

येरु म्हणे बा न घडे ऐसें ॥ आधीं पाहुनि तव मुखास ॥ नंतर सारुं भोजनास ॥ दुःख तुझें हरोनियां ॥१८०॥

जरी तूं करिसी अनमान ॥ तरी प्रत्यक्ष गोमांसमान ॥ मानीन हें अन्न निश्वय जाण ॥ चक्षु आधीं दावी कां ॥८१॥

ऐसें ऐकतां निर्वाणवचन ॥ गोरक्ष बोले श्रीगुरु कारण ॥ कीं मागूं गेलों वडेअन्न ॥ कथा झाली ती ऐका ॥८२॥

जया घरीं वडेअन्न तेथील सद्भक्ति आहे कामिन ॥ तिनोंचे प्रथम दिधलें अन्न ॥ मागूनि गेलों दुसर्‍यानें ॥८३॥

तुमची इच्छा काम दावून ॥ म्यां मागितले बडेअन्न ॥ तंव ती बोलली मजकारण ॥ गुरुभक्त म्हणविसी ॥८४॥

तरी तूं काढूनि देई डोळा ॥ मग वडे देईन बाळा ॥ ऐसे बोलतां तर्जनी बुबुळा ॥ खोवूनियां काढिलें ॥८५॥

तरी हा अन्याय घालूनि पोटीं ॥ मातें करावी कृपादृष्टी ॥ ऐसें ऐकतां तपोजेठी ॥ परम चित्तीं तोषला ॥८६॥

मग चक्षुरद्वाराहूनि वसन ॥ हस्तें काढी मछिंद्रनंदन ॥ तो रुधिरप्रवाह अति दारुण ॥ चक्षुद्वारा येतसे ॥८७॥

मग बोले मच्द्रिनंदन त्यातें ॥ बुबुळ कोठें सांग मातें ॥ येरु काढूनि स्वहस्तें ॥ गुरुनाथा दर्शवी ॥८८॥

मग तो प्रतापी योगद्रुम ॥ मंत्रसंजीवनी आराधोनि नेम ॥ सवितातेज बुबुळधामी ॥ मंत्रप्रयोगी स्थापिलें ॥८९॥

पूर्णमंत्राचा होतां पाठ ॥ बुबुळ संचरले चक्षुकपाट ॥ मग पूर्वस्थितीहूनि अचाट ॥ तेजालागीं मिरवलें ॥१९०॥

मग अंकीं येऊनि गोरक्षनाथ ॥ स्वकरें मुख कुरवाळीत ॥ म्हणे धन्य धन्य बा महिंत ॥ तूंचि एक सच्छिष्य ॥९१॥

मग त्यासी घेऊनि अंकावरी ॥ सच्छिष्यासह भोजन करी ॥ परी धैर्यशक्तींची अपार लहरी ॥ मच्छिंद्रदेहीं मिरवतसे ॥९२॥

झालिया सांगोपांग भोजन ॥ गोक्षरकासी बोले मच्छिंद्र जाण ॥ बा रे तव भक्ति पाहून ॥ परम चित्तीं संतोषलों ॥९३॥

तरी मजपासींचें विद्याधन ॥ हदयीं साठवीं ठेवून ॥ मग अस्त्रविद्या दत्रात्रेयदेणे ॥ सकळ तूते निरोपीन ॥९४॥

कवित्वविद्या साबरी सबळ ॥ तीही विद्या अर्पिली सकळ ॥ एक मास करुनि वस्तीस्थळ ॥ विद्येचा अभ्यास केला पैं ॥९५॥

असो आतां निरुपण ॥ पुढले अध्य़ायीं धुंडीनंदन ॥ मालू सांगेल श्रोत्यांकारण ॥ नरहरिप्रसादेंकरुनियां ॥९६॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ स्मंत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ नवाध्याय गोड हा ॥१९७॥

अध्याय ९ ॥ ओव्या ॥१९७॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

॥ नवनाथभक्तिसार नवमाध्याय समाप्त ॥


श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय १०

श्रीगणेशाय नमः

वक्रतुंड गणाधिपती ॥ विद्यार्णवा कळासंपत्ती ॥ भक्तवरदा हरिसी आर्ती ॥ मंगळमूर्ती गजानना ॥१॥

जयजयाजी आदिनाथा ॥ मायाचक्रचालका अनंता ॥ सर्वाधीशा भगवंता ॥ साक्षात् अक्षय मोक्ष तूं ॥२॥

तरी मागिले अध्यायीं निरुपण ॥ श्रीगोरक्षाचा पावोनि जन्म ॥ उपरी सेवूनि कनकगिरी ग्राम ॥ विद्यार्णवी तो केला ॥३॥

तरी ती विद्या कोण कैसी ॥ सकळ कळा श्लोकराशी ॥ भविष्योत्तरपुराणासी ॥ निरोपितों श्रीश्रोतियां ॥४॥

श्लोक ॥ ब्रह्मज्ञान रसायन कविता ॥ वेद शास्त्र ज्योतिष तथा ॥ व्याकरण धनुर्धर ॥ जलतरंगता ॥ संगीत काव्य अकरावें ॥५॥

अश्वारोहण कोकशास्त्र निपुण नाट्य तथा चार ॥ चतुर्दश विद्यांचा सागर ॥ पूर्णपणें भरलासे ॥६॥

टीका ॥ प्रथम सांगून ब्रह्मज्ञान ॥ स्वमुखीं केल्या परायण ॥ विश्व आणि विश्वंभर दोन भावचि ॥ ऐसा नुरविला ॥७॥

कीं बहुत जे अर्थप्रकार ॥ जीवजंतु चराचर ॥ तो ऐक्यमेळीं सकळ विस्तार ॥ मीच ऐसें भाविलें ॥८॥

कर्माकर्म सत्कर्मराशी ॥ त्या नुरल्याचि कोणीही बीजांकुराशीं ॥ वासना देऊनि योगफांसीं ॥ कामनेते नुरवितो ॥९॥

ऐशा एकमेळें करुन ॥ गोरक्ष झाला सनातन ॥ एवंच सकळ ब्रह्मज्ञान ॥ उपदोशिलें गुरुनाथें ॥१०॥

मग पूर्णपणाचें पात्र होऊनी ॥ वसुधेकल्प अव्यक्त भुवनीं ॥ सर्व आत्मरुप माननी ॥ तत्स्वरुपीं प्रगटेल ॥११॥

याउपरी वातापित्तकफहारक ॥ रसायनविद्या सकळिक ॥ किमया करणें धातु अनेक ॥ हातवटी सांगितली ॥१२॥

कवित्व रसाळ नवरस ॥ गणादि निरोपी दीर्घ र्‍हस्व ॥ व्यक्त अर्थलिंगप्रकरणास ॥ व्यक्ताव्यक्त सांगितलें ॥१३॥

याउपरी वेदाध्ययन ॥ सूक्तऋचेंत केला प्रवीण ॥ दीर्घर्‍हस्वें छंदें निपुण ॥ स्वस्ति छंदीं अवघे गुण पैं केला ॥१४॥

ऋक् अथर्वण यजुर्वेद ॥ सामवेदादि सांगूनि प्रसिद्ध ॥ उपरि विद्या ज्योतिषसिद्ध ॥ परिपूर्ण सांगितली ॥१५॥

सारस्वत किरात कोश ॥ कौमुदी रघु हरिवंश ॥ पंच काव्यें मीमांस ॥ साही शास्त्रें निवेदिलीं ॥१६॥

यावरी धनुर्धरविद्यानिपुण ॥ सकळ शस्त्रीं केला प्रवीण ॥ तीं सकळ अस्त्रें कोण कोण ॥ नामें तयांचीं ऐकिजे ॥१७॥

वातास्त्र आणि जलदास्त्र ॥ उभीं उभी कामास्त्र ॥ वाताकर्षण बळ स्वतंत्र ॥ पर्वतास्त्र सांगितलें ॥१८॥

वज्रास्त्र वासवशक्ति ॥ नागास्त्र खगेंद्र संजीवनी ती ॥ ब्रह्मास्त्रादि निवारणशक्ती ॥ रुद्रास्त्र सांगितलें ॥१९॥

विरक्तास्त्र दानवास्त्र ॥ पवनास्त्र आणि कालास्त्र ॥ स्तवन महाकार्तिकास्त्र ॥ स्पर्शविभक्तास्त्र निवेदिलें ॥२०॥

यावरी साबरीविद्या कवित्व ॥ प्रत्यक्ष करुनि सकळ दैवत ॥ तयांचा वरदपाणी निश्वित ॥ गोरक्षमौळीं मिरवला ॥२१॥

तीं दैवतें कोण कोण ॥ बावन्न वीर असती जाण ॥ नरक कालिका म्हंमदा उत्तम ॥ महिषासुर आराधिला ॥२२॥

झोटिंग वेताळ मारुती ॥ अस्त्रवीर मद्रपती ॥ मूर्तिमंत सीतापती ॥ वरदमौळीं स्पर्शीतसे ॥२३॥

परम जादरीं आलिंगून ॥ श्रीराम घेत चुंबन ॥ म्हणे होई सनातन ॥ कीर्तिध्वज मिरविजे ॥२४॥

यावरी प्रत्यक्ष गजवदन ॥ तोहि उतरला सहस्त्रकिरण ॥ गोरक्षातें अंकीं घेऊन ॥ वरदमौळी स्पर्शीतसे ॥२५॥

यावरी अष्टभैरव उग्र ॥ तेही पातले तेथें समग्र ॥ सिद्धभैरवादि काळभैरव सांग ॥ बाळभैरवादि पातले ॥२६॥

वीरभैरवादि गणभैरव ॥ ईश्वरभैरव रुद्रभैरव ॥ भस्मभैरवादि महादेव ॥ अपर्णापति पातला ॥२७॥

तेणें घेऊनि अंकावरतें ॥ मुख कुरवाळिलें वरदहस्तें ॥ खेळतां बाबर धांवोनि येती ॥ तेही देती आशीर्वचन ॥२८॥

मुंडा चामुंडा शंखिनी डंखिनी ॥ कुंड रंडा भालंडा यक्षिणी ॥ चंडा वंडिका प्रत्यक्ष येऊनी ॥ वर गोरक्षा देती त्या ॥२९॥

यावरी प्रगटूनि जलदैवत ॥ तेव्हा त्यातें वर ओपीत ॥ कुमारी धनदा नंदा विख्यात ॥ देखता त्या गोमट्या ॥३०॥

लक्ष्मी प्राज्ञा बाला बगला ॥ नववी दैवत प्रत्यक्ष विमला ॥ ऐशा जलदेवता येऊनि तत्काला ॥ वर ओपिती बाळातें ॥३१॥

यावरी प्रत्यक्ष अष्टसिद्धी ॥ होऊनि वर ओपिती वरमादी ॥ आणिमा गरिमा विशाळबुद्धी ॥ महिमा प्रकामें पातली ॥३२॥

प्रथिमा प्राची वशित्वा सातवी ॥ तेवीं ती सिद्धी महादेवी ॥ सज्ज करुनि अस्त्रकार उभवी ॥ अष्टसिद्धी तत्काळ त्या ॥३३॥

असो बावन्न वीरांसहित ॥ श्रीराम सूर्य जाहला प्राप्त ॥ सर्वत्र ओपूनि मौळी हस्त ॥ विद्या करीं ओपिती ॥३४॥

असो वर देऊनि सद्विद्येसी ॥ सर्वत्र बंदिती मच्छिंद्रासी ॥ म्हणती महाराजा गोरक्षासी ॥ तपालागीं बैसवीं ॥३५॥

तपीं होआं अनुष्ठान ॥ तेणे बळ चढे पूर्ण ॥ मग ही विद्या तपोधन ॥ लखलखीत मिरवेल ॥३६॥

जैसें खडग शिकले होतां ॥ मग भय काय तें शत्रु जिंकितां ॥ तेवीं तपोंबळ आराधितां ॥ सामर्थ्य सत्ता वाढेल ॥३७॥

ऐसें वदोनि सकळ देव ॥ पाहते झाले आपुलाले गांव ॥ रामसूर्यादि महादेव ॥ बावन्न वीरादि पैं गेले ॥३८॥

यावरी इंद्र वरुण अश्विनी ॥ गणगंधर्वादि पातले भुवनीं ॥ वर देती तयालागुनी ॥ सकळ गेले स्वस्थाना ॥३९॥

याउपरी कोणे एके दिवशीं ॥ गोरक्ष घोकितां सद्विद्येसी ॥ मंत्रसंजीवनी पाठ मुखासी ॥ करीत बैसला होता तो ॥४०॥

जवळी नसतां मच्छिंद्रनाथ ॥ बैसला होता एकांतांत ॥ तों गांवचीं मुलें खेळत खेळत ॥ तया ठायीं पातलीं ॥४१॥

हातीं कवळूनि कर्दमगोळा ॥ मुलें खेळती आपुलें मेळां ॥ तों गोरक्षापासीं येऊनि आगळा ॥ बोल बोलती सकळीक ॥४२॥

म्हणती गोरक्षा ऐक वचन ॥ आम्हीं आणिला बहुत कर्दम ॥ तरी शकट करुनि दे उत्तम ॥ आम्हालागी खेळावया ॥४३॥

येरु म्हणे शकट मजसी ॥ करुं येत नाहीं निश्वयेंसी ॥ येत असेल तुम्हां कोणासी ॥ तरी करुनि कां घ्या ना ॥४४॥

ऐसें ऐकतां मुलांनी वचन ॥ करीं कर्दम कवळून ॥ आपुलालें करें करुन ॥ शकट रचिती चिखलाचा ॥४५॥

कर्दमचक्र काष्ठ व्यक्त ॥ शकट केला यथास्थित ॥ वरीं उदेलें कल्पनेंत ॥ शकटा सारथी असावा ॥४६॥

म्हणूनि कर्दम घेऊनि गोळा ॥ मुलें रचिती कर्दमपुतळा ॥ परी तो साधेना मुलां सकळां ॥ मग गोरक्षातें विनविती ॥४७॥

म्हणती गोरक्षा आम्हांप्रती ॥ साह्य देई शकटसारथी ॥ आम्हां साधेना कर्दमनीती ॥ तरी तूं करुनि देईं कां ॥४८॥

अगा तूं सगळ मुलांचे गणी ॥ वयोवृद्ध अससी प्राज्ञी ॥ तरी आम्हांसी सारथी करुनी ॥ सत्वर देई खेळावया ॥४९॥

ऐसें ऐकतां मुलांचें वचन ॥ म्हणे कर्दम आणूनि द्या देतों करुन ॥ परी ही वासना भविष्यकारण ॥ गोरक्षाते उदेली ॥५०॥

जैसे ज्याचे पूर्वानुक्रम ॥ तैसी बुद्धि येत घडून ॥ जेवीं बीज पेरिल्या समान ॥ तोचि तरु हेलावे ॥५१॥

पहा मातेच्या द्वेषउद्देशी ॥ ध्रुव बैसला अढळपदासी ॥ तेसेंचि वासनालेशीं ॥ क्षीरोदधि उपमन्या ॥५२॥

कीं गांधारींचा होता अंत ॥ म्हणूनि पार्था सुचला अर्थ ॥ अकिंचन तो वायुसुत ॥ ध्वजस्तंभी मिरवला ॥५३॥

कीं सीतासतीच्या उद्देशीं ॥ लंकेमी राहिली येऊनि विवशी ॥ तिनें भक्षुनि दशाननासी ॥ राक्षसकुळ भक्षिलें ॥५४॥

पहा अनुसर्गकर्म कैसें ॥ त्याचि राक्षसीं वंशलेशें ॥ चिरंजीव होऊनि लंकाधीश ॥ भोग भोगी विभीषण ॥५५॥

तस्मात् बोलावयाचें हेंचि कारण ॥ बुद्धि संचरे पूर्वकर्माप्रमाण ॥ पुढें उदयाते करभंजन ॥ येणार होते महाराज ॥५६॥

नवनारायण करभंजन परम ॥ उदय पावणार गहन नाम ॥ म्हणूनि गोरक्षा इछाद्रुम ॥ चित्तधरेतें उदेला ॥५७॥

मग हातीं घेऊनि कर्दमगोळा ॥ रचिता झाला उत्तम पुतळा ॥ परी रसने पाठ संजीवनी आगळा ॥ होत असे मंत्राचा ॥५८॥

त्यांत विष्णुवीर्य उपचार ॥ पीपयूमांडणी जल्पत स्मर ॥ एवंविधि संजीवनीमंत्र ॥ पाठ होता गोरक्षा ॥५९॥

मुखीं पाठ हस्तें पुतळा ॥ पूर्णपणीं होतां कर्दमगोळा ॥ महाभागीं भाग सबळा ॥ व्यक्त असे तत्त्वांचा ॥६०॥

तेणेंकरुनि पंचभूत ॥ दृश्यत्व पावले संजीवनीअर्थ ॥ करमंजन ते संधींत ॥ प्रेरक झाला जीवित्वा ॥६१॥

अस्थिमांस त्वचेसहित ॥ अकार दृश्य झाला त्यांत ॥ पुढें शब्द आननांत ॥ अकस्मात उदेला ॥६२॥

उदय होता करी रुदन ॥ तें पाहिलें सकळ बाळांनीं ॥ म्हणती भूत आणिलें गोरक्षांनी ॥ पळा पळा येथूनियां ॥६३॥

ऐसें बोलतां एकमेकांत ॥ सकळ होऊनि भयभीत ॥ सांडूनि खेळ सकळ अर्थ ॥ पळूनि गेलें वातगती ॥६४॥

हदयीं दाटूनि भयकांपरा ॥ मुलें कांपती थरथरां ॥ आरडत बरडत मच्छिंद्र आधारा ॥ पळोनियां पैं गेलीं ॥६५॥

ऐशापरी मुलें भयग्रस्त ॥ तें पाहूनि मच्छिंद्रनाथ ॥ मग पाचारुनि सकळ मुलातें ॥ आश्वासूनि पुसतसे ॥६६॥

म्हणे बाळां होय थरथराट ॥ का रे कांपतां सांगा वाट ॥ येरी मुळाहूनि सकळ बोभाट ॥ मच्छिंद्रातें निवेदिला ॥६७॥

म्हणे कर्दमाचा शकटसारथी ॥ करवीत होतों गोरक्षाहातीं ॥ तों बालतत्त्वपणीं भूतमती ॥ कर्दम लोपूनि संचरली ॥६८॥

तें भूत अद्यापि आहे लहान ॥ परी क्षणैक होईल स्थूळवटपण ॥ आम्हांलागी करील भक्षण ॥ म्हणूनियां पळालों ॥६९॥

परी आम्ही आलों येथें पळून ॥ मागूनि गोरक्षनाथ येत होता धांवून ॥ त्यासी भक्षिलें असेल भूतानें ॥ यांत संशय नसेचि ॥७०॥

मच्छिंद्र ऐसी ऐकूनि वार्ता ॥ साशंकित झाला चित्ता ॥ चित्तीं म्हणे मुलें वार्ता ॥ सांगती काय तें नोहे ॥७१॥

अवचट भूत कैसें व्यापिलें ॥ तें पाहूनि बाळ भ्यालें ॥ तरी आतां जाऊनि नहिलें ॥ गोचर करावे निजदृष्टीं ॥७२॥

मग आश्वासूनि सकळ मुलां ॥ निकट बैसवूनि पुसे त्यांला ॥ कोणत्या ठायीं संचार झाला ॥ भूताचा तो मज सांग ॥७३॥

येरी म्हणती बावा ऐक ॥ भूत तेव्हां होतें बाळक ॥ आतां थोर फोडोनि हांक ॥ भक्षील आम्हां वाटतस्से ॥७४॥

मच्छिंद्र म्हणे मी असतां ॥ तुम्हां भय नसे सर्वथा ॥ चला जाऊं भूतासीं आतां ॥ शिक्षा करुं आगळी ॥७५॥

मुले म्हणती मच्छिंद्रनाथ ॥ तुम्ही जाऊं नका तेथ ॥ बालर्ककिरण आहे भूत ॥ तुम्हां भक्षील तेचि घडी ॥७६॥

मच्छिंद्र म्हणे दुरुन ॥ दाखवा भूताचा ठिकाण ॥ मग तीं बाळें अवश्य म्हणोन ॥ दुरुनी ठाव दाविती ॥७७॥

यापरी इकडे गोरक्षनाथ ॥ तोही पळाला होऊनि भयग्रस्त ॥ मुलाचें मंडळ सांडूनि एकांतीं ॥ लपोनियां बैसला ॥७८॥

भूत भूत ऐसें म्हणून ॥ मुलें पळालीं आरोळ्या देऊन ॥ तेव्हांचि गेला होता पळून ॥ भूतभयेंकरोनियां ॥७९॥

ठाव लक्षूनि परम एकांत ॥ बैसला होता शुचिष्मंत ॥ परी हदय धडधडीत अत्यंत ॥ भूत येईल म्हणोनियां ॥८०॥

येरीकडे मच्छिंद्राते ॥ ठाव दाविती मुलें समस्त ॥ परी दूरचि असती यत्किंचित ॥ सन्निध न येत भयानें ॥८१॥

जैसा राजभयाचा तरणी ॥ लखलखीत मिरवत असतां अवनीं ॥ मग दुष्कृत चोर जार जारणी ॥ दर्शनार्थ ते न येती ॥८२॥

कीं रामनामबोधोत्तर ॥ असतां भूत न ये समोर ॥ कीं पीयूषीं विपदृष्टिव्यवहार ॥ कदाकाळीं चालेना ॥८३॥

तन्न्यायें मुलें भिऊन ॥ दुरुनि दाविती मच्छिंद्रा ठिकाण ॥ म्हणती याचि ग्रामांतून ॥ भूत प्रगट जाहलें ॥८४॥

मग त्या ग्रामांत मच्छिंद्रनाथ ॥ मुलें दावितां सधट जात ॥ तों बाळ टाहा आरडत ॥ महीलागीं उकिरडा ॥८५॥

बालार्ककिरणी तेज लकाकत ॥ मुखीं टाहा टाहा वदत ॥ तें पाहूनि मच्छिंद्रनाथें ॥ करभंजन ओळखिला ॥८६॥

हदयीं धरुनि लबडसवडी ॥ बाळ उचलोनि घेतला आवडीं ॥ मग लगवगी गांवाबाहेर अतितांतडीं ॥ बाळासह पावला ॥८७॥

तें सकळ मुलें पाहूनी ॥ पळतीं झालीं प्राण घेऊनि ॥ म्हणे नाथांनी भूत धरोनी ॥ आणिलें आतां बरें नसे ॥८८॥

आतां त्या भूतासी देईल सोडून ॥ मग तें आपल्या पाठीसी लागून ॥ एकएकासी भक्षील धरुन ॥ ऐसें म्हणून पळताती ॥८९॥

पळता पडती उठूनि जाती ॥ भयेंकरुनि सांदींत दडती ॥ हदयीं धडधडा अर्थार्थ चित्तीं ॥ लपोनियां बैसला ॥९०॥

येरीकडे बाळ घेऊन ॥ गोरक्षा पाहे मच्छिंद्रनंदन ॥ सदनीं सदनीं हांका मारुन ॥ गोरक्षातें पुकारी ॥९१॥

परीं ज्या सदनी जाय जती ॥ ते सदनींचीं मुलें आरडूनि उठती ॥ आई आई बया बया म्हणती ॥ आणिक पळती पुढारां ॥९२॥

परी सदनींसदनींचे जन ॥ नाथा पुसती हाटकून ॥ भय काय दाविलें मुलांकारण ॥ म्हणूनि आरडूनि पळताती ॥९३॥

कोणाचें मूल घेवोनि ॥ फिरतां तुम्ही सदनी सदनी ॥ येरी म्हणे गोरक्ष नयनी ॥ पाहेन तेव्हां सांगेन ॥९४॥

ऐसें बोलूनि पुढें जात ॥ तों पातला गोरक्ष होता जेथ ॥ उभा राहोनि अंगणांत ॥ गोरक्षातें पाचारी ॥९५॥

ऐकूनि श्रीगुरुची वाणी ॥ गोरक्ष निघाला सदनांतुनी ॥ परी येतांचि बाळ पाहिला नयनी ॥ पुन्हां आरडूनि पळे तो ॥९६॥

हा विषर्यास पाहुनि नयनीं ॥ मच्छिंद्र विचारी आपुले मनीं ॥ गोरक्ष व्यापला भयेकरुनी ॥ बाळ येथें ठेवावें ॥९७॥

मग स्वगिरींचे काढूनि वसन ॥ त्यावरी निजविलें बाळरत्न ॥ मग त्या सदनीं संचरुन ॥ गोरक्षापासीं पातला ॥९८॥

जातां कवळूनि धरिले हदयीं ॥ म्हणे वाहसी व्यर्थ भयप्रवाहीं ॥ तें भूत नाहें मनुष्यदेहीं ॥ करभंजन उदेला ॥९९॥

परी तयाची उदयराहाटी ॥ सांग जाहली निर्भय पोटीं ॥ येरी म्हणे मुलांसाठी ॥ खेळत होतो महाराजा ॥ ॥१००॥

हाति घेऊनि कर्दमगोळा ॥ पूर्णपणीं रचिला पुतळा ॥ परी नेणों कैशी झाली कळा ॥ भूत त्यांत संचरलें ॥१॥

लोपूनि सकळ कर्दमनीती ॥ दिसूं आलीं मानवाकृती ॥ तेणें भय व्यापूनि चित्तीं ॥ पळालों मी मुलांसह ॥२॥

यावरी मच्छिंद्र बोले वाणी ॥ तूतें सांगितली संजीवनी ॥ तो मंत्र घोकितां क्षणीं ॥ करीत होतासी काय तूं ॥३॥

येरी म्हणे आज्ञा तुमची ॥ भंगिली नाहीं शपथ पायांची ॥ खेळतां वाणीं मंत्राची ॥ सांडिलीं नाहीं महाराजा ॥४॥

कर्दमपुतळा करितां हातीं ॥ परी मंत्र सांडिला नाहीं उक्तीं ॥ चुकलों नाहीं शिक्षेहाती ॥ ओपू नका गुरुनाथा ॥५॥

ऐसी ऐकतां गोरक्षवाणी ॥ मच्छिंद्र तोषला आपुले मनीं ॥ म्हणे बा बरी केली करणीं ॥ ऊठ आतां वेगेंसी ॥६॥

मुख कवळूनि चुंबन घेत ॥ हास्य मानूनि कुरवाळीत ॥ म्हणे होई आतां स्वस्थ ॥ चाल वेगीं पाडसा ॥७॥

येरी म्हणे गुरुनाथा ॥ तुम्हीं आणिलें आहे भूता ॥ तें मज खाईल प्रांजळ आतां ॥ बाहेर नेऊं नका जी ॥८॥

मच्छिंद्र म्हणे ऐक मात ॥ हें बाळ नसे रे भूत ॥ तुवा घोकोनि संजीवनीत ॥ मनुष्यपुतळा तो झाला ॥९॥

जैसा गौरउकिरडां स्थान ॥ बाळ झालासी उत्पन्न ॥ त्याच नीती खेळतां कर्दम ॥ बाळ उदयातें आलें हो ॥११०॥

ऐसी ऐकतां गुरुगोष्टी ॥ म्हणे भूत नोहे तपीजेठी ॥ मच्छिंद्र म्हणे भय पोटीं ॥ सांडीं मनुष्य तें असे ॥११॥

ऐसें ऐकूनि प्रांजळ मत ॥ मग श्रीगुरुचा धरुनि हात ॥ बाळ होतें चीरपदरांत ॥ तयापासी पातले ॥१२॥

बाळ उचलोनि मछिंद्रनाथ ॥ आपल्या शिबिरा घेऊनियां जात ॥ गोदुग्ध आणूनि पान त्वरित ॥ ते बाळका पैं केलें ॥१३॥

यावरी वसनझोंळी करुन ॥ आंत घातला गहिनीनंदन ॥ यावरी तया गावींचें जन ॥ शिबिरापाशीं पातले ॥१४॥

नाथचरणीं अर्पूनी माथा ॥ पुसती हे नाथ समर्था ॥ बाळ कोणाचें हालवितां ॥ श्रवण करु इच्छितो ॥१५॥

मग झाला वृत्तांत मच्छिंद्रनाथ ॥ तयां ग्रामस्थां निवेदित ॥ तो ऐकूनि सकळ वृत्तांत ॥ आश्चर्य करिती क्षणोक्षणीं ॥१६॥

म्हणे धन्य धन्य संजीवनी ॥ हा कलींत उदेला उशनामुनी ॥ परी त्याही प्रत्यक्ष सर्वगुणी ॥ नाथ मच्छिंद्र वाटतो ॥१७॥

पहा पहा हा गुरुदैत्य ॥ शवशरीरा सावध करीत ॥ परी त्या म्हणाया जडदेहस्थ ॥ जीवदशा व्यापीतसे ॥१८॥

तरी तैसा नोहे मच्छिंद्रनाथ ॥ कदंमपुतळा केला जिवंत ॥ तस्मात् शुक्र तो त्या तुलनेंत ॥ सहस्त्रभागी दिसेना ॥१९॥

तरी उशना न म्हणूं संमती ॥ द्वितीय ब्रह्मा पातला क्षितीं ॥ तीही संमत गौण चित्तीं ॥ मच्छिंद्रभाग्य दिसतसे ॥१२०॥

पहा पहा विधिराज ॥ उत्पन्न करी जगा सहज ॥ तरी मूळ त्यांत असे बीज ॥ बीजासमान रुख होय ॥२१॥

यावरी आणिक दुसरा अर्थ ॥ विधी स्वअंगें उत्पत्ति करीत ॥ तैसा नोहे मच्छिंद्रनाथ ॥ शिष्याहाती करविला ॥२२॥

महाबीजावीण जाण ॥ कर्दमी केला मनुष्य उत्पन्न ॥ तस्मात् धन्य विधीहून ॥ मच्छिंद्रनाथ मिरविला ॥२३॥

ऐसें परस्परें भाषण ॥ करिती गांवींचे सकळ जन ॥ यावरी बोलती नाथाकारण ॥ नाथानिकट बैसूनियां ॥२४॥

म्हणती महाराजा प्रतापतरणी ॥ बाळाचे कष्ट करुं जाणे जननी ॥ ती तों बाळका न दिसे करणी ॥ गैवीनंदन हा असे ॥२५॥

पहा बाळाचे कष्ट उत्कृष्ट ॥ पुरुषा होईनात ते नाथा श्रेष्ठ ॥ तरी यासी धर्मजननी वरिष्ठ ॥ करुनि द्यावी महाराजा ॥२६॥

तीतें बाळक करीं अर्पण ॥ करील तयाचें संगोपन ॥ तुम्हांलागीं कष्ट दारुण ॥ होणार नाहीत महाराजा ॥२७॥

ऐशी ऐकतां जगाची वाणी ॥ मान तुकावी मच्छिंद्रमुनि ॥ म्हणे बा ते धर्मजननी ॥ कोणती करावी महाराजा ॥२८॥

ऐसें बोलतां मच्छिंद्रनाथ ॥ विचार करिताती ग्रामस्थ ॥ तों ग्रामामाजी विप्रगृहांत ॥ मधुनामा नांदतसे ॥२९॥

तयाची कांता लावण्यखाणी ॥ पतिव्रता धर्मपत्नी ॥ सत्य संचित सर्वज्ञानी ॥ ज्ञानकळा पै असे ॥१३०॥

नामें कौतुका असे गंगा ॥ निर्मळपणीं असे अभंगा ॥ पतिसेवे अंतरंगा ॥ जगामाजी मिरवली ॥३१॥

उदरीं नाहीं संतति ॥ तेणें विव्हळ प्रेम चित्तीं ॥ संततीविण कामगती ॥ संसार ते वेदना ॥३२॥

सदा वाटे हुरहुर ॥ लोकांचे पाहूनि किशोर ॥ चिंत्ती पाहूनि चिंत्ती गहिर ॥ साशंकित होताती ॥३३॥

नाना यत्न संततीसाठीं ॥ करुनि बैसले होते जेठी ॥ उपाय न चाले परम कष्टी ॥ जगामाजी मिरविला ॥३४॥

ऐसे असतां उभय जन ॥ तों दैवें उदेला ॥ मांदुसाकारण ॥ ग्रामस्थांकरीं तयाचें स्मरण ॥ अकस्मात पैं झालें ॥३५॥

जैसा द्रोणाचा विषमकाळ ॥ निवटावया उदेला उत्तम वेळ ॥ सहजखेळीं गांधारी बाळ ॥ विटी कूपांत पडियेली ॥३६॥

कीं रत्नांची होणें उत्पत्ती ॥ म्हणोनि देवदानवमती ॥ अब्धिमंथनी उदेली चित्तीं ॥ एकभावेंकरुनियां ॥३७॥

तन्न्यायें मधुविप्राचें ॥ दैव उदेलें जगमुखें साचें ॥ म्हणूनि स्मरण निघालें त्याचें ॥ मान्य पडलें सर्वांसी ॥३८॥

मग मच्छिंद्रनाथा विनवणी करुन ॥ म्हणती महाराजा मधुब्राह्मण ॥ तयाची कांता परम सगुण ॥ ज्ञानकळा असे कीं ॥३९॥

तो वोपूनि बाळ गोमट ॥ तेथेचि होईल पूर्ण शेवट ॥ पुत्रार्थिया परम अनिष्ट ॥ दिवस असती महाराजा ॥१४०॥

ऐसी ऐकूनि मच्छिंद्रबाणी ॥ लावण्यराशी ॥ सदगुणवर्या जगासी ॥ नाथ पाहतांच ते चित्तासी ॥ ओळखिलें हदयांत ॥४२॥

मनांत म्हणे मच्छिंद्रनाथ ॥ उत्तम जागीं दिसून येत ॥ सकळ जग मान देत ॥ तस्मात् श्रेष्ठ आतां हे ॥४३॥

जो जगामाजी आहे भला ॥ तो तैसाचि परलोकां ठेला ॥ जो जगीं जाय मानवला ॥ परलोकीं मानवला तोचि एक ॥४४॥

आणिक भविष्य अवश्य जाण ॥ अर्थाअर्थी करी गमन ॥ मग कौतुकात्रें जवळ घेऊन ॥ बाळ ओटी ओपीतसे ॥४५॥

म्हणे माय वो माय ऐक ॥ हा बाळ आहे वरदायक ॥ नवनारायणांतील एक ॥ करभंजन मिरवला ॥४६॥

याचें होता संगोपन ॥ फेडील दृष्टीचें पारण ॥ जगामाजी स्थूलवट मान ॥ पुत्र तुझा मिरवेल हा ॥४७॥

म्हणसील हा होईल कैसा ॥ तरी कीर्तिध्वज मित्र जैसा ॥ कीं देवकीचा हरि जैसा ॥ वंद्य असे जगातें ॥४८॥

माय मी काय सांगू गहन ॥ या बाळाचें चांगुलपण ॥ मूर्तिमंत याचे सेवेकारण ॥ कैलासपती उतरेल गे ॥४९॥

तयाची निवटूनी अज्ञानराशी ॥ हा अनुग्रह होईल तयासी ॥ आणूनि ठेवील निवृत्तिपदासीं ॥ निवृत्तिनामें मिरवुनी ॥१५०॥

म्हणे हा अयोनि संभवला ॥ जगामाजी सहज गे मिरवला ॥ परी अति शहनीं नाम याला ॥ गहनी ऐसें देई कां ॥५१॥

यावरी आणिक सांगतों तुजसी ॥ आम्ही जातों तीर्थस्नानासी ॥ उपरी फिरुनि द्वादशवर्षी ॥ गोरक्षबाळ येईल गे ॥५२॥

तो यातें अनुग्रह देऊन ॥ माय गे करील सनातन ॥ परी तूं आता जीवित्व लावून ॥ संगोपनें करी याचे ॥५३॥

यावरी बोले कौतुकें सती ॥ कीं महाराजा योगमूर्ती ॥ बाळ ओपिलें माझे हातीं ॥ परी संशय एक असे ॥५४॥

तुम्ही द्वादश वरुषां आला परतोन ॥ बाळ न्याल कीं मजपासून ॥ मग कैसें जननीपण ॥ जगामाजी मिरवावें ॥५५॥

मग केल्या कष्टाचें आचरण ॥ मज मिरवेल कीं भाडायितपण ॥ तरी प्रांजळपणीं आतांचि वचन ॥ मजप्रती सांगिजे ॥५६॥

पहा पहा जी आशाबद्ध ॥ सकळ जग असे प्रसिद्ध ॥ तरी इच्छा प्रांजळ शुद्धबुद्ध ॥ एकभागीं लावा जी ॥५७॥

तुम्हां आशा असेल याची ॥ तरी तैशीच गोष्टी सांगायाची ॥ मग नाथ गोष्टी ऐकूनि तिची ॥ प्रांजळ वजन बोलतसे ॥५८॥

माये संशय सांडूनि मनीं ॥ बाळ न्यावें आपुलें सदनीं ॥ माझी आशा बाळालागुनी ॥ गुंतत नाहीं जननीये ॥५९॥

तरी तुज तुझा लाभो सुत ॥ प्रांजळपणीं मिरवो जगांत ॥ तूं माय हा सुत ॥ लोकांमाजी बोलतील ॥१६०॥

मी आणि माझा शिष्य ॥ गुंतणार नाही या आशेस ॥ हा बाळ तुमचा तुम्हांस ॥ लखलखीत बोलतों ॥६१॥

परी गोरक्ष अनुग्रह देईल यासी ॥ पुढें जाईल तीर्थस्नानांसी ॥ तूं सांभाळ तुजपाशीं ॥ चिरंजीव असो हा ॥६२॥

ऐसें बोलूनि ग्रामस्थांतें ॥ शपथपूर्वक साक्षसहित ॥ निर्मळपणीं करुनि चित्त ॥ कौतुकसदनीं बोलवी ॥६३॥

मंत्रें चर्चूनि विभूति माळा ॥ मोहनास्त्र घातलें गळां ॥ कौतुकें स्पर्शीत हदयकमळा ॥ पयोधरीं पय दाटतसे ॥६४॥

मग तें बाळ लावोनि स्तनीं ॥ गांवींच्या आणूनि सुवासिनी ॥ पालखांत घातलें प्रेमेंकरुनी ॥ गहनी नाम स्थापिलें ॥६५॥

यावरी मच्छिंद्र कांहीं दिवस ॥ तया ग्रामीं करुनि वास ॥ मग सवें घेऊनि गोरक्षास ॥ तीर्थस्नाना ॥ चालिला ॥६६॥

पुसूनि सकळ ग्रामस्थांसी ॥ निघता झाला गौरवेंसी ॥ मार्ग लक्षूनि तीर्थस्नानासी ॥ बद्रिकाश्रमीं जातसे ॥६७॥

परी मार्गी चालतां वाटोवाट ॥ श्रीगोरक्षाची घेऊनि पाठ ॥ कार्यरुपी कार्य घेऊनि अलोट ॥ परीक्षेतें पाहतसें ॥६८॥

नंतरी ते पाहतां परी विषम अशी ॥ विषम दिसती सर्व कार्यासी ॥ मग मच्छिंद्र विचार करी मानसीं ॥ तप पूर्ण नसे या ॥६९॥

मुळींच पदरी पैसा नसतां ॥ कीं दान मिरवी दांभिका व्ययसा ॥ तेवीं मंत्रहेतु तपोलेशा ॥ विना विषम आहे हा ॥१७०॥

तरी आतां बदरिकाश्रमीं ॥ बद्रीकेदार उभा स्वामी ॥ तया हातीं गोरक्ष ओपूनी ॥ तयालागीं रुझवावा ॥७१॥

ऐसा विचार करुनि चित्तीं ॥ उभयतां हिंडलें नाना तीर्थी ॥ मग लक्षूनि हिमाचलमार्गाप्रती ॥ बदिकाश्रमाप्रती पैं गेलें ॥७२॥

गेले परी तेथील कथन ॥ पुढिले अध्यायीं होईल श्रवण ॥ अर्थ धरुनि अपूर्ण ॥ स्वीकार करावा श्रोत्यांनीं ॥७३॥

तुम्ही विचक्षण श्रोते संत ॥ सदा तुमचा धुंडीसुत ॥ सेवेलागीं अर्थी प्राणांत ॥ ग्रंथ आदरीं मिरवितसे ॥७४॥

तुमचे कृपेचें लेवूनि भूषण ॥ नरहरिवंश पूर्ण ॥ कवि मालू धुंडीनंदन ॥ संतगणीं मिरवला ॥७५॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ दशामाध्याय गोड हा ॥१७६॥

अध्याय ॥१०॥ ओव्या ॥१७६॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

॥ नवनाथभक्तिसार दशमाध्याय समाप्त ॥


श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय ११

श्रीगणेशाय नमः

जयजयाजी इंदुशलाका ॥ मुगुटमणे सकळटिळका ॥ इंदिरापते विबुधजनका ॥ भक्तिमानसा विराजित ॥१॥

ऐसा धैर्यऔदार्यवंत ॥ पुढें बोलवी भक्तिसारग्रंथ ॥ मागिले अध्यायीं गहिनीनाथ ॥ जन्मोदय पावला ॥२॥

यावरी गोरक्ष मच्छिंद्रनाथ ॥ महीचीं तीर्थे करीत ॥ हिमाचल बद्रिकेदारात ॥ भ्रमण करीत ॥ हिमाचल बद्रिकेदारात ॥ भ्रमण करीत पैं गेले ॥३॥

इतुकी कथा सिंहावलोकनीं ॥ पूर्वाध्यायात कीजे श्रवणी ॥ असो गुरुशिष्य बद्रिकाश्रमीं ॥ शिवालया पातले ॥४॥

बद्धांजळी जोडोनि कर ॥ करिते झाले नमस्कार ॥ नमस्कार करुनि जयजयकार ॥ स्तुतिसंवादें आराधिलें ॥५॥

हे त्रिपुरारी शूळपाणी ॥ अपर्णावर पंचाननी ॥ रुंडमाळा चिताभस्मी ॥ दिव्यतेजभूषित तूं ॥६॥

हे कामांतका दक्षतेजा ॥ भोळवट वरां देसी दानवां ॥ कैलासपते महादेवा ॥ सदाशिवा आदिमूर्ते ॥७॥

हे दिगंबरा जगजेटीं ॥ भाळीं गंगा मौळीं जटाजूटी ॥ नरकपाळ करसंपुटीं ॥ इंदुकळेतें मिरविशी ॥८॥

उरगवेष्टन कुरंगसाली ॥ व्याघ्रांबर वसनपाली ॥ गजचार्मादि मिति झाली ॥ परिधाना महाराजा ॥९॥

हे कैलासवासा उमापती ॥ दक्षजामाता आदिमूर्ती ॥ चक्रचालका मायाभगवती ॥ आम्हां दासां अससी तूं ॥१०॥

हे नीलग्रीवा आदिपीठ ॥ करुणकारा उत्तमा श्रेष्ठ ॥ स्वीकारुनि सर्व अरिष्ट ॥ सुख देसी देवांसी ॥११॥

हे भाळदृष्टित्रार्थनयनी ॥ डमरु त्रिशूळ विराजे पाणीं ॥ सदा प्रिय वृषभ वाहनीं ॥ भस्मधारणी महाराजा ॥१२॥

हे स्मशानवासी वैराष्यशीळा ॥ नगजामात रक्षमाळा ॥ श्वेतवर्णा तमोगुणा आगळा ॥ वाहसी गळां राममंत्र ॥१३॥

हे सर्वाधीश विश्वपती ॥ भिक्षाटणी बहुत प्रीती ॥ जटा पिंगटा त्रिपुंड्र लल्लाटीं ॥ शुद्ध वीरगुंठी शोभतसे ॥१४॥

फरशांकुश डमरु हातीं ॥ लोप पापा पातोपातीं ॥ षडाननताता सुत गणपती ॥ विद्यालक्षणीं मिरविसी ॥१५॥

ऐसी स्तुति अपार वचनीं ॥ करीत मच्छिंद्र बद्रिकाश्रमीं ॥ स्तुति ऐकूनि प्रेमें उगमी ॥ प्रगट झाला महाराज ॥१६॥

मग मच्छिंद्राचा धरुनि हस्त ॥ सप्रेम त्यातें आलिंगित ॥ निकट बैसवूनि पुसे त्यातें ॥ योगक्षेम कैसा तो ॥१७॥

गोरक्षातें घेऊनि जाळी ॥ मुख स्वकरें कुरवाळी ॥ म्हणे बा उदय येणें काळीं ॥ हरिनारायण झालासी ॥१८॥

ऐसें वदोनी आणिक वदत ॥ हें महाराज मच्छिंद्रनाथ ॥ हा तव शिवयोगें सुत ॥ तारक होईल ब्रह्मांडा ॥१९॥

म्यां पूर्वीच यातें पाहिलें होतें ॥ म्हणशील तरी कनकगिरीतें ॥ तुवां अभ्यासूनि सुतें ॥ आणिल दैवत घरातें ॥२०॥

श्रीराम नरसिंह सूर्य हनुमंत ॥ भैरव काळिका वीरांसहित ॥ पाचारितां मीही तेथ ॥ आलों होतों महाराजा ॥२१॥

तस्मात् पूर्वीची होय ओळखी ॥ म्हणवूनि गोरक्ष घेतला अंकीं ॥ परी आतां असो शेखी ॥ एक वचन ऐकिजे ॥२२॥

यातें विद्येतें अभ्यासिलें ॥ परी तपाविण विगलित ठेलें ॥ जैसें शत्रु जगत्रयीं झाले ॥ मग तें हीनत्व प्रतापा ॥२३॥

कीं जीवनाविण वृक्ष जैसा ॥ काळरुप भासे तैसा ॥ कीं तरुविण ग्राम जैसा ॥ बुभुक्षित लागतसें ॥२४॥

कीं नाकेंविण सुंदर नारी ॥ कीं विनातोय सरितापात्रीं ॥ कीं नक्षत्राविण शोभा रात्रीं ॥ कदाकाळी दिसेना ॥२५॥

तरी तपाविण लखलखीत ॥ विद्याभांडार न दिसत ॥ जैसा मानव परम क्षुधित ॥ विकळ शरीरीं मिरवतसे ॥२६॥

तरी आतां माझिया आश्रमीं ॥ तपा बैसवीं योगद्रुमी ॥ मग तपबळानें बलाढ्यगामी ॥ विद्याअस्त्रें मिरवेल हा ॥२७॥

याउपरीं मच्छिंद्रनाथ बोलत ॥ वय धाकुटें बाळ अत्यंत ॥ परी तप तीव्रक्लेशांत ॥ साहिलें जाईल कैसें जी ॥२८॥

येरु म्हणे वरदपाणी ॥ तुझ्या आहे मौळिस्थानीं ॥ तरी तपक्लेशावर कडसणी ॥ दुःख देणार नाहीं बा ॥२९॥

यापरी येथें नित्यनित्य ॥ मी समाचारीनें गोरक्षातें ॥ तूं निःसंशय सकलातें ॥ तपा गोरक्षा बैसवीं ॥३०॥

ऐसें वदतां आदिनाथ ॥ अवश्य मच्छिंद्रनंदन म्हणत ॥ उत्तम आहे ऐसें बोलत ॥ अंगिकारिता पैं झाला ॥३१॥

तेथें आमुचें काय हरलें ॥ कीं जन्मांधा चक्षू आलें ॥ कीं सदैव हरिणीतें सांभाळिले ॥ एकटपणीं पावसांत ॥३२॥

तेंवी तूं आणि तुझा दास ॥ येथें आश्रमीं करितां वास ॥ तेथें वाईट काय आम्हांस ॥ चिंता माझी निरसेल ॥३३॥

ऐसी शिवातें बोलूनि वाणी ॥ परी हर्ष न माये मच्छिंद्रमनीं ॥ जें योजिलें होतें अंतःकरणीं ॥ तेचि घडूनि पैं आलें ॥३४॥

फारचि उत्तमोत्तम झालें ॥ गोरक्षासी शिवें अंगिकारिलें ॥ आतां जाईल संगोपिलें ॥ अर्थाअर्थी बहुवसें ॥३५॥

मग उत्तम वेळा उत्तम दिवस ॥ ग्रहबळ जाणूनि नक्षत्रास ॥ उत्तम तिथी उत्तम मास ॥ पाहूनि तपा बैसविला ॥३६॥

लोहाचा करुनि कंटक नीट ॥ त्या अग्रीं योजूनि चरणांगुष्ठ ॥ वामपादा देऊनि कष्ट ॥ उभा राहिला गोरक्ष तो ॥३७॥

वायुआहारीं ठेवूनि मन ॥ क्षणिक अन्न त्यजून ॥ उपरी फळपत्रीं आहार करुन ॥ क्षुधाहरण करीतसे ॥३८॥

सूर्यमंडळीं ठेवूनि दृष्टी ॥ तपो करीतसे तपोजेठी ॥ तें मच्छिंद्र पाहूनि निजदृष्टीं ॥ परम चित्तीं तोषिला ॥३९॥

मग आदिनाथा विनवोनी ॥ मच्छिंद्र निघाला तीर्थाटनी ॥ द्वादश वर्षांचा नेम करुनी ॥ गोरक्षातें सांगितले ॥४०॥

असो मच्छिंद्र गेला तीर्थाटनी ॥ येरीकडे बद्रिकाश्रमीं ॥ रात्रंदिवस बद्रिकाशूळपाणी ॥ जवळी जाऊनि बैसला ॥४१॥

वस्यें आपण आदिनाथ ॥ गोरक्षाचें दास्य करीत ॥ मागें पुढें राहूनि अत्यंत ॥ आल्या विघ्ना निवटीतसे ॥४२॥

असो यावरी मच्छिंद्रनाथ ॥ गया प्रयाग करुनि त्वरित ॥ काशी अवंतिका मिथुळासहित ॥ मथुरा काश्मिरी पाहिली ॥४३॥

अयोध्या द्वारका महाकाळेश्वर ॥ सोमनाथ करुनि तत्पर ॥ ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर ॥ घृणेश्वर पाहिला ॥४४॥

भीमाउगमीं भीमाशंकर ॥ आंवढ्या नागनाथादि पंढरपूर ॥ करुनि चौदा पीठें थोर ॥ भगवतीची पाहिली ॥४५॥

कार्तिक शेषाद्रि मल्लिकार्जुन ॥ सरितासरोवरीं अपार स्नान ॥ घडलें करितां महीतें गमन ॥ लोटलीं वर्षे द्वादशादि ॥४६॥

सकळ तीर्थे महीची करुन ॥ शेवटीं सेतुबंधीं जाऊन ॥ रामेश्वराचे चरण वंदून ॥ स्नाना गेला अब्धीसी ॥४७॥

तों श्वेतबंधीं वायुसुत ॥ जाऊनि नमी मच्छिंद्रनाथ ॥ परी मच्छिंद्रा पाहतां मकरध्वजतात ॥ आल्हादला चित्तीं बहुत तो ॥४८॥

परमप्रीतीं लबडसवडी ॥ मच्छिंद्रहस्त धरुनि ओढी ॥ हदयीं आलिंगूनि परम आबडीं ॥ निकट बैसवी महाराजा ॥४९॥

म्हणे बा तूं योगद्रुमानें ॥ कोणीकडे केलें येणें ॥ चोवीस वर्षी तुझें दर्शन ॥ आजि झालें महाराजा ॥५०॥

कीं आळशावरी गंगा वळली ॥ कीं द्वादश वर्षे पर्वणी आली ॥ तैसी माते गोष्ट जाहली ॥ आज दर्शनें तुझ्या बा ॥५१॥

ऐसें बोलूनि वायुसुत ॥ परम मच्छिंद्राचें आतिथ्य करीत ॥ मग समय पाहूनि संतोषयुक्त ॥ मच्छिंद्रातें बोलतसें ॥५२॥

आज चोवीस संवत्सर झाले ॥ परी तुजकडे माझे चक्षु लागले ॥ कैं भेटसील म्हणोनि भुकेले ॥ पारणें फिटलें आजि तें ॥५३॥

हे महाराज योगुद्रुमा ॥ कामनीं वेधली जो आम्हां ॥ त्या सरिताप्रवाहीं हस्तवर उगमा ॥ बुडवितो मजलागीं ॥५४॥

तरी त्या कामनाजळांत ॥ तूं तारक झाला आहेसी मातें ॥ झालासी परी अद्यापपर्यंत ॥ बाहेर न काढिसी महाराजा ॥५५॥

पूर्वी मजला देऊनि वचन ॥ तुवां केलें आहे गमन ॥ परी स्त्रीराज्याचें स्थान ॥ पाहिलें तुवां नाही कीं ॥५६॥

आतां तरी धरुनि चित्तीं ॥ प्रसन्न करी कृपाभगवती ॥ मैनाकिनीची कामरती ॥ पूर्ण आहुति घेई कां ॥५७॥

आपुले वचनेंकरुनि त्याचें ॥ आणिक फल दे मम वचनाचें ॥ मग पावूनि आर्त मनीचे ॥ सुटका केव्हां होईल ॥५८॥

मी गुंतलो तिचे वचनीं ॥ कीं मच्छिंद्र पाठवीन ये भुवनीं ॥ तरी ते रतिसुखाच्या कामाश्रमीं ॥ मच्छिंद्रनाथा मिरविजे ॥५९॥

ऐसें वचन तीतें व्यक्त ॥ आहे तरी मज करां मुक्त ॥ आणि तुवांही वचन दिधलें मातें ॥ तेंही सत्य करीं आतां ॥६०॥

ऐसी ऐकूनि हनुमंतवाणी ॥ अवश्य म्हणे च्छिंद्रमुनी ॥ मग त्रिरात्र तेथें वस्ती करुनी ॥ निघते झाले उभयतां ॥६१॥

मार्गी जातां अनेक तीर्थे ॥ यथाविधि झाले सरिते ॥ मग गौडबंगाला टाकूनि त्वरितें ॥ स्त्रीराज्यांत संचरलें ॥६२॥

तंव ती सकळ स्त्रियांची स्वामिनी ॥ विराजलीसे राज्यासनीं ॥ महापुण्यांशें तपोखाणी ॥ मैनाकिनी ज्ञानकळा ॥६३॥

शृंगारमुरड उत्तमजन ॥ तेथें भोगीतसे राज्यासन ॥ गज वाजी उदधी रत्न ॥ रथ उष्ट्रादि असती पैं ॥६४॥

छडीदार चोपदार ॥ रत्नपारख हेमकार ॥ राउतपूर्ण भांडार ॥ पोतदार फरासी ॥६५॥

यंत्रधारी मंत्रधारी ॥ नानामंत्री असती कुसरी ॥ शास्त्रनिपुण कारभारी ॥ लेखकही सेवा विराजले ॥६६॥

जासुद हलकारे वकीलात ॥ करुं जाणती सकळ समंतात ॥ पायदळ अश्वराउत ॥ नसे गणित पृतनेतें ॥६७॥

कुत्तेवान चित्तेवान ॥ साकरखाणी पहिलवान ॥ दिवाणादि कपिलखान ॥ गजमस्तकीं रुढती ॥६८॥

खिस्मतगारी करणार ॥ सिकारकी बंडीदार ॥ ताशा मरफी पनवाळ थोर ॥ कुशळपणीं वाजविती ॥६९॥

गायक हेर बातमीदार ॥ खेळक प्राज्ञी निपुणतर ॥ वाद्यधारी शृंगारकर ॥ शिंपी कुल्लाल विराजले ॥७०॥

असो ऐसी राजकारणें ॥ बहुत असती कामें भिन्नें ॥ परी सकळ समुदायकानें ॥ स्त्रिया अवध्या मिरवल्या ॥७१॥

असो अवघ्या कटकांत ॥ संचरते झाले उभयतां नगरांत ॥ राजद्वारी जाऊनि त्वरित ॥ झाले दृष्टीस रायासी ॥७२॥

दृष्टीं पाहतांच अंजनीसुत ॥ स्त्रियांसी आनंद झाला बहुत ॥ बोलावूनि त्वरितात्वरित ॥ कनकासनीं बैसविलें ॥७३॥

एकासनीं मच्छिंद्रनाथ ॥ एकासनीं अंजनीसुत ॥ षोडशोपचारीं पूजूनि त्वरित ॥ बद्धांजली केली तैं ॥७४॥

म्हणे महाराजा दिव्यरथा ॥ वातनंदना अंजनीसुता ॥ द्वितीय कोण सांग आतां ॥ आगमन झालें महाराजा ॥७५॥

येरु म्हणे वो शुभाननी ॥ त्वां बैसूनि तया प्राज्ञी ॥ तरी त्या तपाच्या कामना मनीं ॥ पूर्ण करीं आतां वो ॥७६॥

मम भक्तीचे वरदावळीं ॥ कीं पुरुष लाधशील मच्छिंद्र बळी ॥ तरी तोचि हा होय येणें काळीं ॥ रतिसुखा निववावें ॥७७॥

कीं सेवेलागी उडुगणनाथ ॥ कीं अरुणासह पूर्ण आदित्य ॥ तेवीं तूतें मच्छिंद्रनाथ ॥ काम व्यक्त पुरवावया ॥७८॥

कीं शचीलागीं सहस्त्रनयनी ॥ कीं शोभला जैसा शिव अपर्णी ॥ तेवीं तूतें मच्छिंद्र्मुनी ॥ रतिसुखा हेलावें ॥७९॥

ऐसें बोलोनि वज्रशरीरी ॥ निवांत बैसला आसनावरी ॥ मग राहूनि तेथें तीन रात्रीं ॥ निघता झाला कपिराज ॥८०॥

पुन्हां श्वेतपदा येऊन ॥ करीत बैसला श्रीरामचिंतन ॥ येरीकडे मच्छिंद्रनंदन ॥ सुखामाजी हेलावे ॥८१॥

बैसूनियां कनकासनीं ॥ राज्याविलासा भोगी मुनी ॥ मुक्तमाळा ग्रांवेलागुनी ॥ हेलावती समोर ॥८२॥

हेममुद्रिका ओपूनि कर्णी ॥ हस्त विराजले कनकोंदणी ॥ भरजरी भूषणें हेमकर्णी ॥ ढाळ देती लखलखीत ॥८३॥

पुढें सेवे परिचारिका ॥ परी त्याही दारा लावण्यलतिका ॥ उर्वशीच्या सारुनि आवांका ॥ सेवेलागीं उतरल्या ॥८४॥

वडीजाई बडीदार ॥ वारंवार करिती पुकार ॥ छडीदार चोपदार ॥ दवलतजादा म्हणताती ॥८५॥

मुक्तलवगांचे तुरे माळी ॥ कस्तुरी शोभे केशर भाळीं ॥ राज्यासनीं स्त्रियामंडळी ॥ सुशोभित भंवतालीं ॥८६॥

जैसा नभांत तारांगणीं ॥ वेष्टित शोभला उडुगणस्वामी ॥ तेवीं स्त्रियांत मच्छिंद्र मुनी ॥ निजभारीं शोभला ॥८७॥

कीं देवगणीं शचीनाथ ॥ परम शोभिवंत घवघवीत ॥ तेवीं स्त्रीमंडळींत ॥ मच्छिंद्रनाथ मिरवला ॥८८॥

सदा बैसूनि एका आसनीं ॥ खेळ खेळती द्यूतकर्मी ॥ नाना विनोदून विनोदवाणी ॥ हास्य करिती गदगदां ॥८९॥

राज्यवैभवादि कारभार ॥ स्वयें करिती सारासार ॥ नानाकुशलता अपार ॥ निजदृष्टीं पाहतसे ॥९०॥

रसायनीं कविताकार ॥ वेदज्ञ बोलती शास्त्र अपार ॥ ज्योतिष भविष्य जाणणार ॥ व्याकरणादिक मिरवले ॥९१॥

धनुर्धर युद्धशास्त्री प्रबळ ॥ कीं भिन्न पाहती प्रळयकाळ ॥ जळ तें निर्मील विशाळ ॥ उभे असती सन्मुख ॥९२॥

संगीतकार गायनप्रकारी ॥ गंधर्वसरी तानमानी कळाकुमरी ॥ औषधीक वैद्य रोगापरी ॥ परीक्षिकी मीनले ते ॥९३॥

अश्वारोहण उत्तमयुक्तीं ॥ अश्व फिरवणें वाताकृती ॥ कोकशास्त्र भाष्याकृती ॥ स्वर्गाचाराचे सकळिक ॥९४॥

नाटककळा सकळी शृंगारीत ॥ आणूनि टेंकती राजसंमत ॥ प्रसंगानुसार वाचे वदत ॥ बोलूं जाण ती चातुरी ॥९५।

ऐसिया गुणांचे उत्तम भरत ॥ हेलावती राजसभेत ॥ तेणें चित्तसरितेंत ॥ आनंदतोय हेलावे ॥९६॥

तेणेंकरुनि मच्छिंद्रनाथ ॥ सुखाब्धीचा मीन तळपत ॥ ऐसे लोटले दिवस बहुत ॥ रतिसुखामाझारीं ॥९७॥

तों समयें चित्तसुखमेळीं ॥ ऋतु पावली राजबाळी ॥ ते कामरतीचे सुखवेळीं ॥ गरोदर झाली ते दारा ॥९८॥

तो गणामाजी भद्रजाती ॥ सर्वगुणी मुनी भद्रमूर्ती ॥ अंशरुपें प्रगटूनि रती ॥ देह धरिता पैं झाला ॥९९॥

रेतरक्त जेणें काळीं ॥ लोटत मासां नवांचे मेळी ॥ तदनंतर प्रसून झालिया बाळी ॥ बाळ बालार्क देखिला ॥१००॥

त्यातें भरतां द्वादश दिवस ॥ उत्तमापरी केले बारसें ॥ नाम ठेविलें त्या देहास ॥ मीननाथ म्हणवूनी ॥१॥

याउपरी याचकां देऊनि दान ॥ उचितार्थे सकळ तोषविले जन ॥ नानारत्नीं देऊनी भूषण ॥ गौरवातें मिरविलें ॥२॥

असो ऐसे संगोपनीं ॥ तीन संवत्सर तया स्थानीं ॥ लोटूनि गेलीं सुखासनी ॥ मच्छिंद्रातें भोगितां ॥३॥

यावरी आतां दुसरें कथन ॥ हस्तिनापुरीं कुरुनंदन ॥ जनमेजयाच्या वंशाकारण ॥ बृहद्रवा जन्मला ॥४॥

तो जन्मेजयापासूनि पुढती ॥ सातवा पुरुष वंशाप्रती ॥ दोन सहस्त्र सातशतीं ॥ कली गेलासे लोटूनी ॥५॥

तो बृहद्रवा राजा थोर ॥ राज्यपदी हस्तिनापूर ॥ मेळवूनि महीचे अपार विप्र ॥ सोमयाग मांडिला ॥६॥

एक वरुषें त्या क्षितीं ॥ अग्निकुंडीं पूर्णाहुती ॥ पुष्ट होऊनि दाहकमूर्ती ॥ तुष्ट शरीरीं मिरवला ॥७॥

परी शिवनेत्रींचा प्रळयाग्नी ॥ देणें दाहिले होते पंचबाणी ॥ परी तो गेला होता भक्षुनी ॥ द्विमूर्धनी महाराजा ॥८॥

तो शिवशरीरीं चेतला मदन ॥ जठरीं वाहत होता द्विमूर्धन ॥ तयामाजी जीवित्वप्राण ॥ अंतरिक्ष संचरला ॥९॥

तो अंतरिक्ष महाराज ॥ अग्निजठरामाजी विराजे ॥ तो गर्भ अति तेजःपुंज ॥ यज्ञकुंडीं सांडिला ॥११०॥

पूर्ण होतांचि यज्ञआहुती ॥ शेष प्रसाद मिरवूनी निगुती ॥ मग यज्ञकुंडी विप्राहुती ॥ रक्षा काढी बृहद्रवा ॥११॥

विप्राहातें सलील बाळतेजातें ॥ रक्षा स्पर्शतां लागे हातें ॥ दृष्टी पाहतां बाळातें ॥ मंजुळवत रुदन करी ॥१२॥

तंव तो पुरोहित ज्ञानी द्विज ॥ रायासी म्हणे महाराज ॥ यज्ञकुंडीं तेजःपुंज ॥ बाळ प्रसाद मिरविलें ॥१३॥

प्रत्योदक उचलोनि हातीं ॥ बाळ दावी रायाप्रती ॥ राव पाहोनि तेजस्थिती ॥ परम चित्तीं तोषला ॥१४॥

जैसा जलार्णव मंथन करितां ॥ त्यांत चतुर्दश रत्नें निघतां ॥ मग आनंद न माये सुरवरचित्ता ॥ तैसें झालें बृहद्रव्या ॥१५॥

कीं संजीवनींचा धरुनि अर्थ ॥ कच गेला शुक्रगृहातें ॥ साधूनि येतां संजीवनीतें ॥ शचीनाथ आनंदला ॥१६॥

कीं राम उपजतां कौसल्ये कुशीं ॥ आनंद झाला दशरथासी ॥ तेवीं पाहतां बाळमुखासी ॥ बृहद्रवा आनंदला ॥१७॥

मग पुरोहित विप्रापासुन ॥ निजकरी कवळी अग्निनंदन ॥ परम स्नेहें हदयीं धरुन ॥ घेत चुंबन बाळाचें ॥१८॥

परम उदेला आनंद पोटीं ॥ कीं चंद्रोदयींची ऐक्यभेटी ॥ मग समुद्रपात्रा तोयदाटी ॥ प्रेमलहरी उचंबळे ॥१९॥

वारंवार घेत चुंबन ॥ कीं त्यातें भासे प्रत्यक्ष मदन ॥ परी तो मदनचि व्यक्त पूर्ण ॥ शिवकायेचा प्रगटला ॥१२०॥

कीं सत्त्वगुणी विद्युल्लता ॥ पाळा मांडिला शरीरावरुता ॥ कीं पुनर्विधु प्रसन्न होतां ॥ तेज आपुलें अर्पिलें ॥२१॥

कीं संघांत अपार किरणीं ॥ महीं मिरवला हा उत्तम तरणी ॥ असो ऐसा अपार चिन्ही ॥ वर्णिता ग्रंथ वाढेल ॥२२॥

असो बृहद्रवा लवडसवडीं ॥ अंतःपुरांत जात तांतडी ॥ धर्मपत्नी संसारसांगडी ॥ निजदृष्टीं विलोकी ॥२३॥

नाम तिचें सुलोचना ॥ होय ती प्रत्यक्ष सुलोचना ॥ शुभानना ती देवांगना ॥ महीलागीं उतरली ॥२४॥

कीं प्रत्यक्ष रमा सरस्वती ॥ कीं दिव्य अपर्णेची मूर्ती ॥ उदया आली मायभगवती ॥ कुरुकुळातें तारावया ॥२५॥

जिचे पाहतां चरण ॥ गंगोदक दिसे मळिण ॥ शंतनूसारखें टाकूनि रत्न ॥ शिवमौळी विराजली ॥२६॥

तस्मात् गंगासमान हातीं ॥ देतां अपूर्व लागे गोष्टी ॥ असो तिनें बाळक देखतां दृष्टी ॥ पुसे रायातें आवडीनें ॥२७॥

म्हणे महाराजा विजयध्वजा ॥ करीं कवळिलें कवण आत्मजा ॥ मातें भासें मित्रवोजा ॥ दुसरा तरणी आहे हा ॥२८॥

येरु म्हणे वो शुभाननी ॥ यज्ञकुंडाद्विमूर्धनी ॥ प्रसादरुपें दिधलें तेणें ॥ राजस्तंभीं मिरवावया ॥२९॥

तव उदरीं जो मीनकेत ॥ मनानें वरीं आपुला सुत ॥ तयावरील सकळ हेत ॥ या बाळातें मिरवावा ॥१३०॥

तरी वंशासी मीनकेत ॥ दिव्यस्वरुपा आहे सुत ॥ तयाचा पाठिराखा निश्वित ॥ ईश्वरे हा प्रेरिला ॥३१॥

अगे हा अयोनिसंभव जाण ॥ अवतारदक्ष चिद्रत्न ॥ ज्वाळामाळी होऊनि प्रसन्न ॥ प्रसाद दिधला आपणांसी ॥३२॥

ऐसें वदतां राजभूष ॥ सुलोचना कवळी बाळकंदर्प ॥ तयाचें पाहूनि दिव्यरुप ॥ मोहदीप उजळला ॥३३॥

बाळ हदयीं कवळूनि धरितां ॥ पयोधरीं लोटली पयसरिता ॥ बाळमुखीं स्तन घालितां ॥ पयःपान स्वीकारी ॥३४॥

मग उत्तम करी बाळरीती ॥ स्नानमार्जनादि सारिती ॥ यापरी द्वादश दिनांप्रती ॥ परम सोहळा मांडियेला ॥३५॥

मेळवूनि सुवासिनी ॥ पाळणा घातला योगप्राज्ञी ॥ जालिंदर हें नाम जनीं ॥ सकळां आवडीं ठेविलें ॥३६॥

यज्ञकुंडींचा ज्वाळामाळी ॥ प्रसन्न झाला तेणें काळीं ॥ ज्वाळांत उदेला म्हणूनि सकळीं ॥ नाम जालिंदर स्थापिलें ॥३७॥

ऐशा करुनियां गजरा ॥ ग्रामांत वांटिली गोड शर्करा ॥ अपार धन याचक नरां ॥ लौकिकार्थ वांटिलें ॥३८॥

ऐशिया गजरें पूर्ण राहटी ॥ झाली बहुत दिवसां लोटी ॥ मास संवत्सर पंचवटी ॥ षट् सप्तम लोटले ॥३९॥

यापरी तो बृहद्रवा राणा ॥ अपार पाळिल्या ललना ॥ पुढें योजूनि मौंजीबंधना ॥ यज्ञोपवीत आराधी ॥१४०॥

याउपरी कोणे एके दिवसी ॥ राव विचार करी मानसीं ॥ गृहस्थाश्रमी जालिंदरासी ॥ लग्नविधी उरकाया ॥४१॥

म्हणवूनि आपला पुरोहित ॥ मंत्रि सवें देऊनि त्यातें ॥ उत्तम कुमारी शोधार्थ ॥ महीवरी प्रेरिला ॥४२॥

गुणवंत रुपवंत ॥ सुलक्षणी कुमारी पाहत ॥ मंत्री आणि पुरोहित ॥ देशावरी हिंडती ते ॥४३॥

येरीकडे जालिंदर ॥ राजांगना परम सुंदर ॥ घेऊनिया अंकावर ॥ चुंबन घेती लालसें ॥४४॥

परम स्नेहानें ऊर्ध्वदृष्टी ॥ पाहूनि बोले योगजेटी ॥ धूर्मिण मंत्री मम दृष्टीं ॥ दिसत नाहीं कां माते ॥४५॥

येरी म्हणे पाडसा ऐकें ॥ तुज स्त्री करावया जनकें ॥ पुरोहित आणि मंत्री देखें ॥ पाठविले आहेत बा ॥४६॥

येरु म्हणे स्त्री काये ॥ माता म्हणे बायकोसी म्हणावें ॥ येरु म्हणे मज दावावें ॥ बायका कैशा जननीये ॥४७॥

येरी म्हणे मजसमान ॥ बायको येईल तुजकारण ॥ जैसी मी बा त्याचसमान ॥ तुज बायको येईल कीं ॥४८॥

ऐसी सुलोचना त्यातें वदतां ॥ तो शब्द रक्षूनि आपुल्या चित्ता ॥ बाळांत येऊनि खेळतां खेळतां ॥ बाळांलागीं पुसतसे ॥४९॥

म्हणे गडे हो ऐका एकु ॥ मम तात माता करिती बायकु ॥ तीस कासयासाठीं अर्थकौतुकु ॥ करितां बायकु तें सांगा ॥१५०॥

तंव ते बोलती विचक्षण ॥ बहु शठपणीं बोलती हांसून ॥ जालिंदर बुद्धिहीन ॥ बायकोही कळेना ॥५१॥

मग ते म्हणती मूर्खा ऐक ॥ बायकु म्हणतां संसार निक ॥ विषयसुखाचें पूर्ण भातुक ॥ जगामाजी मिरवीतसे ॥५२॥

विषयसुख म्हणजे काई ॥ सांगती न ठेवता गोवाई ॥ ते ऐकूनि थरारुन जाई ॥ मनीं विचार करीतसे ॥५३॥

अगा जग हें परम अधम ॥ आचरण आचरती परम दुर्गम ॥ जें कां जगाचें उत्पत्तिस्थान ॥ तेचि रमणी रमतात ॥५४॥

तरी आपण करुं नये ऐसें ॥ याचा मनाला सबळ त्रास ॥ ऐसें रचुनि विवेकास ॥ मुलांतूनि निघाला ॥५६॥

माता बोलली मजसमान ॥ कांता मिरवतसे चिद्रत्न ॥ तरी ती कांता मज मातेसमान ॥ वेव्हारा योग्य वाटेना ॥५७॥

तरीही पूर्ण अधर्मराशी ॥ कदा न वर्तू कार्यासी ॥ मग सांडूनि ग्रामधामदारासी ॥ काननांतरीं निघाला ॥५८॥

परी ग्रामद्वारीं ग्रामरक्षक ॥ त्यांनीं जातां पाहिलें बाळक ॥ परी राजनंदन म्हणूनि धाक ॥ हटकावया अंतरले ॥५९॥

परी बुद्धीचा त्यांनी विवेक केला ॥ हेर मागें पाठविला ॥ कोणी जाऊनि त्वरें नृपाला ॥ सांगताती तांतडीनें ॥१६०॥

हे महाराज भुवननाथ ॥ विपिनीं गेला आपुला सुत ॥ रायें ऐसा ऐकूनि वृत्तांत ॥ आला धांवत तांतडीने ॥६१॥

परी तो चपळ विलक्षण ॥ म्हणे कोणी येईल धांवोन ॥ म्हणोनि मार्गातें सोडोन ॥ महाकाननीं रिघाला ॥६२॥

तंव त्या विपिनीं तरुदाटी ॥ विशाळ जाळिया तृण अफाटी ॥ त्यांत संचरतां हेर दृष्टी ॥ चुकुर झाले पाहतां ॥६३॥

परी तो योगेंद्र चपळ बहुत ॥ जातां जातां एक पर्वत ॥ त्याची दरी धरुनि सुत ॥ उत्तरदिशे चालिला ॥६४॥

येरीकडे नृपनाथ ॥ काननीं निघाला शोध करीत ॥ परी शोध लागला दूतस्थानापर्यंत ॥ पुढें शोध लागेना ॥ ॥६५॥

पाहतां परी बहु विपिन ॥ परी जालिंदराचें न पावें दर्शन ॥ जैसा अमावस्येचा दिन ॥ चंद्रभणी लोपतसे ॥६६॥

ऐसें झालें सकळांसी ॥ निराशपणें ग्रामासी ॥ येते झाले झालिया निशी ॥ शोक करितां सकळांनीं ॥६७॥

रायासह अपार जन ॥ पाहती आपुलालें सदन ॥ परी बृहद्रवा आणि सुलोचना ॥ परम अट्टहास करिताती ॥६८॥

बाळलीला खेळ अद्भुत ॥ आठवोनि गातां रुदन करीत ॥ राव म्हणे हा अनुचित ॥ प्रसाद हातींचा पैं गेला ॥६९॥

मातें अग्नि झाला प्रसन्न ॥ अहा माझें कर्म गहन ॥ हातीचें गेले चिद्रत्न ॥ काय करुं उपाय हो ॥१७०॥

अहा बाळक माझें अर्कासमान ॥ तेजरुप वाटे मदन ॥ माता म्हणे खेळ उत्तम ॥ काय वर्णूं तयाचा ॥७१॥

ऐसा करितां अट्टहास ॥ परी आणिक सरदार बुद्धिलेश ॥ रायास सदा बोधी नानाभाष्य ॥ युक्तिप्रयुक्ती करोनियां ॥७२॥

म्हणती राया नरोत्तमा ॥ जालिंदर अयोनिसंभव ॥ तरी हा सेवितां महाकानन ॥ त्यासीं मरण नसेचि ॥७३॥

मही समुद्रवलयांकित ॥ शोध करुं आम्ही निश्वित ॥ परी केव्हां तरी तुमचा सुत ॥ तुम्हां भेटेल महाराजा ॥७४॥

तरी निःसंशयेंकरुन ॥ धैर्यअर्गळी ठेवा मन ॥ ऐशा युक्तीकरुन ॥ रायासी शांत करिताती ॥७५॥

येरीकडे जालिंदर ॥ पर्वतदरीं अतिगुहार ॥ संचरला परी महीवर ॥ काळोखी रात्र दाटली ॥७६॥

तयामाजी झालें विपरीत ॥ विपिनी वणवा लागला बहुत ॥ पुढें तें कानन अग्नि जाळीत ॥ तयापासीं पातला ॥७७॥

तंव त्या दरींत जालिंदर ॥ निद्रें व्यापिला तृण अपार ॥ तों जवळी आला वैश्वानर ॥ तृण भक्षावया कारणें ॥७८॥

तों बाळ गोमटें देखिलें दृष्टीं ॥ विस्मयो करी आपुले पोटीं ॥ हें बाळ मम उदरजेठीं ॥ उदय पावलें होतें कीं ॥७९॥

उत्तम ठाव पाहूनि यातें ॥ सांडिलें होतें म्यां गर्भातें ॥ येथें यावया कारण यातें ॥ कां पडलें न कळे हो ॥१८०॥

मग शांत होऊनि मूर्तिमंत ॥ बाळ त्वरें केला जागृत ॥ अंकीं घेऊनि पुसे त्यातें ॥ कारण काय येथें यावया ॥८१॥

येरु पाहूनि तया आदरें ॥ म्हणे कोण तुम्ही सांगा सत्वर ॥ येरु म्हणे मी वैश्वानर ॥ जननीजनक तुझा मी ॥८२॥

येरु म्हणे जननीजनक ॥ कैसे होतील हरएक ॥ मग तो मुळींहूनि कथा पावक ॥ तयालागीं सांगतसे ॥८३॥

असो आतां वैश्वानर ॥ पुढें पुढती लिहितां पर ॥ ती कथा पुढें धुंडीकुमार ॥ मालू नरहरींचा सांगे की ॥८४॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ एकादशाध्याय गोड हा ॥१८५॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ अध्याय ॥११॥ ओंव्या ॥१८५॥

॥ नवनाथभक्तिसार एकादशाध्याय समाप्त ॥


श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय १२

श्रीगणेशाय नमः

जयजयाजी भगवंता ॥ पाळक नरहरीच्या सुता ॥ नरहरीरुपा कंदर्पताता ॥ अवतार अनंत मिरविशी ॥१॥

तरी आतां पुढें ग्रंथ ॥ बोलवीं बरवे रसभरित ॥ मागिले अध्यायीं मच्छिंद्रनाथ ॥ स्त्रीराज्यांत पै गेला ॥२॥

उपरी जालिंदराचा जन्म ॥ यज्ञकुंडीं उत्तमोत्तम ॥ उपरी पश्वात्तापेंकरुन ॥ पर्वतदरींत निघाला ॥३॥

तेथें प्रगटूनि ज्वाळामाळी ॥ तो परम स्नेहाचे नव्हाळीं ॥ अंकी घेऊनि त्या काळीं ॥ जन्मकथा सांगितली ॥४॥

आहे इतुकी कथा श्रोतीं ॥ पूर्वाअध्यायीं संपली होती ॥ आंता पुढें अवधानाप्रती ॥ श्रवणार्थी मिरवावें ॥५॥

असो महाराज द्विमूर्धनी ॥ सकळ जन्माची कथा सांगोनी ॥ उपरी बोले कामना मनीं ॥ कोणती बाळा ती सांग ॥६॥

येरु म्हणे जी महाराज ॥ कामनाविरहित मन माझें ॥ आहे परी हितार्थ गुज ॥ सकळ जाणसी तूं ताता ॥७॥

या नरदेहाची झाली प्राप्ती ॥ तरी सार्थक ओपीं माझें हातीं ॥ नाहीं तरी आले तैसे जाती ॥ ऐसें न करी महाराजा ॥८॥

जैसा उदककुंभ साचार येथें ॥ तो मळ उसके जेथें तेथें ॥ परी तयाचा विस्तार महीतें ॥ कांहीं एक मिरवेना ॥९॥

तरी व्यर्थ जन्मूनि मरण ॥ कीं लोहकाराचे भाते भरुन ॥ कीं भाडाईत ग्रंथिक रचून ॥ व्यर्थ शीण वृषभातें ॥१०॥

तरी आतां ऐक ताता ॥ मिरवेल ऐशा पूर्ण वार्ता ॥ तिहीं भुवनांभाजी सत्ता ॥ चिरंजीवित्व संपादीं ॥११॥

लोक म्हणती जालिंदर झाला ॥ परी मेला नाहीं ऐकिला ॥ ऐसें न करुनियां देहाला ॥ जगीं मिरवी हे ताता ॥१२॥

ऐसें ऐकूनियां ज्वलन ॥ मौळी तुकावोनि डोलवी ॥ मान ॥ म्हणे बाळाचे धन्य ज्ञान ॥ वयासमान नसे कीं ॥१३॥

मग त्वरें तो द्विमूर्धनी ॥ जालिंदरासी स्कंधीं वाहोनी ॥ अनसूयानंदनस्थानीं ॥ त्वरें जाऊनि पोहोंचला ॥१४॥

तव त्या महाराज अत्रिनंदनास ॥ अग्नीसी पाहोनि झाला हर्ष ॥ मग पुढें होऊनि हव्यवाहनास ॥ आलिंगिलें सुप्रेमें ॥१५॥

म्हणे महाराजा मम दैवता ॥ तेजःपुंज जेवी सविता ॥ कवण कामना वेधूनि चित्ता ॥ येथें आलासीं महाराजा ॥१६॥

मज आळशियावरी ओघ ॥ ओघिला गंगोदकीं चांग ॥ कीं क्षुधिता धेनु लागूनि माग ॥ पयापान करवीतसे ॥१७॥

कीं तमाचें होता वेष्टण ॥ अर्कं दिवटा आला होऊन ॥ कीं मृत्युसमयीं पीयूषपान ॥ पीयूषचि करवी आग्रहें ॥१८॥

तेवीं येथें झाली परी ॥ गंगा ओघिली आळशावरी ॥ मग बैसूनि निकट शेजारीं ॥ वर्तमान पुसतसे ॥१९॥

परी महाराजा द्विमूर्धन ॥ हा कोणाचा आहे नंदन ॥ येरी म्हणे पंचबाण ॥ शिवदेहीचा हा असे ॥२०॥

कीं शिवदेहीचा काम श्रेष्ठ ॥ म्यां दाहिला हें बोलती स्पष्ट ॥ परी जठरीं रक्षिला होता वरिष्ठ ॥ आजपर्यंत महाराजा ॥२१॥

मग बृहद्रव्याच्या यज्ञकुंडांत ॥ प्रगट केलें या देहातें ॥ तस्मात् महाराजा तुमचा सुत ॥ तूंचि आतां संगोपीं ॥२२॥

तरी यातें अनुग्रह देऊनी ॥ जगी मिरवीं सनाथपणीं ॥ हा चिरंजीव असो शिवकामनी ॥ मृत्यु कदा न पावो ॥२३॥

प्रमथ दशकर रेत वहिला ॥ मम जठरीं त्यावरी जन्मला ॥ तस्मात् श्रेष्ठ उभयपक्षांला ॥ चिरंजीव असो हा ॥२४॥

जैसा लाभल्या रस पीयुष ॥ उपरी संजीवनी साह्य त्यास ॥ मग तो निर्मय यमसदनास ॥ यमापाशीं मिरवेळ ॥२५॥

कीं घृतशर्करेची पडतां मिठी ॥ नको कोण म्हणेल या कडवटीं ॥ का चंद्रअर्काची झाली भेटी ॥ उजेड कांहीं दिसेना ॥२६॥

तेवीं शिवकाम माझें जठर ॥ ऐक्य झालिया श्रेष्ठाकार ॥ त्यांत नारायण नव साचार ॥ अंतरिक्ष संचरला ॥२७॥

याही उपरांतिक ऐका परी ॥ मौंजी विराजल्या स्वामीकरीं ॥ मग तें माहात्म्य कवणापरी ॥ जगामाजी काय वर्णावें ॥२८॥

आधीं सुवर्ण सोवळा दासी ॥ त्यावरी सुगलें हेमकर्णी ॥ जडित नवरत्न सुढाळ कोंदणीं ॥ तें कोण लेऊं म्हणेना ॥२९॥

कीं आधींच सुगंध मलयागार ॥ मृदमद झाला असे त्यावर ॥ त्यावरी शृंगारुनि सुंदर ॥ कोण उटी घेईना ॥३०॥

तस्मात् ऐशा झाल्या गोष्टी ॥ वरदकरीं तव गा तपोजेंठी ॥ मग जालिंदर महीपाठीं ॥ कीर्तिसूर्य मिरवेल ॥३१॥

परी ते पावकी रसाळ वचन ॥ वर्षते अमृतचन ॥ तेणें चातकमन ॥ तुष्ट झालें शरीरीं ॥३२॥

मग म्हणे जी महाराजा ॥ पुरवीन आतांचि काम तुझा ॥ परी द्वादश वर्ष विजयध्वजा ॥ मजपाशीं ठेवीं हा ॥३३॥

अवश्य म्हणूनि ज्वाळमौळी ॥ म्हणे रक्षणें आपणांजवळी ॥ परी मज देखतां हस्त मौळीं ॥ वरदकरणी मिरवावा ॥३४॥

मग तो सुपात्र अत्रिनंदन ॥ अंकीं घेत जालिंदर रत्न ॥ सकळ कळांतें सांगून ॥ विकल्पाते नुरवीतसे ॥३५॥

पहा हो कृपेची सदट नव्हाळी ॥ वरदहस्त स्पर्शितां मौळीं ॥ कर्णी ओपितां मंत्रावळी ॥ अज्ञान काजळी फिटलीसे ॥३६॥

परी मंत्राक्षर अंबुदाकार ॥ पूर्ण संचरता कर्ण पात्र ॥ मग ती मही पिकें विचित्र ॥ ब्रह्मपणें मिरवली ॥३७॥

मग तातचि तात अनुपम ॥ चराचरादि स्थावरजंगम ॥ एके रुपीं सनातन ॥ ब्रह्मप्राप्ती मिरवली ॥३८॥

ऐसा झालिया स्वतंत्र विचार ॥ मग करुनी दत्तासी नमस्कार ॥ महाराज तो वैश्वानर ॥ अदृश्यपणें मिरवला ॥३९॥

मग दत्तात्रेय आणि जालिंदर ॥ विराजले पर्वतगिरीदर ॥ मग प्रेमें अभ्यासीं चमत्कार ॥ दृश्यादृश्य कळतील ॥४०॥

मग सवें घेऊनि जालिंदरासी ॥ नित्य गमन करी महीसी ॥ स्नान करुनि भागीरथीसी ॥ विश्वेश्वरासी ॥ नमिताती ॥४१॥

तेथूनि भोजन पांचाळेश्वरी ॥ भिक्षा मागावी कोल्हापुरीं ॥ निद्रा जयाची मातापुरीं ॥ माहूरगड म्हणविताती ॥४२॥

असो ऐसे द्वादश वरुषांत ॥ नाना अस्त्रांसही घेत ॥ प्रवीण करी बाळा समर्थ ॥ विद्याभांडार भरुनिया ॥४३॥

जालिंदराचें दास्य पाहून ॥ घडिघडि आल्हाद पावे मन ॥ सकळ विद्येचें रत्न ॥ तयालागीं भूषणातें ॥४४॥

वातस्त्रादि जलदास्त्र ॥ अग्न्यस्त्र धूमास्त्र ॥ वाताकर्षणं कामास्त्र ॥ पर्वतास्त्र निवेदिलें ॥४५॥

वज्रास्त्र आणि वासवशक्ती ॥ नागास्त्र प्राणाहुती ॥ खगेंद्रास्त्र प्रतापशक्ती ॥ मोहनास्त्र सांगितले ॥४६॥

निर्वाणास्त्रादि संजीवनी ॥ रुद्रास्त्र आणि प्रळयाग्नीं ॥ विरक्तास्त्र कामासनीं ॥ मोहनास्त्र सांगितलें ॥४७॥

दानवास्त्र देवास्त्र पूर्णतप ॥ काळास्त्र मिरविती यमादि दस ॥ स्तवनास्त्रगती उत्तम ॥ जिंकूं शके ब्रह्मांड ॥४८॥

कार्तिकास्त्र ब्रह्मास्त्र ॥ विभक्तास्त्र जारणास्त्र ॥ शापास्त्र आणि मरणास्त्र ॥ शरास्त्रही शिकविलें पैं ॥४९॥

ऐसा द्वादश वर्षात ॥ सकळाखीं प्रवीण केला नाथ ॥ आयुष्य भविष्य गमनार्थ ॥ सकळ विद्या निरुपिल्या ॥५०॥

रसायनादि किमयागार ॥ वेदव्याकारणदि निपुणशास्त्र ॥ नाटकें संगीतसार जें स्वर ॥ गंधर्वातें लाजवी ॥५१॥

ज्योतिष सायक शरसंधान ॥ कोकशास्त्रीं झाला प्रवीण ॥ कामुक दडंगुण ओढण ॥ शास्त्राधारे पैं केला ॥५२॥

जलतरणादि चातुर्थकविता ॥ वैदिकी रत्नलक्षणसहिता ॥ ब्रह्मज्ञानादि निपुण अर्था ॥ बोले तैसा चालतसे ॥५३॥

ऐसी सकळ कळाकुसरी ॥ सद्विद्येचा पूर्ण भांडारी ॥ करुनि निका परीक्षेपरी ॥ जगामाजी मिरविला ॥५४॥

यापरी झालीया पूर्ण ॥ पुढें दैवतें आराधून ॥ वर ओपावयाकारणें ॥ जालिंदरा उतरलीं ॥५५॥

मग तो रतवूनि वैश्वानर ॥ पुढें केला तयाचा कुमर ॥ प्रत्यक्ष होतां जालिंदर ॥ सद्विद्येसी दाविलें ॥५६॥

पाहूनि विद्या अपाररत्न ॥ मान तुकावी द्विमूर्धन ॥ धन्य धन्य हा अत्रिनंदन ॥ वारंवार म्हणतसे ॥५७॥

यापरता अत्रिसुत ॥ म्हणे महाराजा ऐक मात ॥ पूर्णपर्णी जालिंदरनाथ ॥ सद्विद्येश पैं झाला ॥५८॥

झाला परी ऐक वचन ॥ एक उरलें आराधन ॥ दैवत करुनि द्यावें प्रसन्न ॥ वरालागीं महाराजा ॥५९॥

तरी सकळ दैवतांसी ॥ नेऊनि भेटवीं जालिंदरासी ॥ बोल स्वीकारुनि पूर्ण तयासी । बैसवावें महाराजा ॥६०॥

मग अवश्य म्हणूनि वैश्वानर ॥ स्कंधीं वाहिला जालिंदर ॥ भुवनत्रयीं समग्र ॥ फिरोनि ओळखी दैवतें ॥६१॥

असो तीं स्थानें दैवतें नामें ॥ सांगतां वैखरी सुमध्यसे ॥ तरी दुवार कथा ग्रंथमाहात्म्ये ॥ पडत आहे महाराजा ॥६२॥

पूर्वी मच्छिंद्राचे कारणीं ॥ निरोपिली स्थानें दैवतें नामीं ॥ नागपत्रें अश्वत्थधामीं ॥ सूर्यकुंड उपदेशिलें ॥६३॥

जें जें मच्छिंद्रें केलें संधान ॥ सकळ दैवतें प्रसन्न ॥ तें तें दाविलें द्विमूर्धनें ॥ वरालागीं ओपिलें ॥६४॥

बावन्नवीरादि जळदेवता ॥ पाताळभुवनीस्वनाथा ॥ तितुक्यासी करुनि प्रणिपाता ॥ वरालागीं ओपिलेंसें ॥६५॥

परी दैवतें वर देऊनि त्यासी ॥ सांगातीं झालीं पूर्ण तपासी ॥ तेणें पावेल सकळ सिद्धींसी ॥ ऐसें सकळ वदलेती ॥६६॥

तें ऐकूनि द्विमूर्धन ॥ पाहता झाला बद्रिकावन ॥ तेथें द्वादश वर्षे नेम करुन ॥ तपालागीं बैसला ॥६७॥

लोहकंटकी चरणांगुष्ठ ॥ वातग्रहणीं आहार पुष्ट ॥ मुखीं रामनामपाठ ॥ ब्रम्हीं दृष्टीं निर्मिलीसे ॥६८॥

तंव ते आचाट तय पाहून ॥ दैवतें तुकविती झालीं मान ॥ आपुलाले वाहनी आरोहण ॥ करुनि आलीं तया ठाया ॥६९॥

ब्रह्मा विष्णु महेश्वर ॥ आणिक दैवतें आलीं अपार ॥ तपशांती करुनि साचार ॥ स्थानीं गेलीं आपुल्याला ॥७०॥

बद्रिकाश्रमीं बद्रिनाथं ॥ तेणें उभयतां सुतां ॥ आपुल्याजवळी त्रिरात्र ॥ ठेवूनियां घेतलेसे ॥७१॥

ठेविलें परी भविष्य कथून ॥ सांगता झाला पंचानन ॥ सत्यलोकातें ब्रह्मभुवन ॥ तेथें वर्तलें विपरीत ॥७२॥

म्हणाल तें कोणत्या रीतीं ॥ ब्रह्मतनया सरस्वती ॥ द्वादशवर्षे दिव्यमूर्ती ॥ रेखिलीसे शृंगारीं ॥७३॥

जिचें मुख पाहतां भद्र ॥ रेखला वाटे पूर्णचंद्र ॥ केश कुरळ आकाश मंद ॥ वेष्टित वाटे पाहतां कीं ॥७४॥

यापरी पूर्ण आणिक युवती ॥ शृंगार रेखिला हेममुक्ती ॥ तें मुक्त न वाटे नक्षत्रपातीं ॥ शृंगारातें मिरवलें ॥७५॥

अपार रत्नीं आगळा ॥ स्कंद वेष्टित बहु रसाळा ॥ तिहीं भुवनीं रत्नकीळा ॥ नक्षत्रासम मिरवली ॥७६॥

कंचुकीवेष्टन दाट करुनी ॥ त्यात कंदुकासमान इंदुतरणी ॥ कुच विराजती हदयस्थानी ॥ चीर पदरातें मिरवें पैं ॥७७॥

हरिकटीते कटाकृती ॥ जानु कर्दळीस्तंभनीतीं ॥ सरळ पोटर्‍या चरणस्थिती ॥ गजगामिनी मिरवते ॥७८॥

ऐसी तनया पाहतां दृष्टी ॥ तों काम उदेला सहज पोटीं ॥ मग विधि नोहे तो अवधी ॥ परमेष्टी कुबुद्धीतें संचरला ॥७९॥

तो कामबळें उन्मत्त ॥ कुमारीमागें लागत ॥ धावतां धावतां वीर्यपात ॥ झाला विधीचा वेधवां ॥८०॥

वातचक्र सबळ नेट ॥ बुंद पावला महीपाट ॥ परी हिमाद्रीचे वनीं अचाट ॥ दिग्गज एक निजलासे ॥८१॥

निजला परी कर्णरंध्रांत ॥ येऊनि पडिले बिंदुरेत ॥ त्या रेतातें जीव व्यक्त ॥ प्रबद्ध नारायण संचरला ॥८२॥

परी त्यातें लोटले बहुत दिन ॥ झालें चतुरावृत्ती युगप्रमाण ॥ द्विजालागी नाहीं मरण ॥ चिरंजीव असती ते ॥८३॥

अष्टदिशीं अष्ट दिग्गज ॥ महादीप्त ते महाराज ॥ त्यांतील एक हो तेजःपुंज ॥ निजला आहे महाराजा ॥८४॥

प्रबुद्ध नारायण विख्यात ॥ अवतारदीक्षा देहस्थित ॥ त्या दिग्गजाच्या कर्णविवरांत ॥ सुशोभित आहे कीं ॥८५॥

बालतनु बालार्काकिरणीं ॥ हरी ते पहावे निजनयनीं ॥ तो जालिंदरें शिष्य करोनि ॥ महीलागीं मिरवावा ॥८६॥

कर्णोदय त्याचा झाला ॥ म्हणोनि कानिफा नाम त्याला ॥ ऐसें ऐकोनि शिववचनाला ॥ वैश्वानर बोलतसे ॥८७॥

म्हणे महाराजा फार बरवें ॥ आपण बदला तितकें अपूर्व ॥ परी गज केवीं विदारावा ॥ आम्हांलागीं दाखवा ॥८८॥

जैसी उदया आणिली गोष्टी ॥ तैसी दाखवा प्रत्यक्ष दृष्टी ॥ सूर्यजयद्रथ पाठपोटीं ॥ मिरवावा महाराजा ॥८९॥

फार बरवें उत्तम झालें ॥ एकटें महीं मम तान्हुलें ॥ त्यातें पृष्ठी रक्षक भलें ॥ निर्माण केलें महाराजा ॥९०॥

तरी आतां कृपा करुन ॥ दाखवावें गजस्थान ॥ अवश्य म्हणूनि उमारमण ॥ त्रिवर्गादि चालले ॥९१॥

त्रिवर्गाचें तेज अद्भुत ॥ दिशा व्यापोनि शिरले गगनांत ॥ जेवीं चंद्रसूर्याचे तेजांत ॥ अग्नि संचरे तिसरा ॥९२॥

किं एक रुद्र एक विष्णु ॥ तिजा उदेला कमळतनु ॥ कीं चंद्राजळ द्रोणाचळ धनु ॥ मंदराचळ तिसरा पैं ॥९३॥

कीं एक शुक्र बृहस्पती ॥ त्यांत कचेश्वरमूर्ती ॥ कीं अमृतसंजीवनी युक्ती ॥ तिसरा अमर मिरवला ॥९४॥

कीं एक परीस एक चिंतामणी ॥ तिसरा निघतो प्रतापखाणी ॥ ऐसे त्रिवर्ग हिमाद्रीस्थानी ॥ प्रवेश करिते पैं झालें ॥९५॥

तों पैल हिमाद्रीपर्वतीं ॥ दिसे शेवटीं दिग्गजमूर्ती ॥ महाविक्रळ स्थूळवटशक्ती ॥ पर्वतासम देखिला ॥९६॥

देखतांचि उमावर ॥ म्हणे हा गज प्रतापी तीव्र ॥ कदा नोहे महीं स्थिर ॥ माजवील समर आपणांसी ॥९७॥

तरी तयासी कैसी युक्ती ॥ करावी न राहे स्थिरत्वगती ॥ मग जालिंदर तीव्रयुक्ती ॥ बोलता झाला शिवातें ॥९८॥

हे महाराज उमावर ॥ माझिया मस्तकीं वरदकर ॥ अत्रिसुतें ठेविला थोर ॥ त्याचा चमत्कार पहा आतां ॥९९॥

ब्रह्मांड मिरवल्या तीव्रपणीं ॥ तेंही हिसावेल शूलपाणी ॥ मग या गजाची अपार करणी ॥ कोठवर उरे महाराजा ॥१००॥

प्रळयकाळ कृतांत शमे ॥ तोही शांतवेल उत्तमोत्तमें ॥ तें दिग्गजा तीव्रता प्रकाम ॥ कोठें असेल महाराजा ॥१॥

वातगती चक्रराहटी ॥ तेही कुंठित होईल जेठी ॥ मग मित्रस्यंदन भवकोटी ॥ स्थिर कैसा होईना ॥२॥

तन्न्यायें ब्रह्मांड जिंकितां ॥ पावे हा गज कां न स्थिरता ॥ तरी महाराजा चमत्कार आतां ॥ निजदृष्टीं विलोकीं ॥३॥

मग कक्षेमाजी भस्मझोळी ॥ करतर्जनीं चिमुटी ओळी ॥ मोहनास्त्र तदनुकाळीं ॥ जपता झाला महाराज ॥४॥

मोहनास्त्रामागें पवित्र ॥ प्रेरिता झाला स्पर्शास्त्र ॥ जपूनियां शुद्ध मंत्र ॥ भस्मचिमुटी सोडीतसे ॥५॥

तवं तें अस्त्र होतां व्यक्त ॥ तीव्रपणी गज झाला शांत ॥ यापरी महीं चरण चतुर्थ ॥ सुदृढ व्यक्त झाला तो ॥६॥

मग म्हणे शिवासी तातासहित ॥ येथेंचि असावें स्वस्थचित्त ॥ मी करीपाशी जाऊनि त्वरित ॥ कानिफातें आणितो ॥७॥

ऐसें ऐकतां वागुत्तर ॥ अवश्य म्हणे श्रीशंकर ॥ मग तो तेथूनि जालिंदर ॥ गजापाशीं पातला ॥८॥

परी मोहनास्त्र प्रतापवंत ॥ सर्व अंगें गज झाला शांत ॥ निकट जाऊनि तयाचे त्वरित ॥ आदरोक्ती बोलतसे ॥९॥

म्हणे बा रे धीरपण ॥ कोणी नसे तुजसमान ॥ तुझे कर्णी दिव्यरत्न ॥ महासिद्धीनें निर्मिले ॥११०॥

हांक मारुनि बोले त्यातें ॥ म्हणे प्रबुद्ध नारायण समर्थ ॥ गजकर्णी होऊनि व्यक्त ॥ अवतारदीक्षा मिरविसी ॥११॥

तरी आतां झडकरी ॥ कर्ण सोडूनि ये बाहेरी ॥ तूतें नाम या देहापरी ॥ कर्णकानिफा साजतसे ॥१२॥

ब्रह्मवीर्य कर्णउत्पत्ती ॥ म्हणूनि नाम तुजप्रती ॥ तूं तंव कानिफा सर्वज्ञमूर्ती ॥ दृश्यमान होई कां ॥१३॥

ऐकूनि जालिंदराचें वचन ॥ बोलता झाला विधिनंदन ॥ हे महाराजा गुणनिधान ॥ स्थिर असा महीतें ॥१४॥

मग त्वरें येऊनि कर्णद्वारी ॥ दृष्टीं पाहे ब्रह्मचारी ॥ सहज करुनि उभयकरीं ॥ नमस्कारी प्रेमानें ॥१५॥

षोडशवर्षी वयमान ॥ बाळतनू देदीप्यमान ॥ तयाचे तेजें सकळ कानन ॥ तेजामाजी डवरलें ॥१६॥

मग जालिंदरें देऊनि हस्त ॥ खालीं उतरिला कर्णसुत ॥ स्कंधीं वाहूनि प्रेमें स्नेहभरित ॥ शिवापाशीं पातला ॥१७॥

स्कंधींचा उतरुनि ठेवी महीशीं ॥ म्हणे कानिफा सर्वज्ञराशी ॥ नमस्कारीं उमावरासी ॥ वीर्यवंता महाराजा ॥१८॥

त्यातें नमूनि जनकासभेत ॥ द्विमूर्धनी आजी तात ॥ त्यातें नमस्कारुनि त्वरित ॥ श्रेयवंत होईं कां ॥१९॥

मग शिवासी करुनि नमस्कार ॥ उपरी नमिला वैश्वानर ॥ त्याहूनि प्रीती अति थोर ॥ जालिंदर नमिलासे ॥१२०॥

उपरी अत्यंत स्नेहभरितीं ॥ शिवें कवळूनि सप्रेम हस्तीं ॥ आपुले अंकीं बाळमूर्ती ॥ कर्णकानिफा बैसविला ॥२१॥

परम प्रिय अति लालन ॥ घेतलें बाळाचे चुंबन ॥ मग जालिंदरा बोले वचन ॥ बाळा देई अनुग्रह ॥२२॥

तव अनुग्रह झाल्यापाठीं ॥ मोडेल अज्ञानदशाराहाटी ॥ सकळार्थ विजय पोटीं ॥ कर्णकानिफा मिरवेल ॥२३॥

जैसा होतां अर्कोदय ॥ अंधकार पावे विलय ॥ तैं सकळ जनांचे हे व्यवसाय ॥ तन्न्यायें बाळा करावें ॥२४॥

कीं द्रव्य असतां गृहीं भरतीं ॥ मग सकळ व्यवसाय तया सुचती ॥ तन्न्यायें कृपामूर्ती ॥ बाळालागी करावें ॥२५॥

ऐसें ऐकूनि आदिनाथवचन ॥ जालिंदर तो तुकावी मान ॥ मग तेचि घडी क्रियामंडन ॥ संकल्पांत आव्हानी ॥२६॥

तन मन धन काया वाचा ॥ त्याग केला दुर्गुणांचा ॥ तो संकल्प निःसंकल्प साचा ॥ गुरुराज वंदिला ॥२७॥

मग वरदहस्त स्पर्शोनि चंद्रमौळी ॥ कर्णी ओपिली मंत्रावळी ॥ तेणें सकळ अज्ञानकाजळी ॥ फिटोनि गेली तत्काळ ॥२८॥

जैसा सदनीं लावितां दीप ॥ तीव्र तमाचा होय लोप ॥ तेवीं मंत्रबीजमाप ॥ अज्ञानकर्दमपण निवटी कां ॥२९॥

व्यक्ताव्यक्त सकळ भास ॥ पूर्ण झाला विजयपणास ॥ मग चराचरीं माझाचि वास ॥ एके रुपें वर्ततसे ॥१३०॥

ब्रह्मदृष्टी संकलित खूण ॥ दृश्यगुरुमुखेंकरुन ॥ तें हरि रुद्र ब्रह्मरुप चैतन्य ॥ ऐक्यरुपें मीनले ॥३१॥

असो ऐशी होतां राहाटीं ॥ मग उठते झाले चतुर्थ जेठी ॥ पदीं चालतां महीपाठीं ॥ बद्रिकाश्रमीं पातले ॥३२॥

मग सुवचनीं द्विमूर्धन ॥ युक्ती सांगे जालिदराकारण ॥ बा रे जें कां दत्तवचन ॥ कानिफातें समपीं ॥३३॥

ऐसें सांगूनि स्वयें युक्ती ॥ अदृश्य जाहला दाहकमूर्ती ॥ वरी सादृश्यपणें उमापती ॥ षष्मासें त्यातें मिरवला ॥३४॥

परी षण्मासदिनांमाझारी ॥ दत्तकृपेची विद्यालहरी ॥ सांठवूनि कानिफाअंतरी ॥ केला भांडारीं विद्येचा ॥३५॥

सकळ अस्त्रीं केला प्रवीण ॥ परी संजीवनी अस्त्र देदीप्यमान ॥ आणि दुसरें वाताकर्षण ॥ जालिंदरें रक्षिलें असे ॥३६॥

म्हणाल करुनि रक्षण ॥ सांगितलें सकळ विद्येचें कारण ॥ तरी इतुकेंच रक्षावयास संशय कोण ॥ जालिंदरा उदेला हो ॥३७॥

तरी संशयाचें कारण ॥ गजकर्णी झाला जन्म ॥ तया स्थानींचा उत्तम गुण ॥ उभयतांचा मिरवेल ॥३८॥

दांभिक बुद्धिसंस्कार ॥ पाहूनियां जालिंदर ॥ वाताकर्षण संजीवनीमंत्र ॥ अस्त्र भिन्न रक्षिलें ॥३९॥

परी सकळ अस्त्रीं झाला निपुण ॥ मग बोलता झाला उमारमण ॥ अस्त्र देवता करुनि प्रसन्न ॥ कानिफातें देई कां ॥१४०॥

मग स्तवनास्त्र जपोनि त्वरित ॥ बोलाविले सकळ दैवत ॥ इंद्र वरुण आश्विनीसहित ॥ महीलागीं उतरले पातले ते ठाया ॥४१॥

दानव मानव प्रतापवंत ॥ अतळ वितळ जे विख्यात ॥ नवनागकुळें वंशवंत ॥ तेही पातले ते ठाया ॥४२॥

चंद्रसूर्य गणगंधर्व ॥ यक्ष किन्नर आले सर्व ॥ विष्णुसहित कामोद्भव ॥ महीलागीं उतरले ॥४३॥

खगेंद्रासहित प्लबंगम ॥ येता झाला दाशरथी राम ॥ अवतारदक्ष विष्णु दशम ॥ दशअवतारीं मिरविला ॥४४॥

बावन्न वीर जळदेवता ॥ शंखिनी डंखिनी कालिकेसहिता ॥ अष्टभैरव गण पाताळनाथ ॥ गजानन मिरवला ॥४५॥

ऐशा देवता वर्णू किती ॥ मृत्युलोकीं पूर्ण विख्याती ॥ तेहतीस कोटी संख्या बोलती ॥ दृश्य झाले तितुकेही ॥४६॥

असो ऐशा समुचयाकारणें ॥ त्यासी जालिंदर करी नमन ॥ बद्धांजळी सर्वा जोडून ॥ बोलता झाला तत्क्षणी ॥४७॥

म्हणे महाराजा कृपामूर्ति ॥ कानिफा मिरवला सद्विद्येप्रती ॥ तैं योग देऊनि निगुतीं ॥ कार्यालागीं वर्तावें ॥४८॥

ऐसे ऐकूनि तयाचें वचन ॥ दैवतें बोलती सकळ जाण ॥ तुज आम्हीं वरप्रदान ॥ सद्विद्येसी दिधलेसें ॥४९॥

दिधलें परी कवणार्थी ॥ श्रीपावकाच्या मोहाप्रती ॥ आणि अत्रिसुत तुम्हांप्रती ॥ विद्यानाथ झालासे ॥१५०॥

ऐसें उभयांच्या भिडेंकरुन ॥ तुम्हासी दिधलें वरप्रदान ॥ परी पुढें आणिका कारण ॥ वर मिरवत नाहीं जी ॥५१॥

तेथूनि तुम्ही पुढतपुढती ॥ शिष्य सकळ अगणित भिती ॥ तितुक्यांसी सद्विद्येप्रती ॥ वर किती ओपावा हो ॥५२॥

बरें म्हणाल का वाईट ॥ परी वर न ओपूं आम्ही स्पष्ट ॥ मानाल तैसें महाश्रेष्ठ ॥ दुःख देहीं आपुल्या ॥५३॥

ऐसें म्हणूनि विमानीं ॥ बैसते झालें तत्क्षणीं ॥ तें जांलिदर दृष्टी पाहोनी ॥ परम चित्तीं क्षोभला ॥५४॥

म्हणे माझा अनादर ॥ करुनि जातां स्थानावर ॥ परी माझा चमत्कार ॥ निजदृष्टी पहावा ॥५५॥

मग करीं कवळूनि भस्मचिमुटी ॥ वातास्त्र प्रेरिता झाला जेठी ॥ तेणेंकरुनि नभापोटी ॥ प्रेरक झालें वातास्त्र ॥५६॥

तें वातास्त्र अति तीव्र ॥ प्रगट होतां वातचक्र ॥ तैं सकळ विमानें नभावर ॥ भ्रमण करिती वातानें ॥५७॥

तें पाहूनिया गंधर्वनाथ ॥ गुणीं गांडीव चढवितां सिद्ध ॥ आदिदेव सुरवरादि समस्त ॥ सज्ज केले सायके ॥५८॥

मग नानास्त्रें जपूनि युक्ती ॥ शर सोडिती नाथावरती ॥ तें पाहूनि जालिंदर जती ॥ निवारण करी सर्वाचें ॥५९॥

पर्वतास्त्र गंधर्व प्रेरिती ॥ वज्रास्त्र प्रेरी अमरपती ॥ यक्ष अग्निअस्त्रें सोडिती ॥ जळदास्त्र वरुण तो ॥१६०॥

धूम्रास्त्र अश्विनी देव ॥ नागास्त्र प्रेरिती सकळ दानव ॥ ऐशीं अस्त्रें बहुत गौरव ॥ बहुतांनीं तीं निर्मिलीं ॥६१॥

परी हरि आणि हर ॥ दृष्टीं पाहाती चमत्कार ॥ म्हणती पुढें कैसा विचार ॥ निजदृष्टीं पाहूं कीं ॥६२॥

ऐशीं अस्त्रें प्रेरिती बहुत ॥ तें पाहूनि जालिंदरनाथ ॥ मग सकळ अस्त्रांवरी मोहनास्त्र ॥ योजिता झाला महाराजा ॥६३॥

तें मोहन अस्त्रांतरीं ॥ प्रवेशूनि करी प्रताप बाहेरी ॥ जालिंदरातें अवलोंकन करी ॥ नमूनि जात असे अस्त्र ॥६४॥

ऐसें अस्त्र सकळ आलें ॥ परी जालिंदरा नमूनि गेलें ॥ परी पर्वतास्त्रें युक्त केलें ॥ निवटिलें वातस्त्र ते ॥६५॥

मग विमानें होऊनि स्वर्गी स्थिर ॥ समूळ आटलें वातचक्र ॥ मग एकाएका बोलती उत्तर ॥ कैसा विचार करावा ॥६६॥

जीं जीं अस्त्रें प्रेरितीं आपण ॥ तीं तेथें जातीं नमून ॥ तरी आतां शस्त्रें घेऊन महींलागी उतरावें ॥६७॥

तीव्र शस्त्रघातेंकरुन ॥ द्वंद्वमुखांतें करावें आव्हान ॥ मग तयाचा घेऊन प्राण ॥ स्वर्गवासी करावा तो ॥६८॥

ऐसें मानलें सर्वां चित्तीं ॥ विमाने उतरली महीवरती ॥ मग मुदगल फरश अंकुश शक्ती ॥ घेवोनियां धावलें ॥६९॥

त्रिशूळ खडग भाले तोमर ॥ फरश मुरस पाडू कट्यार ॥ गदा चक्र बरची यंत्र ॥ दारुकादि उभवले ॥१७०॥

गुप्ती भाले असिलता ॥ ऐशीं शस्त्रें किती वर्णिता ॥ असंख्यरुपी प्राणहर्ती ॥ घेवोनियां धांवले ॥७१॥

तें पाहूनि जालिंदर ॥ सोडता झाला कामिनीअस्त्र ॥ कामिनीअस्त्रावरी पवित्र ॥ कामअस्त्र प्रेरिलें ॥७२॥

कामिनीअस्त्र प्रगट होतां ॥ अगणित स्त्रिया तेज मारिता ॥ उदया पावूनि कामवार्ता ॥ दर्शविता रायासी ॥७३॥

परी त्या स्त्रिया कैशा ॥ रंभेहूनि शतगुण ऐशा ॥ भ्रुकुटीसायक नेत्रकटाक्षां ॥ शर सोडिती कामाचे ॥७४॥

तयामागें कामास्त्र ॥ सर्वां हदयी रिघोनि पवित्र ॥ तेणें लंपट होऊनि सर्वत्र ॥ प्रणययुद्धा उसळले ॥७५॥

मग एकाएकींच्या ध्यानीं ॥ लागूनि करिती नम्र विनवणी ॥ तंव त्या पळती रानोरानीं ॥ हेही धांवती त्यामागे ॥७६॥

परी बद्रिकाश्रमीं बद्रितरु ॥ त्यातें वर्णितां नसे पारु ॥ कीं वाट दावी कंटकापारु ॥ तयामाजी रिघाल्या ॥७७॥

तंव त्य कामिनी कंटकवनीं ॥ बद्रतरुतें जाती वेंधुनीं ॥ देवही तैसे तरु कवळूनी ॥ वृक्षावरी वेंधती ॥७८॥

एक वृक्षावरी एक एकावरी ॥ तैसे एक एक वेंधले तयांवरी ॥ निकट जाऊनि विनंती करी ॥ वश्य होय म्हणवूनी ॥७९॥

सकळ वृक्षा गेले वेंधून ॥ तें पाहूनि जालंदर नंदन ॥ मग स्पर्शोस्त्र मंत्र जपून ॥ भस्मचिमुटी सोडीतसें ॥१८०॥

स्पशीस्त्र प्रगट होतां ॥ सकळ कामिनींसी झाली प्रेरकता ॥ तें पाहूनि कामिनी तत्त्वतां ॥ उड्या सोडिती महीतें ॥८१॥

तयांच्या मागें देव भले ॥ उड्या सोडिती अति वहिलें ॥ परी स्पर्शास्त्रें पदातें धरिलें ॥ तरुशाखेतें कवळूनी ॥८२॥

मग खाली मौळी वरते पद ॥ मध्येंचि लोंवती देववृंद ॥ मुकुट महीतें पडोनि बद्ध ॥ कबरी मोकळी हेलावे ॥८३॥

जैसें सुग्रीव पक्ष्याचें घर ॥ तरुसी लोंवती दिसती अपार ॥ कीं दिनउदयीं शाखेवर ॥ वडकाळिका झोंबती ॥८४॥

तन्न्यायें तरुवरती ॥ देव उफराटें झोळकंवे घेती ॥ तें पाहूनी उमापती रमापती ॥ हास्य करिती गदगदां ॥८५॥

म्हणती बरवी झाली मौज ॥ ऐसा मिळाला नाहीं भोज ॥ न मारितां सकळ ज्ञानकाज ॥ फेडूनि करपुटीं ॥ नग्नशरीरी मिरवले ॥८६॥

मग स्त्रियां तळवटीं ॥ काम करित्या झाल्या शेवटीं ॥ सकळांचें चीर फेडूनि करपुटीं ॥ नग्नशरीरी मिरविले ॥८७॥

सकळ वस्त्रें जालिंदरापासीं ॥ स्त्रिया आणूनि करिती राशी ॥ मग जालिंदर कानिफापाशीं ॥ हळूचि खुणे सांगतसे ॥८८॥

देव सकळ झाले नग्न ॥ त्यांते नेसवूनि येई वसन ॥ मग तो कानिफा घेऊन वसन ॥ ज्याचे त्यासी नेसवीतसे ॥८९॥

नेसवितां देव बोलत ॥ अहो गुरुची करणी विपरीत ॥ विध्वंसलें असे सामर्थ्य ॥ योग्यायोग्य दिसेना ॥१९०॥

ज्यांची ब्रह्मांडभरी कीर्ति ॥ ते तरुलागीं कैसे लोंवती ॥ ऐसे म्हणूनि तयापरती ॥ वसनालागीं परिधानी ॥९१॥

म्हणे महाराजा गुरुसी चोरुन ॥ तुम्हां परिधानितों गुप्त वसन ॥ तरी हें ऐसें वर्तमान ॥ बोलूं नका गुरुतें ॥९२॥

वसन नेसल्या उपरी ॥ पाय वंदी उभय करीं ॥ भाळ ठेवूनी पदावरी ॥ आणिक जात पुढारां ॥९३॥

मग कानिफाची नेत्रभक्ती ॥ पाहुनी तुष्टले देव चित्तीं ॥ मग प्रसन्न होऊनि वरदहस्तीं ॥ वरा ओपिती कृपेनें ॥९४॥

मनीं करुनि दृढ विचार ॥ विना दिधल्यावाचूनि वर ॥ सोडणार नाहीं जालिंदर ॥ कृतनिश्वय हा असे ॥९५॥

ऐसा निश्चय करुनि चित्तीं ॥ प्रसन्न चित्तें वर ओपिती ॥ जें जें अस्त्र तयाचे शक्ती ॥ आम्ही मिरवूं निश्चयें ॥९६॥

मग सकळीं देऊनि वरप्रदान ॥ कानिफा केला वरदवान ॥ तें ऐकूनि पावकनंदन ॥ विभक्तास्त्र सोडीतसे ॥९७॥

विभक्तास्त्र होतां प्राप्त ॥ सकळ देव झाले मुक्त ॥ सांवरुनि वस्त्रभूषणातें ॥ नाथापाशीं पातलें ॥९८॥

मग सर्वत्रीं करुनि नमस्कार ॥ म्हणती तव सुता दिधला वर ॥ सकळ अस्त्रीं साक्षात्कार ॥ आम्ही मिरवूं निजांगें ॥९९॥

उपरी बोले जालिंदरनाथ ॥ पुढें करीन साबरी कवित्व ॥ त्यातें साह्य तुम्ही समस्त ॥ कृपा करुनि असावें ॥२००॥

मग अवश्य म्हणोनि वचन देती ॥ साह्य असों तव कवितीं ॥ ऐसें बोलोनि स्वस्थाना जाती ॥ विमानारुढ होऊनियां ॥१॥

यावरी रमावर आणि उमावर ॥ कानिफा आणि जालिंदर ॥ बद्रिकाश्रमीं होऊनि स्थिर ॥ तीन रात्र राहिले तेथें ॥२॥

तेथील स्वाद धुंडीसुत ॥ पुढें सांगेल यथास्थित ॥ नरहरिवंशीं नाम ज्यातें ॥ मालू ऐसें वदताती ॥३॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ द्वादशाध्याय गोड हा ॥२०४॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ अध्याय ॥१२॥ ओव्या २०४ ॥ शुभं भवतु ॥

॥ नवनाथभक्तिसार द्वादशाध्याय समाप्त ॥


श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय १३

श्रीगणेशाय नमः

श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

जयजयाजी त्रिभुवनेशा ॥ मच्छकच्छवराहनरसिंहवामनवेषा ॥ भार्गव राघव द्वारकाधीशा ॥ पूर्णब्रह्मा सर्वज्ञा ॥१॥

हे गुणातीता सकळगुणज्ञा ॥ अव्यक्तव्यक्ता सर्वज्ञा ॥ पूर्णब्रह्म अचल सर्वज्ञा ॥ बौद्ध कलंकी आदिमूतें ॥२॥

मागिले अध्यायीं केलें कथन ॥ श्रीजालिंदरा होऊनि जन्म ॥ तप आचारोनि अत्रिनंदन ॥ संपादिला गुरुत्वीं ॥३॥

तो समर्थ अत्रिसुत ॥ प्रसन्न झाला सद्विद्येंत ॥ तयावरुतें सकळ दैवत ॥ गौरविलें पावकें ॥४॥

स्कंधीं वाहूनि द्विमूर्धनी ॥ पृथक् दैवतें स्थानीं स्थानीं ॥ सत्य लोकांदि अमरा पाहूनी ॥ वैकुंठादि पाहिलें ॥५॥

पाहिलें इंद्र चंद्रस्थान ॥ मित्र वरुण गंधर्वा भेटून ॥ सुवर्लोक भुवलोंक तपोलोकादि पाहून ॥ वरालागीं आणिलें ॥६॥

यक्ष राक्षस किन्नरांसहित ॥ गणगंधर्वादि गौरवूनि समस्त ॥ वश केला जालिंदरनाथ ॥ अस्त्रविद्येकारणें ॥७॥

याउपरी कानिफा कर्णोदय ॥ होऊनि शक्ती ॥ प्रसन्न केलें वराप्रती ॥ उपरी गेले स्वस्थाना निगुती ॥ आश्रम बद्रिका सांडूनि ॥९॥

परी उमावर आणि रमावर ॥ कानिफा आणि जालिंदर ॥ बद्रिकाश्रमीं राहूनि स्थिर ॥ करिती विचार तो कैसा ॥१०॥

एकमेकां बोलती हांसून ॥ आठवूनि देवतांचें विमुंडमुंडन ॥ प्रसन्न झाले विटंबून ॥ बुद्धिहीन हे कैसे ॥११॥

परी धन्य जालिंदर मिळाला यांसी ॥ अवस्था दारुण महांसी ॥ पूर्वी भिडले अपार राक्षसांसी ॥ परी ऐसा मिळाला नाहीं त्यां ॥१२॥

उफराटे नग्नदेही ॥ अधो पाहत होते मही ॥ ऐसे उचित कदा देही ॥ मिळाले नाहीं तयांसी ॥१३॥

ऐसें बोलोनि उत्तरोत्तर ॥ हास्य करिती वारंवार ॥ मेळवूनि करास कर ॥ टाळी पिटिती विनोदें ॥१४॥

असो ऐसी विनोदशक्ती ॥ यावरी बोले उमापती ॥ हे महाराजा जालिंदरा जती ॥ चित्त दे या वचनातें ॥१५॥

नागपत्रअश्वत्थस्थानीं ॥ पूर्ण यज्ञआहुती करोनी ॥ प्रथम कवित्वा रचोनि ॥ वरालागीं साधावें ॥१६॥

वेदविद्या मंत्र बहुत ॥ अस्त्रिविद्या प्रतापवंत ॥ परी ते महीवरी पुढें कलींत ॥ चालणार नाहीं महाराजा ॥१७॥

मग मंत्रशक्ती उपायतरणी ॥ कांहींच न मिळे लोकांलागुनी ॥ मग ते दुःखप्रवाहशमनीं ॥ सकळ लोक पडतील ॥१८॥

तरी सिद्ध करुनि आतां कविता ॥ आवंतिजे नागाश्वत्था ॥ सकल विद्या करुनि हाता ॥ कानिफातें ओपिजे ॥१९॥

या कानिफाची उदार शक्तिस्थिती ॥ मिरवत आहे दांभिकवृत्ती ॥ तरी बरवी आहे कार्याप्रती ॥ पुढें पडेल महाराजा ॥२०॥

हा अपार शिष्य करील पुढती ॥ विद्या वरितील याच्या हातीं ॥ मग ती प्रतिष्ठा लोकांपरती ॥ सर्व जगीं मिरवेल ॥२१॥

पूर्वी सांबरी ऋषीनें मार्ग ॥ काढिला आहे शुभयोग ॥ परी थोडकी विद्या चांग ॥ महीलागीं पुरेना ॥२२॥

तरी शतकोटी सांबरीगणा ॥ महीतें मिरवावें शुभवचना ॥ सकळास्त्रांची आणूनि भावना ॥ महीलागी मिरवावी ॥२३॥

तरी या कवितेची वांटणी ॥ मिरवावी नवनाथलागुनी ॥ कोणती कैसी गतीलागुनी ॥ सांगतों मात ते ऐका ॥२४॥

पूर्वी मच्छिंद्रानें धरुनि लक्ष ॥ काव्य केलें आहे प्रत्यक्ष ॥ तेहतीस कोटी पंचाण्णव लक्ष ॥ मंत्रविद्युल्लता मिरविल्या ॥२५॥

यापरी गोरक्षगोष्टी होटीं ॥ मिरवेल नव लक्ष बारा कोटी ॥ पंच कोटी एक लक्ष शेवटीं ॥ मीननाथ मिरवेल ॥२६॥

नव कोटी सात लक्ष ॥ चर्पटनाथ करील कीं प्रत्यक्ष ॥ सात कोटी चार लक्ष ॥ भरतरीनाथ करील कीं ॥२७॥

तीन लक्ष दोन कोटी ॥ रेवणनाथ करील शेवटीं ॥ एक लक्ष एक कोटी ॥ वटसिद्धनाथ करील कीं ॥२८॥

चौतीस कोटी बारा लक्ष ॥ श्रीजालिंदरानें करावें प्रत्यक्ष ॥ सहा कोटी आठ लक्ष ॥ कानिफानें मिरवावें ॥२९॥

अशुभप्रयोग गोरक्षरहाटी ॥ स्थापूनि योजावे शतकोटी ॥ पुढें लोकां साधनजेठी ॥ होणार नाहीं महाराजा ॥३०॥

म्हणूनि ऐसें योजूनि साधन ॥ मंत्रप्रयोगीं करावें प्रवीण ॥ तें न करितां सकळ जन ॥ सुख होईल रोगांतें ॥३१॥

तरी हे जनउपकारासाठीं ॥ जीवा करावी आटाआटी ॥ तुम्हातें सागावी ऐसी गोष्टी ॥ नोहे सर्वज्ञ आम्हांते ॥३२॥

ही कलीची विद्या कलिसंधान ॥ मिरवित आहे पूर्वीपासून ॥ तुम्ही नवनाथ अवतार घेऊन ॥ विद्या वर्तवीत असतां कीं ॥३३॥

तुम्ही जाणणार भविष्योत्तर जाणोनि नाथा ॥ तूं देवासीं केली वार्ता ॥ कानिफातें वर देतां ॥ बोलिलासी हिता महाराजा ॥३५॥

तरी आतां आळस सांडूनि ॥ जेवी मिरवावें कवित्वरत्न ॥ जारण मारण उच्चाटन ॥ कवित्वरचनीं मिरवावें ॥३६॥

ऐसें सांगूनि उमानाथ ॥ कानिफाविषयीं आणिक सांगत ॥ यासी बैसवूनि पूर्ण तपास ॥ समर्थपणें मिरवीं कां ॥३७॥

ऐसें सांगता उमावर ॥ अवश्य म्हणे जालिंदर ॥ मग वर देऊनि रमावर ॥ जाता झाला वैकुंठीं ॥३८॥

मग जालिंदर आणि कानिफनाथ ॥ द्वादश वर्षे राहूनि तेथ ॥ चाळीस कोटी वीस लक्षांत ॥ उभें चरित्र रचियेलें ॥३९॥

तें आदिनाथें कवित्व पाहोन ॥ पूर्ण झालें समाधान ॥ मग म्हणे नागाश्वत्थी जाऊन ॥ सिद्धीमार्गी पावावें ॥४०॥

मग जालिंदर आणि कानिफनाथ ॥ जाऊनि पाहिला नागाश्वत्थ ॥ पूर्ण आहुती हवन तेथ ॥ करुनि तोषवी वीरांतें ॥४१॥

सूर्यकुंडाचें आणुनि जीवन ॥ बावन्न वीरा करी सिंचन ॥ प्रसन्न करुनि त्यांचें मन ॥ वरालागी घेतलें ॥४२॥

यापरी पुनः परतून ॥ पाहते झाले बद्रिकाश्रम ॥ मग कानिफांते तपा बैसवून ॥ लोहकंटकी मिरविला ॥४३॥

श्रीआदिनाथाच्या साक्षीसी ॥ कानिफा बैसवून पूर्ण तपासी ॥ श्रीजालिंदर तीर्थस्थानासी ॥ जाता झाला पुसून ॥४४॥

त्याचि ठायीं बद्रिकाश्रमांत ॥ कानिफा आणि श्रीकृष्णनाथ ॥ तप करिती भागीरथीतीरांत ॥ तीव्र काननी बैसूनियां ॥४५॥

उभय ठाव असे विभक्त ॥ एकमेका नसे माहीत ॥ असो येरीकडे जालिंदरनाथ ॥ नानाक्षेत्रीं हिंडतसे ॥४६॥

परी क्षेत्रीं जातांचि आधीं काननीं ॥ भारा बांधिला तृण कापूनी ॥ निजमौळी त्वरें वाहुनी ॥ क्षेत्रामाजी संचरे ॥४७॥

परी तो मौळी भारा घेतां ॥ सुख न वाटे अनिळचित्ता ॥ मग संचरोनि भयहतां ॥ वरच्यावरी धरीतसे ॥४८॥

म्हणाल पवनासी काय कारण ॥ वरचेवरी धरावया तृण ॥ तरी जालिंदर अग्निनंदन ॥ अग्निपिता तो असे ॥४९॥

परी पौत्राची करुनी ममता ॥ म्हणूनि भारा धरी वरुता ॥ असो जालिंदर क्षेत्रीं येतां ॥ तृण गोधना सोडीतसे ॥५०॥

ऐसें भ्रमण करितां महीं ॥ नानातीर्थक्षेत्रयात्राप्रवाहीं ॥ तो गौडबंगाल देशाठायीं ॥ हेलपट्टणीं पैं आला ॥५१॥

तृणभार मिरवोनि माथीं ॥ परी तो मिरवे सर्वांहातीं ॥ अधर चाले मस्तकावरती ॥ लोक पाहती निजदृष्टी ॥५२॥

हेलापट्टण अति विस्तीर्ण ॥ बुद्धिप्रयुक्त तेथील जन ॥ जालिंदराचें चिन्ह पाहून ॥ आश्वर्य करिती मानसीं ॥५३॥

म्हणती अधर भारा कैसा ॥ चालती हा न कळे तमाशा ॥ तरी हा सिद्ध अवतारलेशा ॥ महीलागीं मिरवीतसे ॥५४॥

मग ते चव्हाट्याचे जन ॥ करुं धांवती तैं दर्शन ॥ परी तें नाथा समाधान ॥ चित्तीं प्रशस्त लागेना ॥५५॥

जे पूर्णपणें झाले निवाले ॥ ते प्रतिष्ठेपासूनि दुरावले ॥ कदा न जातां जगीं मानवले ॥ चित्तीं निःस्पृहता धरुनियां ॥५६॥

बृहस्पतीचे पडिपाडी ॥ तया होतसे सर्वार्थजोडी ॥ परी तों वेडियांत मारी दडी ॥ लोकमहिमाभयास्तव ॥५७॥

जैसें कृपण आपुले धन ॥ रक्षी महीचे पाठीलागून ॥ तन्न्याय झालिया मन ॥ कदाकाळीं आवरेना ॥५८॥

असो मग जालिंदरनाथ ॥ अति तोषें तृणभार जमवूनि आणीत ॥ पाहुनि गोधनाची अमात ॥ तृण सोडी तयांसी ॥५९॥

मग गल्लीकुची गंधमोरी ॥ तेथें जाऊनि वस्ती करी ॥ भिक्षा मागूनि क्षेत्राभीतरी ॥ उदरनिर्वाह करीतसे ॥६०॥

यापरी वर्ततां त्या गांवीचा नृप ॥ त्रिलोकचनसुत जैसा कंदर्प ॥ तयाचें वर्णिता स्वरुप ॥ सरस्वतीसी न सुचे हो ॥६१॥

नाम जयाचें गोपीचंद ॥ वरी मिरवला सर्व संपत्तिवृंद ॥ दिव्य अमूप अमरभद्र ॥ पाहूनि लाजे कुबेर तो ॥६२॥

द्वादश लक्ष अपूर्वशक्ती ॥ अश्व मिरवले वाताकृति ॥ तेजःपुंज पाहूनि लाजती ॥ चपळपणी चपळा त्या ॥६३॥

चीरतगटीं रत्नकोंदणीं ॥ पाखरा शोभल्या बालार्ककिरणीं ॥ झगमगती झालरी किरणीं ॥ हेमगुणीं मिरवल्या ॥६४॥

रश्मी अति शोभायमान ॥ झालरी अग्निहेमगुण ॥ मुक्त गुंफिले समत्वीं समान ॥ नक्षत्रमालिका जेवीं त्या ॥६५॥

हेमतगटी रत्नकोंदणीं ॥ ग्रीव मिरवल्या माळा भूषणीं ॥ संगीत पेट्या नवरंगरत्नी ॥ दीप जैसे लाविले ॥६६॥

मुख शोभलें त्याचिपरी ॥ दिव्य मिरवल्या सरोवरीं ॥ चातकपिच्छ कर्णद्वयाभीतरीं ॥ तुरे खोविले मौळीतें ॥६७॥

आणि पुष्पपृष्ठीं रत्नजडित ॥ गेंदा जोडिया तेजभरित ॥ चारजामे लखलखीत ॥ चपळेहूनि अधिक्ल ते ॥६८॥

द्वादश लक्ष ऐसियेपरी ॥ बाजी मिरवती चमूभीतरी ॥ प्रत्येक पाहतां संमतसरी ॥ उदधिसुत मिरविले ॥६९॥

कीं अर्कहदयी स्पृहा होती ॥ मातें लाभली श्यामकर्ण मूर्ती ॥ त्या स्पृहेची करावया शांती ॥ द्वादश लक्ष प्रगटले ॥७०॥

त्याचिपरी गजसमूह मत ॥ पाहूनि लाजे ऐरावत ॥ चित्तीं म्हणे क्षोभूनि सर्वत्र ॥ रत्नें उपजलीं महीवरी ॥७१॥

विशाळ शुंडा हिरेजाती ॥ अधरें द्वैतदंत शोभती ॥ तयां वेष्टूनि चुडे पाहती ॥ रत्नकोंदणीं मिरविले ॥७२॥

ग्रीवे घंटिका हेमगुणीं ॥ तयामाजीं रत्नपाणी ॥ हिरे माणिक पाचतरणी ॥ नवरंगी शोभले ॥७३॥

यापरी हौदे मेघडंबरी ॥ सुवर्ण अंबार्‍या शोभल्या वरी ॥ त्याहीं कोंदणीं नक्षत्रापरी ॥ रत्न मिरवूं लाहिले ॥७५॥

कोणी रिक्त कोणी ऐसे ॥ परी ते भासती पर्वत जैसे ॥ पृष्ठीं पताका पहा भासे ॥ पर्वतमौळी तरु जेवीं ॥७६॥

जैसे गजपृधूतें मिश्र ॥ विराजलेती दशसहस्त्र ॥ पाईक स्वार दासचक्र ॥ रायापुढें धांवती ॥७७॥

छडीदार चोपदार ॥ पूर्ण बोथाटे पुकारदार ॥ यंत्रधारी अश्वस्वार ॥ रायासमोर धांवती ॥७८॥

अति उग्र खडतरणी ॥ मिरवल्या जैशा कृतांतमूर्ति ॥ की युद्धकुंडींचें पावक होती ॥ घेती आरती परचक्र ॥७९॥

यापरी राव तो कृपाळ ॥ शोभे जैसा तमालनीळ ॥ बरवेपणीं अतिझळाळ ॥ कंदर्पपंथी मिरवतसे ॥८०॥

स्वरुपलक्षणी गोपीचंद ॥ समता न पावे आणिक गौडवृंद ॥ चंद्रचूडमण्यालागीं अबाध ॥ कलंक देहीं म्हणोनी ॥८१॥

अर्क दृष्टांता संमत देखा ॥ तरी तोही तीव्र दाहकपंथा ॥ चपला तेजापरी भ्याडा चित्ता ॥ मेघामाजी दडताती ॥८२॥

तैसा नव्हे हा नृपनाथ ॥ दिव्यरुपी सदगुणभरित ॥ धर्म औदार्य सभाग्यवंत ॥ विजयलक्ष्मी मिरवीतसे ॥८३॥

म्हणाल प्रताप नसेल व्यक्त ॥ तरी कृतांताचे आसन पाळीत ॥ धाकें परचक्र आणूनि देत ॥ कारभारातें न सांगतां ॥८४॥

यापरी वर्णितां शरीरपुष्टी ॥ तरी म्हणवीतसे महीतें जेठी ॥ शतजेठी महीपुटी ॥ लावूनियां रगडीतसे ॥८५॥

यापरी आणिक कल्पाल चित्तीं ॥ कीं इतुकी स्थावर झाली शक्ती ॥ तरी भोगीत नसेल कामरती ॥ विषयीं आसक्त नसेल तो ॥८६॥

तरी धर्मपत्नी शुभाननी ॥ असती नक्षत्रतेजप्रकरणीं ॥ खंजरीटमृगपंकजनयनी ॥ चंद्राकृती मिरवल्या ॥८७॥

चित्तज्ञ परम चातुर्यखाणी ॥ यापरी षोडशशत शुभाननी ॥ भोगांनना जयालागुनी ॥ राजांकीं मिरवल्या ॥८८॥

परी ते पाहतां स्वरुपखाणी ॥ कीं कामचि सांडावा ओवाळुनि ॥ कीं उर्वशीच्या पंक्ती आणुनी ॥ दासी मिरवती तिला त्या ॥८९॥

गजगामिनी चपला अबळा ॥ तेजें लाजविती पाहूनि चपळा ॥ शृंगारभरित असती सकळा ॥ चंद्र रात्री नक्षत्री ॥९०॥

असो ऐसा नृपनाथ ॥ हेलापट्टणी विराजित ॥ जयाची माता सदगुणभरित ॥ मैनावती विराजली ॥९१॥

तंव ती सती मैनावती ॥ कोणी एके दिवशीं उपरीवरती ॥ दिशा न्याहाळी सहजस्थिती ॥ जालिंदरातें देखिलें ॥९२॥

तृणभार अधर मौळी ॥ मुक्त विराजला हस्तकमळीं ॥ पथिकासमान ग्राममेळीं ॥ मार्गी – येतसे पुढारां ॥९३॥

परी तेजःपुंज जैसा तरणी ॥ मदनाकृति स्वरुपखाणी ॥ निःस्पृह निवृत्त योगींद्र मुनी ॥ देखियला तियेनें ॥९४॥

मग म्हणे मैनावती ॥ अधर भारा मौळीवरती ॥ कैसा चाले धैर्यशक्ती ॥ काय असे तयातें ॥९५॥

नोंहे आधार करबंधन ॥ तेही मिरवती मुक्तमन ॥ तरी हा कोणी प्रतापवान ॥ महीलागीं उतरला ॥९६॥

गण किंवा गंधर्व सुरवर ॥ विरिंची किंवा गंधर्व हरिहर ॥ कीं वाचस्पती उशना थोर ॥ प्रतापवान हा असे ॥९७॥

परी सुदृढ आराधोनि भक्तीं ॥ मिरवूं नरदेहसार्थकगती ॥ प्रसन्न करुनि चित्तभगवती ॥ अचळपद वरावें ॥९८॥

ऐसा विचार करुनि मनीं ॥ परिचारिके पाचारुनी ॥ तेही सद्विवेकी सज्ञान प्राज्ञी ॥ जगामाजी मिरवीतसे ॥९९॥

मन्सुख उभी करसंपुटीं जोडूनि बोले वागवटी ॥ कवण अर्थ उदेला पोटीं ॥ निवेदावा महाराज्ञी ॥१००॥

येरी म्हणे वो गजगामिनी ॥ अर्थ उदेला माझे मनीं ॥ परी प्राणजीवित्व रक्षूनी ॥ कार्य आपुलें साधावें ॥१॥

प्रगट होता ती वार्ता ॥ परम पडेल क्षोभ चित्ता ॥ मग त्या उदकप्रवाही वाहतां ॥ परम संकट मिरवेल ॥२॥

म्हणोनि गौप्य धरोनि वचन ॥ कार्यमांदुसा सोडिजे संधान ॥ मग तें वर्णितां सभाग्यपण ॥ अंबर ठेंगणें वाटतसे ॥३॥

म्हणोनि तिनें उभवूनि तर्जनि ॥ खुणें दाविलें तिजलागुनी ॥ कोण येत प्रविष्टतरणी ॥ मौळीं तृण वाहोनियां ॥४॥

तंव ती खूण परिचारिका ॥ पाहती झाली जालंदर विवेका ॥ तों मौळीं भारा अधर दिखा ॥ सवें सवें चालतसे ॥५॥

तें पाहूनियां निजदृष्टीं ॥ विस्मय करी आपुले पोटीं ॥ म्हणे माय वो परम धूर्जटी ॥ योगासिद्ध असे हा ॥६॥

कनकवर्ण बालार्ककिरणीं ॥ महीं मिरवितसे योगप्राज्ञी ॥ तरी हा स्वर्भूवर्लोकप्राणी ॥ सहसा येत असे जननीये ॥७॥

सत्यलोक भृलोक तपोलोक ॥ तयाचे गमनें शोभती देख ॥ स्मरारि कीं स्मरजनक ॥ महींलागीं उतरला ॥८॥

तरी माय वो ऐक वचन ॥ सलीलभक्तीं आराधून ॥ तैं चित्तभगवती प्रसन्न करुन ॥ कल्याणदरीं रिघावें ॥९॥

जैसें ध्रुवानें अढळपद ॥ जिंकूनि हरिला सकळ भेद ॥ जन्ममृत्यूंचे दृढ बंध ॥ मुक्त केले जननीये ॥११०॥

तन्न्याय दास दासी ॥ ओपूनि ऐशा शत पुरुषांसी ॥ चिरंजीव प्रसाद ओपूनि देहासी ॥ अचळ महीतें वर्तावें ॥११॥

ऐसी परिचारिकेची युक्ती ॥ ऐकूनि बोले मैनावती ॥ म्हणे माय वो तरुनि आर्ती ॥ चित्तस्वरुप करावें ॥१२॥

तरी येवढा प्राज्ञीक ज्ञानी ॥ वस्तीस राहतो कोणे स्थानीं ॥ तितुकें गुज गोचर करुनी ॥ लगबगें येईं कां ॥१३॥

अवश्य म्हणोनि परिचारिका ॥ जाती झाली सदैविका ॥ तंव तो संचारुनि ग्रामलोका ॥ गोधनातें पाहतसे ॥१४॥

तंव तीं गोधनें ग्रामवाटीं ॥ अपार जात असती चव्हाटीं ॥ तृण सोडूनि ते थाटी ॥ सुपंथीं तेथ गमतसे ॥१५॥

तंव ती दासी मागे मागे ॥ जात असे लगबगें ॥ मग गंधगल्लीं कुश्चलयोगें ॥ जाऊनियां बैसला ॥१६॥

तेथें क्षण एक उभी राहून ॥ पहात त्याचें अचळपण ॥ सूर्य पावें तों अस्तमान ॥ अचळस्थान रक्षिलें ॥१७॥

मग ती येऊनि वाताकृती ॥ पूर्ण झाली सांगती ॥ अमुक स्थानीं चित्तभगवती ॥ प्रसन्नचित्तीं स्थिरावे ॥१८॥

कुश्वित जागा दुर्गधव्यक्त ॥ माये वो असे सर्व एकांत ॥ तया स्थानीं पिशाचवत ॥ वस्तीलागीं ठिकाण ॥१९॥

जेथे न राहे श्वानसूकर ॥ कर्दम कुवेग कुवेग गंध अपार ॥ वस्ती विराजून पिशाचसर ॥ वल्गना ते वदतसे ॥१२०॥

ऐसी ऐकूनि तियेची वाणी ॥ म्हणे स्थिर वो शुभाननी ॥ रहित होतां जनसंबोध यामिनी ॥ मग जाऊं दर्शना ॥२१॥

अवश्य म्हणोनि परिचारिका ॥ मग मध्ययामिनीं सद्विवेका ॥ उत्तम फळ ठेऊनि तबकां ॥ षड्रसानें मिरविलें ॥२२॥

काळीं कांबळी गुंतूनि बुंथी ॥ परिचारिका मैनावती ॥ येत्या जाहल्या स्थान एकांतीं ॥ लक्षोनियां महाराजा ॥२३॥

तंव तो सिद्धरायमुनी ॥ परमहंसाच्या आव्हानूनि वहनीं ॥ मोक्षमुक्ताच्या ग्रहणार्थ ध्यानीं ॥ बैसलासे महाराजा ॥२४॥

मग त्या उभय सहित युवती ॥ जाऊनि लोटल्या पदावरती ॥ मूर्ध्नीकमळ प्रेमभरती ॥ पदकमळीं ओपिती ॥२५॥

सन्मुख जोडूनि उभय कर ॥ सप्रेम भक्ती वागुच्चार ॥ चातुर्यगंध म्लान अपार ॥ समर्पिली लाखोली ॥२६॥

म्हणसी महाराजा सर्वज्ञराशी ॥ त्रिविधताप उभय उद्देशी ॥ ते तूं दाहिले जीवित्वासीं ॥ मोक्षमांदुसा जाणूनियां ॥२७॥

तरी ऐशिया तपोदरीं ॥ समयजलदा लक्षूनि अंतरीं ॥ कल्पनासदनाचा पेटला भारी ॥ विझवावया पातलों ॥२८॥

तरी औदार्याचें पाहूनि मुख ॥ त्रिविधतापांचा सबळ पावक ॥ विझवूनि चित्तमहीतें पिक ॥ ब्रह्मकर्णी पिकावें ॥२९॥

ऐसें तयाचें वागुत्तर ॥ प्रविष्ट होतां निशिकर ॥ तेणेंकरुनि चित्तसागर ॥ आनंदलहरीं दाटला ॥१३०॥

दाटला परी संकोचित ॥ चंद्र आकाशीं उदधि महींत ॥ तरी भक्तिपंथिका चक्रवात ॥ अस्ताचळीं योजावा ॥३१॥

ऐसें चित्त योजूनि नाथा ॥ दाविता झाला तीव्रवार्ता ॥ मैनावतीचे सफळ चित्ता ॥ किंवा कसोटीं पाहतसे ॥३२॥

पिशाच चेष्टा उद्दामनीती ॥ आव्हानूनि सदृढयुक्तीं ॥ महीचे पाषाण हातीं ॥ कवळोनिया झुगारी ॥३३॥

अशुभवाणीं करुनि वल्गना ॥ भंगूं पाहे चित्तप्रेमा ॥ मेघऔदार्याच्या दुर्गुणा ॥ पाषाणकारका ओसांडी ॥३४॥

परी ते जाया धैर्यवंत ॥ निश्वयअर्गळी योजूनि सदृढ चित्त ॥ म्हणें याचे हस्तें मृत्य ॥ आल्या मोक्ष वरीन मी ॥३५॥

ऐसें योजूनि सदृढ मांडी ॥ बैसली ठाव कदा न सांडी ॥ जैसा पर्वत अचळ विभांडी ॥ मेघधारा न गणोनि ॥३६॥

परी तो नाथ जालिंदर ॥ ओसंडितां पाषाणपूर ॥ परी ती रामा वज्राकार ॥ अचळ पाहूनि तोषला ॥३७॥

मग हस्तें झाडूनि पाषाणद्याडी ॥ म्हणे कोण तूं सांग गोरटी ॥ किमर्थ आजि माझिये पृष्ठीं ॥ लागपाळती केली त्वां ॥३८॥

दुर्गंधी गल्ली ओंगळींत ॥ आहे उगलाचि मी पिशाच येथ ॥ तरी तुज पेटला किमर्थ अर्थ ॥ कामानळें दाटला ॥३९॥

कवण कोणाची नितंबिनी ॥ वेगीं वद वो शुभाननी ॥ आम्ही तपी अलक्ष ध्यानी ॥ लक्ष मंगाया कां आलीस ॥१४०॥

यावरी म्हणे ती महाराजा ॥ त्रिलोचनराज विजयध्वजा ॥ तयाची कांता सर्वज्ञभोजा ॥ धर्मपत्नी मी असें ॥४१॥

असे परी जी योगद्रुमा ॥ काळें भक्षूनि पतिउत्तमा ॥ मातें केलें प्लवंगमा ॥ जगामाजी मिरवावया ॥४२॥

ऐसेपरी योगजेठी ॥ काळचक्र पाहूनि राहटी ॥ मग भयार्कउदक पाहूनि पोटीं ॥ पश्वात्तापी मिरविलें ॥४३॥

काळें पतीची केली गती ॥ तैसीच करील मम आहुती ॥ तरी मानवसन्निपातीं ॥ आरुक मातें होई कां ॥४४॥

येरि म्हणे त्वदभर्ता ॥ पावोनि लया त्वरिता ॥ कवण आश्रमीं काळचरिता ॥ लोटसी तूं जननीये ॥४५॥

येरी म्हणे वो सदैवभरिता ॥ सुत एक आहे प्रपंच ॥ येरु म्हणे कवण अर्था ॥ प्रपंचराहटी चालवी ॥४६॥

तंव ती म्हणे गौडबंगाल ॥ राज्यसदनीं देश विपुल ॥ तयाचा नृप गोपीचंद मूल ॥ दास तुमचा विराजे ॥४७॥

परी असो कर्मराहटी ॥ कृतांतउद्देशाचे पाठीं ॥ मम मौळींचा भार निवटीं ॥ कृपा झणीं करुनियां ॥४८॥

ऐसें ऐकूनि तियेचें वचन ॥ म्हणे कृतांतपाश दृढबंधन ॥ कैसें तुटे गे मग पिशाचान ॥ तुवां काय जाणितलें ॥४९॥

तरी आतां क्षण उभी न राहीं ॥ वेगीं आपुल्या सदना जाई ॥ तव सुता कळतां अनर्थप्रवाहीं ॥ मति त्याची मिरवेल ॥१५०॥

ऐसें बोलतां सागोंपांग ॥ तों मित्रउदयाचा पाहिला मार्ग ॥ मग नमस्कारुनि स्वामी सवेग ॥ सदनाप्रती पातली ॥५१॥

पातली परी अर्थवियोग ॥ चित्तसरितीं दाटला भाग ॥ अति तळमळे प्रसादमार्ग ॥ कृपार्णवीं भेटावया ॥५२॥

ऐसी तळमळे दुःखव्यथा ॥ तों दिनकर लोटला अस्ता ॥ होतां चंद्रविकास ती वनिता ॥ विकासली आनंदें ॥५३॥

पुन्हां घेऊनि परिचारिका ॥ तेथें आली सदयविवेका ॥ दृष्टीं पाहूनि योगिमृगांका ॥ चरणीं माथां ठेवीतसे ॥५४॥

मग सलगभक्तीची करुनि दाटी ॥ सदृढ चरणीं घातली मिठी ॥ पद कवळोनि हस्तपुटीं ॥ पद चुरीत प्रेमानें ॥५५॥

ऐशी सेवा दोन प्रहर ॥ करितां अगम्यलीला प्रभाकर ॥ तें पाहूनि नमस्कार ॥ स्वामीसी करुणा उठतसे ॥५६॥

पुन्हां येऊनियां सदनीं ॥ आचरे आपुली प्रपंचराहणी ॥ अस्त होत्तांचि वासरमणी ॥ स्वामीसी जाऊनि लक्षीतसे ॥५७॥

सद्भावउदय दावूनि प्रेमा ॥ सेवा करीतसे मनोधर्मा ॥ परी सेवा करितां षण्मासउगमा ॥ दिन लोटूनि गेले पैं ॥५८॥

यापरी कोणे एके दिवशी ॥ काळुखी दाटली अपार महीसी ॥ परी सेवा करावयासी ॥ पातली नित्यनेमानें ॥५९॥

तंव ती मूर्ध्नीखाली अंक ॥ ठेऊनियां देतसे टेंक ॥ त्या संधीत योगिनायक ॥ काय करिता झाला पैं ॥१६०॥

मायिक सबळ करुनि भ्रमर ॥ रुंजी घाली तियेवर ॥ न कळतां येऊनि महीवर ॥ अंकाखालीं रिघाला ॥६१॥

ऐसें करुनि अवस्थेंत ॥ आपण गाढ झाले निद्रिस्त ॥ चलनवलन सांडूनि स्थित ॥ कंठीं घोर वाजवी ॥६२॥

तंव तो पटूपद जानूपरी ॥ फोडूनि निघाला नेटें उपरी ॥ ग्रीवे डसूनि जांलिदरा परी ॥ सुचविलें अर्थातें ॥६३॥

तंव तो लगबगें अति त्वरित ॥ उठोनि हस्तें पाहे ग्रीवेंत ॥ ग्रीवा पाहोनि सतीअंकांत ॥ दृष्टी करी महाराजा ॥६४॥

अंक फोडोनि पडे छिद्र ॥ रुधिर दाटलें महीं अपार ॥ तें पाहूनियां जालिंदर ॥ धैर्यबळ ओळखिलें ॥६५॥

मग सहज कृपेची करोनि दृष्टी ॥ मौळी कुरवाळी कृपाजेठी ॥ मग तारकामंत्र कर्णपुटीं ॥ उपदेशिला तत्काळ ॥६६॥

मंत्रपउदेश ओपितां कानीं ॥ खूण व्यक्त दाविली संजीवनी ॥ तेणें खुणें पारायणीं ॥ ब्रह्मव्यक्त झालीसे ॥६७॥

किंबहुना चराचरीं ॥ जीव तितुका संगमस्थावरीं ॥ अहंब्रह्म भुवनापासुनि आकारीं ॥ ब्रह्मदृष्टी हेलावे ॥६८॥

ऐसा होतां चमत्कार ॥ मग मौळी ठेवी चरणावर ॥ म्हणे महाराजा सकळ व्यापार ॥ आजि मिरवला सुगमत्वें ॥६९॥

यापरी तो कृपाळू मोक्षदानी ॥ आणिक करिता झाला करणी ॥ मंत्रप्रयोगें संजीवनी ॥ ते देहीं प्रेरीतसे ॥१७०॥

जी निर्जीवित्वा उठवील ॥ ती जीवित्वा काय न करील ॥ असो मैनावतीसी अमरवेल ॥ देहीं होऊनि ठेविलीसे ॥७१॥

जैसें रामें दानवकुशीं ॥ चिरंजीव केलें बिभीपणासी ॥ तन्न्यायें मैनावतीसे ॥ श्रीजालिंदरें केलें पैं ॥७२॥

मग नित्यनित्य प्रेमभक्ती ॥ विशाल मिरवे भावस्थिती ॥ परी आणिक काम उदेला चित्तीं ॥ पुत्रमोहेंकरोनियां ॥७३॥

मनांत म्हणे चमत्कार ॥ जानू भेदिली स्थिर भ्रमरें ॥ त्या दुःखाचा घाय अनिवार ॥ जानू वरी मिरवला ॥७४॥

घाय पडतां अनिवार ॥ अशुद्धाचा लोटला पूर ॥ तयावरी स्पर्शतां कर ॥ जैसी तैसी मिरविली ॥७५॥

तरी सध्यां चमत्कार ॥ झाला मम दृष्टीं गोचर ॥ आणिक केलें सनातनसार ॥ ब्रह्मव्यक्तिपरायण ॥७६॥

तरी चिरंजीवपद देऊनि मातें ॥ अचल केलें त्रैलोक्यातें ॥ याचि रीतीं माझ्या सुतातें ॥ होतें तरी फार बरवें ॥७७॥

ऐसें योजूनि दृढ मानसीं ॥ वियोगव्यथा वरिली देहासीं ॥ ती व्यथा नरहरिवंशीं ॥ धुंडीसुत मालू सांगे ॥७८॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ त्रयोदशाध्याय गोड हा ॥१७९॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

॥ नवनाथभक्तिसार त्रयोदशाध्याय समाप्त ॥


श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय १४

श्रीगणेशाय नमः

जयजयाजी पंढरीनाथा ॥ समचरणीं भक्ततापशमिता ॥ कटीं कर नासाग्रीं दृष्टी ठेविता ॥ होसी रंजिता मुनिमानसा ॥१॥

ऐसा स्वामी तूं करुणाकार ॥ तरी तूं बोलवीं भक्तिसार ॥ मागिले अध्यायीं कथानुसार ॥ परम कृपें वदविला ॥२॥

त्या कृपेचा बोध सबळ ॥ ब्रह्म उदधि पावला मेळ ॥ पात्रा मैनावती सबळ ॥ सरिताओंघीं दाटली ॥३॥

ॐ नमो ब्रह्मार्णवीं दाटली परी ॥ ऐक्यरुप झाली नारी ॥ मोहें पुत्राचें परिवारीं ॥ गुंतलीसे जननी ते ॥४॥

मनासी म्हणे अहा कैसें ॥ त्रिलोचनरायाचें जाहले जैसें ॥ त्याचि नीतीं होईल तैसें ॥ मम सुताचें काय करुं ॥५॥

जंव जंव पाहे त्यातें दृष्टीं ॥ तंव तंव वियोग वाटे पोटीं ॥ हदयी कवळूनि जठरवेष्टी ॥ होत असे मोहानें ॥६॥

अहा पुत्राचें चांगुलपण ॥ दिसे जैसा प्रत्यक्ष मदन ॥ परी काय करावें चांगुलपण ॥ भस्म होईल स्मशानीं ॥७॥

