संत नामदेव

संत नामदेव गाथा ध्रुवचरित्र

संत नामदेव गाथा ध्रुवचरित्र अभंग १ ते ३३

१.
राजयासी सर्व वृत्तांत ठाउका । असोनी बाळका पाही नातो ॥१॥
कामीक जगासी कामचि आवडे । स्त्रीमोहानें वेडे झाले बहु ॥२॥
रावणानें वेदां ऋचा पदें केलीं । सीतेलागीं आली भ्रांती कैसी ॥३॥
पाराशरा ऐसा दासीसी शमन । हें नव्हे बोलणें आश्चर्याचें ॥४॥
विश्वामित्र झाला रंभेपाठीं श्वान । सांडोनि अभिमान तपाचाही ॥५॥
नामा म्हणे कोण तयासी टाळील । प्रारब्ध करील तेंचि खरें ॥६॥

२.
पतीव्रता मोठी सुमती सुंदरी । वाचेनें उच्चारी गुणदोष ॥१॥
संचित क्रियमाण वाहोनियां सकळ । प्रारब्ध केवळ सारीतसे ॥२॥
गातें हरिनाम अखंड अंतरीं । प्राणेश्वरावरी भाव निका ॥३॥
बाळकाची कळा ठाउकी तियेसी । जीवें प्राण पोसी निरंतरा ॥४॥
नामा म्हणे काळ कल्याणाचा तिला । म्हणोनी जाहला हरिभक्त ॥५॥

३.
लागलें वरुष पांचवें बाळासी ।  खेळे तो मुलांसी नेटेंपाटें ॥१॥
पाहाती ते लोक विस्मय पावती । त्याची अंगकांती कोण वाणी ॥२॥
चंद्रा ऐसें मुख पंकजलोचन । धैर्यासी मंडण तोचि एक ॥३॥
सांवळा सुकुमार उंद्धर गोजिरा । बुद्धीचा अंतरा बोधवीत ॥४॥
वीर्यधैर्य पाइक जयाचा । नामा म्हणे वाचा वर्णवेना ॥५॥

४.
मातेलागीं पुसे पिता माझा कोण । ते म्हणे वचन ऐक बाळा ॥१॥
क्षिराब्धीपासोनी चंद्रमा कां जैसा । होसी तूंहि तैसा राजपुत्र ॥२॥
तरी कां आम्हां त्यानें टाकीलें निवडोन । संचित ते म्हणे पूर्वकर्म ॥३॥
जाऊं भेटूं त्याला बोलवूं कां मागें । नको बा तुज काय उणें असे ॥४॥
नामा म्हणे ऐसा दोघांचा संवाद । झाला मनीं खेद सुमतीसी ॥५॥

५.
कोणे एके दिवशीं खेळत खेळत । गेला सभेआंत राजयाच्या ॥१॥
पाहिलें राजानें ओळखिला पुत्न । झळंबलें गात्र आवडीनें ॥२॥
गोजिरा गोमटा शाहाणा चपळ । नेत्न ते विशाळ पुंजाळले ॥३॥
नामा म्हणे चंद्र पूर्णमेचा पाहातों । समुद्रा ये भरतें तैसें झालें ॥४॥

६.
पाचारिलें ध्रुवाजवळी त्या रायानें । जाणोनी सन्मानें आला पाशीं ॥१॥
संतोष तो कांहीं बोलवेना वाचे । उदार प्रेमाचें झळंबती ॥२॥
अंकीं बैसवितां कैसा तो शोभला । कोंदण रत्नाला जयापरी ॥३॥
चुंबोनियां मुख पुसतो मंजूळ । मी कोण तें न कळे तुज कांहीं ॥४॥
तो म्हणे आहेसी तात तूं निष्ठुर । आम्हांसी बाहेर ठेवियेलें ॥५॥
राजा म्हणे काय जाहालें तयासी । होसी तूं राज्यासी अधिकारी ॥६॥
नाम म्हणे ऐसा दोघांचा उद्नार । लोटों आला पूर आनंदाचा ॥७॥

