संत प्रेमाबाई जीवनचरित्र

संत प्रेमाबाई

संत प्रेमाबाई यांचा जन्म-मृत्यू शक उपलब्ध नाही. त्यांचा काळ इ.स. १६५८ समजला जातो. ह्या गोदावरी नदीच्या काठी असणान्या एका गावामध्ये राहत असत. त्यांचे बालपण व वैवाहिक जीवनाचा तपशील सापडत नाही. बालपणीच पतिनिधनाने त्यांनी वैराग्य स्वीकारले. पण संसारी जीवनाचे काही उल्लेख सापडतात. संत प्रेमाबाईच्या नावावर ज. रा. आजगावकर यांनी तीन- चार पदे शोधली. ती प्रसिद्ध आहेत. तशा त्या अलक्षित अशा स्त्री संत आहेत.

संत प्रेमाबाई लहानपणापासून ईश्वरभक्तीकडे वळल्या. त्यांचे संपूर्ण चरित्र म्हणजे करुण रसाचा कारुण्यपूर्ण प्रवाहच होय. त्यांचे संपूर्ण आयुष्य अत्यंत सत्त्वसंपन्न होते. भक्ती म्हणून त्या भागवत श्रवण करीत. त्यांचे आयुष्य त्यांनी वैधव्यात घालविले. त्यांची भक्ती अनन्यसाधारण होती. भक्तीच्या सामर्थ्यावर त्यांनी भगवंतास आपलेसे करून घेतले होते. त्यांच्याजवळ आप-परभाव कोठेही नव्हता; संत प्रेमाबाईंच्या मनात भूतदया अखंड प्रवाहीत होती. त्या नित्य गोदावरी स्नान, हरिकीर्तन, विठ्ठलभक्ती भागवत-श्रवण करीत असत. त्यांच्याकडे नित्याने साधू-संतांचा मेळा, वैष्णवजन घरी जेवणास येत असत. पुराणश्रवणास त्या बसल्या की, त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत असे. हा त्यांचा स्वभाव पाहून संतसज्जनांनी त्यांचे नाव ‘प्रेमाबाई’ ठेवले.

एके दिवशी संत प्रेमाबाई पुराणश्रवणास जाणार, तोच अनेक सत्पुरुष त्यांचे घरी आले. ते सर्व जण उपवासी होते. प्रेमाबाई विचार करू लागल्या आपण जर कीर्तनास जावे, तर सर्व साधू-संत उपवाशी राहतील. कीर्तनास न जाता यांची सेवा करावी, हेच योग्य होईल. अशा विचाराने संतांच्या भोजनव्यवस्थेस लागल्या. पण त्यांचे चित्त पुराणाकडे लागले होते. मंदिरात कीर्तनास सुरुवात झाली असेल. तेव्हा आज आपले कीर्तन चुकणार, हा विचार मनात येताच प्रेमाबाईंना खूप वाईट वाटले. मग त्यांनी आपल्या दहा वर्षांच्या मुलास सांगितले की, ‘कीर्तनास जाऊन सर्व कथा ऐक व मला येऊन सांग.’ त्याप्रमाणे मुलगा कीर्तनास निघून गेला. इकडे संत प्रेमाबाई संतांच्या सेवेस लागल्या.

स्वयंपाक झाल्यावर संतमंडळी गोदातीरावरून स्नान करून आले. संत प्रेमाबाईंनी संतमंडळींचे पादप्रक्षालन करून आपल्या हाताने पात्रे वाढली व श्रीकृष्णार्पण’ म्हणून संकल्प सोडला. सर्व संत भोजन करून तृप्त झाले. इतक्यात संत प्रेमाबाईंचा मुलगा कीर्तन श्रवण करून घरी आला. संत प्रेमाबाईंनी पुत्रासह भोजन केले. नंतर कीर्तनकाराने सांगितलेली पुराणतली कथा ऐकण्यासाठी आपल्या मुलाजवळ येऊन बसल्या. त्यांच्याबरोबर संतमंडळीही कथा श्रवण करीत होती. कथा ऐकताना संत प्रेमाबाईंची चित्तवृत्ती

अगदी एकरूप झाली होती. कवेतील सर्व घटना, प्रसंग आपल्या डोळ्यांसमोर हुबेहूब घडत आहेत, असे त्यांना वाटत होते. कथेत ‘श्रीकृष्णास बांधून टाकले आहे, तो रडत आहे’ हे ऐकताच यशोदा व कृष्ण यांची स्थिती, गौळणीचे हसणे, श्रीकृष्णास कोणीच कसे मुक्त करीत नाही, हे ऐकून प्रेमळ संत प्रेमाबाई अत्यंत दुःखी झाल्या. गहिवराने त्यांचा कंठ दाटून आला. डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. मग प्रेमाबाई आपल्या पुत्रास म्हणाल्या, “बाळा, ह्या संसाराचा सर्व व्याप मी आता तुझ्याकडे सोपविते व सत्वरः गोकुळास जाऊन श्रीकृष्णास मुक्त करते. “

इतके शब्द बोलताच ‘संत प्रेमाबाईंचा आत्मा त्यांच्या नाशवंत देहाचा त्याग करून चित्स्वरूपी जाऊन मिळाला. त्यांच्या घरी आलेल्या सर्व साधू-संतांस त्यांच्या ह्या उत्कट कृष्णभक्तीचे मोठे आश्चर्य वाटले. या वेळी संत प्रेमाबाईंच्या देहावर अकस्मात परिमला द्रव्ये आणि तुलसीदले येऊन पडली. तो चमत्कार पाहून सर्व सत्पुरुषांनी संत प्रेमाबाईंचा जयजयकार केला.

संत प्रेमाबाईंची पदरचना बरीच असावी, पण त्यांची तीनच पदे आज उपलब्ध आहेत. महिपतीबुवा ताहराबादकर यांच्या ‘भक्तलीलामृत’ या चरित्रग्रंथात ४२व्या अध्यायात त्यांचे पद्य स्वरूपात वरीलप्रमाणे अल्प चरित्र आलेले आहे.


https://www.krushikranti.com/