संत नामदेव महाराज

संत नामदेव गाथा शुकाख्यान

संत नामदेव गाथा शुकाख्यान अभंग १ ते ३७१

ॐ नमोजी ब्रह्म अवतारू । शिश्य अभय करू । तो वंदिला श्रीगुरु । श्रीरामकृष्ण ॥१॥
म्हणतां वाचेसी श्रीराम । रस-नेसी न पडे श्रम । राम नाम उत्तमोत्तम । सर्व नामांमध्यें ॥२॥
पाहतां दोन अक्षरें । वेदशास्त्रें पुराण सारें । श्रीराम नामेम उतरे । भवसागर ॥३॥
तारावया संसार आयती । नौका श्रीरामगुरु उपदे-शिती । श्रीकृष्ण उपदेश शुकाप्रति । शास्त्रें असती प्रमाण ॥४॥
ऐसी नमिली श्रीगुरु देवता । तेणें प्रसन्न जाहली वाद्नेवता । मग ठेवी माझिये माथां । अभय करु ॥५॥
गुरुवचन लाधलें । तेणें ज्ञानु प्रकाशलें । मन माझें समरसलें । श्रीरामचरणीं ॥६॥
आतां श्रोते हो समस्त । तुम्हीं व्हावें एकचित्त । ऐकावें हरिचरित्र । धर्मकथा ॥७॥
वरि एक असे जी बोलणें । तुम्ही संभाळूनि घेणें । माझें वेडेंवाकडें बोलणें । क्षमा करणें अपत्या ॥८॥
इक्षुदंड असे वांकुडा । परि शुद्ध जाणिजे चोखड । तैसा शब्द माझा बोबडा । परि कथा गोड असे ॥९॥
ही कथा जे ऐकती । ते मुक्तपदातें पावती । ऐसी माझी विनंती । भाविक साधुसंतां ॥१०॥
जे कर्मीं परिपूर्ण । वेद शास्त्रींनिपुण । त्यांसी ही माझें नमन । ब्रह्म मुहूर्तां ॥११॥
आतां शुकदेव आख्यान । श्रीगुरु कृपेनें करी कथन । जें जन्मेजयाप्रति वैशंपायन । सांगता झाला ॥१२॥
व्यास ऋषीची कांता । सुळजा नामें पतिव्रता । जे धरूं जाणे चित्ता । वचन भ्र- ताराचें ॥१३॥
जें कांहीं बोले पति । तेचि धरी चित्तीं । सुळजा नामें सति । जगीं कीर्ति तियेची ॥१४॥
पति बोले उत्तर । तें मानी साचार । भ्रतार सेवेसी तत्पर । अंतर पडों नेदी सर्वथा ॥१५॥
आतां सति या असत कलियुगीं । आपुलिया स्वार्थालागीं । डंभाई करिती वाउगी । उतावळया ॥१६॥
न करिती भ्रताराची भक्ति । पतीचें उत्तर नाहीं चित्तीं । लटकीच करिती भक्ती । अभावेंचि जाणावी ॥१७॥
एक डोळे मोडिती । बोल मंजुळ बोलती । ह्मणती तुमचेनि सर्व तृप्ति । प्राणेश्वरा ॥१८॥
एक ह्मणती प्राणेश्वरा । घरीं वरी नाहीं अवधारा । काय खातीं निष्ठुरा । बाळकें माझीं ॥१९॥
एक तेल मीठाकारणें । करिती पतिप्रती भांडनें । ह्मणती तुझेनि भ्रतारपणें । काय काज ॥२०॥
वरी आपलें आपण चोरिती । रांधितां उभ्याच खाती । जाराणेसी गुज बोलती । पतीचें आपुले ॥२१॥
रात्रंदिवस भांडण । पतीसीं करिती जाण । ह्मणती तुमचें शहाणपण । पुरे आतां ॥२२॥
घरींचीं वडि लें न साहती । उगाचि लेंकरासि मारिती । त्या परपुरुषा अभिलषिती । रात्रंदिवस ॥२३॥
भ्रतारा देखोनि पृष्ठि देती । तयातें देखुन वस्तु खाती । बालकातें अंतर देती । महा पापिणी त्या ॥२४॥
ऐशा अधमीं नारी । असती कलियुगाभितरीं । तैसे ते नव्हे सुंदरी । सुळजा पतिव्रता ॥२५॥
बोलों जाणें बरवें । सेवा करी मनोभावें । सुळजा सती नांवें । जगीं विख्यात ॥२६॥
ते पतिव्रता सुंदरी । व्यास ऋषीची स्त्री । ते झाली गरोदरी । शुक माता ॥२७॥
प्रसूत न होय अवधारा । जहालीं वरुषें बारा । शुकदेव कुमार । ज्ञानी असे ॥२८॥
ऐसी ते गरोदरी । थोर व्यथा होतसे उदरीं । काय कवणीये परी । आथिचना ॥२९॥
कष्ट देखतां तियेचे । लोक ह्मणती हिचा जीव न वाचे । आह्मां देखतं बहुतांचे । जीव गेले ॥३०॥
ऐसें पुत्रवल्या नारी बोलती । करुणावचनें भाकिती । आणि वांझा करिती । हास्य तियेचें ॥३१॥
एक ह्मनती वो निसुंगे सुंदर्रे । काय करावी कन्या कुमरें । सर्व इच्छा भ्रतार भोगी पुरे। मरण आदरें तुज आलें ॥३२॥
एवढी जोडिली जोडी । सासूसासरा वृद्ध बापुडीं । त्यांसी आभाची आवडी । पडसी तूं ॥३३॥
वृद्ध जाहला ऋषिश्वर । परी त्यासी पुत्राचा शोक फार । हा गर्भ दुर्धर । कवणें निस्तारावा ॥३४॥
ऐसें बोलती नरनारी । सुळजेतें व्यथा होतसे भारी । आ-कांत होतो ऋषीच्या मंदिरीं । ते समयीं परियेसा ॥३५॥
ज्ञानी ह्मणती पाचारा अनंत । तो सांगेल याचा वृत्तांत । मग ऋषि मना-माजी विचारित । यग स्मरे अनंता ॥३६॥
व्यास ह्लदयीं चिंतिता झाला । श्रीहरि त्वरित पावला । मग पुसता झाला । श्रीकृष्ण व्या-साप्रति ॥३७॥
श्रीकृष्णाचें आगमन । उत्साव झाला सर्वजना । झालें देवदर्शन । विघ्रें दारुण नासती ॥३८॥
श्रीहरि व्यासगृहासी आले । साधुसंतां मानवलें । मग बैसो घातलें । आंथरीय ॥३९॥
ऋषि ह्मणती श्रीहरि । द्बादश वर्षें जाहलीं पुरीं । प्रसूत न होय स्त्री । काय तें उदरीं कळेना ॥४०॥
मग देव ह्मणती ऐका । आड धरा जमनिका । विचारूनि गर्भ बाळका । काय आवांका तयाचा ॥४१॥
श्रीकृष्ण वचन पडतां कानीं । वाचा झाली गर्भालागुनी । मग करसंपुष्ट गर्भ जोडोनि । विनविता जाहला ॥४२॥
म्हणे देवा- धिदेवा दंडवत । देव चिरंजीव म्हणत । बारे शिणलासी बहुत । गर्भवासी ॥४३॥
बाळा आतां रिघें बाहेरी । माता शिणली भारी । सुखें असें संसारीं । क्रिडा करी तूं ॥४४॥
मातेची सेवा किजे । पितृवचन पाळिजे । पावलासी सहजें । मनुष्य देहो ॥४५॥
अद्यापि तरी ज्ञान धरीं । आपणातें उद्धरीं । किती दिवस अघोरीं । क्रमिसी बाळा ॥४६॥
