संत नामदेव

संत नामदेव गाथा गवळण

संत नामदेव गाथा गवळण अभंग १ ते ३४

१.
परब्रम्ह निष्काम तो हा गौळियां घरीं । वाक्या वाळे अंदु कृष्ण नवनीत चोरी ॥१॥
म्हणती गौळणी हरीचीं पाउलें धरा । रांगत रांगत येतो हरी हा राजमंदिरा ॥२॥
लपत छपत येतो हरी हा राजभुवनीं । नंदासी टाकूनि आपण बैसे सिंहासनीं ॥३॥
सांपडला देव्हारीं यासी बांधी दाव्यांनीं । शंख चक्र गदा पद्म शारंगपाणी ॥४॥
बहुता कष्टें बहुता पुण्यें जोडलें देवा । अनंत पवाडे तुमचे न कळती मावा ॥५॥
नामा म्हणे केशवा अहोजी तुम्ही दातारा । जन्मोजन्मीं द्यावी तुमची चरणसेवा ॥६॥

२.
गेलिया वृंदावना तेथें देखिला कान्हा । संवगडिया माजी उभा ध्यान लागलें मना ॥१॥
हरिनाम गोड झालें काय सांगों गे माय । गोपाळ वाहती पावे मन कोठें न राहे ॥२॥
त्याचें मुख साजिरें वो कुंडलें चित्त चोरें । सांडुनी अमृत धनी लुब्धलीं चकोरें ॥३॥
सांडुनी ध्रुवमंडळ आली नक्षत्रमाळा । कौस्तुभा तळवटीं वैजयंती शोभे गळां ॥४॥
सांडुनी मेघराजु कटिसूत्नीं तळपे विजू । भुलला चतुराननू तया नव्हे उमजू ॥५॥
सांडुनी लक्ष्मी निज गोपाळासी बोले गुज । अचोज हा चोजवेना ब्रम्हांदिकां सहज ॥६॥
वांजट धीट मोठी ऐसी कवण असे खिळू । भेदली हरिचरणीं पायीं मुरडीव वांकी सोज्वळू ॥७॥
त्याचें पायींची नेपुरें वाजती वो गंभीरें । लुब्धलीया पक्षयाती धेनु पाचारी स्वरें ॥८॥
आणिक एक नवल कैसें स्वर्गीं देव झाले पिसे । ब्रम्हादिक उच्छिष्ठालागीं देखा जळीं झाले मासें ॥९॥
आणिक एक नवल परी करीं घेऊनि शिदोरी । सवंगडया वांटितसे नामया स्वामी मुरारी ॥१०॥

३.
यशोदे घराकडे चाल मला जेवूं घाल ॥धु०॥
साध्या गव्हांची पोळी लाटीं । मला पुरण पोळी करून दे मोठी । नाहीं अडवीत गुळासाठीं । मला जेवूं घाल ॥१॥
तूप लावून भाकर करीं । वांगें भाजून भरीत करीं । वर कांद्याची कोशिंबिरी । मला जेवूं घाल ॥२॥
आईग खडे साखरेचे खडे । लवकर मला करून दे वडे । बाळ स्फुंदस्फुंदोनी रडे । मला जेवूं घाल ॥३॥
आई लहानच घे गे उंडा । लवकर भाजुन दे मांडा । लांब गेल्या गाईच्या झुंडा । मला जेवूं घाल ॥४॥
आई मी खाईन शिळा घांटा । दह्याचा करून दे मठ्ठा । नाहीं माझ्या अंगीं ताठा । मला जेवूं घाल ॥५॥
भाकर बरीच गोड झाली । भक्षुनी भूक हारपली । यशोदेनें कृपा केली । मला जेवूं घाल ॥६॥
आई मी तुझा एकुलता एक । गाई राखितों नउ लाख । गाई राखून झिजलीं नख । मला जेवूं घाल ॥७॥
नामा विनवी केशवासी । गाई राखितो वनासी । जाऊन सांगा यशोदेशी । मला जेवूं घाल ॥८॥

४.
तळवे तळहात टेंकीत । डाव्या गुडघ्यानें रांगत । रंगणी रंगनाथ । तो म्यां देखिला सये ॥१॥
गवळण जसवंती पैसांगे । आलेवर कृष्णाचेनि मागें ।
येणें येणें वो श्रीरंगें । नवनीत माझें भक्षिलें ॥२॥
एक्या हातीं लोण्याचा कवळु । मुख माखिलें अळुमाळु ।
चुंबन देतां येतो परिमळु । नवनीताचा ये सये ॥३॥
येणें माझें कवाड उघडिलें । येणें शिंकें हो तोडिलें ।
दह्यादुधातें भक्षिलें । उलंडिलें ताकातें ॥४॥
ऐसें जरी मी जाणतें । यमुनापाणिया नव जातें ।
धरूनि खांबासी बांधितें । शिक्षा लावितें गोविंदा ॥५॥
ऐसा पुराण प्रसिद्ध चोर । केशव नाम्याचा दातार ।
पंढरपुरीं उभा विटेवर । भक्त पुंडलिकासाठीं ॥६॥

५.
जाऊं पाण्या निसुरवाण्या । आळवीती गोड राण्या ॥ध्रु०॥
गोविंद गीतीं गाऊं गोविंद गीतीं गाऊं । आनंदें जाऊं पाण्या ॥१॥
खाऊं कंदमुळें आम्ही असों वनीं । न देखों श्रीकृष्ण न ऐकों कानीं ॥२॥
आम्ही गोड भिल्लिणी काय ऐसी बोली । तुझिया नामाची लागली आवडी ॥३॥
आजीचा दिवस आम्हां झालासे आनंदु । विष्णुदास नामा यानें लावियेला छंदु ॥४॥

६.
येत येत उभा राजबिदीं । सर्वें चाले गोपाळांची मांदी । नारी पाहती उभया बिदीं । एकीच्या धरूनि बाहुवा खांदीं ॥१॥
हरिहरनंदना साद्दश्य लोचना । डोळ्यां वेगळा न बा जासी कान्हा ।
अरे कान्हा मनमोहना । गोपी भुलल्या तुझिया गुणा ॥ध्रु०॥
चतुर्वेद नागवी भाट सांगातें । उभया वर्णितां रामकृष्णातें ।
श्रुति स्मृति विद्यावंतें । जय जय म्हणती कृपानिधितें ॥२॥
येत येत उभा रहात । सुदाम्याच्या खांद्यावरी हात ।
समद्दष्टी गोपिका न्याहाळीत । चैतन्य चोरोनि आनंदें डुल्लत ॥३॥
ऐसा कृष्ण सौभाग्यसुंदर । लावण्य गुण रत्नाकर ।
विष्णुदास नामयाचा दातार । भक्ति भावें वोळंगा सारंगधर ॥४॥

७.
जाये जाये जाये परतोनी पाहे । लाजावला जीव पर न लगे सोय गे माय ॥१॥
नावेक विठ्ठल पाहूं द्या साजणी । न पुरे गे धणी डोळियांची ॥२॥
देखिला गे माय लावण्यसागर । नामया दातार केशिराज ॥३॥

८.
मल्हार महुडें गगनीं दाटलें । विजु खळें गर्जिन्नलें गे माय ॥१॥
गोविंद पाहाया लौकरी । कैसे वरुषताहे मधु धारी ये माया ॥२॥
आनंदें मयूरें नाचती आपैसे । प्रेमे निळकंठ झाले ते कैसे ॥३॥
नामया स्वामी द्दष्टी सोज्वळ । जीव लागला गोपाळेगे माय ॥४॥

९.
ध्यान सांवळें गोकुळींचें । धांव पाव वेगीं हरी सांवळिया ॥ध्रु०॥
सांवळीसी आंगीं उटी । सांवळी कस्तुरी लल्लाटीं ।
सांवळीसी कांसे कासियला कटीं । गोवळिया ॥१॥
सांवळीसी तनु वरवी । सांवळें वृंदावन मिरवी ।
सांवळ्याशा तुळसी कानीं । मंजुरिया कोंवळिया ॥२॥
संवळीसी कंठीं माळा । सांवळें ह्रदयीं पदक विशाळा ।
सांवळ्याशा गोपी केल्या ओंवळ्या । गोंवळिया ॥३॥
सांवाळिसी हातीं काठी । सांवळासा कांबळा पाठीं ।
नामयाचा स्वामी गायी राखी । धवळ्या आणि पिंवळ्या ॥४॥

१०.
कोकिळे चित्कळा रत्नाची ते कीळा । मान ईं सोज्वळा वर्णूं हरीचा ॥१॥
वृंदावनीं वेणू वाजे रुणुझुणू । वेध तनुमनु गोपाळांचा ॥२॥
देहुडा पाउलीं हरि गोपाळा गोजिरीं । वाहाती ते लालोरी हरी छंदें ॥३॥
वेधलीं वनचरें गोधनें अपारें । पक्षीकुळें साचारें तल्लिन झालीं ॥४॥
यमुनेचें उदक जळचरें सम्यक । पाताळीं पन्नग एको ठेली ॥५॥
ऐसे कृष्ण वेधें तल्लिन झाले बोधें । नामा म्हणे वेणूछंदें स्थिर झाली ॥६॥

२१.
लांचावलें ब्रह्म भक्तीचेनि सुखें । गोकुळीं गोपाळवेशें गाई राखे ॥१॥
त्रिभुवनीं न समाये ब्रम्हादिकां लक्षा नये । तो दास्यत्व करिताह गौळीयांचें ॥२॥
नवलाव गे माये देखियला । साजिरा । परब्रम्हा जालेंसे पिसें गे माये ॥४॥
निगमा निर्धारितां अमरा दर्शनाची आस । मुनिजनां ध्यानीं आभास तोही नाहीं ॥५॥
तें हें नित्य पूर्ण लाडेंकोडें खेळविती  गौळणी । मा मुख चुंबन देउनी गौळणी ह्रदयीं आलिंगिती ॥६॥
क्षीरसागरींचें सुख सांडुनी अशेष । रुक्मिणी सेजेचे विलास तेहि नावडती ॥७॥
तें हें गोधना गोठणीं लोळे शुद्ध चैतन्य सांवळें । तें सुखही न कळे साचें चतुरानना ॥८॥
भक्ती प्रेम भाव देखे आहे जेथें । हरि वोरसला जाये तेथें कैचें नैश्वरत्व ॥९॥
न विचारी जातीकूळ शुची अथवा चांडाळ । ह्रदय देखुनि निर्मळ प्रीति धरी तेथें ॥१०॥
ऐसें त्रिभुवन सुखाचें सार कीं अनाथाचें माहेर । अव्यक्त परि साकार जालें असे तें ॥११॥
भक्ताचेनि वियोगें श्रमलें म्हणोनि गोकुळासी आलें । तेणें प्रेम सुख दिधलें नामयासी ॥१२॥

२२.
बाळ सगुण गुणाचें तान्हें गे । बाळ दिसतें गोजिरवाणें गे । काय सांगतां गार्‍हाणें गे । गोकुळींच्या नारी ॥१॥
श्रीरंग माझा वेडा गे । याला नाहीं दुसरा जोडा गे ।
तुम्ही याची संगत सोडा गे । गोकुळींच्या नारी ॥२॥
पांच वर्षाचें माम्हेंफ़ बाळ गे । अंगणीं माझ्या खेळे गे ।
कां लटकाच घेतां आळ गे । गोकुळीच्या नारी ॥३॥
सांवळागे चिमणा माझा । गवळणींत खेळे राजा ।
तुम्ही मोठया ढालगजा गे । गोकुळींच्या नारी ॥४॥
तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा । आळ घेतां या गोपाळा गे ।
तुम्ही ठाईंच्या वोढाळागे । गोकुळींच्या नारी ॥५॥
तुम्हीं लपवुनी याची गोटी गे । लागतां गे याचे पाठीं गे ।
ही एकढीच रीत खोटीगे । गोकुळींच्या नारी ॥६॥
तुम्ही लपवून याचा भवरा गे । धरूं पाहतां सारंगधरा ।
तुम्ही बारा घरच्या बारागे । गोकुळींच्या नारी ॥७॥
हा ब्रम्हाविधीचा जनीता गे । तुम्हीं याला धरूं पाहतांगे ।
हा कैसा येईल हातां गे । गोकुळींच्या नारी ॥८॥
नामा म्हणे यशोदेसी गे । हा तुझा ह्रषिकेशी गे ।
किती छळितो आम्हासी गे । गोकुळींच्या नारी ॥९॥

२३.
वारीं वो दशवंती आपुला तूं बाळ । विकटू हा खेळ खेळतसे ॥१॥
धाकुटिया मुलां घेतो हा चिमोरे । काय करुं धुरे भीत असों ॥२॥
घरींचा म्हातारा हाणितला येणें । काय सांगूं उणें तुजपाशीं ॥३॥
मी वो लटिकी तरी नामयासी पुसा । तुझा बाळू कैसा आसंदत ॥४॥

२४.
कान्हां तूं आजि कां झालासि बैमान ॥ध्रु०॥
तूं तो आमुची गडी । म्हणोनि मी केली खोडी । घालूं हुंबर यमुनेची मोडूं मान ॥१॥
होसी तूं आमुचा बळी । म्हणोनि म्यां केली कळी । तेथें कशाचा काय गुमान ॥२॥
जरी तूं होसी सखा । होऊंदे जाला वाखा । चल रूपवती घरीं घेऊं मान ॥३॥
समजूनियां देव । येक नामा नामदेव । जाले ते हरपले या द्वैत भान ॥४॥

२५.
हरी तुझी ऐसी कैसी हे खोड ॥ध्रु०॥
घेउनी चिमुटे मुळसी पळसी । गोपी तुज म्हणती हा दोड ॥१॥
सोडूनी वांसरें गाईसी पाजिसी । यांत तुज काय मिळती जोड ॥२॥
आडवा होउनी गोपीसी धरिसी । चुंबितां वदन मज म्हणसी सोड ॥३॥
अशा ह्या चेष्टा नाम्यासी करिसी । हरी तुझी ऐसी कैशी हे खोड ॥४॥

२६.
सोडीं कान्हा रवि दोर मथित्या देतें । बया मज तें दे आई मज तें दे डेरां घुमघुमतें ॥१॥
यशोदा उचलोनी कडे त्यासी घेउनी । दाविती चित्रशाळेतें ॥२॥
करीं कर धरुनी नेउनी अंगणीं । दावी कुप बावीतें ॥३॥
दावीत आरशांत । म्हणे पाहे कृष्णनाथ । मुखमुखा चुंबितें ॥४॥
चिमण्या ह्या गौळनी । आल्य अत्याहो मिळोनी । राधे उरीं मज तें दे ॥५॥
राधेसी म्हणे नामा । कृष्णासी तुझा प्रेमा । समजावियासी तें दे ॥६॥

२७.
भला तूं हरी कळलासी रडीवाला ॥धृ०॥
विधीचें अक्षर खरें हें असतां । अजासुताचे कां जाले हाल ॥१॥
पाराशरसुत वरचढ जाला । म्हणून कां त्वां फुगविले गाल ॥२॥
बळीनें तुज पाहे खरीद केलें । खर्चून तो धनमाल ॥३॥
नामा मनीं निर्भय गुरुवर कृपे । तुजलागीं देतो हे प्रतिख्याल ॥४॥

२८.
चिदानंद दोंदिल बाळ डोळस । कृष्ण खेळवीत निवे मानस ॥१॥
सये आन कांहीं या जीवा नावडे । चित्त गुंतलें तया सुखी न निवडे ॥२॥
देहा गेहा आठव नाहीं सर्वथा । स्थिति बाणली सहज रूप पाहतां ॥३॥
तेज सांवळें द्दष्टींत कोंदलें । तेणें प्रकाशें सबाह्य मन माझें वेधलें ॥४॥
वृत्तिसहित इंद्रियें परतलीं । कृष्णरूपीं मिळोनियां गेलीं ॥५॥
नामया स्वामी आदि परंपरा । आवडता आहे तो माझा सोयरा ॥६॥

२९.
चिदानंद दोंदिल बाळ सांवळें । कृष्ण पाहतां नयनीं मन मावळे ॥१॥
तें सुख कवणें वाचें बोलिजे । चित्त चैतन्य समरसें भोगीजे ॥२॥
परा परतली पश्यंति तन्मया । मध्यमा वैखरी पावली हो लया ॥३॥
आलिंगना लागुनी बाम्हा स्फुरती । देह न दिसे पाहतां कृष्णमूर्ति ॥४॥
तेथें आर्तीचा आनंदू गोठला । तो हा कृष्णरूपें अंकूर उठिला ॥५॥
नामया स्वामी सबाह्याभ्यंतरीं । गेले रसरंग गोकुळाभीतरीं ॥६॥

३०.
चिदानंद चिद्रूप चित्त चिन्मय । बाळ यशोदेचें आनंद अद्वय ॥१॥
सत्य अभिनव सुख याच्या दर्शनीं । मिठी पडली पाहतां रूप नययीं ॥२॥
द्दष्टीया डोळिया आड रिघोनी । तनु मनासी केली भुलवणी ॥३॥
आंत बाहेरी निज सुख वावरे । नित्य नूतन जीववूनी विसरे ॥४॥
आपरूपीं रूप सकळां केलें । गोपी गोपाळां धेनु वत्सां भुलविलें ॥५॥
नामया स्वामी आनंद उदधि । माजी बुडोनियां नेली देहबुद्धि ॥६॥

३१.
चिदानंदघन चिन्मय बाळकृष्ण । खेळवितां मन होय उन्मन ॥१॥
सुख अनुभवी अनुवाद खुंटला । विश्वंभरीं तोचि अनुवाद गोठला ॥२॥
दुजें न दिसे उपमेसी द्यावया । मन न मिळे आन सुख घ्यावया ॥३॥
ज्ञाता हेंचि अद्वय । ध्याता ध्यान ध्येय हेंचि निरामय ॥४॥
जन्मोजन्मींचें पुण्य संचित । झालें गौळियांचें काय मुर्तिंमंत ॥५॥
नामया स्वामीची अनुपम्य आवडी चित्तें दिधली प्रेमरसी ॥६॥

३२.
गोपाळाशीं खेळती । आनंदें डोलती । कृष्ण आमुचा सांगाती । डो डो डो डो डो ॥१॥
कान्होबाची संगती । ब्रम्हादिक इच्छिती । धन्य आम्हां म्हणविती । अ ल ल ल ल ॥२॥
कृष्णाप्रती गोपाळ । म्हणताती सकळ । अकळशी नाकळ । हा त त त त ॥३॥
मामा मारूं गेलासी । आपटिलें गजाशी । मल्लयुद्ध खेळलासी । हु तु तु तु तु ॥४॥
अजगर मारिला । वडवानळ गिळिला । गोवर्धन उचलिला । अ ब ब ब ब ॥५॥
पूतनेसी शोषिलें । नारदासी । मोहिलें । गाणिकेसी उद्धरिलें । अ रे रे रे रे ॥६॥
गौळियांचे घरां जाशीं । दहीं दुध लोणी खाशी । त्यांच्या सुना भोगिसी । छि छी छी छी छी ॥७॥
सोळा सह्स्र भोगिशी । ब्रम्हचारी म्हणविशी । लटिकेंचि ठकविशी । कु लु लु लु लु ॥८॥
सोडूनियां मीपण । आम्हां घाली लोटंगण । परब्रम्हा नारायण । आ हा हा हा हा ॥९॥
ऐसे तुझे पवाडे । वर्णिताती वाडेंकोडं । विष्णुदास नामा म्हणे । यु यु यु यु यु यु ॥१०॥

३३.
प्रात:काळीं प्रहार रात्रीं गोणी बाळा । घुसळण मांडियेलें घरोघरीं सकळां । नित्यानंदें परमानंदें गाती गोपाळा । सह्स्रापरी कैशा गाती मदन सांवळा ॥१॥
घुम घुम करिती घुम घुम करिती डेरे घुमती । आनंदल्या गौळणी छंदें छंदें डोलती ॥ध्रु०॥
एक म्हणती साजणी तुम्हीं लपवागे लोणी । नकळे हो बाई कृष्णाची करणी ।
कोणीकडून हा गे येईल सखये चक्रपाणी । खास खांदूनि तुम्हीं आतां लपवा दुधाणी ॥२॥
बोलतां चालतां इतुक्यामध्यें हरी आला । कवणेंहीं नाहीं देव द्दष्टि देखिला ।
सूक्ष्म रूप धरूनि डेर्‍यामध्यें प्रवेशला । वरच्यावरी देव  लोणी खाऊनियां गेला ॥३॥
उन्हवणी शिळवणी घालिती परतें लोणी येईना । काय झालें ढोणे सासूबाई कळेना ॥४॥
हा हा गे बायांनो तुमचे जाणतें चाळे । यश्वदेच्या मुला नेऊनि देतसां गोळे ।
उगोंचि मग पाहतां आतां फिरगे निराळे । मारी ठोसरे दोन्ही गाल्होरे घेतले ॥५॥
डेर्‍यामधून मार माझा जगजीवन पाहे । नामा म्हणे धन्य धन्य वर्णूं मी काये ॥६॥

३४.
मस्तकीं ठेवुनियां डेरा । करूं निघाली विकरा । साच करितसे पुकारा । म्हणे गोविंद घ्या वो ॥१॥
बोल बोलती आबळा । तंव त्या हांसती सकळा । मुखीं पडियेला चाळा । या गोपाळाचा ॥२॥
दहीं म्हणावासे ठेले । वाचे गोविंद पैं आलें । चित्त चैतन्य रंगलें । कान्हु चरणीं बाई वो ॥३॥
उन्नतीये बोलती नेती । चालता गज गती । कान्हु वांचुनी चित्तीं । आणीक नेणें बाई वो ॥४॥
जाऊनियां बळीच्या द्वारां । त्रिपांड केली वसुंधरा । कैसा सावाला तुमच्या डेरा । दाखवी बाई वो ॥५॥
वृद्ध गौळणी पाचारिती । आणी वो अरुता श्रीपती । कोठें गोविंदु विकिती । नाहीं देखियला बाई वो ॥६॥
श्रीरंगी रंगला जीवु । म्हणे घ्यावो हा माधवु । बरवा रमापती गौरवु । साच आणियला कैसा ॥७॥
बाळा भरूनियां बाळा । देखे श्रीरंगु साव्ळा । बेधीं वेधल्या सकळां । गोपी गोविंदासवें ॥८॥
गोविंद म्हणा वाचे । गोविंद स्मरण करा साचे । दोष हरती जन्माचे । छंद लागला तयाचा ॥९॥
नामया स्वामी हो मुरारी । मज पाहतां अभ्यंतरी. । शेकी वापिलें निर्धारीं । मनुष्य्पण ॥१०॥

“संत नामदेव गाथा” गवळण एकूण ३४ अभंग समाप्त 

“संत नामदेव गाथा गवळण”

। “संत नामदेव गाथा गवळण” ।

।। “संत नामदेव गाथा गवळण” ।


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral

संत नामदेव गाथा गवळण

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *