संत नामदेव अभंग उपदेश १ ते ३०
१.
भक्तिभावें वळे गा देव । महाराज पंढरिराव ॥१॥
पंढरीसी जावें । संतजना भेटावें ॥२॥
भक्ति आहे ज्याचें चित्तीं । त्याला पावतो निश्चिती ॥३॥
भाव घरा मनीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥
२.
बांधोनियां हात गयाळ मारिती । दंड ते करिती मोक्षासाठीं ॥१॥
गेले ते पितर मोक्षालागीं तुझे । आतां देईं माझे दक्षिणेसी ॥२॥
बापुडें केंश बोडिती मिशीदाढी । मग दक्षणा हिरडी खातसे हे ॥३॥
फार काय सांगों मेल्याविण मुक्ती । नाहीं ते वांछिती स्वप्न सुख ॥४॥
अनंत जन्म मृत्यु होतां जैसें दु:ख । त्याहूनि अशेष आहे तेथें ॥५॥
भांबावले जन धांवे आटाआटी । सोडूनियां कोटि अनंत पद ॥६॥
नलगे गाळावें नलगे तळावें । नलगे मरावें मुक्तीसाठीं ॥७॥
मुक्ति लागे पायां जाऊनियां पाहे । जीव जातां देह जनी नाहीं ॥८॥
३.
धनियाचें पडपे गेला । जीव जिवें जीव झाला ॥१॥
देहीं देह हारपले । गेह गेहातीत झालें ॥२॥
झाला आश्रम आश्रमा । जनी म्हणे धरा प्रेमा ॥३॥
४.
झाली जगाचिये सीमा । वस्तुभाव येर व्योमा ॥१॥
पहा हो अधिकारी । नको असोनी भिकारी ॥२॥
पट तंतूंचा घडला । घट मृत्तिकेचा झाला ॥३॥
पहा श्वानसमची पंडित । जनी म्हणे एकचि मात ॥४॥
५.
नाद पडे कानीं । मृग पैज घाली प्राणी ॥१॥
आवडी अंतरीं । गज मेला पडे गारी ॥२॥
चोख पाहे अंग । दिपे नाडला पतंग ॥३॥
गोडी रसगळा । मच्छ अडकला गळा ॥४॥
गंधें अलि नेला । म्हणे जनी तोचि मेला ॥५॥
६.
भृंगीचिया अंगीं कोणतें हो बळ । शरिरें अनाढळ केली आळी ॥१॥
काय तिनें तपमुद्रा धरियेली । म्हणोनियां झाली भृंगीं अंगें ॥२॥
अरे बा शहाणिया तैसा करीं जप । संतयोगें पाप नाहीं होय ॥३॥
नामयाची जनी पिटिती डांगोरा । संदेह न धरा करा पूजा ॥४॥
७.
जहज तारिलें तारिलें । शेवटीं उगमासी आलें ॥१॥
भाव शिडासी लाविला । नाम फरारा सोडिला ॥२॥
कथा भरियेलें कोणें । घ्यारे नका दैन्यवाणें ॥३॥
एका मनाचा विसार । आधीं देउनी निर्धार ॥४॥
कोण देतो फुकासाठीं । आर्तभूत व्हावें पोटीं ॥५॥
आर्तभूत व्हारे । जनी म्हणे केणें घ्यारे ॥६॥
८.
हेंचि देवांचें भजन । सदा राहे समाधान ॥१॥
येर अवघे संसारिक । इंद्र देव ब्रम्हादिक ॥२॥
वरकडाचा पाड किती । जनी देवास बोलती ॥३॥
९.
चोरा संगतीनें गेला । वाटे जातां नागवला ॥१॥
तैसी सांडोनियां भक्ती । धरी विषयाची संगती ॥२॥
अग्निसवें खेळे । न जळे तो परी पोळे ॥३॥
विश्वासला चोरा । जनी म्हणे घाला बरा ॥४॥
१०.
जगीं विठ्ठल रुक्मिणी । तुम्ही अखंड स्मरा ध्यानी ॥१॥
मग तुज काय उणें । झालें सोयरे त्रिभुवनें ॥२॥
साराचें जें सार । भवसिंधु उतरी पार ॥३॥
मन ठेउनी चरणीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥
११.
सुखें संसार करावा । माजी विठ्ठल आठवावा ॥१॥
असोनियां देहीं । छाया पुरुष जैसा पाहीं ॥२॥
जैसा सूर्य घटाकाशीं । तैसी देहीं जनी दासी ॥३॥
१२.
अंगीं हो पैं शांती । दया क्षमा सर्वांभूतीं ॥१॥
जेथें जाऊन पाहे देवा । ब्रम्हादिक करिती सेवा ॥२॥
आवडी असे पैं कीर्तनीं । लवे संतांचे चरणीं ॥३॥
जैसी दया पुत्रावरी । तेंचि पाहे चराचरीं ॥४॥
बहु अपराध केला । म्हणे जनी तो रक्षिला ॥५॥
१३.
मृदु वाहे पाणी । वृजमानी ऐसें लाणी ॥१॥
क्षमा ऐसी जिवीं । क्रोधभूत हें पृथ्वी ॥२॥
गंधमाती सरी । करुनी आपुली कस्तुरी ॥३॥
गुणदोष मना नाणीं । म्हणे बहिरी होय जनी ॥४॥
१४.
आपणची सारा । पाहावें कीं नारीनरां ॥१॥
पटा कारणे हे जनी । पांडुरंग तंतु मनीं ॥२॥
भावेंवीण भजलें । भिउनियां झांकीं डोळे ॥२॥
म्हणे काय पाहूं येतें । भिन्न नव्हे वस्तु जेथें ॥४॥
भिन्नाभिन्न नाहीं मनीं । म्हणे नामयाची जनी ॥५॥
१५.
आक्रोशें ध्यानासीं आणी पुरुषोत्तमा । पृथ्वीयेसी क्षमा उणी आणी ॥१॥
अखंडित शुद्ध असावें अंतर । लोणिया कठोर वाटे मनीं ॥२॥
बोलें तें वचन बहु हळुवट । सुमना अंगीं दाट जडभार ॥३॥
नाम तें स्मरण अमृतसंजिवनी । म्हणे दासी जनी हेंचि करा ॥४॥
१६.
आम्ही आणि संत संत आणि आम्ही । सूर्य आणि रश्मि काय दोन ॥१॥
दीप आणि सारंग सारंग आणि दीप । ध्यान आणि जप काय दोन ॥२॥
शांति आणि विरक्ति विरक्ति आणि शांती । समाधान तृप्ति काय दोन ॥३॥
रोग आणि व्याधी व्याधी आणि रोग । देह आणि अंग काय दोन ॥४॥
कान आणि श्रोत्न श्रोत्र आणि कान । यश आणि मान काय दोन ॥५॥
देव आणि संत संत आणि देव । म्हणे जनी भाव के ऐसा ॥६॥
१७.
संत आणि देव मानी जो वेगळे । तेणें येथें आगळे केले दोष ॥१॥
माता ते वेगळी कुच तें आगळें । म्हणोनि गरळें पितो मद ॥३॥
दिवस उगवतां पाहों नये त्यातें । जेणें हो संतांतें द्वेषियेलें ॥४॥
तयाचा विटाळ वाहे रजस्वला । म्हणे जनी चांडाळा बोलावूं नका ॥५॥
१८.
पाणी तेंचि मेघ मेघ तेंचि पाणी । काया या दोन्ही पणीं वेगळीक ॥१॥
माती तेचि धूळ धूळ तेचि माती । भेंडा आणि भिंती काय दोन ॥२॥
साखरीं गोडी गोडी साखरेसी । थिजलें तुपासी काय दोन्ही ॥३॥
डोळा तें बुबुळ बुबुळ तो डोळा । शांति ज्ञानकळा काय भिन्न ॥४॥
वदन ते ओंठ ओंठ तें वदन । क्षेमआलिंगन काय दोन ॥५॥
जीभ ते पडजीभ पडजीभ ते जीभ । आशा आणि लोभ काय दोन ॥६॥
संत तेचि देव देव तेचि संत । म्हणे जनी मात गोष्टी भिन्न ॥७॥
१९.
प्रपंचीं जो रडे । ब्रम्हावन त्यातें जडे ॥१॥
ऐसा अखंडित ब्रम्हीं । विठ्ठला जो कर्माकर्मीं ॥२॥
पुत्रदेह ध्याया ध्यानीं । कांता धनवो कामिनी ॥३॥
सिंधूसी सांडावा । जनी म्हणे गा सदैवा ॥४॥
२०.
काम लागे कृषापाठीं । कोली स्मशानाची गांठी ॥१॥
परम कामें भुलविला । कृष्ण स्मशानासी नेला ॥२॥
भुलविला मनीं । रुद्र पाहोनी मोहनी ॥३॥
कन्येचिये पाठीं । ब्रम्हा लागे हतवटी ॥४॥
काम पराशरालागीं । ज्ञानासी लाविली आगी ॥५॥
काम गेला शुकापाठीं । म्हणे जनी मारी काठी ॥६॥
२१.
भजन करी महादेव । राम पूजी सदाशिव ॥१॥
दोघे देव एक पाहीं । तयां ऐक्य दुजें नाहीं ॥२॥
शिवा रामा नाहीं भेद । ऐसे देव तेही सिद्ध ॥३॥
जनी म्हणे आत्मा एक । सर्व घटीं तो व्यापक ॥४॥
२२.
पतंग सुखावला भारी । उडी घाली दीपावरी ॥१॥
परि तो देहांतीं मुकला । दोहीं पदार्थीं नाडिला ॥२॥
विषयांचे संगती । बहु गेले अधोगती ॥३॥
ऐसे विषयानें भुलविले । जनी म्हणे वांयां गेले ॥४॥
२३.
येऊनियां जन्मा एक । करा देहाचें सार्थक ॥१॥
वाचे नाम विठ्ठलाचें । तेणें सार्थक जन्माचें ॥२॥
ऐसा नामाचा महिमा । शेष वर्णितां झाली सीमा ॥३॥
नाम शास्त्रीं त्रिभुवनीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥
२४.
विवेकाची पेंठ । उघडी पंढरीची वाट ॥१॥
तेथें नाहीं कांहीं धोका । उठाउठी भेटे सखा ॥२॥
मरोनियां जावें । शरण विठोबासी व्हावें ॥३॥
म्हणे नामयाची जनी । देव करा ऐसा ऋणी ॥४॥
२५
शरीर हें जायाचें नश्वर आणिकांचें । म्हणाल जरी त्याचें काय काज ॥१॥
आंबरसें चोखिला बिजसालें सांडिला । पुढें तेणें उभविला दुजा एकू ॥२॥
समूळ साल माया सांडुनियां दिजे । परि अहंबीज जतन करा ॥३॥
तें बीज भाजोनि करा ओंवाळणी । संतांचे चरणीं समूळ देह ॥४॥
पुढें त्या बीजांची न करावी दुराशा । न धरावी आशा पुढिलंची ॥५॥
आहे नाहीं देह धरीं ऐसा भाव । म्हणे जनी देव सहज होसी ॥६॥
२६.
नाना व्रत तप दान । मुखीं हरी स्मरण ॥१॥
येथें असों द्यावा भाव । पुरवी अंतरींचें देव ॥२॥
हाचि विश्वास धरुनी । कृपा करील चक्रपाणी ॥३॥
भक्तिभाव ज्याचा पुरा । त्यासी धांवतो सामोरा ॥४॥
लक्ष लावा पायांपाशीं । म्हणे नामयाची दासी ॥५॥
२७.
शूराचें तें शस्त्र कृपणाचें धन । विध्वंसिल्या प्राण हातां नये ॥१॥
गजमाथां मोतीं सर्पाचा तो मान । गेलियाही प्राण हातां नये ॥२॥
सिंहाचें तें नख पतिव्रतेचें स्तन । गेलियाही प्राण हातां नये ॥३॥
विराल्यावांचून देह अहंभाव । जनी म्हणे देव हातां नये ॥४॥
२८.
संसारीं निधान लाधलें जनां । सद्गुरुचरणा सेवीं बापा ॥१॥
कायावाचामनें तयास देवात्रीं । वस्तु माणून ध्यावी अगोचर ॥२॥
तें गोचर नव्हे जाण गुरुकृपेवीण । एर्हवी तें आपणा माजी आहे ॥३॥
असतां सम्यक परि जना चुकामुक । भुललीं निष्टंक मंत्रतंत्रें ॥४॥
माळ वेष्टण करीं टापोर घेती शिरीं । नेम अष्टोत्तरीं करिताती ॥५॥
जो माळ करविता वाचेसि वदविता । तया ह्रदयस्था नेणे कोणी ॥६॥
सोहं आत्मा प्रगट जो दाखवी वाट । सद्रुरु वरिष्ठ तोचि जाणा ॥७॥
तया उत्तीर्णता व्हावया पदार्था । न देखों सर्वथा जनी म्हणे ॥८॥
२९.
कीर्तनासी जातां मार्गीं टाकी पाय । अमर देह होय कळे त्यासी ॥१॥
आखेद तरी तेथें घडे हिंसा । जन्मवेद भाषा वेदापाशीं ॥२॥
गंगा वाराणसी धरोनि पदरीं । चाललीसे नारी दोहींकडे ॥३॥
आमच्या बापाची ऐकावया कीर्ति । जाऊं म्हणोन घेती ऐक्य कधीं ॥४॥
कीर्तनासी जावें कैसें कोणेपरी । असूं द्या अंतरीं गोष्ट हित ॥५॥
वर्हाडी धांवे जैसा प्रयोजनीं । तान्हेलें तें पाणी पुसावया ॥६॥
व्याकुळ तें एक चुकलें बाळक । त्या धांवे शोकें हांका मारी ॥७॥
अशी कथे जातां गंगा त्या चरणीं । म्हणे दासी जनी भाक मानी ॥८॥
३०.
कीर्तनाचा रस आवडे नरासी । लागती पायांसी मुक्ति चार्ही ॥१॥
वारी पंढरीचा निश्चयें म्यां केला । वारकरी झाला पंढरीचा ॥२॥
मोक्षाचा जो मोक्ष मुक्तीची जे मुक्ती । जनी म्हणे किती सांगूं फार ॥३॥
“संत नामदेव अभंग उपदेश”
शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral
संत नामदेव । संत नामदेव महाराज । संत नामदेव माहिती । संत नामदेव माहिती मराठी मध्ये ।
संत नामदेव फोटो । संत नामदेव गाथा
संत नामदेव अभंग । संत नामदेव अभंग उपदेश