सांडीं हें अघोरपण । बाळा भोगी सुख संपन्न । जन्मा येऊनि सुख जाण । आणिक नाहीं ॥४७॥
मज बाळपणीं गोरस खातां । खेळवी यशोदा माता । नंदाचें सुख सांगतां । आ-नंद मज वाटे ॥४८॥
आणि मातेचेनि हातें । षड्रसी तृप्ति होय मातें । खेलवी मज सांगातें । पाळण्यांत निजवी ॥४९॥
यावरी तारुण्य आलें जिवीं । गोपी गोवळ्यांमाजी खेळवी । माता दधि-भात देववी । आपुलेनि हातें ॥५०॥
मी खेळलों गोकुळीं । गोव-ळ्यांचे खेळीं मेळीं । प्रणिली भीमकरायाची बाळी । राज्य केलें द्बारकेचें ॥५१॥
सोळा सहस्त्र अंत:पुरें । साठी सहस्त्र कन्याकुमरें । रथ गज सैन्य अपारें । गणीत नाहीं वैभवा ॥५२॥
दैत्यांचें निर्दा-ळण केलें । इंद्रादि देव स्वस्थानीं बैसविले । एकछत्रीं राज्य केलें । राज्यीं स्थापिलें धर्मराया ॥५३॥
या उपरी तूं राज्य करीं । निघें उदरा बाहेरी । सुख अपार संसारीं । ऋषि नंदना ॥५४॥
कांहीं नको धरूं भय । लवकरी बोहरी ये । हें ऐकोनि शुकदेव राये । बो-लता जाहला ॥५५॥
देवा तुह्मीं बोलिलें । म्यां बहुत जन्म भोगिले । आतां फार जजर्र जाहलें । देह माझें ॥५६॥
आतां विनंति परि-येसीं । जगज्जीवन ह्लषिकेशी । सुख दु:ख तुजपाशीं । निवेदितों ॥५७॥
मागें जन्म जन्मांतरीं । कष्ट भोगिले शरीरीं । तें दु:ख मुरारी । काय सांगों ॥५८॥
येथूनि धरिसें परिकरू । नावेक सांगेन मनहरू । तेथें होतां ऋषिश्वरू । व्यासऋषि ॥५९॥
तेही ग्रंथ केले अनेक । अठरा पर्व भारत देख । वेदादी पुराणें देख । वेदांत सुत्रें ॥६०॥
प्रथम जन्म ब्राम्हण कुळीं । तेनें संध्यास्त्रान त्रिकाळीं । आतिथ्य कवणे काळीं । आथीचना ॥६१॥
जेथें देवधर्म चुकलों । आधा मोहपरि गुंतलों । कर्म करों लागलों । अनेकांचें ॥६२॥
दोघी स्त्रिया होत्या घरीं । त्यांतें सोडोनी परद्बार करी । मन माझें कवणे परी । स्थीर नोहे ॥६३॥
प्रीति असे एकीवरी । दुसरी ते दूर धरी । वस्त्रें अलंकारीं भेद करीं । ऐसीपरी घडली ॥६४॥
एकी आवडी जीवाहूनि । दुजेची गोष्ट नायकें कानीं । तिनें पतिसुख स्वप्रीं । देखिलें नाहीं ॥६५॥
ते काय करील अबळा । माझी मति चंडाळा । सदा करि तीसीं कळ । सुख तिळ न जाणें ॥६६॥
दिवस क्रमी ती ऐसिया रीति । रात्रीं रुतु नेदी तिजप्रति । तेणें उलथों पाहे क्षिती । तियेचे दु:खास्तव ॥६७॥
मासाचे सोळा रुतु । तयातें चुकवी अवचितु । तरी बारा ब्रह्महत्या पडतु । पुरुषावरी ॥६८॥
ऐशा हत्या नित्य बारा । जन्मावरि पडिल्या शारंगधरा । त्या पापाचे डोंगर । जाले देवा ॥६९॥
ऐसिया पापास्तव देव । हीनयाति जन्मलों केशवा । पुनरपि जन्म माधवा । पावलों मी ॥७०॥
शूद्रयाति मी जन्मलों । ऋषिकर्म आचरों लागलों । देवा तुज चुकलों । खळीं झाडितां ॥७१॥
त्या पापास्तव श्रीपति । जन्म पावलों मातंग जाति । मातंगी जननी रमापति । झाली माझी ॥७१॥
ते नगरीचा राजा । प्रतिपाळ करी माझा । तयाचे स्वामिकाजा । तेथें पुरुवनी । अनुसरलों ॥७३॥
कवण एके अवसरीं । परचक्र आलें राज्यावरी । राजा निघाला बाहेरी । युद्धा-लागीम ॥७४॥
तेथें म्यां सैन्य मारिलें । रायें मज वेतन केलें । वैरियातें निर्दाळिलें । अर्धपळ न होतां ॥७५॥
माझी विनंति परियेसी । बारा वर्षें झालीं जन्मासी । नग्र आहे शरिरासी । कसें यावें बाहेरी ॥७६॥
आतां स्वयंभ कासोटी । देईं मज जगजेठी । लाज स्वयंभ कासोटी । देईं मज जगजेठी । लाज राखे सृष्टि । पैं माझी ॥७७॥
इतुकें शुकदेव बोलिला । देवें स्वयंभ कौपीन दिला । मग शुक श्रवणद्वारीं बाहेर आला । योगीराय ॥७८॥
शुकयोगी ब्रह्म परिपूर्ण । मुळजेसी जाहला हर्ष पूर्ण । येरु स्मरे नारायण । धरिले चरण कृष्णाचे ॥७९॥
देवें हस्त ठेविला माथां । तैसाच निघाला तीर्था । मागे न पाहे सर्वथा । शुकदेव योगी ॥८०॥
निघाला तो लवलाहे । मागें पुढें न पाहे । सुईण म्हणे वोमाय । गर्भांतून भूत कायसें आलें ॥८१॥
हें अद्‍भूत लेंकरूं । करी राम नाम उच्चारू । याचे नाभीचा जारू । वाळला नाहीं ॥८२॥
लेंकरूं नव्हे हें सांचा । राक्षस हा मायेचा । न करावा गजर लेंकराचा । हें अपूर्व चोज जाणा ॥८३॥
गेला तरी सुखी जावो । राहतां तरी अनर्थ पैं हो । सुलजा वांचली हें अपूर्व । माना सकळां ॥८४॥
व्यासा चंद्रबळ लाधलें । किंवा सुकृत फळासी आलें । येवढें विघ्न वारिलें । कुळ देवतेनें ॥८५॥
एकी अबाळा वांचलों ह्मणती । एकी जितावण करिती । एकी क्षेमा आळंगिती । आप्त वर्गासी ॥८६॥
मग म्हणे सुलजा । आतां मज दवा पुत्र माझा । द्वादश वरुषें कष्टली वोजा । वाहिला उदरीं ॥८७॥
करुणा करी लवलाही । म्हणे पुत्रा स्तनपान घेईं । बारे कांटे खडे रुतती पायीं । परतोनी येईं लवकरी ॥८८॥
तुजलागींरे कुमरा । स्तनीं लागल्या पयोधारा । बारे येईं सामोरा । घेईं स्तनपान ॥८९॥
ऐसी करुणा करी माता सती । थोर येतसे काकुळती । परी शुक न धरी चित्तीं । दूर गेला ॥९०॥
आतां काय करूं वो साजणी । शुक नये परतोनी । योगी राजा कृष्ण वचनीं । पुत्र माझा ॥९१॥
पोटीं वागविला वर्षें बारा । थोर कष्ट झाले माझिया शरिरा । शेवटीं माझिया पुत्रा । निराशा जाहली ॥९२॥
बारे तूं तप तीर्थ काय जाणसी । कवणें चालविलें तुजसी । जवळी होता ह्लषिकेशी । तेणें नवल काय केलें ॥९३॥
आतां न जाईं तूं तपा । उष्णें करोनी श्रम पावसी बापा । मार्गीं चोरां सर्पा । करुणा नाहीं बाळा ॥९४॥
मग विनवीत भास्करू । म्हणे माझें तान्हें लेंकरूं । तूं देवा तपों नको उग्रु । माझ्या बाळकावरी ॥९५॥
अगा देवा करुणा । लेकराची करावी जाणा । अति कोमल चरणा । न पोळावे देखा ॥९६॥
अहो वसुंधरे माते । जतन करीं शुकातें । वंदीन तुझ्या चरणातें । विनंति तुळजेची ॥९७॥
तूं कृपाळु परियेसी । उदरीं राखिलें सीतेसी । बाळ तैसें माझे आपत्यासी । जतन करीं ॥९८॥
विनंति सिंह सर्पा । रिसा असवला वृश्चिका । तुह्मीं न करावें कोपा । राखा बाळ माझें ॥९९॥
ऐसी ती सुंदरी । कर जोडोनि विनंति करी । तो शुक गेला दुरी । ध्यान करी हरीचें ॥१००॥
या उपरी ह्मणे पिता व्यास । पुत्र चालिला कर्मत्रासें । थोर होती आस । पितृ-गोत्र रक्षील ॥१०१॥
तूं धाकुटें लेंकरूं । परी मज होता आधारु । तुजविण हा संसारु । व्यर्थं गेला ॥१०२॥
मातापिता सांडिजे । योग साधन करिजे । हें कोणे शास्त्रीं बोलिजे । सांग बा मज ॥१०३॥
तपें होय सुकृत । ऐसें मनीं धरिसी निभ्रांत । मातापिता संतोषें सुकृत । हें वेदशास्त्रीं बोलिलें ॥१०४॥
सांडूनि जाई माता-पिता । त्याचा संन्यासी व्यर्थता । तीर्थें कंटाळती सर्वथा । त्याचे स्त्रानें दर्शनें ॥१०५॥
पितृवचन न पाळिजे । मातेसी अंतर देती जे । ते प्राणी पातकी ह्मणिजे । यमदंड पावती ॥१०६॥
पुंडलिका सेवा करितां । पितयासी झोंप आली तत्वता । तंव विष्णु आले त्वरितां । चित्त पहावया तयाचें ॥१०७॥
देव येउनी उभा द्वारीं । परी येरु ये न बाहेरी । सेवा पितयाची करी । एक भावें ॥१०८॥
ऐसा पितृभक्तीचा रंग । न करी देवाचा पांग । पितयाची निद्ना होईल भंग । ह्मणोनि न पाहे माघारा ॥१०९॥
तेणें अंतरीं ओ-ळखिलें । मज देव भेटों आले । पितृसेवें पुण्य जोडलें । फळ ला-धलें पांडुरंग ॥११०॥
मग माघारी वीट झोंकिली । ते चरणीं दे-वाचे लागली । देवें पूजा मानिली । समचरणीं उभा राहे ॥१११॥
हात ठेवूनि कटावरी । युगें अठ्ठावीस उभा हरी । पुंडलि-काची भक्ति भारी । हा उपदेश ह्मणे श्रीव्यास ॥११२॥
दृष्टांत ते आईका । पितृवचनीं राम निका । बारा वर्षें देखा । वनवास क्रमिला ॥११३॥
तेणें पितृवचन पाळिलें । सापत्निक माते समाधान केलें । कीर्तीचें फळ जोडिलें । पुराण प्रसिद्ध ॥११४॥
वृद्धें श्रावणाची पितृ जोडी । ती बैसवूनि कावडी । खांदीं वाहे परवडी । वाराणसी ॥११५॥
मार्गीं जातां तृषा लागली । कावडी वृक्षा लविली । करीं झारी घेतली । उदकाकारणें ॥११६॥
श्रावण उदक भरितां । झारी झाली बुडबुडतां । चाउली झाली दशरथा । संधान लविता तो जाहला ॥११७॥
श्र्वापद उदकासी पातलें । ऐसें जाणुनी संधान केलें । तें येउनी कंठीं लागलें । श्रावणाचे ॥११८॥
जवळी येउनी पाहे । तंव मनुष्य पडिलें आहे । मग सकोंचित होय । राजेंद्र ॥११९॥
तयासी पुसे तूं कवण । येरु ह्मणे मी श्रावण । व्रुक्षासी पितृकावडी लावून उदकासी आलों ॥१२०॥
तूं रांजा सूर्यवंशीं । उदक देईं जा वृद्धांसी । कावडी पैल वृक्षासी । टांगली असे ॥१२१॥
ह्लदयीं मातापित्यांसी स्मरोन । श्रावणें त्यजिला प्राण । पावला पद निर्वाण । सायुज्य मुक्तीतें ॥१२२॥
ऐसें पितृवचन पाळिलें । कीर्तिमुक्तिस जोडिलें । हें तपाहूनि आगळें । पितृवचनें ॥१२३॥
मग रायें दश-रथें । झारी घेऊनि हातें । पाणी द्यावया वृद्धांतें । वृक्षाजवळी पा-तला ॥१२४॥
उदक घ्या ह्मणत । शब्द ओळखिला त्वरित । श्रा-वण नव्हे सत्त्वस्थ । कोण आहे ॥१२५॥
मग पुसत तूं कोण । येरु ह्मणें मी दशरथ जाण । श्रावणाचें वर्तमान । सांगता झाला ॥१२६॥
आतां उदक श्रावणाविण आह्मीं न घेऊं जाण । ऐसें म्हणोन प्राण । सोडिला त्यांहीं ॥१२७॥
पुत्राकारणें पाही । शोक लागला देहीं । भेटी देऊनि जाई । योगेश्वरा ॥१२८॥
आतां पुत्रपण सत्य करीं । माता पिता मुखी करी । पाहा त्या सगरीं । काय केलें ॥१२९॥
साठीसहस्त्र संवत्सर । युद्ध केलें नृपवरें । सूर्यवंशीं महावीर । पवित्र राजा ॥१३०॥
त्यांनीं अश्वमेध मांडिला । शामकर्ण वारु आणिला । तो पृथ्वीवरी सोडिला । युद्धालागीं ॥१३१॥
ते इंद्रें ऐकिली मात । अश्वमेध करिती सगरसूत । मग मंत्र एक त्वरित । रचिता झाला ॥१३२॥
त्यावरी इंद्रें घोडा चोरिला । अदृश्य रूपें । नेला नेऊनि गुंफेमाजी बांधिला । मुनीचिया ॥१३३॥
पाताळीं कपील मुनी । सगरीं खणिली मेदिनी । अंबरीं जाहली आकाशवाणी । सांभाळारे सांभाळा ॥१३४॥
बृह-स्पति सगराचा मामा । तो म्हणे रे उत्तमा । कां आलासी आश्रमा । या ब्राह्मणाचियां ॥१३५॥
तुह्मी खणाल मेदिनी । येथें आहे कपिल मुनीं । तो भस्म करील शोधोनिं । सांडा गर्व ॥१३६॥
येरुसी न आवरे कोपु  । मेदिनी खणिती थोर मापु । प्रवेशले एकाएक । पा-ताळ भुवनीं ॥१३७॥
ऐकोनि तयाच्या गजरु । डचकला तो ऋषे-श्र्वरू । येरि ह्मणती हाचि तस्करु । धरा वहिला ॥१३८॥
यावरी कोपला महामुनी । तयासी शापिलें वचनीं । सागरु जाले तेच-क्षणीं । भस्म देख ॥१३९॥
वडिलाचें वचन न ऐकती कानीं । आपणचि म्हणती ज्ञानी । तरी मूर्ख ते गांजणी । जाणावे गा ॥१४०॥
एक सहस्त्र वर्षें जाहली सुमित्रा । तयाचे वंशीं जाहला पुत्र । अत्रिनें दिधला एक मंत्र । तयाचा भगिरथ ॥१४१॥
गंगा स्वर्गाहुनी आणिली । ते मंदाकिनी स्वर्गा झाली । पाताळीं प्रगटली । ते भोगावती ॥१४२॥
हिमाचलामाजी लपाली । येतां न देखोचि वहिली । मग बुद्धि विचारिली । तया भगीरथें ॥१४६॥
राजा इंद्र विनविला । तेणें ऐरावतीं दिधला । पर्वत फोडोनि टाकिला । गंगाओघें ॥१४४॥
सगरु जळत होते । विझविले गंगासुतें । ऐसें पुत्रपण तया भगी- रथें । सा़च केलें ॥१४५॥
अरे पुत्रा आमुतें संतोषवीजे । मतापिता उद्धरिजे । डोळे झांकती मग जाइजे । हा धर्म चोख ॥१४६॥
पुत्र कष्ट झाले गा थोर । मातेचें गाजिलें बा शरीर । अद्यापि कां निषुर । बोलसीना ॥१४७॥
ऐसें ऐकतां नेटकें । शुक-देव पुढें चमके । यावरि दृष्टि देखे । वनस्थळीं ॥१४८॥
शुक्र-देव अदृश्य झाला । व्यास त्वरित धरणीं पडला । थोर दु:खें आक्रंदला । व्याकुळ प्राण तयाचा ॥१४९॥
पुत्राविणें संसारु । तो केवळ भूमिभारु । माझें उतरावयाचें तारूं । दूरि गेलें ॥१५०॥
आतां कायसें जिणें । शोक दुर्ग जाणणें । व्यर्थ जिणें पुत्राविण । जाण माझें ॥१५१॥
निपुत्री जन मज म्हणती । देव पितर स्वर्गीं कष्टती । ऐसें काय केलें गा श्रीपती । मजलागीं ॥१५२॥
शुक नये काकुलती । वनांत हिंडतो मोह चित्तीं । पुत्रा पुत्रा हें वदती । साद देता श्वापदें ॥१५३॥
पूर्व जन्मींचा तूं पिता । कय पाळिलें ताता । कर्मावसानीं आतां । आह्मी वृद्ध झालों ॥१५४॥
ऐसी ऐकोनि वाग्वाणी । नाद न माय गगनीं । मग व्यासऋषि तेथुनी । परतला मागें ॥१५५॥
इतुका वृत्तांत झाला । व्यास आश्रमा आला । शुक-देव पावला । सुख सरोवरां ॥१५६॥
योगेश्वरीं देखिला । धांवो-नियां आलंगिला । आपले आश्रमसी आणिला । तापसी जाणोनियां ॥१५७॥
तये गुंपे भीतरीं । तेजोरूप अवघ्या नारी । एकीहुनी एक सुंदरी । परी विकल्प अंतरीम । येऊं न दे ॥१५८॥
मग निघो-नियां बाहेरी । वस्त्रें टाकिती सुंदरी । शुक देवासी कवणीये परी । मानविती ॥१५९॥
मग शुक्रें अर्ध्यदान केलें । दर्भासन घातलें । त्यावर आपण बैसले । ऋषिसुत ॥१६०॥
यज्ञ विभूति आणिली । शुकें सर्वांगीं लविली । मग वस्त्रें घेतलीं । भगवानरूपें ॥१६१॥
वृक्ष चंपके वेल पत्रीं । गुंफेमाजी मिरवती । विश्रांत वनीं विज्ञान-वल्ली । ते स्वीकारी तळभरीं ॥१६२॥
शुक आसनीं बैसला । ध्यानीं निश्चल राहिला । आवर्ण आपण विसरला । ब्रह्मयोगी ॥१६३॥
शुकदेवें मांडिलें ध्यान । मुखीं धरिलें मौन्य । नासाग्रीं लोचन । लक्षीत असे ॥१६४॥
ब्रह्मनिष्ठ निरंतरीं । वनामाजी तप करी । एक चरणांगुष्ठावरी । करी निद्रा ॥१६५॥
ऐसा ब्रह्ययोगी निरंतरीं । वनामाजी तप करी । व्यास घरीं चिंता करी । शुक देवाची ॥१६६॥
यावरी प्रार्थितो इंद्रासी । येरे नाभिकार दिधला तयासी । मग तप ढळावयासी । इंद्रें रचिला उपाय ॥१६७॥
इंद्रानें रंभेसी केली हाकार । तंव ते पावली सत्वर । जियेचा महा थरार । तापसीयांसी ॥१६८॥
तिनें नमिला इंद्रराज । ह्मणे कां जी पाचारिलें मज । जें असेल योजिलें काज । तें सांगा स्वामिया ॥१६९॥
तीतें सांगे इंद्रराव । निर्भय तप करीतसे शुकदेव । त्याच्या तपाचा करावा क्षय । त्वां जाउनी ॥१७०॥
तंव बोलली ते सुंदरी । विडा दीजे माझे करीं । आतां शुकदेव सत्वरी । आणिन मी तुह्मांपुढें ॥१७१॥
इंद्र ह्मणे गे सुंदरी । शुका आणसी जरी । तरी तुज अमरपुरीं । मानवती जन ॥१७२॥
मग तियेसी विडा दिधला । रंभेनें शिरीं वंदिला । मग शृंगार केला । नाना परीचा ॥१७३॥
अंग तियेचें पातळ । गौरवर्ण विशाळ भाळ । नेत्र जैसे अंबुजदळ । चंपकवर्ण । तियेचा ॥१७४॥
कांसें कासुनियां वीरगुथी । बरवी वेणी रुळे पृष्ठीं । कटि सामावे मुष्टीं । तये रंभेची ॥१७५॥
बाहु दंड सरळा । बरवी शोभे मेखळा । कांसे कासिला पिंवळा । पीतांबर ॥१७६॥
आंगीं सुवास कस्तुरीची उटी । मुक्तमाळा रुळे कांठीं । टिळा केशराचा लल्लाटीं । तये रंभेचे ॥१७७॥
हातीं रत्नजडीत कंकणें । गळां नव-रत्नांचीं भूषणें । व्यंकट दृष्टि पाहणें । अळूमाळ ॥१७८॥
कानीं तानीवडे जडीत । सांखळ्या नाग भिरवत । भोंवर्‍या शोभिवंत । हिरे जडिले ॥१७९॥
माथां मोतियांची जाळी । दोहींकडे शोभे हसळी । तेज झळके गंडस्थळीं । मिरवे रंभा ॥१८०॥
सुवर्ण कनकाची झारी । हातीं मिरवे सुंदरी । परम चतुर मनोहरी । काम-रूपा ॥१८१॥
नाकीं जडित मुक्ताफळ । तेज मिरवे सुढाळ । मुखीं शोभे तांबूल । तेर गुणांचा ॥१८२॥
दंतपंक्ति तेज देखा । त्यांची चंद्रसारखी शुभ्रता । हिरे जडिले मुखा । रंभेचिया ॥ १८३॥
अति सुंदर पुष्प जाती । चंपकें बकुलें शेवंती । तयावरी मिरवे सोनकेतकी । आणिक मोगरी ॥१८४॥
करीं चंदनाची उटी । अंगीं कंचुकी गोमटी । तयावरी मिरवे पत्रवेटी । चंपकाचे पानांची ॥१८५॥
चरणीं वांक्या तोडरू । अंदुवाचा गजरू । अंगीं तारुण्याचा भरू । अनुपम्य ॥१८६॥
चाले डोले हस्तिनी गति । विद्युल्लतेप्रमाणें नेत्र लवती । तयांसी देखोनी गिरजापति । भूलों शके ॥१८७॥
ऐसी ते महा खेंचरी । निघाली झडकरी । सिंधुवनामाझारीं । प्रवेशली ॥१८८॥
तये वनीं वृक्ष खजुरी पोफळी । फणस महाळुंगी नारळी । आणि द्राक्ष मंडप स्थळोस्थळीं । डुल्लताती ॥१८९॥
गगनचुंबित ताड । आम्रवृक्ष जांभळी उदंड । केळी जांभ अंजिर रगड । बागशाई ॥१९०॥
मालती आणि शेवंती । पाडाळा जाई अनंत जाती । तया वनीं केतकी शोभती । आणिक बहु पुष्पलता ॥१९१॥
तया वनीं जाळीं । रंभा वृक्ष न्याहाळी । आणि सिंह शार्दूल तये स्थळीं । गर्जना करिती ॥१९२॥
तेथें गाइ ह्मैशींचे थवे । तृणें भक्षिती बरवें । अवघ्यांशीं शुकदेवें । ज्ञान उपदेशिलें ॥१९३॥
पशुपक्षी होऊनि एकरूप । उदक पिती सांडुनी विकल्प । परम तयातें सुख । क्रीडा करितां ॥१९४॥
मूषक मांजरें एकेठायीं । नकुळा सर्पा वैर नाहीं । अवघियांचे ठायीं । हरीचें प्रेम ॥१९५॥
ऐसी ते वनस्थळीं । रंभा दृष्टि न्याहाळी । मग पावली जवळी । शुकदेवाश्रमीं ॥१९६॥
डावें घालून शुक आसनास । पूर्वद्वारीं करी प्रवेश । सन्मुख देखे योगि-राजास । ती रंभा ॥१९७॥
लक्ष लविलेंसें ऊर्ध्व दृष्टी । स्वयंभ असे कासोटी । सर्वांगीं शोभे उटी । यज्ञ विभूतीची ॥१९८॥
तंव लावण्य खेंचरी । आपुले मनीं विचार करी । नेत्र हा उघडील जरी । तरी मी थोर दैवाची ॥१९९॥
आनंदें घातली कास । गायन आ-रंभीं सुरस । सप्तस्वर केदारास । आळवी रंभा ॥२००॥
नृत्य करावया उठली । नाना भाव करिती जहाली । परी शुकची नाहीं विसर्जिली । योगमुद्रा ॥२०१॥
आलाप करी सुंदरी । नाना प्रबंध कुसरी । तंव योगीयाची झाली पुरी । ध्यानमुद्रा ॥२०२॥
शुकानें नेत्र उघडिले । रंभेची पुढें देखिलें । येरीनें कर जोडिले । केलें नमन ॥२०३॥
शकें नमस्कारिली खेंचरी । बैसविली गुंफे माझारीं । येरी देखोनि हास्य करी । सुमनें मुखीं उपजती ॥२०४॥
रंभा व्यं-कट दृष्टि पाहे । हावभाव दाविताहे । मंजुळ स्वर गाये । सानुराग ॥२०५॥
तारुण्याचेनि भरें । हावभाव दावी भृकुटी भारें । तंव शुक देव ह्मणे सुंदरे । हरिचरित्र गाइजे ॥२०६॥
मागें तप करितां चंद्र-मौळी । तंव ऐसीच एक प्रवेशली । तयाची समाधि लागली । काम-बुद्धि ॥२०७॥
रुक्मांगद नृपवरा । मोहोनि घाली मंदिरा । ते मारविती जाहलीं कुमरा । धर्मागंदा ॥२०८॥
तैसी रंभा वना प्रगटली । इंद्ररायें पाठविली । काय करील हे माउली । तें सुचेना ॥२०९॥
इयेचेनें काय होईल । शुकाचें तप अढळ । कां कष्टविली अंबा केवळ । वेदव्यासें ॥२१०॥
शुक ह्मणे विचारूं इयेसी । ह्मणे तूं आससी कवणे देशीं । कीं देवकन्या ह्मणविसी । कीं मानवीन ॥२११॥
कीं या वनीं वनदेवता । कीं योगिनी तूं तत्वता । तूं सिद्ध आहेस माता । खेंचरीये ॥२१२॥
तुझें नाम काय । कवण बापमाय । कवण ठायीं आहे । आश्रम तुझा ॥२१३॥
येथें यावया काय का-रण । काय अपेक्षित तुझें मन । हें सकळ वर्तमान । सांगे मज ॥२१४॥
मग बोलली ती खेंचरी । मी देवकन्या निर्धारीं । असे या वनाभीतरीं । क्रीडा करीत ॥२१५॥
आजि देखिली शुकाची मूर्ति । मज आली करुणा चित्तीं । तूं धाकुटा योग स्थिती । कां कष्टसी ॥२१६॥
तूं नेणसी तप प्रमाण । कां वांयांच कष्टविसी प्राण । आंगीं असे तारुण्यपण । सुंदर तूं ॥२१७॥
तुझी मंद असे दशा । दिससी लावण्य राजसा । मदना परिस सुरसा । सुकुमारा ॥२१८॥
तप तुंवा आदरिलें । तुज कवणें उपदेशिलें । तुझें कार्य नासिलें । सुखभोगाचें ॥२१९॥
तप सांडीं अमंगळ । दोघें असों कुशळ । बरवीं वस्त्रें सर्वकाळ । शेजेवरी पांघरवीन ॥२२०॥
मस्तक तुझें वि-घरलें । विभूतीनें आंग मळलें । मी पुसीन करतळें । सुकुमार वस्त्रें ॥२२१॥
बरवे चंदन शीतळ । त्यांत नाना परिमळ । पुष्पांची शेज कुशळ । निद्रेलागीं करीन ॥२२२॥
चांपा आणि शेवंती । दवणा मरवा पुष्प जाती । तितुक्या अर्पिन तुजप्रति । सुगंधाकारणें ॥२२३॥
याउपरि दह्याची वाटी । अमृता ऐसी निकटी । षड्रस प-क्कान्नें गोमटीं । वाढीन तुज ॥२२४॥
कळीया जैशा मोगरीच्या । तैसा भात उष्ण जिरेसाळीचा । त्यावरी ओगर डाळीचा । साजुक तूप वाढीन ॥२२५॥
नाना परीचीं लोणचीं । लिंबें आंवळे मिरची । आणि कढी ताकाची । जेवीं रुचिकरें ॥२२६॥
पुरीया फेणीया तेलवडें । खाजी गुरोळ्या मांडे । देईन रुचिकर सांडगे । मेथकुटें रायतीं ॥२२७॥
उत्तम खांडवी साजिरी । मृदुपणें अंतर बाहेरी । घालेनि दूध साखरी । अटवीन अमृता परीच ॥२२८॥
सरवळे बोटवे कानवले । थिजले घृतीं तळिले । माझे हातीं मिळविलें । तुजकारणें सकु-मारा ॥२२९॥
आंब्याचे रस पिंवळे । परमामृताचे घेतले । मधु मिश्रित वाढिले । इच्छा पूर्ण होईल ॥२३०॥
ऐसी आरोगणा पाविजे । मग स्वस्थानीं बैसिजे । कर्पूरसहित विडा घेइजे । मनोहर ॥२३१॥
नाना परीची वळवटी । मुखों वोंटीं पडेल मिठी । नाना पत्रशाखा सु-भटी । ताटाकाठीं वाढीन ॥२३२॥
आलें सुरण बेळें । भोंकर आणि मायमुळें । दृष्टि देखिल्या जिव्हाळें । अरोगणीं समयीं ॥२३३॥
काकडें आणि करंदें । वर भोंकरें आनंदें । जेवितां वाढीव विनोदें । योगीया तुज ॥२३४॥
आंबे निंबुवांचीं लोणचीं । राईतीं नाना परी-चीं तुमचे जिव्हे रुची । ग्रासोग्रासीं ॥२३५॥
पापड आणि मिरं-गुडे । जेवितां रुचि वाढे । आणिक कोल्हाळ वडे । ऐसी जेवण परी ॥२३६॥
ऐसीं अरोगण कीजे । कर्पूरविडा लवंगीं भक्षिजे । कर्पूरासहित विडा घेईजे । मनोहर ॥२३७॥
माजघरा डोल्हारा बां-धिला । वरी चांदवा लविला । वर क्षीरोदक आथुरिला । जरि – तारी ॥२३८॥
तेथें सुखें निद्रा करीं । सेवा करिती चतुर्विध नारी । मजहुनी सुंदरी । लावण्यवतिका ॥२३९॥
अंगनांसवें वसंता आतु । खेळ खेळें समस्तु । सकळ नारी सवें हेतु । पूर्ण करीं स्वानंदें ॥२४०॥
परिमळा नाहीं मिती । आह्मां घरीं सर्व संपत्ती । ऐसें सुख योगिया-प्रती । नाहीं त्रिजगतीं जाणिजे ॥२४१॥
आतां सांडी मनींची भ्रांती । तप करोनी काय प्राप्ती । संसार भोगी संपत्ती । यासारिखें सुख नाहीं ॥२४२॥
कोण तपाचा सौरसु । कवणें तुज दिधला उप-देशु । जे लविती राखेसू । ते भूत पिशाच्च जाणावे ।२४३॥
क-वण तुज भेटला गुरु । त्याचे वचनीं हरविसी संसारु । तो माझे चित्तीं आहे शत्रु । बहुत जन्मींचा ॥२४४॥
तूं नेणसी बुद्धी । तुझी भांबावली शुद्धी । ठाकीत आली अवधी । दैवगतीची ॥२४५॥
तुज ज्ञान नाहीं धडपुढें । कां हिंडतोसी वनझाडें । तुझें मी फेडीन सर्व सांकडें । क्षणामाजी ॥२४६॥
नेणसी तुज पडिली भूलिभ्रम । आतां सांडीं वनाश्रम । बरा करीं घराश्रम । भोगीं निजसुखवृत्ती ॥२४७॥
ऐसें तप कोण करी । जो सदाचा भिकारी । मायबाप नाहीं संसारीं । तो आदरीत ये भिक्षा ॥२४८॥
ऐसा जो एकटा एकला । शीत उष्ण पर्जन्यांत बैसला । तयांचिया बोला । लागूं नको ॥२४९॥
माझें वचन ऐक आतां । मी सांगतें हिता । मज रंभेतुल्य वनिता । आ-नायासें जोडते ॥२५०॥
मग बोलता झाला शुकदेव । श्रोतीं देउनी चित्त ऐका प्रभाव । रंभेचा फिटे अहंभाव । ऐसें बोले व्याससुत ॥२५१॥
मग वदला शुकदेव । भला सांगसी प्रभाव । शाहाणी च-तुर तूं हो । रंभिका ॥२५२॥
तुजवरी कासया कोपावें । आमचें दैव असेंचि बरवें । जेवीं तव स्वामी भावे । तें तूं बोलसी ॥२५३॥
बहुत चतुर तूं होसी । स्वामी कार्या झळ-कसी । ऐसें पुनरपि कोणासी । बोलूं नको ॥२५४॥
येरी ह्मणे जी योगिया । तुह्मी कोपलेती कवणें कार्या । तें उत्तर स्वामीया । जाण-वीजे ॥२५५॥
शुकदेवें कर जोडिले । नमन करूनि बोलिले । रंभे ऐक ह्मणितलें । योगिरायें ॥२५६॥
तूं बोलिसी सुंदरी । तें मज बाणांपरी । खोंचतसे उरीं । मनीं माझे ॥२५७॥
आतां परियेसी निनवणी । तूं आटोप आपली वाणी । ऐसी भ्रष्ट बोलणीं । मी कर्णी नायकें ॥२५८॥
त्वां संसारू वाणिला । तो म्यां बहुत जन्मीं भो-गिला । आतां झणीं वीट आला । मज तयाचा ॥२५९॥
हे शरिरीं दु: ख पाहे । सुटण्यास अन्य नाहीं उपाय । मग मी धरिले पाय । श्री-कृष्णदेवाचे ॥२६०॥
आतां असो सर्व स्नेहो । हरिस्मरणीं भाव राहो । ऐसा मनींचा हावो । धरिला म्यां ॥२६१॥
आतां न सोडीं हा मार्ग । धरिला साधूचा संग । न करीं मी निश्चयभंग । जाण रंभे ॥२६२॥
मज नाहीं वस्त्राची चाड । नग्न राहावें हेंचि गोड । धनादि सुखाचें कोड । मनीं आथीचना ॥२६३॥
मी जन्मलों ते वेळां । देवें कौपीन दिधला । वस्त्राचा पांग फिटला । जाण रंभे ॥२६४॥
पाटावू आणि सारळें । तेणें मन माझें कंटाळलें । स्वयंभ दिधलें गोपाळें । जें न मिळे कदापि ॥२६५॥
राम सकळ परिमळाचें भांडार । विभूतीहुनी नाहीं थोर । अंगीम चर्चितां सुकुमार । दुर्गंधी नासे ॥२६६॥
विभूति अंगीं चर्चिती । तयासी जन मानिती । शीव-रूप त्या भाविती । पूजा करिती मनोभावें ॥२६७॥
विभूतीनें देव जाहले । विभूती नाम विष्णु बोले । विभूत लवितां पिसें गेलें । विभूत भैरव ॥२६८॥
तूं आणितेसी पुष्पजाती । त्या सवेंचि कोमती । बरवेम चर्म पशुपती । पांघुरला आवडी ॥२६९॥
अति सुरंग रातो-त्पळें । हरिचरणींचीं चरणकमळें । तेंचि अति प्रेमळें । जाण रंभे ॥२७०॥
ह्मणसी षड्रस भोजन । तरी हरिचरणीं अमृतपान । करोनी तृप्त झालें मन । अमरत्व पावलें ॥२७१॥
तेणें सर्व सुख लाधलें । तृप्त होऊन राहिलें । तें तुज अंतरलें । बुद्धिमंदे ॥२७२॥
आणिक लक्षी नारायण । अपरमित त्याचें सदन । रत्नकीलेचे मंचक पूर्ण । तेथें शयन शुक योगी ॥२७३॥
मुखीं रंगला श्रीर्मग । तो केवळ कर्पूर बिडा सुरंग पिकदाणी धरिती मुख रंग । तुज ऐशा वामांगीं ॥२७४॥
इतुकें शुक वदला । मग उगाची राहिला । बोलाचा शब्द सरला । वदतसे रंभा यावरी ॥२७५॥
मग ते ह्मणेरे बुद्धिहीना । महा मूर्खा पुरुषत्वहीना । स्त्रीसुख सोडोनी वनामरणां । इच्छिलें त्वां ॥२७६॥
मिथ्या तूं जन्मलासी । वांयां येथें कष्टसी । तारुण्य व्यर्थ दवडिसी । स्त्रीभोगाविणें ॥२७७॥
भोगिजे द्वादश वरुषांची नारी । षोडश वर्षांची सुंदरी । गौर वर्णाचे परिकरी । सुगंध युवती ॥२७८॥
एकाहूनि एक साजिर्‍या । चंद्रवदनी गोजिर्‍या । माझि-याहूनि सकुमार्‍या । मृगनयनी ॥२७९॥
बोले जाणती बरवें । सेवा करिती मनोभावें । जयांचा माज दृष्टि भाव्वे । पद्मिणी ऐशा ॥२८०॥
शुकें इतकें ऐकिलें । मग प्रतिउत्तर बोलिलें । तें ऐका तुह्मीं वहिलें । योगि जन ॥२८१॥
शुक ह्मणे सत्य सत्य । आह्मी एक पत्नी वृ-तस्थ । रंभे दुजें बोलसी व्यर्थ । सत्रावी भोगितो सुंदरी ॥२८२॥
नारी सत्रावी भोगिजे । हें सुख गुरुवचनीं लहिजे । तियेसंगें पाविजे । मोक्ष सायुज्यता ॥२८३॥
तिचे प्रसंगीं घर । चुकूनि सं-सार येरझार । ते नारी सुंदर मनोहर । पुरोन उरली ॥२८४॥
येरी तुह्मी नाशिवंत शरीरीं । दुर्गंधी मळमूत्र अघोरी । शरीरीं काम लक्ष त्यवरी । ते सुंदरी नावडे ॥२८५॥
तव रंभा ह्मणे अवधारीं । तुज कष्ट सदा संसारीं । सुख नेणसी तिळभरी । योगिया तूं ॥२८६॥
कष्ट भोगी अष्टमा सिद्धी । आमच्या वरीं नवविधी । हे कां नावडे तुज बुद्धी । ओढवली असे ॥२८७॥
सुख राज्य संपत्ति । चारी पदार्थ असती । धर्मकाम कर्म राज्य प्राप्ती । यज्ञ भोगदान ॥२८८॥
गाई ब्राह्मणांचें पाळन । लोकांचें सांभाळण । ये जा ह्मणती देशुगुण ऐसें न सांडीं मी सांगतें ॥२८९॥
उपकार करिसी लोकां । ओ-ळखी पडेल मंडळिका । राजासारिखे सुखा । नसे जाणा ॥२९०॥
सकळ धर्म जोडिसी । राया इंद्रातें मानसी । सर्व सुखभोगा लाभ तुजसी । मी नाचेन गायनीं ॥२९१॥
मग शुक ह्मणे चतुरी । तूं बोलसी वैखरी । नावडे मज अंतरीं । राज्यांतीं सुख नाहीम ॥२९२॥
राज्यपद करितां । पाप होतसे निभ्रांता । महा दोष पावतां । वेळु न लगे ॥२९३॥
राज्य करूनि नरक प्राप्ती । ऐसा कोण करूनि तरला क्षिती । सुकृतांच्या राशी नासती । राज्य करूनि जाण पां ॥२९४॥
राज्य करितां सरे धर्म । राज्य करी घडे अधर्म । राज्य करोनि पाविजे श्रम । निभ्रांत जाणा ॥२९५॥
अगे सुकृत जोडावें नानापरी । तें हारवी राज्यांतरीं । तें तूम नेणसी गे सुंदरी । बुद्धिहीने ॥२९६॥
म्हणोनि धर्मासी जतन करावें । सर्वसुख पदार्थ त्यजावे । हरिचरण सेवावे । जन्मोजन्मीं ॥२९७॥
जाण हरिश्चंद्ररायें आपण । राज्य दिधलें ब्राह्मणां । मुक्तपद निर्वाण । धरिलें निरंतरीं ॥२९८॥
पाहे पां राज्याभीतरी । राज्य पृथ्वीचें करी । तें तुजवांचोनि सुंदरी । नेणे कांहीं ॥२९९॥
राज्यें नव्हे चिरंजीवित्व जाणा । ऐसे आलें माझिया मना । यास्तव सांडूनियां वना । निघता झालों ॥३००॥
औट पाद भूमिका । दिधली ब्राह्मणा एका । सत्वा न ढळे देखा । म्हणोनि पृष्टी ओढली ॥३०१॥
राज्यपद नको गे सुंदरी । तूं नेणसी आमुची थोरी । आह्मी जाण ब्रह्मचारी । सुखी असों ॥३०२॥
तेंच राज्य अढळ असे । तंव रंभा ऐकोनि हांसे । ह्मणे लागलें पिसें । वांयांविण ॥३०३॥
बरवें ठीक लेणें । नाना अलंकार भूषणें । यावरी शुक-देव ह्मणे । हे वानूम नको रंभे ॥३०४॥
तूं नेणसी माझे अलंकार । किती लेणें अपार । शंख चक्र याहूनि थोर । काय असे ॥३०५॥
शंगारिजे येणें शरिर । शंख चक्र आह्मांसि पवित्र । काय करसील लेणीं फार । तीं आह्मं पाषाण ॥३०६॥
शृंगार मुद्रा जाण धन । शरीरीं भार होय जेणें । आह्मां त्यांसी काय कारण । सांग तूं अंगनें ॥३०७॥
संपत्ति जोडावी ह्मणसी । तरी करीन तपाच्या रासी । ह्मणऊनियां सर्वांसी । मज चाड नाहीं ॥३०८॥
तप धन कधींच न सरे । सवेंच करितां उदंड उरे । आह्मां हेंच धन पुरे । लक्ष कोटी ॥३०९॥
एक मूर्ख असती । अनंत द्रव्य मिळविती । मग नेऊनियां पुरिती । भूमिमाजीं ॥३१०॥
माझें माझें म्हणती मनीं । तेच करिती घोकणी । तेणें कारणें फजित होउनी । जोडिलें धन ॥३११॥
पिता पुत्र भांडणें । स्त्रिये बाळकासी बोलणें । तें जाय क्षणामाजी जाण । हानि होतां ॥३१२॥
या धनासाठीं कैसें करिती । इष्ट मित्रांसी दु:ख देती । विश्वास न मानिती । प्राणिमात्रांचा ॥३१३॥
अग्नीपासोनि वांचे जरी ठेवा । तरी राज उपद्रव घडे देवा । नाहींतरी चोरापां-सूनि हानि व्हावा । ऐसें होय ॥३१४॥
ऐसें भलत्यापरि जतन करितां । परि जाईगा निभ्रांता । दु:ख होई त्वरितां । पाहें गे तूं सुंदरी ॥३१५॥
मग मनीं धरिती संताप । ह्मणती द्रव्य गेलें आपोआप । बहु जोडिलें पाप । तें मेळवितां ॥३१६॥
मागें धर्म जरी करितों । अथवा आपंगासी देतों । अथवा अपत्यव-र्गासी वेंचितों । तरी बरें होतें ॥३१७॥
ऐसी करितां चिंतनी । रात्रंदिवस घोकणी । म्हणोनी तपाची सांठवणी । कदांचि न सरे ॥३१८॥
आतां तूं जाय गा येथुनी । आह्मी ब्राह्मण निष्ठुर ज्ञानी । मग बोलिली परतोनि । रंभा त्यासी ॥३१९॥
अगा तूं शाहणा होसी । पाहें बा माझिया रूपासी । आलिये तुजपासीं । योगिराया ॥३२०॥
केले बहुत सायास । आतां पाहे माझी वास । पुरवाधी माझी आस । तुंवा शुकदेवा ॥३२१॥
तूं आहेसी शाहणा चतुर । पाहें माझें स्वरूप शृंगार । आतां होईं कृपासागर । ऋषि-नंदना ॥३२२॥
तुंवा देख देखसी । देखण्या बहूत पाहसी । तरी मज ऐसी सरिसी । निधान न सांपडेल ॥३२३॥
बरवें माझें ला-वण्य । देवीं पाठविलें सगुण । तुज जोडलें निधान । आपोआप ये ठायी ॥३२४॥
अगा तुझे तपा आलें फळ । आतां तुज घालीन मी माळ । पाहे पाहा भरुनी डोळे । लावण्य रूप माझें ॥३२५॥
रूप स्वरूप सुंदरी । शहाणी आहे सकुमारी । मजहूनि सेजे ऐजी नारी । आणिक नाहीं ॥३२६॥
काय वानूं आपआपणा । तूं तरी चतुरांचा राणा । ऋतुसमयींच्या खुणा । जाणसी तूं ॥३२७॥
अथवा नेणसी तरी सांगेन । मज असे कोक शास्त्राचें ज्ञान । अनुसरलिया मन । तुज ज्ञान होईल ॥३२८॥
सोडोनिजां लाज । करितां ध्यान सहज । तप हें काय भोज । जोडलें तुज ॥३२९॥
जया राग नाहीं मनीं । तया बोलती महाज्ञानी । जेणें काम क्रोध झणीं । जिंकिला असे ॥३३०॥
मदन तोंडघसीं रिघाला । काळ मरणें जिंतला । तो वेळु न लागतां पातला । स्वर्ग भुवनासी ॥३३१॥
देव पाहों लागले गगनीं । अमर दाटले विमानीं । बोलों आरंभिलें मग वचनीं । योगिरायें ॥३३२॥
तूं भली वो शहाणी । ह्मणत होतीसी योगिनी । न डचकसी अझुनी । मना-मजी ॥३३३॥
किती वाणिसी आपआपणा । बोलसी ऋतुस-मईंच्या खुणा । ऐसें अपूर्व दारुणा । देखिलें असे ॥३३४॥
नव-द्वारीं निरंतर । सदा दुर्गंधी अपार । वोखटें हें कलेवर । वानूं नको रंभे ॥३३५॥
बाहेर बरवें शृंगारिजे । आणि वस्त्रें अलंकार लेइजे । दृष्टीं पाहतां देखिजे । नर्क कोटि ॥३३६॥
शरीर मु-ळमूत्राचा मेळा । अस्तिचर्माचा गुंडाळा । मग तयासी नांवाथिला । पिंड ऐसा ॥३३७॥
कृमि कीटकांचें घर । सकळ दुर्गंधी अपार । ऐसें हें असे शरीर । नाशिवंत ॥३३८॥
घडीभरी न करितां क्षाळण । तरी दुर्गंधीचा कल्होळ जाण । ह्मणोनि केलें परिमळ स्नान । शुद्धतेलागीं ॥३३९॥
झणीं तूं मुख वाखा-णिसी । तंव तें वाहात असे श्लेश्मासी । ऐसें विचारितां मानसीं । पाहें पां रंभे ॥३४०॥
शुकदेव ह्मणे वो सुंदरी । अमृत कैसें तंव अधरीं । विषय लहरीचे महापुरीं । बुडालीसे कामिनी ॥३४१॥
डोळे म्हणसी अति रसाळ । हें तों आहे पापाचें मूळ । ह्मणऊनियां काजळ । लेईंलें असें ॥३४२॥
तयाचें काळेपण न विटे । कुंकुम नाहीं हो कधीं फिटे । अंकित करोनि विटे । वानूं नको तूं रंभे ॥३४३॥
योगी संन्यासी निंदिजे । तें बरवें नाहीम जाणिजे । ह्मणून तुझें मुख लाजें । काळें झालें ॥३४४॥
तपाचें बरबें-पण । आह्मां नाही कारण । ह्मणोनि कामबाण । वानूं नको रंभे ॥३४५॥
मग या वचनावरी । रंभा स्वदेह विदारी । नखें घालूनि उदरीं । चिरिती झाली ॥३४६॥
तेव्हां शुक ह्मणे तिजप्रती । तूं शीण व्यर्थ करिसी । कारण नाहीं मजसी । तुझिया उदराचें ॥३४७॥
पाहें पाहा ऋषिराया । कैसी माझी निर्मळ काया । अ-व्हेर केलासी वांयां । न विचारितां ॥३४८॥
पाहें पां उदराभीतरीं । परिमळ नानापरी । जवादि अंबर कस्तुरी । आणि अगर चंदन । ॥३४९॥
ऐसी गा मी रंभा पवित्र । सुगंधाचें भांडार । देवऋषि मुनेश्वर । करिती आस माझी ॥३५०॥
ऐसें मी जाणतों गे सुंदरी । तरी येतों तुझिया उदरीं । माता शिणविली येरझारीं । नर-देहीं ॥३५१॥
तुझिया कुळीं जन्मतों । कडेसी वो खेळतों । मुखें स्तनपान करितों । आनंदें करोनियां ॥३५२॥
तुज ऐसी माता । केवि होय पतिव्रता । पूर्व सुकृतावांचोनि सर्वथा । प्राप्त नव्हे ॥३५३॥
तूं माझी वो जननी । क्रष्टविली दुष्ट वचनीं । हें वचन ऐकोनि । तेच क्षणीं उठली रंभा ॥३५४॥
मग निघाली तेथोनि । पावली इंद्रभुवनीं । राया इंद्रासी भेटोनि । बोलती जहाली ॥३५५॥
ह्मणे जी इंद्रराया । गेली या ऋषिच्या ठायां । बहुतप्रकारें तया । बोलिलें म्यां ॥३५६॥
तपें शब्दें प्रसवे कामधेनु । तृण चरे पंचाननु । पश्चिमेस उगवे भानु । जाण राया ॥३५७॥
ऐसें जाण गा नृपति । कवणें समयीं होती । परि शुक देवाचिये चित्तीं । अविनाश ॥३५८॥
ऋषि मुनि संन्यासी । मज देखोन ढळती तपासी । तैसी परी शुक-देवासी । नव्हे जाण ॥३५९॥
तैसा तो नव्हेजी योगिराजा । मनीं भाष न धरी दुजा । म्यां गेलिया ज्या काजा । तें सिद्धि न पावलें ॥३६०॥
शुक देव नमस्कार करूनि । अदृश्य झाला तेथूनि । देव अंतरीं विमानीं । पहात ठेले ॥३६१॥
सुरवर करिती पुष्प वर्षाव । तपा न ढळे शुक देव । देवगणांचा संदेह । फिटला तेणें ॥३६२॥
तप सुरवरांसि मानलें । शुकदेव अलक्ष्य जाहले । तेजीं तेज निमालें । निवडेचिना ॥३६३॥
उतरला पैलपार । संसारींचा भव-सागर । दुस्तर आणि दुर्धर । लोका तरावया ॥३६४॥
दोहों वा-तीचा दीपकू । प्रजळला एकरूपा । हरीहर स्वरूपू । एक झाले ॥३६५॥
ऐसें शुकदेव चरित्र । ऐकतांचि पुण्य पवित्र । वर्णितां जाणा विचित्र । तिहीं लोकीं ॥३६६॥
जे पढती नित्य नेमीं । ते होती मुक्तज्ञानी । तें फळ पावतां निर्वाणीं । झाला शुकदेव ॥३६७॥
श्रोते जे ऐकती । तया होय फळ प्राप्ती । हरिहर चरित्र क्षितीं । पुण्य पावन ॥३६८॥
विनवी विष्णुदास नामा । शुक देवें केली सीमा । चौर्‍यांशीं लक्ष योनीचे जन्मा । सार्थक केलें ॥३६९॥
ऐसें शुकदेव चरित्र । अगाध आणि विचित्र । विष्णुदास नामा विन-वित । भक्तांप्रति ॥३७०॥
मन्मथ संवत्सर पौष्य मासीं । सोम-वार अमावासेच्या दिवशीं । पूर्णता आली ग्रंथासी । श्रोते साव-काशीं परिसीजे ॥३७१॥

“संत नामदेव गाथा” शुकाख्यान अभंग १ ते ३७१ समाप्त

संत नामदेव अभंग । संत नामदेव गाथा 


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: transliteral

View Comments

  • KHUP CHHAN MAHITI SANT SAHITTYA MADHUN VACHAYLA MILTE. RAM KRUSHN HARI. KADACHIT MI KADHICH GRANTHH UGHDUN BAGHITALE NASATE PAN SANT SAHITYYAMADHE PRATTEK SANTANCHI MAHITI MILTE. BAHUTEK SAGLECH GRANTH AAHET AANI SANT HI AAHET. VACHTANA VATAT THAMBUCH NAYE.
    THANK YOU SO MUCH
    TUMCHYA TEAM LA KHUP SHUBHHECHHA