संत नामदेव महाराज

संत नामदेव गाथा नाममहिमा

संत नामदेव गाथा नाममहिमा अभंग १ ते १६३


नामाचा महिमा नेणेची पैं ब्रह्मा । म्हणोनियां कर्मा अनुसरला ॥१॥
नाम हेंचि कर्म नाम हेंचि धर्म । केशव हेंचि वर्म सांगितलें ॥२॥
नाम सुद्ध स्नान नाम शुद्ध संध्या । नामाविणें वेद आणिक नाहीं ॥३॥
करितां आचमन केशव नारायण । करिती उच्चारण आधीं हेंचि ॥४॥
लग्नाचिये काळीं म्हणती सावधान । लक्ष्मीनारायण चिंतन करा ॥५॥
देहाचिये अंती प्रायश्चित्त देती । शेवटीं वदविती रामनाम ॥६॥
ऐसिया नामापरतें नाहीं सार । गिरिजेसी शंकर उपदेशी ॥७॥
करिती पितृश्राद्ध कर्म आचरती । शेवटीं म्हणती एको विष्णु ॥८॥
नामें होय गति नामें होय मुक्ति । नामयाचे चित्तीं रामनाम ॥९॥


म्हणतां वाचे वंदी तया यम । काळादिकांसम तुज एका ॥१॥
ऋद्धि सिद्धि दासी अंगण झाडिती । उच्छिष्टें काढिती मुक्ति चारी ॥२॥
चारी वेद भाट होऊनि गर्जती । सनकादिक गाती कीर्ति तुझी ॥३॥
सुरवरांचे भार अंगणीं लोळती । चरणरज क्षितिं शिव वंदी ॥४॥
नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू । करी तो सांभाळू अनाथांचा ॥५॥


नामें सदा शुद्धि प्राणिया होतसे । नामापाशीं असे भुक्तिमुक्ति ॥१॥
नामा ऐसें सोपें नाहीं त्रिभुवनीं । नाम संजीवनी साधकांसी ॥२॥
नामें भक्ति जोडे नामें कीर्ति वाढे । नामें सदा चढे मोक्ष हातां ॥३॥
यज्ञ दान तप नामें आली हातां । नामें सर्व सत्ता प्राप्त होय ॥४॥
नामा म्हणे सदा नाम ज्याचे मुखीं । नाहीं याच्या तुकीं दुजा कोणी ॥५॥


नामें तो सरता नामें तो परता । नामें पंढरिनाथा भेटविलें ॥१॥
नाम हेंचि तारी नाम भवसागरीं । उतरीं पैलतिरीं नाम तुझें ॥२॥
नाम तें अंजन नामें बोधे मन । नामेंचि निधान चांगया जाला ॥३॥
मार्गीं जातां तुम्ही उर्गेचि नसावें । वाचेसि म्हणावें रामकृष्ण ॥४॥
रामकृष्ण हरी मुकुंदमुरारी । केशव नरहरी नारायण ॥५॥
ऐसा हा सतत आठव नामाचा । नामा म्हणे कैचा दोष तया ॥६॥


चिंतातुर देहीं न साहे काजळी । नामाची पाजळी उभय दिवीं ॥१॥
प्रकाश पडेल ब्रह्म हें दिसेल । वैकुंठ जोखेल भजनभक्तीं ॥२॥
नाहीं यातीवर्ण नाहीं हें वेदोक्त । नार्मेचि संतृप्ति होती जीवा ॥३॥
नामा म्हणे हेंचि बीजसार । तुटेल येरझार भवबंधाची ॥४॥


गोक्षीर लाविलें अंधळिया मुखीं । तेथील पारखी जिव्हा जाणे ॥१॥
तैसे देवा तुझें नाम निरंतर । जिव्हेसी पाझर अमृताचे ॥२॥
सोलूनियां केळें साखरें घोळिलें । अंधारीम खादलें तरी गोड ॥३॥
द्राक्षफळां घड सेवितां चोखड । तयाहूनि गोड नाम तुझें ॥४॥
आळूनियां क्षीर तुपाचिये आळे । कालविलें गुळें गोड जैसें ॥५॥
जाणोनियां नामा करी विनवणी । अमृताची खाणी नाम तुझें ॥६॥


नामचि हें आहे पंचतत्त्वा ठाव । नाहीं दुजा भाव देखावया ॥१॥
देखणारा जाहाल कर्पुराची वाती । नामाग्निं विश्रांती ठाई जाहाली ॥२॥
द्वैताद्वैत तेथें नेणे जाणपण । गेलें हरपोन नामें सर्व ॥३॥
नामदेव म्हणे अनाम तें नाम । नाना नामभ्रम तेथें दुजा ॥४॥


हडबडलीं पातकें । घेताम रामनाम एक ॥१॥
राम म्हणतां तत्क्षणीं । चित्रगुप्तें सांडिली लेखणी ॥२॥
घेऊनि पूजेचा संभार । ब्रह्मा येतसे समोर ॥३॥
नामाम म्हणे जरी हें लटकें । तरी हें भंगो मस्तक ॥४॥


असत्याचें मूळ बैसलें ये वाचे । तें न फिटती साचे तीर्थोदकें ॥१॥
हरीनामामृत प्रक्षाळी जिव्हेतें । पाणिये बहुतें काय करिती ॥२॥
गंगासागरादी तीर्थे कोडीवरी । हरिनामाची सरी न पवती ॥३॥
हरिनाम गंगे सुस्नात पै जाला । नाम्या जवळी आला केशिराज ॥४॥

१०
वैष्णव तो बळी । सदाशिव चंद्रमौळी ॥१॥
त्याचा भक्त तो रावण । मारुनि छेदिला अभिमान ॥२॥
आणिक तो बाणासूर । छेदिला शिवासमोर ॥३॥
अनिरुद्धा समयीं ख्याती । केली तयाची फजिती ॥४॥
भस्मासुर भस्म जाला । जाळुनियां भस्म केला ॥५॥
मारुनियां मुक्त केलें । परि ते भक्त नाहीं जाले ॥६॥
नामा म्हणे देवाधिदेव । भजावया पंढरीराव ॥७॥

११
भक्ति करुनियां कोण वायां गेला । सांगा हो विठ्ठला निवडुनि ॥१॥
द्वापाराचे अंती नामची सुकृत । अद्यापि निश्चित चालतसे ॥२॥
नाम ऐकतां तरती निर्धारीं । व्याख्यान श्रीधरी टीकाकार ॥३॥
नामा म्हणे राम व्यापीं त्रिभुवन । नाम तें निधान कलियुगीं ॥४॥

१२
देवाचें हें गुज सकळ मंत्रमय । जें कां नित्य ध्येय शंकराचें ॥१॥
तें हें रामनाम सेवितां सर्वभावेम । रामरुप व्हावें निश्चयेंसी ॥२॥
नष्ट अजामेळाचें पतितत्व गेलें । दिव्य देह जालें वालिमिकाचें ॥३॥
शरीरसंपत्ति बळीनें देऊनि सकळ । केला द्वारपाळ नारायण ॥४॥
कृष्णाविण दुजें नेणती कायावाचा । जाला पांडवांचा साहाकारी ॥५॥
नामा म्हणे केशव भावाचा लंपट । भक्ताशीं निकट रतलासे ॥६॥

१३
नामाचें सामर्थ्य नेणें वेदशास्त्र । शेषाचीं वक्त्रें मौनावलीं ॥१॥
गंगा गणपति चंद्र सूर्य श्रेष्ठ । शंकर वरिष्ठ मौनावले ॥२॥
भीष्म पराशर उद्धव अंगद । ब्रह्मा मुचकुंद मौनावले ॥३॥
नामा म्हणे येरे जाणे स्तुति । दाटोनि श्रीपती उभा केला ॥४॥

१४
करीं घेऊनि ब्रह्मविणा । नारद वोळगे नारायणा ॥१॥
हेंचि हेंचि तत्त्वसार । नाम म्हणे निरंतर ॥२॥
आपण शिव आणि शक्ति । रामनाम ते जपती ॥३॥
गात नाचत प्रल्हाद वीर । खांबी केलासे अवतार ॥४॥
कुंटिणी पक्षिया म्हणे रामा । तिसी नेलें निजधामा ॥५॥
अहल्येसी लागतां चरण । तिसीं आलें मनुष्यपण ॥६॥
अजामेळ पातकी अपार । नामें पावला पैलपार ॥७॥
गजेंद्रें केलेम स्मरण । त्याचें तोडिले बंधन ॥८॥
द्रौपदी स्मरे ह्रषिकेसी । वस्त्रें पुरविलीं तियेसी ॥९॥
परीक्षितासी घडलें स्मरण । त्यासी जाले सुलभ चरण ॥१०॥
नामा म्हणे निरंतरु । गगनीं अढळ केला धुरु ॥११॥

१५
अग्नी जाळी तरी न जळती पांडव । ह्रदयीं माधव म्हणोनियां ॥१॥
अग्नी जाळी तरी न जळती गोपाळ । ह्रदयीं देवकीबाळ म्हणोनियां ॥२॥
अग्नी जाळी तरी न जळे हनुमंत । ह्रदयीं सीताकांत म्हणोनियां ॥३॥
अग्नी जाळी तरी न जळे प्रल्हाद । ह्रदयीं गोविंद म्हणोनियां ॥४॥
अग्नी जाळी तरी न जळे पैं सीता । ह्रदयीं रघुनाथ म्हणोनियां ॥५॥
लंकेसी उरलें बिभीषणाचें घर । ह्रदयीं सीतावर धरिला म्हणोनिया ॥६॥
नामा म्हणे तुम्ही स्मरावें गोविंदा । चूके भवबाधा संसाराची ॥७॥

१६
नामाचा प्रताप जाणवेना कोणा । समुद्रीं पाषाण तारियले ॥१॥
आवडीनें कोणी चिंतितां उल्हास । काय तो तयास उपेक्षील ॥२॥
कुंटिणी ते नीच राव्यासाठीं नेली । वैकुंठीं ठेविली सन्निधची ॥३॥
अजामिळ खळ पुत्राचिया मिषें । उद्धरिलें त्यास दीनानाथें ॥४॥
नामा म्हणे ऐसें सांगों आतां किती । नामापाशीं मुक्ति उभी असे ॥५॥

१७
आणीक ही मंत्र मोक्षदानी खरे । अशौचाचा थार असूं नये ॥१॥
नाममंत्र कांहीं बाधेना कोणासी । जया अहर्निशीं रामकृष्ण ॥२॥
तपाची मांडणी आकाशाचें खेव । इंद्रियांची हांव राहे तरी ॥३॥
यज्ञ तो आचार धनाचें सांकडें । तरी जाण द्वाड स्वर्गमुख ॥४॥
नामा म्हणे नाम साधकाची माता । जैसें तैसें घेताम भक्ति जोडे ॥५॥

१८
नामचि तो जाणे आन कांहीं नेणें । संसार नामाविणें जाईजेना ॥१॥
नाम स्मरे त्यांसी संसारचि नाहीं । खुंटली ते पाही वेरझार ॥२॥
नामा म्हणे त्याचें जळो जालेंपण । आळसी वायांविण संसाराची ॥३॥
नामा म्हणे मज नामींच सौरसु । नाम स्मरे ह्रषिकेशु त्यासी पावे ॥४॥

१९
साराचेंहि सार भक्तीचें भांडार । नाम निरंतर गातां वाचे ॥१॥
कासया करावें आणिक साधन । नामविण क्षण जाऊं नेदी ॥२॥
दया शांति हेंचि पै भूषण । नामसंकीर्तन अहर्निशीं ॥३॥
नामा म्हणे जप अखंड नामाचा । काळ हा सुखाचा सदोदित ॥४॥

