संत नामदेव गाथा श्रीकृष्णलीला अभंग १ ते ५४
१.
कृष्णराम लीला सवें त्या गोपाळां । जन्मासी सांवळा कैसा आला ॥१॥
विस्तार बोलाया बैस तूं अंतरा । करीं तूं पामरा कृपादान ॥२॥
म्हणोनि विनवी पाया पैं निगुती । ऐकावें श्रींपाति नामा ह्मणे ॥३॥
२.
भूमि भार झाला चालली अदकांत । धरूमियां रूप गाईचें हो ॥१॥
विधीपासीं गेली रडूं ते लागली । समद्र वहिली कथा सांगे ॥२॥
नको भिऊं म्हणो नि अश्वासि लें विधिनें । सवें तीस घेऊन गेला ठायां ॥३॥
नामा ह्मणे तेचि आधार सर्वांची । रूप नाम त्यासी कांही नाहीं ॥४॥
३.
देव क्षिराब्धिसी आलो हो सकळ । करूनि निश्चळ मनामाजी ॥१॥
प्राणायाम मुद्रा लावूनि अंतरीं । इंद्रादि श्रीहरि चिंतूनियां ॥२॥
विराट जें पाहीं संस्कृतें वर्णियेलें । तेंचि चिंति-येलें नामा म्हणे ॥३॥
४.
अकस्मात तेथें उठली ते वाणी । नका भिऊं म्ह-णोनि मेघरूपा ॥१॥
ऐकतांचि कानीं हरुषले मनीं । देवाचिया श्रेणी नामा म्हणे ॥२॥
५.
शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर । चला अवतार घेऊं आतां ॥१॥
पृथ्वीवरी दैत्य माजले ते फार । गार्हाणें सुरवर सांगूं आले ॥२॥
शेष ह्मणे मज श्रम झाले फार । यालागीं अवतार मी न घेचि ॥३॥
रामअवतारी झालों लक्षुमण । सेविलें अरण्य तुह्मां-सवें ॥४॥
चैदा वर्षांवरी केलें उपोषण । जाणतां आपण प्रत्यक्ष हें ॥५॥
नामा ह्मणे ऐसें वदे धरणीधर । हांसोनी श्रीधर काय बोले ॥६॥
६.
पूर्वीं तूं अनुज झालासी कनिष्ठ । सोशियेले कष्ट मज-सवें ॥१॥
आतां तूं वडील होईंगा सर्वज्ञा । पाळीन मी आज्ञा तुझी बारे ॥२॥
देवकीउदरीं राहावें जावोनी । मायेसी मागूनि पाठवितों ॥३॥
योगमाया तुज काढील तेथून । घालील नेऊन गोकुळासी ॥४॥
लक्ष्मीशीं सांगे तेव्हां ह्लषिकेशी । कौंडण्यपुराशी जावें तुह्मीं ॥५॥
नामा म्हणे ऐसा करूनि विचार । घ्यावया अवतार सिद्ध असे ॥६॥
७.
गौळियाचे घरीं रहिवास गोकुळीं । तेथें तुह्मी सकळीं वास कीजे ॥१॥
वसुदेव देवकी उदरीं जन्मेन । क्मसभयें राहीन गोकुळीं हो ॥२॥
तेथें आहे काज कळेल सकळां । आनंद सोहळा पुरवीन ॥३॥
नामा ह्मणे ऐसें देव बोलियेले । आपण ते गेले निजधामा ॥४॥
८.
तयेकाळीं देव गोकुळीं भरले । अगोचर रूप झाले ठायीं ठायीं ॥१॥
सकळ संपत्ति भरूनि उरल्या । दिगंतरीं गेल्या विपत्ति त्या ॥२॥
नामदेवा तेव्हां आनंद तो झाला । गोकुळीं भरला पांडुरंग ॥३॥
९.
शेषयायी हरी उठोनि लवकरी । ह्मने सख्या धरीं मनुष्यरूप ॥१॥
तुजविण मज न गमे घटिका । म्हणोनि नेटका रूप धरीं ॥२॥
देवकी उदरा जाऊनि रिघावें । अंतरीं वसावें रोहिणीच्या ॥३॥
तुझियेचि सेवें येतों मी माघारा । नामया दातारा कळों आलें ॥४॥
१०.
देवकी कवण वसुदेव कवण । सांगवी हे खूण नाग-वळा ॥१॥
ऐकोनी उत्तर देव मनीं पाही । बोलतो लवलाही चित्त देईं ॥२॥
सुतपा प्रती ते अनुष्ठानी दोघे । करूनियां तपें वर मागे ॥३॥
तया दिल्हा वर पुत्र मी होईन । यालागीं कारण आहे तेथें ॥४॥
तींचि दोघें झाली वसुदेव देवकी । ह्मणोनी यादवीं जन्म घेणें ॥५॥
तयाचा वृत्तांत आतां कोठें आहे । सांगेन लवलाहें नामा म्हणे ॥६॥
११.
गोकुळा येवोनी भेटे नंदादिकां । वैकुंठनायका सांगतसे ॥१॥
कंसानें मांडिला अधर्म बहुत । मारावें त्वरित तयालागीं ॥२॥
लावोनियां आग आपण विझविली । तेंचि परी केली नारदानें ॥३॥
सांगोनियां ऐसें विणा सांवरोन । निघाला तेथून नामा म्हणे ॥४॥
१२.
कंसा हातीं विडा पाहे चहूंकडा । पूतन त्या पुढां काय बोले ॥१॥
जाईन गोकुळा वधीन त्या बाळा । ऐसी त्या चांडाळा बोलतसे ॥२॥
विष भरूनि स्तन निघाली पूतना । तीतें देखुनी कान्हा दूध मागे ॥३॥
येऊनि द्वारीं थोकली तंव यशोदा देखिली । कृष्णा आली माउली राहें उंगा ॥४॥
तंव अधिकचि आळी करी वनमाळी । येरी म्हणे दे जवळी पाजीन दूध ॥५॥
पूतने वोसंगा दिधलासे कान्हा । घटघट पय पाना करीतसे ॥६॥
शोषियलें विश्व न धायची भूक । नामया स्वामी न राखे प्राण तिचा ॥७॥
१३.
श्रीकृष्ण जन्मला वार्ता ही ऐकोनी । चिंता कंसा मनीं प्रवर्तली ॥१॥
उद्विग्न मानसीं कंस तो बैसला । सन्मुख देखिला महाबळ ॥२॥
गौरवोनी त्यासी सांगे वर्तमान । शत्रूसी जाऊनि कोण मारी ॥३॥
महाबळ दैत्य प्रतिज्ञा बोलत । शत्रूसी त्वरित मारीन मी ॥४॥
नामा ह्मणे ऐसा बोलूनि निघाला । वेष धरिला तेणें कपट ॥५॥
१४.
विप्र वेष तेव्हां घेऊनि निघाला । गोकुळासी आला लागवेगें ॥१॥
पुत्रोत्सव कोठें लोकांला पुसत । भावीत सांगत नंदाघरीं ॥२॥
ऐकोनियां ऐसें आला अकस्मात । येशोदा देखत सन्मुख त्या ॥३॥
श्रीकृष्णासी तेव्हां वोसांगीं घेतलें । दंडवत केलें ब्राह्मणासीं ॥४॥
सन्मुख बैसोनि वर्तमान पुसे । बाळाचें या कैसें चिन्ह सांगा ॥५॥
पंचांग त्या वेळीं टाकिलें कपटासी । मान तुकावोनि पाहातसे ॥६॥
नामा ह्मणे मैंदें पंचांग पाहून । यशोदा लाऊन बोलतसे ॥७॥
१५.
तुझिया पुत्रासी लागलेंसे मूळ । करील निर्मूल सर्व-त्रांचें ॥१॥
बाळकाचे अंगीं अवचिन्हें बहूत्त । नेऊनि गर्तेंत टाका यासी ॥२॥
लोभ धरूनियां ठेवाल बाळाशी । ग्रासील सर्वांसी एक-दांची ॥३॥
ऐकोनी यशोदा गहिवरोनी बोले । गर्गानीं कथिरेले उत्तम गुण ॥४॥
अमंगळ वाणी पुनरपि बोलिला । गर्ग तो चुकला गणितासी ॥५॥
स्तनपान करीत असतां श्रीकृष्ण । मांडिलें विंदान नामा ह्मणे ॥६॥
१६.
ठांईहूनि जातीं उखळें उडताती । मस्तकीं पडताती येवोनियां ॥१॥
पाटे वरवंटे वसुपात्रालागीं । जीव त्या प्रसंगीं येता झाला ॥२॥
घाबरे दुर्जन पळाया पाहत । आडव्या ठाकत बाजा पुढें ॥३॥
जानवें तुटलें पंचांग फाटलें । धोतरही गळालें ढुंगणाचें ॥४॥
पृष्ठीवरी होती बदबदां मार । तेथून सत्वर पळता झाला ॥५॥
आयुष्याची बाकी कांहीं उरली होती । ह्मणोनी श्रीपति सोडी त्यातें ॥६॥
नामा ह्मणे जीव घेऊनि पळाला । मथुरेसी आला कंसापाशीं ॥७॥
१७.
अहर्निशीं कंस बसे चिंताक्रांत । विचार पुसत प्रधा-नासी ॥१॥
प्रतिज्ञा करूनि शत्रुवधा जाती । ते मागें न येती पर-तोनी ॥२॥
आतां पुरुषार्थी कोण पाठवावा । तो मज सांगावा निव-डोनि ॥३॥
सांगती प्रधान धाडा असुरासुर । तंव तो असूर उभा राहे ॥४॥
म्हणे मत्यु नसे मज कोणा हातीं । द्वापारीं मारुती गुप्त झाला ॥५॥
ऐकोनियां ऐसें आनंद मानसीं । गौरविलें त्यासी नानापरी ॥६॥
नामा म्हणे काळें बोलविलें त्यासी । सत्वर वनासी येता झाला ॥७॥
१८.
आनंदें वनांत खेळताती गोप । गायीचे कळप चर-ताती ॥१॥
अकस्मात दैत्य देखती दुरोनी । म्हणती विघ्न थोर आलें कृष्णीं ॥२॥
लपें तूं कान्होबा म्हणताती गडी । घाडितो वोंगडी तुजवरी ॥३॥
वाबरले तेव्हां समस्त गोपाळ । पाहोनी धननीळ बोलतसे ॥४॥
तुम्ही कांहीं चिंता न करा मानसीं । मा-रितों मी यासी क्षणामाजीं ॥५॥
राहोनियां उभा पाहात अंतरी । यासी मृत्यु करीं कोणा़चिया ॥६॥
वातात्मजा हातीं मरण असे यासी । कळलें देवासी नामा म्हणे ॥७॥
१९.
गायी गोप तेव्हां लपवोनी क्षणेक । जानकी नायक झाला देव ॥१॥
आकर्ण नयन हातीं धनुष्यबाण । करितसे ध्यान मारुतीचें ॥२॥
स्वामीचा तो धांवा ऐकोनियां कानीं । हडबडिला मनीं कपींद्र तो ॥३॥
निवोनी त्वरित वनामाजी आला । चरणसी लागला प्रेमभावें ॥४॥
म्हणे स्वामी कांहीं सेवकासी आज्ञा । करावी सर्वज्ञा दयानिधी ॥५॥
देव ह्मणे बारे काय सांगूं फार । पैल तो असूर येत आहे ॥६॥
तुझ्याहातें आहे तयासी मरण । ह्मणोनि स्मरण केलें तुझें ॥७॥
तयासी जावोनी मारीं त्वां आतां । चरणीं ठेवूनि माथा निघाला तो ॥८॥
दुर्जनें तेवेळीं मारुती पाहिला । ह्मणे काळ आला कोठोनियां ॥९॥
धरूनियां नरडी केला गतप्राण । पुनरपि येऊन वंदीतसे ॥१०॥
नामा ह्मणे दोन्ही जोडोनियां कर । बोलिला उत्तर काय आतां ॥११॥
२०.
त्रेतायुगीं ख्याती करोनियां थोर । वधिले असूर रावणादी ॥१॥
कोण्या हेतुस्तव पुन्हा आगमन । सांगा कृपा करून दासालागीं ॥२॥
ऐकोनियां वचन बोले सर्वेश्वर । द्बापारीं अवतार आठवा हा ॥३॥
तुझे हे भेटीस्त व रूप हेम धरिलें । दावां तें वहिलें कपी ह्मणे ॥४॥
कृष्णलीला पाहूं हेत आहे चित्ता । दावीं सीताकांता दीनालागीं ॥५॥
चतुर्भुज रूप दाविलें प्रगट । शिरीं मोरमुगुट शोभतसे ॥६॥
गुंजाहार गळं वैजयंती माळा । कांसेसी पिंवळा पीतांबर ॥७॥
नवलक्ष गाई गोपही तितुके । खेळती कौतुकें करोनियां ॥८॥
नामा म्हणे तेव्हां स्तुति ते करीत । न कळें तुझा अंत ब्रह्मादिकां ॥९॥
२१.
द्वापारींची ठेव संपूर्ण पाहून । विनवी जोडून करा-लागीं ॥१॥
रामरूप धरून मज बोळवावें । तें रूप राहावें ह्लदया-माजी ॥२॥
मनोरथ ऐकोनी श्रवणीं । झाला चापपाणी तात्कालीक ॥३॥
पाहोनियां ध्यान करूनि नमन । निघाला तेथून वायुसुत ॥४॥
घेवोनियां आज्ञा सेतुबांधा गेला । ध्यानस्थ बैसला नामा ह्मणे ॥५॥
२२.
एक गोप तेव्हां स्रियेसी सांगत । सांठवीं समस्त नवनीत ॥१॥
देवाचा नवस आहे पुरवणें । धरावें येथून अनसुट ॥२॥
सांगोनियां ऐसें राहिला तो स्वस्थ । मागें स्त्रीनें कृत्य काय केलें ॥३॥
चोरोनियां घृत भरोनि घागरीं । नेवोनि शेजारी ठेवि-येल्या ॥४॥
गौळियानें तेव्हां संकल्प सोडिला । नवस फोडिला नामा ह्मणे ॥५॥
२३.
गोपीनें घृतासीं चोरोनी ठेविलें । देवासी कळलें अंत-र्यामीं ॥१॥
सेजे घरीं होतें ठेविलें चोरून । सौंगडे घेऊन गेला तेथें ॥२॥
आज्य घेऊनियां गोपाळांसी देत । आपन भक्षीत प्रेमानंदें ॥३॥
तृप्त होवोनियां गेला क्रीडायासी । पूर्ण नवसासी केलें त्याच्या ॥४॥
नामा ह्मणे ऐसा वैकुंठनायक । दावीत कौतुक नानापरी ॥५॥
२४.
कांहीं एक दिवस लोटलियावरी । गोपी तिचे घरीं प्रवेशली ॥१॥
म्हणे माझा कुंभ देई वो आणून । येरीनें सदन धुंडा-ळिलें ॥२॥
म्हणे सये येथें नाहीं माझें घृत । ऐकोनियां मात क्रोधा-वली ॥३॥
चोरी नवनीत तुझें नाहीं गेलें । माझें काय झालें पुसतसे ॥४॥
नष्टें अभिलाष केला सांग सत्य । बोलेनि निवांत राहिली ते ॥५॥
कलह करावा भ्रतारा कळेल । तो शिक्षा करील यथास्थित ॥६॥
न मिळे जाणोन म्हणे कृष्णार्पण । आलीसे बोलोन मंदिरासीं ॥७॥
नामा म्हणे शूक सांगे परीक्षिती । ऐशा किती ख्याति तुज सांगों ॥८॥
२५.
एकदां श्रीकृष्ण खेळत असतां । प्रवेशे अवचिता गोपीगृहीं ॥१॥
दोहीं करीं तेव्हां नेत्र चोळीतसे । गोपी पुसते काय झालें ॥२॥
कृष्ण ह्मने माझे दुखताती डोळे । उपाय न कळे करूं काय ॥३॥
पुत्रा़ची जननी तिचें दूध मिळे । घालितांची डोळे बरे होती ॥४॥
गोपी ह्मणे दूध देतें मी काढून । तें नेमी घालून बरें करी ॥५॥
देव ह्मणे दूध तूं काधून देसी । कैसा गुण त्यासी येईल सांग ॥६॥
माझिया करानें पिळून देसी स्तन । तरी येईल गुण लवकरी ॥७॥
ऐकतांचि गोपी धांवे मारावया । पळे उठो-नियां नामा ह्मणे ॥८॥
२६.
यशोदे भोंवल्या मिळाल्या गौळणी । सांगती गार्हाणी नानापरी ॥१॥
गोरस भक्षोनि फोडितो भाजन । गोकुळा सोडोनि जाऊं सये ॥२॥
एक गोपी ह्मणे माझ्या घरां येसी । बांधीन खांबासी तुजलागीं ॥३॥
यशोदेसी ऐसी सांगोनि गार्हाणीं । चा-लिल्या कामिनी गृहाप्रती ॥४॥
नाना ह्मणे गोपी बोलिली बांधीन । तिजवरी विघ्न करी देव ॥५॥
२७.
निशीं प्राप्त होतां भ्रताराचे शेजे । गोपिका ती निजे आनंदानें ॥१॥
संधी पाहोनियां प्रवेशला देव । करीत लाघव काय तेव्हां ॥२॥
भ्रताराचे दाढी कांतेची ते वेणी । एकत्र करोनी ग्रंथी देत ॥३॥
करूनि कौतुक निघोनियां गेला । अरुणोदय झाला तये-वेळीं ॥४॥
गोदोहनालागीं गोपी ते उठत । वेणी आंसडीत दाढी-संगें ॥५॥
भ्रतारासी तेव्हां बोले ते कामिनी । न धाय अजूनि मन कैसें ॥६॥
भ्रताराची दाढी ओढितांचि जाण । सक्रोध होऊन बोल-तसे ॥७॥
मस्त होवोनियां माजली धांगडी । करिती ओढाओढी मजलागीं ॥८॥
नामा ह्मणे तेव्हां उठोनी बैसती । आश्चर्य करिसी मनामाजी ॥९॥
२८.
उभयतां तेव्हां कलह करिताती । आण वाहातातां परस्परें ॥१॥
सोडूं जों पाहती सत्वर ग्रंथिका । न सुटे ब्रह्मादिकां कदाकाळीं ॥२॥
सोडितां सुटेना जाळितां जळेना । कापितां कापेना कांहीं केल्या ॥३॥
स्त्रियेलागीं तेव्हां भ्रतार बोलत । तुजसंगें मृत्यु मज आला ॥४॥
दोघेंहि रडत बिदीमाजी येती । कोल्हाळ करिती तयेवेळीं ॥५॥
गोकुळींचे जन डोळां पहाताती । जाऊन सांगती नंदालागीं ॥६॥
नामा म्हणे नंद बैसला चावडी । घेऊन आवदी कृष्णजीला ॥७॥
२९.
गोपीगोप तेथें पातलीं त्वरित । हांसतीं समस्त देखो-नियां ॥१॥
कृष्ण ह्मणे कैसी बांधिसी मजला । बांधिलें तुजला भगवंतें ॥२॥
पायां पडती रडोनी बोलती । सोडवा म्हणती आह्मां-लागीं ॥३॥
पाहोनी किवें त्यांची दया आली चित्ता । कृपेनें पाहातां मुक्त झालां ॥४॥
नामा म्हणे तेव्हां वंदोनी देवासीं । गेलीं निज-धामासीं आनंदानें ॥५॥
३०.
नंदाचिये घरीं चंपाषष्ठी नेम । कुळीं कुळधर्म मार्तं-डाचा ॥१॥
पक्कानेंही नाना रोटिया भरीत । केलीं अपरमित यशोदेनें ॥२॥
वाघियामुरळी सांगितलीं दोन्हीं । आला चक्रपाणी खेळतांची ॥३॥
मातेलागीं म्हणे लागलीसे क्षुधा । थांबरे गोविंदा ह्मणे माता ॥४॥
घेतलीसे आळी करी लगबग । विस्तारिलें सांग नैवेद्यासी ॥५॥
नेवोनियां पुढें देवांच्या ठेवीले । बोलवा वहीलें आमंत्रिकां ॥६॥
तोंवरी मागे तो भक्षी नारायणा । यशोदा आपण रागावली ॥७॥
दुरळ हा देव होय आतां कैसें । मार्तंडाचें पिसें लागे तुज ॥८॥
करी क्षणामाजी वांकडेंचि मुख । हरी खात वीख कालवलें ॥९॥
जाणीतला भाव मायेचें अंतर । करूनियां खरें दावी देव ॥१०॥
वांकडिया हातें ग्रास वाली मुखें । मुख तेंहि सुखें तैसें दावी ॥११॥
पिसाळल्यापरी करी वेडेचार । भय वाटे फार माये-लागीं ॥१२॥
पूर्वीं म्यां सांगतां नायकसी कैसा । पुढें हा वोळसा वोढावला ॥१३॥
पाचारिले देवऋषि हालविती सुपें । त्याचिया न भियें देव निघे ॥१४॥
वासोनियां डोळे तयाकडे पाहे । कांपे तया भयें थरथरां ॥१५॥
मंत्रूनियां पाणी आणिला अंगारा । तयाचा मातेरा केला देवें ॥१६॥
नवसा न पावती गोकुळींच्या देवता । उपाय मागुता राहिलासे ॥१७॥
चिंतावली माय मूर्च्छ आली तीसी । झाली पोरपिसी मोहजाळें ॥१८॥
जाणोनी अंतर ह्मणे कृष्णार्पण । तेव्हां आलें विघ्न दूर होय ॥१९॥
नाना ह्मणे देव पाहे कृपादृष्टी । जाणवलें पोटीं हाचि देव ॥२०॥
३१.
गोपिका ह्मणती यशोदा सुंदरी । करितो मुरारी खोदी बहु ॥१॥
यशोदेप्रती त्या गौळणी बोलती । संकष्ट चतुर्थी व्रत घेई ॥२॥
गणेश देइल यासी उत्तम गुन । वचन प्रमाण मानावें हें ॥३॥
गजवदनासी तेव्हं म्हणत यशोदा । माझिया मुकुंदा गुण देईं ॥४॥
ऐसें हें वचन ऐकुन कृष्णनाथें । सत्य गणेशातें केलें तेहं ॥५॥
एक मास खोडी देवें नाहीं केली । प्रचीत ते आली यशोदेसी ॥६॥
धन्य धन्य देव गणपती पाहे । यशोदा ती राहे उपवासी ॥७॥
इंदिराबंधूचा उदय होऊं पाहात । यशोदा करीत पूज-नासी ॥८॥
शर्करमिश्रित लाडू येकवीस । आणीक बहुवस मोदक ते ॥९॥
ऐसा नैवेद्याचा हारा तो भरुनी । दे-व्हारां नेऊनि ठेवी माता ॥१०॥
मातेसी म्हणत तेव्हां ह्लषिकेशी । लाडू केव्हां देसी मजलागीं ॥११॥
यशोदा म्हणत पूजीन गजवदना । नैवेद्य दाऊन देईन तुज ॥१२॥
ऐसें म्हणूनियां माता बाहेर गेली । देव्हार्याजवळी हरि होता ॥१३॥
एकांत देखोनी हारा उचलिला । सर्व स्वाहा केला एकदांची ॥१४॥
घेऊनियां ग्रास उगाची बैसला । भक्तांलागीं लीला दावीतसे ॥१५॥
धूप घेवोनियां आली सदनातें । रिता हारा तेथें देखियेला ॥१६॥
विस्मय बहुत मातेसी वाटला । नैवेद्य हरीला पुसतसे ॥१७॥
कृष्ण म्हणे सत्यवचन मानीं माते । एक सहस्र उंदीर आले येथें ॥१८॥
त्यांत एक थोर होता तो मूषक । वरी विनायक बैसलासे ॥१९॥
सकळीक लाडू सोंडेनें उच-लीले । सर्व आकर्षिले एकदांची ॥२०॥
सर्वांगासी त्याणें चर्चिला शेंदूर । सोंड भयंकर हालवितसे ॥२१॥
उंदीर भ्यासुर भ्यालों मी देखून । वळली वदनीं बोबडी ते ॥२२॥
न बोलवे कांहीं माझेनी जननी । क्षुधा मजलायोगी लागलीसे ॥२३॥
लाडू मज देईं ह्मणे जनार्दन । माता क्रोधें करून बोलतसे ॥२४॥
माता ह्मणे कृष्णा पाहूं तुझें वदन । लाडू त्वांचि पूर्ण भक्षियेले ॥२५॥
हरि ह्मणे माते लाडू ते बहुत । मातील मुखांत कैसे माझ्या ॥२६॥
गणपति सर्व लाडू गेलासे घेऊन । आलें विहरण मजवरी ॥२७॥
हरी ह्मणे मज मारूं नको माते । तुज वदनातें दावीतों मी ॥२८॥
कृष्ण-नाथें तेव्हां मुख पसरिलें । ब्रह्मांडें देखिलीं मुखामाजी ॥२९॥
असंख्य गणपती दिसती वदनीं । पाहातसे नयनीं यशोदा ते ॥३०॥
मुखांत गणपति मातेसी बोलत । पूजावें त्वरित हरिलागीं ॥३१॥
ऐसें देखोनियां समाधिस्थ होत । चहूंकडे पाहात तटस्थ ते ॥३२॥
योगमाया तेव्हां हरीनें घालून । मातेपुढें जाण उभा असे ॥३३॥
यशोदा हरी कडेवरी घेत । मुखातें चुंबित आवडीनें ॥३४॥
हरि घेऊनियां घरासी ती गेली । भोजना बैसली नामा ह्मणे ॥३५॥
३२.
कोणी एके दिवशीं श्रीकृष्ण अंगणीं । विलोकी नयनीं प्रतिबिंब ॥१॥
मातेप्रती तेव्हां ह्मणतसे हरी । काढोनि झडकरी देईं मज ॥२॥
माता ह्मणे बाळा नये तें काढितां । आणीक अ-नंता माग कांही ॥३॥
ऐसें ऐकोनियां मागतसे हरी । त्यासी नानापरी समजावित ॥४॥
बहुत खेळणीं पुढें ठेवी माता । परी तो रडतां न राहेची ॥५॥
पालखीं नेऊनि हरीसी निजवीत । यशोदा ते जात स्वकार्यासी ॥६॥
तेच समयीं राधा आलीसे मं-दिरीं । देखिला श्रीहरी रडतां तिनें ॥७॥
पालखा जवळी जाऊनि सत्वर । घेत कडेवरी हरिलागीं ॥८॥
राधा म्हणे कां तूं रडतोसी चाटा । गोष्टी त्या अचाटा सांगतोसी ॥९॥
ऐसें ऐकोनियां उगाची राहिला । खेळवी हरिला प्रेमें राधा ॥१०॥
मागुती नेऊनि पालखां घातला । रडाया लागला हरी तेव्हां ॥११॥
राधेसी म्हणत यशोदा सुंदरी । यासी क्षणाभरी नेईं आतां ॥१२॥
आपले मंदीरा घेऊन जाय यासी । ऐकोनि मानसीं संतोषली ॥१३॥
नामा म्हणे राधा घेऊन हरीसी । गेली मंदिरासी आपुलिया ॥१४॥
३३.
मंदिरा नेवोनि पलंगीं बैसविला । म्हणत हरीला तये-वेळीं ॥१॥
ऐसिया समयीं थोर तूं अससी । तरी ह्लषिकेशी बरें होतें ॥२॥
देखोनि तिचा भाव थोर झाला हरी । पाहूनि सुंदरी आन-दली ॥३॥
सुखशयनीं राधा एकांतीं असतां । अनया अवचिता आला तेथें ॥४॥
सक्रोध होऊनि बोलला राधेसी । कोणासी बोलसी गुजगोष्टी ॥५॥
भ्रताराचा शब्द ऐकतां श्रवणी । दचकली मनीं रा-धिका ते ॥६॥
हात जोडोनियां विनवित हरीसी । होईं ह्लषिकेशी सान आतां ॥७॥
ऐकोनि करुणा बाळ झाला हरी । दहिंभात झडकरी ठेवीं पुढें ॥८॥
कवाड उघडून बोलत अनयासी । घरांत ह्लषिकेशी जेवितसे ॥९॥
कावड ठेऊनि घरांत तो आला । जेवितां देखिला कृष्णनाथ ॥१०॥
नामा ह्मणे अनया आनंदला मनीं । ह्लदयीं चक्रपाणी धरियेला ॥११॥
३४.
राधेप्रती अनया बोले तयेवेळीं । घरांत एकली अससी तूं ॥१॥
एकलें हें तुज कर्मेना मंदिरीं । खेळावया हरी आणीत जाईं ॥२॥
भ्रतार वचन राधेनें ऐकोनी । आनंद तो मनीं थोर तिच्या ॥३॥
स्वामी तुमची आज्ञा मजलागीं प्रमाण । म्हणोनी चरण वंदियेले ॥४॥
सुखशयनीं राधा भोगित अनंता । गोकुळांत वार्ता प्रगटली ॥५॥
राधेचिया घरीं थोर होतो हरी । गोकुळींच्या नारी गुजगुजती ॥६॥
यशोदे मातेसी सांगती सुंदरी । आवरीं मुरारी आपुला हा ॥७॥
तैसीच जाऊन राधेच्या गृहासी । सांगती सासूसी तिच्या तेव्हां ॥८॥
राधेलागीं वृद्धा म्हणे तयेवेळीं । घरासी वन-माळी आणूं नको ॥९॥
नामा म्हणे लोकीं पडियेली तुटी । तीसी जगजेठी अंतरला ॥१०॥
३५.
प्रात:काळीं राधा उठोनियां जाण । नंदसदनावरून पाण्या जात ॥१॥
इकडे गोदोहन करीतसे हरी । पाहे उभी द्वारी राधिका ते ॥२॥
विसरे गोदोहन वृषभाखालीं बैसत । कृष्णजीचें चित्त वेधियेलें ॥३॥
भरणा रिचवोनी बाहेर आली माता । वृषभ दोहतां हरि देखे ॥४॥
माता ह्मणे काय करीसी घननीळा । प्रत्युत्तर त्यावेळां हरि देत ॥५॥
दाराकडे पाहे राधेसी न्याहाळून । मातेसी वचन बोलतसे ॥६॥
भरणा भरला आतां जांई तूं घेऊन । माता क्रोधायमान झाली तेव्हां ॥७॥
कृष्णासी यशोदा ह्मणे खालीं पाहे । वृषभ कीं गाय दोहतसे ॥८॥
कृष्ण खालीं पाहे वृषभ देखिला । ह्मणे यशोदेला ऐक एक ॥९॥
देवाचा नवस चुकली बहुतेक । चौ थानांचें थान एक झालें ॥१०॥
वचन ऐकोनी हांसत यशोदा । द्वारीं उभी राधा देखियेली ॥११॥
कांगे येथें उभी घेऊनि घागर । जातसे सत्वर राधा तेव्हां ॥१२॥
नामा म्हणे ऐसें झालें । मुख प्रक्षाळून हरि जेविले ॥१३॥
३६.
मंथना आरंभ करीतसे राधा । आठवी गोविंदा मना-माजी ॥१॥
मेळवोनी मुलें खेळे तिचे द्वारीं । देखिला श्रीहरी राधि-केनें ॥२॥
विसरोनी मंथन रित्या डेरीयांत । रवी फिरवित गरगरां ॥३॥
डेरा खडबडां वाजतं ऐकोन । वृद्धा ते धांवोन बाहेर आली ॥४॥
सासू म्हणे काय गेले तुझे नेत्र । देतसे उत्तर राधा तीसी ॥५॥
डेरा धड किंवा फुटका म्हणुनी । रवी घुसळोनी पाहातसें ॥६॥
वृद्धा म्हणे तुझें चित्त नाहीं स्थीर । द्वारीं हो श्रीधर देखियेला ॥७॥
रागें भरोनियां बोलत म्हातारी । येथें कांरे हरी खेळसी तूं ॥८॥
कृष्ण ह्मणे आह्मीं खेळतों बिदिशीं । तूं कां दटाविसी थेरडिये ॥९॥
ऐसें बोलेनियां श्रीहरी पळाला । घरासी तो गेला नामा ह्मणे ॥१०॥
३७.
मध्यान्हकाळीं मग हरीसी घेऊनि । करीतसे भोजन यशोदा तें ॥१॥
भोजन करूनि पलंगीं निजत । श्रीकृष्णासी घेत पुढें तेव्हां ॥२॥
यशोदेसी सुखनिद्रा हो लागली । राधिका ते गेली यमुनेसी ॥३॥
नेत्रासी पदर लावोनि रडत । अंतरीं अनंत आठ-वोनि ॥४॥
करुणा शब्द तिचा ऐकोनि श्रवणीं । उठला चक्रपाणी तेथोनियां ॥५॥
जावोनियां राधा धरिली पदरीं । तिजलागीं हरि समजावित ॥६॥
संसारासी माझ्या पडियेलें पाणी । ऐसें चूक्र-पाणी तुवां केलें ॥७॥
इकडे यशोदा ती जागी जंव होत । हरिसी धुंडीत तयेवेळीं ॥८॥
एखादी हा कळी घेऊन येईल आतां । पाहातसे माया चहूंकडे ॥९॥
पाउलाचा माग चालिली काढीत । पावली त्वरित यमुनातीरा ॥१०॥
राधा तयेवेळीं ह्मणे रे अनंता । पैल तुझी माता येत असे ॥११॥
मातेसी देखूनि गडबडां लोळत । यशोदा ते घेत कडेवरी ॥१२॥
मातेसी ह्मणत चोरोनि कंदूक । घेऊनियां देख आली येथें ॥१३॥
माता ह्मणे कां वो यासी रड-विसी । चेडुं तूं हरिसी देईं वेगीं ॥१४॥
मामी हा मजवरी घेई गे तुफान । मजपाशीं जाण चेंडु नाहीं ॥१५॥
कृष्ण ह्मणे माते झाडा घेईं आतां । कंदूक तत्त्वतां निघेल पैं ॥१६॥
वस्त्र जंव झाडीत राधा तयेवेळीं । पडिला भूतळीं कंदूक तो ॥१७॥
ऐसें देखोनियां लज्जित जहाली । हांसत वनमाळी नामा ह्मणे ॥१८॥
३८.
चेंडु देखोनियां यशोदा कोपली । ह्मणे तयेवेळीं राधिकेसी ॥१॥
महा नष्ट तुम्ही अवघिया गवळणी । माझा चक्रपाणी ब्रह्मचारी ॥२॥
इतुकें ऐकोनि राधा ते चालिली । स्वगृहासी गेली आपुलिया ॥३॥
राधेचिया मनीं समजलें पूर्ण । ब्रह्मसनातन श्रीकृष्ण हा ॥४॥
इकडे यशोदा घेऊनि हरीसी । गेली मंदिरासी नामा म्हणे ॥५॥
३९.
बरवें बरवें बाळ कोडीसवाणेरे । यशोदा म्हणे दृष्टी होईल बारे ॥१॥
बरवी बरवी डोळस सांवळी । कोण उतरोनी हरीची पाउली ॥२॥
चंदन पोटाळा कांसे सोनसळा । विष्णुदास नामा चरणाजवळी ॥३॥
४०.
दोंदील दोंदील टमकत चाले । गोजिरीं पाउलें घाले:-नियां ॥१॥
पायीं रुणझुण रुणझुणिती वाळे । गोपी पाहतां डोळे मन निवे ॥२॥
सांवळें सगुण मानसमोहन । गोपीमनरंजन ह्मणे नामा ॥३॥
४१.
आई मज ह्मणसील अवगुणांचें । तरी मी काय करितों कोणाचें । जें जें होणार जयाचें । तें कां मजवरी घालिसी ॥१॥
भट आलासे माभळ । तेणें वर्णिल जन्मकाळ । तो चुकला ग्रहमूळ । तेणें त्यासी पाडिलें ॥२॥
माये तीच मावशी । तिनें मज घेतलें वोसंगासी । तिचे अंगीं होती विवशी । तिनें तिसी ग्रासिलें ॥३॥
दहीं भात रत्नताटीं । कालवूनि लावीं माझे ओंठी । जेवितां काग घाली मिठी । धरूनि मुष्टी रगडिला ॥४॥
कैसी पाठविली रिठा-गांठी । ती घातली माझे कंठीं । तेणें माझ्या गळां मिठी । मग म्यां दाढे रगडिली ॥५॥
खेळत होतों यमुनेतटीं । बक लागला माझे पाठी । मग मी धरूनि चंचु उपटीं । धरणीवरी आपटिला ॥६॥
आई म्यां तुझें काय केलें । त्वां मज उखळासी बांधिलें । रांगत रांगत अंगणीं आलों । तेणें वृक्ष उन्मळिले ॥७॥
ऐसा नाटकी ह्लषिकेशी । परब्रह्म दावी यशोदेसी । विष्णुदास नामा अह-र्निशीं । ह्लदय कमळीं पाहातसे ॥८॥
४२.
मोर पिसा कुंचे ढळताती अपार । येताती कुमर यशो-देचे ॥१॥
शिंगें पावे मोहर्या वाजती कुसरी । हुंबर आखरी गगन गर्जे ॥२॥
मोतियांचे घोंस चांदवे झळकती । कनक दंड ढाळिती रामकृष्ण ॥३॥
गौरज डौरळा पीतांबार भिनला । स्वेद जो दाटला मुख कमळीं ॥४॥
रुळती वनमाळा कंठीं गुंजाहार । तरू घोंस अपार खोविलें शिरीं ॥५॥
गजगती पाउलें ठेविती भूमीवरी । धन्य ते संसारी डोळे देती ॥६॥
कुंकुम केशर रंगलें रातोत्पळ । ध्वज वज्रां-कुश कमळ उर्ध्व रेखा ॥७॥
विमानें आकाशीं झालीं पै सकळ । धन्य तें गोकुळ म्हणती देवा ॥८॥
देव पुष्पवृष्टी करिती कृष्णावरी । अंबर जयजयकारी गर्जतसे ॥९॥
माडिया गोपुरीं पाहती सुंदरी । यशोदेच्या करीं लिंबलोण ॥१०॥
ओंवाळिला नाम्या शिंप्याचा दातार । रखुमादेवीवर श्रीविठ्ठला ॥११॥
४३.
खांद्यावरी पांवा कस्तुरीचा टिळा । चालत गोपाळ गाईमागें ॥१॥
यमुने पाबळीं गोपां पाचारीत । सिदोर्या शोभत पाठीवरी ॥२॥
अंतीं पंक्ति करी त्या गोपाळांच्या । संगें गोविंद त्यांच्या अखंडित ॥३॥
नामा म्हणे बोनें विटों देऊं नका । वैकुंठ-नायका सांभाळावें ॥४॥
४४.
श्रीमुख सुंदर वाटोळें । कैसें नीलोत्पल सांवळें ॥१॥
पैं सेंडी गडी धाकुटा । होय घोंगडें खांदा मोठा ॥२॥
थिरू वांसरें होकरी । पुढें वाहती पावे मोहरी ॥३॥
हातीं घेऊनि वेताटी । कैसा लागे वासुरा पाठीं ॥४॥
बाळांगोपाळांसहित मुरारी । खेळू खेळे नानापरी ॥५॥
विष्णुदास नामयाचा दातारु । ब्रह्मादिकां त्याचा नकळे पारु ॥६॥
४५.
गोवळे ह्मणती कांहो आह्मां भितो । ब्रह्मदि वंदिती पायधुळी ॥१॥
गाई तृप्त करी कळबाच्या तळीं । सोडिल्या शि-दोरी दावितसे ॥२॥
हमामा घालितां नव्हती माघारें । नाहीं भीत पोरें येत संगें ॥३॥
नामा म्हणे काय भिऊनि राहिले । नि-वांतचि ठेले ब्रह्मदिक ॥४॥
४६.
हुंबरीच्या मिषें हुतुतु खेळती । गडयांशीं श्रीपति सर्वकाळ ॥१॥
कळंबाचे झाडाखालीं कुंकमाचे सदे । गोपाळा पवाडे दावीतसे ॥२॥
काय काय सागें घेसी नानापरी । गोपिकांचे घरीं काम सारीं ॥३॥
नामा ह्मणे ऐसी अगाध जे कीर्ति । भोळ्या भक्तांप्रति दावीतसे ॥४॥
४७.
डोहामाजीं वास होता बहुत दिवस । आतां कासा-वीस काय सांगूं ॥१॥
विक्राळ होऊनि आला चक्रपानी । काळिया निर्वाणीं ध्यान करी ॥२॥
नको काढूं मज उदका बाहेरी । दंडवत करी काळिया तो ॥३॥
नामा ह्मणे ऐसा काढिला विखरी । कीर्ति वानूं तरी किती देवा ॥४॥
४८.
जन्म गेले याचे राखतां गाई । याचिया बोला वि-श्वास काई ॥१॥
गोधनें राखितो आपण पेंढारा । तुझ्यानी मिळती पाणियाचा थारा ॥२॥
हातीं डांगा खांदीं कांबळा । तुझ्या गाई आह्मी राखों गोपाळा ॥३॥
आठ कोटी नव बहात्री गाई । गोधनें बैसलीं आपुले ठायीं ॥४॥
धालीं गोधनें बसलीं वाडां । संत पाहों आले तंव झोंपा उघडा ॥५॥
गोधनें चरती बाराही रानें । माझें मन तुझें वासरूं तान्हें ॥६॥
गोधनें चारितां कृष्ण सांगाती । विष्णुदास नामा देतुसे वळती ॥७॥
४९.
ब्रह्मादिकां पाहतां ठक पडियंलें । पहाहो कैवल्य गौ-ळिया जोडलें ॥१॥
कोण्या ऋणें या केला नकळे । परब्रह्म आमुचें आहे सोंवळें ॥२॥
या गोकुळाचेनी पाडे पाहतां । सुख वैकुंठीं न दिसे सर्वथा ॥३॥
ऐसा अभिनव आनंदु जाणतो । गोकुळींचें तृण तरुवर तरी होतों ॥४॥
कामक्रोध लवियेला येणें निवे । तेणें सुखें शुद्ध लागलीसे सवें ॥५॥
नामया स्वामी ह्लदयीमचा विसांवा । आपुलें सर्वस्व देऊनियां जोडावा ॥६॥
५०.
त्रिभुवनींचें जीवन कीं अमरांचें ठेवणें । कैसें भाग्य लहाणे लक्ष्मी़चे ॥१॥
धन्य गौळियांचें धन्य धन्य जिणें । ज्या घरीं खेवणें परब्रह्म ॥२॥
अंगें खेळवणें परब्रह्म गोळुजणें । लीला सामावणें रोमरंध्रीं ॥३॥
नाना म्हणे तें दैवचि कारण । झालें खेळवणें परब्रम्ह ॥४॥
५१.
कृष्णातें चैतन्य गौळिया गोपाळा । जिवींचा जि-व्हाळा कृष्ण एक ॥१॥
न गमेचि तया कृष्ण संगाविणें । कृष्णीं चरणीं मन सर्वकाळ ॥२॥
कृष्ण सुख जिवीं कोंदलें सर्वांसी । उभे कृष्णपाशीं मागेंपुढें ॥३॥
नामा ह्मणे कृष्ण भक्ताचें जीवन । कृष्णीं समाधान भक्तालागीं ॥४॥
५२.
आणा उचित उचित । भाणा भात आईतें ॥१॥
भात सारा भात सारा । हरिहरस्मरणीं ॥२॥
गाई गोपाळापें हरी । आणा तरी शिदोर्या ॥३॥
नामा ह्मणे काळ मिसें । श्री निवास स्मरावा ॥४॥
५३.
आकाश गडगडी विद्युल्लता तळपती । अनिवार मेघ सणसणां वरुषती ॥१॥
राखियलें येणें देवकीनंदनें । गोपाळ म्ह-णती आमुचें कान्हे ॥२॥
गोवर्धनगिरी उचलोनी निजकरीं । राखिलें यापरी नामा म्हणे ॥३॥
५४.
गडयानों राजा कीरे झाला । कृष्ण सिंहासनीं बैसला ॥१॥
पांवा मोहरी घोंगडी । आम्हीं खेळु यमुने तटीं । नाचा पाउला देहुडी । कृष्ण आमुचा किरे गडी ॥२॥
खेळूं हुतुतु हुंबरी । थडक हाणो टीरीवरी । आतां चालिला दळभारी । आमचे यशो-देचा हरी ॥३॥
कुस्ती खेळतां कासाविसी । शेंबुड खरकटें नाकासी । कडे घेऊं सावकासी । आतां बहु भितो यासी ॥४॥
आम्ही तुम्ही सवें जाऊं । गाई वळावया जाऊं । त्याचे मानेंत बुक्या देऊं । जवळीं जावयासी भिऊं ॥५॥
नामा म्हणे चला जाऊं । हात जोडोनी उभे राहूं । पाया पडून मागून घेऊं । जनींवनीं तोचि कृष्णजी ध्याऊं ॥६॥
“संत नामदेव गाथा श्रीकृष्णलीला”
शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral