संत नागरी जीवनचरित्र

॥ संत नागरी ॥

(नागी) (१३ वे शतक) संत नामदेवांचे भाऊ (बंधू) रामय्या हे परम विठ्ठलभक्त होते. नागरी ही त्यांची मुलगी. ह्यांच्या जन्म-मृत्यू शकाची कुठेही नोंद नाही. संत नामदेवांचा तिसरा मुलगा गोंदा यांच्या एका अभंगात नागीचा उल्लेख आहे.

“नामयाची दासी नागी, दुसरी जनी । त्यांनी सेवा करून (वश) केला देवा।।”

संत नागरी (नागी) यांच्या आठ अभंगरचनेचे हस्तलिखित बाढ़ संत सोपानदेवांच्या मठात (सासवड, पुणे) संतसाहित्याचे विश्लेषक-संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांना मिळाले. संत नागरीच्या अभंगरचनेतून त्यांच्या चरित्रावर प्रकाश टाकून प्रथमच संशोधकांनी नोंद घेतली आहे. संत नागरीने आठही अभंगांतून आत्मकथन केले आहे. संत नामदेवांची दासी समजली जाणारी म्हणजे शिष्या, त्यांची सख्खी पुतणी ‘नागरी’ यांनी आत्मकथनपर छप्पन्न कडवी असलेले आठ अभंग रचले आहेत. त्या आपल्या अभंगातून म्हणतात,

“रामयाची कन्या गोरटी कोवळी । बापे बोळविली सासुरियात।”

वडील रामय्याने संत नागरीचे कोवळ्या वयात लग्न लावले. अतिशय रूपवान असलेल्या नागीच्या श्वासा श्वासात विठ्ठलभक्ती आणि देवाचे वेध होते. तिच्या लग्नानंतर रामय्याने तिच्याच वयाची बालमैत्रीण तिच्यासोबत हळदीच्या पावलाने सासरी पाठविली. सासरचा उंबरा माहेरापेक्षा निराळा होता. माणसं अडाणी. विठोबाची सावलीही तिथे कुठे दिसत नव्हती.

संत नागरीची देवाविषयीची ओढ तिथे दाबून टाकल्यासारखी होत होती. नागरीचा छंद, आवडी, स्वभाव आणि ओढ याचा सासरी फार कोणी विचार केला नाही. तिथे तिच्या वाट्याला काहीशी सक्ती व असहायता आली होती. लग्न, सासरी येणं म्हणजे काय- हेसुद्धा तिला नीटपणे समजलेले नसावे. मैत्रिणीबरोबर घरात, बाहेर, अंगणात मातीचा विठ्ठल मांडायचा. पूजा करून गळ्यात फुलांचा हार घालून प्रदक्षिणा घालायची. देवाची प्रार्थना करून पदे गात टाळ्या वाजवायच्या असा मैत्रिणींसमवेत नागरी सासरच्या घरी विठ्ठलाचा खेळ मांडायची.

नागरीचे दिवस खेळात जात होते. एकदा एकादशी आली. त्या दिवशी पंढरीनगरीत महापर्वणीच असायची. माहेरी असताना हा पंढरीचा महासोहळा नागरीने पाहिलेला होता. सगळे नातेवाईक हरिकथेत रंगून जात असत. ही माहेरची आठवण आली आणि माहेरच्या मायेची ओढ नागीला व्याकूळ करू लागली. यापूर्वी कधीही घरच्या आठवणीने नागी अस्वस्थ झाली नव्हती; पण

पंढरीच्या सुखाच्या सोहळ्याचे तिला वेध लागते होते. माहेरचे वातावरण, टाळ-मृदंगाचा आवाज, हरिभक्ती, एकमेकांस आलिंगन, नामाचा गजर यामुळे नागीचे मन तगमग करू लागले. भक्तिप्रवणतेचा ओलावा नसलेल्या सासरची माती आणि माणसे तिला परकी वाटू लागली. काही कारण नसताना डोळ्यांत पाणी आणून ओक्साबोक्शी रडू लागली.

तिने अस्वस्थ मनाने विठ्ठलाचा धावा केला. पंढरीची वारी तिची आवडीची, विठ्ठलाची ओढ वाटल्याने सासरच्या मंडळींनी तिला भलत्याच दैवताने पछाडले असे समजून; भूतबाधा झाली असावी, तिला वेड लागले असावे, म्हणून त्यांनी पंढरीस जाऊ न देता घरात कोंडून ठेवले.

विठ्ठलदर्शनास जाऊ न दिल्याने तिचा अपेक्षाभंग झाला. विठ्ठलाचा वियोग सहन झाला नाही. वैष्णवजनांच्या दर्शनाची तळमळ लागली होती. ‘प्राण जातो वेगी करावा धावणी।’ असा संत नागरीने टाहो फोडला. संत नागरीचे देहभान हरपून गेले. सासरच्या मंडळींनी जरी कोंडून ठेवले, तरी त्या मनाने पंढरीनाथांच्या महाद्वारापर्यंत पोहोचल्या. पंढरीत भेटलेल्या संतचरणी त्या लोळण घेऊ लागल्या. संत नागरी या सासर आणि पती यांचा त्याग करून लौकिकातून अलिप्त झाल्या.

विठ्ठलभेटीच्या तळमळीने विठ्ठलाच्या महाद्वारापाशी पोहोचताच पंढरीनाथाच्या महाद्वारात नागरीची वडिलांशी भेट झाली. त्यांना संत नागरीला पंढरपुरी पाहून आश्चर्याचा धक्का बसला. गृहस्थीचे घर सोडल्यामुळे नागरीवर वडिलांनी प्रचंड आगपाखड केली, पण संत नामदेवांनी बंधू रामय्याची समजूत काढली. त्या वेळी संत नामदेव, बंधू रामा हे संत नागरीचे पाय धरतात. त्यांची ईश्वरनिष्ठा दोघांनाही समजते.

या वेळी संत नागरी विठ्ठलाशी पूर्णतः एकरूप झालेल्या होत्या. देवाशी (विठ्ठलाशी भक्तावा उन्मनी अवस्थेचा अधिकार संत नागरीला प्राप्त झाला होता. हा संत नागरीच्या जीवनातील एक चमत्कारच समजावा. विठ्ठलाशी संत नागरीची निष्ठा व एकरूपतेचा हा प्रत्ययच होता. ही संत नागरीच्या जीवनात घडलेली आणि अभंगातून सांगितलेली आत्मकचाच होय.

संत नागरीच्या आठही अभंगांतून आत्मकथन मांडले आहे. त्यांनी आपल्या समग्र जीवनाची कहाणी न सांगता प्रारंभीच्या जीवनात, त्यांच्या उमलत्या कालखंडात सासरी आणि पंढरपुरात जे जे घडले, ते मांडले आहे. एका कुशल कथाकाराने जसा स्वतःचा जीवनपट रंगवावा, अशी कथा आहे.

अशाच प्रकारच्या आत्मकथा स्त्री संत सखूच्या संत विठाई, संत बहेणाईच्या जीवनात घडलेल्या आहेत; पण त्यातील संत सख, यांच्या अभंगरचना उपलब्ध नाहीत. त्यांच्या चरित्रकथा आज उपलब्ध आहेत. या संत स्त्रिया सासरच्या जाचाला त्रासाला न जुमानता स्त्री म्हणून नेहमी सामोऱ्या गेल्या आहेत. पुरुषाशी लग्न झाल्याने त्यांची शरीरे तशी परावलंबी झालेली असली, तरी मने

मात्र विठ्ठलाशी एकरूप व स्वतंत्र झालेली आहेत. संत परिसा भागवत व पत्नीच्याही वस्तीच्या एकरूपतेबद्दल बरेच काही व्यक्त झालेले आहेत.

संत नामदेवांचे शिष्य संत परिसा भागवत ‘ब्राह्मण’ असल्याने संत नामदेवांचा द्वेष करीत असत. त्यांची पत्नी कमळा’ या संत नामदेवांविषयी आदराने पाहत होत्या. त्यांनी काही अभंगरचना केल्या असाव्यात; पण त्यांची एकही रचना आज उपलब्ध नाही. संत परिसा भागवत- कमळजा यांचा संवाद याचा प्रत्यय संत परिसा भागवतांच्या अभंगरचनेतून येतो. ‘कमळ’ यांची विचारशक्ती स्वयंभू असावी. एक कर्तृत्वशाली स्त्री, स्पष्टपणा, निळा व पिटाई याचाही प्रत्यय त्यातून येतो.



शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या