उत्कृष्टपणें करोनि कष्ट ॥ धाम उभाविलें अति श्रेष्ठ ॥ परी वन्हिबळें लागल्य काष्ठ ॥ तेवीं असे काळाग्नी ॥८॥

पहा पल्लवपत्रझाड ॥ अति विशाळ लावला पाड ॥ परी गाभारी वेष्टितां भिरुड ॥ उशाशीं काळ बैसला ॥९॥

तन्न्यायें दिसूनि येत ॥ वायां जाईल ऐसा सुत ॥ कीं कद्रूलागीं चोखट अमृत ॥ फिकरपणे मिरविले ॥१०॥

कीं यत्नेंकरुनि कचें दुर्घट ॥ संजीवनीचा केला पाठ ॥ परी देवयानीचा शाप उल्हाट ॥ यत्र व्यर्थ तो झाला ॥११॥

कीं सुंदर जाया कर्मे जारिणी ॥ परी पतिभयाच धाक मनीं ॥ तेवीं तो उशाशीं काळ बैसोनि ॥ सकळ जनां मिरवला ॥१२॥

कीं कुसुमशेज मृदुलाकार ॥ परी उसां घालूनि निजे विखार ॥ ते सुखनद्रेचा व्यापार ॥ सुखा लाहे केउता ॥१३॥

तन्न्यायें झालें येथ ॥ राजवैभव अपरिमित ॥ परी काळचक्राची सबळ बात ॥ भ्रमण करीत असे पैं ॥१४॥

ऐसी सदासर्वकाळ ॥ चित्तीं वाहे माय तळमळ ॥ परी सुतासी बोध कराया बळ ॥ अर्थ कांही चालेना ॥१५॥

तंव कोणी ऐके दिवशीं ॥ शीतकाळ मावमासीं ॥ उपरी सहपरिचारिकेंसीं उष्ण घेत बैसलीसे ॥१६॥

ते संधींत गोपीचंद ॥ चौकीविभागीं सकळ स्त्रीवृंद ॥ वेष्टूनि स्नान कराया सिद्ध ॥ चंदनचौकीं बैसला ॥१७॥

चंदनचौकी परी ते कैशी ॥ हेमतगंटी रत्न जैशीं ॥ जडावकोंदणी नक्षत्रांसीं ॥ राजवृंदीं चमकतसे ॥१८॥

सकळ काढूनि अंगींचे भूषण ॥ वरी विराजे राजनंदन ॥ उष्ण उदकीं करीत दंतधावन ॥ चौकीवरी बैसला ॥१९॥

तों सौधउपरी मैनावती ॥ झाली स्वसुतातें पाहती ॥ देखिला जैसा पूर्ण गभस्ती ॥ तेजामाजी डवरला ॥२०॥

राजसेवकाचें भोवतें वेष्टन ॥ परिचारिका वाहती जीवन ॥ परी त्या मंडळांत नृपनंदन ॥ चांगुलपर्णी मिरवतसे ॥२१॥

जैसा अपार पाहतां स्वनंदन ॥ मोहें आलें उदरवेष्टन ॥ तेणें लोटलें अपार जीवन ॥ चक्षूंतूनि झराटले ॥२३॥

परी ते बुंद अकस्मात ॥ मोहें घ्राणाचे उदभव व्यक्त ॥ गोपीचंद चातकातें ॥ स्पर्शावया धावले हो ॥२४॥

म्हणाल बुंद चक्षूदकीं ॥ नोहे उरते सत्कर्मवाकीं ॥ उत्तम फळांवें लक्षूनि सेकी ॥ व्यक्त जलें ते अंगासी ॥२५॥

बुंद नव्हती ते चिंतामणी ॥ हरुष केला भवकाचणी ॥ कीं कृतांतभयातें संजीवनी ॥ भूपशरीरा आदळले ॥२६॥

कीं अर्के पीडित भारी ॥ नृपजन वेष्टला नगरी ॥ तैं ते उतरले घन मनहरी ॥ बुंदवेश धरुनियां ॥२७॥

कीं काळक्षुधेचा पेटला अनळ ॥ तेणें शरीर झालें विकळ ॥ ते संधींत होऊनि कृपाळू ॥ कामधेनु उतरली ॥२८॥

कीं दरिद्राचें अतिवेष्टन ॥ तैसा येथें मिरविला कुबेर येऊन ॥ तन्न्याय सुबुंद घन ॥ रावहदयीं आदळले ॥२९॥

शरीरीं होतां बुंद लिप्त ॥ परी उदभवस्थिती लागली त्यांत ॥ म्हणूनि ऊर्ध्व करुनि मूर्धातें ॥ नभालागीं विलोकीं ॥३०॥

हदयीं होऊनि राव शंकित ॥ म्हणे बुंद कैंचा उदभवला येथ ॥ तरी अंबर झालें असेल व्यक्त ॥ घनमंडळ आगळें ॥३१॥

म्हणूनि ऊर्ध्व करुनि दृष्टी ॥ पाहता झाला नभापोटीं ॥ परी ते निर्मळपणें वृष्टी ॥ झाली कोठूनि म्हणतसे ॥३२॥

ऐसा विचार करितां चित्तीं ॥ दृष्टिगोचरी संभविती ॥ तों रुदन करितां मैनावती ॥ निजदृष्टीं देखिली ॥३३॥

करीत होता दंतधावन ॥ तैसाचि उठला नृपनंदन ॥ उपरी त्वरा वेगीं चढून ॥ मातेपाशीं पातला ॥३४॥

जातांचि पदी ठेवूनिया माथा ॥ उभा जोडूनि हस्तां ॥ म्हणे सांग जी कवण अर्था ॥ उचंबळलीस जननीये ॥३५॥

मजसारखा तूतें सुत ॥ राज्याधीश महीं व्यक्त ॥ ऐसा असूनि दुःखपर्वत ॥ कोठूनि उदेला तंव चित्तीं ॥३६॥

पाहें पाहें प्रताप आगळा ॥ न वर्णवे बळ बळियांकित महीपाळा ॥ मिरवती दर्पकंदर्प केवळा ॥ करभारातें योजिती ॥३७॥

ऐसी असतां बळसंपत्ती ॥ बोललें कुणी दुःखसरितीं ॥ तरी मम कोपाचा दाहक गभस्ती ॥ सांवरेल कोणातें ॥३८॥

जेणें पाहिलें असेल नयनीं ॥ उगीच तीव्र दृष्टी करोनि ॥ तरी तयाचे क्षणें चक्षु काढोनि ॥ तव करीं माये ओपीन गे ॥३९॥

किंवा दाविलें असें बोटी ॥ तरी तींच बोटें काढीन शेवटीं ॥ तरी कवण अर्थ उदेला पोटीं ॥ रुदन कराया जननीये ॥४०॥

अष्टविंशति स्त्रीमंडळ ॥ कीं त्यांनीं ओपिलें कडुवट फळ ॥ तरी शिक्षा करुनि तयां सबळ ॥ मोक्षपंथा मिरवीन ॥४१॥

किंवा माझिये दृष्टी सेवेशीं ॥ उदया पावला अंतर शेषीं ॥ म्हणूनि उदय शोकानिशी ॥ दर्शविली त्वां मातें ॥४२॥

तरी कोणता कवण अर्थ ॥ माते वदे प्रांजळवत ॥ कामनीं वेधक असेल चित्त ॥ तोचि वेध निवटीन मी ॥४३॥

म्हणसील कार्य आहे थोर ॥ करुं न शके सुत पामर ॥ तरी हा देह वेंचूनि समग्र ॥ अर्थ तुझा पुरवीन मी ॥४४॥

जरीं ऐशिया दृष्टीं ॥ अंतर पडेल काय पोटीं ॥ तरी धिक्कार असो मज शेवटीं ॥ पुत्रधर्म मिरवावया ॥४५॥

मग श्वान सूकर काय थोडीं ॥ अवतार मिरविती द्वारीं पवाडी ॥ याचि नीति तया प्रौढीं ॥ निर्माण झालों मी एक ॥४६॥

अहा पुत्रधर्म मग कैसा ॥ माता पिता दुखलेशा ॥ पाहूनि चित्तीं परी हरुषा ॥ भूमार तो नर एक ॥४७॥

आपण मिरवे राणिवा प्रकरणीं ॥ मातापिता दैन्यवाणीं ॥ तयाचे भारें सकळ मेदिनी ॥ विव्हळ दुःखे होतसे ॥४८॥

कांतेलागी शृंगार व्यक्त ॥ मातेसी वसन नेसावया भ्रांत ॥ तयाचे भारीं धरा समस्त ॥ विव्हळ दुःखी होतसे ॥४९॥

कांतेसी नेसावया वस्त्रें भरजरी ॥ माता ग्रंथीं चीर सावरी ॥ तयाचे भारें सकळ धरित्री ॥ विव्हळ दुःखें होतसे ॥५०॥

कांतेसी इच्छा समान देणें ॥ मातेसीं खावया न मिळे अन्न ॥ तयाचे भारें पृथ्वी सधन ॥ विव्हळ दुःखे होतसे ॥५१॥

कांतेसी बसावया उंच शासन ॥ मातेसी कष्टवी दासीसमान ॥ तयाचे भारें धरारत्न ॥ विव्हळ दुःखी होतसे ॥५२॥

रंभेसमान कांता ठेवी ॥ भूतासमान माता मिरवी ॥ तयाचे भारें धरादेवी विव्हळ दुःखी होतसे ॥५३॥

जन्म घेतला जियेचे पोटीं ॥ तीते म्हणे परम करंटी ॥ तयाचे भारें धरा हिंपुटीं ॥ विव्हळ दुःखी होतसे ॥५४॥

कांता सर्व सुखाचे मेळीं ॥ माता दुःखें अश्रु ढाळी ॥ तयाचे भारें धरा विव्हळी ॥ आणि दुःखी होतसे ॥५५॥

कांतेलागीं मृदु भाषण ॥ मातेसी हदयी खोंची बाण ॥ तयाचे भारें धरारत्न ॥ विव्हळ दुःखी होतसे ॥५६॥

आपण मिरवे राणिवासरसा ॥ पितया काळा मातंग जैसा ॥ तयांचे भारें धरा क्लेशा ॥ विव्हळ दुःखी होतसे ॥५७॥

आपण कंठी कुड्या पडुडी ॥ पित्याशिरीं बत्या जोडी ॥ तयाचे मारें धरा मुख मुरडी ॥ विव्हळ दुःखी होतसे ॥५८॥

आपण भक्षी सदा सुरस अन्न ॥ पितर मागती भिक्षा कदन्न ॥ तयाचे भारें ॥ धरारत्न ॥ विव्हळ दुःखी होतसे ॥५९॥

तरी ऐसिये पुत्र सृष्टीं ॥ गळावेत गर्भीहून शेवटीं ॥ तन्न्यास अर्थ पोटीं ॥ माझा न धरी जननीये ॥६०॥

जे तुज वेधक मनकामना ॥ तयासाठीं वेचीन प्राणा ॥ परी माये वो तव वासना ॥ पूर्ण करीन निश्वयेसी ॥६१॥

ऐसी बोलता स्वसुत वार्ता ॥ प्रेमान्धि उचंबळला चित्ता ॥ मग हितार्थरत्न द्यावया हाता ॥ वाग्लहरी उचंबळे ॥६२॥

म्हणे बारे ऐक वचन ॥ प्रेम उदयाचळीं तूं दिव्यरत्न ॥ उदय पावलासी चंडकिरण ॥ शत्रुतम निवटावया ॥६३॥

तया ठायीं अंधकार ॥ मज पीडा वा काय करणार ॥ परिस लाधल्या वसतिस दरिद्र ॥ स्वप्नामाजी नांदेना कीं ॥६४॥

बा रे तव प्रताप दर्प ॥ पादरज झाले धूप ॥ ऐसें असतां कोप कंदर्प ॥ मातें कोण विवरील ॥६५॥

बा रे तीव्र प्रतापी स्थावर केसरी ॥ तयाचे लेकुरा वारण मारी ॥ हा विपर्यास कवणेपरी ॥ मिरवूं आहे जगातें ॥६६॥

राया नरेंद्रा तुझी मी माता ॥ मातें कोण होय गांजिता ॥ परी चिंत्ता उदरी मोहव्यथा ॥ शोकतरु उदवभवला ॥६७॥

बा रे तव स्वरुप पूर्ण अर्क ॥ पाहतां मातें उदेला शोक ॥ म्हणशील जरी अर्थदायक ॥ कवणापरी उदेला तो ॥६८॥

बा रे तव पिता तव समान ॥ स्वरुप उदेलें अर्कप्रमाण ॥ परी काळ अस्ताचळीं जाऊन ॥ गुप्त झाला पुरुष तो ॥६९॥

अहा अपार तो स्वरुपाब्धी ॥ अंतीं वेष्टी वडवानळसंधीं ॥ पडतां बा रे विशाळ बुद्धी ॥ भस्म झाला क्षणांतरी ॥७०॥

अस्थी जळाल्या काष्ठासमान ॥ लोभ दाहिलें जेउतें तृण ॥ मांसस्नेहाचें होऊनि शोषण ॥ स्वरुपातें लोपला तो ॥७१॥

तंव त्या भयाची हुडहुडी मोठी ॥ बा रे मज उदेली पोटीं ॥ तुझें स्वरुप पाहतां दृष्टीं ॥ भयातें उठी उठावे ॥७२॥

बा रे कृतांत महीं विखार ॥ धुमधुशीत वारंवार ॥ टपूनि बैसला जैसा मांजर ॥ मूषकातें उचलावया ॥७३॥

जैसा व्याघ्र जपे गाई ॥ कीं मीन वेंची बगळा प्रवाहीं ॥ तैसें जगातें तन्न्यायीं ॥ कृत्तांत आहारीं नटलासे ॥७४॥

तरी तो व्याघ्र ऐसा सबळ ॥ जिंकूनि योजावा पिंजरीं मेळ ॥ बा रे तैं भयाच वडवानळ ॥ मग स्पर्शणार नाहीं देहातें ॥७५॥

बा रे विखार डंखी दुःख ॥ तोंचि वेंचिल्या सकळ सुख ॥ कंटकीं धरिल्यास सकळ वृश्विक ॥ वेदनेतें मिरवेना ॥७६॥

ऐसेपरी रचूनि युक्ती ॥ सकळ हरावा कृत्तांत गती ॥ व्यर्थ शरीराची माती ॥ करुं नये जन्मल्यानें ॥७७॥

आपण आपुले पहावें हित ॥ सारासार नरदेहांत ॥ पाहें वश्य करुनि रघुनाथ ॥ चिरंजीव झाला बिभीपण ॥७८॥

पाहें नारद वैष्णव कैसा ॥ विष्णु पाराधी नरवेषा ॥ तो श्रीगुरु वरदेषा ॥ अमरपणीं मिरविला ॥७९॥

त्याचि नारदासी कृपाधन ॥ बोलला श्रीव्यास महीकारण ॥ तेणें पिकलें ब्रह्मपण ॥ शुक महाराज तिसरा ॥८०॥

त्याचा कौशिक अनुगृहीत ॥ तेणें करोनि शरणागत ॥ कृष्णयाज्ञवल्की तारुनि निश्वित ॥ तेणें तारिला रामानुज ॥८१॥

ऐसा प्रकाश सांप्रदाय मिरवून ॥ ते पुरुष झाले ब्रह्मसनातन ॥ तेवीं तूं बाळा माझा नंदन ॥ जगामाजी मिरवीं कां ॥८२॥

ऐसें बोधितां मैनावती ॥ संपली येथूनि तिची उक्ति ॥ परी श्रोते कवि ते संप्रदाय पुसती ॥ सांगा म्हणती चातुर्य ॥८३॥

ऐसा प्रश्न कवि पाहून ॥ सांगे संप्रदाय पूर्ण ॥ रामानुजापासून ॥ योगिया संत पैं झाला ॥८४॥

तयापासूनि मुकुंदराज ॥ मुकुंदराजाचा जैत्पाल भोज ॥ जैत्पालाचा धर्मानुज ॥ बोधल्यादिक पैं त्याचे ॥८५॥

यापरी द्वितीय संप्रदायी ॥ माता सुतातें लोटी बोधप्रवाहीं ॥ उमेनें आराधोनि शिवगोसावी ॥ चैतन्यसंप्रदायीं मिरवला ॥८६॥

त्यानें बोधिला कपिलमानी ॥ आणि दुसरा राघवचैतन्यस्वामी ॥ राघवाचा ब्रह्मचैतन्य नेमी ॥ तयाचा केशवचैतन्य ॥८७॥

केशवाचा बाबाचैतन्य ॥ श्रीतुकाराम त्याचा धन्य धन्य ॥ हा चैतन्यसंप्रदाय उत्तम मान्य ॥ संतगणीं मिरवितो ॥८८॥

यापरी तिसरा संप्रदाय ॥ महाश्रेष्ठ म्हणती स्वरुपमय ॥ तरी प्रथम बोधिला कमलोद्भव ॥ हंसरुपें श्रीविष्णूनें ॥८९॥

ते विधीचे सकळ हित ॥ अत्रीनें घेतले सकळ पंथ ॥ अत्रीपासूनि झाले दत्त ॥ तयापासूनि नाथ सकळ ॥९०॥

यापरी सांप्रदाय पाहें ॥ चवथा नंद महीतें आहे ॥ सूर्यापासूनि याज्ञवल्की पाहे ॥ ब्रह्मवेत्ता मिरविला ॥९१॥

तयापासूनि सहजानंद ॥ सहजानंदाचा कूर्म अवतार प्रसिद्ध ॥ कूर्मानें उपदेशिला ब्रह्मानंद ॥ ब्रह्मानंदाचा योगानंद कीं ॥९२॥

योगानंदाचा चिदानंद ॥ जगीं मिरवत आहे प्रसिद्ध ॥ तरी तुवां गोपीचंद ॥ हित करुनि घेई कां ॥९३॥

तेणेंकरुनि अमरपणी ॥ जगीं मिरविसी महाप्राज्ञी ॥ यास्तव बा रे माझे नयनीं ॥ अश्रू लोटले तुजलागी ॥९४॥

याउपरी बोले नृपनाथ ॥ बोलसी माते सत्यार्थ ॥ परी प्रस्तुतकाळीं ऐसा नाथ ॥ कोण मिळेल कोठूनि होईल जननीये ॥९६॥

ऐसी ऐकूनि तयाची मात ॥ माता बोलती झाली त्यातें ॥ बा रे तैसाचि आपुले गांवांत ॥ जालिंदरनाथ मिरवला ॥९७॥

स्वरुप सांप्रदाय परिपूर्ण ॥ तूतें करील ब्रह्मसनातन ॥ तरी तूं कायावाचामनें करुन ॥ शरण जाई तयासी ॥९८॥

बा रे तुझें वैभव थोर ॥ राजकारणी कारभार ॥ परी मायिक सकळ विस्तार ॥ लया जाईल बाळका ॥९९॥

तरी तनमनधनप्राण ॥ शरण रिघावें तयाकारण ॥ आपुलें हित अमरपण ॥ जगामाजी मिरवीं कां ॥१००॥

ऐसें ऐकोनि मातेचें वचन ॥ बोलता झाला त्रिलोचननंदन ॥ म्हणे माते तयासी शरण ॥ जालिया योग्यता फिरावें ॥१॥

सकळ टाकूनि सुखसंपत्ति ॥ राजवैभव दारासुती ॥ आप्तवर्गादि सोयरेजाती ॥ टाकूनि योग कैसा करावा कीं ॥२॥

द्वादशवरुषें मातें ॥ भोगूं दे सकळ वैभवातें ॥ मग शरण रिघूनि त्यातें ॥ योगालागी कशीन कीं ॥३॥

कशीन तरी परी कैसा ॥ मिरवीन ब्रह्मांडांत ठसा ॥ कीं उत्तानपादराजसुतापरी ॥ शिका जगामाजी मिरवीन ॥४॥

माता म्हणे बाळा परियेसीं ॥ पळ घडी भरंवसा नाहीं देहासी ॥ तेथे संवत्सर म्हणतां द्वादशो ॥ देखिले कोणी बाळका ॥५॥

चित्त वित्त आणि जीवित्व आपुलें ॥ अचळ नोहे अशाश्वत ठेलें ॥ क्षणैक काय होईल न कळे ॥ क्षणभंगुर वर्ततसे ॥६॥

बा रे उदकावरील बुडबुडा ॥ कोण पाहील अशाश्वत चाडा ॥ वंध्यापुत्रें घेतला वाडा ॥ मृगजळा केवीं तृषातें ॥७॥

तेवीं वारे सहजीस्थतीं ॥ बोलतां न ये अशाश्वती ॥ स्वप्नप्रवाहीं इंद्रपदासी ॥ भोगीत खरे न मानावें ॥८॥

तन्न्याय अभासपर ॥ सकळ मिरवतसे चराचर ॥ त्यांतूनि कोणीएक रणशूर ॥ शाश्वतपदा मिरवितसे ॥९॥

शुक दत्तात्रेय कपिलमुनी ॥ व्यास वसिष्ठाची मांडणी ॥ प्रल्हादादिक भागवतधर्मी ॥ ऐसे कोणी निवडिले ॥११०॥

नाहींतरी होताती थोडीं ॥ सकळ बांधिली प्रपंचबेडीं ॥ परी यमरायाच्या रक्षकवाडी ॥ एकसरां कोंडिलीं ॥११॥

म्हणूनि बा रे सांगतें तुज ॥ शाश्वत नोहे काळ समस्त ॥ कोणे घडी घडेल केउत ॥ अक्कलकळा कळेना ॥१२॥

ऐसा बोध माता करितां ॥ लुमावंती तयाची कांता ॥ गुप्तवेषें श्रवण करितां ॥ हाय हाय म्हणतसे ॥१३॥

म्हणे माता नोहे पापिणी ॥ पुत्रासी योजिती पुत्रकाचणी ॥ ऐसी राज्यविभवमांडणी ॥ जोग देऊं म्हणतसे ॥१४॥

तरी राज्यासी आली विवशी ॥ उपाय काय करावा यासी ॥ रामासारिखा पुत्र वनवासीं ॥ कैकेयीनें धाडिला ॥१५॥

स्वभ्रताराचा घेतला प्राण ॥ चतुर्थपुत्रा लाविलें रानोरान ॥ तन्न्याय आम्हांकारणें ॥ देव क्षोभला वाटतसे ॥१६॥

दुष्ट स्वप्न दृष्टीं येतां ॥ तकीं मानिती विनाश चित्ता ॥ म्हणतां प्रवेशली दुःखव्यथा ॥ तरी देव क्षोभतात ॥१७॥

दासदासी आपुले हाती ॥ आज्ञेमाजी सकळ वर्तती ॥ ते अवज्ञा करोनि उत्तर देती ॥ तरी देव क्षोभला जाणावें ॥१८॥

सहज ठेविलें धनमांदुस ॥ पुढें काढूं जातां कार्यास ॥ तें न सांपडे ठेविल्यास ॥ तरी देवक्षोम जाणिजे ॥१९॥

सभेस्थानीं सत्यार्थगोष्टी ॥ करितां अनृत वाटे चावटी ॥ लोक बैसती चेष्टेपाठी ॥ तरी देवक्षोभ जाणिजें ॥१२०॥

आपुलें धन लोकांवरी सांचे ॥ तें मागूं जातां स्वयें वाचे ॥ ते म्हणती काय घेतले तुझ्या बापाचें ॥ तरी देवक्षोभ जाणिजे ॥२१॥

आपुली विद्या तीव्रशस्त्र ॥ शत्रुकाननीं विनाशपात्र ॥ ती कार्यार्थ न मिरवे स्वतंत्र ॥ तरी देवक्षोभ जाणावा ॥२२॥

नसतां वांकुडे पाऊल कांहीं ॥ नागाविला जाय राजप्रवाहीं ॥ नसत्या कळीं बैसल्या ठायीं ॥ तरी देवक्षोभ जाणिजे ॥२३॥

आपुला शत्रु प्रतापापुढें ॥ मिरवी जैसा अति बापुढें ॥ त्या शरण रिघतां आपुल्या चाडें ॥ तरी देवक्षोभ जाणिजे ॥२४॥

लोकां उपकार केला विशेष ॥ तेचि लोक मानिती आपुला त्रास ॥ पाहूं नका म्हणती मुखास ॥ तरी देवक्षोभ जाणिजे ॥२५॥

नसता अधिमधीं उत्तरा ॥ नसतीच विघ्ने येती घरा ॥ तेंचि करणें परिहारा ॥ देवक्षोभ जाणिजे ॥२६॥

गृहीचें मनुष्य मुष्टींत सकळ ॥ असूनि वाढे गृहांत कळ ॥ आपुले न चाले कांहींच बळ ॥ तरी देंवक्षोभ जाणिजे ॥२७॥

तरी हेचि नीति उपदेश ॥ माता करीत आहे पुत्रास ॥ तरी बरवें नोहे हा विनाश ॥ जगामाजी मिरवेल ॥२८॥

तरी ह्या द्वंद्वसुखाची कहाणी ॥ पेटेल महावडवानळ वन्ही ॥ राजवैभव हें अब्धिपाणी ॥ भस्म करील निश्वयें ॥२९॥

ऐसा विचार करुनि मानसीं ॥ लुमावंती प्रवेशे स्वसदनासी ॥ येरीकडे मैनावतीसी ॥ उत्तर देंत नरेंद्र ॥१३०॥

म्हणे माय वो तव कामनीं ॥ ऐसेंचि आहे वेधक मनीं ॥ तंव त्या स्वामीची करणी ॥ निजदृष्टी पाहीन वो ॥३१॥

माझें मजलागीं हित ॥ तें द्यावया असेल सामर्थ्य ॥ शोध शोधितां भक्तिपंथ ॥ सहज दृष्टीं पडेल वो ॥३२॥

मग मी सोडूनि सकळांस ॥ तनधनमन ओपीन त्यास ॥ तूं येथून वाईट चित्तास ॥ सहसा न मानीं जननीये ॥३३॥

ऐसें वदोनि समाधानीं ॥ नृप गेला स्नानालागोनी ॥ येरीकडे अंतःपुरसदनीं ॥ काय करी लुमावंती ॥३४॥

परम आवडत्या स्त्रिया पांचसात ॥ तयांच्या आज्ञेंत नृपनाथ ॥ पट्टराणिया प्रीतिवंत ॥ सदा सर्वदा वर्तती ॥३५॥

तयांसी पाठवूनि परिचारिका ॥ बोलाविल्या सद्विवेका ॥ त्यांत लुमावंती मुख्य नायिका ॥ पट्टराणी रायाची ॥३६॥

वेगें मांडूनि कनकासन ॥ बैसविल्या प्रीतींकरुन ॥ तांबूलदि पुढें ठेवून वृत्तांत सांगे रायाचा ॥३७॥

बाई वो बाई विपरीत करणी ॥ मैनावती राजजननी ॥ विक्षेप पेटला तियेचे मनीं ॥ काय सांगू तुम्हातें ॥३८॥

कोण गावांत आला हेला ॥ जालिंदर ऐसें म्हणती त्याला ॥ त्याचा अनुग्रह देऊनियां रायाला ॥ जोग देऊं म्हणतसे ॥३९॥

ऐसें वैर भोगवी माता सुत ॥ निश्वय करुनि केला घटपटीत ॥ रायासी बोधितां श्रवणीं मात ॥ सकळ झाली वो बाई ॥१४०॥

मग राजवैभव सकळ नासलें ॥ स्तंभ भंगल्या सदन पडिलें ॥ मुळींचि अर्कालागीं गिळिलें ॥ मग अंधकार सर्वस्वीं ॥४१॥

मग आपण अष्टविंशती सती ॥ असूनि काय करावी माती ॥ परचक्र येऊन सकळ संपत्ति ॥ विनाशातें पावे हो ॥४२॥

परी येउते अर्थाअर्थी ॥ कैसी करावी ती युक्ती ॥ सांगावी आधीं योजूनि सबळ मतीं ॥ केलिया कारण मोडावे ॥४३॥

अगे वन्ही म्हणूं नये लहान ॥ तो क्षणें जाळील सकळ सदन ॥ तरी त्यातें करुनि सिंचन ॥ विझवूनियां टाकावा ॥४४॥

उशा घातला विखार ॥ मग सुखनिद्रा केवीं येणार ॥ विप भेदूनि गेल्या जठर ॥ जीवित्व काय वांचेल ॥४५॥

तरी प्रथमचि सारासार ॥ करुनि मोडावा सकळ प्रकार ॥ ऐसी बुद्धि रचूनि सार ॥ सुखसंपत्ति भोगा कीं ॥४६॥

ऐसी ऐकूनि तियेची उक्ती ॥ मग तर्कवितर्क करिती त्या युवती ॥ नानाबुद्धि विलाप दाविती ॥ परी निश्वय न घडे कोणाचा ॥४७॥

यापरी विशाळबुद्धी युवती ॥ विचार काढी लुमावंती ॥ की येअर्थी दिसे एक मजप्रती ॥ सुढाळपणीं नेटका ॥४८॥

आपुल्या गावांत जालिंदर ॥ जोगी आहे वैराग्यपर ॥ तरी तयाचा अपाय करुनि थोर ॥ निर्दाळावा सर्वस्वीं ॥४९॥

निर्दाळावा तरी कैसे रीतीं ॥ तयाच्या भक्तीसी मैनावती ॥ आहे तरी राजयाप्रती ॥ निवेदावें कुडे भावें ॥१५०॥

तरी तो तुमचा वसवसा ॥ ग्रीवे मिरवितसे भयार्थ फांसा ॥ म्हणूनि युक्ति रचिली मानसा ॥ गाढपणीं ऐकावी कीं ॥५१॥

निवेदावें तरी कैसें ॥ काम न आवरे मैनावतीस ॥ म्हणूनि चित्तीं उदास ॥ जालिंदर भोगितसे ॥ ॥५२॥

जालिंदराचा अनुग्रह देऊन ॥ जोगी करावा राजियाकारण ॥ मग करुनि पाठवावा तीर्थाटन ॥ अथवा तपाचे कारणीं ॥५३॥

मग तो गेलिया दूर देशीं ॥ गृहीं आणूनि जालिंदरासी ॥ बैसवोनि राज्यासनासी ॥ सकळ सुखा भोगावें ॥५४॥

ऐसें सांगूनि सकळ रायातें ॥ उदय करावा कोपानळातें ॥ मग सहजविधि जालिंदरनाथ ॥ भस्म होईल त्यामाजी ॥५५॥

जैसे विषय अति गोड ॥ गोडचि म्हणूनि करावा पुड ॥ मग तें मिरवे शत्रुचाड ॥ द्वंद्वसुख वाटावया ॥५६॥

ऐसा विचार करुनी गोमटा ॥ जात्या झाल्या त्या बरवंटा ॥ येरी सांगे राजपटा ॥ गोपीचंद मिरवला ॥५७॥

राजकारणीं अपार वार्ता ॥ रागरंग कुशळता ॥ मानरंजनीं नृपनाथा ॥ दिवस लोटूनि पैं गेला ॥५८॥

मग निशाउदय तममांडणी ॥ तेही प्रहर गेली यामिनी ॥ मग पाकशाळेंत भोजन करुनी ॥ अंतःपूरीं संचरला ॥५९॥

संचरला परी लुमावंती ॥ तिच्याचि गेला सदनाप्रती ॥ तिने पाहुनी राजाधिपती ॥ कनकासनी बैसविला ॥१६०॥

उचलोनि परमभक्तीं मांदार ॥ बैसला आहे मंचकावर ॥ गौरवूनि षोडशोपचार ॥ प्रेमडोहीं बुडविला ॥६१॥

मग तो राव होऊनि निर्मर ॥ रतिसुखाचा करुनि आदर ॥ यावरी गजगामिनी जोडूनि कर ॥ बोलती झाली रायातें ॥६२॥

हे महाराज प्रतापतरणी ॥ एक वार्ता ऐकली कानीं ॥ परी वदतां भय कीं मनीं ॥ संचरत आहे महाराजा ॥६३॥

जरी न बोलावें ठेवूनी गुप्त ॥ तरी महाअनर्थाचा पर्वत दिसत ॥ वदूं तंव तरी भयांत ॥ चित्त गुंडाळा घेतसे ॥६४॥

ऐसा उभय पाहतां अर्थ ॥ भ्रांतीमाजी पडलें चित्त ॥ तरी सुखशब्दाचा सरुनि वात ॥ वार्ता अवघड महाराजा ॥६५॥

ऐसें ऐकूनि राव बोलत ॥ म्हणे सकळ सोडूनि भयातें ॥ निर्विकार कवण अर्थ ॥ असेल तैसें कळविजे ॥६६॥

येरी म्हणे द्याल भाष्य ॥ तरी चित्त सोडील भयदरीस ॥ मग खरें खोटें बरें रत्नास ॥ तुम्हांलागीं अर्पिन तें ॥६७॥

ऐसें वचन नृप ऐकतां ॥ मग करतलभाष्य झाला देंता ॥ म्हणे मम दर्पभयाची व्यथा ॥ सोडूनि वार्ता बोल कीं ॥६८॥

येरी म्हणे जी एक कुडें ॥ मातेनें रचिलें तुम्हांपुढें ॥ जालिंदर योगी विषयपांडें ॥ वश्य केला आहे की ॥६९॥

परी तुमचा भयाचा संदर्प ॥ अंगी विरला विषयकंदर्प ॥ तेणेंकरुनि बुद्धी कुरुप ॥ तिनें वरिली आहे जी ॥१७०॥

तुम्हांसी अनुग्रह देऊनि त्याचा ॥ वेष द्यावा योगीयाचा ॥ मग तीर्थाटनीं योग तुमचा ॥ बोळवावें तुम्हांते ॥७१॥

तुम्ही गेलिया तपाकारण ॥ दूरदेशी विदेशाकारण ॥ मग जालिंदराप्रती आणून ॥ राज्यासनीं ओपावा ॥७२॥

ऐसें प्रकरणीं सहजस्थिती ॥ श्रुत मात झालें आम्हांप्रती ॥ परी आमुचे सौमाग्यनीतीं ॥ भाग्यार्क दिव्य जाहले ॥७३॥

आमचें कुंकुम होतें अचळ ॥ म्हणोनि दृष्टीं आले ऐसे फळ ॥ यापरी तुम्हा नृपाळ ॥ वाईट बरें विलोका ॥७४॥

ऐसी ऐकोनि तियेची वार्ता ॥ उज्बळला क्रोधनळाच्या माथां ॥ मग अनर्थानळाच्या शाखा दावितां ॥ भयंकररुपी जाहलासे ॥७५॥

मग तो क्रोध न वदवे वाणी ॥ प्रत्यक्ष आला वडवानळ अग्नी ॥ नाथ जालिंदर समुद्रपाथी ॥ प्राशावया क्षोभला ॥७६॥

मग तो उठोनि तैसेचि गतीं ॥ बाहेर जाय तो नृपती ॥ मंत्री बोलावूनि सेवकांहातीं ॥ जालिंदरा पाहों चला ॥७७॥

शीघ्र आणोनि कामाठ्यांसी ॥ गर्ती योजिली कूपासरसी ॥ नाथ जालिंदर ते उद्देशीं ॥ तयामाजी लोटिला ॥७८॥

अश्वलीद न गणती ॥ तेथें सर्वत्र पडली होती ॥ ती लोटूनि गर्तेवरती ॥ नाथजती बुजविला ॥७९॥

ऐसें गुप्त करोनि प्रकरण ॥ राव सेवी आपुलें स्थान ॥ परी सेवकां ठेविले सांगोन ॥ मात बोलूं नका ही ॥१८०॥

जरी होतां मुखलंपट ॥ मम श्रोत्रीं आलिया नीट ॥ त्याचें करीन सपाट ॥ यमलोकीं मिरवीन कीं ॥८१॥

ऐसी ऐकूनि भयंकर वार्ता ॥ दर्पासिंह तो योजूनि माथां ॥ रागेला परी सेवकाचित्ता ॥ धुसधुसी मिरवीतसे ॥८२॥

इतुके प्रकरणीं मध्ययामिनी ॥ झाली म्हणूनि नेणती जनीं ॥ अर्कोदयीं पाहिला स्वामी ॥ म्हणती उठोनि गेला असे ॥८३॥

एक म्हणती त्याचें येथें काय ॥ स्वइच्छे बसावें वाटेल तेथ ॥ हा ग्राम नव्हे आणिक राय ॥ ग्रामवस्तीं विराजला ॥८४॥

ऐशी बहुतांची बहुत वाणी ॥ प्रविष्ट झाली जगालागोनी ॥ कीं जालिंदर गेला येथूनी ॥ महीं भ्रमण करावया ॥८५॥

ऐसी वार्ता नगरलोकीं ॥ उठली ऐकूनि परिचारिकी ॥ त्या जाऊनि साद्विवेकी ॥ मैनावतीसी सांगती ॥८६॥

कीं महाराज आपुला गुरु ॥ वस्तुफळाचा कल्पतरु ॥ उठोनि गेला कोठें दुरु ॥ महीं भ्रमण करावया ॥८७॥

ऐसें ऐकोनि मैनावती ॥ असंतोषली परम चित्तीं ॥ म्हणे मम सुताचे दैवाप्रती ॥ लाभ नाहीं आतुडला ॥८८॥

ऐसें म्हणोनि संकोचित ॥ नेत्रीं प्रेमाश्रु ढाळीत ॥ येरीकडे जालिंदरनाथ ॥ कैसे स्थितीं राहिला ॥८९॥

तरी अवश्य भविष्य जाणणार ॥ आणि मैनावतीचा लोभ अपार ॥ आणि शत्रुमित्र पाहणार ॥ एकरुपीं समत्वें ॥१९०॥

नातरी परम प्रतापी वासरमणी ॥ क्षणें टाकील ब्रह्मांड जाळोनि ॥ तो भद्र ज्याची विपर्यासकरणी ॥ तुष्ट कैसा राहिला ॥९१॥

जो द्वंद्वातीत मूर्तिमंत ॥ दंभरहित स्वरुपीं मिरवत ॥ ममता निःसंग विरहित ॥ कार्याकार्य जाणोनी ॥९२॥

असो गर्तेमाजी यतिनाथ ॥ वज्रासनातें घालोनि खालतें ॥ आकाशास्त्र प्रेरुनि भोंवतें ॥ स्वस्थचित्तीं बैसला ॥९३॥

आकाशास्त्र असतां भोंवतें ॥ लीद मिरवे सभोंवतें ॥ यापरी आकाशास्त्र माथां ॥ वज्रास्त्र स्थापिलें ॥९४॥

तेणेंकरोनि अधरस्थळी ॥ लीद मिरविली आहे शिरीं ॥ येरीकडे अंतःपुरीं ॥ जनवार्ता समजली ॥९५॥

नाथ जालिंदर गेला निघोन ॥ मग सकळ स्त्रियांचें झाले समाधान ॥ बरें झालें म्हणती निधान ॥ येऊनि पहुडल्या सेजेसी ॥९६॥

यापरी पुढें सुरस ॥ धुंडीसुत सांगेल श्रोतियांस ॥ तरी सर्व श्रोतीं टाकूनि आळस ॥ अवधान द्यावें पुढारां ॥९७॥

मालू धुंडी नरहरी वंशीं ॥ कथा वदेल नवरसी ॥ परी वारंवार श्रोत्यांसी ॥ कृपा अवधान मागतसे ॥९८॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ चतुर्दशाध्याय गोड हा ॥१९९॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥


श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय १५

श्रीगणेशाय नमः

जयजयाजी जगत्पालका ॥ मुनिमानसचकोरमृगांका ॥ कृपांबुदातया पूर्णशशांका ॥ ग्रंथादरीं येई कां ॥१॥

मागील अध्यायीं कथन ॥ तुवां वदविलें कृपा करुन ॥ गर्तकूपीं अग्निनंदन ॥ गोपीचंदें घातला ॥२॥

घातला परी कैसा लाग ॥ कीं कोठें नाहीं मूसमाग ॥ जैसा शंकर गेल्यामाग ॥ फसवूनि त्यासी वरियेलें ॥३॥

असो पुढें आतां श्रोती ॥ श्रवण करावी रसाळ उक्ती ॥ सिंहावलोकनीं घेऊनि गती ॥ मागील कथा विलोका ॥४॥

बद्रिकाश्रमीं पूर्ण तपासी ॥ गोरक्ष कानिफा जान्हवीतीरासी ॥ तप आचरितां द्वादशवर्षी ॥ उद्यापन उरकिलें ॥५॥

परी याचें त्यासी नाहीं ठाऊक ॥ कायाभुवनीं उभय अर्क ॥ संगोपीत कामांतक ॥ परी माहीत नाहीं अन्योन्यां ॥६॥

पुढील भविष्योत्तर जाणून ॥ गुप्त ठेविलें ओळखून ॥ यापरी तप झालिया पूर्ण ॥ उभयतांही बोळविलें ॥७॥

कानिफा निघाला उत्तरदेशीं ॥ महातपी तो गोरक्षशेखी ॥ उत्तरपूर्णमध्य कोणासी ॥ संचार करीत चालिला ॥८॥

प्रयाग गया काशी करुन ॥ श्रीगुरुतें शोधी गजकर्णनंदन ॥ यापरी पूर्ण दक्षिण कोण ॥ गोरक्ष शोधी मच्छिंद्रा ॥९॥

शोधीत परी तो कैसा ॥ कीं जलाविण विभक्त मासा ॥ कीं बाळ मातेचे वसवसा ॥ सदोदित हदयांत ॥१०॥

नावडे त्यातें अन्नपाणी ॥ नावडे निद्रा सुखासनीं ॥ सदा भंवते भाविक मनीं ॥ उद्वेगचक्रीं पडियेला ॥११॥

श्रीगुरु आठवूनि चित्तांत ॥ भ्रमण करीतसे पिशाचवत ॥ साडी श्वास आणूनि हेत ॥ नाथ हे नाथ म्हणोनि ॥१२॥

वारंवार हंबरडे फोडीत ॥ म्हणे कधीं भेटती गुरुनाथ ॥ प्राण डोळां उरला किंचित ॥ पाय आतां दाखवीं ॥१३॥

ऐसी प्रेमें होतसे वृष्टी ॥ आपुल्या पुसे वागवटी ॥ म्हणे पहिला असेल मच्छिंद्र जेठी ॥ कोणी तरी सांगा हो ॥१४॥

ऐसें बहुधा बहुतां पुसून ॥ नाना क्षेत्री करी गमन ॥ तो भ्रमत गौडदेशाकारण ॥ हेळापट्टणीं पातला ॥१५॥

तपें मांस भक्षिलें समग्र ॥ अति सूक्ष्म जर्जर शरीर ॥ त्यावरी श्रीगुरुवियोगचिंताशर ॥ हाडीं टोले मारीतसे ॥१६॥

जेथें बैसे तेथें वसे ॥ नीरबिंदू वाहती नेत्रास ॥ कार्याकारण कोण्या क्षेत्रास ॥ भिक्षा मागूं जातसे ॥१७॥

तों हेळापट्टण नगरामाझारी ॥ येऊनि बैसला क्षणभरी ॥ तों द्वारपाळ ग्रामद्वारीं ॥ बैसले होते कांहींसे ॥१८॥

त्यांनी पाहूनि गोरक्षनाथ ॥ आदेश म्हणूनि त्यातें नमीत ॥ परी गोरक्ष तयां द्वारपाळां पुसत ॥ मच्छिंद्रनाथ आहे कीं ॥१९॥

तवं ते म्हणती आमुचे गांवीं ॥ मच्छिंद्र नामें कोणी गोसावी ॥ महाराजा आलाचि नाहीं ॥ काय सांगावी सुखव्यक्ती ॥२०॥

परी नाथा एक तापसी ॥ आला होता या गांवासी ॥ नाम जालिंदर या जगासी ॥ मिरवत होता महाराजा ॥२१॥

काय सांगावी तयाची नीती ॥ लोकांसी वाटे जैसा गभस्ती ॥ तो तृणभारा वाहतां माथीं ॥ अधर आम्ही पाहातसों ॥२२॥

गोरक्ष म्हणे काय कारण ॥ मस्तकीं वाहतसे तृण ॥ येरी म्हणे तो काननांतून ॥ गोधनाकरितां आणीतसे ॥२३॥

गोरक्ष म्हणे गोधन कोणाचें ॥ येरी म्हणती तें गांवीचें ॥ परी निःस्पृहवृत्ति गोधनाचें ॥ पालन करी महाराजा ॥२४॥

गोरक्ष म्हणे किती दिवस ॥ राहिला होता या वस्तीस ॥ राहूनि लोप कवण ठायास ॥ झाला पुढें तो सांगा ॥२५॥

येरी म्हणती योगद्रुमा ॥ एक संवत्सर राहिला या ग्रामा ॥ पुढें गेला कोठें तें आम्हां ॥ माहीत नाहीं महाराजा ॥२६॥

याउपरी गोरक्षनाथ ॥ दिवस किती लोटले ते पाहात ॥ येरी म्हणे दश आजपर्यंत ॥ लोटले संवत्सर महाराजा ॥२७॥

ऐसी ऐकूनि तयांची वाणी ॥ गोरक्ष विचारी आपुले मनीं ॥ तरी कां माझा स्वामी नाम पालटूनी ॥ जगामाजी विचरला ॥२८॥

मी सांडूनि पूर्ण तपास ॥ लागावया करीत येईन धांवत ॥ म्हणूनि पालटिलें स्वनामास ॥ गांवामाजीं मिरवला ॥२९॥

ऐसी कल्पना आणूनि मनीं ॥ अश्रुधारा वाहती नयनीं ॥ म्हणे महाराजा गेलासी सोडुनी ॥ मज पाडसा कैसा रे ॥३०॥

टाकूनि निर्वाण काननांत ॥ कोठें गेला माझा नाथ ॥ मी अर्भक अज्ञान बाळक ॥ बहुत मोकलिलें कैसें मज ॥३१॥

हे नाथ तूं सकळमय ॥ सर्वस्वी बापमाय ॥ तुजविण मातें कोण आश्रय ॥ तिन्हीं लोकीं दिसेना ॥३२॥

अहा मज पाडसाची येरणी ॥ चरुं गेली कोणे रानीं ॥ माझें स्मरण सकळ सांडूनी ॥ कैसी गुंतली तिकडेचि ॥३३॥

अहा मग वत्साची प्रेममाउली ॥ कोण रानीं चरुं गेली ॥ परी माझे स्मरण विसरली ॥ कैसी गुंतली तिकडेचि ॥३४॥

अहा माझी मोहाची माय ॥ करुं गेली अंतराय ॥ मज ते विसरुनि सदयहदय ॥ कैसी गुंतली तिकडेचि ॥३५॥

ऐसें बोलूनि विलाप करीत ॥ ऊर्ध्व हंबरडा मारुनि धांवत ॥ पोट कवळुनि श्वास सोडीत ॥ अहा नाथ म्हणूनी ॥३६॥

मग ते कानवाळू द्वारपाळ ॥ म्हणती नाथा न करीं तळमळ ॥ तुम्हां मायलेंकरांचा मेळ ॥ ईश्वर करील पुढारां ॥३७॥

ऐसी वदती ते वाणी ॥ गांवांत धाडिला भिक्षेलागूनी ॥ मग तो गोरक्ष सदनोसदनीं ॥ अलक्ष गाजवीत जातसे ॥३८॥

परी जालिंदर होता ज्या ठायीं ॥ तेथें सहज आला भिक्षेस पाहीं ॥ तैं एकटएक सदन सांई ॥ पाहुनि अलख म्हणतसे ॥३९॥

तो सवाल ऐकूनि जालिंदरनाथ ॥ आदेश म्हणत महीआंत ॥ ते आदेश गोरक्षाप्रत ॥ श्रवण झाले तांतडी ॥४०॥

मग ते आदेश वंदूनि पुढती ॥ म्हणे कोठे आहांत महाराज जती ॥ येरु म्हणे महीगती ॥ विराजलोसे महाराजा ॥४१॥

गोरक्ष म्हणे कवण नामीं ॥ मिरवत आहांत नाथा स्वामी ॥ येरी म्हणे मनोधर्मी ॥ नाथ जालिंदर म्हणतात ॥४२॥

परी महाराजा योगद्रुमा ॥ कवण नाम मिरवतसे तुम्हां ॥ आणि वहदहस्तप्रसादउगमा ॥ गुरु कोण तुमचा हो ॥४३॥

गोरक्ष म्हणे महाराजा ऐकें युक्ती ॥ तुम्ही सेविली महीगर्ती ॥ जगीं प्रतेष्टुनी पाय मती ॥ भंगित झाली लोकांची कोपानळ पेटला ॥४६॥

म्हणे महाराजा आज्ञा करावी ॥ क्षणेंचि घालीन पालथी मही ॥ तंव त्या नृपाची प्रौढी कांहीं ॥ भस्म करीन क्षणांत ॥४७॥

जैसा अग्नि पेटला सदनांत ॥ तेणें तृणतंतूचें कोण गणित ॥ तन्न्यायें येथील नृपनाथ ॥ भस्म करीन महाराजा ॥४८॥

अहा ऐसी गुरुमूर्ती ॥ देवां दानवां वरद अती ॥ ऐशा स्वामीसी घालूनि गर्ती ॥ राज्य कैसा करितो जी ॥४९॥

तरी आतांचि आज्ञा प्रमाण ॥ लागूं नेदीं एक क्षण ॥ मग जालिंदर बोले वचन ॥ ऐसें नोहे महाराजा ॥५०॥

या कार्याचें पुढें कार्य ॥ नातरी हदयीं विचारुनि पाहें ॥ नाथपंथ येणें दुणावे ॥ हेंचि भविष्य असे पहा ॥५१॥

तरी आतां क्षमा करुन ॥ पुढें महाराजा करी गमन ॥ परी हें ऐसें वर्तमान ॥ बोलूं नको जगासी ॥५२॥

तुम्ही हिंडतां सहज महीसी ॥ मम सुत कानिफा भेटतां तुम्हांसी ॥ श्रुत करावें कृत्य त्यासी ॥ वृत्तांत यथींचा सकळिक ॥५३॥

मग तो युक्तिप्रयुक्ती करुन ॥ संपादूनि रायासी कल्याण ॥ मातें काढील गर्तेतून ॥ वाढवील तो नाथपंथ ॥५४॥

ऐसें सांगूनि गोरक्षनाथ ॥ आदेश म्हणू बोळवीत ॥ आणि गोरक्ष ऐकूनि शांत ॥ होऊन आदेश म्हणतसे ॥५५॥

मग आदेशशब्दोंचे गमन ॥ करुनि निघाला गोरक्षनंदन ॥ आहारापुरतें मेळवूनि अन्न ॥ उपहारा संपादी ॥५६॥

मग शिंगी शेली करुनि ग्रहण ॥ करिता झाला मार्गी गमन ॥ तों जगन्नाथ प्राचीनस्थान ॥ तेथें जाऊनि पोहोंचला ॥५७॥

येरींकडे कानिफानाथ ॥ गांवोगांवी भ्रमण करीत ॥ परी ज्या गांवी जाय तेथें ॥ जगालागीं बोधीतसे ॥५८॥

कानिफामुखाचिये बोधस्थिती ॥ ऐकूनि परम जन मानवती ॥ सलिलप्रेम दाटूनि चित्तीं ॥ अनुग्रह घेती तयाचा ॥५९॥

मग त्या गांवांत एकेक दोन ॥ सच्छिष्य निघती विरक्तमान ॥ प्रपंचराहणी लाथ मारुन ॥ नाथासवें चालती ॥६०॥

ऐसे एक दोन पाच सात ॥ दहाविसांचा मेळा जमत ॥ होतां होतां सप्तशत ॥ दाटले शिष्य समागमें ॥६१॥

पूर्वदेशीं करितां गमन ॥ तो स्त्रीराज्य दोषसघन ॥ तयाच्या सीमेपर्यंत जाऊन ॥ उलट पाहती माघारां ॥६२॥

स्त्रीराज्यांत पुरुष कोणी ॥ नाहीं हे विख्यात जनश्रुतकर्णी ॥ म्हणोनि शिष्यमंडळ दणाणोनि ॥ परतोनि पाहती माघारीं ॥६३॥

ठायीं ठायीं करिती विचार ॥ म्हणती स्त्रीराज्यदेव तीव्र ॥ तेथें प्रवेश करितां नर ॥ वाचत नाहीं सहसाही ॥६४॥

ऐसा देश कठिण असून ॥ स्वामी करिती तयांत गमन ॥ तरी अग्निकुंडीं सकळां नेऊन ॥ पूर्ण आहुती इच्छीतसे ॥६५॥

जरी सेविल्या हलाहलातें ॥ मग कोण पुरुष जगेल तेथे ॥ जेवी तीव्र अग्नीत शिरतां तेथें ॥ आहाळेना कैसें म्हणावें ॥६६॥

सदनीं प्रेरिला वैश्वानर ॥ सदन झाले स्त्रदिरांगार ॥ तयामाजी निघतां नर ॥ वांचेल कैसा सहसा तो ॥६७॥

कीं पतंग घेता दीपाची भेटी ॥ त्याचि रीती येथें गोष्टी ॥ दिसूनि येती परी शेवटीं ॥ मृत्यु आम्हा दिसतसे ॥६८॥

ऐसें होतां निश्चयवचन ॥ कोणी म्हणती करा पलायन ॥ जीवित्व वाचल्या साधन ॥ घडून येईल महाराजा ॥६९॥

एक म्हणती ऐसें करावें ॥ सदृढ धरावे गुरुचे पाय ॥ मग जीवित्वाचें भय काय ॥ जातसे तरी जाऊं द्या ॥७०॥

काय वाचा तनुमनधन ॥ प्रथम त्यासी केलें अर्पण ॥ मग या जीवित्वाची आस्था धरुन ॥ व्रतालागीं कां भंगावें ॥७१॥

एक म्हणती लागलें वेड ॥ कैंचे व्रत पडिपाड ॥ जीवित्व हरल्या व्रतकोड ॥ कोणी दृष्टीं पाहिलें ॥७२॥

तरी हा अर्थ सांडूनि धन ॥ या स्वामीलागीं चुकवून ॥ गृहस्थांनो पलायन ॥ करुनि जावित्व वांचवा ॥७३॥

या स्वामीसी लागलें वेड ॥ सादर मृत्युझांपड ॥ जया ठायीं पडेल धाड ॥ चालूनि जातो त्या ठायीं ॥७४॥

ऐसें तुम्हांसीं सत्य भासेल ॥ तरी हे मानूनि घ्यावे बोल ॥ जीवित्वाची आस्था असेल ॥ तरी बोल्र फोल न मानावे ॥७५॥

ऐसें ठायी ठायीं ताटीं ॥ बैसूनि करिती बोलचावटी ॥ परी हा अर्थ सकळ पोटीं ॥ कानिफातें समजला ॥७६॥

मनांत म्हणे भ्याले सकळ ॥ हीनबुद्धि अति दुर्बळ ॥ परी आपुला प्रताप सांगतां तुंबळ ॥ सत्य वाटणार नाहीं यासी ॥७७॥

मग करीं कवळूनि भस्मचिमुटी ॥ स्पर्शास्त्रप्रयोग पोटीं ॥ जल्पूनि प्रेरी महीपोटीं ॥ तिन्ही दिशा लक्षुनी ॥७८॥

पुढील मात्र मार्ग ठेवूनि मोकळा ॥ दिशा बंधन केल्या सकळा ॥ केल्या परी ऐशा बळा ॥ देवदानवां आतुळेना ॥७९॥

केले अर्थ द्व्यर्थपर ॥ शिष्य पळूनिं नाहीं जाणार ॥ आणि मारुतीचाही भुभुःकार ॥ पोहोचूं नये त्या ठाया ॥८०॥

ऐसें स्पर्शास्त्र पृष्ठीं ॥ रचूनि शांत बैसला जेठी ॥ मग शिष्यां पाचारुनि शेवटीं ॥ पुसता झाला तथासी ॥८१॥

लहान मोठे मेळवून ॥ समुद्रायासी बैसवून ॥ म्हणे आम्हांलागीं जाणें ॥ स्त्रीराज्यांत आहे कीं ॥८२॥

परी तो देश कठिण ॥ वांचत नाहीं पुरुषरत्न ॥ हनुमंतभुभुःकारेंकरुन ॥ प्राणहानी होतसे ॥८३॥

पुढें देश बहुत कठिण ॥ परी आम्हांलागीं आहे जाणे ॥ तया देशींचे तीर्थ करुन ॥ येऊं ऐसे वाटतसे ॥८४॥

आमुचा विश्वास गुरुपायीं ॥ जरी असेल भवप्रवाहीं ॥ तरी देशाची लंघूनि मही ॥ पुनः येऊं माघारे ॥८५॥

नातरी सुखें जावो प्राण ॥ परी मनाची धांव घेई पूर्ण ॥ तरी तुमचा विचार कवण ॥ तो मजप्रती दर्शवावा ॥८६॥

जें निःसीम गुरुच्या असती भक्तीं ॥ तिहीं धरावी माझी संगती ॥ नातरी जीवलोम असेल चित्तीं ॥ तिहीं जावें माघारें ॥८७॥

ऐसें सांगूनि बोलावीत ॥ म्हणे देखिली बुद्धि करा येथ ॥ मग निःसीम भक्तांचे किंचित ॥ तया ठायी राहिले ॥८८॥

सातशतांत सात जाण ॥ ठायीं उरले स्थान धरुन ॥ वरकड कंबरवस्ती करुन ॥ कल्पिल्या मार्गी चालिले ॥८९॥

मनांत मानिती सुखवसा ॥ म्हणती तस्करबुद्धीचा ठसा ॥ पळूनि जाता काजळीलेशा ॥ मूर्खत्व येते आपणांसी ॥९०॥

तरी फार बरवें झालें ॥ स्वामीनें अंतर ओळखिलें ॥ उजळणी बोळविले ॥ कीर्तिमाहात्म्य रक्षुनी ॥९१॥

ऐसा चित्तीं सुखवसा मानून ॥ आले पंथी करिती गमन ॥ एक कोस गेले धांवून ॥ सीमेपर्यंत ग्रामाच्या ॥९२॥

परी स्पर्शास्त्र सीमा लक्षून ॥ बैसलें होतें मही वेष्टून ॥ तेणें येतांच धरिले कवळून ॥ महिसीं दृढ केले ते ॥९३॥

पद झालें महीं व्यक्त ॥ मागें पुढें ठेवाया नसे शक्त ॥ जैसें सावज गुंतल्या चिखलांत ॥ बळ कांहीं चालेना ॥९४॥

असो झाले महीं व्यक्त ॥ म्हणूनि हस्ते काढूं जात ॥ तों हस्त झाले महीं लिप्त ॥ मग सकळ ओणवे झाले ॥९५॥

येरीकडे कानिफानाथ ॥ त्या सातातें बोलावूनि घेत ॥ जवळ बैसवूनि सकळ वृत्तांत ॥ निवेदिला तयांचा ॥९६॥

तुम्ही करावें आतां ऐसें ॥ शीघ्र जाऊनि त्या महीस ॥ पाषाण करीं उचलोनि विशेष ॥ तयांच्या पृष्ठी स्थापावे ॥९७॥

मग विभक्तास्त्रविभूति ॥ चर्चूनि तयांच्या भाळाप्रति ॥ मागूनि पाठविलें साती ॥ समाचारा तयांच्या ॥९८॥

ते तंव श्रीगुरुचे आज्ञेकरुन ॥ पहात चालिले सीमास्थान ॥ तरी ते सर्वही ओणवे होऊन ॥ ठायीं ठायीं खुंटले ॥९९॥

सातांसी पाहूनि अवघ्या मूर्ती ॥ परम चित्तीं लज्जित होती ॥ अधोवदन करुन्मि पाहती ॥ परी न देती उत्तर ॥१००॥

हे जाऊनि बोलती त्यांतें ॥ कैसें सोडूनि गुरुतें ॥ जीवित्वलोभ धरुनियां मनातें ॥ मार्ग केला पुढारां ॥१॥

परी ईश्वराची अगाध करणी ॥ सकळ पडलां महीं खिळूनी ॥ ऐसिया रीतीं कोण तरुनी ॥ गेला आहे सांगा पां ॥२॥

मग हस्ते सकळ पाषाण ॥ पृष्ठीं ठेविती बळेंकरुन ॥ स्पर्श होतांचि जाती चिकटून ॥ आंग हालवितां पडेना ॥३॥

मग परम आक्रंदती ॥ चुकलों चुकलों ऐसें म्हणती ॥ आतां क्षमा करुनि चित्तीं ॥ सोडवावें आम्हांतें ॥४॥

येरु म्हणती खुशाल असा ॥ जीवित्वाचा धरुनि भरंवसा ॥ स्वामी पाहूनि आलिया देशा ॥ सोडवूनि नेऊं तुम्हांसी ॥५॥

गुरु करितां हा कशाला ॥ संकट पडतां काढितां पळा ॥ परी ज्याची क्रिया त्याची त्याला ॥ फलद्रूप होतसे ॥६॥

आतां स्वस्थ असा चित्तीं ॥ अम्ही जातों स्त्रीदेशाप्रती ॥ दैवें वांचूनि आलिया अंतीं ॥ सोडवूनि नेऊं तुम्हांतें ॥७॥

ऐसें सकळां करुनि भाषण ॥ सकळां पृष्ठीं देऊनि पाषाण ॥ परतते झाले गुरुआज्ञेकरुन ॥ परी ते पाहूनि आरंबळती ॥८॥

म्हणती गुरुमायेहूनि माय ॥ होऊनियां सदस्यहदय ॥ आम्हांसही सवें न्यावें ॥ स्त्रीराज्यामाझारी ॥९॥

आमुची सकळ गेली भ्रांती ॥ आणि गुरुची समजली प्रतापशक्ती ॥ आतां सकळ नसूनि दुर्मती ॥ विश्वासाते टेंकलों ॥११०॥

ऐसी करितां विनवणी ॥ ती ऐकिला सातजणीं ॥ मग म्हणती श्रीगुरुतें सांगुनी ॥ सुटका करुं तुमची ॥११॥

ऐसें बोलूनि सकळांकारण ॥ पुनः आले परतून ॥ म्हणती महाराजा दैन्यवाण ॥ शिष्यकटक मिरवले ॥१२॥

त्यांची नासिली सकळ भ्रांती ॥ पृष्ठी पाषाण घेऊनि आरंकळती ॥ तरी आतां कृपा ओसंडोनि चित्तीं ॥ मुक्त करा सर्वांतें ॥१३॥

आतां येथूनि गेलिया प्राण ॥ सोडणार नाहीं आपुले चरण ॥ सर्वही स्थिर मती धरुन ॥ चरणाचरी लोटतील ॥१४॥

नाना युक्तींकरुन ॥ करितील श्रीगुरुचें समाधान ॥ हें सच्छिंष्यांचें ऐकूनि वचन ॥ नाथ चित्तीं तोषला ॥१५॥

मग विभक्तास्त्रमंत्र होंटी ॥ जल्पूनि योजिली भस्मचिमुटी ॥ ओपूनि शिष्या करसंपूटी ॥ म्हणे चर्चूनि यावे तयातें ॥१६॥

मग एक शिष्य जाऊनि तेथें ॥ भाळीं चर्चूनि भस्मचिमुटातें ॥ चर्चिता झाले सकळ मुक्त ॥ सातां उणें सातशें ॥१७॥

ऐसे मुक्त झाले सकळ जनीं ॥ येऊनिं लागले गुरुचे चरणीं ॥ नाथ तयालागीं पाहुनी ॥ अहा अहा म्हणतसे ॥१८॥

असो ऐसें बोलूनि बचन ॥ तेथूनि टाळितां मग मुक्काम ॥ स्त्रीदेशाचे सीमेवरी जाऊन ॥ वस्तीलागीं विराजती ॥१९॥

तेथें दिन लोटल्या झाली रात्री ॥ तो चमत्कार वर्तला ते क्षितीं ॥ भुभुःकार द्यावया मारुती ॥ सेतुहूनि चालिला ॥१२०॥

तों मार्गी येतां अस्त्र सबळ ॥ वेष्टित झालें पदकमळ ॥ परी तो वज्रशरीरी तुंबळ ॥ अस्त्रालागीं मानीना ॥२१॥

येरु चित्तामाजी विचार करीत ॥ हें स्पर्शास्त्र आहे निश्वित ॥ तरी येथें कोणी प्रतापवंत ॥ आला आहे निश्वयें ॥२२॥

ऐसा विचार करुनि चित्तीं ॥ येता झाला सीमेप्रती ॥ तों कटक पाहूनि नाथपंथी ॥ मनांत विचार करीतसे ॥२३॥

कीं म्या यत्न करुनि बहुत ॥ तेथें पाठविला मच्छिंद्रनाथ ॥ परी कटक गेलिया तेथ ॥ बोधितील तयासी ॥२४॥

मग बोधें होऊनियां स्वार ॥ स्वदेशीं येईल मच्छिंद्र ॥ मग मैनाकिनीमुखचंद्र ॥ दुःखसागरीं उतरेल ॥२५॥

तरी येथेंचि यातें निर्बळ करुन ॥ मागें लावावें परतून ॥ मग अति भीमरुप धरुन ॥ भुभुःकार करीतसे ॥२६॥

गाजवी पुच्छाचा फडत्कार ॥ भयंकररुपी अति तीव्र ॥ तें पाहुनिया कटकभार समग्र ॥ स्वामीआड दडताती ॥२७॥

म्हणती महाराजा प्रळयकाळ ॥ प्रथम उदेला महाबळ ॥ आता मधील कटक सकळ ॥ उपाय कांहीं योजावा ॥२८॥

येरु म्हणे नाहीं भय ॥ उगेचि पहा धरुनि धैर्य ॥ यानें तुमचें करावें काय ॥ अचळपणीं असा रे ॥२९॥

मग करीं घेऊनि भस्मचिमुटी ॥ वज्रास्त्र परम कठिण ॥ माथा मिरविलें भूषण गगन ॥ येरीकडे वायुनंदन ॥ निजदृष्टी पहातसे ॥३१॥

मग मोठमोठे उचलून पर्वत ॥ फेंकिता झाला गगनपंथ ॥ ते गिरी आदळतां वज्रास्त्र ॥ चूर्ण होती क्षणार्धे ॥३२॥

तें पाहूनि अंजनीसुत ॥ प्रेरिता झाला मुष्टीघात ॥ तेणें वज्र झाले भंगित ॥ निचेष्टित महीं पडलें ॥३३॥

ऐसे होतां प्रकरण ॥ दृष्टी पाहे कर्णनंदन ॥ मग काळिकास्त्र जल्पून ॥ भस्मचिमुटी सोडीतसे ॥३४॥

यावरी सर्वोचि अग्न्यस्त्र ॥ सोडिता झाला प्रयोगमंत्र ॥ त्यावरी सर्वोचि वासवास्त्र ॥ वरी वाय्वस्त्र प्रेरिलें ॥३५॥

मग तो वाय्ववस्त्रप्रयोग्त होतां ॥ द्विमूर्धनी दाटला सविता ॥ मग महापर्वत असती स्थूलता ॥ भस्म होती तयानें ॥३६॥

तों अंजनीसुतासकट ॥ तो अति तीव्र करीत नेट ॥ याउपरी काय उद्भट ॥ विक्राळरुपी प्रगटला ॥३७॥

कीं कृत्तांत जैसा मुख पसरुन ॥ ग्रासू पाहे सकळ जन ॥ त्यातें साह्य परिपूर्ण ॥ वासवशक्ती मिरवली ॥३८॥

जैसा यमामागे दम ॥ प्रगट होय हरुं प्राण ॥ ऐसें उभयास्त्र तरुण ॥ कडकडां करीतसे ॥३९॥

जैसे खग मेघडंबरीं ॥ चमका मारिती चपळेपरी ॥ उदेली भक्ती तदनुपरी ॥ प्रणयतरणी मिरवल्या ॥१४०॥

त्यात अग्न्यस्त्राचा ताप थोर ॥ त्यावरी साह्यातें वातास्त्र ॥ मग मारुतिदेह होऊनि जर्जर ॥ रक्षणार्थ कांही दिसेना ॥४१॥

वासव आणि काळिकास्त्र ॥ मागे पुढें होऊनि पवित्र ॥ प्रहर भेदाया पाहती स्वतंत्र ॥ परी वायुपुत्र चपळ तो ॥४२॥

देई अस्त्रातें दोन हात ॥ ओढिता झाला चपळवंत ॥ तरी तेंही अस्त्र चपळ बहुत ॥ हस्तयुक्त होऊं न देत ॥४३॥

यावरी अग्न्यस्त्राकारण ॥ पुच्छीं योजी वायुनंदन ॥ यापरी वातास्त्राकारण ॥ स्तुति विनवोनि आराधिले ॥४४॥

म्हणे महाराजा प्रळयवंत ॥ प्रविष्ट करा अग्न्यस्त्रांत ॥ तरी तुझा आहे सुत ॥ लोकांमाजी मिरवतसे ॥४५॥

परी गृहींचा पाहूनि अनये ॥ कोणता पाहुनि तुष्टला तात ॥ ऐसेया प्रकरणीं हदयांत ॥ निवारिजे महाराज ॥४६॥

ऐसें उत्तर ऐकोनि सावधान ॥ मग बोलवी वायुनंदन ॥ तें वातास्त्र झालें क्षीण ॥ महाप्रतापें आच्छादी ॥४७॥

तें पाहुनी कानिफनाथ ॥ मोहनास्त्र प्रेरुनियां त्वरित ॥ तें गुप्तास्त्र हदयांत ॥ जाऊनि आंत संचरलें ॥४८॥

संचरलें तरी वज्रशरीर ॥ लाग न धरी मोहनास्त्र ॥ परी कांहींसा भ्रांत वायुकुमर ॥ निजदेहीं दाटला ॥४९॥

तरी तैसाचि भ्रांतीमाझारी ॥ अग्न्यस्त्र पुच्छे धरी ॥ महाबळें समुद्रतीरी ॥ मिरकावुनि दिधलें ॥१५०॥

परी अग्न्यस्त्रें महासबळ ॥ काढूं लागलें समुद्र जळ ॥ जळाचरा ओढवला प्रळयकाळ ॥ तेणे समुद्र गजबजिला ॥५१॥

मग तो येवोनि मूर्तिमंत ॥ निजदृष्टीनें जंव पाहात ॥ तों कानिफा आणि वायुसुत ॥ युद्धालागीं मिरवले ॥५२॥

परी तयासी ओढवला प्रळयकाळ ॥ अग्न्यस्त्रातें करी शीतळ ॥ मग जलद आणोनी सकळ ॥ अग्न्यस्त्रीं स्थापिलें ॥५३॥

तेणें अग्न्यस्त्र झालें शांत ॥ येरीकडें वायुसुत ॥ मोहनप्रकरणीं प्रविष्टचित्त ॥ परी पुच्छी पर्वत उचलिला ॥५४॥

पर्वत उचलावयाचे संधीं ॥ फाकली होती तिकडे बुद्धी ॥ आणि स्थावरमोह अस्त्रें शुद्धि ॥ भ्रम पडला होताचि ॥५५॥

त्या संधींत दोहींकडून ॥ पाठींपाटी अस्त्रें दोन ॥ एकदांचि मेदिली प्रहार करुन ॥ सबळबळें करुनियां ॥५६॥

जैसी मेणाची मूर्धनी ॥ झुंजतां एक होय मेळणीं ॥ तैसी पृष्ठीं हदय लक्षुनी ॥ भेदतीं झालीं तीं अस्त्रें ॥५७॥

कालिका आणि वासवशक्ती ॥ भेदितांचि मूर्च्छित झाली व्यक्ती ॥ तेणें उलंढूनि महीवरती ॥ वातसुत पडियेला ॥५८॥

तें पाहूनि अनिळराज ॥ हदयीं उजळलें मोहबीज ॥ मग प्रत्यक्ष होवोनि तेजःपुंज ॥ तयापासीं पातला ॥५९॥

परी तो अंजनीचा बाळ ॥ वज्रशरीरी ब्रह्मांडबळ ॥ पुच्छ सांवरोनि उतावेळ ॥ युद्धा मिसळूं पहातसे ॥१६०॥

मग श्रीवातें धरुनि हात ॥ म्हणे ऐक मद्वचन सत्य ॥ हे सबळपाणी आहेत नाथ ॥ रळी यांतें करुं नको ॥६१॥

पूर्वी पाहें मच्छिंद्रनाथ ॥ तव शिरीं दिधला होता पर्वत ॥ वाताआकर्षणविद्या बहुत ॥ जाज्वल्यें मिरवे यापासीं ॥६२॥

तरी आतां संख्य करुन ॥ कार्य काय तें घे साधून ॥ गूळ दिल्या पावे मरण ॥ विष त्यातें नकोचि ॥६३॥

यापरी बोले अपांपती ॥ म्हणे हेंचि मानवतें माझे चित्तीं ॥ संख्यासारखी दुसरी युक्ती ॥ योग्यायोग्य दिसेना ॥६४॥

मग उदधीं आणि द्वितीय वातें ॥ सवें घेऊनि मारुतीतें ॥ कानिफातें घेऊनि त्वरितें ॥ परम प्रीतीनें भेटले ॥६५॥

कानिफा तीन्ही देवांसी ॥ नमन करीतसे अतिप्रीतीसीं ॥ नमूनि पुढें वायुसुतासी ॥ युद्ध कां सोडिलें म्हणतसे ॥६६॥

हे ऐकूनि बोले अनिळ ॥ कीं युद्ध कासया करितां तुंबळ ॥ कवण अर्थी तयाचें फळ ॥ आम्हांलागीं दाखवा ॥६७॥

नाथ म्हणे तया मारुतीसी ॥ युद्ध करीत होतों कासयासी ॥ मारुती म्हणे कामनेसी ॥ तरी ऐका माझिया ॥६८॥

म्यां बहुत यत्नेंकरुन ॥ गौरवोनि मच्छिंद्रनंदन ॥ परम आदरें स्त्रीराज्याकारण ॥ पाठविला आहे कीं ॥६९॥

तरी हे तयाचे असती जाती ॥ तेथें गेलिया तयाप्रती ॥ भेटल्या तयाची समूळ वृत्ती ॥ बोधस्थिती आणितील ॥१७०॥

मग तो सांडूनि तेथींचे स्थान ॥ स्वदेशांत करील गमन ॥ ऐसी चित्तीं कल्पना आणून ॥ युद्धालागीं मिसळलों ॥७१॥

तरी आतां असो कैसें ॥ हा गेलिया स्त्रीराज्यास ॥ कांहीं योग मच्छिंद्रास ॥ बोलूं नये दुरुक्ती ॥७२॥

ऐसे प्रकरणीं भाष्य देऊन ॥ आवश्य करावें यांनीं गमन ॥ मग माझें कांहीं एक छलन ॥ होणार नाही नाथासी ॥७३॥

ऐसें बोलतां वायुसुत ॥ अपांपति म्हणे बरवें यांत ॥ अहा म्हणूनि वदे मरुतसुत ॥ यांत काय वेंचतसे ॥७४॥

मग हांसोनि बोलिलें कानिफानाथें ॥ अहा शंका आलिया तुम्हांतें ॥ तरी प्रयोजन काय आमुतें ॥ मच्छिंद्रातें बोलाया ॥७५॥

तरी सहसा आम्ही मच्छिंद्रासी ॥ बोलणार नाहीं दुर्बलेंसी ॥ आणि संबोधूनि त्यासी ॥ तेथील तेथें स्थापूं कीं ॥७६॥

ऐसें वदूनि करतळभाष ॥ देऊनि तुष्ट केलें त्यास ॥ मग आपण आपुल्या स्वस्थानास ॥ त्रिवर्गही चालिले ॥७७॥

स्वस्थानासी ॥ तों उदय झाल्या लोटली निशीं ॥ मग शिष्यकटकेंसी ॥ तेथूनियां निघाले ॥७८॥

स्त्रीराज्यांत प्रवेशून ॥ नाना तीर्थक्षेत्रस्थान ॥ पहात पहात गजनंदन ॥ शृंगमुरडीं पातला ॥७९॥

तों तें गांवीचे नृपासनीं ॥ तिलोत्तमा मनाकिनी ॥ मच्छिंद्रासह बैसोनि समास्थानीं ॥ सेवेलागी विनटली ॥१८०॥

तों कानिफानाथ फेरी ॥ आला करीत राजद्वारी ॥ सवें शिष्य कटक भारी ॥ तों द्वाररक्षक शोधालागीं धांवले ॥८१॥

शोधिता शिष्य नयनीं ॥ तों कानिफा कळला कानीं ॥ मग जाउनियां राजांगणीं ॥ वृत्तांत सुचविला ॥८२॥

म्हणती महाराजा ग्रामद्वारीं ॥ कानिफा सहनाथपरिवारीं ॥ सातशें शिष्य समुद्रलहरी ॥ तव भेटी आलासे ॥८३॥

हें ऐकूनि मच्छिंद्रनाथ ॥ म्हणे पाहिला तया कोण पंथ ॥ येरी म्हणती म्हणवती नाथ ॥ कानफाटी कर्णी ॥८४॥

ऐसें ऐकूनि मच्छिंद्रनाथ ॥ परम दचकलें तयाचें चित्त ॥ म्हणे आला कीं गोरक्षनाथ ॥ पालटोनि नामातें ॥८५॥

तरी आतां कैचे येथें ॥ राहूं देईना या सुखातें ॥ अहा तिलोत्तमा सौंर्दयें मातें ॥ लाधली होती प्रीतीनें ॥८६॥

परी तयामाजी विक्षेप झाला ॥ कीं सैंधवे दुग्धघट नासला ॥ तन्न्यायें न्याय झाला ॥ प्रारब्धवशें आमुचा ॥८७॥

आतां असो कैसे तरी ॥ यासी न्यावें ग्रामाभीतरीं ॥ म्हणोनि सिद्ध करोनि स्वारी ॥ अश्वशिबिकेसह निघाला ॥८८॥

त्वरें येऊनि ग्रामद्वारीं ॥ परस्पर भेटी झाल्यावरी ॥ कानिफा पाहोनि हदयाभीतरी ॥ समाधान मिरवलें ॥८९॥

मग आदेशा होऊनि नमन ॥ रुजामे भरजरी कनकवर्ण ॥ महीं पसरुनि योगद्रुम ॥ तयावरी बैसविला ॥१९०॥

मग कोण कोणाची समूळ कथा ॥ तदनु पुसतां गुरुचे पंथा ॥ त्यांनींहि सांगितली समूळ वार्ता ॥ जालिंदर जन्मापासूनी ॥९१॥

मग मच्छिंद्र म्हणे जालिंदरनाथ ॥ देता अनुग्रह उत्तम यात ॥ तरी तूं कानिफा नाम सुत ॥ गुरुबंधू तो माझा ॥९२॥

मग शब्दोशब्दीं अधिकोत्तर ॥ वाढत चालली प्रेमलहर ॥ मग वाहूनि गजस्कंधावर ॥ ग्रामामाजी आणिलें ॥९३॥

मग नानायुक्ती रचोनि चित्तीं ॥ स्वयें करीं मच्छिंद्रजती ॥ एक भास अति प्रीतीं ॥ कानिफा राहविला त्या स्थानीं ॥९४।

राहिला परी तो नाथ कैसा ॥ तरी समूळ कथासुधारसा ॥ पुढिले अध्यायीं श्रवणीं वसा ॥ श्रवण होईल सकळिकां ॥९५॥

तरी हा भक्तिकथासार ॥ तुम्हां वैष्णवांचें निजमाहेर ॥ प्रपंच सांडूनि रहावें स्थिर ॥ या धवलगिरीं येऊनि ॥९६॥

धुंडीसुत नरहरिवंशीं ॥ कवि मालू नाम जयासी ॥ तो बैसला ग्रंथमाहेरासी ॥ सुखसंपन्न भोगावया ॥९७॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ पंचदशाध्याय गोड हा ॥१९८॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ अध्याय १५ ॥ ओव्या ॥१९८॥


श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय १६

श्रीगणेशाय नमः

श्रीसरवत्यै नमः ॥ जयजयाजी दिगंबरा ॥ आद्यनामें विश्वंभरा ॥ वर्णिता तुझिया गुणसंभारा ॥ मति अपूर्व होतसे ॥१॥

वर्णिता तुझिया गुणसंपत्ती ॥ वेदभांडारे अपूर्व होती ॥ सहस्त्रफणी वाहतां मार्थी ॥ शीण वाचे दावीतसे ॥२॥

पंचाननाऐसे धेंडे ॥ परी दो अक्षरीं झाले धडे ॥ सरस्वतीचें शिणोनि तोंड ॥ करी सांड विलापाची ॥३॥

आठभार उदभिज देही ॥ कमळपत्रांते पुरे मही ॥ सप्ताब्धींची अपूर्व शायी ॥ तव गुणसाररसज्ञ ॥४॥

ऐसा सर्वगुणज्ञ पुरुष ॥ येवोनि बैसला अबद्भमतीस ॥ भक्तिसार ग्रंथ सुधारस ॥ स्वयें निर्मिला आपणचि ॥५॥

तरी मागिले अध्यायीं सकळ कथन ॥ कानिफा आणि वायुनंदन ॥ युद्धसमयीं ऐक्य होऊन ॥ सुखसागरा मिळाले ॥६॥

यावरी कानिफा स्त्रीदेशांत ॥ गेले श्रीगडमुंडगांवांत ॥ तेथें भेटोनि मच्छिंद्रातें ॥ आतिथ्यातें भोगिलें ॥७॥

भोगिलें परी कैसे रीतीं ॥ तेंचि ऐका येथूनि श्रोतीं ॥ मच्छिंद्राचे काम चित्तीं ॥ एक अर्थी उदेला ॥८॥

कीं कानिफा जाईल स्वदेशांत ॥ श्रीगोरक्षका करील श्रुत ॥ मग तो धांवोनि येईल येथ ॥ नेईल मातें येथुनी ॥९॥

तरी गोरक्ष मम शिष्य आहे ॥ ऐसे यासी श्रुत करुं नये ॥ अनेक योजूनि उपाय ॥ येथें राहता करावा ॥१०॥

ऐसी युक्ती रचूनि चित्तीं ॥ करावें म्हणे आतिथ्य बहू रीतीं ॥ म्हणोनि बोलावूनि बहुत युक्तीं ॥ सकळां मच्छिंद्र सांगतसे ॥११॥

याउपरी आणिक योजना करीत ॥ कीं विषयीं गोंवावा कानिफानाथ ॥ मग हा कदा देशांत ॥ जाणार नाहीं सर्वस्वें ॥१२॥

चंद्राननी मृगांकवदनी ॥ पाठवीतसे शिबिरालागुनी ॥ परी तो नातळे कामवासनीं ॥ इंद्रियदमनी महाराज ॥१३॥

म्हणाल तरी त्या कैशा युवती ॥ प्रत्यक्ष कामाच्या मूर्ती ॥ जयांचे नेत्रकटाक्षें होती ॥ वेडेपिसे देवादि ॥१४॥

जयेचें पाहतां मुखमंडण ॥ तपी सांडिती तपाकारणें ॥ येवोनि मुंगी लुंगी होवोन ॥ मागें भ्रमती जपी तपी ॥१५॥

जयेचे अधर पोंवळ्यांपरी दिसती ॥ दर्शन दाळिंबबीज गोमटी ॥ गौरवर्ण पिकाघाटी ॥ ग्रीवा दर्शवी बाहेर ॥१६॥

कीं अनंत चंद्राचा प्रकाश जैसा ॥ कीं उडुगणपतीचा द्वितीय ठसा ॥ जयांच्या नखाकृतिलेखा ॥ चंद्रकोरी मिरवल्या ॥१७॥

असो ऐसे स्त्रियांचे वर्ण ॥ कीं भानुचि पावला उदयमान ॥ ऐसिया स्त्रिया पाठवोनि स्थान ॥ चेतविती कामासी ॥१८॥

परी तो नातळे महाराज ॥ हा वृत्तांत मछिंद्रा कळला सहज ॥ मग म्हणे शिष्यकटकाचा समाज ॥ कामासनीं गोवावा ॥१९॥

ऐसाहो यत्न करुनि पाहतां ॥ कामिनींचा श्रम झाला वृथा ॥ शिष्यकटकही येईना हाता ॥ उपाय कांहीं चालेना ॥२०॥

असो ऐसे छळणांत ॥ एक मास राहिले तेथ ॥ परी कोपें देव होतां उदित ॥ सहजस्थितीं लोटले ॥२१॥

असो लोटल्या एक मास ॥ मग पाचारुनि मच्छिंद्रास ॥ म्हणती आज्ञा द्यावी आम्हांस ॥ स्वदेशासी जावया ॥२२॥

मग अवश्य म्हणोनि मच्छिंद्रनाथ ॥ नानासंपत्ती द्रव्य ओपीत ॥ गज वाजी उष्ट्र अमित ॥ द्रव्य बहुत दिधले ॥२३॥

शिबिरें कनाथा पडप थोर ॥ तंबू राहुट्या पृथगाकार ॥ शिबिका मुक्तझालरा छत्र ॥ वस्त्राभरणी भरियेले ॥२४॥

ऐसी ओपूनी अपार संपत्ती ॥ बोळवीतसे मच्छिंद्रजती ॥ एक कोस बोळवोनि नमिती ॥ परस्परांसी आदरें ॥२५॥

ऐसें बोळवोनि कटकभार ॥ स्वस्थाना आला नाथ मच्छिंद्र ॥ येरीकडे तीर्थवर ॥ करीत आला स्वदेशा ॥२६॥

सहज आले मुक्कामेंमुक्काम ॥ लंघुनि स्त्रीदेश सुगम ॥ पुढें गौडबंगाल स्थान उत्तम ॥ नानाक्षेत्रें हिंडती ॥२७॥

परी जया गावीं जाय नाथ ॥ त्या गावीं लोक करिती आतिथ्य ॥ सर्व पाहूनि भक्तिवंत ॥ उपचारें मिरवती ॥२८॥

इच्छेसम सकळ अर्थ ॥ पूर्ण होऊनि शिष्यसांप्रदायीं होत ॥ म्हणोनि वर्णिती कीर्त ॥ मुखोमुखीं उल्हासें ॥२९॥

मग या गावीचें त्या गांवीं लोक ॥ येऊनि नेती सकळ कटक ॥ दावूनि भाक्तिभाव अलोलिक ॥ बोळविती पुढारा ॥३०॥

ऐसें श्रवण करीत करीत ॥ कीर्तीमागें कीर्ती होत ॥ ती सत्कीर्ती हेळापट्टणांत ॥ प्रविष्ट झाली जगमुखें ॥३१॥

बहुत जनांचे वाचे स्तुती ॥ अहाहा स्वामी ऐसें म्हणती ॥ मग राजांगणी ही कीर्ती ॥ हेलावली सेवकमुखें ॥३२॥

कीर्ति ऐकूनि नृपनाथ ॥ पुढें प्रेरिता झाला दूत ॥ त्याकरवी उत्तम वृत्तांत ॥ मुनिकटकाचा आणविला ॥३३॥

ते सांगती मुनीचा राजयोग ॥ गांवोगांवींहूनि शिबरें सुरंग चांग ॥ धांवताती घेऊनि मागोमाग ॥ स्वामीलागीं राहावया ॥३४॥

पुढें नाथध्वज येऊन ॥ शिबिरें चालती त्यामागून ॥ शिष्यकटकासी मागूनि गमन ॥ कानिफाचे होतसे ॥३५॥

ऐसें मार्गी करितां गमन ॥ तो येरीकडे जगन्नाथाहून ॥ गोरक्ष बंगालदेशात येऊन ॥ गांवोगांव भ्रमतसे ॥३६॥

तो सहजमार्गी करितां गमन ॥ महीप्रवाही तरुव्यक्त विपिन ॥ तया विपिनीं गजकर्ण नंदन ॥ सहजस्थितीं भेटला ॥३७॥

तेणें पाहिलें गोरक्षकासी ॥ गोरक्षें पाहिलें कानिफासी ॥ दृष्टादृष्टी होतां आदेशीं ॥ एकमेकां बोलिले ॥३८॥

करुनि स्थिर शिबिकासन ॥ खालीं उतरला कर्णनंदन ॥ मग भरजरी गालिंचा महीं पसरुन ॥ गोरक्षासी बैसविलें ॥३९॥

आपण बैसें उपसवे नेटीं ॥ बोले कानिफा वाग्वटी ॥ नाथपंथ हा वरदपुटी ॥ कोण गुरु लाहिला ॥४०॥

हें ऐकून गोरक्षनाथ ॥ मच्छिंद्रजन्मापासुनि कथा सांगत ॥ वरदपाणी उदयामित्र ॥ प्रसन्न झाला तयासी ॥४१॥

तरी त्याचा दासानुदास ॥ मी म्हणवितों महापुरुष ॥ परी श्रीगुरु कानिफादेहास ॥ गुरु कोण मिरवला तें सांगा ॥४२॥

ऐसे गोरक्षबोल ऐकून ॥ कानिफा सांगे जालिंदरकथन ॥ जन्मापासूनि वर्तमान ॥ दत्तकृपा आगळी ॥४३॥

ऐसे उभयतांचें भाषण ॥ झालिया मिरवले समाधान ॥ म्हणती योग्य आलें घडून ॥ तुम्ही आम्हां भेटलां ॥४४॥

याउपरी कानिफाचित्तीं ॥ कामना उदेली एका अर्थी ॥ की मच्छिंद्र गुरु गोरक्षाप्रती ॥ दत्तवरदें मिरवला ॥४५॥

तरी दत्तकृपेचें अनुसंधान ॥ कैसें लाधलें विद्यारत्न ॥ कीं कवणरुपीं सहजदर्शन ॥ जगामाजी मिरवती ॥४६॥

तरी याचा शोध करावा ॥ दावूनी आपुल्या गौरवा ॥ ऐसें योजूनि सहज भावा ॥ दृष्टी करी भोंवतालीं ॥४७॥

तों दृष्टीसमोर आम्रवन ॥ पक्क फळी देखिलें सघन ॥ तेंही पाडाचें पक्कपण ॥ शाखा व्यक्त ॥ झोंबल्या आहेत ह्या वृक्षीं ॥४९॥

परी ऐसी फळें सुगम दिसती ॥ तरी भक्षण करावें वाटे चित्तीं ॥ यावरी गोरक्ष बोले युक्तीं ॥ नको नको म्हणतसे ॥५०॥

याउपरी बोले कानिफा वनच ॥ तोडूनि आणवितों शिष्य धाडून ॥ गोरक्ष म्हणे इतुका यत्न ॥ कासयासी करावा ॥५१॥

आतां शिष्य आहेत जवळी ॥ तोडूनि आणावें त्या करकमळीं ॥ शिष्य नसतां कोणे काळीं ॥ मग आपण काय करावें ॥५२॥

तरी आतां स्वतः ऐसे करावें ॥ गुरुप्रसादें प्रताप मिरवावे ॥ फळें तोडूनि विद्येसी गौरवावें ॥ तुष्ट आत्मा करावा ॥ ॥५३॥

ऐसें कानिफा ऐकूनि वचन ॥ जरी तुमचें इच्छितें ऐसें मन ॥ तरी आतांचि आणितों तोडून ॥ पक्कपणीं गुरुकूपें ॥५४॥

मग कवळूनी भस्मचिमुटी ॥ विभक्तास्त्र जपे होटी ॥ त्यावरीं आकर्षण मंत्रपोटीं ॥ प्रेरिता झाला युक्तीनें ॥५५॥

विभक्तास्त्र आकर्षणी ॥ प्रेरितां फेकीं भस्म काननीं ॥ तंव तीं पक्कफळें वृक्षावरुनी ॥ पुढें आलीं सर्वत्र ॥५६॥

मग ते शिष्यकटकासहित ॥ फळें भक्षिती मधुर व्यक्त ॥ भक्षिल्या पूर्ण तृप्त ॥ क्षाळिले हात जीवनानें ॥५७॥

ऐसे झालिया पूर्णप्रकरणीं ॥ गोरक्ष विचारी ऐसें मनीं ॥ म्हणे प्रताप दाविला मजलागुनी ॥ कानिफानें आपुला ॥५८॥

तरी आपण आतां यासी ॥ दावूं विद्या चमत्कारासी ॥ ऐसा विचार करुनि मानसीं ॥ कानिफातें बोलतसे ॥५९॥

म्हणे तुम्ही केला पाहुणचार ॥ तरी उत्तरालागीं उत्तर ॥ आणिक फळें भक्षूनि साचार ॥ चवी रसने मिरवावी ॥६०॥

ऐसें ऐकोनि तयाचें वचद ॥ म्हणे बोललां ते फार उत्तम ॥ तुमच्या शब्दासी करुनि मान ॥ स्वीकारावें तैसेंचि ॥६१॥

मग आकर्षणशक्तीं विभकास्त्र ॥ जल्पोनि नाथ गोरक्ष पवित्र ॥ तों लवंगवनींचीं फळें विचित्र ॥ येऊनि पडलीं पुढारां ॥६२॥

मग तीं फळें खात जेठी ॥ रसनेसी पडो पाहे मिठी ॥ अहा अहा म्हणे शेवटीं ॥ अमृतसरीं दाटले ॥६३॥

मग ती फळें केलिया भक्षण ॥ शुद्धजीवनें हस्त प्रक्षाळून ॥ बैसले आसनीं सुखें येऊन ॥ त्यावरी बोले गोरक्ष तो ॥६४॥

म्हणे खालीं फळें उत्तम राहिलीं ॥ परी जैसीं तैसी करावीं वहिलीं ॥ पुन्हां योजूनि वृक्षडाहळीं ॥ पुढें मार्गा गमावें ॥६५॥

याउपरी कानिफानाथ ॥ ऐसा कोण ब्रह्मयाचा सुत ॥ पुन्हां निर्मोनि मूर्तिमंत ॥ जैसे तैसे करील ॥६६॥

गोरक्ष म्हणे गुरुपुत्र ॥ जो निस्सीमपणीं आहे पवित्र ॥ त्यासी हें करणें अघटित विचित्र ॥ कदाकाळीं नसेचि ॥६७॥

तो दुसरा ब्रह्मा करील उत्पन्न ॥ मग ऐसियाची कथा कोण ॥ जो महीच मस्तकीं करिता धारण ॥ तो पर्वताचे ओझें शिणे कीं ॥६८॥

जो अर्कतेजा निवविणार ॥ तो पावक ठिणगीनें पळे सत्वर ॥ हदयीं सांठवितो सप्तसागर ॥ तो थिल्लरोदके अटकेना ॥६९॥

जो बोलकाजाचे गंभीर चातुरीं ॥ बृहस्पतीतें मागें सारी ॥ तो अजारक्षकाते भिवोनि अंतरीं ॥ मौन वरील कां वाचे ॥७०॥

जो आपुलें प्रतापेंकरुनी ॥ क्षीराब्धी करील गृहवासनी ॥ तो तक्राकरिता सदैव सदनीं ॥ भीक मागेल केउता ॥७१॥

कीं चक्षूचे कृपाकटाक्षे ॥ पाषाण करी परीस जैस्से ॥ तो हेमाकरितां काय प्रत्यक्ष ॥ आराधील धनाढ्या ॥७२॥

जयाचे वचनवाग्वटी ॥ मिरविती सकळ देवांच्या थाटी ॥ तो आपल्या मोक्षासाठीं ॥ आराधीना भूतासी ॥७३॥

तस्मात् ब्रह्मयाची काय कथा ॥ जो अनंतब्रह्मांडें होय निर्मिता ॥ सर्व कर्तव्याचा कर्ता ॥ गुरुकृपेसी मिरवितसे ॥७४॥

नातरी मुळींच प्रौढीं ॥ गुरु मिरवला ज्याच्या कवाडीं ॥ तयाची दैना कोण फेडी ॥ काबाड ओझें वाहे तो ॥७५॥

ऐसें ऐकतां कानिफानाथ ॥ परम क्षोभला खचितार्थ ॥ जैसा पावक आज्यसिंचितार्थ ॥ कवळूं पाहे ब्रह्मांडा ॥७६॥

म्हणे हो हो जाणतों तूतें ॥ आणि तुझिया गुरुसहित ॥ बहुसाधनीं प्रतापवंत ॥ नरकामाजी पचतसे ॥७७॥

वाचे म्हणविती योगीजन ॥ कर्म आचरती नरकपतन ॥ सकळ स्त्रीराष्ट्र वेष्टून ॥ भोग पापांचा ॥७८॥

जितेंद्रियत्व दावावें जनीं ॥ असोनि भोग चिंती मनी ॥ तया भोगवश करोनि ॥ मेनिकानाथ होवोनि ठेला ॥७९॥

तरी ठाऊक गुरु तुझा ॥ किती बोलसी प्राज्ञी ओजा ॥ आतां ब्रह्मयातें करुनि हीन तेजा ॥ ढिसाळ गोष्टी करितोसी ॥८०॥

प्रथम गुरु तुझा काबाडी ॥ तुझी दैना कोण फेडी ॥ आतां सोडोनि सकळ प्रौढी ॥ मार्गालागी क्रमी कां ॥८१॥

ऐसें वचन खडतर बोलणें ॥ गोरक्षकातें होतां श्रवण ॥ मग म्हणे बोलसी आपण ॥ चावटीपणी हे भ्रष्टा ॥८२॥

तुझा गुरु जालिंदरनाथ ॥ प्रतापहीन दीन बहुत ॥ दशवर्षे आजपर्यंत ॥ नरकीं नित्य पचतसे ॥८३॥

परी त्या सामर्थ्य नाहीं झालें ॥ कीं आपण येथूनि जावें वहिलें ॥ नृपसर्पदपें वेष्टिलें ॥ शक्तिहीन झालासे ॥८४॥

हेळापट्टणीं गौडबंगाल देशीं ॥ वस्ताद मिळाला आहे त्यासी ॥ धन्य गोपीचंद प्रतापराशी ॥ लीदगर्तीत पचवीतसे ॥८५॥

तैसा नोहे गुरु माझा ॥ हालवील सकळ ब्रह्मांड चोजा ॥ शंकराचें अस्त्र ओजा ॥ करकमळीं मिरवतसे ॥८६॥

अष्टभैरव महादारुण ॥ अजिंक्य देवांदानवांकारण ॥ त्यांसी बळें करुनि कंदन ॥ शरणागत आणिलें ॥८७॥

पाहे केवढा मारुतसुत ॥ जेणें विजयी केला रघुनाथ ॥ तया मस्तकीं देऊनि पर्वत ॥ उभा केला स्तंभापरी ॥८८॥

वीरभद्र प्रतापतरणी ॥ देवदानवां अजिंक्य करणी ॥ तयाचा प्राण कंठीं आणुनी ॥ शरणागत तो केला ॥८९॥

द्वादशकळी तीव्र आदित्य ॥ तयाचा उलथोनि पाडिला रथ ॥ सकळ देव शरणागत ॥ होऊनि लोटले पायासी ॥९०॥

तरी प्रतापी गुरु ऐसा ॥ भक्त सोडवीत नरकक्लेशा ॥ तयाच्य वरदकृपें ऐसा ॥ आतांचि पाहें हे भ्रष्टा ॥९१॥

मग घेऊनि भस्मचिमुटी ॥ मंत्रप्रयोग बोले होटीं ॥ संजीवनी ते पीयूषथाटी ॥ सकळ फळातें मिरवली ॥९२॥

ऐसीं सकळ प्रयोगीं फळें संपूर्ण ॥ जैसीं तैसीं ठेलीं होऊन ॥ तें कानिफानाथ पाहून ॥ मनीं शंकित पैं झाला ॥९३॥

योजूनि सवें मुख वोठीं ॥ विस्मय करीत आपुले पोटीं ॥ म्हणे धन्य हा प्रतापजेठी ॥ जगामाजी मिरविला ॥९४॥

सकळ टाकूनि विरुद्ध भाषण ॥ धांवोनि दिधलें आलिंगान ॥ म्हणे धन्य तूं एक निपुण ॥ गुरुपुत्रता मिरविशी ॥९५॥

परी ऐशा बोलतां विरुद्ध बोला ॥ मातें सर्वज्ञ लाभ झाला ॥ शोधित फिरलों जालिंदराला ॥ ठाव लाधला तुजपासीं ॥९६॥

यापरी गोरक्ष बोले वचन ॥ हें बोलिलासी अति अप्रमाण ॥ माझा लाभ तुजकारण ॥ तुझा लाभ मज झाला ॥९७॥

ते बोल नव्हे वाईट ॥ दाविते झाले मार्ग चोखट ॥ गुप्तगुरुचें उघडूनि कपाट ॥ मार्गदिवटा पैं केला ॥९८॥

तरी आतां उत्तम झालें ॥ दृष्टीं पाहूं गुरुपाउलें ॥ ऐसें वदूनि प्रीतीं नमिलें ॥ एकमेकां तें वेळा ॥९९॥

याउपरी गौरनंदन ॥ स्पर्शास्त्र मुखी जल्पून ॥ वृक्षांदेठीं फळे नेऊन ॥ जेथील तेथें जडियेलीं ॥१००॥

मग पुन्हां करोनि नमनानामन ॥ प्रांजळ वर्णित वर्तंमान ॥ एकमेकांतें विचारुन ॥ आदेश म्हणवूनि जाताती ॥१॥

गोरक्ष चालिला स्त्रीदेशांत ॥ कानिफा गौडबंगाली जात ॥ हेळापट्टण लक्षूनियां पंथ ॥ कूच मुक्काम साधीतसे ॥२॥

परी तीव्र होऊनि अति चित्तीं ॥ म्हणे जातांचि भस्म करीन नृपती ॥ अहा जालिंदर गुरुमूर्ती ॥ दुखविली नष्टानें ॥३॥

ऐसें म्हणोनि वारंवार ॥ परम क्रोधाचा वैश्वानर ॥ शिखा डुलवी स्वअंगावर ॥ अहाळूनि पाडावया ॥४॥

तन्न्यायें तीव्रमती ॥ चित्तकुंडी पावकस्थिती ॥ प्रदीप करोनि नृपआहुती ॥ इच्छूनियां जातसे ॥५॥

तच्छिष्यकटकथाटी ॥ गमन करितां वाटोवाटीं ॥ तंव हेळापट्टण काननपुटीं ॥ जाऊनियां पोहोंचला ॥६॥

तो वृत्तांत रायासी कळला ॥ कानिफा आले गावाला ॥ मग परिवारासहित गोपीचंद वहिला ॥ सवें सामोरा जातमे ॥७॥

चित्तीं म्हणे मम वैभवा ॥ योग्य दिसे महानुभावा ॥ तरी गुरु हाचि करावा ॥ कायावाचाभावानें ॥८॥

सातशें शिष्यकटक भारी ॥ पूर्णयोगी ब्रह्मचारी ॥ गज वाजी स्यंदनी स्वारी ॥ जगामाजी मिरवतसे ॥९॥

सिद्ध करुनि चमूभार ॥ शिबिकासनें तुरंग अपार ॥ अन्य मंडळी वीर झुंजार ॥ रायासवें मिरवले ॥११०॥

रायमस्तकीं एकशत ॥ चंद्राकृती देदीप्यवंत ॥ ऐसीं छत्रें वर्णिता बहुत ॥ वाढेल ग्रंथ आगळा ॥११॥

एक सहस्त्र सातशें मिती ॥ बरोबरीचे सरदार असती ॥ तयांचीं छत्रें पंच असती ॥ चंद्राकीं मिरवत ॥१२॥

हेमतगटी झालरा शिल्पयुक्तीं ॥ छत्रकळसाची अपार दीप्ती ॥ रत्नखचित अर्का म्हणती ॥ तेज सांडी तूं आपुलें ॥१३॥

ऐशा संपत्तिसंभारेसी ॥ ठेंगणें भाविती अमरपदासी ॥ मार्गी चालतां मांत्रिकासी ॥ पाचारी तो नृपनाथ ॥१४॥

म्हणती प्रारब्धयोगेंकरुन ॥ येथें पातलें सिद्धरत्न ॥ तरी याचा अनुग्रह घेऊन ॥ ईश्वरभक्तीं परिधानूं ॥१५॥

हा श्रीगुरु आहें योग्य मातें ॥ माझी संपत्ती भूषणभरतें ॥ जगामाजी दिसे सरितें ॥ योगायोग्य उभयतीं ॥१६॥

नातरी गुरु मम मातेनें ॥ योजिला होता कंगालहीन ॥ रत्नपति काच आणून ॥ भूषणातें मिरवीतसे ॥१७॥

कीं कल्पतरुच्या बागायतीं ॥ कंटकतरु बाभूळवस्ती ॥ कीं अर्कचंद्राचे मध्यपंक्ती ॥ काजव्यानें मिरवावें ॥१८॥

मी भूप माझे पंक्ती ॥ भूपती असावा सर्वज्ञमूर्ती ॥ घृतशर्करा दुग्धसरितीं ॥ लवण कैसें वाढावें ॥१९॥

अमंगळ गल्ली कुश्वल स्थान ॥ बहुत ज्ञानी पिशाचसमान ॥ तो गुरु मातेंनें ॥ जालिंदर योजिला ॥१२०॥

अहो ती योग्य नसे संगत ॥ काय केलें स्त्रीजातींत ॥ परी आतां उदेलें उचिताउचित ॥ गुरु कानिफा आम्हांसी ॥२१॥

ऐसें वदूनि मंत्रिकासी ॥ राव जातसे कटकप्रदेशी ॥ घेऊनि सवें संभारासी ॥ षोडशोपचार आदरें ॥२२॥

ऐसेपरी कटकथाटीं ॥ राव जाय सुगम वाटीं ॥ त्या मार्गी योगींद्र जेठी ॥ जाऊनियां मिळाला ॥२३॥

परी येतां देखतांचि गोपीचंद ॥ हदयीं धडाडला अपार क्रोध ॥ परी विवेक अर्गळा अपार ॥ तेणें अक्रोध मनामाजी संचरला ॥२४॥

आतांचि शापुनि करीन भस्म ॥ परी कार्य सुगम ॥ उरकोनि घ्यावा मनोधर्म ॥ आघीं पाहूनि गुरुचरणपद्म ॥ शासनातें मग ओपूं ॥२६॥

ऐसा विचार करुनि चित्तीं ॥ स्तब्ध राहिला योगींद्र जती ॥ क्रोधानळा समूळ शांती ॥ बोधलक्ष्मी स्थापीतसे ॥२७॥

जैसे शस्त्रास्त्री निपुण ॥ जेवीं रक्षिती प्रतापवान ॥ परी कार्यसंबंधीं देदीप्यमान ॥ दर्शविती लोकांतें ॥२८॥

तरी प्रथम श्रीगुरुमूर्ती ॥ प्रत्यक्ष करावी याचे हातीं ॥ मग क्रोधानळासी दुस्तर आहुती ॥ गोपीचंद योजावा ॥२९॥

ऐसिये विचारीं शब्दबोधें ॥ कानिफा राहिला स्तब्ध ॥ येरीकडे गोपीचंद ॥ चरणावरी लोटला ॥१३०॥

उभा राहिला समोर दृष्टीं ॥ नम्रोत्तर बोले होटीं ॥ जोडोनियां करसंपुटीं ॥ विनवणी विनवीतसे ॥३१॥

हे महाराजा दैवयोगा ॥ मज आळशावरी गंगा ॥ वोळलासी कृपाओघा ॥ अनाथा सनाथ करावया ॥३२॥

तुम्ही कृपाळू संतसज्जन ॥ दयाभांडार शांतिरत्न ॥ ज्ञानविज्ञान आस्तिककर्म ॥ गृहस्थांसीं कल्पावें ॥३३॥

ब्रह्मी पावला तत्त्वतां ॥ षड्रगुणासी विषयां दमितां ॥ सकळ भोगूनि अकर्ता ॥ मिरवतसां जगामाजी ॥३४॥

आणि जगाच्या विषयतिमिरीं ॥ ज्ञानदिवटी तेजारी ॥ मिरवूनि सुख सनाथपरी ॥ दाविते झाला महाराजा ॥३५॥

ऐसे साधक याचकमणी ॥ तुम्ही कल्पतरु कल्पनापूर्णी ॥ ऐसिये स्थिती जान्हवी जीवनी ॥ बोळविलीत मजवरुती ॥३६॥

परी श्रीरायाचें वागुत्तर ॥ ऐकूनि कानिफा मनोहर ॥ तेणें चित्तशक्तितरुवर ॥ आनंदशांती मिरवली ॥३७॥

देहीं क्रोधाचा वैश्वानर ॥ पेटवा घेत होता अपार ॥ तरी रावउत्तराचें सिंचननीर ॥ होतांचि शांति वरियेली ॥३८॥

मग रायासी धरुनि करीं ॥ बैसविला स्वशेजारीं ॥ मग बोलत वागुत्तरीं ॥ कुशळ असा कीं महाराजा ॥३९॥

म्हणे राया अनुचित केलें ॥ परी तव भाग्य सबळ पाहिलें ॥ तेणेंकरुनि शांतीतें वरिलें ॥ मम मानसें महाराजा ॥१४०॥

नातरी अनर्थासी गांठी ॥ पडत होती प्राणासी मिठी ॥ परी तव भाग्यउत्तराचे देठीं ॥ शांतिफळें मिरवलीं ॥४१॥

तरी आतां असो कैसें ॥ वेगीं चाल पट्टणास ॥ तेथें सकळ इतिहास ॥ निवेदीन तुज राया ॥४२॥

मग बैसूनि शिबिकासनीं ॥ काटकासह ग्रामासी येवोनि ॥ राये राजसदना आणोनी ॥ कनकासनीं वाहिला ॥४३॥

वाहिला तरी प्रीतीकरुनी ॥ षोडशोपचारें पूजिला मुनी ॥ हेमरत्नीं आणि वस्त्रभूषणीं ॥ नम्रवाणी बोलतसे ॥४४॥

हे महाराजा योगसंपत्ती ॥ कामना वेधली माझे चित्तीं ॥ अनुग्रहीं चोज घेऊनि निगुती ॥ सनाथपणी मिरवावें ॥४५॥

ऐसी वेधककामना चित्तीं ॥ प्रथम भागीं मिरवत होती ॥ त्यांत उदेली कोपयुक्ती ॥ वैश्वानरशिखा ते ॥४६॥

तेणें आनंदोनि उदयाचा तरु ॥ वोळलासे योगधीरु ॥ मग पुढें वासनाफळकारु ॥ प्रेरावयातें पावला ॥४७॥

नृप म्हणे अर्थ उघडून ॥ चित्तीं मिरवा समाधान ॥ नातरी भययुक्त भिरड पूर्ण ॥ चित्ततरुतें स्पर्शीतसे ॥४८।

तरी प्रांजळ करुनि मातें ॥ कृपें ओपूनि अनुग्रहातें ॥ आपुला साह्य म्हणोनि सरतें ॥ तिहीं लोकीं मिरवावें ॥४९॥

कानिफा म्हणे नृपा ऐक ॥ मम अनुग्रहाचें उत्तम दोंदिक ॥ घेऊं पाहसी भावपूर्वक ॥ परी तुवां भाव नासिला ॥१५०॥

जैसें दुग्ध पवित्र गोड ॥ परी लवण स्पर्शितां परम द्वाड ॥ तेवीं तूतें घडूनि विघड ॥ आलें आहे महाराजा ॥५१॥

अरे माझा अनुग्रह घ्यावया पाहसी ॥ परी ज्याचा अनुग्रह मजसी ॥ तो तूं स्वामी महागर्तेसी ॥ अश्वविष्ठेंत स्थापिलाज ॥५२॥

परी तुझें आयुष्य लाग ॥ पूर्वपुण्याचा होता योग ॥ म्हणोनि क्रोधानळ मग ॥ शांतिदरीं दडाला हो ॥५३॥

नातरी महाराज जालिंदर ॥ प्रळयकाळीचा वैश्वानर ॥ तुझे वैभवाचें अपार नीर ॥ भस्म करिता क्षणार्धे ॥५४॥

जयाच्या प्रतापाची सरी ॥ कोण करी बोल वागुत्तरीं ॥ जेणें स्वर्गदेवतांची थोरी ॥ झाडोझाडीं लाविली ॥५५॥

मग साद्यंत वराची कथा ॥ तया नृपातें सांगतां ॥ तेणेंही सकळ ऐकूनि वार्ता ॥ भय उदेलें चित्तांत ॥५६॥

अंगीं रोमांच आले दाटून ॥ शरीरीं कापरें दाटले पूर्ण ॥ मग धरोनि त्याचे चरण ॥ नम्रपणें विनवीतसे ॥५७॥

म्हणे महाराजा योगवित्त ॥ घडूनि आलें तें अनुचित ॥ तरी आतां क्षमा उचित ॥ प्रसाद करा दासावरी ॥५८॥

या ब्रह्मांडपंडपाव ॥ मजएवढा कोणी नाहीं पतित ॥ अहा ही करणी अघटित ॥ घडूनि आली मजलागीं ॥५९॥

परी सदैव मायेपरी ॥ शांति वरावी हदयांतरीं ॥ बहु अन्याय होतां किशोरी ॥ अहितातें टेकेना ॥१६०॥

तुम्ही संत दयावंत ॥ घेतां जगाचे बहु आघात ॥ अमृतोपम मानूनि चित्त ॥ कृपा उचित दर्शवितां ॥६१॥

जैसा झाडा घातला घाव ॥ एकीं लावणी केली अपूर्व ॥ परि उभयतां एकचि छाव ॥ मिरवूं शके जैशी कां ॥६२॥

कीं सरितापात्रीं नीरओघीं ॥ धुती पूजिती मळसंगी ॥ परी एकचि तों उभयप्रसंगी ॥ मिरवली कीं सरिता ते ॥६३॥

कीं तस्कारा होतां घरांत रिघावा ॥ त्यासही प्रकाश देई जैसा दवा ॥ तन्न्याय संतभावा ॥ मिरवूं जात महाराजा ॥६४॥

तरी आतां असो कैसें ॥ क्षमावोढण करी आम्हांस ॥ दुष्कृतसरिताप्रवाही विशेष ॥ ओढूनि काढीं महाराजा ॥६५॥

ऐसें ऐकूनि तयाचें वचन ॥ नाभी म्हणे गजकर्णनंदन ॥ मग रायालागीं सवें घेऊन ॥ स्वशिबिरातें पातला ॥६६॥

परी हा वृत्तांत ऐकूनि ॥ परिचारिका धांवल्या तेथूनी ॥ त्यांनी जाऊनि सकळ युवतींलागोनी ॥ मैनावतीते सांगितलें ॥६७॥

हे माय वो भक्तिसंपादनीं ॥ जालिंदरगुरु तुम्हांलागुनी ॥ परी तयाची रायें विपत्तीं करुनी ॥ महीगर्ते मिरविला ॥६८॥

तेंही अश्वाविष्ठेत ॥ टाकिला आहे दशवरुपांत ॥ ही राजदरबाअ ऐकूनि मात ॥ तुम्हां आम्हीं निवेदिलें ॥६९॥

म्हणाल कैसी कळली मात ॥ तरी जालिंदराचा आला सुत ॥ अपार वैभव कानिफानाथ ॥ विद्यार्णव दुसरा ॥१७०॥

तरी तयाचें वैभव पाहून ॥ शेवटीं नटला आपुला नंदन ॥ परी जालिंदराचें वर्तमान ॥ श्रुत केलें तेणेंचि ॥७१॥

आता राव तयाचे शिबिरीं ॥ गेला आहे सहपरिवारीं ॥ तेथें घडेल जैसेपरी ॥ तैसे वृत्त सांगूं पुढें ॥७२॥

ऐसें सांगतां युवती ॥ हदयीं क्षोभली मैनावती ॥ परी पुत्रमोहाची संपत्ती ॥ चित्तझुलारी हेलावे ॥७३॥

येरीकडे नृपनाथ ॥ मुनिशिबिरा जाऊनि त्वरित ॥ उत्तम अगारीं अनन्य पदार्थ ॥ इच्छेसमान भरियेले ॥७४॥

सदा सन्मुख कर जोडून ॥ अंगें धांवे कार्यासमान ॥ जेथील तेथें अर्थ पुरवून ॥ संगोपन करीतसे ॥७५॥

जैसे दुर्वासा अतिथी सकळ ॥ सेवे आराधी कौरवपाळ ॥ तन्न्याय हा भूपाळ ॥ नाथालागी संबोखी ॥७६॥

असो ऐसे सेवेप्रकरणी ॥ अस्तास गेला वासरमणी ॥ मग रायातें आज्ञा देऊनी ॥ बोळविला सदनातें ॥७७॥

राव पातला सदनाप्रती ॥ परी येतांचि वंदिली मैनावती ॥ मग झाला वृत्तांत तियेप्रती ॥ निवेदिला रायानें ॥७८॥

वृत्तांत निवेदूनि तिजसी ॥ तुवां जाऊनि शिबिरासी ॥ युक्तिप्रयुक्ती बोधूनि त्यासी ॥ महाविघ्ना निवटावें ॥७९॥

मग अवश्य बोलूनि मैनावती ॥ शिबिरा आसनीं जाऊं पाहती ॥ शीघ्र येऊनि शिबिराप्रती ॥ कानिफानाथ मिरवला ॥१८०॥

वंदूनि निकट बैसली तेथ ॥ म्हणे महाराजा गुरुनाथ ॥ कोण तुम्ही वरिला अर्थ ॥ नाथपंथी मिरवावया ॥८१॥

तरी या नाथपंथिका ॥ मीही मिरवतें महीलोका ॥ तरी मम मौळी वरदपादुका ॥ श्रीजालिंदराची मिरवितें ॥८२॥

ऐसी ऐकोनि तियेची वाणी ॥ बोलता झाला कानिफा मुनी ॥ ऐसी असूनि बरवी करणी ॥ जालिंदरातें मिरविली ॥८३॥

तूं अनुग्रही असतां निश्वित ॥ गुरु ठेवावा अश्वविष्ठेंत ॥ मैनावती म्हणे श्रुत ॥ आजि झालें महाराजा ॥८४॥

मग आपुली कथा मुळापासुनी ॥ तया नाथासी निवेदूनी ॥ हें स्वसुताहातीं झाली करणी ॥ मज न कळतां महाराजा ॥८५॥

तरी आतां झालें कर्म ॥ सज्ञाना सांवरी दुर्गम ॥ परी रायाचें दुष्टकर्म ॥ टाळूनि सुपंथ मिरवीं कां ॥८६॥

ऐसें सांगूनि तयाप्रती ॥ मोहों उपजला अति चित्तीं ॥ मग म्हणे श्रीगुरुमूर्ती ॥ दृश्य करा लोकांत ॥८७॥

म्हणशील सुताचे हातेंकरुन ॥ कां न करिसी दृश्यमान ॥ परी नेणों जालिंदराचा कोपाग्न ॥ धांव घेईल पुढारां ॥८८॥

तरी बोधावा युक्तिप्रयुक्तीं ॥ रक्षूनियां आपुल्या भाच्याप्रती ॥ दृश्य करुनि गुरुमूर्ती ॥ सत्कीर्ती भाच्या वरीं कां ॥८९॥

मग या ब्रह्मांडमंडपांत ॥ कीर्तिध्वज अति लखलखीत ॥ हेळाऊनि परम लोकांत ॥ कीर्तिध्वज फडकेल ॥१९०॥

ऐसें बोलूनियां तयाप्रती ॥ मग उठती झाली मैनावती ॥ त्यानेंही नमूनि परमप्रीती ॥ बोळविलें भगिनीतें ॥९१॥

पूर्ण आश्वासन देऊन ॥ म्हणे रायाचें कल्याण इच्छी पूर्ण ॥ श्रीगुरुचरण पाहूनि जाण ॥ सकळ संशय सोडीं कां ॥९२॥

ऐशी आश्वासूनि माता ॥ श्रीनाथ झाला बोळविता ॥ असो मैनावती तत्त्वतां ॥ नमूनि आली सदनासी ॥९३॥

स्वसुतातें पाचारुन ॥ सकळ सांगितलें वर्तमान ॥ मग सकळ भयाचें दृढासन ॥ भंगित झालें तत्क्षणीं ॥९४॥

जालिंदराचे अनुग्रहासहित ॥ आश्वासीत कानिफानाथ ॥ ऐसा सकळ सांगूनि वृत्तांत ॥ भयमुक्त तो केला ॥९५॥

असो आतां येथून ॥ पुढिलें अध्यायीं धुंडीनंदन ॥ नरहरिवरदें श्रोत्यांकारण्झ ॥ मालू निवेदिल गुरुकृपें ॥९६॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ षोडशाध्याय गोड हा ॥१९७॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ अध्याय ॥१६॥ ओंव्या ॥१९७॥


श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय १७

श्रीगणेशाय नमः

जयजयाजी वैकुंठाधीशा ॥ अलक्ष अगोचरा आदिपुरुषा ॥ पूर्णब्रह्म निष्कल निर्दोषा ॥ सनातना आदिमूर्ते ॥१॥

ऐसा स्वामी पंढरीअधीश ॥ बैसूनि मालूचे कवित्वपृष्ठीस ॥ भक्तिसारसुधारस ॥ निर्माण केला ग्रंथासी ॥२॥

तरी मागिले अध्यायीं कथन ॥ आनिफा पातला हेळापट्टण ॥ गोपीचंदाची भेटी घेऊन ॥ मैनावतीसी भेटला ॥३॥

तरी सिंहावलोकनीं तत्त्वतां ॥ मैनावती भेटूनि नाथा ॥ सकळ वृत्तांत सांगूनि सुता ॥ समाधानीं मिरविलें ॥४॥

असो गोपीचंद दुसरे दिनीं ॥ नाथाग्रहें शिबिरीं जाऊनि ॥ मौळी ठेवूनि नाथाचे चरणीं ॥ उभा राहिला सन्मुख ॥५॥

कानिफा पाहूनि राव दृष्टीं ॥ बोलता झाला स्ववाग्वटी ॥ श्रीजालिंदर महीपोटी ॥ कोठे घातला तो सांग पां ॥६॥

येरु म्हणे महाराजा ॥ ठाव दावितो चला ओजा ॥ तेव्हां म्हणे शिष्य माझा ॥ घेऊनि जावें सांगाती ॥७॥

ऐसी कानिफा बोलतां मात ॥ अवश्य म्हणे नृपनाथ ॥ मग सच्छिष्य घेऊनि सांगात ॥ तया ठायीं पातला ॥८॥

ठाव दाखवूनि सच्छिष्यासी ॥ पुन्हां आले शिबिरासी ॥ शिष्य म्हणती त्या ठायासी ॥ पाहूनि आलों महाराजा ॥९॥

मग रायासी म्हणे कानिफानाथ ॥ जालिंदर काढाया कोणती रीत ॥ येरु म्हणे तुम्ही समर्थ ॥ सकळ जाणते सर्वस्वीं ॥१०॥

बाळें आग्रहें करुं जाती ॥ परी तयांचा निर्णय कैशा रीतीं ॥ करावा हें तों नेणती निश्वतीं ॥ सर्व संगोपी माता ती ॥११॥

तेवीं माता पिता गुरु ॥ त्राता मारिता सर्वपारु ॥ तरी कैसे रीती हा विचारु ॥ आव्हानिजे महाराजा ॥१२॥

ऐसें बोलतां नृपनाथ ॥ मग बोलतां झाला गजकर्णसुत ॥ तुझे रक्षावया जीवित ॥ विचार माझा ऐकिजे ॥१३॥

कनक रौप्य ताम्रवर्ण ॥ पितळ लोहधातु पूर्ण ॥ पांच पुतळे करुनि आण ॥ तुजसमान हे राया ॥१४॥

ऐसी आज्ञा करितांचि नाथ ॥ प्रेरिले रायें ग्रामांत दूत ॥ हेमकार लोहकारासहित ॥ ताम्रकारका आणिलें ॥१५॥

जे परम कुशल अति निगुती ॥ लक्षूनि सोडिले हेराप्रती ॥ धातु ओपूनि तयांचे हातीं ॥ पुतळ्यांतें योजिलें ॥१६॥

मग ते आपुले धीकोटी ॥ पुतळे रचिती मेणावरती ॥ नाथालागीं दावूनि दृष्टी ॥ रसयंत्रीं ओतिले ॥१७॥

पाहोनि दिन अति सुदिन ॥ मग नृपासह पुतळे घेवोन ॥ पाहता झाला गुरुस्थान ॥ विशाळबुद्धी कानिफा ॥१८॥

गरतीकांठीं आपण बैसोन ॥ पुतळा ठेवोनि हेमवर्ण ॥ राजाहातीं कुदळ देवोन ॥ घाव घालीं म्हणतसे ॥१९॥

घाव घालितां परी लगबगां ॥ पुसतां स्वामी नांव सांगा ॥ सांगितल्यावरी अति वेगा ॥ गरतीबाहेर निघे कीं ॥२०॥

ऐसें सांगोनि प्रथम रायातें ॥ मग कुदळी दिधली हातातें ॥ उपरी चिरंजीवप्रयोगातें ॥ भाळीं चर्चिली विभूती ॥२१॥

पुतळा ठेवोनि मध्यगरतीं ॥ मागें उभा राहिला नृपती ॥ लवकर घाव घाली क्षितीं ॥ आंतूनि पुसे महाराज ॥२२॥

कोणी येवोनि घालिती घाव ॥ वेगीं वदे कां तयाचें नांव ॥ नृप म्हणे मी राणीव ॥ गोपीचंद असें कीं ॥२३॥

रायें सांगतांचि नाम ॥ निघाला होता गरतींतून ॥ श्रीजालिंदराचें शापवचन ॥ कणकप्रतिमे झगटले ॥२४॥

तीव्रशाप वैश्वानर ॥ व्यापिलें कनकपुतळ्याचें शरीर ॥ क्षण न लागतां महीवर ॥ भस्म होवोनि पडियेलें ॥२५॥

भस्म होतां कनकप्रतिमा ॥ दुसरा ठेविला उगमा ॥ तयाही मागें नरेंद्रोत्तमा ॥ पुन्हां गरतीं स्थापिलें ॥२६॥

रौप्यवर्णी पुतळ्यामागें ॥ राव उभा केला वेगें ॥ पुन्हा विचारिलें सिद्धियोगें ॥ कोण आहेस म्हणवोनि ॥२७॥

पुन्हां सांगे नृप नांव ॥ गरतीबाहेर वेगीं धांव ॥ जालिंदरशापगौरव ॥ जळ जळ खाक होवो कीं ॥२८॥

ऐसें वदतां शापोत्तर ॥ पुतळा पेटला वैश्वानरें ॥ तोही होवोनि भस्मपर ॥ महीलागीं मिरवला ॥२९॥

मग तिसरा लोहपुतळा पूर्ण ॥ तोही झाला शापें भस्म ॥ चवथा पांचवा गति दुर्गम ॥ त्याचिपरी पावला ॥३०॥

यावरी त्या नृपनाथा ॥ श्रीकानिफा झाला सांगता ॥ मातें वदोनि नाम सर्वथा ॥ नाथाप्रती सांगावें ॥३१॥

अवश्य म्हणोनि गौडपाळ ॥ लवकरी भेदी अति सबळ ॥ तो नाद ऐकूनि तपी केवळ ॥ विचार करीत मानसीं ॥३२॥

माझा क्रोध वडवानळ ॥ जाळूनि टाकील ब्रह्मांड समग्र ॥ तेथें वांचला त्रिलोचनकुमर ॥ हें आश्चर्य वाटतें ॥३३॥

कृतांताचे दाढेआंत ॥ सांपडलिया सुटोनि जात ॥ न शिवे वैश्वानर मृत्य ॥ हें आश्चर्य वाटतसे ॥३४॥

महातक्षकानें दंश करुन ॥ वांचवूं शके कोणी प्राण ॥ केंवीं वांचला नृपनंदन ॥ हें आश्चर्य वाटतें ॥३५॥

परम संकट पाहोनी ॥ प्राण उदित घेत हिरकणी ॥ तो वांचूनि मिरवे जनीं ॥ हें आश्चर्य वाटतसे ॥३६॥

उरग खगेंद्रा हातीं लागतां ॥ परी न मरे भक्षण करितां ॥ तेवीं झालें नृपनाथा ॥ हेंचि आश्चर्य वाटतें ॥३७॥

कीं मूषक सांपडल्या मुखांत ॥ त्यातें कदा न ये मृत्य ॥ तेवीं वांचला हा नृपनाथ ॥ हेंचि आश्चर्य वाटतें ॥३८॥

सहज उभा पर्वतानिकटी ॥ कडा तुटोनि पडला माथीं ॥ त्यांत वांचला ऐसें म्हणती ॥ हेंचि आश्चर्य वाटतसे ॥३९॥

ऐसा विचार मनांत ॥ करिता झाला जालिंदरनाथ ॥ चित्तीं म्हणे त्या भगवंत ॥ साह्य झाला रक्षणीं ॥४०॥

तरी आतां असो ऐसें ॥ वांचल्या अमर करुं त्यास ॥ ऐसें विचारुनि चित्तास ॥ मनीं गांठी दृढ धरिली ॥४१॥

येरीकडे कानिफनाथ ॥ हुंकार नृपासी देत ॥ तंव उभा स्वकरीं व्यक्त ॥ लवकरी मही भेदीतसे ॥४२॥

लवकरी घाव कानीं उठतां ॥ श्रीजालिंदर होय पुसता ॥ कोण आहेस अद्यापपर्यंत ॥ घाव घालिसी महीतें ॥४३॥

ऐकतां श्रीगुरुवचन ॥ रायाआधीं गजकर्णनंदन ॥ सांगूनि आपुलें नामाभिधान ॥ गोपीचंदाचें सांगतसे ॥४४॥

म्हणे महाराजा तपोजेठी ॥ मी बाळक कानिफा महीपाठी ॥ पहावया चरण दृष्टीं ॥ बहुत भुकेले चक्षू ते ॥४५॥

म्हणवोनि गोपीचंद नृपनाथ ॥ तुम्हां काढावया उदित ॥ ऐसी ऐकोनि सच्छिष्यमात ॥ म्हणे अद्यापि नृप वांचला ॥४६॥

तरी आतां चिरंजीव ॥ असो अर्कअवघी ठेव ॥ अमरकांती सदैव भाव ॥ जगामाजी मिरवो कां ॥४७॥

ऐसें वदोनि जालिंदरनाथ ॥ निजचक्षूनें पहावया सुत ॥ बोलता झाला अति तळमळत ॥ म्हणे महीतें विदारीं ॥४८॥

ऐसी आज्ञा होतांचि तेथें ॥ मग काढिते झाले वरील लिदीतें ॥ तंव ते मृत्तिका दशवर्षात ॥ महीव्यक्त झालीसे ॥४९॥

मग कामाठी लावूनि नृपती ॥ उकरिता झाला मही ती ॥ वरील प्रहार वज्रापती ॥ जावोनियां भेदलासे ॥५०॥

मग तो नाद ऐकूनि नाथ ॥ म्हणे आतां बसा स्वस्थ ॥ मग जल्पोनि शक्रास्त्र ॥ वज्रास्त्रातें काढिलें ॥५१॥

मग नाथ आणि गजकर्णनंदन ॥ पाहते झाले उभयवदन ॥ मग चित्तीं मोहाचें अपार जीवन ॥ चक्षुद्वारें लोटलें ॥५२॥

मग गरतीबाहेर येवोनि नाथ ॥ प्रेमें आलिंगला सुत ॥ म्हणे बा प्रसंगें होतासी येथ ॥ म्हणवोनि नृपनाथ वांचला ॥५३॥

परी गरतीबाहेर येतांचि नाथ ॥ चरणीं लोटला नृपनाथ ॥ मग त्यातें कवळोनि धरीत ॥ मौळीं हात ठेवीतसे ॥५४॥

म्हणे बाळा प्रळयाग्नी ॥ त्यांत निघालासी वांचुनी ॥ आतां जोंवरी शशितरणीं ॥ तोंवरी मिरवें महीतें ॥५५॥

यावरी त्रिलोचनकामिनी ॥ मैनावती लोटली चरणीं ॥ नेत्रीं अश्रुपात आणोनी ॥ स्वामीलागी बोलतसे ॥५६॥

म्हणे महाराजा एकादश वर्षात ॥ मातें लोटली महातभरात ॥ माझा अर्क गुरुनाथ ॥ अस्ताचळीं पातलासे ॥५७॥

मित्रकुमुदिनी दीनवाणी ॥ हुरहुर पाहे जैसी तरणी ॥ कीं मम बाळकाची जननी ॥ गेली कोठें कळेना ॥५८॥

कीं मम वत्साची गाउली ॥ कोणे रानीं दूर गेली ॥ समूळ वत्साची आशा सांडिली ॥ तिकडेचि गुंतली कैसोनि ॥५९॥

कां मम चकोराचा उड्डगणपती ॥ कैसा पावला अस्तगती ॥ कीं मज चातकाचे अर्थी ॥ ओस घन पडियेला ॥६०॥

सदा वाटे हुरहुर जीवा ॥ कीं लोभ्याचा चुकला द्रव्यठेवा ॥ कीं अंधाची शक्ती काठी टेकावा ॥ कोणें हरोनि नेलीसे ॥६१॥

ऐसे एकादश संवत्सर ॥ मास गेले महाविकार ॥ ऐसें बोलोनि नेत्रीं पूर ॥ अश्रुघन वर्षतसे ॥६२॥

मग तियेसी हदयीं धरोनि नाथ ॥ स्वकरें नेत्राश्रु पुसीत ॥ तीन्ही बाळकें धरोनि यथार्थ ॥ माय हेलवे त्यामाजी ॥६३॥

गोपीचंदाचें मुख कुरवाळून ॥ बोलता झाला अग्निनंदन ॥ बा रे तुझें काय मन ॥ इच्छीतसे मज सांगा ॥६४॥

राजवैभवा भोगावें ॥ कीं आत्मीं समयोग्यते मिरवावें ॥ कोणतें तुझें मनीं भावे ॥ तैसा योग घडेल बा ॥६५॥

अश्वाश्वत शाश्वत दोन पद ॥ राज्य वैराग्य मार्गभेद ॥ तरी तुज आवडे तोचि वृंद ॥ स्वीकारीं कां बाळका ॥६६॥

म्यां तूतें केलें अमरपणीं ॥ परी तैसें नाहीं राजमांडणी ॥ अनेक आलें अभ्र दाटोनी ॥ मृगजळासमान तें ॥६७॥

बा रे संपत्ती अमरां कैसी ॥ तेही आटेल काळवेळेसीं ॥ दिसतें तितुकें वैभवासी ॥ नाशिवंत आहे बा रे ॥६८॥

बा रे पूर्वी राज्य सांडून ॥ कित्येक बैसले योग्यांत येवोन ॥ परी तो योग सोडून ॥ राज्यवैभवा नातळला ॥६९॥

पाहें गाधिसुताचे वैभव ॥ महीलागीं केवढें नांव ॥ परी तो सोडूनि सकळ वैभव ॥ योगक्रिया आचरला ॥७०॥

उत्तानपाद महीवरती ॥ काय न्यून असे संपत्ती ॥ परी सुताची कामशक्ती ॥ वेगें जनीं दाटलीसे ॥७१॥

तस्मात् अशाश्वत ओळखून ॥ बा ते झाले सनातन ॥ तरी आतां केउतें मन ॥ इच्छितें तें मज सांगें ॥७२॥

गोपीचंद विचार करी मनांत ॥ राज्यवैभवीं सामर्थ्य गळित ॥ अहा योगी जालिंदरनाथ ॥ चिरंजीव मिरवतसे ॥७३॥

आज एकादश वर्षेपर्यंत ॥ गरतगलित पचला योगीनाथ ॥ जेणें यम शरणागत ॥ पायांतळीं लोळतसे ॥७४॥

जेणें कृत्तांत निर्बळ केला ॥ तो राज्य मेळवूनि खळ ठेला ॥ हेमकर्णे अशक्त झाला ॥ परीस लोहाकारणें ॥७५॥

सुरभी त्रैलोक्यकामना ॥ पूर्ण करील क्षुधार्तवचना ॥ ती स्वपोटा रानोंराना ॥ शोधील काय तृणातें ॥७६॥

ब्रह्मांडावरी जयाची सत्ता ॥ तो कोणे अर्थी दरिद्रता ॥ भोगील मनें ॥ ऐसा पश्चात्ताप दारुण ॥ चित्तामाजी डवरला ॥७८॥

मग म्हणे गुरुमहाराज ॥ इंधनीं अग्नि होतां सज्ज ॥ तेवीं विधानचि तैसे विराजे ॥ पावका स्पर्श झालिया ॥७९॥

तरी आतां सरतें पुरतें ॥ आपुल्यासमान करा मातें ॥ आळीभृंगन्यायमतें ॥ करुनि मिरवें महीसी ॥८०॥

ऐकोनि दृढोत्तर वचन ॥ श्रीगुरु स्वकरातें उचलोन ॥ पृष्ठी थापटी वाचे वचन ॥ गाजी गाजी म्हणतसे ॥८१॥

मग वरदहस्त स्पर्शोनि मौळी ॥ सकळ देहातें कृपें न्याहाळी ॥ कर्णी ओपूनि मंत्रावळी ॥ स्वनाथ मार्गी मिरवला ॥८२॥

ऐसें होता अंग लिप्त ॥ मग दिसून आलें अशाश्वत ॥ काया माया दृश्य पदार्थ ॥ विनय चित्तीं मिरवले ॥८३॥

मग वटतरुचें दुग्ध काढून ॥ जटा वळी राजनंदन ॥ त्रिसट कौपीन परिधानून ॥ कर्णी मुद्रा परिधानी ॥८४॥

शैली कंथा परिधानूनी ॥ शिंगीनाद गाजवी भुवनीं ॥ कुबडी फावडी कवळूनि पाणी ॥ नाथपणीं मिरविला ॥८५॥

भस्मझोळी कवळूनि कक्षेंत ॥ आणि द्वितीय झोळी भिक्षार्थ ॥ हातीं कवळूनि नाथनाथ ॥ जगामाजी मिरवला ॥८६॥

परी हा वृत्तांत सकळ गांवांत ॥ अंतःपुरादिकीं झाला श्रुत ॥ श्रुत होतांचि अपरिमित ॥ शोकसिंधू उचंबळला ॥८७॥

एकचि झाला हाहाकार ॥ रुदन करितां लोटला पूर ॥ स्त्रिया धरणीसी टाकिती शरीर ॥ मुखीं मृत्तिका घालिती ॥८८॥

मैनावतीसी शिव्या देत ॥ म्हणती हिनेचि केला सर्वस्वीं घात ॥ अहा अहा नृपनाथ ॥ महीं कोठें पहावा ॥८९॥

आठवूनि रायाचें विशाळ गुण ॥ भूमीवरी लोळती रुदन करुन ॥ मूर्छागत होऊनि प्राण ॥ सोडूं पाहती रुदनांत ॥९०॥

अहा हें राज्यवैभव ॥ कैसी आली विवशी माव ॥ अहा सुखाचा सकळ अर्णव ॥ वडवानळें प्राशिला ॥९१॥

अहा रायाचें बोलणें कैसें ॥ कधीं दुखविलें नाहीं मानस ॥ आमुचे वाटेल जें इच्छेस ॥ राव पुरवी आवडीनें ॥९२॥

एक म्हणे सांगू काय ॥ रायें वेष्टिलें चित्त मोहें ॥ म्लानवदन पाहोनि राय ॥ हदयी कवळी मोहाने ॥९३॥

म्हणे बाई मुखातें कुरवाळून ॥ परम प्रीतीनें घेत चुंबन ॥ अति स्नेहानें अर्थ पुरवून ॥ मनोरथ पुरवी माझें गे ॥९४॥

ऐसें म्हणूनि आरंबळत ॥ एकसरां शब्द करीत ॥ एक म्हणे वो बाई मात ॥ काय परी सांगूं रायाची ॥९५॥

अगे वत्सालागीं जैशी गाय ॥ क्षणिक विसंबूं कदा न पावे ॥ तेवीं क्षणक्षणां येऊनि राय ॥ वदन पाहे माझें गें ॥९६॥

एक म्हणे अर्थ पोटीं ॥ किती सांगू राजदृष्टी ॥ वांकुडा केश कबरीथाटी ॥ पडतां सावरी हस्तानें ॥९७॥

अगे कुंकुमरेषा वांकडी होत ॥ ती सांवरी नृपनाथ ॥ मायेहूनि अधिक आतिथ्य ॥ माझें करीत होता गे ॥९८॥

ऐसें म्हणूनि धरणी अंग ॥ धडाडूनि टाकिती सुभाग्य ॥ म्हणती विधात्या बरवा भांग ॥ निजभाळीं रेखिला की ॥९९॥

मस्तक धरणीवरी आपटिती ॥ धडाधडां हस्तें हदय पिटिती ॥ महीं गडबडूनि पुन्हां उठती ॥ पुन्हां सांडिती शरीरातें ॥१००॥

म्हणती राया तुजविण ॥ आतां कोण करील संगोपन ॥ आतां आमुचे सकळ प्राण ॥ परत्र देशांत जातील हो ॥१॥

ऐसे म्हणूनि आरंबळती ॥ अट्टाहासे हदय पिटिती ॥ मृत्तिका घेऊनि मुखीं घालिती ॥ केश तोडिती तटातटां ॥२॥

म्हणती अहा राया तीन वेळ ॥ शय्येहूनि उठूनि पाजिसी जळ ॥ ऐसा कनवाळू असूनि निर्मळ ॥ सोडूनि कैसा जासी रे ॥३॥

अहा राया शयनीं निजता ॥ उदर चापसी आपुल्या हाता ॥ रिक्त लागतां उठोनि तत्त्वतां ॥ भोजन घालीत होतासी ॥४॥

ऐसा कनवाळू तूं मनीं ॥ आतां कैसा जासी सोडूनि ॥ ऐसें म्हणोनि शरीर धरणीं ॥ धडाडूनि टाकिलें ॥५॥

म्हणे रायाचें स्वरुप ॥ पहातांचि पुरतसे कंदर्प ॥ तरी त्या स्वरुपाचा झाला लोप ॥ कोठें पाहूं महाराजा ॥६॥

एक म्हणे नोहे भर्ता ॥ प्रत्यक्ष होती आमुची माता ॥ कैसी सांडूनि जात आतां ॥ निढळवाणी पाडसा ॥७॥

एक म्हणे माझी हरिणी ॥ कैसी पाडसा जात सोडूनी ॥ एक म्हणे माझी कूर्मिणी ॥ कृपादृष्टी आवगतली ॥८॥

एक म्हणे मज मीनाचें जळ ॥ कैसे आटलें अब्धीचें जळ ॥ दुःखार्काची झळाळ ॥ साहवेना वो माये ॥९॥

एक म्हणे माउली माझी ॥ स्नेहाचा पान्हा पाजी ॥ वियोगकाननीं चुकर आजी ॥ कैसी झाली दैवानें ॥११०॥

एक म्हणे आमुची पक्षिणी ॥ अंडजासमान पाळिलें धरणी ॥ आतां चंचुस्नेहें करोनी ॥ कोण ओपील ग्रासातें ॥११॥

एक म्हणे मज चातकाकारण ॥ भरतां नोहे गे अंबुदस्थान ॥ परम स्नेहाचें पाजितां जीवन ॥ आजि ओस कैसा झाला गे ॥१२॥

ऐसें म्हणोनि आरंबळती ॥ एकमेकींचे गळां पडती ॥ रडती पडती पुन्हां उठती ॥ आरंबळती आक्रोशें ॥१३॥

ऐसा आकांत अंतःपुरांत ॥ येरीकडे जालिंदरनाथ ॥ राया गोपीचंदा सांगत ॥ तपालागीं जाई कां ॥१४॥

परी राया ऐक मात ॥ सुरत्नपणाचा पाहों हेत ॥ तुझ्या स्त्रिया अठरा शत ॥ भिक्षा मागे तयांपासी ॥१५॥

आलक्ष आदेश निरंजन ॥ ऐसा सवाल मुखें वदोन ॥ अंतःपुरांत संचार करोन ॥ भिक्षा मागें बाळका तूं ॥१६॥

शिंगीनाद वाजवूनि हातीं ॥ भिक्षा दे माई ॥ वदोनि उक्ती ॥ ऐशापरी भेटोनि युवती ॥ तपालागीं जाई कां ॥१७॥

मग अवश्य म्हणोनि नृपनाथ ॥ संचार करी अंतःपुरांत ॥ अलक्ष निरंजन मुखे वदत ॥ माई भिक्षा दे म्हणतसे ॥१८॥

तें पाहूनि त्या युवती ॥ महाशोकाब्धींत उडी घालिती ॥ एकचि कोल्हाळ झाला क्षितीं ॥ नाद ब्रह्मांडीं आदळतसे ॥१९॥

एक हातें तोडिती केशांतें ॥ एक मृत्तिका घालिती मुखांत ॥ एक म्हणे दाही दिशा ओस दिसत ॥ दाही विभाग झाल्यानें ॥१२०॥

एक धुळींत लोळती ॥ एक उठूनि पुन्हां पडती ॥ एक हदय पिटोनि हस्तीं ॥ आदळिती मस्तकें ॥२१॥

एक पाहोनि रायाचें स्वरुप ॥ म्हणती अहाहा कैसा भूप ॥ सवितारुपी झाला दीप खद्योतपणी दिसतसे ॥२२॥

अहाहा राव वैभवार्णव ॥ कैसा दिसतो दीनभाव ॥ कीं मेरुमांदार सोडूनि सर्व ॥ मशक दृष्टीं ठसावला ॥२३॥

अहा राय हस्तेंकरुन ॥ अपार याचकां वांटी धन ॥ आतां कक्षेंत झोळी घालून ॥ मागे कण घरोघरीं ॥२४॥

ऐसें म्हणोनि आरंबळती ॥ धरणीवरी अंग टाकिती ॥ पुन्हां उठोनि अवलोकिती ॥ म्हणती अहा काय झालें ॥२५॥

असो नृप तो अंतःपुरांगणीं ॥ आदेश निरंजन वदे वाणी ॥ मुख्य नायिका लोमावती राणी ॥ रायापासीं पातली ॥२६॥

मुखचंद्र गळे बोलूनी ॥ नयनी अश्रु अपार जीवनीं ॥ रायालागीं पाळा घालूनी ॥ वेष्टुनियां बोलती त्या ॥२७॥

तिचे मागें चंपिका कारंती ॥ उठोनि येतात मागें समस्तीं ॥ राजस्त्रिया अट्टहास करिती ॥ धांव घेती मागें लगबगां ॥२८॥

म्हणती राया असो कैसे ॥ घडूनि आले ईश्वरसत्तेसें ॥ परी येथेंचि राहूनी पूर्ण योगास ॥ संपादिजे महाराजा ॥२९॥

आम्हां दरिद्रियांचें स्वरुपमांदुस ॥ लोपवूं नका सहसा महीस ॥ आम्ही तुम्हांविण दिसतों ओस ॥ प्राणाविण शरीर जैसे ॥१३०॥

हे राया आम्ही स्त्रिया कोटी ॥ परम अंध महींपाठीं ॥ तरी आमुची सबळ काठी ॥ टेंका हरूं नका जी ॥३१॥

तरी येथोंचि योग आचरावा ॥ आम्ही न छळूं विषयभावा ॥ परी तव स्वरुपाचचि ठेवा ॥ पाहूनि तो शांत करुं कीं ॥३२॥

जैसें जीर्ण कडतर ॥ परी म्हणाया वैभवी थोर छत्र ॥ तेवीं तव आश्रयीं सर्व पवित्र ॥ वैभवमंडण आम्हांसी ॥३३॥

तरी मानेल तेथें पर्णकुटिका ॥ बांधूनि देऊं जडितहाटका ॥ आम्ही बारा सोळा शत बायका ॥ सेवा करुं आदरानें ॥३४॥

सुवर्णे शिंगीं देऊं मढवून ॥ आणि रत्नबिकी शैल्य परिधानून ॥ कनकचिरी कंथा घालून ॥ सुखसंपन्न भोगावें ॥३५॥

मुक्तरत्नें हिरे माणिक ॥ संगीत करुनि हाटकीं देख ॥ त्यातें भूषणमुद्रा अलौलिक ॥ सुखसंपन्न भोगावें ॥३६॥

लोड तिवासे मंचक सुगम ॥ गादी तोषक अति गुल्म ॥ तरी भस्म सन्निधीकरुन ॥ सुखसंपन्न भोगावें ॥३७॥

भिक्षातुकडे सूक्ष्म कठिण ॥ त्यजूनि सेवीं षड्रसान्न ॥ घृत दुग्ध दधि सेवीं पक्कान्न ॥ हें सुखसंपन्न भोगावें ॥३८॥

एकट सेवीं त्यजीं कानन ॥ दासदासी सेवकजन ॥ सेवा करितां षोडशोपचारान ॥ हें सुखसंपन्न भोगावें ॥३९॥

चुवा चंदन अर्गजासुवास ॥ मार्जन करुं तव देहास ॥ तरी धिक्कारुनि तृणासनास ॥ सुखसंपन्न भोगावें ॥१४०॥

हत्ती घोडे शिबिका सदन ॥ टाकूनि कराल तीर्थाटण ॥ परी चालाल तें दुःख त्यजून ॥ सुखसंपन्न भोगावें ॥४१॥

महाल चौकट संगीत रंगीत ॥ ते सांडूनि विपिनीं पडाल दुःखित ॥ तरी तें त्यजूनि रहा येथ ॥ हे सुखसंपन्न भोगावें ॥४२॥

छत्र चामरें प्रजा अंकित ॥ त्यजूनि फिराल अरण्यांत ॥ एकटपणीं त्यजूनि रहा येथ ॥ हें सुखसंपन्न भोगावें ॥४३॥

मृगाक्षा खंजीर पदमनयनी ॥ पद चुरती कोमल पाणी ॥ तरी तृणांकुरशयन त्यजूनी ॥ हें सुखसंपन्न भोगावें ॥४४॥

चंद्राननी गजगामिनी ॥ बोलती संवाद रसाळ वाणी ॥ तरी यांचा त्याग करोनी ॥ हें सुखसंपन्न भोगावें ॥४५॥

ऐशा स्त्रिया संवादती ॥ परी कोप चढला तयाच्या चित्तीं ॥ दूर हो लंडी म्हणोनि उक्ती ॥ धिक्कारीत तयांतें ॥४६॥

परी त्या मोहें वेष्टूनि बोलत ॥ राया एकटें पडावें अरण्यांत ॥ तुम्हांसवें बातचीत ॥ कोण करील महाराजा ॥४७॥

येरी म्हणे अरण्यपोटीं ॥ सिंगी सारंगी करील गोष्टी ॥ स्त्रिया म्हणती आसनदृष्टी ॥ वपन कैंचें हो तेथें ॥४८॥

राव म्हणे मही आसन ॥ अंबरासारखें असे ओढवण ॥ स्त्रिया म्हणती शयनीं कोण ॥ निजेल तुमच्या सांगातीं ॥४९॥

येरी म्हणे कुबडी फावडी ॥ शयन करितील दोन्ही थडी ॥ स्त्रिया म्हणती शैत्य हुडहुडी ॥ कोण निवारी सांगावें ॥१५०॥

येरी म्हणे अचळ धुनी ॥ पेटवा घेईल पंचाग्नी ॥ ते सबळ शीतनिवारणीं ॥ होतील योग साधावया ॥५१॥

स्त्रिया म्हणती अलौलिक ॥ तेथें कोठें परिचारक लोक ॥ राज्यासनीं पदार्थ कवतुक ॥ देत होते आणूनियां ॥५२॥

येरी म्हणे व्याघ्रांबर ॥ आसन विराजूं वज्रापर ॥ मग धांव घेती नारीनर ॥ कौतुकपदार्थ मिरवावया ॥५३॥

स्त्रिया म्हणती मोहव्यक्त ॥ कोणतीं असतीं मायावंत ॥ माय बाप भगिनी सुत ॥ अरण्यांत कैंची हीं ॥५४॥

येरी म्हणे विश्वरुप ॥ घरघर आई घरघर बाप ॥ इष्टमित्र भगिनी गोतरुप ॥ शिष्य साधक मिरवती ॥५५॥

स्त्रिया म्हणतीं षड्रसादि अन्न ॥ विपिनीं मिळतील कोठून ॥ येरी म्हणे जीं फळें सुगम ॥ षड्रसादि असती तीं ॥५६॥

स्त्रिया म्हणती वेंचाया साधन ॥ विपिनीं मिळेल जी कोठून ॥ येरी म्हणे ब्रह्मरुपानें ॥ घेऊं देऊं वेव्हारासी ॥५७॥

स्त्रिया म्हणती फाटल्या कौपीन ॥ पुनः मिळेल ती कोठून ॥ येरु म्हणे इंद्रियदमन ॥ विषयीं कांसोटी घालूं कीं ॥५८॥

स्त्रिया म्हणती फाटल्या कंथा ॥ ते कोठूनि मिळेल जी समर्था ॥ येरु म्हणे योग आचरतां ॥ दिव्य कंथा होईल ॥५९॥

स्त्रिया म्हणती सिंगी सारंगा ॥ फुटूनि गेलिया प्रसंगी ॥ मग गोष्टी करावयाची तरंगी ॥ कोण आहे तुम्हांपाशी ॥१६०॥

येरी म्हणे सगुण निर्गुण ॥ शिंगी सारंगी असती दोन ॥ आगमानिगमाचे तंतू ओंवून ॥ सुखसंवाद करीन मी ॥६१॥

स्त्रिया म्हणती कुबडी फावडी ॥ जीर्ण झालिया लागती देशोधडी ॥ मग सुखशयनीं निद्रापहुडी ॥ कोण सांगेन करील जी ॥६२॥

येरी म्हणे खेचरी भूचरी उभय ॥ आदेय विदेह प्रकाश स्वरुपमय ॥ वाम दक्षिण घेऊनि तन्मय ॥ डोळां लावीन निरंजनीं ॥६३॥

स्त्रिया म्हणती शैल्य तुटून ॥ गेल्या पुन्हां आणाल कोठून ॥ येरी म्हणे मोक्षयुक्तिसमान ॥ शैल्यभूषण मिरवीन गे ॥६४॥

स्त्रिया म्हणती कर्णमुद्रिका ॥ हरपोनि गेल्या नरपाळका ॥ मग काय करशील वनीं देखा ॥ नाथपंथी मिरवावया ॥६५॥

येरु म्हणे वो खेचरी भूचरी ॥ लुप्तमुद्रा कर्णद्वारीं ॥ अलक्ष चाचरी अगोचरी ॥ लेवविल्या गुरुनाथें ॥६६॥

ऐसें बोलतां उत्तरोत्तर ॥ म्हणे माई भिक्षा देई सत्वर ॥ तंव त्या धांवती धरावया कर ॥ कंठीं मिठी घालावया ॥६७॥

ऐसें चांचल्यगुणयुक्त ॥ दृष्टीं पाहूनियां नृपनाथ ॥ कुबडी फावडी उगारीत ॥ दूर होई लंडी म्हणतसे ॥६८॥

तें गुप्त पाहोनि मैनावती ॥ सिद्धार्थ अन्न घेऊनि हातीं ॥ शीघ्र येऊनि पुत्राप्रती ॥ म्हणे भिक्षा घे नाथा ॥६९॥

मग भिक्षा घेऊनि झोळीं ॥ मातेपदीं अर्पी मौळी ॥ मग तेथूनि निघूनि तये वेळीं ॥ नाथापाशीं पातला ॥१७०॥

मग जो झाला स्त्रियांत वेव्हार ॥ तो सकळ सांगितला वागुत्तर ॥ मैनावती येऊनि तत्पर ॥ तीही वदे वृत्तांतासी ॥७१॥

असो उभयतांचा वृत्तांत ऐकून ॥ मान तुकावी अग्निनंदन ॥ मग तीन रात्री रायासी ठेवून ॥ बहुतां अर्थी उपदेशिला ॥७२॥

मग लोमावतीचा उदरव्यक्त ॥ गोपीचंदाचा होता सुत ॥ मुक्तचंद नाम त्याचें ॥ राज्यासनीं वाहिला ॥७३॥

स्वयें जालिंदरें कौतुक ॥ राज्यपटीं केला अभिषेक ॥ मंत्री प्रजा सेवक लोक ॥ तयाहातीं ओपिलें ॥७४॥

राया गोपीचंदा सांगे वचन ॥ बा रे पाहें बद्रिकाश्रम ॥ बद्रिकेदारालागीं नमून ॥ तपालागीं तूं बैसें कां ॥७५॥

लोहकंटकीं चरणांगुष्ठ ॥ देऊनि तपाचें दावीं कष्ट ॥ द्वादश वरुषें नेम स्पष्ट ॥ एकाग्रीं रक्षावा ॥७६॥

ऐसें सांगूनि तयातें ॥ मग प्रजा लोकादि समस्तें ॥ निघाले रायासी बोळवायातें ॥ कानिफासुद्धां जालिंदर ॥७७॥

परी प्रजेचे लोक शोक करिती ॥ राया गोपीचंदाचे गुण आठविती ॥ नेत्रीं ढाळूनि अश्रुपातीं ॥ रुदन करिती अट्टहास्यें ॥७८॥

म्हणती अहा सांगों कायी ॥ नृप नव्हे होती आमुची आई ॥ वक्षाखाली सकळ मही ॥ संबोधीतसे महाराजा ॥७९॥

ऐसे वर्णूनि तयाचे गुण ॥ आक्रंदती प्रजाजन ॥ परी आतां पुरे करा विघ्न ॥ शोकमांदार खोंचला ॥१८०॥

तृणपाषाणादि तरु ॥ पक्षी पशु जाती अपारु ॥ राया नृपाकरितां समग्र ॥ शोकाकुलित मिरवले ॥८१॥

मग एक कोस बोळवून ॥ समस्त आणिले अग्निनंदनें ॥ जेथील तेथे संबोखून ॥ आश्वासीत सकळांसी ॥८२॥

परी राया जातां ठायीं ठायीं ॥ धांवूनि पाहतां उंच मही ॥ म्हणती सोडूनि गेलीस आई ॥ कधी भेटसी माघारां ॥८३॥

घडी घडी दृष्टी ऊर्ध्व करुन ॥ पहाती रायाचें वदन ॥ कोणी मागें जाती धांवून ॥ वदन पाहूनि येताती ॥८४॥

ऐसा राजा जातां दोन कोश ॥ मग सकळ मिरवले एक निराश ॥ मग मागें उलटूनि संभारास ॥ ग्रामामाजी संचरले ॥८५॥

राजसदनीं येऊनि समस्त ॥ सकळ बैसले दीनवंत ॥ जैसें शरीर प्राणरहित ॥ एकसरां मिरवले ॥८६॥

मग श्रीजालिंदर राजसदनीं ॥ मुक्तचंदा विराजूनि राज्यासनीं ॥ मंत्रियातें पाचारुनी ॥ वस्त्रेंभूषणें आणविलीं ॥८७॥

मग जैसें महत्त्व पाहून ॥ तयालागीं भूषणें देऊन ॥ प्रेमें गौरवूनि प्रजाजन ॥ बोळविले स्वस्थाना ॥८८॥

याउपरी अंतःपुरीं जाऊन ॥ सर्व स्त्रियांचें केलें समाधान ॥ मैनावतीचे करीं ओपून ॥ समाधानीं मिरविलें ॥८९॥

मुक्तचंद ओपूनि तियेचे करीं ॥ म्हणे हा गोपीचंदचि मानीं ॥ हा शिलार्थ तयाचे परी ॥ मनोरथ पुरवील तुमचे ॥१९०॥

ऐसे करोनि समधान ॥ राज्यासनीं पुन्हां येऊनि ॥ मुक्तचंदाचे हस्तेंकरुन ॥ याचकां धन वांटिले ॥९१॥

जालिंदर कानिफा कटकासहित ॥ षण्मास राहिले पट्टणांत ॥ अर्थाअर्थी सकळ अर्थ ॥ निजदृष्टीं पाहती ॥९२॥

श्रीजालिंदराचा प्रताप सघन ॥ कोण करुं पाहती विघ्न ॥ येरीकडे गोपीचंदरत्न ॥ भगिनीग्रामा चालिला ॥९३॥

तेथें कथा होईल अपूर्व ॥ ते पुढील अध्यायीं ऐका सर्व ॥ अवधानपात्रीं घन भाव ॥ कथा स्वीकार श्रोते हो ॥९४॥

नरहरीवंशीं धुंडीसुत ॥ मालू संतांचा शरणागत ॥ तयाचे रसनेस धरुनि हेत ॥ अवधान पात्रीं मिरवावें ॥९५॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत चतुर ॥ सप्तदशाध्याय गोड हा ॥१९६॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ अध्याय ॥१७॥ ओव्या ॥१९६॥

॥ नवनाथभक्तिसार सप्तदशाध्याय समाप्त ॥


श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय १८

श्रीगणेशाय नमः

जयजयाजी करुणाकरा ॥ पंढरीअधीशा रुक्मिणीवरा ॥ भक्तपालका चकोरचंद्रा ॥ प्रेमपीयूषधारका ॥१॥

हे दीनबंधो दीनानाथ ॥ पुढें चालवीं भक्तिसारकथा ॥ मागिले अध्यायीं विरागता ॥ गोपीचंदा लाधली ॥२॥

असो पुढें आतां श्रोतीं ॥ अवधान द्यावें ग्रंथार्थी ॥ गोपीचंद सोडूनि ग्रामाप्रती ॥ वैराग्य आचरुं चालिला ॥३॥

मार्गी ग्रामोग्रामीं जात ॥ अहारापुरती भिक्षा मागत ॥ पुढें मार्गी गमन करीत ॥ वाचे जप करीतसे ॥४॥

परी गौडबंगाल देश उत्तम ॥ समाचार कळला ग्रामोग्राम ॥ कीं गोपीचंद राजा नरोत्तम ॥ योगींद्रनीति आचरला ॥५॥

गांवोगावींचे सकळ जनीं ॥ ऐकतां विव्हळ होती मायापूर्ण ॥ कन्येसमान केलें पालन ॥ सकळ प्रजेचे रायानें ॥७॥

आतां ऐसा राजा मागुती ॥ होणार नाही पुढतपुढती ॥ ऐसे म्हणोनि आरबंळती ॥ लोक गावींचे सकळिक ॥८॥

असो तो ज्या गांवीं जात ॥ त्या गावींचे लोक पुढें येत ॥ म्हणती महाराजांनीं राहावे येथ ॥ योग पूर्ण आचरावा ॥९॥

नाना पदार्थ पुढें आणिती ॥ परी तो न घे कदा नृपती ॥ भिक्षा मागुनि आहारापुरती ॥ पुढे मार्गी जातसे ॥१०॥

शेटसावकार मोठमोठे ॥ बोळवीत येती तया वाटे ॥ पुनः परता वागवाटें ॥ बोलतती रायासी ॥११॥

हे महाराजा तुम्हांवीण ॥ प्रजा दिसत आहे दीन ॥ जैसें शरीर प्राणविण ॥ नीचेष्टित पडतसे ॥१२॥

तैसी गति प्रजेसी झाली ॥ जरी तुम्ही जातां आमुची माउली ॥ तरी योग साधुनि पुनः पाउलीं ॥ दर्शन द्यावें आम्हातें ॥१३॥

अवश्य म्हणूनी नृपनाथ ॥ बोळवीतसे समस्त ॥ ऐसें रायासी गांवोंगांवीं होत ॥ अति गुंतीं चालावया ॥१४॥

असो ऐसें बहुत दिनीं ॥ स्वराज्याची सीमा उल्लंघूनी ॥ गौडबंगाल देश टाकूनि ॥ कौलबंगाली संचरला ॥१५॥

त्याही कौलबंगाललांत ॥ गांवोगांवीं हा वृत्तांत ॥ प्रविष्ट झाला लोकां समस्त ॥ चकचकिताती अंतरी ॥१६॥

म्हणती गोपीचंद रायासमान ॥ होणार नाहीं राजनंदन ॥ अहा गोपीचंद प्रज्ञावान ॥ धर्मदाता सर्वदा ॥१७॥

असो कौलबंगालींचा नृपती ॥ पौलपट्टण ग्रामीं वस्ती ॥ तेथें भगिनी चंपावती ॥ गोपीचंदाची नांदतसे ॥१८॥

तिलकचंद श्वशुर नामीं ॥ महाप्रतापी युद्धधर्मी ॥ जैसा गोपीचंद संपत्तीं उत्तमीं ॥ तैशाचि नीतीं तो असे ॥१९॥

गज वाजी अपरिमित ॥ शिबिका नाना दिव्य रथ ॥ धनभांडारें अपरिमित ॥ राजसदनें भरलीं तीं ॥२०॥

किल्ले कोट दुर्ग विशाळ ॥ कौलबंगाल देश सबळ ॥ तया देशींचा तो नृपाळ ॥ तिलकचंद मिरविला ॥२१॥

एक लक्ष सहस्त्रशत लक्ष ॥ सबळ पृतनेचा असे दक्ष ॥ परी ती पृतना नव्हे प्रत्यक्ष ॥ काळ शत्रूचा मिरवतसे ॥२२॥

तया गृहीं ती चंपावती ॥ सासुरवासिनी परम युवती ॥ नणंदा जावा भावांप्रती ॥ देवांपरी मानीतसे ॥२३॥

परमप्रतापी गर्जत काळ ॥ सासुसासरे असती सबळ ॥ तेथेंही वृत्तांत समस्तां सकळ ॥ गोपीचंदाचा समजला ॥२४॥

समजला परी करिती टीका ॥ म्हणती अहा रे नपुंसका ॥ ऐसें राज्य सोडोनि लेकां ॥ भीक मागणें वरियेलें ॥२५॥

अहा मृत्यू आला जरी ॥ तरी भिक्षाझोळी न वंचावी करीं ॥ क्षत्रिय धर्मदाय शरीरीं ॥ भीक मागणें नसेचि ॥२६॥

अहा जन्मांत येऊनि काय केलें ॥ क्षात्रकुळा दूषण लाविलें ॥ आमुचे मुखासी काळें लाविलें ॥ पिशुन केलें जन्मांत ॥२७॥

म्हणतील सोयरा तुमचा कैसा ॥ नपुंसक झाला वेडापिसा ॥ वैभव टाकूनि देशोदेशा ॥ भीम मागे घरोघरीं ॥२८॥

तो जन्मतांचि कां नाहीं मेला ॥ क्षत्रियकुळातें डाग लाविला ॥ आतां स्वमुखा दाविणें कशाला ॥ श्लाघ्य दिसेना आमुतें ॥२९॥

ऐसें आतां बहुतां रीती ॥ लोक निंदितील आम्हांप्रती ॥ अहा कैसी ती मैनावती ॥ सुत दवडिला तिनें हा ॥३०॥

अहा पुत्रा देऊनि देशवटा ॥ आपण बैसली राजपटा ॥ जालिंदर हातीं धरुनि गोमटा ॥ भ्रष्ट केलें राज्यासी ॥३१॥

श्रेया सांडूनि रत्नवाटी ॥ हातीं घेतली कैसी नरोटी ॥ कनक टाकूनि चिंधुटी ॥ भाळी बांधी प्रीतीनें ॥३२॥

अहा जालिंदर कोणता निका ॥ भिकार वाईट मिरवे लोकां ॥ हातीं धरिला समूळ रोडका ॥ डोई बोडका शिखानष्ट ॥३३॥

ऐसियाच्या लागूनि ध्यानीं ॥ घरासि लाविला आपुल्या अग्नी ॥ आतां काळें तोंड करुनी ॥ जगामाजी मिरवतसे ॥३४॥

अहा माय नव्हे ती लांब म्हणावी ॥ स्वसुत जिनें केला गोसावी ॥ लट्टाश्रमाच्या लागूनि पायीं ॥ विघ्न आणिलें राज्यांत ॥३५॥

आतां कोण तिचा बाप ॥ उभा राहिला बलाढ्य भूप ॥ राज्य हरुनि खटाटोप ॥ देशोधडी लावील कीं ॥३६॥

ऐसी वल्गना बहुत रीतीं ॥ एकमेक स्वमुखें करिती ॥ तें ऐकूनि चंपावती ॥ क्षीण चित्तीं होतसे ॥३७॥

मनींच्या मनीं आठवूनि गुण ॥ बंधूसाठीं करी रुदन ॥ नणंदा जावा विशाळ बाण ॥ हदयालागीं खोंचिती ॥३८॥

म्हणती भावानें उजेड केला ॥ कीर्तिध्वज उभारिला ॥ राज्य सांडूनि हात भिकेल ॥ ओढवितो लोकांसीं ॥३९॥

मायबंधूंनी दिवटा लाविला ॥ तिहीं लोकीं उजेड केला ॥ आतां उजेड इचा उरला ॥ हेही करील तैसेंचि ॥४०॥

अहा माय ती हो रांड ॥ जगीं ओढविलें भांड ॥ आतां जगीं काळें तोंड ॥ करुनियां मिरवते ॥४१॥

ऐसे दुःखाचे देती घाव ॥ हदयीं खोंचूनि करिती ठाव ॥ बोलणें होतसे शस्त्रगौरव ॥ दुःख विषमारापरी ॥४२॥

येरीकडे गोपीचंद ॥ पाहता पाहातां ग्रामवृंद ॥ पौलपट्टणीं येऊन शुद्ध ॥ पाणवठी बैसला ॥४३॥

हस्तें काढूनि शिंगीनाद ॥ वाचे सांगत हरिगोविंद ॥ परी स्वरुपामाजी प्रतापवृंद ॥ झांकला तो जाईना ॥४४॥

कीं अर्कावरी अभ्र तेवीं तो नृपनाथ ॥ पाणवठ्यातें विराजत ॥ तों परिचारिका अकस्मात ॥ चंपावतीच्या पातल्या ॥४६॥

त्यांनीं येतांचि देखिला नयनीं ॥ देखतांचि राव ओळखिला चिन्हीं ॥ मग त्या तैशाचि परतोनी ॥ राजसदना पैं गेल्या ॥४७॥

सहराया सकळांसी ॥ वृत्तांत सांगती त्या युवतींसी ॥ कीं गोपीचंद पाणवठ्यासी ॥ येवोनियां बैसला ॥४८॥

ऐसा वृत्तांत रायें ऐकून ॥ मग चित्तीं झाला क्षीण ॥ म्हणे मुखासी काळें लावून ॥ आमुचे गांवीं कां आला ॥४९॥

आला परी लोकांत ॥ करील आमुची अपकीर्त ॥ संचरोनि पट्टणांत ॥ भीक मागेल गृहोगृहीं ॥५०॥

लोक म्हणतील अमक्याच्या अमुक ॥ घरोघरीं मागतो भीक ॥ काळें करुनि आमुचें मुख ॥ जाईल मग पुढारां ॥५१॥

अहा राया ऐसें करणें होतें ॥ तरी कासया आलासी येथें ॥ स्वदेशीं चोरोनियां गुप्त ॥ भीक मागावी सुखानें ॥५२॥

सकळ राजसदनींचीं माणसें ॥ वेडाळपणीं बोलती त्यास ॥ तिलकचंद येऊनि त्या समयास ॥ गृहमनुष्यां सांगतसे ॥५३॥

म्हणे आतां गोपीचंद ॥ भीक मागेल गांवांत प्रसिद्ध ॥ परी जगांत आपुलें नांव शुद्ध ॥ अपकीर्ति मिरवेल ॥५४॥

तरी आतां पाचारुन ॥ अश्वशाळेंत ठेवा आणून ॥ तेथें तयातें घालूनि भोजन ॥ बोळवावें येथून ॥५५॥

ऐसें सांगूनि नृपें सर्वाला ॥ राव सभास्थानीं गेला ॥ येरीकडे परिचारिला ॥ पाठविलें बोलावूं ॥५६॥

परिचारिका जाऊनि तेथें ॥ म्हणती महाराजा नृपनाथें ॥ बोलाविले आहे तुम्हांतें ॥ चंपावतीचे भेटीसी ॥५७॥

राव म्हणे आम्ही गोसावी ॥ आम्हां कैंची भगिनी ताई माई ॥ घरघर बाप घरघर बाप घरघर आई ॥ भरला असे विश्वातें ॥५८॥

परी आतां असो चंपावती ॥ बोलावीतसे आम्हाप्रती ॥ तरी भेटोनि तिये युवती ॥ पुढें मार्ग क्रमावा ॥५९॥

ऐसें म्हणोनि परिचारिकांसहित ॥ चालता झाला नृपनाथ ॥ परिचारिका पश्चिम द्वारांत ॥ त्यासी घेवोनि जाताती ॥६०॥

अश्वशाळेमाजी नेवोन ॥ बैसविला राजनंदन ॥ परिचारिका म्हणती येथें ॥ धाडून देऊं चंपावतीतें ॥६१॥

तुम्ही बैसलां तैसेंचि बैसावें ॥ भेटीसी येतील येथें सर्व ॥ ऐसा परिचारिका दावूनि भाव ॥ सदनामाजी संचरल्या ॥६२॥

सकळांसी सांगितला वृत्तांत ॥ कीं राव बैसविला अश्वशाळेंत ॥ मग राजकांतेनें त्वरित ॥ अन्नपात्र भरियले ॥६३॥

तरुणपणाजोगें पात्र भरोन ॥ परिचारिकेकरीं शीघ्र ओपून ॥ धाडिती झाली नितंबिन ॥ अश्वशाळेंत तत्त्वतां ॥६४॥

तंव ती परिचारिका घेवोनि अन्न ॥ अश्वशाळेत आली लगबग करोन ॥ म्हणे महाराजा भोजना अन्न ॥ पाठविलें तुम्हासी ॥६५॥

तें पात्र पुढें ठेवोन ॥ मग परिचारिका म्हणे करा भोजन ॥ भोजन झालिया भेटीकारण ॥ चंपावती येईल कीं ॥६६॥

राव विचार करी मानसीं ॥ अहा आदर आहे संपतीसी ॥ व्याही विहिणी खाथासी ॥ संपत्तीसी मिळताती ॥६७॥

तरी आतां असो कैसें ॥ आपण घेतला आहे संन्यास ॥ शत्रुमित्र सुखदुःखास ॥ समानापरी लेखावे ॥६८॥

तरी मानापमान उभे राहटें ॥ हे प्रपंचाची मिरवे कोटी ॥ तरी ऐसियासी आधीं कष्टी ॥ आपण कशास व्हावें हो ॥६९॥

मान अपमान दोन्ही समान ॥ पाळिताती योगीजन ॥ ऐसेपरी लक्षूनि मन ॥ भोजनातें बैसला ॥७०॥

मनांत म्हणे चैतन्यब्रह्म ॥ तयाचें जीवन हें अन्नब्रह्म ॥ स्वरुपब्रह्मींचें जीवनब्रह्म ॥ नामब्रह्म मिरवीतसे ॥७१॥

तरी अन्नब्रह्म धिक्कारुन ॥ मग कैंचे पाहावें सुखसंपन्न ॥ ऐसा विचार करुन ॥ भोजनातें बैसला ॥७२॥

येरीकडे अंतःपुरांत ॥ स्त्रिया निघोनि गवाक्षद्वारांत जीवनब्रह्म ॥ पाहती नृपनाथ नेत्रीं दीक्षा पाहती ॥७३॥

मग ऐकेकी बोलती वचन ॥ अहा हें काय निर्लज्जपण ॥ सोयरियावरीं अश्वशाळेंत बैसोन ॥ भोजन करितो करंटा ॥७४॥

एक म्हणती चंपावतीसी ॥ वेगें आणावी या ठायासी ॥ ऐकोनि नणंदेनें त्वरेंसीं ॥ धांव घेतली तिजपासीं ॥७५॥

हस्तीं धरुनि चंपावतीसी ॥ वेगें मेळीं आणिले निगुतीसी ॥ मग हस्त उचलोनि तियेसी ॥ रयातें दाविल्या जाहल्या ॥७६॥

तीस घेवोनि शेजारासी ॥ पाहुती गवाक्षद्वारासी ॥ परी बोलू बोलती कुअक्षरासी ॥ नाम येवोनि बैसला ॥ अश्वशाळेमाझारी ॥७८॥

अहा जळो जळो याचें जिणें ॥ केवढें वैभव सोडून ॥ आतां हिंडतो दैन्यवाणा ॥ श्वानासमान घरोघरीं ॥७९॥

म्हणवीत होता प्रजानाथ ॥ काय मिळालें अधिक यांत ॥ भणंगासमान दिसे आम्हांत ॥ जैसा तस्कर धरियेला ॥८०॥

परी जैसें तैसें असो कैसें ॥ कासया आला सोयरेगृहास ॥ येवोनि बैसला अश्वशाळेस ॥ भोजन करितो निर्लज्ज ॥८१॥

ऐसें नानापरी युवती ॥ कीटकशब्दें वाखाणिती ॥ तें ऐकोनि चंपावती ॥ परम दुःखी झालीसे ॥८२॥

प्रथमचि चंपावती गोरटी ॥ बंधूतें पाहतां निजदृष्टीं ॥ परम झाली होती कष्टी ॥ दुःख तयाचें पाहोनी ॥८३॥

त्यावरी नणंदा जावा पिशुन ॥ दुःखलेशीं बोलती वचन ॥ परी शब्द नसती ते बाण ॥ हदयामाजी खडतरती ॥८४॥

तेणेंकरुनि विव्हळ झाली ॥ पश्चात्तापें परम तापली ॥ मग स्त्रीमंडळ सोडूनि वहिली ॥ सदना आली आपुल्या ॥८५॥

येतां झाली जीवित्वा उदार ॥ वेगें शस्त्र घेतलें खंजीर ॥ करीं कवळूनि क्षणें उदर ॥ फोडिती झाली बळानें ॥८६॥

खंजीर होतां उदरव्यक्त ॥ जठर फोडोनि बाहेर येत ॥ क्षणेंचि झाली प्राणरहित ॥ सदनीं रक्त मिरविलें ॥८७॥

येरीकडे अश्वशाळेंत ॥ परिचारिकेसी म्हणे नृपनाथ ॥ भेटवीं मातें चंपावतीस ॥ चल जाऊं दे आम्हासी ॥८८॥

येरी म्हणती त्या शुभाननी ॥ चंपावती सासुरवासिनी ॥ त्यावरी अश्वशाळेलागुनी ॥ कैसे येथें येईल ॥८९॥

परी आतां असो कैसे ॥ तुम्ही वस्तीस असा या रात्रीस ॥ आम्ही सांगूनि चंपावतीस ॥ गुप्तवेषें आणूं कीं ॥९०॥

ऐसें ऐकोनि राये वचन ॥ म्हणे राहीन आजिचा दिन ॥ तरी आतांचि जाऊन ॥ श्रुत करावें तियेसी ॥९१॥

अवश्य म्हणुनि शुभाननी ॥ आताचि सांगूं तियेलागुनी ॥ रात्रीमाजी येऊं घेऊनी ॥ भेटीलागीं महाराजा ॥९२॥

ऐसें बोलोनि त्या युवती ॥ पाहत्या झाल्या चंपावती ॥ तंव खंजीर खोवोनि पोटीं ॥ महीवरी पडलीसे ॥९३॥

तें पाहुनि शब्दकोल्हाळी ॥ धावती झाली स्त्रीमंडळी ॥ प्राणगत पाहतां बाळी ॥ एकचि कल्होळ माजविला ॥९४॥

रुधिराचें तळें सांचलें ॥ जठर अवघें बाहेर पडलें ॥ तें पाहोनि युवती वहिलें ॥ शंखध्वनि करिताती ॥९५॥

सासु सासरे भावे दीर ॥ पति नणंदा दाटल्या जावा चाकर ॥ म्हणती बंधूकरितां साचार ॥ उदार झाली चंपावती ॥९६॥

मग बोलूं नये तेंचि बोलती ॥ म्हणती अधम मंदमती ॥ कोणीकडूनि या क्षितीं ॥ दुष्ट नष्ट भ्रष्ट आला ॥९७॥

आपुल्या सदनीं अग्नि लाविला ॥ शेवटीं लावावया येथें आला ॥ तरी त्यातें बाहेर घाला ॥ मुख पाहों नका हो ॥९८॥

एक म्हणती तयाकरितां ॥ चंपावतीनें केली कर्तव्यता ॥ तरी तिच्यासमान त्याची अवस्था ॥ करोनि बोळवा तिजसंगें ॥९९॥

ऐसे नाना तर्ककुतर्क ॥ करोनि मारिती हंबरडा हांक ॥ एकचि कोल्हाळ करिती सकळिक ॥ अहा अहा म्हणोनी ॥१००॥

कोणी हंबरडा हाणिती बळें ॥ कोणी पिटिती वक्षःस्थळें ॥ कोणी महीं आपटिती भाळें ॥ मूर्च्छागत पडताती ॥१॥

कोणी आठवूनि रडती गुण ॥ कोणी रडताती चांगुलपण ॥ कोणी म्हणती दैवहीन ॥ भ्रतार असे इयेचा ॥२॥

कोणी म्हणती अब्रूवान ॥ चंपावती होती उत्तम ॥ निजबंधूचे क्लेश पाहोन ॥ दिधला प्राण लज्जेनें ॥३॥

एक म्हणे चंपावती ॥ किती वर्णावी गुणसंपत्ती ॥ मृगनयनी जैसा हस्ती ॥ स्त्रियांमाजी मिरवतसे ॥४॥

एक म्हणती सदा आनंदी असून ॥ पहात होतें हास्यवदन ॥ सदा हर्षित असे गमन ॥ हस्ती जेवीं पृतनेचा ॥५॥

एक म्हणे चांगुलपर्णी ॥ घरांत मिरवें जेवीं तरणी ॥ एक म्हणे वो शुभाननी ॥ किती मृदु कोकिळा ॥६॥

एक म्हणती सासुरवास ॥ असतां नाहीं झाली उदास ॥ ईश्वरतुल्य मानूनि पुरुषास ॥ शुश्रुषा करी वडिलांची ॥७॥

ऐसें म्हणोनि आक्रंदती ॥ अवघे एकचि कोल्हाळ करिती ॥ तो नाद अश्वशालेप्रती ॥ अकस्मात आदळला ॥८॥

अश्वशाळे गौडनाथ ॥ अश्वरक्षकालागीं पुसत ॥ एवढा कोल्हाळ कां सदनांत ॥ झाला आहे कळेना ॥९॥

परी तो सर्वांठायी बोभाट ॥ झाला आहे गांवांत प्रविष्ट ॥ कीं भावाकरितां अति कष्ट ॥ जीवित्वातें दवडिलें ॥११०॥

तें अश्वरक्षकांसी होतां श्रवण ॥ पुसतां सांगती वर्तमान ॥ म्हणती नाथा जीव राणीनें ॥ बंधूकारणें दीधला ॥११॥

नृप म्हणे रे कवण राणी ॥ कोण बंधू कवणस्थानीं ॥ येरु म्हणती ऐकिलें कानी ॥ चंपावती राणी ती ॥१२॥

तियेचा बंधु झाला पिसा ॥ सोडूनि गेला राजमांदुसा ॥ म्हणोनि वरोनि दुःखलेशा ॥ जीवित्व त्यागिलें रांडकीने ॥१३॥

येरु म्हणे बंधु कोण ॥ ते म्हणती त्रिलोकचंदनंदन ॥ गोपीचंद ऐसें नाम ॥ जगामाजी मिरवतसे ॥१४॥

ऐसें ऐकोनि नृपनाथ ॥ नयनीं लोटले अश्रुपात ॥ चित्तीं म्हणे वो बाई घात ॥ मजसाठीं कां केला ॥१५॥

मग चंपावतीचे आठवूनि गुण ॥ गोपीचंद मोहें करी रुदन ॥ अहा मजसाठीं दिधला प्राण ॥ हें अनुचित झालें हो ॥१६॥

तरी आतां महीवरती ॥ माझी झाली अपकीर्ती ॥ आणिक सोयरे दुःख चित्तीं ॥ मानितील बहुवस ॥१७॥

मी येथें आलों म्हणोन ॥ चंपावतीनें दिधला प्राण ॥ हें दुःखा होईल कारण ॥ विसर पडणार नाहीं कीं ॥१८॥

ऐसा विचार करी चित्तांत ॥ परी नयनीं लोटले अश्रुपात ॥ येरीकडे संस्कारासी प्रेत ॥ चितामही चालिलें ॥१९॥

गोपीचंदही प्रेत पाहून ॥ करीत चालिला सवें रुदन ॥ परी चित्त वेधलें कल्पनेकरुन ॥ अपकीर्ति अवघी जाहली ॥१२०॥

तरी आतां असो कैसें ॥ उठवावें स्वभगिनीसी ॥ आणि चमत्कार सोयर्‍यांसी ॥ दाखवावा प्रतापें ॥२१॥

आम्हीं जोग घेतला म्हणूनी ॥ तृणासमान मानिलें यांनीं ॥ तरी नाथपंथाची प्रतापकरणी ॥ निजदृष्टीं दावावी ॥२२॥

जैसा पार्वतीचा गोसावी ॥ परी दक्षें हेळितां तो जांवई ॥ जीवित्व हरुनि प्रताप महीं ॥ गाजविला तयानें ॥२३॥

कीं अष्टवक्र अष्टाबाळ ब्राह्मण ॥ कुरुप म्हणूनि केलें हेळण ॥ परी त्यानें प्रताप दाखवून ॥ विप्र मुक्त केले पैं ॥२४॥

कीं वामनरुप असतां सान ॥ बळीनें मानिलें तृणासमान ॥ परी आपुला प्रताप दाखवून ॥ पातालभुवनीं मिरविला ॥२५॥

कीं अगस्तीचा देह लहान ॥ अर्णवें मानिला तृण ॥ परी केशव म्हणतां नारायण ॥ आचमनातें उरला नसे ॥२६॥

कीं उदयतरुपोटीं ॥ लहान एकादशी गोरटी ॥ परी मृदुमान्या न सान दृष्टी ॥ पाहतां मृत्य वरियेला ॥२७॥

तो दशग्रीव राक्षसपाळ ॥ तृणतुल्य मानिला अनिलबाळ ॥ परी सकळ लंकेचा झाला काळ ॥ एकदांचि जाळिली ॥२८॥

तन्न्यायें आम्हां येथ ॥ झालें मानसन्मानरहित ॥ तरी आतां यांतें नाथपंथ ॥ निजदृष्टीं दाखवावा ॥२९॥

मग सहजस्थितीसवें ॥ स्मशानवटीं गेला राय ॥ प्रेतानिकट उभा राहे ॥ उभा राहूनि बोलतसे ॥१३०॥

म्हणे ऐका माझें वचन ॥ प्रेत करुं नका भस्म ॥ श्रीगुरु जालिंदर येथें आणून ॥ चंपावती उठवीन की ॥३१॥

अहा मी येथें समयीं असतां ॥ वायां जातसे भगिनी आतां ॥ मग व्यर्थ आचरुनि नाथपंथा ॥ सार्थक नाहीं मिरविलें ॥३२॥

कीं पाहा मातुळकुळ ॥ आस्तिकें रक्षिलें तपोबळें ॥ तेवीं येथें युवती निर्मळ ॥ चंपावती उठवीन मी ॥३३॥

कीं अहिरणी गुंतता हिरा ॥ हिरकणी काढी तया सत्वरा ॥ तेवीं येथें भगिनी सुंदरा ॥ चंपावती उठवीन मी ॥३४॥

कीं मोहरासवें सुत सगुण ॥ कदापि नव्हे भस्म ॥ तेवीं येथें सुमधुम ॥ चंपावती उठवीन मी ॥३५॥

ऐसें बोले सकळांकारणें ॥ परी अविश्वासी सकळ जन ॥ म्हणती मेलिया जीवित्व पूर्ण ॥ कदा काळी येईना ॥३६॥

कीं बाळल्या रुखालागी पाला ॥ आला ऐसा नाहीं ऐकिला ॥ हें तों न घडे कदा बोला ॥ धर्मनिष्ठ हा बोलतसे ॥३७॥

गोपीचंद म्हणे बोलतो सत्य ॥ परी मम गुरुचें प्रतापकृत्य ॥ वर्णन करितां सरस्वतीतें ॥ वाचा अपूर्ण मिरवतसे ॥३८॥

जेणें कानिफाचे अर्थालागुनी ॥ सकळ देव आणिले अवनीं ॥ आणिले परी पूर्णपणीं ॥ वृक्षालागी गोविलें ॥३९॥

सध्यां पहा रे मम प्रतापकरणी ॥ एकादश वर्षे गर्ती अवनीं ॥ अश्वविष्ठेंत राहिला मुनी ॥ प्रताप वर्णू केउता ॥१४०॥

तरी धैर्य धरुनि चार दिन ॥ करा प्रेताचें संगोपन ॥ श्रीजालिंदर येथें आणून ॥ उठवीन भगिनीसी ॥४१॥

परी न ऐकता अविश्वासी ॥ शुभा रचिल्या स्मशानमहीसी ॥ प्रेत ठेवूनि ते चितेसीं ॥ अग्नि लावूं म्हणताती ॥४२॥

तें पाहूनि गोपीचंद ॥ मग आपण चित्तेंत बैसूनि शुद्ध ॥ म्हणे अग्नि लावा प्रसिद्ध ॥ भस्म करा मजलागीं ॥४३॥

मी भस्म झालिया पोटीं ॥ मग क्रोध न आवरे जालिंदरजेठी ॥ नगर पालथें घालूनि शेवटीं ॥ तुम्हां भस्म करील कीं ॥४४॥

ऐसें बोलतां गोपीचंद वचन ॥ क्रोधें दाटला तिलकचंद पूर्ण ॥ म्हणे गुरुचा प्रताप वर्णून ॥ फुगीरपण मिरवतसे ॥४५॥

तरी आम्हां सांगतोसी ऐसें ॥ करुनि दावीं चमत्कारास ॥ येरी म्हणे उत्तरासरसें ॥ बोलेन तैसें घडेल ॥४६॥

येरी म्हणे वाम कर ॥ काढूनि देतों जाई सत्वर ॥ पाहूं दे गुरुचा चमत्कार ॥ प्रेत रक्षूं आम्ही हें ॥४७॥

येरी म्हणे फार फार बरवें ॥ चंपावतीचें प्रेत रक्षावें ॥ मी हस्त दावूनि गुरुते भाव ॥ उपजवीन प्रेमाचा ॥४८॥

तिलकचंद पुत्रा सांगोनी ॥ वाम कर तियेचा दे काढूनी ॥ गोपीचंद चितासनींहूनी ॥ उठवूनियां बोळविला ॥४९॥

नाथ गोपीचंद घेऊनि कर ॥ पुढें चालिला मार्गावर ॥ एक कोस येतां नृपवर ॥ काय केलें इकडे ॥१५०॥

चितेमाजी घालूनि प्रेत ॥ डावलूनि गेले सकळ आप्त ॥ येरीकडे नृपनाथ ॥ हेळापट्टणी चालिला ॥५१॥

मार्गी येतां पांच कोस ॥ परी हें कळलें जालिंदरास ॥ मनांत म्हणे नव्हे सुरस ॥ गोपीचंद आल्यानें ॥५२॥

पिशुन करितील विचक्षणा ॥ नानापरींची होईल वल्गना ॥ आणि बाळ पावेल शोकस्थाना ॥ आप्तजनांपुढती ॥५३॥

ऐसा विचार करुनि चित्तीं ॥ आपण चालिला कृपामूर्ती ॥ प्रयाळअस्त्र मंत्रविभूती ॥ चर्चूनियां निजभाळीं ॥५४॥

तरि ते प्रयाणअस्त्रमंत्र ॥ एकचि नैषधराजपुत्र ॥ जाणत होता अस्त्र पवित्र ॥ येरां माहीत नव्हतेंचि ॥५५॥

तें अस्त्र जालिंदरापासीं ॥ होतें अति उजळपणासीं ॥ प्रयाणभस्म लावितां बाळासी ॥ वातगती चालिला ॥५६॥

मग लोटतां एक निमिष ॥ धांवोनि आला शतकोश ॥ अकस्मात् गोपीचंदास ॥ निजदृष्टीनें देखिलें ॥५७॥

म्हणे वत्सा पुन्हां परतोन ॥ किमर्थ केलें आगमन ॥ चरणावरी भाळ ठेवोन ॥ वृत्तांत सर्व निवेदिला ॥५८॥

मग तो ऐकोनि वृत्तांत ॥ म्हणे तुझा मनोरथ सिद्ध करीन नृपनाथा ॥ नको करुं कांही चिंता ॥ पुनः फीर मागुता ॥५९॥

अवश्य म्हणोनि दोघे जण ॥ मार्गे करिते झाले गमन ॥ पौलपट्टणामाजी येवोन ॥ राजांगणीं संचरले ॥१६०॥

तंव ते आप्तांसहित मेळा ॥ घालूनि बैसले होते पाळा ॥ विव्हळ चित्तीं नाना बरळा ॥ रुदनशब्दें बोलती ॥६१॥

तों अकस्मात् देखिले द्वयनाथ ॥ महातपी दर्शनयुक्त ॥ देखतांचि तिलकचंद यथार्थ ॥ धाव पुढें घेतसे ॥६२॥

परमभक्ती करोनियां नमन ॥ त्वरें आणूनि कनकासन ॥ त्यावरी बैसवोनि अग्निनंदन ॥ पुढें उभा राहिला ॥६३॥

परी तो नमनादि आदर ॥ जैसा शठाचा शृंगार ॥ कीं ढिसाळपणीं ओस नगर ॥ तेवीं विनयभाव तो ॥६४॥

कीं अजाकंठींचे लंबस्तन ॥ कीं गारोडियाचें शूरत्व पूर्ण ॥ कीं वेश्येचें मुखमंडन ॥ तेवीं आदर नृपाचा ॥६५॥

कीं घटामाजी जैसा अर्क ॥ कीं हिंबराची सावली शीतळ देख ॥ कीं पिशाचबोलणें न सत्यवाक ॥ तेवीं दावी विनयभावातें ॥६६॥

कीं वृंदावनाचें गोमटें फळ ॥ कीं अर्कवृक्षी लोंबलें केळ ॥ कीं मैंदाचे गळां माळ ॥ तेवी विनयभावातें ॥६७॥

कीं बकाचें दिसे शुद्ध ध्यान ॥ परी अंतरी घोकीत वेंचीन मीन ॥ कीं तस्कराचें मौनसाधन ॥ तेवीं विनयभावातें ॥६८॥

कीं अर्थसाधक श्रोता पूर्ण ॥ परी घातें वेगे घेणार प्राण ॥ तयाचें रसाळ भाषण ॥ दावी विनयभावातें ॥६९॥

कीं गोरक्षकाचें ऊर्ध्वगायन ॥ तेथें कैंचें पहावें तानमान ॥ तेवीं त्या राजाचा सन्मान ॥ दावी विनयभावातें ॥१७०॥

कीं उदधीचें द्रोणांत जळ ॥ कीं कनकतुल्य पिवळा पितळ ॥ कीं विनयाची गोडी बहुरसाळ ॥ तेवीं विनयभावातें ॥७१॥

कीं घररिघेचे सवाष्णपण ॥ कीं भोंद्याचें देवतार्चन ॥ कीं म्हशाचें गण्या नाम ॥ तेवीं विनयभावातें ॥७२॥

तन्न्यायें तो नृपती ॥ तिलकचंद उभा भक्तीं ॥ परी भावना सकळ नाथाप्रती ॥ कळूनि आली तयाची ॥७३॥

म्हणे राया चंपावती ॥ ज्ञानकळा सगुण युवती ॥ ऐसी जाया गृहाप्रती ॥ साजेल मातें दिसेना ॥७४॥

जैसी शिवसाळुंका सुरगणीं ॥ परी ती स्थापावी खडकीं नेऊनी ॥ तेवीं सत्य या सदनीं ॥ चंपावती साजेना ॥७५॥

गर्दभा काय चंदनलेप ॥ मर्कट व्यर्थ गीर्वाण भाष उमोप ॥ वायसा जाण कनकपिंजरुप ॥ कदाकाळीं घडेना ॥७६॥

तन्न्यायें चंपावती ॥ तुझे गृहीं असे युवती ॥ जैसी मैंदगृहा वसती ॥ मनहीन मिरवतसे ॥७७॥

परी आतां असो कैसें ॥ काय करावें ब्रह्मतंत्रास ॥ मग पाहूनि गोपीचंदवक्त्रास ॥ हस्त देई म्हणतसे ॥७८॥

मग हस्त काढूनि दृष्टी ॥ देता झाला करसंपुटी ॥ शव जाणूनि पोटीं ॥ उच्चार न करी रायातें ॥७९॥

मग कवळूनि भस्मचिमुटी ॥ मंत्रप्रयोग बोले होटीं ॥ सकळ संजीवनीची राहटी ॥ प्रोक्षीतसे भुजातें ॥१८०॥

भस्म भुजेसी होतां सिंचन ॥ हांक मारीत तयेकारण ॥ हांकेसरशी त्वरें उठोन ॥ चरणीं माथा ठेवीतसे ॥८१॥

अहा जाज्वल्य संजीवनी ॥ क्षणांत उठली राजपत्नी ॥ जैसा शुक्रें कच मुखांतूनी ॥ दोन वेळां उठविला ॥८२॥

तोचि न्याय येथें झाला ॥ सकळांलागीं भाव ठसला ॥ अहा जालिंदरनाथ भला ॥ पूर्ण ब्रह्म म्हणवूनी ॥८३॥

मग लागवेगें सकळ उठूनी ॥ श्रीनाथाच्या लोटले चरणीं ॥ म्हणती अपार केली करणी ॥ शुक्र प्रत्यक्ष कलीचा हा ॥८४॥

मग समस्त म्हणती फार अपूर्व ॥ कौतुक दावी गोपीचंदराव ॥ धनसंपत्तीतें काय करावें ॥ टाकूनि जावें सर्वस्वी ॥८५॥

मग सर्व जग बोले राया भलें ॥ पश्चात्तापें पूर्ण तापलें ॥ परी तें स्मशानवैराग्य ठेलें ॥ पुन्हां जैसें तैसेंचि ॥८६॥

कीं करी आव्हानिला अति निर्मळ ॥ परि सर्वेंचि गंधमोरी लोळे ॥ उकिरड्यांत उतावेळ ॥ विष्ठाभक्षण आवडतसे ॥८७॥

तन्न्यायें सर्व लोक ॥ बोलती पश्चात्तापें दोदिक ॥ परी त्यांचा सुटे न भोगितां नरक ॥ प्रारब्धयोग तयांचा ॥८८॥

असो ऐसी प्रारब्धकरणी ॥ श्रीजालिंदर जाय उठवूनि ॥ मग उठता झाला कनकासनीं ॥ हेळापट्टणीं जावया ॥८९॥

मग तो तिलकचंद नृपती ॥ अभिमान दवडूनि झाला गलती ॥ सलीलपणीं पदावरती ॥ मस्तक ठेवी सप्रेम ॥१९०॥

म्हणे महाराजा मी पतित ॥ राजवैभवें झालों उन्मत्त ॥ लघु मानिला गोपीचंदनाथ ॥ तरी क्षमेंतें वरीं आतां ॥९१॥

तुम्ही दयाळू कनवाळू संत ॥ मायेडूनि मायावंत ॥ तरी बाळाचे अन्याय यथार्थ ॥ उदरामाजी सांठवा ॥९२॥

ऐसें बोलूनि नम्रोत्तर ॥ चरणीं मौळी वारंवार ॥ ठेवूनि म्हणे आजची रात्र ॥ वस्ती करा या ठायीं ॥९३॥

ऐसें ऐकूनि तयाचें वचन ॥ बोलता झाला अग्निनंदन ॥ चंपावतांचे हस्तकरुन ॥ पाकनिष्पत्ती करीं कां ॥९४॥

अवश्य म्हणूनि तिलकचंद ॥ चंपावतीसी सांगे सदगद ॥ तीतें सांगूनि पाक प्रसिद्ध ॥ करविला नेटका ॥९५॥

मग चंपावती भ्रतारासहित ॥ बैसविली स्वपंक्तींत ॥ आपुला अनुग्रह देऊनि तीतें ॥ नाथपंथीं मिरविली ॥९६॥

आपुलें मुखींचा उच्छिष्ट ग्रास ॥ संजीवनीप्रयोगप्रसादास ॥ देऊनि केलें अमरपणास ॥ मैनावतांपरी सिंचिली ॥९७॥

ऐसे रीतीं सारुनि भोजन ॥ विडे घेतले त्रयोदशगुण ॥ राया तिलकचंदा भाषण ॥ करिता झाला मुनिराज ॥९८॥

म्हणे ऐक बा सर्वज्ञराशी ॥ गोपीचंद जातो पूर्ण तपासी ॥ तरी सांभाळीं याचे राज्यपदासी ॥ बाळ अज्ञान असे याचें ॥९९॥

तुझा प्रताप महीतें संपूर्ण ॥ शत्रु न येती तेणेंकरुन ॥ मीही येथें षण्मास राहुन ॥ सर्व अर्थ पुरवीन कीं ॥२००॥

परी राया षण्मासांसाठीं ॥ मीही जाईन तीर्थलोटीं ॥ परी मुक्तचंद पडतां संकटीं ॥ धांव घालीं तूं येथें ॥१॥

ऐसें बोलतां अग्निसुत ॥ अवश्य बोले तो नृपनाथ ॥ यावरी राहुनि एक रात्र ॥ निघते झाले उभयतां ॥२॥

करोनि जालिंदरा नमन ॥ गोपीचंद करिता झाला गमन ॥ जालिंदरही मार्ग धरोन ॥ हेळापट्टणी चालिला ॥३॥

तिलकचंद नृपनाथा ॥ बोळवोनि आला स्वगृहांत ॥ येरीकडे मैनावतीसुत ॥ मुक्काम मुक्काम साधीतसे ॥४॥

ऐसिया राहणीं मार्ग क्रमोनी ॥ राव गेला बद्रिकाश्रमीं ॥ बद्रिकेदार भावें नमोनी ॥ तपालागीं बैसला ॥५॥

लोहकंटकीं पादांगुष्ठ ॥ ठेवोनि तप करी वरिष्ठ ॥ येरीकडे जालिंदर वाटे ॥ येवोनियां पाहोंचला ॥६॥

तेथें राहूनि षण्मास प्रीतीं ॥ मुक्तचंद उपदेशोनि अर्थाअर्थी ॥ कानिफासह शिष्यकटकाप्रती ॥ घेवोनियां चालिला ॥७॥

नाना तीर्थे करी भ्रमण ॥ द्वादश वर्षे गेलीं लोटोन ॥ शेवटीं बद्रिकाश्रम पाहोन ॥ गोपीचंद भेटला ॥८॥

मग तैं तपाचा उचित अर्थ ॥ उद्यापना देव समस्त ॥ पाचारोनि स्वर्गस्थ ॥ गौरविले आदरानें ॥९॥

महाविष्णु महेश सविता ॥ अश्विनी वरुण अमरनाथा ॥ भेटवोनि समस्त दैवतां ॥ सनाथपणीं मिरवला ॥२१०॥

सकळ विद्येचा समारंभभार ॥ अभ्यासविला तो नृपवर ॥ पुन्हां दैवतां आणोनि सत्वर ॥ वरालागीं ओपिलें ॥११॥

असो येथोनि गोपीचंदाख्यान ॥ संपलें पुढें करा श्रवण ॥ श्रीगोरक्ष स्त्रीराज्याकारणें ॥ जाईल गुरु आणावया ॥१२॥

तरी आतां अत्यदभुत ॥ श्रोत्यां सांगेल धुंडीसुत ॥ मालू ऐसें नाम ज्यातें ॥ नरहरिवंशीं मिरवलें ॥१३॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ अष्टादशाध्याय गोड हा ॥२१४॥

॥ नवनाथभक्तिसार अष्टादशाध्याय समाप्त ॥


श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय १९

श्रीगणेशाय नमः

जयजयाजी जगदगुरुराजा ॥ सर्वज्ञ विजयभोजा ॥ भवाब्धी भवसरिते काजा ॥ साधका नौका अससी तूं ॥१॥

हे पूर्णब्रह्मानंदकंदा ॥ पुढें बोलवीं भक्ती अतिमोदा ॥ तुझी लीला अगाधा ॥ भक्तिसारग्रंथातें ॥२॥

मागिले अध्यायीं वदविलें गहन ॥ गोपीचंदाचें उदार कथन ॥ बद्रिकाश्रमीं तप करुन ॥ तीर्थाटनीं निघाला ॥३॥

याउपरी ऐकिजे श्रोतीं ॥ सिंहावलोकनीं विश्रांती ॥ गोरक्ष कानिफाचे युक्ती ॥ स्त्रीराज्यांत जातसे ॥४॥

मार्गी चालतां मुक्कामोमुक्काम ॥ सदा श्रीगुरुचें आठवी नाम ॥ ग्रामांत करुनि भिक्षाटन ॥ पुढें मार्ग क्रमीतसे ॥५॥

ऐसिया स्थिती गौडबंगाल ॥ सांडूनि सांडिला बंगालकौल ॥ पुढें जात स्त्रीराज्यांत वहिला ॥ सीमेपर्यंत पातला ॥६॥

परी विचारी स्वमनांत ॥ श्रीगुरुराज आहेत तेथ ॥ राज्यवैभव बहु सामर्थ्य ॥ संपत्तीचे मिरवतसे ॥७॥

ऐसें वैभवमानी सुखप्रकरणीं ॥ मातें ओळखील कैसा कोणी ॥ श्रीमंतापुढें हीनदीन ॥ मान्यत्वातें मिरवेना ॥८॥

जेवीं अर्कापुढें खद्योत ॥ हीन दीन अति दिसत ॥ तेवीं मज कंगालवंताते ॥ कोण तेथें ओळखतील ॥९॥

मेरुपुढें मशकस्थिती ॥ कोणें वर्णावी कवण अर्थी ॥ कीं पुढें बैसल्या वाचस्पती ॥ मैंद वल्गना मिरवीना ॥१०॥

कीं हिरातेजपडिपाडा ॥ गार ठेवूनि पुढां ॥ परीसपालटा देतां दगडा ॥ योग्यायोग्य साजेना ॥११॥

सुवर्ण मिरवे राशी सोळा ॥ तेथें दगडाचा पाड केतुला ॥ तेवीं मातें संपत्ती मिरवला ॥ ओळखील कैसा तो ॥१२॥

असो याउपरी दुसरे अर्थी ॥ मम नाम कळतां मच्छिंद्राप्रती ॥ परम द्वाड लागेल चित्तीं ॥ सुखसंपत्ती भोगितां ॥१३॥

जैसें जेवितां षड्रस अन्न ॥ तैं कडुवट सेवी कोण ॥ तेवीं मच्छिंद्र संपत्तीचें टाकून ॥ जाईल कैसा वैरागी ॥१४॥

यापरी आणि अर्था ॥ मम नाम श्रीगुरुलागीं कळतां ॥ नेणों कल्पना वरुन चित्ता ॥ वर्तेल घाता माझिया ॥१५॥

मग तयाच्या सवें विद्यारळी ॥ करावी आपण बांधूनि कळी ॥ हें तों गोड येणें काळीं ॥ मजप्रती भासेना ॥१६॥

ज्या स्वामीचे वंदितों चरण ॥ तयासीं विद्येची रळी खेळेन ॥ हें योग्य मातें नव्हे जाण ॥ अपकीर्ति ब्रह्मांडभरी ॥१७॥

ऐसे तर्कवितर्क करितां ॥ श्रीगोरक्ष मार्गी रमतां ॥ तों वेश्याकटक देखिलें तत्त्वतां ॥ स्त्रीराज्यांत जाती त्या ॥१८॥

तों सकळ वेश्यांची मुख्य कामिनी ॥ गुणभरिता कलिंगानाम्नीं ॥ तिचें स्वरुप वर्णितां वाणी ॥ रतिपति आतळेना ॥१९॥

जिचें पाहतां मुखकमळ ॥ शशितेजाहूनि अति निर्मळ ॥ परम लज्जित चपळा केवळ ॥ होऊनि ढगीं रिघताती ॥२०॥

जिचा नेत्रकटाक्षबाण ॥ तपस्व्यांचें वेधीत मन ॥ मग विषयें लंपट अपार जाण ॥ कवण अर्थी वर्णावे ॥२१॥

ऐसियेपरी सुलक्षण दारा ॥ चातुर्यकलिका गुणगंभीरा ॥ जिचे नाम साजोतरा ॥ कीं हिरा गारा मिरवती ॥२२॥

जिचे सुस्वर विपुल गायन ॥ ऐकतां खालती गंधर्व करिती मान ॥ अप्सरा परम लज्जित होऊन ॥ सेवा इच्छिती जियेची ॥२३॥

ऐशापरी ती कलिंगदारा ॥ जात स्त्रीदेशांत अवसरा ॥ तैं अवचित तीतें गोरक्ष उदारा ॥ देखता झाला निजदृष्टीं ॥२४॥

मग तो जवळा योगद्रुम ॥ जाऊनि पुसे तियेचें नाम ॥ येरी म्हणे कलिंगा उत्तम ॥ नाम असे या देहा ॥२५॥

येरु म्हणे कवणार्थी ॥ जातां कोणत्या ग्रामाप्रती ॥ कलिंगा म्हणे स्त्रीदेशाप्रती ॥ जाणें आहे आमुतें ॥२६॥

राव मैनाकिनी पद्मिनी ॥ सकळ स्त्रियां देशस्वामिनी ॥ तियेतें नृत्यकळा दावूनी ॥ वश्य करणें आहे जी ॥२७॥

ती राजपद्मिनी वश्य होतां ॥ अपार देईल आमुतें वित्ता ॥ यापरी कामना योजूनि चित्ता ॥ गमन करितों आम्ही कीं ॥२८॥

ऐसा वृत्तांत ऐकूनि युवतीं ॥ हदयी विचारी योगपती ॥ कीं इचीच शुद्ध धरुनि संगती ॥ प्रविष्ट व्हावें त्या स्थानीं ॥२९॥

मग सहजस्थितीनें गमना ॥ आव्हानूनि दृष्टीं राजसदना ॥ गुप्तवेषें श्रीगुरुकामना ॥ अवगमूनि घ्यावी तों ॥३०॥

ऐसा विचार करुनि चित्तीं ॥ बोलता झाला तिये युवती ॥ म्हणे मी येतों तुमच्या संगतीं ॥ न्याल तरी कीं कृपेनें ॥३१॥

येरी म्हणे नरेंद्रोत्तमा ॥ येऊं पाहसी संगतीं आम्हां ॥ तरी कुशळपणीं काय तुम्हां ॥ भोंवरिली विद्या जे ॥३२॥

येरु म्हणे करुनि गायन ॥ तुम्हांसवें चातुर्य मानून ॥ आणि मृदंगवाद्य वाजवीत ॥ कुशळपणें नेटका ॥३३॥

येरी म्हणे गाणें वाजविणें ॥ येतसे चातुर्यवाणें ॥ तरी प्रथमारंभीं आम्हां दाविणें ॥ कैसे रीतीं कुशळत्व ॥३४॥

येरु म्हणे जी काय उशीर ॥ आतांचि पहावा चमत्कार ॥ हातकंकणा आदर्शव्यवहार ॥ कामया पाहिजे दृष्टीतें ॥३५॥

कीं स्पर्शतां शुद्ध अमरपण ॥ होय न होय केलिया पान ॥ कीं स्पर्शिल्या परिसोन ॥ न होय भ्रांती मिरवेल काय ॥३६॥

तरी आतां या ठायीं ॥ मम विद्येची परीक्षा घ्यावी ॥ ऐसें ऐकतांचि कलिंगा महीं ॥ सदनाहूनि उतरली ॥३७॥

महींतळीं घालूनि आसन ॥ सारंगी देत आणून ॥ म्हणे नवरसे कुशळत्वपण ॥ कळा दावी कोणती ॥३८॥

ऐसी ऐकून तियेची गोष्टी ॥ करीं कवळूनि भस्मचिमुटी ॥ गंधर्वप्रयोग होटीं ॥ जल्पूनि भाळीं चर्चीतसे ॥३९॥

चर्चूनि दाही दिशा प्रेरीतसे ॥ आणि चतुर्थवाद्यातें स्पर्शीतसे ॥ ऐसें झालिया हुंकार देतसे ॥ गावें वाजवावें म्हणूनियां ॥४०॥

तरी कामनीं तरु पाषाण ॥ जल्पती गंधर्वासारखें गायन ॥ तंतवितंत सुस्वरी वादन ॥ वाजवी वाद्य चतुर्थ हो ॥४१॥

आपुलें आपण वाद्य वाजवीती ॥ पाषाण तरु गायन करिती ॥ हें पाहूनि कलिंगा युवती ॥ आश्चर्य करी मानसीं ॥४२॥

स्वमुखीं ओपूनि मध्यमांगुळी ती ॥ विस्मय करी आपुल्या पोटीं ॥ चित्ती म्हणे हा नरधूर्जटी ॥ ईश्वरतुल्य भासतसे ॥४३॥

जो पाषाणतरुहातीं गायन ॥ करवीत गंधर्वां सरी आपण ॥ तयालागीं स्वतां गायन ॥ अशक्य काय करावया ॥४४॥

जो पाषाणी पिवळेपण ॥ करुं जाणे लोहाचें सुवर्ण ॥ तयालागीं परिसमणी ॥ करावया अशक्य म्हणावें कीं ॥४५॥

जेणें बुरट गौतमीकांसेखालीं ॥ सर्व पदार्थी मही उद्धरिली ॥ त्यातें कामधेनु निर्माया भली ॥ परम अशक्यता न बोलावी ॥४६॥

कीं कोणत्याही वृक्षाखालीं ॥ कामना पुरवी सकळी ॥ ते कल्पतरुमेळीं ॥ आनायासें शोभतसे ॥४७॥

तन्न्यायें वृक्षपाषाणीं ॥ आणिली ज्यानें गंधर्वमांडणी ॥ तो स्वतः सिद्ध कुशलपणीं ॥ गाणार नाहीं कां बोलावें ॥४८॥

तरी आतां असो कैसें ॥ आपणचि रहावें याचे संगतीस ॥ ऐसा विचार करुनि स्वचित्तास ॥ बोलती झाली विव्हळा ॥४९॥

म्हणे महाराजा सदगुणाकरिता ॥ मी दीन किंकर अनाथा ॥ ऐसा काम उदेला चित्ता ॥ तरी सिद्धार्थ आव्हानीं ॥५०॥

अगाध वर्णनाची सविताराशी ॥ दैवें उदेली मम तमगुणासी ॥ तरी संज्ञा जे बोलिलासी ॥ तोंचि सिद्ध आव्हानीं ॥५१॥

तरी महाराजा विद्यार्णवा ॥ जगीं मिरवसी कोणत्या भावा ॥ ऐसें पुसतां गोरक्ष जीवा ॥ परम कल्पना योजीतसे ॥५२॥

चित्तीं म्हणे नामाभिधान ॥ प्रविष्ट न करावें इजकारण ॥ गुप्त ठेविल्यास कार्य साधन ॥ घडूनि येईल पुढारां ॥५३॥

ऐसा विचार करुनी ॥ म्हणे ऐके शुभाननी ॥ पूर्वंडा मम देहालागुनी ॥ जगामाजी मिरवितसे ॥५४॥

येरी म्हणे पूर्वडराया ॥ अर्थकामना कोण हदया ॥ असेल तैसी वदूनियां ॥ सुखालागी हेलावें ॥५५॥

येरु म्हणे वो शुभाननी ॥ विषयघनाची बोलती कडसणी ॥ परी कांहीं कामना नसे मनीं ॥ अज्ञान असे या अर्थी ॥५६॥

एक वेळ उदरापुरती ॥ समया देई कां आहुती ॥ याविरहित अर्थ चित्तीं ॥ इच्छा नसे कांहीच ॥५७॥

येरी ऐकोनि ऐसें वचन ॥ अवश्य करी प्रेमें भाषण ॥ म्हणे महाराजा नरेंद्रा पूर्ण ॥ अर्थ पुरेल हा तुमचा ॥५८॥

परी एक आहे मम बोलणें ॥ स्त्रीराज्यांत आपण जाणें ॥ तेथें पुरुषाचें आगमन ॥ नाहीं त्या देशांत ॥५९॥

येरु म्हणे कवण अर्थी ॥ आगमन नसे तया देशाप्रती ॥ येरी म्हणे मरुतसुती ॥ भुभुःकारें स्त्रिया होती ॥६०॥

उर्ध्वरेती वायुनंदन ॥ रेत पडे भुभुःकारवचनें ॥ गरोदर होती तेणेंकरुन ॥ सकळ स्त्रिया त्या देशीं ॥६१॥

त्याची भुभुःकारें करुन ॥ पुरुषगर्भात होय पतन ॥ तेणेंकरुन तयांची मरण ॥ होतसे जाण महाराजा ॥६२॥

तरी तुझें जाणें उदेलें चित्तीं ॥ परी तूतें होईल कैसी गती ॥ या संशयाची भ्रांती ॥ मनीं घोटाळे माझिया ॥६३॥

येरु म्हणे ऐक युवती ॥ काय करील आम्हां मारुती ॥ प्रळयकाळींची मूध्नीं हरती ॥ लोळवीन महीतें ॥६४॥

अगे तीव्रतपाचा तपोजेठी ॥ जेणें सविता गिळोनि ठेविला पोटीं ॥ तेथें दीपाची हळहळ मोठी ॥ मानील काय तो पुरुष ॥६५॥

सकळ मही जो माथां वाहे ॥ त्यातें पर्वताचें भय काय ॥ अब्धी गिळितां शरण रिघावें ॥ काय वेगें थिल्लारा ॥६६॥

तरी आतां शुभाननी ॥ हा संशय तूं न आणीं मनीं ॥ ऐसें गोरक्ष तीतें बोलोनी ॥ ते स्थानाहोनि उठला ॥६७॥

मग ती कलिंगा बैसवूनि रथीं ॥ आपण झाले पुढें सारथी ॥ दोन्ही बाग्दोरे धरुनि हातीं ॥ धुरा वेष्टूनियां बैसलासे ॥६८॥

परी प्रथमारंभीं तो धूर्जटी ॥ करीं कवळूनि भस्मचिमुटी ॥ वज्रास्त्र मंत्रहोटी ॥ अपारशक्ती जल्पला ॥६९॥

तया मागें स्पर्शमंत्रा ॥ जल्पोनियां निजवक्त्रा ॥ तेही मिरवे सबळ अस्त्रा ॥ महीलागीं महाराजा ॥७०॥

यावरी तिसरें मोहनास्त्र ॥ विराजलें अति पवित्र ॥ उपरी चवथें नागास्त्र ॥ सीमेवरी तें प्रेरिलें ॥७१॥

ऐसे चतुर्थास्त्र प्रेरुन ॥ चालता झाला गोरक्ष त्वरेनें ॥ सीमा उल्लंघूनि एक योजन ॥ स्त्रीदेशांत मिसळला ॥७२॥

चिनापट्टण उत्तम ग्राम ॥ तेथें झालासे मुक्काम ॥ तंव लोटूनि गेला अवघा दिन ॥ महीं निशा दाटली ॥७३॥

परी दिनासमान रात्री ॥ चंद्रतेजें मिरवली होती ॥ सकळी भोजनें सारुनि निगुतीं ॥ पहुडलीं शयनीं आपुल्याला ॥७४॥

निशा लोटली एक प्रहर ॥ तों रात्री निवळली महीवर ॥ सकळ लोपूनि अंधकार ॥ दिशा उजेडें उजळली ॥७५॥

ते दिनींची म्हणूं नये रात्री ॥ कीं उदया आली माया भगवती ॥ चंद्रपोत घेऊनि हाती ॥ सहजमती क्रीडतसे ॥७६॥

कीं ते रात्र नव्हे जडितपदक ॥ हेमतगटी अवनी देख ॥ त्यावरी नक्षत्रें अन्य माणिक ॥ मध्यें हिराबिंदु शोभे जैसा ॥७७॥

कीं ते रात्र नव्हे भद्रकाळी ॥ शृंगारनक्षत्रें मुक्तमाळी ॥ चंद्रबिजवरा लेवूनि माळीं ॥ महीलागीं क्रीडातसे ॥७८॥

ऐसियेपरी सुलक्षण राती ॥ उजेड दावी महीवरती ॥ तो येरीकडे गमन मारुती ॥ सेतूहूनि करीतसे ॥७९॥

मार्गी जातां सहजस्थितीं ॥ येवोनि पोंचला सीमेवरती ॥ तों वज्रास्त्र हदयाप्रती ॥ येवोनियां आदळलें ॥८०॥

परी वज्रशरीरी मारुती ॥ वज्रप्रहारें पडला क्षितीं ॥ मूर्च्छा दाटोनि हदयाप्रती ॥ विगतगति पडलासे ॥८१॥

यावरी स्पर्श करी झगटीं ॥ लिप्त केला महीपाठीं ॥ त्यावरी मोहनास्त्र हदयपुटीं ॥ जाऊनियां संचरलें ॥८२॥

त्यावरी नागास्त्रनागपती ॥ सहस्त्रफणी प्रत्यक्षमूर्ती ॥ उदय पावतां पदहस्तीं ॥ गुंडाळूनिया बैसला ॥८३॥

चतुर्थास्त्राचें पडतां वेष्टन ॥ मग कासावीस होतसे वायुनंदन ॥ अति तळमळे उडायाकारण ॥ परी तेजास्त्र उठों नेदी ॥८४॥

घडोघडी मूर्च्छा येतां ॥ नेत्र भोवंडी वांती देतां ॥ त्यावरी विखार वेष्टितां ॥ तेणें होत कासाविसी ॥८५॥

मोहनास्त्राचा अति प्रसर ॥ मोहूनि घेतलें सकळ शरीर ॥ मी कोण कोणत्या कार्यावर ॥ आलों हेंही कळेना ॥८६॥

ऐसा निचेष्टित महीवरती ॥ पडला असे मारुती ॥ एक प्रहर लोटल्यावरती ॥ प्राण निघूं पाहतसे ॥८७॥

नेत्र झाले श्वेतवर्णी ॥ मुखीं लोटलें आरक्त पाणी ॥ तें लोटलें सकळ अवनीं ॥ भिजूनि लोट लोटतसे ॥८८॥

ऐसा समय तया होतां ॥ मग विचार करी आपुल्या चित्ता ॥ ऐसिया संकटीं प्राण आतां ॥ वांचत नाहीं सहसाही ॥८९॥

तरी माझा काळ आला ॥ आतां स्मरावें श्रीरामाला ॥ ऐसा विचार करुनि स्वचित्ताला ॥ आठविलें श्रीरामातें ॥९०॥

हे दयार्णव कुळभूषणा ॥ सीतापते रघुनंदना ॥ दशग्रीवांतका भक्तदुःखमोचना ॥ धांव पाव वेगेंसी ॥९१॥

हे करुणानिधे ताटिकांतका ॥ मुनिमनोरंजना रघुकुळटिळका ॥ अयोध्याधीशा प्रतापार्का ॥ धांव पाव वेगेंसीं ॥९२॥

हे शिवमानसरंजना ॥ चापधारका तापहरणा ॥ शरयूतीरविहारा आनंदसदना ॥ धांव पाव वेगेंसीं ॥९३॥

हे श्रीराम श्यामतनुधारका ॥ एकवचनीं व्रतदायका ॥ एकपत्नीबाणनायका ॥ धांव पाव वेगेंसीं ॥९४॥

हे पंकजनेत्रा कोमलगात्रा ॥ बिभीषणाप्रिया कोमलपात्रा ॥ परमप्रिय कपिकुळगोत्रा ॥ धांव पाव वेगेंसीं ॥९५॥

हे किष्किंधाधिपवालिनिर्दलना ॥ भक्तप्रियकरा भयमोंचना ॥ विदेहजामाता जगपाळणा ॥ धांव पाव वेगेंसीं ॥९६॥

हे विश्वामित्रमखसिद्धिकारका ॥ खरदूषणादिदैत्यांतका ॥ जलधिजलपाषाणतारका ॥ धांव पाव वेगेंसीं ॥९७॥

हे अहिमहि दानवहारिता ॥ शतमुखखंडी वैदेहीरता ॥ मंगळधारणा कुशळवंता ॥ धांव पाव वेगेंसीं ॥९८॥

हे अर्णवविहारा मारीचदमना ॥ जटायुप्रिया मोक्षगहना ॥ शिवचापभंगा मंगळधामा ॥ धांव पाव वेगेंसीं ॥९९॥

हे दयार्णव राम करुणाकरु ॥ मित्रकुळध्वज कीर्तिधारु ॥ ऐसें असूनि संकटपारु ॥ सुखशयनीं निजला अससी ॥१००॥

तरी आतां धांव वेगीं ॥ तव दूत या संकटप्रसंगीं ॥ मुक्त होऊं दे महीलागी ॥ शरणागत तूं म्हणावितोसी ॥१॥

ऐशी स्तुती वागुत्तर ॥ करीत अति वायुकुमर ॥ ते वाग्बाण श्रवणद्वार ॥ रिघते झाले रामाचें ॥२॥

जाणूनि परम संकटमात ॥ धांवोनि आला श्रीरघुनाथ ॥ मारुतीचें संकट पाहूनि अत्यंत ॥ परम चित्तीं कळवळला ॥३॥

कीं एकांत पाडसावांचूनि हरिणी ॥ हिंडे सैरावैरा रानीं ॥ तन्न्यायें मोक्षदानी ॥ हदयामाजी कळवळला ॥४॥

जैसी वत्सालागी गाय ॥ काननीं हंबरडा ॥ फोडी मोहें ॥ त्याचिप्रमाणे रघुराय ॥ हदयामाजी कळवळला ॥५॥

जळवेगळा पडतां मीन ॥ अति तळमळोनि सोडी प्राण ॥ तन्न्यायें रघुनंदन ॥ हदयामाजी कळवळला ॥६॥

किंवा बाळ मातेचें चुकार होतां ॥ आरंबळती तीं उभयतां ॥ तन्न्यायें भक्त निःशक्त होतां ॥ हदयामाजी कळवळला ॥७॥

मग मनोवेगातें मागें सारुन ॥ प्रत्यक्ष आला लगबगें ॥ धांवून ॥ तों विकळ होऊनि भक्तजन ॥ अहा अहा म्हणतसे ॥८॥

मग तापनिवारण चाप करीं ॥ शर संजून बाप कैवारी ॥ पाकशासनास्त्र अवधारी ॥ वज्रास्त्र निवटावया ॥९॥

प्रेरितांचि वातास्त्र ॥ प्रगट झाला सहस्त्रनेत्र ॥ वज्रास्त्र कवळूनि पवित्र ॥ जाता झाला अमरपुरीं ॥११०॥

यावरी विभक्तास्त्र जल्पून ॥ स्पर्शास्त्र केलें निवारण ॥ यावरी फणी सहस्त्रनयन्ज ॥ हस्तपदीं गुंडाळला ॥११॥

तयासाठीं क्षीराब्धिवासी ॥ लक्ष्मीनारायण वेगेंसीं ॥ तैं प्रत्यक्षस्वरुपें उरगेंसीं ॥ पाहता वैनतेय झालासे ॥१२॥

नमूनि म्हणे अहा अनंता ॥ तूं प्रिय असती माझे चित्ता ॥ याचि नीतीं वायुसुता ॥ संबोखीत आहेसी ॥१३॥

तरी आतां मम सखय ॥ मुक्त करीं अंजनीहदया ॥ ऐसें ऐकूनि आराधिया ॥ मोहाब्धि उचंबळला ॥१४॥

मग स्वदेहपुच्छ काढून ॥ मुक्त केले हस्तचरण ॥ काढूनि घेतलें अस्त्रमोहन ॥ प्रत्यक्ष विष्णु होऊनियां ॥१५॥

असो नागस्त्रीं उरगपती ॥ प्रेमें नमूनि अब्धिजापती ॥ जाता झाला स्वस्थानाप्रती ॥ मही धारण करावया ॥१६॥

येरीकडे अंजनीनंदन ॥ सावध होऊनि बैसला जाण ॥ हदयी आठवूनि रामगुण ॥ स्वस्थ झाला तेघवां ॥१७॥

दृष्टीं करितां चहूंकडे ॥ तों रामस्वामी देखिला पुढें ॥ आनंदोनी मग प्रेमें उडे ॥ चरणकमळ नमावया ॥१८॥

वंदूनि श्रीरामाचे चरण ॥ म्हणे महाराजा वांचविला प्राण ॥ वेधलें अस्त्र अति दुर्गम ॥ देखिलें नाहीं कधीं हो ॥१९॥

अस्त्र नव्हे हें परम काळ ॥ महाप्रळयींचें उतरलें सबळ ॥ आजि माझा अंतकाळ ॥ ओढावला होता महाराजा ॥१२०॥

परी तूं माझी माय सघन ॥ लगबगीनें आलीस धांवून ॥ म्हणूनि वांचला माझा प्राण ॥ प्रळयास्त्रामाझारीं ॥२१॥

तरी तुझिया उपकारा ॥ उत्तीर्णता न होय मज पामरा ॥ ऐसें वदोनि वागूत्तरा ॥ चरणांवरी लोळतसे ॥२२॥

अति कनवाळू सीतापती ॥ सप्रेम हदयीं धरिला मारुती ॥ म्हणें तुजसाठीं बा या क्षिती ॥ तीन वेळां आलों मी ॥२३॥

तेव्हां चतुर्थ अस्त्रबंधन ॥ मुक्त झालें तुजकारण ॥ परी असो तव शत्रु कोण ॥ वेगें वद मम वत्सा ॥२४॥

येरु म्हणे महाराजा ॥ अकल्पित लाभ संकट चोजा ॥ शत्रु येथें कवण माझा ॥ प्राप्त झाला असे कीं ॥२५॥

तरी आतां प्रस्तुतकाळीं ॥ क्षत्रिय नसे कोणी बळी ॥ परी नाथपंथी अस्त्रफळी ॥ मिरवीतसे महाराजा ॥२६॥

तरी महाराजा नवांतील एक ॥ आला असेल प्रतापदायक ॥ तयाचा प्रताप जो अर्क ॥ असे अजिंक्य सर्वांसी ॥२७॥

ऐसें ऐकूनि मारुतीवचन ॥ म्हणे राम नाथपंथी भक्त जाण ॥ तयांसी रळी हे वायुनंदन ॥ करुं नये सहसाही ॥२८॥

ते भक्त माझे आवडीचे असती ॥ तयांसी रळी न करी मारुती ॥ आपण आपुल्या विक्षेपवृत्ती ॥ वाढवूं नये सर्वज्ञा ॥२९॥

ऐसी नीति रघुवीर ॥ अंजनीसुता बोलोनि उत्तर ॥ हदयांत पाहे जनकजावर ॥ नाथ कोणता नवांतुनी ॥१३०॥

तों सहज दृष्टी अंतरीं करितां ॥ चित्त गुंतलें गोरखसुता ॥ मग मारुतीसी म्हणे वो प्रतापवंता ॥ गोरक्षनाथ असे हा ॥३१॥

असे जो हरिनारायण ॥ तयाचा अवतार गोरक्ष जाण ॥ या उपरी बले मारुति वचन ॥ चला जाऊं दर्शना तयाच्या ॥३२॥

या सीमेपासूनि एक योजन ॥ तेणें रचूनि हें संधान ॥ प्रतापी आहे गौरनंदन ॥ स्त्रीराज्यांत जाते झाले ॥३३॥

तया नाथाची घेतां भेटीं ॥ एक अर्थ आहे आमुचे पोटीं ॥ तो साधूनि घेईन त्यांत शेवटीं ॥ तरी कृपाजेठी चलावें ॥३४॥

राम म्हणे वो अर्थ कोण ॥ तो मातें करी निवेदन ॥ मग सकळ कथा अंजनीनंदन ॥ मच्छिंद्राची बदलासे ॥३५॥

मैनाकिनीचें तपोवचन ॥ मच्छिंद्र पाठविला म्हणोन ॥ तरी गोरक्ष आतां जाऊन ॥ येईल घेऊन मच्छिंद्रा ॥३६॥

तरी त्यासी अमृतवाणी ॥ बोलूनि गोंवावा दृढचरणीं ॥ मग तो गोरक्ष मच्छिंद्र लागूनि ॥ नेणार नाहीं कदाही ॥३७॥

ऐसा विचार सुचवी रामातें ॥ मग बोलता झाला सीतानाथ ॥ म्हणे बा तुझा पुरवावया अर्थ ॥ चाल गोरक्षा भेटावया ॥३८॥

युक्तीप्रयुक्ती बोलूनि वचन ॥ परमादरें तोषवून ॥ इतुका अर्थ घेऊं मागून ॥ तुजसाठीं कपींद्रा ॥३९॥

ऐसें वदूनि रघुनाथ ॥ मग चालते झाले उभयतां ॥ मध्यरात्रीचा समय होतां ॥ चिनापट्टम ग्रामा पोंचले ॥१४०॥

तंव त्या ग्रामीं सुखशयनीं ॥ पहुडले होते सुखपणीं ॥ स्वस्वरुपीं अंतःकरणीं ॥ हेलावतसे ब्रह्मांड ॥४१॥

येरीकडे रघुनाथ ॥ आणिक द्वितीय अंजनीसुत ॥ ग्रामानिकट येता त्वरित ॥ स्वरुपातें पालटती ॥४२॥

शुद्ध करुनि याचकपण ॥ भावें आले उत्तम ब्राह्मण ॥ नमन करिता गौरनंदन ॥ तया ठायीं पालटले ॥४३॥

तंव तो साधक गोरक्षनाथ ॥ बैसला होता निवांत ॥ बाचे अंशघन सदगुरुनाथ ॥ प्रेमच्छंदें डुल्लतसे ॥४४॥

जैसा जळामाजी मीन ॥ तळपत आहे स्वच्छंदें करुन ॥ तन्न्यायें गोरक्षनंदन ॥ श्रीगुरुभजनीं डोलतसे ॥४५॥

तों येरीकडे उभयतां ॥ प्रत्यक्ष जाऊनि तेथ ॥ आदेश म्हणूनि वंदिला नाथ ॥ निकट जाऊनि बैसले ॥४६॥

बोलती बैसतांचि वचन ॥ आम्ही षड्रशास्त्री ब्राह्मण ॥ तुम्ही नाथ परिपूर्ण ॥ महीवरी असतां ॥४७॥

योगियांमाजी शिरोमणी ॥ जितेंद्रिय सदा दमनी ॥ विरक्तांत पूर्णपणीं ॥ मिरविसी महाराजा ॥४८॥

धैर्याब्धीचें बुद्धिजळ ॥ मिरविसी विवेकपात्रीं सबळ ॥ परघात तो वडवानळ ॥ शांतोदरीं सांठविसी ॥४९॥

मित्रशत्रुद्वितीयतटी ॥ सदैवकृपासरितेचा पूर लोटी ॥ क्षेमालिंगनअर्थीं भेटी ॥ वर्तविसी महाराजा ॥१५०॥

तरी सच्चिदानंद तेजाकारु ॥ कीं वहनादि चराचरु ॥ एक पाहणें जंगमादरु ॥ दटाविसी महाराजा ॥५१॥

तूं ऐसा औदार्यदाता ॥ अपूर्व मिरविसी धनवंता ॥ तरी महाराजा आमुच्या अर्था ॥ साधिला तो पुरवीं कां ॥५२॥

गोरक्ष म्हणे विप्रोत्तमा ॥ कोण कामना वेधली तुम्हां ॥ तरी सरिताकार्यउगमा ॥ प्रसिद्धपणीं मिरवावें ॥५३॥

येरु म्हणती जी योगशीला ॥ वरदपात्री ओपूं बोला ॥ मग आमुची सरिता विपुला ॥ आनंद जळीं दाटेल ॥५४॥

तरी भाष देऊनि आतां ॥ तोषवीं कां आमुचे चित्ता ॥ भाष्य दिधल्यावरी अर्था ॥ दर्शवूं तूतें महाराजा ॥५५॥

ऐसी ऐकोनि तयांची वाणी ॥ तो गोरक्ष विचार करी मनीं ॥ कीं इतुका गौप्य मेदिनीं ॥ कोण आहे मजपाशीं ॥५६॥

शिंगी सारंगी कुबडी फावडी ॥ मुद्रा शैली कंथा घोंगडी ॥ पात्र भोपळा संपदा एवढी ॥ आम्हांपाशीं विराजे ॥५७॥

याविरहित आणिक दुसरा ॥ अर्थ न राहिली आमुच्या आश्रा ॥ परी यानें कल्पिलें काय अंतरा ॥ हें तों कांहीं कळेना ॥५८॥

यापरी आणिक विचार चित्तीं ॥ कीं अवसर लोटला मध्यरात्रीं ॥ त्यांतही स्त्रीदेशाप्रती ॥ पुरुष आला हें कैसें ॥५९॥

तरी हे मानव सहसा नसती ॥ स्वर्गसुखाचे पात्र असती ॥ शुक्र कीं वरुण गभस्ती ॥ वाचस्पति पातला ॥१६०॥

कीं मंगळ किंवा विरिंची सुंदर ॥ कीं गण किंवा गंधर्व साचार ॥ कीं यक्ष रक्ष अश्विनीकुमर ॥ कीं तपोलोकादि पातले ॥६१॥

नातरी व्हावया आगमन ॥ मानवा नसेही साधन ॥ तरी हे देवचि निश्वयवचन ॥ मानवी कृत्य नसेचि ॥६२॥

ऐसें भासूनि दृढ चित्तांत ॥ आणि विचारी हदयांत ॥ कवण कामना आहे यांतें ॥ शोध करुं याचा ॥६३॥

म्हणूनी अंतरदृष्टी अंतःकरणीं ॥ करुनि विचार शोधी मुनी ॥ परी कांहींएक अर्थ तों तरणी ॥ आश्रयातें लागेना ॥६४॥

मग म्हणे असो कैसें ॥ आपण चालिलों ज्या कार्यास ॥ तितुकें भिन्न करुनि यास ॥ मागेल तेंचि आदरुं ॥६५॥

ऐसा विचार करुनि मनीं ॥ बोलतां झाला प्रसिद्धपणीं ॥ म्हणे महाराजा भूदेवतरणी ॥ तुम्ही सहसा नोहेती ॥६६॥

काय प्राप्ती द्विजवरा ॥ चालूनि येईल येथवरा ॥ काळकृत्तांत सीमेवरा ॥ चतुर्थ अस्त्र विराजती ॥६७॥

प्रतापार्क वायुकुमर ॥ ते रश्मी तसे भुभुःकार ॥ त्यावरी प्रेरिला वैश्वानर ॥ चतुर्थास्त्र प्रतापी ॥६८॥

ऐशिया संकटीं भूदेवराया ॥ कोण रेवाण येईल उपाया ॥ शिवहलातें प्राशिलिया ॥ वाचेल ऐसें वाटेना ॥६९॥

कीं दहन आकाशीं कवळितां ॥ तेथें पतंग मिरवी आपुली वीर्यता ॥ कीं मशक मेरुतें वाहूनि तोली वरता ॥ जात थिल्लरीं बुडवावया ॥१७०॥

तेवीं येथें यावया कारण ॥ कदा न पावे मनुष्या गमन ॥ तरी महाराजा प्रज्ञावान ॥ कोण तुम्ही तें सांगा ॥७१॥

ऐसें बोलूनि माथा चरणीं ॥ ठेविता झाला सलीलपणीं ॥ मग एकमेकांतें विलोकुनी ॥ हास्यवदन करिताती ॥७२॥

याउपरी बोले रघुनंदन ॥ आतां यातें ठेवणें भिन्न ॥ हें योग्य मातें न ये दिसून ॥ स्वपंकजा दावावया ॥७३॥

ऐसें वदतां रघुपती ॥ मान तुकावी प्राज्ञमूर्ती ॥ मग प्रकट करुनि स्वरुपप्राप्ती ॥ नाथ हदयीं कवळिला ॥७४॥

म्हणे वत्सा ऐक वचन ॥ कामें वेधला वायुनंदन ॥ कीं मच्छिंद्रयतीलागून ॥ नेऊं नये स्वदेशीं ॥७५॥

मैनाकिनी नृपदारा ॥ परम आचरली तपाचारा ॥ वचनीं गोंवूनि वायुकुमरा ॥ नाथ मच्छिंद्रातें मागीतलें ॥७६॥

तरी यशाची उभवूनि कोटी ॥ प्रेरिला आहे मच्छिंद्रजेठी ॥ तरी हा अर्थ मारुतीचे पोटीं ॥ पूर्णपणीं मिरवला ॥७७॥

याविरहित मागणें तुजसी ॥ कांही नाहीं तपोराशी ॥ तरी तूं जाऊनि तया भेटीसी ॥ श्रीनाथासी नेऊं नको ॥७८॥

ऐसें ऐकूनि लाघवी वचन ॥ बोलता झाला गौरीनंदन ॥ हे महाराजा प्रज्ञावान ॥ सत्य वचन बोलतसां ॥७९॥

परी पहा जी प्रज्ञावानराशी ॥ आम्ही म्हणवितों योगाभ्यासी ॥ तरी हें अनुचित कर्म आम्हांसी ॥ प्रपंच करु साजिरा ॥१८०॥

तरी इतुकें काम करुनि भिन्न ॥ मागाल तरी देईन प्राण ॥ परी या देशीं मच्छिंद्र जाण ॥ ठेवणार नाहीं सहसाही ॥८१॥

भूवरी आकाश अवघें पडो ॥ मेरुमांदार उलथोनि पडो ॥ कीं अवघी मही रसातळीं बुडो ॥ परी मी न ठेवीं गुरुवर्या ॥८२॥

यावरी बोले रघुनंदन ॥ इतुकें आमुचें करीं मान्य ॥ गोरक्ष म्हणे पितरांकारण ॥ घडूनि आल्या घडेना ॥८३॥

तरी शांतिमांदार रघुनंदन ॥ हस्तकीं धरिला वायुनंदन ॥ म्हणे बा सकळ प्रताप गुणसंपन्न ॥ करशील कंदन निश्चयें ॥८४॥

ऐसें बोलतां गौरनंदन ॥ मारुतीसी क्रोध आला दारुण ॥ रामासी म्हणे करीन कंदन ॥ शब्दभ्रष्ट आतांचि ॥८५॥

परी इतुका अनर्थ कासयासाठीं ॥ लघुकार्यातें आटाआटी ॥ तुज या वचनाची वागवटी ॥ फिटूनि गेली महाराजा ॥८६॥

आतां प्रारब्धयोग कैसा ॥ घडूनि येई तयाच्या लेशा ॥ परी त्या आपुल्या भाषा ॥ सत्य करुनि शेवटविलें ॥८७॥

ऐशा युक्तीप्रयुक्तीकरुन ॥ शांत केला वायुनंदन ॥ मग गोरक्षा हदयीं धरुन ॥ रघुनंदन चालिला ॥८८॥

गोरक्षें चरणीं घालूनि मिठी ॥ म्हणे महाराजा अस्त्रें चावटी ॥ तूतें केली असे पोटीं ॥ क्षेमाब्धींत सांठविला ॥८९॥

ऐसें विनवूनि वाणी रसाळ ॥ बोळविला प्रतापशीळ ॥ अस्त्रा दशरथबाळ ॥ स्वस्थानासी पातला ॥१९०॥

याउपरी पुढिले अध्यायीं कथन ॥ शृंगमुगुट पाहील वायुनंदन ॥ मैनाकिनी राज्यभाषण ॥ गुरुसूचना करील तो ॥९१॥

ती कथा परम सुधारस सुंदर ॥ श्रोत्यांसी सांगेल धुंडीकुमर ॥ नरहरिवंशी संतकिंकर ॥ मालूवरी विराजला ॥९२॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ एकोनविंशोध्याय गोड हा ॥१९३॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ नवनाथभक्तिसार एकोनविंशोध्याय समाप्त ॥


श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय २०

श्रीगणेशाय नमः

जयजयाजी पंढरीराया ॥ भोक्तया षडगुणऐश्वर्या ॥ ऐसी सोसूनि अपार माया ॥ सकळ कळा तुझेनि ॥१॥

घटपटतन्तु आकाशन्याय ॥ सर्व तंवचि ब्रह्म होय ॥ ऐसे असूनि निराळा राहे ॥ अव्यक्त व्यक्ती पावुनी ॥२॥

कीं अपार घटी अपार तरणी ॥ व्यापून ऐक्य दिसे गगनीं ॥ त्याचि न्यायें मोक्षदानी ॥ व्याप्त असे सर्वांतें ॥३॥

तरी पूर्णब्रह्म नाथवेष ॥ करुणानिधि पंढरीचा अधीश ॥ माय कनवाळु जगान्निवास ॥ भक्तवत्सल नटलासे ॥४॥

तरी हे दीनबंधो भक्तव्यापका ॥ पुंडलीकवरदायका ॥ आतां पुढें रसना दोंदिका ॥ भक्तिसार वदवीं कां ॥५॥

मागिले अध्यायीं रामदर्शन ॥ आणि द्वितीयीं अंजनीनंदन ॥ गोरक्षालागीं भेटून ॥ अदृश्यपणीं मिरविले ॥६॥

असो स्वस्थाना गेला अयोध्यानाथ ॥ येरीकडे अंजनीसुत ॥ शृंगमुरडा जाऊनि त्वरित ॥ सानवेषें नटलासे ॥७॥

गुप्तवेषें राजसदन ॥ पाहता झाला अंजनीनंदन ॥ एकांतसदनीं मैनाकिण पदमिण ॥ मंचकावर पहुडली ॥८॥

सुखनिद्रा शयनीं असून ॥ परिचारिका गेल्या उठोन ॥ ऐसी एकांतसंधी पाहून ॥ धवळारी तैं संचरला ॥९॥

चपळपणीं तो मंचकाजवळी ॥ जाऊनि बैसला प्रतापबळी ॥ कीलोतळा पद्मिणी कमळी ॥ करपात्रीं धरियेली ॥१०॥

व्यक्त होतां करकमळ ॥ सावध झाली कीलोतळा वेल्हाळ ॥ तों दृष्टीं देखिला अंजनीबाळ ॥ चरणावरी लोटली ॥११॥

कीलोतळा आणि मैनाकिनी ॥ तृतीय नाम जिये पद्मिणी ॥ यापरी श्रोते बोलती कल्पनीं ॥ कवणें अर्थी हीं नामें ॥१२॥

तृतीयं अभिधाना ती दुहिता ॥ झाली असे कवण अर्था ॥ मग त्या कल्पनीं वाक्सरिता ॥ व्यक्ती घेणें मिरवली ॥१३॥

ऐसा पाहूनि श्रोतियां आदर ॥ बोलता कवि सादर ॥ तृतीय भिन्न भिन्न प्रकार ॥ कैशा रीतीं ऐका त्या ॥१४॥

तरी पर्वतांमाजी मंदरगिरी ॥ जंबुद्वीप त्याची प्रथम पायरी ॥ यापरी सिंहलद्वीपाची दुसरी ॥ मेरुमंदार आहे कीं ॥१५॥

यापरी सिंहलद्वीपभुवनीं ॥ स्त्रिया जितुक्या असती पद्मिणी ॥ त्यांत ही मुख्य मैनाकिनी ॥ स्वरुपवंती मिरवतसे ॥१६॥

तों एके दिवशीं अभ्यंग करुनि ॥ उभी राहिली धबळारी जाऊनी ॥ ते सहज दृष्टीं दिशागमनीं ॥ आकाशातें पहातसे ॥१७॥

हस्तीं झगटती कबरीभार ॥ तों वर दृष्टी जाऊनि गोचर ॥ उपरीचवसु विमानावर ॥ आरुढ होऊनि जातसे ॥१८॥

विमानारुढ झाला होता ॥ तों वसन एकांगें झालें तत्वतां ॥ आवेशें बाहेर लिंग दर्शतां ॥ असावध बैसलासे ॥१९॥

विमानावरी गवाक्षद्वार ॥ त्यांतूनि दिसे अवयव समग्र ॥ तों मैनाकिनी पाहूनि नेत्रें ॥ हांसे खदखदां ते काळीं ॥२०॥

तें ऐकूनि वसुनाथ ॥ विक्षेपोनि बोलता झाला तीतें ॥ म्हणे पापिणी परपुरुषातें ॥ पाहूनिया हासलीस ॥२१॥

तरी ऐसी जारिणी वरती ॥ धरुनि राहसी स्वगृहाप्रती ॥ माझेविषयीं कामशक्ती ॥ उदभवली म्हणूनि हांसलीस ॥२२॥

तरी मी नोहें तैसा भ्रष्ट ॥ सकळ वसूमाजी श्रेष्ठ ॥ इंद्रियदमनीं एकनिष्ठ ॥ पूर्णतपा साधीतसें ॥२३॥

तरी मम अभिलाष धरुनी ॥ गदगदां हांससी पापिणी ॥ तरी पुरुष विनोदे स्वस्थानीं ॥ जाऊनियां पडशील ॥२४॥

स्त्रीदेशांत स्त्रीकटकीं ॥ वस्ती होईल तुझी शेखी ॥ मग कैंचा पुरुष ते लोकीं ॥ दृष्टीगोचर होईल ॥२५॥

ऐसें बोलता वसु अंतरिक्ष ॥ परम लाजली पद्मिणी सुलक्ष ॥ परी पदच्युत शब्द ऐकतां प्रत्यक्ष ॥ स्तुतिसंवादा व्यापिली ॥२६॥

म्हणे महाराजा वसुनाथा ॥ अपराध झाला विषम आतां ॥ अपराधाचें विवरण करितां ॥ बोलतां न ये आम्हांसी ॥२७॥

परी हा असो प्रारब्धयोग ॥ कदा न सुटे आचरला भोग ॥ तरी उश्श्याप देऊनि आतां चांग ॥ स्वपदातें स्थापावें ॥२८॥

तुम्ही वसु सर्वप्रकारें ॥ भरलां आम्हां शांतिभांडारे ॥ परम कनवाळू इंद्रियें साचारें ॥ योगदमनीं मिरवला ॥२९॥

तरी उश्श्याप देऊनि मातें ॥ करीं महाराजा पदाश्रित ॥ मग अंतरिक्ष षाहूनि ढळाळिते ॥ उश्शापातें बदलासे ॥३०॥

म्हणे पद्मिणी ऐक वचन ॥ स्त्रीराज्यांत कीलोतळा स्वामीण ॥ तेथें आयुष्य सरल्या पूर्ण ॥ तैं पदीं वससील तूं माये ॥३१॥

परी मज भावें निवेदिलें चित्त ॥ तरी महीं मिरवेल माझा सुत ॥ तो तुज स्वीकारुनि होईल रत ॥ मच्छिंद्रनाथ म्हणोनियां ॥३२॥

तो रत झालिय अंगसंगीं ॥ पुत्र लाभसील रेतप्रसंगीं ॥ मीननाथ हें नाम जगीं ॥ प्रसिद्ध मिरवेल महीतें ॥३३॥

तो पुत्र झालिया तूतें शेवटीं विभक्ती होईल मच्छिंद्र जेठीं ॥ मग तूं स्वपदा येऊनि गोरटी ॥ भोग भोगीं स्वर्गीचा ॥३४॥

याउपरी बोलली मैनाकिनी ॥ पुरुष नाहीं कां तया भुवनीं ॥ सकळ स्त्रिय दिसती अवनीं ॥ काय म्हणोनी महाराजा ॥३५॥

तरी पुरुषावांचूनि संतती ॥ कोठूनि होतसे नसूनि पती ॥ येरु म्हणे येऊनि मारुती ॥ भुभुःकार देतसे ॥३६॥

उर्ध्वरेता वायुनंदन ॥ वीर्य व्यापितसे भुभुःकारेकरुन ॥ मग उत्पत्ति उदयजन्म ॥ तेथें होतसे शुभानने ॥३७॥

बाळतनु जो पुरुषधारी ॥ मृत्यु पावे तो भुभुःकारीं ॥ तितुक्याविण अचळनारी ॥ महीवरी विराजती ॥३८॥

ऐसें वदता अंतरिक्ष मात ॥ मम बोले पद्मिणी जाऊन त्वरित ॥ हे महाराजा मच्छिंद्रनाथ ॥ येईल कैसा त्या ठाया ॥३९॥

प्रत्यक्ष पुरुष पावती मरण ॥ ऐसी चर्चा तेथें असून ॥ कैसा येईल तव नंदन ॥ मम भोगार्थ महाराजा ॥४०॥

अंतरिक्ष म्हणे वो शुभाननी ॥ तूं कीलोतळेचे उपरी जाऊनि ॥ बैसोनि उपरी तपमांडणीं ॥ अराधावा मारुती ॥४१॥

प्रसन्न झालीया वायुनंदन ॥ मग मुक्त करील त्या भयापासून ॥ परी तुज सांगतों ती खूण ॥ चित्तामाजी रक्षावी ॥४२॥

प्रसन्न होईल जेव्हां मारुती ॥ मागणे करिजे अंगसंगती ॥ मग तो संकटीं पडूनि क्षिती ॥ मच्छिंद्रातें आणील ॥४३॥

तरी हा रचूनि दृढतर उपाय ॥ मिरवत आहे मारुती भय ॥ तरी तयाचे हस्तें साधावें कार्य ॥ मच्छिंद्रातें आणोनी ॥४४॥

याउपरी बोले पद्मिणी युवती ॥ रामचरणीं श्रीमारुती ॥ कैसें मातें द्यावी गती ॥ ऐसें म्हणावें महाराजा ॥४५॥

परी ऐसिये बोलप्रकरणी ॥ मारुतीच मिरवला विषयध्वनी ॥ मग तव सुत मच्छिंद्र कोठूनीं ॥ येथें येईल महाराजा ॥४६॥

ऐसें अंतरिक्ष ऐकतां वचन ॥ म्हणे विषयोपद्रवरहित वायूनंदन ॥ ब्रह्मचर्यव्रतातें लोटून ॥ रतिसुखातें मिरवेल ॥४७॥

तरी हा संशय सोडूनि गोरटी ॥ अर्थ धरिजे इतुका पोटीं ॥ मच्छिंद्रा लाहसील येणे कोटीं ॥ हनुमंतेकरुनियां ॥४८॥

ऐसें सांगूनिया अंतरिक्ष ॥ स्वस्थाना गेला वसु दक्ष ॥ येरीकडे मैनाकिनी प्रत्यक्ष ॥ स्त्रीराज्यांत प्रवर्तली ॥४९॥

शृंगार मुरडा राजपट्टणीं ॥ भ्रमणकरितां ती पद्मिणी ॥ तो ते चर्मिकेचे सदनी ॥ सहजस्थिती पातली ॥५०॥

सहजस्थितीं जाऊनि ओसरीं ॥ बसती झाली शुभगात्री ॥ तों ती चर्मिका पाहूनी नेत्रीं ॥ बोलती झाली तियेतें ॥५१॥

म्हणे माय वो शुभाननी ॥ कोठे अससी लावण्यखाणी ॥ येरी म्हणे वो मायबहिणी ॥ सिंहलद्वीपीं मी असतें ॥५२॥

परी अंतरिक्षवसूचे शापेंकरुन ॥ पाहतें झालें माय हें भुवन ॥ आतां माझें संगोपन ॥ कोणी करील कळेना ॥५३॥

ऐसी ऐकूनि पद्मिणीवाणी ॥ बोलती झाली ती चर्चिणी ॥ म्हणे माय वो माझे स्थानीं ॥ राहूनि सुख भोगीं कां ॥५४॥

स्वहस्तें करुनि षाक ॥ हरीत जा माये तृषभूक ॥ मी आपुल्या गृहींची एक ॥ तारंबळ होतसे ॥५५॥

तरी माय वो उपेक्षा सोडून ॥ सेवीं माय वो माझें सदन ॥ कन्येसमान तुज पाळीन ॥ सर्व सुख देऊनियां ॥५६॥

ऐसी ऐकूनि तियेची वार्ता ॥ परम तोषली हदयीं दुहिता ॥ मग तेथोंचि राहूनि बल्लवी हस्ता ॥ क्रियेलागी आराधी ॥५७॥

हस्तें करुनि पाकनिष्पत्ती ॥ हरीत चर्मिकेचे क्षुधेप्रती ॥ शेवटीं भोजनक्रियेसंगतीं ॥ आपण सेवी नित्यशा ॥५८॥

यासही लोटतां बहुत दिन ॥ कीलोतळा राज्यस्वामीण ॥ आयुष्य सरलें जरा व्यापून ॥ मग मंत्र्यालागीं बोलतसे ॥५९॥

म्हणे आयुष्य सरलें निकट ॥ तरी कोणास हो द्यावा राज्यपट ॥ मंत्री म्हणे माळिका चोखट ॥ गजशुंडी विराजवावी ॥६०॥

सकळ स्त्रिय पाचारुन ॥ गज प्रेरावा माळ देऊन ॥ त्यासी भेटेल दैववान ॥ माळग्रहणीं ग्रीवेंत ॥६१॥

ऐसें बोलता मंत्रीं तये वेळां ॥ परम तोषली कीलोतळा ॥ मग सुदिन पाहूनि कार्यमंगळा ॥ अर्पिली माळा गजशुंडीं ॥६२॥

समग्र स्त्रियांची सभा करुन ॥ मग तो प्रेरिला माळ देऊन ॥ तें प्रांतीं मैनाकिनी पाहून ॥ माळ ग्रीवेंत ओपिली ॥६३॥

या उपरांतिक भोगितां राणीव ॥ आचरली पूर्वोक्त तपपर्व ॥ वश केला मनोभावें ॥ रामदूत तियेनें ॥६४॥

वश झाला अंजनीनंदन ॥ हें पूर्वीच लिहिलें कथन ॥ वायुसुतें मच्छिंद्राकारण ॥ निवेदलें प्रकरण पूर्वीं ॥६५॥

तरी असो ऐसें कथन ॥ सिंहलद्वीपीं मैनाकिनी नाम ॥ मातापितरांच्या आवडींकरुन ॥ नाम ऐसें विराजलें ॥६६॥

यापरी सिंहलद्वीपींची दारा ॥ म्हणोनि सर्वांच्या वागुत्तरा ॥ पद्मिणी नाम सर्वोपचारा ॥ बोभावती कटकांत ॥६७॥

कीलोतळेचें पावली आसन ॥ म्हणोनि कीलोतळा ऐसें नाम असो गुप्तरुपें वायुनंदनें ॥ सावध केली कीलोतळा ॥६८॥

सावध करोनि तीतें ॥ म्हणे कीलोतळे ऐके मात ॥ तुवां मज ठेवूनि वचनांत ॥ मच्छिंद्रनाथ आणविला ॥६९॥

तरी तव वचनापासून ॥ सुटलों आहें अर्थ करुन ॥ परी तव सुखासी पातलें विघ्न ॥ मच्छिंद्रशिष्य येतो कीं ॥७०॥

तो मच्छिंद्राहुनि प्रतापवंत ॥ नामीं मिरवला गोरक्षनाथ ॥ तो अजिंक्य असे तयाचें सामर्थ्य ॥ वर्णवेना वाचेसी ॥७१॥

म्यां तुझ्यासाठीं यत्न केला ॥ श्रीराम मध्यस्थ घातला ॥ परी अवमानूनि उभयतांला ॥ मच्छिंद्रा नेऊं म्हणतसे ॥७२॥

तरी तो आतां येईल येथें ॥ त्यासी सज्ज करुनि प्रीतातें ॥ गोंवूनि घ्यावा कोणे हितार्थे ॥ सुखसंपत्ति दावूनियं ॥७३॥

परी तो नोहे मच्छिंद्रासमान ॥ विषयीं विरक्त तपोधन ॥ कैसा राहील नवलविधान ॥ सर्वोपरी विरक्त तो ॥७४॥

परी वाचागौरव द्रव्यगौरव ॥ आसनगौरव वसनगौरव ॥ भोजनादि नानावैभवें ॥ गौरवोनि गोंवावा ॥७५॥

जैसा जतन करी पावक ॥ संग्रहीं जे गौरवी राख ॥ कीं चिंधीवेष्टणे रक्षणें माणिक ॥ होत आहे शुभाननी ॥७६॥

तैसा बहुविध गौरव करुन ॥ तुष्ट करावें तयाचें मन ॥ ऐसें सांगूनि वायुनंदन ॥ गमन करिता पैं झाला ॥७७॥

परी ती चपळ मैनाकिनी ॥ मारुति बैसविला कनकासनीं ॥ षोडशोपचारें पूजा करोनी ॥ बोळविला महाराजा ॥७८॥

स्वस्थाना गेला वायुसुत ॥ येरीकडे गोरक्षनाथ ॥ वेश्याकटकीं मार्गी येत ॥ मुक्काममुक्कामासी साधूनियां ॥७९॥

जैसे पक्षी करिती गमन ॥ या तरुडूनि त्या तरुवरी जाऊन ॥ तेवीं गोरक्ष मुक्काम करुन ॥ श्रृंगमुरडीं पातला ॥८०॥

गांवानिकट पेठेंत ॥ धर्मशाळा होती त्यांत ॥ वेश्याकटकीं राहुनि तेथ ॥ शिबिरापरी योजिलें ॥८१॥

मग ती वेश्या मुख्य नायिका ॥ कलिंगा नामें मुख्य दोंदिका ॥ साजसरंजाम घेऊनि निका ॥ राजसदनीं चालिली ॥८२॥

सर्व वेश्या सात पांच ॥ घेऊनि रुपवंत गुणवंत साच ॥ ऐसें कटकीं करोनि संच ॥ राजांगणी मिरवली ॥८३॥

राजद्वारीं उभी राहून ॥ पाठविलें वर्तमान ॥ द्वाररक्षके आंत जाऊन ॥ वेश्याकटकी सांगितलें ॥८४॥

हे महाराजा राजद्वारीं ॥ कलावती कलाकुसरी ॥ रुपवती गुणगंभीरी ॥ भेटीलागीं पातली ॥८५॥

तरी आज्ञेप्रमाणें वदूं तीतें ॥ ऐसी ऐकतां किलोतळा मात ॥ म्हणे घेऊनि या सभास्थानांत ॥ अवघे समारंभेंमीं ॥८६॥

ऐसें ऐकतां द्वारीं दूतीं ॥ सर्वेचि पातली द्वारावती ॥ घेऊनि कलिंगा कलावती ॥ सभास्थानीं पातली ॥८७॥

तों कनकतगटीं रत्नकोंदणीं ॥ मच्छिंद्र मिरवला कनकासनीं ॥ निकट बैसली मैनाकिनी ॥ निजभारें शोभलीं ॥८८॥

जैसी नभीं उडुगणज्योती ॥ मध्यें मिरवला रोहिणीपती ॥ त्याचि न्यायें मच्छिंद्राभोंवती ॥ सकळ स्त्रिया विराजल्या ॥८९॥

कीं तेजःपुंज हाटकासनीं ॥ हिरा मिरवला शुद्ध कोंदणीं ॥ नवरत्न हिरे वेष्टित हिरकणी ॥ तैसा शोभला मच्छिंद्र ॥९०॥

कीं शैल्या नव्हेत त्या रश्मिज्वाला ॥ मध्यें मच्छिंद्र अर्कगोळा ॥ कनकासनीं ते सदनीं सकळां ॥ राजसभेंत मिरवत ॥९१॥

असो ऐसी सभा सघन ॥ कलिंगा दृष्टीनें पाहोन ॥ मग बोलती झाली सभेवचन ॥ मैनाकिनीरायातें ॥९२॥

हे महाराजा शैल्यापती ॥ ऐकूनि नामाभिधानकीर्ती ॥ सोडूनि आपुल्या देशाप्रती ॥ येथें आलें महाराजा ॥९३॥

तरी कीर्तिध्वज फडकत अवनीं ॥ तैसी अवलोकनीं आली करणी ॥ मही कलावंत राजभुवनीं ॥ विराजतसे महाराजा ॥९४॥

बृहद्रथ राजा हस्तिनापुरी ॥ कीर्तिध्वज धर्माचारी ॥ यचि नीतीं बंगालधरित्रीं ॥ गोपीचंद विराजला ॥९५॥

याचि नीतीं कीर्तिध्वज ॥ शैल्यादेशीं कीलोतळानाम राज ॥ ऐसी वरुनि सत्कीर्तिभाज ॥ येथें आलें महाराजा ॥९६॥

ऐसी बोलतां कलिंगा युवती ॥ परम तोषला कीलोतळाभूपती ॥ मग समुच्चयें विचार करोनि अन्नभुक्ती ॥ देऊनि बोले कीलोतळा ॥९७॥

तंव ती कलिंगा येऊनि शिबिरीं ॥ मध्यान्हसमया सारोनि उपरी ॥ साजसरंजाम सजूनि परी ॥ सावध रात्रीं बैसली ॥९८॥

तों येरीकडे मैनाकिनी ॥ येऊनि बैसली सभास्थानीं ॥ सभामंडप श्रृंगारोनी ॥ दीपमाळा रचियेल्या ॥९९॥

लावूनि स्फटिकांची कूपिका ॥ मेणबत्ती लावोनि दीपका ॥ अगरबत्तीगंध लोकां ॥ घ्राणोघ्राणीं मिरवतसे ॥१००॥

तबकीं भरोनि गंगेरी पानें ॥ विडे रचिले त्रयोदशगुणी ॥ त्यांत फुलें अत्तरदाणी ॥ लोकांमाजी मिरवतसे ॥१॥

येरी कलिंगा राजसदना जात ॥ सवें चालिला गोरक्षनाथ ॥ परी कलिंगे पाचारोनि एकांत ॥ गुज सांगे तियेसी ॥३॥

म्हणे वो ऐक गुणगंभीरी ॥ तूं नाट्या करिसील सभेभीतरी ॥ तरी मृदंगवाद्य माझे करीं ॥ सभास्थानीं ओपीं कां ॥४॥

शैल्यासभे कटकस्थानीं ॥ रिझवितां माजे वाजवणीं ॥ मग द्रव्यलाभ घे ओढोनि ॥ मानेल तैसें माग तेथें ॥५॥

ऐसें ऐकतां कलिंगा वदत ॥ हे वरिष्ठ महाराजा गुणसमर्थ ॥ सभेस्थानीं स्त्रिया समस्त ॥ पुरुष नसे त्या ठायीं ॥६॥

तरी तुम्हांलागीं तेथे नेतां ॥ वितर्क वाढेल संशय चित्ता ॥ स्त्रीदेशांत पुरुष व्यक्त ॥ कोठेंचि नाहीं म्हणोनि ॥७॥

ऐसें ऐकूनि तपोद्रुम ॥ म्हणे एकें वो सुमध्यमे ॥ अंगनावेषे येतों नटून ॥ रंग तुझा लुटावया ॥८॥

माझी इच्छ होईल पूर्ण ॥ तूतेंही मिळेल अपार धन ॥ मग ती कलिंगा आवडीने ॥ अवश्य नाथा म्हणतसे ॥९॥

मग लेवूनि कंचुकीसार ॥ परिधानिलें उत्तम चीर ॥ जटावियुक्त करोनि भार ॥ भांग मुक्तांनी भरियेला ॥११०॥

भाळीं चर्चूनि कुंकुमकोर ॥ सोगया अंजनी मिरवले नेत्र ॥ कबरीकरुनि चीरपदर ॥ नाभिस्थानीं खोंविला ॥११॥

काढोनि कर्णमुद्रिकाभूषण ॥ ताटके केलीं परिधान ॥ तेही कोंदणीं जडावरत्नें ॥ नक्षत्रांसम झळकती ॥१२॥

कीं एकाग्र करुनि रोहिणीपती ॥ करुं पातले श्रवणीं वस्ती ॥ मुक्तघोष नासिकाप्रती ॥ सरजी नथ शोभतसे ॥१३॥

पाचकंकणजडित भूषण ॥ ग्रीवेमाजी अपार हेम ॥ नाना नगीं हाटकगुण ॥ मुक्तलडा शोभल्या ॥१४॥

असो आतां किती वर्णन ॥ अंगनावेषें गोरक्षनंदन ॥ परम शोभला चपळेपण ॥ वैश्यांगणी तळपतसे ॥१५॥

आधींच पूर्ण हेमकांती अवतारी ॥ त्यावरी नटला हेमशृंगारी ॥ मग वर्णदशास्वरुपापरी ॥ रंभा दासी शोभली ॥१६॥

ऐसिया आव्हानूनि पैंजणी ती ॥ मृदंग कवळूनि प्रतिहातीं ॥ नटनृत्यस्वरुपी राजपंक्ती ॥ जाणूनियां मिरविली ॥१७॥

परी त्या शैल्या शुभाननी ॥ पाहती पुरवंडा सुलोचनी ॥ एकमेकां बोलती वाणी ॥ मदनबाळी हेही असे ॥१८॥

सकळ नाट्यकलावती ॥ विकळस्वरुप नीच दिसती ॥ म्हणती धन्य विधात्याप्रती ॥ रचिली मूर्ति अनुपम्य ॥१९॥

समस्त वदूं जरी उर्वंशी ॥ तरी हिच्यापुढें वाटती दासी ॥ चपळतेजें सहजेंसी ॥ तळपत आहे बाळी हे ॥१२०॥

सहज सोडोनि प्रत्योदक ॥ नाद दर्शबी अलौलिक ॥ पाहतेपणीं पडूनि टक ॥ विस्मयातें पडती त्या ॥२१॥

वाद्यनादानें व्यक्तींत ॥ मेळवीं ताल अति अदभुत ॥ परी सकळ शैल्यांचे चक्षु तेथ ॥ एका ठायीं मीनले ॥२२॥

कलिंगा मुख्य नायकिणी ॥ परी पुरवंडा दैन्यवाणी ॥ जैसें उदया येतां तरणी ॥ सकळ तेजा लोषती ॥२३॥

असो नाट्यदारा कलिंगेसहित ॥ उभ्या राहिल्या करुं नृत्य ॥ तैं कटीं कवळूनि मृदंगातें ॥ कुशळ वाजवी पुरवंडा ॥२४॥

संगीत स्वरित गायन ॥ शैल्या सकळ तुकावती मान ॥ अहा अहा बोलूनि वचन ॥ धन्य म्हणती कलिंगा ॥२५॥

सकळ शैल्या सभांगणीं ॥ त्यांत मच्छिंद्रनाथ कनकासनीं ॥ कीं पदमाळिके चिंतामणी ॥ हिरा चमक दावीतसे ॥२६॥

पुढारां पाहूनि गुरुनाथ्य ॥ मनच्या मनीं नमन करीत ॥ परम हेलावे आनंदें चित्त ॥ म्हणे कृतार्थ झालों मी ॥२७॥

आतां श्रीगुरुचे पाहिले चरण ॥ सकळ झालों तापहीन ॥ मग स्फुरण ये कुशळपणीं ॥ वाद्यकळा मिरवीतसे ॥२८॥

तैं नृत्य गीत संगीत होतां ॥ पाहूनि लाजे विधिदुहिता ॥ लाजत अप्सरा गंधर्व माथा ॥ ठेऊनि पाहती चरणांतें ॥२९॥

तानमान रंगप्रकार ॥ तल्लीन झाले सकळ भार ॥ मान तुकावूनि नाथ मच्छिंद्र ॥ अहा अहा म्हणतसे ॥१३०॥

मग परिधानावया उंच वस्त्र ॥ काढूनि हस्तें देत मच्छिंद्रनाथ ॥ तों पुढारा पाहुनि हर्ष बळवंत ॥ लाघवकळे वर्तवी ॥३१॥

मृदंगवाद्य वाजवितां ॥ अदभुतपण कुशळता ॥ तया नादातें अक्षरव्यक्ता ॥ भांतीभांती काढितसे ॥३२॥

त्या अक्षरांमाजी अक्षर ॥ मच्छिंद्रनामे चमत्कार ॥ दावूनि पुढें तोचि व्यवहार ॥ रंगासमान नाचवी ॥३३॥

मृदंग अक्षरीं तैसीं चर्या ॥ दावीतसे गुरुवर्या ॥ ” चलो मच्छिंदर गोरख आया ” ॥ पुन्हा अक्षरें आच्छादी ॥३४॥

परी अक्षरें मच्छिंद्रातें ॥ श्रवण होतां पाहे भवतें ॥ चित्ती चाकाटूनि म्हणे येथें ॥ कोठूनि आला गोरक्ष ॥३५॥

येरीकडे सहज चालीं ॥ गोरक्ष वाजवी गायनपाउलीं ॥ रंजीत देखतां गुरुमाउली ॥ तीचि अक्षरें आणीतसे ॥३६॥

आणिता अक्षरें पूर्वव्यक्त ॥ होतांचि मच्छिंद्रु दचकत ॥ भंवतें पाहूनि गोरक्षनाथ ॥ कोठे आहे म्हणतसे ॥३७॥

शैल्या आणि कलावासिनी ॥ तयासी व्यक्त न पाहतां नयनीं ॥ कोठूनि पडतसें अक्षरघ्वनी ॥ श्रवणीं आमुचे साजणी ॥३८॥

पिशाचवाणी भंवतीं पाहतसे ॥ घडीघडी चित्त दचकतसे ॥ थडथडोनी हदय उडतसे ॥ आला गोरक्ष म्हणोनी ॥३९॥

मग न आवडे सभा कनकासन ॥ मुख वाळलें झालें म्लान ॥ मग कोणी ऐकेना गायन चित्तीं फार व्यापिले ॥१४०॥

” चलो मच्छिंदर गोरख आया ” ॥ जंव जंव अक्षरें हीं ऐकूनियां ॥ तंव तंव दचकूनि गेली काया ॥ काळिमा तेव्हां येतसे ॥४१॥

तंव पाहूनि कीलोतळा ॥ हदयी पेटूनि चिंतानळा ॥ काळिंबी काया म्हणूनि सकळा ॥ रोमांच उठती शरीरी ॥४२॥

तंव पाहूनि कीलोतळा ॥ म्हणे महाराजा तपपाळा ॥ सुरस रंगीं मुखकमळा ॥ काळिंबी कां वरियेली ॥४३॥

येरी म्हणे वो मैनाकिनी ॥ मातें दिसते विपरीत करणी ॥ मच्छिंद्रशिष्य गोरक्ष अवनी ॥ भय आहे तयाचें ॥४४॥

तो परम पवित्र भक्तचूडामणी ॥ विषया नातळे इंद्रियदमनीं ॥ महाप्रतापें तपोखणी ॥ बैरागी तो असे हो ॥४५॥

अगे तो येतां तव पट्टणीं ॥ नेईल मातें स्वदेशअवनीं ॥ मग तव रतीची सुखयामिनी ॥ गोरक्षअंकीं नासेल ॥४६॥

ऐसें ऐकतां कीलोतळा ॥ मारुतिसूचनेचा खूणगरळा ॥ हदयीं व्यापूनि जाळूं लागला ॥ मुख कोमाविति पैं झाली ॥४७॥

मग तो रंग नाट्यकृती ॥ विरस होऊनि नावडे चित्तीं ॥ हदयालयीं ते चिंताभगवती ॥ नांदती झाली प्रत्यक्ष ॥४८॥

नाट्यरंगाचा आनंदवेष ॥ बळी आव्हानिला एकाचि भाष ॥ मग रंगदेवता पडूनि ओस ॥ उठवी आपुल्या ठाण्यातें ॥४९॥

जैसी पयसैंधवा पडे गांठीं ॥ मग विरस होऊनि नासल्या गोष्टी ॥ मिरवला हा तन्न्याय पोटीं ॥ भय उभयतां आतळे ॥१५०॥

परी ती चतुर मैनाकिनी ॥ गायनस्वर आव्हान कानीं ॥ तों मृदुंगवाद्यीं उठोनि ध्वनि ॥ चलो गुप्त गोरख आया ॥५१॥

ऐसा नाद अक्षरस्थित ॥ कीलोतळा श्रवण करीत ॥ मग बोलावूनि कलावंत ॥ उत्तरातें आराधी ॥५२॥

म्हणे तव सारंगी संगीती ॥ वाजत आहे उत्तमा गतीं ॥ परी आमुच्या साजसंग्रहाप्रती ॥ आजी पाहूं वाजवोनी ॥५३॥

ऐसें ऐकतां कलिंगा पद्मिनी ॥ म्हणे आणा पाहूं वाजवोनी ॥ मग ती कीलोतळा आज्ञापोनी ॥ साज आणूनि ठेवितसे ॥५४॥

तोंही साज पुढें घेऊनी ॥ वाजविती कुशळपणीं ॥ परी सुस्वर गाण्यांत अक्षर पूर्ण ॥ तेंचि काढी पुन्हां पुन्हां ॥५५॥

तेही ऐकूनि मैनाकिनी ॥ मग सेविका आपुली कलावंतिनी ॥ कलिंगाचा साज देऊनी ॥ उभी केली पाठीमागें ॥५६॥

तीतें सांगे रहस्ययुक्ती ॥ पुढारां वाद्यें अक्षरें काढिती ॥ त्याचि नीतीं अक्षरस्थिती ॥ तूंही बोलवीं मृदंगा ॥५७॥

परी ती वाजवितां कलावंतिणी ॥ तैसी अक्षरें न येती कानीं ॥ मग पुढें तिचा हात धरोनि ॥ एकांतासी पैं गेली ॥५८॥

सलीलपणीं चरणीं माथा ॥ ठेवूनी पुसे तीसी वार्ता ॥ माये तूं कोण सांग आतां ॥ सकळ संशय सोडूनी ॥५९॥

जरी ही गोष्ट ठेविसी चोरुन ॥ तरी तुज तुझ्या गुरुची आण ॥ मातें वदें कीं प्रांजळपण ॥ कोण कोणाची तूं अससी ॥१६०॥

ऐसी भूपिणी बोलतां वचन ॥ मनांत विचारी गोरक्षनंदन ॥ प्रगट होण्याचा समय पूर्ण ॥ हाचि सुलक्षण दिसतसे ॥६१॥

मग बोलता झाला प्रांजळ वचन ॥ माये मी नसें सर्वथा कामिण ॥ श्रीमच्छिंद्राचा प्रिय नंदन ॥ गोरक्षानामें मिरवतसें ॥६२॥

तरी स्त्रीवेषनटी नारी ॥ नटोनि निघीं तव राजद्वारीं ॥ ऐसे ऐकतां ती सुंदरी ॥ पुन्हा चरणी लोटली ॥६३॥

मग पुरुषपरिधान आणोनि त्वरित ॥ श्रीगोरक्षनाथा नेसवीत ॥ म्हणे तूं माझा सुत ॥ भेटलासी दैवानें ॥६४॥

पूर्वी नाथानें नामाभिधान ॥ तब रुपीं केलें निवेदन ॥ निवेदन होतांचि तनमनप्राण ॥ तव भेटी उदेले ॥६५॥

उदेले परी सांगूं काय ॥ जैसें सेवितां कां जगन्याय ॥ कीं गृहीं वत्स काननीं गाय ॥ परी प्राण वत्सा ठेवीतसे ॥६६॥

कीं जलावेगळी मासोळी ॥ होतां रिघूं पाहे पुन्हां जळीं ॥ तन्न्यायें मोहकाजळी लागली ॥ तुजसाठीं मज बा रे ॥६७॥

मग हाटकशृंगार करुनि व्यक्त ॥ जडितकोंदणीं लेववीत ॥ रत्नमुद्रिका रणबिंदीसहित ॥ मुक्ततुरा लाविला ॥६८॥

भरजरीचे कनकवर्णी ॥ परिधानिला चीरभूषणीं ॥ मस्तकीं मंदिल नवरत्नी ॥ शिरपेंच वरी जडियेला ॥६९॥

हस्ताग्रीं बाहुवट ॥ हेमकोंदणीं लखलखाट ॥ सर्व भूषणीं तेजवट ॥ शृंगारिला नाथ तो ॥१७०॥

मग हस्त धरुनि कीलोतळा ॥ येती झाली सभामंडळा ॥ येतांचि मच्छिंद्रें देखिली डोळां ॥ पुरुषव्यक्त कामिनी ॥७१॥

मनांत म्हणे मच्छिंद्रनाथ ॥ पुरुष कैंचा आला येथ ॥ निकट येतां कीलोतळेतें ॥ हस्तें खुणावी कोण तो ॥७२॥

येरीकडे हस्तखुणे संकेतीं ॥ पाहूनि म्हणे गोरक्षजती ॥ तुमचा उद्देश धरुनि चित्तीं ॥ भेटीलागीं पातला ॥७३॥

परी आज उदेला दैवआदित्य ॥ भेटला माझा प्राणसुत ॥ सकळ राज्याचा धैर्यवंत ॥ बाळ गोरक्ष माझा हा ॥७४॥

आतां सकळ कांचणी ॥ फिटूनि गेली अंतःकरणीं ॥ सकळ वैभव राजमांडणी ॥ संगोपील बाळ हा ॥७५॥

आणि पाठिंबा बळिवंत ॥ सहोदर वडील गोरक्षनाथ ॥ धाकुटा मीन तुमचा सुत ॥ संगोपीलं तयासी ॥७६॥

म्हणूनि समूळ माझी कांचणी ॥ फिटून गेली दूर अवनीं ॥ वृद्धापकाळीं चक्रपाणी ॥ कृपें वेष्टिला आपणासी ॥७७॥

ऐसें बोलतां मैनाकिनी ॥ गोरक्ष हास्य करी मनीं ॥ चित्तीं म्हणे बळेंचि तरणी ॥ अंधारचीरी भूषीतसे ॥७८॥

आम्ही विरक्त शुद्ध वैष्णव ॥ आम्हां कासयासी वैभव ॥ विधवेलागीं कुंकुमटेव ॥ खटाटोप कासया ॥७९॥

कीं परिसालागीम कनक शृंगार ॥ कीं तक्रीं तुष्टती देव अमर ॥ तैसे आम्ही विरक्त थोर ॥ राजवैभव कासया ॥१८०॥

कीं ग्रामगौतमींची कास ॥ दुग्ध काढूनि अंजुळीस ॥ तें पयोब्धीस पाजूनि सुरस ॥ तुष्ट चित्तीं मिरवला ॥८१॥

कीं सकळ महीचा नृपनाथ ॥ अंजुळी धान्याचा गरजवंत ॥ कीं मित्र तेजाची भिक्षा मागत ॥ काजव्याचें जाऊनि ॥८२॥

तयाचि न्यायें आम्हांसी वैभव ॥ कायसें पद थोर राणीव ॥ येरी जल्पतसे आपुला भाव ॥ निःसंगा संग जाऊनी ॥८३॥

परी असो कार्यापुरती ॥ ऐकूनि घ्यावी येउती मात ॥ श्रीगुरु मर्जी आली करतलांत ॥ मारुं लाथ वैभवासी ॥८४॥

ऐसे गोरक्ष कल्पूनि मनीं ॥ येरीकडे मच्छिंद्रमुनी ॥ कीलोतळेचे शब्द ऐकूनी ॥ आसनाहूनि ऊठिला ॥८५॥

अतिप्रेमा दाटूनि पोटीं ॥ गोरक्षगळां घातली मिठी ॥ करीं कवळूनि हदयपोटीं ॥ प्रेमे सदगद आलिंगिला ॥८६॥

मग कलिंगेतें पाचारुन ॥ अमूप द्रव्य दिधलेंख वसन ॥ गौरवूनि तियेचें मन ॥ स्वस्थानातें बोळविलें ॥८७॥

येरीकडे मंडपांत ॥ शैल्यासहित मच्छिंद्रनाथ ॥ निकट बैसवूनि गोरक्षातें ॥ योगक्षेम पुसतसे ॥८८॥

बद्रिकाश्रमीं तपोराहाटी ॥ तितुकें सांगे गोरक्षजेठी ॥ कंटकाग्रीं पादांगुष्ठी ॥ द्वादश वर्षे संपादिलीं ॥८९॥

उपरी तप झालिया पूर्ण ॥ माव करी उमारमण ॥ सकळ देवां बोलावून ॥ आतिथ्यही मिरवलें ॥१९०॥

ऐशी झालिया तपराहाटी ॥ परी तव वियोग साहीना पोटीं ॥ क्षणाक्षणां होऊनि कष्टी ॥ शोक करुं रिघतसें ॥९१॥

जया पदाचें होता स्मरण ॥ अंतीं जठर जाय वेष्टून ॥ म्लानवदनीं ओस कानन ॥ दाही दिशा दिसतसे ॥९२॥

मग उदकापासूनि जैसा मीन ॥ तरफडून देऊं पाहत प्राण ॥ तेवीं माझें अंतःकरण ॥ दुःखडोहीं हेलावे ॥९३॥

परी प्रारब्धयोग दारुण ॥ येथें भेटले तुमचे चरण ॥ आतां गेलियां प्राण ॥ एकाकी कदा न वसें मी ॥९४॥

ऐसें ऐकतां वचनयुक्तीं ॥ पुन्हां धरीतसे हदयाप्रती ॥ म्हणे वत्सा तुज मागुती ॥ एकांगें कदा न करीं मी ॥९५॥

मुळींहून बाळपण ॥ तुवां न जाणिलें मजविण ॥ सकळ करुनि लालन ॥ स्थावरपणीं मिरविलें ॥९६॥

जगावेगळी जळमासोळी ॥ विभक्त न होय कवणे काळीं ॥ तेवीं मम चित्तदरींत तपोमौळी ॥ विभक्त झाला नाहींस ॥९७॥

परी न व्हावें तें घडूनि आलें ॥ श्रीमारुतीनें मज गोविलें ॥ गौरविलें परी सदा फोलें ॥ वैभव वाटे तुजविण बा ॥९८॥

बा भोजन करितां षड्रसान्नीं ॥ तुझें स्मरण होतसे मनी ॥ बा तो ग्रास ठेवितां आननीं ॥ विषासमान वाटतसे ॥९९॥

मग अश्रूने पूर्ण भरती नयन ॥ तुजजवळी लागे माझा प्राण ॥ मग मूर्तिमंत तूं जठरीं येऊन ॥ उभा राहसी माझिया ॥२००॥

मग ताप उपजे मनांत ॥ अहा बाळकासी टाकोनि वनांत ॥ आलों मी फिरत फिरत ॥ हेंचि चिंतन निशिदिनीं ॥१॥

बा तुजविण करितां तीर्थभ्रमण ॥ परी ओस दिशा बोभावे मन ॥ मनांत जल्पें वत्स टाकून ॥ कैसा आलों मी पापी ॥२॥

ऐसें बोलता मात ॥ मग बोलता झाला गोरक्षनाथ ॥ हे महाराजा माझी ऐकें मात ॥ तूतें सुत बहु असती ॥३॥

जया देशीं कराल गमन ॥ तेथेंचि सुत कराल निर्माण ॥ मग तुमच्या मोहाचें आवरण ॥ वांटले जाय महाराजा ॥४॥

परी एकचि तूं माझी आई ॥ मन माझें एकेच ठायीं ॥ मग जैसी पहा गती पाहीं ॥ जळाविण मीनातें ॥५॥

कीं अर्का कुमुदिनी असती अपार ॥ तो मोह करील कोणावर ॥ परी कुमुदा तो एकचि मित्र ॥ सुखापरी आणाया ॥६॥

कीं चंद्रा चकोर असती बहुत ॥ परी चकोरा एकचि रोहिणीनाथ ॥ त्याचि न्यायें जननी मातें ॥ अससी एकचि मातेंख तूं ॥७॥

जळांत असती बहुत जळचर ॥ परी जळचरा असतें एकचि नीर ॥ तन्न्यायें मज माहेर ॥ एकचि मच्छिंद्र आराधिला ॥८॥

श्लाघ्य पुरुषा अन्य युवती ॥ परी युवतीसी एकचि पती ॥ तन्न्यायें कृपामूर्ती ॥ माझें जीवन तूं अससी ॥९॥

घानासी अपार असती चातक ॥ परी चातकासी घन तो एक ॥ तेवीं तूं मातें जननीजनक ॥ एकचि अससी महाराजा ॥२१०॥

ऐसें म्हणूनि गोरक्षनाथ ॥ नेत्रीं आणी अश्रुपात ॥ तें पाहूनि अंतरिक्षसुत ॥ प्रेमें हदयीं कळवळला ॥११॥

म्हणे तान्हुल्या सत्य वचन ॥ तुज कोणी नसे मजविण ॥ ऐसें म्हणूनि मुखचुंबन ॥ कुरवाळूनि धरीतसे ॥१२॥

मग सभास्थान विसर्जून ॥ पाकशाळेंत उभयतां जाऊन ॥ श्रीगोरक्षा ताटीं घेऊन ॥ भोजनातें सारिलें ॥१३॥

भोजन झालिया एकासनीं ॥ निद्रा करिती उभय जणीं ॥ दिनोदयीं स्नाने करोनि ॥ एकासनीं बैसती ॥१४॥

एका अंकीं मीननाथ ॥ एका अंकीं गोरक्षसुत ॥ कनकासनीं राजसभेत ॥ घेऊनि नाथ बैसती ॥१५॥

जैसा वक्रतुंड षडानन ॥ घेऊनि बैसे उमारमण ॥ कीं माय यशोदेजवळी रामकृष्ण ॥ उभय अंकीं मिरवती ॥१६॥

असो आतां हें कथन ॥ पुढें सुखें झालें संपन्न ॥ तें पुढिले अध्यायीं निरुपण ॥ होईल श्रोती श्रवण कीजे ॥१७॥

तें मच्छिंद्र उभय अंकीं ॥ घेऊनि सुतसुताची फेडील बाकी ॥ शैल्यांनी वेष्टूनि सुखासनीं हाटकीं ॥ नित्य मिरवे मच्छिंद्र तो ॥१८॥

नरहरिवंशीं धुन्डीसुत ॥ नरहरि मालू नाम ज्यातें ॥ तो श्रीगुरुकृपें रसाळ कथेतें ॥ निवेदील श्रोतियां ॥१९॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ विंशतितमाध्याय गोड हा ॥२२०॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ अध्याय ॥२०॥ ओव्या ॥२२०॥


श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय २१

श्रीगणेशाय नमः

जयजयाजी जगन्नायका ॥ जगज्जनका जगत्पाळका ॥ विश्व व्यापूनि अवशेषका ॥ विश्वंभर म्हणविसी ॥१॥

जरी सकळ विद्यांचे भरणें ॥ करिसी कायावाचामनें ॥ तरी मीच काय विश्वार्तीनें ॥ उरलों असें महाराजा ॥२॥

जरी मी असें विश्वांत ॥ तरी पाळण होईल सहजस्थितींत ॥ ऐसें असोनि संकट तुम्हातें ॥ कवण्या अर्थी घालावें ॥३॥

परी मम वासनेची मळी ॥ रसनांतरी हेलावली ॥ तयाचीं सुकृत फळें जीं आलीं ॥ तीं तुज पक्क ओपीत महाराजा ॥४॥

तरी तेंही तुज योग्य भूषणस्थित ॥ मज न वाटे पंढरीनाथ ॥ परी सूक्ष्म शिकवीत भक्तां मात ॥ मोक्षगांवांत प्रणविसी ॥५॥

तरी आतां असो कैसें ॥ स्वीकारिलें बोबड्या बोलास ॥ मागिले अध्यायीं सुधारस ॥ गोरक्ष मच्छिंद्र भेटले ॥६॥

भेटले परी एकविचारीं ॥ गुरुशिष्य असती त्या धवळारी ॥ नानाविलासभोगउपचारी ॥ भोगताती सुखसोहळे ॥७॥

शैल्यराजनितंबिनी ॥ मुख्य नायिका कीलोतळा स्वामिनी ॥ मोह दर्शवी गोरक्षालागुनी ॥ स्वामिनी ॥ मोह दर्शवी गोरक्षालागुनी ॥ स्वसुताहूनि आगळा ॥८॥

आसन वसन भूषणांसहित ॥ स्वइच्छें तया उपचारीत ॥ पैल करुनि मीननाथ ॥ संगोपीत गोरक्षबाळा ॥९॥

जैसा चातकालागी घन ॥ स्वलीलें करी उदकपान ॥ कीं तान्हयाला कासें लावून ॥ पय पाजिती गौतमी ॥१०॥

पाजी परी कैशा स्थिति ॥ उभवोनि महामोहपर्वतीं ॥ वत्सासी लावोनि कांससंपत्ती ॥ शरीर चाटी तयाचें ॥११॥

त्याची नीतीं कीलोतळा ॥ संगोपीत गोरक्षबाळा ॥ भोजन घालीत अपार लळा ॥ तान्हयातें पाजीतसे ॥१२॥

भलतैसें ललितपणें ॥ श्रीगोरक्षा घाली भोजन ॥ निकट मक्षिका उडवोन ॥ निजकरें जेववीतसे ॥१३॥

नाना दावोनि चवणे ॥ अधिकाधिक करवी भोजन ॥ ऐसिये परी माउलपण ॥ नित्य नित्य वाढवी ॥१४॥

ऐसा असोनि उपचार ॥ बरें न मानी गोरक्ष अंतरें ॥ चित्तीं म्हणे पडतो विसर ॥ योगधर्माविचाराचा ॥१५॥

ऐसें चिंतीत मनें ॥ मग भोग तो रोगाचि जाणें ॥ जेवीं षड्रस रोगियाकारणें ॥ विषापरी वाटती ॥१६॥

मग नित्य बैठकीं बैसून ॥ एकांतस्थितीं समाधान ॥ धृति वृत्ति ऐसी वाहून ॥ करी भाषण मच्छिंद्रा ॥१७॥

हे महाराजा योगपती ॥ आपण बसता या देशाप्रती ॥ परीं हें अश्लाघ नाथपंथीं ॥ मातें योग्य दिसेना ॥१८॥

कीं पितळधातूचें तगटीं हिरा ॥ कदा शोभेना वैरागरा ॥ कीं राव घेऊनि नरोटीपात्रा ॥ भोजन करी श्लाघ्यत्वें ॥१९॥

श्रीमूर्ति चांगुळपणें ॥ महास्मशानीं करी स्थापन ॥ तैसा येथें तुमचा वास जाण ॥ दिसत आहे महाराजा ॥२०॥

पहा जी योगधर्मी ॥ तुम्ही बैसलां निःस्पृह होवोनि ॥ तेणेंकरुनि ब्रह्मांडधामीं ॥ कीर्तिध्वज उभारिला ॥२१॥

मृत्यू पाताळ एकवीस स्वर्ग ॥ व्यापिलें आहे जितुकें जग ॥ तितुकें वांच्छिती आपुला योग ॥ चरणरज सेवावया ॥२२॥

ऐसी प्रज्ञा प्रौढपणीं ॥ असोनि पडावें गर्ते अवनीं ॥ चिंताहारक चिंतामणी ॥ अजाग्रीवी शोभेना ॥२३॥

तरी पाहें कृपाळु महाराज ॥ उभारिला जो कीर्तिध्वज ॥ तो ध्रुव मिरवेल तेजःपुंज ॥ ऐसें करी महाराजा ॥२४॥

ऐसें झालिया आणिक कारण ॥ तुम्ही पूर्वीचे अहां कोण ॥ आला कवण कार्याकारण ॥ कार्याकार्य विचारा ॥२५॥

कीं पूर्वी पहा ब्रह्मस्थिती ॥ श्रीकविनारायणाची होती ॥ लोकोपकारा अवतार क्षितीं ॥ जगामाजी मिरवला ॥२६॥

आपण आचरलां तपाचरण ॥ शुभमार्गा लावावें जन ॥ धर्यपंथिका प्रज्ञावान ॥ जगामाजी मिरवावया ॥२७॥

ऐसें असतां प्रौढपण ॥ ते न आचारावे धर्म ॥ मग जगासी बोल काय म्हणवोन ॥ अर्थाअर्थी ठेवावे ॥२८॥

जात्या वरमाया आळशीण ॥ मम काय पहावी वर्‍हाडीण ॥ राव तस्कर मग प्रजाजनें ॥ कोणे घरी रिघावें ॥२९॥

कीं अर्कचि ग्रासिला महातिमिरीं ॥ मग रश्मी वांचती कोणेपरी ॥ उडुगणपती तेजविकारी ॥ जात्या होती तेवीं तारागणें ॥३०॥

तेवीं तुम्ही दुष्कृत आचरतां ॥ लोकही आचरती तुम्हांदेखतां ॥ अवतारदीक्षेलागीं माथां ॥ दोष होईल जाणिजे ॥३१॥

तरी आधींच असावें सावधान ॥ अर्थाअर्थी संग वर्जून ॥ अंग लिप्त मलाकारणें ॥ तिळतुल्यही नसावें ॥३२॥

नसतां ओशाळ कोणापाठीं ॥ कळिकाळातें मारूं काठी ॥ निर्भयपणें महीपाठीं ॥ सर्वां वंद्य होऊं कीं ॥३३॥

तरी महाराजा ऐकें वचन ॥ सकळ वैभव त्यजून ॥ निःसंग व्हावें संगेंकरुन ॥ दुःखसरिता तरवी ॥३४॥

प्रथमचि दुःखकारण ॥ विषयहस्तें बीज रजोगुण ॥ रजा अंकुर येत तरतरोन ॥ क्रोधपात्रीं हेलावे ॥३५॥

मग क्रोधयंत्रीं तृतीयसंधी ॥ मदकुसुमें क्रियानिधी ॥ मदकुसुमांचे संधीं ॥ मत्सरगंध हेलावे ॥३६॥

गंधकुसुमें ऐक्यता ॥ होतांचि दैवे विषयफळता ॥ मग विषयफळीं अपार महिमता ॥ मोहर शोभें वेष्टीतसे ॥३७॥

मग वेष्टिलिया मोहर अंतीं ॥ दैवें फळें पक्कपणा येती ॥ मग तीं भक्षितां दुःखव्यावृत्तीं ॥ यमपुरी भोगावी ॥३८॥

मग तें शिवहळाहळाहूनि अधिक ॥ कीं महा उरगमुखींचे विख ॥ मग प्राणहारक नव्हे सुख ॥ दुःखाचे परी सोशीतसे ॥३९॥

मग दुःखाचिये उपाधी ॥ शोधीत फिराव्या ज्ञानऔषधी ॥ तरी प्रथम पाऊल कृपानिधी ॥ भिवोनियां ठेवावें ॥४०॥

तरी आतां योगद्रुमा ॥ चित्तीं निवटोनि विषयश्रमा ॥ सावधपणें योगक्षेमा ॥ चिंता मनीं विसरावी ॥४१॥

ऐसी विज्ञापना युक्तिप्रयुक्तीं ॥ करुनि तोषविला मच्छिंद्रयती ॥ तंव निवटूनि विषयभ्रांती ॥ विरक्तता उदेली ॥४२॥

मग म्हणे वो गोरक्षनाथा ॥ तूं जें बोललासी तें यथार्था ॥ निकें न पाहती अशा वृत्ता ॥ भ्रष्टदैवा दिसेना ॥४३॥

तरी आतां असो कैसें ॥ जाऊं पाहूं आपुला देश ॥ ऐसें म्हणोनि करतळभाष ॥ गोरक्षकातें दीधली ॥४४॥

कीं गंगाजळनिर्मळपण ॥ परी महीचे व्यक्तकरोन ॥ गढूळपणें पात्र भरुन ॥ समुद्रातें हेलावे ॥४५॥

भाक देऊनि समाधान ॥ चित्तीं मिरवी गोरक्षनंदन ॥ मग गुरुशिष्य तेथूनि उठोन ॥ पाकशाळे पातले ॥४६॥

पाकशाळे करुनि भोजन ॥ करिते झाले उभयतां शयन ॥ कीलोतळामेळें मच्छिंद्रनंदन ॥ शयनीं सुगम पैं झाले ॥४७॥

झाले परी मच्छिंद्रनाथ ॥ कीलोतळेतें सांगे वृत्तांत ॥ म्हणे मातें गोरक्षनाथ ॥ घेऊनि जातो शुभानने ॥४८॥

जातो परी तव मोहिनी ॥ घोटपळीत माझे प्राणांलागुनी ॥ त्यातें उपाय न दिसे कामिनी ॥ काय आतां करावें ॥४९॥

येरी म्हणे तुम्ही न जातां ॥ कैसा नेईल कवणे अर्थी ॥ मच्छिंद्र म्हणे मज सर्वथा ॥ वचनामाजी गोंविले ॥५०॥

विरक्तपणाच्या सांगोनि गोष्टी ॥ वैराग्य उपजविलें माझे पोटीं ॥ तया भापे संतुष्टदृष्टी ॥ वचनामाजी गुंतलों ॥५१॥

तरी आतां काय उपाय ॥ सरला सर्वस्वी करुं काय ॥ तुझा देखोनि विनय ॥ जीव होय कासाविस ॥५२॥

तरी आतां ऐक वचनीं ॥ उपाय आहे नितंबिनी ॥ तुवांचि त्यातें घ्यावें मोहोनी ॥ बहुधा अर्थीकरोनियां ॥५३॥

येरी म्हणे जी प्राणनाथ ॥ म्यां उभविला उपायपर्वत ॥ परी तो न रोधी वज्रवंत ॥ विरक्तीतें मिरवी तो ॥५४॥

ऐसें असतां त्या प्रवाहीं ॥ उपाय मोहाचा चालत नाहीं ॥ मच्छिंद्र म्हणे करुनि पाहीं ॥ यत्न आणिक पुढारां ॥५५॥

ऐसें भाषण करितां उभयतां ॥ निशा लोटली सर्वही असतां ॥ उपाय मोहाचा चिंतन करितां ॥ गोरक्ष येऊनि बोलतसे ॥५६॥

म्हणे माय वो ऐक वचन ॥ मज करुं वाटतें तीर्थाटन ॥ तरी मच्छिंद्रनाथा सवें घेऊन ॥ तीर्था आम्ही जातसों ॥५७॥

येरी म्हणे वत्सा ऐक ॥ तूं ज्येष्ठ सुत माझा एक ॥ तूं वरिष्ठ अलोलिक ॥ मम मनीं ठसलासी ॥५८॥

कीं स्त्रिया राज्यसंपत्ती ॥ त्यांत तूं शोभसी नृपती ॥ आणि धाकटा बंधु धरुनि हातीं ॥ शत्रु जिंकशील वाटतसे ॥५९॥

तरी तूं सकळ राज्याचा धीर ॥ आम्ही उगलेंचि सुख घेणार ॥ अन्नवस्त्राचा अंगीकार ॥ करुनि असों तव सदनीं ॥६०॥

बा रे नाथाचा वृद्धापकाळ ॥ दिवसेंदिवस वाढतसे सबळ ॥ तैसें माझें शरीर विकळ ॥ दिवसेंदिवस होईल कीं ॥६१॥

मग आम्हां वृद्धांचें दीनपण ॥ हरील बा कोण तुझ्याविण ॥ आणि धाकट्या बंधूचें संगोपन ॥ कोण करील तुजवांचुनी ॥६२॥

बाळा तुजवांचूनि मनाचें कोड ॥ कोण पुरवील तूं गेल्या पुढें ॥ मायेवांचूनि न ये रडे ॥ संगोपिता तूं अससी ॥६३॥

बा देवा रे आमुचा सकळ तिलक ॥ तूं अससी राजनायक ॥ तूं गेलिया आम्हीं भीक ॥ घरोघरीं मागावी ॥६४॥

तरी ऐसें विपत्तिकोडे ॥ मज न दाखवी दृष्टीपुढें ॥ तरी मज योजूनि विहीरआडें ॥ लोटूनि मग जाई पां ॥६५॥

ऐशा बोलतां रसाळ युक्ती ॥ परी न मोहे गोरक्ष चित्तीं ॥ जैसें मेघसिंचन झालिया पर्वतीं ॥ अचळ भंगावीण तो ॥६६॥

ऐसें कीलोतळेचें ऐकूनि वचन ॥ म्हणे माय तूं करिसी सत्य भाषण ॥ परी काय गे तूतें बोलून ॥ वैभव माझें दाखवावें ॥६७॥

तिहीं लोकीं गे चार खुंट ॥ आमुचे असे गे राज्यपट ॥ तूतें बोलाया अधिक वरिष्ठ ॥ काय स्त्रियांचें राज्य हें ॥६८॥

तरी माय वो आतां कैसें ॥ आम्ही जातों तीर्थावळीस ॥ तुम्ही स्वस्थ असूनि ग्रामास ॥ संपत्ती भोगा आपुली ॥६९॥

आम्हांसी काय संपत्ति कारण ॥ आमुची संपत्ति योगधारण ॥ सुकृतक्रियाआचरण ॥ सुखसंपन्न भोगावें ॥७०॥

ऐसें निकट बोलूनि तीतें ॥ म्हणे आज्ञा द्यावी जी आमुतें ॥ येरी म्हणे जी ऐक मातें ॥ मम हेतू जाऊं नये ॥७१॥

चित्तीं विचारी कीलोतळा ॥ परम दक्षतेनें या बाळा ॥ उपरी दाराविषय घालोनि गळां ॥ यत्नेंकरुनि अडकावूं ॥७२॥

हें योजूनि म्हणे जाणें तीर्थासी ॥ तरी ऐक बा अटक घालूं तुजसी ॥ इतुका संवत्सर मजपासीं ॥ वस्ती करुनि असावें ॥७३॥

येरी म्हणे एक मातें ॥ षण्मास लोटले मज येथें ॥ आतां न राहे माते कल्पांतें ॥ तीर्थावळी जाणें कीं ॥७४॥

याउपरी बोले कीलोतळा ॥ षण्मास तरी संगती द्यावी मला ॥ थोडकियासाठीं उतावेळा ॥ होऊं नको मम वत्सा ॥७५॥

मग मी समाधानेंकरुन ॥ श्रीनाथ तुजसवें देऊन ॥ तीर्थावळीतें बोळवीन ॥ समारंभ पाडसा ॥७६॥

ऐसे बोलतां बोल रसाळ ॥ विवेकी ज्ञानतपोबाळ ॥ षण्मास वस्ती करुं सदनीं ॥ परी अमुक दिन निश्वय करोनी ॥ ठेवीं आम्हां जावया ॥७८॥

तो दिवस आलियापाठीं ॥ आम्ही न वसूं महीतळवटीं ॥ मग यत्न केलिया तुम्हीं कोटी ॥ फाल माते होतील ॥७९॥

तरी आतां कोणता दिन ॥ दावी माते निश्चयेंकरुन ॥ येरी म्हणे प्रतिपदकारण ॥ बोळवीन तुम्हांसी ॥८०॥

मुहूर्त संवत्सरप्रतिपदेस ॥ मग न पुसतां कोणास ॥ तया दिनीं गमन तुम्हांस ॥ भोजन झालिया करवीन ॥८१॥

ऐसा निश्चय मैनाकिनी ॥ बोलूनि स्थिर केला भुवनी ॥ पुढें कांहींएक दिवसांलागुनी ॥ गोरक्षातें पाचारी ॥८२॥

निकट बैसवूनि आपुलेजवळी ॥ अति स्नेहानें मुख कवळी ॥ म्हणे बा रे कामना मम हदयकमळीं ॥ वेधली असे एक ॥८३॥

कामना म्हणशील तरी कोण ॥ स्नुषा असावी मजकारण ॥ तरी उत्तम दारा तुज निपुण ॥ करुं ऐसें वाटतें ॥८४॥

मग मी बाळा स्नुषेसहित ॥ काळ क्रमीत बैसेन येथ ॥ तों तुम्हीं करुनि यावें तीर्थ ॥ आपुलें राज्य सेवाया ॥८५॥

षण्मास बाळा येथें अससी ॥ अंगीकारीं मुख्य संबंधासी ॥ अंगीकारिलिया तव मानसीं ॥ मोह माझा उपजेल ॥८६॥

म्हणशील तरी विधिपूर्वक ॥ लग्न तुझें करीन निक ॥ परी मम चित्ताचे काम दोंदिक ॥ फेडशी इतुकें पाडसा ॥८७॥

गोरक्ष ऐसे बोल ऐकूनी ॥ म्हणतसे ऐका मम जननी ॥ म्यां काता दोन गुरुकृपेनी ॥ वरिल्या आहेत जननीये ॥८८॥

वरिल्या आहेत तरी चांग ॥ नित्य भोगितों करुनि योग ॥ म्हणशील कवण नामीं सांग ॥ तरी कर्णमुद्रिका म्हणती त्यां ॥८९॥

तया कांतालागीं सोडून ॥ अन्य कांता न वरी व्यभिचारीण ॥ हें योग्य नव्हे मजकारण ॥ गुरुभक्ती जननीये ॥९०॥

ऐसें बोलतां गोरक्षनाथ ॥ कीलोतळा बैसली स्वस्थचित्त ॥ म्हणे नाथ हा विरक्त ॥ कदा नातळे विशयांतें ॥९१॥

यापरी लोटलिया त्या दिवशीं ॥ आणिका एके दिनीं परदेशीं ॥ एक शैली उत्तमराशी ॥ सेवेलागीं पाठविली ॥९२॥

भोजन झालिया रात्रीं निर्भर ॥ शैली संचरली तें मंदिर ॥ अत्युत्तम सारीपाट करें ॥ कवळोनियां पातली ॥९३॥

सदनीं संचरतां बोले वचन ॥ म्हणे हे गोरक्षनंदन ॥ मी सारीपाट करीं कवळून ॥ खेळावया आणिला कीं ॥९४॥

तरी खेळ खेळूं एकटभावें ॥ ऐसें उदेलें माझिया जीवें ॥ येरु म्हणे अवश्य यावें ॥ पूर्ण कामना करावया ॥९५॥

ऐसें म्हणतां नितंबिनी ॥ सारीपाट पसरुनि निकट येऊनी ॥ परी द्यूत खेळतां शुभाननी ॥ नेत्रबाण खोंचीतसे ॥९६॥

खोंचीत परी विषयपर ॥ बोल बोलत अनिवार ॥ बोल नव्हे तें महावज्र ॥ तपपर्वत मंगावया ॥९७॥

ऐसे बोलत आणिक कर्णी ॥ दाखवितसे नितंबिनी ॥ मौळीचा चीरपदर काढूनी ॥ भूमीवरी सोडीतसे ॥९८॥

श्रृंगारव्यक्त नेत्रकटाक्ष ॥ तुकवोनि खेळ खेळे गोरक्ष ॥ खेळ खेळतां मग प्रत्यक्ष ॥ जाणूनि चीर सरसावी ॥९९॥

उघडी एकचि जानू करुन ॥ दावी आपुलें नग्नपण ॥ परी तो विरक्त गौरनंदन ॥ विषयातें आतळेना ॥१००॥

मग नाना संवाद नाना स्तुती ॥ दावितां ती श्रमली युवती ॥ परी हा विरक्त कोणे अर्थी ॥ आतळेना तियेते ॥१॥

मग ती आपुले चित्तीं श्रमोन ॥ राहती झाली दीनवदन ॥ कीलोतळेतें वर्तमान ॥ सर्व सांगूनि गेलीसे ॥२॥

यावरी कीलोतळा संपत्तीसी ॥ गोरक्षा दावी भलते मिसीं ॥ रत्नमुक्तमाणिकराशी ॥ श्रृंगारादि अचाट ॥३॥

परी दावूनि सहजस्थित ॥ म्हणे वत्सा हें तुझेंचि वित्त ॥ चंद्रसूर्यअवधीपर्यंत ॥ भोगिसील पाडसा ॥४॥

ऐसें कीलोतळा ॥ परी हा न मळे आशामळा ॥ जेवीं मुक्ता लिंपिलिया काजळा ॥ श्वेतवर्ण सांडीना ॥५॥

ऐशा युक्तिप्रयुक्ती करितां ॥ निकट वृत्ति आली तत्त्वतां ॥ मग कीलोतळेच्या मोहे चित्ता ॥ नित्य हुंबाडा येतसे ॥६॥

मीननाथ जवळ घेऊन ॥ नेत्रीं लोटलें अपार जीवन ॥ ती आणि शैल्या सेवकी पाहून ॥ दुःखी होती तैशाचि ॥७॥

मग त्या म्हणती वो माय स्वामिनी ॥ आम्ही युवती ॥ कीलोतळेसी समजाविती ॥ ऐसें बोलतां दिनव्यावृत्ती ॥ प्रतिपदा आली असे ॥९॥

मग त्या दिवशी आनंदमहिमा ॥ गुढ्या उभारिल्या ग्रामोग्रामा ॥ परी श्रृंगाररुप प्रवाहोत्तमा ॥ मच्छिंद्रयोगी बुडाले ॥११०॥

कैचा आनंद कैंची पाकनिष्पत्ती ॥ कैंची गुढी शोकव्यावृत्ती ॥ सकळ ग्रामीं शैल्या युवती ॥ मच्छिंद्रयोगें हळहळल्या ॥११॥

एक म्हणती हा नाथ ॥ राज्यप्रकरणी प्रतापवंत ॥ उदार धैर्यपर्वत ॥ दयाळ आगळा मायेहुनी ॥१२॥

एक म्हणती चागुलपणा ॥ यापुढें उणीव वाटे मदना ॥ कनकारनीं सभास्थाना ॥ अर्कासमान वाटतसे ॥१३॥

एक म्हणती ऐसा पुरुष ॥ दैवें लाधला होता आम्हांस ॥ गोरक्ष विवसी आली त्यास ॥ घेऊनि मेला जातसे ॥१४॥

ऐशापरी बहुधा युक्तीं ॥ गोरक्षातें शिव्या देती ॥ अहो मच्छिंद्रअर्काप्रती ॥ राहुग्रह हा भेटला ॥१५॥

एक म्हणती नोहे गोरक्षक ॥ आम्हां भेटला यम देख ॥ मोहपाश घालूनि प्रत्यक्ष ॥ मच्छिंद्र प्राण नेतसे ॥१६॥

हा कोणीकडोनि आला मेला ॥ कां आमुच्या देशासी आला ॥ मच्छिंद्र मांदुस घेऊन चालला ॥ बलात्कारें तस्कर हा ॥१७॥

एक म्हणती अदैव पूर्ण ॥ ऐसें लाधलें होतें स्थान ॥ त्या सुखासी लाथ मारुन ॥ जात आहे करंटा ॥१८॥

काय करील अभाग्यपण ॥ घरोघरीं भीक मागून ॥ त्या तुकड्यांचें झाले स्मरण ॥ षड्रसान्न आवडेना ॥१९॥

उत्तम चीर अन्न भूषण ॥ सांडूनि करील चिंध्या लेपन ॥ महाल माड्या नावडे सदन ॥ सेवील कानन अदैवी ॥१२०॥

ऐसे बहुधा बहुयुक्ती ॥ बोलताती त्या युवती ॥ बोलूनी वियोगें आरंबळती ॥ मच्छिंद्र मच्छिंद्र म्हणोनि ॥२१॥

ऐसेपरी सकळ ग्रामांत ॥ संचरलीसे विकळ मात ॥ येरीकडे गोरक्षनाथ ॥ कुबडी फावडी संयोगी ॥२२॥

अंगी लेवूनी कंथाभूषण ॥ माळा गळां दाट घालून ॥ सिंगी सारंगी करीं कवळून ॥ नाथापाशीं पातला ॥२३॥

चरणीं अर्पूनियां भाळ ॥ म्हणे स्वामी आली वेळ ॥ उठा वेगीं उतावेळ ॥ गमन करावया मार्गात ॥२४॥

तें पाहूनि कीलोतळा ॥ सबळ उदक आणीत डोळा ॥ म्हणे स्थिर होई कां बाळा ॥ भोजन सारिल्या जाईजे ॥२५॥

मग पाक करुनि अति निगुती ॥ गुरुशिष्य बैसवूनि एक पंक्ती ॥ वाढितां बोलती झाली युवती ॥ विचक्षण कीलोतळा ॥२६॥

म्हणे महाराज मच्छिंद्रनाथ ॥ तुम्ही जातां स्वदेशांत ॥ परी मीननाथ तुमचा सुत ॥ ठेवितां कीं संगे नेतां ॥२७॥

नाथ म्हणे वो शुभाननी ॥ जैसे भावेल तुझिये मनीं ॥ तैसीच नीति आचरुनी ॥ मीननाथ रक्षूं गे ॥२८॥

मग बोलती झाली कीलोतळा ॥ तुम्ही संगे न्यावें बाळा ॥ येथें रक्षण केऊतें बाळा ॥ भुभुःकारी होईल कीं ॥२९॥

तुम्ही होतां निकट येथें ॥ म्हणवूनि भुभुःकार न बाधी त्यातें ॥ तुम्ही गेलिया कोण येथें ॥ रक्षण करील बाळाचें ॥१३०॥

आणिक एक घेत लक्ष ॥ मातें शापिलें वसू उपरिईशे ॥ तुमचा पिता जो प्रत्यक्ष ॥ वीर्यसंघ आराधिला ॥३१॥

तयाचा विचक्षण सबळ शाप ॥ मीं सोडिलें सिंहलद्वीप ॥ त्या शापाचें पूर्ण माप ॥ भरुनि आले महाराजा ॥३२॥

तरी उःशापाचा समय आला आतां ॥ फळासी येईल तुम्ही जातां ॥ उपरिचर वसू तुमचा पिता ॥ येऊनि नेईल मजलागीं ॥३३॥

मग बाळाचें संगोपन ॥ कोण करील मायेविण ॥ यातें जरी न्यावें स्वर्गाकारण ॥ मनुष्यदेह नयेचि ॥३४॥

तरी सांगाया हेंचि कारण ॥ मीननाथ सवें नेणें ॥ मग अवश्य म्हणे मच्छिंद्रनंदन ॥ भोजन करुन उठले ॥३५॥

कीलोतळाही भोजन करुनी ॥ मेननाथाकडे पाहूनी बोल न निघे तिचे वदनीं ॥ परी हदयीं डोंब पाजळला ॥३६॥

मच्छिंद्रमोहाच्या स्नेहेंकरुनि आपार ॥ अनिवार मोहाचे वैश्वानर ॥ पेट घेता शिखेपर ॥ दुःख आकाशीं प्रगटलें ॥३७॥

मोह उचंबळोनि अत्यंत चिंता ॥ नेत्रीं लोटली अश्रुसरिता ॥ तें पाहूनियां शैल्या समस्ता ॥ गोरक्षातें वेष्टिती ॥३८॥