७.
सापत्न माउली होती वोंवरींत । ऐकीला भावार्थ दोघांचाहि ॥१॥
बुद्धीचा कांतर बुब्दुदला मोठा चावीतसे ओंठा खेद बहु ॥२॥
निघुनी ते वेगीं आली रायापाशीं । म्हणे या पोरासी कां घेतलें ॥३॥
मांडी बैसवीसी लाडानें बोलवीसी । पाहूं आतां कैसी लोचनीं मीं ॥४॥
शरीर त्यागावें कीं त्यासी मारावें । हेंचि जीवें भावें वाटे मना ॥५॥
मागेंपुढें कांहीं न पाहे द्दष्टीस । लोटिलें बाळक पायें तिनें ॥६॥
नामा म्हणे राजा तियेचा अंकिला । झाला चाकाटला आपुल्या ठायीं ॥७॥

८.
बाईल आधीन होती जे कां नर । ते म्हणों पामर श्वानरूपें ॥१॥
नेणती स्वहित कामाचिया वृत्ती । प्रवृत्ति निवृत्ति सोडोनियां ॥२॥
इष्ट मित्र गुरु ऐसा कैसा भाव । सर्वही निर्वाह तेचि एका ॥३॥
नाचविले तिणें तैसे ते नाचती । माकडाच्या गति गारुडयाच्या ॥४॥
नामा म्हणे राजा गुंतला तियेसी । शेंवुडातें माशी हालूं नेणे ॥५॥

९.
उठवितां बाळ आक्रंदलें पोटीं । निघे उठाउठी चमत्कारें ॥१॥
आवसेंचा शशी तैसा राजा झाला । येरु हा निघाला कळावंत ॥२॥
आळवावा तरी धाक बाईलेचा । तेणें त्याची वाचा चाकाटली ॥३॥
ह्रदय फुटलें प्रेमही दाटलें । तरी काय चाले तियेपुढें ॥४॥
सूर्यासी पडेल निधनासी भूत । तैसी झाली मात राजयासी ॥५॥
नामा म्हणे मोह खोटा हा दुर्धर । त्यागावा निर्धार वेदांतीच्या ॥६॥

१०.
चालिलें बाळक रुदन करीत । देखोनी गांवांत हाहा: कार ॥१॥
पाहा हें रायानें मांडिलें अनुचित । कासया तो भ्रांत झाला नेणों ॥२॥
देवोनियां रत्न घेतला चिंचोका । दिला कवडी एका चिंतामणी ॥३॥
कामधेनु नेधे पोशीले बोकड । अस्पदे माकड पाळावया ॥४॥
कल्पतरु मोडी शेतां कुंपण करी । तैसी झाली परी आजीची हे ॥५॥
नामा म्हणे तिचा मोह हा दारुण । राजा ती आधीन झाला तैसा ॥६॥

११.
घरा येतां बाळ देखिलें मातेनें । दाटली दु:खानें बोलवेना ॥१॥
आक्रंदोनि पुढें मोकळोनि धाये । नेणों कैसें काय झालें यासी ॥२॥
घालोनियां कव घेतां कडेवरी । दोन्ही नेत्र करीं पुसीतसे ॥३॥
काय झालें बाळा सांग बा वृत्तांत । बा कोण तूंतें पाहों नेणे ॥४॥
नामा म्हणे असो प्रेमा तो अपार । पुढील विचार बोलीजेला ॥५॥

१२.
न कळतां मुलांसंगें मी खेळत । गेलों सभेआंत राजयाच्या ॥१॥
काय सांगों माये जाहला अपमान । तेणें माझें मन । दुखावलें ॥२॥
मातें प्रेमभावें रायें आळवीलें । मांडी बैसवीलें सन्मानेशीं ॥३॥
आली आकस्मात्‌ दुर्धर कोपोन । लांस कीं ते कोण मी तो नेणें ॥४॥
ताडोनियां पायीं मज उठविलें । निघालों मी सहजें तत्‌क्षणीं ॥५॥
कोणी नुठवी ऐशाठायीं म्या बैसावें । तें कोणा मागावें सांग माये ॥६॥
नामा म्हणे दिसे पाहातां बाळक । ज्ञानची निष्टंक मुसावलें ॥७॥

१३.
ऐकोनियां वाणी पातली ते रमा । बोलिली विश्रामा जीवाचिया ॥१॥
दुर्जनाचा भाव ऐसाचि वोखटा । दर्प त्याचा मोठा आवरेना ॥२॥
दुसर्‍याचें बरें तें कैसें सोशिती । बळें निखंदिती साटोपानें ॥३॥
दीपाचा प्रकाश सोशीना पतंग । जळताही अंग झेंप घाली ॥४॥
चंद्रोदया आधीं फुटतील डोळे । ते काय कावळे पाहातील चंद्र ॥५॥
आधींच सावत्र संबंधी पापीण । राजाही आधीन जिच्या झाल्या ॥६॥
सिंहासनीं याच्या मांडीये बैससी । हें ते कैसें सोसी निसंगळ ॥७॥
दैवहीन आम्हीं देवचि कोपला । आपुला तो झाला परावा कीं ॥८॥
देवें द्यावें तेव्हां भोगावें सकळ । न चले कदा बळ दुसर्‍याचें ॥९॥
कासया तूं बाळा स्फुंदसी दु:खानें । देवाहून कोण सखें आम्हां ॥१०॥
नामा म्हणे हित ऐकतां मायेचें । चित त्या बाळाचें उठावलें ॥११॥

१४.
पूर्वजज्मीं त्यानें साधियेला योग । कांहींसा वियोग झाला होता ॥१॥
कैसा नेटेपाटे उन्मखे फुटला बालपणीं त्याला ज्ञाम झालें ॥२॥
विरक्ती वोळगे पाइक होउनी । शांती पुढारुनी माळ घाली ॥३॥
शमदम अंकित पुढारले बळें । योग तो अढळ सदा तेथें ॥४॥
मान गर्व मनाचा खुटला विचार । थिता अहंकार तोहि गेला ॥५॥
नामा म्हणे बाळ बोलिलें जाणोनीं । माउली हांसोनी काय बोले ॥६॥

१५.
संकल्पाचा मळु नेत्रीं नीडारला । त्यालागीं तो डोळा काय  दिसे ॥१॥
जेथें देखों तेथें तोचि तो कोंदला । विश्वामाजी  भरला विश्वंभर ॥२॥
मोठे थोर थोर तापसी नाडीले । कामानें वोढिले माघौतेची ॥३॥
वेदाचें पुनीत यज्ञशीळ सारें । झकवती बारे वास नेणे ॥४॥
दांभीक मगरीं गीळिलें सर्वांसीही । त्यालागीं तो नाहीं ऐसा भासे ॥५॥
नामा म्हणे ऐसी बोलली जननी । बाळ मोठा ज्ञानी जाणवला ॥६॥

१६.
केला नमस्कार मातेला उठोनी । निघाला तेथुनी लागवेगें ॥१॥
वनीं बैसोनियां धरोनी विश्वास । आळवावा ईश ऐसें चित्तीं ॥२॥
हाक मारीत मागें माउली चालली । तियेसवें बोली करीना ते ॥३॥
एकाकी तो नीट चालीला त्वरेनें । पाहोंनियां जन स्तब्ध झाले ॥४॥
बोलवितां कांहीं बोलेना कोणासी । अघोर स्थळासी प्रवेशला ॥५॥
मातेसी ठाउकें तयाचें अंतर । म्हणोनी ते स्थिर झाली ठाईं ॥६॥
नामा म्हणे पूर्व पुण्याचिया बळें । मन त्याचें झालें स्थीर तेथें ॥७॥

१७.
नगरीं नरनारी समस्तही । म्हणती झालें कांहीं राजयाला ॥१॥
बाळ तें केवढें धाडीलें वनासी । याचीया धैर्यासी दुजा नाहीं ॥२॥
मागें बहु झालें नाहीं हें देखीलें । हें तों नव्हे भलें विचारितां ॥३॥
सर्वांदिकीं त्यासी सांगितली वृत्त । कांरे तूं निवांत बैसलासी ॥४॥
नामा म्हणे राजा ध्रुवापाठीं गेला । कायतो बोलीला ऐका त्यासी ॥५॥

१८.
म्हणे बा आतां करिशील कायी । एकाला ये ठायीं येऊनियां ॥१॥
वय हें केवढें बुद्धि हे केवढी । वांयां काढाकाढी तपाची कां ॥२॥
व्याघ्र आणि सिंह जंबुक विखार । नांदती या घोर वनामाजी ॥३॥
म्हैषा मसको भूतें वसती रानीं । तुज माये रानीं झोंबतील ॥४॥
नको बा या ठाईं राहूं चाल घराप्रती । जाऊं जोकां प्रीति तेचि देऊं ॥५॥
नामा म्हणे ध्रुव पाहेना बोलेना । आपुलिया ध्यानामाजीं मग्न ॥६॥

१९.
मधुवन चांगलें लोचनीं देखीलें । तेथें मन रंगलें बाळकाचें ॥१॥
राहूं येथें करूं देवाची प्रार्थना । म्हणोनियां मना बोधवीत ॥२॥
सरोवर दिव्य त्यामाजी कल्हारें । भोंवताले मयुर नाचताती ॥३॥
साउली सुंदर सुमनें मनोहर । देवाचा विहार तये ठायीं ॥४॥
नामा म्हणे ऐसा निश्चय नेमून । ध्रुव तये वनीं स्थिरावला ॥५॥

२०.
राजा म्हणे बाळा देतों पंच ग्राम । तो म्हणे आत्माराम देता आहे ॥१॥
आशा सांडोनियां निराश जाहला । शरण देवाला जावयासी ॥२॥
चतुर्थ भागानें राज्य घे वांटोनी । म्हणे चक्रपाणी देता आहे ॥३॥
अर्धें भूमंडळ घेईंरे उदारा । म्हणे विश्वंभरा लाज माझी ॥४॥
संपूर्ण हे महि तुजचि वोपीन । म्हणे नारायण सांभाळील ॥५॥
नामा म्हणे ऐसा गणीना भूपातें । निश्चय चितांत एक झाला ॥६॥

२१.
बाळकाच्या बोला राजा भांबावला । म्हणे झालें याला ज्ञानगम्य ॥१॥
शांती याचे अंगीं बाणलीसे नीट । तेणें नेटेपाटे पुढारला ॥२॥
मी तों झालों वांयां कामाचा किंकर । केला म्यां अव्हेर बाळकाचा ॥३॥
कीर्ति हे त्यागोनी दुर्दशा आणिली । ऐसी होऊं सरली बुद्धि फिकी ॥४॥
नामा म्हणे राजा लाजला चित्तांत । प्राणावीण प्रेत तयापरी ॥५॥

२२.
ठेवुनी भोंवताले रक्षणाला दूत । सांगतो तयातें सत्तारूपें ॥१॥
तुम्ही आतां याचें करावें रक्षण । व्याघ्र सिंह येणें बाधा नव्हे ॥२॥
क्षणाक्षणा मातें सांगावा वृत्तांत । वनीं भूत प्रेत हिंडताती ॥३॥
चोर हेर खळ रात्निचीये वेळे । रहावें भोंवताले सावधान ॥४॥
नामा म्हणे ऐसें सांगे त्या दुतांसी । आपण घरासी येता झाला ॥५॥

२३.
येरु तो निवांत होउनी त्याठायीं । राहोनियां कांहीं करिता झाला ॥१॥
न कळे भक्तिभाव घ्यावें कैसें त्यासी । देव कोण त्यासी ठावें नाहीं ॥२॥
भावार्थानें सर्व इंद्रियें खुंटलीं । प्रारब्धानें दिल्ही वाट तया ॥३॥
साध्यसाधनाचा उपाव कळेना । घ्यान तो धारणा कौंचि तेथें ॥४॥
नामा म्हणे गुरु करावा तें नेणे । अद्‌भुत विंदान मांडियेलें ॥५॥

२४.
वाचितां अध्यात्म जाणितांही अर्थ । गुरुवीण व्यर्थ सर्व कांहीं ॥१॥
करावा तो आधीं सद्‌गुरु प्रसन्न । त्याचिये कृपेनें सर्व साधे ॥२॥
योग याग तपें चित्त शुद्ध होय । गुरुवीण नये मोक्ष हातां ॥३॥
निर्मळ जीवन तीर्थावीण पावन । तैसा गुरु जाण साधकांसी ॥४॥
नामा म्हणे गुरु कृपेचिया बळें । मूर्खहा तरेल भाक माझी ॥५॥

२५.
एकाएकीं दैव उदेलें ध्रुवाचें । येणें नारदाचें झालें तेथें ॥१॥
देखियेलें पोर टाकलेंसे वनीं । भावना धरोनी अपसया ॥२॥
साधूचा भाव उदकाचिया परी । लव तेथें भरी उणें नाहीं ॥३॥
आर्तींचा हे आर्त पुरवावा हा नेम । साधूचा नि:सीम स्वभाव कीं ॥४॥
गिरी देखे मेघ मग तो कैसा थोर । तैसे ते उदार साधुसंत ॥५॥
आतां या बाळाचा योग क्षेम कैसा । पुसावया धिंवसा नामा म्हणे ॥६॥

२६.
धन्य धन्य साधु दर्तति भूतळीं । जे कां भाळींभोळीं तारावया ॥१॥
जयाच्या दर्शनें पातकाई धुणी । होय तो सज्जनीं मान्य सदा ॥२॥
विश्वीं विश्वंभर दाखविती पूर्ण । भवाचें बंधन तोडोनियां ॥३॥
जाती विजाती व्हावया प्रज्ञानहो । एक मग मोहो सोडविती ॥४॥
नामा म्हणे सदां साधुसी वाणितां । वाचे पवित्रता अखंडित ॥५॥

२७.
नारदें पाहिली बाळकाची स्थिती । त्याच्या चित्तीं शांती भरली दिसे ॥१॥
कल्पनेचा दाणा म्हणे तयालागीं । बाळा कवणालागीं आठविसी ॥२॥
वय तरी थोडें भावना उदंड । काय तुज चाड सांग आतां ॥३॥
न बोलसी तरी साधेना हें काज । अंतरींचें नीज मज कळे ॥४॥
आला लाभ काळ फळलीसे भावना । उघडोनी लोचना पाहीं मज ॥५॥
ऐकोनी ध्रुवानें सज्जनाची वाणी । नेत्र विकासोनी पाहे तदा ॥६॥
पुढें उभा मुनि लावण्याचा गाभा । आपुलिया लाभालागीं नाचे ॥७॥
नामा म्हणे ध्रुवें वंदिले चरण । बोलिलें वचन ऐका आतां ॥८॥

२८.
बैसायासी गेलों पितीयाचे अंकीं । उठविलें एकी माउलीनें ॥१॥
सरेना सरेना कोणी उठवीना । ऐसा ठाव जाणा वांछितसे ॥२॥
उपाय न कळे मागावें कोणासी । भावना आपैसी उठावली ॥३॥
नामा म्हणे शब्द ऐके देवऋषी । मग त्या बाळकासी आश्वासीते ॥४॥

२९.
ब्रम्हांड जयाच्या पोटीं सांठवलें । तेंचि साकारलें ध्रुवापाशीं ॥१॥
कैसें तें बोलावें कैसें तें वानावें । वेदासही ठावें नोहे जेकां ॥२॥
निलोत्पल रवि गगनाही हिनावी । ऐसी शोभा दावी इंद्रनीळ ॥३॥
मरगजालागीं जोडलें सौरभ्यें । आनंदाचे कोंब चारी भुजा ॥४॥
मुगुट कुंडलें सर्वांगीं भूषण । लेणीयासी लेणें अंगाचिया ॥५॥
इंद्रधनुष्याची मांडणी मेघाची । माळ वैजयंतीची गळां रुळे ॥६॥
कस्तुरी कपाळीं रेखलीसे भाळीं । उटी ते पिवळी सर्वांगासी ॥७॥
सायुध सुंदर शोभताती कर । प्रभा ते अपार कोंदाटली ॥८॥
अभय हस्त एक पुढें तुकावला । आपुल्या भक्ताला सांभाळाया ॥९॥
गोजिरी गोमटी ध्यानीं उभी ठेली । नामया माउली माथा ठेवी ॥१०॥

३०.
ऐसें कांहीं एक अपूर्व देखिलें । ह्रदयीं कोंदाटलें मूर्तिरूप ॥१॥
परी तें कांहीं तैसें न राहे निश्चळ । चित्त तें चंचळ मावारलें ॥२॥
पुढती सायास करी नानापरी । न राहे अंतरीं साचोकारें ॥३॥
आवडीनें जीव झाला कासावीस । तंव त्या परेशास कृपा आली ॥४॥
ब्राम्हाणाचें रूप उभा ठेला पुढें । निज भक्तांचें कोडें परवावया ॥५॥
कपोलासी शंख लाविला स्वहातें । तेव्हांचि तयातें ज्ञान झालें ॥६॥
वैकुंठ पिठीचें अधिष्ठान साचें । तें रूप तयाचे द्दष्टी पडे ॥७॥
नामा ह्मणे काय सांगावा नवलावो । भक्तांलागीं देवो साहकारी ॥८॥

३१.
स्तवीनसे वाचे जोडोनियां कर । वेदां अगोचर ऐसें कांहीं ॥१॥
धन्य धन्य आतां उद्धरलों स्वभावें । माझें मज ठावें झालें निज ॥२॥
विश्वाच्या विसांव्या जिवाचिया जिवा । देवाचिया देवा दिनानाथा ॥३॥
सूंचि सर्वां आदिमायची अवधी । तुजविण कधीं दुजें नाहीं ॥४॥
एक तूं अनेक अनेकीं तूं एक । येणेही सांशंक  बोलवेना ॥५॥
दातृत्वाची आदी कल्याणाची निधी । चित्तमन बुद्धि सर्व तूंची ॥६॥
तुझीये कृपेनें गेले भावाभाव । आणिक मागावें ऐसें नाहीं ॥७॥
कधींही कोणता चळेना ढळेना । माते ऐशा स्थाना बैसवावें ॥८॥
नामा म्हणे ऐसी करीत प्रार्थना । घाली लोटांगणा पायांवरी ॥९॥

३२.
आश्वासोनी देव बोलिले ध्रुवासी । इच्छा तुझी जैशी तैसें करूं ॥१॥
सहज सत्येनें ऐसें कांहीं जहालें । अढळ दिधलें बैसावया ॥२॥
चंद्र सूर्य तारा शशि ऋषी भोर । हे ज्या आधारें हिंडताती ॥३॥
ब्रम्हलोक साचे परी ते न नासे । ऐशा परी त्यास बैसविले ॥४॥
क्षतेचा दिवस योजनें उन्नती । बेसवी श्रीपति ध्रुवालागीं ॥५॥
सवी सर्वत्नांच्या लोचना गोचर । रमणीये अपार वर्णवेना ॥६॥
नामा म्हणे दुजें वैकुंठ केवळ । भक्तालागीं केलें देवरायें ॥७॥

३३.
ऐसें झालें पूर्ण ध्रुवाचें आख्यान । ऐकती जर जन एका भावें ॥१॥
तयावरी कृपा देवाची होईल । केलें तें लाभेल सर्व काज ॥२॥
पुत्राभिष्ट पुत्र धनाभिष्ट श्वन । जैसें ज्याचें मन तैसें होय ॥३॥
नामा म्हणे तया कल्याण सर्वदा । चिंतितां गोविंदा काम पुरे ॥४॥

“संत नामदेव गाथा ध्रुवचरित्र” समाप्त


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral

संत नामदेव गाथा ध्रुवचरित्र समाप्त एकूण ३३ अभंग

संत नामदेव गाथा ध्रुवचरित्र ।

संत नामदेव गाथा ध्रुवचरित्र ।

संत नामदेव गाथा ध्रुवचरित्र ।

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *