संत नामदेव गाथा पंढरीमाहात्म्य अभंग १ ते ५३
१.
सहस्रअठयांशींऋषि । स्कंद उपदेशीं तयांसी । तिही एक पुसिली पुसी । ते तयासी अकळ ॥१॥
आतां जाऊं कैलासा । सकळ पुसूं त्या महेशा । मग निघाले आकाशा । पितृदेशा पातले ॥२॥
बरे होऊनियां सावध । ऐका भक्तीचा संवाद । विनवीता झाला स्कंद । तो अनुवाद शंभूचा ॥३॥
स्कंदें विनविला त्रिपुरारी । स-हित वामभागीं गौरी । स्तुति स्तयनें केलीं भारी । ह्लदासनीं नभि-येला ॥४॥
मग निघाला लोटांगणीं । ह्मणे त्राहें त्राहें शूळपाणि । करें उचलिला धांवोनि । मग आसनीं बैसविला ॥५॥
ऋषींसि आसनें देऊनि वेगां । जवळीं बैसविलें पैं गा । ते ह्मणती झड-करी सांगा । जें वेदशास्त्रांसी प्रिय ॥६॥
तंव स्कंद ह्मणे ताता । ऋषिनीं पुसिली जे वार्ता । ते आकळ माझिया चित्ता । वेद-शास्त्रार्थ विरहित ॥७॥
बरवीं तीर्थें पुण्यरासी । महात्म्यें सांगत होतों त्यांसी । परी तीर्थ क्षेत्र देवांसी । नाहीं चहूंसी एक भेळा ॥८॥
जे जे क्षेत्रीं करितां विचार । ते ते ठायीं तेंचि थोर । परि तयांमाजी असे सार । जें माहेर सकळिकां ॥९॥
पाप घडे जें जें मेदिनी । तयांसी तें तीर्थकरी धुणी । तीर्था वर्णी शूळपाणि । सांग हानि जें करी ॥१०॥
जळती पातकांचिया कोडी । ऐसीं तीर्थें आहेत गाढी । तयां सकळिकां तीर्थां । ओह खोडी । ते मी उघडी सांगेन ॥११॥
हिमकाळीं कीजे स्नान । हेचिं प्रयागासी न्यून । काशी इच्छी जो मरण । थोर निर्वाण पाविजे ॥१२॥
पितृस्मरण आचमन । करोनि देईजे पिंडदान । तेणें पूर्वज होती पावन । हेंचि न्यून गयेसी ॥१३॥
गाढें कुरुक्षेत्र जाण । तेथें किजे हिरण्यदान । केदारींचें उदकपान । करी पीडन देहासी ॥१४॥
उपमा द्वारकेडनी । अरुच गोमतीचें पाणी । सहा मास सेविल्यावांचुनी । नव्हे दाटणी चक्राशीं ॥१५॥
गंगा बारा वरुषें करी । सकळिकां मध्यें गोदावरी । सिंहस्थीं महिमा थोरी । हें न्यून भारी तयासी ॥१६॥
अयोध्या माया मथुरा – । कांची आवं-तिका करवीरा । लोण्हार हाटकेश्वर तुंगभद्रा । आणि पुष्करा कावेरी ॥१७॥
कलीमाजी वैकुंठ साक्षात । गाढें क्षेत्र जगन्नाथ । त्या देवासी नाहीं पाय हात । उणाव बहुत तयासी ॥१८॥
गाढें श्रीशै-ल्यपर्वत । लक्षावया उदित । तेथें जीवासी करिजे घात । हा उणाव बहुत तयासी ॥१९॥
गाढें क्षेंत्र परियेसा । गोकर्ण सेतुबंधु महेशा । तयासी उणाव ऐसा । जे यमदिशा म्हणताती ॥२०॥
ऐसीं तीर्थें कोटीरासी । परि लांछन आहे सर्वांसी । पहिलें राहिजे उपवासी । मग डोईसी मुंडण ॥२१॥
सकळ तीर्थांचा पारू । जोगा देखिला सागरु । तयासी उणाव आहे थोरु । योग येतो अमावास्ये ॥२२॥
म्हणोनि पुसों आलों तुज । सकळ तीर्थांचें बीज । तें झड-करी सांग मज । देवा तुज जें प्रिय ॥२३॥
ऐसी करोनी विनवणी । मग स्कंद लागला चरणीं । येरें उचलिला झड-करुनी । मग शूळपाणि हे बोलिले ॥२४॥
पुत्रा तुवां जे केली विनंती । हेंचि गिरिजा पुसत होती । तरी सांगेन तुजप्रती । चित देऊनि परियेसीं ॥२५॥
महिमा दरुशनाचा पूर्ण । एक लक्ष्मी जाणे खूंण । शुक सनकादिक मुनि सज्जन । आणि वै-ष्णव जन प्रेमळ ॥२६॥
जैसा कृपणाचा ठेवा । तैसें आर्त रे माझिया जीवा । पुत्रा पुसिलें तुवां । तरी वृत्तांत बरवा सां-गेन ॥२७॥
मी बैसोनियां स्मशानीं । जयाचें नाम जपें ध्यानीं । तें दैवत आहे जये स्थानीं । चित्त देऊनि परियेसा ॥२८॥
युग अठ्ठावीसांवरी । आहे पुंडलिकाच्या द्वारीं । विठ्ठल उभा भीमातीरीं । विश्व तारी दरुशनें ॥२९॥
घेऊनि तरुवरांची बुंथि । देव सेवा जाणवीती । आदिकरोनी पार्वती । आह्मां वस्ति तये ठायीं ॥३०॥
तेजें झळालें वैकुंठ । तयापरी चोखट । पहा पंढर-पूर नीट । महिमा अद्भुत तिहीं लोकीं ॥३१॥
जेणें पीडिलें तिन्ही लोकां । त्यासि वधावया पावलों देखा । ओढी का-ढोनी त्र्यंबका । श्रीहरि सखा स्मरिला ॥३२॥
घात करोनी त्रिपुरा । वधियेलें तिन्ही असुरां । तेंचि तीर्थ भिवरा । सचराचरा तारक ॥३३॥
प्रतिदिनीं माध्यान्हीं । सकळ तीर्थें तिये स्थानीं । भिवरे सुस्रात होऊनि । विठठलचरणीं लागती ॥३४॥
तये क्षेत्रीं पाप घडे । ऐसें बोलतां जीव्हा झडे । काय तुज सांगूं पुढें । ब्रह्म उघडें असे जेथें ॥३५॥
लोहो लागलिय परीसें । सोनें झालें एक सरिसें । आतां पालटेल कैसें । भलतें तैसें जरी झालें ॥३६॥
एक वेळ पंढ-रीये जाऊन । मग भलतिये ठायीं राहो कां जन । तो राहे वैकुंठींचा जाण । कर्महीन जरी झाला ॥३७॥
ऐसें ऐकोनी उत्तर । स्कंद ह-रुषें निर्भर । आदि करोनि ऋषीश्वर । पंढरपूर ठाकिती ॥३८॥
विष्णुदास नामा म्हणे । एक वेळ पंधरीये जाणें । विठठल धन्यावरी पाहणें । नाहीं येणें संसारा ॥३९॥
२.
