अभंग गाथा

संत नामदेव गाथा श्रीविठ्ठलमाहात्म्य

संत नामदेव गाथा श्रीविठ्ठलमाहात्म्य अभंग १ ते ८७

१.
निर्गुणींचें वैभव आलें भक्तिमिषें । तें हेम विठ्ठलवेषें ठसावलें ॥१॥
बरविया बरवें पाहतां नित्य नवें । ह्लदयीं ध्यातां निवे त्रिविधताप ॥२॥
चोविसांवेगळे सहस्रां आगळें । निर्गुणा निराळें शुद्धबुद्ध ॥३॥
वेदां मौन पडे श्रुतींसी कां नडे । वर्णितां कुवाडें पुराणांसी ॥४॥
भावाचें आळुक भुललें भक्तिसुखें । दिधलें पुंडलीकें सांधूनियां ॥५॥
नामा ह्मणे आह्मां अनाथां लागुनी । निडारले नयनीं वाट पाहें ॥६॥

२.
निर्विकल्प निराकारू । नि:शून्य निराधारू । निर्गुण अपरंपारु । चिदानंद सांबळें ॥१॥
तया पुंडलिकासाठीं । येऊनि उभें वाळवंटीं । दोन्ही कर ठेवुनि कटीं । प्रसन्न दृष्टि पाहातसे ॥२॥
ह्मणऊनि उठा घ्यारे वाट । ठाका पंढरी वैकुंठ । येर वावगे काय रे कष्ट । ब्रह्मी भेट पंढरीये ॥३॥
मूळप्राम मायापुर । पडिले भूत ग्रामा-चार । ह्मणऊनि कर जघनावर । उभा राहूनि दावितसे ॥४॥
वि-ठ्ठल नाम ह्लदयीं धरा । हाचि उतार पैलपारा । मग नाहीं येरझारा । शंभु कुमार सांगतसे ॥५॥
भेटी चौघे मुरडले । अठरा धांवतां भागले । पंथीं साहि भांडले । ते अद्यापि बुझले नाहीं ॥६॥
जो सहस्त्रा माजी न दिसे । चोविसांत न भासे । दो सहस्र अनारिसे । पाहतां अरे न दिसेचि ॥७॥
लयलक्ष लावूनि समाधि । योगियां होचि उपाधि । उघडा डोळा प्रेमपदीं । रे विठोजी न्याहाळा ॥८॥
येर वाउगि खटपट । ठाका पंढरी वाळुवंट । हरूनि मनुष्यपण दृष्ट । चतुर्भुज करिल ॥९॥
जना ऐहिक पाहारे हित । हें पंढरीचें कुळदैवत । येर वाउगे खेचर भूत । रे संगीत चित्रिंचें ॥१०॥
पूर्वज उद्धरावयाचि चाडु । तरी वेणुनादीं जेवण करा गोडु । कोटि-कुळें उद्धरती तुमच्या सुरवाडु । रे पावाल कैवल्य ॥११॥
धन्य धन्य तो संसारीं । जेणें देखिली पंढरी । जेणें सप्रेम होऊनि महाद्वारीं । लोटांगण घातलें ॥१२॥
केलें चंद्रभागे स्नान । आणि संतचरणीं दर्शन । नामघोषें निवे मन । समाधान जीवासी ॥१३॥
पंढरी हे वैकुंठ भुवन । म्हणऊनि करीं कांरे दरुषन । मग नाहीं आया गमन । रे सुरगण वंदिती ॥१४॥
भुक्ति मुक्तिचा दातारू । तो हा वोळगा सारंगधरू । नामया स्वामीचा दातारू । रुक्मादेवीवरु पंढरीये ॥१५॥

३.
अनिर्वाच्य ब्रह्म निगम ह्मणती शिणले वेवादति अठरा साही ॥१॥
तें हें पुंडलिकें चोहोंटा उभें केलें । भावें भुलविलें पंढरीये ॥२॥
घ्यारे घ् यारे तह्मी कैवल्याचेम पीक । देतो पुंडलीक सकळ जीवां ॥३॥
उपनिषदांचें मथितार्थ जें साराचें यथार्थ । तो हा पंढरीनाथ प्रगट जगीं ॥४॥
हरिहर विरंचि त्रिमूर्ति हाची । माउली दीनांची लोभा पर ॥५॥
जो श्रवणांचा श्रवण नयनांचा नयन ज्ञानाचा दर्पण दृष्ट होय ॥६॥
आदि मध्यें अंतीं व्यापक सर्वांभूतीं । तो हा झाला व्यक्ति भक्तिभावें ॥७॥
सदा चित्ता आनंदघन परिपूर्ण । कारणें महा कारण प्रभा हेचि ॥८॥
चित्ता चेतविता बुद्धीतें पाळिता । मनादि चाळिता इंद्रियांसी ॥९॥
तो या चराचरीं जीवलग सोइरा । ह्मणोनि अनुसरा पांडुरंगा ॥१०॥
नामा ह्मणे काया वाचा मनें त्याचें । नाम जपा कैचें जन्ममरण ॥११॥

४.
ज्ञानियांचें ज्ञेय ध्यानियांचे ध्येय । पुंडलिकाचें प्रिय सुख वस्तु ॥१॥
तें हें समचरण उभें विटेवरी । पहा भीमातीरीं विठ्ठल रूप ॥२॥
जें तपस्वियांचें तप जें जपकांचें जाप्य । योगि-यांचें गौप्य परम धाम ॥३॥
जें तेजकांचें तेज जें गुरु मंत्राचें गुज । जें पुजकांचें पूज्य कुळदैवत ॥४॥
जें जीवनांतें जीववितें पवनातें निववीतें । जें भक्तांचें उगवितें माया जाळ ॥५॥
नामा ह्मणे तें सुखची आयतें । जोडलें पुंडलि भाग्य योगें ॥६॥

५.
वेदांसी अगोचर परब्रह्म कारण । योगिया ह्लदयींचें ममत्व निर्वाण । आकळूं न कळेचि शेखीं धरियेलें मौन । तें रूप पंढरीये विटे समचरण ॥१॥
कानडा विठ्ठलवो । उभा भिवरेतीरीं । भक्तांचें आर्तवो जीवा लागलें भारी ॥धृ०॥
भूवैकुंठ पंढरी हे देवें रचियली पैं गा । शिवें ती वंदियेली विठो सम चरणांची गंगा । सदाचा नामघोषु कलिमल जाय भंगा । काय वानूं सुख तेथिंर्चे । भेटिलिया पांडुरंगा ॥२॥
विठठल नाम वाचे जना हाचि उपचारू । ह्मणवूनि दावि तुझे कटीं ठेवूनियां करू । येरासी मायानदी काम क्रोध मगरू । ठेवा हा नामयाचा स्वामि विठ्ठल वीरू ॥३॥