म्हणती गोरक्षा ऐक वचन ॥ करुं नको रे कठिण मन ॥ मच्छिंद्र आमुचा घेऊनि प्राण ॥ जाऊं नको महाराजा ॥३९॥

पहा पहा सुखसंपत्ती ॥ राज्यवैभव केवीं गती ॥ ऐशा टाकूनि स्वसुखाप्रती ॥ कानन सेवूं नको रे ॥१४०॥

महाल मुलुख तुज हस्ती ॥ अश्व फिरणें चातकगती ॥ हें सुख टाकूनि राज्यसंपत्ती ॥ कानन सेवूं नको रे ॥४१॥

महाल मुलुख तुज स्वाधीन ॥ प्रजालोकादि करिताती नमन ॥ ऐसा टाकूनि बळमान ॥ कानन सेवूं नको रे ॥४२॥

हिरे रत्नें माणिक मोतीं ॥ परम तेजसी नक्षत्रज्योती ॥ स्वीकारुनि भूषणाप्रती ॥ सुखसंपत्ती भोगावी ॥४३॥

आम्ही झालों तुमच्या दासी ॥ नित्य आचरुं सेवेसी ॥ रतिसुखासी नटूं तैसें ॥ हें सुखसंपन्न भोगी कां ॥४४॥

कला कुशला विद्या सांग ॥ सभेस्थानीं रागरंग ॥ ऐसे टाकूनि प्रेमभोग ॥ कानन सेवूं नको रे ॥४५॥

जरी जरतारी दीपती चीर ॥ परिधानीं कीं इच्छापर ॥ ऐशिया सुखा करी निर्धार ॥ कानन सेवूं नको रे ॥४६॥

जडितरत्न हेमशृंगार ॥ भूषणीक मनोहर ॥ ऐसें टाकूनि सुख मनोहर ॥ कानना जाऊं नको रे ॥४७॥

चुवा चंदन अर्गजा गंध ॥ अंगीं चर्चू आम्ही प्रसिद्ध ॥ ऐसें टाकूनि सुखवृंद ॥ कानना जाऊं नको रे ॥४८॥

कनकासनीं विराजमान ॥ दिससी जैसा सहस्त्रनयन ॥ ऐशा सुखाचा त्याग करुन ॥ कानना जाऊं नको रे ॥४९॥

द्रव्यराशी अमूप भांडार ॥ भरले असती अपरंपार ॥ किल्ले कोट टाकूनि सुंदर ॥ कानन सेवू नको रे ॥१५०॥

ऐशा सुखाची उत्तम जाती ॥ टाकूनि जासी दुःखव्यावृत्ती ॥ महीं भ्रमण काननक्षितीं ॥ दुःख अपार आहे रे ॥५१॥

शालदुशाल भूषणमाळा ॥ टाकूनि घेसी दुःख कशाला ॥ सांडूनि षड्रस अन्न विपुला ॥ कंदमूळ खाशील ॥५२॥

उंच आसन मृदु कैसें ॥ मंचकीं शय्या कुसुमकेश ॥ तें टाकूनि महीस ॥ लोळसील काननीं ॥५३॥

तरी गोरक्षा मनुष्यदेही ॥ वृत्ति आणी विवेकप्रवाही ॥ राज्यासनाचें सुख घेई ॥ सकळ मही भोगीं कां ॥५४॥

अरे या देशीं शत्रुभय ॥ अन्य राजाचें नाहीं भय ॥ ऐसें स्थान आनंदमय ॥ तरी सकळ मही भोगीं कां ॥५५॥

ऐसें बहुतांपरी उपदेशीं ॥ दाविती तया सुखासी ॥ परी विरक्त स्वचित्तेंसीं ॥ आशेलागीं आतळेना ॥५६॥

मग धिक्कारुनि सकळ युवती ॥ म्हणे आम्हां कासया व्हावी संपत्ती ॥ प्राण टाकोनि शवाहातीं ॥ तुम्हीच मिरवा जगीं हो ॥५७॥

अगे आम्हांसी वोढण शयनावसनीं ॥ वरती आकाश खालीं मेदिनी ॥ शयन करितों योगधारणीं ॥ अलक्षीं लक्ष लावूनियां ॥५८॥

ऐसी बहुतां नीतीं तयेसी वाणी ॥ म्हणे दूर लंडी गोड बंगालिणी ॥ ऐसें म्हणोनि तये अवनीं ॥ पाऊल ठेवितां पैं झाला ॥५९॥

मग किलोतळेतें करुनि नमन ॥ स्कंधीं वाहिला मच्छिंद्रनंदन ॥ श्रीमच्छिंद्र सवें घेऊन ॥ ग्रामाबाहेर पैं आला ॥१६०॥

परी कीलोतळेनें गोरक्षकासी चोरुन ॥ कनकवीट आणिली भांडारांतून ॥ मच्छिंद्रनाथाकरीं अर्पोन ॥ भस्म झोळीत टाकिली ॥६१॥

परी मच्छिंद्राच्या मोहें करुन ॥ घोंटाळीत पंचप्राण ॥ नेत्रीं अपार अश्रुजीवन ॥ मोहें नयन वर्षत ॥६२॥

मग गांवाबाहेर मैनाकिनी ॥ माथा ठेवी नाथाचे चरणीं ॥ गोरक्ष हदयीं कवळोनी ॥ निरवीतसें तयातें ॥६३॥

म्हणे वत्सा माझे नाथा ॥ घेउनि जासील अन्य देशांत ॥ परी क्षुधा तृषा जाणोनि यातें ॥ सुख देईं पाडसा ॥६४॥

बा रे अशक्त मच्छिंद्रनाथ ॥ दिधलासे तुझिया हातांत ॥ योजन अर्धयोजन महीतें ॥ सुख देई पाडसा ॥६५॥

बा रे मच्छिंद्र शांतीचा अचळू ॥ परी फारचि असे अति भुकाळू ॥ तरी मच्छिंद्राचा क्षुधानळू ॥ बाळासमान जाण रे ॥६६॥

जैसें मीननाथाचें लहानपण ॥ त्याचि रीतीं मच्छिंद्रातें मान ॥ हे उभयतां आहेत क्षीण ॥ तुझे ओटींत वाहिले ॥६७॥

यापरी तूतें सांग किती ॥ तू जेथें अससी बा सर्वज्ञमूर्ती ॥ सच्छिष्य असें तूतें म्हणती ॥ कारण भक्ती पाहोनी ॥६८॥

ऐसें वदोनि कीलोतळा ॥ मिठी घाली गोरक्षगळां ॥ म्हणे बारे तूतें वेळोवेळां ॥ निरवितें जीवीं धरी बा ॥६९॥

ऐसें म्हणोनि हंबरडा फोडीत ॥ परम अट्टहास्यें शब्द करीत ॥ म्हणे आतां कैसा नाथ ॥ निजडोळां देखेन मी ॥१७०॥

ऐसी मोहाची उभवी वार्ता ॥ तें गोरक्षक पाहोनि म्हणे चित्ता ॥ वेगें निघावें नातरी ममता ॥ मच्छिंद्रातें दाटेल ॥७१॥

मग श्रीगुरुचा धरोनि हात ॥ लगबगें चालिला गोरक्षनाथ ॥ पाउलापाउलीं दुरावत ॥ तों तों आरंबळे कीलोतळा ॥७२॥

पालथा घालोनि पर्वत ॥ अदृश्य झाले तिन्ही नाथ ॥ मग कीलोतळा मस्तक महीप्रत ॥ आपटीतसे तेघवां ॥७३॥

गायीसमान हंबरडा मारीत ॥ हस्तें वक्षःस्थळ पिटीत ॥ म्हणे आतां मच्छिंद्रनाथ ॥ दृष्टीं कैसा पडेल ॥७४॥

ऐसा मच्छिंद्र गुणी ॥ सदा शांत म्हातारपणीं ॥ दयाब्धि कृपानिधि पूर्ण ॥ कोठें पाहूं मच्छिंद्रा ॥७५॥

म्हणे बाई गे शचीनाथ ॥ तैसा आपणांमाजी मिरवत ॥ ऐसा स्वामी दयावंत ॥ कोठें पाहूं निजदृष्टीं ॥७६॥

अहा मज कृपणाचें धन ॥ गोरक्षतस्करें नेलें चोरुन ॥ आतां नाथें कठीण मन ॥ कैसें केलें मजविषयीं ॥७७॥

आहा मज वत्साचें अब्धिजीवन ॥ गोरक्षघन गेला गिळोन ॥ कीं मज अंधाची काठी हिरोन ॥ गोरक्षक निर्दयें नेली गे ॥७८॥

आतां आवोनि मंदिरांत ॥ काय कोठें पाहों नाथ ॥ दाही दिशा ओस मातें ॥ वाटताती साजणी ॥७९॥

सभेस्थानीं कनकासनीं ॥ जेवीं बैसला दिसे तरणी ॥ आतां तें आसन वसन पाहोनी ॥ पाठी लागेल गे माये ॥१८०॥

अगे राजवैभव सकळ भार ॥ मातें वाटतें ओस नगर ॥ आतां माझा नाथ मच्छिंद्र ॥ कैं पाहीन निजदृष्टीं ॥८१॥

ऐसा हा मच्छिंद्रपुरुष ॥ कोठें हिंडतां न देखों देश ॥ अति स्नेहाळू माया विशेष ॥ मायेहूनि पाळीतसे ॥८२॥

बाई गे बाई निजतां शयनीं ॥ काय सांगू तयाची करणी ॥ तीन वेळां मज उठवोनी ॥ तान्हेलीस म्हणते ॥८३॥

मग आपुले करीं उदकझारी ॥ लावी माझिये मुखपात्रीं ॥ उदक पाजोनि कृपागात्रीं ॥ जठर माझें चापीतसे ॥८४॥

रिक्त जठर लागतां त्यातें ॥ म्हणे अससी क्षुधाक्रांत ॥ मग पाचारोनि परिचारिकेतें ॥ बळेंचि भोजन घालीतसे ॥८५॥

ऐशिया मोहाची दयाकोटी ॥ वागवीत होता आपुले पोटीं ॥ अति निर्दय होवोनि शेवटी ॥ कैसा सोडोनि पैं गेला ॥८६॥

ऐसें बोलोनि वागुत्तर ॥ मस्तक आपटिलें महीवर ॥ मुखीं मृत्तिका वारंवार ॥ घालोनि हंबरडा फोडीतसे ॥८७॥

ऐशिया दुःखाची सबळ कहाणी ॥ उपरिचरवसूच्या पडली कानीं ॥ मग तो विमानीं बैसोनी ॥ तियेपाशीं पातला ॥८८॥

विमान ठेवोनि तये अवनीं ॥ निकट पातला कृपेंकरुनी ॥ निकट येता धरिला पाणी ॥ म्हणे पापिणी हें काय ॥८९॥

तूं स्वर्गवासिनि शुभाननी ॥ येथें आलीस शापेंकरुनीं ॥ तें शापमोचन गे येथोनि ॥ झालें आहे सुख मानी कां ॥१९०॥

मग करें कुरवाळोनि कीलोतळा ॥ धरिता झाला हदयकमळा ॥ अश्रु डोळां पुसोनि ते वेळां ॥ सदनामाजी आणीतसे ॥९१॥

सदना आणूनि ते युवती ॥ बोधिता झाला नाना युक्तीं ॥ तो बोध असे भक्तिसार ग्रंथीं ॥ पुढले अध्यायीं ऐकावा ॥९२॥

भक्तिसार उत्तम ग्रंथ ॥ ऐकतां होय पुण्यवंत ॥ तरी श्रोते देऊनि चित्त ॥ ग्रंथ आदरें ऐकावा ॥९३॥

नरहरिवंशी धुंडीसुत ॥ अनन्य तुम्हां शरणागत ॥ मालू ऐसें नाम देहातें ॥ संतकृपेनें व्यापिलें ॥९४॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ग्रंथ ॥ स्वयें बोलिला पंढरीनाथ ॥ सदा संतसज्जन परिसोत ॥ ईश्वरीकृपेंकरोनियां ॥९५॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ एकविंशतितमाध्याय गोड हा ॥१९६॥

श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु अध्याय ॥२१॥ ओव्या ॥१९६॥

॥ नवनाथभक्तिसार एकविंशतितमाध्याय समाप्त ॥


श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय २२

श्रीगणेशाय नमः

जयजयाजी कमळाकांता ॥ कमळानाभा कमलोद्भवपिता ॥ कमळपत्राक्षा दुःखहर्ता ॥ पुढें ग्रंथ रसाळ बोलवी ॥१॥

भक्तिसारग्रंथ हा रत्न ॥ बोलवीं श्रोत्यांकारण ॥ मागिले अध्यायीं गोरक्षनंदन ॥ मच्छिंद्र घेऊनि गेला असे ॥२॥

नेला तरी किलोतळा ॥ बुडालीसे सांगडी ॥ शोकाब्धींजळा ॥ तैं उपरिचवसू तरणि आगळा ॥ काढावया पातला ॥३॥

स्थावरबोधाची बांधूनि सांगडी ॥ शोकाब्धींत घातली उडी ॥ शब्दार्थी मारुनि बुडी ॥ धैर्यकांसे धरियेलें ॥४॥

धरिल्यावरी बाहेर काढुनि ॥ म्हणे माय वो सावधानी ॥ शोक सांडी अशाश्वत गहनी ॥ शाश्वत नाहीं कांहींच ॥५॥

पाहतेपणीं जें जें दृश्य ॥ तें आभासपणीं पावें नाश ॥ तूं शोक करिसी शब्दप्राप्तीस ॥ श्लाध्य तूतें लागेना ॥६॥

तूं कोठील मच्छिंद्र कोण ॥ स्वर्ग भूमीचा झाला संगम ॥ योग तितुका भोगकाम ॥ सरुनि गेला जननीये ॥७॥

तूं अससी स्वर्गवासिनी ॥ मच्छिंद्र स्तविला जन्मोनी ॥ परी प्रारब्धें सहजयोगेंकरुनीं ॥ गाठीं पडली उभयतां ॥८॥

पडली परी मच्छिंद्र स्तविला जन्मोनी ॥ परी प्रारब्धें तूं आपुलें स्वहित निश्चित ॥ सांभाळीं कीं जननीये ॥९॥

तूं झालीस पदच्युत ॥ तरी तें सांभाळी निश्चित ॥ तरी आतां मानूनि व्यक्त ॥ होऊनि चाल जननीये ॥१०॥

तूं पातलिया सिंहलद्वीप ॥ मग मच्छिंद्रयोगें स्थावरकंदर्प ॥ पूर्ण होईल शुद्धसंकल्प ॥ मच्छिंद्र दृष्टीं पाहूनियां ॥११॥

द्वादश वर्षे झालिया पूर्ण ॥ तूतें भेटवीन मच्छिंद्रनंदन ॥ मीननाथादि तपोधन ॥ गोरक्ष दृष्टीं पाहसील तूं ॥१२॥

म्हणशील यावया मच्छिंद्रनंदन ॥ काय पडेल त्या कारण ॥ सिंहलद्वीपीं पाकशासन ॥ महामख आरंभील ॥१३॥

तेव्हां विष्णु विरेंची रुद्र ॥ तया स्थानी येती भद्र ॥ सकळ देवादिक मित्र चंद्र ॥ एका ठायीं मिळतील ॥१४॥

ते नवनाथादि प्रतापवंत ॥ ऐक्य करील शचीनाथ ॥ गहिनी गोपीचंद भर्तरि सहित ॥ एक्या ठायीं मिळतील ॥१५॥

तरी आतां शोक कां व्यर्थ ॥ सांडी प्रांजळ करीं चित्त ॥ विमानारुढ होऊन त्वरित ॥ सिंहलद्वीपीं चाल कीं ॥१६॥

ऐसें ऐकोनि मैनाकिनी ॥ महाराजा श्वशुरप्राज्ञी ॥ द्वादशवर्षे मच्छिंद्र नयनी ॥ दावीन ऐसें म्हणतसां ॥१७॥

तरी मखमंडप पाकशासन ॥ करी अथवा न करो पूर्ण ॥ जरी मज दावाल मम नंदन ॥ तरी मज भाष्य द्यावी कीं ॥१८॥

भाष्य दिधल्या अंतरपुटीं ॥ विश्वासरत्ना रक्षीन पोटीं ॥ मग हे शोक दरिद्रपाठी ॥ चित्त सांडील महाराजा ॥१९॥

ऐसें बोलतां मैनाकिनी ॥ श्वशुर हास्य करी आननीं ॥ मग करतळभाष्य देऊनी ॥ संतुष्ट केलें सुनेतें ॥२०॥

यावरी बोले कीलोतळा ॥ मातें नेतां स्वर्गमंडळा ॥ परी नृपपणीं या स्थळा ॥ कोणालागी स्थापावें ॥२१॥

येरु म्हणे ऐक वचन ॥ सवें सेवेसी आहेत क्रियावान ॥ दैर्भामा उत्तम नामानें ॥ राज्य तीते ओपीं कां ॥२२॥

मग अवश्य म्हणे मैनाकिनी ॥ दैर्भामा राज्यासनीं ॥ बैसविली अभिषेक करुनी ॥ राज्यपदीं तेधवा ॥२३॥

राज्यीं ओपूनि दैर्भामा ॥ मिळती झाली विमानसंगमा ॥ परी सकळ देशींच्या शैल्या रामा ॥ शोकाकुळ झाल्या कीं ॥२४॥

म्हणती माय वो शुभाननी ॥ तुम्ही जातां आम्हांसी टाकुनी ॥ आम्हां पाडसांची हरिणी ॥ दयाळू माय अससी तूं ॥२५॥

असो ऐशा बहुधा शक्ती ॥ शैल्या शोकाकुलित होती ॥ मग तितुक्यां समजावूनि युक्तीं ॥ विमानयानीं आरुढली ॥२६॥

दैर्भामेसी नीतिप्रकार ॥ सांगूनि युक्ती समग्र ॥ यथासमान प्रजेचा भार ॥ सांभाळी कां साजणीये ॥२७॥

जेथील तेथें हित फार ॥ तैसे केलें गोचर ॥ मग विमानीं आपण सश्वशुर ॥ स्वर्गमागें गमताती ॥२८॥

असो विमान पावे द्वीपाप्रती ॥ पदा स्थापिली ते युवती ॥ मग तो उपरिचर सहजगती ॥ आपुल्या स्थाना सेविती ॥३०॥

त्याचि न्यायें उपरिदक्षें ॥ आणि कीलोतळा पद्मिनी प्रत्यक्ष ॥ शाषमोचन सायंकाळास ॥ स्थाना पावली आपुल्या ॥३१॥

कीं अब्धीचें अपार जीवन ॥ व्यापी महीतें मेहमुखाने ॥ परी तें पुन्हां सरिक्षाओघानें ॥ ठायींचे ठायीं जातसे ॥३२॥

त्याचिया न्यायें स्नुषा श्वशुर ॥ पावते झाले स्वस्थानावर ॥ परी तैं इकडे नाथ मच्छिंद्र ॥ गौडबंगाली पातला ॥३३॥

मीननाथ स्कंधीं वाहून ॥ मार्गावरी करिती गमन ॥ तों शैल्येंदेशसीमा उल्लंघून ॥ गौडबंगालीं पातले ॥३४॥

मार्गी लागतां ग्राम कोणी ॥ त्या ग्रामांत संचरोनी ॥ गोरक्ष भिक्षा आणी मागुनी ॥ उदरापुरती तिघांच्या ॥३५॥

ऐसेपरी निर्वापण ॥ मार्गी करिताती गमन ॥ तों कौलबंगाला सांडून ॥ गौडबंगाली पातले ॥३६॥

मार्गी चालता सहजस्थिती ॥ तो कनिफा पूर्वी भेटला तयांप्रती ॥ तेथें पातल्या त्रिवर्गमूर्ती ॥ गमन करितां मार्गातें ॥३७॥

तेथें येताचि गोरक्ष जेठी ॥ स्मरण झालें तयाचे पोटीं ॥ कीं अच्युतवृक्षापुटीं ॥ कानिफाची भेटी झालीसे ॥३८॥

झाली परी हें उत्तम स्थान ॥ महायशस्वी पुण्यवान ॥ मातें दाबिले श्रीगुरुचें चरण ॥ जैसे चुकल्या वत्सासी ॥३९॥

प्रत्यक्ष माझी मच्छिंद्रराणी ॥ गेली होती आदिपट्टराणी ॥ मी पाडस रानोरानी ॥ निढळ्यावाणी लागतसे ॥४०॥

कीं मज वत्साची गाउली ॥ सहज रानी चरावया गेली ॥ शैल्या व्याघ्रे आव्हाटिली ॥ ती भेटविली रायानें ॥४१॥

मग स्कंधी होता नाथ मीन ॥ तथालागी मही ठेवून ॥ दृढ पायीं केलें नमन ॥ नेत्रीं अश्रु लोटले ॥४२॥

तें पाहूनि मच्छिंद्रनाथ ॥ बोलता झाला गोरक्षातें ॥ म्हणे बाळा अश्रुपात ॥ निज चक्षूंसी कां आले ॥४३॥

ऐसें बोलतां मच्छिंद्रनाथ ॥ मग सकळ दुःखाचे मंडण ॥ तें गोरक्षचित्तीं प्रविष्ट होऊन ॥ नेत्रीं नीर अपार लोटलें ॥४४॥

सांगू जातां मुखानें ॥ तो कंठ आलासे भरुन ॥ मग क्षण एक तया स्थानीं बैसून ॥ स्थिर चित्त पैं केलें ॥४५॥

जैसे आकाशीं अभ्र दाटतां ॥ पुन्हां निर्मळ होय तत्त्वतां ॥ तैसें दुःख मोह चिंत्ता ॥ टाकून निर्मळ पैं केले ॥४६॥

मग बद्रीकाश्रमापासूनि कथन ॥ दुःखव्यावृत्ति अतिगहन ॥ कानिफा भेटीपर्यंत वदून ॥ ठाव पशस्वी म्हणतसे ॥४७॥

याचि ठायीं कानिफाभेटी ॥ झाली मातें कृपा जेठी ॥ तुमची शुद्धी तद्वान्वटी ॥ येथेंचि लाधली महाराजा ॥४८॥

तरी हें स्थान पुण्यवान ॥ तुमचे दाविले मज चरण ॥ तरी हे स्थान धनवंत पूर्ण ॥ चुकलें धन मज दिधलें ॥४९॥

दुःखसरिते प्रवाहें वेष्टी ॥ बुडतां वांचविले देउनि पृष्ठी ॥ कीं दुःख व्याघ्राच्या आसडूनि होटी ॥ माये भेटी केली असे ॥५०॥

कीं तुमचा वियोग प्रळयानळ ॥ तयांत मी पडलों होतों बाळ ॥ परी जागा नोहे हा घन शीतळ ॥ मातें झाला महाराजा ॥५१॥

कीं तुमचा वियोगकृतांतपाश ॥ लागला होता मम कंठास ॥ परी जागा नोहे हा सुधारस ॥ मज भेटला महाराजा ॥५२॥

ऐसें म्हणोनि वारंवार ॥ नेत्रीं लोटती अश्रुपूर ॥ परम कनवाळू नाथ मच्छिंद्र ॥ हदयीं धरी गोरक्षा ॥५३॥

मुख कुरवाळूनि आपले हस्तें ॥ सच्छिष्याचे अश्रु पुसीत ॥ मनांत म्हणे हा भाग्यवंत ॥ गुरुभक्त एकचि हा ॥५४॥

मग गोरक्षाचें समाधान ॥ करुनियां मच्छिंद्रनंदन ॥ मग मीननाथा कडे घेऊन ॥ ऊठ वत्सा म्हणतसे ॥५५॥

पुढें मार्गी करितां गमन ॥ जालिंदराचें वर्तमान ॥ सांगता झाला गोरक्षनंदन ॥ श्रीमच्छिंद्राकारणें ॥५६॥

गौडबंगाल हेळापट्टण ॥ तुमचा गुरु जालिंदर पूर्ण ॥ नाथपंथीं हा अनुग्रहकारण ॥ श्रीदत्ताचा मिरवितसे ॥५७॥

तो महाराज योगभ्रष्ट ॥ पावला आहे महाकष्ट ॥ गोपीचंदें करुनि अनिष्ट ॥ महींगर्ती घातला ॥५८॥

मुळापासोनि सकळ कथन ॥ मच्छिंद्रा केलें निवेदन ॥ परी नाथ मच्छिंद्र तें ऐकून ॥ चित्तीं परम क्षोभला ॥५९॥

म्हणे ऐसा राजा आहे नष्ट ॥ तरी आतां करीन त्याचें तळपट ॥ नगरी पालथी घालीन सुघट ॥ महीपालथा मिरवीन तो ॥६०॥

ऐसें बोलोनि विक्षेप चित्तीं ॥ पुढें मागें परमगतीं ॥ एकदोन मुक्काम साधिती क्षिती ॥ हेळापट्टणीं पातले ॥६१॥

ग्रामानिकट ग्रामस्थ भेटती ॥ त्यांतें वृत्तांत विचारीन जाती ॥ ते म्हणती कानिफा येऊनि क्षितीं ॥ मुक्त केलें जालिंदरा ॥६२॥

राया गोपीचंदा अनुग्रह देऊनी ॥ जगीं मिरवला अमरपणीं ॥ तेणें गुरुदीक्षा घेऊनी ॥ तपालागीं तो गेला ॥६३॥

राया मुक्तचंदा स्थापून ॥ राज्यपदीं राज्यासन ॥ देऊनियां अग्निनंदन ॥ तोही गेला षण्मास ॥६४॥

सकळ कथा मुळाहूनी ॥ मच्छिंद्रासी सांगितली ग्रामस्थांनी ॥ तें मच्छिंद्राचे पडतां श्रवणीं ॥ शांतपणीं मिरवला ॥६५॥

जैसा प्रळयानळावरती ॥ घनवृष्टीची होय व्यक्ती ॥ मग सकळ उवाळा पाहूनि अती ॥ अदृश्य होय पावक तो ॥६६॥

कीं साधक पातला असतां ॥ कीं श्रीगुरुचा संसर्ग होतां ॥ होतांचि सिद्धकाची व्यथा ॥ नासूनि जाय ते क्षणीं ॥६७॥

कीं तम ढिसाळ दाटल्या अवनी ॥ उदय होतांचि वासरमणी ॥ मग सकळ तम नाश पावूनी ॥ दिशा मिरविती उजळल्या ॥६८॥

तन्न्यायें मच्छिंद्रसंताप ॥ ग्रामस्थं बोलतां झाला लोप ॥ शांति वरुनि मोहकंदर्प ॥ चित्तामाजी द्रवलासे ॥६९॥

यापरी तो मच्छिंद्रनंदन ॥ ग्रामस्थां विचारी मुख्यत्वकरुन ॥ अधिकारी राज्यनिपुण ॥ कोण आहे प्राज्ञिक तेथें ॥७०॥

येरी म्हणती योगद्रुमा ॥ श्रेष्ठ करणिका राजा उगमा ॥ मैनावती शुभानना ॥ प्राज्ञिकवंत मिरवतसे ॥७१॥

त्या मातेनें अर्थ धरुन ॥ पुत्र मिरविला जी अमरपणें ॥ तुष्ट करोनि जालिंदरमन ॥ अमर झाली आपणही ॥७२॥

ऐसें बोलतां ग्रामस्थ युक्तीं ॥ मनांत म्हणे मच्छिंद्र यती ॥ ऐसा प्राज्ञिक आहे सती ॥ भेटी घ्याची तियेची ॥७३॥

ऐसिये धृती चित्तीं कल्पून ॥ चालते झाले त्रिवर्गजन ॥ ग्रामद्वारा शीघ्र येऊन ॥ द्वाररक्षकां सांगती ॥७४॥

म्हणती जालिंदर जो प्रज्ञावंत ॥ तयाचा सहोदर मच्छिंद्रनाथ ॥ ग्रामद्वारीं आहे तिष्ठत ॥ जाऊनि सांगा सतीसी ॥७५॥

अहो अहो द्वारपाळ ॥ सांगा चला उतावेळ ॥ मैनावती लक्षूनि सकळ ॥ वृत्तांत तियेतें निवेदावा ॥७६॥

ऐसें द्वारपाळ ऐकून ॥ मच्छिंद्रा करिते झाले नमन ॥ म्हणती महाराजा आज्ञा प्रमाण ॥ श्रुत करुं सतीसी ॥७७॥

म्हणती महाराज मच्छिंद्रजती ॥ जालिंदरसहोदर म्हणवितो क्षितीं ॥ तो येऊनि ग्रामद्वाराप्रती ॥ तिष्ठत आहे महाराजा ॥७८॥

ऐसे ऐकूनि मैनावती ॥ म्हणे कैसी वृत्ति कैसी स्थिती ॥ कैसी आहे भूषण व्यक्ती ॥ अभ्यासानभ्यास दाक्षेतें ॥७९॥

येरी म्हने जी महाराजा ॥ कनककांति तेजःपुंजा ॥ बालार्ककिरणी विजयध्वजा ॥ आम्हालागीं दिसतसे ॥८०॥

माय वो आम्हां दिसतो ऐसा ॥ कीं न पावला योनिसंभवसा अवतारदीक्षे स्वर्गवासा ॥ करील जनां वाटतसे ॥८१॥

शैली कंथा लेवूनि भूषण ॥ शिंगी सारंगी समागम ॥ कुबडी फावडी करीं कवळून ॥ उभा द्वारीं असे तो ॥८२॥

आणिक एक सच्छिंष्य त्यासी ॥ संग्रही आहे सुखसेवेसी ॥ परी तो शिष्यासमान अभ्यासी ॥ आम्हालागीं भासतसे ॥८३॥

धृति वृत्ति दीक्षेलागून ॥ ज्ञानवैराग्यस्वरुपवान ॥ आम्हालागीं समसमान ॥ गुरुशिष्य वाटती ॥८४॥

त्याचि रीतीं स्वरुप अपार ॥ तान्हुलें एक असे किशोर ॥ परी त्रिवर्ग स्वरुपसागर ॥ नक्षत्रमणी भासती ॥८५॥

ऐसें सांगतां द्वाररक्षक ॥ मंत्रीं पाचारिला प्रत्योदक ॥ मग स्वयें घेऊनि सुखासन कटक ॥ सामोरी जातसे युवती ते ॥८६॥

कटकासवें द्वारीं येऊन ॥ वंदिती झाली मच्छिंद्रनंदन ॥ मग त्रिवर्गातें सुखासन ॥ ओपूनि नेतसे मंदिरा ॥८७॥

नेतांचि मंदिरा राजभुवनी ॥ भावें बैसविला कनकासनीं ॥ षोडशोपचारें पुजूनि मुनी ॥ नम्रवाणी गौरविलें ॥८८॥

हे महाराजा तपोसविता ॥ कोणीकडूनि येणें झालें आतां ॥ आम्हां आळशावरी सरिता ॥ प्रेमांबु लोटतसे ॥८९॥

कीं दरिद्र्याचें द्रव्यहरण ॥ करुं मांदुस धांवली आपण ॥ कीं चित्ता बोधी अंतःकरण ॥ बुडतां धांवे चिंतामणी ॥९०॥

कीं मृत्युसमयीं हस्तपादास ॥ ओढितां परम दुःखक्लेशास ॥ तें पाहूनियां अमरपीयूष ॥ धांव घेत कृपेनें ॥९१॥

कीं तृषासंकटीं प्राण ॥ तों गंगाओघ आला धांवून ॥ कीं क्षुधें पेटला जठाराग्न ॥ पयोब्धी तों पातला ॥९२॥

तन्न्यायें अभाग्य भागीं ॥ येथें पातलेत तुम्ही जोगी ॥ परी कोणाच्या वचनप्रसंगीं ॥ आम्हां दर्शंवा महाराजा ॥९३॥

येरी म्हणें वो माते ऐक ॥ उपरिचरवसू माझा जनक ॥ मच्छदेही देहादिक ॥ आम्हांलागी मिरवतसे ॥९४॥

यापरी श्रीगुरुज्ञानदृष्टी ॥ तो अनुसूयासुत शुक्तिकेपोटी ॥ तेणें कवळूनि मौळी मुष्टीं ॥ वरदपात्रीं मिरवला ॥९५॥

मज अनुग्रह प्राप्त झाला ॥ त्यावरी श्रीजालिंदराला ॥ प्राप्त होऊनि वैराग्याला ॥ भूषवीतसे जननीय ॥९६॥

धाकटा बंधु गुरुभक्त ॥ मज विराजला जालिन्दरनाथ ॥ परी या ग्रामीं पापी अवस्थेंत ॥ पावला हें ऐकिलें ॥९७॥

म्हणूनि उग्रता धरुनि पोटीं ॥ लंधीत आलों महीपाठीं ॥ परी उत्तम संग्रह ग्रामजेठी ॥ समस्तांनी सांगितले ॥९८॥

तेणें करुनि कोप कंदर्प ॥ झाला जननी सर्व लोप ॥ तरी तूं धान्य ज्ञानदीप ॥ महीवरी अससी वो ॥९९॥

आपुल्या हितासी गृहीं आणून ॥ शेवटीं परम प्राज्ञेकरुन ॥ तुवां मिळविला स्वानंदघन ॥ धन्य धन्य अससी तूं ॥१००॥

धन्य धन्य मही ऐक ॥ निवटूनि पूर्वजपातक दोंदिक ॥ सनाथपणाची घेऊनि भीक ॥ स्वर्गवासा मिरविशी ॥ ॥१॥

तरी तारक लोकां बेचाळीसां ॥ कुळा झालीस भवाब्धिरसा ॥ कीं भगीरथभूष पितृउद्देशा ॥ मिरवलासे त्रिभुवनीं ॥२॥

कीं विनतेचें दास्यपण ॥ गरुडें सांठविलें पीयूष देऊन ॥ तेवीं तूं कुळांत सकळांकारण ॥ तारक झालीस सर्व काळीं ॥३॥

ऐसें नाथ बोलतां युक्तीं ॥ चरणीं माथा ठेवी सती ॥ म्हणे महाराजा कृपामूर्ती ॥ सदैव केलें तुम्हींच ॥४॥

तुमच्या दृष्टीच्या सहज झळकू ॥ कृपापात्र वरिला मशकू ॥ मम प्रज्ञे मोहशठकू ॥ मिरवला हे महाराजा ॥५॥

अहा तुमचे पडिपाडें ॥ न येती कल्पतरु झाडें ॥ परीस वासनेसमान कोडे ॥ बरें वाईंट मिरवतसे ॥६॥

तैसी तुमची नव्हे स्थिती ॥ साधक कल्याण मिरवी मती ॥ कीं परीस देतां समानगती ॥ बरे वाईट मिरवतसे ॥७॥

परीस लोहाचे करी कनक ॥ परी स्वदीक्षेची न तुटे भीक ॥ तेवीं तुम्हीं नोहेत साधक ॥ आपुलेसमान करितां कीं ॥८॥

ऐशी उद्धारपूर्ण कोटी ॥ तुम्ही मिरवतां महीपाठीं ॥ उदार तरी समता होटीं ॥ मेघ अपूरा वाटतसे ॥९॥

मेघ उदार म्हणती लोक ॥ परी तो अपूरा ओसरे उदक ॥ तस्मात् तुमचें औदार्य दोंदिक ॥ समतापदासी मिरवेना ॥१०॥

तरी तुमची वर्णिता स्तुती ॥ अपूर्ण असे माझी मती ॥ ऐसें म्हणोनि मैनावती ॥ चरणीं माथा ठेवीतसे ॥११॥

मग आसन वसन भूषणासहित ॥ अन्नपानादि अन्य पदार्थ ॥ सिद्ध करुनि मनोरथ ॥ तुष्ट करीत नाथासी ॥१२॥

तीन रात्री वस्ती करुन ॥ सर्त्रा आशीर्वाद देऊन ॥ मग निघता झाला मच्छिंद्रनंदन ॥ गोरक्षनाथादिकरुनियां ॥१३॥

सकळ कटकासहित ॥ बाळवों निघाला चंद्रमुक्त ॥ मैनावती आणि ग्रामस्थ ॥ एक कोस बोळविती ॥१४॥

सकळी चरणावरी ठेवूनि माथा ॥ परतते झाले बोळवोनि नाथा ॥ मग आपुले सदनीं येऊनि तत्त्वतां ॥ धन्य नाथ म्हणतात ॥१५॥

येरीकडे मच्छिंद्रनाथ ॥ त्रिवर्गादि गमन करीत ॥ ग्रामोग्राम मुक्काम साधीत ॥ जगन्नाथीं पातलें ॥१६॥

तेथें करुनि उदधिस्नान ॥ जगन्नाथाचें घेऊनि दर्शन ॥ तीन रात्रीं तेथें राहून ॥ तीर्थविधि सारिला तो ॥१७॥

तेथूनि निघोनि पुनः मार्गी ॥ गमन करीत मग योगी ॥ तों सौराष्ट्रग्राममुक्कामप्रसंगी ॥ जाऊनि तेथें राहिले ॥१८॥

रात्र क्रमोनि जैसी तैसी ॥ दुसरे दिनीं मित्रोदयासी ॥ गोरक्ष सांवरोनि भिक्षाझोळासी ॥ भिक्षेलागीं प्रवर्तला ॥१९॥

भिक्षा मागोनि सदनोसदनीं ॥ परम श्रमोनि आला सदनीं ॥ तों येरीकडे शिबिरस्थानीं ॥ शयनीं असे मीननाथ ॥१२०॥

तो मच्छिंद्रनाथानें उठवोन ॥ बैसविला शौचाकारण ॥ तों ते संधींत भिक्षा मागोन ॥ गोरक्षनाथ पातला ॥२१॥

ग्रामांत हिंडतां सदनोसदनीं ॥ श्रमे विटलासे मनीं ॥ तो येतांचि स्थानीं श्रमोनी ॥ मच्छिंद्रनाथ बोलतसे ॥२२॥

म्हणे गोरक्षा मीननाथ ॥ शौचास बैसविला आहे गल्लींत ॥ तरी तूं त्या तें प्रक्षाळूनि त्वरित ॥ घेऊनि येई पाडसा ॥२३॥

ऐसें बोलतां मच्छिंद्रनाथ ॥ भिक्षाझोळी ठेवूनि तेथ ॥ लक्षूनि पातला मीननाथ ॥ गल्लीमाजी जाऊनियां ॥२४॥

तो मीननाथ परम अज्ञान ॥ हस्तपाद भरले विष्ठेनें ॥ अंगव्यक्त गोरक्ष विष्ठा पाहोन ॥ परम चित्ती विटलासे ॥२५॥

मनांत म्हणे मच्छिंद्रासी ॥ कीं परम असे विवसी ॥ विषय उपद्रव संन्याशासी ॥ व्यर्थ कासया पाहिजे ॥२६॥

कीं —– भाराविण बोडकी ॥ कुंकूंखटाटोप हुडकी ॥ तेवीं मच्छिंद्रमनीं उपद्रव शेखीं ॥ काय आज —- ॥२७॥

जन्मांधासी अवनीं ॥ तोचि संभार रक्षी कानीं ॥ निगडी मनुष्या षड्रसान्नीं खटाटोप कासया ॥२८॥

कीं परम भ्याड सोडी सदन ॥ शस्त्रसंभारापरी संगोपन ॥ ज्याचें काय आसन वसन ॥ त्या वस्त्रभूषण कासया ॥२९॥

कीं रानींचें रानसावज उन्मत्त ॥ द्रव्य देऊनि त्या करावें शांत ॥ तेवीं निस्पृहताविषय अत्यंत ॥ गोड कांहींच वाटेना ॥१३०॥

ऐसें बोलूनि गौरनंदन ॥ मीननाथ तें करीं कवळून ॥ दृष्ट करी मच्छिंद्राकारणें ॥ उचलोनिया तेधवां ॥३१॥

विष्ठेव्यक्त मीननाथ ॥ पाहोनि मच्छिंद्र बोलत ॥ म्हणे गोरक्षा सरितेआंत ॥ धुवोनि आणि बाळका ॥३२॥

अवश्य म्हणोनि गोरक्षनाथ ॥ तैसाचि उठोनि सरिते जात ॥ संचार करितां सरितेंत ॥ तों उत्तम खडक देखिला ॥३३॥

देखिलें परी एकांतस्थान ॥ मनांत म्हणे न्यावें धूवोन ॥ परी अंतर्बाह्य मळी निवटवून ॥ नाथालागीं दाखवूं ॥३४॥

ऐसें विचारुनि चित्तांत ॥ पदी धरिला मीननाथ ॥ खडकावरी आपटोनि त्वरित ॥ गतप्राण पैं केला ॥३५॥
सरिते उदक असे अपार ॥ त्यांत प्रवेशते झालें रुधिर ॥ तें सर्व अपार जळचर ॥ भक्ष्य म्हणोनि धावले ॥३६॥

मच्छ मगरी कबंधदेही ॥ मग तळपती त्या प्रवाहीं ॥ तैं अपार जळचरें पाहूनि डोहीं ॥ मनांत म्हणतसे गोरक्ष ॥३७॥

म्हणे जीवें गेला मीननाथ ॥ तरी याचें घालों सदावर्त ॥ एक जीवावरी तृप्त होत ॥ आहेत जीव सकळ हे ॥३८॥

ऐसा विचार करुनि मनीं ॥ त्वचा घेतली काढुनि ॥ रतिरति मांस तुकडे करोनी ॥ जळचरांतें ओपीतसे ॥३९॥

उरल्या अस्थी त्या जळांत ॥ टाकूनि तेथूनि उठला नाथ ॥ परी त्या जळा नसे अंत ॥ अस्थी तळीं व्यक्त जाहूल्याती ॥१४०॥

ऐसे करिता गौरनंदन ॥ मांस तें सकळ गेलें आटून ॥ मांस सरल्या आतडें पूर्ण ॥ जळचरांतें भक्षविलें ॥४१॥

एक त्वचेरहित भाग ॥ कांहीं न ठेवी वरतें अव्यंग ॥ खडकीं पवित्र करुनि चांग ॥ त्वचा घेऊन चालला ॥४२॥

चालला परी तो सदनीं ॥ शिबिरीं नसे मच्छिंद्रमुनी ॥ शांभवीअर्था बाजारभुवनीं ॥ संचारलासे महाराजा ॥४३॥

तो येतांचि तेथें मच्छिंद्रनाथ ॥ मग तान्हा पसरी प्रावणी त्वचेत ॥ मित्ररश्मि पाहोनि वात ॥ सुकावया घातलें ॥४४॥

तों येरीकडे मच्छिंद्रनंदन ॥ शांभवी आलासे घेऊन ॥ कंदा कुत्का सिद्ध करुन ॥ असनावरी बैसला ॥४५॥

बैसला परी गोरक्षातें ॥ म्हणे बा रे कोठें मीननाथ ॥ येरी म्हणे धुवोनि त्यातें ॥ स्वच्छ आणिलें महाराजा ॥४६॥

मच्छिंद्र म्हणे आणिलें परी ॥ कोठें ठेविला न दिसे नेत्रीं ॥ येरी म्हणे तान्हा प्रावरीं ॥ सुकूं घातला महाराजा ॥४७॥

म्हणे मच्छिंद्र काय बोलसी ॥ घातला सुकूं ऐसें म्हणसी ॥ येरी म्हणे कीं असत्य तुम्हांसी ॥ भाषण माझें वाटतसे ॥४८॥

तरी बाहेर शीघ्र येवोन ॥ स्वचक्षूनें पहावा विलोकून ॥ ऐसें बोलता मच्छिंद्रनंदन ॥ तेचि क्षणीं बाहेर येतसे ॥४९॥

म्हणे कोठें रे मीननाथ ॥ परी पाहतां म्हणे तान्हा प्रावर्णातें ॥ न्याहाळोनि पाहतां देखे त्वचेतें ॥ मग धरणी आंग सांडीतसे ॥१५०॥

म्हणे अहा रे काय केलें ॥ बाळ माझें कैसें मारविलें ॥ अंग धरणीवरी टाकिलें ॥ वरी लोळे गडबडां ॥५१॥

अहा अहा म्हणूनी ॥ मृत्तिका उचलोनि घाली वदनीं ॥ आणि वक्षःस्थळा पिटूनी ॥ शोक करी आक्रोशें ॥५२॥

परम मोहें आरंबळत ॥ उठउठोनि त्वचा कळीत ॥ हदयीं लावूनि आठवीत ॥ बाळकाच्या गुणातें ॥५३॥

अहा तुझा मी असें जनक ॥ परम शत्रु होतो एक ॥ जननींचें तोठूनि बाळक ॥ तुज आणिलें कैसें म्यां ॥५४॥

म्हणे अहा रे मीननाथा ॥ मज सांडूनि कैसा गेलासी आतां ॥ एकटा परदेशी सोडूनि तत्त्वतां ॥ मार्ग मिळाला तुज केवीं ॥५५॥

आतां तूतें कीलोतळा ॥ कोठूनि पाहील मुखकमळा ॥ अहा तुझा कापिला गळा ॥ कैसा येथें आणूनी ॥५६॥

बाळका स्त्रियांचे राज्यांत ॥ भुभुःकारें पावशील मृत्यु ॥ म्हणोनि बा रे तुजसी येथें ॥ रक्षणातें आणिलें ॥५७॥

आणिलें परी तुज निश्वितीं ॥ कृत्तांत झाला गोरक्ष जती ॥ ऐसें म्हणोनि धरणीप्रती ॥ अंग टाकी घडाडून ॥५८॥

पुन्हा उठे मच्छिंद्रनंदन ॥ त्वचा हदयी धरा कवळून ॥ म्हणे बाळा तुजसमान ॥ पुत्र कैंचा मज आतां ॥५९॥

अहा बाळाचें चांगुलपण ॥ मज भासतसे जैसा मदन ॥ अहा बाळाचे उत्तम गुण ॥ कोणा अर्थी वर्ण मी ॥१६०॥

बाळा लोटलीं वर्षे तीन ॥ परी काय सांगू मंजुळ बोलणें ॥ हा ताता ऐसें म्हणोन ॥ हाक मारीत होतासी तूं ॥६१॥

बा रे तनू असतां कोवळीं ॥ परी शयनीहून उठसी उषःकाळीं ॥ माथा ठेवूनि मम पदकमळीं ॥ अहो तात ऐसें म्हणसी ॥६२॥

बा तू वसत होतासी मम शेजारीं ॥ मर्यादा रक्षीत होतांसी अंतरीं ॥ अरे कठिण वागुत्तरीं ॥ शब्द वाहिला नाहीं म्यां ॥६३॥

बा रे भोजन करितां ताटीं ॥ चतुरपणाची परम हातवटी ॥ आपुल्या पुढें ठेवूनि दृष्टि ॥ ग्रास देसी बाळका ॥६४॥

अहा रे अहा मीननाथ बाळा ॥ परमज्ञानी वाचा रसाळा ॥ लिप्त कदा नव्हेसी मळा ॥ शुद्ध मुखकमळा मिरवीसी ॥६५॥

अहा बारे चक्षुघ्राण ॥ कधीं न पाहिलें तुझें मळिण ॥ आज तुझे अंग विष्ठावेष्ठन ॥ कैसें अमंगळ जावया ॥६६॥

बा रे कधीं मजवांचून ॥ न राहसी एकांत पण ॥ आजिचे दिनीं शयनीं मज सोडून ॥ कैसा परत गेलासी ॥६७॥

बा रे माय तुझी कीलोतळा ॥ तिचा कधीं न पाहसी लळा ॥ आसनीं शयनीं मजपासूनि बाळा ॥ पैल झाला नाहीस तूं ॥६८॥

तरी ऐसें असूनि तुझें मनीं ॥ आजि मज गेलासी सोडूनी ॥ अहा एकदां येऊनि अवनीं ॥ मुख दावीं मज बाळा ॥६९॥

ऐसें म्हणोनि मच्छिंद्रनाथ ॥ हंबरडा गायीसमान फोडीत ॥ अहा माझा मीननाथ ॥ कोणीं दाखवा म्हणतसे ॥१७०॥

भूमीं लोळे अश्रु नयनीं ॥ नेत्रीं ढाळितां न समाये पाणी ॥ वक्षःस्थळादि पिटूनि अवनीं ॥ दाखवा म्हणे मीननाथ ॥७१॥

ऐसें म्हणोनि आक्रंदत ॥ ते पाहून गोरक्षनाथ ॥ मनांत म्हणे अद्यापि भ्रांत ॥ गेली नाहीं श्रीगुरुची ॥७२॥

मग पुढें गोरक्षनाथ होऊन ॥ म्हणे महाराजा कां घेतां अज्ञानपण ॥ कोण तुम्ही कोणाचा नंदन ॥ करितां रुदन त्यासाठी ॥७३॥

अहो पुरतें पाहतां कोण मेला ॥ अशाश्वताचा भार हरला ॥ शाश्वत अचळ आहे बोला ॥ कदा काळीं न मरे तो ॥७४॥

अहो तुमचा मीननाथ ॥ नामधारी असे त्यांत ॥ तो कदा न मरे योजिल्या घात ॥ आहे शाश्वत महाराजा ॥७५॥

तो कदा न मरे शस्त्रघातांनीं ॥ त्यातें न जाळी कदा वन्ही ॥ अनिळ न शोषी ना बुडवी पाणी ॥ शाश्वत चिन्ही नांदतसे ॥७६॥

ऐसें बोलता गोरक्षक ॥ परी कदा न सोडी शोक ॥ अहा अहा मीननाथ ॥ ऐसें म्हणोनि आक्रंदे ॥७७॥

ऐशिया आग्रहाचा अर्थ ॥ तें पाहूनियां गोरक्षाच्या ॥ मग संजीवनीमंत्राप्रत ॥ स्मरण करिता पैं झाला ॥७८॥

करीं कवळूनि भस्मचिमुटी ॥ संजीवनी मंत्र जपे ओठीं ॥ त्वचेप्रती सोडिता झाला मुष्टीं ॥ मीननाथ ऊउला ॥७९॥

उठतांचि मीननाथ ॥ मच्छिंद्राचे गळा पडत ॥ मच्छिंद्र पाहूनि हदयांत ॥ परम मोहें धरीतसे ॥१८०॥

चुंबन घेऊनि म्हणे बाळा ॥ कोठें गेला होतासी खेळा ॥ मज टाकूनि विनयस्थळा ॥ गमन केलें होतें कीं ॥८१॥

ऐसें म्हणोनि जैसे तैसे ॥ तोही अस्त पावला दिवस ॥ दुसरे दिनीं मीननाथास ॥ घेऊनि ते चालिले ॥८२॥
मार्गी चालतां त्रिवर्ग जाण ॥ गोरक्ष करितां झाला बोलणें ॥ हे महाराजा मच्छिंद्रनंदन ॥ चित्त द्यावें मम बोला ॥८३॥

तुमचा प्रताप पाहतां अवनीं ॥ निर्जीवा जीववाल वाटे मनीं ॥ ऐसें असूनि सुतालागुनी ॥ रुदन केलें हे काय ॥८४॥

तरी हें रुदन करावया कारण ॥ काय होतें बोला वचन ॥ ऐसे मीननाथ सहस्त्रावधीनें ॥ संजीवनीने निर्माल ॥८५॥

तरी हें आश्वर्य वाटे मनीं ॥ स्वामी पडेल शोकरुदनीं ॥ कीं चिंताहारक चिंतामणी ॥ तो चिंतेमाजी पडियेला ॥८६॥

ऐसे ऐकोनि मच्छिंद्रनाथ ॥ म्हणे तुवां मारिलें किमर्थ ॥ येरु म्हणे मोहभावार्थ ॥ तो पाहावया तुमचा ॥८७॥

तुम्ही वेराग्यशील म्हणवितां ॥ तरी माया लंघुनि व्हावें परता ॥ आशा मनिषा तृष्णा ममता ॥ लिप्त नसावी शरीरातें ॥८८॥

ऐशा परीक्षा भावनेसीं ॥ म्यां मारिलें मीननाथासी ॥ परी प्राज्ञिक तुम्ही सर्वज्ञराशी ॥ रुदन कासया केलें जी ॥८९॥

येरु म्हणे वत्सा ऐक ॥ तूं शिष्य माझा अससी एक ॥ तरी म्यांही परीक्षेंचे कौतुकें ॥ तुझें बाळा पाहिले असे ॥१९०॥

बा रे आशा तृष्णा मनिषा कामना ॥ काम क्रोध मद मत्सर वासना ॥ हे मोहमांदुसी मायासदना ॥ नांदणुकी करितात ॥९१॥

तरी तुझे ठायीं मायालेश ॥ आहे कीं नाहीं महापुरुष ॥ हे पहावया रुदनास ॥ आरंभिलें म्यां पाडसा ॥९२॥

आम्ही अलक्षरुपी पाहणें ॥ आणि विज्ञानज्ञानानें विवरणें ॥ याच कौतुकें जाणपते ॥ पाहिलें म्यां पाडसा ॥९३॥

बा रे शाश्वत अशाश्वत ॥ तुज कळलें कीं नाहीं होतों यां भ्रांतीत ॥ तयाची परीक्षा रुदननिमित्त ॥ तुझी घेतली पाडसा ॥९४॥

आतां बा रे तुझे वयसपण ॥ समूळ आजि झालें हरण ॥ पयतोयाचेनि कारण ॥ हंसपुरुष मिरविशी ॥९५॥

ऐसें बोलतां गुरुनाथ ॥ गोरक्ष चरणीं माथा ठेवीत ॥ म्हणें महाराजा तुम्ही सनाथ ॥ या देहासी पैं केलें ॥९६॥

ऐसें बोलूनि वागुत्तर ॥ पुन्हां गमती मार्गापर ॥ मुक्काममुक्कामीं ज्ञानविचार ॥ गुरुशिष्य करिताती ॥९७॥

असो यापरी करितां गमन ॥ पुढें कथा येईल वर्तून ॥ नरहरीवशीं धुंडीनंदन ॥ श्रोतियांते सागेल ॥९८॥

तरी पुढील अध्यायीं कथाराशी ॥ पुण्यषर्वत पापनाशी ॥ श्रोते स्वीकारुनि मानसीं ॥ अवधानिया बैसावें ॥९९॥

तरी नरहरिवंशीं धुंडीसुत ॥ तुमचा आहे शरणागत ॥ मालू नाम ठेविलें सत्य ॥ तो कथा सांगेल तुम्हांसी ॥२००॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ द्वाविंशतितमाध्याय गोड हा ॥२०१॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ अध्याय ॥२२॥ ओव्या ॥२०१॥


श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय २३

श्रीगणेशाय नमः

जयजयाजी कमळानना ॥ दुष्टदानवअसुरमर्दना ॥ भक्तकामचकोरचंद्रानन ॥ यादवेंद्रा आदिपुरुषा ॥१॥

हे पयोब्धिवासा यदुकुळटिळका ॥ पुढें बोलवीं कथानका ॥ जेणें श्रोतियां चित्तदोंदिका ॥ आनंदाब्धि उचंबळे ॥२॥

मागिले अध्यायीं सौराष्ट्रग्रामीं ॥ गोरक्षानें मीननाथा मारुनी ॥ पुन्हां उठविलें परीक्षा देऊनी ॥ श्रीगुरुच्या भावने ॥३॥

मच्छिंद्रें धरुनि अज्ञानपण ॥ मीननाथासवे केलें रुदन ॥ परी गोरक्षाचें जाणीवपण ॥ परीक्षेंतें आणिलें ॥४॥

असो यापरी तेथूनि निघून ॥ मार्गी करीत चालिले गमन ॥ तों तैलंगदेशीं गोदासंगमन ॥ समुद्रतीरा पातले ॥५॥

गोदांसंगमीं करुनि स्नान ॥ आत्मलिंग शिवातें भावें पूजून ॥ तेथूनि गोदेचे तट धरुन ॥ पांश्वमदिशे गमताती ॥६॥

तों बारा लिंगांतील लिंग समर्थ ॥ आंवढ्या आणि परळी वैजनाथ ॥ तैं करुनियां सव्य गोदातीर्थ ॥ घेऊनियां चालिले ते ॥७॥

मार्गी चालितां गोदा सव्य ॥ तो वाल्मीकस्थान विपिनमय ॥ गर्भगिरि पर्वतप्राय ॥ येऊनियां तेथें पोचले ॥८॥

तें रान कर्कश अचाट ॥ गगनचुंबित तरु अफाट ॥ तयांमाजी तृण अफाट ॥ न मिळे वाट चालावया ॥९॥

व्याघ्र जंबूक शार्दूळ हरी ॥ वराह रीस काननातरीं ॥ हिंडती ते उन्मत्तापरी ॥ उग्र वेष दावूनियां ॥१०॥

जाळिया वेली कर्दळी सघन ॥ कीं जेथें रश्मींचें न पवे दर्शन ॥ कीं अर्कोदया लपे गगन ॥ ऐसा भास वाटतसे ॥११॥

बोरी बाभळ पळस शमी ॥ रातांजन कंदर्क्प अनेकनामी ॥ खैर हिंवर कंटकधामी ॥ काननांत तरु मिरवती ॥१२॥

एक तुराट्ट अर्की फुल्लाट ॥ वरकड तीक्ष्ण कंटकनट ॥ तेवीं कनकखंडजाळी अचाट ॥ पर्णकुटिका जैसा कीं ॥१३॥

तयांमाजी तृण उचित ॥ स्थावर तरु जाहले व्यक्त ॥ तेणें धरादेवींचें सहसा नितांत ॥ झाकिन्नले शरीर ॥१४॥

महा तें कानन सुरस ॥ वसन नेसविलें भूदेवीस ॥ हरितवर्णी कुसुमपदरास ॥ बुटलिंगी मिरवली ॥१५॥

म्हणाल कासया नेसली वसन ॥ तो परपुरुष दिनकर गगनीं ॥ म्हणूनि कुळवंत दारा लज्जेनें ॥ स्वशरेंरा लपवी ती ॥१६॥

म्हणूनि मित्रकांता जागा ॥ सांडूनि बैसल्या अंबुजभागा ॥ धरादेवीच्या लज्जित मार्गी ॥ लक्षूनियां रक्षिंले ॥१७॥

ऐसियापरी कानन अचाट ॥ दर्शन नोहे महीपाठ ॥ तेथें पाहूनि मच्छिंद्र सुभट ॥ मनामाजी दचकला ॥१८॥

दचकला परी कवण अर्थ ॥ कनकंवाटे जे होती भस्मझोळींत ॥ तस्कर कोणी हरतील तीतें ॥ म्हणूनि चित्तीं विस्मित ॥१९॥

तैसा नव्हे आणिक अर्थ ॥ गोरक्षाचा लोभी स्वार्थ ॥ पहावया परीक्षेंत ॥ मच्छिंद्रनाथ उदेला ॥२०॥

आपण घेऊनि अज्ञान ॥ पाहे गोरक्षाचें लक्षण ॥ नातरी प्रतापवान ॥ तस्करभय त्या नाहीं ॥२१॥

कीं ये तमाचा प्रतापजेठीं ॥ अर्का संचरे भय पोटीं ॥ कीं उदधीचीं बळी चंचुपुटीं ॥ लागतां कोप काय थरथराटे ॥२२॥

कीं मशकाचे उड्डाणें ॥ मंदराचळ व्यापेल कीं भयानें ॥ कीं सर्पकृत किंवा वृश्चिकदंशानें ॥ खगेंद्रा काय भय त्याचे ॥२३॥

तन्न्यायें मच्छिंद्रनाथ ॥ पाळूं न शके तस्कर तयातें ॥ परी श्रीगोरक्षाचें चित्त ॥ परीक्षेसी उदेलें ॥२४॥

कल्पूनि चित्तीं ऐसियापरी ॥ मग गोरक्षातें जती वागुत्तरीं ॥ बोलतां झाला काननांतरी ॥ पाचारुनि निकटत्वें ॥२५॥

म्हणे वत्सा ऐक बा कैसें ॥ उद्भट दिसे विपिन कर्कश ॥ तरी कांहीं भय अरण्यास ॥ नांदतें कीं तस्करीं ॥२६॥

परम पूर्ण व्यक्त तरुदाटी ॥ जेथें अर्क न पडे दृष्टीं ॥ ऐसिये काननीं कर्कश पोटीं ॥ मज भय आज संचरलें ॥२७॥

तरी बाळा प्रज्ञावंता ॥ आहे कीं नाही भय सांग आतां ॥ तस्करभयाची समूळ वार्ता ॥ काननांत न येवो या ॥२८॥

ऐसें बोलतां मच्छिंद्रनाथ ॥ गोरक्ष विचार करी मनांत ॥ म्हने तस्करभय गुरुतें ॥ काय म्हणूनि उदेलें ॥२९॥

तया शब्दोदयाचा अर्थ ॥ श्रीगुरुजवळ असेल वित्त ॥ म्हणूनि हा शब्द उदयवंत ॥ झाला असेल निश्चयें ॥३०॥

तरी तो म्हणे ताता कैसे समजावें ॥ फुलावरुनि रुखा द्यावीं नांवें ॥ ऐसें शब्दावरुनि मान समजावें ॥ ओळखावें सुज्ञांनीं ॥३१॥

तस्मात् गुरुपाशीं वित्त ॥ आहे काय ऐसें विचारीत ॥ तरी या शब्दाची असे भ्रांत ॥ निरसूनि दुर करावी ॥३२॥

ऐसें योजूनि गोरक्षनाथ ॥ मौन धरोनि मार्गी चालत ॥ परी काननीं अधिकोत्तरांत ॥ भयानक दिसे पदोपदीं ॥३३॥

जंव जंव कानन भयानक दिसे ॥ तंव तंव गोरक्षा मच्छिंद्र पुसे ॥ म्हणे बा अरण्य बहु कर्कश ॥ पदोपदीं दिसतसे ॥३४॥

तरी तस्करभय येथें ॥ आहे कीं नाहीं सांग मातें ॥ परी गोरक्ष उत्तरातें ॥ काहींच तयातें न देई ॥३५॥

जैसा विश्वामित्र समर्थ ॥ मखरक्षणा त्या श्रीरामार्थ ॥ स्तवितां तेणें दशरथातें ॥ परी उत्तर न देई कांहींच ॥३६॥

त्याचि न्यायें गोरक्ष मौन धरोनि ॥ गमतसेच सुपंथ अवनीं ॥ तों पुढें चालतां देखिलें पाणी ॥ संचळपणी स्थिरारावलें ॥३७॥

उदक पाहतां संचळवंत ॥ गोरक्षा वदे मच्छिंद्रनाथ ॥ म्हणे बा गोरक्षा संचरत येथें ॥ उदक आहे नेटकें ॥३८॥

तरी माझी झोळी कक्षेंत घालून ॥ पुढें कांहींसे करीं गमन ॥ तों मीही येतो लगबगेंकरुन ॥ दिशा फिरुन पाडसा ॥३९॥

ऐसें म्हणतां मच्छिंद्रनाथ ॥ अवश्य गोरक्ष म्हणे त्यास ॥ मग स्कंधीं वाहूनि मीननाथास ॥ कक्षीं झोळी घातली ॥४०॥

परी घालितां कक्षे झोळी ॥ वजनवस्त लागें हस्तकमळी ॥ मग मनांत म्हणे प्रतापबळी ॥ भय यांतचि नांदतसे ॥४१॥

ऐसें म्हणोनि स्वचित्तांत ॥ स्कंधी वाहूनि मीननाथ ॥ मच्छिंद्रा सोडूनि थिल्लरांत ॥ पुढें जात सच्छिष्य ॥४२॥

पुढें जातां शतपावलीं ॥ कक्षेतूनि भिक्षाझोळी काढिली ॥ त्यांत पाहतां देखिली ॥ वीट उत्तम हाटकाची ॥४३॥

पाहतांचि दृष्टीं कनकवीट ॥ म्हणे कीं फुका भ्याला मच्छिंद्रनाथ सुभट ॥ मग दाट लक्षूनि तृण अफाट ॥ झुगारिली वीट त्यामाजी ॥४४॥

त्या कनकविटेसमाकृती ॥ पाषाण पाहूनि गोरक्षजती ॥ झोळींत घालूनि कक्षेप्रती ॥ पुन्हां नेसवी झोळीतें ॥४५॥

कक्षे झोळी घालून ॥ स्कंधीं पुन्हां मीननाथ घेऊन ॥ लगबगोंनी मार्गगमन ॥ करीत असे नाथ तो ॥४६॥

सुपंथ लक्षितां तांतडीनें ॥ एक कोस गेला त्वरेंकरुन ॥ तों मच्छिंद्रनाथ दिशा फिरुन ॥ जात मागुता तांतडी ॥४७॥

पुढें जातसे गोरक्षनाथ ॥ मागूनि मच्छिंद्र लगबगा येत ॥ परी तो नाटोपे गोरक्षनाथ ॥ मार्ग क्रमितां मच्छिंद्रा ॥४८॥

परी इतुक्या नेटें भावें ॥ मार्ग मिळतां नाटोपावें ॥ तरी लघुशंकेलागीं धावें ॥ संगतसंगमीं मिळाल्या ॥४९॥

यापरी शौचा सर्वांशीं जावें ॥ लागत आहे सर्वानुभवें ॥ संगतसंगमी होऊनियां ठावे ॥ विसांवयासी महाराजा ॥५०॥

ऐसियापरी आहे गमन ॥ तेवीं मच्छिंद्रा आले घडून ॥ परम तांतडीं करितां गमन ॥ परी तो न मिळे गोरक्ष ॥५१॥

ऐसेपरी गोरक्षनंदन ॥ पुढें चालला सुपंथपथानें ॥ मार्ग काढिला दीड योजन ॥ जाणूनि खूण अंतरींची ॥५२॥

तों अवचट देखिला तरु ॥ गोरक्ष पाहे दृष्टीपरु ॥ मनांत म्हणे व्हावें स्थिरु ॥ येऊं द्यावें नाथासी ॥५३॥

ऐसें योजूनि स्वचित्तात ॥ पाहता झाला उंबरतरुतें ॥ तों त्या ठायीं पोखरणी अदभूत ॥ वामतीर्थ देखिलें ॥५४॥

मग झोळी काढिली कक्षेंतून ॥ स्कंधीचा उतरिला नाथ मीन ॥ मग अंबुपात्र करीं कवळून ॥ पोखरणींत उतरला ॥५५॥

सारुनि आपुलें स्नान ॥ अंगीं भस्म केलें लेपन ॥ उपरी आपुले नेम सारुन ॥ घातलें स्नान मीननाथा ॥५६॥

तों मार्गाहूनि मच्छिंद्रनाथ ॥ अति तांतडीनें आले तेथ ॥ स्नान करुनि यथास्थित ॥ नित्यकर्म सारिलें ॥५७॥

सकळ सारिलें नित्यनेमा ॥ बैसले मार्गी विश्रामा ॥ बैसल्या उपशब्दउगमा ॥ पुन्हां दावी मच्छिंद्र ॥५८॥

म्हणे बा रे गोरक्षनाथ ॥ कर्कश अरण्य येथपर्यंत ॥ आपणां लागलें भयानकवत ॥ पुढेंही लागेल ऐसेंचि ॥५९॥

येरु म्हणे जी गुरुराया ॥ याहूनि पुढें अधिक काय ॥ मच्छिंद्र म्हणें काहीं भय ॥ काननीं या आहे कीं ॥६०॥

गोरक्ष म्हणे वागुत्तर ॥ कीं महाराजा असतां जड पर डर ॥ होता जो तो डर थोर ॥ मागेंचि राहिला आहे जी ॥६१॥

आतां नाहीं डर कैंचा ॥ स्वस्थ असावें कायावाचा ॥ मागें राहिला भाव साचा ॥ जड डराचा महाराजा ॥६२॥

तरी आतां कृपादेही ॥ आपणांपाशीं डर नाहीं ॥ मग भय कैचें काननप्रवाहीं ॥ जड असल्या अचाट ॥६३॥

यावरी बोले मच्छिंद्रनाथ ॥ आपणांजवळ जड ॥ आहे बहुत ॥ हाटकवीट भस्मझोळींत ॥ स्त्रीराज्यांतूनि आणिली ॥६४॥

म्हणूनि तूतें भय स्थित ॥ विचारितां काननांत ॥ येरु म्हणे अशाश्वत ॥ जडही नसे डर गेला ॥६५॥

ऐसें म्हणतां गोरक्षनाथ ॥ मच्छिंद्राचे काय चित्तांत ॥ चित्तीं म्हणे हाटकविटेतें ॥ सांडिली की कळेना ॥६६॥

ऐसें जाणूनि स्वचित्तांत ॥ मच्छिंद्र तळमळी पहावयातें ॥ परी गोरक्ष मच्छिंद्राचा धरुनि हात ॥ पर्वतावरी नेतसे ॥६७॥

तो महापर्वत गर्भगिरी ॥ उभे चढतांचि लघुशंका करी ॥ पर्वतमाथां गोरक्ष मौन वरी ॥ मज समजेल म्हणूनी ॥६८॥

मग दोन घटिका स्वस्तिक्षेम ॥ सेविती ते विश्राम ॥ उपरी अवयव परिक्षालून ॥ मार्ग क्रमूं म्हणताती ॥६९॥

ज्याचें त्यानें वस्त्रभूषण ॥ अंगीं केलें परिधान ॥ आपुलाल्या झोळ्या घेवोन ॥ कक्षे अडकवूनि बांधिती ॥७०॥

तो मच्छिंद्र आपुली घेऊनि झोळी ॥ विकासूनि पाहे नेत्रकमळी ॥ तो कनक नसे पाषाणवळी ॥ झोळीमाजी नांदतसे ॥७१॥

तें पाहूनि मच्छिंद्रनाथ ॥ धरणीवरी अंग टाकीत ॥ अहा अहा म्हणूनि आरंबळत ॥ कनकवीट गेली म्हणोनी ॥७२॥

मच्छिंद्र बोले क्रोधेंकरुन ॥ तुवां टाकिलें रे माझें धन ॥ तूतें ओझें काय दारुण ॥ झालें होतें तयाचें ॥७३॥

अहा आतां काय करुं ॥ कोठें पाहूं हा भांगारु ॥ परम यत्नें वेंचूनि शरीरु ॥ हाटक आणिले होते म्यां ॥७४॥

तरी हा थोर मध्यें अनर्थ ॥ कैसा योजिला श्रीभगवंतें ॥ हातीचें सांडूनि गेलें वित्त ॥ तरी देवक्षोभ जाणावा ॥७५॥

ऐसें म्हणोनि दडदडां धांवत ॥ पुन्हां परतोनि मागे पहात ॥ ठाई ठाई चांचपीत ॥ उकरीत महीसी ॥७६॥

ऐसी करोनि अपार चेष्टा ॥ अंग टाकी महीं प्रतिष्ठा ॥ गडबडां लोळोनि स्फुंदे स्पष्टा ॥ करकमळें पिटीतसे ॥७७॥

पुनः पुनः मही उकरी ॥ इकडे तिकडे पाषाण करीत ॥ भाळावरती ठेवूनि हस्त ॥ कर्म बुडालें म्हणतसे ॥७८॥

ऐसें म्हणोनि आक्रोश करीत ॥ दीर्घस्वरें हंबरडा फोडीत ॥ जीवास सोडूं म्हणत ॥ कैसें केलें देवानें ॥७९॥

पिशाचासम भ्रमण करीत ॥ म्हणे माझें येथें आहे वित्त ॥ धांवोनि उकरा महींतें ॥ कोणीतरी येऊनियां ॥८०॥

गोरक्षापाशीं शीघ्र येऊन ॥ म्हणे तूं माझें न देशी धन ॥ तूं कोण कोणाचा येऊन ॥ पाळतीने मिरविसी ॥८१॥

ऐसे अनाओळखीने बोलत ॥ तेणें हदयीं दचकला गोरक्षनाथ ॥ मग मच्छिंद्राचा धरोनि हात ॥ पर्वतावरी नेतसे ॥८२॥

तो महानग पर्वत गर्भगिरी ॥ उभे चढले तयावरी ॥ चढतां लघुशंका करी ॥ पर्वतमाथां गोरक्ष ॥८३॥

सिद्धीयोग मंत्र जपूनी ॥ मंत्रधार कनकवर्णी ॥ सकळ पर्वत देदीप्यमानी ॥ शुद्ध हाटकीं मिरवला ॥८४॥

मग श्रीगुरुसी नमन करुन ॥ म्हणे लागेल तितुकें घेईजे सोनें ॥ तें मच्छिंद्र पाहूनियां जाण ॥ म्हणे धन्य धन्य गोरक्षा ॥८५॥

गोरक्ष म्हणे गुरुनाथा ॥ लागेल तितुकें घ्यावें कनका ॥ येरु म्हणे तूं परीस निका ॥ लाभलासी पाडसा ॥८६॥

मग हदयी धरुनि गोरक्षनाथ ॥ म्हणे बा धन्य आहेस सुत ॥ सकळ सिद्धींचे माहेर युक्त ॥ होऊनि जगीं मिरविसी ॥८७॥

मग मी ऐसा परीस टाकोन ॥ काय करुं फार सुवर्ण ॥ उत्तम निधनालागी सांडून ॥ वल्लीरसा कां पहावें ॥८८॥

हातींचा टाकूनि राजहंस ॥ व्यर्थ कवळूं फोल वायस ॥ कीं कामधेनू असतां गृहास ॥ तक्र मागें घरोघरीं ॥८९॥

दैवें निधी लाभल्या हातीं ॥ किमर्थ शोधाव्या किमयायुक्ती ॥ चिंतामणीची असतां वस्ती ॥ चिंता करावी कासयातें ॥९०॥

तें बाळका कैसें कळे पूर्ण ॥ अर्थ लाधला तुजयोगानें ॥ आतां कासया व्हावें सुवर्ण ॥ सकळनिधी अससी तूं ॥९१॥

ऐसें बोलतां मच्छिंद्रनाथ ॥ उपरी गोरक्ष विचार करीत ॥ म्हणे महाराजा आजपर्यंत ॥ कनक झोळी वागविलें ॥९२॥

तरी तें वागवावया कारण ॥ कोणता होता मनीं काम ॥ तीच कामना दृश्यमान ॥ मातें दावीं महाराजा ॥९३॥

येरु म्हणे वत्सा ऐक ॥ मम हदयींची होती भूक ॥ आपुले देशीं मोडूनि हाटक ॥ बहु साधुंतें पुजावें ॥९४॥

तया हाटकाचें करुनि अन्न ॥ मेळवावे अपार संतजन ॥ भंडारा करावा ऐसें मन ॥ मनकामनेतें वेधलें ॥९५॥

इतुकाचि अर्थ होता चित्तीं ॥ म्हणोनि वागविलें हाटकाप्रती ॥ यावरी बोले गोरक्ष जती ॥ तरी ही कामना फेडीन मी ॥९६॥

मग पर्वती बैसवोनि मच्छिंद्रनाथा ॥ आपण पुन्हां उतरला खालता ॥ उचलोनि नेलें माथां ॥ पर्वतमाथीं गोरक्षकें ॥९७॥

मग गंधर्वास्त्र जपोनि होटीं ॥ स्वर्गा प्रेरिली भस्मचिमुटी ॥ तेणेंकरुनि महीतळवटीं ॥ चित्रसेन उतरला ॥९८॥

श्रीनाथासी करुनि नमन ॥ उभा राहिला कर जोडून ॥ म्हणे महाराजा आज्ञा कोण ॥ काय कार्य करावें मी ॥९९॥

येरु म्हणे गंधर्वनाथा ॥ आणिक पाचारीं गंधर्व येथें ॥ त्यांसी पाठवूनि महीवरतें ॥ मेळा करा सर्वाहीं ॥१००॥

नाना बैरागी संन्यासी ॥ जपी तपी संतयोगियांसी ॥ येथें आणोनि समाजेंसीं ॥ अन्नदानें उत्साह करावा ॥१॥

सुरवरगंधर्वगणसहित ॥ देवदानवकिन्नरांसहित ॥ मेळवोनि अपरिमित ॥ आनंद उत्साह करावा ॥२॥

ऐसें सांगतांचि चित्रसेनातें ॥ मग चित्रसेनें पाचारी गंधर्वातें ॥ एकशत गंधर्व महीवरते ॥ प्रकट झाले येवोनी ॥३॥

मग त्या गंधर्वासी चित्रसेने ॥ सांगूनि सर्व वर्तमान ॥ दाही दिशा प्रेरणा करुन ॥ प्रज्ञावंत आणिले कीं ॥४॥

जपी तपी योगशीळ ॥ गुप्त प्रगट आणिले सकळ ॥ नवनाथादि ऋषिमंडळ ॥ येऊनियां पोहोंचले ॥५॥

शुक दत्तात्रेय याज्ञवल्की ॥ वसिष्ठ वामदेव कपिल शेखी ॥ व्यास पाराशर नारद ऋषी ॥ वाल्मीक पाचारिले गंधर्वी ॥६॥

अठ्यायशीं सहस्त्र ऋषिभार ॥ स्वर्गीहूनि उतरले देवकिन्नर ॥ गणगंधर्वदि वसुलोक अपार ॥ तपोलोक पातले ॥७॥

त्यांतचि अष्टवसूंपहित ॥ उपरिचर आला विमानव्यक्त ॥ तेणें येतांचि मच्छिंद्रास वृत्तांत ॥ कीलोतळेचा सांगीतला ॥८॥

कीं सोडूनि स्त्रीदेश अवनी ॥ सिंहलद्वीपा गेला मैनाकिनी ॥ परी तुमच्या वियोगेंकरुनी ॥ क्षीणशरीर झालीसे ॥९॥

तरी असो कैसें ते ॥ भेटेल तुम्हां ईश्वरसत्ते ॥ परी योगक्षेम स्वशरीरातें ॥ आहांत कीं त्रिवर्ग ॥११०॥

मच्छिंद्र म्हणे अहो जी ताता ॥ तव कृपेची दृष्टी असतां ॥ सदा मिरवूं सर्व क्षेमता ॥ पदोपदी अर्थातें ॥११॥

ऐसे वदतां उभय जाण ॥ तों देवांसह उतरला पाकशासन ॥ ब्रह्मा विष्णु रुद्रादि पूर्ण ॥ महीलागीं उतरले ॥१२॥

श्रीनाथासी भेटोनि सकळ ॥ मग ठाई ठाई सर्व मंडळ ॥ विराजूनि वार्ता सकळ ॥ ठाई ठाई करिताती ॥१३॥

येरीकडे गोरक्षनाथें ॥ पाचारुनि मच्छिंद्रातें ॥ म्हणे समुदाय अपरिमित ॥ मिळाला कीं महाराजा ॥१४॥

तरी तुमची कनकवीट ॥ आणोनि देतों सुमट ॥ तितुक्यांत अर्थ सारोनि सुभट ॥ बोळवावें समस्तांतें ॥१५॥

यावरी बोले मच्छिंद्रनाथ ॥ काय करुं ही कनकवीट ॥ तुजएवढा शिष्यवर्गात ॥ असतां चिंता नसे मज ॥१६॥

ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ ॥ गदगदां हांसे गोरक्षसुत ॥ म्हणे महाराजा प्रतापवंत ॥ सकळ तुम्ही प्रगटलां ॥१७॥

ऐसें बोलोनि वागुत्तरीं ॥ माथा ठेवी चरणांवरी ॥ म्हणे महाराजा स्वशरीरीं ॥ स्वस्थ आपण असावें ॥१८॥

अष्टसिद्धी अणिमा गरिमा ॥ प्राप्ती प्राकाम्य आणि महिमा ॥ वशित्व ईशित्व आठवी प्रतिमा ॥ सिद्धीलागीं पाचारा ॥१९॥

पाचारिल्या अष्ट जणी ॥ येवोनि लागल्या गोरक्षचरणीं ॥ म्हणती आज्ञा करा स्वामी ॥ कामनेसह अर्थातें ॥१२०॥

येरु म्हणे वो प्रियभामिनी ॥ तृप्त करावें मंडळीलागुनी ॥ षड्रसान्नरुचीकरोनी ॥ संतुष्ट सर्व करावे ॥२१॥

मग तेथ अवश्य म्हणोनि सिद्धी ॥ वेंचित्या झाल्या आपुल्या बुद्धी ॥ अन्न निर्मिले पर्वतमांदी ॥ षड्रसादि पक्कान्नें ॥२२॥

ऐशा सिद्धी योजिल्या कामा ॥ याचपरी सडासंमार्जक्न आराम ॥ सप्तही सटव्या नेमूनि उत्तमा ॥ मही पवित्र करीतसे ॥२३॥

तरी त्या सप्तही सटव्या कोण ॥ ऐका तयांचीं नामाभिधानें ॥ आणि तयांतें काय कामानें ॥ निरोपिलें विधीनें ॥२४॥

तरी त्या उत्पत्तिस्थानीं जन्मकाळा ॥ जावोनि लक्षावें यांनीं बाळा ॥ विधिअक्षरें लिहिलीं भाळा ॥ वाचूनि पाहती सटव्या ॥२५॥

जरी सप्त सटव्या मानवासी ॥ शोभा न मिरवे असुरप्रदेशीं ॥ रानसटवी वनचरांसी ॥ विलोकूनि जातस्वे ॥२६॥

वृषभ अश्व गांवाचे पशू ॥ घोडसटवी आहे त्यांस ॥ वासतसटवी खेचरांत ॥ पक्षिकुळा मिरवतसे ॥२७॥

अंबुघासटवी जळचरांत ॥ सबुधासटवी उदळी जात ॥ ऐसिया कामीं सटव्या सात ॥ कमलोदभवें लाविल्या ॥२८॥

त्या सातही परिचारिका ॥ सडासंमार्जन करिती निका ॥ यापरी वाढणें आनंदोदिका ॥ जळदेवता आराधिल्या ॥२९॥

कुमारी धनदा नंदा विमला ॥ लक्ष्मी विख्याता प्रबळ ज्ञानमंगळा ॥ नववीं समर्थं देवता बाळा ॥ ह्या नवही वाढिती सकळातें ॥१३०॥

गंधर्वे करावें पाचारणें ॥ समाचार घ्यावा अष्टवसूनें ॥ चौकी द्यावी भैरवानें ॥ अष्टदिशा अष्टांनी ॥३१॥

उपरिचरवसूनें करपल्लवी ॥ सकळांसी दक्षणा द्यावीं ॥ मच्छिंद्र करीत आघवी ॥ प्रदक्षिणा भावार्थे ॥३२॥

चित्रसेन गंधर्वपती ॥ तांबूल देतसे सर्वांप्रती ॥ आणि तीर्थ जे गंगाभगीरथी ॥ तोय वाढी सर्वांतें ॥३३॥

यापरी अष्टोत्तरशत तीर्थे ॥ पाणी वाहती समर्थे ॥ आणि उचलणें उच्छिष्टपात्रातें ॥ ऐशीं कामे करिताती ॥३४॥

महानुभाव जो उमापती ॥ अती आदरें स्वपंक्तीं ॥ अप्सरा किन्नर गायन करिती ॥ नारदादि येवोनियां ॥३५॥

ऐसें नेम नेमूनियां कामा ॥ दिधलें ऐसें कार्य उगमा ॥ आनंदोत्साह होतां सुकर्मा ॥ सर्वानंद हेलावें ॥३६॥

ऐसी होतां आनंदस्थिती ॥ परी गाहिनी आठवला गोरक्षचित्तीं ॥ मग येवोनियां मच्छिंद्राप्रती ॥ बोलता झाला प्राज्ञिक ॥३७॥

हे महाराजा गुरुनाथा ॥ प्राणिमात्र आले समर्था ॥ परी कर्दमपुतळा गाहिनीनाथा ॥ येथें आणावा वाटतें ॥३८॥

ऐसें मोहक ऐकोनि वचन ॥ म्हणें गंधर्वा पाठवोन ॥ कोंतिगेसहित मधुब्राह्मण ॥ बाळासह आणावा ॥३९॥

मग चित्रसेना सांगोनि वृत्तांत ॥ पत्र लिहिलें मधुविप्राते ॥ सुलोचन गंधर्वाचे ओपून हस्तें ॥ कनकगिरीशीं पाठविला ॥१४०॥

गंधर्व जावोनि कनकगिरीसी ॥ भेटोनि कोंगिगे मधुविप्रासी ॥ मग आनंदोत्सव वृत्तांतासी ॥ निवेदिलें सकळ तेथे ॥४१॥

मग पत्र देवोनि त्याहातीं ॥ वाचून पाहे विप्रमूर्ती ॥ पाचारण ही मजकुरशक्ति ॥ ध्यानालागीं संचरली ॥४२॥

मग बाळासह सपरिवार ॥ येता झाला मधुविप्र ॥ मुक्कामोमुक्काम महीवर ॥ साधुनिया पोंचला ॥४३॥

सप्तवर्षी गहिनीनाथा ॥ आणूनि लोटिला पदवरुता ॥ मच्छिंद्र अंकीं घेवोनि त्यांतें ॥ प्रेमें चुंबन घेतसे ॥४४॥

अति स्नेहानें करोनि लालन ॥ म्हणे अवतारी करभंजन ॥ गैबी जन्मला गहिनीनाम ॥ सकळालागीं दिठावी ॥४५॥

ऐसिये स्नेहाचा परम अवसर ॥ पाहोनि बोलता झाला शंकर ॥ कीं आम्हालागीं पुढें अवतार ॥ घेणें आहे मच्छिंद्रा ॥४६॥

तरी त्या अवतरणीं नेमस्ती ॥ मही मिरवे नामांप्रती ॥ तरी त्या अनुग्रहाचे स्थितीं ॥ गहिनीनाथ वदविला ॥४७॥

तरी त्यातें विद्या अभ्यासून ॥ सकळ अधिकारी करावा पूर्ण ॥ मी अनुग्रह याचा घेईन ॥ पुढले ते अवतारीं ॥४८॥

ऐसें सांगतां शिव त्यास ॥ मग बोलावूनि गोरक्षास प्रत्यक्ष अनुग्रह गहिनीनाथास ॥ गोरक्षानें देवविला ॥४९॥

सर्व देवांचे साक्षीसहित ॥ मौळीं ठेविला वरदहस्त ॥ ब्रह्मपरायण गहिनीनाथ ॥ जाहला सत्य परियेसा ॥१५०॥

अनुग्रहउत्साह मंडळीसंगम ॥ एक मास उभवला आनंदद्रुम ॥ मग कुबेरा पाचारुनि नेम ॥ सांगता झाला गोरक्ष ॥५१॥

म्हणे हा कनकगिरी जा घेवोन ॥ अम्हां देई अपार भूषण ॥ सकळ मंडळी गौरवोन ॥ पाठवणें स्वस्थाना ॥५२॥

मग तो कुबेर बोलें वचन ॥ येथेंचि असों द्यावें धन ॥ मी लागेल तैसें इच्छेसमान ॥ भूषणातें आणितों ॥५३॥

मग अपार दिंडें वस्त्रें आणोन ॥ महत्त्वासारखें दिधलें वांटोन ॥ द्रव्यादि दैवोनि याचकजन ॥ तोषविले सकळ ॥५४॥

सकळ तोषले पावोनि मान ॥ पावती आपुलें स्वस्थान ॥ परी मच्छिंद्र तेथें राहोन ॥ अभ्यासिती गहिनीतें ॥५५॥

उपरी गंधर्व मच्छिंद्रपिता ॥ तो आपुले स्वस्थाना जातां ॥ त्यासवें देऊनि मीननाथा ॥ सिंहलद्वीपीं पाठविला ॥५६॥

उपरिचर वसूनें मीननाथ ॥ केला कीलोतळाच्या हस्तगत ॥ मच्छिंद्राचा सकळ वृत्तांत ॥ निवेदिला तियेसी ॥५७॥

कीलोतळेंनें ऐकोनि वृत्तांत ॥ नेत्रीं आणिलें अश्रुपात ॥ म्हणे आतां मातें मच्छिंद्रनाथ ॥ कैसा भेटेल कळेना ॥५८॥

उपरिचर बोले वो शुभाननी ॥ चिंता न करीं कांहीं मनीं ॥ एक वेळां मच्छिंद्रमुनी ॥ निजदृष्टीं पाहसील ॥५९॥

ऐसें म्हणोनि उपरिचर गेला ॥ येरीकडे कीलोतळा ॥ हदयीं कवळोनि मीननाथबाळा ॥ प्रेमें चुंबन घेतसे ॥१६०॥

म्हणे बाळा माझिये खंती ॥ होतसे कीं तुजप्रतीं ॥ सोडोनि आलासी नाथ निगुती ॥ श्री मच्छिंद्र पितयातें ॥६१॥

ऐसें बेलोनि मीननाथातें ॥ वारंवार चुंबन घेत ॥ येरीकडे गर्भाद्रातें ॥ गहिनी विद्या अभ्यासी ॥६२॥

तये वेळेस कोण कोण तेथें ॥ राहिलें होते ऐका नाथ ॥ विचार करोनि उमाकांत ॥ गर्भाद्रातें राहिले ॥६३॥

अदृश्य अस्त्र नगीं प्रेरुन ॥ स्वस्थाना गेला कुबेर निघोन ॥ तेणें नग तो कनकवर्ण ॥ झांकोळून पैं गेला ॥६४॥

परी गर्भाद्रि पर्वतांत ॥ वस्तीस राहिला उमाकांत ॥ तो अद्यापि आहे स्वस्थानांत ॥ म्हातारदेव म्हणती त्या ॥६५॥

तयाचिया पश्चिम दिशेसी ॥ कानिफा राहिला शिष्यकटकेंसी ॥ वस्ती करोनि नाम या ग्रामासी ॥ मढी ऐसें ठेविलें ॥६६॥

तयाचे दक्षिण पर्वतीं ॥ राहता झाला मच्छिंद्र जती ॥ त्याहूनि पूर्वेस महीपर्वतीं ॥ जालिंदर राहिला ॥६७॥

आणि त्या पर्वतापैलदेशीं ॥ नागनाथ राहिला वडवानळेंशीं ॥ आणि रेवणासिद्ध जया महाशीं ॥ विटेग्रामीं राहिला ॥६८॥

वामतीर्थ गर्भाद्रिपर्वतीं ॥ राहता झाला गोरक्ष जती ॥ सेवेसी शिष्य ठेवोनि सप्ती ॥ विद्या सागे गाहिनीते ॥६९॥

एक वर्षपर्यंत ॥ अभ्यासिला गाहिनीनाथ ॥ सकळ विद्येचे स्वसामर्थ्य ॥ तया देहीं सांठविलें ॥१७०॥

परी कोंतीगांवी मधुब्राह्मण ॥ गेले होते गहिनीस ठेवोन ॥ ते जालंदरासमीप दिशेकारण ॥ वस्तीलागीं विराजले ॥७१॥

विराजले परी गहिनीनाथ ॥ अभ्यासिते झाले पात्रभरित ॥ मग गोरक्ष बोळवोनि त्यातें ॥ विप्रापाशीं पाठविला ॥७२॥

यावरी त्या वस्तीस ॥ वसते झाले बहुत दिवस ॥ शके दहाशें वर्षांस ॥ समाधीं त्यांनी घेतल्या ॥७३॥

घेतल्या परी यवनधर्म ॥ कबरव्यक्त झाले आश्रम ॥ पुढें औरंगजेब तें पाहून ॥ पुसता झाला लोकांसी ॥७४॥

ह्या कोणाच्या असती कबरी ॥ ते म्हणती तव पूर्वजांच्या साचारीं ॥ मठींत कान्हाबापर्वती मच्छिंद्र ॥ आवडतें स्थान याचें तें ॥७५॥

त्याहूनि पूर्वेस जालिंदर ॥ विराजली त्याची कबर ॥ त्याहूनि खालता बल्ली थोर ॥ गाहिनीनाथ नांदतसे ॥७६॥

मग तेणें ऐकूनि ऐसी भात ॥ पालटिलें त्या नांवातें ॥ जानपीर जालिंदरातें ॥ ठेविलें असे राजानें ॥७७॥

गाहिनीनाथास गैवी पीर ॥ नाम ठेविलें तेवी साचार ॥ महीजदी बांधोनि पुजारे ॥ ठाई ठाई स्थापिले ॥७८॥

मच्छिंद्र आणि कानिफाचें ॥ नामाभिधान बदलूनि साचें ॥ मायावा कान्होबा बोलोनि साचें ॥ यवन पुजारी स्थापिले ॥७९॥

कल्याण कलबुगीं बाबाचैतन्य ॥ राजबागशर नाम ठेविलें त्यानें ॥ म्हणाल केलें यवनकारण ॥ ऐसें विपरीत त्या रायें ॥१८०॥

परी समाधी पाहिल्या कबरीऐशा ॥ म्हणोनि त्यातें पडला भास ॥ कीं हे पीर असतील यवनकुळींचे ॥ म्हणोनि प्रविष्ट करावें ॥८१॥

म्हणोनि ऐसें कृत्य घडलें ॥ यापरी ऐकोनि श्रोता बोले ॥ कीं कबरयुक्त नाथ केले भले ॥ काय म्हणोनि झालेती ॥८२॥

तरी ते अंतरसाक्ष नाथ ॥ यवन राजे होतील महीते ॥ ते छळितील हिंदूदेवांतें ॥ म्हणोनि कबरी बांधिल्या ॥८३॥

परी हें असो आतां कथन ॥ मध्यें कथा असती देदीप्यमान ॥ नाथांनीं योजूनि आपुलालें स्थान ॥ ठाई ठाई राहिले ॥८४॥

गोरक्ष सटव्या ठेवोनि रक्षण ॥ निघता झाला तीर्थांकारण ॥ त्या सटव्या तेथें अद्याप राहून ॥ रक्षिताती स्थानासी ॥८५॥

यापरी पुढें गोरक्षनाथ ॥ भेटेल जाऊनि भर्तरीस ॥ ती कथा पुढें रसाळभरित ॥ श्रोतिये श्रवणीं स्वीकारा ॥८६॥

नरहरिवंशीं धुंडीकुमर ॥ कवि मालू असे संतकिकर ॥ कथा सांगेल भक्तिसार ॥ भर्तरीचे आख्यान ॥८७॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ त्रयोविंशाध्याय गोड हा ॥१८८॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ अध्याय २३ ॥ ओव्या ॥१८८॥


श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय २४

श्रीगणेशाय नमः

जयजयाजी निरंजना ॥ अलक्ष गोचरव्यक्त निर्गुणा ॥ पूर्णब्रह्मा मायाहरणा ॥ चक्रचाळका आदिपुरुषा ॥१॥

हे गुणातीता सर्वत्रभरिता ॥ सगुणरुपा लक्ष्मीकांता ॥ मागिले अध्यायीं रसाळ कथा ॥ मच्छिंद्रोत्सव दाविला ॥२॥

एका सुवर्णविटेसाठीं ॥ कनकगिरी करी गोरक्षजेठी ॥ आतां मम वाग्वटी ॥ भर्तरी आख्यान वदवीं कां ॥३॥

तरी श्रोते ऐका कथन ॥ पूर्वी मित्ररश्मी करितां गमन ॥ वातचक्रीं प्रेरुनि स्यंदन ॥ अस्ताचळा जातसे ॥४॥

तों उर्वशी विमानासनीं ॥ येत होती भूलोकअवनी ॥ तंव ती दारा मुख्यमंडनीं ॥ मदनबाळी देखिली ॥५॥

देखतांचि पंचबाणी ॥ शरीर वेधलें मित्रावरुणी ॥ वेघतांचि इंद्रियस्थानीं ॥ येऊनि रेत झगटलें ॥६॥

झगटतांचि इंद्रिय रेत ॥ स्थान सोडूनि झालें विभक्त ॥ विभक्त होता पतन त्वरित ॥ आकाशाहूनि पैं झालें ॥७॥

परी आकाशाहूनि होतांचि पतन ॥ वातानें तें विभक्तपण ॥ द्विभाग झालें महीकारण ॥ येऊनियां आदळलें ॥८॥

एक भाग लोमश आश्रमा ॥ येऊनि पावला थेट उत्तमा ॥ घटीं पडतांचि तनू उत्तमा ॥ आगस्तीची ओतली ॥९॥

यापरी दुसरा भाग ॥ तो कौलिक ऋषीच्या आश्रमा चांग ॥ येतांचि कैसा झाला वेग ॥ तोचि श्रवण करा आतां ॥१०॥

कौलिक घेऊनि पात्र भर्तरी ॥ मिक्षोद्देश धरुनि अंतरीं ॥ निघता झाला सदनाबाहेरी ॥ वस्तीपर्यटण करावया ॥११॥

परी कौलिक येतांचि बाहेर ॥ भर्तरी ठेवूनि महीवर ॥ बंद करीतसे सदनद्वार ॥ कवीटाळें देऊनियां ॥१२॥

परी भर्तरी ठेविली अंगणांत ॥ तों आकाशांतूनि रेत त्यांत ॥ येऊनियां अकस्मात ॥ भाग एक आदळला ॥१३॥

तों इकडे कौलिक ऋषी ॥ टाळे देऊनि गृहद्वारासी ॥ येऊनि पाहे भर्तरीसी ॥ तों रेत व्यक्त देखिलें ॥१४॥

रेतव्यक्त देखतांचि पात्र ॥ अंतःकरणीं विचारी तो पवित्र ॥ चित्तीं म्हणे वरुणीमित्र ॥ रेत सांडिलें भर्तरीं ॥१५॥

तरी यांत धृमीनारायण ॥ अवतार घेईल कलींत पूर्ण ॥ तीन शत एक सहस्त्र दिन ॥ वर्षे लोटलीं कलीचीं ॥१६॥

इतकीं वर्षे कलीची गेलिया ॥ धृमींनारायण अवतरेल भर्तरीं या ॥ तरी आतां भर्तरी रक्षूनियां ॥ ठेवूं आश्रमीं तैसीच ॥१७॥

मग ती भर्तरी रेतव्यक्ती ॥ रक्षिता झाला आश्रमाप्रती ॥ त्यास दिवस लोटतां बहुतां ॥ पुढें कलि लागला ॥१८॥

मग तो कौलिक ऋषी ॥ गुप्त विचारितां प्रगट देशीं ॥ भर्तरी नेऊनि मंदराचळासी ॥ गृहाद्वारीं ठेविली ॥१९॥

गृहाद्वारीं ठेवूनि पात्र ॥ तो अदृश्य विचरे पवित्र ॥ तों कलि लोटतां वर्षे तीन सहस्त्र ॥ एकशतें तीन वर्षे ॥२०॥

तों द्वारकाधीशअंशें करुन ॥ भर्तरींत संचरला धृमीनारायण ॥ जीवित्व व्यक्त रेताकारण ॥ होतांचि वाढी लागला ॥२१॥

वाढी लागतां दिवसेंदिवस ॥ पुतळा रेखित चालिला विशेष ॥ पूर्ण भरतां नवमास ॥ सिद्ध झाला तो पुतळा ॥२२॥

परी मधुमक्षिकेनें पात्रांत ॥ मधूचें जाळें केले होतें ॥ तयाचे संग्रहें व्यक्त ॥ बाळ वाढी लागला ॥२३॥

वाढी लागतां मधुबाळ ॥ नवमास लोटतां गेला काळ ॥ परी तो देहें होता स्थूळ ॥ भर्तरी पात्र मंगलें ॥२४॥

बहुत दिवसांचे पात्रसाधन ॥ झालें होतें कुइजटपण ॥ त्यांत पर्जन्यकाळीं कड्यावरुन ॥ पर्वत कोसळता लोटले ॥२५॥

कोसळतां परी एक पाषाण ॥ गडबडीत पातला तें स्थान ॥ परी पावतांचि पात्रासी झगडोन ॥ भर्तरी भंग पावली ॥२६॥

भर्तरी भंगतांचि बाळ त्यांत ॥ तेजस्वी मिरवले शकलांत ॥ मक्षिकेचे मोहळ व्यक्त ॥ तेहीं एकांग जाहलें ॥२७॥

मग त्यांत निर्मळपणीं बाळ विरक्त ॥ मिरवों लागलें स्वतेजांत ॥ जैसें अभ्र वेगळें होतां दीप्त ॥ निर्मळपणीं मिरवतसे ॥२८॥

कीं स्थिरावल्या जैसे जीवन ॥ तळा बैसलें गढूळपण ॥ तें बाळ भर्तरी शुक्तिकारत्न ॥ विमुक्त झालें वेष्टणा ॥२९॥

परी कडा कोसळला कडकडीत ॥ शब्द जाहले अति नेट ॥ तेणेंकरुनि मक्षिका अचाट ॥ भय पावोनि पळाल्या ॥३०॥

येरीकडे एकटें बाळ ॥ शब्दरुदनीं करी कोल्हाळ ॥ तेथें चरे कुरंगमेळ ॥ तया ठायीं पातल ॥३१॥

तयांत गरोदर कुरंगिणी ॥ चरत आली तये स्थानीं ॥ तों बाळ रुदन करितां नयनीं ॥ निवांत तृणीं पडलेंसे ॥३२॥

तरी अफाट तृण दिसे महीं ॥ त्यांतही बाळ सबळ प्रवाहीं ॥ चरत येतां हरिणी तया ठायीं ॥ प्रसूत झाली बाळ पैं ॥३३॥

प्रसूत होतां बाळें दोन्ही ॥ झालीं असतां कुरंगिणी ॥ पुनः मागें पाहे परतोनी ॥ तों तीन बाळें देखिलीं ॥३४॥

माझींच बाळे त्रिवर्ग असती ॥ ऐसा भास ओढवला चित्तीं ॥ मग जिव्हा लावूनि तयांप्रती ॥ चाटूनि घेतलें असे ॥३५॥

परी तो खडतरपणी दोन्ही पाडसें तीतें ॥ संध्याअवसरीं झगडलीं स्तनातें ॥ परी हें बाळ नेणे पानातें ॥ स्तन कवळावें कैसे तें ॥३६॥

मग ते कुरंगिणी लोटूनि पाडस ॥ चहूंकडे ठेवूनि चौपदांस ॥ मग वत्सलोनि लावी कांसेस ॥ मुख त्याचें थानासी ॥३७॥

ऐसे लोटतां कांहींएक दिवस ॥ तों तें रागूं लागलें महीस ॥ मग ते मृगी लावूनी थानास ॥ संगोपन करीतसे ॥३८॥

ऐसें करवोनि स्तनपानीं ॥ नित्य पाजी कुरंगिनी ॥ आपुले मुखींची जिव्हा लावूनी ॥ करी क्षाळण शरीरासी ॥३९॥

पाडसें ठेवूनि तया स्थानीं ॥ चरूं जातसे विपिना हरिणी ॥ घडोघडी येतसे परतोनी ॥ जाई पाजूनि बाळातें ॥४०॥

ऐसें करितां संगोपन ॥ वर्षे लोटलीं तयातें दोन ॥ मग हरिणामध्येंचि जाऊन ॥ पत्रें भक्षी वृक्षांची ॥४१॥

परी त्या वनचरांचे मेळीं ॥ विचारितां सावजभाषा सकळी ॥ स्पष्ट होऊनि त्या मंडळीं ॥ त्यांसमान बोलतसे ॥४२॥

हस्तिवर्ग गायी म्हैशी व्याघ्र ॥ जंबुक लांडगे हरिण भयंकर ॥ शार्दूळ रोही गेंडा सांबर ॥ भाषा समजे सकळांची ॥४३॥

सर्प किडे मुंगी पाळी ॥ पक्षी यांची बोली सकळी ॥ तैसेंचि कोकूनि उत्तर पावलीं ॥ देत असे सकळांसी ॥४४॥

ऐसियापरी वनचर – रंगणी ॥ प्रत्यक्ष अवतार विचरे काननीं ॥ जिकडे जिकडे जाय हरिणी ॥ तिकडे तिकडे जातसे ॥४५॥

ऐसें पांच वर्षेपर्यंत ॥ हरिणीमागें तो हिंडत ॥ तों एके दिवशीं चरत ॥ हरिणी आली त्या मार्गे ॥४६॥

काननीं चरतां मार्गे नेटें ॥ तो बाळही आला ते वाटे ॥ तों मार्गी सहस्त्रीपुरुष भाट ॥ मग त्या वाटे तीं येती ॥४७॥

त्या भाटा जयसिंग नाम ॥ कांता रेणुका सुमध्यम ॥ परी उभयतांचा एक नेम ॥ एकचित्तीं वर्तती ॥४८॥

प्रवर्तती परी कैसे अलोटीं ॥ शत्रुमित्र ऐक्यदृष्टीं ॥ कीं धनदघातका मोह पोटीं ॥ समानचि वर्ततसे ॥४९॥

तन्न्यायें पुरुषकांता ॥ प्रपंचराहाटीं वर्तत असतां ॥ तों सहज त्या मार्गे येतां ॥ तया ठायीं पातले ॥५०॥

पातले परी मार्गावरती ॥ बाळ देखिले दिव्यशक्ती ॥ बालार्ककिरणी तेजाकृती ॥ लखलखित देखिलें ॥५१॥

कीं सहजासहज करावया गमन ॥ महीं उतरला रोहिणीरमण ॥ कीं पावकतेजकांती वसन ॥ गुंडाळलें वाटतसे ॥५२॥

ऐशापरी तेजःपुंज ॥ जयसिंग भाट देखतां सहज ॥ मनांत म्हणे अर्कतेज ॥ बाळ असे कोणाचें ॥५३॥

ऐसें स्त्रियेसी म्हणतसे ॥ ऐसिया अरण्यांत असे ॥ बाळ सांडूनि गेली सुरस ॥ मातापिता कैसी तीं ॥५४॥

कीं सहजचाली चालतां ॥ यांत चुकली याची माता ॥ ऐसे अपार संशय घेतां ॥ तयापाशीं पातले ॥५५॥

पातले परी बाळ पाहोन ॥ भयें व्याप्त झालें मन ॥ मग मृग बोलिले आरंबळोन ॥ पळूं लागले मार्गातें ॥५६॥

तें पाहूनि जयसिंग भाटें ॥ धांवोनि धरिली बाळकाची पाठ ॥ पाठीं लागूनि धरुनि मनगट ॥ उभा केला बाळ तो ॥५७॥

उभा करुनि त्यातें बोलत ॥ म्हणे बाळा सांडीं भयातें ॥ तूतें भेटवीन तव मातेतें ॥ माता कोण ती सांग ॥५८॥

परी तैं कुरंगभाषेकरुन ॥ आरंबळतसे छंदेंकरुन ॥ नेत्रा लोटलें अपार जीवन ॥ हांक मारी हरिणीतें ॥५९॥

परी ते हरिणी बाळ पाहून ॥ कासावीस झाले परम प्राण ॥ परी मनुष्यभयेंकरुन ॥ निकट येऊं शकेना ॥६०॥

हरिणी आपुले ठायींच्या ठायीं ॥ परम आरंबळें महीते देहीं ॥ येरीकडे मार्गप्रवाहीं ॥ भाट बोले बाळातें ॥६१॥

म्हणे वत्सा व्यर्थ कां रडसी ॥ कोण मातापिता आहे तुजसी ॥ सोडूनि गेलीं अरण्यासी ॥ तरी भेटवूं तुज आतां ॥६२॥

परी कुरंगभाषेकरुन ॥ ब्यां ब्यां करुनि करी रुदन ॥ मग भाट म्हणे हें वाचाहीन ॥ मुखस्तंभ वाटतसे ॥६३॥

मग हस्तखुणेनें पुसे त्यांतें ॥ परी खूणही तें नेणे परतें ॥ मग जयसिंग म्हणे आपुले मनातें ॥ परम अज्ञानी बाळक हें ॥६४॥

तरी आतां असो कैसें ॥ यातें आपुल्या न्यावें वस्तीस ॥ याची जननी भेटल्यास ॥ हस्तगत यातें करुं ॥६५॥

ऐसा विचार करुनि मनासीं ॥ उचलूनि घेतला स्कस्कंधासीं ॥ परी तें आरंबळोनि हरिणीसी ॥ पाचारीत अट्टहास्यें ॥६६॥

परी ती कुरंगभाषा कांहीं ॥ जयसिंगातें माहीत नाहीं ॥ तैसें वाहूनि मार्गप्रवाहीं ॥ घेऊनि जात बाळका ॥६७॥

परी त्या बाळकासी घेऊनि जातां ॥ अति आरंबळे हरिणी चित्ता ॥ सव्यअपसव्य वेढा भंवता ॥ घेऊन हंबरडा मारीतसे ॥६८॥

बाळावरी ठेवूनी दृष्टी ॥ धांव घेतसे पाठोपाठीं ॥ ठायीं ठायीं महीतटीं ॥ उभी राहूनि आरंबळे ॥६९॥

ऐसी हरिणी आरंबळत ॥ दुरोनि त्यासी मार्ग गमत ॥ परी तो जयसिंग पाहूनि मनांत ॥ विचार करी आपुल्या ॥७०॥

म्हणे ही हरिणी कवणे अर्थी ॥ हिंडत आहे काननाप्रती ॥ पाडस चुकार झालें निगुतीं ॥ म्हणोनि हिंडे विपिनी ही ॥७१॥

ऐसियेपरी चित्तीं भास ॥ भासूनि गमन करीतसे मार्गास ॥ गमन करितां स्वगृहास ॥ वस्तीत जाऊनि पोहोंचला ॥७२॥

मग ती वस्ती पाहोनि हरिणी ॥ विपिना गेली निराशपणीं ॥ परी ठायीं ठायीं उभी राहूनि ॥ हंबरडा मारी आक्रोशें ॥७३॥

येरीकडे जयसिंग भाट ॥ येतां ग्रामा झाला प्रविष्ट ॥ बाळ ओपूनि कांते सुभट ॥ वस्ती फिरुं पातला ॥७४॥

सकळ वस्तीची फेरी फिरुन ॥ पुन्हां शिबिरा येत परतोन ॥ ऐसे करितां मास तीन ॥ लोटूनि गेले वस्तीसी ॥७५॥

परी तें बाळ आरंबळतां ॥ भयानें राहिली सकळ व्यथा ॥ मग थोडी थोडी संवय लागतां ॥ हरिणीस विसर पडला ॥७६॥

तेचि नीतीं बाळ विसर ॥ शनैक पडला कुरंगापर ॥ मग भोजनपानादिक सारासार ॥ कळों सविस्तर लागलें ॥७७॥

बोली चाली शनैःशनैक ॥ प्रविष्ट जाहलें तें बाळक ॥ मग हांका मारी जननी जनक ॥ भक्षावया मागतसे ॥७८॥

असो ऐसियापरी अलोट ॥ ग्रामोग्रामीं हिंडे भाट ॥ हिंडतां हिंडतां भागीरथी तट ॥ काशीक्षेंत्रीं पातला ॥७९॥

पातला परी विश्वेश्वरीं ॥ दर्शना जात देवालयांतरीं ॥ स्नान करुनि भागीरथीतरीं ॥ बाळ घेऊनि गेला असे ॥८०॥

विश्वेश्वराचें दर्शन करीत ॥ तों लिंगातूनि बोलिला उमाकांत ॥ यावें भर्तरीअवतारांत ॥ दृश्य झालां तुम्हीं कीं ॥८१॥

ऐसे ऐकूनि नमस्कारितां ॥ शब्दोदयीं झाला बोलता ॥ त्याचे ते शब्द सहजता ॥ जयसिंगें ऐकिले ॥८२॥

मग तो मनांत करी विचार ॥ बाळ हें करितां नमस्कार ॥ शिवलिंग बोले अति मधुर ॥ भर्तरी ऐसें म्हणोनि ॥८३॥

तरी हा आहे कोन अवतारदक्ष ॥ स्वर्गवासी आहे प्रत्यक्ष ॥ परी प्रारब्धयोगें आम्हां सुलक्ष ॥ प्राप्त झाला वाटतसे ॥८४॥

जैसा दारिद्रिया मांदुसघट ॥ सहज चालतां आदळे वाट ॥ तेवीं आम्हां बाळ चोखट ॥ प्राप्त झालें दैवयोगें ॥८५॥

कीं चिंतातुरासी चिंतामणी ॥ अवचट लाधला मार्गेकरुनी ॥ तेवीं मातें अवतारतरणी ॥ प्राप्त झाला दैवानें ॥८६॥

कीं दुष्ट काळाची थोर रहाटी ॥ प्राण अन्नाविण होतां कष्टी ॥ तैं सुरभि येऊनि कृपाहोटीं ॥ थान आपुलें ओपीतसे ॥८७॥

तन्न्याय मातें झालें ॥ निर्देवा दैवें बाळ लाधलें ॥ लाधलें परी पुण्य पावलें ॥ अवतारी दिसतो हा ॥८८॥

हें पुण्य तरी वर्णू केवढे ॥ जयासाठीं हा स्थूळवट दगड ॥ हर्षे पावूनि संस्कारपाड ॥ यावें भर्तरी म्हणतसे ॥८९॥

तरी आतां भर्तरी नाम ॥ थोर पाचारुं वाचेकारण ॥ ऐसीं चित्तीं कल्पना योजून ॥ पुन्हां शिबिरा पातले ॥९०॥

पातले परी कांतेलागून ॥ सर्व निवेदिलें वर्तमान ॥ म्हणे हा पुत्र तुजकारण ॥ अवतारदक्ष सांपडला ॥९१॥

तरी हा अवतारदक्ष कैसा ॥ म्हणशील तरी वो वाग्रसा ॥ तरी शिव प्रत्यक्ष बोलिला ऐसा ॥ यावें भर्तरी म्हणोनी ॥९२॥

अगे हा बाळ करितां नमन ॥ ध्वनि हे निघाली लिंगांतून ॥ ती म्यां ऐकिली आपुल्या कानें ॥ म्हणोनि म्हणतों अवतार हा ॥९३॥

तरी आतां येथूनि याते ॥ भर्तरी ऐसें नाम निश्वित ॥ पाचारुनि अंतर्भूत ॥ पालन करीं बाळाचें ॥९४॥

ऐसें सांगूनि तो युवती ॥ टाकूनि गेला फेरीप्रती ॥ परी श्रोते चित्तीं कल्पना घेती ॥ शिव कां बोलिला भर्तरी ॥९५॥

यावें भर्तरी ऐसें वचन ॥ किमर्थ बदला उमारमण ॥ तरी तो भर्तरीत पावला जन्म ॥ म्हणोनि शिव बोलिला असे ॥९६॥

भर्तरी अवतार सघन ॥ यावें भर्तरी ऐसें म्हणोन ॥ तरी आतां ऐसें ऐका वचन ॥ कथा पुढें परिसावी ॥९७॥

ऐसें जयसिंग रेणुकेसी ॥ सांगूनि वर्तमान तियेसी ॥ भर्तरी नाम आनंदेसीं ॥ पाचारीत उभयतां ॥९८॥

त्या उभयतांचें जठरांतरीं ॥ संतति नसे संसारविहारीं ॥ म्हणोनि स्नेहाची भोहित लहरी ॥ बोलली असे तयातें ॥९९॥

रेणुका नित्य बैसवोनि अंकीं ॥ चुंबन घेतले लालनअंकीं ॥ नाना पदार्थ मागितले कीं ॥ आणूनि देती उमयतां ॥१००॥

आसन वसन भोजन पान ॥ देती करिती बहु लालन ॥ बाळ खेळतांना पाहून ॥ हर्षयुक्त होती ते ॥१॥

बाळ भर्तरी पंचवर्षी ॥ बोबडे बोले नाचे महीसी ॥ नाच नाचोनि धांवोनि कंठासी ॥ मिठी घाली मातेच्या ॥२॥

मिठी घालितां रेणुका सती ॥ उचलूनि घेत अंगावरती ॥ चुंबन घेतां उभय तीं ॥ हास्यवदन करिताती ॥३॥

हांसूनि एकमेकां म्हणती ॥ ईश्वर पावला आपणांप्रती ॥ उदरीं नसतां स्वसंतती ॥ ईश्वरें दिधली कृपेनें ॥४॥

दिधली परी आक्षेप चित्तासी ॥ घेऊनि म्हणती या बाळासी ॥ मातापिता चुकल्यासी ॥ शोधित असतील महीतें ॥५॥

परी ते शोधितां कोठें ॥ अवचित जरी पडली गांठ ॥ मग ते आपणां पासूनि नेटें ॥ घेऊनि जातील बाळातें ॥६॥

ऐसी चिंता उभय तीं ॥ नित्य त्निय हदयीं वाहती ॥ अहा हें बाळ अलोलिक स्थिती ॥ स्वरुपा मिती नसे याच्या ॥७॥

ऐसें बाळ हें परम सगुण ॥ हें तों नेतील आम्हांपासून ॥ ऐसें चिंतिती परी मन ॥ घोंटाळत उभयतांचे ॥८॥

मग ते उभयतां विचार करिती ॥ कीं यास सोडूनि क्षेंप्रत्राती ॥ मही हिंडतां कोणे क्षिती ॥ गांठी पडेल तयांची ॥९॥

मग त्या क्षेत्रीं स्थळ पाहून ॥ राहते झाले भिक्षुकपणें ॥ भिक्षा मागूनि क्षेत्राकारण ॥ निर्वांहातें चालविती ॥११०॥

यापरी तें भर्तरी बाळ ॥ मेळ मुलांचे स्थावरमंडळ ॥ तयांमाजीं खेळे खेळ ॥ राजचिन्हें सर्वस्वीं ॥११॥

आपण सर्वांचा होऊनि राव ॥ मुलांचींच मुलें सर्व ॥ काठीचे करुनि अश्व ॥ शाळा लाविल्या तयानें ॥१२॥

मंत्री परिचारक पायदळ जन ॥ स्वार झुंझार कारकून ॥ नाना वेष मुलांस दाखवून ॥ राजचिन्हें करीतसे ॥१३॥

तरी खेळ नव्हे भविष्य होणार ॥ होय भाग्याचा संस्कार ॥ जैसें ज्याचें भाग्य पर ॥ चिन्हें उदय पावलीं ॥१४॥

तरी असो राजचिन्हीं ॥ खेळ खेळतां बाळपणी ॥ तों एके दिवशीं आरोहणोनी ॥ काष्ठशालिके पळताती ॥१५॥

पळती ते वाताकृती ॥ मुखें हो हो करुनि म्हणती ॥ हो हो म्हणूनि थापटिती ॥ काष्ठशालिके अश्वातें ॥१६॥

ऐसें खेळतां सोडूनि क्षेत्र ॥ धांवती भरले काननीं सर्वत्र ॥ एकांत विपिनी खेळ खेळत ॥ सान्निध कोणी नसेचि ॥१७॥

परी ते काननचव्हाट्यांत ॥ भर्तरी धांवतां शालिका अश्वातें ॥ तों पायासी ठेंच लागूनि महीतें ॥ उलथोनियां पडियेला ॥१८॥

पडिला महीं कासावीस ॥ होऊनि सांडिलें शुद्धबुद्धीस ॥ नेत्रें विकासूनि महीतें ॥ दाविता झाला तत्क्षणीं ॥१९॥

ते श्वेतवर्ण पाहूनि नयन ॥ अर्भकें पळालीं भयेकरुन ॥ म्हणती भर्तरी पावला मरण ॥ भूत होईल आता हा ॥१२०॥

मग हा आपुल्या लागोनि पाठीं ॥ भक्षील सकळ मग शेवटीं ॥ ऐसें भय मानूनि पोटीं ॥ पळूनि गेलीं अर्भकें ॥२१॥

जाऊनि भागीरथीघांटावर ॥ करीत बैसलीं आहेत विचार ॥ म्हणती भर्तरिया भूत थोर ॥ होऊनि हिंडे ग्रामांत ॥२२॥

मग गडे हो आपण गल्लींसी ॥ कैसें खेळावें भक्षील आपणांसी ॥ तरी आतां आपुले ग्रामासी ॥ खेळ खेळूं सदनांत ॥२३॥

यापरी दुसरा अर्भक बोलत ॥ कीं बरवें सांडिलें काननातें ॥ मनुष्य कोणी नव्हतें तेथें ॥ भक्षिलें असतें आपणांसी ॥२४॥

ऐसें अर्भक घांटावर ॥ करीत बैसले आहेत विचार ॥ तों येरीकडे मूर्च्छा अपार ॥ भर्तरांतें वेधली ॥२५॥

महीं पडलासे उलथोन ॥ शरीर सुकलें तेणेंकरुन ॥ ठायीं ठायीं भेदले पाषाण ॥ रुधिर तेणें वाहातसे ॥२६॥

ऐसे होतां अवस्थेसी ॥ मैत्रावरुणें पाहिलें त्यासी ॥ मग पुत्रमोह हदयासी ॥ परम कळबळा दाटला ॥२७॥

मग महीस मित्रावरुणी ॥ येता झाला स्नेहेंकरुनी ॥ अति लगबगें बाळ उचलोनी ॥ हदयालागीं कवळिलें ॥२८॥

त्वरें आणूनि भागीरथीजीवन ॥ तयासी करविलें तोयपान ॥ हदयालागीं आलिंगून ॥ सावध केलें बाळासी ॥२९॥

आणि पाहूनि स्वयें कृपादृष्टीं ॥ मग दुःखलेशाची झाली फिटी ॥ पाषाणघांव घसवटीं ॥ अदृश्यपणें मिरविले ॥१३०॥

मग तो बाळ सावधपणीं ॥ अंकीं घेऊनि मिरवोनी ॥ परम स्नेहें मुखावरोनी ॥ वरदहस्तें कुरवाळी ॥३१॥

यापरी विप्राचा वेष धरोनि ॥ तेथोनि चालिला मित्रावरुणी ॥ भर्तरीचा धरोनि पाणी ॥ सदनालागीं आणीतसे ॥३२॥

तों मार्गी येतां घाबरे ॥ पाहते झाले सर्व किशोर ॥ पाहतांचि म्हणती भर्तरी थोर ॥ भूत होऊन आला रे ॥३३॥

ऐसें म्हणूनि आरडोनी ॥ पळताती अति भयेंकरुनी ॥ आपुलाले सदना जाऊनी ॥ भयें दडती संधींत ॥३४॥

येरीकडे मित्रावरुणी ॥ सदनीं आला त्यासी घेऊनी ॥ माता रेणुकेसी पाचारोनी ॥ म्हणे सांभाळी बाळातें ॥३५॥

मग ते चरणीं ठेवूनि माथा ॥ म्हणे महाराजा हे ताता ॥ आपण कोण्या ग्रामी असतां ॥ परम स्नेहाळू आहां कीं ॥३६॥

ते रेणुका प्रेमळ सती ॥ पाहतां विप्र दिव्य मूर्ती ॥ वस्त्रासन टाकूनि निगुती ॥ बैसविलें त्यावरी ॥३७॥

मग म्हणे बाळका करीं कवळून ॥ आणिलें तुम्हीं मोहेंकरुन ॥ तरी सकळ संशय सोडून ॥ नामाभिधान मज सांगा ॥३८॥

येरी म्हणे वो सती ऐक ॥ या बाळाचा मी असें जनक ॥ म्हणोनि स्नेहाचें दोंदिक ॥ तरी तुजपाशीं मी आलों ॥३९॥

तरी बाळ तुजकारणें ॥ कायावाचा केलें अर्पण ॥ परी तूंही आतां संशय टाकून ॥ संगोपन करीं याचें ॥१४०॥

तें ऐकून बोलें ऐसें ॥ तुम्ही बाळकाचे जनक कैसे ॥ येरी म्हणे वो अनायासें ॥ कथा ऐक बाळाची ॥४१॥

अगे मी विप्रवेषें तूतें ॥ दिसत आहें परी मी दैवत ॥ मित्रावरुणी नाम मातें ॥ महीलागीं वदतात ॥४२॥

मग मूळापासूनि तीतें कथन ॥ भर्तरीपात्रव्यक्त जनन ॥ हरिणीस्तनीचें संगोपन ॥ सकळ निर्णय बदलासे ॥४३॥

तरी या बाळाचें संभवन ॥ अपूर्व आहे महीकारण ॥ परी असो पूर्ण दैवानें ॥ लाभ झाला तुज याचा ॥४४॥

झाला परी आर्तभूत ॥ जगीं म्हणावीं कां आपुला सुत ॥ काया वाचा बुद्धि सुत ॥ रक्षण करीं उचित हें ॥४५॥

ऐसें सांगूनि मित्रावरुणी ॥ जाता झाला आपुले स्थानीं ॥ येरीकडे नितंबिनी ॥ परम चित्तीं तोषली ॥४६॥

मग भ्रतारासी सांगूनि वर्तमान ॥ तोही हर्षे ऐकून ॥ मग जननीजनकांचें भय पूर्ण ॥ बाळप्रकरणीं फिटलें कीं ॥४७॥

जैसे वस्त्र स्पर्शिल्या साबणीं ॥ सकळ मळाची होय हानी ॥ ठेवी मित्रावरुण वाचेकरुनी ॥ सकळ संशय फिटलासे ॥४८॥

किंवा गढूळ झालें असतां उदक ॥ स्थिरावल्या दावी पवित्र मुख ॥ तेवीं त्याचा समूळ धाक ॥ फिटूनि गेला तत्काळ ॥४९॥

की दारा सगुणपर ॥ गृहीं असतां गरोदर ॥ परी प्रसूतीचे भय थोर ॥ प्रसूत झालिया फिटतसे ॥१५०॥

कीं अनभ्यस्त कांसे लागतां ॥ परम भय मानी पार होतां ॥ परी पार झालिया सकळ चिंता ॥ फिटोनि जाय सरितेची ॥५१॥

कीं अचाट काननीं तस्करभयातें ॥ मार्ग मिळाला भयव्यक्त ॥ परी वस्ती पावल्या स्वस्थचित्त ॥ भयापासूनि होतसे ॥५२॥

तन्नायें मित्रावरुणी ॥ वार्ता ऐकतां उभय कर्णी ॥ भयमुक्त होती आनंदोनी ॥ हेलावे चित्त पूर्णत्वें ॥५३॥

जैसें दुःख जाऊनि होतां सुख ॥ पोसे शरीर दोंदिक ॥ तेवीं त्यांचे चित्तीं बलाइक ॥ आनंदाचा उदेला ॥५४॥

मग ते अतिप्रेमेंकरुन ॥ आशापाशाचें गुंतले बंधन ॥ मग परम स्नेहाचा खुंट उभवोन ॥ गरके घालिति त्यासवे ॥५५॥

ऐसियापरी दिवसेंदिवस ॥ परम उदेले लालनपालनास ॥ तंव काशीक्षेत्रीं पुण्यवस्तीस ॥ पंच वरुषें लोटलीं ॥५६॥

तों षडदशवर्षी भर्तरीनाथ ॥ पूर्ण झाला वयें व्यक्त ॥ जयसिंग आणि रेणुकेप्रत ॥ लग्नविचार सूचला ॥५७॥

मग उभयतां बसूनि एकांतीं ॥ म्हणती चला जाऊं स्वदेशाप्रती ॥ लक्षूनि संबंधा जाती ॥ लग्न करुं बाळाचें ॥५८॥

ऐसा विचार उभयतां करोनि ॥ सोडितें झाले क्षेत्रालागोनी ॥ माळवादेशीं त्यांचा ग्राम उद्देशोनी ॥ मार्ग धरितां तयाचा ॥५९॥

मार्गी चालतां ग्रामोग्रामीं ॥ भिक्षा करिती भिक्षुकधर्मी ॥ मार्गी चालता भविष्य वर्मी ॥ विकट झगटलें येऊनि ॥१६०॥

मार्गी चालतां काननांत ॥ तस्कर येऊनि अकस्मात ॥ जयसिंग शस्त्रघातें ॥ मुक्त केला प्राणातें ॥६१॥

जवळी होतें वित्त कांही ॥ तें हिरोनि नेलें तस्करीं उपायीं ॥ जयसिंगाचें प्रेत महीं ॥ निचेष्टित पडियेलें ॥६२॥

मग तें पाहूनि रेणुका सती ॥ प्रेत कवळूनि देहानिगुती ॥ परम शोकें देहाप्रती ॥ सांडिती झाली तेधवां ॥६३॥

मग तीं उभयतां स्त्रीपुरुष ॥ भर्तरीनें काष्ठें मेळवूनि विशेष ॥ अग्नि लावूनि उभयतांस ॥ शोकडोहीं बुडाला ॥६४॥

उभयतांचें करितां दहन ॥ परी शोकविशोकें पोळे प्राण ॥ म्हणे अहा तात मातेनें ॥ कैसें सोडिलें काननीं या ॥६५॥

अहा तुम्ही जननी जनक ॥ पाहते झालां परत्रलोक ॥ यापरी महीतें मायिक ॥ कोणी नसे मजलागीं ॥६६॥

अहा जननी रेणुकानाम्नी ॥ कैसी गेली मज सोडोनी ॥ आतां आई आई म्हणोनि वाणी ॥ बोलावूं मी कोणातें ॥६७॥

अहा जननी तूं परम मायिक ॥ जाणत होतीस तृषाभूक ॥ आतां निकटपणी लोक ॥ परम कैसे पाहतील ॥६८॥

अहा जननी रात्रींतून ॥ तीन वेळां उठोन ॥ करवीत होतीस तोयपान ॥ तरी मन निष्ठुर कां केलें ॥६९॥

अहा हदयीं धरुनि करिसी चुंबन ॥ वाचे म्हणसी बाळ हें तान्हें ॥ ऐसें म्हणोनि उदकपान ॥ करवीत अससी नित्यशा ॥१७०॥

ऐसी माय तूं सघन ॥ असोनि केलें निष्ठुरपण ॥ मज ऐशा वनीं सोडून ॥ गेलीस कैसी जननीये ॥७१॥

अहा ताता जयसिंगनामी ॥ कैसा गेलासी मज टाकुना ॥ आता पृथ्वीवर दैन्यवाणी ॥ कोठे राहूं निराश्वित ॥७२॥

अहा ताता बाहेर जातां ॥ खाऊ मजला आणीत होतां ॥ तो मुगुटी खोवूनि सदनीं येतां ॥ पाचारुनि मज देशीं ॥७३॥

ऐसा मोह असतां पोटीं ॥ सांडूनि गेलास विपिनीं देठीं ॥ ऐसें म्हणूनि करसंपुटीं ॥ वक्षःस्थळ पिटीतसे ॥७४॥

ऐसें रुदन करीत करीत ॥ पेटवूनि झाला शांताचित्त ॥ परी तो तेथूनि न उठे त्वरित ॥ प्राण सोडूं पाहातसे ॥७५॥

तों मार्गेकरुन व्यवसाइक ॥ त्या वंजारें वृषभकटक ॥ त्यांनीं पाहूनि त्याचा शोक ॥ परम चित्तीं कळबळले ॥७६॥

मग तयापाशीं येऊन ॥ पुसोनि घेतले वर्तमान ॥ वर्तमान कळल्या बोलती वचन ॥ बोधनीती तयातें ॥७७॥

म्हणती अगा भटसुता ॥ शोक कारसी अति वृथा ॥ होणार झालें विषममाथा ॥ विधिअक्षरें नेमीत ॥७८॥

जरी तू आतां करिसी शोक ॥ तरी काय मिळतील जननी जनक ॥ ईश्वरकरणी प्रारब्ध फुटकें ॥ आपुलेंचि म्हणावे ॥७९॥

तरी आतां धैर्य करुन ॥ हित पहावें आपुलें आपण ॥ संसार करुनि आपुले मतीने ॥ तिन्ही लोकीं मिरवावें ॥१८०॥

ऐसें म्हणूनि बोध अपार ॥ उठविला त्याचा धरुनि कर ॥ मग संगें घेऊनि मुक्कामावर ॥ आणिलासे भर्तरी ॥८१॥

मुक्कामीं राहूनि सकळ जन ॥ रात्रीं देऊनि अन्नपान ॥ दुसरें दिवशीं सवें घेऊन ॥ पुन्हां जात व्यवसई ॥८२॥

ऐसेपरी सात पांच दिन ॥ शोक करितां गेले लोटून ॥ मग दिवसेंदिवस होऊनि विस्मरण ॥ सहजस्थिती वर्ततसे ॥८३॥

मग त्या व्यवसायिकां सहज ॥ करुं लागला तयांचें काज ॥ काज होता तेजःपुंज ॥ सकळ चाहती आदरानें ॥८४॥

मग आसन वसन भूषणासहित ॥ व्यवसाइक सकळ संपादित ॥ ऐसेपरी कांहीं दिवस त्या स्थितींत ॥ लोटून गेले तयाचे ॥८५॥

यापरी व्यवसाइक ॥ धान्य भरुनि अति अमूप ॥ उज्जनि शहर अवंतिक ॥ मार्ग धरिला तयाचा ॥८६॥

मार्ग सरतां वृक्षमकटका ॥ येऊनि पोहोंचला अवंतिका ॥ तेथें कथेचा रस निका ॥ होईल तो स्वीकारा पुढें ॥८७॥

म्हणाल पुढिलें अध्यायीं रस ॥ उगाचि मानाल स्वचित्तास ॥ ऐसें तरी न म्हणावें पीयूष ॥ चवी घेतां कळों येईल ॥८८॥

तरी ती कथा सुधारस थोर ॥ वाढी श्रोत्या धुंडीकुमर ॥ मालू ऐसा नामोच्चार ॥ नरहरिकृपें मिरवतसे ॥८९॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ चतुर्विशति अध्याय गोड हा ॥१९०॥

श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥

॥ नवनाथभक्तिसार चतुर्विशतितमोध्याय समाप्त ॥


श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय २५
श्रीगणेशाय नमः

जयजयाजी वासुदेवा ॥ वासनाद्वासुदेवा मायाअवयवा ॥ म्हणोनि तूर्ते माधवा ॥ सगुणस्थिति विराजे ॥१॥

हे चक्रचाळका यदुपति ॥ वदवीं आतां रसाळ युक्ती ॥ जेणें श्रोतें आनंद पावती ॥ नवरसांतें वेधूनियां ॥२॥

मागिले अध्यायीं भर्तरीनाथ ॥ अवंतिके आला व्यवसायातें ॥ तें जननादि पाळण यथाश्रुत ॥ वदविलें महाराजा ॥३॥

यापरी पुढें कथा गहन ॥ वदवीं नवरसां सुढाळपण ॥ ऐसें वदतां रुक्मिणीरमण ॥ संतोष चित्तीं जाहला ॥४॥

जाहला तरी आतां श्रोतीं ॥ कथा स्वीकारा श्रवणार्थी ॥ व्यवसायिक घेऊनि भर्तरीप्रती ॥ अवंतिकेंसी पातले ॥५॥

पातले परी ग्रामाजवळी ॥ करिते झाले शिबिरस्थळी ॥ रचोनि गोण्या कनकपट सकळी ॥ शिबिरावरी विराजले ॥६॥

ऐसियेपरी व्यवासायिक ॥ उतरते झाले स्थानस्थायिक ॥ तों अस्ताचळा गेला अर्क ॥ व्यवसायिक मिळाले ॥७॥

अग्नि पेटवूनि एक्या ठायीं ॥ शेक घेती व्यवसायी ॥ तों निकट येऊनि जंबुक महीं ॥ कोल्हाळ केला एकचि ॥८॥

कोल्हाळ केला परी स्वभाषेंत ॥ बोलते झाले जंबूक समस्त ॥ व्यवसायिक हो या स्थितींत ॥ बैसूं नका सावध व्हा ॥९॥

तुम्हांवरी आहे धाडी ॥ महातस्कर बळी प्रोढी ॥ द्रव्य हरुनि नेतील तांतडी ॥ सावध होऊनि बैसा रे ॥१०॥

ऐसें जंबुक बोलतां वाणीं ॥ भर्तरी ऐकता झाला कानीं ॥ ऐकतांचि विचार अंतःकरणीं ॥ करिता झाला महाराजा ॥११॥

मनांत म्हणे व्यवसायिक अन्न ॥ आपण करीत आहो भक्षण ॥ तरी यांतें श्रुत करुन ॥ उपकारातें सारावें ॥१२॥

कीं मातेचा उपकार ॥ जेवीं फेडीतसे खगेंद्र ॥ तेवी व्यवसायिकांचा उपकार ॥ जंबुकांचें भाष्य तेचि रीतीं सागावें ॥१३॥

मग म्हणे सकळ व्यवसायिकां ॥ तुम्ही असावध राहूं नका ॥ तस्कर धाड घालूं आले ऐका ॥ येत आहेती तुम्हांवरते ॥१४॥

म्हणती कळलें कशावरुन ॥ तरी जंबुक बोले स्वभाषेंकरुन ॥ भुंकत तरी माषा मज कळून ॥ येत आहे महाराजा ॥१५॥

तरी मीं तुमचें भक्षिलें अन्न ॥ म्हणूनि वदलों गुप्त न ठेवून ॥ ऐसें बोले भर्तरी वचन ॥ विश्वासातें दाटलें ॥१६॥

मग ते व्यवसायिक जन ॥ नाना शस्त्रें करुनि धारण ॥ बैसते झाले सावधपणें ॥ काष्ठवणी योजूनियां ॥१७॥

पोटी घालूनि मालभरती ॥ सावध पहारे देती भंवतीं ॥ तों तस्कर घाडी शतानुशतीं ॥ येऊनियां पोचले ॥१८॥

पोंचले परी व्यवसायिक ॥ परम झुंझार ब्रीददायिक ॥ यंत्रघायें तस्कर सकळिक ॥ जर्जर केलें सर्वस्वीं ॥१९॥

परम जर्जर तस्कर होतां ॥ मग वित्ताची सोडूनि वार्ता ॥ पळते झाले शस्त्रघाता साहवेना शस्त्रघात ॥२०॥

असो तस्कर शतानुशतें ॥ पळूनि गेले शस्त्रघातें ॥ मग निवारण होऊनि हडबडत ॥ बैसले शांत व्यवसायिक ॥२१॥

शांत होउनि भर्तरियासी ॥ घेऊनि बैसले मंडपासी ॥ परी सावधपणीं लोटलिया निशी ॥ दीड प्रहर राहिली ॥२२॥

राहिली दीड प्रहर रात्र ॥ पुन्हां जंबुक येऊनि तेथ ॥ भुंकती सर्व मंडळासहित ॥ व्यवसायिक ऐकती ॥२३॥

ऐकती परी भर्तरीतें ॥ पुन्हां पुसती प्रश्न उक्तें ॥ कीं पुन्हां जंबुक येऊनि येथें ॥ काय बोलले तें सांग ॥२४॥

ऐसें बोलतां व्यवसायिक ॥ सांगता झाला वरदायक ॥ म्हणे आतां कोल्हे भुंकें ॥ वदले आहेत ते ऐका ॥२५॥

तरी उत्तर दिशेहूनि आतां पांथिक ॥ येत आहे दक्षिणे जात ॥ शिववरदी महासमर्थ ॥ राक्षस जाणे असे तो ॥२६॥

तयापाशीं चार रत्नें ॥ असती तेजस्वी दैदीप्यमान ॥ तरी त्यातें येईल जो मारुन ॥ पूर्णलाभ तो लाभेल ॥२७॥

परी तो लाभ म्हणाल केउता ॥ तरी तयाचा रुधिरटिळा रेखितां ॥ पावेल मग लाभ सार्वभौमता ॥ अवंतिकेमाजी दक्ष तो ॥२८॥

तरी त्यातें योजूनि मरण ॥ रुधिरें वस्त्र आणावें भरुन ॥ ग्रामद्वारीं टिळा रेखून ॥ विजय भाळीं रेखावा ॥२९॥

ऐसें भर्तरी बोलतां त्यातें ॥ तों विक्रम नृप होतां तेथें ॥ ऐकतांचि शस्त्र हातातें ॥ कवळूनियां चालिला ॥३०॥

यापरी श्रोते कल्पना घेती ॥ शिववरदें त्या दानवाप्रती ॥ काय धन लाभलें क्षितीं ॥ तेंचि कथानक सांगावे ॥३१॥

मग कवि म्हणे तो दानव ॥ पूर्वी स्वर्गीचा होय गंधर्व ॥ चित्रमा गंधर्व तयाचें नांव ॥ महाप्रतापी आगळा ॥३२॥

तो सहजस्थितीं कैलासासी ॥ जाता झाला भावें मानसीं ॥ तों उमेसह द्यूतकर्मासी ॥ शिव बैसले खेळत ॥३३॥

तों चित्रमा गंधर्वनाथ ॥ येऊनि पोंचला अकस्मात ॥ तो उमेसहित उमाकांत ॥ भावेंकरुनि नमियेला ॥३४॥

नमितां देखिलें नीलकंठें ॥ मग आश्वासन देऊनि संनिध नीट ॥ विराजवूनि गंधर्वभट ॥ तुष्ट केला मानसीं ॥३५॥

निकट गंधर्वा बैसवून ॥ खेळ खेळती दोघे जण ॥ तों अंबेनें खेळीं डाव जिंकोन ॥ शिवावरी आणियेला ॥३६॥

आणिला परी अक्षभास ॥ द्विविध भासला उभयतांस ॥ तेणेंकरुनि प्रतिवादास ॥ प्रवर्तली उभयतां ॥३७॥

शिव म्हणे पडले अठरा ॥ अंबा म्हणे पडले बारा ॥ ऐसा बोलण्यांत फेरा ॥ उभयतांसी पडियेला ॥३८॥

मग ते उभय वदती ॥ विवादितां गंधर्वा पुसती ॥ तेणें शिवपक्ष धरुनि चित्तीं ॥ अष्टादश पडले म्हणतसे ॥३९॥

परी ते पोबारा खरेपणीं ॥ असतां क्षोभली मृडानी ॥ म्हणे गंधर्वा शिवपक्ष धरोनी ॥ बोलतोसी ऐसें तूं ॥४०॥

परी तव देहीं असत्यवस्ती ॥ आहे सदृढ पापमती ॥ तरी तूं जाऊनि मृत्युक्षिती ॥ राक्षसरुपें वर्तसील ॥४१॥

ऐसें बोलतां दक्षनंदिनी ॥ गंधर्व व्यापला कंपेकरोनी ॥ अंगीं रोमांच उठवूनी ॥ शिवचरणीं लागला ॥४२॥

म्हणे महाराजा चंद्रमौळी ॥ तव पक्ष धरितं येणें काळीं ॥ मुखा लागली शापकाजळी ॥ तरी आतां काय करुं ॥४३॥

ऐसें म्हणोनि अश्रु भरुन ॥ आले उभय लोचन ॥ तेणेंकरुनि चित्तीं प्रसन्न ॥ पशुपति दाटला ॥४४॥

म्हणे चित्रमा गंधर्वनाथा ॥ न करीं शापाची सहसा चिंता ॥ पुढें सुरोचन गंधर्व महीपर्वता ॥ शक्रशापें वर्तला कीं ॥४५॥

वर्तला परी तया क्षितीं ॥ पुत्र होईल तयाप्रती ॥ तया पुत्राचेनि हातीं ॥ मुक्त होशील सुजाणा ॥४६॥

तो शस्त्रघातें राक्षसततूतें ॥ तव प्राणातें करील विभक्त ॥ येरी म्हणे लाभ त्यात ॥ मज मारावया कायसा ॥४७॥

शिव म्हणे तूतें मुक्त करितां ॥ रुधिरटिळक रेखितां माथां ॥ तेणें टिळकें सर्व शोभता ॥ मही भोगील भोगातें ॥४८॥

तों चित्रमा गंधर्व बोलत ॥ त्या पुत्रासी काय हें माहीत ॥ तरी तो येऊनि मम वधातें ॥ प्रवर्तेल महाराजा ॥४९॥

ऐसें ऐकूनि उमाकांत ॥ म्हणे धृमिन अवतार भर्तरीनाथ ॥ त्यांचे मुखें होईल श्रुत ॥ सुरोचना पुत्रासी ॥५०॥

ऐसें बोलतां पंचानन ॥ मग स्वस्य झालें तयाचें मन ॥ मग दिव्यदेहा आश्रमीं ठेवून दानवदेहीं अवतरला ॥५१॥

अवतरला परी बळहीन ॥ येत होता मार्गे करुन ॥ तों शस्त्र नेऊनि विक्रम ॥ काननाप्रती प्रवर्तला ॥५२॥

यापरी आणिक श्रोते बोलती ॥ सुरोचन गंधर्व महीवरती ॥ शक्रशापें पातला निगुती ॥ कैशा अर्थी तें वदावें ॥५३॥

कवि म्हणे वो ऐका वचन ॥ अमरपुरीं पाकशासन ॥ सभेंस्थानीं सभा करुन ॥ गांधर्वादिक बैसले ॥५४॥

पुढें अप्सरा नृत्य करिती ॥ नेटके हावभाव दाविती ॥ तिलोत्तमा आणि मेनका युवती ॥ अर्कज्योति लावण्य ॥५५॥

कैसें त्यांचें चांगुलपण ॥ ग्रंथीं किती करुं वर्णन ॥ तरी तयांचें स्वरुप पाहतां मदन ॥ मूर्छागत होतसे ॥५६॥

ज्या सभास्थानीं नाट्य करितां ॥ दाविती चमचमका समता ॥ जयांचे नेत्रकटाक्ष पाहतां ॥ जपी तपी नाडती ॥५७॥

मग मुनी येऊनि लुंगी कांसोटी ॥ सोडूनी धांवती तयांचे पाठीं ॥ मग कैचें आचरण योगराहाटी ॥ होती कष्टी कंदपें ॥५८॥

ऐसी गुणज्ञानस्वरुपस्थिती ॥ लावण्यलतिका चंद्रज्योती ॥ नाट्य करिती ते सभेप्रती ॥ वेधे चित्तीं कंदर्प ॥५९॥

ते नाट्य करितां सुरपतीं ॥ सुरोचन गंधर्व पंचबाणी ॥ अति वेधला निशिदिनी ॥ लाज सोडूनि तिजकारणें ॥६०॥

परम वेधतां पंचबाणीं ॥ देवसभेतें मदें न गणूनी ॥ एकाएकीं सभेंत उठोनी ॥ मेनकेतें स्पर्शीतसे ॥६१॥

धरुनि मेनकेचा हस्त ॥ कुच हस्तानें करी व्यक्त ॥ तें पाहूनि शचीनाथ ॥ परम चित्तीं क्षोभला ॥६२॥

म्हणे सभास्थानीं सोडूनि लाज ॥ कवळीत रंभेते कामिककाजें ॥ तरी हा ऐसा अघमध्वज ॥ पदच्युत होवो कां ॥६३॥

जयातें न कळे रागरांग ॥ हीनबुद्धि कामियोग ॥ तरी हा पतन पावो स्वर्ग ॥ महागर्दभ होवो कां ॥६४॥

ऐसें बोलतां पाकशासन ॥ तत्काळ झाला तेथूनि पतन ॥ पतन होता सहस्त्रनयन ॥ तुष्ट केला स्तुतीनें ॥६५॥

म्हणे महाराजा अमरनाथा ॥ उःशाप द्यावा मातें आतां ॥ हें कर्म घडलें असतां ॥ परी क्षमा करावी जी ॥६६॥

तूं दयावंत प्रज्ञाराशी ॥ सदा कळवळा हदयी पाळिशी ॥ तरी पोटीं घालूनि अपराधासी ॥ क्षमादान ओपावें ॥६७॥

तूं माय मी लेकरुं सहसा ॥ न गणीं माझे अपराधलेशा ॥ तरी तूं दृष्टि समपीयूषा ॥ मिरवीं कां मजवरी ॥६८॥

ऐसें स्तुतीचें वदतां वचन ॥ संतुष्ट झाला पाकशासन ॥ म्हणे द्वादशवर्षी पुन्हां परतोन ॥ स्वस्थानातें येशील कीं ॥६९॥

येशील परी कैसें कर्म ॥ मथुराधीश जो नरेंद्रोत्तम ॥ ज्याते सत्यवर्मां नाम ॥ महीलागीं मिरवतसे ॥७०॥

तयाची कन्या लावण्यराशी ॥ सद्विवेकीं पुण्यराशी ॥ तीतें वरोनि कृत्रिमासीं ॥ विक्रमातें तोषवावें ॥७१॥

ता विष्णुविक्रममूर्ती ऐसी ॥ स्वशक मिरवेल महीसी ॥ तो येता तव उदारसी ॥ मुक्त होशील महाराजा ॥७२॥

पाहतां विक्रमसुताचें मुख ॥ हरेल सर्वं शापदुःख ॥ मग भूलोकांतें होवोनि विन्मुख ॥ स्वर्गलोकवासी होसी तूं ॥७३॥

ऐसें बोलतां सहस्त्रनयन ॥ गंधर्वा पावला तुष्टभान ॥ जैसें मृत्युवेळीं पियूषपान ॥ लाभलेसे दैवानें ॥७४॥

कीं अत्यंत दारिद्र्य झाल्यास प्राप्त ॥ दैवें मांदुसलाभ होत ॥ कीं सरिताओधीं जात वाहात ॥ सांगडी हाता लागली ॥७५॥

कीं परम दुष्काळीं न मिळें अन्न ॥ भणंगरुप दावी दुरुन ॥ तें आपंगिलें सुरमीने ॥ तैसें झालें गंधर्वी ॥७६॥

असो मग तो सुरोचन ॥ तया झालें स्वर्गपतन ॥ वायुचक्रीं मिथुळाकानन ॥ सेविता झाला येऊनी ॥७७॥

परी तो येतांचि स्पर्शितां मही ॥ होऊनि गेला गर्दभदेही ॥ मग रासभपंक्ती काननप्रवाही ॥ चरूं लागे नित्यशा ॥७८॥

तंव त्या गांवीं कुल्लाळ कमठ ॥ उत्तम नामें असे सुभट ॥ तो संचरोनि काननवाटे ॥ गर्दभातें शोधीतस ॥७९॥

शोध शोधितां कमठ कुल्लाळ ॥ देखिलें गर्दभमंडळ ॥ त्या गर्दभात हा शापबळ ॥ गर्दभरुपी मिरवतसे ॥८०॥

मग तेणें हांकोनि गर्दभ समस्त ॥ नेता झाला स्वसदनांत ॥ त्याजसवें गर्दभ त्यांत ॥ कुल्लाळशाळे गेला असे ॥८१॥

गेला परी बहु दिवस ॥ तया कुल्लाळगृहीं असे ॥ यावरी कमठ तो स्वसदनास ॥ दरिद्रांत पावला ॥८२॥

तेणेंकरुनि गर्दभ समस्त ॥ ओपिले परा घेऊनि वित्त ॥ परी तो गर्दभ स्वसदनांत ॥ रक्षोनियां ठेविला ॥८३॥

रक्षिला परी एकटा द्वारी ॥ गर्दभ मनीं विचार करी ॥ एकांतीं एकट्यापरी ॥ कमठ कुल्लाळें ठेविला ॥८४॥

मग रात्र पाहोनि दोन प्रहर ॥ कुल्लाळातें बोलें उत्तर ॥ कीं सत्यवर्म्याची कन्या सुंदर ॥ करुनि द्यावी मज कांता ॥८५॥

ऐसें दिनोदिन पुकारितां ॥ कमठ कानी होय ऐकता ॥ मग सदनाबाहेर येऊनि तत्त्वतां ॥ निजदृष्टीनें विलोकी ॥८६॥

विलोकी परी कोठें कांहीं ॥ पाहत्याप्रती वसत नाहीं ॥ कोण बोलतो बोल प्रवाहीं ॥ तोही कोण कळेना ॥८७॥

ऐसा होऊनि साशंकित ॥ पुन्हां सदनामाजी जात ॥ तों गर्दभ पुन्हां पाचरुनि त्यातें ॥ दारा द्यावी म्हणतसे ॥८८॥

पुन्हां कमठ येत परतोन ॥ पाहतां बोले याचें वदन ॥ परी गर्दभ बोलतो ऐसें वचन ॥ हें तों कोणा कळेना ॥८९॥

मग साशंकित होय चित्तीं ॥ कोण बोले तो गृहाप्रति ॥ संशय येत तया चित्तीं ॥ उभा राहे कमठ तो ॥९०॥

कमठ सन्मुख उभा असतां ॥ गर्दभ विचार करी चित्ता ॥ म्हणे भ्रांति फेडावी आतां ॥ आपुलिया शब्दाची ॥९१॥

मग कमठा जवळी पाचारुन ॥ बोलता झाला गर्दभ वचन ॥ म्हणे महाराजा संशयें दारुण ॥ पाहात अससी किमर्थ तूं ॥९२॥

परी मी नित्य बोलतों वाणी ॥ तूं ऐकतोसी कानीं ॥ तरी सत्यवर्म्याची मज नंदिनी ॥ करुनि देई ते भाजा ॥९३॥

ऐसें गर्दभ बोलतां वचन ॥ कमठ खोंचे भयेंकरुन ॥ जरी हें ऐकिलें परानें ॥ तरी शिक्षा होईल आमुतें ॥९४॥

अहा अहा रे प्रत्यक्ष गर्दभ तंव ॥ मिसळू पाहशी सोयराणीव ॥ मेरु मशक तेवीं मानव ॥ समरंगण मिरविशी ॥९५॥

कोठें राजा कोठें रजक ॥ कोठें तूं रे मागणार भीक ॥ कोठें मेरु कोठें मशक ॥ अर्की खद्योत मिरवला ॥९६॥

ऐसा विचार कमठ करीत ॥ म्हणे बरवें नव्हे यांत ॥ तरी आतां त्यजूनि ग्रामातें ॥ परदेशाप्रती वसावें ॥९७॥

तरी आतां विषर्यास ॥ कळतां सत्यवर्म रायास ॥ तो शिर छेदूनि कसायास ॥ अंर्पील जाण निर्धारें ॥९८॥

ऐसा विचार करितां चित्तीं ॥ तों उदयास पावला गभस्ती ॥ मग कांतेसी सांगूनि गर्दभनीती ॥ पलायनास निश्चय केला पैं ॥९९॥

परी ते मूढ दोघेजण ॥ जयांलागी नसे ज्ञान ॥ कीं प्रत्यक्ष पशूनें बोलावें वचन ॥ हें आश्चर्य वाटेना ॥१००॥

पशू असती वाचारहित ॥ हा गर्दभ बोलतो मात ॥ तरी हा पशू नव्हे निश्वित ॥ प्रज्ञावंत समजेना ॥१॥

म्हणोनि असती मूढपणें ॥ योजिलें त्यांनीं पलायन ॥ त्याचि गर्दभी ग्रंथिका वाहोन ॥ संसारग्रंथिका भरियेली ॥२॥

संसार वाहोनि गर्दभावरता ॥ त्याससें चालती उभयतां ॥ सहजस्थितीं चाल चालतां ॥ ग्रामद्वारीं ते आले ॥३॥

परी द्वाररक्षक तेथें असती ॥ तिहीं पाहतां तयांची स्थिती ॥ समजोनि त्यांची पलायनरीती ॥ तार्किकज्ञानेंकरुनियां ॥४॥

मग ते हटकिती कमठाकारणें ॥ म्हणती संसार गर्दभीं वाहोन ॥ किमर्थ तूं पलायन ॥ करिशी सांग कमठा रे ॥५॥

ऐसें पुसतां द्वाररक्षक ॥ तेव्हां तो झाला भयें व्यापक ॥ न बोले वचन कांहींएक ॥ मुखस्तंभ बावरियेला ॥६॥

तरी ते नाना युक्तिप्रयुक्तीं ॥ पलायना अर्थ पुसती ॥ परी तो न वदे दुःखाप्रती ॥ संशयांत मिरवतसे ॥७॥

मनांत म्हणे कमठ कुल्लाळ ॥ जरी हा अर्थ वदूं केवळ ॥ तरी सध्यां हा वडवानळ ॥ अंग स्पर्शील आमुचें ॥८॥

म्हणूनि त्यातें न बोलेचि कांहीं ॥ मुखस्तंभ विचरे वाचाप्रवाहीं ॥ मग ते द्वारपाळ प्रज्ञादेही ॥ अटक करिती कमठातें ॥९॥

म्हणती ऐसी वस्ती टाकून ॥ कमठा तूं करिशी पक्लायन ॥ तरी तें रायातें श्रुत करुन ॥ मग बोलवूं तुज कमठा ॥११०॥

ऐसें वदूनि द्वारपाळ ॥ राजांगणीं जाऊनि चपळ ॥ म्हणती महाराजा कुमठ कुल्लाळ ॥ ग्रामांतूनि जातसे ॥११॥

मग त्वरें पाठवूनि आपुले दूत ॥ कमठ आणिला राजसभेंत ॥ सभास्थानीं जातांच त्यातें ॥ राव स्वमुखें पुसतसे ॥१२॥

म्हणे काय झाली दुःखमात ॥ कोणतें दुःख तुज वसत ॥ झालें म्हणोनि ग्रामातें ॥ सांडूनियां जासी तूं ॥१३॥

ऐसी असतां महाराहाटी ॥ तूं कोणे अर्थे झालासी कष्टी ॥ तरी तो अर्थ वदोनि होटी ॥ श्रुत करी आमुतें ॥१४॥

म्हणे कमठा सत्यवर्मा ॥ नांव मिरवत नहीं आम्हां ॥ तरी सत्य चालवीन नेमां ॥ नामासमान वर्ततसें ॥१५॥

ऐसें बोलतां राव वचन ॥ कमठ बोले रायाकारणें ॥ हे महाराजा प्रजापालन करणें ॥ दक्ष तुम्हीच अहां कीं ॥१६॥

परी मातें दुःख जें आहे ॥ तें वाचेनें बोलता न ये ॥ बोलों जाता प्राण जाये ॥ देहमुक्त होईन ॥१७॥

राव म्हणे मजकडून ॥ जात असेल तुझा प्राण ॥ तरी अन्याय माफ करीन ॥ रक्षीन प्राण तुझा कीं ॥१८॥

तरी या बोलाकारणें ॥ संशय मिरवीत असेल मनें ॥ तरी माझें सदैव वचन ॥ घेई घेई कमठा तूं ॥१९॥

ऐसी बोलतां राजेंद्र वाणी ॥ कमठ तुकावी ग्रीवेलागुनी ॥ म्हणे महाराजा ऐसी वाणी ॥ भाष द्यावी मज आतां ॥१२०॥

अवश्य म्हणोनि सत्यवर्मा ॥ करतळभाष देत उत्तमा ॥ मग म्हणे कमठा क्लेशवर्मा ॥ वदोनि दावीं मज आतां ॥२१॥

येरु म्हणे नरेशा ॥ एकांतीं दावीन शब्दलेशा ॥ ऐसें बोलतां कमठ सहसा ॥ एकांतातें चालिले ॥२२॥

कमठ आणि नरेंद्रोत्तम ॥ एकांतीं बैसले शुद्ध आश्रमा ॥ मग कमठ म्हणे राया कामा ॥ मम क्लेशाचे अवधारीं ॥२३॥

हे राया तूं सर्वज्ञमूर्ती ॥ तव उदरींची कन्या युवती ॥ नाम जियेचें सत्यवती ॥ महीवरती मिरवतसे ॥२४॥

तरी काय सांगू विपर्यास ॥ एक गर्दभ मम सदनास ॥ तो रात्रीं पाचारुनि आम्हांस ॥ विपरीत वाणी बोलतसे ॥२५॥

बोलतसे कैस रीतीं ॥ कीं मज दारा करुनि दे सत्यवती ॥ ऐसें बोलतां चक्रवर्ती ॥ भयें व्यप्त मन माझें ॥२६॥

अहो हें पशु काय बोलत ॥ जरी रायातें होत श्रुत ॥ मत तो मातें सदनासहि ॥ कोपानळीं जाळील ॥२७॥

ऐशा भयाची उमजोनि वार्ता ॥ त्रास योजिला आपुले चित्ता ॥ म्हणोनि राया सोडोनि स्वार्था ॥ ग्रामाबाहेर जातसे ॥२८॥

ऐसें बोलतां कमठ कुल्लाळ ॥ मग विचार करीतसे नृपाळ ॥ चित्तीं म्हणे पशू केवळ ॥ वाचारहित असती कीं ॥२९॥

तरी तो पशु न म्हणावा सर्वथा ॥ कोणीतरी असेल देवता ॥ परीक्षेविण माझिये चित्ता ॥ पशुवेषें नटला असे ॥१३०॥

ऐसा विचार करुनि चित्तीं ॥ बोलता झाला कमठाप्रती ॥ म्हणे कमठा भय चित्तीं ॥ धरुं नको या हेतू ॥३१॥

तरी आतां कुशळपणें ॥ दावूं आपलें भावलक्षण ॥ आणि तयाची परीक्षा करुन ॥ सत्यवती ओपावी ॥३२॥

तरी तूं आतां सेवोनि सदन ॥ स्वस्थ करीं आपुलें मन ॥ गर्दभ करितां तूतें भाषाण ॥ उत्तरयुक्ती तूं ऐक ॥३३॥

तूतें बोलतां गर्दभ मात ॥ तरी त्यातें उत्तर द्यावे त्वरित ॥ कीं हा प्रकार रायातें श्रुत ॥ केला असे महाराजा ॥३४॥

केलें परी राजउत्तर ॥ आलें आहे तव बोलावर ॥ तरी धातुताम्राचें मिथुळानगर ॥ करुनि द्यावें सर्वस्वे ॥३५॥

पूर्ण झालिया ताम्रवती ॥ मग आपुल्यातें देईल सत्यवती ॥ ऐसें सांगूनि तयाप्रती ॥ तुष्ट करीं चित्तातें ॥३६॥

ऐसें कमठा नरेंद्रोंत्तमें ॥ सांगोनि दिला उत्तरनेम ॥ तुष्ट करोनि मनोधर्म ॥ बोळविला कमठ तो ॥३७॥

मग तुष्ट होवोनि कमठ चित्तीं ॥ जाता झाला सदनाप्रती ॥ तों अस्ताचळा पावोनि गभस्ती ॥ महीं रात्र संचरली ॥३८॥

रात्र झाली दोन प्रहर ॥ तंव गर्दभ बोले उत्तर ॥ हे कमठा तूं नरेश्वर ॥ सत्यवती दे मातें ॥३९॥

ऐसें बोलतां पशु युक्तीं ॥ कमठ उत्तर दे तयाप्रती ॥ म्हणे महाराजा नृपाप्रती ॥ श्रुत केलें आहे मीं ॥१४०॥

केल्यावरी प्रत्युत्तर ॥ रायें दिधलें अनिवार ॥ कीं ताम्रधातूचे मिथुळानगर ॥ करुनि द्यावें आमुतें ॥४१॥

ग्राम झालिया ताम्रसदनी ॥ अर्पीन त्यातें नंदिनी ॥ ऐसिया बोलप्रकरणीं ॥ बोलिला आहे नरेंद्र तो ॥४२॥

तरी ऐसिया बोला सरळा ॥ असेल कांहीं दावा कळा ॥ तुष्ट करोनि नरेंद्रपाळा ॥ सत्यवती वरावी ॥४३॥

त्यातें ताम्रवती देवोन ॥ ग्रहण करावें कन्यारत्न ॥ जैसें दानवां सुरा देवोन ॥ पियूष घेतलें देवांनीं ॥४४॥

किंवा कष्टातें कचें ओपूनी ॥ हरोनि गेला संजीवनी ॥ तेवीं रायातें तुष्ट करोनी ॥ सत्यवती हरीं कां ॥४५॥

तरी कांच देवोनि पाच घेणें ॥ हें तों बुद्धिमंतलक्षण ॥ असेल कांहीं या प्रमाण ॥ करुनि दावीं महाराजा ॥४६॥

ऐशी कमठ बोलतां उक्ती ॥ हास्य करी गंधर्वपती ॥ म्हणे रायाची विशाळ मती ॥ नव्हे कमठा या प्रकरणीं ॥४७॥

अरे हेमतगटीं ॥ रत्नकोंदणीं ॥ जरी तो आराधित वाणी ॥ तरी करोनि देतों येचि क्षणीं ॥ अमरनगरीसमान कीं ॥४८॥

कीं सबळ शक्राची संपत्ती ॥ आणूनि देतों तयाप्रती ॥ तेथें मागणें ताम्रवती ॥ अदैवपणीं हें काय ॥४९॥

असें सकळकाननाब्धिसुरभिरत्न ॥ कल्पतरु आदि चौदा करुनी ॥ तैं ताम्रवती मागणें वाणीं ॥ अदैववाणीं हें काय ॥१५०॥

कीं सुरभि अब्धिरत्न ॥ मागतां देतों आणून ॥ तेथें ताम्रवती नगर पूर्ण ॥ अदैववाणीं हें काय ॥५१॥

कें रेवाकाननींचे पाषाण ॥ निधि चिंतामणी देतों करुन ॥ तैं ताम्रवती नगर मागोन ॥ अदैंवपणें हें काय ॥५२॥

तरी आतां असो कैसें ॥ जैसें ज्याचें संचित असे ॥ तैसी बुद्धी होय प्रकाश ॥ प्रारब्धबळें अनुक्रमें ॥५३॥

तरी कमठा अति निगुतीं ॥ जावोनि सांगावें रायाप्रती ॥ कीं मिथुळाग्राम ताम्रवती ॥ ग्रहण करीं नरेंद्रा ॥५४॥

अवश्य म्हणोनि कुल्लाळ ॥ जावोनि वंदिला मिथुळापाळ ॥ म्हणे महाराजा भूपा कुशळ ॥ बोलिला तें ऐकावें ॥५५॥

म्हणे सिद्ध करोनि सत्यवती ॥ कृपें ओपिजे माझे हातीं ॥ आज रात्रीं ताम्रवती ॥ निजदृष्टीं पाहशील ॥५६॥

ऐसें पशूचें वाग्वचन ॥ कमठमुखें राव ऐकून ॥ अवश्य कुल्लाळातें म्हणून ॥ सदनातें पाठवी ॥५७॥

कुल्लाळ येतांचि स्वधामा ॥ म्हणे प्राज्ञिका गर्दभोत्तमा ॥ राया सांगतां ऐसा महिमा ॥ स्वीकारिलें रायानें ॥५८॥

केला प्रत्यक्ष विश्वकर्मा ॥ तो म्हणे महाराजा गंधर्वोत्तमा ॥ कवण कामिक काम तुम्हां ॥ वेधलासे महाराजा ॥५९॥

येरु म्हणे विराटस्वरुप तनया ॥ मुख्य माझी तों ब्रह्मकाया ॥ काम उदेला गुरुराया ॥ मिथुळा कीजे ताम्रवती ॥१६०॥

विश्वकर्मा तुझें नाम ॥ तरी जाणसी सकळ विश्वाचें कर्म ॥ कर्म ओपूनि जगद्रुम ॥ सुपंथ पंथा लाविलें ॥६१॥

तरी सकळकर्म निर्माणकर्ता ॥ म्हणोनि विश्वकर्मा नाम शोभत ॥ आहेस म्हणोनि त्या अर्थे ॥ पाचारिलें तूतें मीं ॥६२॥

तरी जगदगुरु तूं कर्मपाड ॥ निवारीं तूं माझें इतुकें साकडें ॥ ताम्रवती मिथुळकोट ॥ करुनि द्यावी महाराजा ॥६३॥

ऐसी ऐकतां गंधर्वबाणी ॥ मागिले प्रहरींची यामिनी ॥ विश्वकर्मा ग्रामधामीं ॥ कृपा करोनि हांसतसे ॥६४॥

कृपादृष्टी अविट करितां ॥ ताम्रधातु ग्राम समस्त ॥ व्याप्त धामें सर्वथा ॥ ताम्रवर्णी लखलखीत ॥६५॥

राजा अंत्यजादि सवें सकळ ॥ कोणी न उरला धामीं दुर्बळ ॥ ताम्रवटिका सकळ स्थळ ॥ ग्राम मिथुळा मिरवलें ॥६६॥

ऐसें करोनि विश्वकर्मा ॥ अदृश्य गेला आपुले धामा ॥ येरीकडे उदयोत्तमा ॥ होतां पाहती ग्रामजन ॥६७॥

तों ताम्रधातू अंगणासहित ॥ धामें विराजलीं सुशोभित ॥ ऐसें पाहतांचि अपरिमिति ॥ ठक पडलें जगासी ॥६८॥

म्हणती हें काय अपूर्व झालें ॥ न धडे तेंचि घडून आलें ॥ परी रायें पाहतांचि जाणवलें ॥ खूणपरीक्षा चित्तातें ॥६९॥

मग मनांत म्हणे सत्यवर्मा ॥ कन्या ओपितां सुकर्मा ॥ परी लौकिक अति जगदुर्गमा ॥ हेळणेते पावेन मी ॥१७०॥

तरी हें जग दुर्गम नोहे भलें ॥ द्विमुख सावज होऊनि बैसलें ॥ पैशून्याचि देखूनि पावलें ॥ दंशावया धांवती ॥७१॥

तरी आतां गुप्तगुप्तें ॥ कन्या ओपूनि कुल्लाळातें ॥ स्वग्रामधामाकारणें विभक्त ॥ दूरदेशीं बसवावी ॥७२॥

ऐसा विचार योजूनि चित्तीं ॥ मग पाचारुनि कमठाप्रती ॥ लोकर्निदेच्या सकळार्थी ॥ सुचविलें तयानें ॥७३॥

म्हणे महाराजा ऐक ॥ कन्या गर्दभा ओपितां देख ॥ लोकनिंदा पतनशब्द चार्वाक ॥ प्रविष्ट होईल भवनीं कीं ॥७४॥

तरी लावण्य चपळा सत्यवती ॥ घेऊनि जावी सदनाप्रती ॥ परी या गांवीं न करुनि वस्ती ॥ दूरदेशीं वसावें ॥७५॥

ऐसें बोलतां राव स्पष्ट ॥ अवश्य म्हणे कुल्लाळ कमठ ॥ मग सदनीं येऊनि संसारथाट ॥ वस्त्रीं ग्रंथिका वाहिली ॥७६॥

अर्क झाला अस्तमानीं ॥ पुन्हां प्रवेशे राजसदनी ॥ म्हणे राया ग्रंथिका बांधूनी ॥ सिद्ध आहे जावया ॥७७॥

राव पाचारुनि कन्या युवती ॥ म्हणे पवित्र सत्यवती ॥ तूतें अर्पिली देवाप्रती ॥ स्वीकारावें तयातें ॥७८॥

म्हणशील परीक्षिलें कैसें ॥ तरी मिथुळा ताम्रवती लेशें ॥ क्षण न लोटतां केले असे ॥ तस्मात् देव निश्चयें तो ॥७९॥

तरी तूं त्या स्वीकारुन ॥ ओळखी आणिजे कोणाचा कोण ॥ मीं तोचि परीक्षिला निश्चयें करुन ॥ देवतारुपी गर्दभ तो ॥१८०॥

करिसी सहसा अनमान ॥ तरी कायावाचामनें करुन ॥ शुचि होऊनि उत्तीर्ण ॥ उभयकुळां हेंचि करीं ॥८१॥

जरी गर्दभ म्हणूनि अमपानिसी ॥ तरी डाग लागेल मम कुळासी ॥ आणि तो कोपला विपर्यासीं ॥ पतनशापा ओपील कीं ॥८२॥

तरी ऐसें करीं नंदनी ॥ युक्तिप्रयुक्तीं तयालागुनी ॥ गर्दभदेहाचा त्याग करुनी ॥ स्वस्वरुपीं मिरवीं कां ॥८३॥

तेणेंकरुनि उभयकुळपक्षी ॥ उद्धारार्थ मिरवेल दक्षी ॥ तरी आतां शुद्धकांक्षी कमठसदना सेवीं कां ॥८४॥

ऐसें बोलतां तींतें सदनीं ॥ अवश्य म्हणूनि शुभाननी ॥ मग कुल्लाळ गृही जात घेऊनी ॥ निशीमाजी संचरली ॥८५॥

संचरली घरी म्हणतां ॥ बोटा लावूनि दावीं भर्ता ॥ सत्यवती ऐसें बोलतां ॥ राव पुसे कमठातें ॥८६॥

राव पुसे कमठासही ॥ दावितांचि राव लागे पायीं ॥ म्हणे महाराजा हे जांवई ॥ पाळण करी कन्येचें ॥८७॥

ऐसें बोलतां तयापर ॥ गर्दभ बोलता झाला यातें म्हणतील काई ॥ परी हे असे थोर ॥ मी जांवई तुज असें ॥८८॥

पाहें माझी कळा गर्दभदेही ॥ लोक यातें म्हणतील काई ॥ परी हे असो निंदाप्रवाहीं ॥ परी धन्य भाग्य तुझें कीं ॥८९॥

राया तरी ऐक मात ॥ शक्रशापें गर्दभदेहातें ॥ मी विचरतों कृत्रिममतें ॥ नातरी सुरोचन गंधर्व मी ॥१९०॥

मग मूळापासूनि समूळ कथा ॥ सांगूनि तोषविलें नृपनाथा ॥ ऐशी नृपें ऐकूनि वार्ता ॥ तुष्ट चित्तीं मिरवला ॥९१॥

मग देऊनि लावण्यराशी ॥ राव गेला स्वसदनासी ॥ भर्ता देऊनि सत्यवतीसी ॥ कुल्लाळातें प्रार्थूनियां ॥९२॥

राव जातां स्वसदनीं ॥ कमठ सत्यवतीसी घेऊनी ॥ अवंतिकेचा मार्ग धरुनी ॥ गमन करी रात्रीं तो ॥९३॥

असो आतां पुढिले अध्यायीं ॥ सत्यवती करील काई ॥ तेचि कथा परिसावी ॥ अवधान देऊनियां ॥९४॥

धुंडीसुत नरहरिवंशीं ॥ मालू नटला संतसेवेसी ॥ सेवाप्रसाद तयापाशीं रात्रंदिन मागतसे ॥९५॥

इतिश्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ पंचविंशति अध्याय गोड हा ॥१९६॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥


श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय २६

श्रीगणेशाय नमः

जयजयाजी कमलापती ॥ सर्वसाक्षी आदिमूर्ती ॥ पूर्णब्रह्मा सनातनज्योती ॥ रुक्मिणीपते जगदात्मया ॥१॥

हे दीननाथा दीनबंधू ॥ मुनिमानसरंजना कृपासिंधू ॥ तरी आतां कथासुबोधू ॥ रसज्ञ शब्दीं वदवीं कां ॥२॥

मागिले अध्यायीं कथन ॥ गंधर्व नामीं सुरोचन ॥ शक्रशापें गर्दभ होऊन ॥ सत्यवती वरियेली ॥३॥

तरी ही असो मागील कथा ॥ सिंहावलोकनीं पहा आतां ॥ कमठ कुल्लाळ काननपंथा ॥ अवंतिके जातसे ॥४॥

गंधर्वगर्दभी संसार वाहोन ॥ स्वदारेसहित सत्यवतीरत्न ॥ मार्गी चालता मुक्कामोमुक्काम ॥ अवंतिके पातला ॥५॥

कुल्लाळगृहीं सदन पाहून ॥ राहते झाले समुच्चयेकरुन ॥ परी सत्यवतीतें सुढाळपणें ॥ कन्येसमान पाळीतसे ॥६॥

सकळ मोहाचें मायाफळ ॥ सत्यवतीतें अर्पी कुल्लाळ ॥ आसनवसनादि सकळ ॥ इच्छेसमान पाळीतसे ॥७॥

तों एके दिवशीं सत्यवती ॥ म्हणे ताता कमठमूर्ती ॥ मम लग्नातें करुनि पती ॥ माझा मज दावीं कां ॥८॥

येरी म्हणे वो अवश्य माय ॥ या बोलाचा फेडीन संशय ॥ मग रात्रीं अवसर पाहूनि समय ॥ गंधर्वापाशीं पातला ॥९॥

म्हणे महाराजा पशुपती ॥ कामना वेधली जे तव चित्तीं ॥ ती फळासी येऊनि निगुती ॥ तुजलागी पावती झाली ॥१०॥

तरी या अर्था सुलक्षण ॥ पुढें व्हावें मंगलकारण ॥ सत्यवती उत्तम रत्न ॥ वाट पाहे पतीची ॥११॥

तरी या प्रश्नाचे उत्तर देऊन ॥ उभयीं मिरवावें समाधान ॥ ऐसें ऐकतां संकटवचन ॥ गंधर्वराज वदतसे ॥१२॥

तरी असो अन्य विधीतें ॥ प्रविष्ट न व्हावें हें लोकांत ॥ तरी योजूनि असुरी लग्नांत ॥ सत्यवती स्वीकारुं ॥१३॥

म्हणे महाराजा कमठा ऐक ॥ मंगलविधी नसे एक ॥ आसुरीविधीपूर्वक ॥ हा सोहळा मिरवितसें ॥१४॥

ऐसें बोलतां गंधर्वराव ॥ कमठ म्हणे आहे बरवें ॥ परी एक संधीं उदित भाव ॥ उदय पावला महाराजा ॥१५॥

म्हणे संदेह कवण कैसे ॥ परी आपण वर्ततां पशू ऐसे ॥ तरी या मिषें संग मनुष्यें ॥ कैसी रीती घडेल कीं ॥१६॥

तरी संदेह फेडूनि माझा ॥ प्रिय करावी आपुली भाजा ॥ ऐसे ऐकूनि कामठ चोजा ॥ उत्तरा उत्तर देतसे ॥१७॥

तो म्हणे महाराजा कमठा ऐक ॥ रत्न सत्यवती अलोलिक ॥ ऋतुसमय सत्य दोंदिक ॥ श्रुत करावे आम्हांतें ॥१८॥

तुवां श्रुत केलिया दृष्टी ॥ दावीन आपुली स्वरुपकोटी ॥ गंधर्ववेषें इच्छा पाटीं ॥ पूर्णपणी आणीन कीं ॥१९॥

सत्यवती उत्तम जाया ॥ चतुर्थदिनी एकांत ठाया ॥ तुष्ट करीन गंधर्वी काया ॥ वरुनिया महाराजा ॥२०॥

ऐसी बोलतां गंधर्व वाणी ॥ तुष्ट झाला कमठ मनीं ॥ स्वधामात संचरोनी ॥ वृत्तांत कन्येसी निवेदिला ॥२१॥

म्हणे माये वो सत्यवती ॥ कामना जे आहे तव चित्तीं ॥ ते ऋतुकाळीं कामाहुती ॥ गंधर्वराज ओपील गे ॥२२॥

आपुल्या स्वरुपा प्रगट करुन ॥ करुं योजितों आसुरा लग्न ॥ तरी तेंचि वरुनि समाधान ॥ सुखालागीं पावशील ॥२३॥

ऐसें सांगूनि कमठ कुल्लाळ ॥ शयनीं पहुडला उतावेळ ॥ ती निशा लोटूनि उदयकाळ ॥ गभस्तीचा पातला ॥२४॥

तेही लोटल्या दिनोदिन ॥ समय पातला ऋतुकालमान ॥ चतुर्थ दिनी कुल्लाळ जाऊन ॥ श्रुत करी गंधर्वातें ॥२५॥

म्हणे महाराजा गंधर्वनाथा ॥ योजिला समय आला आतां ॥ तरी उभय काम पूर्ण होतां ॥ स्वीकारावें महाराजा ॥२६॥

ऐसें बोलता कमठ वाणीं ॥ वेष गर्दभी तत्क्षणी ॥ सोडूनि स्वस्वरुपा प्रगट करुन ॥ महीलागीं मिरवला ॥२७॥

मिरवला परी जैसा गभस्ती ॥ वस्त्राभरणीं कनककांती ॥ कमठे पाहूनि चित्तसरतीं ॥ आनंदतोय हेलावे ॥२८॥

चित्ती म्हणे भाग्यवंत ॥ मजसमान नाही या माहीत ॥ स्वर्गवासी गंधर्व दैवत ॥ ममगृहीं वर्ततसे ॥२९॥

अहा ती धन्य सत्यवती ॥ बैसलीसे पुण्यपर्वती ॥ ऐसा स्वामी जियतें पती ॥ निजदैवें लाधला ॥३०॥

राहिला परी वर्णनासी मती ॥ नसे बोलावया अनुसंमती ॥ स्वर्गफळचि लागलें हाती ॥ सत्यवतीकारणें ॥३१॥

जैसें अमरां पीयूषदान ॥ आतुडले मंथनीं दैवेकरुन ॥ कीं दानवांत नवनिधिधन ॥ कुबेर लाधला पुण्यानें ॥३२॥

कीं शिवमौळींचे दृढासन ॥ दैवें लाधला रोहिणीरमण ॥ तेवीं गंधर्वसुरोचन ॥ सत्यवती ही लाधली ॥३३॥

कीं प्रत्यक्ष सूर्यनारायण ॥ पाठीं वाहे श्यामकर्ण ॥ तन्न्यायें दैवेंकरुन ॥ सत्यवती लाधली ॥३४॥

कीं अब्धिजा दारा कमला नामें ॥ विष्णूसी लाधली दैवेंकरुन ॥ तेवीं गंधर्वस्वामी सुरोचन ॥ सत्यवती लाधली ॥३५॥

ऐसा विस्मय कमठ पोटी ॥ करीत आहे हर्षे देठी ॥ मग भाळ ठेवूनि चरणसंपुटीं ॥ विनवणी करीतसे ॥३६॥

म्हणे महाराजा स्वर्गधामका ॥ अहा मी अबुद्ध असें या लोकां ॥ नेणूनि तव प्रतापआवांका ॥ कष्टविलें पापिष्ठें ॥३७॥

तव पृष्ठीं ते ग्रंथिका वाहूनी ॥ गर्दभ भाविला आपुले मनीं ॥ अहंमूढ मी अबुद्धखाणी ॥ आरोहण केलें पापिष्ठें ॥३८॥

अहा स्वामिया ऐसी कोटी ॥ असूनि मृत्तिका वाहिली पाठीं ॥ नेणूनि तूतें केलें कष्टी ॥ मीही दुरात्म्या पापिष्ठें ॥३९॥

अहा कर्म हें अनिवार ॥ आरोहतां तव पृष्ठीवर ॥ तैं दुरात्मा मुष्टिप्रहार ॥ करीत होतों पापिष्ठ ॥४०॥

तरी ऐसिया अपराधांसी ॥ क्षमा करीं गा दयाराशी ॥ ऐसें म्हणोनि पुन्हां चरणांसी ॥ निजमौळी अर्पितसे ॥४१॥

मग सुरोचन गंधर्व हात ॥ धरुनि कमठ सदनीं नेत ॥ म्हणे महाराजा स्वकांतेतें ॥ सांभाळावें सर्वस्वीं ॥४२॥

मग सुरोचन गंधर्वे एकांतासी ॥ पाचारिलें सत्यवतीसी ॥ येरी येतांचि षोडशोपचारेंसीं ॥ गंधर्वराज पूजियेला ॥४३॥

मग अति प्रीतीं संवादस्थितीं ॥ ऐक्य भावानें उभय रमती ॥ आसुरी विवाहकामार्थ रती ॥ तुष्ट चित्तीं मिरवला ॥४४॥

मिरवले परी त्याच रात्रीं ॥ गर्भ संभवला सत्यवती ॥ प्रारब्धयोगें पुत्रवंतीं ॥ जठस्थानीं राहिला ॥४५॥

यापरी गंधर्वराज ॥ म्हणतसे सत्यवतीभाज ॥ पुत्रसुखातें पाहिलें चोज ॥ स्वर्गवास करीन मी ॥४६॥

शक्रशापापासूनि कथा ॥ सत्यवतीतें होय सांगता ॥ कथा सांगूनि म्हणे आतां ॥ सुख क्षेमांत असावें ॥४७॥

तरी तुज आतां राजबाळी ॥ पुत्र उल्हासील येणें काळीं ॥ परी तो पुत्र महाबळी ॥ राज्यासनीं मिरवेल ॥४८॥

मिरवेल परी धर्मदाता ॥ विक्रम नामीं जगाविख्यात ॥ धैर्य राशि औदार्यवंत ॥ शक्रकर्ता मिरवेल ॥४९॥

ऐसा पुत्र तूं चूडामणी ॥ लाधसील वो शुभाननी ॥ मी तव ऋणापासूनी ॥ मुक्त झालों सर्वस्वीं ॥५०॥

आतां उरलें शापमोचन ॥ पाहतांचि गे पुत्रवदन ॥ अमूल्य स्वर्गसुखा पावेन ॥ स्वस्थानासी जाऊनी ॥५१॥

यावरी पुढें तूं गोरटी ॥ मम क्षती न करी आपुले पोटीं ॥ विक्रमपुत्र पाळूनि शेवटीं ॥ सकळ सुखा भोगीं कां ॥५२॥

ऐसें सांगूनि सुरोचन ॥ पुन्हां गर्दभवेश धरुन ॥ सवेंचि सेविलें आपुलें ठाण ॥ अंगणांत येऊनियां ॥५३॥

यापुढे दिवसानुदिवस ॥ गर्भ लागला आहे वाढीस ॥ परी लोक पुसती कुल्लाळास ॥ सत्यवती कोण ही ॥५४॥

येरु म्हणे मम कुमरी ॥ मोहे आणिली आहे माहेरीं ॥ गरोदरपण निवटल्यावरी ॥ पुन्हां जाईल स्वसदना ॥५५॥

ऐसें जगतातें करुनि भाषण ॥ तुष्ट मिरवे सकळांचें मन ॥ यापरी तीतें नवमास पूर्ण ॥ गर्भस्थानीं विराजले ॥५६॥

तो सुलक्ष समयो सुलक्ष तिथी ॥ नक्षत्र करण शुभयोगांतीं ॥ चंद्रबळ तारानीती ॥ प्रसूत झाली सुलक्षणी ॥५७॥

बाळ पाहतां शुभाननी ॥ तेजःपुंज लावण्यखाणी ॥ कीं सरळ तेज ओपूनि तरणी ॥ पाहुणचारी आरधिला ॥५८॥

पुढें पाहतां संस्कारासी ॥ वारसें केलें द्वादश दिवसीं ॥ पाळणां घालूनि बाळकासी ॥ विक्रम नाम ठेविलें ॥५९॥

नाम ठेविलें सुदिनास ॥ तों अर्क प्रवर्तला अस्तप्रदेश ॥ सुरोचन गर्दभवेश ॥ सांडिता झाला तत्क्षणीं ॥६०॥

मग संचरुनि सदनातें ॥ सत्यवतीतें म्हणे कांते ॥ शीघ्र आणीं पाहूं दे बाळकातें ॥ पुत्रमुख या काळीं ॥६१॥

बैसोनियां वस्त्रासनीं ॥ सत्यवती देत बाळ आणूनि ॥ अंकीं सुरोचन गंधर्व घेऊनी ॥ पुत्रमुख पाहिलें ॥६२॥

पुत्रमुख पाहतां दृष्टीं ॥ आटूनि गेल्या शापकोटी ॥ तों अमरीं जाणवलें शक्रपोटीं ॥ मातलीतें पाठविलें ॥६३॥

विमान रोहणा मातली घेवोनी ॥ येता झाला अवंतिकास्थानीं ॥ शीघ्र द्वारीं आसन ठेवोनी ॥ सदनामाजी संचरला ॥६४॥

तो सुरोचन गंधर्व बाळ घेऊन ॥ परम स्नेहानें घेत चुंबन ॥ तों मातली सन्निध उभा राहून ॥ बोलता झाला गंधर्वाते ॥६५॥

म्हणे महाराजा सुरोचना ॥ मज पाठविलें पाकशासनें ॥ तरी आतां आरुढोनि विमाना ॥ अमरस्थानी चलावें ॥६६॥

आतां सोडूनि पुत्रमोहातें ॥ चला वेगीं देवनाथ ॥ अहा वाट आपुली पहात ॥ शापमोचन जाहलिया ॥६७॥

ऐसें बोलतां मातली वचन ॥ सत्यवतीतें बाळक ओपून ॥ म्हणे कांते समाधान ॥ ठेवीं आतां जातों आम्ही ॥६८॥

ऐसें बोलतां सत्यवती ॥ म्हणे महाराजा गंधर्वपती ॥ बाळ तान्हुलें टाकूनि क्षितीं ॥ कैसें जातां महाराजा ॥६९॥

तुम्ही गेलिया सोडूनि मातें ॥ कोण आहे मम देहातें ॥ निढळपणीं परदेशातें ॥ सोडूनी कैसै जातां जी ॥७०॥

ऐसें म्हणोनि सत्यवती ॥ हंबरडा फोडिला वृत्तीं ॥ अश्रु भरुनि नेत्रपातीं ॥ दुःखसरिता लोटतसे ॥७१॥

म्हणे महाराजा तुजकारण ॥ जनक माझा सत्यवर्मा जाणू ॥ तुटला आहे निर्लोभ होऊन ॥ कैसें सोडूनि मज जातां ॥७२॥

अहा महाराजा तुम्हासाठी ॥ सर्व सोडूनि भांडारकोटी ॥ जनकजननींची पाडूनि तुटी ॥ जोड केली म्यां तुमची ॥७३॥

तरी आतां मज सोडून ॥ तुम्ही जातां निढळवाणे ॥ मातें करोनि दीनपण ॥ योग्य तुम्हां दिसेना ॥७४॥

ऐसें बोलता सत्यवती ॥ हदयीं धरी सरोचन पती ॥ चुंबन घेऊन अश्रु वाहती ॥ पुसोनियां वदतसे ॥७५॥

ऐके युवती शुभाननी ॥ तुज स्मरण होतां माझें मनीं ॥ त्याच वेळां उतरुनि अवनीं ॥ भेटी देईन तूतें गे ॥७६॥

ऐसें देऊनि भाष्यउत्तर ॥ शांतविले युवतीअंतर ॥ मग आरोहूनि विमानावर ॥ कमठास पुसोनि निघाला ॥७७॥

सत्यवतीचा धरुनि तैं हस्त ॥ कमठा ओपूनि मोहित ॥ म्हणे तनयाचा मम सांप्रत ॥ सांभाळ करी महाराजा ॥७८॥

ऐसें वदोनि सुरोचन ॥ पाहता झाला शुक्रस्थान ॥ येरीकडे बाळ तान्हें ॥ वयवर्धन होतसे ॥७९॥

दिवसानुदिवस होता थोर ॥ सप्तवर्षी झाला कुमार ॥ मग मुलांसीं खेळता झाला सत्वर ॥ राजचिन्हीं खेळतसे ॥८०॥

ऐसें खेळतां मुलांत ॥ द्वादश वर्षे लोटलीं त्यांत ॥ ईषें पडोनि बाळखेळांत ॥ विद्येलागीं लागला ॥८१॥

विद्या तरी सहजचिन्हीं ॥ शास्त्रआधार अश्वारोहणी ॥ सहज सेवकाश्रयेंकरुनी ॥ विद्येलागीं अभ्यासी ॥८२॥

सहज मग तों विद्येकारणीं ॥ ओळखी पडली राजांगणीं ॥ राजमंडळी सर्व प्राणी ॥ विक्रमातें ओळखिती ॥८३॥

पुढें षोडश वर्षांवरुते ॥ इष्टत्वें भेटविंला विक्रमगयागें ॥ पाइक चाकरी अर्पूनि यातें ॥ ग्रामरक्षणी ठेविले ॥८४॥

ग्रामरक्षण दरवाजावरती ॥ पहारा गाजवूनि गाजवी राती ॥ तों व्यवसायी बाजारक्षितीं ॥ तेथें येऊनि राहिले ॥८५॥

तयांमाजी भर्तरीनाथ ॥ वनचरसावजी भाषा जाणत ॥ कोल्हे भुंकतांचि अकस्मात ॥ भाषा सांगे तयांची ॥८६॥

म्हणे उत्तरदिशेहूनि दानव ॥ निर्बळपणीं होऊनि मानव ॥ दक्षिणादिशेचा धरुनि गौरव ॥ जात आहे पांथिक तो ॥८७॥

तरी त्याच्या सामोरें जाऊन ॥ वधील कोणी तयाकारण ॥ वधिल्या ग्रामद्वारा पूर्ण ॥ रुधिरटिळा रेखावा ॥८८॥

आणि दुसरें आपुलें भाळा ॥ तेचि क्षणीं रेखिजे टिळा ॥ तो अवंतिका उत्तमस्थळा ॥ नृपत्वातें मिरवेल ॥८९॥

ऐसी ऐकतां भर्तरीवाणी ॥ विक्रम जातसे शस्त्र घेऊनी ॥ येथपर्यंत कथा रंजनी ॥ पूर्व अध्यायीं वदलीसे ॥९०॥

तरी श्रोते बुद्धिवान ॥ पाहती सिंहावलोकन ॥ चित्रमा गंधर्व शापोन ॥ राक्षसदेहीं मिरवला ॥९१॥

मिरवला परी शापमोचन ॥ बोलला वरदें शाप सघन ॥ तों ती घडी निटावून ॥ रांगत फिरत ये वेळा ॥९२॥

तरी शापवचनीं शापमोचन ॥ शिववरदें शाप सघन ॥ बोलिला असे त्रिनयन ॥ कीं शापें गंधर्व सुरोचन राहिला कीं ॥९३॥

तयाच्या वीर्येकरोन ॥ निर्माण होईल विक्रमनंदन ॥ त्याच्या हस्तें पावोनि मरण राक्षसशरीरा सांडसी तूं ॥९४॥

ऐसा उःशाप शिववरदॆंसी ॥ होतां चित्रमा गंधर्वासी ॥ तो समय भर्तरीवागुत्तरासी ॥ येवोनियां झगटला ॥९५॥

असो ही मागील कथा ॥ विक्रम भर्तरीचे शब्द ऐकतां ॥ शस्त्र सज्जोनि समोरा पंथा ॥ चित्रमा गंधर्वा होतसे ॥ ॥९६॥

तंव चित्रमा गंधर्व ॥ राक्षसापरी करोनि भाव ॥ मानवरुप धरुनि स्वभावें ॥ येत आहे पांथिक तो ॥९७॥

येत आहे परंतु चार ॥ अमूल्य रत्नें तेज अपार ॥ मुष्टीं घेऊनि राक्षस थोर ॥ मानववेषें गमतसे ॥९८॥

तों विक्रम जाऊनि तया निकटीं ॥ शस्त्रविद्येतें विपुल जेठीं ॥ सामोरा होऊनि मौळीं दृष्टीं ॥ असीलतेसी प्रेरीतसे ॥९९॥

सकळ प्रहार भेदितां घायीं ॥ राक्षस उलथोनि पडला महीं ॥ प्राण कासावीत होऊनि देहीं ॥ पडत झाला तत्काळ ॥१००॥

महीं पडतां चित्रमा गंधर्व ॥ विक्रम प्रज्ञावान प्रसिद्ध ॥ वस्त्रें भिजवूनि रुधिरें शुद्ध ॥ भाळीं टिळा रेखिला ॥१॥

तों राक्षस होऊनि गतप्राण ॥ दिव्यदेहीं निघे तेथून ॥ गंधर्वरुपीं स्वपदा पात्रोन ॥ विक्रमातें वंदिलें ॥२॥

मग गंधर्व करितां स्वयें दृष्टी ॥ विमान उतरले महीतळवटीं ॥ त्यांत आरोहण करितां जेठीं ॥ विक्रम पुसे तयातें ॥३॥

म्हणे महाराजा राक्षस पूर्ण ॥ स्वर्गा करुं जासी गमन ॥ ही तों कळा राक्षसांकारण ॥ दुर्लभपणीं वाटतसे ॥४॥

मग शिवफांसेखेळापासून ॥ विक्रमा सांगितलें शापकथन ॥ आपुलें चित्रमा गंधर्व नाम ॥ सांगूनि गेला स्वस्थाना ॥५॥

येरीकडे प्रेतशरीरीं ॥ चाचपूनि पाहे करीं ॥ तों चार रत्नें मुष्टीमाझारी ॥ तेजःपुंज देखिलीं ॥६॥

तिघे चिंतामणी वैडुर्यवंत ॥ सकळ कामद चवथें अत्यदभुत ॥ ऐशीं चारी रत्नें विख्यात ॥ सकळ कार्या चालती ॥७॥

विक्रम देखतां हर्षवंत ॥ मग तो भर्तरी धन्य म्हणत ॥ ऐसा पुरुष प्रज्ञावंत ॥ अवतारदक्ष म्हणावा ॥८॥

जैसा वृक्षांत कल्पतरु ॥ दैन्यहारी सुखपरु ॥ तन्न्यायें नगरांत हा नरु ॥ श्रेष्ठ जगीं भासतसे ॥९॥

कीं पशूमाजी धेनुजाती ॥ त्यांत सुरभी कामना द्रवती ॥ तन्न्यायें मनुष्यजातीं ॥ श्रेष्ठ जगीं भासतसे ॥११०॥

कीं रत्नामाजी वैडूर्यवंत ॥ निघती चिंतामणी उपकारस्थित ॥ तन्न्यायें मनुष्यांत ॥ श्रेष्ठ जगीं भासतसे ॥११॥

कीं पाषाणजाती उपकारस्थित ॥ परीसपणातें मिरवत ॥ तन्न्यायें मनुष्यांत ॥ श्रेष्ठ जगीं भासतसे ॥१२॥

ऐशी भावना धरुनि चित्तीं ॥ आणिक कामना वरीतसे पुढती ॥ ऐसा पुरुष स्वसांगाती ॥ त्रैलोक्यांत मिरवेल ॥१३॥

ऐसा विचार मार्गे करुन ॥ पाहता झाला द्वारग्राम ॥ रुधिरटिळा द्वारासी उत्तम ॥ चर्चूनियां निघाला ॥१४॥

ऐसा निघूनि अतित्वरा ॥ आला व्यवसायिक शिबिरा ॥ तंव ते भर्तरीस घालूनि घेरा ॥ सकळ बैसले वेष्टुनी ॥१५॥

त्यांत जाऊनि मध्यस्थानीं ॥ बैसला व्यवसायिकांत गुणी ॥ परी बैसल्या दिसे तरणी ॥ कीं नक्षत्रस्वामी नक्षत्रांत ॥१६॥

त्याचि रीती भर्तरीनाथ ॥ कीं चंद्रज्योती तेजवंत ॥ असो व्यवसायिक विक्रमातें ॥ पुसती कोण तुम्ही जी ॥१७॥

येरी म्हणे व्यवसायिक ॥ आम्ही असों राजसेवक ॥ राजआज्ञे ग्रामरक्षक ॥ देशावरी नांदतसों ॥१८॥

तरी सहजस्थितीं मनाची ओज ॥ तुम्हा भेटीस पातलों सहज ॥ उत्तम तुमच्या गोष्टी गुज ॥ ऐकूनिया हर्षलो ॥१९॥

येरी म्हणे आमुच्या गोष्टी ॥ उत्तम कोणत्या ऐकिल्या जेठी ॥ विक्रम म्हणे तुम्हां दृष्टी ॥ सन्मुख पहारा देतसें ॥१२०॥

तुम्ही खालीं मी कुशवती ॥ निकट पाहारा देतो रात्रीं ॥ तुम्ही बोलतां तितुकें निगुर्ती ॥ श्रवण होतसे आम्हातें ॥२१॥

परी हें आतां असो कैसी ॥ तुम्हांवरी आली धाडी आली विशेंषीं ॥ ते श्रुत झाली कैसी तुम्हांसी ॥ म्हणोनि शोधा पातलों ॥२२॥

तुम्हांवरी आली धाडी ॥ हे राया सकळ कळली प्रौढी ॥ परी तुमच्या मुखीं कळतां निवाडी ॥ रक्षण करु तैसेंचि ॥२३॥

तरी ते तुम्ही दृष्टिव्यक्ती ॥ तस्कर पाहिले किती जमाती ॥ येरी म्हणती एकशती ॥ दृष्टीगोचार झाले जी ॥२४॥

विक्रम म्हणे तस्कर येतां ॥ कैशी कळली तुम्हां वार्ता ॥ येरी म्हणे कोल्हे भुंकतां ॥ वर्णन केलें या वाचे ॥२५॥

स्वहस्तानें उठवून ॥ भर्तरीसी दाखविती तया लागून ॥ येरी म्हणे नामीं कोण ॥ मिरवत आहे हा बावा ॥२६॥

व्यवसायिक म्हणती त्यातें ॥ भर्तरी नाम आहे त्यातें ॥ मग दृष्टी पाहूनि प्रांजळवंत ॥ पूर्ण ओळखी जाहली ॥२७॥

क्षणैक बैसवूनि नाना भाषण ॥ व्यवसायिकांचे तोषवी मन ॥ मग उठता झाला त्यांपासून ॥ चालतां ग्रामीं संचरला ॥२८॥

तैसाचि जाऊनि आला एकांतीं ॥ भेट झाली जकात्याप्रती ॥ तंव मागिल्या घटकाराती ॥ सदनाबाहेर येतसे ॥२९॥

उदकपात्र विराजलें हातीं ॥ जात होता दिशेप्रती ॥ तो हटकूनि बैसविला क्षितीं ॥ वदे त्यातें रसज्ञ ॥१३०॥

म्हणे आपुले ग्रामी कटक ॥ वृषभथाटी व्यवसायिक ॥ तयांचें जकातीनाणें देख ॥ हिशेबातें घेतलें ॥३१॥

तरी त्या वर्तली नाणीं ॥ मी देईन त्रैअर्थगुणी ॥ तरी भर्तरी नामीं तया पैं रत्नीं ॥ मागूनि घ्यावें महाराज ॥३२॥

म्हणाल भर्तरी नामें कोण ॥ तरी मम बंधू पाठीचें रत्न ॥ कार्यविभक्त आत्मा होऊन ॥ व्यवसायिकां हिंडतसे ॥३३॥

तरी तयाचें आमुचें संगोपन ॥ केलिया थोर वाढेल धर्म ॥ आणि पुण्याचा स्थावर संगम ॥ परलोकातें मिरवेल ॥३४॥

ऐशा बहुप्रकारयुक्ती ॥ सांगूनि जकातदाराप्रती ॥ हें ऐकूनि म्लानितमती ॥ द्रव्यलोभें तोषला ॥३५॥

द्रव्यलाभ तरी कैसा ॥ त्रिगुणार्थ होता ऐसा ॥ मग मेलिया जेवीं जात ठसा ॥ संजीवनी होऊनि आगळा ॥३६॥

तरी द्रव्य न म्हणावें अमृतवल्ली ॥ निर्जीव मनुष्यासी संजीवनी ठेली ॥ आणि दुसरा मार्ग तयाजवळी ॥ मायिकपर्णी विराजे ॥३७॥

तरी धनाचे बहु भास ॥ वर्ते सुखदुःखा लेश ॥ धनकांता धवळार सुरस ॥ सर्वसुखा संपादी ॥३८॥

धनें मोक्षाची पाहील वाट ॥ धनें भोगील महीपाठ ॥ धनोंचि नरक भोगील अचाट ॥ यमपदा जाऊनी ॥३९॥

धनाचा अपार तमास ॥ सुसंग कुसंग खेळे फांसा ॥ सर्व यशकर्ता सबळ पैसा ॥ इष्टा नष्टा वर्ततसे ॥१४०॥

असा जयास विक्रम बोलतां ॥ जकाती सहज आला होता ॥ म्हणे विक्रमा ते कामदुहिता ॥ पूर्ण करीन मी तुझी कीं ॥४१॥

ऐसें बोलूनि करतळवचन ॥ देऊनि तोषविले तयाचें मन ॥ मग विक्रमातें बोळवून ॥ शौचविधि सारिला ॥४२॥

सकळ झालें एकांतीं करणें ॥ सेविता झाला आपुलें आसन ॥ मग भृत्यांलागीं बोलावून ॥ व्यवसायिकां पाचारिलें ॥४३॥

गोण्या माल टिपी लावून ॥ हिशेबापरी बोलूनि धन ॥ तंव तें व्यवसायिक आणून ॥ तयां करीं ओपीतसे ॥४४॥

यापरी बोले जकाती ॥ म्हणे व्यवसायिक ऐका युक्ती ॥ भर्तरी नामें कोण जमाती ॥ तुम्हांमाजी आहे रे ॥४५॥

येरी म्हणती उगलाचि पोसोनी ॥ आहे आमुचे मंडळांगणीं ॥ जकाती म्हणे आमुच्या नयनीं ॥ कैसा आहे पाहूं द्या ॥४६॥

तंव त्यातें पाचारुनि ॥ दाविते झाले विमुटखाणी ॥ म्हणती हाचि आमुच्या गणी ॥ विराजित आहे महाराजा ॥४७॥

मग जकाती पाहूनि भर्तरीसी ॥ म्हणे हा प्रत्यक्ष महीचा शशी ॥ कोणी तरी अवतारासी ॥ महीलागी विराजला ॥४८॥

तरी आतां असो कैसें ॥ हा आपुल्या गांवांत असाचा पुरुष ॥ व्यवसायिक रानमाणूस ॥ या गणीं योग्य दिसेना ॥४९॥

ऐसा तर्क आणूनि मनीं ॥ बोलविलाहे पाहूं नयनीं ॥ मग व्यवसायिकांचा मुख्य स्वामी ॥ एकांतांत पैं नेला ॥१५०॥

एकांतीं नेतां म्हणे व्यवसायांतें ॥ तुमचे द्रव्य देऊं तुम्हांतें ॥ माफीचिठी करुनि जी त्वरित ॥ तुम्हालांगी बोळवूं ॥५१॥

तरी पुन्हां परतोन ॥ माल आणा सबळ भरुन ॥ तोंबरी तुम्हांसवें ठेवून ॥ ग्रामवस्ती येथें असावें ॥५२॥

म्हणशील तरी निराश्रित ॥ पोतें ठेवूनि नाही जात ॥ बाकी साकी येणे आम्हांतें ॥ गांवामाजी उरली असे ॥५३॥

तरी सकळ हिशेबप्रकरण ॥ माहीत आहे जकात्याकारण ॥ तरी त्यापाशीं शेर घेउन ॥ तयासंमती वर्तावें ॥५४॥

मग अवश्य म्हणे भर्तरीनाथ ॥ राहीन म्हणे सर्वासंमतें ॥ देणें घेणें सकळार्थ ॥ उकळोनि येईन माघारा ॥५५॥

ऐसें म्हणोनि त्वरा करीत ॥ व्यवसायी घेवोनि भर्तरीतें ॥ येऊनि शीघ्र जकातगृहातें ॥ तयाहातीं बोळविलें ॥५६॥

ओपिलें परी कैसें बोलून ॥ कीं तुमचे गृहीं आमुचा गडी जाण ॥ ग्रामावळीतें वसूल करुन ॥ जकात तुमची सांबरील ॥५७॥

आम्ही येऊं पुन्हां परतोन ॥ तोंबरी करा त्याचें संगोपन ॥ आपुलें द्रव्य घ्या फेडून ॥ उरल्या हातीं या ओपा ॥५८॥

ऐसें बोलूनि तया देखती ॥ ओपिते झाले जकाती हातीं ॥ उत्तम भाषन पुसूनि तयाप्रती ॥ शिबिरातें पातले ॥५९॥

मालटाल उरला विकून ॥ निघते झाले मग तेथून ॥ येरीकडे विक्रमाकारण ॥ पाचारिलें जकात्यानें ॥१६०॥

नेऊनि तया एकांतासी ॥ म्हणे केलें सांगितल्या व्रतासी ॥ मग हिशेब दाखवूनि बेरजेसी ॥ द्रव्य आणीं म्हणतसे ॥६१॥

ऐसें बोलतां अकाती वचन ॥ तों काढूनि देतसे एक रत्न ॥ म्हणे हें तुजपाशीं असूं दे गहाण ॥ संजायितपणासी ॥६२॥

तुझें द्रव्य त्रैभाग्यार्थे ॥ देऊनि घेऊं स्वरत्नातें ॥ ऐसें वदतां जकात्यातें ॥ अवश्यपणी होतसे ॥६३॥

याउपरी भर्तरीनिमित्यें ॥ म्हणे बंधूचे ओळखीतें ॥ न बोलुनि कांहीच त्यातें ॥ भोजना पाठवा मम गृहीं ॥६४॥

नित्य नित्य भोजनीं गांठ ॥ पडतां होईल ओळखी दाट ॥ मग सहज बोलण्याचा मेहपाट ॥ खुणाखुण मिळेल कीं ॥६५॥

बाहेर निघाले उभयतांतें ॥ ऐसे सांगूनि एकांतातें ॥ मग जकाती पाहूनि भर्तरीतें ॥ विक्रमातें बोलतसे ॥६६॥

म्हणे विक्रमा ऐक वचन ॥ आम्हांपासूनि शेर घेऊन जाणें ॥ तयाची पाकनिष्पत्ती करुनि जाण ॥ हा गडी आमुचा संगोपा ॥६७॥

तुझ्या गृहीं तुझी माता ॥ आहे विक्रमा पाकनिष्पत्तीकरितां ॥ तरी या भर्तरीचें आतां ॥ संगोपन करावें ॥६८॥

ऐसें विक्रम ऐकतां वचन ॥ म्हणे स्वीकारीन तुमचे बोलणें ॥ मग भर्तरीचा हात धरुन ॥ स्वसदनासी पैं नेला ॥६९॥

द्वारानिकटीं टाकूनि वसन ॥ त्यावरी बैसविला भर्तरीरत्न ॥ चार घटिका करुनि भाषण ॥ गृहामाजी संचरला ॥१७०॥

माता पाचारुनि सत्यवती ॥ निकट बैसवूनि एकांती ॥ तर्जनीखुणेनें दाखवूनि जती ॥ वृत्तांत सर्व सांडतसे ॥७१॥

जंबुकबोल भाष्यापासून ॥ तीतें सांगितले सकळ कथन ॥ स्वकरीं मिरवला लोभिक रत्न ॥ तोही धीट पैं केला ॥७२॥

ऐसियेपरी धीट होतां संतोष मानी सत्यवनी मात ॥ उपरांत विक्रम झाला सांगता ॥ भर्तरीविषयीं वचनातें ॥७३॥

म्हणे माते मजहूनि अधिक ॥ भर्तरीचे मानी स्नेह दोंदिक ॥ पूर्ण अवतारीक पाठीरक्षक ॥ पुढें मातें होईल गे ॥७४॥

तरी आतां दुसरा सुत ॥ ज्येष्ठपणी मिरवेल लोकांत ॥ अणुरेणूइतुकें यांत ॥ भिन्न पडूं नेदीं की ॥७५॥

सकळ मोहाची करुनि गवसणी ॥ लेववीं भर्तरीशरीरालागूनी ॥ आणि तो वर्तेल स्वइच्छापणी ॥ तैसे वर्तू दे त्यासी कीं ॥७६॥

ऐसें सांगूनि मातेप्रती ॥ पुन्हां बाहे आला विक्रमनृपती ॥ तों पाकसिद्धि होतांचि त्याप्रती ॥ भोजनातें सारिलें ॥७७॥

भोजन झालिय सवें जाऊन ॥ पाहता झाला दुर्गमस्थान ॥ मग चार घडी रात्री होऊन ॥ अनुवादिलें रजनीतें ॥७८॥

यापरी भर्तरी तेथून ॥ पाहता झाला जकातीस्थान ॥ जकातदार त्यातें देखून ॥ भर्तरीते बोलतसे ॥७९॥

म्हणे भर्तरीराव ऐका वचन ॥ तुम्हीं असावें सदन धरुन ॥ कार्यालागतां पाचारुन ॥ घेत जाऊं तुम्हांसी ॥१८०॥

मग अवश्य म्हणोनि भर्तरीनाथ ॥ विक्रमसदना पुन्हां येत ॥ मग दिवसानुदिवस ते वस्तींत ॥ मोहपूरी लोटला ॥८१॥

आधींच माय ती सत्यवती ॥ त्यावरी पुत्राची ऐकोनि युक्ति ॥ परम मोहातें भर्तरी जती ॥ गुंडाळूनि घेतला ॥८२॥

जैसा उदकाविण मत्स्य होत ॥ तळमळ करी होतां विभक्त ॥ कीं धेनूलागीं वत्स नितांत ॥ विसर कदा घडेना ॥८३॥

तन्न्यायें मग त्रिवर्ग जण ॥ मोहे वेष्टिले हरणीकारण ॥ एकमेकांच्या दृष्टीविण ॥ विरह होतां तळमळती ॥८४॥

असो ऐसी मोहस्थिति ॥ बंधूपणें जगीं मिरवती ॥ यावरी पुढें आतां श्रोतीं ॥ अवधान द्यावें कथेंतें ॥८५॥

नरहरवंशीं धुंडीनंदन ॥ पुढिलें अध्यायीं सांगेल कथन ॥ कवि मालू नामाभिधान ॥ सेवक असे संतांचा ॥८६॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ षडविंशति अध्याय गोड हा ॥१८७॥

॥ नवनाथभक्तिसार षडविंशतितमोध्याय समाप्त ॥


श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय २७

श्रीगणेशाय नमः

जयजयाजी जगदुद्धारा ॥ विश्वव्यापका विश्वंभरा ॥ जगसृजित्या करुणाकरा ॥ दिगंबरा आदिपुरुषा ॥१॥

पूर्णब्रह्म सनातना ॥ पंढरीअधीशा रुक्मिणीरमणा ॥ पुढें ग्रंथरचनामहिमाना ॥ बोलवीं कां महाराजा ॥२॥

मागिले अध्यायीं निरुपण ॥ भर्तरी आणि दुजा विक्रम ॥ प्रेमसागरीं भक्ति प्रेम ॥ उभय सरिता लोटल्या ॥३॥

मग ते उभयतां एक दुर्गी ॥ ग्रास रक्षिती एक प्रसंगीं ॥ तों एके दिवशीं शुभमार्गी ॥ दैव उदया पातलें ॥४॥

मोक्षपुर्‍या असती सप्तम ॥ तयांतील तें अवंतिका ग्राम ॥ तेथील नृपति नरेंद्रोत्तम ॥ शुभविक्रम विराजे ॥५॥

तया जठरीं ती सूक्ष्म वेली ॥ सकळ देहीं संचार पावली ॥ पावली परिभवें परतली ॥ संभव तो न ये सांगावया ॥६॥

ऐसी कन्या असें उदरीं ॥ तीही धाकुटी बरवंटावरी ॥ कीं लवणाब्धीची लहरी ॥ मदनबाळी शोभतए ॥७॥

नाम जियेचें सुमेधावती ॥ तीक्ष्णबुद्धि असे युवती ॥ परी चंद्रकला नक्षत्रज्योती ॥ सांग स्वरुपीं मिरवतसे ॥८॥

तंव कोणे एके दिवशीं ॥ बैसली होती रायापाशीं ॥ रायें परम लालनेसी ॥ अंकावरी घेतली ॥९॥

परम सौंदर्य मुखमंडन ॥ रायें कवळुनि घेतलें चुंबन ॥ उपरी कल्पने वेधले मन ॥ वराविषयीं ॥१०॥

मग सुमति मंत्री पाचारुनी ॥ बोलता झाला शुभविक्रम वाणी ॥ म्हणे सुमेधावती मम नंदिनी ॥ उपवर ती दिसतसे ॥११॥

तरी इतुके स्वामित्वपण ॥ पुरुष योजावा दिव्यरत्न ॥ यावरी मंत्री बोले वचन ॥ राजउक्ती ऐकूनियां ॥१२॥

म्हणे महाराजा सुरतयोग ॥ जराव्यापक सर्वाग ॥ ऐसिया काळीं विषयरंग ॥ सरसावला तुम्हांतें ॥१३॥

उदरीं नाहीं वंश संतती ॥ जरा व्यापिली शरीराप्रती ॥ तरी कामना एक वेधली चित्तीं ॥ सुमेधावतीकडूनियं ॥१४॥

तरी स्वआत्मजा लावण्यराशी ॥ दावितों पहा जया वरासी ॥ त्यांते स्थापूनि राज्यासनासी ॥ करावें सुरत वैभवातें ॥१५॥

मग तो वर जामातसुत ॥ उभयपणीं या जगांत ॥ मिरवूनि जरेतें सकळ हित ॥ संगोपील तुम्हांसी ॥१६॥

तरी ऐसिये मम वचन ॥ सिद्धार्थ करा आपुलें मन ॥ तरी सुत घ्यावा कन्या देऊन ॥ पुढिलिया सुखातें ॥१७॥

ऐसें मंत्री बोलतां वचन ॥ मान तुकावी शुभविक्रम ॥ म्हणे अवश्य ऐसोंचि करणें ॥ योजिलिया अर्थातें ॥१८॥

तरी प्राज्ञिक एक यांत ॥ गोष्ट सुचली आहे मातें ॥ आधीं योजूनि अधिकारातें ॥ वरी जामात मानवावा ॥१९॥

तरी प्राज्ञिक करावें ऐसें ॥ समारंभीं गजशुंडेस ॥ माळ ओपूनि राज्यासनास ॥ स्वामित्वपणीं मिरवावें ॥२०॥

मग तो सहज ईश्वरीसत्तें ॥ लोकांत मिरवेल महीपती ॥ कन्या अर्पूनि उपरांतीं ॥ सर्वसुखा ओपावें ॥२१॥

ऐसें बोलतां शुभविक्रम नृपती ॥ तेंचि मानलें मंत्रिकाप्रतीं ॥ मग शुभमाळा मंडपक्षितीं ॥ महोत्सव मांडिला ॥२२॥

पाहूनि दिन सुदिन मास ॥ उभारिलें मंडपास ॥ गुढ्या तोरणें पताकांस ॥ राजसदन शोभलें ॥२३॥

वस्त्राभरणीं कनककोंदणीं ॥ भूमीं मिरवला कुंजर रत्नी ॥ दिव्यमाळा शुंडी ओपूनी ॥ नगरामाझारी संचरला ॥२४॥

मागें मंत्री मानव विप्रांसहित ॥ चक्षुदीक्षा करी नृपनाथ ॥ तों दिव्यकुंजर घेऊनि माळतें ॥ नगरामाजी संचरला ॥२५॥

आधीं सभामंडपीचे जन ॥ दिग्गजें सर्व विलोकून ॥ उपरी नगरामाजी गमन ॥ करिता झाला कुंजर तो ॥२६॥

मग सकळ ग्रामीचे ग्रामजन ॥ पाहती ठाई ठाई उभे राहून ॥ तों ग्राम शोधीत दुर्गी येऊन ॥ विक्रमाते विलोकी ॥२७॥

गज येऊनि दुर्गानिकट ॥ उभा राहे न चाले वाट ॥ तो दुर्गी विक्रमासह हे अष्ट ॥ सेवाधारी असती कीं ॥२८॥

गज खुंटतां पाहे नृपती ॥ खालीं पाचारी अष्टांप्रती ॥ एकामागें एक उतरती ॥ दुर्गपाय‍र्‍या विशाळ ॥२९॥

तों सर्वामागूनि उतरतां विक्रम ॥ गज आनंदोनि धावे सप्रेम ॥ कुसुममाळा ग्रीवेलागून ॥ शुंडादंडे ओपिली ॥३०॥

माळा ग्रीवे ओपितां गज ॥ वाद्ये वाजती जाहले चोज ॥ गजस्कंधीं वाहूनि राज ॥ श्रृंगारमंडपी आणिला ॥३१॥

मग ओपूनियां कनकासन ॥ निकट रायें मंत्री बैसवून ॥ परी सहज चर्चा जातीलागून ॥ कुल्लाळशब्द निघाला ॥३२॥

तेणें करुनि राव चित्तीं ॥ कांहींसा झाला साशंकित ॥ मग मंत्रिका नेऊनि एकांती ॥ कुल्लाळशब्द दर्शवी ॥३३॥

म्हणें योजिल्या अर्थाप्रती ॥ भिन्न अर्पाया सुमेधावती ॥ आम्हां क्षत्रियां कुल्लाळजाती ॥ वर्ण भिन्न दिसतो हा ॥३४॥

ऐसें बोलता शुभविक्रमराव ॥ मंत्रांही व्यापिला संशयभावें ॥ परी तो सर्वज्ञ शोधार्णव ॥ राव घेऊनि वहिवटला ॥३५॥

सवें येऊनि मंडपाबाहेर ॥ त्या अष्ट सोबत्यां बोलावूनि बाहेर ॥ निकट बैसवूनि जातीविचार ॥ पुसतां झाला तयांसी ॥३६॥

ते म्हणती नेणों कोण जाती ॥ कुल्लाळ म्हणती विक्रमाग्रतीं ॥ परी याचा शोध कुल्लाळजातीं ॥ कवणालागीं पुसवा ॥३७॥

मग तो मंत्री परस्परें ॥ कमठा पाचारुनि वागुत्तरें ॥ एकांतीं नेऊनि परम आदरें ॥ जातिवृत्तांत पुसतसे ॥३८॥

मग तों कमठ मुळापासून ॥ सांगता झाला विक्रमकथन ॥ माता क्षत्रियकुळीं सत्यवर्म ॥ मिथुळापतीची दर्शवी ॥३९॥

याउपरी पिता सुरोचन ॥ दर्शवी स्वर्गीचे गंधर्वरत्न ॥ ऐसें ऐकतां वर्तमान ॥ मंत्री तोषमान होतसे ॥४०॥

मग कमठासी नेऊनि रायासमोर ॥ तेथेंही वदविलें वागुत्तर ॥ रावही ऐकूनि तें उत्तर ॥ परम चित्तीं तोषला ॥४१॥

तोषूनी मंत्रिका पुन्हा बोलत ॥ मंत्री म्हणे कमठ घेऊनि आंत ॥ मीच जातों महाराज्यांत ॥ तरी पाचरण पाठवा सत्यवर्म्यातें ॥४२॥

अवश्य म्हणे शुभविक्रमनृपती ॥ बोळविता झाला मंत्रिकाप्रती ॥ मग कमठ आणि मंत्री सुमती ॥ मिथुळेलागीं पातले ॥४३॥

राये सत्यवर्मे ऐकून ॥ सदनीं नेलें गौरवून ॥ मग कमठ मंत्री सत्यवर्म ॥ एकांतासी बैसले ॥४४॥

ते एकांती कमठ विचार ॥ सांगता झाला सविस्तर ॥ कीं सत्यवतीचें उदेलें जठर ॥ विक्रमफळ मिरवलें ॥४५॥

तरी आतां दैवेंकरुन ॥ पौत्रा लाभलें राजचिन्ह ॥ तरी संशयद्रुम आपण चालून ॥ मुळापासूनि खुडावा ॥४६॥

ऐसी सांगूनि सकळ कथा ॥ योगक्षेमाची सांगितली वार्ता ॥ स्वर्गवास गंधर्वजामाता ॥ झाल्यासह कथियेलें ॥४७॥

रायें ऐकूनि सकळ विस्तार ॥ चित्तसरिते आनंदपूर ॥ दाटोनि पृतनेसह संभार ॥ शुभविक्रमसंगमीं मिळाला ॥४८॥

भेटून सत्यवतीतें ॥ सकळ पुसूनि वृत्तांतातें ॥ मग शुभविक्रमरायाचे चित्तीं ॥ अंतीं पांग फिटला ॥४९॥

याउपरी सुघोषमेळी ॥ विक्रम अभिषेकिला राज्यनव्हाळीं ॥ मग राज्यपदीं तयें काळीं ॥ बैसविला महाराजा ॥५०॥

छत्रचामरें माथां मिरवती ॥ तें राज्यासनीविक्रम नृपति ॥ गहिंवरोनि तोषविला प्रजापती ॥ याचकां धन वांटिलें ॥५१॥

ऐसा समारंभ झालियापाठीं ॥ मग सुमेधा अर्पिली गोरटी ॥ तोही आनंद महीपाठीं ॥ मंगलाचा भिरवला ॥५२॥

यापरी सत्यवर्म ॥ परम संस्काराचा आनंद घेऊन ॥ आपुलें राज्य विक्रमा देऊन ॥ उचित आनंद संपादीत ॥५३॥

सत्यवतीउदरींचे रत्न ॥ राज्य ओपिले तया आंदण ॥ उभयराज्यीं सार्वभौम ॥ विक्रमनृपति मिरवला ॥५४॥

असो ऐसी वहिवाट करुन निघता झाला सत्यवर्म ॥ येरीकडे राव विक्रम ॥ भर्तरीतें ओपी युवराज्या ॥५५॥

मग उभय बंधु समाधानीं ॥ राज्य करिती अवंतिकास्थानीं ॥ तों सुमंत मंत्रिका एके दिनीं ॥ अर्थ एक सूचला ॥५६॥

कीं आपुली कन्या पिंगला ॥ देऊं राया भर्तरीला ॥ मग विक्रमा पुसूनि सोहळा ॥ शुद्ध तिथि लग्नाची ॥५७॥

परी ते तेथें विक्षेप आला अवचिता ॥ कुटाळ मिळाला रजक तत्त्वतां ॥ मंत्रिका आराटूनि सांगे वार्ता ॥ शोध करा जातीचा ॥५८॥

ऐसें बोलतां रजक त्यातें ॥ पुन्हां बोलविलें कमठकुल्लाळातें ॥ त्यातें पुसतां सविस्तर तें ॥ कुल्लाळ म्हणे श्रुत नाहीं ॥५९॥

मग सत्यवतीतें विचारीत ॥ भर्तरी तुमचा कैसा सुत ॥ तीही म्हणे उदरव्यक्त ॥ भर्तरी नव्हे माझा कीं ॥६०॥

ऐसी ऐकूनि तयाची उक्ती ॥ विक्रमा विचारी मंत्री सुमती ॥ तोही म्हणे नेणों जाती ॥ बंधु मानिला भावार्थे ॥६१॥

ऐसें बोलतां राव विक्रम ॥ संशयीं पडला मंत्री सुगम ॥ मग भर्तरीस पुसता झाला वर्म ॥ प्रांजळ सांगे भर्तरी ॥६२॥

मित्रावरुणीरेतापासून ॥ वनांतरीं वाढलों हरिणीपासून ॥ भाटसंगतीं व्यवसायादि करुन ॥ सकळ कथन निरुपिलें ॥६३॥

परी मंत्रिका न पडे विश्वास ॥ चित्तीं म्हणे स्वकार्यास ॥ ऐसें भाषण करीतसे विशेष ॥ सत्य केवीं मानावें ॥६४॥

तरी आतां असो कैसें ॥ हा म्हणवितो मित्रपिता आम्हांस ॥ तरी याचे हस्तें मित्रावरुणीस ॥ कार्यालागीं पाचारावें ॥६५॥

ऐसें मंत्री चित्तीं योजूनी ॥ म्हणे तुमचा पिता मित्रावरुणी ॥ तरी स्वमंगलातें बोलावूनी ॥ आम्हां दृष्टीं दाखवा ॥६६॥

भर्तरी असे तुमची माता ॥ तरी ती झाली विगलिता ॥ परी लग्नविधातें आपुला पिता ॥ सोहळा घेऊनि पाचारा ॥६७॥

ऐसें बोलतां मंत्री त्यातें ॥ म्हणे अघटित काय यातें ॥ मग उभा राहूनि अंगणातें ॥ ऊर्ध्वदृष्टीं करीतसे ॥६८॥

म्हणे मित्रावरुनी मम ताता ॥ हा देह असेल तव रेता ॥ तरी मज बाळाची धरुनि आस्था ॥ मंगलासी येई कां ॥६९॥

ऐसे बोलूनि दीर्घवाणीं ॥ घ्यान करीतसे आपुलें मनीं ॥ हें जाणवलें अंतःकरणीं ॥ मित्रावरुणीच्या तेधवां ॥७०॥

मग वातचक्रीं आगमन ॥ अवंतीनगरीं स्वतां येऊन ॥ बोलता झाला मंत्रिकालागून ॥ शुभविक्रम रायाच्या ॥७१॥

म्हणे मंत्रिका सर्व सुमूर्ती ॥ सकळ संशयाची सांडी भ्रांती ॥ मम सुता विवाहाप्रती ॥ कन्यादान ओपी कां ॥७२॥

म्हणसील जरी मंगळा निक ॥ वराचा सिद्ध असावा जनक ॥ तरी पुष्पवृष्टि मंगळघोष ॥ सुरवरां हातीं करवीन ॥७३॥

याउपरी राया विक्रमाच्या तातातें । सुरोचन गंधर्वा पाठवीन येथें ॥ सकळ संशय सांडूनि त्वरितें ॥ सुखें द्यावी पिंगला ॥७४॥

म्यां जरी यावें मृत्युभूमीं ॥ तरी दाहतील बहुत प्राणी ॥ तस्मात् सकळ संशय सोडोनी ॥ पिंगला अर्पी मम सुता ॥७५॥

ऐसें तन्मुखींचें ऐकूनि वचन ॥ परितोषलें मंत्रिकाचें मन ॥ सकळ संशयातें सांडून ॥ लग्नसोहळा मांडिला ॥७६॥

मग नेमिल्या तिथीस सीमांतपूजन ॥ ते संधींत उतरला गंधर्व सुरोचन ॥ स्वकांता सत्यवतीसी भेटून ॥ विक्रमांते पाचारी ॥७७॥

विक्रम येऊनि त्वरितात्वरित ॥ तातचरणीं माथा ठेवोत ॥ मग बोलावूनि सुमंत्रिकातें ॥ सुरोचनातें भेटवी ॥७८॥

असो सुरोचन गंधर्वपती ॥ दिव्यतेजे पाहूनि क्षितीं ॥ अतिनम्र होऊनि चित्तीं ॥ निकट बैसे गंधर्वी ॥७९॥

निकट बैसतां सुरोचन ॥ म्हणे सुमति तूं दैववान ॥ प्रत्यक्ष धृमीनारायण ॥ सोयरा केला जामात ॥८०॥

अरे भर्तरीपुत्र अवतारदक्ष ॥ मित्रावरुणीचा अवतार प्रत्यक्ष ॥ तुवां जामात केला प्रत्यक्ष ॥ सकळ दैवां मिरवला ॥८१॥

ऐसें बोलतां सुरोचन ॥ पुन्हां वंदिता झाला चरण ॥ म्हणे मम भाग्य खरें उत्तम ॥ सोयरे झाले देव कीं ॥८२॥

तरी मी एक अर्थाअर्थी ॥ दैववान असें त्रिजगतीं ॥ तरी चलावें मंडपाप्रती ॥ करुं सीमांतपूजना ॥८३॥

अवश्य म्हणोनि सुरोचन ॥ मानववेषीं मंडपीं येऊन ॥ समारंभें करिती सीमांत पूजन ॥ करुनि विधि उरकिला ॥८४॥

वधूवरांतें आशीर्वाद देतां ॥ कुसुमें वर्षती स्वर्गदेवता ॥ अष्टके झालिया करतलहस्ता ॥ टाळी पिटिती आनंदें ॥८५॥

मग नाना वाद्यांचा गजर ॥ तेणें कोंदलें सकळ अंबर ॥ स्वर्गी गर्जती जयजयकार ॥ सुरवर विमानी बैसूनियां ॥८६॥

असो पांच दिवस उत्तम सोहळा ॥ नाना रत्नरंगमाळा ॥ सकळ तोषवूनि वर्‍हाळपाळा ॥ बोळविलें सुमतीनें ॥८७॥

याचकांसी अपार धन ॥ रायें बोळविलें देऊन ॥ एक मास गंधर्व सुरोचन ॥ तया ठायीं राहिला ॥८८॥

वरपिता मिरवला सुरोचन ॥ वरमाय सत्यवतीरत्न ॥ असो सकळां पुत्रसोहळामान ॥ सुमतीनें ओपिला ॥८९॥

यापरी एक मासाची अरुती ॥ सुरोचन तोषविला सहसत्यवती ॥ मग विचारुनि शुभविक्रमरायाप्रती ॥ स्वस्थानासी पैं गेला ॥९०॥

येरीकडे अवंतिकेंत ॥ दिवसेंदिवस लोटले बहुत ॥ पिंगला नामें स्वरुपवंत ॥ ऋतकाळ पावली ॥९१॥

मग उभयतां एकपणें ॥ सदा विचरती संतोषमनें ॥ याउपरी भर्तरीनें लग्नें केली अमूप ॥९२॥

द्वादश शत कामिनी करोनि ॥ सदा विचरे भोगासनीं ॥ परी मुख्य दारा पिंगला नामीं ॥ पट्टराणी मिरवत ॥९३॥

जैसा नवलक्ष नक्षत्रांत ॥ तेजें मिरवे नक्षत्रनाथ ॥ तेवीं द्वादश शतांत ॥ पिंगला नामें मिरवतसे ॥९४॥

असो युवराज्याच्या मंडणीं ॥ भर्तरी राणा मिरवे भूषणीं ॥ परी तयासमीप हिरकणी ॥ पिंगला मिरवे वैडूर्या ॥९५॥

कीं अर्का शोभवी रश्मिकिरण ॥ कीं घृतीं शर्करा दावी गोडपण ॥ तेवीं भर्तरी पिंगलारत्न ॥ स्वस्वरुपीं मिरवतसे ॥९६॥

ऐसें उभयतांचें एकचित्त ॥ कीं लोह मिळालें चुंबकांत ॥ कीं कर्दम उदकातें ॥ कदाकाळीं सांडीना ॥९७॥

सभामंडपीं राय असतां ॥ परी पिंगलेस वदे सदा चित्ता ॥ रायासही न गमे तीतें पाहतां ॥ घडोघडी पाहतसे ॥९८॥

पाहूनियां पिंगलेचें वदन ॥ मग राया सुचे कारभार पूर्ण ॥ जैसें अमालिया पूर्ण ॥ अमल सर्वदा पाहिजे ॥९९॥

तन्न्यायें उभयतांशीं ॥ ऐक्यप्रीति वर्ते प्रपंचासी ॥ ऐसें लोटतां बहुत दिवसीं ॥ वय अर्धे पातलें ॥१००॥

तों एके दिवशीं पारधीलागूनी ॥ राव जातसे घोर विपिनीं ॥ तों वरुनि पाहे मित्रावरुणी ॥ पुत्रचंद्र दृष्टीनें ॥१॥

पाहतां विचारी मनांत ॥ कीं मम वीर्याचे उदेले सुत ॥ एक अगस्ती दुसरा भर्तरीनाथ ॥ मृत्युभूमी कारणें ॥२॥

परी त्यांत अगस्तीनें हित केलें ॥ चपळपणानें स्वयंभ वरिले ॥ परी भर्तरीचें मन गुंतले ॥ राज्यवैभवाकारणें ॥३॥

तरी अहिताचा विषयप्याला ॥ राया भर्तरीस गाड वाटला ॥ हितालागीं सर्वस्वीं चुकला ॥ अचलपद तोचि राया ॥४॥

तरी हा विषयपदापासून ॥ कैसा सुटेल स्वबुद्धीनें ॥ याचें हित याजकारणें ॥ प्राप्त कैसें होईल कीं ॥५॥

नवनाथांतील अवतार ॥ धृमीनारायण महाथोर ॥ परी वेष्टिला विषयतिमिर ॥ सुटेल कैसा कळेना ॥६॥

ऐसा मोह उपजोनि पोटीं ॥ उतरता झाला महीतळवटीं ॥ अनुसूयात्मजाची घेऊनि भेटी ॥ वर्तमान निवेदिलें ॥७॥

म्हणे महाराजा योगद्रुमा ॥ काम वेधला आहे आम्हां ॥ तरी त्या कामाची सत्यभावना ॥ ऐकूनि घेईं महाराजा ॥८॥

तुम्ही विजयप्रतापध्वज ॥ मिरवलां महीं तेजःपुंज ॥ तरी मिरवला मम आत्मज ॥ मच्छिंद्रासम भर्तरी ॥९॥

तूं रायपंथ मिरवून ॥ सच्छिष्य मिरवले जगांत रत्न ॥ ते चित्तीं मम नंदन ॥ प्रविष्ट करीं याचि जागीं ॥११०॥

यावरी बोले अनुसूयासुत ॥ चिंता न करीं भर्तरीनाथ ॥ माझे प्रसादे जाण सत्य ॥ जगामाजी मिरवेल ॥११॥

मिरवेल परी कैसे रीतीं ॥ चिरंजीव शोभे महीवरती ॥ यावत् मही तावत् जती ॥ भर्तरीनाथ मिरवेल ॥१२॥

हें पूर्वीच भविष्योत्तर ॥ आहे समर्था मम गोचर ॥ दिधलें उत्तर केलें वागुत्तर ॥ मम वचनीं सर्वथा ॥१३॥

तरी आतां संशयासीं न रहावें ॥ आतां स्वस्थचित्त असावें ॥ मी यत्न करुनि भर्तरीराव ॥ नाथपंथीं मिरवीन ॥१४॥

ऐसें बोलूनि अत्रिनंदन ॥ बोळविला मित्रावरुण ॥ आपण तेचि घडी कृपा करुन ॥ भर्तरीपासीं जातसें ॥१५॥

तों येरीकडे भर्तरी नृपती ॥ पारधीस्तव काननाप्रती ॥ मृगयेकरितां हिंडे निगुती ॥ नाना वनें उपवनादि ॥१६॥

सवें सेना अपरिमित ॥ विपिनीं विस्तारली कृतांतवत ॥ चवदा लक्ष वाताकृत ॥ वाजी फिरती विपिनीं ते ॥१७॥

हेमतगटीं शृंगारासहित ॥ पाखरा झालरी शोभती मुक्त ॥ अलंकारें कोंदणयुक्त ॥ रत्नें मिरवी नवविध ॥१८॥

तरी ते शृंगार म्हणा वाचे ॥ कीं मोहर उजाळें नक्षत्रांचें ॥ तेवीं रत्नें चमकपणाचे ॥ भाव दाखविती नक्षत्रांचे पै ॥१९॥

अहो ते हय न म्हणूं वाचे ॥ रत्न उदेले उदधिउदराचें ॥ तेणे इंदिरा हर्षोनि नाचे ॥ बंधू म्हणोनि शृंगारी ॥१२०॥

त्याचि नीतिं एक लक्ष ॥ दिनसमान गज प्रत्यक्ष ॥ विशाळ शुंडादंड सुलक्ष ॥ चंद्रतेज मिरवले ॥२१॥

मिरवले परी कैसे भावें ॥ इंदूस मानलें बंधुभावें ॥ म्हणोनि सर्व पूर्ण स्वभावें ॥ चमत्कार दावीतसे ॥२२॥

त्याही दंती शुद्धकोंदणीं ॥ चुडे मिरवती हाटकखाणी ॥ त्यांत हिरे नक्षत्रें आणोनी ॥ इंदुराज मिरवितसे ॥२३॥

आणि स्वतां तोचि मुक्तासंपत्ती ॥ वरदबाळ ओपित्याप्रती ॥ झालरी अग्रगण्य निगुतीं ॥ एकसारा अर्चियेल्या ॥२४॥

चांदवे अंबारी कोंदणयुक्त ॥ नवरत्नादि सगुण मुक्त ॥ कळसतेजीं लावूनि आदित्य ॥ म्हणती विसावा घेई कां ॥२५॥

आणि रायासमान पंचशत ॥ राजविनवणी प्रज्ञावंत ॥ सरदारनामीं भूषणभरित ॥ मूर्ती जेवीं गभस्तीच्या ॥२६॥

तयां माथां कनकचीर ॥ सहज तेज छत्र चंद्राकार ॥ तयांच्या कळसदीप्तीवर ॥ भानुतेज लाजतसे ॥२७॥

रायामाथीं अर्धशत ॥ कनक अंबरीं हाटक व्यक्त ॥ पाच माणिकी मणियुक्त ॥ हेमें गुंफिल्या झालरी ॥२८॥

ऐसिया छत्रकळसउद्देशीं ॥ वैडूर्यरत्नें जडिल्या राशी ॥ पद्मरागें आदित्य मानसीं ॥ विरह करुं म्हणतसे ॥२९॥

विरह तरी केउता तरणी ॥ व्यर्थ फिरतसे अंबरभ्रमणी ॥ तरी वैडूर्यरत्नांच्या पंक्तींलागुनी ॥ येऊनि सुख भोगी कां ॥१३०॥

वनें विरहे उदास चित्तीं ॥ अस्ताचळीं जातां गभस्ती ॥ चतुर्थ प्रहरीं शिणली वृत्ती ॥ रत्नपंक्ती इच्छितसे ॥३१॥

असो आतां विरहअर्क ॥ म्हणे संपत्ती मिरवला मम बाळक ॥ तेणें तो अर्क पावूनि सुख ॥ अस्ताचळा मावळतसे ॥३२॥

असो ऐशा भाषणस्थितीं ॥ अचाट विपिनीं भर्तरी नृपती ॥ मृगया करितां वाताकृती ॥ काननांत हिंडूनिया ॥३३॥

परी समयास आला मास चैत्र ॥ पुत्रचंद्रा पहावया मित्र ॥ स्थिरावे तेणें रश्मि उलटयंत्र ॥ काननांत लखलखी ॥३४॥

तैं रश्मीचें तीव्रपण ॥ चमू हळहळी तृषेंकरुन ॥ मग राव भर्तरी मृगया सांडून ॥ उदक शोधूं धावतसे ॥३५॥

परी पंचत्रयचतुर्थीत ॥ काननविरहित योजनशत ॥ उदक न दिसे ऐसें भावीत ॥ कानन रुक्ष मिरवतसे ॥३६॥

फार व्यापिले तृषेंकरुन ॥ कोणी सोडूं पाहती प्राण ॥ कोणी हिंडोनि रानोरान ॥ लवन जीवन पहाती ॥३७॥

कोणी त्रासूनि पाला भक्षिती ॥ कोणी लघुशंका सेविती ॥ कोणी तरुच्या सावलीं क्षिती ॥ धरुनियां पडियेले ॥३८॥

ऐसी पृतना आहाळपणी ॥ व्यापिली आहे तृषेंकरुनी ॥ रावही तैसाच क्लेशें काननी ॥ पाणी पाणी म्हणतसे ॥३९॥

प्राण झाला कासावीस ॥ हदयीं न सांठवे श्वासोच्छवास ॥ मुखीं कोरड पडली विशेष ॥ जिव्हा लोटूं लागलीसे ॥१४०॥

ऐसें क्लेशाचे प्रकरणीं ॥ श्रीदत्तात्रेय काननीं ॥ गुप्तवेषें असोनी ॥ रायामागें हिंडतसे ॥४१॥

तो विपिनीं मध्यें गोंगावत ॥ काय करी अत्रिसुत ॥ मायेचें सरोवर रचूनि तेथ ॥ छंदे व्यक्त दाखवी ॥४२॥

निर्मळपणीं गंगाजळ ॥ दाटोनि पात्र उचंबळे ॥ कुमुदिनी विकासित घालूनि पाळे ॥ नांदताती सभोंवती ॥४३॥

आणि तया सरसीकांठी ॥ बहु फलित तरुदाटी ॥ अनेक पक्षी मराळकोटी ॥ पंक्तिसरी दाटल्या ॥४४॥

शीतळ छाया शीतळ जीवन ॥ सरोवर मिरवले गहिंवरपणे ॥ तये तटीं पर्णकुटी करुन ॥ अत्रिआत्मज मिरवला ॥४५॥

तों येरीकडे नृपनाथ ॥ क्लेशें हिंडतां काननांत ॥ तों सरोवर ठायीं देखोनि अकस्प्रात ॥ एकटाचि पातला ॥४६॥

परमदेखूनि गहिंवरें जीवन ॥ धांव घेतसे नृपचिद्ररत्न ॥ सरसीकांठीं जाऊन ॥ जीवन स्पर्शू टेंकला ॥४७॥

आतां स्पर्शावें ओंजळांत ॥ तों तिकडूनि उठला अत्रिसुत ॥ प्रत्योदक करें कवळूनि हात ॥ रायावरी धांवला ॥४८॥

अरे अरे वाचे म्हणून ॥ म्हणे न स्वीकारीं माझे जीवन ॥ तूं कोणाचा आहेस कोण ॥ आधीं माते सांगें की ॥४९॥

येरी पावोनि देहातें ॥ भयें दाटलां नृपनाथ ॥ कांहीं न बोले क्षितींत ॥ टकमकां पहातसे ॥१५०॥

अवधूत म्हणतसे कां रे मौन ॥ धरुनि कांहीं न बोलसी वचन ॥ माता पिता गुरु कोण ॥ तव देही मिरवले ॥५१॥

मातापिता गुरुसहित ॥ सांगूनि करीं उदकपानातें ॥ नातरी सेवितां पावसी मृत्यु ॥ जीवन येथेंचि हें राया ॥५२॥

ऐसें ऐकूनि भर्तरीनाथ ॥ पदावरी लोटला त्वरित ॥ नमूनि जन्मकथेसहित अत्रिसुता सांगितलें ॥५३॥

भर्तरीमाता पात्रसांठवणीं ॥ पिता मिरवला मित्रावरुणी ॥ ऐसें प्रकरण दत्तालागुनी ॥ मूळापासोनि सांगितलें ॥५४॥

येरी म्हणे गुरु कोण ॥ भर्तरी म्हणे नाहीं अजून ॥ ऐसें ऐकूनि अत्रिनंदन ॥ बोलता झाला तयासी ॥५५॥

म्हणे राया व्यवस्थित ॥ मिरवलासी या देहातें ॥ अद्यापि गुरु नाहीं तूतें ॥ भ्रष्टबुद्धि मिरविसी ॥५६॥

तरी तूंख पूर्वीचा परम पापिष्ठ ॥ म्हणूनि गुरु न मिळाला वरिष्ठ ॥ तरी आतां क्रियानष्ट ॥ स्पर्श न करी जळातें ॥५७॥

तुवां स्पर्श केलिया पाणी ॥ सकळ तोय जाईल आटोनी ॥ निगुरुत्वाचा विटाळ मानूनी ॥ तोय त्रासा पावेल ॥५७॥

तुवां स्पर्श केलिया पाणी ॥ सकळ तोय जाईल आटोनी ॥ निगुरुत्वाचा विटाळ मानूनी ॥ तोय त्रासा पावेल ॥५८॥

मग तोय आटल्या निगुतीं ॥ मम कोपाची पावकशेखी ॥ आसडोनि तव देहाप्रती ॥ भस्म करील क्षणार्धे ॥५९॥

ऐसें बोलतां अत्रिनंदन ॥ भर्तरी करीतसे नमन ॥ म्हणे महाराजा तृषें प्राण ॥ जात आहे माझा कीं ॥१६०॥

तरी आता अनुग्रह देऊन ॥ आपण वांचवा माझा प्राण ॥ दत्त म्हणे तव अनुग्रहास मम मन ॥ द्यावया योग्य दिसेना ॥६१॥

अरे मम अनुग्रहासाठी ॥ शिव विरिंची घालिती मिठी ॥ तरी अनुग्रहातें पूर्ण कोटी ॥ तुझे पदरीं दिसेना ॥६२॥

ऐसे भागले थोर नायक ॥ तरी नातुडे अनुग्रह दोंदिक ॥ तों तेथे तूं मशक ॥ अनुग्रह वांछिसी ॥६३॥

भर्तरी म्हणे हें तो निश्वित ॥ परी तृषेनें होतों प्राणरहित ॥ तुम्ही कृपाळु परम संत ॥ दया क्षमा पाळितां ॥६४॥

जगाचें न साहे कीचकपण ॥ त्वरेंचि हरतां दैन्याकारण ॥ तरी माझा वांचवूनि प्राण ॥ धर्मसाधन मिरवावें ॥६५॥

ऐसें ऐकतां तपोराशीं ॥ म्हणे अनुग्रह देईन तुजसी ॥ परी पूर्ण तप द्वादशवर्षी ॥ आचरावें या स्थळा ॥६६॥

त्या तपःपुण्यांशेंकरुन ॥ योग्य होसील अनुग्रहाकारण ॥ राव म्हणे सध्याचे प्राण ॥ तृषेंकरोनि जातो कीं ॥६७॥

मग द्वादश वर्षे वांचल्यावरती ॥ कैसी घडेल कृपामूर्ती ॥ दत्तात्रेय म्हणे तपापुढती ॥ संकल्पातें करावें ॥६८॥

काया वाचा चित्त मन ॥ संकल्प झालिया पुण्यवर्धन ॥ वर्धन झालिया पाजीन जीवन ॥ सकळ बाधा वो चुके ॥६९॥

येरी म्हणे महाराजा ॥ संकल्प करीन सांगितल्या चोजा ॥ परी आतां मातें उदक पाजा ॥ प्राण रक्षा माझा कीं ॥१७०॥

नाथ गुरु संकल्प करिसी ॥ कीं तपा आचरण द्वादश वरुषी ॥ परी तैसें वैभवासी ॥ पुन्हां लिप्त न व्हावें ॥७१॥

वमनासमान पाळूनि सर्व ॥ विरक्तपणाची बरवी ठेव ॥ योगामाजी नित्य बैसावें ॥ आयुष्यमर्यादापर्यत ॥७२॥

ऐसें ऐकतां राव कुंठित ॥ विचारदरीं व्यापिलें चित्त ॥ म्हणे कैसी करावी रीत ॥ प्राण कासावीत होतसे ॥७३॥

तरी तो पूर्ण प्रज्ञावंत ॥ म्हणे महाराजा हे नाथ ॥ मी प्रपंचरहणीरुप ॥ मुक्त झालों नाहीं अद्यापि ॥७४॥

परी पितृश्राद्ध पितृऋण ॥ मातेसी केलिया गयावर्जन ॥ कांते पुत्र झालिल्यावीण ॥ कांताऋण फिटेना ॥७५॥

पुत्रविवाह स्नुषामेळीं ॥ ऋणमुक्त होय शुद्धमौळी ॥ ऐसिया ऋणाची स्थावरकाजळी ॥ फिटली नाहीं महाराजा ॥७६॥

तरी द्वादश वरुषेंपर्यत ॥ प्रपंच आचरुं द्यावा मातें ॥ उपरी योजूनि पूर्ण योगातें ॥ केलिया संकल्प समान कीं ॥७७॥

ऐसे बोलता तई भूपाळ ॥ अवश्य म्हणे अनसूयाबाळ ॥ मग कमंडलू भरुनि जळ ॥ तयापासीं पैं आला ॥७८॥

उदक ओपूनि करयुग्मी ॥ संकल्प करवीं मनोधर्मीं ॥ कीं द्वादशवरुषें संकल्पनामीं ॥ पुण्ययोग आचरेन ॥७९॥

यापरी तन मन धन ॥ काया वाचा जीवित्व पूर्ण गुरुसंकल्पीं सोडूनि जीवन ॥ अनुग्रह देतसे ॥१८०॥

मौळीं ठेवूनि वरदहस्त ॥ कर्णी बीजमंत्र अर्पीत ॥ आपुला करोनि शरणागत ॥ नाम आपुले सांगतसे ॥८१॥

म्हणे वत्सा ओळख मातें ॥ मी दत्तात्रेय अत्रिसुत ॥ परी तव दैव भाग्यवंत ॥ मम कर मौळीं विराजला ॥८२॥

परी अनुग्रह होतांचि प्राप्त ॥ मायिक सरोवरासहित झाला गुप्त ॥ इतुकें केलें जया अर्थी ॥ व्यर्थ होऊं पहातसे ॥८३॥

ऐसी चिंता मानसीं बहुत ॥ करिता झाला भर्तरीनाथ ॥ म्हणे महाराजा गुरुनाथ ॥ प्राण जाऊं पाहे आतां ॥८४॥

ऐसे ऐकतां भर्तरीवचन ॥ भोगावती पाचारी अत्रिनंदन ॥ तरी ती सरिता अपार जीवन ॥ घेऊनियां धांवली ॥८५॥

सुरभीचें करुनि चिंतन ॥ मही दर्शविली देदीप्यमान ॥ नेमक सहज उपजवोनि अन्न ॥ पर्वतासमान मिरवलें ॥८६॥

मग चमूसहित नृपनाथ ॥ भोगावतीचे स्नान करीत ॥ उत्तम अन्न स्वीकारुनि समस्त ॥ दर्शन करोनि चालिले ॥८७॥

पृतनेसहित तुष्टचित्तीं ॥ मृगया करुनि येत नृपती ॥ येरीकडे भोगावती ॥ तिचे स्थाना पाठविली ॥८८॥

कामधेनू स्वर्गस्थानीं ॥ पाठवोनि अदृश्य झाला मुनी ॥ येरीकडे मृगया करोनी ॥ भर्तरी गेला गांवांत ॥८९॥

तरी आतां पुढें श्रोतीं ॥ कथा स्वीकारावी सुधारससंपत्ती ॥ धुंडीसुत मालू वदेल उक्ती ॥ नरहरिप्रसादेंकरुनियां ॥१९०॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ सप्तविंशति अध्याय गोड हा ॥१९१॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ सप्तविंशति अध्याय समाप्त ॥


श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय २८

श्रीगणेशाय नमः

जयजयाजी जगदुद्धारा ॥ अखिल निरंजना निर्विकारा ॥ भक्तमानसचकोरचंद्रा ॥ प्रेमांबुधारा ओसरसी ॥१॥

तरी तूं असतां कृपाळु आई ॥ माय माझे विठाबाई ॥ तरी आतां ग्रंथप्रवाहीं ॥ येऊनियां बैसे गे ॥२॥

मागिले अध्यायीं प्रेमेंकरुन ॥ वैभवीं मेळविला राव विक्रम ॥ भर्तरीसंगमीं पिंगलालग्न ॥ दत्तानुग्रह लाधला ॥३॥

उपरी मृगया करुनी ॥ अवंतिकास्थाना जाऊनि ॥ राजधामीं कनकासनीं ॥ सभामंडपीं बैसला ॥४॥

क्षणैक बैसूनि त्वरितात्वरित ॥ पाकशाळे गेला नृपनाथ ॥ पक्कान्न सेवूनि अंतापुरात ॥ पिंगलागृहीं संचरला ॥५॥

कनकमंचकीं सुमनशेजी ॥ राव बैसवी पिंगला अजीं ॥ षोडशोपचारेंकरुनि पूजी ॥ श्रद्धापूर्वक पिंगला ॥६॥

परम प्रीतीं भावारुढ ॥ रायें दर्शविलें चित्तीं कोड ॥ मग करी कवळूनि स्नेहपाडें ॥ निकट घेत पिंगला ॥७॥

तीतें वामांकी बैसवोन ॥ परम प्रीतीनें घेत चुंबन ॥ वाचेनें म्हणे तुजसमान ॥ अन्य दारा नावडती ॥८॥

अगे पिंगले माझें मन ॥ भावी मम देहींचें ऐक्यरत्न ॥ जैसे मित्र आणि रश्मिचिन्ह ॥ ऐक्यदेहीं मिरवती ॥९॥

कीं राजमौळी तेजें आगळा ॥ द्वितीये शोभली त्याची कळा ॥ तेवीं माते तूं पिंगला ॥ मम चित्तावरी धांवें ॥१०॥

अगे हे पिंगले माझा भाव ॥ पिंगलाभर्तरीं ऐक्यनांव ॥ एकाचि देहीं मज वाढीव ॥ भासे भास शुभानने ॥११॥

जैशी शर्करा आणि गोडी ॥ नामें भिन्न परी ऐक्यप्रौढी ॥ तेवी तूं पिंगला माझे पाठीं ॥ भासे भास शुभानने ॥१२॥

जैसा उदधी आणि लहरी ॥ परी ऐक्यता सागरीं ॥ तेवीं मातें तूं सुंदरी ॥ भास भाससी शुभानने ॥१३॥

ऐसें म्हणूनि परम प्रीतीं ॥ पुन्हां चुंबन घेत नृपती ॥ मग भोगूनि सकाम रीतीं ॥ संतुष्ट चित्तीं मिरवला ॥१४॥

मग विचार सुचला एक गहन ॥ आनंदें बैसती प्रीतीकरुन ॥ बैसल्या पिंगला बोलूनि वचन ॥ विडा त्रयोदशगुणी देतसे ॥१५॥

म्हणे हे महाराजा नृपवरा ॥ मम देहींचे प्राणप्रियेश्वरा ॥ मम मानसचकोरचंद्रा ॥ प्रेमांबु मिरवतसे ॥१६॥

तरी तुम्हां आम्हां गांठी ॥ गांठी गांठिल्या त्या परमेष्ठीं ॥ गांठिल्या परी चित्तदेठीं ॥ ऐक्यभास भासतसे ॥१७॥

जसें लवण उदकी मिश्रित ॥ भिन्न न दावी दृष्टींत ॥ तन्न्यायें ऐक्यचित्त ॥ रावणराणी शोभत ॥१८॥

तरी ऐसा मिश्रित अर्थ ॥ उदया पावला असे ऐक्यचित्त ॥ परी नेणूनि निर्दय परम कृतांत ॥ जगामाजी मिरवतसे ॥१९॥

चित्तीं चित्तभय काया ॥ हरण करीत असे राया ॥ तरी नेणों आपण विषयचिंते या ॥ बुद्धि जरी संचरली ॥२०॥

संचरतां परी एक त्यांतें मातें दिसत उचितार्थ ॥ तुम्हांआधी मातें मृत्यु ॥ सुगम चित्ता वाटतसे ॥२१॥

तरी हें ऐसें इच्छिल्याप्रमाण ॥ ईश्वरसत्ते जरी आलें घडोन ॥ मग परम बरवें दैववान ॥ जगीं असें मी एक ॥२२॥

ऐसें बोलतां शुभाननी ॥ राव ऐकूनि बोले वाणी ॥ नेणों सखे ईश्वरकरणी ॥ पुढील काहीं वदवेना ॥२३॥

मज आधी तूं कामिनी ॥ मृत्यु पावों इच्छिसी मनीं ॥ परंतु नेणों निर्दयपणीं ॥ मित्रात्मज मिरवतसे ॥२४॥

तो कदा न जाणे वेदविधी ॥ सदा वर्ततसे बिघडबुद्धीं ॥ नेणों मज मृत्यु तुज आधी ॥ आल्या काय करशील ॥२५॥

ऐसें ऐकूनि वदे पिंगला ॥ नेणो कैसे असे जी भाळा ॥ रेखिली विधीनें अकळ कळा ॥ कळत नाहीं महाराजा ॥२६॥

परी ऐशा घडल्या गोष्टी ॥ मी राहाणार नाहीं महीपाठीं ॥ देह दाहूनिया हव्यवाटी ॥ गमन करीन तुम्हांसह ॥२७॥

राव ऐकूनि बोले वचन ॥ पुरे आतां तुझे बोलणे ॥ प्राणांहूनि प्रिय कोण ॥ घात त्याचा करवेना ॥२८॥

तरी हे बोल उगलेचि फोल ॥ माझिया तोषाचें करिसी मोल ॥ परी समय येतां तव पाऊल ॥ मागेंचि धांव घेणार ॥२९॥

तरी अनुभव माझिये चित्ता ॥ सहज आहे मजला पाहतां ॥ अगे राज्यासनीं विपुल वार्ता ॥ सेवक श्रवण माझें करविती ॥३०॥

करविती परी कैशा रीतीं ॥ समरंगणींचा भाव दाविती ॥ शत्रुअनली प्राणाहुती ॥ वेंचूं ऐसें म्हणताती ॥३१॥

तरी समय पडतां दृष्टीं ॥ जीवित्व रक्षिती बारा वाटीं ॥ मग कोण कोठील मोह पोटीं ॥ जीवित्वाचा वरिती गे ॥३२॥

तरी हें तैसे तुझें बोलणें ॥ दावीत मातें चांगुलपण ॥ परी समय पडतां अर्थ ॥ भिन्न दुसराचि आहे गे ॥३३॥

कीं बहुरुपियाचे खेळमेळीं ॥ होऊनि बैसती महाबळी ॥ परी ते शूरपणाची नव्हाळी ॥ समरभूमीं चालेना ॥३४॥

कीं श्वानपुच्छाची कैशी उग्रता ॥ परी हार तेचि पडे बळी देखतां ॥ जैसी पालीची दृष्टी देखतां ॥ वृश्चिक नांगी उतरीतसे ॥३५॥

तन्न्यायें तव बोलणें ॥ मातें दिसतें सहज स्थितीनें ॥ ऐसें बोलतां भर्तरीनंदनें ॥ पिंगला वदे स्वामीसी ॥३६॥

म्हणे महाराजा प्राणेश्वरा ॥ या बोलाच वाग्दोरा ॥ कंठीं बांधिला आहे नरा ॥ काया वाचा मानसीं ॥३७॥

तरी आतां व्यर्थ बोलून ॥ नेणो घडेल अर्थ कोण ॥ ईश्वरसत्तेचें प्रमाण ब्रह्मांदिका कळेना ॥३८॥

परी माझिये भावनेऐसें ॥ येत आहे स्वचित्तास ॥ विधवा शब्द शरीरास ॥ लिप्त होणार नाहीं कीं ॥३९॥

जरी म्हणाल कैशावरुन ॥ तरी काया वाचा चित्त मन ॥ तुम्हांलागीं केलें अर्पण ॥ साक्ष असे ईश्वर तो ॥४०॥

तरी ईश्वर तो सत्याश्रित ॥ आहे म्हणती सकळ जगतीं ॥ तरी वैधव्य शब्द जगमुखांत ॥ मातें लिप्त होणार नाहीं कीं ॥४१॥

असो बीज पेरिलें तैसे फळ ॥ दुमकोमादि दावी सकळ ॥ तेवीं माझो चाली सरळ ॥ फळ उमटेल तैसेंचि ॥४२॥

ऐसें बोलूनि निवांतपणीं ॥ स्तब्ध राहिली कामिनी ॥ परी रायाचे अंतःकरणीं ॥ शब्द सदृढ मिरवलें ॥४३॥

मिरवले परी ठेविले मनांत ॥ चमत्कार पाहूं कोणे दिवसांत ॥ असो हे जल्प बहु दिनांत ॥ सारिते झाले प्रीतीनें ॥४४॥

सहज कोणे एके दिवशीं ॥ राव जातसे पारधीसी ॥ मृगुया खेळतां विपिनासी ॥ आठव झाला कांतेचा ॥४५॥

कीं आम्ही उभयतां दोघे जण ॥ बैसलों होतों सुखसंपन्न ॥ तयामाजी मृत्यु बोलोन ॥ निश्चयविलें कांतेनें ॥४६॥

तुम्ही झालिया गतप्राण ॥ तुम्हांसवे करीन गमन ॥ तरी त्या बोलाचें साचपण ॥ आज पाहूं निश्चये ॥४७॥

ऐसी चित्तीं योजना करुन ॥ मृगया करीत फिरे कानन ॥ तों अकस्मात देखिला नयनें ॥ मृग एक नेटका ॥४८॥

राव देखतां तयापाठीं ॥ लागूनि शीघ्र महीं आर्‍हाटी ॥ शीणचि त्या जीवीं बहु मेळथाटी ॥ मृग जीवंत धरियेला ॥४९॥

धरियेला परी हस्तेंकरुन ॥ तयाची ग्रीवा छेदून ॥ मुकुटासह काढूनि भूषणें ॥ रुधिरें अस्त्रें भिजविलीं ॥५०॥

भिजवोनियां सेवकाहातीं ॥ देता झाला शीघ्र नृपती ॥ अन्य भूषणें उभवूनि कांती ॥ सुखासनीं बैसला ॥५१॥

उत्तम छाया पाहून ॥ तयाखालीं नृप जाऊन ॥ उत्तम चीर कनकवर्ण ॥ मृदु गालिचा आंथरला ॥५२॥

तयावरी बैसूनि नृपती ॥ मंडळी दुरावूनि बैसे एकांती ॥ परी रुधिरवस्त्रें जयाहातीं ॥ तयालागीं पाचारी ॥५३॥

म्हणे ही रक्तवस्त्रें घेऊन ॥ सेवका पिंगलेचें गांठीं स्थान ॥ वस्त्रें तीतें गोचर करुन ॥ राव निमाला म्हणावें ॥५४॥

निमाला परी कैसें रीती ॥ जरी पिंगला बोलले उक्ती ॥ तरी व्याघ्र संधांनी जीवित्वआहुती ॥ घेऊनियां पळाला ॥५५॥

ऐसें वदोनि राव भृत्यातें ॥ गुप्त पाठविला अवंतिकेतें ॥ राजसदना जाऊनि भृत्यें ॥ पिंगलेतें विलोकिलें ॥५६॥

मौळीचीरासह सकळ ॥ रुधिरव्याप्त वस्त्रें सबळ ॥ पुढें ठेवूनि करकमळ ॥ जोडूनियां बोलतसे ॥५७॥

म्हणे जी महाराज महीस्वामिनी ॥ मृगया करीत राव काननी ॥ अवचित व्याघ्र जाळींतुनी ॥ उठला राया न कळतां ॥५८॥

मागाहूनि साधूनि उड्डाण ॥ राव धरिला ग्रीवेकारण ॥ धरितांचि हरुनि प्राण ॥ रुधिर पिऊनि पळाला ॥५९॥

आतं त्याचें करुनि दहन ॥ चमू येईल सकळ परतोन ॥ ऐसें पिंगला ऐकून ॥ हदय पिटी आक्रोशें ॥६०॥

हदय पिटूनि महीवरती ॥ भावें आपटी निष्ठुरगती ॥ अहा म्हणूनि केश हातीं ॥ धरोनियां लुंचीतसे ॥६१॥

शब्द करुनि अट्टाहास ॥ हंबरडा मारुनि उदास ॥ पुन्हां महीतें मस्तकास ॥ वारंवार आफळीतसे ॥६२॥

मृत्तिका घेऊनि टाकी मुखांत ॥ म्हणे हा जी प्राणनाथ ॥ कैसे टाकूनि गेलांत मातें ॥ परत्रदेशभुवनासी ॥६३॥

अहा महाराजा प्राणेश्वरा ॥ कूपीं कापिला कैसा दोरा ॥ अहा तव प्रीतीचा मोहझरा ॥ आज कैसा आटला जी ॥६४॥

अहो मम प्राणनाथा ॥ मजविण तुम्हां क्षण गमत नव्हता ॥ प्रीती सोडूनि कैसे आतां ॥ परत्र देशा गमलेती ॥६५॥

ऐसें म्हणोनि आरंबळत ॥ तों अंतःपुरीं समजली मात ॥ स्त्रिया राजाच्या द्वादश शत ॥ आरंबळत पातल्या ॥६६॥

एक हदय पिटिती आपुलें हस्तीं ॥ एक धांवती महीं पडती ॥ एक ऐकतांचि झाली वरती ॥ महीलागीं मूर्च्छित ॥६७॥

एक हंबरडा फोडूनि ऊर्ध्व ॥ म्हणती आमुचा गेला निध ॥ आतां महीतें स्त्रीवृंद ॥ दीनवंत झालों कीं ॥६८॥

ऐसें म्हणोनि आरंबळती ॥ एकमेकींच्या गळां पडती ॥ हदय पिटूनि आपटिती ॥ महीलागीं मस्तक तें ॥६९॥

ऐसा सकळ अंतःपुरांत ॥ कोल्हाळ झाला अदभुत ॥ परी पिंगला दारा प्रीतीं बहुत ॥ शोक करी आक्रोशें ॥७०॥

म्हणे महाराजा निढळवाणी ॥ मज कैसे गेलेत जी सांडोनी ॥ मोहाचा सकळ तरणी ॥ लोपोनियां महाराजा ॥७१॥

बाळाहूनि मोह अत्यंत ॥ मजविषयीं पाळीत होतेत ॥ तो मोह दवडूनि निष्ठुरवर ॥ सांडूनि कैसे गेलांत ॥७२॥

अहो तुम्ही राया सिंहासनी ॥ बैसत असतां राजकारणीं ॥ परी मम स्मरण होतां मनीं ॥ या धांवूनि सदनांत ॥७३॥

ऐसें म्हणोनि धरणीवर शरीर ॥ पिंगला टाकी वारंवार ॥ आजि सकळ सांडोनि राज्यभार ॥ कैसा गेलासी महाराजा ॥७४॥

पाहूनि माझें मुखमंडन ॥ पुन्हां सेविसी राज्यासन ॥ मोह आजि सकळ सांडोन ॥ कैसा गेलासी महाराजा ॥७५॥

अहा पिंगला अंडजखाणी ॥ कोठें गेलीसे मम पक्षिणी ॥ दाही दिशा ओस करोनी ॥ अचर रानीं चरावया ॥७६॥

मम पाडसाची हरिणी ॥ परत्र तृण गोड पाहुनी ॥ तिकडेचि गुंतली लोभेंकरुनी ॥ माझा लोभ सांडोनियां ॥७७॥

अहा मज आंधळ्याची काठी ॥ हिसकूनि नेली निर्दये पोरटी ॥ कीं क्षुधिताची अन्नवाटी ॥ जिंतूनि नेली भणंगें ॥७८॥

अहा राया मजवांचून ॥ तूतें गमत नव्हतें एक क्षण ॥ आज निष्ठुर मन करुन ॥ कैसा गेलासी महाराजा ॥७९॥

अहा राया उत्तम पदार्थ ॥ जो महीलागीं उत्पन्न होत ॥ तो मम आधीं नृपनाथें ॥ भक्षिला नाहीं कधीं कीं ॥८०॥

मातें बैसवोनि निजअंकास ॥ मुखीं ओपीत होता ग्रास ॥ ऐसेपरी सांडोनि प्रीतीस ॥ परत्र कैसे गेलांत ॥८१॥

ऐसेपरी नाना गुण ॥ आक्रंदतसे आठवून ॥ मग ते सेवेकातें पाचारुन ॥ शय्यासाहित्य करवीतसे ॥८२॥

रायमौळीचा चीरमुगुट ॥ परिधानी कबरी अलोट ॥ स्फुरण दाटोनि मग बळकट ॥ उत्तम चीरीं कवळिला ॥८३॥

स्वामीचें वस्त्र परिधान करुन ॥ घेती झाली सतीचें वाण ॥ स्मशानवाटिकेचें साधन ॥ सिद्ध केले तत्काळ ॥८४॥

मग सकळ समारंभासहित ॥ येती झाली स्मशानवाटिकेंत ॥ अग्निकुंडीं विधानें करुन त्यांत ॥ सबळ अग्नि चेतविला ॥८५॥

अग्नि लावितां विधानशक्तीं ॥ दाहूनि वर्तल अंगारनीतीं ॥ धगधगोनि कुंडाप्रती ॥ पावक शक्ति दावीतसे ॥८६॥

ऐसिया प्रकरणीं पेटविला वन्ही ॥ होतां पातली सौदामिनी ॥ अग्निकुंडी शिळा स्थापोनी ॥ निरोप मागे सर्वातें ॥८७॥

सकळां जय देऊन आशीर्वचन ॥ जय जय भर्ता ऐसें म्हणोन ॥ तुझा देह तुज अर्पण ॥ शीघ्रकाळीं होवो कां ॥८८॥

ऐसे म्हणोनि अग्निकुंडांत ॥ सांडिती झाली स्वशरीरातें ॥ परी त्या पावकीं होतां स्थित ॥ गुंडाळोनि गेली सर्वस्वीं ॥८९॥

मग ते याचक अपार जन ॥ धन्य म्हणती तियेकारण ॥ स्वहित केलें पिंगलेनें ॥ स्वामीसवें गमूनियां ॥९०॥

अहा पिंगला ऐसें म्हणती ॥ पवित्र जाया सत्यवती ॥ उदार कर्ण स्वकुळाप्रती ॥ परकुळातें तारील ॥९१॥

भर्तरीपरी करितां परलोक ॥ विव्हळ चित्ती करिती शोक ॥ म्हणती आम्हां प्रजेचें दोंदिक ॥ ईश्वरें कैसें नेलें हो ॥९२॥

ऐसें म्हणोनि आक्रंदती ॥ भर्तरी म्हणोनि आठविती ॥ असो पावकीं दाहोनि सती ॥ लोक निघाले माघारे ॥९३॥

आपुलाल्या सदनीं जाऊन ॥ बैसले असतीं मुख वाळवोन ॥ अहा भर्तरी ऐसें म्हणोन ॥ श्वासोच्छवास सोडिती ॥९४॥

आणि राजसदनीं स्त्रियांचा मेळ ॥ शोक करीत अति तुंबळ ॥ तों येरीकडे विपिनीं नृपाळ ॥ मृगया करुनि येतसे ॥९५॥

तों अस्तासी गेला चंडमणी ॥ रात्र दाटली परम विपिनीं ॥ म्हणोनि राजा उठोनी ॥ नगराप्रती चालिला ॥९६॥

पावकतेजीं देदीप्यमान ॥ हिलाल मागीं प्रदीप्त करुन ॥ जातां भृत्य पाठविला वस्त्रें देऊन ॥ आठव तयाचा पैं झाला ॥९७॥

राव बैसूनि सुखासनीं ॥ येतां मागीं मशाली पेटवोनी ॥ त्यांत चंद्रज्योती शशिसमानी ॥ दिशेलागीं उजळती ॥९८॥

आठव होतांचि म्हणे चित्तांत ॥ अबुद्धिपणें स्त्रियांची जात ॥ नेणों गृहीं कैसी मात ॥ घडोनि आली असेल कीं ॥९९॥

म्यांहीं केलें मूढपण ॥ शोध केला नाहीं आणिका पाठवोन ॥ सकल भ्रांतीत चित्त गोंवोन ॥ पाठीं लागलों मृगाच्या ॥१००॥

परी मातें दिसतें अहित ॥ मूर्खपणा घेतला स्वपदरांत ॥ ऐसी चिंता करीत ॥ अवंतिके पातला ॥१॥

परी यांत श्रोते कल्पना घेती ॥ पिंगला दाहिली पावशक्ति ॥ तेव्हां विक्रम नृपती ॥ शोध कैसा अंतरला ॥२॥

आणि जो भृत्य आला वस्त्रें घेऊन ॥ तेणें कैसें पाहिलें निर्वाण ॥ तरी तो पिंगलेतें वस्त्रें देऊन ॥ आला होता अरण्यांत ॥३॥

परी रायाची न पडूनि गाठी ॥ कटक शोधितां महीपाठीं ॥ मग तो अस्तमान होतां शेवटी ॥ कटकालागीं मिळाला ॥४॥

आणि त्या समयीं विक्रम नृपवरें ॥ सेविलें होतें मातुळघर ॥ मिथुळेस जाऊनि समाचार ॥ सत्यवर्म्याचा घेतसे ॥५॥

मग सुमतिप्रधान चमूसहित ॥ शुभविक्रमरायादि प्रज्ञावंत ॥ सकळ मंडळीही ज्ञानभरित ॥ रायासवें गेली ती ॥६॥

गृहीं तितुकें स्त्रीमंडळ ॥ ग्रामजनादि रक्षपाळ ॥ सकळ अबुद्धि केवळ ॥ ज्यांते शक्ति नातुडली ॥७॥

ऐसा समय आला घडून ॥ तों त्यांतही घडलें अपार विघ्न ॥ पिंगला अबुद्धिपणें रत्न ॥ देहान्त पावली ॥८॥

असो पाहिली मार्गवाट ॥ राव भर्तरी चमूनेट ॥ येऊनि अवंतिकेनिकट ॥ ग्रामद्वारीं संचारला ॥९॥

तंव ते उठोनि द्वारपाळ ॥ रायासमोर झाले सकळ ॥ आश्चर्य मानूनि उतावेळ ॥ रायाप्रती वदताती ॥११०॥

म्हणती परी कैसे रीतीं ॥ नम्रोत्तरें मंजुळ करिती ॥ मुजरे करुनि निवेदिती ॥ पिंगलेचा वृत्तांत ॥११॥

म्हणती महाराज दिनमणी ॥ भृत्य एक आला वनांतूनी ॥ तो दुश्विन्ह वदोनि वाणी ॥ ग्राम बुडविला शोकांत ॥१२॥

परी त्या शोकाची ऊर्ध्वनळी ॥ सती पडली सुमति बळी ॥ नरस्वामिनी पिंगला दवडिली ॥ परत्र देशीं गेलीसें ॥१३॥

तरी तियेची करुनि बोळवण ॥ आतांचि गृहीं आले सकळ जन ॥ स्मशानवाटिका झाली भस्म ॥ एक प्रहर लोटला ॥१४॥

ऐसें राव ऐकतां वचन ॥ परम घाबरलें अंतःकरण ॥ मग सुखासनांतूनि उडी टाकून ॥ स्मशानवाटिके पातला ॥१५॥

पातला परी आक्रंदत ॥ अट्टहास्यें शब्द करीत ॥ अति लगबगें धांवत ॥ स्मशानवाटिकेजवळी पैं ॥१६॥

पातला परी चूम मागें ॥ करीत जातसे अति लाग ॥ सकळ कुळवृद्ध योग ॥ रायालागीं कवळिती ॥१७॥

राव जाता स्मशानमहीसी ॥ पहात पिंगलेचे चित्तेसी ॥ रव विरागी होऊनि मानसीं ॥ उडी टाकूं म्हणतसे ॥१८॥

परी ते चमूमेळीचे गृहस्थ थोर ॥ रायासी कवळूनि धरिती समग्र ॥ स्मशानकुंडीचा वैश्वानर ॥ वेष्टूनियां बैसले ॥१९॥

परी राव ते उद्देशी ॥ प्राणघात इच्छी मानसीं ॥ परी वेष्टन पडतां शरीरासी ॥ उपाय कांहीं चालेना ॥१२०॥

मग बैसल्या ठायीं आरंबळत ॥ महीं मस्तकातें आपटीत ॥ हदय पिटूनि शोक करीत ॥ मूर्च्छनेलागी पावतसे ॥२१॥

मूर्च्छा गेलिया पुन्हां उठत ॥ अग्नीं आहुती द्यावया पहात ॥ परी अपार जनांचे वेष्टन बहुत ॥ बळ कांहीं चालेना ॥२२॥

ऊर्ध्व करुनि आपुला माथा ॥ घडी घडी पाहे पिंगलाचिता ॥ अहा म्हणोनि भाळ तत्त्वतां ॥ महीलागीं आफळीतसे ॥२३॥

आफळूनि आठवी पिंगलेचें गुण ॥ म्हणे कैसी वो गेलीस मज सांडून ॥ मातें मृत्युमहीं ठेवून ॥ परत्र कैसी झालीस ॥२४॥

हें पिंगले तुझे मन ॥ गमत नव्हतें मजवांचून ॥ आतां कैसी निष्ठुर होऊन ॥ परत्रदेशीं गेलीस तूं ॥२५॥

हे पिंगले तुझा मी पती ॥ नव्हतों शत्रु होतो या जगतीं ॥ कैसें जल्पूनि कुडेमती ॥ भस्म तूतें म्यां केलें ॥२६॥

अहा मी पतित दुष्ट दुर्जन ॥ मूढमतीनें घेतला प्राण ॥ तरी मी तुझा शत्रु पूर्ण ॥ पति न म्हणें पिंगलें ॥२७॥

ऐसें म्हणोनि अंग धरणीं ॥ टाकी हा हा शब्द करोनी ॥ हदय पिटी दणाणोनी ॥ महीं मस्तक आफळीतसे ॥२८॥

अहा पिंगला म्हणोन ॥ हांक मारी अट्टहास्येंकरुन ॥ अहा पिंगले एकदां तव वदन ॥ मज दृष्टी दावीं कां ॥२९॥

अहा पिंगले परत्रभुवनीं ॥ गेलीस मातें तूं सांडोनी ॥ हदय पिटी दणाणोनी ॥ महीं मस्तक आफळीतसे ॥१३०॥

हें पिंगले आसनीं शयनीं ॥ मज बैसवीत होतीस अंतःकरणी ॥ आतां माझा विसर धरोनि ॥ कैसी राहसी परत्र ॥३१॥

अहा पिंगले तुजवांचून ॥ सर्वत्र मातें दिशा शून्य ॥ अहा पिंगला माझा प्राण ॥ कुडी टाकून गेलासे ॥३२॥

अहा पिंगले तुजवांचून ॥ सर्वत्र मातें दिशा शून्य ॥ शून्यमंदिरीं निद्राशयन ॥ कैसें येईल सांग पा ॥३३॥

अहा पिंगले माझी अधिक ॥ जाणत होतीस तृषाभूक ॥ आतां निष्ठुर मन केलें निक ॥ कैसी सांडूनि गेलीस तूं ॥३४॥

अहा पिंगले माझे शयनीं ॥ होतीस मृदु भाषणें करुनीं ॥ पाहतां उर्वशी दिसे नयनी ॥ संतोष माझा होतसे ॥३५॥

ऐसें पाहूनि सुगंधद्रव्य मी ॥ रुंजी घाली षटपदकामी ॥ ऐसें सुखसरितासंगमीं ॥ सुख कोठें पाहूं आतां ॥३६॥

यापरी पिंगले तव गुण ॥ दयचें भांडार मुक्त करुन ॥ कीं जगाचें करिसी पालन ॥ धर्मानुकूळें सर्वस्वीं ॥३७॥

ऐसिया प्रज्ञेचें पहुडपण ॥ पिंगले कोठें मी जाऊन ॥ ऐसें म्हणूनि धडाडून ॥ धरणीं अंग सांडीतसे ॥३८॥

यापरी सर्व जाणोनि लोक ॥ रायाचा पाहूनि शोक ॥ गहिंवर येतसे आणीक ॥ शोकशब्देंकरुनियां ॥३९॥

कीं तरु मलयागरा ॥ गंधी मिरवती समग्रा ॥ तैसें रायाच्या शोकपारा ॥ शोकें व्याकुळित जाहले ॥१४०॥

असो हा ग्रामांत वृत्तांत सकळां ॥ कळला परी सुखवसा झाला ॥ जैसा प्राण जावोनि आला ॥ शवशरीरा पुन्हां कीं ॥४१॥

मग गांवीचें ग्रामजन ॥ स्मशानाजवळी आले धावोन ॥ परी रायाचा शोक पाहून ॥ तेही तैसेचि होती पैं ॥४२॥

परी तो मायिक सहजस्थितीं ॥ दुःखरहित शोकावरती ॥ जैसे बहुरुपी खेळाप्रती ॥ शूरत्व मिरविती अपार ॥४३॥

कीं गुर्जरदेशीं चाल सधन ॥ रुदन घेती मोल देऊन ॥ तैसे घरचे सर्व जन ॥ येती प्रेतसंस्कार करावया ॥४४॥

तन्न्यायें शोक करीत ॥ राव पडला शोकार्णवांत ॥ न वर्णवे तो आकांत ॥ अल्प येथे वर्णिला ॥४५॥

असो ऐसी रुदनस्थिती ॥ ज्याची त्याला माया चित्तीं ॥ परी ते लोक अभाव नीतीं ॥ समजाविती रायातें ॥४६॥

तुम्ही सर्वज्ञ सकळराशी ॥ बोध करिता अन्य जनासीं ॥ होऊनी गेलें होणारासी ॥ आश्चर्य याचे कायसें ॥४७॥

म्हणती महाराजा भविष्योत्तर ॥ होऊनि गेलें ते होणार ॥ तयाच शोक करणें चतुर ॥ योग्य आम्हां दिसेना ॥४८॥

अशाश्वताचा शोक करणें ॥ तरी काय शाश्वत आपुलें जिणें ॥ पिंगला गेली आपणही जाणें ॥ कदाकाळीं सुटेना ॥४९॥

पहा आपुले पूर्वज अपार ॥ मृत्यु पावले समग्र ॥ एकामागें एक सर्वत्र ॥ गेले न राहिले मेदिनी ॥१५०॥

कीं आजा गेला नातु उरला ॥ ऐसा कोणी पाहिला ॥ तरी अशाश्वताचा घट भरला ॥ रिता होय क्षणमात्रें ॥५१॥

तरी हे सकळ अशाश्वतपण ॥ पूर्ण मानिती ज्ञानवान ॥ तरी तयाचा शोक करुन ॥ व्यर्थ जीवा कष्टवितां ॥५२॥

अहा पाहती जपी तपी ॥ सिद्ध साधक नानारुपी ॥ कोण वांचले देहसंकल्पी ॥ मृत्युभुवनीं महाराजा ॥५३॥

तरी जी जी जाईल घडी ॥ तीं सुखाचीच मानावी प्रौढी ॥ ईश्वरनामीं ठेवूनि गोडी ॥ चित्त स्थिर असावें ॥५४॥

ऐसें बोधितां सर्वही जग ॥ युक्तिप्रयुक्तीं नानाबोध ॥ परी रायाचे हदय चांग ॥ शोककाजळी उजळेना ॥५५॥

मग ते ग्रामीचे सकळ जन ॥ थकित झाले बोध करुन ॥ एकामागें एक उठोन ॥ आपुल्या सदना सेविती ॥५६॥

असो तीही लोटली रात्री ॥ उदया आला गभस्ती ॥ पिंगलाचितेची पाहुनि शांती ॥ पावक झाला अदृश्य ॥५७॥

मग तो मानूनि दुसरा दिन ॥ पुन्हां पातले आप्तजन ॥ उत्तरक्रिया संपादोन ॥ अस्थिमिलन केले तैं ॥५८॥

तें भर्तरीरावें पाहून ॥ चित्तीं विचार करितां पूर्ण ॥ घेऊं देईना अस्थिसंचयन ॥ स्पर्श कोणा न करवी ॥५९॥

आपण बैसूनि चिता रक्षीत ॥ कोणा लावूं देईना हात ॥ मग ते आप्त जन समस्त ॥ पुन्हां गेले माघारे ॥१६०॥

परी तो राव तैसाचि चितेंत ॥ बैसता झाला दिवसरात ॥ अन्नपाणी त्यजूनि समस्त ॥ पिंगला पिंगला म्हणतसे ॥६१॥

मग हें निर्वाणीचें वर्तमान ॥ मिथुळेसी दूत सांगती जाऊन ॥ राव विक्रम करितां श्रवण ॥ निघता झाला तेथोनी ॥६२॥

सत्यवर्मादि शुभविक्रम ॥ विक्रमादि सुमति प्रधान ॥ परम शोकार्णव रचून ॥ अवंतिके पातले ॥६३॥

मग येतांचि स्मशानवाटीं ॥ पिंगला आणूनि चित्तदृष्टि ॥ परम शोकें जाहला कष्टी ॥ शोकसिंधूंत निमग्न ॥६४॥

आठवी सर्व कन्येचे गुण ॥ म्हणें मम हातीचें गेलें निधान ॥ विक्रम म्हणे मम गृहीचे रत्न ॥ काळतस्करें नेलें कीं ॥६५॥

अहा माउली उभयकुळांत ॥ तारक झाली भवसरितेंत ॥ पुन्हां दीपाची लावी वात ॥ अदृश्य कैसी झाली वो ॥६६॥

अहा स्त्रीकटकीं अंतःपुरीं ॥ मुख्य मिरवीत होती सज्ञानलहरी ॥ जैसा हस्ती चमूभीतरी ॥ चांगुलपण दावीतसे ॥६७॥

रुपवंत गुणवंत ॥ सर्व लक्षणीं ज्ञानवंत ॥ सूचक सदा सर्वकाळ संगोपीत ॥ चित्त सकळांचे लक्षी कीं ॥६८॥

ऐसे आठवोनि नाना गुण ॥ शोक करी अति दारुण ॥ मग विक्रम नृपति पुढें होऊन ॥ भर्तरीलागीं समजावी ॥६९॥

नाना युक्ति नाना वचन ॥ भर्तरीचें बोधी मन ॥ परी तो नायके पिसाटपण ॥ पिंगला पिंगला वदतसे ॥१७०॥

परी राव बोध करितां उत्तम ॥ लोटून गेला दिन दशम ॥ मग विक्रमें उत्तरक्रिया करुन ॥ शुचिर्भूत जाहला ॥७१॥

यापरी पुढें तेरावे दिवशीं ॥ जातिभोजन दानमानेसी ॥ सर्व उरकोनि राज्यासनासी ॥ घेऊनि राव बैसला ॥७२॥

भर्तरी न सोडी स्मशानवाटिका ॥ धरुनि बैसला अचळ निका ॥ जैसा वृंदे धरुनि हेका ॥ विष्णु बैसला स्मशानीं ॥७३॥

ऐसेपरी अचलपण ॥ मिरवता झाला मित्रनंदन ॥ परि नित्य नित्य विक्रम येऊन ॥ बोध त्यातें करीतसे ॥७४॥

ऐसा बोध करितां नित्य ॥ द्वादश वर्षे लोटलीं सत्य ॥ पर्णतृण भक्षूनि जीवित ॥ उदकआहारें राखिलें ॥७५॥

अहा देवा अनाथनाथा ॥ कैसें केलें त्वां अनंता ॥ पिंगला माझी सगुण कांता ॥ तूतें कैसी आवडली ॥७६॥

ऐसें म्हणोनि नामोच्चार ॥ शोक करीतसे वारंवार ॥ रात्रदिवस चित्तीं विसर ॥ पिंगलेचा पडेना ॥७७॥

कृश शरीर झालें तेणें ॥ कंठी उरलासे प्राण ॥ मुखीं आणूनि हरीचें नाम ॥ शोकें पिंगला वदतसे ॥७८॥

ऐसीं लोटलीं द्वादश वर्षे ॥ शुचिष्मंत झालें शरीर कृश ॥ तें पाहूनियां अति क्लेश ॥ मित्रावरुणी द्रवलासे ॥७९॥

पुत्रमोहाचे अपार भरतें ॥ लोट लोटले चित्तसरिते ॥ मग मित्रावरुणी तुष्टोनि मनांत ॥ अत्रिजानिकटीं पातला ॥१८०॥

तंव तो प्राज्ञिक अत्रिनंदन ॥ मित्रावरुणीस सन्मान देऊन ॥ म्हणे महाराजा कामना कोण ॥ धरुनि येथें आलासी ॥८१॥

येरी म्हणे जी द्विजोत्तमा ॥ ज्ञानलतिकेच्या फलद्रुमा ॥ जाणत असूनि पुससी आम्हां ॥ अज्ञानत्व घेऊनि ॥८२॥

तरी तव शिष्य जो भर्तरी ॥ त्याची कैसी झाली परी ॥ तें हदयीं आणूनि हितातें वरी ॥ विलोकी कां महाराजा ॥८३॥

मग तो महाराजा ज्ञानवान ॥ हदयीं पाहे विचारुन ॥ तों विपत्काळीं शोकेंकरुन ॥ भर्तरीनाथ मिरवला ॥८४॥

अति क्लेश तयाचे पाहून ॥ परम द्रवला मोहेंकरुन । मग मित्रावरुणीतें बोले वचन ॥ चिंता न करी महाराजा ॥८५॥

तुम्हीं जावें स्वस्थानासी ॥ मी भर्तरीचे आहे उद्देशीं ॥ स्वहित करीन चिंता मानसीं ॥ पाळूं नका महाराजा ॥८६॥

माझा शिष्य जो मच्छिंद्रनाथ ॥ तयाचा गोरक्ष प्रज्ञावंत ॥ तो महीं भ्रमत करीत तीर्थ ॥ येथें येईल महाराजा ॥८७॥

तो परम आहे प्रज्ञावान ॥ तयासी तेथे पाठवीन ॥ तो नाना प्रयुक्ती करुन ॥ शुद्ध पंथा आणील कीं ॥८८॥

ऐसें बोलता मित्रावरुणीसी ॥ संतोषें मिरवला तो चित्तासी ॥ मग पुसूनी अनसूयात्मजासी ॥ स्वस्थानासी पैं गेला ॥८९॥

यावरी पुढील अध्यायीं कथा सुंदर ॥ अध्यात्मदीपिका मनोहर ॥ मालू सांगे धुंडीकुमर ॥ नरहरीकृपेंकरोनियां ॥१९०॥

दत्त सांगेल गोरक्षनाथा ॥ गोरक्ष येऊनि विरहसरिता ॥ शोषण करील तत्त्वतां ॥ घटोदभवाचे कृपेनें ॥९१॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ अष्टाविंशति अध्याय गोड हा ॥१९२॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ अध्याय २८॥ ओव्या ॥१९२॥

॥ नवनाथभक्तिसार अष्टाविंशतितमोध्याय समाप्त ॥


श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय २९

श्रीगणेशाय नमः

रुक्मिणीवरा कमलाकांता ॥ चाणूरमर्दना वसुदेवसुता ॥ कंसारी तूं जगत्राता ॥ वासुदेवा जगदीशा ॥१॥

शेषशायी हलधरभ्राता ॥ भावप्रिया सुदर्शनदर्शिता ॥ द्रौपदीलज्जारक्षणकर्ता ॥ पाठिराखा मिरवसी ॥२॥

जैसा पांडवांचा पाठिराखा ॥ तैसा मिरवसी मम दोंदिका ॥ भक्तिसारग्रंथ कौतुका ॥ वाग्वरदा म्हणविसी ॥३॥

मागिले अध्यायीं विरहस्थिती ॥ लाधली गाढत्वें भर्तरीप्रती ॥ पिंगलेकरितां स्मशानक्षिती ॥ पूर्ण तप आचरला ॥४॥

तया क्लेशाचे उद्देशीं ॥ मित्रावरुणी दत्तापाशीं ॥ श्रुत करुनि स्वस्थानासी ॥ येऊनियां पोहोंचला ॥५॥

इतुकी कथा सिंहावलोकनीं ॥ चित्तीं धरावी श्रोतेजनीं ॥ यापरी पुढें ग्रंथमांडणीं ॥ सिद्ध अवधानी असावें ॥६॥

असो गर्भाद्रींत मच्छिंद्रनाथ ॥ ठेवूनि गोरक्ष करावया तीर्थ ॥ महीलागीं भ्रमत ॥ गिरनारप्रती पातला ॥७॥

तेथें भेटोनि दत्तात्रेयासी ॥ भावें नमिलें प्रेमराशीं ॥ श्रीदत्तें धरोनि हदयासी ॥ आनंदानें उचंबळला ॥८॥

श्रीकरपद्में मुखमंडन ॥ गोरक्षाचें कुरवाळूनि वदन ॥ निकट बैसविला हस्त धरोन ॥ अलाई बलाई घेतसे ॥९॥

मोहितवाणीं पुसतसे त्यातें ॥ म्हणे कोठें रे मच्छिंद्रनाथ ॥ तूं सोडूनि निरपेक्ष त्यातें ॥ महीलागीं भ्रमतोसी ॥१०॥

येरुं सांगे पुन्हां नमोन ॥ गर्भाद्रिपर्वती मच्छिंद्रनंदन ॥ राहिलासे स्वसुखेंकरुन ॥ जपजाप्यातें योजूनियां ॥११॥

मुहूर्तपणे स्वसुखासीं ॥ लाविलें असें तीर्थस्नानासी ॥ मग मी नानातीर्थउद्देशीं ॥ करीत आलों परियेसा ॥१२॥

ऐसा वदोनि वृत्तांत ॥ याउपरी बोले अत्रिसुत ॥ वत्सा कार्य लागलें मातें ॥ त्या कार्यातें संपादीं ॥१३॥

तरी म्हणसी कार्य कवण ॥ भर्तरी मम अनुग्रही नंदन ॥ तो स्वकांतेकरितां स्मशान ॥ द्वादश संवत्सर सेवीतसे ॥१४॥

अन्नोदकाचा त्याग करुन ॥ सेवोनि आहे तृणपर्ण ॥ कांता कांता चिंतन करुन ॥ द्वादश वर्षे बैसला ॥१५॥

तरी तुवां जावोनि तेथें ॥ सावध करीं युक्तिप्रयुक्ति ॥ सकळ दावीं अशाश्वत ॥ आपुले पंथीं मिरवावें ॥१६॥

त्यासी मीं अनुग्रह जेव्हां दिधला ॥ तेव्हांचि गुंतविला संकल्पाला ॥ कीं सोडूनि वैभवपंथाला ॥ नाथपंथीं मिरवेन मी ॥१७॥

तरी तया बोलासी जाण ॥ दिवस लोटूनि गेले पूर्ण ॥ मग जन्मापासूनि सकळ कथन ॥ भर्तरीच्या सांगीतलें ॥१८॥

समुचयगोष्ट ऐकूनि कथन ॥ मान तुकावी गोरक्षनंदन ॥ म्हणे महाराजा तव कृपेने ॥ कार्य सत्य करीन हें ॥१९॥

तव आज्ञा यापरी मातें असतां ॥ मग भर्तरी लोहातें आणीन कनकता ॥ ही अशक्य नसे मातें वार्ता ॥ अर्थ घडला सहजचि ॥२०॥

हें महाराजा तूं कृपाघन ॥ वर्षलासी मम देहकारण ॥ तैं भर्तरीतरुनें ज्ञानकण ॥ अनायासें कणसेंचि ॥२१॥

तव कृपा जवळी असतां ॥ मग भर्तरीक्षुधेची कामवार्ता ॥ ही अशक्य नसे मातें करितां ॥ तृप्त सिद्धीतें भिनवाया ॥२२॥

कीं तव कामकल्पतरु ॥ मम चित्तागणीं पावला विस्तारु ॥ तेथें भर्तरीहीनत्वविचारु ॥ दरिद्रातें उरेना ॥२३॥

तरी आतां बोलतों प्रमाण ॥ कार्य आपुलें करुनि देईन ॥ ऐसें म्हणोनि वंदोनि चरण ॥ शीघ्रगती निघाला ॥२४॥

व्यानअस्त्र जपोनि होटीं ॥ भाळी चर्चिली भस्मचिमुटी ॥ मग व्यानमंत्रे महीपाठी ॥ गमन करुं निघाला ॥२५॥

लवतां डोळ्याचें पातें ॥ क्षणें आला अवंतिकेप्रत ॥ पन्नास योजनें निमिषांत क्षितींत ॥ लंघोनिया पातला ॥२६॥

तों गोरक्ष येतां स्मशाननिकट ॥ दुरोनि पाहे भर्तरी नेट ॥ तों सर्वांग दिसे अटि कृशवट ॥ अस्थिगत प्राण देखिला ॥२७॥

मुखीं तितुकीच सहजध्वनी ॥ म्हणे राम हे बरवी केली करनी ॥ आम्हां उभयतांची तुटी करोनी ॥ पिंगला नेली जवळिके ॥२८॥

ऐसी सहजध्वनि ऐकोन ॥ पाहूनि तयाचें कृशपण ॥ परम चित्तीं हळहळोन ॥ चकचकाव मानीतसे ॥२९॥

चित्तीं म्हणे अहा कठिण ॥ राव आचरे परम निर्वाण ॥ अस्थिमय राहिला प्राण ॥ त्वचा व्यक्त होऊनियां ॥३०॥

तरी ऐसा विरह जयासी ॥ बाणलाहे पूर्ण मानसीं ॥ तो वरपंगी वाग्वरासी ॥ कदाकाळीं मानीना ॥३१॥

तरी यातें आम्ही जें बोलूं ॥ तें तें सकळ होय फोलू ॥ जैसा क्षुधेला वेळू ॥ पळवा तेथें मिरवेना ॥३२॥

जैसा खापरासी परीस भेटे ॥ व्यर्थ होय यत्नपाठ ॥ तेवीं बोधितां बोध अचाट ॥ व्यर्थपणीं मिरवेल ॥३३॥

कीं हिंगतरु अपार विपिनीं ॥ त्यांत मैलागरु स्थापिला वनीं ॥ तया सुगंध लिप्तदुर्गध वनीं ॥ कदाकाळी तुटेना ॥३४॥

कीं शर्करेचे आळीपाळीं ॥ शक्रावणाच्या वेष्टिल्या वेली ॥ परी त्या कटुत्वपणा सकळां ॥ मधुरपणा मिरवेना ॥३५॥

कीं चतुराननाचे हस्तकमळीं ॥ जन्मभर स्थापिलें दरिद्र भाळीं ॥ तैं व्यवसायेंकरुनि नव्हाळी ॥ कदाकाळीं चालेना ॥३६॥

तरी आतां विचार येतां ॥ योजावा कांही बोधरहिता ॥ ज्यातें जैसी कामना स्थित ॥ तैसी स्थिती वर्तावी ॥३७॥

कीं श्वपुच्छा चक्रवेढा ॥ नीट होण्या यत्न पाडा ॥ तेवीं राव झाला वेडा ॥ शब्दबोध चालेना ॥३८॥

जैसा जो तैसाचि होतां स्थित ॥ मग संतोष मिरवे चित्त ॥ संतोष मिरवल्या कार्य प्राप्त ॥ घडोनि येतें सकळिकां ॥३९॥

पहा राम शत्रु दानवां ॥ परी विभीपण मिरवला भिन्नभावा ॥ तेणेंकरुनि स्ववैभवा ॥ भंगूं दिलें नाहींच कीं ॥४०॥

कीं बळियारायाचें जिणें ॥ त्यासी मिरवला तो वामन ॥ मातृशत्रू फरशधर होऊन ॥ तातासमान वहिवटला ॥४१॥

तन्न्यायें करुनि येथें ॥ रायासी ओपावें सर्व हित ॥ संतोष मिरवोनि अत्रिसुता ॥ कीर्तिध्वज लावावा ॥४२॥

मग जाऊनि अवंतिकेंत ॥ कुल्लाळगृहीं संचार करीत ॥ एक गाडगें आणूनि त्यातें ॥ बाटली नाम ठेविलें ॥४३॥

उपरी रंग चित्रविचित्र ॥ देऊनि रोगणीं केलें पवित्र ॥ मग तें चमकपणीं पात्र ॥ तेजालागीं दर्शवी ॥४४॥

परो अंतरीं पात्र कच्चेपणीं ॥ वरी रंग दावी लखलखोनी ॥ जेवीं वाढीव ब्रह्मज्ञानी ॥ परी अंतरी हिगो ॥४५॥

बोलतां ज्ञानी विशेष ॥ कीं प्रत्यक्ष मिळाला स्वरुपास ॥ ऐसें भासलें तरी ओंफस ॥ तरी अंतरी हिंगो ॥४६॥

नव तें मडकें कच्चेपणीं ॥ वरी सुढाळ दिसे रंग सन्मुख तत्त्वतां ॥ ठेंचेचे निमित्त करुनि नाथ ॥ भूमीलागी पडतसे ॥४८॥

अंग धरणीं देत टाकून ॥ सोंग दावी मूर्च्छापणें ॥ त्या संधींत बाटली कवळून ॥ बाटलीलागीं न्याहाळी ॥४९॥

असो बाटली गेली फुटोन ॥ मग सोंग मूर्च्छेचें सांवरोन ॥ भंवतें पाहे विलोकून ॥ बाटली झाली शतचूर्ण ॥५०॥

तंव ती देखिली शतचूर्ण ॥ मग उठतां झाला अहा म्हणोन ॥ म्हणे माझी माय बहीण ॥ वाटले कैसी फुटलीस तूं ॥५१॥

सकळ मेळवूनि तिचे खापर ॥ शोक करीतसे वारंवार ॥ ऊर्ध्वशब्दें गहिंवर ॥ लोकांमाजी दाखवी ॥५२॥

म्हणे अहा माझी बाटली ॥ दैवें कैसी फुटोनि गेली ॥ आतां ती माझी परम माउली ॥ कोणे रानी धुंडाळूं ॥५३॥

अहा माय गेलीस सोडोन ॥ आतां तुजसाठीं वेंचीन प्राण ॥ अहा विधात्या कैसें घडोन ॥ आणिलें तुवां या ठायी ॥५४॥

अहा माजे माय बहिणी ॥ कैसी गेलीस सोडोनी ॥ दाही दिशा मजलागोनी ॥ ओस करोनि गेलीस ॥५५॥

माये गे माय गा ठायीं ॥ तूं वांचली असतीस आपुले देहीं ॥ मी पावलों असतों मृत्युप्रवाहीं ॥ त्यांत कल्याण मानितो ॥५६॥

ऐसे शब्द रायें ऐकोन ॥ हास्य करी गदगदोन ॥ चित्तीं म्हणे पावलिला मरण ॥ मडक्याम काय मग करितां ॥५७॥

ऐसी अदेशा आणोनि चित्तीं ॥ हास्य वारंवार करी नृपती ॥ येरीकडे गोरक्ष क्षितीं ॥ आरंबळे अट्टाहास्यें ॥५८॥

धरणीं टाकोनि शरीर ॥ हदय पिटीं उभय करीं ॥ अहा बाटली वागुत्तरी ॥ ऐसें म्हणोनि आरंबळे ॥५९॥

म्हणे तूं गेलीस माय बहिणीं ॥ परी माझें आटलें सुदैवपाणी ॥ अहा माझा वासरमणी ॥ अस्ताचळा गेलासे ॥६०॥

अहा बाटली माझें घन ॥ कोणें दुर्जनें नेलें हिरावोन ॥ अहा बाटले तुझें वदन ॥ एकदां दावीं मजलागीं ॥६१॥

अहा बाटली परम धूर्जटी ॥ कोणी हिरावली मम अंधाची काठी ॥ ऐसें म्हणोनि वाग्वटी ॥ माय वदन दावीं गे ॥६२॥

ऐसें म्हणोनि दीर्घरुदन ॥ करीत आहे अट्टाहास्येंकरोन ॥ परी राव भर्तरी तें पाहुन ॥ चित्तामाजी चाकाटे ॥६३॥

अहा पिंगला हा पिंगला ॥ ऐसा घोप करीत बैसला ॥ परी तें पाहूनि विसरला ॥ मनीं आश्चर्य बहु मानी ॥६४॥

म्हणे वोंचिता दमडी अडका ॥ तयासाठीं धरुनि आवांका ॥ नाशवंत जाणे सर्व निका ॥ शोक केवीं करतसे ॥६५॥

ऐसें जल्पूनि चित्तीं ॥ निवांत बैसला तये क्षितीं ॥ परी हुडहुडी तरुफलाप्रती ॥ शांतपणें राहीना ॥६६॥

सुशब्दवाक्या अमृतपर ॥ सिंचिता झाला वागुत्तर ॥ म्हणे योगिया कां चिंतातुर ॥ शोक करिसी हें सांग ॥६७॥

अरे वेंचितां सापिका कवडी ॥ मडकें येईल पुन्हां आवडीं ॥ तयासाठीं शोकपरवडी ॥ करिसी काय हे मूर्खा ॥६८॥

ऐसें उत्तरद्रुमाचें फळ ॥ अर्थी ओपितां नृपाळ ॥ यावरी गोरक्षबाळ ॥ बोलता झाला तयातें ॥६९॥

म्हणे महाराजा नृपाळा ॥ तूं शोक करिसी कवण मेळा ॥ तरी दुःखाब्धिशोकजाळा ॥ प्रचीति पाहें आपुली ॥७०॥

तरी अहा पांथस्थ तूं प्रकाम ॥ कंठीं लागला जगाचा उगम ॥ तरी त्या उभवोनि अनर्थघाम ॥ सुख कैसें नांदेल ॥७१॥

तरी आपणावरुनि नृपती ॥ घ्यावी जगाची अर्थप्रचीती ॥ माझी बाटली फुटल्या क्षितीं ॥ दुःख जाणें मी एक ॥७२॥

राव ऐकूनि वागुत्तरा ॥ पुन्हां म्हणतसे ऐकिजे नरा ॥ मम दुःखाचा दृष्टांत खरा ॥ प्रचीतिरुपीं धरिला त्वां ॥७३॥

परी माझी पिंगला राणी ॥ मान पावली जेवीं सौदामिनी ॥ हारपली जैसी सौदामिनी ॥ परतोनि कैसी प्राप्त होय ॥७४॥

शतानुशत मडकीं मिळत ॥ प्राप्त करुनि देईन क्षणांत ॥ पिंगलेसमान स्त्रीरत्न ॥ कैंचे दुसरे मिळेल ॥७५॥

यावरी गोरक्ष बोले वचन ॥ तुझ्या पिंगला लक्षवधि जाण ॥ प्राप्त करीन एक क्षण ॥ परी ऐसी बाटली मिळेना ॥७६॥

ऐसें ऐकूनि नराधिप ॥ म्हणे पिंगलेचें स्वरुप ॥ गुणवती गंभीर दीप ॥ लक्षावधि दाविसी ॥७७॥

तरी लक्षावधि पिंगला मातें ॥ आतांचि दाखवीं सदगुरुभरिते ॥ तूतें बाटल्या शतानुशतें ॥ सिद्ध करितों या ठाया ॥७८॥

तरी तुझा चमत्कारु ॥ दावीं मातें कल्पतरु ॥ जैसा भूषण कृपापरु ॥ गुरुसुत तो गहिंवरला ॥७९॥

तरी बा समान करणी ॥ मातें मिरवेल अंतःकरणीं ॥ नातरी ढिसाळ बाटल्यावाणी ॥ परी अर्थ हिंगूच दिसतसे ॥८०॥

जैसें मृगजळाचें पाणी ॥ परी अब्धिसमान वाटे खाणी ॥ परी तृषाकोडाचा वासरमणी ॥ अतस्ताचळीं पावेना ॥८१॥

कीं शुद्ध ओडंबरी घन ॥ स्वगींहूनि करी गर्जन ॥ परी तोय लेशमान ॥ महीलागीं आतळेना ॥८२॥

कीं काजवा जो तो दिढवा दावी ॥ तरी कां तिमिरास तो आटवी ॥ तेवीं बोल फोलप्रवाहीं ॥ मिरवू नको योगेंद्रा ॥८३॥

ऐसें ऐकतां वचन ॥ म्हणे राया नरेंद्रोत्तमा ॥ पिंगलाउदय लक्षावधीन ॥ केलिया मज देसील काय ॥८४॥

येरु म्हणे पिंगला नयना ॥ दाविलिया पुरवीन इच्छिली कामना ॥ राज्यवैभव सुखसेवना ॥ संकल्पीन तुजलागीं ॥८५॥

ऐसें बोलतां नरेंद्रपाळ ॥ साक्ष कोण म्हणे गोरक्षबाळ ॥ येरु म्हणे पंचमंडळ ॥ साक्षभूत असती बा ॥८६॥

आणि अनलादि स्वर्गसविता ॥ जळपाताळ जळमही मान्यता ॥ हे साक्ष असती बा देस्वता ॥ पशु पक्षी मृगादिक ॥८७॥

जरी मज न घडे बोलासमान ॥ तरी पूर्वज सर्व पावती हीन ॥ स्वर्गवासी पावती पतन ॥ नरकवास भोगिती ॥८८॥

आणि शतजन्म रौरवकार ॥ महीं भोगीन वारंवार ॥ जरी मी न ओपीं राज्यसंभार ॥ तुजलागीं महाराजा ॥८९॥

ऐसें बोलूनि शपथपूर्वक ॥ पुन्हां बोले शपथदायक ॥ म्हणे महाराजा हे तपपाळक ॥ बोलासमान दावीं कीं ॥९०॥

जरी या बोलासमान राहणी ॥ तूं न दाखविसी मातें नयनीं ॥ तरी नरक पावसील सहस्त्र जन्मीं ॥ विहित वाचे अनृतत्वें ॥९१॥

ऐसी राजेंद्र बोले वाणी ॥ सत्यार्थ म्हणतसे योगतरणी ॥ मग कामिनीअस्त्र पिंगलानामीं ॥ प्रयोगातें उच्चारी ॥९२॥

मग सहज करुनि ऊर्ध्व दृष्टी ॥ फेंकिता झाला भस्मचिमुटी ॥ तंव ते कामिनी अस्त्रपोटीं ॥ स्त्रिया कोटी उतरल्या ॥९३॥

मुख्य पिंगला जी भस्म झाली ॥ तीच अनंत मूर्ति धरुनि उतरली ॥ पाठीं पोटीं व्यापिली ॥ सन्मुख उभी राहिली रायाच्या ॥९४॥

राव पाहूनि पिंगलास्वरुप ॥ मोह कामाचा उजळला दीप ॥ सकळांसी बैसवोनि आपणासमीप ॥ संसारखुणा पुसतसे ॥९५॥

परी त्या पिंगला सगुणसरिता ॥ सर्व सांगती अचूक वार्ता ॥ सांगूनि उपरी बोधअर्था ॥ रायाप्रती बोलती ॥९६॥

म्हणती महाराजा प्राणेश्वरा ॥ मम विरहाचें शल्य बैसलें अंतरा ॥ परी अशाश्वताचा माथां भारा ॥ फुकटपणीं वाहिला ॥९७॥

म्यां चित्तीं करुनि तुमची प्रीती ॥ दाहूनि घेतले देहाप्रती ॥ पुन्हां उदय गोरक्षजती ॥ अनंत दृश्य पैं केलें ॥९८॥

केलें तरी तुम्हांभावनी ॥ मिरवणें मज पुन्हां अवनीं ॥ परी शेवटी मृत्युपणाची काचणी ॥ तुम्हां आम्हां असेचि ॥९९॥

तरी राया महीभोजा ॥ आतां संग सोडूनि माझा ॥ मोक्षमहींतळीं ध्वजा ॥ लावोनियां उभारी ॥१००॥

यापरी माझा काम चित्तीं ॥ वरुनि आचरला संसारनीति ॥ परी मुक्तिमोक्षाची मांदुस हातीं ॥ चढणार नाहीं महाराजा ॥१॥

मी पिंगला तुमची कांता ॥ आचार आचारलें पतिव्रता ॥ तेणें डौरवोनि श्रीवरें माथा ॥ दिधलें हिता मजलागीं ॥२॥

आतां तुमचे सर्व हित ॥ तुम्ही विलोका प्रज्ञावंत ॥ मी तुमची दासी तुम्हां संमत ॥ चालूं शकें महाराजा ॥३॥

ऐसे वदोनी निवांतपणीं ॥ पिंगला बैसली राव वेष्टोनि ॥ परी तो चमत्कार पाहोनि ॥ विस्मय त्यासी वाटला ॥४॥

मग धांवूनि गोरक्षचरणीं ॥ लोटूं पाहे दंडवत अवनीं ॥ परी सर्वज्ञ गोरक्ष धरुनि पाणी ॥ रायाप्रती बोलतसे ॥५॥

हे महाराज महीपाळ ॥ माझा गुरु जो मच्छिंद्रबाळ ॥ मच्छिंद्रनामें प्रतापशीळ ॥ शिष्य आहे दत्ताचा ॥६॥

तरी यापूर्वी तुझिया देहीं ॥ दत्तानुग्रह लाधला पाहीं ॥ तरी तूं मच्छिंद्रसहोदर महीं ॥ गुरु माझा अससी कीं ॥७॥

तरी तूं वंद्य आहेसी मातें ॥ म्हणोनि नमना अनुचित ॥ तरी माझा साष्टांग प्रणिपात ॥ तव चरणी असो कीं ॥८॥

तरी राया सदगुरुभ्राता ॥ सांग कीं कामना केवीं उदभवली चित्ता ॥ राज्यवैभव संसारदुहिता ॥ पिंगला भोगूं इच्छीतसे ॥९॥

किंवा सोडूनि सकळ संपत्ती ॥ कामनाविरह वैराग्य चित्तीं ॥ आचरुं ऐसी बोधमती ॥ तरी स्थिती सांग कीं ॥११०॥

जैसी कामना असे चित्ता ॥ तैसीच लाभेल तेजभरिता ॥ ऐसें बोलतां गोरक्षनाथा ॥ राव बोले उत्तर ॥११॥

म्हणे महाराजा द्वादश वरुनां ॥ बैसली पिंगलाउद्देशा ॥ परी पिंगला स्वरुपास ॥ प्राप्त झाली नाहीं कीं ॥१२॥

तरी येऊनि त्वरितात्वरित ॥ पिंगला दाविल्या शतानुशत ॥ तरी ऐसें सबळ सामर्थ्य ॥ राज्यपदीं दिसेना ॥१३॥

मी पूर्वीच भ्रांतीं वेष्टिलों ॥ श्रीगुरुचे हातापासूनि निसटलों ॥ निसटलों परी कष्टलों ॥ संसारतापामाझारीं ॥१४॥

तरी आतां कृपाघन ॥ दत्तदर्शनाचें अपार जीवन ॥ मज चातका करीं पान ॥ कृपाघना महाराजा ॥१५॥

आतां मातें संसारराहणी ॥ राज्यवैभव सुखावणीं ॥ तुच्छ लागे योगधर्मी ॥ प्रतापानें हीन तैं ॥१६॥

धन्य तूं एक प्रत्ययास ॥ पिंगला दाविली चमत्कारास ॥ जेवीं आवडी कुरुपाळास ॥ कौरवदर्शना दाविलें ॥१७॥

तैसें पूर्ण कथेंत ॥ दर्शन करविलें मातें येथ ॥ तरी मी न राहें भवभ्रांतींत ॥ वेष्टोनियां महाराजा ॥१८॥

आतां आचरेन पूर्ण योगा ॥ साधीन सकल कलांसी प्रयोगा ॥ माझा स्वामी अनसूयाकुशिगा ॥ रत्न मातें दावीं कां ॥१९॥

गोरक्ष म्हणे विरहे नृपाळा ॥ मनीं वरिली आहे पिंगला ॥ तरी लक्षावधी प्राप्त या वेळा ॥ तूतें झाल्या महाराजा ॥१२०॥

तरी तितुक्या भोगूनि आतां ॥ संतुष्ट करीं आपुल्या चित्ता ॥ येरु म्हणे एकीकरितां ॥ दुःख इतुकें भोगिलें ॥२१॥

मम लक्षावधी भोगून ॥ तयांचे दुःख अवर्णन ॥ कोणी भोगावें चंद्रार्कमान ॥ अवधीतें सांडोनियां ॥२२॥

एक वृश्चिक दंशिल्या अंगा ॥ वेदना होती भोगा ॥ त्यांत लक्षानुलक्ष सुयोगा ॥ दंशिल्या काय सांगावें ॥२३॥

तरी आतां असो कैसें ॥ पुन्हा अदृश्य करीं पिंगलेस ॥ आणि तूं राज्यवैभवास ॥ सांभाळ करीं महाराजा ॥२४॥

तरी माझिया स्वामीचे चरण ॥ आतां दावीं मजकारण ॥ इतुका उपकार करुन ॥ कीर्तिध्वजा मिरवीं कां ॥२५॥

मग अवश्य म्हणे गोरक्षसुत ॥ पुन्हां अदृश्य पिंगला समस्त ॥ मग धरोनि भर्तरीनाथाचा हस्त ॥ नगरामाजी आणिला ॥२६॥

आणिला तेव्हां हर्ष समस्तां ॥ लोटिती झाली आनंदसरिता ॥ विक्रमरायानें माथा ॥ गोरक्षचरणीं ठेविला ॥२७॥

रायें बैसवोनी कनकासनीं ॥ षोडशोपचारे पूजिला मुनी ॥ मग जोडोनियां पाणी ॥ गोरक्षकातें पुसतसे ॥२८॥

म्हने महाराजा मम भ्राता ॥ पिंगलाविरहें पेटल्या चित्ता ॥ कैसा आणिला देहावरता ॥ तरी कथा सांगावी ॥२९॥

मग रायातें सकळ कथन ॥ तुष्ट केला मनोधर्म ॥ उपरी वैराग्यसंकेत पावून ॥ पुढील कार्य सांगितलें ॥१३०॥

परी विक्रम तो सर्व मर्मज्ञ ॥ तुष्टतांचि मिरवी मनोधर्म ॥ यावरी बोलता झाला वचन ॥ गोरक्षकांतें तेधवां ॥३१॥

हे महाराजा कृपामूर्ती ॥ आपण बरीच योजिली युक्ती ॥ परी आपण येथ षण्मास वस्ती ॥ भ्रात्यासमवेत करावी ॥३२॥

म्हणाल तरी काय कारण ॥ तरी द्वादश वर्षे सोडिले अन्न ॥ तेणें कृश शरीर होऊन ॥ प्राण डोळां उरलासे ॥३३॥

म्हणोनि आपणा विनंतिपत्र ॥ पुढें वाढितों पवित्र ॥ तरी तें स्वाद्वन्न सेवोनि चित्र ॥ मम मानसा पोसावें ॥३४॥

यावरी बोले गोरक्ष जती ॥ जाणत आहे माझे चित्तीं ॥ परी नेणों यावरी पुढें मती ॥ कैसी होईल रायाची ॥३५॥

त्याकरितां तप्तातप्त ॥ देईन रायाचें हातीं हित ॥ आतां राहणें योग्य मातें ॥ दिसत नाहीं महाराजा ॥३६॥

ऐसें विक्रमा गोरक्ष बोलोन ॥ प्रविष्ट झालें सकळांकारण ॥ द्वादशशत राण्या आदिकरोन ॥ वृत्तांत त्यांतें समजला ॥३७॥

मग तें असुख मानूनि चित्तीं ॥ शोकें युवती विव्हळ होती ॥ गोरक्षातें शिव्या देती ॥ मेला मेला म्हणोनियां ॥३८॥

नाना वल्गना बोलती ऐसी ॥ म्हणती होता दृष्टीसरसीं ॥ मेल्यानें येऊनि घातलें फांशीं ॥ दूरदेशा न्यावया ॥३९॥

तरी याचे जळो वदन ॥ नेतों आमुचें सौभाग्यरत्न ॥ ऐसें म्हणोनि म्लान वदन ॥ रुदनाते दाविती ॥१४०॥

असो यापरी विक्रपाकरितां ॥ त्रिरात्र झाला राहता ॥ मग भर्तरी गोरक्ष उभयतां ॥ निघते झाले तेथोनी ॥४१॥

राव विक्रमा आनंद चित्तीं ॥ उभयतांचे घेऊनि संगतीं ॥ बोळवीतसे अति प्रीतीं ॥ गोरक्षातें वंदूनिया ॥४२॥

परी स्त्रियांचे कटकांत ॥ थोर ओढवला आकांत ॥ शरीर टाकूनि भूमोवरतें ॥ आरंबळती अट्टाहास्यें ॥४३॥

आठवोनि रायाचे निपुण गुण ॥ स्त्रिया करिती अट्टहास्यें रुदन ॥ म्हणती आमुचा गेला प्राण ॥ रावशरीरी मिरवला ॥४४॥

येरीकडे गोरक्षनाथ ॥ भर्तरी आणि विक्रमासहित ॥ अपार मंडळ प्रज्ञावंत ॥ गांवाबाहेर पातले ॥४५॥

तों गोरक्ष पुसे भर्तरीतें ॥ कीं राज्यवैभव अत्यदभुत ॥ यांत मानस जरी गुंडाळत ॥ असेल तरी मज सांग ॥४६॥

ऐसी ऐकोनि गोरक्षवार्ता ॥ भर्तरी बोले प्रांजळ अर्था ॥ हे महाराजा वैभव नलगे चित्ता ॥ योग आचरुं वाटतसे ॥४७॥

राज्यवैभव कनककामिनी ॥ वाटले नीच वमनाहुनी ॥ लक्ष लावोनी श्रीगुरुचरणीं ॥ प्रचीत घेऊनि वहिवाटला ॥४८॥

मग आपुली शैली शिंगी कंथा ॥ झाला देता राया यशवंता ॥ भिक्षाझोळी घेऊनि हाता ॥ कुबडी फावडी ओपीतसे ॥४९॥

ऐसिया सरंजामेंकरुन ॥ रायासी बोलता झाला वचन ॥ वैभव मानसीं वमनासमान ॥ तरी प्रचीत दावी कां ॥१५०॥

तरी संचरोनि अंतःपुरांत ॥ कामिनी तुझ्या द्वादश शत ॥ त्या परक्या मानूनि चित्तांत ॥ भिक्षा मागूनि येईं मम दृष्टी ॥५१॥

ऐसें ऐकोनि भर्तरीनाथ ॥ अवश्य म्हणे काय आहे यांत ॥ मग तैसाचि उठूनि कृतांतवत ॥ अंतःपुरांत संचरला ॥५२॥

आदेश लक्ष निरंजन ॥ शब्द गाजवी सवालपण ॥ शिंगी सारंगी वाजवोन ॥ स्त्रियांचे सदनीं फिरतसे ॥५३॥

तों तें आधींच स्त्रीकटक ॥ बैसलें होतें करीत शोक ॥ त्याउपरी पाहुनि रायाचें मुख ॥ आक्रंदती अट्टहास्यें ॥५४॥

एक धरणीवरी लोळती ॥ एक कबरीकेश तोडिती ॥ एक मृत्तिका मुखीं घालिती ॥ मस्तक आपटिती धरणीये ॥५५॥

महीं आपटूनि कपाळ ॥ रुधिरें व्यक्त करिती बंबाळ ॥ एक उभयहस्तें वक्षःस्थळ ॥ धबधबां पिटिती पैं ॥५६॥

एक रडती एक पडती ॥ एक शोकें मूर्च्छित होती ॥ परिचारिका धांवोनि हस्तीं ॥ सावध करिती तयांतें ॥५७॥

एक म्हणे या रायासमान ॥ उपरी न देखों शतजन्म ॥ अहा रायाचें मायिक धन ॥ मायेहूनि आगळिक ॥५८॥

एक म्हणती अहा राव ॥ कैसा मिटला आमुचा भाव ॥ अहा विधात्या आमुचें दैव ॥ कैसे रेखिलें निजभाळा ॥५९॥

जैं वत्सालागीं गाय ॥ एक घडी न टाकूनि जाय ॥ त्याचि नीतीं तो पतिराय ॥ होय माय आमुचा ॥१६०॥

अगे स्नेहेकरुन एकशयनीं ॥ परमस्नेहाच चांगुलपणीं ॥ किंचित कोमाइलेपहात वदनीं ॥ अर्थ पुसे तयाचा ॥६१॥

पुसे परी इष्टार्थासमान ॥ राव पूर्ण करी स्नेहेंकरुन ॥ जैसी माय करी कन्येकारण ॥ तैसा लळा फळीतसे ॥६२॥

ऐसी माया जयाचे चित्तीं ॥ तो आतां होऊनि निष्ठुमती ॥ कैसा जातसे अदृश्य क्षितीं ॥ आम्हां शव करुनियां ॥६३॥

तरी आता अर्थहीन ॥ राया जातात आमुचे प्राण ॥ आम्हां निढळवाणी करुन ॥ अधोर रानीं सोडिसी ॥६४॥

ऐसें म्हणोनि आरंबळती ॥ उलथोनि महीवरती पडती ॥ पुन्हा उठोनि रायासी पाहती ॥ दैन्यवाणी शरीरें ॥६५॥

मग म्हणती अहा जी राव ॥ मिरवत होतासी कैसा भाव ॥ कीं महीलागीं कामदेव ॥ अवतार दुसरा दिसतसे ॥६६॥

अहो राजाचे वैभववर्णन ॥ ठेंगणा वाटतसे सहस्त्रनयन ॥ तो कुशशरीर दैन्यवाणा ॥ भिक्षा मागें घरोघरीं ॥६७॥

ऐसें बोलूनि पहात त्यातें ॥ पुन्हा सांडिती शरीरातें ॥ मग सकळ उठोनि रायातें ॥ वेष्टन घातलें स्त्रियांनीं ॥६८॥

म्हणती राया आम्हां सांडून ॥ दुर देशीं नको करुं गमन ॥ येथेंचि पाहूनि चंद्रवदन ॥ तुष्ट होतों आम्हीं कीं ॥६९॥

तरी आतां निःस्पृह निराश ॥ दाही दिशा पडल्या राया उदास ॥ तरी मुक्त करुनि आमुच्या प्राणांस ॥ पाऊल मग पुढें ठेवावें ॥१७०॥

ऐसें बोलतां राया मनीं ॥ संचरला त्र्कोधद्विमूर्धनी ॥ मग कुबडी उगारोनी ॥ निघता झाला माघारा ॥७१॥

परी तो गोरक्ष गुप्तहेर ॥ पा त होता चमत्कार ॥ राव निघतां त्यजूनि स्त्रिया सत्वर ॥ मान तुकावी गोरक्ष ॥७२॥

असो भर्तरी सहजस्थितीं ॥ निघतां मागे त्या युवती ॥ आरंबळोनि पाठी येती ॥ नको जाऊं म्हणोनियां ॥७३॥

आज द्वादश वर्षेपर्यंत ॥ बैसला होतासी स्मशानांत ॥ आतां जोग आचरण करुनि वनांत ॥ तैसाचि येथें राहें कां ॥७४॥

परी तो राव सकळ सांडोन ॥ गांवाबाहेर आला परतोन ॥ येरीकडे विक्रम उज्जयिनीं ॥ स्त्रिया गेल्या स्वस्थाना ॥७५॥

यापरी गोरक्ष भर्तरीनाथ ॥ पुसोनि निघाले विक्रमातें ॥ मग पदीं पदीं दुरवा होत ॥ अर्धकोस पैं गेले ॥७६॥

येरीकडे विक्रम नृपती ॥ परतोनि आला स्थानाप्रती ॥ परी अट्टहास्य पाहूनि अंतःपुराप्रती ॥ संचार करिता पैं झाला ॥७७॥

मग माय बहिणी कन्यासमान ॥ सकळां तोषवी बोध करुन ॥ येरीकडे उभयजन ॥ मार्गाप्रती गमताती ॥७८॥

परी कृशशरीरी भर्तरीनाथ ॥ अशक्त पद ठेवी कंठेना पंथ ॥ मग व्यानअस्त्र भस्मचिमुटींत ॥ स्थापिता झाला गोरक्ष ॥७९॥

मग तें भस्म चर्चिता भाळीं ॥ झडूनि गेली अशक्त काजळी ॥ मग क्षण पातीं लागतां डोळीं ॥ गिरनारपर्वतीं पोंचला ॥१८०॥

तों जातां देखें अत्रिनंदन ॥ पायीं लोटले उभयजन ॥ मग मायें उभयतां कवळून ॥ वदन इंदु कुरवाळी ॥८१॥

म्हणे वत्सा गोरक्षनाथा ॥ भर्तरीकरितां शिणविले तूतें ॥ ऐसें म्हणोनि कुर्वाळीत ॥ वारंवार मुखातें ॥८२॥

त्याच प्रकरणीं मोहस्थिती ॥ राया भर्तरीतें संपादिती ॥ म्हणे वत्सा श्रम बहुतीं ॥ आणिलें येथें मम वत्से ॥८३॥

असो स्थिति वृत्ति धृति सकळा ॥ एकमेकांतें घोंटाळा ॥ निवेदनीं चित्तीं संचियेला ॥ तोषाप्रती तरी वरितील ॥८४॥

असो आतां तुष्ट लक्षण ॥ पुढील अध्यायीं सांगेल धुंडीनंदन ॥ मालू नरहरिकृपेंकरुन ॥ संतगणीं मिरवला ॥८५॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ नवविंशति अध्याय गोड हा ॥१८६॥

शुभं भवतु ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

॥ नवनाथभक्तिसार नवविंशतितमोध्याय समाप्त ॥


श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय ३०

श्रीगणेशाय नमः

जयजयाजी जगदुद्धारा ॥ पंढरीअधींशा रुक्मिणीवरा ॥ सर्वसाक्षी दिगंबरा ॥ पुढें ग्रंथ बोलवी कां ॥१॥

मागिले अध्यायीं अनुसंधान ॥ भर्तरीस आले विरक्तपण ॥ गोरक्षजतीचे समागमें करुन ॥ गिरनार अचळा पोंचला ॥२॥

पोंचला परी रात्रदिन ॥ लेऊनि स्नेहाचें अपार रत्न ॥ तेणेंकरुनि उभयतां जाण ॥ सुशोभित पैं झालें ॥३॥

यावरी गोरक्ष तीन रात्री ॥ राहता झाला गिरनारपर्वती ॥ मग पुसूनी श्रीदत्ताप्रती ॥ मच्छिंद्राकडे चालिला ॥४॥

चालिला परी अत्रिसुत ॥ म्हणे बाळा गोरक्षनाथा ॥ मच्छिंद्रवत्स मम देहातें ॥ भेटला नाहीं बहुत दिवस ॥५॥

तरी तयाचे भेटी माझे चक्षु ॥ परम भुकेले योगदक्षु ॥ तरी त्या आणूनि मज प्रत्यक्षु ॥ भेटवीं कां जिवलगा ॥६॥

ऐसी ऐकतां दत्तात्रेयवाणी ॥ भेटवीन म्हणे गोरक्षमुनी ॥ मग श्रीदत्तात्रेयचरणां नमूनी ॥ निघता झाला गोरक्ष ॥७॥

श्रीमच्छिंद्रनाथमार्ग धरुन चालता झाला गोरक्षनंदन ॥ येरीकडे रायाकारण ॥ काय करी महाराजा ॥८॥

नाथदीक्षा देऊनि त्यासी ॥ मौळीं स्थायीं वरदहस्तासी ॥ चिरंजीवपद देऊनि त्यासी ॥ अक्षय केला महाराजा ॥९॥

जोंवरी कल्याण असे धरित्री ॥ चिरंजीव केला राव भर्तरी ॥ ऐसें वचन वागुत्तरीं ॥ प्रसादाते ओपिलें ॥१०॥

याउपरी अभ्यासास ॥ प्रारंभी नेमिला भर्तरीदास ॥ ब्रह्मज्ञान रसायनास ॥ कविता वेद सांगितला ॥११॥

ज्योतिष व्याकरण धनुर्धर ॥ जलतरणादि संगीतोत्तर ॥ वैद्य अश्व रोहिणी अपार ॥ गाढ आधींच होता तो ॥१२॥

कोकशास्त्रादि नारक – कळा ॥ चातुर्थभाष्य बोल रसाळा ॥ मीमांसादि पातंजला ॥ प्रवीण केला महाराजा ॥१३॥

यापरी वैद्यशास्त्र गहन ॥ सांगता झाला अत्रिनंदन ॥ वातास्त्रादिक जलद पूर्ण ॥ अग्निअस्त्र सांगितलें ॥१४॥

कामास्त्र धर्मास्त्र वाताकर्षण ॥ वज्रास्त्र पर्वतास्त्र वासवशक्ति दारुण ॥ नागास्त्र खगेंदास्त्र अस्त्रजीवनीं जीवन ॥ ब्रह्मास्त्रादि उपदेशी ॥१५॥

देवास्त्र काळास्त्र आणि मोहन ॥ रुद्राक्ष विरक्तास्त्र आते निपुण ॥ निर्वाण अस्त्रादि दानवप्रवीण ॥ रतवनास्त्रादि सांगितली ॥१६॥

कार्तिकास्त्र आणि स्पर्शास्त्र ॥ विभक्तास्त्रादि मानवअस्त्र ॥ विहंगम प्लवंगम कामिनीअस्त्र ॥ सकळ अस्त्रादि उपदेशी ॥१७॥

यावरी शस्त्रविद्या सघन ॥ पूर्वी होता राव निपुण ॥ त्रिशूळ फरश अंकुश मान ॥ धनुष्य तोमर असिलता ॥१८॥

परज मुदगर बरसी ॥ मांडूक चक्रें गदा उद्देशीं ॥ दारुकयंत्रे शस्त्रेंसीं बरसी ॥ कुठारादिकीं प्रवीण ॥१९॥

ऐसा शस्त्रविद्येकारण ॥ पूर्वीच होता राव प्रवीण ॥ त्यावरी अस्त्रविद्यारत्न ॥ गुरुमुखें लाधला ॥२०॥

मग ते विद्येसी अर्थ शेवटीं ॥ कीं कोंदण विराजे रत्नतगटी ॥ मग त्या हेमावटी ॥ मोल काय बोलावें ॥२१॥

कीं सुगंधित मलयागार ॥ त्या मिश्रित झालें मृगमदकेशर ॥ मग त्या गंधातें वागुत्तर ॥ कवण अर्थी बोलावें ॥२२॥

असो विद्यासंपन्न ॥ भर्तरीतें करुनि अत्रिनंदन ॥ उपरी साबरी व्यक्त करुन सदनातें पाठवी ॥२३॥

नाग पन्नग उभय ठायीं ॥ सकळ दैवतें तया प्रवाहीं ॥ मित्र कुंडासनीं वेढूनी महीं ॥ पाठवीत महाराजा ॥२४॥

मग तेथें जाऊनि भर्तरीनाथ ॥ साधिलें सकळ बावन्न वीरांतें ॥ जैसा मच्छिंद्र झाला क्लेशवंत ॥ त्याचि क्लेशा वरियेलें ॥२५॥

मग सकळ देव करुनि प्रसन्न ॥ पाहती श्रीगुरुचे चरण ॥ मग सवें घेऊनि अत्रिनंदन ॥ बद्रिकाश्रमीं पातला ॥२६॥

तेथें बैसवूनि पूर्ण तपासी ॥ मग घेऊनि गिरनारपर्वतासी ॥ राहते झाले सुखवस्तीमी ॥ मच्छिंद्रमार्ग विलोकीत ॥२७॥

तों येरीकडे गोरक्षनाथ ॥ पहाता झाला गर्भगिरी पर्वत ॥ परम आवडीं आनंदभरित ॥ मच्छिंद्रातें भेटला ॥२८॥

उपरी चरणीं ठेवूनि माथां ॥ म्हणे महाराजा आनंदभरिता ॥ तुमच्यां भेटीची क्षुधा नितांत ॥ कामानळू दाटला ॥२९॥

तरी तयाची घेऊं भेटी ॥ आनंदें होड दाटला पोटीं ॥ जैसी इंदूची अर्णवा गांठी ॥ प्रेमें लहरी उचंबळे ॥३०॥

कीं सोमातें कुमुदपती ॥ भेटी चुंबक काम वांच्छिती ॥ तन्न्यायें त्रिविधमूर्ती ॥ कामिनली भेटसी ॥३१॥

ऐसी गोरक्षकाची ऐकतां वाणी ॥ तोहि पडला कामवेष्टणी ॥ म्हणे वत्सा माझा स्वामी ॥ पाहूं ऐसें वाटतसे ॥३२॥

मग कांहीं दिवस तेथें राहून ॥ करिते झाले उभय गमन ॥ वैदर्भदेशींचा मार्ग धरुन ॥ गमत असती उभयतां ॥३३॥

तों कौंडिंण्यपुरीं सहज ग्रामांत ॥ करुं गेले उभय भिक्षेतें ॥ तों तेथींच शशांगर नृपनाथ ॥ कोपलासे स्वसुता ॥३४॥

कोपला परी चौहटआंत ॥ दूताहातीं ओपूनी सुत ॥ खंडित करुनि पदहस्त ॥ चौहटातें टाकिला ॥३५॥

यावरी श्रोते कल्पना घेती ॥ राव कोपला सुतावरती ॥ तो कोप तया कवण अर्थी ॥ सुतावरी पेटला ॥३६॥

तरी हे कविज्ञ महाराजा ॥ दावा सकळ निर्णयचोजा ॥ गूढत्व ठेवूनि ग्रंथी भोजा ॥ प्रांजळपणीं असावा ॥३७॥

ऐसें ऐकतां श्रोत्यांचें वचन ॥ कवि म्हणे घ्या अनुसंधान ॥ तेथींचा राव शशांगर नाम ॥ प्रज्ञावंत धार्मिक ॥३८॥

धैर्य औदार्य बाळ संपत्तीं ॥ सत्वस्थ यश करी कांतीं ॥ ऐसा असूनि शशांगर नृपती ॥ परी संतति नसे त्या ॥३९॥

संतति नसे तेणेंकरुन ॥ राव पेटला चित्तीं उद्विग्न ॥ न आवडे वैभव राज्यकारण ॥ छत्रसिंहासन नावडे ॥४०॥

नावडे आसन वसन शयन ॥ नावडे अन्नोदकादि पान ॥ नावडे चातुर्यभोगादि गायन ॥ कळाकुशळ गुणस्वी ॥४१॥

सदा विराजूनि एकांतस्थानीं ॥ वंशलतेची करी घोकणी ॥ तों एके दिवशीं मंदाकिनी ॥ कांता बोले रायातें ॥४२॥

म्हणे महाराजा नरेंद्रोत्तमा ॥ धाक धरितां संततिकामा ॥ परी लल्लाटरेषेच्या विधिउपमा ॥ नसल्या व्यर्थ कां धाक ॥४३॥

तरी सर्वज्ञा सहजस्थितीं ॥ चित्त मिरवा प्रांजळवृत्तीं ॥ व्यर्थ कांचणी शरीराप्रती ॥ न भंगूं द्यावें अनलातें ॥४४॥

राया वडवानळ चिंताक्लेश ॥ शरीरा साहूनि हरी प्रज्ञेस ॥ प्रज्ञेविण संसार ओस ॥ होत आहे महाराजा ॥४५॥

ऐसें बोलतां मंदाकिनी ॥ परी राया बोध न वाटे मनीं ॥ चित्तदरीं व्यग्र कांचणी ॥ संसारवल्ली सोडीन ॥४६॥

दिवसानुदिवस अति थोर ॥ नावरे चिंतावैश्वानर ॥ मग एके दिवशीं अति निष्ठुर ॥ शिव आराधूं बैसला ॥४७॥

मंत्रिकातें पाचारुन ॥ वैभव केलें त्यां स्वाधीन ॥ सवें स्वल्प दूत घेऊन ॥ दक्षिण दिशे चालिला ॥४८॥

रामेश्वरा काम वरुन ॥ जात शिवातें करुं प्रसन्न ॥ तों मार्गी चालतां कृष्णासंगम ॥ तुंगभद्रीं भेटला ॥४९॥

तेथें राहता मुक्कामासां ॥ शयन करितां निशीसी ॥ दशकर पंचानन स्वप्नासी ॥ येऊनिया बोलतसे ॥५०॥

म्हणे राया संसारवल्ली ॥ तव चिंतदरीं चिंत्ता व्यापिली ॥ तरी याचि ठायीं संतानवल्ली ॥ प्राप्त होईल तुज राया ॥५१॥

परी कृष्णातुंगभद्रा उभयसरितीं ॥ संगम चिमट्यांत तटक्षिती ॥ अपर्णेसहित माझी मूर्ती ॥ नित्य अची त्या लिंगी ॥५२॥

लिंग अर्चिता सकाम कामा ॥ स्वार्थ पावशी नरेंद्रोत्तमा ॥ याविण खंती जावया तुम्हां ॥ अन्य उपाय नसेचि ॥५३॥

ऐसा स्वप्नी दृष्टांत होतां ॥ तेंचि आवडे नरेशचित्ता ॥ मग मित्रडोहसंगमसरिता ॥ जाऊनियां विलोकी ॥५४॥

तों जुनाट लिंग दिसलें तेथ ॥ होतें तटीं प्रतिष्ठेरहित ॥ रावें पाहूनि सप्रेमभरित ॥ प्रतिष्ठेंत मिरविलें ॥५५॥

मेळवूनि पंचोपचारक ॥ तया उभवूनि प्रेम दोंदिक ॥ प्राणप्रतिष्ठा करुनि आरचक ॥ तया ठायीं मिरवला ॥५६॥

तयालागीं उत्साह थोर ॥ भावने रक्षी रामेश्वर ॥ परी कीर्तिध्वजे संस्कार ॥ अपार लोक मग येती ॥५७॥

करुनि हराचे जयजयकार ॥ अखंड होता नामीं गजर ॥ जय जय शिव संगमेश्वर ॥ ऐसें लोक बोभाती ॥५८॥

परी तयानिकट मध्यक्षिती ॥ भद्रसंगम ग्रामवस्ती ॥ तयामाजी भूदेव जाती ॥ एक असे प्राज्ञिक ॥५९॥

मित्राचार्य तयाचें नाम ॥ वेदपाठकी उत्तमोत्तम ॥ तयाचि दारा शरयू नाम ॥ पतिव्रता आगळीं ॥६०॥

आगळी परी संततीविण ॥ दोघे होती अति क्षीण ॥ मग ते उभयतां सुलक्षण ॥ त्याच शिवा अर्चिती ॥६१॥

ऐसें लोटतां काहीं दिवस ॥ तों स्वर्गी वर्तलें काय कथेम ॥ सर्व गण मिळूनि सभेस ॥ शिवा बैसले वेष्टुनी ॥६२॥

सुधाम अति मनोहारक ॥ रत्नजांडत तें हाटक ॥ तरी धाम नोहे वेडूर्यविकासिक ॥ शिवसभा मिरवतसे ॥६३॥

ऐसिये सभे ते काळीं ॥ बैसली असतां गणमंडळी ॥ सुरोचना अप्सरा चंद्रमौळी ॥ पाचारिता पैं झाला ॥६४॥

तंव ती सुरोचना देवांगना ॥ वेगीं येऊनि सिद्धांगणा ॥ मदनांतकाच्या लागूनि चरणा ॥ नाट्यपरी वहिवटली ॥६५॥

नाट्यें करितां चातुर्यगायन ॥ चतुर्थ स्वरीं परम संपूर्ण ॥ तानमानीं संकेत दावून ॥ नृत्य करी आगळी ॥६६॥

परी नृत्य करितां भावनेंत ॥ भावना कल्पी स्वचित्तांत ॥ कीं स्मरातीते होऊनि रत ॥ कामभावनें निवटावे ॥६७॥

ऐसिये कामनीं पेटूनि कामा ॥ परी काम दाटला शरीरउगमा ॥ तेणेंकरुनि नाट्यें उत्तम ॥ नृत्य करितां चांचरली ॥६८॥

चाचणी पाहूनि अपर्णाकात ॥ तियेची भावना आणूनि चित्तांत ॥ म्हणे कामीण कामानलातें ॥ पेटली ही अप्सरा ॥६९॥

तरी अहंकार विलक्षण ॥ योग्य नव्हे ही कामीण ॥ तरी ईतें सुलभ जन्म ॥ देऊनियां रत व्हावें ॥७०॥

ऐसी कल्पना आणूनि चित्तीं ॥ बोलतां झाला पशुपती ॥ म्हणे सुरोचने काम चितीं ॥ तुझा माते समजला ॥७१॥

तरी तूं ऐसिया भ्रष्टपणीं ॥ शीघ्र पावसी मृत्यु अवनीं ॥ भद्रसंगमीं जन्म घेऊनी ॥ विप्रकुशी मिरवसी ॥७२॥

मित्राचार्य पिता तया नाम ॥ माता शरयू परम सुगम ॥ तियेचे कुशीं तुज जन्म ॥ मानवदेहीं मिरवीं कां ॥७३॥

ऐसें वदता झाला अंत ॥ सुरोचना भयभीत ॥ चित्तीं म्हणे स्वर्गच्युत ॥ हीनदैवें झालें मी ॥७४॥

अहा चित्तीं उदेले दैवमांदुस ॥ तेथें उदेला दैवें खईस ॥ तेवी इच्छिल्या शिरवतीस ॥ अलाभातें मिरवलें ॥७५॥

अहा जी करुं जातां एक ॥ प्रारब्ध घडवी अनेक ॥ करी कवळिता रत्नमाणिक ॥ काचप्रणि निवडिला ॥७६॥

ऐसी सुरोचना चित्तीं चिंतून ॥ करिती झाली म्लानवदन ॥ उपरी तिनें स्तुतिस्तवन ॥ शिवालागीं आरंभिलें ॥७७॥

म्हणे महाराजा कैलासपती ॥ नंदीवहना चक्रवर्ती ॥ त्रिशूळपाणी सर्वागी विभूती ॥ व्यक्ताव्यक्त अससी तूं ॥७८॥

फरशांकुश गदा तोमर ॥ डंमरु चक्र कपालपात्र ॥ इहीं शोभती दशकर ॥ रुंडमुंडभूषणिका ॥७९॥

भाळी इंदू कबरी गंगा ॥ श्वेतवर्णा करिती योगा ॥ वस्ती सुलक्षें आवडे नगा ॥ पूर्ण जोगा साधावया ॥८०॥

तरी हे उमामायाधवा ॥ देवा श्रेष्ठा महाभावा ॥ विज्ञानधारणीं अनुभवा ॥ महादेव तुज म्हणती ॥८१॥

तरी आतां प्रज्ञावंता ॥ चुकुर माझी वारी व्यथा ॥ भोळेपणीं मानूनि चित्ता ॥ उश्शापातें वदावें ॥८२॥

ऐसी ऐकूनि तियेची वाणी ॥ तोषला मृडानीवर मनीं ॥ म्हणे सुरोचने तूतें अवनीं ॥ प्राप्त होईल निश्चयें ॥८३॥

परी माते तूं अर्चितां ॥ प्रत्यक्ष होऊनि तुझिया अर्था ॥ मग सहज माझा स्पर्श होतां ॥ स्वस्थानातें तूं येशी ॥८४॥

हाचि माझा वरउश्शाप ॥ तरी खेदातें करीं लोप ॥ ऐसें बोलतां गणाणिवभूप ॥ चालती झाली उर्वशी ॥८५॥

भद्रसंगमीं विप्रोत्तम ॥ मित्राचार्य पवित्र नाम ॥ शरयु कांते वरितां काम ॥ दृश्य झाली जठरातें ॥८६॥

पुढें लोटतां दिवसानुदिवस ॥ पूर्ण होतां नव मास ॥ कन्यारत्नपंकजास ॥ उदय झाला वेल्हाळ ॥८७॥

परी ती ठायीची उर्वशी ॥ कवणा न वर्णवे स्वरुपासी ॥ बालार्ककिरणी सतेजराशी ॥ कनकपंकजा मिरवतसे ॥८८॥

चंद्राननी आकर्ण नयन ॥ खंजरीटकलिका देदीप्यमान ॥ जिचें पाहतां मुखमंडन ॥ मदन मूर्च्छा वरीतसे ॥८९॥

जिचे दंत माणिकवर्णी ॥ अधर विकासत सुहास्यवदनी दंततेजें पाषाणतरणी ॥ रत्नपंकजा मिरवतसे ॥९०॥

पवळदेठी अधरभार ॥ सरळ नासिक पदनस्थिर ॥ परमतेजवंत वस्त्र ॥ पाहूनि चंद्र लाजतसे ॥९१॥

चंपकमालतीसुवासमाला ॥ कीं मलयागरें दिधली कळा ॥ ऐसें गंधी षटपदमेळा ॥ रुंजावया धांवतसे ॥९२॥

एक कोश वनांत ॥ तरु होती तैं सुगंधित ॥ मृत्तिका करुनि मृगमदास ॥ सर सर परतें म्हणविती ॥९३॥

ऐसियेपरी गजगामिनी ॥ दिवसेंदिवस वृद्धि होऊनि ॥ द्वादश वरुषें पवित्रपणीं ॥ कदंबा ऐसें मिरवतसे ॥९४॥

परी ती कदंबा शुभाननी ॥ द्वादश वरुषें इंद्रियदमनीं ॥ पिता पतीतें पडतां यत्नीं ॥ परी ती न वरी भर्त्यातें ॥९५॥

सदा विरक्त शिवस्मरणी ॥ शिवध्यान आसनीं शयनीं ॥ काया वाचा अंतःकरणीं ॥ शिववेधें वेधली ॥९६॥

शिवार्चनीं तात माता ॥ जाती नित्य उभयतां ॥ तयांसगें लावण्यलता ॥ कदंबाही जातसे ॥९७॥

बाळपणीं नित्यनित्य ॥ शिवा दर्शन तियेसी होत ॥ पुढें होतां वयस्थित ॥ शिव स्वतः अर्चीतसे ॥९८॥

ऐशीं लोटतां द्वादश वरुषें ॥ तों कोणे एके सुदिन दिनास ॥ गृहीं सांडूनि तातमातेस ॥ शिवालयी गेली ते ॥९९॥

तंव ते समयीं देवळांत ॥ कोणीच नसे एकांतात ॥ कदंबा तेथे संचार करीत ॥ एकटपणी शुभांगी ॥१००॥

जय जय हर म्हणूनि वाणी ॥ मस्तक ठेवी महीलागुनी ॥ ते समयीं मृडानीवर तीलागुनी ॥ अदृश्य होता त्या ठायीं ॥१॥

गुप्त तेथ शिव पंचानन ॥ पाहता झाला तियेकारण ॥ परी ती दारा सुलक्षण ॥ मुखमंडणीं देखिली ॥२॥

जैसी चपळा तेजभरित ॥ शिवधार्मी लखलखित ॥ तीतें पाहतां अपर्णानाथ ॥ कामवेष्टणीं पडियेला ॥३॥

मग हास्ययुक्त होऊनि कुमारतात ॥ मनीं इच्छी व्हावें रत ॥ ऐसें योजूनि चपळवंत ॥ धरुं पाहे ती चपळा ॥४॥

परी तो शिव तेजखाणी ॥ धांवतां देखिला जैसा तरणी ॥ तेणेंकरुनि भयभीत होऊनि ॥ पळूं लागे कदंबा ॥५॥

शिवालयातें सोडूनि बाहेरी ॥ येती झाली विप्रकुमरी ॥ परी तो शिव कामातुर ॥ तियेमागें धांविन्नला ॥६॥

पुढें कदंबा मागें भव ॥ उभयतां महीतें घेती धांव ॥ धांव घेतां सदाशिवे ॥ जाऊनियां स्पर्शिली ॥७॥

परी शिवस्पर्श होतां तीतें ॥ सांडी मानवतनूतें ॥ सुगेचना अप्सरा होऊनि त्वरित ॥ स्वर्गाप्रती चालिली ॥८॥

चालिली परी एकीकडे ॥ शिवकामाचा उजळिला पाड ॥ ठाव सांडूनि इंद्रियपाड ॥ द्रव द्रवला महीतें ॥९॥

द्रव द्रवतां महीपाठीं ॥ पाहतां झाला कृष्णातटी ॥ उदक मिळतां एकवटीं ॥ सकळ मासे संचरले ॥११०॥

संचरले परी पूर्वीपासून ॥ तये समयीं पर्वतघन ॥ तेणें प्रवाहीं कृष्णासंगमनीं ॥ रेतपात मिरवला ॥११॥

पर्जन्यकाळी तो अचाट ॥ जात होता कृष्णपात्रांत ॥ तये संधींत राव सुभट ॥ स्नानालागीं मिरवला ॥१२॥

स्नान करुनि शशांगर ॥ तटीं बैसला होऊनि स्थिर ॥ स्नानसंध्या सारोनि समग्र ॥ अर्घ्यप्रदानीं प्रवर्तला ॥१३॥

करीं घेतां कृष्णाजीवन ॥ तों रेत दाटले अंजुळींत येऊन ॥ मानवदेहाचा स्पर्श होऊन ॥ रेतीं पुतळा रचियेला ॥१४॥

रचिला परी न लागतां क्षण ॥ सकळ अवयव दैदीप्यमान ॥ रायें पाहतां प्रत्यक्ष वदन ॥ बाळतनूतें देखिलें ॥१५॥

पाहतांचि राजा हर्षयुक्त ॥ म्हणे मज पावला उमाकांत ॥ अयोनसंभव सुत ॥ प्रतापदक्ष मज झाला ॥१६॥

तरी हा कोणी महीअवतार ॥ असेल विरिंचि हरि हर ॥ वाचस्पति सहस्त्रनेत्र ॥ अवनीवरी उतरला ॥१७॥

ऐसा आनंद मानोनि चित्तीं ॥ उठता झाला तो नृपती ॥ बाळक कवळोनि हदयाप्रती ॥ शिबिरा प्रविष्ट पैं झाला ॥१८॥

मंदाकिनी सुंदर कांता ॥ परम सत्त्वस्थ पतिव्रता ॥ तिये करीं बाळ ओपितां ॥ पाहोनि तेही आनंदें ॥१९॥

रायासी म्हणे मंदाकिनी ॥ बाळ कोणाचा आणिला स्वामी ॥ राव म्हणे अर्घ्यजीवनीं ॥ उदय पावला करपात्रीं ॥१२०॥

तरी हा ईश्वरें पुत्र तूतें ॥ दिधला आहे उमाकांतें ॥ तरी पालन करुनि महीतें ॥ पुत्रवती मिरवें कां ॥२१॥

ऐसी ऐकूनि नरेंद्र वाणी ॥ परम हर्षली मंदाकिनी ॥ मग अति स्नेहाचें भरतें आणूनी ॥ बाळ हदयीं कवळिला ॥२२॥

लावितांचि स्तन मुखासी ॥ पान्हा आला स्तनासी ॥ संस्कारोनि कृष्णागर नामासी ॥ द्वादशावे दिनीं स्थापिलें ॥२३॥

यावरी राव शिवापासून ॥ निघतां झाला मग तेथून ॥ कौंडण्यग्राम अपूर्व स्थान ॥ येऊनियां पोंचला ॥२४॥

यावरी दिवसानुदिवस ॥ कृष्णागर पावला दश वर्षे ॥ मग विवाहचिंता शशांगरास ॥ स्नुषारुपी दाटली ॥२५॥

मग कर्दयमंत्री पुरोहित ॥ ऐक्य करुनि नृपनाथ ॥ देशावरी पाठवीत ॥ सुलक्षण कुमारी योजावया ॥२६॥

परी राव सांगे मंत्रिकांकारण ॥ कीं कुमारी पहावी सुलक्षण ॥ रुपवती गुणानें समान ॥ कृष्णागरासारखी ॥२७॥

अवश्य म्हणोनि मंत्रिकवृंद ॥ जात देशातें समुच्चयवृद ॥ पुरोहितादि पाहती संबंध ॥ कृष्णागर रायाचा ॥२८॥

नाना क्षेत्र राज्य पाहूनि ॥ कुमारी पाहे मंत्री नयनीं ॥ परी कृष्णागराच्या रुप मांडणी ॥ एकही कन्या आढळेना ॥२९॥

सकळ मंत्री देशोदेश ॥ पाहूं श्रमले कुमारीस ॥ परी सर्वसंपन्न तयांस ॥ कोणी एक आढळेना ॥१३०॥

रुप पाहती तों गुण हीन ॥ गुण पाहती तों स्वरुप हीन ॥ रुप गुण असतां घटित समान ॥ उभयतांचें येईना ॥३१॥

ऐसियेपरी सांगोपांग ॥ कोठेंहि दिसेना शुभमार्ग ॥ अति श्रमोनि लागवेग ॥ स्वस्थानासी पातले ॥३२॥

रायासी भेटूनि सांगती वृत्तांत ॥ कीं कन्यारत्नें अपरिमित ॥ गुणरुपघटितार्थ ॥ कोणी एक दिसेना ॥३३॥

आजवरी महाराजा ॥ द्विसंवत्सर लोटले काजा ॥ परी कन्यारत्न चोजा ॥ नातळे ऐसें झालेंसें ॥३४॥

ऐसें रायातें मंत्री सांगून ॥ पाहते झाले आपुलीं स्थानें ॥ याउपरी षणभास दिन ॥ लोटूनि गेले तयापाशीं ॥३५॥

याउपरी कोणे एके दिवशी ॥ कृतातभृत्य येऊनी महीशीं ॥ घेऊनि गेले मंदाकिनीसी ॥ परत्रदेशाकारणे ॥३६॥

मग सुशरीर मंदाकिनी ॥ रायें शशांगरें पाहनी ॥ परम विव्हळ झाला वियोगेंकरुनी ॥ शोकार्णवीं दाटला ॥३७॥

परी कैसाही असला मायिक देही ॥ मेल्यामागें मरत नाही ॥ असो उचंबळोनि शोकप्रवाहीं ॥ हुंदकिया संपादि ॥३८॥

उपरी उत्तरक्रिया करुनि ॥ राव सेवी सिंहासन ॥ त्यासही लोटल्या संवत्सर पूर्ण ॥ श्राद्धदशा उरकली ॥३९॥

उरकली परी कामिनीविण ॥ राया चित्तीं न वाटे कल्याण ॥ कामानळीं पंचप्राण ॥ व्याकुळ बहु होतासी ॥४०॥

परी राव तो इंद्रियदमनी ॥ कदा न पाहे व्यभिचार मनीं ॥ मग मंत्रिकासी बोलावुनी ॥ निक्ट बैसवी आपुल्या ॥४१॥

म्हणे मकरंदा सुलक्षणा ॥ तूं करुं गेलासी देशभ्रमणा ॥ परी कुमारी रुपवंत आणि सगुणा ॥ कोणी तरी आढळली कां ॥४२॥

मंत्री म्हणे जी नृपनाथ ॥ कुमारी आहे स्वरुपवंत ॥ आणि गुणही उत्तम दिसत ॥ परी घटित दिसेना ॥४३॥

उपरी मंत्रिका बोलत ॥ जरी सुतालागीं न उतरे घटित ॥ तरी आमुचे नामीं घटितार्थ ॥ शोध शोधूनि पहावा ॥४४॥

मंत्री म्हणे जी पुरोहितें ॥ टिप्पणे आणिली आहेत लिखितें ॥ तरी त्यातें पाचारुनि संबंधातें ॥ विलोकूनि पाहिजे ॥४५॥

मग पाचारुनि पुरोहितास ॥ सकळ कुमारीची टिप्पणें पहात ॥ तों चित्रकुटीचा नृपनाथ ॥ घटितार्थ आवडला ॥४६॥

नाम जया भुजध्वज ॥ धार्मिक प्राज्ञिक महाराज ॥ तयाची कन्या तेजःपुंज ॥ भुजावंती मिरवली ॥४७॥

रुपवंत गुणवंत ॥ तया नामीं आले घटित ॥ मग पाचारुनि मंत्रिकातें ॥ तया स्थानीं पाठविले ॥४८॥

मंत्री जाऊनि चित्रकूटासी ॥ पुन्हां भेटूनि भुजध्वजासी ॥ वृत्तांत सांगूनि सकळ रायासी ॥ लग्नपत्रिका काढिली ॥४९॥

लग्नपत्रिका आणि भृत्य ॥ लिहूनि पाठविले अर्जदास्त ॥ रायापाशीं येतांचि दूत ॥ वर्तमान निवेदिती ॥१५०॥

लग्नपत्रिका आणि दूत ॥ पाहूनि राव संतोषत ॥ मग सरंजामीं जाऊनि तेथ ॥ लग्नसोहळा उरकला ॥५१॥

मग ती कांता घेवोनि राव ॥ पाहता झाला आपुला ठाव ॥ उपरी दिवसेंदिवस थोरीव ॥ भुजावंती झालीसे ॥५२॥

त्रयोदश वर्षे व्यवस्थित ॥ भुजावंती मही मिरवत ॥ येरीकडे सप्तदश वर्षात ॥ कृष्णागरु मिरवला ॥५३॥

परी भुजावंती अंतःपुरांत ॥ धाम उभविलें एकांत ॥ अगम्य जितुके रायातें ॥ तितुके ती मिरवत ॥५४॥

असो एकांती भुजावंती ॥ सापत्नसुताची ऐकीव उक्ती ॥ होती परी दृष्टिव्यक्ती ॥ एकमेकांतें पाहती तीं ॥५५॥

तो कोणे एके सुदिनाशीं ॥ राव गेला मृगयेसी ॥ कृष्णागरु धामासीं ॥ वेधोनियां पहातसे ॥५६॥

सहज वावडी घेवोनि हातीं ॥ चित्त रंजवी खेळा निगुतीं ॥ तो येरीकडे भुजावंती ॥ धामावरी आलीसे ॥५७॥

राजकिशोर पाहूनि नयनीं ॥ दृष्टी वंचली सुतालागूनी ॥ तेणें वेष्टूनि पंचबाणी ॥ परिचारिके बोलत ॥५८॥

म्हणे पैल धामाप्रती ॥ वावडी उडवी वाताकृती ॥ त्यातें पाचारुनि उत्तमगती ॥ स्वधामातें आण वेगें ॥५९॥

ऐसें ऐकूनि दासी वचन ॥ पाहती झाली रजनंदन ॥ रायासी म्हणे तव मातेनें ॥ चित्तीं हेतू वरियेला ॥१६०॥

तरी महाराजा उत्तम जेठी ॥ शीघ्र चलावें तियेचे भेटी ॥ राव ऐकोनि कर्णपुटीं ॥ अवश्य म्हणे येतो कीं ॥६१॥

भवंडीदोर देत सेवकाहातीं ॥ आपण निघे सर्वज्ञमूर्ती ॥ सहज चाले सदनाप्रती ॥ जात आनंदेंकरोनियां ॥६२॥

रायें करुनि आणिले लग्न ॥ तेव्हां गेला होता दर्शना ॥ तयासी लोटले बहुत दिन ॥ म्हणे आजि सुदिन उगवला ॥६३॥

मज आज वत्सातें माउली ॥ कोणीकडूनि पान्हावली ॥ तरी आज भाग्य साउली ॥ सफळ पूर्ण झालीसे ॥६४॥

ऐसा आनंदोत्साह चित्तीं ॥ मानूनि जातसे नृपती ॥ सहज चालीं सदनाप्रती ॥ जावोनियां पोंचला ॥६५॥

तंव ती दारा उपरीवरी ॥ येतां पाहिलें कृष्णागरीं ॥ खालीं उतरुनि शयनगुहारीं ॥ पाहती झाली वेल्हाळी ॥६६॥

शयनसदनाचे धरुनि द्वार ॥ उभी राहिली ती सुकुमार ॥ तों परिचारिका कृष्णागार ॥ घेऊनियां पोचली ॥६७॥

पोंचली परी हस्तसंकेतें ॥ रायाप्रती दावी सदनातें ॥ आपुल्या घरीं दासी जात ॥ भेट करुनि उभयतां ॥६८॥

येरीकडे कृष्णागर ॥ चालीं चालतां गेला समोर ॥ जातांचि करी नमस्कार ॥ सापत्न माता म्हणोनि ॥६९॥

परी ती बाळा मदनबाळी ॥ वेष्टिली होती कामानळीं ॥ तेणें चित्तदरीं काजळी ॥ अज्ञानपणीं मिरवितसे ॥१७०॥

सुतें केला नमस्कार ॥ परी ती न वदे यावर ॥ तें पाहुनियां कृष्णागर ॥ मनामाजी चाकाटला ॥७१॥

परी निकट झालिया त्या वास ॥ येरी जाऊनि धरी हस्तास ॥ म्हणे माझे तुष्ट मानस ॥ कामानळें विझवीं कां ॥७२॥

राया तव स्वरुप अर्ककांत ॥ द्रवते झालें कामानळांत ॥ तरी चितेविण जाळूं पहात ॥ शांत करीं महाराजा ॥७३॥

ऐसें ऐकतां तियेचें वचन ॥ राव कोपे क्रोधेंकरुन ॥ म्हणे सेवूनि राहसी कानन ॥ सावजापरी काय वो ॥७४॥

तूं प्रत्यक्ष माझी सापत्न माता ॥ कुडी बुद्धी वरिसी चित्ता ॥ तरी या कृत्या कोण त्राता ॥ तूतें होईल पुढारा ॥७५॥

अहा स्त्रीजाती अमंगळा ॥ दुर्गमसरिता परम चांडाळा ॥ नेणें अनर्थासह बंडाळा ॥ जगामाजी वाढविती ॥७६॥

ऐसें म्हणूनि कृष्णागर ॥ आसडूनि चालिला आपुला पदर ॥ सदना येऊनि खेळावर ॥ तैसाचि पुन्हां वहिवाटला ॥७७॥

येरीकडे भुजावंती ॥ सुत ऐसे समजतां चित्तीं ॥ परम भयाचे व्याप्ती ॥ दासीलागीं पाचारी ॥ म्हणे बाई वो झालें विघ्न ॥

प्रेम भयानक घेईल प्राण ॥ तो परपुरुष नव्हता सापत्ननंदन ॥ अर्थ ओंगळ झाला गे ॥७९॥

तरी हा झाला वृत्तांत ॥ आतां रायास करील श्रुत ॥ श्रुत झालिया प्राणघात ॥ मिरवेल सखे मम देहीं ॥१८०॥

तरी आतां विष घेऊन ॥ द्यावा वाटते आपुला प्राण ॥ प्राण हरल्या सकळ कल्याण ॥ मजप्रती वाटतसे ॥८१॥

विपरीतात विपरीत करणी ॥ गुप्त राहील सकळ जनीं ॥ नातरी वांचल्या विटंबनी ॥ नाना क्लेशां भोगावे ॥८२॥

तरी यांतचि सारगोष्टी ॥ हेत मिरवावे मृत्युवाटीं ॥ नातरी वांचल्या राव शेवटीं ॥ विटंबोनि मारील गे ॥८३॥

मारिल्यास सर्व लोकांत ॥ बाई गे होईल अपकीर्त ॥ म्हणतील रांड परम कुजात ॥ भ्रष्टबुद्धि पापिणी ॥८४॥

असो ऐसा दुर्घट विचार ॥ ओढवला तरी सारांत सार ॥ गुप्तप्रकरणीं प्राणावर ॥ उदार व्हावें आपणचि ॥८५॥

ऐसी तीतें बोलतां युवती ॥ सखी होईल उत्तराप्रती ॥ तें पुढील अध्यायीं भक्तिसारग्रंथीं ॥ श्रवण करा श्रोते हो ॥८६॥

तरी हा ग्रंथ भक्तिसार ॥ तुम्हींच वदवितां मनोहर ॥ निमित्त मात्र धुंडीकुमर ॥ मालू नरहरीचा मिरवितसे ॥८७॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ त्रिंशति अध्याय गोड हा ॥१८८॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ अध्याय ॥३०॥ ओंव्या ॥१८८॥

॥ नवनाथभक्तिसार त्रिंशति अध्याय समाप्त ॥


श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय ३१

श्रीगणेशाय नमः

जयजयाजी जगत्पाळका ॥ जगत्पते वैकुंठनायका ॥ जगत्सृजका यदुकुळटिळका ॥ भक्तसखा तूं होसी ॥१॥

निखिलजीवन निर्विकारा ॥ विवेकरत्नवैरागरा ॥ शुद्धसत्त्वगुणगंभीरा ॥ रुक्मिणीवरदा दीनबधो ॥२॥

हे कृपार्णवा पंढरीनाथा ॥ पुढें बोलवीं भक्तिसारग्रंथा ॥ मागिले अध्यायीं अनाथनाथा ॥ जन्म चौरंगीचा करविला ॥३॥

करविला परी त्याचें कथन ॥ राहिलें तें ग्रंथीं लेखन ॥ आतां करवीं जगज्जीवन ॥ पुढें वैखरी बैसूनियां ॥४॥

तरी गताध्यायीं सापत्नमाता ॥ लोटली तातें कामसरिता ॥ परी कृष्णागर प्राज्ञिक सुता ॥ बळेंचि नेलें पाचारुनी ॥५॥

करुनि जननीचा धिक्कारु ॥ सदना गेला होता कृष्णागरु ॥ येरी सखी जीवापारु ॥ पाचारिली होता कीं ॥६॥

तिये सांगूनि सकल वृत्तांत ॥ प्राणघातासी झाली होती उदित ॥ परी ती सखी प्रज्ञावंत ॥ देत मसलते तियेसी ॥७॥

म्हणे बाई वो भुजावंती ॥ ईश्वरकरणी प्रारब्धगती ॥ जैसे असेल तैसी पुढती ॥ घडून येईल भिऊं नको ॥८॥

परी तूतें सांगेन हित कांहीं ॥ तैसेचि धरुनि जीवीं ॥ नको कष्ट मानूं आपुले देहीं ॥ शयन शयनीं करी आतां ॥९॥

शयन शयनीं केलिया पूर्ण ॥ राव येईल पारधीहून ॥ आल्या सेवील तुझें सदन ॥ परी तूं उठू नको कीं ॥१०॥

मग तो राव पुसेल तूतें ॥ तंव तूं सोंग दावीं शोकाकुलतें ॥ रुदन करुनि वदें रायातें ॥ प्राणरहित होय मी ॥११॥

आतां काय ठेवूनि प्राण ॥ झाला नाहीं अबूरक्षण ॥ ऐसें बोलतां राव वचन ॥ पुढें तुजशीं पुसेल ॥१२॥

पुसतां वदे कीं प्रांजळवंत ॥ कृष्णागर तुमचा सुत ॥ कामुक होऊनि मम सदनांत ॥ स्पर्शावया धांवला ॥१३॥

धांवला परी यत्नेकरुन ॥ बळें दिधला मागें लोटून ॥ ऐसें होतां अनुचित प्राण ॥ कैसा ठेवूं महाराजा ॥१४॥

ऐशा परी आराधूनि युक्तीं ॥ क्रोंध उपजवीं रायचित्तीं ॥ क्रोधवश झालिया राय नृपती ॥ कलहें मुला सोडील कीं ॥१५॥

मग तो कदा ना म्हणे सुत ॥ त्वरें करील प्राणरहित ॥ मग तूं सदनीं आनंदभरित ॥ सुखलाभातें सेवीं कां ॥१६॥

अंगीं विपतरुचा कोंब चांग ॥ खुडूनि टाकिल्यानें मार्ग ॥ मग विषाचा शरीरीं लाग ॥ कोठूनि होईल जननीये ॥१७॥

आधीं ठेचिल्या उरगमुख ॥ मग कैंचें मिरवेल विषदुःख ॥ कंटकी धरिल्या वृश्चिक ॥ वेदनेतें मिरवेना ॥१८॥

कीं वन्हि असतां धूम्रा कार ॥ वरी सांडावे लगबगे नीर ॥ मग धांव सदनापर ॥ घेत नाहीं जननीये ॥१९॥

तरी कृष्णागराचा वसवसा ॥ तव हदयी मिरवे स्वबाळफांसा ॥ तरी राया सांगूनि ऐशिया लेशा ॥ दुःखसरिता लोटवीं ॥२०॥

तरी त्या उदकाचे आधीं वळण ॥ दुःखसरिते बांधावे बंधन ॥ बंधन बांधिल्या सजीवपणें ॥ सुखे पुढें मिरवीं कां ॥२१॥

ऐसी सांगूनि ती युवती ॥ गेली आपुल्या सदनाप्रती ॥ येरीकडे भुजावंती ॥ कनकमंचकीं पहुडली ॥२२॥

त्यजूनि अन्नोदक स्नान ॥ कैंचे श्रृंगार कुंकुमलेण ॥ सर्व उपचारांतें त्यजून ॥ विन्मुख तई पहुडली ॥२३॥

तों येरुकडे शशांगर ॥ पारधी खेळूनि काननभर ॥ चिंताब्धीची फोडूनि लहर ॥ सदना तदा जातसे ॥२४॥

नाना गजरें यंत्रस्थित ॥ चमूअब्धीचा लोट लोटीत ॥ क्षेत्रपातीं पूर्ण भरित ॥ चमृतोयें तेधवां ॥२५॥

यावरी राव तो पूर्ण ज्ञानी ॥ संचार करी आपुले सदनीं ॥ दृष्टीसमोर न देखितां राणी ॥ परिचारिके विचारीतसे ॥२६॥

म्हणे कोठे आहे भुजावंती ॥ सन्मुख कां न आली पारधीप्रती ॥ आजि चुकुर होऊनि चित्तीं ॥ निंबलोणा नातळली ते ॥२७॥

रायातें बोलती परिचारिका ॥ हे महाराजा सद्विवेका ॥ आजि राणी कवण दुःखा ॥ दुखावली कळेना ॥२८॥

तेणेंकरुनि शयनापाटी ॥ निजली आहे होऊनि कष्टी ॥ होतांचि शब्द कर्णपुटी ॥ सदनामाजी संचरला ॥२९॥

तों ती मंचकीं भुजावती ॥ राव देखूनि बोले युक्तीं ॥ म्हणे कां हो कवण अर्थी ॥ शयन केलें जिवलगे ॥३०॥

परी तई उत्तरा न देती ॥ कांहींच न बोले रायाप्रती ॥ जीवन आणूनि नेत्रपातीं ॥ अश्रु ढाळी ढळढळां ॥३१॥

तें पाहुनियां राव दयाळ ॥ चिंत्तीं दाटला मोहें केवळ ॥ मंचकीं बैसे उतावेळ ॥ हदयीं धरीं कांतेतें ॥३२॥

अश्रुधारा नेत्रपातीं ॥ राव पुसी स्वयें हस्तीं ॥ चुंबन घेऊनि लालननीतीं ॥ अंकावरी बैसवीतसे ॥३३॥

अंकीं बैसवोनि स्वदारारत्न ॥ हेम जडावया करी यत्न ॥ राव कोंदणी हाटकप्रयत्न ॥ अर्थरत्ना जोडीतसे ॥३४॥

म्हणे सुखसरिते ॥ कोठूनि भेदलें गढोळ चित्तीं ॥ दुःखघनाचा वर्षाव अमित ॥ कोणें केला तो सांग ॥३५॥

मी राव महीचा भूप ॥ मी बोलणारा दर्पसर्प ॥ ऐशा व्याघ्राचा करोनि लोप ॥ दिधलें माप दुःखाचें ॥३६॥

तरी ती कवण पुरुष नारी ॥ तूतें अन्य झाली भारी ॥ तरी मातें बोलूनि वैखरी ॥ निमित्तमात्र दावीं कां ॥३७॥

अगे सहज दिठवा होते ॥ दावीन त्यातें अर्कसुत ॥ या बोलाची सहज भ्रांत ॥ मानूं नको जिवलगे ॥३८॥

अगे प्रिय तूं मातें अससी ॥ कोण गांजील उद्देशीं ॥ हरिबाळातें जंबुकलेशी ॥ दुःखदरी मिरवेना ॥३९॥

अगे मशकाचेनि पाडा ॥ धडके उतरे गिरीचा कडा ॥ कीं रामरक्षे भूतवडा ॥ रक्षणिया बैसतसे ॥४०॥

तेवीं तूं माझी पट्टराणी ॥ कोण घालूं शके काचणी ॥ नाम दर्शवीं प्रांजळपणीं ॥ मग ऊर्वी न ठेवीं तयातें ॥४१॥

ऐसें ऐकतां राववचन ॥ हदयीं तोषली अर्थार्थी सघन ॥ म्हणे महाराजा तव नंदन ॥ भ्रष्टबुद्धी व्यापिला ॥४२॥

आपण गेलिया पारधीसी ॥ एकांत पाहूनि मम उद्देशीं ॥ येथें येऊनि स्मरलेशी ॥ हस्त माझा धरियेला ॥४३॥

धरिला परी निर्दयवंतें ॥ कामें ओढिता झाला हस्त ॥ म्हणे चालावें एकांतांत ॥ सुखसंवाद भोगावा ॥४४॥

मग म्यां पाहूनि कामिकवृत्ती ॥ हात आंसडूनि घेतला निगुतीं ॥ भयार्थ मानूनि आपुले चित्तीं ॥ सदनामाजी पावलें ॥४५॥

पळता कोणे झाली अवस्था ॥ उलथूनि पडलें महीवरती ॥ परी म्यां धरुनि तैशीच शक्ती ॥ आड कवाड पैं केलें ॥४६॥

मग तो छलबलत्वहीन ॥ होऊनि पाहे आपुलें सदन ॥ तस्मात् आतां आपुला प्राण ॥ ठेवीत नाहीं महाराजा ॥४७॥

भलतैसिया गरळांत ॥ घेऊनि करीन प्राण मुक्त ॥ परी धैर्य वरिलें तुम्हांकरितां ॥ तुमचा मुखेंदु पहावा ॥४८॥

मज वाटलें पारधीचें कानन ॥ अति तीव्र कर्कश भयाण ॥ त्यातूनि तुम्ही जीवंतपणें ॥ कैसे याल वाटलें ॥४९॥

ऐसेपरी धुसधुशीत ॥ संचार होतां हदयांत ॥ म्हणोनि महाराजा येथपर्यंत ॥ प्राण देहीं रक्षियेले ॥५०॥

आतां याचि बोलापाठीं ॥ मी चकोर देहीं चंचुपुटीं ॥ तव आननेंदूचे जीवन शेवटी ॥ लक्षूनि तुष्ट झालें असें ॥५१॥

ऐसें बोलतां भुजावंती ॥ परम क्रोधावला नृपती ॥ परी क्रोध नव्हे क्षितीं ॥ वडवानलचि पेटला ॥५२॥

वडवानल तरी कैसा ॥ शिखा मिरवी अंबरलेशा ॥ सुतरत्नालागीं कैसा ॥ ग्रासूं पाहे क्षणांत ॥५३॥

मग तैसाचि येऊनि सदनाबाह्ये ॥ आरक्त नेत्रीं भंवता पाहे ॥ म्हणे कोणी तरी येथे आहे ॥ पुढें यावें माझिया ॥५४॥

तंव ते भृत्य धांवत येती ॥ भृत्य नव्हे ते कृत्तांत दिसती ॥ राव वरुनि क्रोधरीती ॥ स्वतां त्यांतें लोटीतसे ॥५५॥

म्हणे भृत्य हो याचि पावलीं ॥ जाऊनि मम सुताची करा होळी ॥ अथवा बंधन करुनि हस्तवेली ॥ खंडोनियां टाकाव्या ॥५६॥

ऐसें बोले नृपनाथ ॥ दूत धांवती वाताकृत ॥ सदन वेढूनि राजसुत ॥ मृत्युमहीं नेलासे ॥५७॥

परी ते सेवक ज्ञानखाणी ॥ पुनः जाती राजांगणी ॥ म्हणती महाराजा मृत्युभुवनीं ॥ कृष्णागरु पैं नेला ॥५८॥

राव क्रोधें तयां पहात ॥ म्हणे हस्तपादांते करा खंडित ॥ पुनः येवोनि सांगत ॥ धांवधांवोनि रायातें ॥५९॥

तरी रायाचा कोपानळ ॥ कदा न होय शीतळ ॥ पुनः पाहोनि दूतमेळ ॥ तीच आज्ञा आज्ञापा ॥६०॥

परी ते भृत्य देहस्थितीं ॥ म्हणती हा स्वामी राजसुत ॥ यासी वधितां काय अनर्थ ॥ कैसा होईल कळेना ॥६१॥

ऐसे संदेहें भयस्थित ॥ पुनः जाती राजांगणांत ॥ परी तो राव अति संतप्त ॥ तीच आज्ञा आज्ञापी ॥६२॥

मग ते दूत निष्ठुरपणी ॥ चौरंग आणिती कनककोंदणीं ॥ तयालागी बैसवोनी ॥ कार्यावर्ती वहिवटले ॥६३॥

शुद्ध चर्‍हाटें बांधोनि हस्त ॥ तदा नेत कृष्णागरातें ॥ म्हणती बंधसिद्ध केले हस्त ॥ खंडविखंड करावया ॥६४॥

परी कृष्णागर चव्हाटां नेला ॥ हा वृत्तांत सकळ ग्रामांत कळला ॥ मग चुंगारचुंगार मेळा ॥ विलोकावया धांवती ॥६५॥

येरीकडे येरीकडे राजांगणी ॥ मिळाले थोर प्राज्ञीं ॥ परी नृपतीचा क्रोधाचि पाहुनी ॥ बोलो न शकती कदाचित ॥६६॥

तरी वृत्तीचा क्रोधानळ ॥ लोकबोलाचें सुभद्रजळ ॥ प्राशनें भेणें उतावेळ ॥ धांव मागें घेतसे ॥६७॥

येरीकडे चव्हटेंशी ॥ कनकचौरंगी राजसुतासी ॥ दूर्ती बैसवोनि हस्तपादांसी ॥ योजिते झाले छेदावया ॥६८॥

शस्त्र करुनियां नग्न त्वरित ॥ एकें घायाळ केले हस्त ॥ तैसेचि झाले चरण व्यक्त ॥ भग्न होऊनि पडियेला ॥६९॥

एकचि आकांत वर्तला तेथें ॥ कोणी कोणा न विचारी जेथे ॥ पाहूनि सकळ संग्रामातें ॥ भयभीत संपूर्ण ॥७०॥

उपरी योजूनि पद निगुतीं ॥ तीक्ष्णधारा शस्त्रें हाणिती ॥ तीहीं एका घायें क्षिती पदकमलीं पडियेली ॥७१॥

मग रुधिराचा भडभडाट ॥ महीं लोटला अपार लोट ॥ जेवीं युवतिकुंकुममळवट ॥ तेवीं धारा शोभली ॥७२॥

परी राव तो कृष्णागर ॥ मूर्च्छेनें व्यापूनि तीव्र ॥ कनकासनीं चौरंगावर ॥ उलथोनियां पडियेला ॥७३॥

प्राण होऊनि कासावीस ॥ मुखावरी दाटला फेस ॥ उपरी कोरड पडली मुखास ॥ श्वेतनयन पैं केले ॥७४॥

मग तें दुःख पाहूनि लोक ॥ दुःखानें करिती महाशोक ॥ अहा कृष्णागरासारखें माणिक ॥ व्यर्थ राये भंगिले ॥७५॥

एक म्हणती म्हातारपणीं ॥ राव चळला आहे प्राज्ञी ॥ ऐसा पुत्र लावण्यखाणी ॥ नष्ट केला पदवीचा ॥७६॥

तरी राजा परम भ्रष्ट ॥ झाला आहे निर्दय नष्ट ॥ आतां येथें राहतां उत्कृष्ट ॥ योग्य काहीं दिसेना ॥७७॥

सहज प्रपंचाचे पाउलीं ॥ पडतसे आड पाउली ॥ परी रायें हदयीं क्षमा न केली ॥ घात करील कधीं तो ॥७८॥

अहा एकुलता एक बाळ ॥ त्यावरि पाखडिला क्रोधानळ ॥ मग प्रजान्याया कैसा शीतळ ॥ वृद्ध राव राहील हा ॥७९॥

एक म्हणे राजनीती ॥ तैशीच आहे सर्व क्षितीं ॥ गृहीं दाविली क्रोधसंपत्ती ॥ धाक पडेल प्रजेतें ॥८०॥

एक म्हणे भ्रष्ट कृष्णागर ॥ कुबुद्धि धरिली मातेवर ॥ तैं शिक्षा पावला साक्षात्कार ॥ राया दोष न लागेचि ॥८१॥

गौपीडक व्याघ्रे असला ॥ तरी कां मारुं नये त्याला ॥ तरी रायानें धर्म पाळिला ॥ लोभ धरिला नाहीं की ॥८२॥

वृश्चिक होतां दृष्टिव्यक्त ॥ तरी कां करुं नये प्राणांत ॥ दुष्ट आहे कीं धुसधुसीत ॥ मारु नये कीं त्याला ॥८३॥

ऐशा नानापरी युक्तीं ॥ तर्कवितर्क जग बोलती ॥ अपार मेळा चवाठ्याप्रती ॥ मिळाला असे लोकांचा ॥८४॥

त्यांत सहजासहज गमन ॥ गोरक्ष मच्छिंद्र उभय जाण ॥ करीत आले चव्हाटेंकारणें ॥ तो अपार मेळा देखिला ॥८५॥

सोडूनि गर्भाद्रिपर्वतातें ॥ न्यावें भेटीसी मच्छिंद्रातें ॥ घेऊनि जाता गोरक्षनाथ ॥ आले होते त्या ठायीं ॥८६॥

आले परी सहज चालीं ॥ नगरदीक्षेची कामना फिरली ॥ म्हणोनि पाहतां व्यवहारपाउली ॥ येवोनि तेथें धडकले ॥८७॥

धडकले परी अपार मेळ ॥ पाहूनि त्यांत संचरले गौरबाळ ॥ तों कृष्णागर होऊनि विकळ ॥ कनकचौरंगी पडियेला ॥८८॥

मग मच्छिंद्रातें पाचारुन ॥ दाविता झाला गौरनंदन ॥ जळचरसुतें पाहून ॥ परम चित्तीं द्रवलासे ॥८९॥

परी त्याचा अन्याय काय ॥ लोकांपाशी पुसों जाय ॥ क्षण स्थिर करुनि हदय ॥ करणी विलोकी बाळाची ॥९०॥

तों सहज अंतरीं दृष्टि करितां ॥ त्या समजली तयाची माता ॥ आणि कृष्णागरासी वरता ॥ अवतारदक्ष आढळला ॥९१॥

ऐसा शोध शोधिल्या चित्तीं ॥ मग क्रोधें दाटले तपोगभस्ती ॥ म्हणे अहो हे रांड शक्ती ॥ प्रविष्ट झाली लोकांत ॥९२॥

परी तो आहे मूर्ख राय ॥ चित्तीं योजितां न ये न्याय ॥ बाळावरी तिनें घाय ॥ कोपशस्त्रीं योजिला ॥९३॥

तरी ऐसा बुद्धिभ्रष्ट ॥ विषयलोभी अति वरिष्ठ ॥ महीं नसावा महाभ्रष्ट ॥ महीमार आगळा ॥९४॥

लागूनि कांतेच्या बुद्धिसंगतीं ॥ बाळालागीं केली आर्ती ॥ तस्मात् राव विषयभक्ती ॥ ठेवूं नये महीसीं ॥९५॥

ऐसें चित्तीं धरुनि तेथून ॥ उभय निघाले मंडळांतून ॥ मग गोरक्षा सकळ खूण ॥ निवेदिली रायाची ॥९६॥

सकळ गोरक्षां निवेदन होता ॥ तोही आपुले हदयीं पाहतां ॥ पाहूनि म्हणे गुरुनाथा ॥ यांचे नांव रंगाते आणावें ॥९७॥

कृष्णागर तो चौरंगीं व्यक्त ॥ म्हणोनि चौरंगी बोलला नितांत ॥ कृष्णागर हें नाम महींत ॥ नाहीं म्हणोनि वदलासे ॥९८॥

आणि हस्तपादादि सकळ ॥ एका चौरंगी झाले सकळ ॥ म्हणोनि चौरंगी गौरबाळ ॥ सहजस्थितीं वदलासे ॥९९॥

असो गोरक्ष मच्छिंद्रातें ॥ म्हणे राजसदना जाऊं त्वरिते ॥ मागूनि घ्यावें चौरंगातें ॥ नाथपंथीं मिरवावया ॥१००॥

मच्छिंद्र म्हणे कर्मशासन ॥ रावराणीतें दुःख दावून ॥ मग न्यावा शिवनंदन ॥ नाथपंथीं मिरवावया ॥१॥

गोरक्ष म्हणे हो नोहे ऐसें ॥ नऊं आधीं चौरंगास ॥ पूर्णपर्णी नाथपंथास ॥ विद्यार्णव करावा ॥२॥

मग तयाचेचि हातीं ॥ रायासी दावावी प्रतापशक्ती ॥ आणि त्या रांडे चामुंडेप्रती ॥ ओपणें तें ओपावें ॥३॥

तरी आतां सौम्य उपचार ॥ राया करुं वागुत्तर ॥ मागून घ्या स्नेहपरिवार ॥ चौरंगीतें महाराजा ॥४॥

ऐसी गोरक्ष बोलतां वाणी ॥ अवश्य म्हणे मच्छिंद्रमुनी ॥ मग उभयतां राजसदनीं ॥ प्रविष्ट जाहले महाराजा ॥५॥

पुढें धाडूनि द्वाररक्षक ॥ श्रुत करविलें नांव दोंदिक ॥ कीं मच्छिंद्र गोरक्षक तपोनायक ॥ भेटीसी येती महाराजा ॥६॥

रायें ऐकोनि ऐसें नाम ॥ मनीं उचंबळे भावार्थ प्रेम ॥ मनांत म्हणे योगद्रुम ॥ वंद्य असती हरिहरा ॥७॥

परी मम दैवार्णवा सुफळबांध ॥ मच्छिंद्रकृपेचा वोळला मेध ॥ ऐसें म्हणूनि लागवेग ॥ कनकासन सांडिलें ॥८॥

सम्यक सामोरा होऊनि नृपति ॥ दृष्टीं देखतां मच्छिंद्रजती ॥ भाळ ठेवूनि चरणांवरती ॥ आलिंगीतसे प्रेमानें ॥९॥

म्हणे महाराजा अज्ञानभंगा ॥ अज्ञानपतिता बोधली गंगा ॥ वळूनि धीर पावल्या संगा ॥ कुशब्दपाप नाशील ॥११०॥

ऐसें म्हणोनि राव पुढती ॥ नमिता झाला गोरक्षाप्रती ॥ भाळ ठेवूनि चरणांवरती ॥ सभेस्थानीं आणिलें ॥११॥

बैसवूनि कनकासनीं ॥ षोडशोपचारें पूजिले मुनी ॥ उपरी उभय जोडूनि पाणी ॥ उभा राहिला सन्मुख ॥१२॥

म्हणे महाराजा योगद्रुमा ॥ तुमचे चरणीं असे मम प्रेमा ॥ दर्शन दिधलें भक्तिउगमा ॥ मम अभक्ताकारणें ॥१३॥

तरी आतां कामशक्तीं ॥ वेध कोणता सांगा जती ॥ जेवीं ऋतुकाल द्रुमाप्रती ॥ फळे येतील तैशींच ॥१४॥

तरी चिच्छक्तिउल्हासपणें ॥ अर्थ दावा मजकारण ॥ ते त्यावरी कामना पावन ॥ तुष्ट होईल महाराजा ॥१५॥

ऐसें बोलतां नरेंद्रपाळ ॥ मच्छिंद्रचित्तद्रुमाचें फळ ॥ शब्दचातुर्यलापिका रसाळ ॥ चौरंगभावीं निघालें ॥१६॥

म्हणे महाराजा नरेंद्रोत्तमा ॥ एक काम वेधला आम्हां ॥ आज तुमच्या कौंडण्यग्रामा ॥ शासनीं बाळ विलोकिला ॥१७॥

राया तिष्ठतां तव कोपाग्न ॥ तयाचे हस्तपाद केले भग्न ॥ तो जरी तुमचा अन्यायी उत्तम ॥ आम्हांलागीं ओपावा ॥१८॥

राव ऐशी ऐकूनि मात ॥ हदयीं गदगदोनि हांसत ॥ म्हणे महाराजा योगी समर्थ ॥ काय त्या कराल नेवोनि ॥१९॥

म्हणाल करील सेवाभक्ती ॥ तरी भग्न झाला पदहस्तीं ॥ तरी त्या पंथ गमाया शक्ती ॥ कांहीं एक दिसेना ॥१२०॥

तुम्हीच वाहोनियां आपुल्या स्कंधीं ॥ वागवाल कीं कृपानिधी ॥ तो स्वामी तुम्ही सेवकबुद्धी ॥ आचराल कीं महाराजा ॥२१॥

यावरी बोले मच्छिंद्रनाथ ॥ तो सत्यपणें शक्त कीं अशक्त ॥ इतुके वद कीं आमुचे अर्थ ॥ कासया तूं पाहशी ॥२२॥

ऐसें बोलतां मच्छिंद्रजती ॥ अवश्य म्हणे शशांगरनृपती ॥ घेऊनि जावें आवडल्या चित्तीं ॥ सिद्धसंकल्प महाराजा ॥२३॥

ऐसें बोलतां धरापाळ ॥ उठोनि आले तत्काळ ॥ परोपकारी अति कनवाळ ॥ चौरंगापाशीं पातले ॥२४॥

कनकचौरंगी सधीर युक्त ॥ तैसाचि उचलिला महीभुवसुत ॥ नेऊनि आपुले शिबिरांत ॥ हस्तपाद तळविले ॥२५॥

येथें श्रोते कल्पना घेती ॥ निजीवास सजीव करितो जती ॥ तेणें चौरंगीहस्तपादांप्रती ॥ स्नेहकढयी कां तळविलें ॥२६॥

निर्जीव पुतळा नृत्य करीत ॥ तेथें मिरवले गहिनीनाथ ॥ मग हस्तपादनिमित्त ॥ काय अशक्य झालें तें ॥२७॥

तरी कवि म्हणे पुढील कारण ॥ होतें म्हणोनि मच्छिंद्रानें ॥ लोहढथीं द्विमूर्धानें ॥ स्नेहीं तळले पदहस्त ॥२८॥

तूतें करोनि दुःखाचें शमन ॥ पुढें पहा म्हणती नेमानेम ॥ समान उत्तमोत्तम ॥ फळा मिरवूं ययासी ॥२९॥

ऐसा विचार करुनि चित्तीं ॥ तळों लागले पदहस्ती ॥ मग तेथें राहोनि एक राती ॥ पुढें गमती महाराजा ॥१३०॥

चौरंगी स्कंधीं वाहून ॥ मार्ग गमीतसे गौरनंदन ॥ मग ग्राम पाहूनि निघून ॥ बद्रिकाश्रमीं पातले ॥३१॥

शीघ्र जावोनि शिवालयांत ॥ भावें वंदिला उमाकांत ॥ उपरी चौरंगी ठेवूनि तेथ ॥ काननांत संचरले ॥३२॥

काननीं हिंडतां तेथ पाहीं ॥ तों एक गव्हर देखिलें महीं ॥ देखतां विसरती तया ठायीं ॥ गुहागृहामाझारी ॥३३॥

तंव तें गव्हर परम गोमट ॥ पाहूं बोलती प्रताप सुभट ॥ म्हणती चौरंगीनिश्चयतुळवट ॥ येथें कसून पहावा ॥३४॥

पाहावें तरी कैसें रीतीं ॥ मग काय करिते झाले जती ॥ एक शिळा विस्तीर्ण शक्ति ॥ गोरक्षनाथें आणिली ॥३५॥

आणिली परी गुहागृहांत ॥ उचलूनि वरल्या जमिनीत ॥ शस्त्र अस्त्र जल्पूनि तेथें ॥ अंधारव्यक्त केलेंसे ॥३६॥

ऐसें कृत्य करुनि तेथें ॥ पुन्हां परतोनि आले नाथ ॥ स्कंधीं वाहूनि चौरंगीतें ॥ पुन्हां परतोनि गेले त्या ठायीं ॥३७॥

तेव्हां गृहद्वारासमीप ॥ तरु एक होत विशाळरुप ॥ तयाखालीं प्रतापदीप ॥ सावलींत बैसले ॥३८॥

बैसले परी गोरक्षासी ॥ मच्छिंद्र म्हणे भावउद्देशीं ॥ वा अनुग्रह चौरंगासी ॥ याच ठायीं ओपावा ॥३९॥

ऐसें बोलतां मच्छिंद्रनाथ ॥ गोरक्ष वदतसे उत्तरातें ॥ मम अनुग्रह तपाश्रित ॥ लाभ होतसे महाराजा ॥१४०॥

तरी चौरंगीचें अनुष्ठान ॥ पूर्णस्वरुपीं मी पाहीन ॥ मग प्रसन्नचित्तें देईन ॥ अनुग्रह महाराजा ॥४१॥

ऐसें बोलतां वरदउक्ती ॥ मच्छिंद्र म्हणे बरवी नीती ॥ तरी याचि ठायीं चौरंगीप्रती ॥ तपालागीं स्थापावा ॥४२॥

ऐसें म्हणूनि गोरक्षासी ॥ पुसता झाला चौरंगासी ॥ हे बाळा तूं पूर्ण तपासी ॥ बसतोसी कीं या ठाया ॥४३॥

यावरी बोले चौरंगनाथ ॥ मी मान्य तुमचे कर्तव्यांत ॥ जेथें ठेवाल राहीन तेथ ॥ सांगाल करीन तैसेंचि ॥४४॥

परी एक मागणें आहे येथें ॥ तुम्ही जावें कोण्या देशातें ॥ परी प्रतिदिनीं माझा हेत ॥ कूर्मदृष्टीं रक्षावा ॥४५॥

इतकें मातें दिधल्यास दान ॥ सकळांत माझे कल्याण ॥ दिवसानुदिवस माझे स्मरण ॥ तव धवळारीं पाळावें ॥४६॥

तुम्हांस होतां माझें स्मरण ॥ त्या कृपें होईल माझें पोषण ॥ जैसें कूर्मदृष्टीकरुन ॥ बाळालागीं पोषीतसे ॥४७॥

ऐसें बोलतां चौरंगनाथ ॥ उमय झाले तोषवंत ॥ मग उचलोनि गुहागृहांत ॥ चौरंगीतें ठेविलें ॥४८॥

ठेविलें परी त्यास सांगती ॥ बा रे ऊर्ध्व करीं कां दृष्टीप्रती ॥ शिळा सुटक दिसे क्षितीं ॥ पडेल वरती तुज राया ॥४९॥

परी आपुले प्रसादेंकरुन ॥ तूतें देतों एक वरदान ॥ दृष्टी याजवरुन ॥ काढूं नको कदापि ॥१५०॥

जरी दृष्टी किंचित चुकुर ॥ होता पडेल अंगावर ॥ मग प्राण सोडूनि जाईल शरीर ॥ चूर्ण होशील रांगोळी ॥५१॥

मग पुढील कार्य साधेपर्यंत ॥ सकळ राहिले नरदेहांत ॥ तरी जतन करुनि शरीरांत ॥ हित आपुलें जोडी कां ॥५२॥

मग एक मंत्र सांगूनि कानीं ॥ म्हणे करी याची सदा घोकणी ॥ येणेंचि सर्व तपालागुनी ॥ प्राप्त होसील पाडसा ॥५३॥

मग गोरक्ष जाऊनि उत्तम फळातें ॥ तया सामोरें आणूनि ठेवीत ॥ म्हणे हें फळ भक्षूनि निश्वितें ॥ पूर्ण तपा आचरी कां ॥५४॥

परी आणिक राया तूतें ॥ दृष्टी रक्षावी जीवित्वनिमित्तें ॥ मंत्र जपावा तपोअर्थे ॥ फळे भक्षावीं क्षुधेसी ॥५५॥

ऐसी त्रिविधा गोष्टी तूतें ॥ सांगितली परी रक्षी जीवातें ॥ तों आम्ही लवकरी करुनि तीर्थातें ॥ तुजपासीं येऊं कीं ॥५६॥

ऐसें सांगूनि चौरंगासी ॥ बाहेर निघे गोरक्षेंसी ॥ शिळा आपुले गुहाद्वारासी ॥ बंधन केलें दृष्टोत्तर ॥५७॥

या उपरांतीं तपाचारशक्ती ॥ चामुंडा स्मरला लावोनि चित्तीं ॥ तंव त्या स्मरतां येऊनि क्षितीं ॥ गोरक्षातें भेटल्या ॥५८॥

म्हणती महाराजा योगोत्तमा ॥ कामना उदेली कोण तुम्हां ॥ तैसाचि अर्थ सांगूनि आम्हां ॥ स्वार्थालागीं मिरविजे ॥५९॥

येरी म्हणे हो शुभाननी ॥ मम प्राण आहे या स्थानीं ॥ तरी तयाच्या क्षुधेलागुनी ॥ नित्य फळें ओपावीं ॥१६०॥

आणावी परी गुप्तार्थ ॥ फळें ठेवावीं त्या नकळत ॥ शिळे उचलूनि जावें त्वरित ॥ नित्य फळें ओपावीं ॥६१॥

ऐसें सांगूनि चामुंडेसी ॥ चालते झाले तीर्थवासी ॥ सहज चालीं चालतां महीसीं ॥ गिरनारपर्वतीं पोंचले ॥६२॥

येरीकडे चामुंडा सकळ ॥ उत्तम आणूनि देती फळ ॥ शिळा उचलूनि उतावेळ ॥ काननांत सांडिती ॥६३॥

सांडिती परी कैसे रीतीं ॥ गुप्त सेवा करुनि जाती ॥ परी चौरंगी महाजती ॥ शिळाभयें दाटला ॥६४॥

मनांत म्हणे गुरुवचन ॥ कीं शिळा घेईल तुझा प्राण ॥ म्हणोनि दृष्टीं याकारण ॥ अखंडित रक्षावें ॥६५॥

ऐसी भावना आणूनि चित्तीं ॥ दृष्टी ठेवी शिळेप्रती ॥ मुखीं नाम मंत्रउक्ती ॥ आराधींत सर्वदा ॥६६॥

परी त्या शिळेच्या भयेंकरुन ॥ खाऊं विसरला फळाकारण ॥ किंचित वायूचें होतां गमन ॥ तोचि आहार करीतसे ॥६७॥

शिळेवरती सदा दृष्टी ॥ परी ऊर्ध्वभागीं ओपिली दृष्टी ॥ अंग हालवेना महीपाठीं ॥ अर्थ कांहीं चालेना ॥६८॥

जरी करावें चलनवलन ॥ नेणों दृष्टीसी चुकुरपण ॥ शिळा झालिया घेईल प्राण ॥ म्हणोनि न हाले ठायातें ॥६९॥

फळें जरी चांचपूनि घ्यावें हातीं ॥ नेणों तिकडे जाय अवचितीं ॥ चित्त गेलिया इंद्रियें समस्तीं ॥ तयामागें धांवती ॥१७०॥

मग चित्त बुद्धि अंतःकरण ॥ हें तों ऐक्य असती तिचे जण ॥ फळ स्पर्शितां भावनेकरुन ॥ भ्रष्ट होईल सर्वस्वें ॥७१॥

मग मंत्ररुपें स्मरणशक्ती ॥ आबुद्ध करील माझी मती ॥ म्हणोनि सांडिलें फळप्राप्ती ॥ योगाहूनि लक्षीतसे ॥७२॥

ऐसी उभयतां कांचणी करुन ॥ आटत चालिले रुधिर प्राण ॥ परी तें रुधिर मांस लक्षून ॥ आटत आहे तंव सत्य ॥७३॥

रुधिर मांसालागूनि भक्षीत ॥ भक्षूनि उदरकमय करीत ॥ शेवटीं चित्तासी हरीत ॥ भक्षण करीतसे नित्यशः ॥७४॥

चित्ता आटिलें सकळ रुधिर ॥ पैं शरीर उरलें अस्थिपंजर ॥ वरी उगवली त्वचा त्यावर ॥ गवसणीपरी विराजे ॥७५॥

जोंबरी शरीरीं असे प्राण ॥ तोंबरी अस्थि त्वचा घ्राण ॥ प्राण भंगल्या भंग जाण ॥ सर्वत्रासी माहिती ॥७६॥

नाडी त्वचा अस्थी ॥ चौरंगी उतरल्या देहाप्रती ॥ सूक्ष्म शरीरीं आपण भूतीं ॥ त्रासूनियां पळाले ॥७७॥

मग तो देह काष्ठासमान ॥ बोलारहित चलनवलनहीन ॥ ऐसें पाहूनि बाळ तान्हें ॥ वारुळ वरी रचियेलें ॥७८॥

मग तितुक्या दृष्टी हरल्याप्रती ॥ मुखीं ध्वनि मंत्रशक्ती ॥ तितुकें उरे मग निश्वितीं ॥ जिकडे तिकडे झालीसे ॥७९॥

ऐसेपरी चौरंगीतें ॥ झालें आहे निजदेहातें ॥ यावरी पुढील स्वार्थे ॥ पुढील अध्यायीं ऐका तें ॥१८०॥

तरी हा ग्रंथ नवरत्नहार ॥ आणि वैडूर्य स्वतेजापर ॥ तुम्हां श्रोतियां शृंगार ॥ धुंडीसुत अर्पीतसे ॥८१॥

नरहरिवंश मालूतें ॥ मालू नरहरीचा शरणागत ॥ तो हा भक्तिपूर्वक ग्रंथ ॥ श्रोतियांतें संकल्पिला ॥८२॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत श्रोते चतुर ॥ एकत्रिंशाध्याय गोड हा ॥१८३॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ अध्याय ॥३१॥ ओंव्या ॥१८३॥ शुभं भवतु ॥

॥ नवनाथभक्तिसार एकत्रिंशाध्याय समाप्त ॥


श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय ३२

श्रीगणेशाय नमः

जयजय जगदुद्धारा ॥ जगदाश्रिता रुक्मिणीवरा ॥ दीनबंधो दयासागरा ॥ वीरा सुरवरा तूं एक ॥१॥

तरी ऐसा प्रभू समर्थ सर्वा ॥ सुरवरांप्रती जैसा मघवा ॥ तरी आतां कृपार्णवा ॥ ग्रंथादरीं येईं कां ॥२॥

मागिले अध्यायीं कथन ॥ चौरंगी बैसे तपाकारण ॥ उपरी गोरक्ष मच्छिंद्रनंदन ॥ गिरनारगिरीं पोचले ॥३॥

पोचले परी आनंदभरित ॥ प्रेमें वंदिला मच्छिंद्रनाथ ॥ पुढें पाहतांचि अत्रिसुत ॥ आनंदडोहीं बुडाला ॥४॥

मच्छिंद्रातें कवळूनि हदयीं ॥ म्हणे माझी आलीस गे आई ॥ चक्षु मीनले तुझे ठायीं ॥ मार्ग पाहें पाडसापरी ॥५॥

जैसें इंदूचें आगमन ॥ तिकडेचि हेलावे समुद्रजीवन ॥ तेवीं तुझे मार्गेकरुन ॥ चक्षू वेधले माझे बा ॥६॥

तरी आतां असो कैसें ॥ माझें मला भेटलें पाडसें ॥ तरी वत्सा सांडूनि आम्हांस ॥ जाऊ नको पुढारां ॥७॥

ऐसी धृति वृत्ति मती ॥ ऐक्य झाली उभयव्यक्ती ॥ जैसें जळ जळाप्रती ॥ ऐक्य होय मेळवितां ॥८॥

मग नाना गोष्टी विचारप्रसंग ॥ तीर्थगमनादि योगसंयोग ॥ दुःखसुखादि सकळ प्रयोग ॥ एकमेकां निवेदिले ॥९॥

आसन वसन भोजन शयनीं ॥ सदा सन्निध मच्छिंद्रमुनी ॥ जैसें अर्भका तान्हूले मनीं ॥ माय नातळती होईना ॥१०॥

ऐसे मोहाचिये परी ॥ षण्मास लोटले तैं गिरीं ॥ यापरी गोरक्ष सदनांतरीं ॥ तीर्थस्थानीं जल्पतसे ॥११॥

मग तो श्रीदत्ताकारण ॥ म्हणे महाराजा अत्रिनंदन ॥ तीर्थ केलें साधुदर्शन ॥ करावया महाराज ॥१२॥

तरी आम्हां आज्ञा द्यावी ॥ आतां लंघूनि येतों मही ॥ मही धुंडाळल्या संगमप्रवाहीं ॥ साधु मिरवती महाराजा ॥१३॥

तरी याचि निमित्ताकारणें ॥ आम्ही घेतला आहे जन्म ॥ सकळ जगाचें अज्ञानपण ॥ निवटावया महाराजा ॥१४॥

ऐसें बोलतां गौरसुत ॥ दत्त ग्रीवा तुकावीत ॥ आणि पुढील जाणूनि भविष्यार्थ ॥ अवश्य म्हणे पाडका ॥१५॥

मग परमप्रीतीं स्नेहेंकरुन ॥ बोळविता झाला उभयांकारण ॥ येरीं उभयें करुनि नमन ॥ पर्वताखाली उतरले ॥१६॥

मार्गी चालती उभय जण ॥ परी त्या पर्वता क्षणोक्षण ॥ पाहे मच्छिंद्रनंदन ॥ म्हणे प्राण अंतरला ॥१७॥

प्रेमाक्षु ढाळी नयनीं ॥ पुढें ठेवी पदालागुनी ॥ ऐसें चालतां तया अवनीं ॥ दुरदुरावा पडला असे ॥१८॥

मग मार्ग धरुनि काशीपुरी ॥ चालते झाले ते अवसरीं ॥ मुक्कामोमुक्काम लंघितां धरित्री ॥ प्रयागस्थानीं पातलें ॥१९॥

तों त्या गांवीं मूर्तिमंत ॥ औदार्यराशि प्रतापादित्य ॥ त्रिविक्रम नामें नृपनाथ ॥ धर्मप्राज्ञी नांदतसे ॥२०॥

गज वाजी रथ संगतीं ॥ जयाची सेना अपरिमिती ॥ तरी अधर्मनाशार्थ निगुतीं ॥ सैन्यसिंधू मिरवला ॥२१॥

भद्रासनी तो राजेश्वर ॥ जयाची संपत्ति औडंबर ॥ पाहूनि लाजती अमर ॥ हा एक प्रभू म्हणती ते ॥२२॥

ऐसियेपरी राजसंपत्ती ॥ परी उदरी नाहीं संतती ॥ तैशांत देहीं जरा निगुती ॥ प्राप्त झाली बळत्वें ॥२३॥

परी तो राजा सुगम प्राज्ञ ॥ परोपकारी अपार ज्ञान ॥ मूर्तिमंत जयाचें संधान ॥ पाळीत असे नेटका ॥२४॥

तयाचे राज्यांत बावन्न वर्ण ॥ कोणी न देखों अकिंचन ॥ संत आलिया करिती पूजन ॥ सकळ जगीं मिरवतसे ॥२५॥

चौदा विद्यांमाजी कुशल ॥ जैसा दुसरा मूषकपाळ ॥ हीनदीनांची माय कनवाळ ॥ आणि काळ तत्काळ शत्रुचा ॥२६॥

सकल गृहीं देशावर ॥ त्या राजाचा परोपकार ॥ त्यामुळे मिरवती सकळ नर ॥ चिंताविरहित सुखानें ॥२७॥

असो ऐसे तेजस्थिती ॥ तया देशीं पावले निगुती ॥ तेथें सकळ नारीनर क्षितीं ॥ विजयवचनीं गर्हिवरले ॥२८॥

यापरी तयाची गृहस्वामिनी ॥ जिये मिरवती ज्ञानखाणी ॥ पतिव्रता सौदामिनी ॥ षडर्णवगुणी गुणस्वी ॥२९॥

कीं राव तो उत्तम धवळार ॥ तैं दिसती ती स्तंभाकार ॥ कीं संसारमहीचा हांकणार ॥ अनंतरुपीं नटलासे ॥३०॥

ऐसेपरी राजयुती ॥ परी जरा पाहूनि रायाप्रती ॥ तेणें भयार्त होऊनि चित्तीं ॥ चिंतेमाजी पडली असे ॥३१॥

म्हणे रायाचे सकळ अवसान ॥ जिंकूनि नेलें आहे जरेनें ॥ नेणों दिवस येईल कोण ॥ संगतीसी सोडावया ॥३२॥

ऐसीं चिंता व्यापिली चिंत्तीं ॥ तों रायासी भरली आयुष्यभरती ॥ तप्त शरीरी पाहूनि वृत्ती ॥ गमन करी परत्र ॥३३॥

प्राण सांडूनि शरीरातें ॥ गेला असें निराळपंथें ॥ महीं उरलें असे प्रेत ॥ झाला आकांत राज्यांत ॥३४॥

पवित्रनामी रेवती ललना ॥ अट्टहास करी शोकरुदना ॥ तेचि रीतीं इतर जनां ॥ दुःखप्रवाह लोटला असे ॥३५॥

आठवूनि त्रिविक्रमरायाचे गुण ॥ परम आक्रंदती जन ॥ म्हणती पुनः या रायासमान ॥ होणार नाहीं दूसरा ॥३६॥

ऐसे अट्टहास्यें घरोघरीं जन ॥ नारीनरादि दुःखसंपन्न ॥ तये संधींत गांवी येऊन ॥ नाथ तेथें पातले ॥३७॥

तें क्षेत्र महान प्रयागस्थान ॥ उभय संचरती त्याकारण ॥ तो गृहोगृहीं दुःखनिमग्न ॥ शोकाकुलित मिरवले ॥३८॥

कोणी शरीर टाकीत अवनीं ॥ कोणी पडले मूर्च्छा येऊनी ॥ कोणी योजूनि हदयीं पाणी ॥ धबधबा पिटिती ते ॥३९॥

कोणी येऊनि पिशाचवत ॥ इकडून तिकडे धांव घेत ॥ अहां म्हणूनि शरीरातें ॥ धरणीवरी ओसंडिती ॥४०॥

कोणी धरणीवरी आपटिती भाळ ॥ रुधिरव्यक्त करुनि बंबाळ ॥ अहा त्रिविक्रमराव भूपाळ ॥ सोडूनि गेला म्हणताती ॥४१॥

ऐसियेपरी एकचि आकांत ॥ नारीनरादि बोलती समस्त ॥ तें पाहूनि मच्छिंद्रनाथ ॥ परमाचित्तीं कळवळला ॥४२॥

सहज चालतां तेथ पथ ॥ ठायीं ठायीं उभा राहात ॥ त्या रायाचे गुण समस्त ॥ आठवूनि रडताती ॥४३॥

धर्मज्ञानिक रायाचे गुण ॥ मोहकपणीं होतां श्रवण ॥ तंव ते वेळीं तो मच्छिंद्रनंदन ॥ मोहदरींत रिघतसे ॥४४॥

मनांत म्हणे धन्य पुरुष ॥ जयासाठीं जग पिसें ॥ जाहलें आहे तस्मात यास ॥ राव उपकारी वहिवाटला ॥४५॥

तरी हा ऐसा भलेपणीं ॥ राव मिरवला आहे अवनीं ॥ तरी यातें पुनः आणोनी ॥ देहंगत करावा ॥४६॥

ऐसें योजूनि स्वचित्तांत ॥ पाहें रायाचें आयुष्य भरत ॥ तंव तो राव तितुकियांत ॥ निरामयीं पोंचला ॥४७॥

राव नुरलासे जिवितपणीं ॥ मिळाला ऐक्यें ब्रह्मचैतन्यीं ॥ ऐसें देखतां अजीवितपणीं ॥ मग उपाय ते हरले ॥४८॥

कीं मुळींच बीजा नाहीं ठाव ॥ मग रुखपत्रीं केवीं हेलाव ॥ तेवीं जीवितपणीं राणीव ॥ नातुडपणीं उतलीसे ॥४९॥

मग स्तब्ध होऊनि मच्छिंद्रनंदन ॥ परतता झाला ग्रामातून ॥ परी मच्छिंद्राहूनि गौरनंदन ॥ कळवळला स्वचित्तांत ॥५०॥

राज्यभागीं जगाचें बोलणें ॥ ऐकूनियां गौरनंदनानें ॥ मोहें चित्तस्फोट होऊन ॥ अश्रु ढाळी नयनातें ॥५१॥

ऐसें स्थिती ग्रामांतून ॥ निघते झाले उभय जण ॥ तों ग्रामाबाहेर निवांत काननीं ॥ शिवालय देखिलें ॥५२॥

तें पाहूनि एकांतस्थान ॥ जाते झाले तयाकारण ॥ तों पलीकडे मोहक जन ॥ प्रेतसंस्कार मांडिला ॥५३॥

प्रेत स्कंधीं वाहूनि चतुर्थ ॥ येते झाले शिवालयांत ॥ सवें अपार जन वेष्टित ॥ शोकसिंधु उपासिती ॥५४॥

परी आकळीकपणें वंचना ॥ शोकसिंधूची दावी भावना ॥ परम आटूनि आपुल्या प्राणा ॥ प्रेतालागीं कवटाळिती ॥५५॥

यापरी गांवोगांवीचे जन ॥ तेही ऐकूनि वर्तमान ॥ धांव घेती आक्रोशपणें ॥ आप्तजनांसारिखे ॥५६॥

तें पाहूनियां गोरक्षनाथ ॥ परम कळवळूनियां चित्तांत ॥ बोलतां झाला मच्छिंद्रातें ॥ ऐशा पुरुषा उठवावें ॥५७॥

मच्छिंद्र ऐकून तयाची वाणी ॥ उगाचि बैसें म्हणे तयालागुनी ॥ परी स्थिर नोहे गोरक्षमुनी ॥ पुन्हां वागुत्तर देतसे ॥५८॥

म्हणे जरी तुम्ही न उठवाल यातें ॥ तरी मी उठवीन स्वसामर्थ्ये ॥ मच्छिंद्र म्हणे तुझें सामर्थ्य ॥ त्यास उठवावया नसे की ॥५९॥

ऐसें ऐकूनि गोरक्ष वदत ॥ म्हणे याच्यासाठी वेचीन जीवित ॥ परी सुखी करीन सकळ जनांते ॥ निश्चयेंसीं महाराजा ॥६०॥

जरी न उठवें माझेनि राजा ॥ तरी अग्नीत ओपीन शरीर ओजा ॥ हाचि सिद्धार्थ पण माझा ॥ निश्चयेंसीं वरिला असे ॥६१॥

जरी ऐसिया बोला संमत ॥ जरी माते न घडे नाथ ॥ तरी रौरव भोगीन कोटि वर्षांत ॥ कुंभीपाक महाराजा ॥६२॥

ऐसें बोलतां दृढोत्तरवचन ॥ मग बोलता झाला मच्छिंद्रनंदन ॥ अहा वत्सा शोधाविण ॥ व्यर्थ काय वदलासी ॥६३॥

सारोखपणे केलासी पण ॥ राव उतरला जीवित्वेंकरुन ॥ ब्रह्मरुपीं सनातन ॥ ऐक्यरुपीं मेळ झालासे ॥६४॥

ऐसें बोलतां वसुआत्मज ॥ मग तो गोरक्षमहाराज ॥ हदयीं शोधितां तेंचि ओज ॥ लक्षापरी भासलें ॥६५॥

मग म्लान करुनि आपुलें वदन ॥ म्हणे आतां अग्नि घेईन ॥ मग प्रत्योदक तेथूनि उठून ॥ काष्ठांलागीं मेळविलें ॥६६॥

तें पाहूनि मच्छिंद्रनाथ ॥ परम झाला भयभीत ॥ चित्तीं म्हणे हा प्राणातें ॥ चुकणार नाहीं द्यावया ॥६७॥

जेणें वडे आणायाकरितां ॥ चक्षु काढूनि आपुले हाता ॥ तोषविली विप्रदुहिता ॥ निबरगट्ट हा असे ॥६८॥

मग पाचारुनि गोरक्षातें ॥ बोलता झाली प्रांजळवत ॥ म्हणे बा रे सुखी करावें जनातें ॥ यालागीं वदलासी ॥६९॥

तरी जनांचे उपकारास ॥ उदार झालासी प्राणास ॥ चित्तीं तुझे समाधानास ॥ विचार एक ऐकावा ॥७०॥

मी याचे देहस्थित ॥ होतों रक्षाया तुझा हेत ॥ परी बा माझिया शरीरास ॥ द्वादश वर्षे सांभाळीं ॥७१॥

द्वादश वर्षे जाहलिया पूर्ण ॥ पुन्हां देहात देहांतर्गत होऊन ॥ सकळ जगाचें करुं कल्याण ॥ उपकारीं मिरवेन बा ॥७२॥

ऐसे बोलतां मच्छिंद्रनाथ ॥ अवश्य गोरक्षक म्हणत ॥ मग शीघ्र सांडूनि शरीरातें ॥ रायशरीरीं संचरला ॥७३॥

संचरला परी स्मशानहीं ॥ उठोनि बैसला राजदेहीं ॥ तें पाहोनियां लोक सर्वही ॥ आनंदसरिते मिरवले ॥७४॥

जैसा पक्षियें मांडिला ठाव ॥ मिरवे वृक्षा अन्य वाव तेवीं देहातें सांडूनि बरवें ॥ रावदेहीं संचरला ॥७५॥

लोक म्हणती आम्हां प्रजेकारण ॥ मोहें वेष्टिलें हरिहरांचे मन ॥ म्हणोनि होऊनि सुप्रसन्न ॥ रायालागीं जीवविलें ॥७६॥

एक म्हणती आयुष्य होतें ॥ काळें हरण केलें जीवंत ॥ चुकारपणीं समजूनि मागुतें ॥ जीवविलें रायातें ॥७७॥

असो ऐशा बहुधा प्रकरणीं ॥ आनंद वदतसे जगाची वाणी ॥ मग ते परम हर्षेकरुनी ॥ स्वस्थानातें पावले ॥७८॥

विधिवत् कनकाचा पुतळा करुन ॥ स्मशानक्रिया संपादून ॥ पाहते झाले आपुलें स्थान ॥ आप्तजनांसमवेत ॥७९॥

येरीकडे शिवालयांत ॥ सच्छिष्य महाराज गोरक्षनाथ ॥ रक्षावया गुरुचें प्रेत ॥ स्थानालागीं विचारी ॥८०॥

तों तितुक्यांत आली पूजारणी ॥ होती शैवगुरविणी ॥ तियेलागी पाचारुनी ॥ वृत्तांतातें निवेदी ॥८१॥

म्हणे माये रायाकरितां ॥ आणि प्रजेची धरुनि ममता ॥ मम गुरु मच्छिंद्र केला सरता ॥ राजदेहाकारणें ॥८२॥

तरी आतां श्रीगुरुचें प्रेत ॥ कवणा ठायीं रक्षूं यातें ॥ जरी तुजला आहे माहीत ॥ ठात मातें सांग कीं ॥८३॥

ठाव तरी म्हणसील कसा ॥ गुप्त जगांत न कळे लेशा ॥ पूर्ण झाली द्वादश वर्षे ॥ पुनः श्रीगुरु उठेल वो ॥८४॥

तरी तूं ठाव ऐसा मनांत ॥ सांगूनि दृढ रक्षीं प्रेत ॥ आणि स्वचित्तीं रक्षुनियां मात ॥ गुप्त जगीं वर्ते वो ॥८५॥

तरी या कर्मासी साक्षभूत ॥ तुझें माझें उभय चित्त ॥ ही गोष्ट कळतां जनांत ॥ परम परम विक्षेप वाटेल गे ॥८६॥

तरी आतां चिंतार्णवीं ॥ झालें कर्म वडवानलदेहीं ॥ धैर्यजळाचे प्रवाहडोहीं ॥ गुप्त यातें रक्षावें ॥८७॥

ऐसें बोलतां तपःप्राज्ञी ॥ अवश्य म्हणत शैवराणी ॥ मग त्या शिवालयामध्यें नेऊनी ॥ गुप्त गुहार दावीतसे ॥८८॥

तेंही गुप्त गुहार जगांत ॥ माहीत नव्हतें किंचितार्थ ॥ तें दावूनि गोरक्षनाथ ॥ तुष्ट केला स्वदेहीं ॥८९॥

मग तें गुहाग्रामींचें मुख ॥ मही विदारुनि पाहे देख ॥ उत्तम ठाव लक्षूनि तेथ ॥ प्रेत त्यांत ठेवीतसे ॥९०॥

प्रेत ठेवोनि गुहागृहांत ॥ मुख आच्छादिलें त्वरितात्वरित ॥ गृह लक्षूनि पुन्हां आलयांत ॥ येवोनियां बैसला ॥९१॥

बैसे परी शैवकांता ॥ म्हणे महाराजा गोरक्षनाथा ॥ द्वादश वर्षे रक्षीन प्रेता ॥ निश्चय त्वां केला असे ॥९२॥

केला परी बोलें शरीर ॥ कैसें राहील साचोकार ॥ एकदिन नव्हे संवत्सर ॥ द्वादश निश्चय केला असे ॥९३॥

ऐशी ऐकूनि तियेची वाणी ॥ गोरक्ष म्हणे वो शुभाननी ॥ चिरंजीवपद देहालागूनी ॥ मच्छिंद्रनाथ मिरवीतसे ॥९४॥

तरी हा देह नाशरहित ॥ आहे मायाप्रळयवंत ॥ परी ऐसी जगांत मात ॥ प्रविष्ट न करीं जननीये ॥९५॥

ऐसें उत्तर सांगूनि तीतें ॥ उभय चित्तीं मिरवले शांत ॥ तों इकडे नृपनाथ ॥ अंतःपुरीं पातला ॥९६॥

परी तो त्रिकाळज्ञानी ॥ चांचरा न घे प्रज्ञेलागुनी ॥ जेवीं माहितगार पूर्वीचें सदनीं ॥ राज्यभुवनीं वर्ततसे ॥९७॥

असो गेलिया अंतःपुरांत ॥ रेवती कांता प्रज्ञावंत ॥ मंचकीं नेवोनि आपुला नाथ ॥ प्रीतीं आदरें आदरिला ॥९८॥

स्नान भोजन झालियाउपरी ॥ राव बैसला मंचकावरी ॥ अंकीं बैसवोनि सदगुणालहरी ॥ अनंत वल्गने वदतसे ॥९९॥

परी जें कांता पुसे त्यातें ॥ तेंही प्राज्ञिक प्रांजळ सांगत ॥ गुप्त प्रगटला वृत्तांत ॥ उत्तरा उत्तर देतसे ॥१००॥

व्यंगरहित बोले वचन ॥ करी कांतेचें समाधान ॥ यावरी द्वितीय दिनीं मंगलस्नान ॥ करुनि सभे बैसला ॥१॥

तेथेंही राजवैभवाकारणें ॥ अचूक वर्ते सकळ प्रकरणीं ॥ मंत्रीं आणि सकळ जन ॥ भिन्न कांहीं दिसेना ॥२॥

न्यायनीतीं झाला वहिवाट ॥ माहितासमान वर्तती पाठ ॥ स्नेहक्रूरता समान लोट ॥ रायासमान वर्तती ॥३॥

यापरी नित्य चतुर्थ प्रहरीं ॥ सकळ वैभवें वना करी स्वारी ॥ शिवदर्शना ग्रामाबाहेरी ॥ त्याचि देवालय येतसे ॥४॥

प्रथम दिवशीं येतां राव ॥ शिवालयीं उमाधव ॥ वंदितां देखोनि गोरक्ष प्राज्ञ अतीव ॥ संपादणी पुसतसे ॥५॥

म्हने नाथ जी आदेशवंत ॥ किती दिवस आलां येथ ॥ कवण स्थळीं वास्तव्य करीत ॥ कवण नाम मिरवतसे ॥६॥

उभा राहोनि ऐसे नीतीं ॥ गोरक्षातें पुसे नृपती ॥ संपादणी ती जगाप्रती ॥ दृढा दावी महाराजा ॥७॥

परी तो चाणाक्ष गोरक्षनाथ ॥ संपादनीचें उत्तर देत ॥ मग उत्तराउत्तर करुनि महीतें ॥ शिवालयीं संचरले ॥८॥

संचरले परी गोरक्षकातें ॥ घेवोनि गेला स्वसांगातें ॥ शिवालयीं नेमिला एकांत ॥ राव पुसे गोरक्षनाथा ॥९॥

हस्तसंकेतें खुणेंकरुन ॥ म्हणे देहातें बंधनसाधन ॥ कैसे रीतीं केलें रक्षण ॥ ठाव लक्षोनि नेटका ॥११०॥

मग तो प्राज्ञिक गोरक्षनाथ ॥ बरबरभाषा सांगत ॥ सवें घेवोनि खूण दावीत ॥ गुहागृह रायातें ॥११॥

असो ऐसें केलियापाठीं ॥ गोरक्षें केलिया खूणदृष्टी ॥ मग क्षणें बैसोनि तळवटीं ॥ राव स्थाना पैं गेला ॥१२॥

गेला परी प्रतिदिनीं ॥ राव येतसे शिवभुवनीं ॥ आपुला शरीरठाव लक्षोनी ॥ शिवा नमोनि जातसे ॥१३॥

क्षण एक बैसोनि गोरक्षाजवळी ॥ दावीत भक्ती प्रेमनव्हाळी ॥ आणि चित्ताची संशयकाजळी ॥ फेडूनि जात स्वस्थाना ॥१४॥

ऐसियेपरी वहिवाटतां ॥ तीन मास लोटले पंथा ॥ यापरी एके दिवशीं बैसतां ॥ गोरक्षक पुसें रायातें ॥१५॥

आम्ही जातों तीर्थाटनासी ॥ आपण असावें योगक्षेमसीं ॥ दृष्टी ठेवोनि स्वहितासी ॥ स्वशरीरासी रक्षावें ॥१६॥

अवश्य त्यातें भूप म्हणत ॥ स्वधर्मे ठेवूं स्वशरीरातें ॥ आपण जावे स्वस्थचित्तें ॥ तीर्थाटनी गमावे ॥१७॥

ऐसें वदोनि गोरक्षकातें ॥ भूप पातला स्वस्थानात ॥ येरीकडे गोरक्षनाथ ॥ तीर्थस्थाना वहिवाटला ॥१८॥

साही लोटले षण्मास ॥ रेवती कांता रतिसुखास ॥ ऋतुमंधी रेतगर्मास ॥ गरोदर पै ते झाली ॥१९॥

दिवसेंदिवस नव मास ॥ लोटोनि गेले गर्भास सुदिनदिनीं प्रसूतीस ॥ रेवती कांता होतसे ॥१२०॥

प्रसूत झाल्या मदनाकृती ॥ बाळ पाहे माय रेवती ॥ बाळककर्णी तेजोत्पती ॥ बाळ दृष्टीं देखिला ॥२१॥

त्यासी लोटले द्वादश दिवस ॥ आनंदउत्सव पालखास ॥ बाळ पहुडोनि नाम त्यास ॥ धर्मनाथ ठेविलें ॥२२॥

त्यासही लोटली पांच वरुषें ॥ तों एके दिवशीं शिवालयास ॥ घेवोनि पूजेचे तबकास ॥ राजा राणी पातलीं ॥२३॥

सवे परिचारिका पंचशत ॥ लावण्यलतिका चपळवंत ॥ कीं राजार्णवींच्या लहरी अदभुत ॥ रेवतीसवें मिरवल्या ॥२४॥

असो रेवती दासीसहित ॥ संचरोनि शिवालयांत ॥ प्रेमें पूजीतसे उमाकांत ॥ शुद्धभावेंकरोनिया ॥२५॥

पूजा सांग जाहलियावरी ॥ शिवा प्रार्थीतसें वागुत्तरीं ॥ हे महाराज त्रिपुरारी ॥ उमापती महानुभावा ॥२६॥

तरी ऐसें करावें कृपानिधी ॥ श्रीराया त्रिविक्रमाआधीं ॥ मातें मरण देऊनि साधीं ॥ सुवासिनीत्व माझें हें ॥२७॥

ऐसें वदतां वाकसुगरिणी ॥ गदगदां हांसे शैवराणी ॥ तें रेवतीनें पाहोनिं ॥ तियेलागीं पुसतसे ॥२८॥

म्हणे माय वो शैवदारा ॥ तुज हांसूं कां आलें वागुत्तरा ॥ म्हणे हास्य तव उत्तरा ॥ सहज आननी आले वो ॥२९॥

रेवती म्हणे आश्चर्येविण ॥ न यावें विकासीपणा मन ॥ तरी तूं माये प्रांजळ वचन ॥ सांग संशय सोडोनी ॥१३०॥

तंव ती बोले शैवराणी ॥ म्हणे माय वो हास्यचिन्हीं ॥ तूतें वदतां कहाणी ॥ विपर्यास होईल गे ॥३१॥

तरी माये माझें चित्त ॥ वदावया होतें भयभीत ॥ नेणो कैसी पुढील मात ॥ घडोनि येईल कर्मातें ॥३२॥

आम्ही दुर्बळ तुम्ही समर्थ ॥ सहज कोपल्या होईल घात ॥ पतंग स्पर्शतां प्रळयानळांत ॥ जीवित्वातें उरेना ॥३३॥

कीं केसरीगृही अन्याय ॥ केलिया जंबुक जीवें जाय ॥ कीं नगर पेटतां कोणें वांचावें ॥ जीवित्वातें हे माते ॥३४॥

ऐसें बोलतां शैवराणी ॥ रेवती म्हणे माय बहिणी ॥ निर्भय होवोनि तुवां मनीं ॥ रहस्यार्थ निरोपीं ॥३५॥

राव आणि माझे कांहीं ॥ भय असेल तुझे देहीं ॥ तरी आम्ही सहसा कोपप्रवाहीं ॥ तुजवरी न करुं ॥३६॥

ऐसें बोलोनि करतळभावास ॥ रेवती देत शैवकांतेंस ॥ सकळ हरुनि संशयास ॥ म्हणे वार्ता वद आतां ॥३७॥

तरी ती प्रांजळ बोले वाणी ॥ मग परिचारिका बाहेर काढूनी ॥ म्हणे सांगेन वो एकांतभुवनी ॥ एकांतस्थानीं पैं गेल्या ॥३८॥

एकांतालया गेलियावरी ॥ बोलती झाली शैवनारी ॥ म्हणे माये तूं सुवासीण स्वदेही ॥ कांही नाहींस जाण पां ॥३९॥

राव त्रिविक्रम मृत्यु पावला ॥ तयाचे देही मच्छिंद्र संचरला ॥ आपला देह येथें सांडिला ॥ शिवालयामाझारीं ॥१४०॥

मग तयाचा शिष्य गोरक्षनाथ ॥ गुहागृहा ठेवूनि गेला प्रेत ॥ द्वादश वर्षे नेमस्त ॥ नेम केला उभयतांनीं ॥४१॥

द्वादश वर्षे सरल्या शेवटीं ॥ मच्छिंद्र वर्तेल स्वदेहराहाटी ॥ ऐसिये कथा माझिये दृष्टी ॥ झाली असे जननीये ॥४२॥

तरी तुज वैधव्यपण ॥ असोनि बोलसी सुवासिण ॥ म्हणोनि हास्य आलें मजलागून ॥ जाण जननी निश्चयें ॥४३॥

ऐसें ऐकुनि रेवती सती ॥ म्हणे दावीं कां मच्छिंद्रप्रेताप्रती ॥ येरी अवश्य म्हणोनि उक्ती ॥ गृहेमध्यें नेतसे ॥४४॥

म्हणे माय वो येचि ठायीं ॥ आच्छादिला मच्छिंद्रदेहीं ॥ तरी मही विदारुनि गुहागृहीं ॥ निजदृष्टीनें पाहें कां ॥४५॥

ऐसें बोलोनि दावोनि तीतें ॥ शिवालयीं गेली त्वरित ॥ येरीकडे संशयवंत ॥ रेवती स्थाना गेलीसे ॥४६॥

गेलीसे परी एकांतासीं ॥ विचार करी आपुले मानसीं ॥ चित्तीं म्हणे पतिव्रतानेमासी ॥ दैवेंकरुनि नांडिले ॥४७॥

नाहिसें परी संचितार्थ ॥ घडणार घडूनि आलें निश्चित ॥ परी पुढती आपुलें हित ॥ विलोकावें आपणचि ॥४८॥

पति निवर्तल्यापाठीं ॥ लाधली मच्छिंद्रवीर्यकोटी ॥ परी पाहतां पातकदृष्टीं ॥ वंशवेली दिसेना ॥४९॥

पूर्वी भरतवंश काढून ॥ व्यासवीर्ये केला उत्पन्न ॥ त्याही पुढें कुंतीरत्न ॥ त्याच नीतीं आचरली ॥१५०॥

पंचदेवाचें वीर्य घेवोन ॥ निर्माण केले पांचहि जण ॥ तस्मात् वंशवेलीकारणें ॥ शिष्टदेह अर्पावा ॥५१॥

तरी हा विचार पातकरहित ॥ घडोनि आला यत्नातीत ॥ परी द्वादश वर्षे होतां भरित ॥ पुन्हां अनर्थ होईल हा ॥५२॥

मच्छिंद्र जाईल स्वदेहाकारणें ॥ सुत धर्मनाथ अति सान ॥ राज्यवैभवीं आसरा धरोन ॥ कवण रतीं राहील कीं ॥५३॥

त्रिविक्रमदेहीं तपोबल ॥ आहे म्हणूनि विवतें बाळ ॥ तो गेलिया सावली शीतळ ॥ मजलागीं मिळेना ॥५४॥

तरी आतां करावें कैसें ॥ दृष्टीं पाहें मच्छिंद्रदेहास ॥ दृष्टीं पाहिल्यावरी विनाश ॥ करोनियां सांडावा ॥५५॥

देह झालिया छिन्नभिन्न ॥ मग कैसा संचरेल मच्छिंद्रनंदन ॥ मुळींच बीज केलिया भस्म ॥ बाहेर कांहीं उगवेना ॥५६॥

ऐसा विचार करुनि चित्तीं ॥ एक परिचारिका घेवोनि सांगाती ॥ गांवाबाहेर मध्यरात्रीं ॥ येवोनियां पोंचली ॥५७॥

आणिक एक गुप्तराहाटी ॥ दोन सबळ घेतले होते कामाठी ॥ त्वरें येऊन्नि शिवालयापाठीं ॥ गुहाद्वार विदारिलें ॥५८॥

मोकळें केलें गुहाद्वार ॥ करिते झाले आंत संचार ॥ जातांचि तें कलेवर ॥ मच्छिंद्राचें देखिलें ॥५९॥

परी तें कलेवर तेजःपुंज ॥ कीं सजीवपणीं दिसे सहज ॥ माणिकवर्णी सविताराज ॥ तियेलागी भासलें ॥१६०॥

असो ऐसिये तेजोराशी ॥ मग शस्त्र घेवोनि अस्थिमांसासी ॥ रती रती छेदोनियां तयासी ॥ बाहेर तई काढिलें ॥६१॥

मग भाग टाकोनि कान नांत ॥ विखरुनि दिधले पृथक् पृथक् तेथ ॥ तरी समान रज समस्त ॥ ठाई ठाई टाकिले ॥६२॥

टाकिले परी पातळपणी ॥ रजरजाची होय मिळवणी ॥ ऐशापरी त्यासी करुनी ॥ स्वस्थानीं गेली ते ॥६३॥

गुहागृहाचें मुख आच्छादून ॥ जैसें होतें तैसे करुन ॥ येरी घडल्या कारण ॥ उमा जागृत झालीसे ॥६४॥

मग प्रत्यक्ष होऊनि बोलत ॥ म्हणे महाराजा कैलासनाथा ॥ जागृत व्हावें विपरीतपंथा ॥ अघटित झालें महाराजा ॥६५॥

तुमचा मच्छिंद्रनंदन ॥ गेला आहे स्वदेह सांडून ॥ परी रेवतीदारा येऊन ॥ विध्वंसिलें शरीरासी ॥६६॥

ऐसी ऐकतां उमेची मात ॥ खडबडूनि उठला कैलासनाथ ॥ हदयीं पाहे तों विपरीत ॥ मच्छिंद्रदेही वर्तलें ॥६७॥

मग अंबेसी बोलता झाला शिव वचन ॥ म्हणे माझा आज गेला प्राण ॥ परी उमे यक्षिणी बोलावून ॥ सकळ शरीर वेंचीं कां ॥६८॥

अस्थि त्वचा मांसासहित ॥ रती रती भाग वेंचूनि समस्त ॥ एकत्र करुनि कैलासांत ॥ यक्षिणीहस्तीं पाठवीं ॥६९॥

अवश्य म्हणूनि नगात्मजा ॥ यक्षिणी पाचारी विजयध्वजा ॥ कोटी चामुंडा विभागकाजा ॥ महीलागीं उतरल्या ॥१७०॥

त्यांतें पाहूनि माय भवानी ॥ येतांचि सांगे कार्यालागुनी ॥ मच्छिंद्रशरीर समस्त वेंचोनी ॥ स्वर्गा न्यावें म्हणतसे ॥७१॥

कैलासगिरी शिवगण बहुत ॥ त्यांत वीरभद्र मम सुत ॥ तयाहातीं ओपोनि समस्त प्रेत ॥ रक्षण दृढ सांगावें ॥७२॥

ऐसें सांगूनि क्षणिक वार्त ॥ महीं संचरल्या मांसशोधार्था ॥ सकळ शरीर वेंचूनि तत्त्वतां ॥ कैलासभुवनीं चालिल्या ॥७३॥

कोटी चामुंडा प्रतापवंत ॥ यक्षिणीसह झाल्या स्वर्गस्थित ॥ कैलासगिरीं मग जात ॥ वीरभद्रातें निवेदिलें ॥७४॥

म्हणती परम हर्षेकरुनी ॥ हे महाराज शिवगणी ॥ राजेश्वर भद्रासनी ॥ वृत्तांतातें ऐकावें ॥७५॥

आमचा तुमचा शत्रु पूर्ण ॥ अवचट पावला आहे मरण ॥ रती रती देहाचे भाग जमवून ॥ आम्हीं आणिले महाराजा ॥७६॥

तरी तो शत्रु म्हणशील कोण ॥ या भूमंडळा मच्छिंद्रनंदन ॥ त्यानें आम्हांसी नग्न करुन ॥ परम लज्जे विटंबिलें ॥७७॥

अष्टभैरव पाहोनि धरणीं ॥ विटंबिलें दशा करुनि ॥ रुधिरपूर लोटूनि अवनीं ॥ विगतकळा वरियेली ॥७८॥

आणि तुम्हांसवें घेतले कटक ॥ मौळीं पर्वत देऊनि देख ॥ वायुसुत करुनि आदिक ॥ विटंबिले महाराजा ॥७९॥

सकळ देवांचा शत्रु कुजात ॥ बरा दैवें पावला घात ॥ तरी आतां प्रतापवंत ॥ दृढोत्तरीं शरीर रक्षावें ॥१८०॥

या मच्छिंद्राचा शिष्य गोरक्ष ॥ तो परम प्रतापवंत दक्ष ॥ तो जिंकूनि नेईल शरीर प्रत्यक्ष ॥ तरी सावध राहावें ॥८१॥

सहजस्थितीतें दैवेंकरुन ॥ शत्रु पावला आहे मरण ॥ हालावांचूनि फेडविलें हर्षेकरुन ॥ तुम्हां आहां दैवानें ॥८२॥

ऐसें सांगूनि हर्षयुक्त ॥ परी वीरभद्र तोषला आपुले चित्तांत ॥ मग भैरवादि समस्त ॥ अहा अहा म्हणताती ॥८३॥

मग चौर्‍यायशी कोटी बहात्तर लक्ष ॥ शिवगण प्रतापी महादक्ष ॥ मच्छिंद्रशरीर वेष्टूनि प्रत्यक्ष ॥ रक्षणार्थ बैसविले ॥८४॥

कोटी यक्षिणी चामुंडांसहित ॥ डंखिनी शंखिनी पातल्या समस्त ॥ अस्त्रशस्त्रादि होऊनि उदित ॥ रक्षण करिती शरीराचें ॥८५॥

येरीकडे त्रिविक्त्रमदेहात ॥ प्रतापशीळ जो मच्छिंद्रनाथ ॥ नित्य येऊनि शिवालयांत ॥ गुहागृहीं लक्षीतसे ॥८६॥

परी तो ठाव जैसा तैसा ॥ दिसुनि येत दृष्टिभासा ॥ मग स्वस्थ भोगी संपत्तिविलासा ॥ राज्यासनीं बैसूनियां ॥८७॥

परी शरीरा झाला जो प्रयास ॥ हें माहीत नव्हतें कांहीं देहास ॥ सदा भोगी संपत्तिविलास ॥ राजभुवना जातसे ॥८८॥

ऐसे नित्य राजविलास ॥ लोटूनि गेलीं वर्षे द्वादश ॥ तों येरीकडे तीर्थाटनास ॥ गोरक्ष सावध झाला असे ॥८९॥

तरी तो गोरक्ष पुढील अध्यायीं ॥ काय करील तो प्रतापप्रवाहीं ॥ तरी श्रोते अवधान देहीं ॥ सिद्ध करा पुढारी ॥१९०॥

अवधान पाहूनि अर्थ बहुत ॥ कथा वदेल धुंडीसुत ॥ मालू नरहरीचा शरणागत ॥ दास संतांचा असे कीं ॥९१॥

स्वस्तिश्री ग्रंथ भक्तिसार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ द्वात्रिंशति अध्याय गोड हा ॥१९२॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ अध्याय ॥३२॥ ओंव्या १९२॥

॥ नवनाथभक्तिसार द्वात्रिंशतिअध्याय समाप्त ॥


श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय ३३

॥ श्रीगणेशाय नमः ॥

जयजयाजी जगदुद्धारा ॥ कनकवर्णा नरहरि चतुरा ॥ ऐक्यत्वकारणें हरिहरां ॥ शक्य एक तुझेंचि ॥१॥

तरी आतां कृपा करुनी ॥ ग्रंथ सुचवीं सुढाळ रत्नीं ॥ शुभ योगी श्राव्य भाषणीं ॥ स्वीकार करीं महाराजा ॥२॥

मागिले अध्यायीं मच्छिंद्रनंदन ॥ त्रिविकमदेहीं संचरुन ॥ गोरक्ष तीर्थस्नानाकारणें ॥ धाडिलसे मच्छिंद्रें ॥३॥

यापरी गोरक्षनाथ ॥ महीं भ्रमतां नानी तीर्थ ॥ तो गोदातटीं अकस्मात ॥ येऊनियां पोहोंचला ॥४॥

तों गोदातटीं भामानगर ॥ तया अरण्यांत गौरकुमर ॥ परम झाला क्षुधातुर ॥ जठरानलें करुनियां ॥५॥

ग्राम पाहतां तो अरण्यांत ॥ उदक एक योजन न मिळे तेथ ॥ तया स्थानी क्षुधाक्रांत ॥ अनल जैसा पेटला ॥६॥

मार्गी चालतां दिशा लक्षीत ॥ तों शेत देखिलें अकस्मात ॥ कृषिकर्म प्रांजळवंत ॥ पाहूनि सुमार धरियेला ॥७॥

तंव तो कृषीवल माणीकनामी ॥ वय दश वर्षे देहधर्मी ॥ मध्यान्हसमय साधूनी ॥ भोजनातें बैसला ॥८॥

पात्र घेतलें पुढें वाढून ॥ कवळ करावा जों मुखीं अर्पण ॥ तों अकस्मात गौरीनंदन ॥ आदेश शब्द गाजवी ॥९॥

तंव तो माणीक कृषि शेतीं ॥ ऐकूनि आदेश शब्दाप्रती ॥ योजिला कवळ ठेवूनि हातीं ॥ प्रेमें नमीत तयातें ॥१०॥

म्हणे महाराजा तुम्ही कोण ॥ किमर्थ घेतलें आडरान ॥ येरु म्हणे मी तपोधन ॥ क्षुधानळीं पेटलों ॥११॥

परम झालों तृषाकांत ॥ म्हणोनि होऊनि आलों अतिथ ॥ तरी सन्निध अन्न असेल तूतें ॥ भिक्षा आम्हां ओपावी ॥१२॥

ऐशी ऐकतां तयाची वाणी ॥ म्हणे महाराजा योगेंद्रमुनी ॥ निधान आहे मनोधर्मी ॥ पात्र वाढिलें भक्षावें ॥१३॥

मग तो उठोनि त्याचि वेळीं ॥ शीघ्र ओपी पत्रावळी ॥ आणि मृत्कुंभ भरोनि जवळी ॥ शीघ्र करी पुढारां ॥१४॥

मग तो गोरक्ष तपोधन ॥ हस्तपाद प्रक्षाळून ॥ अन्नपात्र पुढें घेऊन ॥ जठराहुती घेतसे ॥१५॥

पूर्ण झाल्या जठराहुती ॥ मग सहजचि तुष्ट झाला चित्तीं ॥ कीं रुखा होतां जलप्राप्ती ॥ लवणाकार पावतसे ॥१६॥

कीं दरिद्याप्रती देतां धन ॥ मग कां न पावे तुष्ट मन ॥ कीं यथेच्छ मेळविता झाल्याकारण ॥ तोष शरीरीं मिरवेना ॥१७॥

तन्नाय कृषिनरेंद्रात्तमा ॥ घडूनि आलें तुष्टमहिमा ॥ मग प्रसन्न होऊनि चित्तद्रुमा ॥ वरदफळा दावी तो ॥१८॥

म्हणे कृषिका कवण काम ॥ मिरवला हो देहधर्मी ॥ येरु ऐकोनि म्हणे स्वामी ॥ आतां कासया पुसतां हो ॥१९॥

तरी महाराजा आटाआटी ॥ करावी प्रथम कार्यासाठी ॥ कार्य झालिया व्यर्थ चावटी ॥ अन्यासी कासया शिणवावें ॥२०॥

तरी आतां कार्य झालें ॥ पुढें योजीं शीघ्र पाउलें ॥ गोरक्ष म्हणे बोलशी बोल ॥ सत्य असती तुझे बा ॥२१॥

परी तुवां मातें दिधलें अन्न ॥ तेणें मम चित्त झालें प्रसन्न ॥ तरी तव देहीं किंचित पण ॥ सत्य असेल वद मातें ॥२२॥

जे जे कामना असेल तूतें ॥ ती पूर्ण पावशी फळसहितें ॥ येरी ऐकूनि कृषी त्यातें ॥ ऐसें उत्तर देतसे ॥२३॥

म्हणे महाराजा महीपाठीं ॥ तुम्हीच हिंडतां भिकेसाठी ॥ ते तुम्ही मोह धरुनि पोटीं ॥ मातें काय द्याल जी ॥२४॥

भणंगापाशीं भणंग गेला ॥ तो काय देऊनि तृप्त झाला ॥ खडका उदकपान्हा बोला ॥ कदाकाळी दिसेना ॥२५॥

तुम्ही तेवी हिंडतां अन्नासाठी ॥ आम्हां काय देणार जेठी ॥ नाथ म्हणे इच्छातुष्टा ॥ आतां तुझी करीन बा ॥२६॥

येरी म्हणे पुरें बोलणें ॥ काय आहे तुम्हांस्वाधीन ॥ तरी आणिक तुजकारण ॥ लागत असेल तें माग ॥२७॥

नाथ म्हणे रे एक दान ॥ तुवां दिधल्या झालों प्रसन्न ॥ तरी कांहीतरी मजपासून ॥ मागूनि घेई कृषिराया ॥२८॥

येरु म्हणे उगला ऐस ॥ तुवां काय द्यावें आम्हांस ॥ तरी कांहीं न मागूं सुरस ॥ पंथ आपुला क्रमीं कां ॥२९॥

ऐसे बोलतां माणीकनामी ॥ गोरक्ष विचारी आपुलें मनीं ॥ आडबंग असती कृषिधर्मी ॥ सदा विपिनीं बैसूनियां ॥३०॥

तरी हा मातें म्हणतो माग ॥ परी त्याच्याचि हितार्थ करावा लाग ॥ ऐसें विचारोनि मनोवेगें ॥ तयालागीं बोलतसे ॥३१॥

म्हणे कृषिराया ऐक वचन ॥ तूं आम्हांसी म्हणशील देऊं देणें ॥ तरी मागें सरस वचन ॥ निश्चयें करुनियां बोलावें ॥३२॥

येरु म्हणे तापसा ऐक ॥ मातें दिससी महामूर्ख ॥ जो देणार आपुले आत्मसुख ॥ तो मागें सरणार नाहीं कीं ॥३३॥

अरे चंद्र असे शीतळपणीं ॥ तरी तो वर्षेल दाहकपणीं ॥ परी तो ढळणार नाहीं प्राणी ॥ मागें पाऊल कासया ॥३४॥

सविताराज तेजोदीप्ती ॥ तोही अंधकारीं करील वस्ती ॥ परी उदार तो औदार्याप्रती ॥ मागें पाऊल सारीना ॥३५॥

मही गेलिया रसातळीं ॥ परी औदार्यप्राप्ती महाबळी ॥ त्या कृपणत्व कदाकाळी ॥ अंगालागीं स्पर्शेना ॥३६॥

तरी कोणतें मागणें तूतें ॥ मागूनि घेईजे त्वरितें ॥ मी बोललों निश्चयातें ॥ निश्चय माझा पाहीं कां ॥३७॥

ऐशी बोलतां विपुल वार्ता ॥ गोरक्ष म्हणे आपुल्या चित्ता ॥ तरी मनाचे करणें मागूं आतां ॥ कैसा सांभाळील पाहू तो ॥३८॥

ऐसा विचार करुनि चित्तीं ॥ म्हणे मज दावीं कां विपिनपती ॥ जें जें आवडेल तुजे चित्तीं ॥ तें तूं न करीं महाराजा ॥३९॥

कांही एक इच्छील तुझें मन ॥ तें तूं न करणें हेंचि मागणें ॥ इतुकें देऊनि तुष्टपण ॥ बोळवीं कां कृषिराजा ॥४०॥

ऐशीं वदतां तयाची वाणी ॥ अवश्य म्हणे कांषकर्मी ॥ हा धर्म आतां आपुले धर्मी ॥ अर्कअवधीं रक्षीन गा ॥४१॥

ऐशी तैशी देऊनि भाक ॥ तुष्ट केलें शरीरास ॥ असो गोरक्ष त्या विपिनास ॥ सांडूनियां चालिला ॥४२॥

माणिकनामी कृषी शेतांत ॥ मुक्त करिता झाला औत ॥ येठणें बांधूनि समस्त ॥ भार सकळ वाहातसे ॥४३॥

वृषभा मागें दिधलें लावून ॥ मौळीं घेत येठण उचलून ॥ मनांत म्हणे ग्रामासी जाऊन ॥ क्षुधाबल घालवावें ॥४४॥

इतुकी मनीं योजना होतां ॥ स्मरण झालें गोरक्षनाथा ॥ पुत्र कल्याण आणितां चित्ता ॥ मनाचें करणें उल्लंधावें ॥४५॥

मन इच्छीत असे घरीं जावया ॥ तरी आपण न जावें तया ठाया ॥ मग तेथेंचि उभा राहूनियां ॥ गाढ निद्रा करीतसे ॥४६॥

मौळीं येठणाचा भार ॥ घेऊनि उभा महीवर ॥ नेत्र झांकूनि चिंतापर ॥ हरिनामीं योजितसे ॥४७॥

मन इच्छी हालवूं अंग परी न हाले धडभाग ॥ स्थिर होऊनि संचरले ओघ ॥ वचनार्थ संपादी ॥४८॥

तरुपर्ण जे येती उडोन ॥ तेचि करीतसे भक्षण ॥ मनीं येतां सांठवण ॥ तेही त्याग पर्णीचे करीतसे ॥४९॥

मग सहजस्थितीं वायुलहर ॥ अकस्मात येतसे मुखावर ॥ तितकेचि प्राशन आहारपर ॥ अमल मन होतसे ॥५०॥

तेणें कृश झालें शरीर ॥ सकळ आटूनि गेलें रुधिर ॥ मांस म्हणाया तिळभर ॥ स्वप्नामाजी दिसेना ॥५१॥

त्वचा अस्थि झाल्या एक ॥ उभा राहिला कष्टदायक ॥ येरीकडे तपोबाळक ॥ बद्रिकाश्रमीं पातला ॥५२॥

बद्रिकेदारा नमूनि त्वरित ॥ पाहूं चालिला चौरंगानाथ ॥ तंव गुहागृहीं शरीरावरतीं ॥ वाळवीवारुळ विराजले ॥५३॥

मुखीं तितुकी नामावळी ॥ आणि नेत्रचंद्रीं असे शिळाभारीं ॥ असे स्थिर तया स्थळीं ॥ गोरक्षनाथ प्रगटला ॥५४॥

त्वरित द्वाराची शिळा काढून ॥ पाहे तयाचे शरीराकारणें ॥ तों वारुळ गेलें वेष्टून ॥ सर्व अंगीं तयाच्या ॥५५॥

शिळाचंद्री न हाले पाती ॥ रामशब्दें वलगे उक्ती ॥ तें पाहूनियां गोरक्ष जती ॥ परम चित्तीं हळहळला ॥५६॥

मग शरीराचे वारुळ काढून ॥ पाहे तयाचे शरीराकारण ॥ तों हस्तपाद लवेंकरुन ॥ तपोबळें आले ते ॥५७॥

मग सावध करुनि तयातें ॥ म्हणे पाहें मी आलों गोरक्षनाथ ॥ शीघ्र कवळूनि तयाचा हस्त ॥ बाह्यात्कारीं आणिले ॥५८॥

मग कृपें करितां अवलोकन ॥ शरीरशक्ति आली दारुण ॥ मग उठूनि वंदी गोरक्षचरण ॥ म्हणे सनाथ झालों असें मी ॥५९॥

यापरी तयासी आलिंगुनी नाथ ॥ म्हणे बा कैसा झाला चरितार्थ ॥ येरी म्हणे मज माहीत ॥ नाही चामुंडे विचारी ॥६०॥

मग विचारुनि चामुंडेसी ॥ वृत्तांत पुसे चरितार्थासी ॥ येरु म्हणे आम्ही फळांसी ॥ देत होतों महाराजा ॥६१॥

परी चौरंगी न करुनि भक्षण ॥ बैसला होता शिळा लक्षून ॥ मग फळेंचि पर्वताप्रमाणें ॥ गोरक्षातें दाविलीं ॥६२॥

फळनगा पाहोनि तपोजठी ॥ विस्मय करी आपुल्या पोटीं ॥ म्हणें धन्य याची तपोराहाटी ॥ ब्रह्मादिकां अतर्क्य ॥६३॥

परम चित्तीं कृपा वेष्टुनी ॥ मौळीं ठेविला वरदपाणी ॥ अनुग्रहचोज पुन्हां दाउनी ॥ ब्रह्मसनातन केला असे ॥६४॥

पुढें चौरंगीसी घेऊन ॥ बद्रिकेदारालया आणून ॥ जागृत करुनि उमारमण चौरंगीतें भेटविला ॥६५॥

मग तेथें राहूनि षण्मास ॥ सकळ करविला विद्याभ्यास ॥ अस्त्र शस्त्र बहुवस ॥ प्रवीण झाला महाराजा ॥६६॥

मग सकळ देवांतें पाचारुन ॥ तपोवळें केलें सधन ॥ मग सकळ दैवतें तुष्ट करुन ॥ वरदप्रज्ञा आराधिलें ॥६७॥

सकळ देव वर देऊन ॥ पहाते झाले आपुले स्थान ॥ येरीकडें बद्रिकेदार नमून ॥ चौरंगीसह निघाला ॥६८॥

त्वरें येऊनि वैदर्भ देशांत ॥ चौरगींतें कौंडिण्यपुर दावीत ॥ म्हणे बा रे तव माता तात ॥ भेट घेई तयांची ॥६९॥

भेटशी तरी कैसा त्यातें ॥ जगीं जाऊनि अति ख्यात ॥ हस्तपदांचे मुंडणखंडणनिमित्त ॥ उत्तरा सड घेईजे ॥७०॥

राये छेदिलें तव हस्तपदासी ॥ परी धुसधुसी आहे मम मानसीं ॥ तरी आपुला प्रतापसंगम रायासी ॥ निजदृष्टीं दावीं कां ॥७१॥

अवश्य म्हणे चौरंगीनाथ ॥ भस्मचिमुटी कवळुनि हस्त ॥ रायाचें लक्षूनि बागाईत ॥ वातास्त्रासी सोडीतसे ॥७२॥

तंव तेथींचे वनकर ॥ सहा शत एक सहस्त्र ॥ वातचक्रें उडवूनि अंबर ॥ दाविता झाला तयांसी ॥७३॥

पुन्हां वातअस्त्र घेत काढून ॥ तंव ते उतरती महीकारण ॥ किती पडले मूर्च्छना वेष्टून ॥ कितीएक ग्रामीं पळाले ॥७४॥

तें येऊनि राजांगणी ॥ सांगते झाले विपरीत करणी ॥ कोणी केली न दिसे नयनीं ॥ आश्चर्य बहु होतसे ॥७५॥

मग भृत्यांतें पाचारुन ॥ पुसूनि त्यातें वर्तमान ॥ कोणी केलें आला कोण ॥ शोधालागी धाडीतसे ॥७६॥

तों येरीकडे चौरंगीसहित ॥ पाणवठी बैसला गोरक्षनाथ ॥ हेर पाहूनि त्वरित ॥ रायापाशीं पातले ॥७७॥

म्हणती महाराजा पाणवध्यासी ॥ बैसले आहेत दोन तापसी ॥ तीव्रतेजी कानफाटवेषी ॥ विद्यार्णव दिसताती ॥७८॥

ऐसें ऐकूनि राजेश्वर ॥ स्वननीं आपुला करी विचार ॥ आले असती गोरक्ष मच्छिंद्र ॥ पुत्रदुःखें द्वेषानें ॥७९॥

तरी आतां त्वरेकरुन ॥ तयांसी जावें शरण ॥ नातरी ग्रामासी पालथें करुन ॥ प्राणांप्रती हरतील ॥८०॥

ऐसा विचार करुनि मानसीं ॥ राव सामोरा ये समारंभेंसी ॥ गज वाजी शिबिका रथांसी ॥ कटकासह येतसे ॥८१॥

ग्रामाबाहेर कटक येतां ॥ गोरक्ष म्हणे चौरंगीनाथा ॥ आपुला प्रताप आतां ॥ निजदृष्टीं दावीं कां ॥८२॥

ऐशीं ऐकतां गोरक्षगोष्टी ॥ पुन्हां कवळी भस्मचिमुटी ॥ वातास्त्र जल्पूनि पोटी ॥ चमूवरी प्रेरीतसे ॥८३॥

मग तें वातास्त्र अति तीक्ष्ण ॥ चमूसह राया दाविलें गगन ॥ रथ गज वाजा शिबिकासन ॥ वातास्त्रें पाडिली ॥८४॥

तेणेंकरुनि चभू समस्त ॥ गगनपंथें आरंबळत ॥ म्हणती हे महाराजा नाथ ॥ शरणागता तारावें ॥८५॥

सकळ स्तविती दीनवाणीं ॥ ते शब्द ऐकोनि तपोज्ञानी ॥ चौरंगीसी म्हणे घे उतरोनी ॥ चमूसहित रायातें ॥८६॥

मग तो कुशल प्रज्ञावंत ॥ पर्वतास्त्र असे आड करीत ॥ मग सकळ आटूनि गेला वात ॥ चमू मिरवली नगमौळी ॥८७॥

मग उभा करोनि आपुला कर ॥ म्हणे उतरुनि यावें चमू समग्र ॥ मग रायासह कटकभार ॥ उतरले तळवटी ॥८८॥

मग समीप येतां शशांगर ॥ चौरंगीसी बोलिला गौरकुमर ॥ पितयासी करुनि नमस्कार ॥ तुष्ट चित्तीं मिरवीं कां ॥८९॥

ऐसें ऐकतां गुरुनंदन ॥ धावूनि धरिले तातचरण ॥ म्हणे महाराजा मी तव नंदन ॥ निजदृष्टीं देखें मज ॥९०॥

ऐसे बोलतां चौरंगनाथ ॥ रावें धांवूनि धरिले हदयांत ॥ मग परम प्रीतीं गोरक्षातें ॥ चरणीं भाळ अर्पीतसे ॥९१॥

मग गोरक्षही धरुनि हदयीं ॥ म्हणे राया याचा प्रताप पाहीं ॥ येरी म्हणे तुजसमान आई ॥ भेटल्या न्यून कायसें ॥९२॥

याउपरी तैसें चौरंगीनाथ ॥ वज्रास्त्र निर्माण करीत ॥ चूर्ण करुनि महापर्वत ॥ अदृश्यपंथीं मिरवतसे ॥९३॥

याउपरी शशांगर ॥ गोरक्षासी म्हणे चतुर ॥ आरोहण करुनि शिबिकेवर ॥ राजसदनीं चला जी ॥९४॥

याउपरी बोले चौरंगीनाथ ॥ आम्ही न येऊं तव गृहांत ॥ सापत्न मातुःश्रीचे कुडें मनांत ॥ हस्तपाद छेदिले ॥९५॥

मग मूळापासोनि सकळ वृत्तांत ॥ रायालागीं केला श्रुत ॥ राव कोपोदधींत ॥ उचंबळला आगळा ॥९६॥

सेवकालागीं आज्ञा करीत ॥ ताडीत आणा राणी येथ ॥ तें ऐकूनि चौरंगीनाथ ॥ काय परी वदतसे ॥९७॥

म्हणे ताता आपुलें वचन ॥ हेचि शिक्षा आली घडून ॥ यापरी ताता आपुले कीर्तीनें ॥ ब्रह्मांड भरेल महाराजा ॥९८॥

तरी ऐसें न करीं ताता ॥ सदनींच शिक्षा करावी प्रीता ॥ मग शिबिकासनी बैसवूनि तत्त्वतां ॥ राजसदना पातले ॥९९॥

राव जातां मंदिरांत ॥ पादत्राण घेऊनि हातांत ॥ ताडन करुनि पत्नीतें ॥ म्हणे जाई येथूनी ॥१००॥

द्वादश संवत्सरपर्यंत ॥ त्वां तप केलें शुचिष्मंत ॥ तयाचें फळ कुडें मत ॥ भ्रष्ट केलें राज्यासी ॥१॥

तें पाहूनि गोरक्षनाथें ॥ राया संबोधूनि केला शांत ॥ एक मास राहिला तेथ ॥ शशांगरभक्तीनें ॥२॥

यापरी गोरक्ष जातेसमयीं ॥ वंश वेष्टी मोहप्रवाहीं ॥ प्रसाद देऊनि राजदेही ॥ वीर्यवान पैं केला ॥३॥

म्हणे कामिनी करुनि दुसरी ॥ भोगीं वंशलतेची लहरी ॥ ऐसें सांगूनि शशांगरीं ॥ चौरंगीसह चालिला ॥४॥

मार्गी चालतां मुक्काम ॥ पाहते झाले प्रयागस्थान ॥ स्नान करुनि उत्तोमात्तम ॥ शिवालयीं पातलें ॥५॥

येतांचि करुनि शिवदर्शन ॥ मग शिवदारे बोलूनि वचन ॥ गुरुकलेवराचें वर्तमान ॥ तियेलागी पुसतसे ॥६॥

तंव ती होऊनि भयभीत ॥ बोलती झाली चाचरे घेत ॥ शरीरेंकरुनि थरथरां कोपित ॥ पायावरी लोटली ॥७॥

म्हणे महाराजा गुरुनाथा ॥ राजाभाजा रेवतीकांता ॥ तिनें मातें भ्रष्टवूनि चित्ता ॥ पुसूनि घेतलें होतें कीं ॥८॥

याउपरी दुसर्‍यालागुनी ॥ वदलें नाहीं कलेवर कहाणी ॥ परी नेणों भय वाटे मनीं ॥ कलेवर पहा निजदृष्टी ॥९॥

स्त्रीजाती बोलती एक ॥ परी करणी करिती आणिक ॥ मज वाटतसे ती चाळक ॥ समक्ष दृष्टीं पहावें ॥११०॥

ऐसी ऐकूनि तियेची वाणी ॥ परम घाबरला गोरक्षमुनी ॥ मग एकांत गुहासदनीं ॥ विदारुनि पाहतसे ॥११॥

तंव तें मोकळे गुहागार ॥ आंत नाहीं कलेवर ॥ मग नेत्रीं दाटूनि मोहाचा पूर ॥ शोकसिंधु उचंबळे ॥१२॥

तंव तो म्हणे महाराजा प्रज्ञावंता ॥ सोडूनि दिधली माजी ममता ॥ आतां येथें गुरुनाथा ॥ कवणे ठायीं पाहूं मी ॥१३॥

ऐसें म्हणूनि आरंबळत ॥ धरणीप्रती शरीर टाकीत ॥ तंव ती शैवदारा मोहस्थित ॥ होऊनि त्यातें बोलतसे ॥१४॥

म्हणे महाराजा धैर्य धरीं ॥ मीं राजांगने जाऊनि सत्वरीं ॥ पुसूनि येतें मच्छिंद्रशरीरीं ॥ वृत्तांत कैसा झाला तो ॥१५॥

ऐसें बोलूनि गोरक्षातें ॥ शैवदारा अंतःपुरांत ॥ शीघ्र जाऊनि रेवतीतें ॥ राजनेमानें नमियलें ॥१६॥

तंव ती पाहूनि शैवकामिनी ॥ म्हणे कां आलीस वो माय बहिणी ॥ येरी म्हणे अंतःकरणीं ॥ आठव मातें झालासे ॥१७॥

म्हणाला तरी आठव कोण ॥ तरी द्वादश वर्षे आलीं भरुन ॥ तुम्हांलागीं सांगितली खूण ॥ राजभागीं विचारा ॥१८॥

ऐसी ऐकतां तियेची वाणी ॥ एकांता ने ते राजपत्नीं ॥ म्हणे माय वो अंतःकरणीं ॥ चिंता सोडीं सकळ ती ॥१९॥

अगे तुजविरहित त्याचि दिवशीं ॥ कलेवर काढूनि शस्त्रउद्देशी ॥ वांटले गे रतिरती मांसीं ॥ सकळ विपिनामाझारी ॥१२०॥

त्यासही लोटले बहुत दिवस ॥ अस्थिमांसाचा झाला नाश ॥ जीवजंतू खाऊनि त्यास ॥ विष्ठा मृत्तिका झाली असे ॥२१॥

तरी या कार्याचा सकळ तरु ॥ समूळीं उपटिला बीजांकुरु ॥ आतां चिंतेचें फळ अपारु ॥ कोठूनि दृष्टी पडेल ॥२२॥

ऐसें बोलता राजांगना ॥ परम चितें व्यापिली मना ॥ म्हणें नेणों पुढिल्या कर्मा ॥ कैसें घडोनि येईल ॥२३॥

परी आतां असो कैसें श्रुत करावें गोरक्षास ॥ जें जें असेल प्रारब्धास ॥ भोग भोगणें लागेल ॥२४॥

ऐसा विचार करुनि चित्तीं ॥ पुनश्व आली शिवालयाप्रती ॥ जे वदली रेवती युक्ती ॥ प्रांजळ तैसें सांगितले ॥२५॥

सांगतां ऐकिलें नाथें ॥ परम पेटला क्रोधानळातें ॥ म्हणे शिक्षा करावी राजभाजेतें ॥ दुःखार्णवीं बुडवूनियां नाथें लागतसे ॥२७॥

जरी अवज्ञा करुन ॥ जंतूंचे झालें भक्षण ॥ तरी आतां शोधार्थ मन ॥ मच्छिंद्रशरीरीं ठेवावें ॥२८॥

न द्यावें तिसी शिक्षेकारणें ॥ तें नाश न पावे निश्चय पूर्ण ॥ कोणे तरी ठाया लागून ॥ मच्छिंद्रदेह असेल ॥२९॥

मग बोलावूनि चौरंगीतें ॥ म्हणे बा रक्षीं शरीरातें ॥ मी देहासी सांडूनि त्रिभुवनातें ॥ कलेवर शोधार्थ जातों कीं ॥१३०॥

परी रेवती येथील राजकांता ॥ प्रवर्तली आहे मच्छिंद्रघाता ॥ तैशीच वहिवटेल माझिया अर्था ॥ म्हणूनि सावध असावें ॥३१॥

ऐसें सांगूनि चौरंगीतें ॥ प्रवेश करी गुहागृहातें ॥ प्राण सान शरीरातें ॥ भ्रमण करी दक्ष दिशा ॥३२॥

सकल शोधला जंबुद्वीप ॥ सरितार्णवीं सकल आप ॥ ग्राम कानन सप्तद्वीप ॥ रतीरती शोधिलें ॥३३॥

परी जीवजंतूची देहस्थिती होऊन ॥ शोधितां गुरुचें कलेवर पूर्ण ॥ कोणेतरी ठायालागून ॥ मच्छिंद्रदेह असेल ॥३४॥

अतळ वितळ सुतळ पाताळ ॥ सप्तही पाताळस्थळ ॥ पिंडब्रह्मांड शोधूनि सकळ ॥ स्वर्गावरी चालिले ॥३५॥

सुवर्लोक भुवर्लोक तपोलोक ॥ अर्यमा यक्षादि सत्यलोक ॥ कुबेर तारागणादि अनेक ॥ शोधूनियां पाहिले ॥३६॥

एक मेरु स्वर्गपाठार ॥ गणगंधर्वादि अन्य सुरवर ॥ सकल शरीरा करुनि संचार ॥ गुरुशरीरे शोधिलें ॥३७॥

उपरी पाहूनि वैकुंठ समस्त ॥ त्वरें पातला कैलासाप्रत ॥ तों होतांचि प्रवेश शिवगणांत ॥ धुंडाळूनि पाहतसे ॥३८॥

तों शिवगणीं चामुंडासमुदायांत ॥ अस्थि त्वचा मांस देखे समस्त ॥ यापरी वीरभद्र सर्व गणांत ॥ गर्जोनियां सांगतसे ॥३९॥

म्हणे द्वादश वर्षाचा सरला नेम ॥ मच्छिंद्रशवातें करा रक्षण ॥ तयाचा शिष्य गौरनंदन ॥ कोणे रुपें येईल कीं ॥१४०॥

ऐसी ऐकूनि तयाची वार्ता ॥ गोरक्ष तेथूनि झाला निघता ॥ तों येरीकडे चौरंगीनाथा ॥ काय सुचलें होतें कीं ॥४१॥

गोरक्षशवाजवळ बैसून ॥ आणीक सकळ अस्त्र व्यापून ॥ जेथें लाग न लागे देवांकारण ॥ ब्रह्मादिकांकरुनियां ॥४२॥

ऐसें अस्त्र व्याप्त ॥ तैशांतूनि निघूनि गौरसुत ॥ गुप्तवेषें शरीरांत ॥ येऊनियां प्रवेशला ॥४३॥

प्रवेशतांचि अकस्मात ॥ उठूनि बैसला गौरसुत ॥ मार्ग सोडूनि गुहागृहांत ॥ बाहेर आले उभयतां ॥४४॥

मग सिद्ध करुनि भस्मझोळी ॥ उभे राहिले दोन्ही बळी ॥ पर्वतास्त्र तेणें काळीं ॥ अर्कावरी सोडिलें ॥४५॥

गोरक्षमुखींचें पर्वतास्त्र ॥ प्रविष्ट होतां अति स्वतंत्र ॥ माथां उचलितां अंबरपात्र ॥ भरोनियां निघाले ॥४६॥

सवालक्ष योजनमिती ॥ स्वर्गी उंच झाले गभस्ती ॥ त्याहूनि माथा द्विगुण पर्वती ॥ अंबरातें मिरवला ॥४७॥

मित्रमार्गीचा धरुनि रोक ॥ आकाशस्तंभ झाला एक ॥ तेणेंकरुनि स्यंदनीं अर्क ॥ मार्गावरी अडखळला ॥४८॥

चक्रपदा चालावया वाट ॥ न मिळे पाहूनि सुभट ॥ मग सज्ज करुनि गांडीवचिमुटी ॥ योजिता झाला महाराजा ॥४९॥

तीव्रशरीरीं वज्रास्त्र ॥ योजूनि सोडी प्रविष्ट मित्र ॥ तेणेंकरुनि पर्वतास्त्र ॥ भंगिता झाला ते क्षणीं ॥१५०॥

परी पर्वतास्त्र भंगित होतां ॥ आदित्य विचारी आपुले चित्ता ॥ हें अस्त्र कोणाची प्रतापदुहिता ॥ आडमार्गी झालें असे ॥५१॥

ऐसें पाहतां अर्क अंतरी ॥ तो समजला नर गोरक्षकेसरी ॥ मग स्यंदनासह महीवरी ॥ येऊनियां प्रगटला ॥५२॥

येतां देखती अर्कराज ॥ काय करिती हो विजयध्वज ॥ चंद्रास्त्राचें पेरुनि बीज ॥ कोटी चंद्र निर्मिले ॥५३॥

तेणेंकरुनि शीतळ प्रवाहीं ॥ मिरवती झाली मही ॥ मग तो सकळ दाह स्वभावीं ॥ बाधूं न शके अर्काचा ॥५४॥

ऐसी समाधानस्थिती होतां ॥ परी समीप पावला प्रविष्ट सविता ॥ मग चौरंगी आणि गोरक्षनाथ ॥ अर्कचरणी लागती ॥५५॥

यापरी भाविकस्थिति सांगून ॥ बोलता झाला जगलोचन ॥ बा रे तुज सुखसंबंध कोण ॥ दर्शवीं कां वाचेशीं ॥५६॥

येरु म्हणती महाराजा ॥ आम्ही उदेलों एक काजा ॥ मच्छिंद्रदेह तेजःपुंजा ॥ शिवगणें हरियेला ॥५७॥

तरी आपण जाऊनि तेथें ॥ सुनीति सांगावी वीरभद्रातें ॥ की मच्छिंद्रदेह महीते ॥ पाठवूनि द्यावा कीं ॥५८॥

परी या कार्या बहुधा नीती ॥ सांगूनि जरी ना ऐकती ॥ मग मागूनि बोलावूनि घेऊं या क्षितीं ॥ युद्धालागीं मिसळाया ॥५९॥

ऐसें पर्वी महापर्वी ॥ आमुची जाऊनि करावी शिष्टाई ॥ इतुका उपकार मच्छिंद्रदेहीं ॥ आम्हांसी साह्य मिरवावें ॥१६०॥

ऐसें बोलतां गोरक्षनाथ ॥ आदित्य अवश्य त्यांतें म्हणत ॥ मग त्या क्षणीं कैलासा जात ॥ त्वरित जाऊनि पोंचला ॥६१॥

गणें पाहूनि अर्क येतां सहज ॥ पापांलागीं विजयध्वज ॥ म्हणती येणें महाराज ॥ कवण्या अर्था झाले असें ॥६२॥

आदित्य म्हणे ऐका वचन ॥ गोरक्षशिष्टाईसाधन ॥ करुं पातलों तुम्हांकारण ॥ मच्छिंद्रदेहाकारणें ॥६३॥

तरी मम बोलणें आतां ॥ चित्त द्यावें परम हिता ॥ महीसी पाठवा मच्छिंद्रदेह आतां ॥ तुष्ट करीं गोरक्षा ॥६४॥

तुम्हीं तुष्ट केलिया त्यास ॥ नाथपंथें वाढेल प्रीत ॥ ऐसें उत्तर बोलतां आदित्य ॥ वीरभद्र बोलतसे ॥६५॥

हे महाराजा ऐक वचन ॥ आम्हांसीं दुःख दिधलें मच्छिंद्रानें ॥ तरी आतां गेलिया प्राण ॥ मही न दाऊं शबातें ॥६६॥

जरी गोरक्ष झुंजेल आम्हांतें ॥ तरी सिद्ध होऊं युद्धातें ॥ गोरक्ष जिंकूनि समरंगणातें ॥ मच्छिंद्रासम करुनि ठेवूं ॥६७॥

उपरी बोले नारायण ॥ मच्छिंद्रें दुःख दिलें तुम्हांकारण ॥ तेव्हां तुमचा प्रताप पळून ॥ कवण ठाय गेलासे ॥६८॥

आतां अवचट घडलें ऐसें ॥ म्हणूनि प्रौढ झाला मानसें ॥ परी मच्छिंद्र जैसा तैसाच गोरक्ष ॥ प्रतापबळी असे कीं ॥६९॥

तेव्हां मच्छिंद्र होता एक ॥ आतां दोघे असती प्रतापअर्क ॥ ते कोपल्या सकळ धाक ॥ कृतांतासम योजिती ॥१७०॥

येरु म्हणती असो कैसे ॥ परी कदा न देऊं मच्छिंद्रास ॥ यापरी बोलतां राजस ॥ आवडेल तैसें करावें ॥७१॥

परी एक आणिक वचन ॥ तुम्ही उतरा महींकारण ॥ स्वर्गी करितां कंदन ॥ शिवलोकांत पावेल तें ॥७२॥

म्हणती कीं यासी काय कारण ॥ तरी ते प्रतापी असती तीक्ष्ण ॥ कैलासगिरि पिष्ट होऊन ॥ खंड करितील क्षणाधें ॥७३॥

परी ते पाहूनी येथील वस्ती ॥ विनाश होईल स्वर्गाप्रती ॥ मग त्या कोपे पशुपती ॥ शासन करील तुम्हांतें ॥७४॥

भवभवानी अति प्रीती ॥ करिती गोरक्षमच्छिंद्रांप्रती ॥ पहा शरीरज सवें चामुंडांहातीं ॥ कैलासातें पाठविले ॥७५॥

तरी आतां शिवा न कळतां ॥ मानेल तैसे करावें चित्ता ॥ ऐशी गोष्ट आदित्य बोलतां ॥ सर्वां परी मानलें ॥७६॥

मग वीरभद्र म्हणे सर्व गणांसी ॥ तुम्ही युद्धा जावें सर्व महीसी ॥ दुःख लागतां कांहीं रणासी ॥ मीही येतों मागून ॥७७॥

मग अष्टभैरवगण ॥ अवश्य म्हणूनि करिती गमन ॥ विमानें प्रत्यक्ष घेऊन ॥ शस्त्रअस्त्रादिकीं उतरले ॥७८॥

बहात्तर कोटी चौर्‍यायशीं लक्ष ॥ येतांचि देखे नाथ गोरक्ष ॥ मग चौरंगीतें बोले प्रत्यक्ष ॥ सावध होई मम वत्सा ॥७९॥

असो शिवगण येतांचि महीं ॥ लोटते झाले शस्त्रप्रवाहीं ॥ तें गोरक्ष पाहूनि त्या समयीं ॥ वर्जास्त्र निर्मियेलें ॥१८०॥

वज्रास्त्र पातलें लव न लागतां ॥ सहस्त्र वेळां भवतें फिरतां ॥ तेणें शिवगणांचे शर समस्त ॥ अंगी लिप्त न होती ॥८१॥

तें पाहूनियां सकळ शिवगण ॥ योजिती अपार अस्त्रांकारण ॥ तितुक्याहीं अस्त्रां उभय जन ॥ लक्ष्य धरुनि उडविती ॥८२॥

अग्निअस्त्र धूमास्त्र ॥ तयावरी प्रेरिती वातास्त्र ॥ वातास्त्रावरी उरगास्त्र ॥ प्रेरिते झाले शिवगण ॥८३॥

काळास्त्र आणि वज्रास्त्र ॥ महाकठिण स्पर्शास्त्र ॥ तयामाजी दानवास्त्र ॥ प्रळय करीत आगळा ॥८४॥

तें पाहूनि गोरक्षनाथ ॥ प्रेरिता झाला जलदास्त्र ॥ तयामागें पर्वतास्त्र ॥ लागोपाठ करीतसे ॥८५॥

तयामागे खगेंद्रास्त्र ॥ तयामागें संजीवनी अस्त्र ॥ मग प्रेरी इंद्रास्त्र ॥ ते जाऊनिया झगटे ॥८६॥

विभक्तास्त्र देवास्त्र कठिण ॥ तींही झगटती त्वरेंकरुन ॥ ऐसें अस्त्र परिपूर्ण ॥ गण अस्त्र तें भंगिती ॥८७॥

त्यात काय करी चौरंगीनाथ ॥ हळूचि मोहनास्त्र प्रेरीत ॥ तें संचरुनि गणहदयांत ॥ मग पिसाटपणें मिरवत ॥८८॥

सर्वासी नाहीं देहभान ॥ तेणें न कळे आलों कोणकार्यालागून ॥ पिशाचवृत्तीं भ्रमत रानोरान ॥ व्यर्थ फिरते जाहले ॥८९॥

त्यांत आणिक चौरंगीनाथ ॥ प्रेरी प्रळयकाळींचा वात ॥ तेणें गण समस्त ॥ वायुचक्रीं पडियेले ॥९०॥

तों वीरभद्र मागूनि चामुंडेसहित ॥ युद्धालागीं आला त्वरित ॥ परी शिवगण पाहूनि अव्यवस्थित ॥ परम चित्ती क्षोभला ॥९१॥

मग गांडीवातें टणत्कारोनी ॥ बाण योजिले अपार गुणी ॥ कामास्त्र ब्रह्मास्त्र कार्तिक तीन्ही ॥ विविध बाणीं पाडीतसे ॥९२॥

जैसा प्रळयकाळींचा वडवानळ ॥ तो यत्नें न पावे कदा शीतळ ॥ तन्न्यायें शिवबाळ ॥ कोपानळी वेष्टिला ॥९३॥

तें पाहूनि चौरंगीनाथ ॥ रतिअस्त्र प्रेरीत त्वरीत ॥ तेणें कामास्त्र त्वरें निश्चित ॥ मूर्च्छित होऊनि पडियेले ॥९४॥

यावरी दुसरें चौरंगीनाथ ॥ दशासुरी अस्त्र प्रेरीत ॥ तें पाहुनियां नाभीसुत ॥ झडझडोनि पळतसे ॥९५॥

चित्तीं म्हणे नोहे बरवें ॥ वेद हरतील आतां सर्व ॥ शंखासुर प्रतापार्णव ॥ पुनः उदय झाला असे ॥९६॥

ऐसा विचार करुनि मनीं ॥ ब्रह्मास्त्र दडविलें अदृश्यपणीं ॥ पुढें कामिनीअस्त्र चौरंगीमुनी ॥ ग्रेरिता झाला लवलाहे ॥९७॥

तें पाहूनि कार्तिकास्त्र ॥ पळूनि लपवी मुखपात्र ॥ परी चौरंगीचे पांचजन्यास्त्र ॥ प्रळयालागीं मिरवले ॥९८॥

तें पाहूनियां भद्रजाती ॥ मत्स्यास्त्र योजिलें परन निगुती ॥ तेणे करुनि तदस्त्र शांती ॥ अदृश्य तें मिरवलें ॥९९॥

परी परम कोपोनि तपोबळ ॥ तीव्रास्त्र योजिलें तत्काळ ॥ संजीवनी योजूनि सबळ ॥ सकळ दानवां उठलें ॥२००॥

ते दानव म्हणाल कोण कोण ॥ त्रिपुरसुंदराक्ष मलमृदु मान्य ॥ म्हैसासुर जालंधर प्राज्ञ ॥ काळयवन अघ बक ॥१॥

हिरण्याक्ष हिरण्यकश्यपसहित ॥ मुचकुंद बळी वक्रदंत ॥ रावण इंद्रजित कुंभकर्ण त्यांत ॥ सिंहनाद भरिताती ॥२॥

ऐसे सबळ राक्षस उठतां ॥ विमानयानीं सुरवर असतां ॥ अति भय मानूनि चित्ता ॥ विमानांतें पळविती ॥३॥

कैंचे युद्ध कैचें पाहणें ॥ पळती सुर भयभीत होऊन ॥ तेहतीस कोटी देवतांकारण ॥ चिंता अपार व्यापिली ॥४॥

म्हणे रावणें बंदीं घातलें ॥ दैवें दाशरथी रामें सोडिलें ॥ आतां दैन्य भोगूनि आलें ॥ दुःख अपार येधवां ॥५॥

ऐसे होऊनि भयभीत ॥ कंपे व्यापिले ते समस्त ॥ असो सुरवर जाऊनि वैकुंठात ॥ निवेदिती श्रीरंगा ॥६॥

मग तो दयाळ चक्रपाणी ॥ ऐसी ऐकूनि सुरवरवाणी ॥ म्हणे भोग आला परतुनी ॥ अवतारदीक्षेकारणें ॥७॥

मग तो परम दचकूनि चित्तीं ॥ शिव पाचारिला सुरवरांहाती ॥ बैसवूनि स्वसंगतीं ॥ विचित्र करनी निरोपिली ॥८॥

म्हणे गोरक्षें केलें अनुचित ॥ पुनः उठविले दानव समस्त ॥ आतां दानव तरी रसातळाप्रत ॥ मही सकळ नेतील कीं ॥९॥

एक एक दानवासाठीं ॥ आपण माराया झालों कष्टी ॥ कल्पावरी अवतार जेठी ॥ धरुनियां भीडलो ॥२१०॥

तरी आतां कैसें करावें ॥ निवटतील कैलासा सकळ दानव ॥ अहा मूर्ख तो वीरभद्रराव ॥ व्यर्थ द्वेषीं मिरवला ॥११॥

मग सोडूनि वैकुंठासी ॥ येते झाले गोरक्षापासी ॥ म्हणती बा विपरीत महीसी ॥ पुत्रा हें काय मांडिले ॥१२॥

अरे एकएका राक्षसालागीं ॥ आम्ही श्रमलों बहु प्रसंगीं ॥ अवतार घेऊनि नाना रंगीं ॥ हनन केलें तयांचे ॥१३॥

तरी आतां कृपा करुन ॥ अदृश्य करीं दानवांकारण ॥ येरी म्हणे गुरुशवा आणून ॥ द्यावें आधीं मजलागीं ॥१४॥

मग शिवें बोलावूनि चामुंडेसी ॥ मच्छिंद्रशवातें आणविलें महीसी ॥ म्हने बा घेई आणि राक्षसांसी ॥ शांतदृष्टी दावीं कां ॥१५॥

यापरी गोरक्ष म्हणे त्यांतें ॥ दानव नोहेत अस्त्रव्यक्त ॥ संजीवनी प्रयोग देहस्थित ॥ दानव उदया पावले ॥१६॥

तरी अवतार घेऊन ॥ पुनः योजा रणकंदन नातरी वीरभद्राची आस्था सोडून ॥ द्यावी लागेल तुम्हांते ॥१७॥

यावरी बोले भालदृष्टी ॥ येर पोर नाहीं म्हणे पोटीं ॥ परी नाथा राक्षस जेठी ॥ दुःख देतील आम्हांतें ॥१८॥

एक मधुदैत्य माजला ॥ तेणे पळविले रानोरानीं आम्हांला ॥ शेवटीं एकदशीनें त्याला ॥ मृत्युमुखी पाठविलें ॥१९॥

ऐसें दुःख सांगावें किती ॥ तरी आतां कृपामूर्ती ॥ वेगी निवटी राक्षसांप्रती ॥ पुत्रमोह साडिला ॥२२०॥

ऐसें शिव विष्णु बोलत ॥ येरीकडे राक्षस समस्त ॥ वीरभद्र पाहूनि झुंजत ॥ धनुष्यबाण कवळूनियां ॥२१॥

परी तो प्रतापी भद्रजाती ॥ एकटा झुंजतो सर्वाप्रती ॥ नानाशस्त्रअस्त्राकृती ॥ निवारींत बलिष्ठ ॥२२॥

तुष्ट होतां गोरक्ष जती ॥ वाताकर्षण अल्पयुक्तीं ॥ भस्मचिमुटी रणकंदनाप्रती ॥ फेंकूनियां देतसे ॥२३॥

ऐसे वीरभद्र आणि राक्षस संपूर्ण ॥ एकमेळीं माजले कंदन ॥ येरीकडे शिवविष्णूंनी ॥ स्तुतीं तुष्टविला गोरक्ष ॥२४॥

तेणें दानव वीरभद्रासहित ॥ महीं पाडिले निचेष्टित ॥ श्वासोच्छवास कोंडूनि समस्त ॥ प्राणरहित झाले ते ॥२५॥

सबळ अस्त्रेम वाताकर्षण ॥ ठाऊक नव्हतीं देवदानवांकारण ॥ परी नाथपंथीं तीं येऊन ॥ प्रसन्न झाला कृपेनें ॥२६॥

असो वीरभद्र आणि दानव समस्त ॥ रणीं निमाले प्रतापवंत ॥ त्यावरी गोरक्षें जल्पूनि अग्निअस्त्र ॥ सकल केले भस्म तेणें ॥२७॥

यावरी पुढें पंचानन ॥ वेष्टिले अति मोहानें ॥ तें पुढीले अध्यायीं सकळ कथन ॥ श्रोतियानी ऐकावें ॥२८॥

परम साधन योजूनि चित्तीं ॥ पाठ थापटूनि वक्त्याप्रती ॥ भला भला म्हणवूनि उक्ती ॥ श्रोते करिती तत्कृपें ॥२९॥

परम अवधाना योजूनि चित्त ॥ वक्ता जाहला धुंडीसुत ॥ नरहरि मालु नाम ज्यांत ॥ संतसेवे अनुसरला ॥२३०॥

स्वास्त श्रीग्रंथ भक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ त्रयस्त्रिंशति अध्याय गोड हा ॥२३१॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ अध्याय ॥३३॥ ओंव्या ॥२३१॥

॥ नवनाथभक्तिसार त्रयस्त्रिंशतिअध्याय समाप्त ॥


श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय ३४

श्रीगणेशाय नमः

जयजयाजी रघूत्तमा ॥ आराध्य होसी प्लवंगमां ॥ जटायूनामी विहंगमा ॥ मुक्तिदाता रक्षक तूं ॥१॥

तरी आतां कथाप्रसंगा ॥ पुढें बोलवी नवरस प्रसंगा ॥ जेणें ऐकूनि श्रोतये अंगा ॥ अनुभवतील महाराजा ॥२॥

मागिले अध्यायीं करविलें बोलणें ॥ मच्छिंद्राचें भूमंडळीं शरीर आणून ॥ वीरभद्र मारुनि केला भस्म ॥ दानवांसह रणांगणीं ॥३॥

तरी आतां पुढें कथा ॥ वीरभद्र निमाल्या उमाकांता ॥ सहज गुण आठवोनि चित्ता ॥ पुत्रमोहें वेष्टिला ॥४॥

मुख वाळूनि झालें म्लान ॥ अश्रु लोटले दोन्ही नयनीं ॥ परी न बोले कांहीं जटा वेष्टूनी ॥ पुत्र मोहें स्फुंदतसे ॥५॥

मनांत म्हणे हा हा पुत्रा ॥ परता धैर्या लावण्यगात्रा ॥ विद्यासंपन्न सर्वअस्त्रा ॥ जाणता एक होतास कीं ॥६॥

अहा कैसा दैवहीन हातींचें गेलें पुत्रनिधान ॥ काय असोनि अपार गण ॥ तया सरसी न पवती ॥७॥

एक इंदु खगीं नसतां ॥ अपार उडुगण असोनि वृथा ॥ तेवीं वीरभद्राविण सर्वथा ॥ हीन तेजें वाटती ॥८॥

कीं मयूरा सर्वागीं डोळे ॥ परी देखण्याचे मंदावले बुबुळे ॥ तेवीं वीरभद्राविण गण विकळे ॥ सर्व मातें भासती पैं ॥९॥

कीं गात्रें सकळ चांगुलपणीं ॥ अंगी मिरविला लावण्यखाणी ॥ परी एक घ्राण गेलें सांडोनी ॥ सकळ विकळ ती होती ॥१०॥

तैसें माझ्या वीरभद्राविण ॥ सकळ विकळ दिसती गण ॥ अहा वीरभद्र माझा प्राण ॥ परत्र कैसा गेला सोडोनी ॥११॥

ऐसें म्हणूनि मनींच्या मनांत ॥ पंचानन आरंबळत ॥ तीं चिन्हें जाणूनि गोरक्षनाथ ॥ चित्तामाजी कळवळला ॥१२॥

मनांत म्हणे बद्रिकाश्रमातें ॥ मातें बैसविलें तया गुरुनाथें ॥ तै रात्रंदिवस उमाकांत ॥ मजसाठीं श्रम पावे ॥१३॥

मायेसमान पाळूनि लळा ॥ माता रक्षी जेवीं बाळा ॥ तरी ऐसा स्वामी चित्तकोंवळा ॥ पुत्रमोहें वेष्टिला असे ॥१४॥

अहा तरी म्यां उपकार ॥ काय हो केला अनिवार ॥ ऐसा स्वामी शिणविला हर ॥ दुःख तुंबळ देऊनियां ॥१५॥

ऐसें म्हणून स्वचित्तांत ॥ पायां लागे गोरक्षनाथ ॥ म्हणे पुत्रदुःखावरी मोहवेष्टित ॥ चित्त तुमचे झालें कीं ॥१६॥

तरी वीरभद्रातें आतां उठवीन ॥ परी अस्थि आणाव्या ओळखून ॥ येथें राक्षसांचें झालें कंदन ॥ राक्षसअस्थी मिरविती ॥१७॥

त्यांत वीरभद्राच्या अस्थी ॥ मिसळल्या कृपामूर्ती ॥ म्हणूनि संशय वाटें चित्तीं ॥ वीरभद्रातें उठवावया ॥१८॥

जरी ऐसिया मिसळल्या नाथा ॥ संजीवनीप्रयोग जपतां ॥ सकळ राक्षस उठतील मागुतां ॥ म्हणोनि चिंता व्यापिली ॥१९॥

ऐसें बोलतां गोरक्षजती ॥ नीलग्रीव म्हणे कृपामूर्ती ॥ वीरभद्राच्या सकळ अस्थी ॥ ओळखून काढीन मी ॥२०॥

माझे गण आहेत जितुले ॥ ते आसनीं भोजनीं भले ॥ मम नामीं रत झाले ॥ कायावाचाबुद्धीनें ॥२१॥

तरी चित्तबुद्धिअंतःकरणीं ॥ वीरभद्र नामीं गेला वेष्टोनी ॥ जागृत सुषुप्त स्वप्नीं ॥ वेष्टिला असे मम नामीं ॥२२॥

ऐसें बोलूनि शंकर ॥ रणभूमीत करी संचार ॥ मग तेथें अस्थि उचलूनि सत्वर ॥ कर्णी आपुल्या लावीतसे ॥२३॥

ऐशियेपरी शोध करितां ॥ वीरभद्र जेथें पडला होता ॥ तेथे जाऊनि अवचट हस्ता ॥ अस्थी उचली तयाच्या ॥२४॥

अस्थी उचलोनि कर्णी लावीत ॥ तंव त्या अस्थी मंद शब्द करीत ॥ शिव शिव म्हणोनि शब्द येत ॥ शिवकर्णी तत्त्वतां ॥२५॥

मग त्या अस्थी पंचानने ॥ गोळा केल्या परीक्षेनें ॥ जेथें होता गोरक्षनंदन ॥ तेथें आणूनि ठेविल्या ॥२६॥

मग तो विद्यार्णवकेसरी ॥ भस्मचिमुटी कवळूनि करीं ॥ वीरभद्रनामीं साचोकारीं ॥ संजीवनी स्मरला असे ॥२७॥

होतां संजीवनीचा प्रयोग पूर्ण ॥ वीरभद्र उठला देह धरुन ॥ म्हणे माजें धनुष्यबाण ॥ कोठें आहे सांग कीं ॥२८॥

व्यापले अपार राक्षस कोटी ॥ तितुके मारीन आतां जेठी ॥ उपरी गोरक्षा यमपुरी शेवटीं ॥ प्रतापानें दावीन कीं ॥२९॥

ऐसें वीरभद्र बोले वचन ॥ करीं धरीं पंचानन ॥ म्हणे बापा आतां शीण ॥ व्यर्थ बोलाचा न करी ॥३०॥

मग हदयी कवळूनि त्यातें ॥ सांगितला सकळ वृत्तांत ॥ उपरी म्हणे उमाकांत ॥ स्नेह नाथीं धरावा ॥३१॥

मग गोरक्ष आणि वीरभद्रजेठी ॥ उभयतांची करविली भेटी ॥ उपरी म्हणे स्नेह पोटीं ॥ उभयतांनीं रक्षावा ॥३२॥

उपरी बहात्तर कोटी चौर्‍यांयशीं लक्ष ॥ शिवगण प्रतापी महादक्ष ॥ ते वायुचक्रीं असतां प्रत्यक्ष ॥ उतरी गोरक्षक तयांसी ॥३३॥

मग सकळ समुदाय एक करुन ॥ जाते झाले गोरक्ष नमून ॥ येरीकडे राव त्रिविक्रम ॥ राज्यवैभवीं गुंतला ॥३४॥

गोरक्ष सकळ शवमांदुस ॥ रक्षन करी शिवालयास ॥ तों त्रिविक्रमराव दर्शनास ॥ अकस्मात पातला ॥३५॥

राव देखतां गोरक्षासी ॥ प्रेमें मिठी घाली ग्रीवेसी ॥ निकट बैसवोनि त्यासी ॥ सर्व वृत्तांत विचारी ॥३६॥

मग शवाचा जो झाला वृत्तांत ॥ तो सकळ त्यातें केला श्रुत ॥ होतांचि तळमळ चित्तांत ॥ मच्छिंद्राच्या लागली ॥३७॥

मग गोरक्षासी बोले वचन ॥ धैर्य धरावें कांहीं दिन ॥ धर्मनाथातें राज्यासन ॥ देऊनि येतो लगबगें ॥३८॥

ऐसें बोलूनि प्रजानाथ ॥ स्वगृहीं आला त्वरितात्वरित ॥ बोला वोनि मत्रिकांतें ॥ विचारातें घडविलें ॥३९॥

मग पाहूनि उत्तम दिन ॥ महीचे राव घेतले बोलावून ॥ राज्यपदीं स्वहस्तें अभिषेक करवून ॥ धर्मराज स्थापिला ॥४०॥

याचकांसी देऊनि अपार धनें ॥ आणि भूपांलागीं दिधली भूषणें ॥ परम स्नेहें बोळवून ॥ बंदिजन सोडविले ॥४१॥

यासही लोटला एक मास ॥ राव त्रिविक्रम आपुल्या मंदिरीं खास ॥ देह सांडूनि शिवालयास ॥ तत्क्षणीं पातला ॥४२॥

येरीकडे रेवती सती ॥ सहज गेली राजसदनाप्रती ॥ म्हणे महाराजा हे नृपती ॥ अजूनि कां हो निजलांत ॥४३॥

परी तीतें न बोले कांहीं ॥ मग हालवोनि पाहे स्वहस्तप्रवाहीं ॥ तंव तें प्रेत मिरवले देहीं ॥ पाहोनि शोका वहिवाटे ॥४४॥

रेवती शोक करितां तुंबळ ॥ ऐकूनि धांवला धर्मनाथ बाळ ॥ मंत्री प्रजा सेवक सकळ ॥ हंबरडा बहु ऊठला ॥४५॥

तो वृत्तांत शिवालयासी ॥ जनमुखें आला गोरक्षापाशीं ॥ मग सिद्ध करुनि भस्मचिमुटीसी ॥ संजीवनी प्रयोजी ॥४६॥

अस्थी मांस प्रयोजितां ॥ देह संगीन झाला त्वरित ॥ संगीन होतां मच्छिंद्रनाथा ॥ समय पावला रिघावया ॥४७॥

मच्छिंद्र देहीं संचार होतां ॥ उठूनि बैसला क्षण न लागतां ॥ येरीकडे रावप्रेत ॥ स्मशानवाटिके आणिलें ॥४८॥

प्रेत आणिलें स्मशानी ॥ त्रिवर्ग पहावया निघाले मुनी ॥ तो रेवतीनें दृष्टीं पाहोनी ॥ शोध आणविला तयाचा ॥४९॥

करुनि रायाचें दहन ॥ स्नाना गेले सकळ जन ॥ परी धर्मराज दारुण ॥ शोक करी अदभुत पैं ॥५०॥

शोक करी तरी कैसा ॥ सोडूनि प्राणाचा भरंवसा ॥ लोक बोधितां न ये भासा ॥ आरंबळत असे आक्रोशें ॥५१॥

उत्तरक्रिया झालिया उपरी ॥ न राहे रुदन तयाचे परी ॥ अन्नपाणी वर्जोनि शरीरी ॥ प्रान देऊं म्हणतसे ॥५२॥

मग मायेचा मोह अत्यंत ॥ त्यातें नेऊनि परम एकांतात ॥ म्हणे बाळा शोक कां व्यर्थ ॥ पितयाकरितां करितोसी ॥५३॥

तरी आतां बाळ तुझा पितां ॥ चिरंजीव आहे महीवरुता ॥ प्रत्यक्ष जाऊनि शिवालयीं आतां ॥ निजदृष्टी विलोकी ॥५४॥

तव पित्याचें मच्छिंद्र नाम ॥ चिरंजीव आहे उत्तमोत्तम ॥ ऐसे ऐकतां राजोत्तम ॥ पिसा कैसा म्हणतसे ॥५५॥

मग प्रवेशादि सकळ वार्ता ॥ सांगती झाली निजसुत ॥ धर्मराया ऐकूनि तत्त्वतां ॥ तुष्ट झाला शरीरातें ॥५६॥

मग शीघ्र घेऊनि कटकभार ॥ शिवालयीं आला अति सत्वर ॥ भावें नमुनि नाथ मच्छिंद्र ॥ शिबिकासनीं वाहिला ॥५७॥

नेऊनि आपले राजभवनी ॥ सेवा करीतसे प्रीतीकरुनी ॥ मग तो एक संवत्सर येथें राहुनी ॥ पुढें तीर्था चालिला ॥५८॥

चालिला परी धर्मनाथ ॥ परम झाला शोकाकुलित ॥ म्हणें ताता तव सागातें ॥ मीही तीर्था येतो कीं ॥५९॥

याउपरी बोले मच्छिंद्रनाथ ॥ बाळा द्वादश वर्षी येऊं येथें ॥ मग जोग देऊ गोरक्षहातें ॥ तूतें सवें नेईन मी ॥६०॥

आतां रेवतीची सेवा करुन ॥ भोगीं आपुलें राज्यासन जेथें रेवती तेथें प्राण ॥ माझा असे हो बाळका ॥६१॥

तिची सेवा केलियानें ॥ संतुष्ट आहे माझें मन ॥ ऐसें करुनि समाधान ॥ त्रिवर्ग तेथूनि निधाले ॥६२॥

मग तीर्थाटनी भ्रमण करिती ॥ येऊनि पोहोंचले गोदातटीं ॥ धामनगर काननपुटीं ॥ येऊनियां पोहोंचले ॥६३॥

ग्रामनाम ऐकूनि कानीं ॥ गोरक्षाचे अंतःकरणीं ॥ स्मरण झालें कृषीधर्मी ॥ माणिकनामी कृषांचे ॥६४॥

मम मच्छिंद्रातें सांगे समस्त ॥ अडबंग भेटला एक तेथें ॥ मी प्रसन्न होतां आपुल्या चित्तें ॥ कांही वर न वे तो ॥६५॥

मग मुळापासूनि तयाचें कथन ॥ मच्छिंद्रा केलें निवेदन ॥ मच्छिंद्रें ऐकूनि वर्तमान ॥ म्हणें पुनः आतां पाहावा ॥६६॥

मग शेतसुमार धरुनि चाली ॥ चालत आले त्रिवर्ग पाउलीं ॥ तों माणीकनामें निश्चयबळी ॥ काष्ठासमान देखिला ॥६७॥

मौळीं विराजे वेष्टन ॥ बाबर्‍या रुळती महीकारण ॥ नखें जुळमट गेलीं होऊन ॥ मांस दिसेना तिळभरी ॥६८॥

अस्थी त्वचा झालीं एक ॥ पोट झालें पृष्ठीं स्थायिक ॥ दृष्टी लावूनियां देख ॥ मंत्रजप करीतसे ॥६९॥

ऐसी पाहतां तपाकृती ॥ गोरक्ष धन्य म्हणे चित्तीं ॥ मग नमूनि मच्छिंद्राप्रती ॥ अडबंग हाचि म्हणतसे ॥७०॥

मग निकट येऊनि त्रिवर्ग जण ॥ बोलते झाले तयाकारण ॥ म्हणती आतां तपोधन ॥ पूर्ण तप करी कां रे ॥७१॥

येरु वचन त्या देत ॥ तुमचें यांत काय जात ॥ धरुनि आपला शुद्ध पंथ ॥ गमन करावें येथूनियां ॥७२॥

जें जें बोले मच्छिंद्रनाथ ॥ तया वांकडेपणें उत्तर देत ॥ मग गोरक्ष म्हणे मच्छिंद्रातें ॥ हा अडबंग असे महाराजा ॥७३॥

तरी याचें आतां हित ॥ युक्तीनें करितो बैसा स्वस्थ ॥ मग तरुच्छायेनिकट तेथ ॥ मच्छिंद्र जाऊनि बैसला ॥७४॥

चौरंगा आणि मच्छिंद्रनाथ ॥ गोरक्षाची मौज पाहत ॥ गोरक्ष जाऊनि पैं तेथ ॥ अहा अहा म्हणतसे ॥७५॥

अहा म्हणोनि वाणी ॥ म्हणे ऐसा महीतें दुजा स्वामी ॥ आम्हीं देखिला नाहीं नयनीं ॥ तपोनिधि आगळा हो ॥७६॥

समुद्रवलयांकित ॥ पृथिवी पाहिली आहे समस्त ॥ परी ऐसा तपोनाथ ॥ देखिला नाहीं निजदृष्टीं ॥७७॥

तरी ऐसा स्वामी योगमुनी ॥ याचा अनुग्रह घ्यावा कोणीं ॥ गुरु झालिया ऐसा प्राणी ॥ दैव अपार मिरवतसे ॥७८॥

तरी आतां असो कैसें ॥ गुरु करावा आपणास ॥ ऐसें बोले त्यास ॥ प्रज्ञावंत महाराजा ॥७९॥

म्हणे स्वामी कृपा करुन ॥ मज अनुग्रही गुरु होऊन ॥ येरु बोलणें ऐकोन ॥ अडबंग म्हणे तयासी ॥८०॥

बेटा येवढा थोर झाला ॥ अद्यापि अक्कल नाहीं त्याला ॥ गुरु करुं म्हणतो आम्हांला ॥ मूर्खपणीं आगळा हा ॥८१॥

मग मजला गुरु करुं पाहशी ॥ तरी तूंचि कां बेट्या होईनासी मजसी ॥ ऐसें म्हणोनि स्वमुखासी ॥ तया कर्णी लावीतसे ॥८२॥

कर्ण लागतां गोरक्षाननीं ॥ सज्ञानमंत्र ब्रह्मखाणी ॥ परम कृपें कर्णी फुंकूनी ॥ सनाथ केला क्षणार्धे ॥८३॥

मंत्र पडतां कर्णपुटीं ॥ त्रैलोक्याची आली दृष्टी ॥ स्थावरजंगम एकथाटीं ॥ ब्रह्मरुप भासलें ॥८४॥

मग अर्थाअर्थी सकल ज्ञान ॥ झाला बृहस्पतिसमान ॥ मग सांडूनि आपुलें तपःसाधन ॥ गोरक्षचरणीं लागला ॥८५॥

मग गोरक्ष भस्मशक्तिप्रयोग ॥ प्रयोगूनि भाळीं चर्ची सांग ॥ तेणेंकरुनि सर्वाग ॥ शक्तिवान मिरवलें ॥८६॥

मग धरुनि शीघ्र तयाचा हस्त ॥ वृक्षाखालीं आणी नाथ ॥ म्हणे महाराजा कृपावंत ॥ अडबंग हाचि ओळखावा ॥८७॥

हंसूनि बोले मच्छिंद्रमुनी ॥ या अडबंगातें अडभंग नामीं ॥ पाचारावें सर्व येथोनी ॥ साजूकपणी या वाटतसे ॥८८॥

मग अवश्य म्हणे गोरक्ष त्यास ॥ नाथदीक्षा दीधली खास ॥ मग शीघ्र घेऊनि व्यासंगास ॥ तीर्थालागीं जातसे ॥८९॥

मार्गी जातां सद्विद्येसी ॥ सकळ तेव्हां पूर्ण अभ्यासी ॥ आपुल्या समान शस्त्रअस्त्रेंसीं ॥ अडभंग तो मिरवला ॥९०॥

असो ऐसे चारी जण ॥ द्वादश वर्षे तीर्थाटन ॥ करुनि पुनः प्रयागकारण ॥ चारी सूर्य पातले ॥९१॥

येरीकडे धर्मरायासी ॥ पुत्र झाला सतेजराशी ॥ वडिलांचें नांव ठेविलें त्यासी ॥ त्रिविक्रम म्हणोनियां ॥९२॥

चौघे प्राज्ञिक ग्रामीं येतां ॥ श्रुत झालें धर्मनाथा ॥ मग कटकभारेसीं शिबिके तत्त्वतां ॥ बैसवोनि आणिलें सदनासी ॥९३॥

मग धृति वृत्ति भक्ति सघन ॥ करुनि तोषविलें मच्छिंद्रमन ॥ मग त्रिविक्रमसुता राज्यीं स्थापून ॥ दीक्षा घेतली योगाची ॥९४॥

माघमासीं पुण्यतिथी ॥ द्वितीयेसी धर्मराजाची बीज म्हणती ॥ तें दिवशीं गोरक्ष जती ॥ अनुग्रह देत तयातें ॥९५॥

या उपरी देव मिळवूनि स्वर्गीचे ॥ आणि प्रजालोक त्या ग्रामीचे ॥ मेळवूनि चोज अनुग्रहाचें ॥ मोहळें रचिलीं अपार ॥९६॥

अनुग्रह झाल्यावरती ॥ सकळ बैसोनि एकपंक्तीं ॥ गोरक्ष कवळ घेऊनि हातीं ॥ सर्वामुखीं ओपीतसे ॥९७॥

मग तो आनंद परम जेठी ॥ पाहूनि धांवले सुरवर थाटीं ॥ तेही प्रसाद पावोनि शेवटीं ॥ तुष्ट चित्तीं मिरवले ॥९८॥

मिरवले परी करिती भाषण ॥ ऐसाचि प्रसाद जन्मोजन्म ॥ प्रतिसंवत्सरीं असावा पूर्ण ॥ इच्छेलागीं वाटतसे ॥९९॥

ऐसें बोलतां सुरवर सकळ ॥ ऐकोनि बोले तपोबळ ॥ माझें नाम घेऊनि केवळ ॥ अर्पा जगा प्रतिवर्षी ॥१००॥

धर्मराजाची बीज म्हणवूनी ॥ उत्सव करावा तुम्ही सघन ॥ याचि नीती कुमारा सांगोनि ॥ कवळों पाहे जगासी ॥१॥

मंत्र स्फुरला म्हणूनि स्फुरमाण ॥ सकळ तुम्ही बोला वचन ॥ अंबलिपणें शक्तीसमान ॥ सदैव करा उत्सवो ॥२॥

ऐसें महाराजा गोरक्ष बोलतां ॥ मानवलें सुरवरांच्या चित्ता ॥ मग प्रतिवर्षी आनंदभरिता ॥ महाउत्सव करीत ॥३॥

तैंपासूनि सहजासहज ॥ जगीं मिरवतसे धर्मनाथाची बीज ॥ हें वृत्त आचरल्या महाराजा ॥ तुष्ट होतसे गोरक्ष ॥४॥

पूर्वी किमयागार ग्रंथांत ॥ स्वयें बोलिला गोरक्षनाथ ॥ कीं बीजेचें जो आचरील व्रत ॥ शक्तीमान आपुल्या ॥५॥

तयाचे गृहीं दोषदरिद्र ॥ रोगभोगादि विघ्नेंद्र ॥ स्वप्नामाजीं संसार अभद्र ॥ पाहणार नाहीं निजदृष्टीं ॥६॥

प्रत्यक्ष रमा सुखें सुरगणीं ॥ त्या गृहीं होईल गृहवासिनी ॥ मग दोषदरिद्र तया अवनी ॥ स्पर्शावया येईना ॥७॥

असो महात्म्य वदावें किती ॥ ते प्राज्ञिक पावले सुखसंपत्ती ॥ जैसी कामना वेधेल चित्तीं ॥ तोचि अर्थ पावेल ॥८॥

ऐसा गोरक्ष तयाकारण ॥ बोलिला आहे मूळग्रंथीं वचन ॥ तैसें येथें केलें लेखन ॥ विश्वासातें वरा कीं ॥९॥

असो तेथें महोत्साह करुन ॥ धर्मनाथा नाथदीक्षा देऊन ॥ तेथोनि निघाले पांच जण ॥ नरशार्दूळ ते ऐका ॥११०॥

नाना तीर्थे करितां महीसी ॥ अभ्यासिलें सद्विद्येसी ॥ शाबरी सहस्त्र अस्त्रासीं ॥ प्रवीण केला महाराजा ॥११॥

मग शेवटीं बद्रिकाश्रमीं जाऊन ॥ दृश्य केला उमारमण ॥ धर्मराज तया स्वाधीन ॥ तपालागीं बैसविला ॥१२॥

द्वादश वर्षाचा केला नेम ॥ तपा बैसला नाथ धर्म ॥ येरु तेथूनि चौघे जण ॥ तीर्थालागीं चालिले ॥१३॥

द्वादश संवत्सर तीर्थे करुन ॥ पुनः पाहिला बद्रिकाश्रम ॥ मग तेथें मावंदे अति दुर्गम ॥ बद्रिकाश्रमीं मांडिलें ॥१४॥

सकळ देव सुरवरांसहित ॥ पाचारुनि घेतले तेथ ॥ मावंदें झाल्या पूर्ण वरातें ॥ देऊनि देव गेले पैं ॥१५॥

मग तो धर्मराज सवें घेऊन ॥ फेरी करिती तीर्थाटन ॥ आतां पुढें ऐंका कथन ॥ रेवणसिद्धनाथाचें ॥१६॥

पूर्वी अठ्ठयायशीं सहस्त्र ऋषी ॥ झाले आहेत विधिवीर्यासी ॥ त्याचि समयीं रेत महीसी ॥ रेवातीरी पडियेलें ॥१७॥

रेवातीरी तेंही रेवेंत ॥ रेत पडिलें अकस्मात ॥ चमस नारायण संचार करुनि त्यांत ॥ देहद्वारीं मिरवला ॥१८॥

बाळतनू अति सुकुमार ॥ बालार्ककिरणीं मनोहर ॥ उकरडां लोळे महीवर ॥ ठेहेंठेंहें म्हणोनियां ॥१९॥

तों त्या काननीं कृषी एक ॥ उत्तम नाम सहनसारुक ॥ तो घट घेऊनि न्यायवा उदक ॥ रेवातीरा पातला ॥१२०॥

पातला परी अकस्मात ॥ येता झाला बाळ जेथ ॥ सहज चालीं पुढें चालत ॥ बाळ दृष्टीं देखिलें ॥२१॥

बाळ परम अति सुकुमार ॥ कांति कर्दळीगाभाभर ॥ पाहूनि तयाचें अंतर ॥ विव्हळ मोहें झाला असे ॥२२॥

मग घट ठेवूनि महीलागीं ॥ धांवोनि तांतडीं उचली वेगीं ॥ मोहें कवळूनि हदयभागीं ॥ अति स्नेहें धरिलेसें ॥२३॥

आधींच सहनसारुक नामानें ॥ तेथें दयेसी काय उणें ॥ आवडीनें करुनि मुखचुंबन ॥ कुर्वाळीत प्रीतीनें ॥२४॥

मग रिक्तपट भरुनि आडीं ॥ ग्रामांत आला हरुषापाडी ॥ सदनीं प्रवेशूनि आवडीं ॥ कांतेलागीं बोलतसे ॥२५॥

म्हणे जिवलगे आजिचा दिन ॥ मातें झाला धातुहेस ॥ तरी शिवलतेलागीं द्रुम ॥ कुंभापरी मिरवला ॥२६॥

सहज गेलों उदकातें ॥ रेवातीरीं वाळवंटींत ॥ आपणा ईश्वरें दिधला सुत ॥ वंशावळी मिरवावया ॥२७॥

ऐसी ऐकतां कांता गोष्टी ॥ म्हणे कोठें मज दाव दृष्टीं ॥ तंव तो काढूनि वस्त्रपुटीं ॥ करसंपुटीं देतसे ॥२८॥

तंव ती कांता उत्तमनामी ॥ धार्मिकबुद्धी संसारधामीं ॥ देखतां देहदर्मी ॥ हर्शसिंधु लोटला ॥२९॥

जैसा पूर्ण चंद्र दृष्टीं ॥ दृश्य होतां उदधिपोटीं आनंद भरुनि तोयदाटीं ॥ उचंबळा दाटतसे ॥१३०॥

कीं दरिद्रियासी मांदुस होय दर्शन ॥ मग तयाचा आनंद वर्णील कोण ॥ तेवीं उत्तम मनोधर्म ॥ आनंददरीं मिरवितसे ॥३१॥

बाळ धरुनि हदयसंपुटीं ॥ चुंबन घेत स्नेहाचे पोटीं ॥ मग तैलउदकीं न्हाणूनि शेवटीं ॥ पालखातें घातले ॥३२॥

तियेचें तान्हुलें होतें घरीं ॥ निजविला योगी तयाशेजारीं ॥ स्तनपान केलियाउपरी ॥ बाळ निजे पालखीं ॥३३॥

असो ऐसे नित्यानित्य ॥ बाळ संगोपी ममतें ॥ रेवणनाम ठेवोनि त्यातें ॥ मोहेंकरुनि सांभाळी ॥३४॥

रेवातीरीं बाळ रेवेंत ॥ सांपडलें म्हणूनि त्यातें ॥ रेवणनाम साजुकवंत ॥ सहनसारुक ठेवोनियां ॥३५॥

असो रेवणनामियाचें संगोपन ॥ करिता उभयतां पालन ॥ ऐसे लोटतां बहुत दिन ॥ प्रपंचरहाटी करितसे ॥३६॥

द्वादशसंवत्सर प्रपंचराहटी ॥ कृषिकर्मविद्यापाठीं ॥ पूर्ण झाला आवुता जेठी ॥ पित्याहूनि आगळा ॥३७॥

नांगर वरखरली पेरण ॥ काकपक्ष्यादि करी रक्षण ॥ ऐसा कृषिकर्मी निपुण ॥ रेवणनाथ झाला असे ॥३८॥

तो कोणे एके दिवशीं ॥ उठुनि मागिले प्रहरनिशीं ॥ वृषभ सोडून काननासी ॥ चारावयासी चालिला ॥३९॥

चांदणें पडलें असें सुदृढ ॥ दृश्य होतसें महीची वाट ॥ सुदृढपणें गोचर वात ॥ निजचक्षूतें होतसे ॥१४०॥

दादा म्हणूनि वृषभापाठीं ॥ हांकीत चालिला आहे जेठी ॥ तों अनुसूयाशक्तिकारत्न वाटीं ॥ पुढें झालें अकस्मात ॥४१॥

परी तो महाराजा अत्रिनंदन ॥ पवनवेगें तयाचें गमन ॥ नेमिलें ठायीं करुनि स्नान ॥ गिरनार पर्वती जातसे ॥४२॥

पायीं खडावा सुशोभित ॥ एक अंचल अंगीं शोभत ॥ शुभ्र कौपीन विराजित ॥ कंठतटा वेष्टूनी ॥४३॥

मौळी वेष्टिल्या असती जटा ॥ दाही मिशा रंग पिंगटा ॥ सकळ ज्ञानियांचा वरिष्ठा ॥ कनककांति शोभतसे ॥४४॥

ऐसा महाराजा अत्रिनंदन ॥ जो त्रितयदेवांचा अवतार पूर्ण ॥ अति लगबगें करीत गमन ॥ पुढील नेम मानुनियां ॥४५॥

तों मार्गावरी अकस्मात ॥ वृषभगमन देखत ॥ वृषभाआड रेवणनाथ ॥ दृष्टी नाहीं आतळला ॥४६॥

मानवगती तेणे देखोन ॥ पुढें आला अत्रिनंदन ॥ सहजस्थिती वृषभामागून ॥ पाऊलें ठेवी चालावया ॥४७॥

तों सर्वांमागील वृषभ पूर्ण ॥ शरीरें मिरवे शीथलपण ॥ तयाआड नाथ रेवण ॥ बाळतनू चालतसे ॥४८॥

तों वृषभामागें येत दत्त ॥ वृषभ बुजोनि पुढें पळत ॥ मागें अंतरतां रेवणनाथ ॥ त्यावरी दत्त आदळला ॥४९॥

उभयदेहीं कामपणी ॥ ऐक्य झाली देहधरणी ॥ परी स्पर्श होतां अंतःकरणी ॥ ज्ञानदीप उजळला ॥१५०॥

विमूढपणीं कृषिकर्मात ॥ अज्ञान सर्वापरी वर्तत ॥ सदा बैसणें अरण्यांत ॥ अबुद्धीपणें वर्ततसे ॥५१॥

परी दत्तात्रेयाचा स्पर्श होतां ॥ पूर्वजन्मातें झाला देखता ॥ चित्तीं म्हणे मी महीवर असतां ॥ कवण स्थिती पावलों ॥५२॥

आहे मी पूर्वीचा नारायण प्रकाम ॥ परम प्राज्ञिक चमसनाम ॥ ऐसे असूनि कृषिकर्म ॥ येथें करीत बैसलों ॥५३॥

वंद्य असतां तिही लोकांत ॥ आतां कोणी ओळखीना मातें ॥ सदा काननीं झालों रत ॥ अहितकामीं प्रपंच ॥५४॥

ऐसें देहीं झालिया ज्ञान ॥ मग स्तब्ध धरुनि राहे मौन ॥ परी धडक बैसतां अत्रिनंदन ॥ कोण तूं ऐसा पुसतसे ॥५५॥

कोण तूं ऐसें पुसतां दत्त ॥ करिता झाला प्रणिपात ॥ म्हणे महाराजा या देहांत ॥ अंश असे तुझा कीं ॥५६॥

तुमचे देहीं त्रिदेवांचे अंश ॥ परी सत्यगुणी जो महापुरुष ॥ तो मी येथें प्रपंचदेहास ॥ परम कष्टें कष्टलों ॥५७॥

तरी आतां क्षेमोदयास ॥ उदित करा जी महापुरुष ॥ सनाथ करुनियां या देहास ॥ महीलागी मिरवावें ॥५८॥

ऐसें म्हणोनि दृढोत्तर चरणीं ॥ मौळी अर्पी प्रेमेंकरुनी ॥ म्हणे मज सनाथ केल्यावांचुनी ॥ कदा न सोडीं तुम्हांतें ॥५९॥

ऐसें वदूनि वाग्वटीं ॥ सदृढपणी देत मिठी ॥ परी आदरें प्रेमपोटीं ॥ दत्तजेठी मिरवला ॥१६०॥

तयाचा पाहूनि भक्तिआदर ॥ सदृढपणीं निश्चयपर ॥ मग कमंडलु ठेवूनि महीवर ॥ मौळी कर स्थापीतसे ॥६१॥

भाळाखालीं घालूनि हात ॥ उठविला रेवणनाथ ॥ मनांत म्हणे हा सनाथ ॥ पूर्वीचाची असे कीं ॥६२॥

हा नावामाजी असे एक ॥ नाथपंथी अवतार दोंदिक ॥ चमसनारायण प्रतापार्क ॥ महीवर विराजला ॥६३॥

तरी आतां यातें सनाथ ॥ करुनि वाढवावा नाथपंथ ॥ कृपें ठेवोनि मौळीं हस्त ॥ केला अंकित आपुला ॥६४॥

कृपें मौळीं ठेविला कर ॥ परी अनुग्रहाचें केलें अंतर ॥ म्हणाल कासयासाठीं उदार ॥ झाला नाहीं अनुग्रहा ॥६५॥

तरी चित्ती योजिता झाला दत्त ॥ भक्तिश्रम यासी घडले नाहींत ॥ तरी कांही देहीं प्रायश्वित्त ॥ घडोनि यावें ययातें ॥६६॥

तरी भक्तिश्रम घडतां सांग ॥ उपदेश मग द्यावा अव्यंग ॥ मग ज्ञानवैराग्याचा मार्ग ॥ ब्रह्मस्थितीं मिरवेल हा ॥६७॥

ऐसें म्हणूनि अनुग्रहारहित ॥ कृपा मौळीं ठेविला हस्त ॥ परी भक्तीलागीं रेवणनाथ ॥ काय करी महाराजा ॥६८॥

एक सिद्धीची कळा त्यातें ॥ सांगता झाला कृपावंत ॥ असतां बीज रोपूनि किंचित् ॥ दृष्टी ठेवील पुढारां ॥६९॥

जैसें अर्भका देऊनि धन ॥ पिता मिरवी व्यवसायाकारण ॥ मग तयाचें पुढें चांगुलपण ॥ निजदृष्टीं पाहतसे ॥१७०॥

किंवा महींत मेळवण ॥ घालूनि पाहती दुग्धाकारण ॥ कीं पत पहातसे देऊनि धन ॥ सावकार कुळातें ॥७१॥

तेवीं सहस्त्रांशेंकरुन ॥ महीमान सिद्धीचें सांगून ॥ तुष्ट केले तयाचें मन ॥ प्रज्ञावंतें महाराजें ॥७२॥

परी ती कळा होतांचि प्राप्त ॥ रेवण झाला आनंदभरित ॥ मग प्रेमें नमूनि अनुसूयासुत ॥ बोळविले तत्क्षणीं ॥७३॥

परी विरह मानूनि चित्तीं ॥ चालता झाला काननाप्रती ॥ परी अंतरला आपुल्या हितीं ॥ निजपदातें पहावया ॥७४॥

जैसें कोंडवळ्य़ा कांजी ॥ देतां भूत होतसे राजी ॥ तैसा अल्पसिद्धीमाजी ॥ तुष्ट झाला तो पुरुष ॥७५॥

परम लाधली होती धणी ॥ परंतु दवडिली अज्ञानपणीं ॥ खापरासाठीं चिंतामणी ॥ सोडूनि दिधला हातींचा ॥७६॥

कीं सुरा लागूनि परम गोड ॥ सोडिली अमृतरसाची चाड ॥ कीं निर्मळपणीं पाहूनि दगड ॥ परिस हातींचा सोडिला ॥७७॥

तेवीं प्रत्यक्ष नाथ रेवण ॥ भुलला सिद्धिप्रकरणेंकरुन ॥ सिद्धिबुद्धि अत्रिनंदन ॥ हातींचा सोडिला नायकें ॥७८॥

असो ऐशी संप्रदाययुक्ती ॥ निःस्पृह पातला आपुल्या शेती ॥ तेथील कथा होईल श्रोतीं ॥ पुढिले अध्यायीं ऐकावी ॥७९॥

धुंडीसुत नरहरिवंशीं ॥ सांगेल तुम्हां श्रोतियांसी ॥ संतकृपें नाम देहासी ॥ मालू ऐसें म्हणती तया ॥१८०॥

स्वति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ चतुस्त्रिंशति अध्याय गोड हा ॥१८१॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ अध्याय ३४॥ ओंव्या ॥१८१॥

॥ नवनाथभक्तिसार चतुस्त्रिंशतिअध्याय समाप्त ॥


श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय ३५

श्रीगणेशाय नमः

श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

जयजयाजी करुणाकरा ॥ पंढरीशा रुक्मिणीवरा ॥ दीनबंधो दयासागरा ॥ पुढें ग्रंथ बोलवीं ॥१॥

तूं दयाळ विश्वंभर ॥ बहुधा अर्थी हें चराचर ॥ भरण करिसी जन्म दिल्यावर ॥ कामनेतें लक्षुनी ॥२॥

तरी मम कामनेचा अर्थ ॥ कीं ग्रंथाक्षरें व्हावीं रसभरित ॥ तरी ग्रंथांतरी भराभर उदित ॥ विश्वंभरा होई कां ॥३॥

मागिले अध्यायीं उत्तम कथन ॥ रेवणनाथाचा झाला जन्म ॥ सहनसारुकें कृषिकर्म ॥ बोलूनियां दाविलें ॥४॥

दाविलें परी दैवें करुन ॥ अवचट देखिला अत्रिनंदन ॥ जो शंकरसेवक तयालागून ॥ तेंचि प्राप्त होतसे ॥५॥

हिरातेज गूढ स्थानालागुनि ॥ दडे तरी तया काढी हिरकणी ॥ भेटीलागीं येत धांवोनी ॥ लोहालागीं चुंबक ॥६॥

कां हंसपक्षी भक्षणांत ॥ कदा न भक्षी मुक्ताविरहित ॥ जरी गुंतला पिंजर्‍यांत ॥ परी तेंचि भक्ष्य भक्षीतसे ॥७॥

तेवीं रेवण योगमूर्ती ॥ मार्गीच भेटला अवचटगती ॥ दुग्धालागीं शर्करा निश्वितीं ॥ लवण कांहीं मिरवेना ॥८॥

असो ऐसा अवसर त्यांत ॥ घडला परी अबुद्धिवंत ॥ सिद्धिकळा घेऊनि चित्तांत ॥ अत्रिसुत दवडिला ॥९॥

दत्तें केलें शहाणपण ॥ किंचित कळा त्या दाखवून ॥ रक्षूनि आपुलें सकळ भूषण ॥ गेला निघूनि महाराजा ॥१०॥

जेवीं मर्कटा चणे देऊनि ॥ मार्गी हिंडविती बुद्धिमंत प्राणी ॥ तेवीं अत्रि आत्मज करणी ॥ करुनि गेला महाराजा ॥११॥

येरीकडे रेवणनाथ ॥ वृषभ ठेवूनि स्वशेतांत ॥ येऊनियां सिद्ध आउत ॥ करिता झाला महाराजा ॥१२॥

सकळ शेत झाल्यापाठीं ॥ नागदोर कवळूनि करसंपुटीं ॥ आउतमागीं फिरत जेठी ॥ गायनातें आरंभिलें ॥१३॥

आरंभिलें परी दत्तवचन ॥ मंत्रप्रयोगें गाय गायन ॥ दत्तमहिमा ऐसें म्हणून ॥ वृषमातें बोलतसे ॥१४॥

येरी महिमा ऐसें वचन ॥ सहज बोले प्रयोगानें ॥ परी महिमासिद्धि प्रत्यक्षपणें ॥ प्रगट झाली ते ठायीं ॥१५॥

सिद्धि येऊनि आउतापाशी ॥ म्हणे कामना कोण तुजसी ॥ येरु म्हणे तव नामासी ॥ श्रुत मातें करीं कां ॥१६॥

येरी म्हणे मी सिद्धि पूर्ण ॥ देहधारी महिमान ॥ ऐसें ऐकतां उत्तमोत्तम ॥ दत्तबोल आठवला ॥१७॥

जेव्हां सिद्धि दत्त देता ॥ ते सिद्धीची सकळ वार्ता ॥ सांगोनियां रेवणनाथा ॥ गेला होता महाराजा ॥१८॥

कीं हा प्रयोगितां मंत्र ॥ महिमा नामें सिद्धि पवित्र ॥ प्रत्यक्ष होईल तुजपुढें प्राप्त ॥ कामनेते पुरवावया ॥१९॥

मागणें जे आर्थिक कामना मनीं ॥ तूं तीस दाखवीं बोलूनी ॥ मग तितुके कार्यालागुनी ॥ सकळ कामना पुरवील ॥२०॥

म्हणसील काय आहे प्रताप तिचा ॥ तरी वदतां न ये आपुले वाचा ॥ सकळ भोग जो महीचा ॥ प्राप्त करील क्षणार्धे ॥२१॥

कानन तरु पाषाणपर ॥ जितुके असतील महीवर ॥ तितुके कल्पतरु साचार ॥ करुनि देईल क्षणार्धे ॥२२॥

आणि तुळवट जेथ पाषाण खाणी ॥ तपाची दावी अपार करणी ॥ की परीस तेवीं चिंतामणी ॥ करुनि दावी क्षणार्धें ॥२३॥

वसन भूषण धनकनकराशी ॥ अपार दावी नगाऐसी ॥ जें जें वर्तेल स्वकामनेसी ॥ तो तो अर्थ पुरवील बा ॥२४॥

ऐसें सांगूनि अत्रिआत्मजें ॥ ओपिलें होतें मंत्रबीज ॥ ऐसें श्रुत होतां सहजें ॥ दाटला होता गर्वानें ॥२५॥

परंतु निःस्पृह होता आनंदभरित ॥ हांकीत होता शेतांत आउत ॥ मंत्रप्रयोगीं विचारीत ॥ सहजस्थिति केलीसे ॥२६॥

परी महिमासिद्धि भेटतां त्यातें ॥ अधिक झाला आनंदभरित ॥ म्हणे सत्पंथ सांगोनि दत्त ॥ गेला असे महाराजा ॥२७॥

मग हातीचा सोडूनि आउतदोर ॥ तीतें बोलता होय उत्तर ॥ म्हणे शेतीं पैल असे तरुवर ॥ छायेकरुनि वेष्टिला ॥२८॥

तरी त्या शीतळ छायेतें ॥ कणाच्या राशी अपरिमित ॥ कनक करीं एक क्षणांत ॥ चमत्कार दावीं कां ॥२९॥

दृष्टीं पडतां कनकराशी ॥ मग मी म्हणेन सिद्धि तुजसी ॥ मग जे कामना होईल देहासी ॥ ते मी तुजला सांगेन ॥३०॥

तरी हे ऐसें परीक्षावचन ॥ आधीं दावीं मजकारण ॥ जैसा मोहोरा सूत गुंडोन ॥ अग्नि रक्षी परीक्षे ॥३१॥

कीं पक्षिकुळातें हंसदृष्टीं ॥ परीक्षे ओपी पयतोयवाटी ॥ कीं परिसा पारख पाषाणथाटीं ॥ लोह मिरवी कनकातें ॥३२॥

तेवीं आतां परीक्षापण ॥ दावी मिरवूनि अपार सुवर्ण ॥ तेणें मग संशयविरहित होवोन ॥ गोड होईल चित्तातें ॥३३॥

ऐसें बोलतां रेवणनाथ ॥ सिद्धि आश्चर्ये हास्य करीत ॥ म्हणे महाराजा एक क्षणांत ॥ कनकधनें भरीन सकळ मही ॥३४॥

मग सहज आणूनि कृपादृष्टीं ॥ विलोकीतसे महीपाठीं ॥ तों नगासमान कनकधनथाटी ॥ अपार राशी मिरवल्या ॥३५॥

तें पाहूनि रेवणनाथ ॥ म्हणे माते तूं आहेसी सत्य ॥ तरी आतां संन्निध मातें ॥ येथूनियां रक्षीं कां ॥३६॥

तूं सन्निध असतां सर्व काळ ॥ पुरविसी सकळ इच्छाफळ ॥ ऐसें बोलतां ती वेल्हाळ ॥ बोलती झाली तयातें ॥३७॥

म्हणे सन्निध राहीन आतां ॥ परी गुप्त वर्तेन जगाकरितां ॥ तुवां न धरावी दर्शनस्पृहता ॥ कार्य तुझें करीन मी ॥३८॥

मग अवश्य म्हणे रेवणनाथ ॥ कार्यसंबंधी असावें उदित ॥ मग कनकधनराशी गुप्त ॥ अदृश्य सिद्धि मिरवली ॥३९॥

त्यावरी सायंकाळपर्यत ॥ शेतीं प्रेरिलें समग्र आउत ॥ मग गुरांसवें येऊनि गोठंगणांत ॥ वृषभांतें बांधिलें ॥४०॥

रात्रीं करुनी शयनीं शयन ॥ तों उदय झाला द्वितीय दिन ॥ मग मनांत म्हणे ब्रह्मनंदन ॥ व्यर्थ कां कष्टें कष्टावें ॥४१॥

शेतीं सायंकाळपर्यंत ॥ संवत्सर हांकावें आउत ॥ तरी आतां कष्ट केउतें ॥ व्यर्थ शरीरा शिणवावें ॥४२॥

निधान असतां आपुले हातीं ॥ दैन्य भोगावें कवणें अर्थी ॥ परीस लाधला धनप्राप्ती ॥ मेळवूं कां जावें देशांतरा ॥४३॥

सुरसुरभी असतां घरीं ॥ तक्र मागावें घरोघरीं ॥ चिंतामणी ग्रीवेंमाझारी ॥ असतां चिंता कां भोगावी ॥४४॥

ऐशा कल्पना आणूनि चित्तीं ॥ सोडोनि दिधलें जाणें शेतीं ॥ तो दिन येत प्रहरमिती ॥ सहनसारु बोलतसे ॥४५॥

म्हणे वत्सा सोडूनि आउत ॥ गृहीं बैसलासी कवणे अर्थे ॥ येरू म्हने जाऊनि शेतांत ॥ काय ताता करावें ॥४६॥

कष्ट करितां रात्रंदिवस ॥ काय मिरवले फळास ॥ येरू म्हणे धान्य खावयास ॥ पिकवावें पाडसा ॥४७॥

शेत पिकलिया अपार कर्णी ॥ मग सुख भोगूनि अवनीं ॥ नातरी भ्रांति खावयालागुनी ॥ पुढे होईल बाळका ॥४८॥

ऐसें ऐकूनि तातवचन ॥ म्हणे कष्टें पिकवावें शेतीं अन्न ॥ तरी आपुले गृहीं काय न्यून ॥ म्हणोनि आतां कष्ट करावे ॥४९॥

येरु म्हणे बा आपुल्या गृहासी ॥ काय आहे न कळे मजसी ॥ नित्य स्थापूनि येरयेरा कोरड्यासी ॥ दिवसपरी लोटीतसें ॥५०॥

येरु म्हणे बोलसी खोटें ॥ सदन भरलेसें कनकवटें ॥ जाऊनि पहा खरे खोटे ॥ बोल माझे महाराजा ॥५१॥

तंव तो हांसूनि सहजस्थितीं ॥ गमन करीतसे धवळाराप्रती ॥ तों कनकराशी धन अपरिमिती ॥ गृहामाजी मिरवती ॥५२॥

तें पाहूनियां सहनसारुक ॥ चित्तीं आश्चर्य मानी दोंदिक ॥ म्हणे कैसे झालें कौतुक ॥ बाळबोलेकरुनियां ॥५३॥

मग परम होवोनि हर्षयुक्त ॥ म्हणे वरदपानी आहे सत्य ॥ कोणी अवतारी प्रतापवंत ॥ सिद्धमुनि हा असे ॥५४॥

मग तो सहनसारुक ऋषी ॥ कदा न सांगे कवण्या कार्यासी ॥ प्रमाण मानूनि त्याचे बोलासी ॥ तदनुसारें वर्तत ॥५५॥

मग तो रेवण ब्रह्मसुत ॥ काय करीतसे नित्यानित्य ॥ बुंधल ग्राम तो थोर अत्यंत ॥ मार्गावरी नांदतसे ॥५६॥

तैं पांथस्थ येतां मुक्कामासी ॥ पाचारुनि नेतसे सदनासी ॥ कामनेसमान आहारासी ॥ अन्न देतसे नित्यशा ॥५७॥

मग गांवात पडली एक हांक ॥ कीं रेवण देत अन्न उदक ॥ मग चुंगावर चुंगा लोक ॥ पांथिक सत्वर धांवती ॥५८॥

मग जैसी ज्याची इच्छा गहन ॥ तैसी पुरवी नाथ रेवण ॥ वस्त्रपात्र अपार धन ॥ देवोनियां बोळवी ॥५९॥

रोगभोगादि मनुष्यें येती ॥ तीं सर्व दुःखांची पावूनि शांती ॥ धन्य म्हणूनि गृहासीं जाती ॥ यशकीर्ति वर्णीत पैं ॥६०॥

मग जगांत होऊनि प्रसिद्ध ॥ सर्वत्र म्हणती धन्य हा सिद्ध ॥ देशविदेशीं जनांचे वृंद ॥ रेवणसिद्ध म्हणताती ॥६१॥

तों कोणे एके दिवशी मच्छिंद्रनाथ ॥ महीं करीत नानातीर्थ ॥ बुंधलग्रामीं अकस्मात ॥ मुक्कामातें पातला ॥६२॥

वस्तीसी धर्मशाळेंत राहून ॥ करीत बैसला श्रीगुरुचिंतन ॥ तों त्या गांवीचे कांहीं जण ॥ धर्मशाळेंत पातले ॥६३॥

येतांचि त्यांनीं देखिला नाथ ॥ म्हणती बाबा उतरलासी येथ ॥ तरी सारावया आपुला भक्त ॥ रेवणसिद्ध पहावा ॥६४॥

येरु पुसे त्यांतें वचन ॥ रेवणसिद्ध आहे कोण ॥ मग ते सांगती मुळापासून ॥ कृषिकर्मी शोध हा ॥६५॥

ऐसे ऐकतां मच्छिंद्रनाथ ॥ जाऊनि पाहे अंतरीं गुप्त ॥ तो दृष्टी देखतां म्हणे चित्तांत ॥ अवतार असे हा एक ॥६६॥

आमुचा सांगाती पूर्णाश ॥ हा नारायण प्राज्ञ चमस ॥ तरी प्रसन्न कोण झाला यास ॥ शोध करुं तयाचा ॥६७॥

पुनः येवोनि धर्मशाळेंत ॥ लोकांसी म्हणे गुरु कोण यातें ॥ कोण मिरवला जगातें ॥ निजदेहाचें नाम सांगा ॥६८॥

तंव ते म्हणती बाबा नाथ ॥ आम्हां नाहीं माहीत ॥ मग स्तब्ध राहूनि मच्छिंद्रनाथ ॥ काय करी महाराजा ॥६९॥

पक्षिकुळांतें पाचारुन ॥ घालिता झाला इच्छाभोजन ॥ एका करीं बैसवोन ॥ तुष्ट करुनि बोळवी ॥७०॥

शिरीं स्कंधीं पक्षिमेळा ॥ मच्छिंद्र बैसोनि वेष्टी सकळां ॥ जाय म्हणतां उतावेळा ॥ अंबरातें जाती पैं ॥७१॥

मग पाचारुनि वनचरांसी ॥ त्यांसही देत आहारासी ॥ आपुले हस्तें व्याघ्रसिंहांसी ॥ ग्रास देत महाराजा ॥७२॥

ऐसे होतां कांहींएक दिवस ॥ लोक म्हणती महापुरुष ॥ हा ईश्वरचि म्हणूनि यास ॥ श्वापद विहंगम स्पर्शिती ॥७३॥

मग धन्य धन्य म्हणूनि ख्याती ॥ रेवणसिद्धासी सांगती ॥ म्हणती आला आहे एक जती ॥ सर्वापरी अदभुत ॥७४॥

विहंगमादि श्वापदगण ॥ सहज घेतसे पाचारुन ॥ तेही येती संशय सोडून ॥ भेटीलागी तयाच्या ॥७५॥

करीं स्कंधीं करुनि आरोहण ॥ अन्नोदकातें सेववून ॥ जा म्हणतां करिती गमन ॥ तृप्त मना मिरवोनि ॥७६॥

म्हणाल बोलणें व्यर्थ चावटी ॥ तरी आपण पहावें तया दृष्टी ॥ पक्षी श्वापदें कोट्यनुकोटी ॥ तयापाशीं येताती ॥७७॥

ऐसें ऐकूनि रेवणसिद्ध ॥ पाहूं चालिला प्रतापसिद्ध ॥ तों येतां देखिले पक्षियांचे वृंद ॥ करीं शिरीं मिरवले ॥७८॥

तें पाहूनि आश्चर्यवंत ॥ म्हणे वनचरीं कैसें सांडिलें द्वैत ॥ तरी फेडूं या संशयातें ॥ प्रत्यक्ष सिद्ध कोण हा ॥७९॥

मग शीघ्र येवोनि आपुले सदनीं ॥ जाऊनि बैसले एकांत स्थानीं ॥ दत्तमंत्र प्रयोगूनी ॥ प्रत्यक्ष करुं सिद्धीतें ॥८०॥

मग होतां प्रत्यक्ष सिद्धी ॥ म्हणे महाराजा विशाळबुद्धी ॥ कवण कामने काय सिद्धी ॥ प्रत्यक्ष केलें तुवां मातें ॥८१॥

येरु म्हणे वो कृपासरिते ॥ तुष्ट करिसी सर्व जनांतें ॥ तेचि रीतीं पक्षिकुळांतें ॥ तुष्ट करी श्वापदें कीं ॥८२॥

तुष्ट करिसी तरी कैसें ॥ हरुनि त्यांच्या देहबुद्धीस ॥ मम सन्निध स्वअंगास ॥ संगोपावें जननीये ॥८३॥

येरी ऐकोन वागुत्तर ॥ म्हणे महाराजा पक्षी आणि वनचर ॥ होणार नाहीत अद्वैतपर ॥ ब्रह्मवेत्त्यावांचोनी ॥८४॥

जो स्थावर आणि जंगमांत ॥ सर्वाचि नांदे हदयांत ॥ तयाचिया गोष्टी ह्या निश्चित ॥ जो अद्वैतपणें वसतसे ॥८५॥

हे महाराजा ऐक बोला ॥ जो जळरुपीच होऊनि ठेला ॥ तो जळामाजी मिळावयाला ॥ अशक्य काय उरेल जी ॥८६॥

तेवीं ब्रह्मपरायण होतां ॥ मग चराचरीं नुरे द्वैतवार्ता ॥ अद्वेष्टा झाला सर्वभूतां ॥ चराचरी महाराजा ॥८७॥

मग तो प्राणी सर्वभूत ॥ जगातें मानी आप्त ॥ आणि मग तेही मानिती त्यातें ॥ सखा सोइरा कीं आमुचा ॥८८॥

तरी आतां श्लाघ्यवंत ॥ आधीं व्हावें ब्रह्मव्यक्त ॥ त्यावरी बोले रेवणनाथ ॥ ब्रह्मवेत्ता करीं मातें ॥८९॥

येरी म्हणे चातुर्यखाणी ॥ अत्रिनंदन तुझा स्वामी ॥ त्यातें स्तवोनि उगमी ॥ साध्य करुनि घेई कां ॥९०॥

तुज तो साह्य झाल्या जाण ॥ मग पक्षिश्वापदीं अद्वैतपण ॥ काय असें तेवढें कठिण ॥ देवादिक येतील कीं ॥९१॥

स्वर्लोक भूलोक तपोलोक ॥ स्वर्गवासी सुरवर अनेक ॥ चरणसेवा दोंदिक ॥ वांछितील मग तुझी ॥९२॥

ऐसें सिद्धी बोलतां वचन ॥ चित्तीं म्हणे हेंचि करीन ॥ मग सर्व त्याग करुन ॥ काननांत प्रवेशे ॥९३॥

जयाठायीं भेटला दत्त ॥ तेथें जाऊनि बैसला नाथ ॥ दत्तस्मरणीं ठेवूनि चित्त ॥ वाट पाहे भेटीची ॥९४॥

मनीं दाटला भेटीचा योग ॥ तेणें अन्नोदकाचा झाला त्याग ॥ मग दिवसेंदिवस शरीरभोग ॥ शुष्ककाष्ठ दाहीतसे ॥९५॥

चालले तरुचें पर्णभक्षण ॥ येतसे काय जें उडून ॥ दत्तवियोगें भेटांकारणें ॥ काये वाचे वेला ॥९६॥

मग तें पाहून मच्छिंद्रनाथ ॥ म्हणें हा लागला प्रयत्नांत ॥ परी कोण गुरु आहे त्यातें ॥ समजला नाहीं अद्यापि ॥९७॥

अहा गुरु तो ऐसा कैसा ॥ काळरत्ना दृढोत्तर घालूनि फांसा ॥ गेला आहे अभ्यासमासा ॥ निष्ठुर मन करुनियां ॥९८॥

मग रेवणसिद्धाचा प्रताप ॥ पुसूनि घेतला जनमुखें माप ॥ ते म्हणती तो आहे जगबाप ॥ परोपकारी असे कीं ॥९९॥

कितीएकां घातलें इच्छि अन्न ॥ कितीएकां दिधलें अपार धन ॥ अपार जगाते अकिंचनपण ॥ अर्थाअर्थी हरीतसे ॥१००॥

ऐसी ऐकूनि जनाची गोष्टी ॥ चित्तीं म्हणे हा प्रतापकोटी ॥ सिद्धी सकळ साधला जेठी ॥ कोठेतरी गुरुकृपें ॥१॥

तरी आतां सिद्धि कोण ॥ झाली आहे या स्वाधीन ॥ त्या सिद्धीतें पाचारुन ॥ वृत्तांत श्रुत व्हावा कीं ॥२॥

मग अणिमा गरिमा लघिमा महिमा ॥ ईशित्व वशित्व प्राप्ति प्रकामा ॥ ऐशा अष्टसिद्धि नामा ॥ पाचारिल्या प्रत्यक्ष ॥३॥

प्रत्यक्ष होत त्या शुभाननी ॥ श्रीनाथाच्या लागल्या चरणीं ॥ नाथ म्हणे त्यातें पाहुनी ॥ उत्तर मज सांगावें ॥४॥

रेवणसिद्ध हा महापुरुष ॥ त्याचे सिद्धि दासत्वास ॥ कोणती सांगा आहे आम्हांस ॥ गुरुवाक्येंकरुनियां ॥५॥

तंव ती बोलती झाली महिमा ॥ मातें ओपिलें दास्यनेमा ॥ श्रीदत्तात्रेययोगद्रुमें ॥ मंत्रसिद्धिकरुनियां ॥६॥

मग दत्तात्रेय हा ऐकूनि गुरु ॥ म्हणे हा बंधूचि साचारु ॥ आहे तरी सर्वापारु ॥ हित इच्छिणें तयाचें ॥७॥

जैसा अर्धपिंडी भाग ॥ मारुतिदेहीं उद्भवला योग ॥ परी सीताहरणीं भोगिला भोग ॥ साह्य होऊनि तयासी ॥८॥

किंवा मागील संगेंकरुन ॥ गोपाळ झाले वानरगण ॥ सर्व साह्य होऊन ॥ माहात्म्यीं कृष्ण वाढविला ॥९॥

तेवीं आपुली ऐसी मती ॥ चमस नारायण स्वसंगतीं ॥ तरी या रेवणसिद्धाप्रती ॥ साह्य आपण व्हावें सर्वस्वीं ॥११०॥

मग तेथूनि निघे अतिवेग ॥ गिरनारपर्वती आला चांग ॥ भेटूनि अत्रिआत्मजयोग ॥ रेवणसिद्धाचें वृत्त कथियेलें ॥११॥

सकालपणीं चरणी माथा ॥ ठेवूनि म्हणे अनाथनाथा ॥ हे गुरुराजा दयावंता ॥ साधकहिता भास्करु ॥१२॥

तरी अवनीं अवतारपूर्ण ॥ प्राप्तिक चमसनारायण ॥ तो तुम्हांकरितां क्लेश दारुण ॥ महीलागीं भोगीतसे ॥१३॥

निर्वाण धरुनि चित्तीं ॥ बैसला आहे काननाप्रती ॥ तरी कृपाबोध मारुतगती ॥ तयावरी सिंचावा ॥१४॥

अहा एक सिद्धी आणूनि त्या भास ॥ घालूनि गळां दृढोत्तर फांस ॥ तरी तो फांस झाला क्लेश ॥ मरणवाट त्या दावी ॥१५॥

जेथें झाली तुमची भेटी ॥ तेथेंचि बैसला काननपुटीं ॥ आहार त्यजूनि प्राण कंठीं ॥ आणूनियां ठेविला तो ॥१६॥

त्वचा झाली अस्थिव्यक्त ॥ देहींचें रुधिर आटलें समस्त ॥ प्राण कासावीस चक्षु श्वेत ॥ कार्पाससम दिसताती ॥१७॥

सरागींच्या शिरा दृश्या ॥ ढळढळीत दिसती महापुरुष ॥ पोटपाठ ऐक्यलेश ॥ हरिकटीसम मिरवत ॥१८॥

तरी महाराजा सदैव माउलें ॥ वत्सा करावे काय इतुलें ॥ अवकृपा करणें नव्हे भलें ॥ महीलागीं मिरवावें ॥१९॥

लोहाचे कनक करी परिस ॥ तेणें सांडिला पाकरस ॥ तरी परीस ऐसें कोण त्यास ॥ म्हणेल दगड मिरवेल ॥१२०॥

कीं एक तमाचा अरि पूर्ण ॥ तेणें साडिलें चांगुलपण ॥ मग सविताराज तया कोण ॥ महीलागीं बोलेल कीं ॥२१॥

आमुचा वरदपाणी ॥ स्पर्शिता जाय मौळीलागुनी ॥ मग तो सर्वालागूनि अवनीं ॥ ठेंगणेपणीं मानीतसे ॥२२॥

ऐसी चाल सहजस्थित ॥ गुरुची असे कृपा मूर्त ॥ तरी रेवणनाथदेहआहुत ॥ कष्टानळी न सांडावी ॥२३॥

पहा जीवनें केली लावणी ॥ सुखा आणिलें थोरपणीं ॥ ते शुष्क केलिया मोहेंकरुनी ॥ बुडवूं न शके जीवन तें ॥२४॥

त्याचि नीतीं पीयूषाभास ॥ सेविल्या ओपी संजीवनपणास ॥ तें पुढें कोपल्या मृत्युपदास ॥ पाठवील कीं महाराजा ॥२५॥

तरी त्या पीयूष रसाच्या गांवीं ॥ स्वप्नामाजी मृत्यु नाहीं ॥ तैसें तुमच्या हदयीं ॥ औदार्य बहु वसतसे ॥२६॥

ऐसे बोल त्या युक्तिवानाचे ॥ ऐकूनि दत्तहदयीं प्रेम नाचे ॥ डोलवूनि ग्रीवा साचें ॥ हास्य करी आनंदें ॥२७॥

मग तो उदार शांत दाता ॥ सवे घेऊनि मच्छिंद्रनाथा ॥ व्यान अस्त्र जल्पूनि चित्ता ॥ तया ठायीं पातले ॥२८॥

परी त्या उभय भव्यमूर्ती ॥ जैसे उतरले दोन गभस्ती ॥ कीं इंद्र वाचस्पती ॥ प्राज्ञिकपणीं मिरवले ॥२९॥

कीं एक हरि एक हर ॥ कीं द्रोण मंदराचल किमयागार ॥ प्रेममारुता होऊनी स्वार ॥ तया ठायीं पातले ॥१३०॥

तों येतांचि देखिला रेवणनाथ ॥ कृश शरीर काष्ठवत ॥ अस्थिमय प्राण व्यक्त ॥ वाट पाहे दत्ताची ॥३१॥

अतिक्लेशी कंठीं प्राण ॥ पाहूनि श्रमला अत्रिनंदन ॥ प्रेमें कवळिला सदयपणें ॥ माय जैसी बाळकातें ॥३२॥

कीं वत्सलागीं जैसी गाय ॥ हंबरडा फोडी अति मोहें ॥ तेवीं अत्रिनंदनें प्रेमहदयें ॥ प्रियभावें आलिंगिला ॥३३॥

तेणेंही चरणीं ठेवूनि माथा ॥ होय प्रेमाक्षु ढाळिता ॥ म्हणे आजी भेटली माझी माता ॥ निढळवाणी वत्सातें ॥३४॥

मग तो महाराज तपोराज ॥ हदयीं धरी अत्रिआत्मज ॥ मग साधकहिताचें चोज ॥ उल्हासें ओपीतसे ॥३५॥

जैसें सुतालागीं तात ॥ हिता ओपूनि परत्र होत ॥ तेवीं दूर्वाससहोदर मोहित ॥ होऊनि हिता मोहीतसे ॥३६॥

परम आराधूनि कृपें न्याहाळी ॥ कर्णी ओपिली मंत्रावळी ॥ तेणें तदघटी अज्ञानकाजळीं ॥ निघूनि गेली सर्वस्वीं ॥३७॥

मग तो ज्ञानी हदयीं दिवटा ॥ नृत्य करीतसे तत्त्वचोहटा ॥ तेणें करुनि द्वैतकांटा ॥ अंकुरातें खुडियेला ॥३८॥

मग कृपें आराधूनि वज्रशक्ती ॥ भाळीं चर्चिली दिव्य विभूती ॥ तेणेंकरुनि देहस्थिती ॥ शक्तिवान मिरवली ॥३९॥

मग सवें घेऊनि रेवणनाथ ॥ गिरनारपर्वती गेला दत्त ॥ तेथें बैसूनि दिवस अमित ॥ विद्यावसन नेसविलें ॥१४०॥

ब्रह्मज्ञानरसायन ॥ विपुलपणीं केलें पान ॥ तेणेंकरुनि ऐक्यपण ॥ चराचरीं मिरवलें ॥४१॥

ऐसा झाला तयातें आभास ॥ कीं मीच स्वामीचा भास ॥ मीच व्याप्त चराचरीं असें ॥ एकदेहीं मिरवलों ॥४२॥

मग पक्षिकुळा वनचरां सहित ॥ अचलपणी पापाणलता ॥ समीप येती पाचारितां ॥ रेवणनाथा वंदावया ॥४३॥

ऐशी अद्वैत दृष्टी होतां ॥ मग रसायणादि शीघ्र कविता ॥ वेदपाठी ज्योतिषअर्था ॥ प्रवीण कळा व्याकरणीं ॥४४॥

धनुर्धर जळतरणी ॥ वैद्य नाटकें चातुर्यगीत गायनी ॥ कोकशास्त्रादि अश्वारोहणी ॥ चतुर्दशविद्या निरोपिल्या ॥४५॥

उपरी नानाशास्त्रप्रवीण ॥ अस्त्रें सांगितलीं मच्छिंद्रासमान ॥ वज्रअस्त्रादि वाताकर्षण ॥ संजीवनी सांगितली ॥४६॥

वातास्त्र धूम्रास्त्र अग्निअस्त्र ॥ नागास्त्र कामास्त्र पर्वतास्त्र ॥ जलदअस्त्रादि खगेंद्रास्त्र ॥ ब्रह्मास्त्रादि निरोपिलीं ॥४७॥

निर्वाण रुदास्त्र वासवशक्ती ॥ देवास्त्र मोहनास्त्र दानवास्त्रगती ॥ असो ऐसे वर्णितां किती ॥ अपार अस्त्रीं मिरविला ॥४८॥

मग नाथपंथीं दीक्षा देऊन ॥ उन्मनी मुद्रा फाडिले कान ॥ तत्त्वामाजीं दिव्यज्ञान ॥ गळां कंथा ओपिली ॥४९॥

देवविती शुद्ध सारंगी ॥ अनुहत वाजे नाना अंगीं ॥ कुबडी फावडी देहप्रसंगीं ॥ देह विदेही मिरवला ॥१५०॥

ऐसा होऊनि पूर्ण स्थित ॥ मग सवें घेऊनि मच्छिंद्रनाथ ॥ मार्तडपर्वतीं गेले त्वरित ॥ नागेश्वरस्थाना वंदिलें ॥५१॥

तेथें करुनि देवदर्शन ॥ वरद घेतला विद्येकारणें ॥ मग साबरीविद्या कवित्वरचन ॥ महीवर मिरवीतसे ॥५२॥

असो सर्व साध्य झाल्यावरी ॥ मावदे मांडिले बहुतां गजरीं ॥ हरिहरादि साह्यकारी ॥ गिरिनारपर्वतीं आणिलें ॥५३॥

सुवर्लोक भूलोक तपोलोक ॥ स्वर्गवासी पुण्यश्लोक ॥ गणगंधर्व सुरवर अनेक ॥ मावद्यास आणिले ॥५४॥

ब्रह्मा इंद्र वरुण कुबेर अश्विनीकुमार चंद्र भास्कर ॥ सकळ समुच्चय पर्वताकार ॥ मावद्याते पातले ॥५५॥

चार दिवस यथायुक्त ॥ सोहळा भोगिला अपरिमित ॥ मग प्रसन्न होऊनि सकळ दैवतें ॥ पूर्ण वरा ओपिलें ॥५६॥

वर देऊनि सकळ विद्येसी ॥ जात झाले स्वस्थानासी ॥ रेवणासिद्धही तीर्थाटनासी ॥ अत्रिआत्मजें पाठविला ॥५७॥

तीर्थे हिंडतां अपार महीसी ॥ तों विठग्राम मानदेशीं ॥ तेथें येऊनि मुक्कामासीं ॥ सहजस्थितीं राहिला ॥५८॥

तों तेथें सरस्वती ब्राह्मण ॥ जान्हविका स्त्री तयालागून ॥ लावण्यलतिक स्वरुपवान ॥ चंद्रासी वदनें लाजवितसे ॥५९॥

उभय स्त्रीपुरुष एकचित्ती ॥ जेवीं ते लोहचुंबकरीती ॥ किंवा जगप्रिय गमस्ती ॥ अवियोगप्रीतीं वाहिले ॥१६०॥

कीं मीनतोयाची संगती ॥ कीं विवरस्थाची एकनीती ॥ कीं भावाअंगी सिद्धभक्ती ॥ सदा धवळारीं नांदतसे ॥६१॥

तन्न्याये उभयतां जाण ॥ प्रपंच वहिवाटिता एकप्रमाण ॥ परी इतुकें असोनि जठरीं संतान ॥ शून्यपणें मिरवत ॥६२॥

सप्त पुत्र झाले तयासी ॥ परी ते बाळपणीं पंचत्व देहासी ॥ सातवें आठवे दिवशीं ॥ दहावे दिवशीं पंचत्व होय ॥६३॥

असो षटपुत्र देहान्त पावले ॥ यावरी सातवे उदय पावले ॥ ते द्वादश दिन वांचलें ॥ तेणें हर्षलें विप्रमन ॥६४॥

कांतेती म्हणे परम वेल्हाळे ॥ पंचम षष्ठ भक्षिले काळे ॥ हें द्वादश दिन वांचले केवळ ॥ काळवेळ लोटली येणें ॥६५॥

एक आणि चुकल्यापरीस ॥ तों दश वर्षांचा होय आयुषी ॥ तरी आतां या पुत्रासी ॥ भय नसे सर्वथा गे ॥६६॥

ऐसें कांतेसी बोलून वचन ॥ बारसें मांडिलें परम आवडीनें ॥ गृहीं करुन पंचपक्कान्नें ॥ घाली भोजन विप्रांसी ॥६७॥

तों ते दिवशीं रेवणनाथ ॥ भिक्षा करीत आला तेथ ॥ अलक्ष गाजवूनि त्या द्वारातें ॥ पुढे पाऊल ठेवीतसे ॥६८॥

तंव त्या विप्रें देखिलें दुरोनी ॥ वाढतें पात्र ठेविलें धरणीं ॥ तैसाचि बाहेर येऊनी ॥ नाथानिकट लगबगें ॥६९॥

तंव तेजःपुंज हाटककांती ॥ देखतां विप्र म्हणे चित्तीं ॥ हा पूर्व तापसी अवतार क्षितीं ॥ कोणी तरी आहे कीं ॥१७०॥

तैसाचि सोहळा लगबगेंकरुन ॥ नाथचरणीं मस्तक ठेवोन ॥ म्हणे महाराजा प्रयोजन ॥ माझे घरीं आहे कीं ॥७१॥

ऐसें असोनि मज दरिद्रियाचे मनोरथ ॥ डावलूनि जातां किमर्थ ॥ तरी हे तुम्हां नव्हे यथार्थ ॥ अनाथा सनाथ करावें ॥७२॥

मी हीन दीन जाति ब्राह्मण ॥ काय करावा उत्तम वर्ण ॥ सेवाचोर अतिथिकारणें ॥ व्यर्थ संसारीं मिरवतों ॥७३॥

ऐसें बोलोनि म्लान वाणी ॥ माथां वारंवार ठेवी चरणीं ॥ आपुला वर्णाश्रम टाकोनि ॥ विव्हळ झाला भावार्थे ॥७४॥

त्यावरी नाथ बोले त्यासी ॥ आम्ही शूद्र तूं विप्र मिरविसी ॥ मज नमस्कारावया तुजसी ॥ अर्थ नाहीं जाणिजे ॥७५॥

येरु ऐकूनि बोले वचन ॥ शूद्र जातीचा ब्राह्मण ॥ तो मातंगा करील नमन ॥ अन्य वर्ण चुकेल कैसा ॥७६॥

कडू भक्षिता काय होय गोड ॥ होणार नाहीं धडफुढा ॥ प्राज्ञिक मानिला जेणें वेडा ॥ तरी त्या पंडिता धिक्कार ॥७७॥

तरी ऐसें वर्म निपुण ॥ मज कैसे येईल घडून ॥ परी देखावें श्रेष्ठ वचन ॥ ऐसी विनंती करीतसे ॥७८॥

ऐसें बोलतां विप्र त्यातें ॥ मनांत म्हणे रेवणनाथ ॥ हा विप्र आहे प्रज्ञावंत ॥ बोलापरी चालतसे ॥७९॥

नातरी बोल बोलतां सोपे ॥ आचार दावितां टीर कांपे ॥ तरी आतां असो यातें स्वल्प ॥ सिद्धार्थातें मेळवूं ॥१८०॥

मग विप्राचा धरुनि हात ॥ संचार करी त्याचे गृहांत ॥ विप्रें नेवोनि स्वसदनांत ॥ महाराज बैसविला ॥८१॥

पात्र लगबगें आणी वाढून ॥ सर्व पदार्थ भरी प्रेमेंकरुन ॥ पात्रानिकट बैसोन ॥ भोजन सारी नाथाचें ॥८२॥

अन्य विप्रां विप्र नेमून ॥ सकळाचें करी संगोपन ॥ परी आपण न उठे नाथापासून ॥ परमभक्तीसी गुंतला ॥८३॥

जैसी शर्करेसी पिपीलिका ॥ काढूं जातां दडपी मुखा ॥ तेवीं भक्तीचा धरुनि आवांका ॥ विप्र गुंतला नाथभक्ती ॥८४॥

असो ऐसे परम भक्तीं ॥ नाथाची झाली जठरतृप्ती ॥ येरीकडे विप्रपंगती ॥ गेले भोजन सारुनियां ॥८५॥

विप्र गेले आपुले सदनीं ॥ येरीकडे नाथालागूनी ॥ भोजन झाल्या नम्र वचनीं ॥ बोलता झाला विप्र तो ॥८६॥

म्हणे महाराजा आजिचा दिन ॥ वस्तीसी सेवावें माझें सदन ॥ उदयिक प्रातःकाळीं उठून ॥ जाणें असेल तरी जावें ॥८७॥

पाहूनि तयाचा परम आदर ॥ अवश्य म्हणे विधिकुमर ॥ एकांतस्थानीं शयनावर ॥ नाथा नेऊनि पहुडविलें ॥८८॥

नाथ शयनीं होतां निद्रित ॥ आपण भोजन सारुनि त्वरित ॥ वारासार करुनि येत ॥ नाथापाशीं त्वरेनें ॥८९॥

तों सूर्य गेला अस्तासी ॥ मग उठूनि बैसला तापसी ॥ पुन्हा वंदूनि नाथचरणांसी ॥ उपाहार करवा म्हणतसे ॥१९०॥

तंव नाथ म्हणे आतां भोजन ॥ झालें आहे न इच्छी मन ॥ मग आपुला नित्यनेम सारुन ॥ पुन्हां शयनीं पहुडला ॥९१॥

सरस्वती ब्राह्मण निकट बैसून ॥ नाथाचे चुरीतसे चरण ॥ तों मध्यरात्री झाली पूर्ण ॥ तेव्हां विपर्यास वर्तला ॥९२॥

बाळ जें होतें मातेपाशीं ॥ सटवीनें झडपिलें त्यासी ॥ परम तें झालें कासाविशी ॥ शोकसिंधु उचंबळला ॥९३॥

हांक मारी स्वभर्त्यातें ॥ म्हणे बाळ कासाविसी बहु होतें ॥ विप्र म्हणे त्या कांतेतें ॥ होईल तैसें होऊं दे ॥९४॥

तूं न करीं आतां कांही अनुमान ॥ निद्राभंग होईल नाथाकारण ॥ आपुलें प्रारब्ध मुळींच हीन ॥ बरवें कैसें होईल गे ॥९५॥

मागें आचरलों कांहीं पाप ॥ तें भोगितों अमूप ॥ आतांहि मोडितां स्वामीची झोंप ॥ सुलभ पुढें दिसेना ॥९६॥

ऐसें बोलूनि कांतेतें ॥ श्रीनाथाचे चरण चुरीत ॥ तों सवितासुताचे येऊनि दूत ॥ बाळ पाशीं आकर्षिला ॥९७॥

काढूनि चैतन्य जीवदशारुप ॥ घेऊनि गेले यमासमीप ॥ येरीकडे शवस्वरुप ॥ बाळदेहीं मिरवलें ॥९८॥

मग तो मायेचा मोह दारुण ॥ हदयीं पेटला विरहअग्न ॥ मग मंद रुदन भरतां नयन ॥ जान्हवी तेव्हां करीतसे ॥९९॥

तों प्रातःकाळसमय झाला ॥ शयनीं नाथ जागृत झाला ॥ तों मंद रुदनार्थ आकर्णिला ॥ एकाएकीं तयानें ॥२००॥

नाथें ऐकूनि मंद रुदन ॥ विप्रासी म्हणे रडतें कोण ॥ येरु म्हणे बाळकाचा प्राण कासावीस होतसे ॥१॥

म्हणोनि मोहस्थित नाथा ॥ अज्ञानपणीं रडतें कांता ॥ ऐसी ऐकूनि तयाची वार्ता ॥ बाळा आणीं म्हणतसे ॥२॥

मग तो विप्र स्वकांतेपाशीं ॥ येऊनि पाहे स्वपुत्राची ॥ तंव तें मिरवलें प्रेतदशेसी ॥ हांका मारुनि तेधवां ॥३॥

म्हणे महाराजा प्राणरहित ॥ बाळ झालें निश्चित ॥ ऐसें ऐकूनि रेवणनाथ ॥ परम चित्तीं क्षोभला ॥४॥

म्हणे मी या स्थळीं असतां ॥ कैसा डाव लाधला कृतांता ॥ तरी तो कृतांत पाहीन आतां ॥ पाहूनि नाहींसा करीन मी ॥५॥

ऐसे दुर्घट शब्द वदोन ॥ ब्राह्मणासी म्हने बाळ आण ॥ तंव तें शरीर उचलोन ॥ नाथालागीं अर्पीतसे ॥६॥

तंव तें बाळ परम गोमटें ॥ नाथ पाहे आपुले दृष्टीं ॥ चित्तीं हळहळूनि म्हणे नष्ट ॥ कर्म काय उदेलें ॥७॥

विप्रासी म्हणे बाळ तूतें ॥ इतुकेचि झाले काय नितांत ॥ येरी म्हणे कृपावंत ॥ बाळ सातवें हें असे ॥८॥

बाळ होतां बाळंतपर्णी ॥ मृत्यु पावले पंचसप्तादिनी ॥ द्वादशदिन तपः प्राज्ञी ॥ बाळ सातवें हें असे ॥९॥

तरी आतां असो कैसें ॥ हीन प्रारब्ध आहे आम्हांस ॥ तें सुफळपणीं कर्मलेश ॥ फळा कैसें येईल कीं ॥२१०॥

परी असो होणार तें झाले ॥ आमुचे सेवेसी चित्त रंगलें ॥ तें पुण्यांश हेंचि इतुलें ॥ वारंवार लाधो कीं ॥११॥

ऐसी बोलतां विप्रहाणी ॥ अंतर जाणितलें प्रांजळपणीं ॥ मग सरस्वतीविप्रा पाचारुनी ॥ बोलता झाला महाराजा ॥१२॥

म्हणे वत्सा तीन दिवस ॥ जतन करीं बाळतनूस ॥ मी स्वतः जाऊनि यमपुरी ॥ साती बाळें आणितों कीं ॥१३॥

मग अमरमंत्र मंत्रूनि विभूती ॥ चर्चिली बाळशवाप्रती ॥ म्हणे विप्रा बाळ हें क्षितीं ॥ येणें नासणार नाहीं रे ॥१४॥

ऐसें सांगूनि त्वरितात्वरित ॥ तेथूनि निघता झाला नाथ ॥ व्यानअस्त्र जल्पूनि सनाथ ॥ अतिवेगेंसीं चालिला ॥१५॥

भोंवतें अस्त्रांचें करी भ्रमण ॥ तेणें हिमालयाचे अंबुकण ॥ शीतळ करुनियां जाण ॥ यथास्थित मिरवले ॥१६॥

जैसे शीताचे झुळकेआंत ॥ समीप पावक निश्वित ॥ तेणेंकरुनि शरीरांत ॥ बाधा न करी अंगातें ॥१७॥

तेवीं आदिनामास्त्र ॥ सव्य मेळवूनि योगपात्र ॥ व्यानास्त्र मुखीं स्तोत्र ॥ जल्पूनि गिरि वेधला ॥१८॥

सहज चालिला यमपुरीं ॥ संचर करी यक्षधवळारीं ॥ तो धर्मराज पाहूनि नेत्रीं ॥ आसनाहूनि उठालासे ॥१९॥

बैसवूनि आपुले कनकासनीं ॥ षोडशोपचारें पूजिला मुनी ॥ सहज करपुटीं नम्र वाणी ॥ धर्मराजें आरांधिला ॥२२०॥

म्हणे महाराजा योगदक्ष ॥ किमर्थ कामीं योजिला पक्ष ॥ तरी तें वदूनि सुढाळ पक्ष ॥ मज यक्षातें तुष्टवीं ॥२१॥

येरु म्हणे यमपुरनाथा ॥ मी सरस्वतीविप्राचे घरीं असतां ॥ तुवां येऊनि तयाच्या सुता ॥ हरण केलें कैसें रे ॥२२॥

तरी जें घडूं नये तें घडलें ॥ परी आतां मागुती देइजे वहिलें ॥ आणि षटपुत्र त्याचे कोठें ठेविले ॥ तेही आतां देई आणोनी ॥२३॥

तरी या बोलासी वर्तन ॥ तूतें न ये जरी घडून ॥ मग मम कोपाचा प्रळयाग्न ॥ उरों न देई तुजलांगीं ॥२४॥

ऐसें बोलतां रेवणनाथ ॥ विचार करी तेजोब्धिसुत ॥ म्हणे चांगलें बोलूनि यातें ॥ शिवधरेतें धाडावा ॥२५॥

आपुल्या सर्वस्वीं निमित्याकडून ॥ अधिकारी करावा उमारमण ॥ हा सिद्ध तेथें गेल्यानें ॥ दृष्टीं पडेल प्रतापू ॥२६॥

ऐसा विचार करुनि मानसीं ॥ बोलता झाला योगियासी ॥ म्हणे महाराजा मम बोलासी ॥ चित्त द्यावें यथार्थ ॥२७॥

हे महाराजा हरिहर ॥ आणि तिजा तो नाभिकुमर ॥ हे मुख्य यांचा कारभार ॥ सकळ करणें तयांचें ॥२८॥

जरी म्हणाल कैसे रीतीं ॥ त्रिवर्ग त्रिकामीं असती ॥ शिव क्षयी विधि उत्पत्तीं ॥ रक्षणशक्ति विष्णूचि ॥२९॥

तरी यक्षपति तो तमोगुणविहारी ॥ आम्ही त्याची करितों चाकरी ॥ मारणें तारणें आमुच्या करीं ॥ कांहीं एक नसे जी ॥२३०॥

तरी आतां प्रतापराशी ॥ गमन करावें कैलासासी ॥ आराधूनि शिवचित्तासी ॥ सप्तपुत्र न्यावे जी ॥३१॥

आणीक खूण सांगतों उत्तर ॥ तेथेंचि आहेत सप्तकुमर ॥ तरी दावूनि आपुला बुद्धिसंचार ॥ कार्य आपुलें करणें जी ॥३२॥

मजवरी जरी आलां आपण कोपोन ॥ तरी मी काय हीनदीन ॥ क्षयकर्ता उमारमण ॥ प्रसिद्धपणीं मिरवतसे ॥३३॥

क्षयकर्ता आहे भव चराचरीं ॥ शास्त्रादि बोलती साचार ॥ आपणही आहांत जाणिव सर्व ॥ अंतरंग सर्वाचें ॥३४॥

ऐसें असोनि महाराज ॥ कां कोपानळी योजितां मज ॥ सोज्ज्वळतेजीं अर्कराज ॥ तमधवळारा नांदवितां ॥३५॥

तुम्ही सर्वांचे ज्ञानदिवटे ॥ कूपीं पडतां अज्ञानवाटे ॥ हें योग्य नव्हे तुम्हां हळवटे ॥ धोपटपंथीं मिळाना कां ॥३६॥

ऐसें बोलतां धर्मराज ॥ मान तुकावी तेजःपुंज ॥ म्हणे हें पंचाननाचे काज ॥ तें सत्यार्थ बोलसी तूं ॥३७॥

तरी आतां कैलासीं जाईन ॥ कैसा आहे पंचानन ॥ तो सर्व दृष्टीं पाहीन ॥ अमित्रपन त्यासुद्धां ॥३८॥

ऐसें बोलूनि योगधारणी ॥ उठता झाला मग तेथुनी ॥ व्यानअस्त्र मुखीं स्तवोनी ॥ कैलासातें पातला ॥३९॥

आतां तेथें कथासार ॥ होईल तितुकी धुंडीकुमर ॥ मूळ काव्य ग्रंथापर ॥ नरहरिकृपें वर्णीत ॥२४०॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ पंचत्रिंशाध्याय गोड हा ॥२४१॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ अध्याय ३५ ॥ ओंव्या २४१॥


श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय ३६

श्रीगणेशाय नमः

जयजयाजी भक्तरातका ॥ मम पूर्वजा ज्ञानार्का ॥ नरहरिनामें पुण्यश्लोका ॥ पुढें ग्रंथ बोलवीं ॥१॥

मागिले अध्यायीं कथन ॥ रेवणनाथातें अत्रिनंदन ॥ वरदचित्तें प्रसन्न होऊन ॥ सनाथ चित्तें केला असे ॥२॥

केला तरी प्रतापवंत ॥ परी सरस्वतीविप्राचा अभिप्राय हेत ॥ चित्तें करुनि केला शांत ॥ रेवणनाथ गेला असे ॥३॥

तरी आतां पुढें श्रोतीं ॥ परिसावें आवाहना ग्रंथ अर्थी ॥ रेवणनाथ कैलासाप्रती ॥ कैलासद्वारीं प्रगटला ॥४॥

दिसे जैस भास्कर ॥ कीं उदय पावला रोहिणीवर ॥ कीं सहस्त्र चपलांचा एकभार ॥ अंगकांति मिरवतसे ॥५॥

ऐसा महाराज तेजःपुंज ॥ ग्रामद्वारीं येतां भोज ॥ तंव ते शिवगण विजयध्वज ॥ रक्षणा असती द्वारांत ॥६॥

त्यांनी पाहूनि योगमूर्ती ॥ हटकोनि उभा केला क्षितीं ॥ म्हणती तुम्ही कोणती नूतन गणती ॥ जातां कोठें महाराजा ॥७॥

येरु म्हणे रेवणनाथ ॥ नाम असे या देहातें ॥ विजयकरणीं भवभेटीते ॥ आम्हां जाणें आहे कीं ॥८॥

येरु म्हणती कवण कार्ये ॥ आम्हांलागीं शीघ्र सांगावें ॥ नाथ म्हणे विप्रतनय ॥ सत्य चोरिला शिवानें ॥९॥

तरी तयासी शिक्षा करुन ॥ घेऊनि जाईन विप्रनंदन ॥ ऐसें ऐकतां शिवगण ॥ परमचित्तीं क्षोभले ॥१०॥

म्हणती बाबा बोलसी वचन ॥ यांत आम्हांसी आलें समजोन ॥ तुमचा गुरु गंधर्व जाण ॥ आम्हांलागीं वाटतो ॥११॥

परी गंधर्वचा संस्कार ॥ पाहूं आला प्रहार ॥ तरी तो तेथेंचि करावा आदर ॥ फीर माघारा येथोनी ॥१२॥

ऐसें बोलती शिवगण त्यासी ॥ परम कोप चढला त्याचे मानसीं ॥ म्हणे गुरु गंधर्ववंशीं ॥ तरी तुम्हां दावितों ॥१३॥

अरे तुम्ही गंधर्वासमान ॥ फिरों नका रानोरान ॥ ऐसें म्हणोनि करें भक्तिबंधन ॥ भस्मचिमुटी कवळिली ॥१४॥

स्पर्शअस्त्र जपोनि होटीं ॥ फेंकिता झाला भस्मचिमुटी ॥ तेणें द्वारपाळ महीपाठीं ॥ खिळोनियां राहिले ॥१५॥

एक सहस्त्र तीन शत ॥ गण महीतें केलें व्यक्त ॥ उचलूं जातां स्वपदातें ॥ मही पदातें सोडिना ॥१६॥

पद महीपासूनि कदा न सुटति ॥ म्हणोनि हस्त धरुनि काढूं जाती ॥ तेणें मही तें व्यक्त होती ॥ उभय हस्त गणांचे ॥१७॥

ऐसे एक सहस्त्र तीन शत ॥ ओणवे केले महीं व्यक्त ॥ मग सर्वालागीं बोले नाथ ॥ कोण गंधर्व सांगा रे ॥१८॥

ऐसे विपरीत करणी ॥ प्रविष्ट होतां त्या शिवगणीं ॥ हा वृत्तांत सकळ शिवभुवनीं ॥ शिवालागी समजला ॥१९॥

कैलासवासी शिवाचे गण ॥ त्यांनीं विपर्यास पाहून ॥ परम भयभीत चित्तीं होऊन ॥ शिवालागी दर्शविती ॥२०॥

उभे राहोनि शिवानिकट ॥ म्हणती महाराजा नीळकंठा ॥ एक मानव सुभट ॥ ग्रामद्वारीं पातलाहे ॥२१॥

तेणें एक सहस्त्र तीन शत ॥ द्वारगण केले महीव्यक्त ॥ करचरण दोन्ही ओणवे समस्त ॥ आरंबळती महाराजा ॥२२॥

ऐसी ऐकोनि शिवें मात ॥ कल्पांतभैरवां आज्ञापीत ॥ म्हणे कोण आला येथ ॥ शिक्षा त्यातें करा रे ॥२३॥

ऐसें ऐकतां शिववचन ॥ अष्टही मैरव प्रळयाग्न ॥ सवे घेऊनि शतकोटी गण ॥ ग्रामद्वारीं पातले ॥२४॥

तंव ते एक सहस्त्र तीन शत ॥ भैरवीं पाहिले महीव्यक्त ॥ मग परम कोपोनि पिनाकहात ॥ शर भया योजीतसे ॥२५॥

तें नाथें चपळपणीं पाहून ॥ पुनः शस्त्रअस्त्रांचे संधान ॥ तीव्र कल्पूनि शतकोटिगण ॥ तयांसी तेथ खिळियलें ॥२६॥

अष्टभैरव प्रतापदर्प ॥ कदा न गणिती अस्त्रप्रताप ॥ टणत्कारुनि शरचाप ॥ तीव्र अस्त्रे योजिती ॥२७॥

एक योजिती वातास्त्र प्रबळ ॥ एक योजिती प्रळयानळ ॥ एकीं नागास्त्र परम विशाळ ॥ विषधारा योजिलें ॥२८॥

एकीं धूम्रास्त्र योजिलें कठिण ॥ एकीं वासवशक्ति केली निर्माण ॥ एकीं ब्रह्मास्त्र शापवचन ॥ शापादपि योजिलें तें ॥२९॥

एकें वज्रास्त्र योजिलें सबळ ॥ जें सकळ अस्त्रां असें अतुळ ॥ वीरभैरव तों साधनीं चपळ ॥ विभक्त अस्त्र निर्मीतसे ॥३०॥

ऐसी योजूनि सायकमुष्टी ॥ शर सोडिते झाले जेठी ॥ मग अष्टास्त्रांते प्रतापकोटी ॥ अंबरातें मिरवलें ॥३१॥

तें पाहोनियां रेवणनाथें ॥ भस्मचिमुटी कवळूनि हातें ॥ एकदाचि उत्तीर्ण अष्ट अस्त्रातें ॥ मुखेंकरोनि जपिन्नला ॥३२॥

वातास्त्रावरी पर्वतास्त्र ॥ अग्निअस्त्रावरी जलदास्त्र ॥ नागास्त्रावरी खगेशास्त्र ॥ यापरी तो जल्पतसे ॥३३॥

धूम्रास्त्रावरी आदित्यनामी ॥ वासवशक्तीतें काळिका निर्मी ॥ शापादपि ब्रह्माखाणी ॥ स्तवनअस्त्र त्या ओपी ॥३४॥

वज्रास्त्रातें शक्रास्त्रे जपोन ॥ विभक्तास्त्र केलें निर्माण ॥ मोहन अष्टअस्त्रांचे निवारण ॥ एकाचि वचनें केलें तें ॥३५॥

असो अष्टास्त्री अष्ट अस्त्रें जाऊन ॥ नाहीसें केलें अंबरांत जाण ॥ परी ती अष्ट अस्त्रें उकलोन ॥ भैरवांवरी पडियेली ॥३६॥

तेणें अष्टभैरव झाले जर्जर ॥ शिवालागीं सांगती हेर ॥ हे महाराज उमावर ॥ भैरव क्षीण झालेती ॥३७॥

तें ऐकोनि शिव चित्तीं ॥ सिद्ध गोसुत केला निगुतीं ॥ अव्हानोनि रोहिणीपती ॥ त्रिशूळ हातीं मिरवला ॥३८॥

चक्र खडग शर सायक ॥ अंकुश आणि डमरु देख ॥ शंख नरकपाळ हस्तीं एक ॥ नंदी वाग्दोर मिरवतसे ॥३९॥

ऐशीयेपरी भूषण ॥ कामांतक तो शस्त्र संजोन ॥ परम संतापे उभा राहोन ॥ बहु त्वरें धांवला ॥४०॥

तें पाहूनि रेवणनाथ ॥ चित्तीं म्हणे युद्ध कासया बहुत ॥ एकाचि अस्त्रें प्रतापवंत ॥ शिवालागीं करावें ॥४१॥

जल्पूनि अस्त्र वताकर्षण ॥ फुंकूनि देत भस्म जल्पून ॥ तें प्रविष्ट होतां तीव्रपण ॥ शिवश्वास आकर्षिला ॥४२॥

तेणेंकरोनि उमास्वामी ॥ विकळ झाला नंदीवरोनी ॥ धीर न धरवे महीलागुनी ॥ उलथोनिया पडियेला ॥४३॥

परम झाला गात्रीं विकळ ॥ शस्त्रें मुठीचीं सुटली सकळ ॥ मुखीं रुधिर लोटलें तुंबळ ॥ सरितापाठीं मिरवलें ॥४४॥

अष्टभैरव अष्टशस्त्रेंकरुन ॥ तेही पडले जर्जर होऊन ॥ तीव्र प्रहारें मूर्च्छा येऊन ॥ महीवरती मिरवती ॥४५॥

सकळ पडले शुद्धिरहित ॥ अष्टशस्त्रें तीं झालीं गुप्त ॥ परी गंधर्वा हा सकळ वृत्तांत ॥ युद्ध पाहतां समजला ॥४६॥

मग ते परम तांतडीकरोन ॥ विष्णूसी ही जाणविती खूण ॥ परम अवस्थेसी ऐकून ॥ कमलापति धांविन्नला ॥४७॥

मनोवेगातें मागें टाकून ॥ शीघ्र पातला रमारमण ॥ नाथासन्मुख निकट येऊन ॥ हदयीं प्रीतीनें कवळीतसे ॥४८॥

हदयीं कवळूनि योगमूर्ती ॥ म्हणे महाराज तपःपती ॥ कवण कारणें विक्षेप चित्तीं ॥ कोपानळ पेटला ॥४९॥

येरी म्हणे पंकजाक्ष ॥ मी सरस्वतीविप्राच्या गृहीं प्रत्यक्ष ॥ असतां शिवें धाडूनि यक्ष ॥ पुत्र त्याचा मारिला ॥५०॥

तरी त्या अभिप्रायेंकरुन ॥ आतां घेईन शिवाचा प्राण ॥ उपरी संजीवनीअस्त्रेंकरुन ॥ बाळ उठवीन तयाचें ॥५१॥

नातरी रक्षिणें असेल प्राण ॥ तरी सप्तबाळें द्या आणोन ॥ ऐसें नाथ बोले वचन ॥ विष्णु त्यातें बोलतसे ॥५२॥

म्हणे महाराजा बाळें सप्त ॥ आहेत मजपाशीं जीवदशाव्यक्त ॥ तरी सप्तही जीव तुम्हांतें ॥ हस्तगत करितों मी ॥५३॥

जीवदशा तुम्हां करितां अर्पण ॥ पुढें देह तुम्ही करा निर्माण ॥ ऐसें नाथें ऐकूनि वचन ॥ अवश्य म्हणे तयातें ॥५४॥

मग वातप्रेरक अस्त्र जपूनी ॥ सावध केला शूळपाणी ॥ उपरी विभक्तअस्त्र जपूनी ॥ गण सोडविले सकळिक ॥५५॥

स्थितमंत्र सुखवास सघन ॥ अष्टभैरवा लाविलें भस्म ॥ तेही झाले सुखरुप पूर्ण ॥ अस्त्रप्रहारांवेगळे ॥५६॥

मग सकळ सावध होऊनि प्रीतीं ॥ नमिते झाले योगपती ॥ मग सप्तजीवदशा देऊनि हातीं ॥ बोळविला महाराजा ॥५७॥

व्यानास्त्र मुखीं जपून । महीं उतरला तपोधन ॥ शीघ्र विप्रग्रामीं येऊन ॥ सरस्वतीविप्रा सांगतसे ॥५८॥

म्हणे बा रे पुत्रकलेवर ॥ कुटी मेणासम समग्र ॥ ऐसें ऐकतां सरस्वतीविप्र ॥ उखळीं पुत्र वाहिला ॥५९॥

कुटूनि केला मेणासमान ॥ मग समग्र भाग दिला आणून ॥ मग तयाचे यथाविभाग करुन ॥ सप्त पुतळे बनविले ॥६०॥

सिद्ध पुतळे झालियावर ॥ संजीवनीप्रयोगीं वागुत्तर ॥ तेणें सजीव झाले समग्र ॥ जीवदशा प्रगटुनी ॥६१॥

प्रगटती अट्टहास्य करुन ॥ रुदन करिती सप्तही नंदन ॥ मग सरस्वतीकांतेसी ओपून ॥ म्हणे पाळण करीं याचें ॥६२॥

मग द्वादश दिवसां पालखीं घालून ॥ सप्त पुत्रांचे ठेविलें नाम ॥ सारंगीनाथ द्वितीयाकारण ॥ जोगीबा नाम ठेविलें ॥६३॥

तृतीय बाळक निजानंद दिनानाथ ॥ नयननाथ मिरवला चतुर्थ ॥ यदुनाथनामीं पंचम समर्थ ॥ षष्ठ निरंजननामीं मिरवला ॥६४॥

सातवा महापुरुष गहिनीनाथ ॥ असे सप्त पुरुष जगविख्यात ॥ पुढें द्वादश वरुषें रेवणनाथें ॥ अनुगृहीत केले ते ॥६५॥

मग त्या सप्त शिष्यांकारण ॥ सिद्ध केलें विद्या ओपून ॥ जगीं मिरवले सिद्ध म्हणून ॥ चौर्‍यायशीं सिद्धांत पैं ॥६६॥

मग तेथेंचि राहूनि योगपती ॥ सेवा घेतसे सातांहातीं ॥ असो रेवणनाथ विटें प्रांतीं ॥ अद्यापपर्यंत नांदतसे ॥६७॥

असो ऐसें कथेचें चांगुलपण ॥ जो नित्य करी श्रवण पठण ॥ बाळमृतीचा दोष जाऊन ॥ पुत्रवान होईल कीं ॥६८॥

बाळें होऊनि दोषें मरती ॥ तिने सुस्नात होऊनि कथेप्रती ॥ मग बाळें तियेचीं चेवली न जाती ॥ हें गोरक्ष बोलिला जाण पां ॥६९॥

तरी ऐशी दोषनिवारण ॥ कथा ऐकावी कामिकानें ॥ याउपरी वटसिद्धनाथाचें कथन ॥ स्वीकारावें श्रोत्यांनीं ॥७०॥

पूर्वी सरस्वतीचे उद्देशेंकरुन ॥ ब्रह्मवीर्य गृहातें पडलें खचोन ॥ सर्पिणीमस्तकीं अकस्मात येवोन ॥ आदळले ते समयीं ॥७१॥

मौळदंडी पडलें रेत ॥ तंव ती पाहे अकस्मात ॥ चित्तीं म्हणे भक्ष महीतें ॥ पडला आहे सुढाळ ॥७२॥

मग ते उचलोनि आननपुटी ॥ सांठविती झाली आपुले पोटी ॥ परी सांठवल्या रेत शेवटीं ॥ गर्भ वाढी लागला ॥७३॥

राहिला परी आस्तिकासी ॥ समजूनि आलें अंतरासी ॥ कीं ब्रह्मवीर्य तक्षकात्मजेसी ॥ प्राप्त झालें तये वेळीं ॥७४॥

झालें परी महासिद्ध ॥ उदरा येईंल अवतार प्रसिद्ध ॥ जो नवांतील नारायण शुद्ध ॥ सिद्धनाथ म्हणतील जो ॥७५॥

ऐसें जाणोनि आस्तिकमुनी ॥ पाहता झाला तक्षकनंदिनी ॥ समीप तीतें पाचारुनी ॥ बोलता झाला महाराजा ॥७६॥

म्हणे माया वो ऐक वचन ॥ तव तो भोग नव्हे दुर्बळवान ॥ तुज उदरीं नारायण ॥ आविर्होत्र येतो गे ॥७७॥

परी हें तूतें सांगावया कारण ॥ पुढें आहे दुर्घट विघ्न ॥ जनमेजय राजयानें ॥ सर्पसत्र मांडिलेंसे ॥७८॥

सकळ ऋषींचा घेवोनि मेळ ॥ मखकुंडी ठेविला प्रळयानळ ॥ सर्पसमिधा योजूनि सबळ ॥ ॠषिमंत्र आव्हानिती ॥७९॥

तरी माया वो सांगों किती ॥ बहु फण्यांची होईल आहुती ॥ तें अवगमोनि माझिये चित्तीं ॥ तुजपाशीं पातलों ॥८०॥

तरी आतां गर्भभरणीं ॥ स्वदेहातें बैसा आच्छादुनी ॥ येरी म्हणे कवणा स्थानीं ॥ राहूं लपोनि महाराजा ॥८१॥

ऐसें बोलतां वागुत्तर ॥ तों समीप देखता वटतरुवर ॥ तोही जुनाट काष्ठपोखर ॥ महीवरी मिरवतसे ॥८२॥

तें पाहूनियां आस्तिकसुनी ॥ म्हणे माय वो तक्षकनंदिनी ॥ या वटपोखरांत संचरोनी ॥ प्राण आपुला रक्षीं पैं ॥८३॥

मग तक्षकात्मजबाळा ॥ रिघती झाली वटस्थळा ॥ काष्ठपोखरीं तपोवेल्हाळा ॥ गरोदरपण भोगीतसे ॥८४॥

परी आस्तिकें अचळ वज्रप्रयोगीं ॥ सिंचिला तरु अंबुभागीं ॥ अचळ करुनि तरु वेगीं ॥ हस्तिनापुरीं चालिला ॥८५॥

जाऊनि मखमंडपांत ॥ भेटूनि सकळ ऋषीतें गुप्त ॥ तक्षकसुतेचा सकळ वृत्तांत ॥ निवेदिला तयांसी ॥८६॥

म्हणे ब्रह्मवीर्य सनाथवंत ॥ तें उदरीं आहे नेमस्त ॥ तरी तो वटसिद्धनागनाथ ॥ प्रगट होईल महाराजा ॥८७॥

ऐसें सांगतसे वर्तमान ॥ जो नवांतील आविर्होत्र नारायण ॥ सर्पसत्रीं आपण ॥ योजूं नये तयासी पैं ॥८८॥

ऐसें साकल्य वर्तमान ॥ ऐकूनि ऋषी तुकविती मान ॥ आपुले हदयीं शोध करुन ॥ अवश्य म्हणती तयातें ॥८९॥

मग तक्षकात्मजा नाम पद्मिणी ॥ मंत्रप्रयोगीं देती सोडूनी ॥ येरीकडे उरगी गर्भिणी ॥ नवमासांतें पुरलीसे ॥९०॥

तिकडे सर्पसत्र झाले समाप्त ॥ इकडे दिवस भरले नेमस्त ॥ मग प्रकृतिअंड होऊनि उदित ॥ प्रसूत झाली पद्मिणी ॥९१॥

असो वटवृक्षपाखरांत ॥ अंड राहिलें दिवस बहुत ॥ आर्विर्होत्र नारायण त्यांत ॥ ईश्वरसत्ते संचरला ॥९२॥

दिवसेंदिवस अंडांत ॥ वाढी लागलेसें जीववंत ॥ देह होतां सामर्थ्यवंत ॥ भग्न झालें अंड तें ॥९३॥

मग त्या तळवटपोखरांत ॥ बाळ रुदन करी अत्यंत ॥ निढळ वाणी कोणी त्यातें ॥ रक्षणातें नसेचि ॥९४॥

जैसी जळांतील जळमासोळी ॥ उड्डाण घेतां पडे वेगळी ॥ मग तीं अत्यंत चित्तीं तळमळी ॥ तैसें झाले बाळका ॥९५॥

अट्टाहास्ये करीतसे रुदन ॥ तैं पातला शुचि ब्राह्मण ॥ गौडजाती अथर्वण ॥ वेदभूषणीं मिरवतसे ॥९६॥

कोशधर्म तयाचें नाम ॥ आचारशील विद्यावान ॥ सहा शास्त्रीं पारंगत पूर्ण ॥ चतुर्विध जाणता तो ॥९७॥

अपर सूर्य तो सर्वज्ञामूर्ती ॥ परी दरिद्र प्रारब्धगतीं ॥ तेणेंकरुनि संसारक्षितीं ॥ परम चित्तीं विटला ॥९८॥

विटला परी पत्रावळीकारण ॥ पाहता झाला वटस्थान ॥ पत्रें तोडावीं हें मनीं इच्छून ॥ तयानिकटीं पातला ॥९९॥

निकट येतां तया तरुतळवटीं ॥ बाळ रडे तें कर्णपुटीं ॥ ऐकूनि चहूंकडे फिरवी दृष्टी ॥ तों कांहीं दिसेना ॥१००॥

मनांत होय साशंकित ॥ म्हणे बाळरुदन कोठें होत ॥ स्वर्गीचे सुरवर त्यातें पाहात ॥ बोलते झाले तयातें ॥१॥

म्हणती कोशधर्मा सुशीळा ऐक ॥ या वटतरुंत आहे बाळक ॥ तरी त्या मांदुसा तूं पाईक ॥ दृष्टिगोचर नव्हेसी ॥२॥

तरी प्रज्ञावंता ऐक वचन ॥ तूं ते मांदुस काढून ॥ आपल्या गृहासी ते नेऊन ॥ संगोपन करीं त्याचें ॥३॥

तव घरीं येतां तें बालक ॥ सुदैव दशेचा उगवेल अर्क ॥ मग दरिद्रता सकळिक ॥ जाईल नासूनि महाराजा ॥४॥

जैसे परिसअंगसंगेंकरुन ॥ लोहजाती होय सुवर्ण ॥ मग षडगुणैश्वर्य तयाकारण ॥ दृष्टी पडेना काळिमा ॥५॥

तेवीं तूं बाळ गृहीं नेतां ॥ सकळ हरेल व्यथा दरिद्रता ॥ बाळ नव्हे प्रत्यक्ष सविता ॥ आविर्होत्र नारायण तो ॥६॥

ऐसें बोलोनि साचोकार ॥ सुरवरीं पाठविला एक शर ॥ तेणें तरु तो महीवर ॥ खंडूनियां पडियेला ॥७॥

तरु खंड होतां त्वरित ॥ तों कोशधर्म बाळ देखत ॥ बालार्ककिरणीं तेज अदभुत ॥ नक्षत्रपतीतें लाजविता ॥८॥

बाळ तेजस्वी मनोहर ॥ अंबरीं पाहते झाले सुरवर ॥ मग सकळीं घेवोनि कुसुमभार ॥ वर्षाव करिती भावार्थे ॥९॥

देखतांचि पदपद्मा ॥ सकळीं जोडोनि करयुग्मा ॥ नमोनियां योगसद्मा ॥ कोशधर्मा बोलती ते ॥११०॥

म्हणती महाराजा सभाग्यवंत ॥ तूं एक आहेसी भूमंडळांत ॥ वटसिद्ध नागेशनाथ ॥ तूतें प्राप्त झाला असे ॥११॥

तरी हा पद्मिणी नागिणीपोटीं ॥ रक्षिला गेला तरुच्या तळवटीं ॥ आणि सिद्धता पावूनि त्या नागवटीं ॥ नाथ मिरवेल योग्यांचा ॥१२॥

ऐसी करणी झाली येथ ॥ म्हणोनि नाम वटसिद्धनागनाथ ॥ तरी तुम्ही आतां महीतें ॥ हेंचि नांव पाचारा ॥१३॥

ऐसें ऐकोनि कोशधर्मे ॥ बाळ उचलिले अति प्रेमें ॥ परम आनंदें आपुलें धाम ॥ सेवोनि कांतेप्रती बोलतसे ॥१४॥

तंव ती कांता सुरादेवी ॥ परम प्राज्ञिक सुशील महीं ॥ धैर्य औदार्य सच्चपदवी ॥ लोकांमाजीं दावीतसे ॥१५॥

बाळ सत्यवतीनें देखतां ॥ म्हणे मजकडे द्या लावण्यवंता ॥ तंव तें दृष्टिगोचर करितां ॥ बाळ अर्कासम दिसतसे ॥१६॥

मग हांसोनि बोले कोशधर्मा ॥ म्हणे महाराजा नरेंद्रोत्तमा ॥ बाळ कोणाचें उगमा ॥ आणिलें तें मज सांगा ॥१७॥

मज वाटतें कीं बाळ नव्हे ॥ सानरुपी यमपिता झाला आहे ॥ कीं ईश्वरें सृष्टि पाहें ॥ दुजा चंद्र निर्मिला कीं ॥१८॥

कीं विद्युल्लता सकळ लाजिरवाण ॥ कीं मेघापरती लपवो स्वरुपानन ॥ म्हणोनि ईश्वरें तेज हरुन ॥ तुम्हांहातीं दीधलें ॥१९॥

कीं नक्षत्रांचा अपार मेळा ॥ नावडे ईश्वरा पृथकपाळा ॥ म्हणोनि हें समुच्चयेंकरुनि गोळा ॥ तुम्हांलागीं ओपिलें ॥१२०॥

ऐसें म्हणोनि स्नेहभरित ॥ बाळ उचलोनि हदयीं लावीत ॥ मग कोशधर्मे सकळ वृत्तांत ॥ निवेदिला कांतेतें ॥२१॥

सुरादेवीनें सकळ कथन ॥ सुरवरवाक्यासी ऐकोन ॥ परम पावोनि समाधान ॥ पालखां घालोनि हालवीत ॥२२॥

हदयीं कवटाळितां बाळ ॥ पयानें दाटलें कुचमंडळ ॥ पान्हावोनि बाळमुखकमळ ॥ पयोधराग्री प्रेरीतसे ॥२३॥

मग तें बाळ घोटीत क्षीर ॥ जठराग्नीचा दाहक उबार ॥ शांतवोनि शांतिपर ॥ बाळ मिरवे देहस्थ ॥२४॥

अति लालनें स्नेहभरित ॥ मार्जन न्हाणोनि घातला पालखांत ॥ नाम ठेविलें वटसिद्धनाथ ॥ ओंव्य मंगळें गातसे ॥२५॥

मग दिवसेंदिवस राहणी घन ॥ सिंचन करी मोहसंजीवन ॥ सुरा देवीचे पंचप्राण ॥ निजांकुरीं लवलवती ॥२६॥

मग ती पल्लवाकार ॥ फळ दावी भक्तिपर ॥ परी तीक्ष्ण कटु व्यवहार ॥ स्वप्नामाजी दिसेना ॥२७॥

जैसें तमारीचे गांवीं ॥ नांदूं न शके तमाची पदवी ॥ कीं कामधेनूचे कांसेठाई ॥ क्षुधानळें पीडियेला ॥२८॥

तेवीं सुरादेवीचें अंतःकरण ॥ कदा न दर्शवी भिन्नदर्शन ॥ परम मोहें गेली वेष्टोन ॥ पाषाण जेवीं शेवाळीं ॥२९॥

असो ऐसे सुखस्थित ॥ बाळा लोटले दिवस बहुत ॥ सप्तवरुषी कोशसुत ॥ मौंजीबंधना मिरवला ॥१३०॥

याउपरांतिक एके दिवशीं ॥ सोडोनियां क्षेत्र काशी ॥ नागनाथ सहज खेळावयासी ॥ भागीरथीतें पातला ॥३१॥

ठळटळीत भरले दोन प्रहर ॥ काशीविश्वेश्वराचे समोर ॥ बाळ क्रीडतसे मनोहर ॥ अर्क जेवीं दुसरा ॥३२॥

तों तेचि समयीं अकस्मात ॥ येता झाला अत्रिसुत ॥ येतांचि दृष्टी यथास्थित ॥ बाळावरी गेलीसे ॥३३॥

तो बाळ तेजस्वी अर्कनीतीं ॥ खेळताहे स्वस्थगतीं ॥ बहु मुलें बैसवोनि पंगतीं ॥ लटकेंचि अन्न वांटीतसे ॥३४॥

मुलें गड्या गड्या म्हणोन ॥ धालो म्हणती सेवोनि अन्न ॥ आतां पुढें वाढणें ॥ वाढूं नको आम्हांसी ॥३५॥

परी तो तयांसी आग्रह करीत ॥ घ्या घ्या म्हणोनि वाचें वदत ॥ न घे त्याची विनंति करीत ॥ रसाळवाणीकरुनिया ॥३६॥

तें पाहोनियां अनसूयासुत ॥ पाहोनि मनीं हास्य करीत ॥ चित्तीं म्हणे लटक्या अन्नातें ॥ मुलें धालों म्हणताती ॥३७॥

तरी आतां आपण संचरोन ॥ मुलांलागीं द्यावे अन्न ॥ मग प्रत्यक्ष बाळतनु धरोन ॥ तयांमाजी संचरला ॥३८॥

बाळ अंगणीं उभा राहोन ॥ म्हणे अतिथ आला तुम्हांकारणें ॥ अन्न मागतो उदराकारणें ॥ तृप्त त्यातें करावें ॥३९॥

तंव तीं मुलें तीव्रपणें ॥ पाठी लागती वसवसोन ॥ म्हणती आमुचे मंडळांत कोण ॥ आला असे आतां खेळावया ॥१४०॥

कोणी दाटूनि पुढें येती ॥ कोणी शेला उगारिती ॥ कोणी पाषाण घेती हाती ॥ जातोसी कीं मारुं तुज ॥४१॥

ऐशीं मुलें दाविती चिन्ह ॥ तें श्रीनागनाथें पाहोन ॥ सकळ मुलांची इच्छा पाहून ॥ वारिता झाला स्वहस्तें ॥४२॥

म्हणे गडे हो ऐका वचन ॥ आपण बैसलों सेवूं अन्न ॥ त्यांत अतिथ आला जाण ॥ त्यासी दवडूं नये कीं ॥४३॥

पहा आपुले घरीं सांगे पिता ॥ विन्मुख कोणी न व्हा अतिथा ॥ तैसाचि आपण भिक्षुक मागता ॥ आला आहे समयासी ॥४४॥

काढोनि अंगावरील चीर ॥ अंग पुसीतसे आपुले करीं ॥ गंध लावी भाळावरी ॥ शुष्कपूजा करीतसे ॥४५॥

तरी अतिथाचें करुनि पूजन ॥ पोटभरी घालावें अन्न ॥ प्रत्यक्ष नाथ करीं धरोन ॥ बाळें अंगणीं बैसविला ॥४६॥

लटकेंचि कल्पनेचे करुनि जीवन ॥ तया अतिथा घालिता स्नान ॥ हस्तपादावरी फिरवून ॥ करिती क्षालन अंगाचें ॥४७॥

लटकें मनाचें करुनि सुमन ॥ हार गुंफिला कल्पनेकरुन ॥ तो अतिथाचे गळां घालोन ॥ लटका धूप दाविती ॥४८॥

भावपूर्वक लावोनि नयन ॥ ऐक्य करिती पंचप्राण ॥ परी सहजदृष्टीतें ज्ञानपण ॥ आरती करिती अतिथीची ॥४९॥

मग लटकेंचि पात्र पुढें ठेवून ॥ कल्पूनि लटकें आणूनि वाढिती अन्न ॥ मग उभय हस्त जोडून ॥ प्रार्थना करिती अतिथाची ॥५०॥

नम्र वाचा रसाळ वचन ॥ म्हणती स्वामी सेवा अन्न ॥ वारंवार नमस्कार करोन ॥ आणीक वाढूं म्हणताती ॥५१॥

ऐसें आदराचें चांगुलपण ॥ पाहूनियां अत्रिनंदन ॥ चित्तीं म्हणे प्रज्ञावान ॥ बाळ सुशीळ आहे हा ॥५२॥

उदारबुद्धीं तृप्ती करुन ॥ वर्तताहे दातृत्वपणें ॥ हे तों पूर्वीची योगसृष्टीकरोन ॥ योग्यावांचूनि घडेना ॥५३॥

सुशब्द आणि विवेकशांती ॥ विचरे जयाचे देहाप्रती ॥ जरी पूर्वीचा योगभ्रष्टगती ॥ योग्यावांचूनि घडेना ॥५४॥

स्नान आणि हरणी स्थिती ॥ याचक आर्तवान बहुत युक्ती ॥ तरी पूर्वीची योगश्रेष्ठ गती ॥ योग्यावांचूनि घडेना ॥५५॥

उदारबुद्धि धार्मिक स्थिती ॥ विचार रसाळ सर्वाप्रती ॥ दुःख न देणें परांप्रती ॥ हें योग्यावांचूनि घडेना ॥५६॥

ऐसें चित्तीं अवगमून ॥ शोधी तयाचा पूर्वजन्म ॥ तों आविर्होत्र नारायण ॥ निजमानसीं भासला ॥५७॥

मग कृपासिद्धि वरुनि युक्तीं ॥ देता झाला तयाची हातीं ॥ जे जे वदे वाणी निश्विती ॥ ते ते पदार्थ मिरवावे ॥५८॥

मग परम होऊनि हर्षयुक्त ॥ म्हणती हा एक उदेला महीनाथ ॥ समीप बोलावोनि त्यातें ॥ हस्त धरी तयाचा ॥५९॥

उपरी कर्णी सांगे मात ॥ भोजन घालीं सकळ मुलांतें ॥ परी तूं न सेवीं सिद्धिअन्नातें ॥ कदाकाळीं बाळका रे ॥१६०॥

नाथ आग्रहें त्या वाढीत ॥ तरी तें पात्र मिरवे अति अदभुत ॥ ज्या पदार्थाचें नाम मिरवे पात्रावरी ॥६१॥

मग तीं बाळें अज्ञान पणें ॥ साचोकारी करिती भोजन ॥ ऐसे लोटले बहुत दिन ॥ नित्य खेळ खेळताती ॥६२॥

स्वनाम सांगूनि अत्रिनंदन ॥ चालता झाला पुसोनि नाम ॥ येरीकडे पंक्तीं बैसवोन ॥ भोजन खेळी खेळती ॥६३॥

आपुलाले गृहीं जाऊन ॥ सेविती कांहीं किंचित अन्न ॥ तें चाटीबोटीकरुन ॥ अन्न नासती विखुरती ते ॥६४॥

येथें यथेष्ट इच्छेसमान ॥ सर्व पदार्थ षड्रसान्न ॥ मग तें गृहीचें कदन्न ॥ तुच्छपणीं वाटलें त्यां ॥६५॥

जे ब्रह्मरुप रसातें धाले ॥ आपपर सकळ विसरले ॥ मायाद्वैतकांचीसी बैसले ॥ लाळ घोटीत सेवावया ॥६६॥

कीं हाटकतगट जडावासी ॥ नवरत्नकोंदण त्या भूषणासी ॥ ते काय करुनि काचमण्यासी ॥ स्पर्शित होतील चित्तांत ॥६७॥

कीं सुरगरंगी धाममंचकीं ॥ कुसुमगंधागरु सवितां थोर कीं ॥ तो त्यजूनि दुर्गंध लोकीं ॥ गल्लीमाजी पडेल कीं ॥६८॥

तन्न्याय मुलें सकळ ॥ सेविती षड्रसान्नातें अमळ ॥ तयां गृहीचें कदन्न केवळ ॥ मिष्ट कांहीं लागेना ॥६९॥

मग ते तयांचें तात मात ॥ गृहीं मुलांसी पुसती यथार्थ ॥ तेही वदती प्रांजळवंत ॥ षड्रस खेळ अन्नाचा ॥१७०॥

म्हणती तुम्ही दरिद्रपणीं ॥ सेवितां कदन्न कांजीपाणी ॥ आम्ही नित्य सुरनदीवर जाऊनी ॥ षड्रस अन्न सेवितों ॥७१॥

तंव ते असत्य मानूनि चित्तीं ॥ गुप्तवेषें दुरुनि पाहती ॥ सरितातीरीं बैसवोनि पंक्ती ॥ नागनाथ वाढीतसे ॥७२॥

मग ती चर्चा सर्वागृहीं ॥ प्रकट झाली सर्वदेहीं ॥ मग कोशधर्मासी सर्वही ॥ सुचविती अर्थातें ॥७३॥

म्हणती विप्रा तव नंदन ॥ स्वर्गसरिते नित्य जाऊन ॥ अपार पंक्ती बैसवून ॥ षड्रसान्न वाढीतसे ॥७४॥

आम्ही प्रत्यक्ष पाहूनि दृष्टीं ॥ बोलतों तूतें वाग्वटीं ॥ पात्रेंविण उभय करपुटीं ॥ इच्छान्न वाढीतसे ॥७५॥

नेणों कैशी करितो गती ॥ उगला हात ठेवितो क्षितीं ॥ पदार्थविवरणा वाचेप्रती ॥ होतां पदार्थ मिरवत ॥७६॥

ऐसें ऐकोनि कोशधर्म ॥ आठवीं केलें सुरवरांचें वचन ॥ कीं पुढें पावोनि सिद्धकर्म ॥ सिद्धनामें मिरवेल हा ॥७७॥

ऐसी खूण जाणूनि चित्तीं ॥ म्हणे आश्चर्य दावी लोकांप्रती ॥ ऐसें कोणासही या क्षितीं ॥ घडूनि येत नसे कीं ॥७८॥

धिक्कार करुनि म्हणे तयांचा ॥ बाळ विकारी असत्य वाचा ॥ एके दिवशीं हस्त सुताचा ॥ धरुनि बैसवीं अंकासनीं ॥७९॥

घेऊनियां मुखचुंबन ॥ आणि कुरवाळी हस्ते वदन ॥ म्हणे बा रे मुलांकारणें ॥ भोजन घालिसी कैसें तूं ॥१८०॥

ऐसें पुसतां कोडेंकरुन ॥ तोही दाटला स्नेहेंकरुन ॥ तातासी म्हणे तुज भोजन ॥ तैसेंचि घालितों आतां मी ॥८१॥

अंकीहूनि तत्काळ उठोन ॥ क्षितीं हस्त ठेवी पात्र म्हणोन ॥ तंव ते प्रत्यक्ष पात्रीं दिसे अन्न ॥ कोशधर्म पहातसे ॥८२॥

उपरी बहुधा प्रत्यक्षपणीं ॥ तंव ते पदार्थ दिसती नयनीं ॥ खाद्यें उपजलीं हें पाहोनी ॥ मनीं आश्चर्य मानिलें ॥८३॥

मग मान तुकावूनि कोशधर्म ॥ म्हणे बाळा होते कैसें कर्म ॥ प्रसन्न झालें त्याचें नाम ॥ मजलागीं सांगावें ॥८४॥

यावरी म्हणे ताता ऐक ॥ आमुचें खेळीं आलें बालक ॥ तेणें सांगितलें कौतुक ॥ तें तुजप्रती सांगतों ॥८५॥

तेणें माझा हस्त धरोन ॥ उगाचि कान फुंकोन ॥ मौळीं हस्त ठेवोन ॥ वाढावया लाविलें ॥८६॥

परी तें पोर आमुचे मेळीं ॥ सहज रीतीं आलें खेळी ॥ परी त्या पोरीं करोनि रळी ॥ वारिले म्यां सकळांतें ॥८७॥

उपरी मीं त्या मुलांकारणें ॥ तोषविलें मोठ्या गौरवानें ॥ जैसे तुम्ही अतिथाकारणें ॥ गौरवीतसां महाराजा ॥८८॥

लटकमटक स्नानभोजन ॥ सारुनि तयाचे पूजिले चरण ॥ नमस्कारुनि ते देखोन ॥ बोळविला महाराजा ॥८९॥

ऐसें ऐकोनि कोशधर्म ॥ आल्या अतिथा धरोनि नेम ॥ बाळाहातीं अतिथापूजा करोन ॥ तुष्टचित्तें बोळवी ॥१९०॥

ऐसा पाहोनि विप्रनेम ॥ परम संतोषला दत्तात्रेयनाम ॥ चित्तीं म्हणे मार्ग सुगम ॥ बाळालागीं लाधला ॥९१॥

तेणेंकरुनि सकळ क्षेत्रांत ॥ कीर्ति वाढली असंभावित ॥ महासिद्ध नारायणनाथ ॥ कितीकांनीं आराधिला ॥९२॥

मग शतानुशत सहस्त्र पंक्ती ॥ षड्रस अन्नें सेवोनि जाती ॥ बहुतांचीं कार्ये होतीं ॥ कनक धन वसना पावती ते ॥९३॥

मग जिकडे तिकडे नागेशसिद्ध ॥ कीर्ति वानिती जन प्रसिद्ध ॥ पंचविषयां संतोषोनि ॥ इच्छिले कामा फळतसे ॥९४॥

मग अंगीं आलें शहाणपण ॥ देहाचें गेलें अज्ञानपण ॥ एके दिवशीं ब्रह्मनंदन ॥ ताताजवळी बैसला ॥९५॥

तातासी म्हणें महाराज ॥ मम हातें पुरे जगाची चोज ॥ तरी कवणे अर्थी जगाचें काज ॥ कवण्या अर्थे फळतसे ॥९६॥

दत्तात्रेय नामें बाळवेष ॥ बाळपणीं भेटला आम्हांस ॥ तरी कोण महापुरुष ॥ प्रतापी बळें आगळा ॥९७॥

तात म्हणे तो दत्तात्रेयमुनी ॥ त्रयदेवांचा अवतार भुवनीं ॥ सुफळ प्रारब्धें गेला भेटोनी ॥ तुजलागीं पाडसा ॥९८॥

नागेश म्हणे आतां परतोन ॥ कैसा भेटेल अत्रिनंदन ॥ हें सांगें मजलागून ॥ निवेदन करी महाराजा ॥९९॥

याउपरी बोले कोशधर्म ॥ बाळा तयाची भेटी दुर्गम ॥ तो एके ठायीं नसे नेम ॥ अनेक क्षेत्रीं हिंडतसे ॥२००॥

कोल्हापुर पांचाळेश्वर ॥ काशीक्षेत्र मातापुर ॥ ऐसीं हिंडतां अनेक क्षेत्रें ॥ कोठें पाहसी पाडसा ॥१॥

परी प्रारब्धयोगेंकरोनी ॥ भेटतसे दत्तात्रेय मुनी ॥ यत्न केल्या भेटीलागुनी ॥ आतुडेना बाळका ॥२॥

जैसा कल्पतरु चिंतामणी ॥ निधीपरीस लावण्यखाणी ॥ बा रे नातुडे यत्नेंकरोनी ॥ अवचटपणीं मिळती ते ॥३॥

तेचि रीतीं अत्रिनंदन ॥ प्राप्त नव्हे यत्नेंकरुन ॥ ऐसें सांगूनि कोशधर्म ॥ बाहेर गेला कार्यासी ॥४॥

येरीकडे नागनाथ ॥ हदयीं आपुले विचारीत ॥ कीं ऐसा रवि सनाथवंत ॥ निजदृष्टीनें पहावा ॥५॥

परी पांचाळेश्वरीं मातापुरीं ॥ जाऊनि शोधावें कोल्हापुरीं ॥ जेथें जेथें वास धरित्रीं ॥ तेथें तेथें शोधावें ॥६॥

मग पुसोनि मातेसी ॥ निघता झाला मुनिशोधासी ॥ मातापुरादि पांचाळेश्वरासी ॥ पाहूं पातला कोल्हापुरीं ॥७॥

क्षेत्र कोल्हापुरीं संचरोन ॥ पुसता होय जनाकारणें ॥ कीं येथें तो अत्रिनंदन ॥ कोणे ठायीं राहातसे ॥८॥

ऐसें ऐकोनि लोक हांसती ॥ वेड लागलें तूतें म्हणती ॥ अवधूत येतसे क्षेत्राप्रती ॥ तो कोणा प्रगट नव्हे रे ॥९॥

कोण्या स्वरुपीं येथें येऊन ॥ जात आहे भिक्षा मागोन ॥ ऐसे जनाचे बोल ऐकोन ॥ प्रत्युत्तर त्यां देतसे ॥२१०॥

म्हणे येथें भिक्षेकारणें ॥ येत आहे अत्रिनंदन ॥ तरी अन्य क्षेत्रीं भिक्षा मागणें ॥ तया पडन नाही कीं ॥११॥

येर म्हणती त्यासी ॥ भिक्षा मागावी कोल्हापुरासी ॥ याव्यतिरिक्त अन्य क्षेत्रासी ॥ अन्न न सेवी मागोनी ॥१२॥

अन्य क्षेत्रीं तया अन्न ॥ चित्तीं न वाटे सुढाळपण ॥ यासम कैसें ग्राम आन ॥ पुण्यक्षेत्र हें असे ॥१३॥

ऐसें क्षेत्र पुण्यपावन ॥ जरी या गांवीं न मिळे अन्न ॥ तरी उपवास करी अत्रिनंदन ॥ परी अन्य क्षेत्रीं सेवीना ॥१४॥

अरे या गांवीचें शाकपत्र ॥ मानीत आहे परम पवित्र ॥ परी अन्य गांवींचे पक्कान्न स्वतंत्र ॥ विटाळापरी मानीतसे ॥१५॥

जैसें एकपत्नी नरा ॥ कुरुप असेल जसे दारा ॥ तरी तीच भोगी व्यभिचारा ॥ लावण्यलतिका आकळीना ॥१६॥

कीं विप्रकरीचें कदन्न ॥ सोडूनि शूद्राचें षड्रस अन्न ॥ सेवील काय प्रसिद्ध ब्राह्मण ॥ मनें देवता न वरीच ॥१७॥

तेवीं दत्त क्षेत्र हें सोडून ॥ कदा न पाहे अन्य ग्राम ॥ ऐसे त्या जनाचे बोल ऐकोन ॥ विचार करी मग नाथ ॥१८॥

चित्तीं म्हणे करोनि पाकाग्नी ॥ ग्रामांत पेटूं न द्यावा अग्नी ॥ सकळ क्षेत्रा भोजन घालोनी ॥ पाठवावें गृहीं गृहीं ॥१९॥

मग तो स्वामी येतां भिक्षेसी ॥ कोठोनि अन्न वाढिती त्यासी ॥ मग सहजचि स्वकीर्तीसी ॥ आपणापासीं येईल कीं ॥२२०॥

येईल परी सिद्ध अन्न ॥ घेणार नाहीं भिक्षेलागून ॥ हेची ओळखी जाणोनि खूण ॥ पाय वंदावे तयाचे ॥२१॥

आणिक माझे विचारुनि नाम ॥ गेला आहे योगद्रुम ॥ तरी तोही भेटेल कृपेंकरोन ॥ नामाभिधान ऐकोनी ॥२२॥

आणि मजही गेला सांगोनि जाण ॥ कीं सेवूं नको सिद्धान्न ॥ आणिकांतें घालीं भोजन ॥ तुष्ट करी क्षुधार्थी ॥२३॥

ऐसी सांगूनि गेला मात ॥ तो सेविणार नाहीं सिद्धान्नातें ॥ ऐसा उपाय योजूनि चित्तांत ॥ लक्ष्मीदेउळी संचरला ॥२४॥

भेटूनि पुजारियासी ॥ ओवरी एक रहावयासी ॥ मागूनि घेत अति प्रीतीसीं ॥ बंदोबस्तीं नेटकी ॥२५॥

परी तो पुजारी भक्तिवान ॥ अतिथपूजाकरोन ॥ नित्य पंक्तीसी घेवोन ॥ भोजनातें सारीतसे ॥२६॥

ऐसे लोटतां कांहीं दिवस ॥ पाचारुनि पुजार्‍यास ॥ म्हणे माझे आहे मनास ॥ ग्रामभोजन घालावें ॥२७॥

परी तुम्हीं साह्य होवोनि मातें ॥ खटपटीसह सारावें कृत्य ॥ तंव तो हांसूनि बोलें त्यातें ॥ फार बरें आहे जी ॥२८॥

आम्ही खटपट करुं सघन ॥ परी तुम्हांपासीं कोठें अन्न ॥ उगेंचि कैसें ग्रामभोजन ॥ सबळ सामर्थ्य असावें ॥२९॥

नाथ म्हणे ऐका वचन ॥ सर्व सामग्री ठेविली करोन ॥ परी खटपटीची आंगवण ॥ करा कार्य सिद्ध हें ॥२३०॥

मग तो अवश्य म्हणोनि त्यातें ॥ बोले आमुचें काय जातें ॥ पुण्यासाठीं धर्मकृत्य ॥ घडोनि येतें आम्हांसी ॥३१॥

ऐसें बोलोनि नाथातें ॥ पुजारी गेला स्वकार्यातें ॥ येरीकडे ओवरींत ॥ काय करी महाराजा ॥३२॥

कोरडे अन्नाचे घेवोनि नाम ॥ क्षितीसी ठेवी करपदम ॥ तो कनकराशीं पर्वतासमान ॥ तया ठायीं बैसल्या ॥३३॥

ऐशापरी अपार राशी ॥ निर्मिता झाला स्वकरेंसी ॥ घृतस्नेहादि सांठवणासी ॥ ओवरीमाजी विराजवीत ॥३४॥

मग येवोनि पुजार्‍याचे सदनीं ॥ आणिला करीं कवळोनी ॥ ओवरीमाजी शीघ्रगती नेवोनी ॥ सिद्धाश्रम दाविला ॥३५॥

यावरी आतां पुढें कथन ॥ अन्नछत्रीं इच्छेसमान ॥ श्रीनागेंद्र सिद्ध करोन ॥ भेट घेईल दत्ताची ॥३६॥

तरी ती कथा सुधाकर ॥ पुढें सेवा श्रवणद्वारें ॥ धुंडीसुत मालू सुरस ॥ हरिकृपें सांगेल कीं ॥३७॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ षटत्रिंशतितमोऽध्याय गोड हा ॥२३८॥

श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ अध्याय ३६॥ ओंव्या २३८॥

॥ नवनाथभक्तिसार षटविंशतितमोध्याय समाप्त ॥


श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय ३७

श्रीगणेशाय नमः

जयजयाजी पंकजाक्षा ॥ आदिपुरुषा सर्वसाक्षा ॥ अव्यक्तव्यक्ता सर्वपरीक्षा ॥ महादक्षा रमावरा ॥१॥

मागिले अध्यायीं कथन ॥ करविलें वटसिद्धनागनाथजन्म ॥ उपरी सिद्धकळा पावून ॥ कोल्हापुरीं पातला ॥२॥

तेथें राहूनि लक्ष्मीआलयांत ॥ पुजारी करुनि हस्तगत ॥ सर्व सामग्री ओवरींत ॥ नेऊनियां दाखविली ॥३॥

दाखवूनि म्हणें पुजार्‍यांसी ॥ सबळ पडल्या कनकराशी ॥ तरी ह्या सरतील ज्या दिवशीं ॥ तंववरी संतर्पण योजावें ॥४॥

योजावें तरी अन्यवर्ण ॥ कांहींच धरुं नये भिन्न ॥ सकळांलागीं करुनि पक्कान्न ॥ पंक्तीतें वाढावें ॥५॥

गांवामाजी सकळांकारणें ॥ पेटूं न द्यावा पाकीं अग्न ॥ द्विवेळा त्रिवेळा घालूनि भोजन ॥ तुष्ट करावें सकळातें ॥६॥

शेट सावकार राजा रंक ॥ सकळांसी आणूनि ओपावा पाक ॥ अंत्यजादि भुदेव लोक ॥ तुष्ट करावें सर्वांसी ॥७॥

ऐसें सांगूनि पुजार्‍यातें ॥ शीघ्र कामाठी आणवीत ॥ कार्ययोगें अपरिमित ॥ सकाम कामीं योजिले ॥८॥

उत्तम तिथी नेम करुन ॥ मांडव मंडप उभारुन ॥ पाकालागीं सज्ज करुन ॥ सर्व काम चालविलें ॥९॥

मग शिष्टाशिष्ट गृहीं धाडून ॥ तया दिधलें आमंत्रण ॥ येरीकडे पाक निर्माण ॥ करावया लाविलें ॥१०॥

आणि ग्रामद्वारीं टिळा लावून ॥ भोजनदवंडी ग्रामीं पिटून ॥ सर्व सामग्री सज्ज करुन ॥ काम चालीं चालविलें ॥११॥

शैव श्रावक आणि ब्राह्मण ॥ भेद चौर्‍यायशीं देशांसमान ॥ देवाग्नी विप्र ऋषि ब्राह्मण ॥ पाक भिन्नभिन्न निर्मिती ॥१२॥

पंच द्राविड देश मुलतानी ॥ मारवाडी गुर्जर हिंदुस्थानी ॥ हुसेनी पौंड्र मिळोनी ॥ देशजाती मिळाल्या ॥१३॥

असो भेदाभेद अन्यजाती ॥ षड्र मार्गानीं पाकविती ॥ खाज्या करंज्या कचुर मालती ॥ शिरा बुंदी करिताती ॥१४॥

पुरी पोळी क्षिप्रा बहुत ॥ चमचमीत भाज्या वरणभात ॥ पंचमधु त्यांत अपार घृत ॥ इच्छेसमान मिरवलें ॥१५॥

असो पाकाग्नि सिद्ध करुन ॥ चालते पंक्तीं सेविती अन्न ॥ पुन्हां क्षुधा लागल्या परतून ॥ येऊनि अन्न सेविती ॥१६॥

प्रथम पाक जातजाती ॥ तेथें नसे कांहीं अरुती ॥ कितीक वाढूनि गृहासी नेती ॥ भोजन करुनि मन माने ॥१७॥

कोणी कोरडेंचि उपटूनि नेती अन्न ॥ नेऊनि भरिती आपुलें सदन ॥ मग जिकडे तिकडे सिद्ध अन्न ॥ सर्व झालें गांवांत ॥१८॥

राव रंक कुटुंबासहित ॥ अन्न सेवूनि होती तृप्त ॥ मग वन्ही इतुका दीपानिमित्त ॥ गृहोगृहीं मिरवला ॥१९॥

असो यापरी एक मास ॥ ग्राम सेवी सिद्धअन्नास ॥ यावरी कथा अत्रिसुतास ॥ कैसी वर्तली ती ऐका ॥२०॥

प्रथम दिनीं भिक्षेकारण ॥ गांवांत संचरे अत्रिनंदन ॥ कुश्वितरुपी विरुपवान ॥ भिक्षा मागे गृहोगृहीं ॥२१॥

तंव ते घरोघरींचे जन ॥ म्हणती गांवांत प्रयोजन ॥ होतें तेथे आम्हां जाणें ॥ कुटुंबादि भोजना ॥२२॥

तरी तूं सत्वरगती ॥ जाऊनि सारी कां आपुली भुक्ती ॥ व्यर्थ शीण कासायाप्रती ॥ वाईट कदन्न इच्छूनी ॥२३॥

उत्तम पक्क अन्न टाकून ॥ व्यर्थ कां शिणसी दरिद्रवान ॥ कामधेनूचे कासे आनन ॥ कांडणकोंडा कां भक्षावा ॥२४॥

कीं कल्पतरु बैसल्या ठायीं ॥ इच्छेसमान पदार्थ देई ॥ मग कां शिणावें धांवूनि पायीं ॥ मेळवावया भुक्तीते ॥२५॥

परीस असतां गृहालागून ॥ मच चाकरी कासया करावी हेमाकारण ॥ भाग्यें आतुडतां पीयुषपान ॥ मग वल्लीरसायण कां इच्छावें ॥२६॥

तेवीं तूं प्रकरण करिसी येथें सोडूनि सुधारसअन्नातें ॥ कदन्नाकरितां या गांवात ॥ हिंडतोसी मतिमंदा ॥२७॥

येपरी असों आम्ही गृहासी ॥ भोजना जातों आम्ही कुटुंबेंसीं ॥ पाक करावा कवणें अर्थेसीं ॥ तुजलागीं ओपावया ॥२८॥

ऐसीं घरोघरीं भाषणें ॥ होती दत्तात्रेयाकारणें ॥ मग मनांत म्हणे प्रयोजन ॥ जाऊनि पाहूं निजदृष्टीं ॥२९॥

ऐसें योजूनि स्वचित्तांत ॥ तेथें पातला तपोनाथ ॥ उभा राहूनि पाकशाळेंत ॥ पाक लक्षांत आणीतसे ॥३०॥

तंव तो महाराज योगकारण ॥ देखतां ओळखी सिद्धिअन्न ॥ थोडें करितां नगसमान ॥ होय अपार न पचवितां ॥३१॥

एक पोळी पडतांचि लागली ॥ परी सहस्त्रही वाढियेली ॥ ऐशा चिन्हें ओळखिली ॥ सिद्धिकळा महाराजें ॥३२॥

मग तेथींच्या जनालागीं पुसत ॥ हें प्रयोजन एवढें कोण करीत ॥ येरु म्हणती महासमर्थ ॥ वटसिद्धनागनाथ करितो कीं ॥३३॥

ऐसें ऐकोनि अत्रिसुत ॥ खूण जाणली स्वचित्तांत ॥ कीं म्यां मुलासी सिद्धपदार्थ ॥ काशीक्षेत्रीं ओपिले ॥३४॥

तरी त्याचें नांव होतें यथार्थ ॥ वटसिद्धनागेश नागनाथ ॥ तरी तोचि काय आहे तेथें ॥ मोठेपणा मिरवावया ॥३५॥

त्यासी वर्षे लोटली वीस ॥ तरी झाला असेल स्थूळ देहास ॥ तरुणपणीं महंतीस ॥ वाढवावया टेकला ॥३६॥

टेकला परी मजकारणीं ॥ गोचर व्हावें ही इच्छा मनीं ॥ या गांवींचें संधान धरुनी ॥ संतर्पण मांडिलें ॥३७॥

हें गावीचें भिक्षास्थान ॥ भ्रष्ट करावें सिद्धिअन्न ॥ सकळ गांवींचा पाक वर्जून ॥ केला अर्थ मजकरितां ॥३८॥

तरी आतां असो कैसें ॥ आजिचा दिन करुं उपवास ॥ ऐसें योजूनि स्वचित्तास ॥ स्वामी तेथूनि चालिला ॥३९॥

चालिला परी आणिक जन ॥ पाचारिती बाळाकारण ॥ आपण जावें भोजन करुन ॥ तूं ऐसा कां जातोसी ॥४०॥

ऐसें म्हणोनि हातीं धरिती ॥ पुन्हां पाकशाळे आणिती ॥ परी तो नायके योगपती ॥ गांवामाजीं संचरे ॥४१॥

मग कणधान्याची भिक्षा करीत ॥ लोक पुसतां त्यांतें वदत ॥ कीं आमुचा नेम भिक्षारहित ॥ अन्न सेवीत नाहीं जी ॥४२॥

ऐसें वदूनि सकळ लोकांत ॥ शुष्क अन्न मागूनि घेत ॥ काशीक्षेत्रीं जाऊनि त्वरित ॥ भोजनातें सारीतसे ॥४३॥

ऐसें रीतीं एक मास ॥ लोटूनि गेला सहजस्थितीस ॥ परी नागनाथ स्वचित्तास ॥ विचार करितां पैं झाला ॥४४॥

म्हणे लोटला एक मास ॥ स्वामी न दिसे आम्हांस ॥ मग बोलावूनि ग्रामस्थांस ॥ पुसतां झाला महाराज ॥४५॥

म्हणे गांवात कोणी येत ॥ अतिथ आहे भिक्षावंत ॥ तंव ते म्हणती सिद्धनाथ ॥ एक अतिथ येतो की ॥४६॥

तो येथींचें तुमचें अन्न ॥ न सेवी मागतो भिक्षाकदन्न ॥ आम्ही पुसतां म्हणतो नेम ॥ माझा ऐसा आहे कीं ॥४७॥

आम्ही सारितो येथें भोजन ॥ म्हणोनि न मिळे त्या पक्कान्न ॥ यास्तव कोरडे मागूनि धान्य ॥ नेत आहे महाराजा ॥४८॥

ऐसें बोलतां सकळ ग्रामस्थ ॥ त्यांसी म्हणे नागनाथ ॥ मागूं येतील जे गांवांत ॥ करा श्रुत मजलागीं ॥४९॥

त्यांसीं कांहीं न टाकून ॥ श्रुत करावें मजकारण ॥ मग मी जाऊनी ग्लानित वचनें ॥ भोजन घालीन तयांसी ॥५०॥

परी आणिक एक अर्थ ॥ कोरडें अन्न न्या गृहांत ॥ येरु येईल जंव भिक्षेतें ॥ तेंचि अन्न वाढावें ॥५१॥

त्याणें हें अन्न घेतल्या पदरीं ॥ मग प्रयोजन आहे सांगा यापरी ॥ न घेई मग तुम्ही येऊनि झडकरी ॥ श्रुत करा मजलागीं ॥५२॥

ऐसें पांच पन्नासांसी ॥ नाथें सांगितलें भाविकांसी ॥ जे कदाकाळी कार्यासी ॥ ढळणार नाहींत निश्चयें ॥५३॥

ऐसें सांगूनि सिद्धिअन्न ॥ त्यातें दिधलें वस्त्रीं बांधून ॥ मग आपुल्या गृहीं जाऊन ॥ वाट पहात बैसले ॥५४॥

तों श्रीदत्तात्रेय अत्रिसुत ॥ भिक्षेसी आले अकस्मात ॥ तंव ते सिद्धिअन्न घेऊनि हातांत ॥ सन्मुख येती घालावया ॥५५॥

म्हणती महाराजा आम्ही दीन ॥ आमुचें गृहीं कैचें अन्न ॥ परी नागनाथ ॥ कृपा करुन ॥ देतो अन्न आम्हांसी ॥५६॥

तरी त्या भिक्षेंत भिक्षा चोज ॥ तुम्हां वाढावें धर्मकाज ॥ ऐसें बोलती तें सहज ॥ श्रुत कराया दत्तासी ॥५७॥

परम चतुर विचक्षण ॥ परीक्षा घेती श्रुत करुन ॥ परी तो त्रैदेवांचा अंश हें ऐकून ॥ भिक्षेतें आकळेना ॥५८॥

मागें पाऊल तत्काळ ठेवून ॥ जात होय अत्रिनंदन ॥ मग तें आपुलें गृहीचें अन्न ॥ घेऊनियां धांवती ॥५९॥

म्हणती महाराजा नागनाथाचें अन्न ॥ आपणा न वाटे चित्तीं प्रसन्न ॥ तरी आमुचे कष्टा चित्त देऊन ॥ विन्मुख होऊं नका जी ॥६०॥

ऐसें सांगूनि भिक्षा देती ॥ तो घेत नाहीं प्रांजळ चित्तीं ॥ मग लगबगें हेर जाती ॥ श्रुत करिती नाथासी ॥६१॥

नाथासी होतां श्रुत मात ॥ शीघ्र चपळत्वें येत धांवत ॥ निकट येतां हस्तसंकेतें ॥ हेर दाविती तयासी ॥६२॥

तोही हस्तसंकेतखुणें ॥ अत्रिसुताच्या निकट जाऊन ॥ प्रथम करें कर कवळून ॥ चरणीं माथा ठेवीतसे ॥६३॥

म्हणे महाराजा योगपती ॥ माय तूं माउली दयाळ कितीं ॥ तरी डावलूनि पाडसाप्रती ॥ गुप्त कैसा विचरसी ॥६४॥

मज करुनियां निढळवान ॥ दैन्यवंत बहुत काननीं ॥ तेथें सांडूनि निष्ठुरपणीं ॥ जासी कैसा वो माये ॥६५॥

मज बाळपणी आपुलें चोज ॥ दावूनियां तपोभोज ॥ गेलासी टाकूनि महाराज ॥ मागें दृष्टि न करितां ॥६६॥

तरी मी सखया तुजबांचुनी ॥ पडलों आहे घोर वनीं ॥ मार्ग लक्षितां सूक्ष्मनयनीं ॥ प्राण कंठीं उरला असे ॥६७॥

जैसा चातक दृष्टीकरुन ॥ वाट पाहे अंबुद सघन ॥ कीं उखली हरिणीलागून ॥ वाट पाहे पाडस ॥६८॥

वीस संवत्सर गेला काळ ॥ परी चिंतावन्ही दाही तळमळ ॥ तैं शांत करावया जळ ॥ तुझें कांहीं दिसेना ॥६९॥

आपावेगळी आपमासोळी ॥ तेवीं तव भेटी जीव तळमळी ॥ परी माये त्वां हदयगतकमळीं ॥ निष्ठुर कैसें सांठविलें ॥७०॥

ऐसें म्हणोनि आरंबळत ॥ नेत्रअश्रूंनी पाद क्षाळीत ॥ म्हणे अंतर देऊनि मातें ॥ गेलासी कैसा महाराजा ॥७१॥

ऐसी वदूनि ग्लानित वाणी ॥ पूर लोटवी नेत्रजीवनीं ॥ मग त्रयदेव परीक्षानयनीं ॥ अंतरातें ओळखी ॥७२॥

चित्तीं म्हणे प्रांजळवंत ॥ तापे तापला आहे नाथ ॥ मग मस्तकाखाली घालूनि हस्त ॥ उठविलें महाराजें ॥७३॥

प्रेमस्नेहें कवळूनि पाणी ॥ हदयीं कवळीला प्रेमेंकरुनी ॥ वामहस्ते कवळुनि मूध्नी ॥ नेत्रअश्रु पुसीतसे ॥७४॥

मग धरुनि शीघ्र हस्त ॥ नेत स्वामी एकांतांत ॥ कृपें मौळीं ठेवूनि हस्त ॥ कर्णी मंत्र ओपीला ॥७५॥

देऊनि स्वमुखें आत्मखून ॥ केला ब्रह्मपरायण ॥ अपरंपार अज्ञानपण ॥ मुळाहूनी नाशिलें ॥७६॥

ऐसी होतां ब्रह्मस्थितकोटी ॥ तत्काळ गुरुकृपें पडली दृष्टी ॥ जैसें अभ्र वितुळतां शेवटीं ॥ सुढाळ अर्क दिसतसे ॥७७॥

तेवीं पाहतां दत्तस्वरुप ॥ मग उचंबळला आनंदकूप ॥ अहा म्हणोनि बाप बाप ॥ पदीं मौळी अर्पीतसे ॥७८॥

मग परम प्रिय अत्रिनंदन ॥ कीं घेतला स्नेहेंकरुन ॥ करे मुख कुरवाळून ॥ मागील कथा निवेदी ॥७९॥

आविर्होत्र नारायण ॥ आहेसी बा तूं महीकारण ॥ उरगीकुशीं विधिवीर्यवान ॥ जन्म तुझा होय बा ॥८०॥

तरी ही ऐसी मूळकथा ॥ मज आतुडली हदयीं शोधिता ॥ म्हणूनि बाळा तुझ्या हाता ॥ सिद्धिकळा ओपिली ॥८१॥

तरी तुज भेटी द्यावयाकारण ॥ इच्छित होतें माझें मन ॥ परी प्रारब्धयोगें करुन ॥ आजि घडूनि आलें बा ॥८२॥

जें प्रकरण समयोचित ॥ लोहचुंबका भेटी होत ॥ कीं समुद्रक्षारऐक्यवंत ॥ नगआवळी होतसे ॥८३॥

तेवी बापा तुज मज भेठी ॥ झाली प्रारब्धयोगंकाठीं ॥ ऐसें म्हणोनि हदयपुटीं ॥ नाथालागीं धरीतसे ॥८४॥

मग उभय प्रतापवंत ॥ निघतां सांडूनि ते एकांत ॥ ग्रामाबाहेर निघोनि त्वरित ॥ काशीक्षेत्रीं चालिले ॥८५॥

चालिले परी ऐसें रीती ॥ यानमंत्र प्रयोगी विभूतीं ॥ नाथभाळीं चर्चुनि निगुतीं ॥ गमन दोघे करिताती ॥८६॥

मग पवनवेंगाचे गमन थकिता ॥ वाटे ऐसे गमती उभयतां ॥ लवतां नेत्रपातिये पातां ॥ काशीक्षेत्रीं पातले ॥८७॥

तेथे कांहींसे टेंकूनि क्षण ॥ सारिला आपुला नित्यनेम ॥ मग बद्रिकेदार चित्तीं धरुन ॥ गमन करिती त्या मागें ॥८८॥

भाळीं प्रयोग दिव्य विभूती ॥ यानरुपाची महाशक्ती ॥ क्षणें बद्रिकाश्रमाप्रती ॥ जाऊनिया पोंचलें ॥८९॥

संचार करिती शिवालयांत ॥ प्रत्यक्ष झाला उमाकांत ॥ मग प्रेमआवडीं उभवूनि पर्वत ॥ एकमेकां भेटती ॥९०॥

यापरी तो उमाकांत ॥ श्रीदत्तातें विचारीत ॥ दुसरा कोण आहे भृत्य ॥ मेळविला सेवेसी ॥९१॥

ऐसें बोलतां अनसूयासुत ॥ म्हणे महाराजा नाम या नागनाथ ॥ आविर्होत्र प्रतापवंत ॥ नारायण अवतार ॥९२॥

ऐसें बोलतां उमारमण ॥ दत्तासी म्हणे ऐक वचन ॥ यातें सद्विद्या अभ्यासून ॥ नाथपंथीं मिळवावा कीं ॥९३॥

मग अवश्य म्हणोनि अत्रिसुत ॥ राहता झाला षण्मास तेथ ॥ सांगूनि सकळ अस्त्रविद्येप्रत ॥ चवदा कळा चौसष्टी ॥९४॥

उपरी नागपत्रीं अश्वत्थीं नेऊन ॥ केलें सकल सिद्धार्थ साधन ॥ उपरी बद्रिकाश्रमीं जाऊन ॥ तपालागी बैसविलें ॥९५॥

नाथदीक्षा तत्काळ देऊनी ॥ उन्मनी मुद्रा लेववी कानीं ॥ शिंगी शैली सिद्ध करुनी ॥ नाथालागीं ओषिली ॥९६॥

असो ऐशा दीक्षारुपें ॥ द्वादश वर्षे केलें तप ॥ मग स्वर्गदेव मेळवूनि अमूप ॥ वरालांगीं दीधलें ॥९७॥

मावदें करुनि देदीप्यमान ॥ तुष्ट करुनि स्वर्गीचें जन ॥ बोळविलें स्थानोस्थान ॥ नाथा वर देऊनियां ॥९८॥

यावरी पुढें तो अत्रिसुत ॥ नागनाथा बोळवीत ॥ म्हणे बा रे महीचें तीर्थ ॥ सांगोपांग करीं कां ॥९९॥

तीर्थे अति मळीण ॥ तयांचा मळ सांडिती संतजन ॥ तस्मात् बा रे तीर्थाटन ॥ संतमेळीं करीं कां ॥१००॥

मग अवश्य म्हणूनि नाथ प्रेमळ ॥ वंदूनि श्रीगुरुचें पदकमळ ॥ तीर्थे कराया उतावेळ ॥ महीवरी संचरला ॥१॥

अत्रिसुत गेला गिरनारपर्वतीं ॥ येरीकडे नागनाथ जती ॥ तीर्थे करीन नाना क्षिती ॥ क्षिती बालेघाटीं पातला ॥२॥

तेथें पाहूनि शुद्ध कानन ॥ वस्तीसी राहिला मनोधर्म ॥ परी तो प्रतापी तपी सघन ॥ गांवोगांवीं समजला ॥३॥

मग अपार लोक येती दर्शना ॥ दिवसानुदिवस वाढे महिमा ॥ मग भक्तिपुरस्करांची वाढली महिमा ॥ तुम्ही येथेंचि वस्ती करावी ॥४॥

मग अपार धर्म करुन ॥ वस्तीसी राहिले अपार जन ॥ वडवाळ ऐसें ग्राम नाम ॥ नागनाथें ठेविलें ॥५॥

यापरी कोणे एके दिवशीं ॥ मच्छिंद्र आला त्या ठायासी ॥ सहज राहता झाला वडवाळासी ॥ नाथकीर्ती ऐकिली ॥६॥

म्हणोनि मच्छिंद्र दर्शना जात ॥ तो मठद्वारीं येऊनि त्वरित ॥ सदृढ चालतां द्वाराआंत ॥ स्वशिष्यांनीं हटकिलें ॥७॥

म्हणती नाथबोवा ऐका वचन ॥ पुढें नका करुं गमन ॥ श्रीनागनाथातें सांगून ॥ तुम्हां नेऊं दर्शना ॥८॥

तयाच्या परवानगीवांचून ॥ होत नाहीं कोणाचें गमन ॥ तस्मात् थांबावें एक क्षण ॥ आम्ही विचारुनि येतों कीं ॥९॥

ऐसें मच्छिंद्रें ऐकता वचन ॥ कोपानळीं चढलें मन ॥ चित्तीं म्हणे हा संतजन ॥ कैंचा राववत दिसतसे ॥११०॥

देवद्वार साधुद्वार ॥ मुक्त असावें निरंतर ॥ तरी कपटपणींचा संत वेव्हार ॥ संग्रहातें न ठेविती ॥११॥

तरी येथें आहे बंड ॥ जग भोंदावयाचें केले प्रचंड ॥ तरी शिक्षा आतां उदंड ॥ दाखवावी या नरा ॥१२॥

ऐसें क्रोधें चित्तीं आणून ॥ त्या शिष्यांसी केलें ताडण ॥ ताडण करितां बहुत जन ॥ सप्तशत शिष्य धांवले ॥१३॥

तें पाहूनियां मच्छिंद्रनाथ ॥ स्पर्शकळा त्वरें प्रेरीत ॥ तेणें झाले महीव्यक्त ॥ सातशें शिष्य सकळिक ॥१४॥

महीव्यक्त सकळ होतां ॥ नाथमुखवटा ताडण ॥ करितां ॥ तंव ते आरंबळती आक्रोशवंत ॥ एक आरडा उठला ॥१५॥

तों येरीकडे मठांत ॥ सदा ध्यानीं भरुनि नागनाथ ॥ कोल्हाळ आरडा ऐकूनि प्रांजळवंत ॥ देहावरी पातला ॥१६॥

ध्यान भंगिले कोल्हाळेंकरुन ॥ तेणे कोपानळीं पेटलें मन ॥ मग उपरी वरी शीघ्र जाऊन ॥ निजदृष्टीं पहातसे ॥१७॥

तैं सातशें शिष्य महीव्यक्त ॥ झाले ते चलनवलनरहित ॥ एकटा तया गणीं नाथ ॥ मुखावरी मेदीतसे ॥१८॥

ऐसें नागनाथें पाहून ॥ अत्यंत कोपला कोपानळानें ॥ म्हणे हा नाथ दीक्षेसी येतो दिसोन ॥ परी भ्रष्टबुद्धी आहे कीं ॥१९॥

शांति क्षमा दया पूर्ण ॥ पाळिजे साधूचें हेंचि लक्षण ॥ स्वप्नामाजी तीव्रपण ॥ ठेवूं नये निजवृत्तीं ॥१२०॥

तरी हा यातें नाहीं योग्य नाथ ॥ नाथपंथा लाविला डाग ॥ कोणता साधू होता मांग ॥ उपदेशिलें ऐशासी ॥२१॥

तरी यातें शिक्षा करुन ॥ दीक्षा घ्यावी हिरोन ॥ ऐसें कोपोंचि जल्पून ॥ धुनीभस्म कवळिलें ॥२२॥

प्रथम गरुडबंधनविद्या जल्पून ॥ स्वर्गी गरुडाचें केलें बंधन ॥ सकळ नुरे चलनवलन ॥ स्वर्गी व्यक्त केला असे ॥२३॥

मग विभक्तास्त्र जल्पून ॥ शिष्य मुक्त केले महीकारण ॥ मुक्त होतांचि सकळ जन ॥ नाथपृष्ठीं दडाले ॥२४॥

तें पाहूनियां मच्छिंद्रनाथ ॥ म्हणे चूर्ण करावे हे समस्त ॥ मग जल्पूनि अस्त्रपर्वत ॥ महानग निर्मिला ॥२५॥

तो पर्वत विशाळपणीं ॥ येता झाला पंथगगनीं ॥ तें नाथें पाहूनि नयनीं ॥ शक्रवज जल्पिलें ॥२६॥

मग तो शीघ्र पाकशासन ॥ अंतराळीं वज्र देत सोडून ॥ तेणें पर्वत झाला चूर्ण ॥ मच्छिंद्रनाथ पाहुनी कोपला ॥२७॥

मग जल्पूनि वाताकर्षण ॥ शक्र पाडिला महीकारण ॥ वज्रकाळीविद्या जल्पून ॥ वज्रालागीं निवटिलें ॥२८॥

तें पाहूनियां नागनाथ ॥ मनीं क्षोभला अति अदभुत ॥ मग वातप्रेरक विद्या त्वरित ॥ मेघास्त्रावरी टाकिली ॥२९॥

तेणें शक्र सावध होऊन ॥ पळूं लागला भयेंकरुन ॥ म्हणे हे प्रतापी गहन दोघे जण ॥ आपुलें काम नसे येथें ॥१३०॥

ऐसें म्हणोनि भयस्थित ॥ शक्र स्थाना पळूनि जात ॥ येरीकडे मच्छिंद्रनाथ ॥ काय करितां पैं झाला ॥३१॥

मग वासवशक्ति अति दारुण ॥ जल्पूनि मंत्रप्रयोगानें ॥ सिद्ध करुनि देदीप्यमान ॥ नागेशभागा पाठविली ॥३२॥

परी ती शक्ति महादारुण ॥ सहस्त्रमित्रतेजेंकरुन ॥ प्रलयकाळींचा जैसा अग्न ॥ शब्द करीत येतसे ॥३३॥

शब्द करितां कडकडाट ॥ खचूनि पडती गिरिकपाट ॥ धरा कांपे जळजळाट ॥ द्विभाग होऊ पाहातसे ॥३४॥

श्वापदें पळती रानोरान ॥ दिग्गजां न मिळे कोठे ठिकाण ॥ पाताळभुवनीं शेष दचकून ॥ मूर्धनीते सरसावी ॥३५॥

एकाचि झाला हलकल्लोळ ॥ महींचे जीव चराचर सकळ ॥ घाबरोनि झाला हडवळ ॥ क्षमेंत स्थळ पाहती ॥३६॥

ऐसा पाहुनि महा आकांत ॥ काय करी नागनाथ ॥ सकळ दैवतें बंधनविद्येंत ॥ जल्पता झाला महाराजा ॥३७॥

तेणें दैवतांचें बंधन समस्त ॥ मग न धावती स्फुरल्या विद्येंत ॥ ऐसी केली गती कुंठित ॥ सकळ अस्त्रशस्त्रांची ॥३८॥

मग हेमाद्रिपर्वत दारुण ॥ अस्त्र योजिलें महादारुण ॥ हेमाद्रि अस्त्र पावोन ॥ नाथें वासवी शक्ती टाकिली ॥३९॥

तें पाहोनियां मच्छिंद्रनाथ ॥ शक्रवज्रालागीं स्तवीत ॥ वरी बंधन झालें सकळ दैवत ॥ अस्त्रविद्या फळेना ॥१४०॥

मग नाना अस्त्रांचें प्रयोग युक्तीं ॥ जपें परी ते सकळ व्यर्थ जाती ॥ मग निःशक्त मच्छिंद्र होवोनि जगती ॥ स्तब्धदृष्टीं पहातसे ॥४१॥

तों येरीकडे नागनाथ ॥ नाना अस्त्रें जल्पोनि त्वरित ॥ पर्वतासमान तक्षक तेथें ॥ अस्त्रविद्येसीं धावले ॥४२॥

मग मच्छिंद्रातें दंशूं धांवती ॥ शतानुशत नाहीं गगती ॥ ते पाहोनि मच्छिंद्रजती ॥ गरुडास्त्र तेव्हां जपतसे ॥४३॥

परी नागनाथें पूर्वप्रकरणीं ॥ केलें होतें गरुडबंधन ॥ तेथें मच्छिंद्राचा योग पूर्ण ॥ व्यर्थ झाला गरुडास्त्रीं ॥४४॥

मग ते सर्प उन्मत्त ॥ येवोनि डंखिती ठायीं नाथ ॥ तेणें मच्छिंद्र हडबडीत ॥ प्राण सोडूं पाहतसे ॥४५॥

मग अंतकाळींचा समय जाणून ॥ चित्त बुद्धी अंतःकरण ॥ काया वाचा तन मन ॥ गुरुचे चरण स्तवीतसे ॥४६॥

स्तवीतसे परी कैशा रीतीं ॥ ऊर्ध्वशब्द उद्धभटगति ॥ म्हणे महाराजा कृपामूर्ती ॥ अत्रिसुता धांव रे ॥४७॥

मी बाळक लडिवाळ जाण ॥ वेष्टलो असें सर्पबंधनें ॥ तरी माये तुजवांचून ॥ कोण सोडवील मज आतां ॥४८॥

हे त्रयदेवअवतारखाणी ॥ मज पाडसाची तूं हरिणी ॥ व्याघ्र बैसला मम प्राणहरणी ॥ ये धांवोन लगबगें ॥४९॥

परम संकटीं पडलों येथें ॥ कैसी निद्रा लागली तूतें ॥ सर्वसाक्षी असोनि जगातें ॥ नेत्र झांकिले मजविषयीं ॥१५०॥

दत्त दत्त ऐसें म्हणोन ॥ शब्द फोडिला अट्टाहस्येंकरुन ॥ नेत्र झाले श्वेतवर्ण ॥ मुखीं हुंदका येतसे ॥५१॥

परी दत्तात्रेयनामेंकरुन ॥ बाहे अट्टहस्यें वचन ॥ ते नागनाथें शब्द ऐकून ॥ साशंकित होतसे ॥५२॥

चित्तीं म्हणे मम गुरुचें ॥ स्मरण हा करितो किमर्थ वाचे ॥ तरी हा कोणाचा शिष्य याचें ॥ नांव विचारुं जावोनी ॥५३॥

मग निकट येवोनि वटसिद्धनाथ ॥ पुसता झाला स्नेहभरित ॥ म्हणे कोण तुम्ही हो दीक्षावंत ॥ गुरु कोण तुमचा ॥५४॥

येरु म्हणे आदश नाथा ॥ नाम मच्छिंद्र तत्त्वतां ॥ प्रसन्न करोनि अत्रिसुता ॥ अनुग्रह घेतला ॥५५॥

तरी यासी नाथपंथ मूळ ॥ मी प्रथमभागीं दत्ताचें बाळ ॥ मजमागें जालिंदर सबळ ॥ दत्तानुग्रहीं मिरवला ॥५६॥

तयामागे भर्तरीनाथ ॥ दत्तशिष्य झाला जगविख्यात ॥ जोंवरी अवनी तोंपर्यत ॥ चिरंजीव मिरवला ॥५७॥

तयामागें रेवणनाथ ॥ दत्तानुग्रहीं प्रतापवंत ॥ जेणें जिंकोनि देव समस्त ॥ विप्रबाळें उठविलीं ॥५८॥

तरी महाराजा नाथपंथांत ॥ मी दत्तात्रेयाचा ज्येष्ठ सुत ॥ ऐसें ऐकोनि वटसिद्धनाथ ॥ मनामाजी कळवळला ॥५९॥

मग सुपर्णाचें सोडून बंधन ॥ गरुडअस्त्र जपे वाचेकारण ॥ ऐसें होतां तत्काळ सुपर्ण ॥ महीवरी उतरले ॥१६०॥

उतरोनि नागकुळ समस्त ॥ होवोनियां भयभीत ॥ तत्काळ विष शोषूनि त्वरित ॥ अदृश्य ते पावले ॥६१॥

असो नागकुळ विष शोषून ॥ अदृश्य झालिया भयेंकरुन ॥ गरुडही उभयतां नमून ॥ स्वर्गाप्रती तो गेला ॥६२॥

येरीकडे नागनाथ ॥ मच्छिंद्रचरणीं माथा ठेवीत ॥ म्हणे तातासमान वडिल भ्रात ॥ गुरु माझा तूं होसी ॥६३॥

मग नेवोनियां स्वस्थानासी ॥ बैसविला आपणापाशीं ॥ गौरवोनि उदार मानसीं ॥ एक मास ठेविला ॥६४॥

यावरी मच्छिंद्र एके दिवशीं ॥ बोलता झाला नागनाथासी ॥ तुवा बंधन द्वारापाशीं ॥ ठेविलें काय म्हणोनियां ॥६५॥

भाविक येती दर्शनातें ॥ तव शिष्य येवों न देती त्यातें ॥ तुज मज कळी याचि निमित्तें ॥ झाली असे महाराजा ॥६६॥

यावरी बोले नागनाथ ॥ मी असतों सदा ध्यानस्थ ॥ जन हे येवोनि अपरिमित ॥ ध्यान माझें भंगिती ॥६७॥

म्हणोनि द्वारीं ठेवितो रक्षण ॥ उपरी बोले मच्छिंद्रनंदन ॥ नाथा हें नव्हे चांगुलपण ॥ भूषणिक आपणासी ॥६८॥

कोण जन ते हीन दीन ॥ व्हावया येती पवित्र पावन ॥ तरी ते द्वार अटक पाहोन ॥ विन्मुख मागें जाताती ॥६९॥

तरी मुक्तद्वार आतां येथून ॥ ठेवीं जगाचें अकिंचनपण ॥ हरोनियां मनोधर्म ॥ रुढमार्गा वाढवीं ॥१७०॥

ऐसें सांगोनि नागनाथासी ॥ मच्छिंद्र जाती तीर्थासी ॥ येरीकडे वडवाळगांवासी ॥ काय करी नाथ तो ॥७१॥

मुक्तद्वार अगार टाकोन ॥ मग दर्शना येती अपार जन ॥ नाना जगाचें अकिंचनपण ॥ फिटोनि मागे जाताती ॥७२॥

ऐसें असतां कोणे एके दिवशीं ॥ चांगुणा संतशिष्य होता त्यासी ॥ तयाची स्त्री पुण्यराशी ॥ मृत्यु पावली मठांत ॥७३॥

तें पाहोनि वटसिद्धनाथ ॥ उठविती तयाचे कांतेतें ॥ तेणें बोभाट वडवाळ्यांत ॥ घरोघरीं संचरला ॥७४॥

मग जयाचे घरीं होत मृत ॥ आणूनि टाकिती मठा प्रेत ॥ उठवूनि नागनाथ ॥ सदना धाडी तयाच्या ॥७५॥

ऐसें होतां बहुत दिवस ॥ संकट पडलें यमधर्मास ॥ मग तो जाऊन सत्यलोकास ॥ विधीलागीं निवेदी ॥७६॥

मग तो मूर्तिमंत चतुरानन ॥ वडवाळांत शीघ्र येवोन ॥ श्रीनाथाचा स्तव करोन ॥ राहविले त्या कर्मा ॥७७॥

यापरी सहा शिष्य त्यातें ॥ सिद्धकळा लाधली नवांतें ॥ ते जगामाजी प्रसिद्धवंत ॥ सिद्धनामीं मिरवले ॥७८॥

चांगुलसिद्ध धर्मसिद्ध ॥ देवसिद्ध भोमसिद्ध ॥ देवनसिद्ध भोमनसिद्ध ॥ कोकिळ सुंदरचक्षू तो ॥७९॥

ऐशा नवसिद्धांमाझारीं ॥ विद्या ओपिली कवित्व साबरी ॥ देव जिंकोनि सत्वरीं ॥ विद्यावरु मिरवले ॥१८०॥

बावन वीरांचे करोनि बंधन ॥ केल्या साबरी विद्या स्वाधीन ॥ ते साबरी विद्या कवित्वरत्न ॥ नवसिद्धांत मिरवती ॥८१॥

एक कोटी एक लक्ष ॥ नागनाथाची विद्या प्रत्यक्ष ॥ परोपकारी सौम्य दक्ष ॥ पीडाकारक नव्हती ॥८२॥

धांवरें खांडुक उसण ॥ टिके किरळ अहिरानैम ॥ वृश्चिकसर्पविषहरण ॥ ऐसी विद्या परोपकारीं ॥८३॥

असो ऐसी विद्या साबरी कवित ॥ नवांनीं प्रगट केली जगांत ॥ यापरी दिवस लोटले बहुत ॥ कथा वर्तली विप्राची ॥८४॥

समाधियोग सरला शेवट ॥ तैं उद्धरिला बहिरंभट ॥ आणि रामाजी भक्त सुभट ॥ हेमकारक उद्धरिला ॥८५॥

तरी त्या कथा पूर्ण भागांत ॥ वदलों भक्तिकथामृतग्रंथांत ॥ या उपरी चरपटीनाथ ॥ श्रवण करावें श्रोते हो ॥८६॥

धुंडीसुत नरहरिवंशीं ॥ मालू तो संतकृपेसी ॥ अवधान विद्ये सावकाशीं ॥ श्रोते तुम्ही अवधारा ॥८७॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ सप्तत्रिंशत्तमोध्याय गोड हा ॥१८८॥

श्रीपांडुरंगार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ अध्याय ३७॥ ओंव्या १८८॥

॥ नवनाथभक्तिसार सप्तत्रिंशतितमऽध्याय समाप्त ॥


श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय ३८

श्रीगणेशाय नमः

जयजयाजी व्यंकटरमणा ॥ दयासागरा परिपूर्णा ॥ भक्तदुःखभंजना ॥ पुढें ग्रंथ बोलवीं ॥१॥

मागिले अध्यायीं कथन ॥ नागनाथा भेटला अत्रिनंदन ॥ विद्याभ्यासें दीक्षाकारण ॥ नाथपंथीं मिरवला ॥२॥

उपरी मच्छिंद्राशीं खेळूनि रळी ॥ जिंकिला मच्छिंद्र तपोबळी ॥ तंव सिद्ध उत्पन्न करुनि मंडळी ॥ शाबरी विद्या ओपिली ॥३॥

यावरी श्रोतीं पुढें कथन ॥ पूर्वी दक्षगृहीं वार्ता जाण ॥ निघालें विवाहयोजनालक्षण ॥ मंगळकार्याचें तेधवां ॥४॥

हिमालयाची आत्मजा ॥ ती योजिली मंगलकाजा ॥ तेव्हां देवदानवमानवां भोजा ॥ पाचारण पाठविलें ॥५॥

तेणेंकरुनि दक्षागार ॥ भरोनि निघाला सुरवर ॥ मानवी दक्ष हरि हर ॥ सभास्थानीं बैसले ॥६॥

मंडळी ऐसी सर्वासहित ॥ बैसली असे पार्वती त्यांत ॥ मंगलकला करुनि मंडपांत ॥ मिरवत असे नोवरी ॥७॥

परी ते नोवरी स्वरुपखाणी ॥ कीं चंद्रकला नक्षत्रगणीं ॥ तेजाला जैसी सौदामिनी ॥ उजळपणा कराया ॥८॥

कीं सहस्त्र विद्युल्लतांचा पाळा ॥ ऐक्यपणें झाला गोळा ॥ सुरवरीं घनमंडळा ॥ चमकपणी शोभवी ॥९॥

कीं अर्क प्रत्यक्ष दीक्षाबाळ ॥ सभासद मिरवे केवळ ॥ तयाचें प्रतिबिंब व्योमीं जळ ॥ ब्रह्माण्डकुंडीं अर्क हा ॥१०॥

ऐसियापरी लावण्यता ॥ सभेंत मिरवे जगन्माता ॥ ते स्वरुप देखूनि नाभिसुत ॥ कामानळ दाटला ॥११॥

कामविरह चपळवंत ॥ नेणे विचार समयोचित ॥ स्थान सोडूनि इंद्रियांत ॥ लिंगामाजी पातला ॥१२॥

तैं विधीचा विरहकाम ॥ अधीरपणीं द्रवला उत्तम ॥ महीं प्राप्त होतां मनोधर्मे ॥ संकोचला विधी तो ॥१३॥

बैसल्याठायींचि करुन ॥ रेत रगडियेले महीकारण ॥ तैं आगळे साठसहस्त्र ऋषी वेषें ॥ वालखिल्य भागीं मिरवले ॥१५॥

परी एक आगळा होता भाग ॥ तैसाचि राहिला तेथें चांग ॥ सेवक झाडी महीअंग ॥ केरसमानी मिसळला ॥१६॥

उपरी सरतां मंगळनेम ॥ केला होता लज्जाहोम ॥ केर आणि तयाचें भस्म ॥ सेवक सांडिती सरितेंत ॥१७॥

सरितेंत पडतां सकळ मेळ ॥ सर्व रेताचा सांडूनि मळ ॥ केर मग उगवोनि तळ ॥ निर्मळपणीं वर्तला ॥१८॥

मग तो जळी ढळढळीत ॥ तरुनि प्रवाहीं वाहात जात ॥ तो वाहतां अकस्मात ॥ कुशवेष्टनी आतुडला ॥१९॥

तैं जललहरीचें नेटेंकरुन ॥ कुशवेष्टींत पडे जाऊन ॥ तेथे लोटतां बहुत दिन ॥ कुशमुळ्यांनीं वेष्टिला ॥२०॥

यापरी बहुतां दिवशीं ॥ ईश्वरआज्ञा अवतारक्रमासी ॥ पिप्पलायन त्या रेतासी ॥ नारायण संचरला ॥२१॥

संचरला परी कैसे रीतीं ॥ रोहिसावजे विपिनीं असती ॥ तो मेळ त्या कुशवेष्टीप्रती ॥ उदकपाना पातला ॥२२॥

त्यांत रोहिणी ऋतुवंत ॥ मूत्न स्त्रवली प्रत्यक्ष रक्त ॥ तें भेदूनि वीर्यव्यक्त ॥ रेत वाढी लागलें ॥२३॥

कुशवेट परम भुवन ॥ तयामाजी हे सघन ॥ वाढी लागतां स्वेदजविधान ॥ कीटकन्यायें करुनियां ॥२४॥

अंडज जारज स्वेदज प्रकरण ॥ ऐसीं जीवां उत्पत्तिस्थानें ॥ असो या विधानेकरुन ॥ मूर्ति रचिलीं नवमास ॥२५॥

देह वाढता सबळवंत ॥ कुशमूळ झालें त्रुटित ॥ मग ढाळपणीं महीवरतीं ॥ बाळ दृष्टीसी ते आलें ॥२६॥

तो त्या ठायीं अकस्मात ॥ सत्यश्रवा विप्र भागीरथींत ॥ येवोनियां दर्भानिमित्त ॥ कुशवेष्टी विलोकी ॥२७॥

तो विप्र असे परम सुशीळ ॥ पुनीतग्रामीं तयाचें स्थळ ॥ तेथें येतां दृष्टीं बाळ ॥ पाहिलेसे तेधवां ॥२८॥

देखिलें परी देदीप्यमान ॥ अर्कतेजें परम सुगण ॥ कीं प्रत्यक्ष चंद्रकळा जिंकोन ॥ आणिता झाला त्या ठायीं ॥२९॥

कीं अनंत मस्तकींचा मणी ॥ विसरुनि गेला ते स्थानीं ॥ ऐसें भासलें विप्रा मनीं ॥ अति तेजस्वी चकचकाटे ॥३०॥

चित्तीं म्हणे हें बाळ ॥ कोणाचें आहे तेजःपुंजाळ ॥ कीं उर्वशी उदरकमळ ॥ टाकूनियां गेली असे ॥३१॥

कीं राजबीज मनमोहन ॥ जळदेवतीं दृष्टी पाहून ॥ आणिलें मातेच्या शेजेहून ॥ आपुले स्थानीं न्यावया ॥३२॥

तरी याची पुनः माता ॥ येऊनि भेटेल कधी आतां ॥ परी प्रेमरहित लोभ ममता ॥ टाकूनि ती गेलीसे ॥३३॥

ऐसा तर्कवितर्क करीत ॥ परी तो बाळा न लावी हस्त ॥ कैसे न्यावें म्हणोनि मनांत ॥ पुढील अर्थ दिसेना ॥३४॥

अति वितर्के भेदलें मन ॥ परी मोहें वेष्टिले पंच प्राण ॥ चित्तीं म्हणें कैसें सोडून ॥ बाळालागीं जावें हो ॥३५॥

अरण्य कर्कश तीर भागीरथी ॥ सावजे येती उदकाप्रती ॥ दृष्टि पडतां तयाचि क्षितीं ॥ घात करतील बाळकाचा ॥३६॥

ऐसें मोहें चित्तीं जल्पून ॥ परी स्पर्श न करी भयेंकरुन ॥ चित्तीं म्हणे नेणों संधान ॥ कैसें आहे कळेना ॥३७॥

ऐसें प्रकरणीं शंकित मानस ॥ बाळानिकट उभा असे ॥ परी स्वर्गाचे देव असती डोळस ॥ देखते झाले तयासी ॥३८।\

बाळक करीतसे रुदन ॥ हस्तपादांतें नाचवून ॥ तें स्वर्गी सुरवर पाहून ॥ नमन करिती भावानें ॥३९॥

म्हणती हा पिप्पलायन नारायण ॥ आजि देखियले तयाचे चरण ॥ तरी आजिचा दिन परम सुदिन ॥ कृतकृत्य झालों कीं ॥४०॥

मग सर्वत्र करुनि जयजयकार ॥ वर्षिते झाले कुसुमभार ॥ कुशवेष्टींत कुसुमें अपार ॥ खचूनियां पाडियेलीं ॥४१॥

विप्र बाळाच्या अंगावरुनी ॥ कुसुमें अपरिमित काढूनी ॥ टाकी परी कुसुमांलागोनी ॥ परी न सरे म्हणोनि दचकला ॥४२॥

चित्तीं म्हणे कैचें बाळप्रकरण ॥ पिशाचकरणी येते दिसोन ॥ अकस्मात येऊनि कुसुमघन ॥ कोणीकडून वर्षती ॥४३॥

ऐसा भयस्थित होऊनि चित्तीं ॥ पळूं लागला नगरवाटीं ॥ कैंचे दर्भ चरणसंपुटीं ॥ अति कवळूनि पळतसे ॥४४॥

तें पाहूनि सुर समस्तीं ॥ गदगदां हास्य करिती ॥ सत्यश्रव्यासी पळतो म्हणती ॥ उभा उभा पळूं नको ॥४५॥

ते सत्यश्रवें शब्द ऐकोन ॥ परम घाबरला पडे उलथून ॥ चित्तीं म्हणे पिशाच येऊन ॥ भक्षावया धांवले ॥४६॥

ढळढळीत भरले दोन प्रहर ॥ खेळी निघाले महीवर ॥ कैंचे बाळक तें प्राणहर ॥ पिशाचकृत्यें मिरवला ॥४७॥

ऐशा वितर्ककल्पना आणूनी ॥ पळत आहे प्राण सोडुनी ॥ पडतां महीतें उलथुनी ॥ पुनः उठोनी पळतसे ॥४८॥

सुरवर उभा उभा म्हणती ॥ तों त्यातें न दिसे क्षिती ॥ परी शब्द सुस्वर होती ॥ पिशाच सत्य हें आहे ॥४९॥

मग स्वर्गस्थ सुरवर शब्द सोडुनी ॥ नारदातें बोलती वचनी ॥ स्वामी तुम्हीं जाऊनी ॥ सत्यश्रव्यातें सुचवावें ॥५०॥

हा परम भ्याड ब्राह्मण ॥ सत्यवादी परी करी पलायन ॥ तरी त्याचा संशय छेदून ॥ टाकूनि बाळ त्या देईजे ॥५१॥

ऐसें सुरवर कमलोदभवसुता ॥ बोलतांचि महाराज होय निघता ॥ ब्रह्मवीणा घेऊनि हाता ॥ महीवरती उतरला ॥५२॥

आपुले स्वरुपाचा लोप करुन ॥ मानववेषी दिव्य ब्राह्मण ॥ सत्यश्रव्याचे पुढें जाऊन ॥ उभा राहे मार्गात तो ॥५३॥

सत्यश्रवा भयभीत ॥ मार्गी पळतां श्वास सांडीत ॥ पडत झडत मुनी जेथें ॥ येवोनि तेथें पोहोंचला ॥५४॥

प्राण झाला कासावीत ॥ मुखीं न निघे श्वासोच्छवास ॥ तें पाहुनि नारद त्यास ॥ बोलता झाला महाराजा ॥५५॥

म्हणे महाराजा किमर्थी ॥ घाबरलासी काय पंथीं ॥ येरु म्हणे प्राणाहुती ॥ आजि झाली होती कीं ॥५६॥

दर्भानिमित्त गेलों सरितेतीरा ॥ पिशाचकळा तेथें पाहिली चतुरा ॥ बाळवेषें मी मोहिलों विप्रा ॥ मीचि म्हणोनि टिकलों ॥५७॥

टिकलों परी अकस्मात ॥ अपार कुसुमें तेथे पडत ॥ तें पाहूनियां भयभीत ॥ होऊनियां पळालों ॥५८॥

पळालों परी मागाहून ॥ अपार शब्दें पिशाचगण येऊन ॥ उभा रहा ऐसें म्हणोन ॥ वारंवार ऐकितों मी ॥५९॥

परी मी न पाहें मागें ॥ पडत झडत आलों लगबगें ॥ ऐसी कथा सांगोपागें ॥ झाली असे मज विप्रा ॥६०॥

मग नारदें धरुनि त्याचा हात ॥ तरुखालतें नेऊनि त्वरित ॥ बैसवूनि त्या स्वस्थचित्त ॥ वृत्तांतातें सांगतसे ॥६१॥

म्हणे विप्रा ऐक वचन ॥ तूं होतासी कुशबेटाकारण ॥ तेव्हां तुज म्यां विलोकून ॥ ऊर्ध्वदृष्टी पाहिलें ॥६२॥

पाहिलें परी अंबरांत ॥ मज दृष्टीं पडलीं सुरवरदैवतें ॥ त्यांणीं कुसुमें घेऊनि हातांत ॥ तुजवरी झोंकिलीं ॥६३॥

झोंकिलीं याचें कारण ॥ तुज बोलाविलें नामाभिधाने ॥ येरी म्हणे माझेचि नाम ॥ सत्यश्रवा म्हणताती ॥६४॥

नारद म्हणे असो कैसें ॥ सत्यश्रवा नाम तुज वसे ॥ म्हणोनि पुकारीत होते देव तैसें ॥ भूतचेष्टा नसे बा ॥६५॥

तरी सत्यश्रवा तुझें नाम ॥ कोठे आहे तुझें धाम ॥ नाहीं ठाऊक आम्हां ग्राम ॥ कोण आहे सांग पां ॥६६॥

असो इतुकें त्यासी विचारुन ॥ पुढें बोलला एक वचन ॥ बाळालागीं सदनीं नेऊन ॥ करीं पाळण प्रीतीनें ॥६७॥

ऐसें बोलूनि आणिक बोलले ॥ कीं हें बाळक ब्रह्म ठेलें ॥ पिप्पलायन नारायण जन्मले ॥ अवतार प्रगट जाहला ॥६८॥

तरी सकळ संशय सांडून ॥ बाळ नेई सदनालागून ॥ याचें करितां संगोपन ॥ सकळ सिद्धी साधती ॥६९॥

ऐसें सुरवरांचे बोलणें ॥ विप्रा म्यां येथूनि ऐकिले कानें ॥ असत्य मानूं नको जाणें ॥ देव सर्वही बोलती ॥७०॥

सत्यश्रवा विचारी मानसीं ॥ स्वर्गात नम नाम काय माहितीसी ॥ हाचि संशय धरुनि चित्तासी ॥ क्षण एक तिष्ठतसे ॥७१॥

करुनि पाहे ऊर्ध्व दृष्टी ॥ तों देखिली अपार देवथाटी ॥ परी नारदकृपेची सर्व हातवटी ॥ देव दृष्टी पडियेले ॥७२॥

मग नारदबोलें तुकावी मान ॥ म्हणे विप्रा बोलसी सत्यवचन ॥ माझे दृष्टी सुरवरगण ॥ येथोनियां दिसती पैं ॥७३॥

तरी विप्रा ऐक सत्य वचन ॥ येई माझ्या समागमेंकरुन ॥ कुशवेष्टींतील बाळ उचलोन ॥ मम करीं ओपीं कां ॥७४॥

ऐसे बोल ऐकतां ॥ अवश्य म्हणे संवत्सरपिता ॥ मग नेऊनि सत्यश्रव्याचे हाता ॥ बाळकाकारणें ओपिलें ॥७५॥

सत्यश्रव्यातें नारदें ओपूनि बाळ ॥ तेणें योगें मन सुढाळ ॥ पोटीं आनंद भरोनि सबळ ॥ बाळ हदयीं कवळीतसे ॥७६॥

बाळ ओपूनि नारदमुनी ॥ बोलता झाला तयालागुनी ॥ सत्यश्रव्या बाळनामीं ॥ चरपट ऐसें पाचारीं ॥७७॥

चरपटनामी बाळ गुणी ॥ सुरवर बोलले आहेत वाणी ॥ ती ऐकिली निजश्रवणीं ॥ तरी हेंचि नाम ठेवीं कां ॥७८॥

अवश्य म्हणोनि सत्यश्रवा ॥ येता झाला निकट आपुल्या गांवा ॥ येरीकडे नारद देवां ॥ स्वर्गी जाऊनि संचरला ॥७९॥

सांगतां सकळ देवां वृत्तांत ॥ स्थाना गेले दव समस्त ॥ येरीकडे स्वसदनांत ॥ सत्यश्रवा संचरला ॥८०॥

गृहीं कांता चंद्रानामी ॥ अति लावण्य धार्मिक लक्ष्मी ॥ पतिव्रता ती अपारनेमी ॥ कीं ती अनसूया दूसरी ॥८१॥

तिचे निकट सत्यश्रवा ॥ उभा राहोनि बोले बरवा ॥ म्हणे कामिनी दर्भ मिळावा ॥ गेलों होतों काननीं ॥८२॥

तेथें अवचट लाभ झाला ॥ सुत तूतें दैंवें दिधला ॥ तरी पालन करुनि नाम याला ॥ चरपट ऐसें पाचारीं ॥८३॥

तयाच्या योगेंकरुन ॥ सुरवरांचे पाहिले चरण ॥ मग मुळापासूनि सकळ कथन ॥ कांतेपाशीं वदला तो ॥८४॥

कांता ऐकूनि वर्तमान ॥ तुकावीतसे आनंदें मान ॥ म्हणे दर्भभावें सेवितां विपिन ॥ वंशलता सांपडली ॥८५॥

कीं खापर वेंचूं जातां अवनीं ॥ तों सांपडला चिंतामणी ॥ तेवीं तुम्हां दैवेंकरुनी ॥ बाळ लाभलें महाराजा ॥८६॥

कीं भूत पूजावया मसणवटीं ॥ जातां लक्ष्मी भेटे वाटीं ॥ तेवीं तुम्हां काननपुटी ॥ बाळलाभ झाला असे ॥८७॥

कीं दगड उलथायाचे मिषें ॥ दैवें लाभला चोख परीस ॥ तेवीं तुम्हां लाभ सुरस ॥ बाळलाभ झाला असे ॥८८॥

कीं सहज मर्कट धरुं जातां ॥ गांठ पडली हनुमंता ॥ तेवीं तुम्हां दर्भभावार्था ॥ बाळलाभ झाला असे ॥८९॥

ऐसें म्हणोनि चंद्रा नारी ॥ बाळ हदयीं कवळी करीं ॥ परी अति स्नेहचित्तसमुद्रीं ॥ आनंदलहरी उठवीत ॥९०॥

जैसा दरिद्री पिशुन वनांत ॥ निजे परी मांदुस सांपडे त्यांत ॥ मग आनंद तयाचे हदयांत ॥ कवण अर्थी वर्णिला ॥९१॥

तेवीं वाढोनि आनंदलहरी ॥ बाळा आलिंगी चंद्रा नारी ॥ मग स्नान पान पयोधरी ॥ करुनि पालखातें हालवीतसे ॥९२॥

चरपट ऐसें बोलूनि नाम ॥ गीत गातसे साधूसम ॥ ऐसें सलील दावूनि प्रेम ॥ अपार दिवस लोटले ॥९३॥

सप्त वर्षेपर्यत ॥ पालन केलें कालस्थित ॥ उपरी मौंजीबंधन त्यांत ॥ अति गजरें केलें असे ॥९४॥

मग करवूनि वेदाध्ययन ॥ शास्त्रीविद्येत केलें निपुण ॥ मीमांसदि सकळ व्याकरण ॥ न्यायशास्त्र पढविलें ॥९५॥

यापरी कोणे एके दिवशीं ॥ गमन करितां देवऋषी ॥ सहज येत पुनीतग्रामासी ॥ स्मरण झाले नाथाचें ॥९६॥

मग आगंतुकाचा वेष धरुन ॥ पाहे सत्यश्रव्याचा आश्रम ॥ तों द्वादश वर्षाचा चरपट नाम ॥ महातेजस्वी दिसतसे ॥९७॥

मग विप्रवेषे ते गृहभक्ती ॥ सारुनि पाहिली चरपटमूर्ती ॥ तों सुगम विद्येची दैदीप्यशक्ती ॥ तया देही देखिली ॥९८॥

ब्रह्मरेतोदयप्राणी ॥ म्हणोनि बंधुत्व नारदमुनी ॥ त्या मोहानें सकळ करणी ॥ चरपटाची देखिली ॥९९॥

परम तोष मानूनि चित्तीं ॥ जात बद्रिकाश्रमाप्रती ॥ तों आत्रेय आणि मच्छिंद्रजती ॥ निजदृष्टीं देखिले ॥१००॥

मग भावेंकरुनि तये वेळां ॥ उभयतांसी जाऊनि भेटला ॥ त्यातें पाहूनि लोट लोटल ॥ चित्तसरिती प्रेमाचा ॥१॥

निकट बैसूनि तयांचे पंगतीं ॥ परी एकाग्रीं मिळाल्या चतुर्थशक्तीं ॥ मच्छिंद्रनाथ अपर्णापती ॥ दत्तात्रेय चतुर्थ तो ॥२॥

परी हे चौघेही एकाभ्यासी ॥ दीक्षावंत पूर्ण संन्यासी ॥ वैष्णवनामी भागवतदेशीं ॥ प्रतापार्क तयांचा ॥३॥

कीं निधी परीस चिंतामणी ॥ कीं चौथा कौस्तुभ वैडूर्यखाणी ॥ ऐसे चौघेही एकासनीं ॥ विराजले एकदां ते ॥४॥

वार्तालता अपरिमित ॥ तों चरपटवार्ता विधिसुत ॥ मुळापासूनि पूर्ण कथित ॥ त्रिवर्गात सांगितली ॥५॥

वार्ता ऐकतां आदिनाथ ॥ श्रीदत्तात्रेय बोलत ॥ कीं तुम्ही नवनारायणात ॥ सनाथ करुं इच्छिलें ॥६॥

तो पिप्पलायन नारायण ॥ अवतार मिरवला चरपटनाम ॥ तया आतां सनाथ करुन ॥ कल्याणरुपीं मिरवाल ॥७॥

ऐसे बोलतां उमारमण ॥ बोलतां झाला अत्रिनंदन ॥ कीं महाराजा पश्चात्तापाविण ॥ हितप्राप्ती मिळेना ॥८॥

तरी चरपटातें पश्चात्तापें ॥ मानला नाहीं जंववरी बापें ॥ त्यावरी अनुग्रहलोपें ॥ माझ्यावरी मिरवतसे ॥९॥

यावरी बोले नारदमुनी ॥ हे अवधूता बोलसी वाणी ॥ तरी चरपटाचे अंतःकरणीं ॥ पश्चात्ताप मिरवे तो ॥११०॥

परी तुम्ही जीवासम भावें ॥ चरपटभागीं मिरवा सदय ॥ तों पश्चात्तापउदय ॥ चरपटदेहीं करितों मी ॥११॥

ऐसें बोलूनि अवधूताप्रती ॥ पाहिली शीघ्र लुप्तग्रामक्षिती ॥ पवित्र होऊनि विद्यार्थी ॥ सत्यश्रव्यातें भेटला ॥१२॥

म्हणे महाराजा गुरुवर्या ॥ मी विद्यार्थी विद्याकार्या ॥ तरी मजवरी करुनि दया ॥ विद्यारत्न ओपावें ॥१३॥

मग अवश्य म्हणोनि तो ब्राह्मण ॥ अभ्यासविद्येकारणें ॥ कुलंब ऐसें स्वदेहा नामाने ॥ सत्यश्रव्या वदलासे ॥१४॥

कुलंब नामें नारदमुनी ॥ आणि चरपट नामेंकरोनीं ॥ उभयतां बैसूनि एकासनीं ॥ अभ्यास करिती सद्विद्या ॥१५॥

परी कोठेंही न लागे ठिकाण ॥ तो अवसर आल दैवेंकरोन ॥ तया ग्रामीं एक यजमान ॥ पाचारावया पातला ॥१६॥

तयाचे गृहीं प्रयोजन ॥ करणें होतें ओटीभरण ॥ तो ग्रामजोशी म्हणोन ॥ पाचारावया पातला ॥१७॥

पातला परी सत्याश्रवा ॥ बैसला होता अर्चूनि देवा ॥ मग चरपटा सांगोनि मनोभावा ॥ नारदासह पाठविला ॥१८॥

चरपट जाऊनि तयाचे धार्मी ॥ विधी उरकला मनोधर्मीं ॥ उपरी यजमान दक्षिणापाणी ॥ येता झाला महाराजा ॥१९॥

नारदें पाहूनियां संधी ॥ स्मरण झालें पूर्वविधी ॥ चरपटमनीं कलह नव्हता कधीं ॥ परी नारदें योजिला ॥१२०॥

बैसलें होते कार्यालागुनी ॥ तों नारद बोले चरपटासी वाणी ॥ दक्षिणा न घेतां तूं गुणी ॥ योगपुरुषा योगज्ञाना ॥२१॥

जरी तूं दक्षिणा हातीं घेसी ॥ तरी योग्य न वाटे आम्हांसीं ॥ आपण उभयतां अज्ञान विद्यार्थी ॥ भागाभाग समजेना ॥२२॥

तरी उगलाचि चाल चरपटा उठोनि ॥ सत्यश्रवा येईल तव दक्षिणा घेऊनि ॥ चरपट म्हणे रिक्तहस्तेकरोनी ॥ कैसें जावें सदनासी ॥२३॥

नारद म्हणें तूं दक्षिणा घेसी ॥ परी अमान्य होईल तव पित्यासी ॥ येरु म्हणे कसरतेसी ॥ करुनि दक्षिणा घेईन मी ॥२४॥

कसरत करुनि सवाई पाडें ॥ द्रव्य ठेवितां तातापुढें ॥ मग तो काय बोलेल वाकुडें ॥ भलेपणा दावील कीं ॥२५॥

तों ती दक्षिणा अति सान ॥ नव्हती उभयतांच्या स्वरुपाप्रमाण ॥ तेणेंकरुनि चरपट मनें ॥ खिन्न झाला धार्मिक तो ॥२६॥

ऐसें उभयांचें झालें भाषण ॥ तों यजमान आला दक्षिणा घेऊनि ॥ चरपटाहातीं देत भिजवून ॥ अल्प दक्षिणा पहातसे ॥२७॥

आधींच नारदें कळ लावूनी ॥ ठेविली होती अंतःकरणीं ॥ त्यावरी लघु दक्षिणा पाहूनी ॥ कोप अत्यंत पावला ॥२८॥

नारदें भाषणापूर्वीच बीज ॥ पेरुनि ठेविलें होतें सहज ॥ कोपतरु फळविराज ॥ कलह उत्पन्न झाला पैं ॥२९॥

मग बोलता झाला यजमानासी ॥ म्हणे तुम्हीं ओळखिलें नाहीं आम्हांसी ॥ कवण कार्य कवण याचकासी ॥ द्यावें कैसें कळेना ॥१३०॥

यजमान म्हणे ऐक भटा ॥ याचका पैका द्यावा मोठा ॥ परी दाता असेल करंटा ॥ मग याचकें काय करणें ॥३१॥

येरी म्हणे सामर्थ्य असतां ॥ तरी प्रवर्तावें कार्यार्था ॥ ऐसेपरी बोलतां ॥ उभयतां कलह अपार वाढे ॥३२॥

नारद तेथोनि निघोनी ॥ सत्यश्रवा विप्राजवळी येऊनी ॥ म्हणे दुखविला यजमान गुणी ॥ धडगत मज दिसेना ॥३३॥

असंतुष्ट द्विज नष्ट ॥ ऐसें बोलती सर्व वरिष्ठ ॥ तरी चरपटानें केलें भ्रष्ट ॥ यजमानकृत्य सर्वस्वीं ॥३४॥

आपण याचक संतुष्टवृत्ती ॥ सदा असावें गौरवयुक्ती ॥ आर्जव केलिया कार्ये घडती ॥ न घडे तेंचि महाराजा ॥३५॥

ऐसें बोलतां नारदमुनी ॥ कोप चढला सत्यश्रव्या लागुनी ॥ तत्काळ देवार्चन सोडोनी ॥ यजमानगृहीं पातला ॥३६॥

तो यजमान आणि सुत ॥ बोलबोली ऐकिली समस्त ॥ तेंही पाहूनि साक्षवंत ॥ अति कोप वाढला ॥३७॥

जैसा आधींच वैश्वानर ॥ त्यावरी सिंचिलें स्नेह अपार ॥ कीं उन्मत्त झालिया पान मदिर ॥ त्यावरी संचार भूताचा ॥३८॥

त्याची न्यायें सत्यश्रवा ॥ कोपानळीं चढला बरवा ॥ येतांचि चरपटमुखीं रवा ॥ करपुटानें काढीतसे ॥३९॥

ताडन होतां मुखावरती ॥ चरपटही पडला क्रोधाहुतीं ॥ आधींच बोलतां यजमानाप्रती ॥ क्रोधोदकें भिजलासे ॥१४०॥

त्यावरी चरपटनेत्रीं ॥ क्रोधाचे पूर लोटती ॥ मग सर्व त्यागूनि क्रोधें जल्पती ॥ गांवाबाहेर निघाला ॥४१॥

गांवाबाहेर भगवतीदुर्ग ॥ जाऊनि बैसला गुप्तमार्ग ॥ पश्चात्तापें झाला योग ॥ मनामाजी दाटेना ॥४२॥

येरीकडे नारदमुनी ॥ अंतरसाक्षी सर्व जाणुनी ॥ दिव्यभव्य विप्र प्राज्ञी ॥ वेष द्वितीय नटलासे ॥४३॥

होऊनि दिव्य ब्राह्मण ॥ दुर्गालयीं आला दर्शना म्हणोन ॥ भगवतीतें नमस्कारुन ॥ चरपटासमीप बैसला ॥४४॥

म्हणे कोण जी कां हो येथ ॥ बैसले आहां चिंतास्थित ॥ येरु ऐकूनि सकळ वृत्तांत ॥ तयापाशीं निवेदी ॥४५॥

ऐकूनि चरपटाचें वचन ॥ म्हणे पिसाट झाला ब्राह्मण ॥ ऐशा क्रोधें पुत्रालागून ॥ दुखविलें वृद्धानें ॥४६॥

आपुले चरणीं चरणसंपुट ॥ पुत्रापायीं येतां नीट ॥ मग पुत्रमर्यांदा रक्षूनि चोखट ॥ माहात्म्य आपुलें रक्षावें ॥४७॥

ऐशी चाल जगतांत ॥ प्रसिद्धपणी आहे वर्तत ॥ तरी मतिमंद तो वृद्ध निश्चित ॥ बुद्धिभ्रष्ट म्हणावा ॥४८॥

तरी ऐशियाचा संग त्यूजून ॥ तूं सेवावें महाकानन ॥ परतोनि त्याच्या वदना वदन ॥ दावूं नये पुत्रानें ॥४९॥

ऐसें बोलतां नारदमुनी ॥ चरपटा क्रोध अधिक मनीं ॥ दाटला पश्चात्तापें करुनी ॥ अधिकोत्तर नेटका ॥१५०॥

मग त्या विप्रालागीं बोलत ॥ म्हणे मम गृहीं जाऊन गुप्त ॥ कुलंब नाम विप्र यथार्थ ॥ पाचारुनि आणावा ॥५१॥

त्यातें घेऊनि स्वसंगती ॥ आम्ही जाऊं विदेशाप्रती ॥ पाहूनि सबळ सदगुणमूर्ती ॥ विद्या सकळ अभ्यासूं ॥५२॥

अवश्य म्हणोनि तो ब्राह्मण ॥ भगवती दुर्गाबाहेर येऊन ॥ त्या स्वरुपा लोप करुन ॥ कुलंववेष नटलासे ॥५३॥

पुन्हां त्यापाशीं शीघ्र येऊन ॥ केली चरपटालागी देखण ॥ म्हणे पिसाट झाला तो ब्राह्मण ॥ हिताहित कळेना ॥५४॥

तरी ऐसिया क्रोधापासीं ॥ आम्ही न राहूं निश्चयेंसीं ॥ तरी आणिक गुरु पाहूनि महीसी ॥ विद्येलागीं अभ्यासूं ॥५५॥

ऐसें बोलतां कुलंब वचन ॥ अधिकोत्तर चरपटमन ॥ पश्चात्ताप दाटून ॥ कुलंबचित्तीं मिरवला ॥५६॥

म्हणे सख्या अन्य क्षेत्रासी ॥ आपण राहूनि उभयतांसी ॥ दोघे एकचि मार्गासी ॥ वर्तणुकी राहूंया ॥५७॥

करुं एकचित्तें आपणास ॥ पडणार नाहीं दुःखलेश ॥ गुरु संपादूनि निःशेष ॥ विद्येलागीं अभ्यासूं ॥५८॥

ऐसें बोलतां चरपटासी ॥ अवश्य म्हणे विधिसुत त्यासी ॥ तत्काळ सांडूनियां नगरासी ॥ मुनिराज ऊठला ॥५९॥

मग चरपट आणि नारदमुनी ॥ उभयतां चालिले मार्ग लक्षूनी ॥ पांच कोश लंधितां अवनी ॥ नारद बोले तयातें ॥१६०॥

म्हणे सखया ऐक वचन ॥ आपण पाहूं बद्रिकाश्रम ॥ श्रीबद्रिकेदारा नमून ॥ काशीक्षेत्रीं मग जाऊं ॥६१॥

तये क्षेत्रीं विद्यावंत ॥ विप्र आहेत अपरिमित ॥ कोणी आवडेल जो चित्तांत ॥ विद्या त्यायाशीं अभ्यासूं ॥६२॥

ऐसें बोलतां कुलंब चरपटाप्रत ॥ अवश्य म्हणे विप्रपुत्र ॥ मार्ग धरुनि बद्रिकाश्रमातें ॥ पाहावया चालिले ॥६३॥

मार्गी करुनि भिक्षाटन ॥ पाहते झाले बद्रिकाश्रम ॥ केदारेश्वर देवालयांत जाऊन ॥ बद्रिकेदार नमियेला ॥६४॥

नमितां उभयें श्रीकेदार समर्थ ॥ तों प्रगट झाले मच्छिंद्रदत्त ॥ तें पाहूनि विधिसुत ॥ तयांपासीं पातले ॥६५॥

दत्तचरणीं ठेवूनि माथा ॥ आणिक नमी मच्छिंद्रनाथा ॥ तें पाहूनि चरपटी तत्त्वतां ॥ तोही वंदी उभयतांसी ॥६६॥

चरपटें उभयतां करुनि नमन ॥ पुसतसे तो कुलंबाकारण ॥ म्हणे महाराजा हे कोण ॥ उभयतां असती पैं ॥६७॥

नारद म्हणे ओळखीं नयनीं ॥ अत्रिसुत हा दत्तात्रेय मुनी ॥ आणि मच्छिंद्र जती ऐकसी कानीं ॥ तोचि असे का ब्राह्मणा ॥६८॥

यानंतर मी देवऋषी ॥ नारद म्हणती या देहासी ॥ तव कार्यार्थ कुलंबवेषीं ॥ मानवदेहीं नटलों मी ॥६९॥

ऐसे ऐकतां चरपटवचन ॥ कुलंबचरणीं माथा ठेवून ॥ म्हणे महाराजा स्वरुप दावून ॥ सनाथ करी मज आतां ॥१७०॥

नारद म्हणे ऐक वचन ॥ आम्ही स्वरुप दावूं त्रिवर्ग जाण ॥ परी बा गुरुप्रसादाविण ॥ न देखवे गा तुजलागीं ॥७१॥

तरी गुरुप्रसादमंत्र कानीं ॥ रिघावा होतांचि ध्यानीं ॥ मग आम्हीच काय दिसती त्रिभुवनीं ॥ ब्रह्मस्वरुप होशील तूं ॥७२॥

यावरी बोले चरपटनाथ ॥ कोणता पाहूं गुरु येथ ॥ तुम्हांपक्षां प्रतिष्ठावंत ॥ भुवनत्रयीं असेना ॥७३॥

तरी मज अनुग्रह द्यावा येथें ॥ करावें स्वरुपीं सनाथ मातें ॥ नारद म्हणे दत्तात्रेयातें ॥ कारण आपुलें संपादा ॥७४॥

ऐसें बोलतां नारदमुनी ॥ श्रीदत्तात्रेय कृपा करुनी ॥ ठेविता झाला वरदपाणी ॥ चरपटमौळीं तेधवां ॥७५॥

संकल्पित स्थित तनु मन ॥ कायावाचा जीवित्वप्राण ॥ चित्त बुद्धि अंतःकरण ॥ घेतलें गोवूनि संकल्पीं ॥७६॥

मग वरदहस्त ठेवूनि मौळीं ॥ कर्णी ओपिली मंत्रावळी ॥ ओपिताचि अज्ञानकाजळी ॥ फिटूनि गेली तात्काळ ॥७७॥

ब्रह्मदर्शन खुणाव्यक्त ॥ होतांचि देखिलें सत्तत्त्व तेथ ॥ लखलखीत तेज अदभुत ॥ मित्रापरी भासलें ॥७८॥

कीं औदुंबरींचा ठाव सांडून ॥ मिरवती पृथ्वीवरुन ॥ तेवीं विधिपुत्र वसुनंदन ॥ तेजेंकरुनि गहिवरलें ॥७९॥

तें चरपटें पाहूनि तेजोसविता ॥ त्रिवर्गा चरणीं ठेविला माथा ॥ तो अवसर पाहूनि तत्त्वतां ॥ उमाकांत प्रगटला ॥१८०॥

प्रगट होतां अपर्णापती ॥ चरपटा सांगे मच्छिंद्रजती ॥ दशकर नमींकां कृपामूर्ती ॥ भेटावया आलासे ॥८१॥

ऐसें ऐकतां चरपटनाथ ॥ शिवा नमीतसे आनंदभरित ॥ मग दशकर कवळूनि हदयांत ॥ मुखालागीं कुरवाळी ॥८२॥

कुरवाळूनि म्हणे अत्रिसुता ॥ विद्या सांगावी चरपटनाथा ॥ नवांच्या गणीं करुनि सरता ॥ नाथपंथी मिरवी कां ॥८३॥

अवश्य म्हणोनि अत्रिसुत ॥ चरपटासी विद्या अभ्यासीत ॥ सकळ शास्त्रीं झाला ज्ञात ॥ उपरी तपा बैसविला ॥८४॥

मग नागपात्री अश्वत्थीं जाऊन ॥ द्वादश वर्षे वीरसाधन ॥ नऊ कोटी सात लक्ष रत्न ॥ शाबरी कवित्व पैं केलें ॥८५॥

यापरी मंत्रविद्या करुन ॥ मेळविले सुरवर मंडण ॥ स्वर्गदेवता तोषवून ॥ विद्यावरु घेतला ॥८६॥

मग श्रीगुरु अत्रिसुत ॥ सेविता झाला गिरनारपर्वत ॥ येरीकडे चरपटनाथ ॥ तीर्थावळी चालिला ॥८७॥

श्रीरामेश्वर गोकर्ण महाबळेश्वर ॥ जगन्नाथ हरिहरेश्वर ॥ काशी मनकर्णिका विश्वेश्वर ॥ तीर्थे सेवीत चालिला ॥८८॥

तीर्थे करितां अपरिमित ॥ सच्छिष्य नव झाले त्यांत ॥ ते नवशिष्य प्रख्यातवंत ॥ सिद्धकळा जाणती ॥८९॥

राघवसिद्ध बाळसिद्ध ॥ गोकाटसिद्ध जाबुसिद्ध ॥ नैमित्यिक सारेंद्वक हुक्ष प्रसिद्ध ॥ द्वारभैरव रणसिद्ध तो ॥१९०॥

ऐसे चरपटाचे नवसिद्ध वर्ण ॥ शाबरी विद्येंत असती पूर्ण ॥ चौर्‍यायशीं सिद्ध नवांपासून ॥ उदयवंत पावले ॥९१॥

जोगी शारंगी निजानंद ॥ नैननिरंजन यदु प्रसिद्ध ॥ गैवनक्षुद्र कास्त सिद्ध ॥ रेवणनाथाचे असती पैं ॥९२॥

उरेश सुरेश धुरेश कुहर ॥ केशमर्दन सुद्धकपूर ॥ भटेंद्र आणि कटभ्रवा साबर ॥ हे नवसिद्ध भर्तरीनाथाचे ॥९३॥

दक्षेंद्र आणि अनिर्वा अपरोक्ष ॥ कामुकार्णव सहनसिद्ध प्रसिद्ध ॥ दक्षलायन देवसिद्ध ॥ पाक्षेंद्र साक्ष मच्छिंद्राचे सिद्ध हे ॥९४॥

निर्णयार्णव हरदंतान ॥ भोमान हुक्षे कृष्णपलायन ॥ हेमा क्षेत्रांत रत्नागर नाम ॥ गोरक्षाचे हे असती ॥९५॥

विनयभास्कर दत्तघात ॥ पवनभार्गव सुक्षार्णव यथार्थ ॥ कविटशवी वधम प्रोक्षित ॥ नव जालिंदराचे हे असती ॥९६॥

शारुक वालुक शरभ सहन ॥ प्रोक्षितशैर्म कोकिल नाम ॥ कोस्मितवाच संपति नवही पूर्ण ॥ कान्हिपाचे हे असती ॥९७॥

यापरी चौरंगीचे सहा सिद्ध ॥ लोम भ्रातरक चिरकालवृन्द ॥ नारायण काळिका साव्रजी प्रसिद्ध ॥ चौरंगीचे असती पैं ॥९८॥

मीननाथ अडबंगीनाथ ॥ यांचे सहा सिद्ध सिद्धिवंत ॥ सुलक्षा लुक्ष मोक्षार्णव समर्थ ॥ द्वार भद्राक्ष सहावा ॥९९॥

एकूण चौर्‍यायशीं सिद्धांचा झाडा पूर्ण ॥ ग्रंथीं वदला धुंडीनंदन ॥ मालू नरकिमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ अष्टत्रिंशततिमोऽध्याय गोड हा ॥२०१॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ शुभं भवतु ॥ ॥ अध्याय ३८॥ ओंव्या २०१॥

॥ नवनाथभक्तिसार अष्टत्रिंशतितमोऽध्याय समाप्त ॥


श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय ३९

श्रीगणेशाय नमः जयजयाजी आदिनाथा ॥

कर्पूरवर्णा उरगभूषिता ॥ बोलवीं पुढें ग्रंथार्था ॥ नवरसादि कृपेनें ॥१॥

मागिले अध्यायीं केलें कथन ॥ चरपटीचा होऊनि जन्म ॥ दत्तदीक्षा पुढें घेऊन ॥ नाथपंथीं मिरवला ॥२॥

उपरी एकादश नाथांपासून ॥ चौर्‍यायशीं सिद्ध झाले पूर्ण ॥ तयांचे सांगितले नाम ॥ यथाविधीकरुनियां ॥३॥

एक गहनी वेगळा करुन ॥ बहात्तर आठांनीं केले निर्माण ॥ उपरी मीननाथ चौरंगी आडबंगण ॥ बारा सिद्ध निर्मिले ॥४॥

एकूण चौर्‍यायशीं सिद्ध पूर्ण ॥ पुढें आतां ऐका कथन ॥ चरपटी करी तीर्थाटन ॥ कथा कैसी वर्तली ॥५॥

गया प्रयाग काशीहून ॥ जगन्नाथ मल्लिकार्जुन ॥ फणिपर्वत रामेश्वर करुन ॥ कुमारीदैवत पाहिलें ॥६॥

बारा मल्हार हिंगलाज ॥ बारा लिंगे तेजःपुंज ॥ सप्त मोक्षपुर्‍या पाहोनि सहज ॥ महीप्रदक्षिणा घातली ॥७॥

सकळ महीचें झाले तीर्थ ॥ गुप्त प्रगटे अत्यदभुत ॥ परी एक राहिले इच्छिलें तीर्थ ॥ स्वर्गपाताळ तीर्थात ॥८॥

करुनि मणिकर्णिकेचें स्नान ॥ सकळ स्वर्ग यावें पाहून ॥ उपरी पाताळभुवनीं जाण ॥ भोगावती वंदावया ॥९॥

ऐसा विचार करुनि चित्तीं ॥ गेला बद्रिकाश्रमाप्रती ॥ तेथें नमूनि उमापति ॥ पुढें चालिला महाराजा ॥१०॥

व्यानप्रयोगीं भस्मचिमुटी ॥ चर्चूनियां निजललाटा ॥ तेणेंकरुनि वातगतीं ॥ गमनातें दावीतसे ॥११॥

मग आदित्यानामी मंत्र जपून ॥ प्रत्यक्ष केला नारायण ॥ तो मागें पुढें सिद्ध होऊन ॥ मार्गापरी गमतसे ॥१२॥

कीं मनयोगाचा धीर धरुनि करीं ॥ चरपट लंघी महेंद्रगिरी ॥ शैल्यबर्फलहरी ॥ अंगीं झगट करीतसे ॥१३॥

सवितातेज अति अदभुत परम तीव्र दाहाते करीत ॥ तेणेंकरुनि बर्फगणांत ॥ वितळपणीं मिरवत ॥१४॥

जैसें पर्जन्यकाळीं महीं ॥ वितळे मित्रतेजप्रवाहीं ॥ त्याचि न्यायें ते समयीं ॥ हिमाचलकण वहिवटले ॥१५॥

ऐसी करुनि गमनस्थिती ॥ लंघूनि गेला स्वर्गाप्रती ॥ तों प्रथम शृंगमारुती ॥ सत्यलोका पाहिलें ॥१६॥

जातांचि गेला विधिसभेंत ॥ चतुराननाचें चरण वंदीत ॥ वंदूनियां जोडूनी हस्त ॥ सन्मुख उभा राहिला ॥१७॥

विधि पाहूनि चरपटासी ॥ म्हणे कोण आला योगाभ्यासी ॥ ऐसें बोलतां घडीसीं ॥ नारद उभा तैं होता ॥१८॥

तो तयाच्या सन्मुख होऊन ॥ म्हणे महाराजा चतुरानन ॥ मग मूळापासून जन्मकथन ॥ तयापासीं वदला तो ॥१९॥

ऐकूनि विधि सर्व वत्तांत ॥ आनंदला अति अदभुत ॥ मग चरपटाचा धरुनि हस्त ॥ अंकावरी घेतला ॥२०॥

हस्तें मुख कुरवाळून ॥ क्षणोक्षणीं घेत चुंबन ॥ म्हणे बाळा तुझें येणें ॥ कैसें झालें स्वर्गासी ॥२१॥

येरी म्हणे जी ताता ॥ नारदें ओपिलें दत्तहस्ता ॥ तेणें वरदपाणी माथां ॥ ठाऊक केला बाळासी ॥२२॥

मग सकळ चरपटीतें विद्यार्णव ॥ वैखरीपत्रें आणूनि ठेव ॥ त्यावरी मोदानें कमलोदभवें ॥ श्रवणपात्रीं भरलासें ॥२३॥

तो कुशल विद्यारत्न ॥ श्रवणशक्तीं कीं सांठवण ॥ परम आल्हादें आनंदन ॥ पुन्हां चुंबन घेतसे ॥२४॥

यावरी बोले चतुरानन ॥ बाळा कामना वेधली कोण ॥ येरु म्हणे तव दर्शन ॥ मनीं वाटलें हो तात ॥२५॥

यापरी होतां कामना चित्तीं ॥ तेथेंचि वेधली कृपामूर्ती ॥ कीं मनकर्णिका स्नाना निगुतीं ॥ भोगावती पहावी ॥२६॥

यावरी बोले कमलोदभव ॥ बा रे एक संवत्सर येथें असावें ॥ त्यांत पर्वणी आल्यासी अपूर्व ॥ स्नानासी जाऊं सकळिक ॥२७॥

ऐसें बोलतां कमलोदभवतात ॥ अवश्य म्हणे चरपटीनाथ ॥ यापरी राहतां सत्य लोकांत ॥ बहुत दिन लोटले ॥२८॥

परी चरपट आणि नारदमुनी ॥ वर्तती एकचित्तें खेळणीं ॥ चैन न पडे एकावांचुनी ॥ एकमेकां क्षणार्ध ॥२९॥

यापरी कथा पूर्वापारेसीं ॥ नारद जातसे अमरपुरीसी ॥ तों ॥ सहस्त्रचक्षु देखतां त्यासी ॥ विनोदउक्तीं पाचारी ॥३०॥

देखतांचि हा तपोवृंद म्हणे यावें कळीनारद ॥ ऐसे शक्राचे ऐकूनि शब्द ॥ मुनी क्षोभ पावला ॥३१॥

चित्तीं पेटतां कोपाग्नी ॥ अंतरीं जल्पे नारदमुनी ॥ म्हणे तोही समय तुजलागुनी ॥ एक वेळं दाखवीन ॥३२॥

ऐसें म्हणून स्वचित्तांत ॥ नारद जातां आपुल्या स्थानाप्रत ॥ यासही लोटले दिन बहुत ॥ परी शब्द चित्तांत रक्षीतसे ॥३३॥

तों सांप्रतकाळीं चरपुटमुनी ॥ विद्यापात्र प्रळयाग्नी ॥ तें पाहूनि जल्पे नारद मुनी ॥ इंद्र आहुतीं योजावा ॥३४॥

ऐसे कामरत्नीं इच्छाधामीं ॥ रक्षीत असतां देवस्वामी ॥ तों एके दिवशीं श्रवणउगमीं ॥ श्रृंगारिला चरपट तो ॥३५॥

म्हणे बांधवा ऐक वचन ॥ कामें वेधलें माझें मन ॥ कीं अमरकुसुमवाटिकाश्रम ॥ पाहूं क्रीडेकारणें ॥३६॥

चरपट म्हणे अवश्य मुनी ॥ चला जाऊं येचि क्षणीं ॥ ऐसा विचार करोनि मनीं ॥ अमरपुरीं चालिले ॥३७॥

मार्गी चालतां चरपटनाथ ॥ शांतपणें महीं पाऊल पडत ॥ तें पाहूनि कमलोद्भवसुत ॥ चरपटातें बोलतसे ॥३८॥

म्हणे सखय जाणें येणें ॥ आहे परम लंबितवाणें ॥ तरी गमन ऐसे चालीनें ॥ घडोनि कैसें येईल ॥३९॥

चरपट म्हणे आम्ही मानव ॥ आमुची हीच चाली काय करावें ॥ तुम्हांपाशी असे चपल उपाव ॥ तरी तेणेंकरुनि मज न्यावें कीं ॥४०॥

नारदें ऐसे शब्द ऐकून ॥ कार्यकामनीं मोहित मन ॥ मग मार्गालागी स्थिर होऊन ॥ गमनकळा अर्पिली ॥४१॥

जो महादभुत कमलापती ॥ तेणें दिधली होती नारदाप्रती ॥ ती प्रारब्धबळें चरपटाप्रती ॥ लाधली असे अवचितीं ॥४२॥

ती गमनकळा कैसी स्थित ॥ इच्छिल्या ठाया ती नेत ॥ आणि त्रिभुवनांतील सकळ वृत्तांत ॥ दृष्टीपुढें बैसतो ॥४३॥

आयुष्य भावी वर्तमान ॥ गुप्तकृत्ये झाली होऊन ॥ कोण्या ठायी वसे कोण ॥ सकळ दृष्टी पडतसे ॥४४॥

ऐसी कळा ती गमनस्थिती ॥ चरपटाते होतां प्राप्ती ॥ मग हदयीं सरिताभरतीं ॥ तोय आनंदाचें लोटलें ॥४५॥

मग उभय एके कलेंकरुन ॥ मार्गी करिते झाले गमन ॥ एकासारखा एक चंडकिरण ॥ स्वर्गालागीं मिरवले ॥४६॥

मग लवतां डोळियाचें पातें ॥ मनोवेगीं अपूर्व असत ॥ गगनचुंबित मार्गे अमरक्षितींत ॥ कुसुमवाटिकेंत पातले ॥४७॥

तंव तेथें नाना तरु विस्तीर्ण ॥ गगनचुंबित विशाल वन ॥ ज्यांच्या कुसुमसुगंधेंकरुन ॥ अमोघ पाषाण मिरवती ॥४८॥

सहस्त्र योजन कानन समस्त ॥ झाले आहे गंधव्यक्त ॥ ते पाहूनियां चरपटनाथ ॥ परम चित्तीं आल्हादें ॥४९॥

मग कुसुमवाटीं करितां गमन ॥ खेळती नाना क्रीडावचनें ॥ खेळतां खेळतां येती दिसुन ॥ पीयूषफळे त्या ठाया ॥५०॥

नारदासी म्हणे चरपटनांथ ॥ फळें भक्षावीं कामना होत ॥ नारद म्हणे कोणी हस्त ॥ धरिला आहे तुमचा ॥५१॥

मग मन मानेल तैसें फळ ॥ तोडूनियां तपोबळ ॥ भक्षण करिती एकमेळ ॥ उभय सुत विधीचे पैं ॥५२॥

तयांच्या बीजसाली सोडून ॥ पीयूषरसासी करिती सेवन ॥ उपरी सांडूनि तें स्थान ॥ अनेक स्थानें सेविती ॥५३॥

फळें तोडितां पक्कशाखा ॥ महीं पडती विभक्त रुखा ॥ ऐसी ठाई ठाई कुसुमवाटिका ॥ महीतें दर्शवी ॥५४॥

यापरी उभय ते समयीं ॥ कुसुमें तोडिती गंधप्रवाहीं ॥ मणि भूषणमिषें सर्व देहीं ॥ घेऊनि कांहीं जाताती ॥५५॥

तों ब्रह्मदेव देवतार्चनी ॥ बैसतां ठेविती पुढें नेऊनी ॥ म्हणती कोण येतो न कळे येथ ॥ सकळ नासूनि बागाइत ॥ जात आहे येथुनी ॥५८॥

मग ते रक्षक पाळतीवरती ॥ गुप्त बैसती अन्यक्षेत्रीं ॥ तो ऐकें दिनीं उभय ते ॥ कुसुमवाटिके संचरले ॥५९॥

संचरतांचि विभक्त ठाया ॥ चरपट गेला फळें तोडावया ॥ तों रक्षक येऊनि पृष्ठीमाया ॥ चरपटातें धरियेलें ॥६०॥

तें नारदानें पाहून ॥ त्वरेंकरुनि केलें पलायन ॥ स्वस्थानासी जाऊन ॥ स्थिर होऊनि राहिला ॥६१॥

येरीकडे लतिकापाळ ॥ धरुनियां चरपटबाळ ॥ येतांचि भेदिलें मुखकमळ ॥ हस्तेंप्रहारेंकरुनियां ॥६२॥

तेणें कोपोनि तपोकेसरी ॥ कीं अपूर्व भासे वैश्वानरी ॥ मग तीव्रशिखा आहुती बनकरी ॥ चावावया धांवतसे ॥६३॥

करीं कवळूनि भस्मचिमुटी ॥ वाताकर्षण जल्पे होटीं ॥ तेणेंकरुनि बनकर थाटीं ॥ व्याप्त झाले सकळिक ॥६४॥

परम अस्त्र तें कठिण ॥ सकळांचें भेदलें हदयस्थान ॥ तेणें देहींचा सकळ पवन ॥ कुंठित झाला ते समयीं ॥६५॥

कुंठित होत श्वासोच्छ्वास ॥ तेणें प्राण झाले कासाविस ॥ सकळ उलथोनि महीस ॥ डोळां विकास दाटला ॥६६॥

गात्रें कांपती थरथराट ॥ मुखीं रुधिराचा पूरलोट ॥ नेत्र वटारुनि स्थूळवट ॥ बुबुळांतें दाविताती ॥ ॥६७॥

ऐसा होतां विपर्यास ॥ तों आणिक बनकर त्या ठायास ॥ मागूनि येतां सहज स्थितीत ॥ तेथें पाहिलें सकळिकां ॥६८॥

तों अव्यवस्थित सकळ बनकर ॥ पडिले आहेत महीवर ॥ ऐसें पाहूनि करिती विचार ॥ तों सिद्ध बाळक पाहिला ॥६९॥

परम तीव्र अति कठिण ॥ देदीप्यरुप तेज गहन ॥ त्यातें दृष्टी पाहून ॥ मागचे मागें ते सरले ॥७०॥

त्वरें येऊनि नगरक्षिती ॥ म्हणती महाराजा हे नृपती ॥ एक जोगी अर्कस्थिती ॥ आला असे महाराजा ॥७१॥

बाळरुपी अति सान ॥ तेणें बनकरांचे घेतले प्राण ॥ हदयीं पेटला प्रळयानळासमान ॥ दशा मिरवूं म्हणतसे ॥७२॥

आणीक वल्ली तरु पाहात ॥ फिरत आहे बागाइत ॥ न चले आमुचे माहात्म्य तेथ ॥ म्हणोनि आलो या ठाया ॥७३॥

मग पाचारुनि सुरवरमेळ ॥ इंद्र म्हणे तुम्ही जाऊनि सकळ ॥ शासन करुनियां बाळ ॥ धरुनि आणा मजपुढें ॥७४॥

नावरे तरी करा बंधन ॥ शस्त्रास्त्रीं करावें कंदन ॥ युक्तिप्रयुक्तिकरुन ॥ अरिष्टातें दवडा कां ॥७५॥

ऐसें बोलतां देवपाळ ॥ सकळ देव उठले सबळ ॥ चरपटप्रतापसमुद्रजळ ॥ प्राशन करुं पाहती ॥७६॥

कीं तें सैन्य नोहे वडवानळ ॥ अति शोभूनि शिखाजाळ ॥ शस्त्रास्त्रीं महादळ ॥ घेऊनियां चालिले ॥७७॥

येतांचि कुसुमवाटीनिकटीं ॥ चरपट पाहता झाला दृष्टीं ॥ मग सावध राहूनि कोपार्णव पोटीं ॥ लहरा सोडूं म्हणतसे ॥७८॥

भस्मचिमुटीं करीं कवळून ॥ सावध उभा ब्रह्मनंदन ॥ तों देवसैन्य अपार धन ॥ निकट येऊनि बोलती ॥७९॥

पाहूनि तयाचें तीव्रपण ॥ मनीं म्हणे ब्रह्मनंदन ॥ व्यर्थ विद्या अपार शीण ॥ कासयासी करावा ॥८०॥

सकळ अस्त्रप्रतापतरणी ॥ त्यांत अस्त्र मुकुटमणीं ॥ तेंचि द्वंदासी पाठवूनि ॥ वाताकर्षण रुझवावा ॥८१॥

मग हातीं भस्मचिमुटी ॥ वाताकर्षण झालें होटीं ॥ पाहूनि देवेचमूथाटी ॥ सव्य अपसव्य फेंकीतसे ॥८२॥

मग तो अस्त्रप्रयोग कठिण ॥ सकळ चमू घाली वेष्टून ॥ सर्वा हदयीं संचरुन ॥ आकर्षिला वात तो ॥८३॥

सर्वातें वात होतां लिप्त ॥ श्वासोच्छवास झाले कुंठित ॥ मग ते शस्त्रअस्त्र हस्त ॥ मोकलोनि देताती ॥८४॥

प्राण होऊनि कासाविस ॥ देह सांडिती स्वर्गमहीस ॥ रुधिर येऊनि आननास ॥ पूर वाहे भडभडां ॥८५॥

नेत्रद्वारें वटारुन ॥ सकळ सांडू पाहती प्राण ॥ गात्रें विकळ शवसमान ॥ सकळ काननीं मिरवले ॥८६॥

ऐशा दशेंत देव सघन ॥ होतां येरीकडे पाकशासन ॥ हेर भृत्य पाठवून ॥ समाचार आणवी ॥८७॥

येऊनि हेर पाहूनि तेथें ॥ सांगते झाले अमरपाळाते ॥ म्हणती महाराजा अत्यदभुत ॥ देव सर्वस्वीं निमाले ॥८८॥

निमाले परी पुढें आतां ॥ येथें येऊनि अमरनाथा ॥ तुमचे सकळ जीविता ॥ ओस नगरी करील कीं ॥८९॥

बाळरुप दिसतो सान ॥ परी कृतांताचा घेईल प्राण ॥ प्रळयरुद्र तो आकर्षण ॥ करील मही वाटतसे ॥९०॥

कीं महाप्रळय आजीच आला ॥ ऐसेपरी भासे आम्हांला ॥ ऐसें ऐकूनि बहु बोलां ॥ पाकशासन दचकतसे ॥९१॥

यावरी धैर्य धरोनि बोलत ॥ सिद्ध करा ऐरावत ॥ महाप्रळय वज्रघातें ॥ भग्न करणें तयासीं ॥९२॥

ऐसें ऐकूनि बोलती हेर ॥ म्हणती न्यून काय झुंजणार ॥ परी तो धनुष्यालागीं शर ॥ न लावी अजूनि महाराजा ॥९३॥

पाहतां पाहतां रणांगणीं ॥ विपरीत करतो करणी ॥ उगीच श्वासोच्छवास कोंडुनी ॥ प्राण सोडितां झुंजार ॥९४॥

तेथें तुमचें वज्रअस्त्र ॥ काय करील सहस्त्रनेत्र ॥ तयाची विद्या गुप्तक्षेत्र ॥ कांहीं करुं नेदीचि ॥९५॥

नातरी उगलाचि जाईल प्राण ॥ मग सकळ राहील मुखभंजन ॥ तरी दशकरातें साहाय्य करुन ॥ येथें आणावा महाराज ॥९६॥

त्याची होतांचि दृष्टी ॥ याची होय श्वासकुंठी ॥ तरी महाराजा हे दयाजेठी ॥ शिव साह्य करावा ॥९७॥

तरीच देव उठती पुढती ॥ नातरी सकळांची होऊनि शांती ॥ तस्मात् आतां युद्धाप्रती ॥ जाऊं नये महाराजा ॥९८॥

ऐसें ऐकतां हेरभाषण ॥ उठता झाला पाकशासन ॥ वाहनारुढ प्रत्यक्ष होऊन ॥ कैलासासी पातला ॥९९॥

तें शिवगणवेष्टित सदाशिव ॥ बैसला होता महादेव ॥ तों अकस्मात देवराव ॥ जाऊनियां पोहोंचला ॥१००॥

चरणावरी ठेवूनि माथा ॥ म्हणे महाराजा आदिनाथा ॥ तुम्हीं अमरपुरीं मज पतिता ॥ अमर करोनि बैसविलें ॥१॥

बैसविल्यावरी दानवें थोर ॥ गांजिल्यावरी वारंवार ॥ संकट निरसूनि सत्वर ॥ पदस्थापना मज केली ॥२॥

परी आतां निर्वाण आलें ॥ देव सकळ प्राणा मुकलें ॥ सांगावया तुम्हांसी वहिले ॥ उरलों आहें इतुका मी ॥३॥

शिव म्हणे ऐसा कोण ॥ आला आहे स्वर्ग चढून ॥ शक्र म्हणे स्वदृष्टीनें ॥ पाहिला नाहीं महाराजा ॥४॥

कुसुमलतिकेचा केला नाश ॥ म्हणूनि पाठविलें सर्व देवांस ॥ त्यांचा समूळ होतां प्राणनाश ॥ पळूनि आलों येथें मी ॥५॥

ऐसें ऐकतां शिवशंकर ॥ गणांसी आज्ञा देत सत्वर ॥ सिद्ध होऊनि चला समग्र ॥ समागमें माझिया ॥६॥

आणि विष्णूते करा श्रुत ॥ तो होवो अनायासें सहित ॥ ऐसें ऐकतां दूत ॥ विष्णूसमीप धांवती ॥७॥

मग गणांसहित अष्ट भैरव ॥ अष्ट पुत्र घेऊनि शिव ॥ शतकोटिसमुदाव ॥ अमरपुरीं पातला ॥८॥

चढाओढी रणांत ॥ देव मिळाले समस्त ॥ चरपटीनें दृष्टीं देखत ॥ भस्मचिमुटी कवळिली ॥९॥

चित्तीं म्हणे कासया उशीर ॥ उगाचि शीण करावा थोर ॥ निवृत्ति करुनि थोर व्यवहार ॥ बोलवावें सर्वासी ॥११०॥

ऐसें सिद्ध करुनि वचन ॥ प्रयोगीं अस्त्र वाताकर्षण ॥ अस्त्रदेवता सिद्ध करुन ॥ श्वास बंद शिवासहित ॥११॥

श्वास झाले कुंठित ॥ शिवासहित देव झाले विगलित ॥ मूर्च्छना येऊनि भूमीवरी पडत ॥ प्राण सर्वाचे निघूं पाहती ॥१२॥

असो शतकोटी गण ॥ शिवासह पाकशासन ॥ एकदांचि महीकारण ॥ ढासळून पाडिले ॥१३॥

जैं तरु पल्लवशाखीं ॥ मूळ खंडतां पडती शेखीं ॥ तेवीं अवस्था झाली निकी ॥ महीवरी पडतसे ॥१४॥

त्यापरी शिवादि शतकोटी गण ॥ मुख आच्छादी पाकशासन ॥ पुष्पवाटिके विकल प्राण ॥ मूर्च्छागत झाले ते ॥१५॥

अवघे पडिले निचेष्टित ॥ परी नारद दुरोनि विलोकित ॥ हस्तपाद खुडितां हंसत ॥ अमरनाथा पाहुनी ॥१६॥

मनीं म्हणे बरें झालें ॥ अहंकारीं सर्व गळाले ॥ देवांमाजी कित्येक मेले ॥ शव झालें शरीराचें ॥१७॥

कुसुमलतापाळक बनकर ॥ तैं सकळ सांडिले देहअवसर ॥ प्रेत होवोनि महीवर ॥ भयेंकरुनि पडियेले ॥१८॥

कोणा रुधिराचा भडभडाट ॥ मुखीं अपार पूर लोटत ॥ श्वेतवर्ण चक्षुपाट ॥ वटारुनि दाविती ॥१९॥

येरीकडे शिवदूत ॥ गेले होते वैकुंठांत ॥ विष्णु लक्षूनि महादभुत ॥ वृत्तांत सर्व सांगती ॥१२०॥

म्हणती महाराजा कमलाक्षा ॥ महीदक्षा सर्वसाक्षा ॥ राक्षसारी मोक्षमोक्षा ॥ निजदासां कैवारी ॥२१॥

नेणों अमरवनीं कोण ॥ आला आहे बलिष्ट जाण ॥ तेणें सकळ देव केले तृण ॥ गतप्राण झाले ते ॥२२॥

एकटा उरला अमरनाथ ॥ तोही शीघ्र येवूनि कैलासास ॥ स्तवूनियां उमानाथास ॥ युद्धालागीं गेलासे ॥२३॥

शतकोटी गणांसहित ॥ वीरभद्रासह देव समस्त ॥ सवें घेवूनि उमानाथ ॥ युद्धालागीं गेलासे ॥२४॥

भव जातां अमरपुरीसी ॥ आम्हां पाठविलें तुम्हांपासीं ॥ आपण चलावे त्या कटकासी ॥ म्हणोन आम्हीं धांवलों ॥२५॥

ऐसें ऐकतां मधुसूदन ॥ विचार न पाहतां विष्णुगण ॥ छपन्न कोटी मेळवून ॥ गरुडारुढ झालासे ॥२६॥

टाळ ढोल दुंदुभिनाद ॥ समारंभें श्रीगोविंद ॥ अमरपुरींत झाला नाद ॥ ऐसें येवूनि पातले ॥२७॥

समस्त बैसले घालूनि पोळा ॥ आर्‍हाटिती विष्णुमंडळा ॥ धरा मारा शब्दकोल्हाळा ॥ एकदांचि करिताती ॥२८॥

शिवगण जे शिवासहित ॥ देवांसह अमरनाथ ॥ परम पाहूनि अवस्थित ॥ विष्णु मनीं क्षोभला ॥२९॥

सकळ दूतां आज्ञापीत ॥ म्हणे तुमचा होय ताता ॥ धरा मारा आलंबित ॥ शस्त्रेंअस्त्रें करुनियां ॥१३०॥

आपण घेवूनि सुदर्शन ॥ गांडीव सजविलें लवोन ॥ इतुकें चरपटनाथें लक्षून ॥ भस्मचिमुटी कवळीतसे ॥३१॥

मनांत म्हणे विष्णुकुमार ॥ सुदर्शन हें आह अनिवार ॥ तरी आपण आधींच वारासार ॥ करुनियां बैसावें ॥३२॥

मग मोहनास्त्र जल्पूनि होटीं ॥ सुदर्शननामीं फेंकिली भस्मचिमुटी ॥ तें मोहनास्त्र सुदर्शनपोटीं ॥ जाऊनियां संचरलें ॥३३॥

तेणेंकरुनि सुदर्शन ॥ अचळ जड झालें मोहून ॥ तैसेंचि गांडीव आणि सकळ गण ॥ उठावले नेटकीं ॥३४॥

तें पाहूनि चरणस्थित ॥ काय करिता झाला नाथ ॥ विष्णुगण करुनि समस्त ॥ वाताकर्षण योजिलें ॥३५॥

वाताकर्षणप्रयोग नेटीं ॥ गर्णी फेंकितां भस्मचिमुटी ॥ तेणें विष्णुकटक सुभट ॥ श्वासोच्छवासें दाटलें ॥३६॥

कोंडतांचि श्वासोच्छ्वास ॥ धैर्य न उरे मग समस्तांस ॥ मग देह सांडूनि सकळ धरणीस ॥ धुळीमाजी लोळती ॥३७॥

खरसायके मोकळे हस्त ॥ शस्त्रविकार झाला बहुत ॥ मुखीं रुधिर विचकूनि दांत ॥ नेत्र श्वेत करिताती ॥३८॥

सकळ सांडूं पाहती प्राण ॥ हस्तपाद आपटिती दुःखी होवून ॥ तें पाहूनि मधुसूदन ॥ सुदर्शन प्रेरीतसे ॥३९॥

सुदर्शनातें वैडूर्यखाणी ॥ कीं येवूनि राहिले सहस्त्र तरणीं ॥ ऐसें अति चंचळाहुनी ॥ चपल महाअस्त्र तें ॥१४०॥

जैसा अश्वांत श्यामकर्ण ॥ कीं धेनुगणीं सुरभिरत्न ॥ तेवीं अस्त्र सुदर्शन ॥ जाज्वल्यपणीं मिरवें तें ॥४१॥

तें सुदर्शन कोपेंकरुन ॥ प्रेरिता झाला रमारमण ॥ परी तें नाथापाशीं येउन ॥ मोहेंकरुन वेष्टिलें ॥४२॥

चित्तीं म्हणे पिप्पलायन ॥ हा प्रत्यक्ष विष्णुनारायण ॥ स्वामी आपुला वाचवा प्राण ॥ घोट घेतला दिसेना ॥४३॥

तरी हें युद्ध पूर्ण नाहीं ॥ माझी परीक्षा पाही ॥ निमित्तें सहज करुनियां कांहीं ॥ खेळ मज दावीतसे ॥४४॥

ऐसा विचार करुनि चित्तीं ॥ नमन केलें नाथाप्रती ॥ नमूनियां दक्षिण हस्ती ॥ जाउनियां विराजलें ॥४५॥

चरपटाहातीं सुदर्शन ॥ कुस्ती करितां मनोधर्म ॥ मग तो चरपट चांगुलपणें ॥ प्रत्यक्ष विष्णु भासतसे ॥ येरीकडे वैकुंठनाथ ॥ आश्चर्य करीं स्वचित्तांत ॥ म्हणे मोहूनि सुदर्शनातें ॥ घेतले कैसें अरिष्टानें ॥४७॥

मग हातीं गदा परताळून ॥ घेता झाला रमारमण ॥ तैं चरपट तेथें दृष्टीं पाहून ॥ भस्मचिमुटी कवळीतसे ॥४८॥

वाताकर्षणप्रयोगमंत्र ॥ सिद्ध करोनि तपपात्र ॥ समोर लक्षोनि कंजगात्र ॥ प्रेरी अस्त्र दुर्घट तें ॥४९॥

मग तें अस्त्र पवनगतीं ॥ संचरतें झालें हदयाप्रती ॥ तेणें झालें अरिष्ट अती ॥ धडाडूनि पडियेलें ॥१५०॥

हस्तविभक्त होवूनि गदा ॥ पडती झाली क्षितीं आल्हादा ॥ पांचजन्य प्रियप्रद गोविंदा ॥ सोडूनियां मिरवत ॥५१॥

ऐसा होतां अव्यवस्थित ॥ तें पाहूनियां चरपटनाथ ॥ मग विष्णूजवळी येवूनि त्वरित ॥ निजदृष्टी विलोकी ॥५२॥

विलोकितां विष्णूलागुनी ॥ तों दृष्टीं पडला कौस्तुभमणी ॥ मग मनांत म्हणे आपणालागुनी ॥ भूषणातें घ्यावा हा ॥५३॥

ऐसें म्हणोनि स्वचित्तांत ॥ वैजयंतीसी काढूनि घेत ॥ गळां ओपूनि मौळीं ठेवीत ॥ रत्नमुगुट विष्णूचा ॥५४॥

शंखचक्र आदिकरुन ॥ हातीं घेतसे ब्रह्मनंदन ॥ गदा कक्षेमाजी घालून ॥ शिवापासीं पातला ॥५५॥

शिव पाहूनि निजदृष्टीं ॥ तों कपालपात्र आणिलें पोटीं ॥ तें घेवूनि झोळीं त्रिपुटी ॥ सोडूनियां चालिला ॥५६॥

चित्तीं गमनागमध्यान ॥ त्वरें पातला सत्यग्राम ॥ पितयापुधें शीघ्र येवून ॥ उभा राहिला चरपट ॥५७॥

पांचजन्य सुदर्शन ॥ सव्य अपसव्य कराकारण ॥ कक्षे गदा हदयस्थान ॥ कौस्तुभ गळां शोभवी ॥५८॥

तें पाहूनि नाभिसुत ॥ विष्णुचिन्हें भूषणास्थित ॥ मौळीं मुगुट विराजित ॥ अर्कतेजीं चमकूनिया ॥५९॥

ऐसे चिन्हीं पाहतां विधी ॥ मनीं दचकला विशाळबुद्धि ॥ म्हणे मुला काय त्रिशुद्धी ॥ केलें आहेसी कळेना ॥१६०॥

मग चरपटाचा धरुनि हात ॥ आपुल्या अंकावरी घेत ॥ गोंजारुनि पुसत ॥ चिन्हें कोठूनी आणिली हीं ॥६१॥

येरु म्हणे ऐक तात ॥ सहज शक्राच्या कुसुमलतांत ॥ खेळत होतों पहात अर्थ ॥ मातें बनकरें तोडिलें ॥६२॥

मम म्यां कोपें बनकर ॥ मारुनि टाकिले महीवर ॥ तया कैवारें हरिहर ॥ झुंजावया पातले ॥६३॥

मग मी चित्तीं शांत होवून ॥ विकळ केले भवविभुप्राण ॥ तया अंगींची भूषणे घेऊन ॥ आलों आहे महाराजा ॥६४॥

ऐसी ऐकतां चरपटगोष्टी ॥ परम दचकला परमेष्ठी ॥ मग हदयीं धरुनि नाथ चरपटी ॥ गौरवीत बाळातें ॥६५॥

म्हणे वत्सा माझा तात ॥ आजा तुझा विष्णु निश्चित ॥ महादेव तो आराध्यदैवत ॥ मजसह जगाचा ॥६६॥

तरी ते होतील गतप्राण ॥ मग मही त्यांवांचून ॥ आश्रयरहित होवून ॥ जीवित्व आपुलें न चाले ॥६७॥

तरी बाळा ऊठ वेगीं ॥ क्लेश हरोनि करी निरोगि ॥ नातरी मज जीवित्वभागीं ॥ अंत्येष्टी करुनि जाई कां ॥६८॥

ऐसें बोलतां चतुरानन ॥ चित्तीं वेष्टला कृपेंकरुन ॥ म्हणे ताता उठवीन ॥ सकळिकां चाल कीं ॥६९॥

मग विधि आणि चरपटनाथ ॥ त्वरें पातले अमरपुरींत ॥ तों हरिहर अव्यवस्थित ॥ चतुराननें देखिले ॥१७०॥

मग प्रेमाश्रु आणूनि डोळां ॥ म्हणे वेगीं उठवीं बाळा ॥ वाताकर्षण चरपटें कळा ॥ काढूनियां घेतलें ॥७१॥

वातप्रेरकमंत्र जपून ॥ सावध केले सकळ देवजन ॥ उपरी जे कां गतप्राण ॥ संजीवनीनें उठविले ॥७२॥

सकळ सावध झाल्यापाठीं ॥ ब्रह्मा करीं धरुनि चरपटी ॥ विष्णुभवांच्या पदपुटीं ॥ निजहस्तें लोटिला ॥७३॥

परी विष्णुचिन्ह भूषणस्थित ॥ पाहूनियां रमानाथ ॥ कोण हा विधीतें पुसत ॥ तोही प्रांजळ सांगतसे ॥७४॥

मग जन्मापासूनि अवतारलक्षण ॥ विधी सांगे देवांकारण ॥ विष्णु सकळ वृत्तांत ऐकून ॥ ग्रीवेलागीं तुकावी ॥७५॥

मग म्हणे मम भूषणें ॥ वर्तलें नाही विभक्तपण ॥ माझाचि अवतार जाण ॥ चरपटनाथ आहे हा ॥७६॥

मग परमश्रेष्ठी हस्तेंकरुन ॥ चरपट आंगींचे काढूनि भूषण ॥ विष्णूलागीं देवून ॥ चरणीं माथा ठेवीतसे ॥७७॥

असो सकळांचे समाधान ॥ पावूनि पावले स्वस्थान ॥ चरपट अवतार पिप्पलायन ॥ सर्व देवालागीं समजला ॥७८॥

कपालपत्र शिवें घेवून ॥ गणांसह पावला स्वस्थान ॥ अमरपुरीं सहस्त्रनयन ॥ देवांसहित गेला असे ॥७९॥

मग विधीने चरपट करीं वाहून ॥ पाहतां झाला ब्रह्मस्थान ॥ येरीकडे नारद गायन ॥ करीत आला शक्रापाशीं ॥१८०॥

इंद्रालागीं नमस्कारुन ॥ म्हणे तुम्हां झाले थोर विघ्न ॥ येथें कोणता नारद येवून ॥ कळी करुन गेला असे ॥८१॥

आम्ही तुमच्या दर्शना येतां ॥ कळींचे नारद आम्हां म्हणतां ॥ तरी आजचि कैसी बळव्यथा ॥ कोणें दाखविली तुम्हांसी ॥८२॥

ऐसें नारद बोलतां वचन ॥ मनीं खोंचला सहस्त्रनयन ॥ चित्तीं म्हणे हेंचि कारण ॥ नारद आम्हां भंवलासे ॥८३॥

ऐसें समजूनि स्वचित्तांत ॥ कळीचे नारद कदा न म्हणत ॥ अल्प पूजनें गौरवीत ॥ मग बोळविलें तयासी ॥८४॥

येरीकडे चतुरानन ॥ गेला स्वस्थाना चरपटीसी घेवून ॥ तयामागें नारद येवून ॥ सत्यलोकीं देखिला ॥८५॥

यापरी पुढें खेळीमळी ॥ पर्वणी उत्तम पावली बळी ॥ मणिकर्णिकेसी सर्व मंडळी ॥ स्नानालागीं जातसे ॥८६॥

एकवीस स्वर्गीचे लोक समस्त ॥ मणिकर्णिकेसी आले बहुत ॥ तयांमाजी चरपटीनाथ ॥ विधी घेवूनि आलासे ॥८७॥

मग तात पुत्र करुनि स्नाना ॥ परतोनि आले स्वस्थाना ॥ याउपरी सहजस्थित होवून ॥ संवत्सर भरला असे ॥८८॥

नारदविद्या पूर्ण गमन ॥ मनीं चिंतितां पावे स्थान ॥ तया मार्गे गौरवून ॥ भोगावतीसी पातला ॥८९॥

विधिसुत चरपटनाथ ॥ गमन करीत महीं येत ॥ तेथेंही करुनि अन्य तीर्थ ॥ भोगावतीसी जातसे ॥१९०॥

करुनि भोगावतीचें स्नान ॥ सप्त पाताळ दृष्टीं पाहून ॥ बळिरायाच्या गृहीं जावून ॥ वामनातें वंदिलें ॥९१॥

बळीनें करुनि परम आतिथ्य ॥ बोळविला चरपटीनाथ ॥ यापरी इच्छापूर्ण नाथ ॥ भ्रमण करी महीसी ॥९२॥

ऐसी कथा ही सुरस ॥ कुसुममाळा ओपी त्यास ॥ कवि मालू श्रोतियांस ॥ भावेंकरुन अर्पीतसे ॥९३॥

नरहरीवंशी धुंडीसुत ॥ अनन्यभावें संतां शरणागत ॥ मालू ऐसे नाम देहाप्रत ॥ ज्ञानकृपें मिरवीतसे ॥९४॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ एकोनिचत्वारिंशत्ततिमोध्याय गोड हा ॥१९५॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ नवनाथभक्तिसार एकोनचत्वारिंशतितमोऽध्याय समाप्त ॥


श्री नवनाथ भक्तिसार पोथी – अध्याय ४०

श्रीगणेशाय नमः

जयजयाजी पंढरीनाथा ॥ पुंडलीकवरदा रुक्मिणीकांता ॥ दीनबंधो अनाथनाथा ॥ पुढें ग्रंथ बोलवीं ॥१॥

मागिलें अध्यायीं रसाळ वचन ॥ तुवां बोलविलें कृपेंकरुन ॥ स्वर्गी चरपटीनाथें जाऊन ॥ इंद्राचा गर्व हरिलासे ॥२॥

हरिहरांची जिंकूनि कोटी ॥ पुढे लोभाची भेटी ॥ गमनकळा नारदहोटीं ॥ प्राप्त झाली महाराजा ॥३॥

उपरी मनिकर्णिकेचें करुनि स्नान ॥ पुढें पातले पाताळभुवन ॥ घेवूनि बळीचा गौरव मान ॥ वामनातें भेटला ॥४॥

भोगावतीची करुनि आंघोळी ॥ पुनः पातला भूमंडळीं ॥ यावरी कथा पुढें कल्होळीं ॥ नवरसातें वाढी कां ॥५॥

असो आतां रमारमण ॥ ग्रंथाक्षरीं बैसला येवून ॥ तरी पुढें श्रोतीं सावधान ॥ कथारस घ्यावा कीं ॥६॥

इंद्र चरपटीनें जिंकला ॥ वैभवें मशकातुल्य केला ॥ तरी तो विस्मयवान खोंचला ॥ खडतरपणीं हदयांत ॥७॥

मग जो गुरु वाचस्पती ॥ परम ज्ञाता सर्वमूर्ती ॥ सहस्त्रनयन तयाप्रती ॥ घेवूनियां बैसलासे ॥८॥

देवमंडळांत सहस्त्रनयन ॥ घेवूनि बैसलासे कनकासन ॥ जैसा नक्षत्रीं रोहिणीरमण ॥ अति तेजें मिरवला ॥९॥

ऐशा रीती पाकशासन ॥ बैसला सेवूनि सभास्थान ॥ मग बृहस्पती विस्मयरत्न ॥ चरपटप्रताप सांगतसें ॥१०॥

अहा वय धाकुटें सान स्वरुप ॥ परी अर्कासमान थोर प्रताप ॥ हरिहरादि करुनि लोप ॥ स्थापूनि गेला आपुलेचि ॥११॥

तरी वाताकर्षणविद्या सबळ ॥ देवदानव झाले निर्बळ ॥ नाथपंथीं हें महाबळ ॥ आतळलें कैसें कळेना ॥१२॥

तरी यातें करुनि उपाय ॥ साध्य करावी इतुकी ठेव ॥ या कर्मासी कोण लाघव ॥ स्वीकारावें महाराजा ॥१३॥

कीं तयाच्या गृहाप्रती जावून ॥ दास्य करावें मनोधर्मे ॥ तोषवूनि सर्व कर्म ॥ महीवरी मिरवावें ॥१४॥

असो यापरी यत्न करुन ॥ भेट घ्यावी त्या गंवसून ॥ परी ते जोगी तीव्रपणें ॥ वर्तताती सर्वदा ॥१५॥

तरी उगलीच घेऊनि सदृढ भेट ॥ अर्थ वदावा तयासी निकट ॥ परी काय चाड आमुची अलोट ॥ कार्यार्थी भीड कोणती ॥१६॥

तरी भिडेचें उपजेपण ॥ उजेड पडेल दासत्वेंकरुन ॥ तयामागें रानोरान ॥ अपार मही हिंडावी ॥१७॥

तरी हिंडल्यानें कोणे काळीं ॥ उदय पावेल कृपानव्हाळी ॥ अमरपुरीची देवमंडळी ॥ तेजोयुक्त होईल ॥१८॥

म्हणाल ऐसें कासयान ॥ हा विपर्यास येईल घडोन ॥ तरी महीं होतो पुण्यपावन ॥ आसन माझें घेतसे ॥१९॥

तरी मी येथें सावधान ॥ करुनि रक्षितों आपुलें आसन ॥ तस्मात् अमरावती सोडून ॥ जाणें नाहीं मजलागीं ॥२०॥

ऐसें बोलतां अमरपती ॥ बोलता झाला वाचस्पती ॥ म्हणे महाराजा नाथाप्रती ॥ येथेंचि आणावे महायत्नें ॥२१॥

तरी तो यत्न म्हणशील कैसा ॥ यज्ञ करावा सोमभासा ॥ त्या निमित्तें नाथ राजसा ॥ घेवोनि यावें स्वर्गासी ॥२२॥

मग तो येथें आल्यापाठी ॥ दावूनि भक्तीची अपार कोटी ॥ मोह उपजवोनि नाथापोटीं ॥ कार्य साधूनि घेइजे ॥२३॥

ऐसें बोलतां तपोद्विज ॥ परम तोषला अमरराज ॥ उपरी म्हणे महाराज ॥ कोणा पाठवूं पाचाराया ॥२४॥

यावरी बोले कचतात ॥ हे महाराज अमरनाथ ॥ मच्छिंद्रपिता अष्टवसूंत ॥ उपरिचर नामें मिरवतसे ॥२५॥

उपरिचर जातां महीतळवटीं ॥ मच्छिंद्राची घेईल भेटी ॥ सांगूनि त्यातें कार्य शेवटीं ॥ मग मच्छिंद्र आम्हां बोधील ॥२६॥

तरी त्यातें पाचारुन ॥ कार्ययज्ञाचा वदूनि काम ॥ विमानयानीं रुढ करुन ॥ पाठवावा महाराजा ॥२७॥

यापरी मच्छिंद्रनाथ ॥ आला असतां अमरपुरींत ॥ गौरवोनि तुवां त्यातें ॥ तुष्टचित्तीं मिरवावा ॥२८॥

तरी शक्ति तव सरितालोट ॥ मच्छिंद्र उदधिपोट ॥ संगमिता पात्र अलोट ॥ प्रेमतोय भरलें असे ॥२९॥

तरी सुमुखाचें पडतां जळ ॥ कार्यशुक्तिकामुक्ताफळ ॥ तूतें ओपील तपोबळ ॥ नवनाथ आणोनियां ॥३०॥

मग तो मुक्त अविंधविधी ॥ लावी भक्तीच्या शस्त्रास्त्रसंधीं ॥ मग तें रत्न कर्णविधीं ॥ स्वीकारी कां महाराजा ॥३१॥

ऐसे ऐकूनि गुरुवचन ॥ परम तोषला सहस्त्रनयन ॥ मग रथीं मातली पाठवोन ॥ उपरिचरा पाचारी ॥३२॥

उपरिचर येतां वदे त्यातें ॥ म्हणे महाराजा कामना मनांत ॥ उदेली करुं सोममखातें ॥ पूर्ण करीं आतां तूं ॥३३॥

तरी विमानयानीं करोनि आरोहण ॥ जाऊनियां मच्छिंद्रनंदन ॥ उपरी त्यातें सवें घेऊन ॥ जावें नवनाथमेळीं ॥३४॥

मग ते आर्या भावार्थित ॥ मेळवोनि आणी अमरपुरींत ॥ सोममखाचें सकळ कृत्य ॥ तया हस्तें संपादूं ॥३५॥

अवश्य म्हणे वसुनाथ ॥ तत्काळ विमानयानीं बैसत ॥ बद्रिकाश्रमी मच्छिंद्रनाथ ॥ लक्षूनियां पातला ॥३६॥

तों गोरक्ष धर्मनाथ ॥ चौरंगी कानिफा गोपीचंद राजसुत ॥ बद्रिकाश्रमी जालंधर अडबंगीनाथ ॥ तीर्थस्नानीं ऐक्यमेळा झाला असे ॥३७॥

ऐशा समुदायांत मच्छिंद्रनाथें ॥ अवचटपणीं देखिला ताते ॥ मग उठोनि मौळी चरणातें ॥ समर्पीत महाराजा ॥३८॥

मग नाथ वसु भेटून ॥ बैसला सकळांमध्यें वेष्टून ॥ म्लानवाणीं कार्यरत्न ॥ अमरांचें सांगतसे ॥३९॥

म्हणे महाराज हो शक्रापोटीं ॥ अर्थ उदेला मखकोटी ॥ तरी आपण नवही जेठी ॥ साह्य व्हावें कार्यार्था ॥४०॥

बहुतांपरी करुनि भाषण ॥ सर्वांचे तुष्ट केलें मन ॥ उपरी मच्छिंद्रातें बोधून ॥ अवश्यपणीं वदविलें ॥४१॥

मग जालंदर कानिफा चौरंगी ॥ मच्छिंद्र गोरक्ष अडबंगी ॥ गोपीचंद रायादि अन्य जोगी ॥ आरुढ झाले विमानीं ॥४२॥

गौडबंगाली हेलापट्टण ॥ प्रविष्ट झालें तैं विमान ॥ राव गोपीचंद मातेसी भेटून ॥ समागमें घेतली ॥४३॥

उपरी विमानयानी होऊन ॥ पहाते झाले वडवालग्राम तेथून ॥ तेथें वटसिद्धनागनाथ पाहून ॥ आरुढ केला विमानीं ॥४४॥

तेथूनि भर्तरीचें करुनि काम ॥ विमान चालविती इच्छिल्या व्योमें ॥ तों गौतमतीरीं नाथ उत्तम ॥ जती भर्तरी अवतरला असे ॥४५॥

यापरी तीर्थ करितां महीपाठीं ॥ महासिद्ध जो नाथ चरपटी ॥ अवंतीसी होता ताम्रपर्णीकांठीं ॥ सवें घेतला महाराजा ॥४६॥

तेणें पुण्यमान देशी विटग्राम नामानें ॥ पहाते झाले विमानयानें ॥ तेथें रेवणसिद्ध बोधून ॥ आरुढ केला विमानीं ॥४७॥

असो नवनाथ परिवारासहित ॥ ते विमानयानीं झाले स्थित ॥ चौर्‍यायशीं सिद्धांसमवेत ॥ अमरपुरीं पातले ॥४८॥

विमान येतां ग्रामद्वारी ॥ सामोरा आला वृत्रारी ॥ परम गौरवोनि वागुत्तरीं ॥ चरणांवरी लोटला ॥४९॥

सकळां करोनि नमनानमन ॥ नेत सदना सहस्त्रनयन ॥ आपुल्या आसनीं बैसवोन ॥ षोडशोपचारें पूजिले ॥५०॥

नवनाथां पाहोनि सकळ अमर ॥ मनीं संतोषले अपार ॥ तेज पाहोनियां गंभीर ॥ उभे तेथें ठाकलें ॥५१॥

मग हवनकृत्य मनकामना ॥ वदतां झाला सकळ जनां ॥ म्हणे महाराजा कवणे स्थाना ॥ सिद्ध अर्थ अर्थावा ॥५२॥

मग वाचस्पति आणि मच्छिंद्रनाथ ॥ म्हणती सुरवरपाळा ऐक मात ॥ सिंहलद्वीपीं स्थान अदभुत ॥ यज्ञ तेथें करावा ॥५३॥

अटव्य कानन आहे तुमचें ॥ शीतळ छायाभरित जळाचें ॥ तेथें न्यून साहित्याचें ॥ पडणार नाहीं कांहींच ॥५४॥

उपरिचरन वसु गंधर्व घेऊन ॥ पाहत झालें अटव्यवन ॥ तेथें यज्ञसाहित्य आहुती करुन ॥ यज्ञ आरंभ मांडिला ॥५५॥

दंपत्य बैसोनि सहस्त्रनयन ॥ मंत्रप्रयोगीं बृहस्पती आपण ॥ यज्ञ आहुती नवही जण ॥ स्वाहा म्हणोनि कुंडीं टाकिती ॥५६॥

परी किलोतळेचे सीमे आंत ॥ अटव्यवन होते अदभुत ॥ यज्ञ होतां मीननाथ ॥ मच्छिंद्रातें आठवला ॥५७॥

मग पाचारोनि उपरिचर तात ॥ मच्छिंद्र म्हणे जी वसु समर्थ ॥ सिंहलद्वीपीं मीननाथ ॥ कवण ग्रामीं ठेविला ॥५८॥

येरु म्हणे त्याच्या ग्रामसीमेंत ॥ अटव्यवन हें विख्यात विराजित ॥ तरी कीलोतळेसहित मीननाथ ॥ पाचारितों आतांचि ॥५९॥

मग उपरिचर वसु प्रत्यक्ष जाऊन ॥ मीननाथासह कीलोतळारत्न ॥ पाचारुनि एक क्षण ॥ भेटी केली उभयतां ॥६०॥

परम स्नेहानें क्षण एक कांहीं ॥ वाहवले मोहप्रवाही ॥ उपरी दारा सुत तया ठायीं ॥ मच्छिंद्रानें ठेविले ॥६१॥

चौरंगी आणि अडबंगीनाथ ॥ मिरवीत बैसविले समुदायांत ॥ यज्ञआहुती तयांचे हस्तें ॥ स्वीकारीत महाराजा ॥६२॥

दहा नाथ यज्ञआहुती ॥ प्रवाहीं चाले मच्छिंद्रजती ॥ पुत्रमोह धरुनि चित्तीं ॥ अभ्यासातें बैसविला ॥६३॥

अभ्यास करितां मीननाथ ॥ वाचस्पती शक्रासी बोलत ॥ म्हणे महाराजा यज्ञार्थ ॥ तुम्ही बैसतां सरेना ॥६४॥

तरी दंपत्यार्थ उपरिचरवसु ॥ बैसवोनि पहावा अर्थ सुरसु ॥ ऐसे बोलतां प्राज्ञ विशेषु ॥ अमरपाळ समजला ॥६५॥

मग हातींचें सोडूनि यज्ञकंकण ॥ वसुहाती केलें स्थापन ॥ मग न्यूनपणें बहुतां प्रार्थून ॥ निजदृष्टीं विलोकी ॥६६॥

सर्व पदार्थ आणवोनि आपण ॥ अंगें झिजवी शचीरमण ॥ उदकपात्र सांगतां जाण ॥ सिद्ध होय पुढारी ॥६७॥

खाद्य भोज्य षड्रस अन्न ॥ करें आणीतसे पात्रीं वाढून ॥ शेवटीं शिणले तयाचे चरण ॥ निजहस्तीं चुरीतसे ॥६८॥

ऐसी सेवा करितां संपन्न ॥ तुष्ट होतसे जतीचे मन ॥ हदयीं भाविती यावरुन ॥ प्राणसांडी करावी ॥६९॥

येरीकडे मीननाथ ॥ सुतासी विद्या अभ्यासीत ॥ तो समय जाणोनि सापेक्ष ॥ इंद्र मयूरवेषें नटलासे ॥७०॥

निकटतरुशाखेवरती ॥ विद्या अभ्यासीत गुप्तपंथीं ॥ तों अकस्मात वातास्त्र जपती ॥ वाताकर्षण लाधलें ॥७१॥

दैवें सर्व तपराहटी ॥ सकळ लाधली हातवटी ॥ उपरी वाताकर्षणविद्या पाठीं ॥ वातप्रेरक अस्त्र लाधलें ॥७२॥

ऐसी विद्या होतां सघन ॥ परम हरुषला सहस्त्रनयन ॥ परी एक संवत्सर होतां यज्ञ ॥ अभ्यासीत तंववरी ॥७३॥

असो हवनअर्पण आहुती ॥ मग पावूनि पूर्ण समाप्ती ॥ मग मच्छिंद्रनाथ प्राज्ञिक जती ॥ अग्रपूजे बैसला ॥७४॥

मग पूजा करोनि सांगोपांग ॥ उपरी दशमनाथें पूजिलें अंग ॥ वस्त्रभूषणें चांग ॥ देऊनिया गौरविलें ॥७५॥

सकळां बैसवोनि कनकासनीं ॥ उभा राहिला जोडीनि पाणी ॥ सर्वासी वदे म्लानवदनीं ॥ नाथ वचन माझें परिसा ॥७६॥

मातें घडला एक अन्याय ॥ परी आपण सहन करा समुदाय ॥ म्यां मयूरवेष धरुनि मायें ॥ अभ्यासिलें विद्येतें ॥७७॥

मीनजतीचा प्रताप गहन ॥ मज सांपडलें विद्यारत्न ॥ तरी आपुला वर त्यातें देऊन ॥ सनाथपणीं मिरवावें ॥७८॥

ऐसें बोलतां अमरनाथ ॥ सर्वासी समजलें तस्करीकृत्य ॥ मग ते कोपोनि परम चित्तांत ॥ शापवचन बोलताती ॥७१॥

म्हणती इंद्रा तूं कृत्रिम ॥ आणिलें ठकवावया कारण ॥ तरी चोरुनि घेतलें विद्यारत्न ॥ निष्फळ होईल तुजलागीं ॥८०॥

ऐसें बोलता सकळ जती ॥ मग उपरिचर वसु वाचस्पती ॥ गौरवोनि अपार युक्तीं ॥ तुष्ट केलें चित्तांत ॥८१॥

म्हणती महाराजा शापमोचन ॥ पुढें बोला कांहीं वचन ॥ मग ते बोलती तयाकारण ॥ तप आचरावें इंद्रानें ॥८२॥

द्वादश वर्षे तप आचरितां ॥ विद्या फळेल तत्त्वतां ॥ परी नाथपंथी छळ न होतां ॥ पदरावरी पडेल ॥८३॥

ऐसें बोलोनि सकळ जती ॥ विमानारुढ झाले समस्ती ॥ खाली उतरुनि महीवरती ॥ नाना तीर्थे भ्रमताती ॥८४॥

ऐसें भ्रमण करितां जती ॥ तीर्थे झालीं अपरिमिती ॥ याउपरी कीलोतळेतें मच्छिंद्रजती ॥ पुसोनिया चालिला ॥८५॥

मग तें कीलोतळेचें नमन ॥ अवर्ण्य आहे अनुष्ठान ॥ नेत्रीं प्रेमबिंदु आणोन ॥ बोळविलें नाथासी ॥८६॥

सवें घेऊनि मीननाथ ॥ विमानयानी झाले समस्त ॥ खालीं उतरुनि मृत्युमहींत ॥ नाना तीर्थे पाहिलीं ॥८७॥

हेलापट्टणीं मैनावती ॥ पोहोंचवोनि तीर्थे हिंडती ॥ तेव्हां मीननाथें तीर्थक्षितीं ॥ सिद्ध तीन निर्मिले ॥८८॥

तयांचें सांगितलें पूर्वी नाम ॥ आतां सांगावया नाहीं काम ॥ असो सिद्धकटकासह उत्तम ॥ तीर्थे करीत भ्रमताती ॥८९॥

येरीकडे अमरनाथ ॥ लक्षूनियां सह्याद्रिपर्वत ॥ द्वादश वरुषें तप निश्चित ॥ तीव्रपणी आचरला ॥९०॥

परी तें आचरितां तीव्रपणीं ॥ मंत्रप्रयोगें सोडी पाणी ॥ तेणें सरिता लोट लोटोनी ॥ भीमरथीतें भेटली ॥९१॥

तें मणिकर्णिकेचे जीवन ॥ आणिलें होतें कमंडलू भरोन ॥ परी इंद्रहस्तीं प्रवाही होऊन ॥ इंद्रायणीं पडियेलें ॥९२॥

ऐसें तप करोन ॥ स्वस्थानासी इंद्र जाऊन ॥ उपरी नवनाथ करितां तीर्थाटन ॥ बहुत दिवस लोटले ॥९३॥

शके सत्राशें दहापर्यंत ॥ प्रकटरुपें मिरवले नाथ ॥ मग येऊनि आपुले स्थानांत ॥ गुप्तरुपें राहिले ॥९४॥

मठींत राहिला कानिफाजती ॥ उपरी मछिंद्रासी मायबाप म्हणती ॥ जानपीर जो जालंदर जती ॥ गर्भागिरीं नांदतसे ॥९५॥

त्याहूनि खालतां गैबीपीर ॥ तो गहनीनाथ परम सुंदर ॥ वडवानळ ग्रामीं समाधिपर ॥ नागनाथ असे कीं ॥९६॥

वीटग्रामीं मानवदेशांत ॥ तेथें राहिले रेवणनाथ ॥ चरपट चौरंगी अडबंगी तीर्थ ॥ गुप्त अद्यापि करिताती ॥९७॥

भर्तरी राहिला पाताळभुवनीं ॥ मीननाथ गेला स्वर्गालागोनी ॥ गिरनार पर्वतीं गोरक्षमुनी ॥ दत्ताश्रमीं राहिला ॥९८॥

गोपीचंद आणि धर्मनाथ ॥ ते स्वसामर्थ्ये गेले वैकुंठांत ॥ विमान पाठवोनि मैनावतीतें ॥ घेऊनि विष्णु गेलासे ॥९९॥

पुढें चौर्‍यायशीं सिद्धांपासून ॥ नाथपंथ मिरवला अतिसामर्थ्यानें ॥ येथूनि चरित्र झालें संपूर्ण ॥ सर्व नाथांचें महाराजा ॥१००॥

तरी आतां सांगतों मुळापासून ॥ कथा वर्तली कवण ॥ प्रथमाध्यायीं गणपतिस्तवन ॥ सुंदरपणीं मिरवले ॥१॥

उपरी सांगूनि रेताक्षिती ॥ आणि मच्छिंद्राची जन्मस्थिती ॥ तो बद्रिकाश्रमाप्रती ॥ तपालागीं बैसला ॥२॥

या प्रसंगाचें श्रवण पठण ॥ नित्य करितां भावेंकरुन ॥ तरी समंधबाधा घरांतून ॥ जाईल वासूनी महाराजा ॥३॥

द्वितीय अध्यायीं अत्रिनंदन ॥ विद्यार्णव केला अनुग्रह देऊन ॥ उपरी नागपत्रीं अश्वत्थी जाऊन ॥ सिद्धयर्थकळा साधिली ॥४॥

तो अध्याय करितां नित्य पठण ॥ अपार धन लाभेल संसारी जाण ॥ विजयलक्ष्मी पाठीं बैसून ॥ करील हरण दरिद्र ॥५॥

तृतीय अध्यायीं मच्छिंद्र मारुती ॥ युद्धा प्रवर्तले श्वेतक्षितीं ॥ युद्ध करुनि उपरांतीं ॥ ऐक्यचित्त झालें असे ॥६॥

याचें झालिया पठण ॥ शत्रु होतील क्षीण ॥ मुष्टिविद्यासाधन ॥ तया होत सर्वथा ॥७॥

मुष्टिबाधा झाली असोन ॥ अपकार होईल तियेने ॥ मुर्तिमंत मारुती करोनि रक्षण ॥ राहे तया घरीं सर्वदा ॥८॥

चतुर्थ अध्यायीं वदली कथा ॥ अष्टभैरव चामुंडा समस्ता ॥ रणीं जिंकूनि वसुसुता ॥ ज्वालामुखी भेटली ॥९॥

तो अध्याय नित्यपठण करितां ॥ चुकेल कपटाची बंधनव्यथा ॥ शत्रु पराभवोनि सर्वथा ॥ निरंतर शांति मिरवेल ॥११०॥

पांचवे अध्यायींचे कथन ॥ भूतें घेतलीं प्रसन्न करुन ॥ अष्टपती जिंकून ॥ विजयी झाला मच्छिंद्र ॥११॥

ती कथा नित्य करिता पठण ॥ भूतसंचार नोहे त्या घराकारण ॥ आले असतां जाती सोडोन ॥ परम त्रासेंकरोनियां ॥१२॥

सहाव्या अध्यायांत ॥ शिवअस्त्र कालिका मच्छिंद्रनाथ ॥ युद्ध करुनि प्रसन्नचित्त ॥ वश्य झालीं अस्त्रें ती ॥१३॥

तो अध्याय नित्य करितां पठण ॥ शत्रूलागीं पडेल मोहन ॥ निष्कपट तो करुनि मन ॥ किंकर होईल द्वारींचा ॥१४॥

सातव्या अध्यायीं अपूर्व कथा ॥ जिंकूनि वीरभद्र केली ऐक्यता ॥ उपरी स्वर्गापासाव मच्छिंद्रनाथा ॥ इच्छेसमान झालीसे ॥१५॥

ती कथा नित्य गातां ऐकतां ॥ लिप्त नोहे त्रौर्‍यायशींची व्यथा ॥ झाली असेल मिटेल सर्वथा ॥ चिंत्ता व्यथा हरतील ॥१६॥

जखीणभयापासुनी ॥ त्वरित मुक्त होईल जनीं ॥ एक मंडळ त्रिकालीं अभ्यासूनी ॥ फलप्राप्ति घेइजे ॥१७॥

आठव अध्यायीं सकळ कथन ॥ पाशुपतरायासी रामदर्शन ॥ रणीं मित्रराज जिंकोन ॥ केला प्रसन्न विद्येसीं ॥१८॥

तो अध्याय नित्य गातां ऐकतां ॥ आपुला सखा देशावरता ॥ तो गृहासी येऊन भेटेल तत्त्वतां ॥ चिंताव्यथा हरेल कीं ॥१९॥

नववे अध्यायीं कथन ॥ गोरक्षाचा होऊनि जन्म ॥ उपरी सेवूनि बद्रिकाश्रम ॥ विद्यार्णव झालासें ॥१२०॥

तो अध्याय नित्य गातां ऐकतां ॥ साधेल विद्या इच्छिल्या अर्था ॥ ब्रह्मज्ञान रसायण कविता ॥ चवदा विद्या करोनि राहे ॥२१॥

दशम अध्यायीचें कथन ॥ स्त्रीदेशीं मच्छिंद्रनंदन ॥ अंजनीसुतअर्थी पाठवोन ॥ अर्थ किलोतळेचे पुरविले ॥२२॥

एकांतीं बैसूनि अनुष्ठान ॥ संजीवनी पाठ करी गौरनंदन ॥ गहिनीनाथाचा झाला जन्म ॥ कर्दमपुतळा करितां तो ॥२३॥

तो अध्याय करितां पठण ॥ स्त्रियांचे दोष जातील कपटपण ॥ फळे वाचतील होतां जाण ॥ जगीं संतती मिरवेल ॥२४॥

उपरी गृहद्रव्याच्या यज्ञांत ॥ उदय पावला जालिंदरनाथ ॥ तो एकादश अध्याय पठण करितां नित्य ॥ अग्निपीडा होईना ॥२५॥

आणि जयाचे धवळारात ॥ पूर्वीचा कांहीं दोष असत ॥ तो जाऊनि संपत्तिविशेषातें ॥ संततीसह भोगील कीं ॥२६॥

बाराव्यांत हें कथन ॥ जालिंदरें गुरु केला अत्रिनंदन ॥ उपरी कानिफाचा होऊनि जन्म ॥ विटंबिले देवांसी ॥२७॥

तो अध्याय करितां पठण ॥ क्षोभ न पावे कोणी देवता जाण ॥ क्षोभित असल्या होतील शमन ॥ सुख सर्व त्याचि देती ॥२८॥

तेराव्या अध्यायांत ॥ मैनावतीतें प्रसन्न नाथ ॥ होऊनि केलें अचल सनाथ ॥ ब्रह्मरुपीं आगळी ॥२९॥

तरी तो अध्याय करितां पठण ॥ स्त्रीहत्येचें दोष सघन ॥ त्यांचे होऊनि सकळ निरसन ॥ उद्धरील पूर्वजां चतुर्दश ॥१३०॥

चतुर्दश अध्यायीं कथन ॥ गर्तेत जालिंदर गोपीचंदानें ॥ स्त्रीबोलें घातले नेऊन ॥ गुप्त निशीमाझारी ॥३१॥

तो अध्याय पठण करितां ॥ असेल बंध कारागृहीं व्यथा ॥ तरी त्याची होईल मुक्तता ॥ निर्दोष जनीं वर्तेल ॥३२॥

पंचदशांत सुढाळ कथन ॥ कानिफामारुतीचे युद्धकंदन ॥ उपरी स्त्रीराज्यांत जाऊन ॥ आतिथ्य पूर्ण भोगिलें ॥३३॥

तो अध्याय गातां ऐकता नित्य ॥ घरचे दारचे कलह नित्यकृत्य ॥ शांति पावोनि सर्व सुखांत ॥ निर्भयपणें नांदेल ॥३४॥

सोळावे अध्यायांत ॥ कानिफा भेटला गोपीचंदातें ॥ तरी तो अध्याय वाचितां नित्यानित्य ॥ दुःस्वप्नातें नाशील ॥३५॥

सप्तदश अध्यायीं कथन ॥ जालिंदर काढिला गर्तेतून ॥ उपरी नाथाची दीक्षा घेऊन ॥ गोपीचंदें अर्चिला ॥३६॥

तोचि अध्याय पठण करितां ॥ योग साधेल योग आचरतां ॥ दुष्टबुद्धि जाईल सर्वथा ॥ सुपंथपंथा लागेल तो ॥३७॥

अष्टादश अध्यायीं कथन ॥ बद्रिकाश्रमी गोपीचंद जाऊन ॥ तपःपूर्ण भगिनी उठवोन ॥ तीव्रपणीं आचरला ॥३८॥

तो अध्याय नित्य पठण करितां ॥ ब्रह्महत्या नासेल सर्वथा ॥ पूर्वज कुंभीपाकीं असतां ॥ सुटका होईल तयांची ॥३९॥

एकोणिसाव्यात गोरक्षाकारण ॥ भेटला मारुति श्रीरामप्रीतीने ॥ तरी तो अध्याय करितां पठण ॥ तया मोक्षार्थ साधेल कां ॥१४०॥

तिसाव्यात अदभुत कथन ॥ श्रीमाच्छिंद्रा भेटीचे कारण ॥ गोरक्ष स्त्रीराज्यांत जाऊन ॥ स्नेहसंपन्न जाहला ॥४१॥

तो अध्याय पठण करितां गोड ॥ लागलें असेल अत्यंत वेड ॥ तरी ती चेष्टा जाऊनि धड ॥ होऊनि प्रपंच आचरेल ॥४२॥

एकविसाव्यांत स्त्रीराज्यांतून ॥ मच्छिंद्रासी काढिलें गोरक्षनंदनें ॥ नानापरी बोधूनि मन ॥ दुष्टकर्मातें निवटिलें ॥४३॥

तो नित्य अध्याय पठण करितां ॥ नासेल बहुजन्माची गोहत्या ॥ निष्कलंक होऊनि चित्ता ॥ तपोलोकीं मिरवेल ॥४४॥

बाविसाव्यांत सोरटीग्रामी ॥ गोरक्षें मीननाथा मारोनी ॥ पुन्हां उठविला मंत्रेंकरोनी ॥ मच्छिंद्रमोहेंकरुनियां ॥४५॥

तरी तो अध्याय नित्य पठण करितां ॥ पुत्रांर्थिया पुत्र तत्त्वतां ॥ तो होईल विद्यावंत ॥ विद्वज्जना मान्य कीं ॥४६॥

तेविसाव्यांत रसाळ कथन ॥ मच्छिंद्र गोरक्ष गर्भाद्री जाऊन ॥ सुवर्णविटेकरितां सुवर्ण ॥ गर्भगिरि केला असे ॥४७॥

आणिक केला तेथें उत्सव ॥ तरी तो अध्याय पठण नित्य भावे ॥ करितां घरीं सुवर्ण नव ॥ अखंड राहे भरोनि ॥४८॥

चोविसाव्यांत भर्तरीनाथ ॥ जन्मोनि आला आवंतिकेंत ॥ तरी तो अध्याय पठण करितां नित्य ॥ बाळहत्या नासेल ॥४९॥

बाळहत्या जन्मांतरी ॥ तेणें समस्त वांझ होती नारी ॥ तरी ते नासेल संसारीं ॥ सुखी होऊनि बाळ वांचे ॥१५०॥

पंचविसाव्यात गंधर्व सुरोचन ॥ रासभ झाला शापेंकरुन ॥ तरी तो अध्याय केलिया पठण ॥ शापवचन बाधेना ॥५१॥

आणि मानवाविण दुसरा जन्म ॥ होणार नाही तयाकारण ॥ आरोग्य काया पतिव्रता कामिन ॥ पुत्र गुणी होईल ॥५२॥

सव्विसावे अध्यायांत ॥ गणगंधर्व झाला विक्रमसुत ॥ आणि विक्रम भर्तरीसुत ॥ एकचित्त ॥ भेटी होऊनि राहिले ॥५३॥

तो अध्याय करितां पठण ॥ गोत्रहत्या जाति नासून ॥ पोटीं पाठीं शत्रुसंतान ॥ न राहे होऊनियां ॥५४॥

सत्ताविसाव्यांत अदभुत कथन ॥ राज्यपदी बैसला राव विक्रम ॥ भर्तरी पिंगलेचें होऊनि लग्न ॥ दत्तानुग्रह लाधला ॥५५॥

तरी तो अध्याय करितां पठण ॥ पदच्युत पावेल पूर्वस्थान ॥ गेली वस्तु पुनः परतोन ॥ सांपडेल तयांची ॥५६॥

अट्ठाविसाव्या अध्यायांत ॥ पिंगलेकरितां स्मशानांत ॥ विरक्त होऊनि भर्तरीनाथ ॥ पूर्ण तप आचरला ॥५७॥

तो अध्याय करितां श्रवण पठण ॥ त्या भाविकाचें होईल लग्न ॥ कांता लाभेल गुणवान ॥ सदा रत सेवेसी ॥५८॥

एकुणतिसावे अध्यायींचे चरित्र ॥ भर्तरी होऊनि विरक्त पवित्र ॥ गोरक्ष सांगती अत्रिपुत्र ॥ गुरुनाथ पै केला ॥५९॥

तो अध्याय नित्य करितां पठण ॥ सुटेल क्षयरोगापासून ॥ आणि त्रितापांची वार्ता जाण ॥ कालत्रयीं घडेना ॥१६०॥

तिसाव्या अध्ययांत ॥ जन्मला चौरंगीनाथ ॥ परी तें चरित्र पठण करितां ॥ तस्करी दृष्टी बंधन होय ॥६१॥

एकतिसाव्यांत चौरंगीनाथ ॥ तपा बैसला हिमालयांत ॥ तरी तो अध्याय पढतां ॥ कपटमंत्र न चालती ॥६२॥

बत्तिसाव्यांत सुगम कथन ॥ मच्छिंद्र त्रिविक्रमदेहीं संचरोन ॥ द्वादश वर्षे राज्य करोन ॥ रेवतीसी पुत्र दिधला ॥६३॥

त्या अध्यायाचें करितां पठण ॥ अयुष्य असतां देहाकारण ॥ गंडांतरें करुं येतील विघ्नें ॥ आपोआप टळतील कीं ॥६४॥

तेहतिसाव्यांत गौरनंदन ॥ वीरभद्राचा घेऊनि प्राण ॥ मच्छिंद्रशव स्वर्गाहून ॥ महीवरती उतरिलें ॥६५॥

तरी ती कथा करितां पठण ॥ धनुर्वाताचें निरसे विघ्न ॥ झालेल्यातें होतां श्रवण ॥ पीडा हरेल तयाची ॥६६॥

चौतिसाव्यांत रेवणजन्म ॥ होऊनि भेटला अत्रिनंदन ॥ सहज सिद्धिकळा दावून ॥ गेला असे महाराजा ॥६७॥

तरी ती कथा करितां पठण ॥ जाणें कोणत्याही कार्याकारण ॥ तो सिद्धार्थ साधेल कार्यसाधन ॥ यश घेऊन येईल तो ॥६८॥

पस्तिसाव्यांत पूर्ण कथन ॥ रेवण झाला विद्यावान ॥ दत्तकृपें स्वर्गी जाऊन ॥ बाळें आणिलीं विप्राचीं ॥६९॥

तरी ती कथा करितां पठण ॥ महासिद्ध येईल उदराकारण ॥ बेचाळिसांचें करुनि उद्धरण ॥ गातील आख्यान लोक परी ॥१७०॥

छत्तिसाव्यांत अपूर्व कथा ॥ जन्म झाला वटसिद्धनाथा ॥ आस्तिक ऋषि झाला ताता ॥ तयाचिये मातेसी ॥७१॥

ती कथा करितां श्रवण पठण ॥ सर्पवृश्चिक दंश जयाकारण ॥ झालिया विषाचें उत्तीर्ण ॥ श्रवण केलिया अध्याय तो ॥७२॥

सदतिसाव्या अध्यायांत ॥ नागनाथासी गुरु झाला अत्रिसुत ॥ उपरी विद्याबळें मच्छिंद्रनाथ ॥ जिंकियेले भिडोनी ॥७३॥

ती कथा करितां श्रवण पठण ॥ सदना न लागे कुशीलपण ॥ लागल्या त्याचें होईल बंधन ॥ विद्यावंत होऊनियां ॥७४॥

अडतिसाव्यांत चरपटीचा जन्म ॥ होऊनि दत्तात्रेयें दीक्षा देऊन ॥ विद्येमाजी करुनि संपन्न ॥ तीर्थावली धाडिला ॥७५॥

तरी ती कथा सुरस ॥ श्रवण पठण होतां त्यास ॥ हिंवताप मधुरा नवज्वरास ॥ शांति होईल सर्वस्वीं ॥७६॥

एकूणचाळिसाव्यांत कथा ॥ चरपटीनें जिंकिलें अमरनाथा ॥ हरिहरादि देवां समस्तां ॥ स्वर्गी ख्याती लाविली ॥७७॥

तरी तो अध्याय करितां पठण ॥ तो युद्धां जातां तपोधन ॥ शस्त्रबाण पावोन ॥ जय घेऊन येईल कीं ॥७८॥

यावरी चाळिसाव्यांत कथन ॥ सर्व नाथांतें पाकशासन ॥ स्वर्गी नेऊनि करी हवन ॥ विद्यार्थिरुपें अर्थ पुरविला ॥७९॥

तरी चाळिसावा नित्य पठण करितां ॥ लाभेल सर्व इच्छिल्या अर्था ॥ यश श्री ऐश्वर्य योग्यता ॥ पुत्रपौत्रीं नांदेल ॥१८०॥

एकुणचाळिसांचा फलार्थ ॥ तोचि प्राप्त तदर्थ ॥ कीं चाळिसावा एक परिस ॥ कीं कामधेनु कल्पतरु ॥८१॥

गोरक्ष बोलतो वाचेकरुन ॥ त्यातें असत्य मानील जन ॥ जो निंदक यातें दावील निंदून ॥ तो अधिकारी विघ्नांचा ॥८२॥

इहलोकीं परलोकीं ॥ राहणार नाहीं परम सुखी ॥ निर्वश पावोनि शेवटीं वंशीं ॥ पिचेल ग्रंथ निंदितां हा ॥८३॥

अगा हा ग्रंथ नोहे भक्तिसार ॥ आहे गोरक्षाचा किमयागार ॥ परी पालटोनि भाषांतर ॥ महाराष्ट्र अक्षरीं रेखिला ॥८४॥

म्हणोनि श्रोते हो भाविक जन ॥ सोडोनि द्या कीं निंदावचन ॥ विश्वासपर स्वार होऊन ॥ मोक्षमुक्काम करी कीं ॥८५॥

तरी हा ग्रंथ संग्रह करुन ॥ चमत्कार पाहावा पठण करुन ॥ हे चाळीस प्रसंग मंत्रनिर्वाण ॥ महासिद्धीचे असती कीं ॥८६॥

हे चाळीस मंत्र परोपकारी ॥ आहेत दुःखाची करतील बोहरी ॥ तरी संग्रह करुनि उगलेचि घरी ॥ ठेवा विश्वास धरुनियां ॥८७॥

ह्या चाळीस अध्यायांत मंत्रयंत्र ॥ सुखकारक असती अति पवित्र ॥ दुःखदरिद्रहरण सर्वत्र ॥ गोरक्षकानें निर्मिलें ॥८८॥

पठण करितां षण्मासमिति ॥ जो अध्याय ज्या कार्याप्रति ॥ तें कार्य होईल निःसंशय चित्तीं ॥ पठण करुनि पहावें ॥८९॥

याउपरी वाचितां न ये जरी ॥ तरी संग्रह करुनि ठेवावा घरीं ॥ नित्य वंदितां नमस्कारीं ॥ कार्य त्यांतचि घडेल ॥१९०॥

एक कुसुम झोंकूनि वरती ॥ चला म्हणावें मम कार्याप्रति ॥ नवनाथ वंदूनि उक्ति ॥ नमस्कार करावा ॥९१॥

ऐसा याचा आहे मार्ग ॥ करुनि पहावा चमत्कार चांग ॥ नवनाथ ओडवोनि अंग ॥ कार्य तुमचें करितील कीं ॥९२॥

तरी असो विजय संपत्ती ॥ नांदो श्रोत्याच्या गृहाप्रति ॥ धुंडिसुत हेंचि प्रार्थी ॥ मालू नरहरी देवाते ॥९३॥

शके सत्राशें एकेचाळीस ॥ प्रमाथीनाम ज्येष्ठ मास ॥ शुक्लपक्ष प्रतिपदेस ॥ ग्रंथ समाप्त जाहला ॥९४॥

तरी ओंव्या सर्व नेमस्त ॥ सप्तसहस्त्र सहाशत ॥ उपरी ऐसे देदीप्यवंत ॥ ओंव्या मंत्र असती ह्या ॥९५॥

अध्याय वाचावया न बनेल ज्यासी ॥ तरी अध्यायांतील एक ओंवीसी ॥ पठण करुनि नाथनामासी ॥ कार्यकाज करावें ॥९६॥

असो आतां बहु भाव ॥ श्रोते असोत चिरंजीव ॥ इहलोकीं परलोकीं ठेव ॥ आनंदाची होतसे ॥९७॥

तरी समस्त नाथांतें धुंडीसुत ॥ मालू नरहरि हेंचि विनवीत ॥ कीं श्रोते असोत सुखरुपवंत ॥ सर्व अर्थी सर्वदा ॥९८॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ चत्वारिंशतितमाध्याय गोड हा ॥१९९॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ अध्याय ४० ॥ ओंव्या १९९ ॥

॥ नवनाथभक्तिसार चत्वारिंशतितमोऽध्याय समाप्त ॥

॥ नवनाथांचा श्लोक ॥

गोरक्षजालंदरचर्पटाश्च अडबंगकानीफमछिंदराद्याः ।

चौरंगिरेवाणकभर्तिसंज्ञा भूम्यां बभूवुर्नवनाथसिद्धाः ॥

॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥


श्री नवनाथ भक्तिसार १ ते ४० समाप्त.