पितयाची भक्ति पुंडलीकें केली । मात हे ऐकिली देव-रायें ॥१॥
नवलक्ष गोधनें पांचसें सवंगडे । रामकृष्ण पुढें चालताती ॥२॥
उठा चला जावों पुंडलीक पाहों । देव ह्मणे भावो पाहों त्याचा ॥३॥
गोकुळींहूनि देव पंढरपुरा पातला । त्वरित पावला वेणुनादीं ॥४॥
तेथूनि परतला बाळुवंटीं आला । तंव देव देखिला पुंडलीकें ॥५॥
देव उभा आहे पुंडलीक पाहे । चतुर्भूज स्वयें देखियेला ॥६॥
देखियेले हरि शंख चक करीं । आयुधें तीं चारी झळकती ॥७॥
चतुर्भूज मूर्ति देखियेली दृष्टी । पुंढलिकें ईट टाकियेली ॥८॥
इटेवरी उभा राहिला विठ्ठल । ठसा मिरवला त्रिभुवनीं ॥९॥
पुंडलिक भाव पाहूं आला देव । प्रसन्न झाले सर्व पुंडलीका ॥१०॥
वैकुंठ कैलास आणिल हा येथें । नामा म्हणे हित झालें आह्मां ॥११॥
३.
पंढरी हें क्षेत्र पावन पवित्र । महिमा विचित्र त्रिभुवनीं ॥१॥
पाहिलिया क्षणीं नासती पातकें । ऐसियासी तुके दुजें कोण ॥२॥
तृण पक्षि सर्व झाले ऋषि देव । पहाती वैभव पंढरीचें ॥३॥
भूमि ते राहिली विष्णु चक्रावरी । वैकुंठिंची परी सर्व येथें ॥४॥
टाळ नृत्य घोष पताकांचे भार । गर्जे भीमातीर सर्वकाळ ॥५॥
पुंडलिकासाठीं ठाके केशिराज । भेटीनें सायुज्य त्यास देती ॥६॥
स्रानें उद्धरती दर्शनें प्रशस्तीं । वाचे नाम कीर्ति विठोबाचा ॥७॥
नामा ह्मणे लाभ थोर हा जोडतो । पंढरिसी येतो प्राणी त्यासी ॥८॥
४.
पंढरीचें सुख आनंदें गर्जती । ध्यातसे पार्वती अखंडित ॥१॥
भीमातीरीं उभा सखा । पांडुरंग । देई अंगसंग अखंडित ॥२॥
उशीर झाला काय कामकाजा । यावें अधोक्षजा अनिरुद्धा ॥३॥
नामा ह्मणे पाहा पंढरी माझारी । केशीराज तारी एकसरा ॥४॥
५.
निंबलोण करूं पंढरीच्या सुखा । आणिक पुंडलीका मायबापा ॥१॥
पाहतां भूमंडळीं नाहीं आणिक रे । पांडुरंग क्षेत्रा वांचूनियां ॥२॥
अणिमादी सिद्धि भक्तांचिये द्वारीं । होऊनिं कामारि वोळंगती ॥३॥
परलोकीं येती परतोनी मागुसे । सर्व सुख तेथें भोगावया ॥४॥
मुक्तिपद कोणी नघे फुकासाठीं । हिंडे वाळवंटीं दीनरूप ॥५॥
भक्तांचिया पायां पडतो पुढतां पुढती । मज करा सांगती मोक्ष म्हणे ॥६॥
सत्य लोकीं जया सुखाची शिराणी । तें आम्हां अनुदिनीं प्रत्यक्ष दिसे ॥७॥
बंदी जन नामा उभा महा-द्वारीं । कीर्ति चराचरीं वर्णितसे ॥८॥
५.
पंढरीचें सुख जिहीं अनुभविलें । भावें अनुसरले विठठल- पायीं ॥१॥
काया वाचा मन रंगलें चरणीं । धरियेला मनीं पांडुरंग ॥२॥
नामाचेनि बळें उडविलीं साधनें । तोडीलीं बंधनें संसाराचीं ॥३॥
मुक्तिपद कोणी नेघे फुकासाठीं । हिंडे वाळवंटीं दीनरूप ॥४॥
योगियांचें घर रिघे काकुलती । आव्हेरीलें संतीं ह्मणोनियां ॥५॥
दोन्ही कर जोडूनि मोक्ष पाहे वास । ह्मणे होईन दास हरिदासाचा ॥६॥
तंव तुच्छ करोनि न पाहती दृष्टी । आपंगिलें शेवटीं ब्रह्मज्ञानें ॥७॥
अष्ट महा-सिद्धि ह्मणती कवण गति । यावें काकूलती कवणा आह्मी ॥८॥
मोक्ष मुक्ति जिहीं हाणितल्या पायीं । आमची ते सोयी काय धरिती ॥९॥
ऐसे भक्तराज देवां वंद्य झाले । ते एक राज्य केलें पुंडलीकें ॥१०॥
हर्षें निर्भर नामा नाचे महाद्वारीं । कीर्ति चराचरीं वर्णीतसे ॥११॥
६.
पंढरीचें सुख पाहतां एक घडी । वास कल्प कोडी वै-कुंठींचा ॥१॥
आणितां अनुमाना न पवे सरी । महिमा न कळे थोरी सहस्रमुखा ॥२॥
हें सुख सुरवरां स्वप्नीं नाही दृष्टीं । जैसें वाळंवटीं तुह्मां आह्मां ॥३॥
धन्य चंद्रभागा पुण्य सरोवर । धन्य भीमातीर पुण्य भूमी ॥४॥
धन्य नरनारी गर्जती हरिनामें । ऐ-कोनि प्रेमें डोले शूळपानी ॥५॥
धन्य वेणुनाद धन्य वृंदावन । धन्य तें महिमान क्षेत्रवासी ॥६॥
धन्य पंचक्रोशी धन्य आसपासी । दुम-दुमी अहर्निशीं नामघोष ॥७॥
धन्य पशु पक्षि कीटक आणि भृंग । जयां अंगसंग पांडुरंगीं ॥८॥
धन्य ते तरुवर अवघे लहान थोर । अवतरले अमर गुप्तरूपें ॥९॥
धन्य ते संसारीं वर्तती जीवन्मुक्त । ज्यात आर्त असे पांडुरंगीं ॥१०॥
धन्य त्याचा वंश ज्या नामीं वि-श्वास । धन्य विष्णुदास नामा तेथें ॥११॥
७.
ऐका पंढरीचें महिमान । राउळें तितुकें प्रमाण । ते-थील तृण आणि पाषाण । तेहि देव जाणावे ॥१॥
ऐसी पंढरी मनीं ध्याती । त्यांसी तिहीं लोकीं गति । ते आनिका तीर्था जाती । तीं वंदिती तयांसी ॥२॥
वाराणसी चालिजे मासा । गोदावरी एक दि-वसा । पंढरी पाऊल परियेसा । ऐसा ठसा नामाचा ॥३॥
ऐसें शं-कर सांगे ऋषीं जवळी । सकळ तिर्थें माध्यानळीं । येती पुंड-लीकाजवळी । करिती अंघोळी वंदिती चरण ॥४॥
ऐसेनि तिर्थीम पाप झडे । असस्य बोलतां जिव्हा झडे । नाम विनवी संतांपुढें । पंढरी पेठ वोसंडावी ॥५॥
८.
अगाध भवजळ तरावया दुस्तर । रची पंढरपूर कली-माजी ॥१॥
तारु पंढरीनाथ मोलेंविण उतरी । उभा भिमातीरीं वाट पाहे ॥२॥
बुडण्याचें भय नाही पैं संसारीं । कलीमाजी पंढरी थोर नाव ॥३॥
जया नावेवरी अठराही आवलें । साही खण भले मिरवती ॥४॥
चहूंमुखीं जिचा नकळेचि पार । पाहतां विचार सहस्र-मुखा ॥५॥
सडया लावी कसे कुटुंबीं नावेवरी । उतरीलें तीरीं केशि-राजें ॥६॥
प्रेमाचिया पेठीं बांधोनियां पोटीं । उतरी जगजेठी पांडु-रंग ॥७॥
अंगें घाली उडी बुडतिया काढी । ऐसे कल्प कोडी तारियेले ॥८॥
तारियेलें सत्य हाचि पैं निर्धार । नामा पैल पार उतरला ॥९॥
९.
धन्य पंढरीचे सकळही जन । जिहीं सख्य केलें जाण विठठलपायीं ॥१॥
विठठल ह ध्यानीं विठठल हा मनीं । विठठल चिंतनीं रात्रंदिवस ॥२॥
विठ्ठलविण जया नगमे एक घडी । सर्वस्वें आ-वडी विठठलाची ॥३॥
विठठलची माता विठठलचि पिता । भगिनी आणि भ्राता विठठल ज्यांचा ॥४॥
विठठलचि मित्र विठठलचि पुत्र । विठठल कुळगोत्र केला जिहीं ॥५॥
विठठलचि क्रिया विठठलचि कर्म । विठठल सकळ धर्म कुळदैवत ॥६॥
गुज गौप्य जीवींचें विठठला सां-गावें । विठठलें पुरवावें कोड त्यांचें ॥७॥
सर्वकाळ करणें विठठलचि कथा । विठठल जडला चित्त जयाचिया ॥८॥
विठठल जागृतीं स्वप्नीं आणि सुषुप्तीं । अखंड बोथरती विठठल विठठल ॥९॥
ऐसा सर्वस्वेंसी विठठल भजतां । सुख आलें हातां विठठलाचें ॥१०॥
नामा म्हणे त्याचें चरणरेणु होऊन । झालों मी पावन ह्मणे आतां ॥११॥
१०.
पंढरीचे जन अवघे पावन । ज्या जवळी निधान पांडु-रंग ॥१॥
विठ्ठलनामें घेणें विठठलनामें देणें । विठठलनामें करणें सकळ काम ॥२॥
विठठलनामें क्रिया विठठलनामें कर्म । हाचि प्रिय धर्म जया चित्ता ॥३॥
सबराभरित विठठल मागें पुढें । जिकडे जाती तिकडे विठठलचि ॥४॥
निरंतर गर्जती विठठल पवाडे । ऐत निवाडे विठठलरूप ॥५॥
विठठलनाम सरतें विठठलनाम पुरतें । विठठल नाम ज्यातें भांडवल ॥६॥
विठठलनामें करिती अवघा योग क्षेम । नित्य ज्यांचें प्रेम विठठलनामीं ॥७॥
सदा ह्लदयीं भरित विठठलाचें प्रेम । हर्षे विठठलनाम गर्जताती ॥८॥
विठठलनामीं गोडी धरोनी आवडी । विठठलनामीं बुडी दिल्ही जेणें ॥९॥
नामा म्हणे अवघें विठठलचि झालें । विठठलें दिधलें प्रेमसुख ॥१०॥
११.
नित्य हे दिवाळी असे पंढरपुरी । ओंबाळिती नारी विठठलासी ॥१॥
पांवा वाजे वेणु बरविया नांदे । नामघोष आ-नंदें नाचतसे ॥२॥
नामा ह्मणे आह्मीं पंढरीये जावें । कवतुकें पहावे विठठलासी ॥३॥
१२.
अवघी हे पंढरी सुखाची मांदुस । माझा स्वप्रकाश रत्न हरी ॥१॥
धन्य संतजन तेथिंचे पारखी । ज्यां झाली ओळखी विठठल-नामीं ॥२॥
अनुभवुनीं चित्तीं पाहिलें विवेकें । धरिलें पुंडलीकें ह्लदयकमळीं ॥३॥
त्रिभुवन खेळण प्रेमाचें कोंदण । करोनि भूषण भोगितसें ॥४॥
युगें गेलीं परीं पालटचि नाहीं । नित्य शुद्ध तेज:पुंज ॥५॥
पाहतां नित्य नवें ध्यातां चित्त निवे ।ह्मणोनि नामा जिवें विसंबेना ॥६॥
१३.
अनंत तीर्थांचें माहेर । अनंत रूपांचें सार । अनंता अ-नंत अपार । तो हा कटीं कर ठेवूनि उभा ॥१॥
धन्य धन्य पांडु-रंग । सकळ दोषां होय भंग । पूर्वज उद्धरती सांग । पंढरपुर देखिलिया ॥२॥
निरा भिवरा पडतां दृष्टी । स्नान करितां शुद्ध सृष्टि । अंतीं तों वैकुंठप्राप्ती । ऐसें परमेष्टि बोलिला ॥३॥
तेथें एक शीत दिधल्या अन्न । कोटी कुळांचें होय उद्धरण । कोटि याग केले पूर्ण । ऐसें महिमान ये तीर्थींचें ॥४॥
नामा ह्मणे धन्य जन्म । जे धरिती पंढरीचा नेम । तयां अंतीं पुरुषोत्तम । जीवें भावे न विसंबे ॥५॥
१४.
ऐसें तीर्थ कोणी दाखवा गोमटें । जेथें प्रत्यक्ष हें भेटे परब्रह्म ॥१॥
कोठें ऐसें क्षेत्र आहे त्रिभुवनीं । सकळां शिरोमणि चंद्रभागा ॥२॥
ऐसें तीर्थ कोणी दाखवावें एक । देखतांचि सुख पावे मन ॥३॥
ऐसें तीर्थ कोणी दाखवा साजिरें । सदा प्रेमपुरें वोसंडत ॥४॥
ऐसें तीर्थ कोणी दाखवा सुलभ । जेथें समारंभ हरिकथेचा ॥५॥
ऐसें तीर्थ कोणी दाखवा निर्मळ । परब्रह्म केवळ सकळां जीवां ॥६॥
नामा म्हणे आह्म दीनांचें माहेर । धन्य पंढरपुर गीतीं गातां ॥७॥
१५.
काय सांगूं तुझी करणी नारायणा । वेदपारायणा के – शिराजा ॥१॥
पृथ्वीवरी तीर्थें आहेत अपार । परी पंढरिची सर एका नाहीं ॥२॥
जन्मोंजन्मींचिया पातकां दरारा । चुके येरझारा एके खेपें ॥३॥
ब्रह्मज्ञानेंवीण मोक्ष आहे भूतीं । वाचेसी ते घेती विठठलनाम ॥४॥
बेताळीसांसहित जातील वैकुंठा । नामा म्हणे भेटा विठठल देवीं ॥५॥
१६.
सांडूनि पंढरी जासी आणिका तीर्था । लाज तुझ्या चित्ता कैसी नये ॥१॥
त्रिभुवनिचीं तीर्थें झालीं तीं मळीण । व्हा-वया पावन आलीं येथें ॥२॥
एवढा ब्रह्मानंद कैंचा आणिका ठायीं । जो या आहे पायीं विठोबाच्या ॥३॥
काळ मृत्यु दोन्ही घालोनि पायांतळीं । वाजलिया टाळी कीर्तनसंगें ॥४॥
नित्य नवी दिवाळी सुखाचा सोहळा । भोगिजे अवलीला संतसंगे ॥५॥
धर्म अर्थ काम मोक्ष मुक्ति चारी । देतो हा मुरारी नामें एका ॥६॥
नामा ह्मणे चला जाऊं पंढरिये । पाहूं बापमाये पांडुरंग ॥७॥
१७.
काशी हे पंढरी । प्रयाग नीरा नृसिंहपुरी । पिंड ठेवा पुष्पवती संगमपदावरी । पूर्वज होती चतुर्भुज ॥१॥
सकळ तीर्थें वाराणसी । मध्यनकाळीं येती पंढरीसी । ओंवाळिती विठोबासी । विश्वनाथ ह्मणोनियां ॥२॥
ह्मणऊनि वेगीं चला पंढरपुरा । विठोबा-रायाच्या नगरा । चंद्रभागा सरोवरा । देव कौतुक पाहती ॥३॥
वारा-पासी मनिकर्णिका । चंद्रभागा पुंडलिका । वाराणसी भागीरथी देखा । पांडुरंगीं भीमरथी ॥४॥
वाराणसी पंचगंगा । पुष्पवती पांडुरंगा । महा पातकें जाती भंगा । तीर्थें मस्तकीं वंदिल्या ॥५॥
वाराणसी दंडपाणि । क्षेत्रपाळ हे हनुमंत दोन्ही । सकळ तीर्थें विठोबाचे चरणीं । काशी होय पंढरी ॥६॥
वारासणसी माधवबिंदू । पांडुरंगीं वेणुनादू । पंचकोशी तीर्थ उदंडू । पांडुरंगी पद्मतीर्थ ॥७॥
वारा-णसी मोक्षपंथा । विठठलचेनि सायुज्यता । एवढें तीर्थ त्रिभुवनीं पा-हतां । तीर्थ नाहीं यापरतें ॥८॥
वाराणसी चंद्रमौळी । पांडुरंगीं वनमाळी । विश्र्वनाथ नंदी जवळी । विठोबा जवळी गरुड असे ॥९॥
वाराणसी गौरी खुणा । पांडुरंगीं रुक्मिणी जाणा । वाराणसी अन्न-पूर्णा । पांडुरंगीं जाणा सत्यभामा ॥१०॥
वाराणसी त्रिशुळावरी । सुदर्शनावरी पंढरी । कांहीं संदेह मनीं न धरीं । काशी होय पंढरी ॥११॥
ऐसें सकळ तीर्थांचें माहेर । तीर्थ नाहीं यापरतें थोर । विष्णुदास नामयाचा दातार । पुंडलिकासहित असे ॥१२॥
१८.
पाहातां देऊळाची पाठ । तीर्थें घडलीं तीनशें साठ ॥१॥
स्त्रान करितां पन्हाळें । उद्धरती सर्व कुळें ॥२॥
सन्मुख पाहातां विठाई । त्यासी उपमा द्यावया नाहीं ॥३॥
ऐसा पंढरीचा महिमा । काय वर्णू ह्मणे नामा ॥४॥
१९.
श्रोते ह्मणती विष्णुदासा । या ब्रह्मांडींचा प्रळय कैसा । पंढरीच्या भास । नाश कीं नाहीं ॥१॥
तंव नामा ह्मणे सुदर्शना-वरी । देवें रचिली पंढरी । भक्तांसहित राज्य करी । रुक्मिणीवर ॥२॥
तो परमात्मा गुणातीत । अपरोक्ष भक्तांसहित । तेथें प्र-ळय हात जोडित । जयालागीं ॥३॥
जें ब्रह्मयाचें आयुष्य सारें । तें लया जाय चराचरें । तें पंढरपूर । मिळे वस्तु माझी ॥४॥
नामा ह्मणे या खुणा । कळती संतजना । इतर मायिक जना । नेणवती ॥५॥
२०.
कृत त्रेता द्वापार कली । ऐसा चौ युगांचा मेळीं । तें महायुग शब्द आढळी । वेदांत शास्त्रीं ॥१॥
ऐसा ब्रह्मयाचा दिनां-तर । तैसीच रात्र एक सहस्त्र । तिसा दिवसांचा प्रखर । एक मास ॥२॥
ऐसे बारा मास । त्याचें एक वरुष । शतभरी आयुष्य । ब्रह्म-याचें ॥३॥
ऐसा ब्रह्मयाचा दिनांत । शत वरुषें गणीत । ज्या प्र-ळयीं पोहत । मार्कंडेय उदकीं ॥४॥
ऐसीं अठ्ठावीस युगें जाण । पंढरपुरासी झालीं पूर्ण । जो कीं ब्रह्मयाचा दिन । प्रळय केला ॥५॥
नामा ह्मणे पंढरिची संख्या । सांगितली संत महंत लोकां । लक्षूनि पादुका । विठोबाच्या ॥६॥
२१.
आधीं रचिली पंढरी । मग वैकुंठ नगरी ॥१॥
जेव्हां नव्हतें चराचर । तैं होतें पंढरपुर ॥२॥
जेव्हां नव्हती गोदा गंगा । तेव्हां होती चंद्रभागा ॥३॥
चंद्रभागेचे तटीं । धन्य पंढरी गोमटी ॥४॥
नासिलीया भूमंडळ । उरे पंढरीमंडळ ॥५॥
असे सुदर्श-नावरी । ह्मणूनि अविनाश पंढरी ॥६॥
नामा ह्मणे बा श्रीहरी । ते म्यां देखिली पंढरी ॥७॥
२२.
अवघी हे पंढरी सुखाची वोवरी । अवघ्या घरोघरीं ब्रह्मानंद ॥१॥
अवघा हा विठ्ठल सुखाचाचि आहे । अनुसरे तो लाहे सर्व सुख ॥२॥
पहावा अवघा नयनीं ऐकावा श्रवणीं । अ-वघा घ्यावा ध्यानीं अवघ्या मनें ॥३॥
अवघिये आवडी अवघा गावा गीतीं । अवघा सर्वांभूतीं तोचि आहे ॥४॥
अवघा हा जाणावा अवघा हा मानावा । अवघा वाखाणावा अवघी वाता ॥५॥
अवघा ओळखोनि अवघा गिळिजे मनें । अवघा हाचि होणें ह्मणे नामा ॥६॥
२३.
अवघें हें पवित्र पांडुरंग क्षेत्र । सुखाचि सर्वत्र भरलें असे ॥१॥
अवघा हा विठठल गीतीं गातां । अवघें पुरवी कोड नामें एकें ॥२॥
अवघें जे सांडोनि अनुसरले यातें । अवघें देतो त्यांतें आपुलें प्रेम ॥३॥
अवघी चित्तवृत्ति ठेविती याच्या पायीं । ह्यातें अवघ्या बाहीं आलिंगितो ॥४॥
अवघें आपुलें मन दिल्हें जिहीं यातें । असे त्यांसांगातें मागें पुढें ॥५॥
अवघ्यासि अनुरला अवघेंचि विसरला । अवघा नामा झाला सुखरूप ॥६॥
२४.
तूं जाऊं नको जेथें तेथें । जरी तुज मुक्तीचें आर्तें । तुज मी सांगेम हित । देऊनि चित्त परियेसें ॥१॥
शंभु अडसष्टी तीर्थांचेम माहेर । सकळ सिद्धि ऋषीश्वर । मध्यान्हकाळीं सुरवर । पंढरपूर ठाकती ॥२॥
जाई जांई आलियारे । पांडुरंगीं राहें स्थिररे । न लगती आणिक दैवतें रे । एक पुरे विठ्ठलची ॥३॥
तीर्थ क्षेत्र दैवतें । ऐसें नाही जेथे तेथें । तिन्ही सर्वोत्तम जेथें । तें पैं क्षेत्र सांगेन ॥४॥
श्रीहरीच्या चोविस मूर्ति । विठ्ठल प्रेमदृष्टीं प्रीति । सहस्त्र नामांवरती कीर्ती । विठठल दैवत जाणावें ॥५॥
रुद्रार्धांगी गौरी । जान्हवी असे शिरीं । सर्वांग व्यापिनी भीमा सुंदरी । आले त्रिपुरारी ठाकोनी ॥६॥
कोटिजन्माचें पातक । नासे स्नान केलिया देख । एवढें क्षेत्र अलैकिक । पांडुरंग भींवरा ॥७॥
काशीं त्यागिजे शरीर । हिंवे शिणलें केदार । पाणी गोमतीचें क्षार । म्हणवोनि महिमा सम नाहीं ॥८॥
जन्म मरणावेगळें । वैकुंठ तुकिलें सगळें । परि त्याहूनि आगळें । एक अक्षर जाणावें ॥९॥
गया भोंवुनि चौ-दापदीं । तीं अनंतें वेणुनादीं । काला केला गोविंदीं । हा दृष्टांत पहा पां ॥१०॥
ज्याचेनि नांवें पिंडदान । त्यासी गयेसी गति जाण । येथें करितां नाम स्मरण । सर्व पूर्वजां मुक्ती ॥११॥
कार्ति-कीये आदित्यवारीं । जो पद्माला स्नान करी ! त्यासी नाहेम येरझारी । नये पुढती संसारा ॥१२॥
इंद्र येवढे परमेष्टी । तेथें मनुष्याच्या काय गोष्टी । धन्य धन्य तो एक सृष्टीं । पंढरी दृष्टीं जो देखे ॥१३॥
बरवें पुंडलीकें केलें । हें परब्रह्म रे अर्चिलें । जगांत शांतवन केलें । परि नेटकें सर्वथा ॥१४॥
तीर्थ सोपारें सधर । कष्ट न लगती अपार । उपवासी निराहार । कीं क्षौर करणोंचि नलगे ॥१५॥
येथें सुखें येणें जाणें । घेणें नलगे धरणें । मनीचें मनोरथ पुरवणें । एके भेटीसाठीं ॥१६॥
पूर्वजन्मींचा तापसी । तीर्थें केलीं पुण्यराशीं । सहस्त्र शतें भोजनासी । देवां द्विजां भजिन्नला ॥१७॥
शाळिग्रामाची पूजा करी । त्यासी प्रसन्न झाले हरि । त्यसी दावितो पंढरी । पूर्व सं-स्कारी ह्मणोनियां ॥१८॥
जयासी नावडे पंढरी । तो पापिया दुरा-चारी । उपजोनियां संसारीं । येरझारीं । शिणतो ॥१९॥
त्यासी श्वान सूकर हांसती । ह्मणती यासी कैसी पडली भ्रांती । उपजो-नियां मनुष्ययातीं । पंढरपूरपति नोळखे ॥२०॥
जो विन्मुख पंढ-रपुरा । त्याचा संग झणीं धरा । मोडोनि सुकृताचा थारा । पाप शरीरासी तो गेल ॥२१॥
जो पंढरीसी आर्तु । त्याची करा बरवी मातु । अंतकाळीं पंढरीनाथु । यमपंथु चुकवील ॥२२॥
बरवें सम-तुल्य वाळुवंत । वरी वैष्णव मिळाले घनदाट । करिती हरिनामाचे बोभाट । वीर उद्भट विठ्ठालचे ॥२३॥
जे येथें प्रेमासी आतुर । ते चतुर्भुज होती नर । येवढें क्षेत्र पंढरपुर । महिमा थोर तिहीं लोकीं ॥२४॥
अन्य क्षेत्रीं पाप कीजे । तें पुण्य क्षेत्रीं विनसिजे । पुण्य क्षेत्रीं पाप कीजे । तें त्यागिजे पंढरीसी ॥२५॥
पंढरीचें पातक । पंढ-रीस नासे देख । ऐवढें क्षेत्र अलौकिक । त्रिभुवनामाझारी ॥२६॥
पैल इटेवरी सांवळा । विठोबा पहा पहा रे डोळां । विघ्न घालोनि पायातळा । आणिक कळिकाळा दमेना ॥२७॥
जप तप अनु-ष्ठान । नलगे जिवासी रे बंधन । आणिक न करावें साधन । पहावे चरण विठोबाचे ॥२८॥
देवा सांगे वसुंधरा । मी नभियें सप्तसा-गरा । स्थावर जंगमादि सारा । नाहीं भार तयाचा ॥२९॥
ज्यासी नावडे विठ्ठल वीरु । त्याचा मज भार थोरु । त्यासी नरकीं होय थारु । तो असुर प्राणिया ॥३०॥
ऐसा हा पंढरपुरपति । जीवंतु असतां देतो मुक्ति । मेलिया देतो ब्रह्मप्राप्ति । दोहींकडे सौरस ॥३१॥
येरं प्राणियां कष्ट थोर । परि तें न भरे उदर । मेलिया । यम किंकर । अष्टौप्रहर जाचिती ॥३२॥
ऐसा हा कैलासींचा राणा । गिरीजे स्कंदा सांगे खुणा । तुह्मी आणिक मंल नेणां । या पांडुरंगावांचुनी ॥३३॥
विठ्ठल विठ्ठल म्हणतां । तुटती महापातकचळथा । विष्णुदास नामा विनवीं संतां । सावधान व्हा जी ह्मणतसे ॥३४॥
२५.
सुखालागीं जरी करिसी तळमळ । तरी तूं पंढरिसी जाय एक वेळ ॥१॥
तेथें अवघाची सुखरूप होसी । जन्मोंजन्मींचे श्रम विसरसी ॥२॥
चंद्रभागेसी करितां स्नान । तुझे दोष पळती रानोरान ॥३॥
लोटांगण घालेनि महाद्वारीं । कान धरोनि नाच गरुडपारीं ॥४॥
नामा ह्मणे उपमा काय द्यावी । माझ्या विठ-बाची इडा पीडा घ्यावी ॥५॥
२६.
संपदा सोहोळा नावडे मनाला । छंद हा लागला पंढरीचा ॥१॥
जावें पंढरीची आवडे मनासी । कधीं एकादशी आषाढी हे ॥२॥
आषाढी कार्तिकी कधीं ये ह्मणोनि । जातिया लागोनि पुसतसे ॥३॥
नामा ह्मणे ऐसें आर्त ज्याचे मनीं । त्याची चक्रपाणि वाट पाहे ॥४॥
२७.
यारे नाचों प्रेमानंदें । विठ्ठल नामाचिया छंद्रें ॥१॥
जाऊं ह्मणती पंढरिची वाट । कळिकाळा भय वाटे ॥२॥
चंद्रभागे घडलें स्नान । यमलोकीं पडली हान ॥३॥
झाली पुंडलिका भेटी । पूर्वज आनंदले वैकुंठीं ॥४॥
आतां राउळासी जातां । झाली जी-वाचि मुक्तता ॥५॥
विष्णुदास नामा म्हणे । आतां नाहीं येणें जाणें ॥६॥
२८.
पैल ते पंढरी पैल ते पंढरी । पांढरीवरी काळी वस-विली ॥१॥
सोंवळें हें ब्रह्म सुनिळ हें ब्रह्म । विद्युल्लता ब्रह्म पाहूं चला ॥२॥
नामा ह्मणे माझा विठ्ठल हा डोळा । अर्धमात्रे जवळां पाहूं चला ॥३॥
२९.
झळकती पताका । कळस दिसतो नेटका ॥१॥
बरवें बरवें पंढरपुर । विठोबा रायाचें नगर ॥२॥
अरे हें माहेर संतांचे । नामया स्वामि केशवाचें ॥३॥
३०.
काय पुण्य केलें इहीं जीवा जनीं । पंढरी नयनीं देखि-येली ॥१॥
अनंता जन्मांचे होंचि प्रायश्चित । वाचे जपे नित्य राम नाम ॥२॥
कोटी कुळें केलीं क्षणेंचि पावन । केल्या एक स्नान चंद्रभागे ॥३॥
शोक मोह ताप विध्वंसिल हेळां । अवलोकितां डोळां पांडुरंग ॥४॥
महा पापराशी तिहीं केल्या होळी । वाजवि-ल्या टाळी विठ्ठलनाम ॥५॥
नामा म्हणे धन्य धन्य ते संसारीं । चालविती वारी पंढरीची ॥६॥
३१.
काशीराजक्षेत्रीं जुंपिलें आउत । अष्ट धान्यें तेथें पेरि-येलीं ॥१॥
मेघ:श्यामघोष वर्षे सर्वांधारी । बींज विटेवरी सासि-न्नलें ॥२॥
जगाचें जीवन पंढरी पिकली । चारया सोकली भूतजातें ॥३॥
घालूनियां माळा रक्षी कळिकाळा । नि विटों विठ्ठला संसारासी ॥४॥
पाप सोकरण भक्ति हें गोफण । भूस कांडी कण नाम घायीं ॥५॥
वेद स्मृति श्रुति ऐसें बोलवितां । गूढ वेगळितां लाभ होती ॥६॥
नामा म्हणे स्वामि केशव सूकाळ । अन्नब्रह्म फळ नाम बीज ॥७॥
३२.
कार्तिकी एकादशी । पोहा मिळाला पंढरिसी । ते-थील महिमा वंर्णू कैसी । ब्रह्मादिकां न वर्णवे ॥१॥
दिंदया गरुड -टक्यांचे भार । मृदंग वाजती अपार । वैष्णव नाचती जयजयकार । नादें अंबर गर्जतर्स ॥२॥
उपजोनियां संसारीं । वेळोवेळां पाहारे पंढरी । विठ्ठलराज भीमातीरीं । वाट पाहे भक्तांची ॥३॥
कल्प-तरु चिंतामणी । घरीं कामधेनूची दुभणी । मोतियांचे चौक राजांगणीं । वृंदावनें शोभती ॥४॥
संत बैसले पद्मासनीं । राया विठ्ठला तुझे चरण ध्यानीं । हरिकीर्तन ऐकोनी कानीं । अंत:करणीं निवाले ॥५॥
जें जें चिंतन मानसीं । तें फळ पावलें अहर्निशीं । मुक्ति देऊनि तयासी । अढळपदीं बैसविलें ॥६॥
सकळ तीर्थें म-ध्यानकाळीं । येती चंद्रभागे जवळी । विमानें येती अंतराळीं । देव स्रानें करिताती ॥७॥
धन्य धन्य ऐसें चंद्रभागा तीर्थ । तेथें चतु-र्भुज होती प्राणिमात्र । ऐसें आणिक नाहीं क्षेत्र । भूवैकुंठ पंढरी ॥८॥
मणिकर्णि वैतरणी । स्रान करिजेली अंत:करणीं । लीन होईल विठ्ठल चरणीं । पायाधुणी होईल ॥९॥
अनंत जन्मांचा उपाव । नामया स्वामि पंढरीराव । देईल वैकुंठीं ठाव । पुनर्जन्म चुकवील ॥१०॥
३३.
एक एकादशी होय पंढरीसी । सुकृताच्या रासी ब्रह्मा नेणे ॥१॥
चंद्रभाबेतीरीं चतुर्भुज नरनारी । विठ्ठल कैवारी उभा असे ॥२॥
परतून येथें न येसी मागुता । आणिकां सर्वथा ऐसें नाहीं ॥३॥
क्षीरसागरींचें जिव्हार वैकुंठीचें सार । पुंडलिकें उपकार केला लोकां ॥४॥
नामा म्हणे आम्हां थोर लाभ झाला । तापत्रय गेला पांडुरंगा ॥५॥
३४. अरूप रूपासी आलें । परब्रह्म ठसावलें । भक्ता पुंड-लिका फावलें । गौप्य झालें प्रगट ॥१॥
धन्य धन्य भिंवरातट । चंद्रभागा हे निकाट । धन्य धन्य वाळूवंट । मुक्तिपेठ पंढरी ॥२॥
धन्य धन्य प्रेमळ । सबराभरित स्वानंद जळ । स्नान केलिया नि-र्मळ । कोटिकुळें उद्धरती ॥३॥
धन्य गा हा देशु । जेथें विठ्ठले केला रहिवासु । नामा विनवी विष्णुदासु । देह समरसु भक्तीचा ॥४॥
३५.
पांडुरंगाचें नाम बरवें । आवडी घेतली माझ्या जीवें ॥१॥
कैसा देहुडा पाउलीं उभा । वेणुनादीं गोपाळ वेणु वाहे ॥२॥
आंगीं चंदन चर्चित माळा गळां । भाळीं शोभताहे कस्तुरीचा टिळा ॥३॥
नामा म्हणे धन्य धन्य जिणें । एकावेळा पंढरी पाहणें ॥४॥
३६.
उठाउठी जावों पंढरीस राहों । आनंदें क्षेत्र पाहों वि-ठ्ठलाचें ॥१॥
नाम वदनीं घ्यावो चरण ह्लदयीं ध्यावो । रूप डोळां पाहों विठ्ठालाचें ॥२॥
जीवें भेटी घेवों आनंदभावें गावों । प्रेमसुख घेवो ह्मणे नामा ॥३॥
३७.
विठोबाच्या गांबा जाईन धांवोनी । घालीन लोळणी चरणांवरी ॥१॥
शिणभाग द्रवाळिला म्हणेल । जीविंचें पुसेल जड-भारी ॥२॥
हरुषें लोळत जाईन महाद्वारां । भेटाया सामोरा येईल मज ॥३॥
उचलोनी सीस पुसील आदरें । मुख पीतांबरें पुसिल माझें ॥४॥
धरोनि हनुवटी हनुवटी उठवील हस्तकीं । ठेवीन मस्तकीं अभयकर ॥५॥
राई रखुमाई माता सत्यभामा । कडे घेऊनि नामा स्तनीं लावी ॥६॥
३८.
विठोबाच्या गांबा जाईन धांवोनी । घांलोनी लोळणी चरणांवरी ॥१॥
शिणभाग द्रवाळिला म्हणोल । जीविंचें पुसेल जड-भारी ॥२॥
हरुषें लोळत जाईन महाद्वारां । भेटाया सामोरा येईल मज ॥३॥
उचलोनी सीस पुसील आदरें । मुख पीतांबरें पुसिल माझें ॥४॥
धरोनि हनुवटी उठवील हस्तकीं । ठेवीन मास्तकीं अभयकर ॥५॥
राई रखुमाई माता सत्यभामा । कडे घेऊनि नामा स्तनीं लावी ॥६॥
३९.
धांऊनियां मिठी घालीन संतचरणीं । सांगेन वचनीं मनिंचे गुज ॥१॥
विठोबाचे गांवा न्यारे एकवेळां । फार आहळला जीव माझा ॥२॥
आनंदाचें जीवन पाहेन श्रीमुख । शोक मोह दु;ख हरती माझे ॥३॥
विटेसहित चरण देईन आलिंगनु । तेणें माझी तनु ओल्हावेल ॥४॥
तुझी आवडते हरीचें अंतरंग । माझे जीवलग प्राणसखे ॥५॥
नामा म्हणे विठोबा कृपेची माउली । तेव्हां ते साउली करील मज ॥६॥
४०.
ऐसें तीर्थ कोणी दाखवा सुलभ । जेथें समारंभ हरि-कथेचा ॥१॥
तें एक पंढरी विख्यात त्रिभुवनीं । सकळां शिरोमणी चंद्रभागा ॥२॥
ऐसें तीर्थ कोणी दाखवा सुखरूप । जेथें त्रिविध ताप हारपती ॥३॥
ऐसें तीर्थ कोणीं दाखवा सुंदर । गरुड टक्केभार विराजती ॥४॥
ऐसें तीर्थ कोणीं दाखवा निर्मळ । जेथें नासे मळ दुष्टबुद्धि ॥५॥
नामा म्हणे संतजनाचें माहेर । गातां मनोहर गोड वाटे ॥६॥
४१.
सर्व सुखरासी भिंवरेचे तीरीं । आमुची पंढरी काम-धेनू ॥१॥
प्रेमासृतें दुभे सदा संतजनां । वोसंडतो पान्हा नित्य नवा ॥२॥
धर्म अर्थ काम मोक्ष चार्ही थानें । दोहोणार धन्य पुंडलीक ॥३॥
जयाचें दुभतें नित्य नावें वाढतें । बहु पंढरीतें पुर्वपूण्य ॥४॥
भक्तिचेनि बळें भावाचेंनि मेळें । देखोनियां बोले बहु फार ॥५॥
भाग्यवंत नामा तें क्षीर लाधला । प्रेमें वोसंडला गर्जे नाम ॥६॥
४२.
पंढरीच्या सुखा अंत पार नाहीं लेखा । शेषा सह्स्र-मुखा न वर्णवेचि ॥१॥
पंढरीच्या सुखा तोचि अधिकारी । जन्मोंजन्मी वारी घडली तया ॥२॥
पंढरीस जातां प्रेम उचं-बळत । आनंदें गर्जत नामघोष ॥३॥
विश्वमूर्ति विठो विश्वंभर देखे । विसरला दु:खें देहभाव ॥४॥
नामा ह्मणे त्याचा होईन चरणरज । नुपेक्षील मज पांडुरंग ॥५॥
४३.
पंढरीची वारी जयाचिये कुळीं । त्याची पायधुळी लागो मज ॥१॥
तेणें त्रिभुवनीं होईन सरता । नलगे पुरुषार्था मुक्तिचारी ॥२॥
नामाची आवडी प्रेमाचा जिव्हाळा । क्षण जिवावेगळा नकरीं त्यासी ॥३॥
नामा म्हणे माझा सोयरा -जिव – लग । सदा पांडुरंग तयाजवळी ॥४॥
४४.
पंढरीचें प्रेम आहे त्यांचे जीवीं । त्यांची नित्य नवी करीन आशा ॥१॥
ते माझे सोइरे सुखारे सद्नुरु । भवसिंधुचा पारु उतरतो ॥२॥
माझ्या विठोबाच्या नामीं ज्यां विश्वास । होइन त्यांचा दास आवडीचा ॥३॥
माझ्या विठोबाच्या चरणीं ज्यांचा भाव । दारवंटा पाय धरीन त्यांचे ॥४॥
माझ्या विठोबाचें ध्यान ज्यांचें मनीं । सांडोबा अंगणीं होईन त्यांचे ॥५॥
ऐसे सर्वभावें माझ्या विठोबा शरण । त्यांचे वंदीन चरण नामा म्हणे ॥६॥
४५.
अभिमानें लोक जाती वाराणसी । आमुची मिरासी पंढरीये ॥१॥
तीर्थ व्रत नेम मज केशिराजा । पंढरीचा राजा बोळ – वया ॥२॥
पाउला पाउलीं चालती मारग । उभा पांडुरंग मागें पुढें ॥३॥
नामा म्हणे मज पंढरीं विसांवा । दर्शन केशवा पुरे मज ॥४॥
४६.
जाऊं म्हणतां पंढरी । यम थोर चिंता करी ॥१॥
धरितां पंढरीची वाट । पापें पळालीं सपाट ॥२॥
कळस देखतां नयनीं । होय पातकांची धुणी ॥३॥
घेता विठोबाची भेटी । दोष जाती उठाउठी ॥४॥
करितां चंद्रभागे स्रान । सर्व पापा घडे हान ॥५॥
नामा म्हणे रे केशवा । आह्मी करूं तुझी सेवा ॥६॥
४७.
वांकडे पाहणें जया लौकिकासी । मज पंढरिसी वास पुरे ॥१॥
उदंड उपास कासया करावे । पुरे एका भावें भाविकांसी ॥२॥
तीर्थ क्षेत्र मूळ जाणा वाळुवंट । कटीं कर नीट भक्तांसाठीं ॥३॥
नामा म्हणे माझी वैकुंठ पंढरी । तेथें निरंतरी जन्म देंई ॥४॥
४८.
आम्हीं स्वर्गसुख मानूं जैसा ओक । देखोनियां सुख पंढरीचें ॥१॥
नलगे वैकुंठ न वांछूं कैलास । सर्वस्वाची आस देवा पायीं ॥२॥
नलगे संतति आणि धन मान । एक असे ध्यान विठो-वाचें ॥३॥
सत्य कीं मायिक आमुचें बोलणें । तुझी तुज आण सांग हरि ॥४॥
जीवभाव आम्ही सांडूं ओंवाळुनी । नामा लोटांगणीं महाद्वारीं ॥५॥
४९.
वैकुंठासी आम्हां नको धाडूं हरी । वास दे पंढरीं सर्वकाळ ॥१॥
वैकुंठ कोपत जुनाट झोंपटी । नको अडा अडी घालूं आह्मां ॥२॥
वैकुंठीं जाऊनि काय बा करावें । उगेंचि बैसावें मौनरूप ॥३॥
नामा ह्मणे मज येथेंच हो ठेवीं । सदा वास देंई चरणांजवळी ॥४॥
५०.
माझें कुळींचें दैवत । बाप माझा पंढरिनाथ ॥१॥
पुंढरीसि जाऊं चला । भेटूं रखुमाई विठठला ॥२॥
पुंडलीकें बरवें केलें । कैसें भक्तीनें गोविलें ॥३॥
नामा म्हणे नीट । पायीं जड-लीसे ईट ॥४॥
५१.
आम्हीं होतों पंढरिसी । आमची जुनाट मिरासी ॥१॥
राई रखुमाई माता । पांडुरंग आमुचा पिता ॥२॥
पुंडलीक आमुचा भाइ । चंद्रभागा बहिणाई ॥३॥
नामा ह्मणे हो शेवटीं । घर चंद्रभागे कांठीं ॥४॥
५२.
नित्य प्रेमाचें पेटें बांधीं माझे पोटीं । उतरीं जगजेठि पैलपार ॥१॥
निरोभिवरे ऐक्य तीरीं । कां पद्मळा पंढरपुरीं ॥२॥
केलिया रविवारीं आंघोळी । महा दोषां होय होळी ॥३॥
पाप जाईचें । पद पावाल अच्युताचें ॥४॥
ह्मणाल बोलणें कोणाचें । नामया स्वामि केशवाचें ॥५॥
५३.
देव गुज सांगे पंढरीसी यारे । प्रेमें चित्तीं घ्यारे नाम माझें ॥१॥
काया वाचा मन दृढ धरा जीवीं । सर्व मी चालवी भार त्यांचा ॥२॥
भवसिंधु तारीन घ्यारे माझी भाक । साक्ष पुंड-लिक करूनि बोले ॥३॥
लटकें जरी असे नामयासी पुसा । आहे त्या भरंवसा नामीं माझ्या ॥४॥
“संत नामदेव गाथा पंढरीमाहात्म्य”
शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral