संत नामदेव

संत नामदेव गाथा नामसंकीर्तन-माहात्म्य

संत नामदेव गाथा नामसंकीर्तन-माहात्म्य अभंग १ ते १५

१.
गातां विठोबाची कीर्ती । महापातकें जळती ॥१॥
सर्व सुखाचा आगर । उभा असे विटेवर ॥२॥
आठवितां पाय त्याचे । मग तुम्हां भय कैंचें ॥३॥
कायावाचामनें भाव । जनी म्हणे गावा देव ॥४॥

२.
जन्मा येऊनियां देख । करा देहाचें सार्थक ॥१॥
वाचे नाम विठ्ठलाचें । तेणें सार्थक देहाचें ॥२॥
ऐसा नामाचा महिमा । शेषा वर्णितां झाली सीमा ॥३॥
नाम तारक त्रिभुवनीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥

३.
नाम फुकट चोखटे । नाम घेतां नये वीट ॥१॥
जड शिळा ज्या सागरीं । आत्मारामें नामें तारी ॥२॥
पुत्रभावें स्मरण केलें । तया बैकुंठासी नेलें ॥३॥
नाममहिमा जनी जाणे । ध्यातां विठठलचि होणें ॥४॥

४.
एक नाम अवघें सार । वरकड अवघें तें असार ॥१॥
म्हणोनियां परतें करा । आधीं विठ्ठल हें स्मरा ॥२॥
जनी देवाधिदेव । एक विठ्ठल पंढरीराव ॥३॥

५.
काय हे करावे । धनवंतादि अघवे ॥१॥
तुझें नाम नाहीं जेथें । नको माझी आस तेथें ॥२॥
तुजविण बोल न मानीं । करीं ऐसें म्हणे जनी ॥३॥

६.
विठ्ठल नामाची नाहीं गोडी । काळ हाणोनि तोंड फोडी ॥१॥
गळां बांधोनि खांबासी । विंचू लाविती जिव्हेसी ॥२॥
ऐसा अभिमानी मेला । नर्ककुंडीं थारा त्याला ॥३॥
नामा बोध करी मना । दासी जनी लागे चरणा ॥४॥

७.
तो हा भक्तांचे तोडरीं । वाचे उच्चारितां हरी ॥१॥
काम होऊनि निष्काम । काम भावभक्ति प्रेम ॥२॥
तो हा पूर्ण काम होय । अखंडित नाम गाय ॥३॥
काम निष्काम झाला मनीं । वंदी नाचे दासी जनी ॥४॥

८.
नाम विठोबाचें ध्यावें । मग पाउल टाकावें ॥१॥
नाम तारक हें थोर । नामें तारिले अपार ॥२॥
आजामेळ उद्धरिला । चोखामेळा मुक्तीस नेला ॥३॥
नाम दळणीं कांडणीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥

९.
निराकारींचें नाणें । शुद्ध ब्रम्हींचें ठेवणे ॥१॥
प्रयत्नें काढिलें बाहेरी । संतसाधु सवदागरीं ॥२॥
व्यास वसिष्ठ नारद मुनी । टांकसाळ घाटली त्यांनीं ॥३॥
उद्धव अक्रूर स्वच्छंदीं । त्यांनीं आटविली चांदी ॥४॥
केशव नामयाचा शिक्का । हारप चाले तिन्ही लोकां ॥५॥
पारख नामयाची जनी । वरती विठोबाची निशाणी ॥६॥

१०.
माझा शिणभाग गेला । तुज पाहतां विठ्ठला ॥१॥
पाप ताप जाती । तुझें नाम ज्याचे चित्तीं ॥२॥
अखंडित नामस्मरण । बाधूं न शके तया विघ्न ॥३॥
जनी म्हणे हरिहर । भजतां वैकुंठीं त्या घर ॥४॥

११.
नाम विठोबाचें थोर । तरला कोळी आणि कुंभार ॥१॥
ऐसी नामाची आवडी । तुटे संसाराची बेडी ॥२॥
नाम गाय वेळोवेळां । दासी ननीसी नित्य चाळा ॥३॥

१२.
मारूनियां त्या रावणा । राज्य दिधलें बिभिषणा ॥१॥
सोडवुनी सीता सती । राम अयोध्येस येती ॥२॥
ख्याति केली रामायणीं । म्हणे नामयाची जनी ॥३॥

१३.
येऊं ऐसें जाऊं । जनासंगें होंचि दाऊं ॥१॥
आपण करूं हरिकीर्तन । जाणोनी भक्तीचें जीवन ॥२॥
नाम संशयछेदन । भवपाशाचें मोचन ॥३॥
जनी म्हणे हो देवासी । होईल त्याला कसणी ऐसी ॥४॥

१४.
हरिहर ब्रम्हादिक । नामें तरले तिन्ही लोक ॥१॥
ऐसा कथेचा महिमा । झाली बोलायाची सीमा ॥२॥
जपें तपें लाजविलीं । तीर्थें शरणागत आलीं ॥३॥
नामदेवा कीर्तनी । ध्वजा आल्या स्वर्गाहुनी ॥४॥
देव श्रुतीं देती ग्वाही । जनी म्हणे सांगूं कायी ॥५॥

१५.
व्हावें कथेसी सादर । मन करूनियां स्थीर ॥१॥
बाबा काय झोंपी जातां । झोले चौर्‍यांशींचे खाता ॥२॥
नरदेह कैसारे मागुता । भेटी नव्हे त्या सीताकांता ॥३॥
आळस निद्रा उटाउठी । त्यजा स्वरूपीं घाला मिठी ॥४॥
जनी म्हणे हरिचें नाम  । मुखीं म्हणा धरुनि प्रेम ॥५॥

“संत नामदेव गाथा” नामसंकीर्तन-माहात्म्य एकूण १५ अभंग समाप्त 


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *