संत शाह अब्दुल लतीफ (१६८९–१७५२). श्रेष्ठ मध्ययुगीन सिंधी संतकवी. त्यांचा जन्म ‘सय्यद’ (प्रेषिताचे वंशज) घराण्यात, हाला तालुक्यातील भाईपूर या खेड्यात झाला व त्यांचे बालपण कोटरीला गेले. पुढे काही वर्षांनी ते भिट्ट येथे स्थायिक झाले, त्यामुळेच भिट्टचे शाह अब्दुल लतीफ या नावाने ते ओळखले जातात.

त्यांचे वडील शाह हबीबुल्ला हे सुविख्यात संत होते,

तर पणजोबा शाह अब्दुल करीम (१५३६-१६२०) हे सर्वश्रेष्ठ कवी व बुलडीचे (वास्तव्यस्थान) संत म्हणून ओळखले जात.

त्यांना शिक्षणासाठी आखुंद नूर मोहम्मद भट्टी यांच्याकडे धाडण्यात आले पण वर्णमालेच्या ‘अलीफ’ या आद्याक्षरातच त्यांना अल्लाचा साक्षात्कार झाला व पुढचे शिक्षण त्यांनी नाकारले, असा प्रवाद आहे.

त्यांच्या मुखातून साक्षात्काराच्या बेहोषावस्थेत काव्य स्रवत असे व त्यांचे शिष्य ते कागदावर उतरून घेत, असे म्हणतात.

शाह अब्दुल लतीफ यांनी हिंदू योगी व संन्यासी यांच्यासमवेत हिंगलज (अंदा देवीचे पवित्र स्थान) व द्वारका या धर्मस्थानांची तीन वर्षे यात्रा केली.

ओसाड वाळवंट व पर्वतराजी यांतून केलेल्या या खडतर, जोखमीच्या प्रवासातील त्यांची निरीक्षणे, अनुभव त्यांच्या काव्यात प्रतिबिंबित झाले आहेत.

शाह यांचे ज्या मोगल स्त्रीवर उत्कट प्रेम होते, तिच्याशीच त्यांचा विवाह एका विचित्र योगायोगाने घडून आला.

संत शाह अब्दुल लतीफ यांचा रिसालो (म. शी. संदेश, १८६६) हा काव्यसंग्रह सिंधी साहित्यातील अभिजात ग्रंथ मानला जातो.

सिंधी भाषेचे वैभव व जोम, तसेच काव्यात्म वाक्‌पाटव, विचारांची  समृद्धी व रचनेचे कौशल्य इ. गुणांनी या कविता संपन्न आहेत.

सुफी पंथाचे गूढवादी तत्त्वचिंतन त्यांच्या काव्यातून आढळते पण त्यांचे काव्य व्यापक भारतीयत्वाला आवाहन करणारे असल्याने सिंधी साहित्यात त्यांना अमाप लोकप्रियता व मान्यता मिळाली.

त्यांच्या काव्यातून प्रकटणारा तात्त्विक विचार हा समन्वयवादी आहे.

वेदान्ताचे तत्त्वज्ञान, इस्लामचा एकेश्वरवाद, प्राचीन इराणी (पार्शियन) जीवनदृष्टीतील निसर्गपूजक सौंदर्यासक्ती यांचे मनोज्ञ, एकात्म दर्शन त्यांच्या काव्यातून घडते.

शाह यांच्या रिसालो त एकूण तीस सूर (अध्याय) आहेत.

काही सुरांना हिंदुस्थानी संगीतातील रागरागिण्यांची नावे दिली आहेत.

ह्या तीन सुरांच्या आशयातील विचार व भावना सुफी प्रणालीच्या आहेत.

मानवाचे परमेश्वराशी मीलन हा त्यांचा गाभा असून प्रियकर व प्रेयसीच्या रूपकातून तो वारंवार प्रकट होतो.

शाह साधकाला स्त्रीरूपात तर परमेश्वराला प्रियकर वा पतीच्या रूपात कल्पितात.

आपल्या प्रियकराच्या शोधासाठी निघालेल्या एखाद्या सुंदरीच्या नायिकांची अतिशय लोभस व वैशिष्ट्यपूर्ण चित्रणे आढळतात. या सर्व साध्यासुध्या सिंधी स्त्रिया आहेत. उदा., ससुई ही धोबीण आहे, तर मारुई ही वाळवंटात राहणारी आहे. हिंदू भक्तिपंथी राधा ही शाह यांच्या काव्यात ससुई वा सुहिनी बनते. सिंधची पर्वतराजी, दऱ्याखोरी, वैराणपणा, वाळवंट, बाजारपेठा, वनस्पती, जीवसृष्टी, जानपद समाजजीवन या साऱ्यांचे दर्शन त्यांच्या काव्यातून घडते. शाह यांच्या काव्यातील ही ‘सिंधीयत’ (सिंधी संस्कृतीचा अस्सलपणा) अभूतपूर्व आहे. शाह यांनी जानपद भाषेला उच्च दर्जाच्या अभिव्यक्तीचे सामर्थ्य व डौल प्राप्त करून दिला. त्यांनी दोहा या प्रकारात विपुल रचना केली. नाट्यात्मक जाण असलेले श्रेष्ठ भावकवी, म्हणून सिंधी  साहित्यात त्यांचे स्थान अढळ आहे. इंग्रजी साहित्यात शेक्सपिअरचे जे स्थान, तेच सिंधी साहित्यात शाह यांना असल्याचे मानले जाते.


हे पण वाचा: संत माणकोजी बोधले यां-ची संपूर्ण माहिती


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: vishwakosh

View Comments

  • शाह लतिफ यांचा उल्लेख जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगात येतो. पण त्यांच्या संबंधी माहिती मात्र प्रथमच मिळाली. छान माहिती. धन्यवाद!