६.
वेडावली वाचा वेदाची बोलतां । देवा पाहूं जातां अनिर्वाच्य ॥१॥
अनिर्वाच्य वाचा बोलावया गेली । जिव्हा हे चि-रली भूधराची ॥२॥
भूधराची जिव्हा झालिसे कुंठित । नामा ह्मणे अंत नलगे त्याचा ॥३॥

७.
हवा हवा ह्मणताती श्रुति । परि त्या नेणती भुललीया ॥१॥
तुझिया रूपा नेणती अगा कमळापती । बाळक म्हणती गौळियाचें ॥२॥
विष्णुदास नामयानें दावियेल्या खुणा । पंढरीचा राणी श्रीविठ्ठल ॥३॥

८.
जेथें नाहीं कांहीं नाम रूप गुण । बोलती निर्गुण तया-लागीं ॥१॥
तोचि गोकुळांत होऊनि गोंवळ । झणवितो बाळ यशो-देचा ॥२॥
चिन्मय चिद्रूप अक्षय अपार । अपार परेहूनि पर ह्मणती ज्यातें ॥३॥
सर्वां भूतांचे फुटकाये खोळें । भरलें न गळे आत्मपणें ॥४॥
आनंदी आनंद मातला अपार । वेदालाही पार नाही ज्याचा ॥५॥
नामा ह्मणे सर्व रूपें जें रूपस । गोकुळीं विलास मांडियेला ॥६॥

९.
पुष्पासी परिमळु दूध घृत मेळु । ऊंस तो रसाळु बीज नाहीं ॥१॥
तैसें परब्रह्म आहे तें निर्वाण । वर्णितां पुराण नपडे ठायी ॥२॥
दीपाचीही दीप्ति दर्पणची कांति । तैसी ब्रह्ममति कवण जाणे ॥३॥
नामा ह्मणे जैसें सर्वांघटीं आकाश । केशव परमहंस तैसा जाणे ॥४॥

१०.
निर्गुण सगुण नाहीं ज्या आकार । होऊनि साकार तोचि ठेला ॥१॥
जळीं जळगार दिसे जैशा परी । तैसा निराकारी साकार हा ॥२॥
सुवर्ण कीं धन धन कीं सुवर्ण । निर्गुणीं सगुण ययापरी ॥३॥
ऐसा पूर्णपणें सहजीं सहज । सखा केशिराज प्रगटला ॥४॥
पांडुरंगीं अंगें सर्व झालें जग । निववी सर्वांग नामा ह्मणे ॥५॥

११.
आपणची कर्ता आपणची मित्र । आपण सर्वत्र हरी झाला ॥१॥
साधन साधितां हरि दिसे पूर्ण । प्रपंच हें भान न देखें डोळां ॥२॥
किमर्थ हें टवाळ मायामोह जाळ । वांयांच पा-ल्हाळ कोरडे करा ॥३॥
नामा ह्मणे सखोल विठ्ठल पूर्ण बोल । उच्चारितां मोल नलगे कांहीं ॥४॥

१२.
एक तत्व एकाकार सर्व देशीं । एक तो नेमेसी सकल जनीं ॥१॥
ऐसें ब्रह्म पहा आहे सर्व एक । नलगे विवेक करणें कांहीं ॥२॥
मिथ्या हें डंबर माया मथितार्थ । हरि हाची स्वार्थ वेगीं करी ॥३॥
नमा ह्मणे समर्थ बोलिला तो वेद । नाहीं भेदाभेद ब्रह्मपणीं ॥४॥

१३.
ज्ञान सत्य मुक्त शुद्ध बुद्ध युक्त । कारण रहित निरं-जन ॥१॥
तें आह्मीं देखिलें चर्मचक्षु दृष्टीं । उभा वाळवंटीं पंढ-रीये ॥२॥
वेदां अगोदर तयां सहस्रमुखा । तें झालें पुंडलिका लोभापार ॥३॥
परतल्या श्रुती ह्मणती नेती नेती । आह्मां गातां गीतीं सांपडलें ॥४॥
स्वरूपाचा निर्धार ओलती पुराणें । शिणलीं दरूशनें वेवादती ॥५॥
नामा ह्मणे यांसी भावची कारण । पावा-वया चरण केशवाचे ॥६॥

१४.
ब्रह्मीं ब्रह्म एक मुळीं नाहीं जग । सर्व मायायोग कल्प जाणा ॥१॥
स्थावर जंगम सर्व मयोपाधि । जाण पां त्रिशुद्धि आत्मज्ञामें ॥२॥
रवीच्या कीरणें जैसें मृगनीर । तैसें ब्रह्मीं कीर विश्व झालें ॥३॥
नामा ह्मणे वाचा ऐका निज खूण । स्वरूपीं तल्लिन होऊनि राहें ॥४॥

१५.
वंदावें तें काय निंदावें तें काय । सर्वांठायीं पाहें कों-दाटलें ॥१॥
आहे कवणा ठायीं नाहीं कवणा ठायीं । ठायींच्या पैं ठायीं कोंदाटलें ॥२॥
रविरश्मीचें तेज सर्वांठायीं असे । त्या परि अनायासें बुजतु जाय ॥३॥
भाव तेंचि ब्रह्म ब्रह्म तेंचि कर्म । जा-णोनियं वर्म ह्मणे नामा ॥४॥

१६.
हात पाय सर्व मिळोनियां मेळा । चला पाहूं डोळां ह्मणताती ॥१॥
देखणें तें नव्हे देखतील कैसें । देखण्याची असे सर्व डोळां ॥२॥
चंचुभूत अंश अशांत मिळाली । निर्गुणाची खोली देव जाणे ॥३॥
नामा ह्मणे तेव्हां तुज पाहों आला । पाहोनि तो ठेला सर्वांभूतीं ॥४॥

१७.
देख देख देख पैल पैल । पैल उभा असे विटेवरी ॥१॥
खोळे बुंथीचा आकारु झकळे पीतांबरु । सौभाग्य सुंदरु विठ्ठल देव ॥२॥
दान दीक्षा गुरू नामया दातारू । धरावया नागरू केशिराज ॥३॥

