जगद्गुरू श्री तुकोबारायांचेनंतर कान्होबा महाराजांचा जन्म झाला. आत्मसत्तेचा खेळ माहीत असल्यामुळे त्यांनी लौकिक खेळाचे रूपांतर आध्यात्मिक खेळामध्ये केले. कान्होबा महाराज कुणी मेले तर त्याचे दु:ख मानत नाहीत आणि जिवंत झाल्याचा आनंद मानत नाहीत ; म्हणूनच ते एका अभंगामध्ये म्हणतात ,
‘ मरण माझे मरोनि गेले। मज केलें अमर। ‘
‘उत्तररामचरीतम’ मध्ये भवभूति लिहितात.
लौकिकानां हि साधुनामर्थं वागनुवर्तते ।
ऋषिणां पुनराद्यानां वाचमर्थोनुवर्तते ।।१०॥
सामान्य लौकिक सज्जन अर्थाचा विचार करून वाणी उच्चारतात परंतु आद्यऋषींच्या वाणीमागे अर्थ स्वतः धावत जातात. यास्तेषा स्वैर कथा ता भवन्ति शास्त्राणि। त्यांच्या सहज गप्पा-गोष्टीही शास्त्राचे रूप धारण करतात. महापुरुषांच्या शब्दांमागे अर्थ स्वतः धावतात. तसेच अशा महापुरुषांच्या आजुबाजूला वावरणार्या जीवाला देखील वेगळीच अर्थप्राप्ति होते. सामान्य असणारी व्यक्ती देखील आत्मोंन्नती साधून उच्चपदाला पोहोचतात. संत तुकाराम महाराजांचे धाकटे बंधु ‘कान्होबा यांच्या बाबत वरील विधान खरे ठरते. संत तुकारामांचा आयुष्यभरचा एक अभ्यासू सखा,साक्षीदार म्हणून ‘कान्होबां’चे चरित्र महत्वाचे आहे. संत कान्होबांची भूमिका तुकाराम महाराजांना, वारकरी परंपरा यांना समजावून घेताना महत्वाची ठरते.
संत तुकारामांचे सामान्य मानवी जीवनाचे प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून कान्होबाराय आपल्याला दीपस्तंभासारखे तुकारामांच्या जीवनाकडे पाहायला मदत करतात. तुकारामांच्या बालपणीचा सोबती, तुकारामांचा भक्त, तुकारामांचा धाकटा बंधु आहे, जो स्वतः कवी असल्या कारणाने तुकारामांच्या अभंगांचा अर्थ समजणारा म्हणून कान्होबांचे स्थान अनन्यसाधारण आहे. तुकाराम दुष्काळात धान्याचे वाटप करतात तरी कान्होबा त्यांना विरोध करत नाही, कर्जाचे कागद इंद्रायणीत बुडवले तरी कान्होबा विरोध करत नाही यात कान्होबांचा तुकोबांवर असलेल्या प्रेम आणि विश्वास यांवर खूप छान प्रसंग दिले आहेत. कान्होबांची गणना तुकोबांच्या शिष्यावर्गातच केली जाते. कान्होबांचे गुरु हे तुकोबाच होते हे त्यांच्या अभंगांवरून दिसून येते.
व तसेच त्यांची गणना तुकोबांच्या १४ टाळकर्यांमध्ये होते.
त्यांचे आज ९०-१०० अभंग उपलब्ध आहेत.
संत कान्होबा – कुटुंब
संत कान्होबांच्या कुटुंबाचा विचार केला तर जे वातावरण तुकोबांना लाभले, तेच कान्होबांना. पिढीजात वारकरी घराणे याचा दोघा बंधुंना समान अभिमान होता. वडील सावकार होते तसेच नित्य नियमाने वारी करत होते. त्यामुळे परमार्थ आणि व्यावहारिक जीवन यांचा समन्वय कुटुंबात होताच. तुकोबा थोरले होते तरी दोघांच्या वयात फारसे अंतर नव्हते. सुखी, संपन्न, समृद्ध त्याचबरोबर आध्यात्मिक जीवनाची ओढ असणार्या कुटुंबात दोघांची घडण एकाच साच्यात झाली.
तुकारामांनी कान्होबांच्या जीवनातून नाहीसे होईपर्यंत त्या दोघांना समान सुःख-दुःखाच्या प्रसंगांचा सामना करावा लागला. आई- वडिलांचे निधन, मोठा बंधू सावजीचा गृहत्याग, दुष्काळ, तुकोबांच्या पहिल्या पत्नीचे निधन हे सर्व जीवनाचे दुःख तुकोबांनी भोगले त्यांच्यासोबत कान्होबांनी सुद्धा भोगले. वयाच्या ज्या टप्प्यावर तुकारामांना जी अध्यात्मिक स्थिति प्राप्त झाली तीच स्थिति कान्होबांनाही प्राप्त झाली असणार. त्यामुळे कदाचित तुकाराम हे मोठे बंधू नसते किंवा असते आणि त्यांचा इतका नावलौकिक नसता तरीही कान्होबा वारकरी असतेच. भारतीय तत्वज्ञानामध्ये मृत्यूनंतर आयुष्य संपते हा विचार नाही.
जीवनाची सलगता हे वेद तत्वज्ञानाची जगाच्या तत्वज्ञानाला दिलेले मोठे योगदान आहे. परंतु कान्होबा तुकारामांप्रमाणेच अभंगांची रचना करतात, हा विशेष योगायोग आहे. त्यांच्या रचनांना तुकारामांच्या अभंगांइतकीच मान्यता आहे. कान्होबांनी आपल्या अभंग रचना ‘तुकायाबंधू’ या नावाने केल्या आहे. कीर्तनात ते गाईले जातात. कान्होबांचे व्यक्तिमत्व तुकारामांशी समरस असूनही तुकारामांपासून भिन्न, स्पष्ट आणि विकसित आहे. असे असताना कान्होबांनी स्वतःला तुकारामांमध्ये समर्पित केले आहे. त्यांच्या ह्या गुणामुळे कान्होबांची तुलना रामायणातील लक्ष्मणासोबत करता येते. असे असले तरी कान्होबांच्या व्यक्तिमत्वामध्ये भरताच्या गुणांचा प्रत्यय येतो. राम वनात गेल्यानंतर भरताने त्याच्या राज्याचे रक्षण केले.
सिंहासनावर रामाच्या पादुका ठेऊन स्वतः रामाचा विश्वासू या नात्याने राज्यकारभार सांभाळला.
तुकाराम वैयक्तिक संसारातून निवृत्त होऊन भगवंतांच्या संसारात प्रवृत्त होताना त्यांच्या पश्चात कान्होबांनी सावकारी सांभाळली, तुकोबांच्या कुटुंबांचा सांभाळ केला, शेती सांभाळली, आणि हे सर्व करत असताना त्यांची प्रचंड ओढाताण झाली असली तरी त्यांचे तुकारामांवरचे प्रेम यत्किंचितही कमी झाले नाही. तुकाराम भंडारा डोंगरावर जात व दोन-तीन दिवस घरी येत नसत त्यावेळी त्यांना जेवण घेऊन जाने, त्यांना शोधून घरी आणणे हे सर्व कान्होबा खूप मायेनं आणि प्रेमाने करत. तुकाराम गेल्यानंतर त्यांनी तुकारामांच्या कुटुंबाचा सांभाळ केलाच परंतु तुकोबांच्या पश्चात नारायण बाबा मोठे होईपर्यंत वारकरी परंपरा सांभाळण्यात कान्होबांचे योगदान फार मोठे आहे.
तुकोबांनी अपार प्रेम केलेल्या वारकरी सांप्रदायाला आत्मसात करून त्यांचा सांभाळ केला आणि पुढे विस्तारही केला. त्यामुळे कान्होबा तुकोबांचे खरे कृतीशील अनुयायी ठरतात. कान्होबांचे तुकारामांवर एक बंधू म्हणून किती प्रेम होते याचा प्रत्यय तुकाराम अचानक नाहीसे झाल्यानंतर कान्होबांवर त्याचा काय परिणाम झाला, त्यांची अवस्था कशी झाली, त्यांनी किती किती ठिकाणी तुकोबांना शोधले याचे हृदयद्रावक वर्णन दि.बा.मोकाशी यांच्या ‘आनंद ओवरी’ या कादंबरीत केले आहे. तुकोबांच्या अकाली आणि अनपेक्षित वैकुंठगमनानंतर कान्होबा शोकमग्न झाले. त्यांनी त्या अवस्थेत जे अभंग रचले ते ‘विलपिका’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यातील काही अभंगांचा आज जरी डोळे बंद करून गाईले तरी डोळ्यातून पाणी येईल इतके ते जिवंत आहेत.
दुःखे दुभागले हृदयसंपुष्ट । गहिवारे कंठ दाटताहे।।
ऐसे काय केले सुमित्रा सखया। दिले टाकोनिया वनामाजी।।
कान्होबा म्हणतात, ‘‘दुःखाने माझे हृदय दुभंगले आहे. कंठ दुःखाच्या गहीवराणे दाटून येत आहे, हे सुमित्रा, हे सख्या तू मला एकट्याला ह्या वनात टाकून दिले आणि तू एकटा निघून गेला, असे का केले? बालकांच्या आक्रंदण करण्यामुळे पृथ्वी शोकाने फुटायला झाली आहे.”
“काय हे सामर्थ्य नव्हते तुजपाशी।संगे न्यावयासी अंगभूता।।”
तुझ्याकडे आम्हाला सोबत न्यायचे सामर्थ्य नव्हते काय? तुला माहिती आहे, तुझ्यावाचून आम्हाला कोणीच नाही आहे. तू आम्हाला भेटायला ये, तुझ्यावाचून आम्ही पोरके आहोत.
‘सख्यात्वाशी गेलो करत सलगी । नेणेचि अभागी महिमा तुझा।।
…. कष्टविलासी म्यां चांडाळे संसारी….उचित अनुचित सांभाळिले नाही. ..’
या अभंगात कान्होबांनी तुकारामांविषयी जी भूमिका घेतली आहे ती श्रीमद्भगवद्गीतेत विश्वरूपदर्शन बघितल्यानंतर अर्जुनाने भगवान श्री कृष्णांसाठी घेतलेल्या भूमिकेशी साधर्म्य सांगणारी आहे. गीतेत ११ व्या अध्यायात ४१ वा श्लोक आहे,
“सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं। हे कृष्ण हे यादव हे सखेति।
अजानता महिमानं तवेदं, मया प्रमादात्प्रणयेन वापि।”
अर्जुन म्हणतो, ‘आपला प्रभाव न जाणल्यामुळे, आपण माझे मित्र आहात असे मानून प्रेमाने किंवा चुकीने मी ‘हे कृष्णा! हे यादवा! हे सख्या! असे जे काही विचार नं करता मुद्दाम म्हटले असेल तर ..’तत्क्षामये त्वामहमप्रमेयम्’ मी त्याची क्षमा मागत आहे. त्याप्रमाणे म्हणतात सख्यत्वामुळे तुझ्याशी सलगी करत गेलो पण तुझी योग्यता आम्ही जाणली नाही. आम्ही भाग्यहीन आहोत. मी चांडाळाने तुला त्रास दिला. तुकोबांचा वियोग सहन न होऊन कान्होबांनी देवाशी कठोर भाषण केले.
आता चिंता नको व कोणाची संमती नको. माझा भाऊ गेला त्याचे कारण मला कळले. ‘आले मुळ भ्राता गेला त्याचे।. तो देव, तोच घरभेद्या आहे. आता मी त्याचे पाय धरतो आणि जेव्हा तो माझ्या भावाची मला भेट करून देईल तेव्हाच सोडीन..तेधवा या विठ्ठला..त्याचे पाय सोडीन. बरा रे निर्गुणा नष्ट नारायणा, घर बुडवा भेटलासी, इतके कठोरपणे कान्होबा देवाशी भांडतात, ‘धिंद धिंद तुझ्या करीन चिंधड्या। ऐसे काय वेड्या जाणीतले…देवा तुझा धिक्कार असो, हे म्हणण्याचा अधिकार कान्होबांना त्यांच्या तुकारामांवरील प्रेमाने प्राप्त करून दिला. पुढे एक अभंग खूपच मन हेलावणारा आहे.
‘मायबाप निमाल्यावरी। घातले भावाचे आभारी।
तोही परि हरी। तुझ जाला असमाई।।’
… आई-बापांनी मरते वेळी मला माझ्या भावाच्या पदरी घातले, हे हरी तोही तुला सहन झाला नाही.’ या सर्व अभांगांमध्ये कान्होबांमधील बंधु बोलत आहे, त्यांचे तुकारामांवरील प्रेम बोलत आहे. मध्ययुगीन काळात भारतीय तत्वज्ञानाला जे नकारात्मक वळण मिळाले त्याला विधायक दृष्टी देण्याचे कार्य संत चळवळीने केले. त्याचा प्रत्यय कान्होबांच्या अभंगात आपल्याला येतो. धर्माचा तर्काधिष्टीत पण भावपूर्ण विधायक विचार आणि सर्वसामान्यांना सहज शक्य होईल असे कृतीपूर्ण ज्ञान हे संतांचे वेगळेपण आहे.
संत कृतीशील तत्ववेत्ते होते. सॉक्रेटिस बद्दल एका अभ्यासकाने म्हटले आहे, महाराष्ट्रातील संतांनी आपल्या साहित्यातून हेच काम केले. एका अभंगात कान्होबा आत्मज्ञान मिळाल्यानंतरची आत्मस्थिती बद्दल चर्चा करतात. भारतीय तत्त्वज्ञानात आत्मज्ञानाला फार महत्व आहे. कठोपनिषदामध्ये नचिकेत्याची गोष्ट आहे. प्राचीन काळी ‘कठ’ समूहाने ते सांभाळले म्हणून त्याला कठोपनिषद असे म्हणतात. कान्होबा म्हणतात,
नमस्कारी भुते विसरोनिया याती।
तेणे आत्मस्थिती जाणितली ।।
द्वैतद्वैत नाही जया चित्ती।
तेणे आत्मस्थिती जाणितली।।
तत्कालीन ‘आत्मज्ञाना’ विषयीची जी समज होती त्याला सकारात्मक वळण कान्होबांच्या या अभंगात आहे.
आत्मज्ञानी हा लौकिक व्यवहारातुन अलिप्त राहतो.
तो आत्मचिंतनात मग्न राहतो ही नकारात्मक समज हजारो वर्ष, समाजात रुजल्यामुळे समाजातील सर्जनशील शक्ती वाया गेली.
त्याने व्यक्ती, समाज यांची अधोगती झाली. कान्होबांनी आत्मज्ञानाला व्यावहारिक जीवनाचे परिमाण दिले.
जो जाती-भेदाच्या नजरेतून माणसाकडे पाहत नाही तर तो त्यांच्यात तेच आत्मतत्व पाहतो जे तो स्वतःत पाहतो.
त्याचे वर्तन ही त्याला अनुरूप असते.
भ्रांत वेदांती कर्माच्या परिणामाला घाबरून निष्क्रिय होऊन बसतात व त्यांच्याकडे असणारी शक्ति वाया घालवतात.
कान्होबा म्हणतात की, आत्मस्थित व्यक्ती वैयक्तिक स्वार्थाच्या पुढे जाऊन तो आपली शक्ती परोपकारासाठी खर्च करतो.
शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral, kailaswagh