योगी पावन मनाचा ।
साही अपराध जनाचा ॥१॥
विश्व रागें झाले वन्ही।
संती सुखें व्हावें पाणी ॥२॥
शब्द शस्त्रं झालें क्लेश ।
संती मानावा उपदेश ॥३॥
विश्व पट ब्रह्म दोरा।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥
माऊली आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.
View Comments
योगी, भगवंताला मिळवण्यासाठी प्रयत्न करणारा, हा मनाचा पावन असतो, शुद्ध असतो. त्याच्या मनात राग, द्वेष असे भाव नसतात.योगी माणसाला जर राक्षसी, असूरी वृत्तीच्या लोकांनी त्रास दिला, तर त्याने तिथेच थांबावे, त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे.
सामान्य माणसाला जर राक्षसी, असूरी वृत्तीच्या लोकांनी त्रास दिला तर तो दबून जातो. त्याचे त्यांच्या नीचवृत्तीपुढे काहीच चालत नाही. म्हणून योग्याने, संताने राक्षसांचे म्हणणे ऐकून घ्यावे. राक्षसांमधे राग, द्वेष परिपूर्ण भरलेले असतात. चांगल्या लोकांमध्ये, सज्जनांमध्ये त्यांना घाण दिसते.कारण त्यांच्या डोळ्यात, विचारात घाण असते.असूरी वृत्तीच्या लोकांच्या राग द्वेषाने विश्वात आग भरली आहे. सगळे विश्व त्या आगीत जळते आहे. अशा वेळी संतांनी सुखाने , आनंदाने पाणी ह्वावे. आग लागते तेव्हा ती पाण्यानेच विझते. आपल्याला थोडा राग आला तर आपण गरम होतो.ज्यांच्यामध्ये सगळे षड्रिपू खचाखच भरले आहेत, ते खरोखरच जळत आहेत.त्यांच्यात आग लागली आहे. एखादा निर्णय आपण रागाच्या भरात घेतला तर पश्चात्ताप होतो, निर्णय चुकतो. ज्यांच्या डोक्यात पूर्ण पणे राग, द्वेष, लोभ, मोह, मद, मत्सर भरलेले असतात त्यांचे कोणते निर्णय बरोबर असणार? सामान्य माणसाला ते कळत नाही, ज्ञानेश्वर महाराज योगी आहेत. त्यांच्या मनात घाण नाही.त्यांनी दुर्जनांची, असूरांची ही स्थिती ओळखावी. दुर्जनांचे डोके चालत नाही. जसे कर्करोग झाल्यानंतर शरीरातल्या पेशी उलटे काम करतात, शरीराला वाचवण्याऐवजी मारण्याचे काम करतात, त्याला कर्करोग म्हणतात. तसे माणसाने माणसाशी चांगले वागण्याऐवजी दुष्ट व्यवहार करतात. माणसाला त्रास देतात, हा समाजाला झालेला कर्करोग आहे. कर्करोग्याला दवाखान्यात नेतात. रोगी अस्वस्थ होतो, असह्य वेदनांनी तळमळतो, ओरडतो, म्हणून घरचे लोक त्याला टाकून देत नाहीत. त्याच्यावर प्रेम असते. त्याला योग्य तो औषधोपचार करतात.
साधा राग आला तरी निर्णय चुकतात, ज्यांच्या डोक्यात सर्व षड्रिपू काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर खचाखच भरलेले असतात त्यांचे डोके चालते असे म्हणणे चुकीचे आहे.ते डोके कर्करोगासारखे उलटे काम करते. योगी, संत कुणाला त्रास देत नाहीत, सर्वांवर प्रेम करतात. हे असूर लोक त्यांची निंदा करतात, त्यांना त्रास देतात. संत, योगी लोक हे लोक डाॅक्टरची भूमिका बजावतात.
संत मुक्ताबाई सांगतात, असूरांचे डोके षड्रिपूंनी नुसते गरम नाही झालेत, त्यांच्या डोक्यात आग लागली आहे. सामान्यांना ते कळणार नाही, तुम्ही त्यांच्यासाठी पाणी ह्वा. त्यांच्या पेटलेल्या डोक्यावर पाणी टाका. त्यांचे कटू शब्द तुम्हाला शस्त्र वाटलेत. त्याने तुमच्या ह्रदयावर वार झालेत, त्यांच्या शब्दांच्या शस्त्राने तुम्हाला वाईट वाटते.तुम्हाला त्यांचा राग येतो. हे कसे चालेल? तुम्ही संत आहात, योगी आहात. तुम्ही त्यांच्यावर रागावू नका, मोठे ह्वा. त्यांच्याकडे बघा. त्यांना काय होतंय, त्यांचे म्हणणे ऐकून घ्या. ते वाईट बोलतात, तो उपदेश आहे असे माना. संपूर्ण विश्व भगवंताने भरलेले आहे. त्यांच्यातही भगवंत आहे हे लक्षात असू द्या. ते वाईट बोलल्यावर आपल्याला एवढा त्रास होतो, तर त्यांच्यातल्या भगवंताला किती त्रास होत असेल.? त्यांच्यातला भगवंत आपल्याला हाक मारतोय. मला यांच्यातून, ह्या नरकातून बाहेर काढ अशी हाक मारतोय.प्रत्येक मनुष्यात भगवंत बघा.आणि त्या भगवंताला ह्या दुःखातून बाहेर काढा. तुम्ही डॉक्टर ह्वा.