गोरा कुंभार (gora kumbhar)(इ.स. १२६७ – १० एप्रिल १३१७) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते. ते नामदेव व ज्ञानेश्वरांचे समकालीन मानले जातात व तज्ज्ञांच्या मते शा.श. ११८९ (इ.स. १२६७) साली त्यांचा जन्म झाला असावा.संत गोरा कुंभार यांनी अनेक अंभग लिहिले आहेत. गोरा कुंभार हे विठ्ठलाचे(पांडुरंग) मोठे भक्त होते.
संत गोरा कुंभार – जन्म (sant gora kumbhar information marathi)
“तेर’ नगरीत गोराबा काका यांच्या घराण्याची परंपरा धार्मिक वृत्तीची व सदाचारी वृत्तीची होती. “तेर’ येथील “काळेश्वर’ या ग्रामदैवतांचे त्यांचे घराणे उपासक होते. दोघे नवराबायको कुंभारकाम व काबाडकष्ट करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. सदाचारी, सच्छिल वृत्तीमुळे “तेर’ गावात माधव बुवांना “संत‘ म्हणून गावकरी ओळखत होते. माधवबुवांना आठ मुले झाली होती. त्यांना झालेली मुले जगत नव्हती. त्यांनी आपली ८ ही मुले काळेश्वराजवळील स्मशानातील गोरीत पुरली होती. ती आठही मुले जिवंत कशी झाली. यासंबंधी एक आख्यायिका संत गोरोबा काका(gora kumbhar) चरित्रामध्ये महादेव बाळाजी कुंभार यांनी सांगितली आहे. ते आपल्या चरित्रामध्ये म्हणतात,””श्री माधवबुवा “तेर’ येथील काळेश्वराची उपासना करीत होते.
त्यांना आठ पुत्र होते. त्यांना आठ पुत्र झाले. परंतु ते सर्व एकामागून एक निर्वतले. पुढे कालांतराने परमात्मा पांडुरंग ब्राह्मणाचा वेष घेऊन त्यांचे घरी आले. तेव्हा त्यांनी खिन्न मुद्रा पाहून देवांनी त्यांना विचारले की, तुम्ही दुःखी का?’ माधबुवांनी सांगितले की,”आमची आठही मुले देवाने नेली, म्हणून दुःखी आहोत’ नंतर देवाने आठ मुलांना जेथे मूठमाती दिली, ती जागा दाखविण्यास सागितले. माधवबुवांनी त्यांना काळेश्वर जवळील स्मशानात नेले, व देवास आठही मुले कोठे पुरली ती जागा दाखविली. देवांनी सर्व मुलांची प्रेते उकरण्यास सांगितली. बुवांनी त्याप्रमाणे आठही मुलांची प्रेते बाहेर काढली. देवाने पाहिले व सात मुलांना आपल्या हाताच्या स्पर्शाने जिवंत केले व त्यांना स्वर्गात पाठविले आणि नंतर आठवा मुलगा जिवंत केला.
तोही स्वर्गाच्या मार्गाने निघाला. परंतु देवाने त्यास जाऊ दिले नाही. भगवंताने त्याला आपल्या हातात घेऊन माधवबुवा रखुमाईच्या स्वाधीन केले. देव म्हणाले, ‘तुला गोरीतून काढले म्हणून तुझे नाव गोरोबा ठेवले.’
या आख्यायिकेच्या मागे चमत्काराचा भाग असलेला दिसून येतो. संतांच्या चरित्रात असे अनेकविध चैतन्याचे चमत्कार वर्णिलेले आहेत. चमत्काराचे चैतन्य असते. पण ब-याचदा समृध्द समाजाला अशा चमत्कारातून चेतना मिळण्याऐवजी त्यांच्या ठिकाणी अंधश्रध्दा बळावताना दिसते. संतांचे जीवन दर्शन घडविताना सुध्दा केवळ चमत्कार हे त्यांचे साध्य नव्हते तर साधन होते, याचे भान राखावे.
म्हणून फक्त तो त्यांच्या जीवनातील एक चमत्काराचा भाग समजावा. फार तर त्याचा सरळ सरळ अर्थ घेणे योग्य नाही. याबाबत असे म्हणता येईल की माधवबुवा धार्मिक व सहिष्णु वृत्तीचे होते. काळेश्वरावर त्यांची निस्सीम श्रध्दा व भक्ती होती. सात मुले एका मागोमाग गेली परंतु आठवा मुलगा गोरोबा (gora kumbhar) जिवंत राहिला. म्हणून माधवबुवांना तो आपल्या श्रध्देचा, भक्तीचा, महिमा वाटला. यावरुन एवढाच तर्क करता येतो किंवा अंदाज बांधता येतो की, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गारोबांचा जन्म झाला आहे.
दिनक्रम – संत गोरा कुंभार (sant gora kumbhar story)
गोरोबांच्या (gora kumbhar) मनावर लहानपणापासूनच भगवद्भक्तीचे संस्कार झाले होते.गोरोबांना (gora kumbhar) लिहायला वाचायला येत होते.ज्ञानदेव, नामदेव यांच्या पूर्वकाळात पंढरपूर हे शिव उपासकांचे/भक्तांचे केंद्र होते.अनेक शिवभक्त त्याठिकाणी आपली साधना करीत होते.ते भक्त होते, योगी होते.सिद्ध, साधकही होते.गोरोबा (gora kumbhar) जेव्हा जेव्हा पंढरपूरला जात तेंव्हा त्यांना या सिद्ध पुरुषाचं दर्शन होई.
त्यांच्या योगसाधनेचं त्यांना कौतुक वाटे, आकर्षण वाटे असे करता करता गोरोबांचा (gora kumbhar) प्रपंच आता परमार्थमय झाला होता.गोरोबा (gora kumbhar) सकाळी उठून अंघोळ करून, देवाची पूजा करणे.नंतर नामस्मरण करावं आणि ध्यानात पांडुरंगाचं रूप साठवून त्याला मनी-मानसी मुरवून घ्यावं आणि मग न्याहारी करुन कामाला लागावं, असा त्यांचा सकाळचा दिनक्रम असे.
दुपारचे जेवण झाल्यावर गोरोबा जरा विश्रांती घेत. ही विश्रांती म्हणजे झोप घेणे नव्हते.तर घराच्या ओसरीवरच्या खांबाला टेकून देवाचे नामस्मरण करीत, अभंग म्हणीत विश्रांती घेत. त्यामुळे त्यांच्या चित्ताला एक समाधानही मिळत असे.
पुन्हा लगेच मोठ्या जोमाने कामाला लागत.ते दिवस मावळेपर्यंत.दिवस मावळल्यानंतर हातपाय धुऊन पुन्हा घराच्या ओसरीवर एकतारीवर चिंपळ्याच्या साथीने भजन सुरू होई आणि रात्रीच्या जेवण्याचेवेळी ते थांबे. अन् रात्रीचे जेवण झाल्यानंतर पुन्हा भजन सुरु होई.शेजारपाजारची मंडळीही त्यात सामील होत असत.नंतर परमेश्वराचे नामस्मरण करीत झोपी जात.
मूल चिखलात तुडविले (sant gora kumbhar)
एके दिवशी गोरोबा (gora kumbhar) पायाने चिखल तुडवित होते. त्यांचे सर्व ध्यान पांडुरंगचरणी लागलेले असे. गोरोबा (gora kumbhar) जरी संसारात दंग होते. तरी विठ्ठल भक्ती आणि विठ्ठलाचे नामस्मरण हेच गोरोबांचे (gora kumbhar) जीवन झाले होते. संत जन्मतःच ईश्वरभक्त त्याचकरिता त्यांचा जन्म होता. पांडुरंगाच्या नामस्मरणात ते आपली तहानभूक हरपून जात. स्वदेहाचे भानच त्यांना राहत नसे. गोरोबाकाका (gora kumbhar) विठ्ठल भक्तीत कसे तल्लीन होत हे सांगताना संत नामदेव गोरोबा काकांच्या तन्मय वृत्तीबद्दल लिहितात. प्रेमे अंगी सदा वाचे भगवंत।
प्रेमळ तो भक्त कुंभार गोरा।।१।।
असे घराश़मी करीत व्यवहार
न पडे विसर विठोबाचा ।।२।।
कालवुनी माती तुडवीत गोरा।
आठवीत वरा रखुमाईच्या।।३।।
प्रेमे अंगी असे झाकुनी नयन
करीत भजन विठोबाचे ।।४।।
स्वतः नामदेवांनी गोरोबांच्या तन्मयवृत्तीबद्दल वरील अभंगात दिलेली स्पष्ट कबुली महत्त्वाची वाटते. गोरोबाकाकांच्या चरित्रातील हे तन्मयवृत्तीचे एक अत्यंत प्रभावी असे उदाहरण आहे. अशाप्रकारे एके दिवशी गोरोबा (gora kumbhar) देहभान हरपून अभंग म्हणत माती तुडवीत होते. त्यांचे सर्व ध्यान ईश्वरचरणी लागले होते.
अशावेळी त्यांची बायको-संती मुलाला मकरेंद्राला ठेवून पाणी आणण्याकरिता जाते आणि त्यावेळी ती म्हणते, धनी, बाळावर जरा लक्ष ठेवा. घरी त्याला सांभाळण्याकरता कोणी नाही. असे सांगून ती पाणी आणण्याकरिता निघून गेली. पण तिचे सांगणे गोरोबांनी ऐकले का? त्यावेळी गोरोबा (gora kumbhar) देहभान हरपून गेले होते. पण संतीला याची काय कल्पना! इकडे भक्त गोरोबा (gora kumbhar) पांडुरंग चरणी लीन होऊन अभंगातून विठ्ठलाचे स्मरण, जप करीत होते.
असे गोरोबा (gora kumbhar) विठ्ठल नामस्मरणात रममाण झाले होते. गोरोबा चिखल तुडवित आहेत आणि बाळ, रांगतरांगत पित्याकडे धावत आहे. अन् ते खेळत खेळत बापाचा पाय धरून उभा राहण्याचा प्रयत्न करू लागले. हसतहसत पित्याच्या पायाला धरता धरता ते चिखलात पडते. श्री.गोरोबा-काका (gora kumbhar) डोळे मिटून भाव समाधीत होते. हृदयी अनंतास आठवीत होते. देहवृत्ती शून्य दशेतच विठ्ठल नामस्मरणात रत होते. मन देवस्वरूपी एकाग्र झाले असताना त्या चिखलात त्यांचा एकलुता एक मुलगा पायाखाली आला. ते चिखलासवे मुलालाही तुडवू लागले. त्याचा व्हायचा तो अटळ परिणाम झाला. त्याविषयी एकनाथ महाराज सांगतात,नेणेवेचि बाळ की हे मृत्तिका
मन गुंतलेले देखा पांडुरंगी।।१।।
मृतिकेसम जाहला असे गोळा।
बाळ मिसळला मृतिकेत ।।२।।
रक्तमांस तेणे जाहला गोळा लाल
नेणवे तात्काळ गोरोबासी।।३।।
एका जनार्दनी उटक आणुनी कांता
पाहे तवं तत्वता बाळ न दिसे।।४।।
अशाप्रकारे मुलाचे रक्तमांस, हाडे चिखलात मिसळली. मुलाचा प्राण ताबडतोब गेला. मुलाच्या रक्तमांसाने चिखल रंगला. परमेश्वर भक्तीत तन्मय असलेल्या गोरोबांना बाळाचा स्पर्शही जाणवला नाही. जणु मूल म्हणजे चिखलाचा गोळा आणि अखेर देह मातीतच तुडविला गेला.
संती पाणी घेऊन घरी आली. पण तिला दारात मूल दिसले नाही. पाण्याची एक घागर डोईवर व दुसरी कमरेवर ठेवून ती सगळीकडे बाळाचा शोध घेऊ लागली. पण बाळाचा शोध कुठे लागेना! तिने गोरोबांना विचारले, धनी, आपला बाळ कुठे आहे? परंतु गोरोबांचे लक्ष संतीच्या विचारण्याकडे नव्हते. ते परमेश्वराच्या नामस्मरणात दंगच.
संतीने गोरोबांना खूप विचारले पण त्यांना सांगता आले नाही. शेवटी ती मनात दचकली आणि तिची नजर चिखलाकडे गेली. आपला बाळ चिखलात तुडविला गेला आहे, हे तिच्या लक्षात आले. संतीने आक्रोश सुरु केला. बायकोचा आक्रोश कानावर येताच गोरोबा ध्यानावर आले आणि संती रागारागाने गोरोबाला बोलू लागली. ती रागाच्या भरात गोरोबांना काय म्हणते? ह्याचे नामदेव आपल्या अभंगात यथोचित शब्दात वर्णन करतात.जळो हे भजन तुझे आता।
डोळे असोनिया जाहलासी आंधळा।
कोठोनी कपाळा पडलासी।
कसाबासी तरी काही येती दया।
का रे बाळराया तुडविले।
संतीच्या आकांताने मूल आपल्या पायाखाली तुडविलेले गेले आहे हे गोरोबांच्या लक्षात येते. गोरोबांना या गोष्टीचे अत्यंत वाईट वाटते. त्यांच्या अंत:करणाला खूप वेदना होतात. पण हातून झालेली चूक दुरुस्त करता येणारी नव्हती. परंतु संतीने विठ्ठलाविषयी जे अनुद्गार काढले. त्यांनी गोरोबा खवळले. त्यांनी तिला हातातील चिपळ्या फेकून मारल्या आणि चाकाचे दांडके काढून मारायला धावले. त्यावेळी संतीने गोरोबांना विठ्ठलाची आण (शपथ) घातली. याप्रसंगाचे नामदेव आपल्या अभंगात यथोचित असे वर्णन करतहातबोट मज लावशील आता
आण तुला सर्वथा विठोबाची।
ऐकतांचि ऐसे ठेवियेली काठी
राहिला उगाचि गोरा तेव्हा।।
संतीने विठ्ठलाची शपथ घातल्याने गोरोबा मारता मारता तिथेच थांबले. संतीचा आकांत सुरुच होता. शेजार-पाजारचे पुरुष बायका जमा झाल्या. त्या गोरोबांना दूषण देऊ लागल्या. संती माझा बाळा कुठे आहे? माझा बाळा कुठे आहे, म्हणून छाती बडवून घेत होती. हा सगळा प्रकार आता गोरोबाला चांगलाच उमजला अन् गोरोबा संतीला म्हणाले, कारभारणी, माझ्या हातून फार मोठी चूक झाली. कर्माची गती वेगळीच असते. देवाचे नामस्मरण करता करता त्या नामाशी एकरूप कधी झालो ते कळलेच नाही असे म्हणून गोरोबांनी आपल्या बायकोची क्षमा मागितली. संतीने देखील याप्रसंगी अखेर मनावर ताबा ठेवला.
येथे भाविकांनी, रसिकांनी गोरोबाकाकांनी मुलाला चिखलात तुडवून मारले. ह्या घटनेचा अर्थ गोरोबांच्या भावभक्तीचा प्रकार मानवा असे वाटते. कारण संतजीवनात, चरित्रात अशा अनेक चमत्कारिक घटना येतात. त्यामागे संतचरित्रे ही सर्वसामान्य माणसाहून वेगळी वाटावी. संत चरित्राचे महत्त्व वाढावे असाच भाव असलेला दिसून येतो. आणि या घटना साधकांना चेतना देणाऱ्या म्हणूनच रेखाटल्या आहेत. म्हणून अशा घटनांचा आजच्या जीवनात अर्थ घेताना भक्तिभावा चा हा प्रकार समजावा.
काही दिवस गोरोबा-संतीचा अबोला चालला, कोणीही कोणाशीच बोलेना चालेला. एके दिवशी संतीने असा विचार केला की, असा अबोला धरून आपला संसार कसा चालणार? संतीला मुलाची आणि मातृत्वाची ओढ होती. “आण ना बाण उगीचच संसारात ताण’ निर्माण झाला. उगाउगी आपण धन्याला विठ्ठलाची आण घातली. त्यामुळेच त्यांनी प्रपंचा विषयी विरक्ती स्विकारली, संसारापासून दूर जाऊ लागले असे तिला वाटू लागले. गोरोबा संसारात उदास राहून परमेश्वरात आणि त्याच्या नामस्मरणात अधिक एकरूप होऊ लागले. गोरोबांची संसाराविषयीची उदासीनता संतीला सहन होत नव्हती.
एक वंशाचा दिवा गेला आता वंशाला दुसरा दिवा हवा. संत गोरोबांनी तर संसारात पूर्णपणे वैराग्य पत्करलेले. शेवटी संतीने मनाशी विचार केला अन् ती एके दिवशी गोरोबांचे पाय धुण्याकरिता गेली असता गोरोबा म्हणतात, खबरदार, माझ्या अंगाला स्पर्श करशील तर! अग तू मला विठ्ठलाची शपथ घातली आहेस ना? मग माझ्या अंगाला हात का लावतीस! जर माझ्या अंगाला हात लावशील तर तुलाही पांडुरंगाची शपथ! अग सूर्य पश्चिमेस उगवेल! समुद्र आपली मर्यादा सोडील परंतु विठ्ठलाची शपथ मी कधी मोडणार नाही.
अशाप्रकारे असे बरेच दिवस गेले. गोरोबांची अवस्था असोनि संत नसोनी संसारी अशीच झाली होती. अखंड नामस्मरण देवाची भक्ती आणि आपला कामधंदा एवढेच त्यांना माहीत होते. एक वर्ष होऊन गेले तरी त्यांनी संतीच्या अंगाला स्पर्श केला नाही. दुरुनच बोलणे, वागणे. संतीसारखी भावूक मनाची प्रेमऴ, संसारी स्त्री हा दुरावा किती दिवस सहन करणार? तिने गोरोबाची काळजी परोपरीने घ्यायला सुरुवात केली. तिची ही पतिसेवा दिवसेंदिवस एखाद्या व्रतासारखी होऊ लागली.
ती गोरोबांना जीवापलीकडे जपू लागली. तरीही गोरोबा तिच्याशी अलिप्तवृत्तीने वागू लागले. त्यामुळे संतीच्या जीवाला एकप्रकारची काळजी लागून गेली. आपण भावनेच्या, दु:खाच्या भरात आपण वाटेल तसे मनाला येईल तसे बोलून जातो. पण त्याचा केवठा मोठा विपरित परिणाम भोगावा लागतो. यातून संतीच्या मनातील संसाराची चिंता आणि गोरोबांच्या मनाची विरक्ती दिसून येते. या सर्व प्रसंगातून गोरोबांच्या कुटुंबाची मानसिकताही स्पष्ट होते.
गोरोबांनी दोन्ही हात तोडले
रामी ऊर्फ राणी आणि गोरोबा यांचा विवाह आनंदात पार पडला. परंतु गोरोबांनी संतीप्रमाणे रामीलाही स्पर्श केला नाही. रामीच्या हितासाठी संतीने एक युक्ती योजिली. ती आपल्या बहिणीला रामीला म्हणाली, हे बघ रामी, आता मी सांगेन तसं वागायचं आपण त्यांना विठोबाची शपथ मोडण्यास भाग पाडू. संतीचे हे बोलणे ऐकून रामी म्हणाली, पण आक्का, ते कसं?
असं नाही तसं नाही. असं म्हणायचं नाही. मी सांगेन तसंच वागायचं! असे संतीने रामीला सांगितले.
संतीने काय करायचे ते रामीला समजावून सांगितले. एका रात्री दोघींनी मिळून त्याप्रमाणे विचार केला. आणि गोरोबा दिवसभर नामस्मरण व भजन करून शांतपणे झोली गेले. अन् संती आणि रामी गोरोबाच्या दोन्ही बाजूस झोपल्या उजव्या हाताला संती आणि डाव्या हाताला रामी झोपली आणि संतीने ठरल्याप्रमाणे गोरोबाचा डावा हात उचलून आपल्या छातीवर ठेवला रामीनेही गोरोबांचा उजवा हात उचलून आपल्या छातीवर ठेवला. अन् दोघीही शांतपणे झोपी गेल्या.
रामी ऊर्फ राणी आणि गोरोबा यांचा विवाह आनंदात पार पडला. परंतु गोरोबांनी संतीप्रमाणे रामीलाही स्पर्श केला नाही. रामीच्या हितासाठी संतीने एक युक्ती योजिली. ती आपल्या बहिणीला रामीला म्हणाली, हे बघ रामी, आता मी सांगेन तसं वागायचं आपण त्यांना विठोबाची शपथ मोडण्यास भाग पाडू. संतीचे हे बोलणे ऐकून रामी म्हणाली, पण आक्का, ते कसं?
असं नाही तसं नाही. असं म्हणायचं नाही. मी सांगेन तसंच वागायचं! असे संतीने रामीला सांगितले.
संतीने काय करायचे ते रामीला समजावून सांगितले. एका रात्री दोघींनी मिळून त्याप्रमाणे विचार केला. आणि गोरोबा दिवसभर नामस्मरण व भजन करून शांतपणे झोली गेले. अन् संती आणि रामी गोरोबाच्या दोन्ही बाजूस झोपल्या उजव्या हाताला संती आणि डाव्या हाताला रामी झोपली आणि संतीने ठरल्याप्रमाणे गोरोबाचा डावा हात उचलून आपल्या छातीवर ठेवला रामीनेही गोरोबांचा उजवा हात उचलून आपल्या छातीवर ठेवला. अन् दोघीही शांतपणे झोपी गेल्या.
गोरोबा स्नान, पूजा, नामस्मरण, भजन करण्यासाठी लवकर उठत असत. पहाटे त्यांना जाग आली तेव्हा आपले दोन्ही हात कुणीतरी घट्ट धरून ठेवले आहेत. अंधारात त्यांना काही कळेनासे झाले. एवढ्यात बांगड्याचा आवाज ऐकल्याबरोबर त्यांना शंका आली
गोरोबा झटकन् उठले. त्यांना संती व रामी यांचा अत्यंत राग आला गोरोबांचा राग-संताप पाहून रामी व संती मनातल्या मनात फार घाबरून गेल्या गोरोबांचा संताप पाहून संतीने त्यांना दोघींनी केलेला सारा प्रकार सांगितला. तेव्हा गोरोबा म्हणाले, यात तुमचा काही दोष नाही तो माझ्या हातांचाच दोष आहे. अरेरे! घात झाला. मी माझ्या हातांनी विठ्ठलाची शपथ मोडली. विठ्ठल मला भेटायला आला नाही. मी एवढा भाग्यवान नाही मी त्याची शपथ मोडली म्हणून तो तर आणखी दूर गेला.
गोरोबांना झाल्या गोष्टीचा पश्चाताप झाला, दुःख झाले अन् ते संतीला रामीला म्हणाले, हे काय केले तुम्ही माझ्या विठ्ठलाची आण मोडली संती, मी तुझ्या म्हणण्यानुसार दुसरे लग्न केले. तुला अन् रामीला मी उगीच त्रास दिला. असे हे माझ्या हातून दुहेरी पाप घडले. माझे हातच अपराधी आहेत. या अपराधी हातांना शासन झाले पाहिजे. रामी आणि संती तुम्ही दोघीही मनाने स्वच्छ आहात. नवऱ्यावर त्यांचा अधिकारही आहे. पण आता मी काय करु! मी विठ्ठलाची आण मोडली! नामदेव महाराजांनी गोरोबांच्या या स्थितीचे पुढीलप्रमाणे वर्णन केलेले आहे,विठोबाची माझ्या मोडियेली आण।
गोरोबा स्नान, पूजा, नामस्मरण, भजन करण्यासाठी लवकर उठत असत. पहाटे त्यांना जाग आली तेव्हा आपले दोन्ही हात कुणीतरी घट्ट धरून ठेवले आहेत. अंधारात त्यांना काही कळेनासे झाले. एवढ्यात बांगड्याचा आवाज ऐकल्याबरोबर त्यांना शंका आली, पाहिले तर त्याच्या शेजारी रात्री संती व रामी झोपल्या होत्या.
घेऊनिया शस्त्र तोडियले कर।
आनंदला फार गोरा तेव्हा।।
गोरोबांनी शस्त्र घेऊनी आपले दोन्ही हात मनगटापासून तोडून घ्यायचे ठरविले. झाल्या चुकीबद्दल संती-रामी यांनी गोरोबांची खूप क्षमा मागितली, अन् त्या दुःखाने व्यथित होऊन गोरोबापासून दूर निघून गेल्या अन् घरकामाला लागल्या. आणि इकडे गोरोबांनी धारदार शस्त्रावर दोन्ही हात आपटून घेतले. गोरोबांचे हात तुटले. त्यांना शारीरिक वेदना खूप झाल्या. पण प्रायश्चित घेतल्याचे समाधान त्यांना वाटत होते. हा प्रसंग वर्णन करताना संत नामदेव अमृतवाडी ग्रंथामध्ये लिहितात,लग्न झाल्यावरी घाली वोसंगळा।
दोघासही पाळा समानची।।
न पाळीता आण तुम्हा विठोबाची।
धराया शब्दाची आठवण।
अवश्य म्हणोनिया निघाला तो गोरा।
आला असे घरा आपुलिया।।
कनिष्ठ स्त्रियेशी आले असे न्हाण।
न करी भाषण तिसी काही।।
संतीला आपला नवरा आपल्याशी अन् रामीशी संभाषण करीत नाही याचे आश्चर्य वाटते. त्यावर गोरोबा सांगतात की, मला सास-यांनी विठ्ठलाची शपथ घातली आहे. दोघींना मी सारखेच वागवणार आहे. संतीला या गोष्टीचे वाईट वाटते आपला वंश कसा वाढणार? ही संतीला काळजी होती. दोघी गोरोबांना न सांगता, न कळता त्यांच्या शेजारी झोपण्याचे ठरवितात त्यातून पुढील अनर्थ घडतो आणि विठ्ठलाची आण मोडल्याने गोरोबा आपले हात तोडून टाकतात संती अन् रामी हे दृश्य पाहतात अन् कावऱ्याबावऱ्या होतात.
कारण गोरोबांनी हात तोडले तिथे रक्ताचा थेंबही दिसला नाही. अन् शारीरावर जखमही कोठे दिसेना. गोरोबा संतीला व रामीला म्हणाले, तुम्हा दोघींना दोन हात दिलेत ते घ्या आणि तेरणा नदीच्या पलीकडे टाका.
त्याप्रमाणे त्या दोघी गोरोबांच्या आज्ञेप्रमाणे हात तेरणा नदीपलिकडे टाकतात. अन् पाहतात तर नवल दोन्ही हात गुप्त झाले. भाविकांनी व रसिकांनी घटनेचा अर्थ असा घ्यावा, की गोरोबांनी संसाराचा त्याग करून परमेश्वर भक्तीचाच मार्ग स्वीकारला आणि आपले दोन्ही हात दोघी बायकांना दिले म्हणजे आता संसाराची धुरा तुम्ही दोघीच व्हा असे सांगितले.
अन् आपला पती परमेश्वर भक्त आहे याची संतीला खात्री झाली. गोरोबांचे श़ेष्ठत्व तिच्या लक्षात आले आणि तिच्या मनाचे परिवर्तन झाले. तसेच गोरोबांनी हात तोडले याचा अर्थ असा घ्यावा की, गोरोबा संसार पाशातून विरक्त वृत्तीने राहू लागले. विठ्ठल भक्ती व नामस्मरण यासाठी हात वर्ज्य केले असा हा हात तोडले याचा अर्थ लक्षात घेता येईल. गोरोबांच्या या सर्व कृतीतून आपल्या माणसाबद्दलची आत्मीयता आणि भक्तीमार्गावरील अढळ श़द्धा किती प्रभावी होती हे स्पष्ट होते.
गोरोबांनी आपल्या पारंपरिक व्यवसायाचा त्याग केला, संतीने आणि रामीने गोरोबांचे मोठेपण मान्य केले अऩ् त्या दोघी संसार करू लागल्या, पण गोरोबांनी वैराग्यवृत्ती धारण केल्याने घरात धन-धान्य याची कमतरता भासू लागली. दोघी चिंतातुर होऊन कसाबसा संसार सावरू लागल्या. पण शेवटी भक्ताच्या संसाराची काळजी परमेश्वरालाच असते
पांडुरंगे धरिला कुंभारवेष – (sant gora kumbhar)
गोरोबांनी हात तोडून घेतले त्यामुळे संती-रामी यांना फार दुःख झाले.गावातील दुष्ट चांडाळ होते ते गोरोबांची निंदा करु लागले.हात तोडायची काय गरज होती.आता आम्हाकडे जर मदत मागायला आला तरी आम्ही तिळमात्र मदत करणार नाही.पण गोरोबांनी निंदकाचे घर असावे शेजारी या न्यायाने त्यांच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.क्षेमकुशल आणि कल्याण याची काळजी परमेश्वराला असते.आपला भक्त गोरोबा याच्या संसाराची दयनीय अवस्था पाहून विठ्ठलाला काळजी वाटते.ते गोरोबांच्या घरी भक्ताचे येथे जावयाचे ठरवतात.
विठ्ठलाबरोबर रुक्मिणी आणि गरुडही जावयास तयार होतात.ते तिघेही वेष पालटून ढोकीस निघाले.विठ्ठल स्वतः विठू कुंभार झाले.विठ्ठलाच्या सांगण्यावरून रुक्मा कुंभारीण झाली.गरुड गाढव झाले.विठ्ठलाने कुंभाराचे रूपधारण केले.डोक्यावर वेडेवाकडे पागोटे घातले.अंगात बंद नसलेली बाराबंदी घातली.जीर्ण धोतर नेसले.रुक्मिणीने जीर्ण-जुने असे लुगडे नेसले.कपाळावर आडवे कुंकू लावले. नाकात मोत्याची झुपकेदार नथ घातली.गरुड गाढव झाले.
अशाप्रकारे तिघे वेष पालटून तेर गावात आले.अन् आम्ही कुंभार आहोत आणि आम्हाला काम मिळावे म्हणून ते गावात फिरू लागले.गावातल्या लोकांना कुंभाररूपी विठ्ठल सांगू लागले, मी नावाचा विठू कुंभार.रुक्मा माझी बायको.आमचे कुटुंब मोठे आहे.कामधंदा करुन पोट भरण्यासाठी आम्ही आपल्या गावी आलो आहे. कारण आमच्या गावी दुष्काळ पडलेला आहे.आम्ही मन लावून काम करु.आम्हाला मडकी घडावयास व भाजावयास येतात.आमचे काम तरी बघून मग आम्हाला ठेवून घ्या.असे चक्रपाणीचे हे सत्य बोलणे कोणाला कळेना तेर गावातील प्रत्येक जण म्हणू लागला हा गरीब कुंभार आहे.
त्याला गोरोबांच्या घरी पाठवूया. आणि गावकरी विठू कुंभाराला सांगू लागले, आमच्या गावचा गोरा कुंभार त्याने आपले हात तोडून घेतले आहेत तेथे तुम्हाला कामधंदा मिळेल.गावकऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे देव गोरोबाच्या घरी जातात अन् गोरा कुंभारला म्हणतात, आम्हांला काहीतरी काम द्या.आम्हांला पैश्याची अपेक्षा नाही.आपण जे सांगाल ते काम करु. यावर गोरोबा काका विचारतात आपण कोण? कुठले? आपले नांव गाव सांगा? तुम्ही कोणता कामधंदा करु शकता? त्यावर देव म्हणाले, मी विठू कुंभार माझी बायको रुक्मा कुंभारीण.आम्हां दोघांची एकमेकाला साथ आहे.हे गाढव (गरुड) आमचे कामधंद्याचे वाहन.
आम्ही कारगीर आहोत.मडकी घडणे भाजणे हा आमुचा व्यवसाय आहे.आम्ही पंढरपूर भागातील रहिवासी.आमच्या भागात दुष्काळ पडलेला आहे.म्हणून आम्ही कामधंद्याच्या शोधार्थ, पोट भरण्यासाठी देशोदेशी फिरत आहोत पण हे सांगताना आपण देव आहोत हे कळून दिले नाही.अन् म्हणाले, आपण द्याल ते काम करु आणि मिळेल ते पोटाला खाऊ.गोरोबांनी त्यांना आनंदाने कामाला ठेऊन घेतले.तिघेही आनंदाने गोरोबांच्या घरी राहिले.अन् भक्ताच्या घरी देव माती वाहू लागले.
नानाप्रकारची मडकी घडू लागले.प्रेमाने भक्ताच्या घरी काम करु लागले (भाविकांनी ही मूळ कथा ब्रह्म-वैवर्त पुराणात पहावी) गरुड माती वाही.विठ्ठल चिखल तुडवी.रुक्मिणी पाणी भरी.अन् विठ्ठल चाकावर नाना प्रकारची गाडगी-मडकी तयार करु लागला.भगवंत विठ्ठल आपल्या भक्ताच्या नानाप्रकारची कलाकुसरीची मडकी तयार करु लागला आणि ती गाडगी मडकी जाळ्यामध्ये बांधून विठ्ठल आणि रुक्मिणी आसपासच्या गावी बाजारात गाडगी मडकी विकू लागले.विठ्ठलाने कुंभारवेषात तयार केलेली मडकी घेण्यासाठी आसपासच्या गावातील व तेरमधील स्त्रिया मडकी घेऊ लागल्या.स्त्रिया विठ्ठलरुपी कुंभाराचे कौतुक करु लागल्या.
कुंभारवेष धारण केलेले पांडुरंग आणि रुक्मिणी दिवसभर कुंभारकाम करीत असत. उभयतांना कामाचा कंटाळा असा नसे. संध्याकाळी रुक्मिणी स्वयंपाक करी. गोरोबा आणि विठ्ठल एका पात्रात जेवत असत. संती-रामी यांना वेगवेगळ्या पात्रात वाढी आणि गरुडासाठीही स्वतंत्र पात्र करीत असत. रुक्मिणीने केलेल्या स्वयंपाकाचा सर्वजण आस्वाद घेऊ लागले. एके दिवशी गोरोबा व विठ्ठल एका पात्रात जेवू लागले. विठ्ठल गोरोबाच्या मुखी घास घालून भक्ताला भरवू लागला गोरोबाही विठ्ठलला भरवू लागला.
आणि संतीही गोरोबांची सेवा करु लागली. लोकही गोरोबाचे हात नसल्याने त्यांच्याकडून आता गाडगी-मडकी मिळणार नाहीत म्हणून स्त्रिया विठ्ठलरूपी कुंभाराकडून तयार झालेली मडकी विकत घेऊ लागल्या. आणि स्त्रिया गाडगी मडकी घेत असत पण त्याच्या मोबदला देत नसत आणि विठ्ठल व गरुड शेवटी कौशल्याने सर्वांकडून धनधान्याच्या रूपात बैते गोळा करून गोरोबाच्या घरी आणून टाकीत असत.
अशाप्रकारे परमभक्त गोरोबांच्या घरी सेवेसाठी विठ्ठल-रुक्मिणी आले. ते गोरोबांची आणि त्यांच्या कुटुंबाची ही सेवा करु लागले. इतर भक्तांना विठ्ठल कुठेही दिसेना म्हणून विठ्ठलाच्या शोधार्थ संतपरिवार गोरोबाच्या गावी जायचे ठरवतात. तेर नगरीत पांडुरंग सात महिने सव्वीस दिवस राहिले.
संत गोरा कुंभार यांच्या कार्याची महती : sant gora kumbhar
श्री.संत गोरा कुंभार यांचे जीवन एका सर्वसाधारण कुटुंबात व्यतीत झाले परंतु त्यांनी आपला भक्तीभाव जपला अन् आपला प्रपंच परमार्थमय करुन टाकला. संसार आणि परमार्थ त्यांनी वेगळा मानला नाही.
श्री.संत गोरोबाकाका यांनी भक्ती आणि नामस्मरण या साधनांच्याद्वारे करणी करे तो नरका नारायण’ होईल म्हणजेच “विठ्ठल भक्तच विठ्ठल होऊन गेले’ अशी ही पंढरीच्या पांडुरंगाची किमया त्यांनी सर्वांना पटवून दिली. संत गोरोबा संत-मंडळात “वडील’ होतेच इतकेच नव्हे तर महाभागवतानाही आदरणीय, वंदनीय होते. संत गोरोबा विरागी पुरुष होते. अनंत, निर्गुण, निराकार अश परब्रह्माचे लौकिक रुप म्हणजे “गोरोबा’ म्हणून सर्व संत त्यांना “काका’ उपाधी बहाल करतात.पंढरीच्या पांडुरंगाचे नाम महात्म्य सांगताना संत गोरोबा म्हणतात,”तूझे रुप चित्ती राहो। मुखी तुझे नाम।
देह प्रपंचाचा दास। सुखे करी काम।।
देहधारी जो तो त्याचे। विहीत नित्यकर्म।।
तुझ्या परी वाहिला मी। देहभाव सारा।।
उडे अंतराळी आत्मा सोडुनी पसारा।।
नाम तुझे गोरा। होऊनि निष्काम।।’
गोरोबांच्या ह्या अभंगातून कोणीही अनन्य भावांनी वारकरी पंथात यावे कपाळी अबीर बुक्का लावावा. गळ्यात माळ घालावी आणि पांडुरंगांच नामस्मरण करीत आपला जीवनक्रम चालू ठेवावा. शुध्द अंतःकरणात फक्त भक्तीभावावरुन कळी फुलून द्यावी म्हणजेच त्या भक्तीचा परिमल सर्वत्र दरवळतो. इतकेच नव्हे तर तो
“देवाचा लाडका पुत्र म्हणून सन्मानित होतो ‘ त्यापैकीच गोरोबाकाका होत. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात म्हटल्याप्रमाणे “संसारी असावे असुनी नसावे. भजन करावे सदोदीत.’ संत गोरोबा संसारात राहत होते. तरीही त्यांची पांडुरंग चरणी एकनिष्ठा होती. “कासयासी बहु घालिसी मळण. तुज येणेविण काय काज. एकपणे एक एकपणे एक. एकाचे अनेक विस्तारले’ हा त्यांचा पारमार्थिक भाव होता
मराठी संतांनी भक्तिमार्गाची कास धरुन भागवत धर्माचा पुरस्कार केला. माणसे सुधारावीत त्यांच्यातील मानवाची, माणुसकीची पातळी उच्चतम करावी, याच तळमळीने संत उपदेश करीत असतात. सात्त्विकपणा, शुध्दाचरण, सद्गुण यांचा विकास आणि श़ध्दामय जीवन याविषयी सर्व संतमंडळींचा स्थायीभाव होता. स्वतः संत व्हावे सभोवतालच्या लोकांवर संतपणाचे संस्कार करावेत. संतपण समाजात पसरावे अशी तळमळ मराठी संतांना होती. आणखी संतांचे विशेष सांगावयाचे म्हणजे
“संत जनहिताची मनोगते, संत श़ध्देची अंतःकुजिते, सदा संत देती स्फुर्ती, संत निर्वाणीचे सोबती, संत निर्गुणाचे गुणाकार, संत भवरोगाचे भागाकार, संत पाप तभसी भास्कर, संत वैद्य सर्वांना हे सर्व विशेषभाव इ. ज्यांच्या जीवनचरित्रात आढळतात. त्यापैकी संत शिरोमणी गोरोबाकाका एक होत. संत गोरोबांनी भागवत धर्माची प्रतिज्ञा भक्तीचा प्रचार व प्रसार करणे.
त्यांनी स्वतःचा पारंपारिक कुंभार व्यवसाय करीत संसारही केला आणि संतपणाही सांभाळीत भागवत धर्माची प्रतिज्ञा पार पाडली. भागवत धर्माच्या या प्रतिज्ञेशिवाय पंढरीचा वारकरी मनुष्यच ठरत नाही. जो उगवला दिवस देवाला स्मरुन सार्थकी लावतो तोच वारकरी ठरतो. मग तो आपल्या घरीदारी, नियत कर्तव्यकर्मात, अरण्यात, डोंगर द-याखो-यात कोठेही असो. जे स्वार्थनिष्ठ, लोभी ते वारकरी संत नाहीत.
निरनिराळ्या सांप्रदायिक स्वरुपाचे कोणी मानवमात्राच्या कल्याणाचा ध्यास घेणारे, त्याचाच सतत विचार करतात तेच साधुसंत होत. अशा साधुसंतांच्या पुण्याईने समाज साजिवंत राहत असतो. असा महाभाग संसारीही असू शकतो. आपल्या अश़ितांचे भयापासून संरक्षण करावे हा क्रम गृहस्थाश़मी संत सतत पाळत असतात संत गुणदोषांची पारख करुन जनसामान्यातला परमेश्वर जागा करण्याचा प्रयत्न श़ध्देने करतात. याचबरोबर जनकल्याणाचे कार्य निरपेक्ष भावनेने करतात. या कार्यालाच यज्ञ म्हणतात. “जे जे आपणाशी ठावे. ते ते इतरांशी सांगावे. शहाणे करुन सोडवे सकळ जन.. ‘ या उक्तीप्रमाणे ते संत ज्ञानयज्ञ करतात. जनयज्ञ करतात तो त्यांचा पुरुषार्थ अपूर्वच होय.
संतांचे अभंग वाङ्मय जे अभंग असते. ते भाविकांस भेटले की, तो आपण होऊनच संतांचा गुणगौरव करतो. संत मात्र रसिक, भाविक,वाचक, अभ्यासक आणि समिक्षकांच्या “निंदा स्तुतीवर लावोणी फाटी’ म्हणजे त्यांच्या टीका टिपणीचा विचार न करता त्यांचा ज्ञानयज्ञ आणि जनयज्ञ आपण असेतोपर्यंत व पश्चातापही सातत्याने पाळलेला असतो. संत शिरोमणी गोरोबाकाका यांची अभंग संख्या कमी असली तरी अभंगवाणीत आढळणारी उत्कटता, भावसमृध्दी यामुळे संतमेळ्यातील त्यांची अभंगरचना त्यांच्या कर्तृत्वाची ग्वाही देणारी आहे. इतकेच नव्हे तर त्यांचे अभंग त्यांच्या जीवनाशी निगडीत आहेत. त्यांच्या अभंगवाणीतून साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार, उत्कट भक्तीचा अनुभव, अनुभवाची संपन्नता, पवित्र
आणि समृध्द असा ज्ञानानुभूतीचा प्रत्यय ही त्यांच्या अभंगवाणीतून प्रत्ययास येतो नुसतीच व्यर्थ बडबड करणा-यांच्या निरर्थकतेला रामराम करुन अशा आजच्या जमान्यात “देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो.’ अशा “निश्चयाचा महामेरु’, “आवडता डिंगरु केशवाचा’ असे संतशिरोमणी गोरोबाकाका समाजाच्या खालच्या थरातला एक कुंभार आपण ब्रह्मांडाशी एकरुप झाल्याचा असा विलक्षण अनुभव घेतो की, जो योग्यानासुध्दा दुर्मिळ असतो. अद्वैताचा हा अवर्णनीय आनंद आपल्या दरिद्री प्रपंचात राहूनच त्यांनी प्राप्त केला आहे. अभेदाचे बौध्दिक ज्ञान वेगळे, हे सुखाचे सुख, हे भाग्याचे सौभाग्य, हा अत्यानंदाचा आनंदकंद, गोरोबाकाका आपल्या भक्तिभाव बळावर मिळवू शकले.
अन् “मौनं सर्वार्थ साधनम्’ असे ब्रीद उरी बाळगणाऱ्या शीलवान कर्मयोग्यास अवघे पन्नास वर्षाचे आयुष्यमान लाभले होते. संत गोरोबाकाकांनी अनंत काळाला आपल्या जीवनचरित्राचा आणि कार्याचा, कर्तृत्वाचा जो आदर्श निर्माण केला होता तो इतिहासाला कदापिही विसरता येणार नाही.
तेर गावी गोरोबाकाका समाधीस्त – sant gora kumbhar
शालीवाहीन शके ११०० मध्ये अनेक संतांनी अवतार घेतले. अन् भक्तीच्या मार्गाचा प्रसार करुन त्यांनी जनकल्याणाचे दैदीप्यमान असे कार्य केले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा आजही जनमाणसांच्या मनावर उमटलेला आहे. “ईष्वरनिष्ठांच्या मांदियाळी’ ने जनकल्याणासाठी तीर्थयाख केल्यानंतर ते धन्य पावले. त्यानंतर अनेकांनी समाधी घेतली. ज्ञानेश्वर, सोपानदेव, चांगदेव, निवृत्तीनाथ, इ. नी समाधी घेतली. मुक्ताई ग्रह्मस्वरुप लीन झाली. या संतांच्या समाधी सोहळ्यास पांडुरंगासंगे गोरोबाकाकाही होते. त्या समाधी प्रसंगांचे वर्णन नामदेव गाथेत नामदेवांनी केलेले आहे ते वाचकांनी वाचावे. पांडुरंगाच्या हस्ते सावतामाळी, नरहरी सोनार, परिसा भागवत, कुर्मा, विसोबा खेचर इ. चारही समाधी सोहळा पांडुरंग हस्ते पार पडला. अशा प्रकारे वैष्णव समुदायाचा समाधी सोहळा संपन्न झाला.
अन् सकल संत समाधीस्त झाल्याने दुरावले. सकलसंत निजधामा गेल्याने गोरोबाकाका मनाने खिन्न झाले. सकल संतांचे अभंग गाऊन पांडुरंग गोरोबाकाकांचे (gora kumbhar) सांत्वन करु लागले. पण गोरोबाकाका विठ्ठलाला म्हणू लागले. संतसंगविना माझे कशातही लक्ष लागत नाही, मनाला समाधान लाभत नाही, संतसंगाशिवाय मला कशाचीही गोडी वाटत नाही, उदा, खिन्न गोरोबाकाका (gora kumbhar) पांडुरंगाच्या मुखाकडे पाहत आणि व्याकुळ होत होते. चैत्र वैद्य दशमी दिवशी गोरोबाकाका खिन्न मनाने विचार करु लागले, “”संतदर्शनाला आता मी पारखा झालो.
संताशिवाय माझे दुसरे कोणीही सोयरे नाहीत. संतसंगतीशिवाय मला दुसरे काही आवडत नाही. संत प्रेमानी मला वेडे केले आहे. संतांच्या प्रेमात मी बांधला गेलो आहे. त्यांच्या प्रेमामुळे मला मी विसरलो आहे. पांडुरंगाने गोरोबाची (gora kumbhar) ही स्थिती जाणली आणि गरुडाला सांगून पंढरपुरातून रुक्मिणीसह ज्येष्ठ-श़ेष्ठ अशा वैष्णव भक्तांना तेरला आणावयास सांगितले. भक्त पुंडलिकासह रुक्मिणी सनकदीक, नारद इ. ची दाटी झाली. पांडुरंगाने गोरोबास अलिंगन दिले. भक्त आणि पांडुरंगाची ही भेट पाहून सकलसंतांच्या डोळ्यात आनंदाश़ू उभे राहिले.
पताका, टाळ, दिंडीसह संतमंडळीही गंध, चंदन, बेलाची पाने, अक्षता, अर्पूण, निरंजन लावू लागले. प्रत्येकजण संत गोरोबाकाकांना (gora kumbhar) प्रेमभरे भेटू लागले आणि समाधीसाठी आवश्यक असणारी शेज पांडुरंगाने तयार केली. नामाचा गजर करुन इ.स. १३१७ (शके १२६७)साली कृष्णपक्ष त्रैयोदशीस दुपारच्या समयी तेर येथे पांडुरंगानी गोरोबाकाकांना (gora kumbhar) समाधीस्थळी बसविले. तेर येथे कालेश्वर लिंगाशेजारी गोरोबांची समाधी आहे. अशारितीने श्री गोरोबाकाका (gora kumbhar) यांचे व्यक्तिमत्व, जीवन चरित्र अलौकिक असेच होते. ते परग्रह्म होऊन जीवनमुक्तांचे जीवन जगले. गोरोबाकाकांच्या (gora kumbhar) जीवनचरित्र वाचनाने या जगातील अज्ञानी लोक जितके शहाणे
होतील तितके अधिक या भूमंडळातील लोकजीवनातील दुःखे कमी झाल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर रामनाम जपाने गणिकेचा उध्दार झाला अजामिळाला मुक्ती मिळाली. पापी लोक हरिनामाने तरले हे आपणां सर्वांना ज्ञात आहेच. म्हणून संतशिरोमणी गोरोबाकाका (gora kumbhar) यांच्या जीवनचरित्रातून एकच संदेश घेता येईल, असे वाटते तो म्हणजे, “विठ्ठलमंत्र सोपा असुनी एकेवळी तरी उच्चारावा’ या मंत्राने साधक व भाविक भक्तांचे, जनसामान्यांचे जीवनतंत्र सुधारेल. जनसामान्यांना त्यांचे जीवन आदर्श भक्त कसा असावा? यासाठी प्रेरणादायी चैतन्यदायी असे वाटते.
तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
नमस्कार ? खूप सुंदर माहिती बद्दल धन्यवाद ? संत गोरा कुंभार यांचे गुरू कोण होते ?
खूप सुन्दर रितिन विवरण दिल आहे.धन्यवाद
खूप सुन्दर रितिन विवरण दिल आहे.धन्यवाद.
धन्यवाद.
वाचून सुन्न झालो
वाचायला सुरुवात केल्यानंतर शेवटपर्यंत वाचल्याशिवाय सोडू वाटले नाही
खूपच सुंदर चरित्र.. तसेच भावर्थाचे अध्यात्मिक विवेचण.. मनस्वी धन्यवाद. रामकृष्ण हरी..
खूप छान माहिती देण्यात आलेली आहे धन्यवाद
खूपच छान लेख संगोराम काका बद्दल प्रस्तुत केला धन्यवाद. जयजय रामकृष्ण हरी.