२०
दग्धही होतसे आलें जें आकारा । असोनि निर्धारा नाम नाहीं ॥१॥
नाम अनुभवे प्रपंचि हो ब्रह्म । जाहला सर्वोत्तम संत कृपें ॥२॥
म्हणोनियां संतां जाऊनि शरण । साधावें निधान नाम ब्रह्म ॥३॥
नामदेव म्हणे संताचिया कृपं । माजीं नाम सोपें नांदतसे ॥४॥

२१
नांदतसे नाम आकाश पाताळीं । सर्व भूमंडळीं घनदाट ॥१॥
पाताळ फोडोनि किती आहे पुड । नाहीं आंत वाड नभ वरी ॥२॥
चौर्‍यांशी भोगिती दुर्मति पामर । नाहीं सारासार जाणत तें ॥३॥
नामदेव म्हणे नाम अविनाश । तेथें नाना वेष नाम सर्व ॥४॥

२२
तरले तरतील हा भरंवसा । पुढती न येती गर्भवासा ॥१॥
वाट सांपडली निकी । विठठल नाम ज्याचे मुखीं ॥२॥
तीर्थे इच्छती चरणीचें । रज नामधारकाचें ॥३॥
प्रायश्चित सोडोनीं प्रोढी । जाली दीन रुपें बापुडीं ॥४॥
ऋद्धी सिद्धी महाद्धारीं । मोक्ष वोळंगण करी ॥५॥
नामा म्हणे सुखनिधान । नाम पतित पावन ॥६॥

२३
तपें दानें व्रतेम यज्ञाचिया कोडी । तुकितां जालीं थोकडीं हरिनामें ॥१॥
न पुरे त्यांसी घातलीं त्रिभुवनींची तीर्थे । नयेची पुरतें रामनामेंसी ॥२॥
नाहीं या जीवांचें बोलणें शिवाचें । उपदेशिलें वाचे शक्तिप्रती ॥३॥
नाम नाहीं वाचे हाचि पै निषेधु । विधी हा गोविंदु स्मरलिया ॥४॥
श्रेष्ठ सर्व नाम शिवाचें बोलणें । युक्ति अनुमानें न बोले कांहीं ॥५॥
नामेंचि भक्त ते पावले अपार । नामें पतित नर उद्धरले ॥६॥
नामें पशु गजेंद्राचा तो उद्धार । वाल्मिकें विचार हाचि केला ॥७॥
गगनीं धुरु केला अढळ नामें देखा । नामेंचि गणिका उद्धरली ॥८॥
नामें ते आपदा न बाधी प्रल्हादा । मुखीं नाम सदा उच्चारितां ॥९॥
कृपाळू नाम पैं मेघ हाचि सार । भीष्में युधिष्ठिरा उपदेशिलें ॥१०॥
हरिनामापरतें नाहीं विचारीतां । नवमाध्यायी गीता कृष्ण सांगे ॥११॥
सकल अमृत श्रीहरींचे नाम । त्यामाजीं उत्तम राजनाम ॥१२॥
म्हणोनी सदाशिवेम धरिलें मानसीं । हेंचि गिरिजेसी उपदेशिलें ॥१३॥
तारक ब्रह्ममंत्र राजनाम जाण । विश्वनाथ श्रवण करीतसे ॥१४॥
कीर्तन श्रवण हेंचि पै हो काशी । म्हणोनी मानसीं राम जपा ॥१५॥
विरंची सकळ शास्त्र विचारितां । हरिनामापरता मंत्र नाहीम ॥१६॥
कळिकाळा त्रास हरिनामकीर्तनें । पतितपावन प्राणी होय ॥१७॥
कलियुगीं धर्म हरीचें हें नाम । म्हणोन शुकदेवें वाखणिलें ॥१८॥
नामयाचा स्वामी पंढरीचा रावो । रुखमाईचा नाहो गाऊं गीतीं ॥१९॥

२४
चंद्रतारांगण नैऋति भास्कर । ततस्थ निर्धार ब्रह्मादिक ॥१॥
ब्रह्मादि सकळ भजनीं तत्पर । तेव्हां हरिहर नाचतसे ॥२॥
कृष्ण विष्णु नाम अच्युत अनंत । सगुण निश्चित स्मरा वेगीं ॥३॥
नामा म्हणे नको उदंड सायास । तोडी भवपाश राजनामें ॥४॥

२५
सुखाचा सोहळा वाटतसे जीवा । भेटणें केशवालागीं आजी ॥१॥
पाउलां पाउलीं याचिया वाटे । पताकांचे थाट दिसताती ॥२॥
पैल तो कळसू पाहे पां साजणी । नामघोष कानीं पडतसे ॥३॥
नामा म्हणे नामीं पारणें जो करी । तयासि श्रीहरी उपेक्षिना ॥४॥

२६
नामापरता मंत्र नाहीं त्रिभुवनीं । ऐसेम बोले वाणी वेदशास्त्रीं ॥१॥
पहा विचारोनि अनुभव तो मनीं । नका आडरानीं झणीं भरो ॥२॥
नामाविणे कोणी तरले जे म्हणति । ते आधीं बुडती भवसागरीं ॥३॥
नामा म्हणे नाम ॐकाराचें मूळ । ब्रह्म तें केवळ विटेवरी ॥४॥

२७
सार पैं सांगत उपनिषद तुम्हां । वाचे रामनामा जप करा ॥१॥
हेंचि पैं मथित सांगोनियां गेले । उच्चारितां ठेले ब्रह्मरुप ॥२॥
ज्योतिसी ते ज्योति भजन करील । आपणचि होईल हरी स्वयें ॥३॥
नामा म्हणे कैसें विपरीत करणें । भूतदया धरणें सर्वाभूतीं ॥४॥

२८
अखंड मुखीं रामनाम । धन्य तयाचाचि जन्म ।
स्नान संध्येसी नेम । तो पुरुष महापवित्र ॥१॥
धन्य धन्य तयाचा जन्म । रामार्पण अवघें कर्म ।
तोचि तरला हाचि नेम । रामकृष्ण उच्चारणीं ॥२॥
अनंत जन्माचे सांकडें । तेणेंचि उगविलें कोडें ।
जप तप येणें नावडे । रामकृष्ण उच्चारनीं ॥३॥
नामा म्हणे नाममात्रें । अवघीं निवारलीं शस्त्रें ।
रामकृष्ण नाम वक्त्रें । उच्चारी तो धन्य ॥४॥

२९
सह्स्त्र दळांमधुन अनुहातध्वनि उठी । नामाचेनि गजरें पातकें रिघालीं कपाटीं ॥१॥
जागा रे गोपाळांनों रामनामीं जागा । कळिकाल एका नामें महादोष जाति भंगा ॥२॥
दशमी एक व्रत दिंडीचें करा दर्शन । एकादशी उपवास तुम्ही करा जागरण ॥३॥
द्वादशी साधनें जळती पातकांच्या कोटी । नामा म्हणे केशव ठाव देईल वैकुंठीं ॥४॥

३०
सर्वांभूतीं हरी आहे हेंचि साच । मायाजाळ न छळे भाविकांसी ॥१॥
सर्व ब्रह्म ऐसे वेद बोले गाढा । ब्रह्मींचा पवाडा अगम्य तो ॥२॥
जाणतां नेणताम हरीनाम उच्चार । मार्ग तो साचार सुफल सदा ॥३॥
नामा म्हणे कारण जिव्हा होय स्मरण । सर्व नारायण हरी दिसे ॥४॥

३१
जप तप अनुष्ठान हरी । एकचि तो नमस्कारी ।
भूतद्वेष कदा न करी । तप सामुग्री हेचि तुझी ॥१॥
हरी माधव यादवा । कृष्णा गोविंद केशवा ।
येणें करोनियां जीवा । सर्वकाळ रंजवी ॥२॥
स्मरतां हरीचें नाम । पळोनी जाति काळयम ।
तुटता नाना योनी जन्म । गर्भवासा मग नये ॥३॥
नामा जपे नामावळी । अखंड तप हेंचि सदाकाळीं ।
हरीनामें पिटोनि टाळी । हाचि तरणोपाय सकळांचा ॥४॥

३२
सर्वकाळ हरी जप । हेंचि तपामाजीं तप ।
न लागती घालावे संकल्प । नाना मंत्राचे परियेसी ॥१॥
मंत्रामाजीं मंत्रसार । रामकृष्ण हाचि उच्चार ।
नित्यानित्य निर्विकार । हाचि जोडेल साचा रे ॥२॥
मागें कृतायुगीं सांगों । त्रेतायुगीं काय ओळगों ।
द्वापारीं कृष्णरंगे रंगो । परी कलीमाजी नामतारक ॥३॥
नामा म्हणे ग्रंथीं । पाहे पा यथा निगुती ।
नाम जपतांची तरती । हें व्यासाचें वचन ऐसें ॥४॥

३३
नाम वाचे उच्चारितां । हरे संसाराची व्यथा ।
जाती दोषाचिया चळथा । रामकृष्ण उच्चारणीं ॥१॥
हरी माधव गोविंद । याची नामाचा जया छंद ।
तोचि पावेल परमपद । निजभुवन वैकुंठीं ॥२॥
जन्मजन्माची तपरासी । तेणें नाम आलें मुखासी ।
स्मरतां हरी ह्रषिकेशी । सकळ पूर्वजां उद्धार ॥३॥
नामा जपे ध्यानीं मनीं । अखंड विठ्ठल हरी कीर्तनीं ।
तेणें जपें ये मेदिनी । कोटी यज्ञ घडले ॥४॥

३४
रुपाचें रुपस नाम ह्रषिकेश । पंढरी निवास जप करी ॥१॥
विठ्ठल श्रीहरी मुकुंद श्रीहरी । नामेंचि बोहरी प्रपंचाची ॥२॥
विठठल नामामृत हेंचि जीवन होत । नाम हें मुखांत केशवाचें ॥३॥
नामा म्हणजे देव अमृताचा लाठा । मुखामाजी पेठा होत नामें ॥४॥

३५
सर्वांग साजिरीं आहेती इंद्रियें । तंव सावध होय हरीकथे ॥१॥
कीर्तन नर्तन वाचे जनार्दन । न पावसी पतन येरझारीं ॥२॥
पूर्ण मनोरथ घडती एका नामें । दाटले सप्रेमें जीवन हेतु ॥३॥
नामा म्हणे विलास न करी तूं आणिक । सर्वीं सर्वां येक नाम असे ॥४॥

३६
ऐकतां कीर्तन जीवन्मुक्त । दाविसी अनंत नाममात्रें ॥१॥
मृत्युलोकीं जो जन्म इच्छी नर । त्याच्या पुण्या पार कोण वाणी ॥२॥
भक्तिसारामृत श्रेष्ठ कलियुगीं । उद्धरिले योगी ब्रह्मादिक ॥३॥
नामा म्हणे मज नाहीं चिंता भय । ह्रदयीं तुमचे पाय पुरे आतां ॥४॥

३७
कीर्तनाच्या सुर्खे होतो देव । कोण तें वैभव वाणी आतां ॥१॥
अंत्यज आणि जातिवंता । मुखीं नाम घेतां उडी घाली ॥२॥
बैसोनी आसनीं आळवितां नाम । उभा सर्वोत्तम तयापुढें ॥३॥
प्रेमाचिया भरें उभ्यानें गर्जत । नाचे हा अनंत तयासवें ॥४॥
नामा म्हणे तया कीर्तनाची गोडी । घालीतसे उडी नेटेपाटें ॥५॥

३८
काळवेळ नसे नामसंकीर्तनी । उंच नीच योनी हेंहि नसे ॥१॥
धरा नाम कंठी सदा सर्वकाळ । मग तो गोपाळ सांभाळील ॥२॥
कृपाळू कोंवसा सुखाचा सागर । करील उद्धार भाविकांसी ॥३॥
नामा म्हणे फार सोपें हें साधन । वाचे नाम घेणें इतुकेंचि ॥४॥

३९
गीता हेचि गंगा गुह्यभाव पैं गा । नाम हेचि वेगा सोडवण ॥१॥
सर्व ब्रह्म हरी सांगतसे मुरारी । विश्वरुप श्रीहरी आपण जाला ॥२॥
उपदेश अर्जुना जनीं जनार्दना । अखंड भावना भूतदया ॥३॥
नामा म्हणे सर्व आहे हाचि देव । उदार माधव सर्वांभूतीं ॥४॥

४०
नामाचें चरित्र सदा अति गोड । तीर्थें काय चाड नाममात्रें ॥१॥
ऐसा दृढ मनीं करावा विचार । नाम परिकर कलियुगीं ॥२॥
नामा म्हणे नाम अनादि अक्षर । उभा कटीं कर भक्तांसाठी ॥३॥

४१
नाम तेंचि रुप रुप तेंचि नाम । नामरुप भिन्न नाहीं नाहीं ॥१॥
देव आकारला नामरुपा आला । म्हणोनि स्थापिला नामवेदीं ॥२॥
नामापरता मंत्र नाहीं हो आणिक । सांगती ते मूर्ख ज्ञानहीन ॥३॥
नामा म्हणे नाम केशव केवळ । जाणती प्रेमळ भक्त भले ॥४॥

४२
अनंत जन्में मेळविता दुर्लभ । तो प्राणवल्लभ शंकराचा ॥१॥
वेदशास्त्र मंथुनी काढियेलें सार । ब्रह्मादिकां पार रामनामें ॥२॥
स्वर्गींचे देव चिंतिताती मानसीं । भेटी आम्हां कैसी पांडुरंगीं ॥३॥
नामा म्हणे केशवाचें नाम उच्चारितां । विघ्नासी भंगिता नवल काय ॥४॥

४३
विठठलाचें नाम जे माऊलिचे ओठीं । विठो तिचें पोटीं गर्भवासी ॥१॥
जयाचिये कुळीं पंढरीची वारी । विठो त्याचे घरीं बाळलीळा ॥२॥
नामा म्हणे जिव्हे काढीन मी रवा । असत्य केशवा वचन होतां ॥३॥

४४
अनंत ब्रह्मांडें व्यापक तें नाम । अनादि निष्काम विश्वंभर ॥१॥
तोचि कृष्ण परब्रह्म द्वारकेसी । पांडवां मानसीं ठसावला ॥२॥
ठसावला तोचि पाहावा अनुभव । पांचालागीं ठाव मग कैसा ॥३॥
नामा म्हणे देव संपूर्ण आघवा । तयाचिया गांवा सींव नाहीं ॥४॥

४५
ज्ञान व्हावें आधीं ओळखावें नांवा । मग जावें गांवा तयाचिया ॥१॥
या नामाचें मूळ त्या माजीं जो धाला । प्रपंच्याचा घाला मग नाहीं ॥२॥
नाम गावें प्रपंच सर्व आहे नाम । ब्रह्मानंदें प्रेम घनदाट ॥३॥
नामदेव म्हणे नंदाचिया घरीं । होता एक हरि दुजें नाम ॥४॥

४६
साधनांत सोपें नाम हें केवळ । याविण सकळ शीण वायां ॥१॥
धरी रे धरा नाम विठोबाचें । तेणें अज्ञानाचें मूल नासे ॥२॥
नाम तारी फार पुराणीं वर्णिलें । नामचि केवळ आत्मसत्ता ॥३॥
नामा म्हणे नामीं रंगला सुरंग । अंगें स्वयमेव पांडुरंग ॥४॥

४७
एकटी येकला सर्व हें सकळां । आपणची जाला विश्वहरी ॥१॥
न कळे याची माव कैसा आहे भाव । सर्वांभूतीं देव गीता सांगे ॥२॥
भूतदया धरा भजावें श्रीधरा । नामा एक स्मरा विठठल ऐसें ॥३॥
नामा म्हणे देव पंढरी पाटणीं । पावेल निर्वाणीं नाम घेतां ॥४॥

४८
जीव शिव ग्रामी मीतूंपण पाही । हा गौरव कांहीं नाहीं नामीं ॥१॥
नाहीं चतुर्देह तूर्या हे उन्मनी । स्वयंभु ते खाणी निजनामाची ॥२॥
नामीं जडे चित्त तेथें काय उणें । लज्जित साधनें नाना जहालीं ॥३॥
नामदेव म्हणे मीतूंपण नाहीं । नाहीं आन कांहीं सर्व तेंची ॥४॥

४९
आकारिक नाम जीवानें ठेविलें । शिवानें तें केलें निर्विकल्प ॥१॥
जीव शिव दोन्ही विराले ज्यामाजीं । तें नाम सहजीं आद्य आहे ॥२॥
तया नामाविण जावयासी ठाव । नाहीं दुजा भाव तिळभरी ॥३॥
नामदेव म्हणे नाम घनदाट । प्रपंच निघोट नामापरी ॥४॥

५०
कृष्णनाम श्रेष्ठ गाती देव ऋषी । नाम अहर्निशीं गोपाळाचें ॥१॥
हरी हरी हरी तूंचि बा श्रीहरी । वसे चराचरी जनार्दन ॥२॥
आदि ब्रह्मा हरि आळवी त्रिपुरारी । उमेप्रति करी उपदेश ॥३॥
नामा म्हणे ब्रह्म हा जप उत्तम । शंकारासी नेम दिननिशीं ॥४॥

५१
भजन करा रे हरिहरा । नारायण शिवशंकरा ।
माझें बोलणें हें अवधारा । भेद न करा दोघांचा ॥१॥
तुम्हां सांगेन सत्य वृत्तान्त । पाहें पां तेथींचा दृष्टान्त ।
नारायणें सेविलें अमृत । जला श्वेत महादेव ॥२॥
शंभूनें गिळिलें हलाहला । म्हणोनि विष्णु जाला निळा ।
देखत देख आंधळा । झणीं होसी गव्हरा ॥३॥
लक्ष्मी रुपें आपण हरु । देवें वरिला शारंगधरु ।
गरुडरुपें महेश्वरु । वहन जाला विष्णूचें ॥४॥
शक्तिरुपें शारंगापणि । नारायण जाला भवानी ।
शारंगधर नंदी होऊनि । सन्मुखासनीं बैसला ॥५॥
एक तो एक वेगळा नाहीं । दृष्टान्त तूं आगमीं पाहीं ।
नामा म्हणे एक केशव ध्यायीं । हरिहर पाहीं ज्याचे अवतार ॥६॥

५२
म्हणतां नाम वाचे वैकुंठ जवळी । नित्य वनमाळी भक्तांसंगें ॥१॥
होईल साधन विठठलीं परिपूर्ण । निवती नयन मूर्ति पाहतां ॥२॥
शंखचक्रांकित आयुधें शोभती । भाग्योदयीं दिसती भावशीळा ॥३॥
नामा म्हणे तें रुप पंढरीचें आहे । न सांडी ते सोय केशवाची ॥४॥

५३
आपुली पदवी सेवकासी द्यावी । तो एक गोसावी पांडुरंग ॥१॥
भावाचा आळुका भुलला भक्तिसुखा । सांपडला फुका नामासाठीं ॥२॥
प्रेमाचा जिव्हाळा नामाची आवडी । क्षण एक न सोडी संग त्याचा ॥३॥
नामा म्हणे दीनांचे माहेर । तो एक उदार पांडुरंग ॥४॥

५४
सोयरा सुखाचा विसावा भक्तांचा । विठोबा निजाचा मायबाप ॥१॥
कृपाळू दीनाचा बडिवार नामाचा । तोडर ब्रीदाचा साजे तया ॥२॥
काया मनें वाचा संग धरा त्याचा । अनंत जन्माचा हरेल शीण ॥३॥
नामा म्हणे विठो अनाथा कुवासा । तारिल भरंवसा आहे मज ॥४॥

५५
देव दयानिधि भक्तांचा कैवारी । नाममात्रें तारी सर्वांलागीं ॥१॥
तया देवराया गावें हो आवडी । लागे मनीं गोडी सर्वकाळ ॥२॥
नाहीं यातिकूळ उंच नीच भेद । भाव एक एक शुद्ध पाहातसे ॥३॥
नामा म्हणे काय सांगावें नवल । अखंड दंडलें व्योमाकार ॥४॥

५६
नाम फुकाचें चोखट । नाम घेतां नलगे कष्ट ॥१॥
पडशील ज्या सागरीं । रामनामें आत्मा तारी ॥२॥
पुत्रभावें स्मरण केलें । तया वैकुंठासी नेलें ॥३॥
नामा हें महिमान जाण । घेतो विठ्ठलाची आण ॥४॥

५७
साधावया स्वरुपसिद्धि । सिद्ध साधक समाधी ।
बैसोनी ध्यानबुद्धि । परी तो हरी न सांपडे ॥१॥
धन्य धन्य वैष्णव संग । अखंड तेथें पांडुरंग ।
कीर्तनी नाचतसे अभंग । अखंड काळ सर्वदा ॥२॥
नाम घेतां धांवे विठठल । नलगे तप नलगे मोल ।
कष्ट न लगती बहुसाल । हा कृपाळु दीनाचा ॥३॥
नामा म्हणे भक्तीचें कारण । भक्तीसी तुष्टे नारायण ।
याचें करितां कीर्तन । आपेंआप तुष्टेल ॥४॥

५८
दया हेचि दाता मन करी उदार । सर्व हा श्रीधर ऐसें भावी ॥१॥
तुटेल यातना होईल वैकुंठ । पंढरी मूळपेठ सेवी कांरे ॥२॥
इच्छिती अमर नित्य काळ नेमें । दाटताति प्रेमें सनकादिक ॥३॥
तें हें विठठलनाम पवित्र चोखडें । अंतरीं माजिवडे नित्य करी ॥४॥
होतील कामारि ऋद्धिसिद्धी अपार । आपण श्रीधर कुरवाळील ॥५॥
नामा म्हणे येथें न लगेची मोल । विठठल निमोल सर्वांभूतीं ॥६॥

५९
कां करिसी हव्यास इंद्रियांचा सोस । वायां कासावीत कोण्या काजें ॥१॥
सर्व ही लटिकें मोहबंधन । सत्य हें निधान विठठल एक ॥२॥
उगवेल प्रंपच सर्व हें आहाचें । रामकृष्ण वाचे बांध जिव्हें ॥३॥
नामा म्हणे करणी करावी पै ऐसी । जेणें त्या विठठलासी पाविजेसा ॥४॥

६०
मी माझें भावितां न फिटे हें ओझें । कर्मकण्ड दुजें आड येत ॥१॥
न तुटे हें कर्म न चले हा धर्म । सर्वत्र हें ब्रह्म न कळे तया ॥२॥
मी माझें हें ओझें अहंताची वाहे । परतोनी न पाहे मी कवण ॥३॥
नामा म्हणे नाम स्मरे त्या कृष्णाचें । भय कळिकाळाचें नाहीं नाहीं ॥४॥

६१
उपदेश विव्हळ न कळे याचा अर्थ । वायांची हा स्वार्थ प्रपंचाचा ॥१॥
सांडी हा प्रपंच मिथ्या लवलाहो । विठठल हा टाहो नित्य करी ॥२॥
हरी हरी भजन भज दयाशीळ । होसील निर्मळ ब्रह्मरुप ॥३॥
सर्व हा आकार हरीचें शरीर । मायेचा विकार भुलों नका ॥४॥
आप तेजीं ब्रह्म हरी माझा सम । आदि अंतीं नेम विठ्ठल हरी ॥५॥
नामा म्हणे उपमा काय द्यावी यासी । नाम तारी सर्वांसी कलिमाजीं ॥६॥

६२
धिग्‍ तो ग्राम धिग्‍ तो आश्रम । संत समागम नाहीं जेथें ॥१॥
धिग्‍ ते संपत्ति धिग्‍ ते संतति । भजन सर्वांभूतीं नाहीं जेथें ॥२॥
धिग्‍ तोआचार धिग्‍ तो विचार । वाचे सर्वेश्वर नाहीं जेथें ॥३॥
धिग्‍ तो वक्त्ता धिग्‍ तो श्रोता । पांडुरंगकथा नाहीं जेथें ॥४॥
धिग्‍ तें गाणें धिग्‍ ते पढणें । विठठल नाम बाणें नाहीं जेथें ॥५॥
नामा म्हणे धिग्‍ धिग्‍ त्यांचे जिणें । एका नारायणें वांचूनिया ॥६॥

६३
सुख तें आपुलें चोरांशी वांटिलें । पालटें घेतलें दुःख त्यांचें ॥१॥
नित्य नवी त्याची सोसितां सोसिणा । नयेचि तुज अझोनी वीट मना ॥२॥
ऐसा तूं निर्लज्ज पाहे आत्मघातीं । कैसी तुझी खंती न वाटे तुज ॥३॥
लक्ष या चोर्‍यांशीं सोसितां यातना । भोगिसी पतना ज्यांच्या संगें ॥४॥
त्यांते भजसी सांग पुढती कोण्या मोहें । विचारुनि पाहे तुझा तूंचि ॥५॥
सदा चिंतातुर होऊनि दीनरुप । संकल्प विकल्प करिसी किती ॥६॥
नाथिलाची छंदु नाहींत्या दुराशा । भोंवसी दाही दिशा तळमळीत ॥७॥
त्यांची इंद्रियें बापुडीं असती केविलवाणीं । विषयी लागोनी लोलंगिती ॥८॥
तूं हे आशा करिसी निरंतरीं । जालासी भिकारी कृपणाचा ॥९॥
आलें काळभय हाकीत टाकीत । मूढा तुझें हित कोण करी ॥१०॥
त्रिभुवनीं समर्थ बळी जगजेठी । रिघें त्याचे पाठीं म्हणे नामा ॥११॥

६४
अभ्यासिले वेद जाला शास्त्रबोध । साधिल्या विविध नाना कळा ॥१॥
प्रेमाचा जिव्हाळा जंव नाहीं अंतरीं । तंव कैसा श्रीहरि करील कृपा ॥२॥
हित ते आचरा हित ते विचारा । नामीं भाव धरा जाणतेनों ॥३॥
प्रसंगीं पुराणें ऐकिलीं श्रवनीं । त्यांतील कोण मनीं धरील अर्थ ॥४॥
काय तें सांडिलें काय तें मांडिलें । काय तें दंडविलें प्रवृत्तीसी ॥५॥
अनंत ह्रा मूर्ति पाहिल्या लोचनीं । यांतील कोण ध्यानीं प्रतिबिंबली ॥६॥
स्वप्नींचिया परी देखसी अभ्यास । न धरीच विश्वास चित्त तुझें ॥७॥
वांझेचिये स्तनीं अमृताची धणी । मृगजळ पाणी तान्हा बोले ॥८॥
तरी प्रेमेविण कळतो क्रियाकर्मे । हातीं येतीं वर्मे विठोबाचीं ॥९॥
नामा म्हणे तरी विठो येऊनि भेटे । कायाच पालटे कैवल्य होय ॥११॥

६५
नामामृत गोडी आहे वैष्णवासी । येरां प्राकृतासी कळेनाची ॥१॥
प्राकृत हे जन भुलले विषयीं । नामाचिया गांवी कैसे जाती ॥२॥
नामीं चित्त व्हावेम जावें तेव्हां गांवा । मग नाम गोवा तेथें कैंचा ॥३॥
नाम तेंचि जाहालें वर्नरुपातीत । अनाम स्वतंत्र स्वयंभ तो ॥४॥
नामदेव म्हणे नाम हें सुलभ । अभक्ता दुर्लभ नानापरी ॥५॥

६६
अवघिया आचार निष्ठा । चित्त जरी जाय वैकुंठा ।
तरीच निस्तरिलें कष्टां । भवपाशापासोनी ॥१॥
धन्य धन्य चित्तवृत्ति । विठठल भक्तीची पुढत पुढती ।
त्याचे पूर्वज उद्धरती । गीत गाती रामकृष्ण ॥२॥
हेंचि जप तप ध्यान । हरी चरणीं ठेवूनि मन ।
साधले कार्यांचें कारण । रामकृष्ण उच्चारिणीं ॥३॥
नामा जपे ठेऊनि चित्त । अखंड चरणीं जाला रत ।
पुरले आमचे मनोरथ । सर्व कृतार्थ पैं जालों ॥४॥

६७
सर्वांमाजीं सार नाम हें देवाचें । सर्व साधनांचे सार जें कां ॥१॥
चार साहा आणिक आठरा वर्णिती । नामें निजप्राप्ती अर्धक्षणीं ॥२॥
व्यासादिक नाम साधियलें दृढ । प्रपंच काबाड निरसेल ॥३॥
नामदेव म्हणे निजधाम ब्रह्म । घेतां नेम धर्म सर्व साधे ॥४॥

६८
मन करी आपुलें वासना ते वारी । सर्व हेंचि हरी भजत जाय ॥१॥
ब्रह्मनाम गोविंद नाहीं भेदाभेद । तुटे भवबंध हरी नामें ॥२॥
सांडी लगबग न करी तूं आळस । विठठलीं विश्वास असों देणें ॥३॥
नामा म्हणे ब्रह्म हेंचि निरुपण । सर्व काम पूर्ण याच्या नामें ॥४॥

६९
व्रत तप दान हवन पूजन । न लगे साधन नाम म्हणतां ॥१॥
रामकृष्ण हरी मुकुंड मुरारी । जिव्हे क्षणभरी न विसंबें ॥२॥
कळिकाळ दारुण करीतसे विघ्न । परजी नारायण नाम जिव्हें ॥३॥
शरण आलों जिव्हे तुवां नुपेक्षावें । नामा म्हणे गावों हरिनाम ॥४॥

७०
नित्य सर्वगत अखंड सगुण । केशवाचें ध्यान करी ब्रह्म ॥१॥
ब्रह्मा सर्वकाळ सांगे साधूपाशीं । आणिक हे शेषीं तेंचि मानी ॥२॥
मनीं जो मानसीं नामामृत सार । सेविती सादर नामा म्हणे ॥३॥

७१
नामाचा धारक विष्णुरुप देख । वैकुंठीचें सुख रुळे पायीं ॥१॥
निराकार देव आकारासी आला । भक्तीं पैं स्थापिला नामरुपा ॥२॥
नाममंत्र बीज जोंवरी नाहीं जया । तोंवरी केशवदया नाहीं प्राप्त ॥३॥
नामा म्हणे नाम केशव केवळ । जाणती प्रेमळ हरीभक्त ॥४॥

७२
सदा पैं परिपूर्ण जयाचें रुपडें । तेथेंचि माजीवडे मन करी ॥१॥
होईल उद्धार सुटेल संसार । सर्व मायापूर दुरी होय ॥२॥
कांठाळा कायेचा दुरावा मायेचा । हेंचि जप वाचा स्मरे नाम ॥३॥
नामा म्हणे करी सर्व हरी हरी । राम हें उत्तरीं वाखाणी पां ॥४॥

७३
रकार मकार बांधी कां रे तुळीं । तापत्रय होळी होऊनि जाय ॥१॥
गोविंद मुकुंद हरि परमानंद । कृष्ण केशव छंद नित्य वाचे ॥२॥
जपे जग्‌दबंधु हरिकथा छंदू । बिघडे भवबंधु येणें मात्रें ॥३॥
नामा म्हणे केशवा न करी निर्वाण । माझा अभिमान आहे त्यासी ॥४॥

७४
शंभु उपदेशी भवानीसी । रामनाम जपे मानसीं ॥१॥
दोन्हीं अक्षरें रसाळें । महा पातकां करी निराळें ॥२॥
वीजमंत्र राजनाम । फळ शतकोटी रामायण ॥३॥
नामा विनवितो रघुनंदना । विनती परिसा दशरथनंदना ॥४॥

७५
संसार पाल्हाळ सांगसी परिकर । नाम तें श्रीधर न म्हणसी ॥१॥
कैसें तुज उद्धरण होईल गव्हारा । भजन त्या हरीहरी करी वेगीं ॥२॥
योनी नानाविद्या पावसी आपदा । हाचि खेळ सदा स्मरतोसि ॥३॥
नामा म्हणे लटिकें प्रपंचासी मुके । राम हेंचि मुखें जप करी ॥४॥

७६
गाणें गाती रे सुगडें । तया हांसति दुधडें ॥१॥
नाम गोड नाम गोड । होय जन्माचा निवाड ॥२॥
हांसे त्यासी हांसूं द्यावें । गात आपण असावें ॥३॥
नामा म्हणे जे हांसती । त्यांचीं कुळें नरका जाती ॥४॥

७७
नाम एकचि तारक । रामनामें शुद्ध मुख ।
येणें उद्धरती तिन्ही लोक । कुळांसहित वैकुंठ ॥१॥
धन्य धन्य तें कुळ । रामनामें नित्य निर्मळ ।
जो उच्चारी सर्वकाळ । धन्य जन्म तयाचा ॥२॥
एक हरी एक तत्त्व । तेथें धनोनियां शुद्ध सत्त्व ।
नाना काय करिसी कवित्व । राम नाम उच्चारी ॥३॥
नामा जपे नाम मंत्र । हातीं न घे आणिक शस्त्र ।
रामकृष्ण हें वक्त्र । उच्चार इतुकेचि पुरे आम्हां ॥४॥

७८
न लगती कथा व्युत्पत्ति उलथा । वाउग्या चळथा ग्रंथाचिया ॥१॥
हरि हरि भजन जनीं जनार्दन । सर्वत्रीम समान भूतदया ॥२॥
भावेंचि भजावें हरीतें पूजावें । नित्य हें सेवावें रामनाम ॥३॥
नामा म्हणे गोड नको तें हे वाड । विठठलाचें वेड इतुकें पुरे ॥४॥

७९
मंत्राचा पैं मंत्र हरी हरी उच्चार । न लागे तो विचार करणें कांहीं ॥१॥
सुफळ नाम गाढें वाचेसि उच्चारुं । केशव हाचि करुं सर्वांभूतीं ॥२॥
नाहीं यासी पतन न होईल बंधन । नित्य हेंचि स्नान रामनामें ॥३॥
नामा म्हणे भाव सर्वांभूतीं करा । आणिक पसारा घालूं नका ॥४॥

८०
नाचताम उडतां रडताम पडतां । नाम्या अवचितां हातां आला ॥१॥
येतां जातां हरि हरि हरि वाटे । नाम तें चोखटें स्मरा मुखीं ॥२॥
हंसतां खेळताम घरीं दारीं पारीं । मुखीं हरि हरि म्हणे कां रे ॥३॥
खाताम जेवितां अन्नतृप्ति सारी । सांडी मांडी हरी सर्व काळ ॥४॥
नामा म्हणे नामीं आस्ति नास्ति ठसा । केशव हरि सन्मुख तुम्हां दिसे ॥५॥

८१
हरिविण देह मळीण सर्वथा । मंगळाची कथा रामकृष्ण ॥१॥
कथा करी कोणी ऐकती जे जन । वैकुंठभुवन हातां आलेम ॥२॥
वेदशास्त्रां सार नामाचा उच्चार । अंतीं पैल पार दाखवितो ॥३॥
जन्मोनियां जगीं अलिप्त असावें । नाम तें स्मरावें म्हणे नामा ॥४॥

८२
सर्वकाळ पुण्याच्या राशी । हरिनाम आलिया जिव्हेसी ।
नित्य तप अनुष्ठानाच्या राशी । कोटी यज्ञासी लाभ जाला ॥१॥
धन्य धन्य त्याचा वंश । जे जे रतले नामास ।
रामनामीं नित्य सौरस । ते विष्णुदास पवित्र ॥२॥
पवित्र ते स्वधर्मीं । ज्यांसी सर्वकाळ नामीं ।
तयाचें नाम पूर्णकामी । मनोरथ पुरतील ॥३॥
नामा जपे नाम हरीचें । सार्थक केलें संसाराचें ।
ओझें फेडिलें पूर्वजन्माचें । हरीस्मरण केलिया ॥४॥

८३
नामीं नारायण । होय भक्तांचे आधीन ॥१॥
न मागतां भक्ति । नामापासीम चारी मुक्ती ॥२॥
भूलों नये जाण । नाम वैकुंठीं निशाण ॥३॥
नामा म्हणे ऐसे प्राणी । सम होती नारायणीं ॥४॥

८४
आतां आहे नाहीं पाहतां क्षण एक । संपत्तीचे सुख विषय हा ॥१॥
हित तें आचरा हित तें विचारा । नामीं भाव धरा जाणतेनो ॥२॥
संपत्तीच्या बळें एक जाले आंधळे । वेढिलें कळिकाळें स्मरण नाहीं ॥३॥
एक विद्यावंत जातीच्या जातीच्या अभिमानें । नेले तमोगुणें रसातळा ॥४॥
मिथ्या माया करोनि मोह हव्यास । वेचिलें आयुष्य वायांविण ॥५॥
नामा म्हणे कृपा करुनि ऐशा जीवा । सोडवी केशवा मायबापा ॥६॥

८५
आम्ही विठोबाचे दूत । यम आणूं शरणागत ॥१॥
मुखें नाम हातें टाळी । महापापा करुं होळी ॥२॥
करुं हरिनामाचा घोष । कुंभपाक पाडूं ओस ॥३॥
करुं हरीकथा कीर्तन । तोडूं यमाचें बंधन ॥४॥
एवढा प्रताप नामाचा । रिघ नव्हे कळिकाळाचा ॥५॥
ऐसा नामा यशवंत । विठोबाचा शरणागत ॥६॥

८६
ज्यासी विन्मुख संसार । तो मोक्षाचा विचार ॥१॥
आम्ही पंढरीचे लाठे । नवजो वैकुंठीचे वाटे ॥२॥
सांडोनी पंढरीची वारी । मोक्ष मागतो भिकारी ॥३॥
जन्मोजन्मींचा आळसी । तो मुक्तीतें अभिलाषी ॥४॥
ताट ओगरिलें निकें । सांडोनी कोण जाय भिके ॥५॥
जो कां नेणे नामगोडी । तो मुक्तीतें चरफडी ॥६॥
नामा म्हणे विष्णुदासां । झणीं भ्याला गर्भवासा ॥७॥

८७
हरिकथा श्रवण श्रवणाचेनि द्वारें । माझिया दातारें केशवें दिलें ॥१॥
तीर्थाचें सुख चरणाचेनि द्वारें । माझिया दातारें केशवें दिलें ॥२॥
पूजनाचें सुख कराचेनि द्वारें । माझिया दातारें केशवें दिलें ॥३॥
नामा म्हणे ऐसे जयाचे उपकार । तो विठठल दातार विसरले ॥४॥

८८
ब्राह्मण हो तुम्ही सर्व नारीनर । सर्वांसी आधार नाम सत्य ॥१॥
नामाविण गति न सरे आणिक । वैकुंठनायक बोले मुखें ॥२॥
परि तेंचि नाम पहावें शोधुनी । चौर्‍यांशीची खाणी तेव्हां चुके ॥३॥
नामा म्हणे आतां सद्‌गुरु वंदनी । नाम घ्या शोधुनि सत्य मुक्त ॥४॥

८९
ब्राह्मण न कळे आपुलें तें वर्म । गवसे परब्रह्म नामें एका ॥१॥
लहान थोरांसी करितों प्रार्थना । दृढ नारायणा मनीं धरा ॥२॥
सर्वांप्रति माझी हेचि पै विनंती । आठवा श्रीपति आपुलें मनीं ॥३॥
केशव नारायण करावें आचमन । तेचि संध्या स्नान कर्म तया ॥४॥
नामा म्हणे हेंचि करा नित्य भजन । ब्रह्मार्पण साधन याचे पायीं ॥५॥

९०
ब्राह्मण हो शूद्र वैश्य नारीनर । सर्वांसी आधार नाम सत्य ॥१॥
नामविण गति नाहीं हो आणीक । वैकुंठनायक बोले मुखें ॥२॥
परी तेंचि नाम पाहावें शोधून । चौर्‍यांशी खाणी चुके तेव्हां ॥३॥
नामदेव म्हणे सद‌गुरुपासोनी । नाम घ्या शोधूनि भावमुक्त ॥४॥

९१
सदाशिवापुढें कोण अनुष्ठानी । अष्टांग लावूनि नमस्कारी ॥१॥
नाम यज्ञ जप ऋषीश्वर ध्याती । शीतळ ते होती काळकूट ॥२॥
सर्वांमाजीं श्रेष्ठ नाम कलियुगीं । रामकृष्ण जगीं नामनौका ॥३॥
नामा म्हणे नाम अखंडित स्मरा । पांडुरंग भजा वेगीं ॥४॥

९२
ब्रह्मांडनायक विश्वाचा गोसावी । तो केला पांडवी म्हणियारा ॥१॥
भावाचा लंपट भक्ताम पराधीन । सोडोनी अभिमान दास्य करी ॥२॥
भाजीचिया पाना संतोषला हरी । जयाचे उदरीं चौदा भुवनें ॥३॥
जनक श्रुतिदेवेम धरियेला करीं । दोघांचिये घरीम घेतो पूजा ॥४॥
पुंडलिकें वीट बैसावया नीट । तेथें भूवैकुंठ वसतें केलें ॥५॥
नामा म्हणे शरण रिघतां एक्याभावें । कैवल्य भोगावें नामामात्रें ॥६॥

९३
केशव कैवल्य कृपाळ । नारायणें उद्धरिला अजामेळ ।
माधव मनीं धरा निश्चळ । गोविंद गोपाळ गोकुळींचा ॥१॥
विष्णु विश्वाचा जिव्हाळा । मधुसूदन माउली सकळां ।
त्रिविक्रमें रक्षिलें गोवळा । वामनें पाताळीं बळी नेला ॥२॥
श्रीधरें धरा धरिली पृष्ठीं । ह्रषिकेश उभा भीवरेतटीं ।
पद्मनाभ पुंडलिकासाठी । दामोदरें गोष्टी पांडवांशीं ॥३॥
संकर्षणें अर्जुनासी संवाद केला । वासुदेवें अवचितां वाळी वधिला ।
प्रद्युम्न समुद्रावरी कोपला । अनिरुद्धे छेदिला सहस्त्रबाहो ॥४॥
पुरुषोत्तमें केला पुरुषार्थ । अधोक्षजें हिरण्यकश्यपा मारिली लाथ ।
नरहरि प्रल्हादा रक्षित । स्मरावा अच्युत स्वामी माझा ॥५॥
जनार्दनें रावणादि वधिले । उपेंद्रें अहिल्येसी उद्धरिलें ।
हरि हरि म्हणताम दोष जळाले । कृष्णें तारिलें गणिकेसी ॥६॥
या चोवीस नामांचें करितां स्मरण । जन्ममरणांचे होय दहन ।
विष्णुदास नामा करी चिंतन । चरण ध्यान मज देई ॥७॥

९४
येऊनि संसारा । हित वेगीं विचारा ॥१॥
स्मरा ह्रषिकेशी । तो नेईल परलोकासी ॥२॥
गणिका नाम उच्चारी वाचे । जन्ममरण चुकलें तिचें ॥३॥
अजामेळ पापराशी । नामें पावला मोक्षासी ॥४॥
दूध मागों गेलें लेकरुं । तया दिधला क्षीरसागरु ॥५॥
सापत्नी धुरु दवडिला । तो अढलपदीं बैसविला ॥६॥
गजेंद्र स्मरत तांतडी । त्याची चुकविलीं सांकडीं ॥७॥
नामा म्हणे नामबळें । उद्धरती कोटी कुळें ॥८॥

९५
हरीनाम गातां पवित्र । सेविती हरिहर ब्रह्मादिक ॥१॥
नाम तारी नाम साहाकारी । नामें उच्चारी रुपें तुझीं ॥२॥
ऐसीं अनंत नामें तुझीं न वर्णवती देवा । नामा म्हणे केशवा विनवितसे ॥३॥

९६
नाम घेताम भगवंताचें । पाश तुटती भवाचे ॥१॥
जे जे नामीं रत जाले । ते ते केशवीम तारिले ॥२॥
गणिका दुराचारी । नामें तारिली अहिल्या नारी ॥३॥
महापापी अजामेळ । तोही तारिला चांडाळ ॥४॥
नामें गजेंद्र तारिला । देवें मोक्षपदासी नेला ॥५॥
नाम घेतसे पांचाळी । उभा बाप वनमाळी ॥६॥
नामा सांगे भाविकंसी । नाम घ्यारे अहर्निशीं ॥७॥

९७
कुटिल कुबुद्धि कुपात्र कठोरी । अंगिकारी हरी अश्वत्थामा ॥१॥
अश्वत्थामा अंबऋषि दुर्योधन । शेवटीं अर्जुन हितकारी ॥२॥
मानी भावभक्ति आश्चर्य सकळ । शंकर शीतळ होय नामें ॥३॥
नामा म्हणे आधीं नाममंत्र धोका । नाहीं भय धोका किमपिही ॥४॥

९८
नामाचा प्रताप काय सांगू वाचे । अक्षय सुखाचें स्थान दावी ॥१॥
नामाविण कांहीं नाहीं नाहीं सार । साधावें सस्त्वर भले नोहे ॥२॥
अजामेळ पाहा आजन्म पातकीं । नामें गेला सेखीं वैकुंठासी ॥३॥
कुंटिणी जारिणी शुकामिसें गाय । वैकुंठासी जाय तत्क्षणीं ॥४॥
पाहा वाल्ह्या कोळी उफराट्या नामें । भविष्य संभ्रमें वाखाणिलेम ॥५॥
नामा म्हणे किती सांगावा निर्धार । साधन सोपारें नाम एक ॥६॥

९९
नाम न म्हणे आवडी । व्यर्थ वाचे बडबडी ॥१॥
जिव्हा नव्हे ती वाचक । भोगी आळसें नरक ॥२॥
करी आरालिया निंदा । परी न म्हणे गोविंदा ॥३॥
असत्या आवडी । सदा वाचेसी रोकडी ॥४॥
निंदेवांचूनि पातक । सत्या जाणा माझी भाक ॥५॥
गर्जे नामाचे पवाडे । पायां कळिकाळ पडे ॥६॥
निज सहज चैतन्य । नामा म्हणे नां जाण ॥७॥

१००
जयासी लागली रामनामाची गोडी । त्यानें केली प्रौढी परमार्थाची ॥१॥
कलिमाजीं नाम सुलभ सोपारें । यालागीं आदर नामीं धरा ॥२॥
आणिक साधनें आहेती उदंड । सेवितां वितंड कष्ट तेथें ॥३॥
सोवळें ओवळें उंच नीच वर्ण । नाहीं येथें गुणदोष कांहीं ॥४॥
नामा म्हणे सर्व सिद्धांताचा भाव । प्राणियांचें दैव कोण जाणे ॥५॥

१०१
नाम जींही उच्चारण केलें । तींही वैकुंठ साधिलें ।
भवसागर पार पावले । उद्धरले हरिभक्त ॥१॥
नाम दुर्लभ दुर्लभ । तारील हा पद्मनाभ ।
पुंदलिकें करोनियां स्वयंभ । केशव मूर्ति केली उभी ॥२॥
ऐसें अगाध हरी रुपडें । प्रत्यक्ष पुंडलिकापुढें ।
भक्ती काज कैवाडें । भीमातरीं उभा असे ॥३॥
वर्णावया न पुरे शेष । वेदां न घालवे कास ।
तेथें शास्त्र काय घेती भाष । रुप वर्णावया हरीचें ॥४॥
उद्धव अक्रूर द्वापारीं । त्यासवें खेळले हरी ।
मग ते उद्धरिले अवधारी । ज्ञान देऊनि श्रीकृष्णें ॥५॥
नामा म्हणे ऐसें नाम । हरिकथेसी धरी प्रेम ।
तरी तुझा धन्य जन्म । मनुष्य जन्मीं असतां ॥६॥

१०२
हरिनाम पाठ हाचि भाव । हरी हरी हाचि देव ।
हरिविण न फिटे संदेह । सर्व जिवांचा जाण पां ॥१॥
हरितत्त्व ज्याचे देहीं । तोचि तरला येथें पाही ।
हरिविण या डोहीं । भवसागर कैसा तरेल ॥२॥
रामकृष्ण वासुदेवा । हाचि सर्व जिवांचा विसावा ।
येथें पोकारुनियां धांवा । विठ्ठलनाम उच्चारी ॥३॥
नामा जपे ह्रदयीम सदा । रामकृष्ण हाचि धंदा ।
हरिराम परमानंदा । हाचि जप जपतसे ॥४॥

१०३
पद तीर्थ दान हें सर्व कुवाडें । नाम एक वाड केशवाचें ॥१॥
मुमुक्षु साधकीं सदा नाम गावें । तेणेंचिया व्हावें अखंडित ॥२॥
विपत्तीचें बळें न होतां विन्मुख । नाममात्र एक धरा वाचे ॥३॥
जीवन्मुक्त शुक मुनि ध्रुवादिक । तयासी आणिक ध्यास नाहीं ॥४॥
नामयाची वाणी अमृताची खाणी । घ्यावी आतां धणी सर्वत्रांही ॥५॥

१०४
केशव नाम गाय माधव नाम गाय । विठ्ठल नाम गाय कामधेनु ॥१॥
वेणुवादीं चरे पाणी पी भीवरें । ती गाय हंबरे भक्तालागीं ॥२॥
भक्तीसुखें धाय प्रेमें तें पान्हाय । भुकेलिया खाय पातकासी ॥३॥
नामा म्हणे गाय पंढरीसी आहे । पापिया न साहे पाठीं लागे ॥४॥

१०५
आदरें जपतां केशवाचें नाम । वैकुंठ हें धाम पायां पडे ॥१॥
आणिक सायास करुनि कदापि । चौर्‍यांशींच्या सिपीं गुंफीं नका ॥२॥
याजसाठीं हरिनाम निरंतरीं । तारील निर्धारीं भाक माझी ॥३॥
भावभक्ती क्रिया नलगे आणिक । कीर्तन तारक म्हणे नामा ॥४॥

१०६
केशव म्हणतां क्लेश जाताती परते । त्याहुनि सरतें आणिक नाहीं ॥१॥
वेद कां पढसी शास्त्रें कां शिणसी । उदंड वाचेसी हरी म्हणा ॥२॥
याहुनि पैं सार नाहीं हो दुसरें । भीष्में युधिष्ठिर उपदेशिला ॥३॥
नामा म्हणे धरा केशवीं विश्वास । तुटे गर्भवास नामें एकें ॥४॥

१०७
शेतीं बीज नेतां थोडें । मोटे आणिताती गाडे ॥१॥
एक्या नामें हरि जोडे । फिटे जन्माचें सांकडें ॥२॥
बाळे भोळे जन । सर्व तरती कीर्तनें ॥३॥
नामा म्हणे नेणें मूढें । नाम स्मरावें साबडें ॥४॥

१०८
तोडीं हें बिरडें मोह ममता आधीं । विषय बाधा कधीं गुंफो नको ॥१॥
असे घराश्रमीं भजे सर्वांभूतीं । मी माझें पुढतीं म्हणों नको ॥२॥
तूं तंव लटिका आलासी कोठुनि । मी माझें म्हणोनि म्हणतोसी ॥३॥
नामा म्हणे मूळ राम परब्रह्म । जगाचा विश्राम त्यासी भजे ॥४॥

१०९
मी म्हणतां अहंता होईल पूर्णता । भजन सर्वथा न घडे येणें ॥१॥
आपुलें आपण विचारावें धन । हरि हाचि पूर्ण भजें कारे ॥२॥
हेंचि भजन थोर करी निरंतर । नाम हें सधर मनें गिळी ॥३॥
नामा म्हणे अपार नाम पारावार । श्रीराम सुंदर जप करी ॥४॥

११०
एकांत एकला सर्व आहे हरी । ऐसेंचि अहर्निशीं ध्यायिजे तूं ॥१॥
सर्वांभूतीं विठठल आहे आहे साचे । हें तंव वेदींचे वचन जाण ॥२॥
मार्ग हाचि सोपा गेले मुनिजन । जनीं जनार्दन हाचि भावो ॥३॥
नामा म्हणे नाम मंत्र उच्चारण । सर्वही कारण होईल तुझें ॥४॥

१११
एकचि क्षरलें एकचि देखिलें । ब्रह्म हें संचलें हरिनामें ॥१॥
एक एकाकार सर्वही आकार । राम हा साकार सर्वांघटीं ॥२॥
असोनी निराळा सुमनाचा वास । तैसा ह्रषिकेश जीवां सकळां ॥३॥
नामा म्हणे सुमन कळिकाळें एक । तेंचि निजसुख घेई जना ॥४॥

११२
प्रसन्न वदन सदा विळ आहे । कां करिसी उपाव कर्म जाड ॥१॥
मंत्रांचा पैं मंत्र बीज नाम हरीचें । तेंचि हें शिवाचें रामनाम ॥२॥
तुटेल भवकंद जासील निजपंथें । झणीं तूं दुश्चितें करिसी चित्त ॥३॥
नामा म्हणे भजन सर्व हरीचें करी । होईल बोहरी प्रपंचाची ॥४॥

११३
एकतत्त्व हरी निर्धार तूं धरी । प्रपंच बोहरी एका नामें ॥१॥
अच्युत गोविंद परमानंद छंद । नित्य तो आल्हाद हरिनामीं ॥२॥
ऐसा तूं विनटें हरी नामपाठें । जासील वैकुंठें नश्वरता ॥३॥
नामा म्हणे तत्त्व नाम गोविंदाचें । हेंचि धरी साचें येर वृथा ॥४॥

११४
सर्वांमाजीं सार नाम श्रीहरीचें । अखंडीत वाच जप करी ॥१॥
निशिदिनीं ह्रदयीं ध्यातो शूलपाणि । पाविजे निर्वाणीं मोक्षपद ॥२॥
नामा म्हणे ऐसें स्मरे कां निधान । पावेल सदन वैकुंठीचें ॥३॥

११५
विठठलासी पाहे विठठलासी ध्याये । विठ्ठलासी गाये सर्वकाळ ॥१॥
विठठल हा वृत्ति विठठल जपणें । चित्त वित्त मनें सर्वकाळ ॥२॥
सबाह्य विठठल दाटे घनवट । दशदिशा अफाट विठ्ठलचि ॥३॥
नामा म्हणे तुम्ही विठठल होऊन । अभंग भजन करीतसां ॥४॥

११६
सार पैं नाम विठठलाचेम आहे । दिननिशीं सोय मना लावी ॥१॥
गुंपजेल मन जोडती पाउलें । तुटती घेतलें मायाजाळ ॥२॥
नामचि कारण जप पैं सफळ । उद्धार निर्मळ सकळ जीवाम ॥३॥
नामा म्हणे तो हा विठठल पंढरिये । नाम अमृतमर्य चराचरीं ॥४॥

११७
विठठनामीं आळस न करी गव्हरा । वायांचि वेरझारा शिणतोसी ॥१॥
हरी उच्चारण करी हा विचार । नामचि साचार उद्धरण ॥२॥
मी म्हणताम अहंता वाढे हे सर्वथा । परी भजनापरता नाहीं मार्ग ॥३॥
मायाजाळ विषय तोडी तोडी सांठा । विठ्ठलनाम पाठा वोळगे जना ॥४॥
सर्ग हें लटिकें मोहजाळ फिकें । नामेंविण एके नाहीं दुजें ॥५॥
नामा म्हणे उपदेश भजे केशवास । वैकुंठनिवास वोळगे तुज ॥६॥

११८
तुझें तुज सांकडें पडलें थोर कोडें । तें करी माजीवडें ब्रह्मार्पण ॥१॥
ब्रह्म हरी ध्याई मन ठेवीं ठायीं । विठठलाच्या पायीं दिननिशीं ॥२॥
अनुभवग्रहणीं विठठल निशाणी । घडेल पर्वणी नित्यकाळ ॥३॥
नामा म्हणे सुघड मन करी वाड । इंद्रियांची चाड धरुं नको ॥४॥

११९
ज्याचे मुखीं नाम तोचि एक धन्य । त्याचें शुद्ध पुण्य इये जनीं ॥१॥
नामसंकीर्तन नित्य नाम वाचे । दहन पापाचें एका नामें ॥२॥
ऐसा जो अखंड जपे रामनाम । नाहीं तयासम दुजें कोणी ॥३॥
नामा म्हणे नाम विठठलाचें जपा । हाचि मार्ग सोपा परब्रह्मीं ॥४॥

१२०
सकळ साधनांचे सार । रामकृष्ण हा उच्चार ॥१॥
म्हणा गोविंद नरहरी । सकळ जीवां तोचि तारी ॥२॥
नाम घेतां हरी माधव । तरताती सकळ जीव ॥३॥
नामा म्हणे केशव वाचे । धन्य जीवित वैष्णवांचें ॥४॥

१२१
म्हणा श्रीराम जयराम । भवसिंधु तारक नाम ॥१॥
नाम पतितपावन । नाम जीवांचे साधन ॥२॥
नाम शिवाचें ध्यान । नाम नारदा गायन ॥३॥
नामा म्हणे हरिचें नाम । नाम तारक परब्रह्म ॥४॥

१२२
सोपा ह सुगम उपावो परीस । धरीं तू विश्वास नाममहिमें ॥१॥
नाम हेंचि गंगा नाम हेंचि भीमा । अंतरीं श्रीरामा जपिजेसू ॥२॥
अमृत सुरस रामनाम एक । वाचेचें वाचक मन करी ॥३॥
नामा म्हणे सुरस सेवी सुधारस । ध्यायी केशवास दिननिशीं ॥४॥

१२३
भावेंचि भजन जनी जनार्दन । नित्य हें वचन रामनाम ॥१॥
खुंटतील योनी तुटेल यातना । भक्ति नारायणा पावेल तुझी ॥२॥
स्मरे सदा कांरे न लगती पाल्हाळ । वसिजे गोपाळ सर्वांभूतीं ॥३॥
नामा म्हणे ब्रह्म सर्व हरि । येकु चराचरीं जनार्दन ॥४॥

१२४
सर्वांभूतीं भजन हेंचि पैं चोखडें । ब्रह्म माजीवडे करोनि घेई ॥१॥
सफळ सर्वदा जप हा गोविंदा । न पावाल आपदा नाना योनी ॥२॥
नाम संजीवनी अमृत सरिता । परिपूर्ण भरिता सिंधु ऐसा ॥३॥
नामा म्हणे चोखडें नाम हेंचि गाढें । चुकवील कोडें जन्ममरण ॥४॥

१२५
निसुगा निदसुरा झणीं तूं बा होसी । नाम ह्रषिकेशी घालीं मुखीं ॥१॥
गोविंद हरे कृष्ण विष्णु हरे । अच्युत मुरारे जनार्दन ॥२॥
करितां नामपाठ चुकती भवचाळ । तुटेल तें जाळें मायामोह ॥३॥
नामा म्हणे ऐसा उपाव सुगम । दिननिशीं नेम राम म्हणे ॥४॥

१२६
केशवाचे प्रतापें गोसावी होसी । दास्यत्व करोनि सर्वस्व पोशी ॥१॥
अर्जुनाचा सारथी बळीचा सांगाती । द्रौपदीच्या आकांतीं धांवोनि पावे ॥२॥
चातका जलधरु मच्छा जीवन नीरु । प्रल्हादा कैवारु दास म्हणोनी ॥३॥
नामा म्हणे तुम्ही न करा आळसु । नाम मंत्र दिवसु अभ्यासिजे ॥४॥

१२७
कां करितोसि शीण वाचे नारायण । जपतां समाधान होईल तुज ॥१॥
रामकृष्ण हरी गोविंद गोविंद । वाचेसी हा छंद नामपाठ ॥२॥
वंदितील यम कळिकाळ सर्वदा । न पवसी आपदा असताम देहीं ॥३॥
नामा म्हणे वोळगे सीण जाला सांगें । प्रपंच वाउगें टाकी परतें ॥४॥

१२८
पांडुरंगें प्राप्त होईल सकळ । चरणकमळ ध्यारे मनीं ॥१॥
मनीं मानसिक न करावा कधीं । नाम घ्यारे आधीं केशवाचें ॥२॥
केशवाचें नाम पावन पवित्र । महाभाष्यसूत्र हेंचि सांगे ॥३॥
नामा म्हणे तुम्हीं करावें कीर्तन । पंढरीचें ध्यान चुकों नका ॥४॥

१२९
केशव नारायण हा जप आमुचा । सर्व हा मंत्राचा आत्माराम ॥१॥
माधव गोविंद सर्वशास्त्रीम आहे । उभारुनियां बाहे वेदु सांगे ॥२॥
नामाचेनि पाठें तरुं हा भवसागरु । आणिक विचारु नेणों आम्ही ॥३॥
विष्णू मधुसूदन हें दैवत आमुचें । नित्य पैं नामाचें सार आम्हां ॥४॥
त्रिविक्रम वामन सर्व ब्रह्मांडनायकु । हाचि जप सम्युक आम्हां घटीं ॥५॥
श्रीधर ह्रषिकेष मंत्रराज जपा । पावाल स्वरुपा विष्णुचिया ॥६॥
पद्मनाभ दामोदर हा नामाचा विस्तार । करितां विचार तरले जीव ॥७॥
संकर्षण वासुदेव पंढरीचा राणा । सांगितल्या खुणा खेचररार्ये ॥८॥
प्रद्युम्न अनिरुद्ध दैवत कुळीचें । पुंडलिक तयाचें तपसार ॥९॥
पुरुषोत्तम अधोक्षज वैकुंठ निर्मळ । जपतां सकळ पापें जाती ॥१०॥
नरसिंह अच्युत नामाचें कवच । जपतां होय वेंच संसारासी ॥११॥
जनार्दन उपेंद्र नाम हें अमृत । शंकर निवांत जपे सदा ॥१२॥
हरी कृष्ण विष्णू सर्व घटी नांदें । तोचि पैं आल्हाद उच्चारजेसु ॥१३॥
ऐसा नाम महिमा उपदेश गोमटा । नामेंचि वैकुंठा भक्त गेले ॥१४॥
नामा म्हणे ते मूर्ति पंढरिये गोमटी । नामें उठाउठी भेटी देसी ॥१५॥

१३०
माया पुरातनु तूंचि वो जननी । नाम संजीवनी विठठल वो ॥१॥
तेंचि हें वोळलें पूर्ण प्रेम आम्हां । लोलंगित ब्रह्मा पंढरीये ॥२॥
धांव पाव वेगीं येई संभाळी तूं । नाम हा संकेतु पांडुरंगे ॥३॥
क्षुधा तृषा आशा तुजलागीं चिंतिती । जीवन हें मागुती नाम तुझें ॥४॥
अनंत अच्युत नाम हेंचि नित्य । तेणें कृतकृत्य प्राण माझा ॥५॥
नामा म्हणे देवा तूं जीवन आमुचें । आतां मज कैचें क्रियाकर्म ॥६॥

१३१
मायेचा कळवळा मायाची जाणे । तैसें मी तान्हें माऊलिये ॥१॥
विठठल श्रीरंग डोळस प्रसन्न । नित्य अमृतघन वोळला सदा ॥२॥
जननी जनक तूंचि वो मुकुंद । नाम हें गोविंद शुद्धरसु ॥३॥
येई वो केशवे नित्य नामरुपें । मी तुज आलापें आळवित ॥४॥
माधवा श्रीधरा वेगीम येई त्वरें । मज वो नावरे प्रेमवेधु ॥५॥
नामा म्हणे तूं जीवन आमुचें । नित्य केशवाचें प्रेम मज ॥६॥

१३२
केशवासी पाहे केशवासी ध्याये । केशवासी गाये सर्वकाळ ॥१॥
केशव पैं हाचि वृत्तीसहित मन । केशववासी ध्यान सर्वकाळ ॥२॥
सबाह्यअंतरीं सांडिना कोणासी । जाणों अंतरासी साक्ष भूत ॥३॥
नामा म्हणे तुम्हीं केशव होऊनि । पंढरीं पाटणीं नांद बापा ॥४॥

१३३
वेदाचें महिमान जनीं जनार्दन । आणिक वचन तेथें नाहीं ॥१॥
भूतीं दया धरा भक्तिभाव करा । हरिहरां वेद सांगे ॥२॥
सर्व हेंचि सार ब्रह्ममय खरें । आणिक दुसरें न दिसे आम्हां ॥३॥
नामा म्हणे समर्थ वेद तो आमुचा । सांगे नित्य जपा रामकृष्ण ॥४॥

१३४
साधन साधितां होताती आपदा । म्हणोनि गोविंदा स्मरे कां रे ॥१॥
कृष्णकथा सार सांगे कां सधर । तुटेल येरझार जन्ममरणा ॥२॥
निष्फळ निखळ भावीं तूं सफळ । भजन केवळ सर्वांभूतीं ॥३॥
नामा म्हणे भक्ति होईल विरक्ति । तुटेल यातायाती जन्ममरण ॥४॥

१३५
भवसिंधुचा पार तरे तो पोहणार । बळिया परम धीर भजनशील ॥१॥
नामची सांगडी लावूनि कासे । दृढ प्रेमरस वोसंडती ॥२॥
सत्वाचा सुभट असंग एकट । वैराग्य उद्‌भट निर्वासन ॥३॥
कामक्रोध जेणें घातले तोडरीं । निर्दाळिले वैरी लोभदंभ ॥४॥
रजतमाचे जेणें तोडिले अंकुर । केला अहंकार देशधडी ॥५॥
नामा म्हणे जया नामी अनुसंधान । तोचि परम धन्य त्रिभुवनीं ॥६॥

१३६
भवसिंधुचा पार तरावयालागीं । साधन कलियुगीं आणिक नाहीं ॥१॥
अहनिंशीं नाम जपा श्रीरामाचें । सकळ धर्माचे मुगुटमणी ॥२॥
न चले वर्णाश्रम धर्म आचरण । न घडे व्रत दान तप कोणा ॥३॥
नव्हे तीर्थाटन पुराण श्रवण । नव्हे ब्रह्मज्ञान शास्त्रबोध ॥४॥
नव्हे ध्यान स्थिती भावेंविण वोजा । न घडे देवपूजा एकनिष्ठ ॥५॥
नामा म्हणे नाम राघोबाचें गातां । ब्रह्म सायोज्यता घर रिघे ॥६॥

१३७
तुटे मायाजाळ विघडे भवसिंधू । जरी लागे छंदू हरिनामाचा ॥१॥
येर कर्मधर्म करितां या कलीं । माजी कोण बळी तरला सांगा ॥२॥
न पढवे वेद नव्हे शास्त्रबोध । नामाचे प्रबंध पाठ करा ॥३॥
नव्हे अनुष्ठान न कळे ब्रह्मज्ञान । करावी सोपान कृष्णकथा ॥४॥
न साधे हा योग न करवे वैराग्य । साधा भक्ति भाग्य संतसंगें ॥५॥
नामा म्हणे साधन न लगे आणिक । दिधली मज भाक पांडुरंगें ॥६॥

१३८
पंढरीचा राजा उभा भक्तकाजा । उभारुनि भुजा वाट पाहे ॥१॥
घ्यारे नाम सुखें प्रेमें अलौकिक । साधनें आणिक करुं नका ॥२॥
मनाचेनि मनें ह्रदयीं मज धरा । वाचेनें उच्चारा नाम माझें ॥३॥
बोलोनियां ऐसा उभा भीमातीरीं । नामा निरंतरी चरनापाशीं ॥४॥

१३९
हरिहर ब्रह्मा इंद्रादिक देव । इच्छिताती सर्व पायधुळी ॥१॥
यांवरी गोपाळ आनंदें नाचती । भूषणें श्रीपती शोभायमान ॥२॥
पाहोनियां सुख आले सर्व देव । पंढरीचा राव पाहावया ॥३॥
नामा म्हणे मिषें गोपाळकाल्याचे । निरंतर वाचे घेत नाम ॥४॥

१४०
वदनीं तुझें नाम अमृत संजीवनी । असतां चक्रपाणि भय कवण ॥१॥
या जन्ममरणाची कायसी मग चिंता । तुझिया शरणागता पंढरीनाथा ॥२॥
ह्रदयीं तुझें रुप बिंबलें साचार । तेथें कवण पार संसाराचा ॥३॥
नामा म्हणे तुझें नाम वेळोवेळ । म्हणतां कळिकाळ पायां पडे ॥४॥

१४१
नाहीं भक्ती नामीं चांडाळ पातकी । तोचि जाणावा लोकीं दुष्ट नष्ट ॥१॥
प्रपंचीं कर्दमीं गढोनियां ठेले । न निघती बोले संताचिया ॥२॥
काढितां त्या वाटे प्रपंचाचें दुःख । विषयाचें सुख हर्ष बहु ॥३॥
पुत्र वित्त कांता मानी भरंवसा । पडे मोह फांसा जन्मवरी ॥४॥
नामदेव म्हणे अंतीं आहे कोण । कळा नामाविण नानापरी ॥५॥

१४२
नाम हं अमृत भक्तांसी लाधलें । आपण घेतलें बौध्यरुप ॥१॥
नाम हें आळवा नाम हें आळवा । होईल दोहावा कामधेनु ॥२॥
न बाधेल विघ्न प्रपंच हें भान । नाम हेंचि खूण वैकुंठींची ॥३॥
नामा म्हणे जीव ब्रह्म असे सर्व । हा गीतेमाजीं भाव सांगितला ॥४॥

१४३
आलिया संसारीं आत्माराम मुखीं । घेतलिया सुखी त्रिभुवनीं ॥१॥
जपोनियां नाम आपुलेंचि आधीं । मग सोहंसिद्धि सर्व साधे ॥२॥
सर्व हरी मग नाहीं दुजा भाव । प्रापंचिक गर्व दिसेचिना ॥३॥
नामदेव म्हणे सर्वही साधनें । भासे जन वन परब्रह्म ॥४॥

१४४
व्यापकं तें नाम तेव्हांच होईल । जेव्हां ओळखेल मीपणासी ॥१॥
आपुलेंचि नाम न ओळखिलें । व्यापक साधिलें जायेचिना ॥२॥
आपुलीच ओळख आपणासी पडे । मग सर्वत्र जोडे नाम तेव्हां ॥३॥
नामाविण नाम तेंचि होय विभ्रम । नामदेव म्हणे संताम पुसा ॥४॥

१४५
आसनीं शयनीं जपतां चक्रपाणि । लाविली निशाणी वैकुंठींची ॥१॥
नाहीं रे बंधन आम्हां हरिभक्तां । गीतीं गुण गातां राघोबाचि ॥२॥
भवसिंधूची जिवा जाली पायवाट । जे गर्जती उद्धट नामघोष ॥३॥
प्रेमें वोथरत हर्षे पिटूं टाळी । नाम ह्रदयकमळीं विठोबाचें ॥४॥
नाहीं काया क्लेश न करी सायास । दृढ धरी विश्वास हरीनामीं ॥५॥
नामा म्हणे साधन न लगे अनेक । दिली मज भाक पांडुरंगें ॥६॥

१४६
राम मंत्राचिया आवर्ती । घडती जयासी पुढतोपुढती ।
त्याचा जन्म धन्य ये क्षितीं । सर्व कुळाशीं तारक ॥१॥
राममंत्र आवडे जीवा । हाचि उद्धार सर्व जीवां ।
शिवासही विसावा । पार्वती सहित ॥२॥
रामकृष्ण उच्चारे । तरती जड पामरें ।
ऐसें हें व्यासें निर्धारेम । नानाग्रंथीं सांगितलें ॥३॥
नामा जपे नाम मंत्र । आणिक नेणे नाना शास्त्र ।
रामनामें नित्य वक्त्र । हरी रंगें रंगलें ॥४॥

१४७
विठोबाचे पाय जन्मोनि जोडावे । संबंधी तोडावे कामक्रोध ॥१॥
ऐक्य सुख घ्यावें एकविध भावें । प्रेम न संडावें आवडीचें ॥२॥
अनंत जन्मा यावें ऐसें भाग्य व्हावें । एक वेळाम जावें पंढरीसी ॥३॥
वृत्तिसहित मन पायींच ठेवावें । अद्वैत भोगावें प्रेमसुख ॥४॥
देहीं देहभाव प्रकृति दंडावें । सांडणें सांडावें ओवाळुनी ॥५॥
नामा म्हणे ऐसें घेतलें माझ्या जिवें । विठोबा पुरवावें आर्त माझें ॥६॥

१४८
तुझाचि अहंकार तुजचि नाडील। मागुता मांडील संसारु हा ॥१॥
सांडी सांडी मोहो विषय टवाळ । वाचेसी गोपाळ उच्चारी रे ॥२॥
सर्व हे भुररे मायेचें घरकुलें । अहंकारें नाथिलें नानायोनी ॥३॥
नामा म्हणे भजन हरीचें करीन । नित्य ते सेवीन चरनरज ॥४॥

१४९
देहधर्म विहित करी । द्वैतभाव चित्तीम न धरी ।
सर्वाभूती नमस्कारी । एक आत्मा म्हणोनियां ॥१॥
एक तत्त्व एक हरि । एकचि तो नमस्कारी ।
आदि अंतींचा नरहरि । सकळ कुळांसी तारील ॥२॥
पवित्र त्याचेंचि कुळ । आचार त्याचाचि सुशीळ ।
अखंड जपे सर्वकाळ । रामकृष्ण नरहरि ॥३॥
नामा जपे नाम मंत्र । अखंड हरि नाम सहस्त्र ।
हाचि आमुचा निज मंत्र । रामकृष्ण गोविंद ॥४॥

१५०
सुलभ सोपारें नाम केशवाचें । आठविताम वाचे दोष जाती ॥१॥
अनाथाचा सखा उभा नामापासीं । ऐसा तो प्रेमासी भुललासे ॥२॥
जातिवंत आम्ही वेदाचे पाठक । तरी सर्व फिकें नामाविण ॥३॥
नामा म्हणे नामीं रंगलों सतत । म्हणोनि अनंतें दिधली भेटी ॥४॥

१५१
सुलभ सोपारें नाम केशवाचें । आठविताम वाचे दोष जाती ॥१॥
अनाथाचा सखा उभा नामापासीं । ऐसा तो प्रेमासी भुललासे ॥२॥
जातिवंत आम्ही वेदाचे पाठक । तरी सर्व फिकें नामाविण ॥३॥
नामा म्हणे नामीं रंगलों सतत । म्हणोनि अनंतें दिधली भेटी ॥४॥

१५२
विसावा विश्वाचा जो प्राण जीवाचा । तोचि नित्य वाचा जपों आम्ही ॥१॥
गोविंद वामन भावयुक्त भजन । सर्व जनार्दन हाचि भाव ॥२॥
चैतन्य अचिंत्य नाम हेंचि सत्य । नित्यता कृतार्थ विठठलनामें ॥३॥
नामा म्हणे उद्धरण आणिक नाठवे । केशवचि सवें पुरे आम्हां ॥४॥

१५३
राम हेंचि स्नान राम हेंचि ध्यान । रामें घडे यज्ञ कोटी देखा ॥१॥
न लगती साधनें नाना मंत्र विवेक । रामनामीं सुख रंगीं कां रे ॥२॥
नामा म्हणे नाम हेंचि वचन आम्हां । नित्य ती पौर्णिमा सोळा कळी ॥३॥

१५४
शास्त्राचेम हें सार वेदाचें गव्हर । उतरावया पार आणिक नाहीं ॥१॥
विठठल विठठल म्हणा उघडा मंत्र जाणा । कळिकाळ अंकणा होईल तुम्हां ॥२॥
न करावें खंडन खंडन उच्चारण । तप अनुष्ठान न लगे तुम्हां ॥३॥
सिद्धीचे हें सार मुक्तीचें माहेर । उतरावया पार दुजें नाहीं ॥४॥
विठठलापरतें काय करीसी दैवत । परब्रह्म निरुतें पंढरीये ॥५॥
सिद्धीचें सहज भक्तीचे हें बीज । केशवीं दिलें मज म्हणे नामा ॥६॥

१५५
मुक्तिप्रद आहे एक विठ्ठल नाम । आतां क्रियाकर्म कवणालागीम ॥१॥
राहेम राहेम तूं मना निवांत । ध्याई अखंडित नारायणा ॥२॥
संतसमागम साधी हें साधन । पावसी निर्वाण नित्य सुख ॥३॥
नामा म्हणे भज श्रीगुरुच्या पायीं । तरी वर्म ठायीं पडेल जाण ॥४॥

१५६
करिताम हे वेदाध्ययन ज्योतिष । नामाचा तो लेश न ये हातां ॥१॥
बहुत व्युत्पत्ति सांगति पुराण । व्यर्थ तें स्मरण नाम नव्हे ॥२॥
अनंत हें नाम जयांतुनि आलें । त्यांतचि विरालें जळीं जळ ॥३॥
तें नाम सद्‌गुरुकृपेविण कोणा । साधिताम साधेना जपें तपें ॥४॥
नामदेव म्हणे स्वतःसिद्ध नाम । गुरुविण वर्म हाताम न ये ॥५॥

१५७
ज्ञान ध्यान जप तप साधन तें । नाम प्रत्ययातें न ये कोणा ॥१॥
गुरुपदीं जावें आधीं हो शरण । मी हें माझें ओळखुन घ्यावें नाम ॥२॥
तयाचें तें मूळ पाहोनियां त्यांते । मिळवावें द्वैत अद्वैतातें ॥३॥
द्वैत द्वतातीत स्वयंभ संचलें । तेंचि नाम आलें त्रिभुवनीं ॥४॥
नामदेव म्हणे परब्रह्म नाम । द्वैत क्रियाकर्म नाहीं तेथें ॥५॥

१५८
सद्‌गुरुवांचुनी नाम न ये हातां । साधन साधितां कोटी गुणें ॥१॥
जैसा कांतेविण करणें संसार । तैसा हा व्यापार साधनांचा ॥२॥
जंव सद्‌गुरु नाहीं केला भ्रतार । साधनाविचार व्यर्थ गेला ॥३॥
नामदेव म्हणे सद‌गुरुपासोनी । नाम घ्या जाणोनी नाना कांहीं ॥४॥

१५९
चंद्र्भागतीरीम उभा राहिलासी । भक्तांचे मानसीं भाव मात्र ॥१॥
काय पुंडलिकें केल्या तपरासी । जाणोनि मानसीं भावमात्रें ॥२॥
भावेंविण देवा सर्वथा नातुडे । नेणती बापुडे बद्धजन ॥३॥
नामा म्हणे माझें माहेर पंढरी । भेटती महाद्वारीं संतजन ॥४॥

१६०
देवाचे हे आत्मे जाणावे संत । त्यांचे पदीं रत सर्वभावें ॥१॥
श्रीहरीची भेटी सहजचि होय । श्रम लया जाय जाला आधीं ॥२॥
पापाचे पर्वत भस्म नामाग्नीनें । अभक्तासी हाण नामविण ॥३॥
नामदेव म्हणे नामाग्नीच्या पोटीं । नाना पाप कोटी दग्ध होती ॥४॥

१६१
अवघे ते दैवाचे विठठल म्हणती वाचे । अवघे कुळ त्यांचे पुण्यवंत ॥१॥
अवघेचि संसारीम जाणावे ते धन्य । ज्यांचे प्रेम पूर्ण पांडुरंगीं ॥२॥
अवघा विठठल भोतिती दिनरातीं । वोळगे किंकरवृत्ति नामा त्यांतें ॥३॥

१६२
म्हणे दीनबंधू तुम्ही सावध व्हावें । संतांशीं नमन नाम वाचें जपावेम ॥१॥
नामाविण साधन नाहीं या कलियुगी । व्यर्थ श्रम होती पाहतां मत्तें ॥२॥
मताभिमान करोनि तुम्ही जाल आड वाटां । अभिमानें ठकविले नारदादि श्रेष्ठा ॥३॥
आलिया जन्मास आतां न करी आळस । नामदेवालागीम सांगे जगन्निवास ॥४॥

१६३
सकळ संतजन देखोनि नयनीं । टाळिया पिटोनी गाता नाम ॥१॥
म्हणती धन्य भक्त निधडा वैष्णव । ब्रह्मादिकां माव न कळे याची ॥२॥
कैसा ऋणिया केला पंढरीनाथ । आहे सदोदित याचेजवळी ॥३॥
पूर्वी तो प्रल्हाद श्रवणीं ऐकिला । किंवा हा देखिला संतामधीं ॥४॥
नामा येऊनियां चरणासी लागला । ह्रदयीं आलिंगिला भक्तराज ॥५॥

“संत नामदेव गाथा नाममहिमा” एकूण १६३ अभंग समाप्त

“संत नामदेव गाथा” नाममहिमा 


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral