संत नामदेव गाथा चरित्रे अभंग १ ते १५

संत नामदेव गाथा चरित्रे – पौराणिक-चरित्रें-दशावतारवर्णन अभंग १ ते ९

१.
मीनरूप झाला प्रथम तो हरी । ज्याचा चराचरीं वास होता ॥१॥
मार्कंडेयालागीं दाखविली माया । वटपत्रीं तया रूपासी हो ॥२॥
बाळमुकुंदानें स्वरूप दावितां । श्वासोच्छ्वास घेतां चौदाकल्प ॥३॥
पाहोनियां माया अंतरीं निमाला । घाबरा तो झाला ऋषिराज ॥४॥
अश्वासून तया दाखविली माया । धन्य देव-राया नामा म्हणे ॥५॥

२.
उदकीं बुडतां क्षिती तारियेली । भूतें सारियलीं दाढे-वरी ॥१॥
अद्यापि तूं होसी ऐसा ह्लषिकेशी । धरूनि मारिसी बळि-वंत ॥२॥
नामा म्हणे धन्य अघटित करणी । दाढेसी धरूनि वराह तूं ॥३॥

३.
प्रल्हादाकारणें स्तंभीं अवतार । भक्त राजेश्वर ह्मण-ताती ॥१॥
जळीं स्थळीं आहे सर्वां ठायीं हरी । प्रत्यक्ष तूं न्या-हारी स्तंभामाजी ॥२॥
ऐकतांचि वाणी क्रोधासी चढला । खड्ग तो काढिला कोशांतून ॥३॥
तयेकाळीं हाक मारिली प्रचंड । फोडिलें ब्रह्मांड नरसिंहेम ॥४॥
धरूनियां दैत्य वेगीं मांडीवरी । नखानें तो चिरी पोट त्याचें ॥५॥
जयजयकार झाला ब्रह्मादि पातला । इंद्रा-दिक आला देवांसहित ॥६॥
करूनियां स्तुति देव शांतविला । प्रल्हाद तो झाला पूर्ण भक्त ॥७॥
नामया हो झाली मायबाप भेटी । लाभ उठाउठी आनंदाचा ॥८॥

४.
बळीराजा दैत्य बहुत मातला । संपत्ति हरिल्या देवां-चिया ॥१॥
तयाकाळीम जे जे देव आठविती । प्रार्थना करिती देवदेवा ॥२॥
तयाकाळीं तुवां अदिति उदरीं । अवतारधारी बटु झाला ॥३॥
छळूनियां बळी पाताळीं घातला । आपण रा-हिला तया द्वारीं ॥४॥
देव देवपदीं बैसऊनि सारे । राखीतसे द्बार नामा ह्मणे ॥५॥

५.
मारावया राजे ब्राह्मणाचे घरीं । रेणुकाजठरीं अव-तार ॥१॥
करूनियां पृथ्वी नि: क्षत्रिय बहुवेळं । दान ते सकळां विप्रां दिली ॥२॥
खुंटविला चिरंजीव अद्यापि तो आहे । आत्म-रूपीं पाहे निजानंदीं ॥३॥
दाशरथी रामा झाला समागम । तेणें एक बाण दिल्हा ह्मणे नामा ॥४॥

६.
दशरथ राजा संतान तें नाहीं । ह्मणोनियां पाही ऋषेश्वरीं ॥१॥
करूनि विनंति पुत्रेष्टी हे केली । पुरोडांश भक्षिली पत्नियांनीं ॥२॥
तपाच्या समार्थ्यें पुत्र चार झाले । अविनाश आले अवतारासी ॥३॥
रघुपति रामें पूर्ण मुसावलें । चैतन्य प्रगटलें कौसल्येसी ॥४॥
तेनें केली ख्याति राक्षस मारिले । रा-मराज्य केलें त्रैलोक्यांत ॥५॥
नामा म्हणे मज नाम गोड आहे । त्यालागीं तूं पाहे विचारुनी ॥६॥

७.
श्रीकृष्ण लीलामृत बाणतांचि गोडी । कथेचि परवडी आवडती ॥१॥
तयाचा विस्तार तोचि बोलवीता । आहे सर्व सत्ता त्याचे हातीं ॥२॥
तेथें मी पामर काय बोलूम वाणी । दिसे किविल-वाणी संतांपुढें ॥३॥
म्हणोनी विस्तार आटोपिला नाहीं । वेदांसी तें नाहीं पुरतें ठावें ॥४॥
नामा म्हणे नामें आठवा अवतार । पूर्ण ब्रह्म साचार कृष्णरूप ॥५॥

८.
मध्यें झालेम मौन देव निजध्यानीं । बौध्य ते म्हणोनी नांवें रूप ॥१॥
पाखांडें बहुत कलिमाजी झालीं । वणार्श्रम स-काळीं बुडविले ॥२॥
पापाचिया राशी जळतील नामीं । निश्चय हरिनामीं नामा म्हणे ॥३॥

९.
कलीचिये अंतीं होणार कलंकी । मारील म्लेंछ की घोडयावरी ॥१॥
करील धर्माची उभारील गुढी । कृतयुगा प्रौढी करीतोचि ॥२॥
तोंवरी साधन हरिनाम कीर्ति । संतांची संगती नामा म्हणे ॥३॥

“संत नामदेव गाथा चरित्रे” – संत नामदेव गाथा पौराणिक-चरित्रें-दशावतारवर्णन समाप्त


संत नामदेव गाथा चरित्रे – प्रल्हाद चरित्र अभंग १ ते ६


दैत्य राजा थोर महा बळिवंत । जगीं तो विख्यात हिरण्यकश्यप ॥१॥
करुनियां तप तोषवी ब्रम्हाया । मागे वर तया दैत्यराव ॥२॥
वरदान मागे नसावा तो मृत्यु । कवणाचे हातु देव सुरां ॥३॥
गंधर्व मानव सकळांचें भय । नसावें तिळप्राय कवणेकाळीं ॥४॥
दिवसां ना रात्रीं तिथीं हो नक्षत्रीं । अंतरिक्ष क्षितीं मरण नसो ॥५॥
घरीं राजधानीं चोहटा मंदिरीं । कवणे ते स्थळीं मृत्यू नसो ॥६॥
ऐसा वर मागे दिला ब्रम्हा देवें । तपाचे स्वभावें तयेकाळीं ॥७॥
वर मागूनियां हरियलें पद । देवांसहित इंद्र स्थान भ्रष्ट ॥८॥
तयेकाळीं देव लपोनियां हरी । स्तविती अंतरीं पाहीं पाहीं ॥९॥
देवराया आली कृपा ते समयीं । म्हणे सर्व होई काळयोगें ॥१०॥
तयाचे उदरीं भक्तराजराणा । प्रल्हाद सुजाणा होईल तो ॥११॥
तयासी छळितां पावेल शासन । हाचि भरवसेन नेम आहे ॥१२॥
नामा म्हणे देवें केलें समाधान । आनंदें निमग्न आले स्थाना ॥१३॥


ऐसें हो असतां देव खेळे मेळा । सहित गोपाळा चाल केली ॥१॥
भय तें मानुनी स्त्री पाठवी माहेरा । होता तो उदरा भक्तराज ॥२॥
अकस्मात्‌ वाटे नारद भेटला । उपदेश केला दैत्यपत्नी ॥३॥
हरिमंत्र शुद्ध पडतां श्रवणीं । गर्भस्थ ते क्षणीं स्वहित मानी ॥४॥
आठवीत नाम ह्रदय गुंफेंत । कालें तो प्रसूत होता झाला ॥५॥
आनंदें भरित मेदिनी भरली । राजा मात आली पुत्र झाला ॥६॥
भिकार्‍यासी दान सभाग्यें करूनि । संतोषला मनीं दैत्यभूप ॥७॥
देव होते करीत अनुष्ठान सिद्धी । झाला भक्तनिधी महाराज ॥८॥
स्वर्गीं ध्वज केलें उभे देवें सर्व । आनंद वैभव संतोषोनि ॥९॥
ऐशापरी बाळ पावतां वृद्धीसी । पंच कर्म त्यासी संस्कार ॥१०॥
मग करवी त्याला विद्या अभ्यासाला । गुरु शुक्र झाला सांगावया ॥११॥
शंडामर्क नामें शिक्षेसी ठेविला । पढूं तो घातला कुमरवर ॥१२॥
समस्त ते बाळ पढती जें कांहीं । गुरूचे ते ठायीं भावयुक्त ॥१३॥
प्रल्हादासी पूर्वीं गर्भवास झाला । उपदेश फळला नारदचा ॥१४॥
त्याचि छंदें गात हरिनाम अंतरीं । वाचेमाजी हरि आठवीत ॥१५॥
गुरु वैरभाव सांगत हरीचा । न मानी तयाचा उपदेश ॥१६॥
समस्तां बाळकां सांगे हरिनाम । प्रेमें तो आपण वाखाणीतो ॥१७॥
तेणें तीं लेंकुरें हरिरूप जपतांची । हरिरुप साचीं झालीं पाहा हो ॥१८॥
गुरु करी चिंता काय रायाप्रती । जाऊनि निगुती सांगों आतां ॥१९॥
आपण तो कांहीं न शिके बोलिलें । समस्त लेंकुरें नाशियेलीं ॥२०॥
जाऊनि हे मात रायासी निवेदी । कोप करुनि आधीं राजा बोले ॥२१॥
मग म्हणे आणा अधमासी येथें । गुरुराज पंथें नेत जात ॥२२॥
नाहीं कांहीं भय चिंतनीं हरीचे । आनंद करीत साचें चालिला तो ॥२३॥
नामा म्हणे ऐसा भक्तराज बळी । स्मरे वनमाळी ह्रदयांत ॥२४॥


घेऊनियां गुरू आले राजसभे । वंदूनियां उभे सन्मुख तो ॥१॥
ह्मणे काय पढसी तूं सांग । म्हणे लागूं वेगें हरीहरी ॥२॥
ऐकतां वचन बोले क्रोधावोनि । पापीयासी झणी नका येथें ॥३॥
माझा जो वैरी तया आठवितो । कुळघात होतो ऐशानेंचि ॥४॥
म्हणूनि समुद्रीं नेऊनियां टाका । अग्नींत लोटा कां दुराचारी ॥५॥
शस्त्रघाव वरी मारारे अधम । काळाग्नीते सम विष पाजा ॥६॥
पर्वतावरी नेऊनियां टाका । प्राण याचा घ्या कां अवघे दूत ॥७॥
राजआज्ञा होतां संकोचित दूत । राजा बोले त्यांतें काय पाहतां ॥८॥
दूतीं राजाज्ञेनें धरुनि हो नेतां । मुखीं त्या अनंता आठवितो ॥९॥
तयेकाळीं भक्त उभा निर्भय चित्त । काय हो करीत हरि माझा ॥१०॥
नेऊनियां तिरी समुद्राचे पाहीं । म्हणती आतांही ऐक बापा ॥११॥
येरु म्हणे हरि असे नारायण । तो मज लागून तारील हो ॥१२॥
टाकितां उदकीं वरतीच राहे । म्हणती हा पाहें पोहतसे ॥१३॥
तेथूनि काढितां अग्नींत टाकीला । शीतळ हो झाला अग्नी स्पर्शें ॥१४॥
हरिदासा काय शक्ति हो जाळाया । म्हणोनियां पायां वंदितसे ॥१५॥
मुखीं हरिहरि उच्चार नामाचा । गर्जे भक्त साचा सर्वांठायीं ॥१६॥
अग्नि तो शीतळ होतां मात राया । म्हणे जादु केली याद दुर्जनानें ॥१७॥
विष हळाहळ करुनियां वाटी । नेऊनियां होटीं लाविताती ॥१८॥
भोक्ता नारायण म्हणोनियां त्याला । अमृत तो झाला प्रल्हादासी ॥१९॥
पर्वंत शिकरीं बैसऊनि खालें । लिटितां हो बोले सर्व सत्ता ॥२०॥
जळीं स्थळीं व्यापि आहे नारायण । तेथें काय होणें भय दु:ख ॥२१॥
पडतांचि खालीं उठोनियां उभा । पाहतां हो सभा भय दु:ख मानी ॥२२॥
म्हणे मारा याला शस्त्रघाय वरी । धांवोनियां चिरी महाबळें ॥२३॥
हाणितां शस्त्रानें न लगती कांहीं । मुखीं हरि पाही आठवीत ॥२४॥
म्हणे गजपायीं बांधोनियां मारा । कुंजर ते आणा बोले राजा ॥२५॥
आणोनियां हत्ती घालीत हो वर । पाहे तो समोर विक्राळ सिंह ॥२६॥
दाहि दिगंतर उलंघुनी गेले । उपाय न चाले कांहीं त्यासी ॥२७॥
श्रमयुक्त झाळा राजा कांहीं केल्या । भक्त राजा भला न ढळेचि ॥२८॥
नामा म्हणे भक्त निर्भय सर्वांसी । काय हो तयासी उपेक्षी हरी ॥२९॥