१८.
काष्ठीं अग्नीम असे प्रगटे नयनीं । काष्ठींही असोन्नी वेग-ळाची ॥१॥
तैसें निर्धारितां असे पैं सकळां । दावितां निराळा पांडु रंग ॥२॥
तरु बीजीं जैसें सर्व व्यापक असे । जळाविण नसे फळ पहा कीं ॥३॥
नामा ह्मने बीज नासिलें तें भोग । तूंचि पांडुरंग आह्यांसाठीं ॥४॥

१९.
वैकुंठीं माहें तंव चतुर्भुज दिसे । परि सुंदर रूप तेथें नाहीं ॥१॥
क्षीरसागरीं पाहें तों तेथें निद्रिस्त । परि सुंदर रूप तेथें नाहीं ॥२॥
द्वारके पाहें तंव पाताळीं चरण । परि सुंदर रूप तेथें नाहीं ॥३॥
ह्लदयीं पाहें तंव अव्यक्तचि दिसे । परि सुंदर रूप तेथें नाहीं ॥४॥
नामा ह्मणे ऐसा सर्व गुण संपूर्ण । पंढरीये उभा शोभतसे ॥५॥

२०.
निर्गुण सगुण नव्हे तें समान । तैसें तेंही जाण योगा-भ्यासीं ॥१॥
प्रल्हादासी हरी शंख चक्र गदा । सगुण गोविंदा शोभतसे ॥२॥
अर्जुनासी देव उभा पाचारासी । सखा उद्धवासी साक्ष दावी ॥३॥
नामा म्हणे माझा केशिराज भोळा । दाविसी गो-पाळां बाळलीळा ॥४॥

२१.
अमराचें ठेवणें विश्वाचें जीवन । सौभाग्य लावण्य र-खुमाईचें ॥१॥
धन्य गौळियां जीणें कृष्ण बाळपण । यशोदा-नंदन क्रीडा करी ॥२॥
अंगें स्थूलपणें ब्रह्म खेळा येणें । लीला सा-भावणें रोमरंघ्रीं ॥३॥
विष्णुदास नामा दैवेंची लाहाणें । ज्या घरीं खेळनें परब्रह्म ॥४॥

२२.
धन्य गोकुळ महीतळीं मंडळ । सुखावलें ब्रह्म जेथें झालें सगुण ॥१॥
काय न कळे आवडी त्याचा भाव । सुख नेलें रे गोवळीं ह्मणती देव ॥२॥
आलें वैकुंठभुवनीं विकृति । ते हे पाहवी गौळियांची विश्रांति ॥३॥
योगियांचे ध्यानीं उगवलें । तया गौळि-यांचे अनुरागीं रंगलें ॥४॥
वेद श्रुतीसी पारू न कळे । कोण सुख सर्वांहूनि आगळें ॥५॥
नामया स्वामी आमुचें कुलदैवत । शरण जाऊनि गौळिया मागूं उच्चिष्ट ॥६॥

२३.
डोलत डोलत टकमक चाले । गोजिरीं पाउलें टाकू-नियां ॥१॥
पायीं रुणझुण वाजताती वाळे । गोपी पाहतां डोळे मन निवे ॥२॥
सांवलें सगुण मानस मोहन । गोपी रंजवण नामा ह्मणे ॥३॥

२४.
उपाधि निर्मळ शोभती चरण । नादबिंदु पूर्ण मध्य-भागीं ॥१॥
कदंबावरती चढे वनमाळी । शोभती निढळा ऊर्ध्वपुं‍ड्र ॥२॥
श्रवणीं कुंडलें शोभती नक्षत्र । श्रीमुख पवित्र दिसों येत ॥३॥
नामा ह्मणे मज ढापवेना डोळा । करुणा कल्लोळे देखोनियां ॥४॥

२५.
यमुने पाबळी देखियेली मूर्ती । तळपती दीप्ति तेजो-मय ॥१॥
सांवळें सुंदर ओंकार वर्तुळ । मध्यें घननीळ पाचारितो ॥२॥
सुरंग ओतिली प्रेमतनु छाया । तेणें तुझी माया काय बाणूं ॥३॥
नामा ह्मणे विठो चातुर्य करुणा । गुणागुणीं किरणा प्रभा भासे ॥४॥

२६.
विटेवरी समचरण सुंदर । बाळ सकुमार यशोदेचें ॥१॥
वाळे वांकी गर्जे तोडर चरणीं । नाद झणझणी वाजताती ॥२॥
कांसे कसियेला पीत पीतांबार । लोपे झडकर तेणें प्रभा ॥३॥
नामा ह्मणे नाहीं तुझ्या रूपा पार । तेथें मी किंकर काय वानूं ॥४॥

२७.
प्रथम अवतारीं देव मच्च झाले सागरीं । वधोनि शंखा-सुर वैरी आणिले वेद ॥१॥
कूर्म अवतारी सांवरीली सृष्टी । वरा-हद्विज नेहटी धरणीधरु ॥२॥
प्रल्हाद कैवारा स्तभांभितरीं । बळी बंधन हरी प्रगत झाला ॥३॥
रेणुका नंदन द्विजकुळ पाळण । त्रिं-बक भजन रघुनाथ ॥४॥
गोकुळीं अवतारू सोळासहस्र वरू । आ-पण योगेश्वरू बौध्यरूपीं ॥५॥
कल्की अवतारू वदतसे वरू । नामया दातारू केशिराज ॥६॥

२८.
कमळगर्भा मनीं थोर चिंता करी । पद्म ठसेवरी उम-टताती ॥१॥
नीलोत्पल जैसें चरण वानूं कैसे । सकुमार राजस विठ्ठ-लाचे ॥२॥
लावण्यसागरु रूप पाहों ठेली । दृष्टी पैं खुंटली रुक्मिणीची ॥३॥
नामा ह्मणे विठोचे चरण सकुमार । तेथें वाहे धार गंगादेवी ॥४॥

२९.
काळा गे दादुला पाहतां आकळू । तो झाला गोवळू नंदाचा ॥१॥
काळागे दादुला काळागे दादुला । पंढरीं पहा चला विठ्ठलगे ॥२॥
काळा ह्मणोनी पाहों गेलों जवळां । सुनीळू सांवळा दिसतसे ॥३॥
नामा ह्मणे सर्व भक्षितो हा काळू । भक्तांचा कृपाळू श्रीविठ्ठल ॥४॥

३०.
सहस्रदळांत आकाशाच्या परी । राहोनी शरीरीं शोभा दावी ॥१॥
तेंचि नटे थाटे उभा विटेवरी । कर कटावरी ठेऊनियां ॥२॥
जयाचिये नाभीं जन्मला विधाता । तेथोनी वाढता लोक झाला ॥३॥
शुतीचिये वाचे नोहे गोचर । जेथें अवतार तिही देवा ॥४॥
नामा ह्मणे विश्वंभरू आणिक । अंगुळ दशक आहे जें कां ॥५॥

३१.
मत्स्य कच्च क्रोड मृग ते खुजट । जेथूनि प्रगट झालीं रूपें ॥१॥
तेंचि ब्रह्म उभें भिंवरेच्या तिरीं । हात कटावरी ठेवू-नियां ॥२॥
मातृघाती हिंडे वनीं जो रडत । चोर जात घात करी दुष्ट ॥३॥
दिगंबर अश्वारूढ खड्गधारी । पृथ्वीचा जो करी ग्रास एक ॥४॥
नामा म्हणे मुंगी आदि ब्रह्मवरीं । नाना अवतारीं एकलचि ॥५॥

३२.
परब्रह्ममूर्ति सांवळें सगुण । पंढरी निधान वाळुंवटी ॥१॥
आनंद अमृत वोळला दरुशनें । तुटेल बंधन हेळामात्रें ॥२॥
नामा म्हणे नको नामीं सदा मन । उभा नारायण भेटी पुरे ॥३॥

३३.
कस्तुरी कुंकुम रेखे लाल टिळा । केशराची उटि सर्वां-मासी ॥१॥
पाहिला पाहिला माझा पांडुरंग । जीवीं जिवलग डोळे भरी ॥२॥
हार शोभे गळां मंजुरी़चा तुरा । कर्ण रत्न फळा झळाळित ॥३॥
विटेवरी नीट गोमटीं पाउलें । त्यांवरी ठेविलें मस्तक म्यां ॥४॥
नामयाची धणी भुकेली ते धाली । आनंद दि-वाळी आजि झाली ॥५॥

३४.
सुखाचें हें सुख श्रीहरि मुख । पाहताही गेली ॥१॥
भेटली भेतली विठाई माउली । वासना निवाली जिवां-तील ॥२॥
चंद्रसी चकोर मेघासी मयूर । वाटे तैसा भर आनंदाचा ॥३॥
नामा ह्मणे पाय आणि ताप दु:ख । गेलें झालें सुख बोलवेना ॥४॥

३५.
माझ्या मनें तुझ्या चरणीं दिली बुडी । इंद्रियें बापुडी वेडावलीं ॥१॥
आतां विषयसुख जागावें हें कोणें । जाणोनी भो-गणें कोणें स्वामी ॥२॥
देह सहज स्थिति राहिले निष्काम । ह्लदयीं सद प्रेम वोसंडत ॥३॥
नामा म्हणे केशवा कृपेच्या सागरा । तूं आह्मां सोयरा आदि अंतीं ॥४॥

३६.
परब्रह्म अविनाश आणि आनंदघन । त्याहूनि चरण गोड तुझे ॥१॥
तें जीवित्व न सोडीं अगा पंढरिनाथा । जाणसी तत्वता ह्लदय माझें ॥२॥
परात्पर ध्याइजे अपरांपर । त्याचेही जिव्हार पाय तुझे ॥३॥
सच्चिदानंदघन जेथें हरपलें मन । त्याहूनि चरण गोड तुझे ॥४॥
नामा ह्मणे तुझीं पाउलें सकुमार । तें माझें माहेर विटेवरी ॥५॥

३७.
अवताराची राशी तो हा उभा विटेवरी । शंख चक्र- गदापद्मसहित करीं ॥१॥
देखिला देखिला देवा आदिदेव बरवा । समाधान जीवा पाहतां वाटे गे माये ॥२॥
सगुण चतुर्भुज रूपडें तेज पुंजाळती । वंदी चरणरज नामा विनवी पुढती गे माय ॥३॥

३८.
शांति भीमातीरीं भक्ति पंढरपुरीं । प्रेम विटेवरी देखि-यलें ॥१॥
देखिलागे माय देखिलागे माय । देखिलागे मय पंधरीये ॥२॥
नामा रूपातीत नित्य सदोदित । जेथें विरे चित्त योगियांचे ॥३॥
दुरी ना जवळी त्रिपुटीं वेगळा । केशव भेटला नामा ह्मणे ॥४॥

३९.
योगियांचें ब्रह्म शून्य व्योमाकार । आमुचें साकार विटेवरी ॥१॥
दाटुंगें नागर कटीं ठेऊनि कर । सर्प्वस्वें उदार भक्ता-लागीं ॥२॥
ज्ञानीया सिद्धांतीं लक्षापरी नये । आमुची वाट पाहे अनाथाची ॥३॥
पुंडलिका भावा वोळले वोरसें । नेणों काय कैसें प्रेम त्याचें ॥४॥
जाप्यकाचें जाप्य नाम मंत्रमय । आमुचें भक्तीप्रिय संसारी कं ॥५॥
नाम ह्मणे जीवें करीन ओंवा-ळणी । झणीं चक्रपाणी दिठावसी ॥६॥

४०.
श्रीमुख साजिरें कुंडलें गोमटीं । तेथें माझी दृष्टी बैसलीसे ॥१॥
कटावरी कर समचरन साजिरे । देखावया झुरे माझें मन ॥२॥
माहेरीची आस दसर दिवाळी । बाहे ठेवी निढळी वाट पाहे ॥३॥
बंदिजन नामा उभा महाद्बारीं । कांर्ति चराचरीं वर्णितसे ॥४॥

४१.
चाळक माझें मन पांगुळ पैं झालें । साक्षात्कारें मन हारपोनी गेलें ॥१॥
मन हारपलें करूं आतां काय । पहावया गेलें तंव परतोनी कांही नये ॥२॥
भक्ति ज्ञान वैराग्य नोहे । अवघेंचि आहे अवघें तो आहे ॥३॥
नामा ह्मणे जनाबाई आहे बो कैसा । बाबा उदकीं घट बुडोनी ठेला जैसा ॥४॥

४२.
केशवाच्या नामीं लागलेंसे ध्यान । देखिल्या नयन तदाकार ॥१॥
जया तया ह्मणे माझा चक्रपाणी । जाय लोटांगणीं सर्व भावें ॥२॥
प्रेम बोथरत नामाचेनि छंद्रें । ह्लदय प्रेमानंदें वोसं-डत ॥३॥
धांवूनि येऊनि चरणाजवळीं । बंदी पायधुळी सर्वभावेम ॥४॥
घन:श्याम मूर्ति सुंदर सांवळी । ध्यान ह्लदयकमळीं नित्य राहे ॥५॥
भाग्यवंत नामा भक्तां शिरोमणी । अखंड उन्मनी भोगितसे ॥६॥

४३.
वेणू वाहूनि चित्त दुहिलें । रूप देऊनि मज मनें मोहि यलें ॥१॥
वेधु वेधकू गोपाळ लाघवी । जीवा लवियली आवडी नित्य नवी ॥२॥
दृष्टीपुढें माझें ध्यान ठेवियेलें । वृत्तिसहित मन तेथें माझें गोविलें ॥३॥
शुद्ध शामकमळदळ लोचनु । पावा वाजवि-तसे देहुडा रुणझुणीं ॥४॥
तया प्रभा दिसती दिशा निर्मळ । कृष्ण पाहतां मन झालें व्याकुळ ॥५॥
नामया स्वामीचें अनुपम्य रूपडें । पाहतां मन फिरलें माघारें ॥६॥

४४.
शाममूर्ति डोळस सुंदर सांवळी । तें ध्यान ह्लदय- कमळीं धरूनि ठेला ॥१॥
सकळ स्थिति सुखाचा अनुभव झाला । सकळ विसरला देहभाव ॥२॥
पांगुळलें मन स्वरूपीं गुंतलें । बोलणें खुंटले प्रपंचाचें ॥३॥
सबाह्याभ्यंतरीं स्वरूप कोंदलें । द्वैत निरसिलें चंद्राकारें ॥४॥
निजरूप निर्धारितं नयन सोज्वळ झाले । रोमांच दाटले रवरवीत ॥५॥
नामामृताचा घन वोळला अंबरीं । वर्षाव सहस्र धारीं होत असे ॥६॥
तें क्षीर सेवितां झालें समाधान । चुकलें जन्म-मरण कल्पकोडी ॥७॥
सहज सुखें निवाला भवदु:ख विसरला । विसांवा भेटला पांडुरंग ॥८॥
नामा ह्मणे देवा दृष्टि लागो झणीं । पुंडलिका धर्में करूनि जोडलासी ॥९॥

४५.
जीव विठ्ठल आत्मा विठ्ठल । परमात्मा विठठल विठ्ठल ॥१॥
जनक विठ्ठल जननी विठ्ठल । सोयरा विठ्ठल सांगाती ॥२॥
अहिक्य विठ्ठल परत्र विठ्ठल । निरंतर विठ्ठल तारीता ॥३॥
नाम विठ्ठल रूप विठ्ठल । पति पावन विठ्ठल विठ्ठल नामा ॥४॥

४६.
तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल । देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल ॥१॥
माता विठ्ठल पिता विठ्ठल । बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल ॥२॥
गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल । निधान विठ्ठल निर्मतर विठ्ठल ॥३॥
नामा म्हणे मज विठ्ठल सांपडला । ह्मणोनी कळिकाळां पाड नाहीं ॥४॥

४७. माता पिता बंधु भगिनी इष्टमित्र विठ्ठल तूं रे ॥धृ०॥
बापा यावें भेटावें विसांवा माझा गा तूं । माझा कुळाचार माहेर रे जिव्हार विठ्ठल तूं ॥१॥
माझें विद्याधन आयुष्य आरोग्यता विठ्ठल तूं गा । माझें तप व्रत तीर्थ दान पुण्य विठोबा तूं गा ॥२॥
माझा गुरुमंत्र दैवत आगम निगम विठ्ठल तूं गा । भूपति सुरपति ब्रह्म-मूर्ति विठोबा तूं गा ॥३॥
माचा आचार विचार सत्यवाद धीर धर्म विठोबा तूं गा । यश कीर्ति निवृत्ति आतां माझी तृप्ति विठोबा तूं गा ॥४॥
माझे यम नियम प्राणायाम प्रत्याहार विठोबा तूं गा । नामा ह्मणे विठोबा केशव परमात्मा माझा तूं गा ॥५॥

४८.
नाम बरवें रूप बरवें । दर्शन बरवें कानडिया ॥१॥
वेदांसी कानडें श्रुतीसी कानडें । परब्रह्म उघडें पंढरीये ॥२॥
नामा ह्मणे विठो त्रिभुवन बरवें । त्याहूनि बरवें प्रेम तुझें ॥३॥

४९.
बरवेपणें बरवा बाप मदनाचा । तो स्वामि आमुचा पंढरिराव ॥१॥
उदारपणें उदार दाता त्रैलोक्याचा । तो स्वामि आमुचा पंढरिराव ॥२॥
झुंझार आणि शूर अरी त्या दैत्यांचा । तो स्वामि आमुचा पंढरिराव ॥३॥
चतुरपणें चतुर बाप ब्रह्मयाचा । तो स्वामि आमुचा पंढरिराव ॥४॥
पवित्रपणें पवित्र उद्धार तीर्थांचा । तो स्वामि आमुचा पंढरिराव ॥५॥
नामा म्हणे आधार सकळां जीवांचा । तो स्वामि आमुचा पंढरिराव ॥६॥

५०.
विटेवरी उभा दीनांचा कैवारी । भेटाया उभारी दोन्ही वाह्या ॥१॥
गुण दोष त्यांचे न पाहेचि डोळी भेटे वेळोवेळां केशिराज ॥२॥
ऐसा दयावंत घेत समाचार । लहान आणि थोर सांभाळितो ॥३॥
सर्वांलागीं देतो समान दरुशन । उभा तो आपण सम पायीं ॥४॥
नामा ह्मणे तया संतांची आवडी । भेटावया कडाडी उभाची असे ॥५॥

५१.
दीनाची माउली । आजि म्यां देखिली ॥१॥
कटीं ठेवू -निया कर । उभी राहे विटेवर ॥२॥
मुगुट रत्नांचा साजिरा । वरी मोतियांचा तुरा ॥३॥
रूप लावण्य गोजिरें । ह्लदयीं पदक साजिरें ॥४॥
कासे पिंवळा पीताबर । चरणीं ब्रिदाचा तोडर ॥५॥
भक्तां कृपेची सावली । नामा वंदी पायधुळी ॥६॥

५२.
आषाढी कार्तिकी हेचि आह्मां सुगी । शोभा पांडुरंगीं घनवटे ॥१॥
संतांचीं दर्शनें हेंचि पीक जाण । देतां आलिंगन देह निवे ॥२॥
देह निव्वे किती नवल सांगावें । जीवासी दुणावे ब्रह्मानंद ॥३॥
नामा म्हणे यासी मूळ पांडुरंग । त्याचेनि अव्यंग सुख आह्मां ॥४॥

५३.
आवडे जें जीवा तें पंढरिये उभें । पुंडलिकें लोभें राह-त्रिलें ॥१॥
जोडूनि जाऊलें ठेवियलीं इटे । करद्बय गोमटें कटावरी ॥२॥
कान मुख डोळे न ह्मणती पुरे । सेवितां न पुरे धनी मना ॥३॥
गोड लागे पोट न भरे न धाय । भुकेलीच राहे भूक सदा ॥४॥
नामा ह्मणे संतसंगती विश्वास । घेऊं अनुभवास फार फार ॥५॥

५४.
जयालगिं ह्लदय उले । तें म्यां जीवेंसि धरिलें ॥१॥
विठ्ठालाचीं पाऊलें । म्यां मस्तकीं वाहिलीं ॥२॥
नामा म्हणे मुनि रंगले । तें म्यां जीवेंसि धरिलें ॥३॥

५५.
आमुचा विठ्ठल प्रचंड । इतरा देवांचें न पाहूं तोंड ॥१॥
एका विठ्ठालांचून । न करूं आणिक भजन ॥२॥
आह्मां एकविध भाव । कदा न ह्मणूं इतरां देव ॥३॥
नित्य करूं हा अ-भ्यास । म्हणे नामा विष्णुदास ॥४॥

५६.
भजूं एका विठोबास । आणिक न करूं अभ्यास ॥१॥
येथें साधन आहे एक । पाहों विठोबाचें मुख ॥२॥
वर्णूं हरीचे पवाडे । काळ लावूं देशधडे ॥३॥
नामा विष्णुदास ह्मणे । ऐसें करूम हरीकीर्तन ॥४॥

५७.
जीवप्राणें एक विठ्ठालची व्हावा । ऐसिया मी भावा रातलिया ॥१॥
आवडे पंढरी आवडे चंद्रभागा । येती यमुनागंगा प्रतिदिनीं ॥२॥
आवडे पद्मतीर्थ आवडे गरुडपार । राउळीं माहेर पांडुरंग ॥३॥
नामा म्हणे अहो विठाईरुक्माई । आणिकांपाशीं नाहीं चित्त माझें ॥४॥

५८.
न पाहें गे माय विठईविण डोळां । सर्वस्वें कंटाळा आणिकांचा ॥१॥
विठोबाविण कांहीं नायकें मीं कानीं । जडली चरणीं चित्तवृत्ती ॥२॥
आणिकांचे मार्गीं न चालोत पाय । जीव वोढे सय पांडुरंग ॥३॥
नामा म्हणे करीं आणिकांची पूजा । न करीं गरुडध्वजा वांचूनियां ॥४॥

५९.
विठ्ठल कानडें बोलूं जाणे । त्याची भाषा पुंडलीक नेणे ॥१॥
युगें अठ्ठावीस झालीं । दोघां नाहीं बोला बोली ॥२॥
कर टे-वूनि कटावरी । उभा भिंवरेच्या तिरीं ॥३॥
नामा ह्मणे स्वामि माझा । उभा भक्तांचिया काजा ॥४॥

६०.
मान तोडावया कर शस्त्रांचे । कठिण बहुतांचे उभारिले ॥१॥
तरी न वदें न वदें आन । आन कांहीं या विठोबावांचून ॥२॥
विठोबा परतें दैवत आहे ह्मणाती । ऐसें श्रुती स्मृती जरी बोलती । तरी ते अपशब्द कानीं पडों न द्यावे । पाखांडी म्हणती जरी उगोंचि असावें ॥३॥
ब्रह्मदेवेसी जालिया भेटी । तोहि जरी वदेंल ऐसिया गोष्टी । या विठोबापरतें दैवत म्हणेल सृष्टीं । चळला पोटीं निभ्रांत जाणा ॥४॥
कोटी कोटी ब्रह्मांडे एक एक रोमीं । व्यापू-नियां व्योमीं वर्ततसे ॥५॥
तो हा माझा विठोबा सर्वांघटीं सम । न सांडावें वर्म ह्मणे नामा ॥६॥

६१.
बांधिलें राहीना वैरलें खाईना । दवडिलें जाईना जाणते हो ॥१॥
तय खुंटा नांदावें सौरसें बांधावें । कशानें करावें वोढाळें हो ॥२॥
तया नेत्र ना पाय तिन्ही एक पाहे । न देखावे ते ठाय देखताहे ॥३॥
नामा म्हणे श्रोता विचारावें ज्ञानीं । केश-वाचे नयनीं उतरला ॥४॥

६२.
ध्यान धारणा नलगे टाळी । विठो पाहावा उघडे डोळीं ॥१॥
विठो समाधीचें सुख । पाहतां हरे तहान भूक ॥२॥
नामा ह्मणे न करीं कांहीं । चित्त रंगलें हरीचें पायीं ॥३॥

६३.
येतियां पुसे जातियां धाडी निरोप । पंढरपुरीं आहे माझा मायबाप ॥१॥
येंई विठाबाई आई माउलीये । निढळावरी कर ठेऊनि पालवीये ॥२॥
पिवळा पितांबर गगनीं झळकला । गरुडावरी बैसोनी माझ कैवारी आला ॥३॥
डोळ्यांतील बाहुली माझी विठाई झाली । घनानंद मूर्ति माझ्या ध्यानासी आली ॥४॥
विठोबाचें राज्य आह्मां नित्य दिवाळी । विष्णुदास नामा जीवेंभावें ओंवाळी ॥५॥

६४.
विठ्ठलेंविण जया न गमे एक घडी । सर्वस्व आवडी विठ्ठालाची ॥१॥
विठ्ठालचि माता विठ्ठालचि पिता । भगिनी आणि भ्राता विठ्ठालचि ॥२॥
विठ्ठालचि क्रिया विठ्ठालचि कर्म । विठ्ठाल सकल धर्म कुळदैवत ॥३॥
गुज गौप्य जीविचें विठ्ठाल सांगावे । विठ्ठालें पुर-वावें कोड त्याचें ॥४॥
सर्वकाळ करणें विठ्ठालाची कथा । विठ्ठाल जडला चित्ता जयाचिया ॥५॥
विठ्ठाल जागृति स्वप्र आणि सुषुप्ति । अखंड वदती विठ्ठाल विठ्ठाल ॥६॥
ऐसें सर्वस्वेसीं विठ्ठाल भजतां । सुख आलें हातां विठ्ठालाचे ॥७॥
नामा ह्मणे त्याचे चरणरज होऊन । जाहलोंसे पावन ह्मणे आतां ॥८॥

६५.
विठ्ठाल विसांवा सकळिकां । विठ्ठाल आधार तिही लोकां । विठ्ठाल नकळे ब्रह्मांदिकां । विठ्ठाल रेखा पंढरीये ॥१॥
विठ्ठाल डोळस सांवळा । विठ्ठाल धरारे मानसीं । विठ्ठाल सोडवील अहर्निशीं । विठ्ठालावीण मुक्ति कैंची । कुंटणी गणिकेसी उद्धरिलें ॥३॥
विठ्ठाल उभा भीमातिरीं । कर ठेवूनि कटावरी । विठ्ठाल भक्ताकाज कैवारी । विठ्ठाल हरी महादोष ॥४॥
विठ्ठाल अनाथ कोंवसा । विठ्ठाल नुपेक्षी भरवंस। विठ्ठालेंविण शून्य दाही दिशा । विठ्ठालविण नाहीं हे अनेक ॥५॥
श्रीविठ्ठल भक्तीरस । श्रीविठ्ठल परम पुरुष । विष्णुदास ह्मणे नामा ॥६॥

६६.
दोन्ही हात ठेवूनि कडां । उभा भिवरेच्या थडां ॥१॥
हरि बरवया बरवया । विठोबा पंढरीच्या राया ॥२॥
नामा ह्मणे वेगीं धांवा । देव आले याची गांवा ॥३॥

६७.
अवघें तीर्थ तीर्थरूप । परि तें विठ्ठाल चरणीचें स्वरूप । विठ्ठाल देखिलिया नि:पाप । जीवजंतु होताती ॥१॥
एवढें क्षेत्र पांडुरंग । सर्वां तीर्थांमाजी अभंग । धरिलिया संतसंग । महादोष हरताती ॥२॥
हरिकीर्तन करीं वेगीं । हेंचि उद्धरील जगालागीं । जें जें सरलें पांडुरंगीं । तें तें गेलें वैकुंठा ॥३॥
नामा जपे सदा काळीं । रामकृष्ण नामावळी । विठ्ठाल विठ्ठाल ह्लदयकमळीं जपतसे सर्वदा ॥४॥

६८.
केशव आराध्य देवाचाही देव । पंढरीचा राव पांडुरंग ॥१॥
पांडुरंमाविण नाहीं त्रिभुवनीं । भोळ्या चक्रपाणी वांचूनियां ॥२॥
नामा ह्मणे ध्यानीं ध्यावें विठोबासी । अखंड मानसीं भजा देवा ॥३॥

६९.
अनंत ह्मणती माझिया स्वामीतें । अनंत गुण त्यातें ह्मणोनियां ॥१॥
पतित पावन ह्मणती माझिया स्वामीतें । उद्धरी पति-तातें म्हणोनियां ॥२॥
विश्वंभर म्हणती माझिया स्वामीतें । पोशि-तो विश्वातें ह्मणोनियां ॥३॥
जगजीवन ह्मणती माझिया स्वामीतें । जीववी जगातें ह्मणोनियां ॥४॥
ह्लषिकेश ह्मणती माझिया स्वामी- तें । चाळी इंद्रियातें म्हणोनियां ॥५॥
नामा ह्मणे केशव म्हणती स्वामीतें । नासितो क्लेशातें म्हणोनियां ॥६॥

७०.
पुंडलिक भक्तबळी । विठो आणिला भूतळीं ॥१॥
अनंत अवतार केवळ । उभा विटेवरी सकळ ॥२॥
वसुदेवा न कळे पार । नाम्यासवें जेवी फार ॥३॥
भक्त भावार्थां विकला । दासी जनीला आनंद झाला ॥४॥

७१.
भला भला पुंडलिका । तुझ्या भावार्थाचा शिक्का ॥१॥
भलें घालूनियां कोडें । परब्रम्हा दारापुढें ॥२॥
घाव घातला निशाणीं । ख्याति केली त्रिभुवनीं ॥३॥
जनी म्हणे पुंडलिका । धन्य तूंचि तिहीं लोकां ॥४॥

७२.
पंढरीचें सुख पुंडलिकासी आलें । तेणें हें वाढिलें भक्तालागीं ॥१॥
भुक्ति मुक्ति वरदान दिधलें । तेंहि नाहीं ठेविलें आपणापाशीं ॥२॥
उदार चक्रवर्ती बाप पंडलिक । नामें विश्वलोक उद्धरिले ॥३॥

७३.
अरे विठया विठया । मूळ मायेच्या कारटया ॥१॥
तुझी रांड रंडकी झाली । जन्मसावित्री चुडा ल्याली ॥२॥
तुझें गेलें मढें । तुला पाहून काळ रडे ॥३॥
उभी राहूनि आंगणीं । शिव्या देत दासी जनी ॥४॥

७४.
जन्म खातां उष्टावळी । सदा राखी चंदावळी ॥१॥
राहीरुक्मिणीचा कांत । भक्तिसाठीं कण्या खात ॥२॥
देव भुलले पांडुरंग । ऐसा जाणावा श्रीरंग ॥३॥
जनी म्हणे देवराज । करी भक्ताचें हो काज ॥४॥

७५.
ऐसा आहे पांडुरंग । भोग भोगूनि निसग ॥१॥
अविद्येनें नवल केलें । मिथ्या सत्यत्व दाविलें ॥२॥
जैसी वांझेची संपत्ति । तैसी संसार उत्पत्ति ॥३॥
तेथें कैचि बा धरिसी । ब्रम्हीं पूर्ण जनी दासी ॥४॥

७६.
स्मरतांचि पावसी । तरी भक्तांसी लाधसी ॥१॥
ऐसा नाहीं न घडे देवा । वांयां कोण करी सेवा ॥२॥
न पुरतां आस । मग कोण पुसे देवास ॥३॥
कोठें चक्रपाणी । तुज आधीं लाही जनी ॥४॥

७७.
बाप रकुमाबाई वर । माझें निजाचें माहेर ॥१॥
तें हें जाणा पंढरपुर । जग मुक्तीचें माहेर ॥२॥
तेथें मुक्ति नाहीं म्हणे । जनी न पाहे याचें वदन ॥३॥

७८.
अनंत लावण्याची शोभा । तो हा विटेवरी उभा ॥१॥
पितांबर माल गांठीं । भाविकांसी घाली मिठी ॥२॥
त्याचे पाय चुरी हातें । कष्टलीस माझे माते ॥३॥
आवडी बोलें त्यासी । चला जाऊं एकांतासी ॥४॥
ऐसा ब्रम्हींचा पुतळा । दासी जनी पाहे डोळां ॥५॥

७९.
देव देखिला देखिला । नामें ओळखुनी ठेविला ॥१॥
तो हा विटेवरी देव । सर्व सुखाचा केशव ॥२॥
जनी म्हणे पूर्ण काम । विठ्ठा देवाचा विश्रास ॥३॥

८०.
योगीं शीण झाला । तुजवांचुनी विठ्ठला ॥१॥
योग करितां अष्टांग । तुजविण शुका रोग ॥२॥
बैसला कपाटीं । रंभा लागे त्याच्या पाठीं ॥३॥
तईं त्वांचि सांभाळिला । जेव्हां तुज शरण आला ॥४॥
सांगोनी पुत्रातें । त्वांचि छळिलें कश्यपातें ॥५॥
अमराच्या राया । म्हणे जनी सुखालया ॥६॥

८१.
आळवितां धांव घाली । ऐसी प्रेमाची भुकेली ॥१॥
ते हे यशोदेच्या बाळा । बरवी पाहातसें डोळां ॥२॥
विटेवरी उभा नीट । केली पुंडलिकें धीट ॥३॥
स्वानंदाचें लेणें ल्याली । पाहून दासी जनी धाली ॥४॥

८२.
स्तन पाजायसी । आली होती ते माउसी ॥१॥
तिच्या उरावरी लोळे । विठो माझा क्रीडा खेळे ॥२॥
मेल्यें मेल्यें कृष्णनाथा । सोडीं सोडींरे अनंता ॥३॥
लिंग देह विरविरलें । जनी म्हण  विठ्ठलें ॥४॥

८३.
अहो यशोदेचा हरी । गोपिकांसी कृपा करी ॥१॥
वेणु वाजवितो हरी । पर्व देवांचा साह्यकारी ॥२॥
धांवे धांवे गाई पाठीं । जनी म्हणे जगजेठा ॥३॥

८४.
विठो माझा लेंकुरवाळा । संगें लेंकुरांचा मेळा ॥१॥
निवृत्ती हा खांद्यावरी । सोपानाचा हात घरी ॥२॥
पुढें चाले ज्ञानेश्वर । मागें मुक्ताई सुंदर ॥३॥
गोरा कुंभार मांडिवरी । चोखा जीवा बरोबरी ॥४॥
वंका कडियेवरी । नामा करांगुळी धरी ॥५॥
जनी म्हणे गोपाळा । करी भक्तांचा सोहळा ॥६॥

८५.
नोवरीया संगें वर्‍हाडीया सोहोळा । मांडे पुरणपोळ्या मिळे अन्न ॥१॥
परीसाचेनीसंगें लोहो होय सोनें । तयाचीं भूषणें श्रीमंतासी ॥२॥
जनी म्हणे जोड झाली विठोबाची । दासी नामयाची म्हणोनियां ॥३॥

८६.
तुझ्या निजरूपाकारणें । वेडावलीं षड्‌दर्शनें ॥१॥
परि सोय न कळे त्यांसी । समीप असतां देवासीं ॥२॥
चारीश्रमें हो कष्टती । वेदशास्त्रें धुंडाळिती ॥३॥
परि कवणें रीति तुला । न जाणवे जी विठ्ठला ॥४॥
तुझी कृपा होय जरी । दासी जनी ध्रुपद करी ॥५॥

८७.
पंढरी सांडोनी जाती वाराणसी । काय सुख त्यांसी आहे तेथें ॥१॥
तया पंचक्रोसी म्हणती मरावें । मरोनियां व्हावें जीवन्मुक्त ॥२॥
नको गा विठोबा मज धाडूं काशी । सांगेन तुजपाशीं ऐक आतां ॥३॥
मरचीमात्र वेरण स्तंभीं घाली । घालोनियां गाळी पापपुण्य ॥४॥
जावोनियां तेथें प्रहर दोन रात्रीं । सत्य मिथ्या श्रोतीं श्रवण करा ॥५॥
आई आई बाबा म्हणती काय करूं । ऐसें दु:ख थोरू आहे तेथें ॥६॥
इक्षुदंड घाणा जैसा भरी माळी । तैसा तो कवळी काळनाथ ॥७॥
लिंगदेहादिक करिती कंदन । तेथील र्‍यातना नको देवा ॥८॥
न जाय तो जीव एकसरी हरी । रडती नानापरी नानादु:खें ॥९॥
अमरादिक थोर थोर भांबातले । भुलोनियां गेले मुक्तीसाठीं ॥१०॥
ती ही मुक्ति माझी खेळे पंढरीसी । लागतां पायांसी संतांचिया ॥११॥
ऐसिये पंढरी पहाती शिखरीं । आणि भीमातीरीं मोक्ष आला ॥१२॥
सख्या पुंडलिका लागतांचि पाया । मुक्ति म्हणे वांयां गेलें मी कीं ॥१३॥
घर रिघवणी मुक्ति होय दासी । मोक्ष तो पाठीसी धांव घाली ॥१४॥
मोक्ष सुखासाठीं मुक्ति लोळे । बीं नेघे कोणी कदा काळीं ॥१५॥
मोक्ष मुक्ति जिंहीं हाणितल्या पायीं । आमुची ती काय धरिती सोय़ी ॥१६॥
समर्थाचे घरीं भिक्षा नानापरी । मागल्या पदरीं घालिताती ॥१७॥
अंबोल्या सांडोनी कोण मागे भीक । सांराजाचें सुख तुझें ॥१८॥
जनी म्हणे तुज रखुमाईची आण । जरी मज क्षण विसंबसी ॥१९॥

“संत नामदेव गाथा” श्रीविठ्ठलमाहात्म्य अभंग १ ते ८७ समाप्त

“संत नामदेव गाथा श्रीविठ्ठलमाहात्म्य”


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral

संत नामदेव अभंग । संत नामदेव । संत नामदेव महाराज । संत नामदेव माहिती । संत नामदेव माहिती मराठी मध्ये । संत नामदेव फोटो ।

संत नामदेव गाथा