आघात न चले आणची जवळीं । म्हणे कोण बळी साह्यकर्ता ॥१॥
कोठें राहतो कैसा कोण सांग । येरू म्हणे वेग नाहीं कोठें ॥२॥
सर्वां ठायीं आहे व्यापुनी सगळा । नाहीं तो निराळा कोठें पाहतां ॥३॥
जळीं काष्ठीं आहे माझें अंतरंग । सखा पांडुरंग मायबाप ॥४॥
ऐकतांचि बोल राजा कोपावत । म्हणे तो निश्चीत काष्टीं आहे ॥५॥
सभास्तंभीं आहे संदेह तो काय । ऐकतां स्वयमेव उठीयला ॥६॥
काढूनि खडगासी मारीत स्तंभासी । करीत नादासी हरिरूप ॥७॥
भक्ताच्यावचना कोरडिया कष्टीं । सत्य करी गोष्टी नारायण ॥८॥
महानाद झाला त्रिभुवन भ्याला । गर्भपात झाला स्वर्गलोकीं ॥९॥
फुटों पाहे अंड बुडों पाहे क्षिती । ऐसी होती गति तये काळीं ॥१०॥
स्तंभ तो चिरला नरहरी देखिला । भयाभीत झाला राजा तेव्हां ॥११॥
परी शूर क्षेत्रीं न टाकी धैर्यासी । घेऊनि खड्गासी धांवियला ॥१२॥
धांवोनियां जातां धरिला तात्काळ । चिरीतां ते वेळ मांडीवरी ॥१३॥
नखें घाय केला ह्रदयीं चिरीला । काढी अंत्रमाळा पोटांतुनी ॥१४॥
रुधिर जिव्हेनें चाटी करी शोष । भय बहु त्नासें उग्ररूपीं ॥१५॥
मानव शरीर सिंहवदन हरी । गुरगुर तो करी देवराव ॥१६॥
अवतार वेळा वैशाख मासी । चतुर्दशी संधीसीं अर्धबिंबी ॥१७॥
दिवा रात्रीं स्वाती नक्षत्नासी । प्रगटला ज्योतीसीं दैयहर्ता ॥१८॥
घरीं ना मंदिरीं सभे ना बाहेरी । उंबरीयावरी मारीयेला ॥१९॥
शस्रानें न मरे ऐसा वर होता । ह्मणोनि नखें त्याचा अंत केला असे ॥२०॥
वर राखोनियां केला वध पाही । दासाची नवाई वाढवीत ॥२१॥
शब्द जो कां झाला प्रगटतां रूप । तेणें अंतराळीं अमूप नाद भरे ॥२२॥
नक्षत्रें पडती भूमीं रिचवती । भयेंचि खालती आघाट ते ॥२३॥
ब्रम्हांदिकां भय त्रास उपजला । धांऊनियां आला दर्शनासी ॥२४॥
सहित देवगण करीत स्तुतिसी । न होय शांतीसी कांहीं केल्या ॥२५॥
रामा पूर्ण माये आली ते समयीं । तिसी ते वैभवी साहवेना ॥२६॥
तये काळीं देवीं प्रल्हाद प्रार्थिला । सन्मुख गेला उग्ररूप ॥२७॥
प्रेत टाकियेलें शांतरूप झाला । प्रल्हाद पावला आनंदातें ॥२८॥
पाहतांचि बाळ वोसंगा घेतला । हातें कुर्वाळिला भक्तराज ॥२९॥
देव सुर राज्यीं बैसऊनि हरी । स्वरूप संहरी उग्रबाव ॥३०॥
राज्यीं बैसविला प्रल्हाद निजभक्त । केली जगीं ख्यात नामा म्हणे ॥३१॥


वर्णावया रूप कांहीं स्फुर्ती देईं । नरसिंह तूं होई साह्यभूत ॥१॥
मुख तें सिंहाचें शरीर मानवाचें । भयंकर देवाचें रूप असे ॥२॥
अनंत भूषणे जडित बाहूचीं । गळां पदकाची थाटी बहू ॥३॥
केशर चंदन लावियलें अंगा । अखंड श्रीरंगा देवाजीचे ॥४॥
नवनीत तुळशीचीं सुगंधित फुलें । माळा गुंफियले चंपकानें ॥५॥
कासे पीतांबर जडित सुंदर । कडदोरा अपार शोभिवंत ॥६॥
तोडर ब्रीदाचा विराजत भारी । आनंदला हरि नामा ह्मणे ॥७॥


अज्ञान बांळंक तुझा प्रल्हाद धांवा करितां । आणि त्रिभुवन देवता नाभीं नाभींरे आतां ।
माझा प्रर्‍हादु असे वो केउता । तो कवणें पां गांजिला ॥१॥
वदन पसरूनि विक्राळ । झरझरीत झरे लाळ ।
नेत्र जैसें वडवानळ । शोषु पाहे जलनिधी ॥२॥
संहार झालें नागकुळ । भ्याले अष्ट लोकपाळ ।
स्वर्गीं सुटली खळबळ । अमरावती इंद्रासीं ॥३॥
मग दैत्यातें पाचारितु । लोह खणखणा वाजतु ।
धाकें अंबर गर्जतु । तेणें कांपे मेदिनी ॥४॥
वेटाळूनि चहूं हातीं । विदारिला चपेट घातीं ।
जैसा रुद्र प्रळ्यांतीं । तैसा हरी दिसतसे ॥५॥
दैत्य न मरे कवणेपरी । मग धरिला जानूवरी ।
नखें उदर फाडूनि सत्वरीं । अस्थिचुर्ण केलिया ॥६॥
भोजें नाचत देवता । मुक्ति झाली दैत्यनाथा ।
नामया स्वामि वरदहस्ता । अभय दाता भक्तांसी ॥७॥

“संत नामदेव गाथा” चरित्रे – प्रल्हाद चरित्र अभंग १ ते ६ समाप्त


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral